Home Blog Page 2081

खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक

0

मुंबई, दि. 18 : करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या संचालकाला महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाने काल मुंबईतील गिरगांव येथून अटक केली.में. एव्हरंट फेरोमेट प्रायव्हेट लिमिटेड या मुंबईस्थित कंपनीने मोठ्या प्रमाणावर बोगस देयके प्राप्त केल्याचे विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या संचालकांना याबाबत विचारणा केली असता कंपनीच्या संचालकांनी सुरुवातीला आपल्याला या कंपनीच्या व्यवहारांबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. मात्र काही कालावधीनंतर आपणच या कंपनीच्या सर्व कारभाराबाबत जबाबदार असल्याचे विभागाला कळविले. मात्र कंपनीने घेतलेल्या बोगस देयकांसंदर्भात समाधानकारक माहिती कंपनीचे संचालक देऊ शकले नाहीत; तसेच या संदर्भात विभागाने कळविलेल्या कराचा भरणादेखील कंपनीने केला नाही.

विभागाने या कंपनीच्या संचालकाला 162 कोटी रुपयांची बोगस बिले घेऊन 29 कोटी रुपये इतका बोगस इनपूट टॅक्स क्रेडीट प्राप्त केल्याप्रकरणी अटक केली. महानगर दंडाधिकाऱ्यांनी कंपनीच्या संचालकास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सहाय्यक राज्यकर आयुक्त रामचंद्र एन. मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली आहे.

करचुकवेगीरी करणाऱ्या करदात्यावर कारवाई करीत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने आतापर्यंत 16 वेगवेगळ्या प्रकरणांत अटकेची कारवाई केली असून 3 हजार कोटी रुपयांहून अधीकचे बोगस देयकांचे घोटाळे उघडकीस आणले आहेत.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील गाड्यांना वारंवार होणाऱ्या अपघातांची चौकशी करावी

0

आमदार रमेशदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, दि. १८ फेब्रुवारी – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर काल गुरुवारी सातारा, महाबळेश्वर दौऱ्यावर शासकीय वाहनांनी जाताना पुणे-बंगळुरू महामार्गावर पारगाव–खंडाळा येथे त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला. गेल्या वर्षभराच्या काळात तीन वेळा दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या ताफ्यातील गाड्यांना झालेला अपघात हा घातपात तर नाही ना अशी शंका व्यक्त होण्यास वाव असल्यामुळे या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रमेशदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आमदार रमेश पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रानुसार, विरोधी पक्ष या नात्याने अनेक वेळा समाजातील कुप्रवृत्तीविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध, गुन्हेगारीविरुद्ध, अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून स्पष्ट भूमिका मांडावी लागते. अशा परिस्थितीत घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापूर्वी घडलेल्या तिन्ही अपघात तसेच कालच्या अपघाताच्या घटनेचे गांभीर्य ध्यानात घेऊन या सर्व प्रकरणांची विशेष तपास पथकांमार्फत चौकशी करण्याची तसेच विरोधी पक्षनेते दरेकर यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय घेऊन सहकार्य करण्याची विनंती रमेशदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

खासदार बापटांनी उडविली खिल्ली ..म्हणाले राष्ट्रवादीची तर एकाच घरातील चौघांची पार्टी-ते हि तत्वाला न बांधलेले, आपसात वाद असलेले…

पुणे-गजानन मारणे यांची पत्नी माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी मनसे मधून राष्ट्रवादी मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रवेश केला.राष्ट्रवादीने एसीबी कडे पुणे महापालिकेच्या कारभाराबाबत चौकशीची मागणी केली आहे, आणि दुसरीकडे १६ भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत येणार असे म्हटले आहे. त्यावरून भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि,’ राष्ट्रवादी पार्टी ही केवळ पाश्चिम महाराष्ट्रापुरती आहे. ती काही देश पातळीवरच पार्टी नाही. त्यांचामध्ये परिवारवाद असून त्यांच्या परीवाराचेच दोन चार जण निर्णय घेतात. ते देखील कुठल्याही तत्त्वाला बांधिल नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसची आज खासदार बापटांनी खिल्ली उडविली.

मोदी अजिबात कोणाचीच माफी मागणार नाहीत.

पुणे महापालिकेत १५ दिवसांपूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. त्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात प्रत्येक राजकीय कार्यक्रम आणि आंदोलनाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जात आहे.आज भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या घराबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी गिरीश बापट यांच्या घराबाहेर देखील भाजपाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर काँग्रेस पक्षाच्या आंदोलनानंतर भाजपाचे खासदार गिरीश बापट म्हणाले की, ”कधीही कोणत्याही राजकीय पार्टीला आंदोलनाबाबत विरोध करीत नाही. लोकशाही पद्धतीने आंदोलनं झाली पाहिजे. माझ्या घराबाहेर देखील आमचे कार्यकर्ते जमले होते. काही करायचे नाही, असे त्यांना मी सांगितले होते. तसेच त्या आंदोलनामध्ये २० ते २५ पण कार्यकर्ते नव्हते. जर दुर्दैवाने काही गडबड झाली असती. तर आम्ही जशाच तसे उत्तर दिले असते.”तसेच त्यांनी हे देखील सांगितले की, मोदी अजिबात कोणाचीच माफी मागणार नाहीत. ”मोदींनी मुंबईच जे उदाहरण दिले आहे. ते खरं असून ज्या पद्धतीने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे मुंबईत रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली. त्या सर्व कामगारांची काळजी अगोदरच केंद्र सरकारने घेतली होती. करोना काळात केंद्र सरकारला सहकार्य न केल्यामुळे काँग्रेसने देशाची माफी मागावी.”,अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

महापालिका निवडणुकीत आम्ही १०० च्या पुढे निश्चित जाऊ –

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचे किती नगरसेवक निवडून येतील? या प्रश्नावर गिरीश बापट म्हणाले की, महापालिकेच चित्र स्पष्ट असून तीन प्रभाग पद्धत आमच्या दृष्टीने चांगले झाले आहे. आमच्या नगरसेवकांनी करोना काळ आणि त्यानंतर देखील चांगले काम केले आहे. पण महापालिकेच्या चांगल्या कामांना अडथळा आणण्याचे काम शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले आहे. त्याचा जाब आम्ही निवडणुकीदरम्यान निश्चित विचारू आणि आम्ही १०० च्या पुढे निश्चित जाऊ, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीने काल लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे.त्यावर ते म्हणाले की, आमची तक्रार कुठे ही करा, दूध का दूध पाणी का पाणी..अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

38 जणांना फाशी, 11 जणांना जन्मठेप; तर एक आरोपी ठरला माफीचा साक्षीदार-अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट खटला

0

अहमदाबाद –

अहमदाबादमध्ये 26 जुलै 2008 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली. 38 दोषींना फाशी आणि 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी रोजी सिटी सिव्हिल कोर्टाने 78 पैकी 49 आरोपींना UAPA (अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट) अंतर्गत दोषी ठरवले होते. अयाज सय्यद या दोषींपैकी एकाला तपासात मदत केल्याबद्दल निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. याशिवाय 29 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख, गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 25 हजार रुपये देण्यात येतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

70 मिनिटांत झाले होते 21 स्फोट
26 जुलै 2008 हा तो दिवस होता जेव्हा 70 मिनिटांच्या कालावधीत 21 बॉम्बस्फोटांनी अहमदाबादचा आत्मा हादरला होता. शहरात झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला, तर 200 लोक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटांचा तपास अनेक वर्षे चालला आणि सुमारे 80 आरोपींवर खटला चालवण्यात आला. पोलिसांनी अहमदाबादमध्ये 20 एफआयआर नोंदवले होते, तर सुरतमध्ये आणखी 15 एफआयआर नोंदवण्यात आले होते, जिथे विविध ठिकाणांहून जिवंत बॉम्बही जप्त करण्यात आले होते.

29 बॉम्बचा स्फोट होऊ शकला नाही
स्फोटांनंतर, गुजरातच्या सुरत पोलिसांनी 28 जुलै ते 31 जुलै 2008 दरम्यान शहरातील विविध भागांतून 29 बॉम्ब जप्त केले होते. ज्यामध्ये 17 वराछा परिसरातून आणि इतर कतारगाम, महिधरपुरा आणि उमरा भागात होते. चुकीचे सर्किट आणि डिटोनेटरमुळे या बॉम्बचा स्फोट होऊ शकला नसल्याचे तपासात समोर आले होते.

गोध्रा घटनेला प्रत्युत्तर म्हणून बॉम्बस्फोट करण्यात आले होते
इंडियन मुजाहिदीन (IM) आणि प्रतिबंधित स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी हे स्फोट घडवून आणले. स्फोटाच्या काही मिनिटांपूर्वी टेलिव्हिजन चॅनल आणि प्रसारमाध्यमांना ‘इंडियन मुजाहिदीन’ने बॉम्बस्फोटाचा इशारा देणारा ई-मेल पाठवला होता. 2002 मधील गोध्रा दंगलीला प्रत्युत्तर म्हणून आयएमच्या दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवून आणल्याचे पोलिसांचे मानने होते. या प्रकरणातील आणखी एक आरोपी यासीन भटकळ याच्याविरुद्ध पोलिस नव्याने गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

डीजीपी आशिष भाटिया यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम तयार करण्यात आली होती
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून जेसीपी क्राइमच्या नेतृत्वाखाली अहमदाबाद क्राइम ब्रांचची विशेष टीम तयार करण्यात आली होती. डीजीपी आशिष भाटिया यांनी या पथकाचे नेतृत्व केले. त्याचवेळी या टीममध्ये अभय चुडास्मा (DCP क्राईम) आणि हिमांशू शुक्ला (ASP हिम्मतनगर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणांचा तपास तत्कालीन डीएसपी राजेंद्र असारी, मयूर चावडा, उषा राडा आणि व्हीआर टोलिया यांच्याकडे सोपवण्यात आला होता. अहमदाबाद क्राइम ब्रांचच्या या विशेष पथकाने 19 दिवसांत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि 15 ऑगस्ट 2008 रोजी पहिली अटक केली.

78 आरोपींविरुद्ध खटला सुरू होता
न्यायालयाने सर्व 35 एफआयआर एकत्रित केल्यानंतर डिसेंबर 2009 मध्ये 78 आरोपींविरुद्ध खटला सुरू झाला. एक आरोपी नंतर सरकारी साक्षीदार झाला. या प्रकरणात नंतर आणखी चार आरोपींनाही अटक करण्यात आली होती, परंतु त्यांचा खटला अद्याप सुरू झालेला नाही. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने 1100 साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांमध्ये एचएम ध्रुव, सुधीर ब्रह्मभट्ट, अमित पटेल आणि मितेश अमीन, तर बचाव पक्षाचे वकील एमएम शेख आणि खालिद शेख आदींचा समावेश होता.

19 दिवसांत 30 दहशतवादी पकडले
विशेष पथकाने अवघ्या 19 दिवसांत 30 दहशतवाद्यांना पकडून तुरुंगात पाठवले होते. यानंतर उर्वरित दहशतवादी देशातील विविध शहरांतून पकडले जात राहिले. अहमदाबादमधील बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिद्दीनच्या याच टीमने जयपूर आणि वाराणसीमध्येही स्फोट घडवून आणले होते. देशातील अनेक राज्यांचे पोलिस त्यांना पकडण्यात गुंतले होते, पण ते एकामागून एक ब्लास्ट करत गेले. अहमदाबाद बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 जुलैला सुरतमध्येही साखळी बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे ते स्फोट होऊ शकले नाहीत.

वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही

0

बर्ड फ्ल्यू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी

ठाणेदि. 18 : ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोलीता.शहापूर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नयेअसे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सांगितले कीमौजे वेहळोलीता.शहापूर जि.ठाणे येथे काही कोंबड्या दगावल्या होत्या. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल काल  प्राप्त झाला. त्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून  बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात इतरत्र कुठेही पसरु नये यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार बर्ड फ्लू बाधित क्षेत्र केंद्रबिंदू मानून 1 कि.मी. त्रिज्येतील परिसर संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील पोल्ट्री फार्म मधील कुक्कुट पक्षीउर्वरित पक्षी खाद्यअंडी नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या भागातील कुक्कुट पक्षांचे जिल्हा पशुसंधर्वन उपायुक्त यांच्या मार्फत शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने प्रभावित पक्ष्यांना नष्ट करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जोपर्यंत बाधित क्षेत्र संपूर्णत: संसर्गमुक्त क्षेत्र म्हणून घोषित होत नाही. तोपर्यंत या 1 कि.मी. त्रिज्येतील चिकन विक्रेते व वाहतूकदार यांचे दैनंदिन कामकाज रोखण्यात यावेअसे निर्देश अधिसूचनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

वेहळोली वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची घटना नाही. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नयेअसे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु

0

पुणे, दि. १८ फेब्रुवारी २०२२: पश्चिम महाराष्ट्रात थकबाकीदारांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. १९) व रविवारी (दि. २०) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. सोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

खासदार गिरीष बापट यांच्या घरासमोर कॉंग्रेसचे ‘मोदी माफी मांगो आंदोलन’

0

पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्या घरासमोर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माफी मांगो आंदोलन.

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान करताना काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला व काँग्रेस पक्षाला दोषी ठरविले. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज पुणे शहराचे खासदार गिरीष बापट यांच्या घरासमोर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे याच्या नेतृत्वाखाली ‘माफी मांगो आंदोलन’ करण्यात आले.यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘देशाचे पंतप्रधान संसदेसारख्या पवित्र ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला व काँग्रेस पक्षाला बदनाम करून कोरोनाचे खापर महाराष्ट्र व काँग्रेसच्या माथी फोडायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा की शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागावी लागली, तशी महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल माफी मागावी लागेल. दिल्लीच्या सत्तेसमोर गुडघे टेकून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही.’’ माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ‘‘कोरोना काळात केंद्रातील भाजपा सरकारने अचानक लॉकडाऊन लावला. या कठीण प्रसंगी राज्यातील लोकांना केंद्र सरकारने मदत केली नाही पण काँग्रेस पक्षाने व महाराष्ट्र सरकारने लाखो लोकांना मदत केली. अडचणीच्या काळात मदत करणे ही काँग्रेसची परंपरा आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हजारो लोकांना आम्ही मदत केली असताना कोरोना पसरवला, असा आरोप पंतप्रधानांनी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागावी.’’यानंतर प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, रोहित टिळक, कमल व्‍यवहारे, गोपाळ तिवारी, नीता रजपूत, पूजा आनंद, विशाल मलके, मुख्तार शेख, बाळासाहेब अमराळे, प्रविण करपे, सचिन आडेकर, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, विजय खळदकर, सुनिल घाडगे, अजित जाधव, द. स. पोळेकर, किशोर मारणे, नंदा ढावरे, रमा भोसले, सुंदरा ओव्‍हाळ, रवि आरडे, रवि पाटोळे, राजश्री अडसूळ, अंजली सोलापूरे, सिमा महाडिक, ज्योती परदेशी, ताई कसबे, परवेज तांबोळी, चैतन्य पुरंदरे, सुरेश कांबळे, अनुप बेगी, अविनाश अडसूळ, राजू गायकवाड व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

0

मुंबई, दि.17 :-  शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे सुरु असलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रिया सुळे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचा तांदूळ, गहू, हळद आणि गावरान कडधान्य, डाळी, असे पीक शेतकरी  बांधव  घेत असतात.  या उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी  आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच ग्राहकांना योग्य दरात चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून  हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व तांदूळ उत्पादकांशी उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि सहकार मंत्री श्री. पाटील यांनी संवाद साधला. प्रत्येक स्टॉलवरील तांदळाची वैशिष्ट्ये जाणून घेतली. राज्याचे समृद्ध असे कृषी वैविध्य एकाच ठिकाणी पहायला मिळत असल्याबद्दलही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी समाधान व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर आणि श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड व ग्रोवर्स डायरेक्ट इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला  ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ गुरुवार दि. 17 ते 19 फेब्रुवारी 2022 असे तीन दिवस असणार आहे. यामध्ये सेंद्रिय निळाभात, काळाभात, लाल तांदूळ (शुगर फ्री) इंद्रायणी, काळातांदूळ, कोलम, वाडा कोलम, झिनी कोलम, ब्राउन राईस, आंबेमोहोर, रायभोग, काळा गहू, नाचणी ,सेंद्रिय काजू, महिला बचत गटांकडून तयार करण्यात येणारी उत्पादने यांचा समावेश आहे. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे मार्गाच्या सूरत ते वापी दरम्यानचे काम हि जलद गतीने होतेय पूर्ण

0

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2022

केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी आज मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे मार्गिकेच्या (बुलेट ट्रेन) सूरत आणि वापी दरम्यानच्या बांधकामांचा प्रकल्पस्थळी जाऊन आढावा घेतला. 

जरदोश यांनी नवसारी जिल्ह्यातील पडघा गावातल्या चे 243 मधील कास्टिंग यार्ड पासून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यावेळी, 242 P42 आणि  P23 या कास्टिंग साठी तयार केलेल्या कामांचा आढावा घेतला.

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्पात, त्यांनी कास्टिंग यार्ड (नसीलपोर, जिल्हा नवसारी) इथल्या चेसिस 238 चा आढावा घेतला. त्यांनी तिथे, 1100 टी आणि पूलाच्या पायाच्या बांधकामाचा आढावा घेतला.

त्यानंतर, कास्टिंग यार्ड 232 (काछचोल, जिल्हा नवसारी) इथे संपूर्ण ग्रीन्डरचा आढावा घेतला. तसेच वलसाड जिल्हयात तयार स्टील प्लांट, स्टीलचे स्वयंचलित कटींग आणि रिंग तयार करणे,चेसिस  197 ते 195 विद्युत पीयर्सच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, त्यांनी दमण गंगा नदीकिनारी जाऊन, नदीवर बांधल्या जात असलेल्या पूलाच्या पायाच्या कामाचा आढावा घेतला. 

अतिरिक्त माहिती :

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे मार्गाच्या बांधकाम कामांची काही ठळक वैशिष्ट्ये :

  • गुजरात राज्यात (352 किमी), 100% सिव्हिल बांधकाम निविदा भारतीय कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत.
  • 98.6% जमीनीचे भूसंपादन झाले आहे, आणि संपूर्ण 352 किमीच्या कामाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
  • गुजरात राज्यात, (352 किमी), 98.6% जमीन संपादित करण्यात आली आहे आणि संपूर्ण 352 किमीचे बांधकाम सुरु झाले आहे. महाराष्ट्रात,  62% भूसंपादन झाले आहे.
  • स्तंभ, पाया, पियर्स, पियर्स कॅप्स, कास्टिंग आणि विद्युत तसेच स्थानकांसाठीच्या ग्रीन्डर साठीचे खोदकाम सुरु झाले आहे. गुजरातमधील आठही जिल्ह्यात हे काम सुरु आहे.  
  • 352 किमी पैकी, 325 किमीच्या मार्गाचे भू-तांत्रिक सर्वेक्षण काम पूर्ण झाले आहे.
  • भू तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी, सूरत इथे एशियातील सर्वात मोठी भू-तंत्रज्ञान प्रयोगशाळा विकसित करण्यात आली आहे.  
  • 110 किमी मार्गावर पाइल्स, पाइल्स कॅप्स, मुक्त पाया, विहीरीचा पाया, पियर्स आणि पीयर्स कॅप्स चे बांधकाम सुरु आहे. 
  • 352 किमीपैकी, 81 किमीवरील पाईलीगचे कां पूर्ण झाले आहे तर 30 किमीवर पाया पूर्ण झाला असून 20 किमी अंतरावरील पीयरचे काम पूर्ण झाले आहे.   

ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे 18 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 4:30 वाजता व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ठाणे आणि दिवा या स्थानकांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करणार आहेत.  मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांनाही ते हिरवा  झेंडा  दाखवतील आणि त्यानंतर ते उपस्थिताना  संबोधितही  करतील

ठाणे जिल्ह्यातील कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण येथे एकत्रित  येवून पुढे मुंबईतील  सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) च्या दिशेने रवाना होते. कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या चार मार्गांपैकी दोन मार्ग  धीम्या लोकलसाठी आणि दोन मार्ग  जलद  लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात येत होते. उपनगरीय  आणि लांब  पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक स्वतंत्रपणे  करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन  करण्यात आले.

ठाणे आणि दिवा यांना जोडणारे  दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले  आहेत आणि त्यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 छोटे पूल आहेत. या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या  वाहतुकीतील  लांब  पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होईल. तसेच या मार्गांमुळे शहरात 36  नवीन उपनगरीय गाड्या सुरू करता येतील.

महिला धोरणाच्या जाणीवजागृतीत सामाजिक संस्थांचा सहभाग असावा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई, दि. 17 : अनेक सामाजिक संस्था महिलांच्या प्रश्नांबाबत काम करतात. महिला धोरणाच्या ग्रामपातळीपर्यंत जाणीवजागृतीसाठी महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही महिला धोरणात सहभाग करून घ्यावा, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्याच्या महिला धोरणात महिलांच्या समस्यांचा व्यापक प्रमाणात विचार करण्यात आला आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार व पायाभूत सुविधा याबाबत उपाययोजना केल्या आहेत. महिला धोरण काळानुरूप अधिक सक्षम आणि प्रभावी करणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

महिला धोरणाबाबत प्रारूप मसुद्यावर चर्चा याबाबत सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक असावा. यासाठी शिक्षण विभागात आर्थिक तरतूद असावी. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कायदे आहेत परंतु या कायद्यांबाबत विविध पातळ्यांवर जनजागृतीची गरज आहे. राज्य शासनाच्या प्रत्येक विभागावर या  धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी असल्यामुळे सर्व विभांगाचा यामध्ये समावेश असणार आहे.

सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना महिला धोरणामुळे संधी मिळाली. शहरी व ग्रामीण भागातील महिला आज विविध क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. हा प्रवाह असाच सुरू ठेवण्यासाठी त्यात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे. महिलांना समान न्यायाचे मूल्य प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. या धोरणाच्या जाणीवजागृतीसाठी सामाजिक संस्थाची मदत घेणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या बैठकीस ‘माविम’च्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, सहसचिव श.ल.अहिरे, महिला व बालविकासचे आयुक्त राहुल मोरे ,अवर सचिव महेश वरुडकर उपस्थित होते.

लकडाऊनच्या निमित्ताने शुभा खोटे पुन्हा सुवर्ण पडद्यावर

0

१९१३ला पहिल्या चित्रपटानंतर भारतीय मनोरंजन सृष्टीचा सुवर्ण काळ सुरु झाला तो म्हणजे ५० ते ८० च्या दशकात, या दशकांत वावरणारे अनेक कलाकार आज ‘लेजेंड’ म्हणून सिनेसृष्टीत वावरतात आणि अशाच एक लेजेंड म्हणजे ‘शुभा खोटे’. १९५३ पासून ते आता पर्यंत त्या मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत.

               सीमा या पहिल्या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत त्या सिनेसृष्टीत रुजू झाल्या, ‘मेहमूद’ या अष्टपैलू कलाकाराच्या यांच्या सोबत त्यांची जोडी चांगलीच जमली होती. आपल्या या ६९ वर्षाच्या कारकिर्दीत शुभा खोटे यांनी तब्बल ५६ सिनेमामध्ये काम केलं असून आता यात अजून एका चित्रपटाची भर पडली आहे ती म्हणजे ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपटाची, येत्या २५ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात शुभा खोटे यांची महत्वाची भूमिका असून तब्बल ४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आणि लॉकडाऊनमुले एकाच घरात अडकलेल्या कुटुंबाची आणि नवविवाहित जोडप्याची गोष्ट ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हा चित्रपट सांगतो. सर्वांची लाडकी आजी म्हणून शुभा खोटे या चित्रपटात आपल्याला दिसणार असून, त्यांच्यासारखी आजी सर्वांना मिळो असं प्रेक्षक बोलतील अशी त्यांची भूमिका आहे. या कुटुंबाच्या प्रमुख म्हणून शुभा खोटे असून आपल्या नातवाच्या लग्नातली धांदल त्या अनुभवत आहेत. तब्बल ८४ वर्षाच्या शुभा खोटे या चित्रपटाच्या दरम्यान स्वतःहून आघाडी घेत सेट वर सगळ्यांच्या आधी हजर राहत तर सेटवर अनेकदा त्यांनी आपल्या हाताने सगळ्यांसाठी जेवण सुद्धा त्यांनी बनवलं होत. विनोदी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असणारा हा चित्रपट संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटाची निर्मिती इष्णव मीडियाची आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मिता स्मिता खरात असून चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली आहेत. चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे. शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे.

-शरद लोणकर

ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने प्रस्ताव केंद्र शासनाकडे

0

मुंबई, दि. १७ : ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी राज्याच्या कांदळवन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे. रामसर दर्जा मिळाल्यास पक्षी निरीक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होतील तसेच पर्यावरण व पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबत पाणथळ जागेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळताना जागतिक पर्यटन नकाशावरदेखील याची नोंद होईल  असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ९ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या चौथ्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

ठाणे खाडी

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौ.कि.मी क्षेत्रावर पसलेले आहे. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या पर्यावरणाबाबत महत्त्व असलेल्या क्षेत्रांना रामसर क्षेत्र असे म्हटले जाते. ठाणे खाडी परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी-प्रजाती आढळतात. त्यामुळे या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. ठाणे खाडीच्या अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित असून त्यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित  ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये अधिसूचित झाली आहे. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे.ठाणे खाडी परिसर रामसर क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानंतर फ्लेमिंगोसह  विविध पक्षी व प्रजातींचे अधिक संवर्धन होण्यास मदत मिळेल.

महाराष्ट्रातील रामसर स्थळे

पाणथळांसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर अधिवेशनात  नाशिक जिल्ह्यातील “नांदूर मधमेश्वर”अभयारण्यास जानेवारी २०२० मध्ये रामसर स्थळाचा दर्जा दिला गेला. हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये घोषित झालेले बुलडाण्यातील  “लोणार”सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे. यानंतर ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यास महाराष्ट्रातील हे तिसरे रामसर स्थळ होईल….

रामसर दर्जा म्हणजे काय ?

१९७१ मध्ये इराणमधील रामसर शहरात “रामसर परिषद”  झाली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिकदृष्टीने महत्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना “रामसर स्थळ” घोषित करण्याचे निश्चित करण्यात आले. पाणथळ जागेच्या कक्षेत  सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्र किनारे, भातखाचरे, इ. जागांचा समावेश करण्यात आला.

जगात २४२४ पाणथळांना रामसर स्थळे

भारताने “रामसर” करारावर १९८२ मध्ये स्वाक्षरी करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले. सध्या जगातील २४२४ पाणथळांना “रामसर” स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. यात भारतातील ४९ स्थळांना “रामसर स्थळा”चा दर्जा मिळाला आहे.

वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् अॅपद्वारे माहिती द्या-नागरिकांना महावितरणचे आवाहन

0

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२२: जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, महावितरणच्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेमधील रोहित्र, फिडर पिलर, वीजखांब आदींवर कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, पत्रके चिटकवू नयेत. वीज यंत्रणेवर पोस्टर्स किंवा पत्रके चिटकवताना विद्युत अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून कोणत्याही प्रकारचे पत्रके किंवा पोस्टर्स वीजयंत्रणेवर लावू नयेत किंवा चिटकवू नयेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस् अॅपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् अॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

महावितरणची वीजतार तुटलेली आहे. झोल किंवा जमीनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडे किंवा तुटलेले आहे. रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे आदी स्वरुपाची माहिती/तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधीत स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉटस् अॅपच्या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना पाठवता येत आहे. यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरु असलेली ही सेवा उपलब्ध आहे.

व्हॉटस् अॅपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस् अॅपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे. 

३३० दशलक्ष डॉलर्स निधीची घोषणा

0

ग्रामीण भारताचे बीटुबी ईकॉमर्स प्लॅटफॉर्म भारतीय खरेदीच्या पुढच्या लाटेचा लाभ घेण्यासाठी नव्या भौगोलिक प्रदेशात विस्तार करणार इलॅस्टिकरनतर्फे सॉफ्टबँक व्हिजन फंड २, प्रोसस व्हेंचर्स आणि गोल्डमॅन सॅक्स यांच्या नेतृत्वाखाली ३३० दशलक्ष डॉलर्स निधीची घोषणा

पुणे, १७ फेब्रुवारी २०२२ – इलॅस्टिकरन या लाखो ग्रामीण भारतीय किराणा दुकाने उपलब्ध करून देणाऱ्या बीटुबी प्लॅटफॉर्मने ३३० दशलक्ष डॉलर्स फंडिंग राउंडची सांगता जाहीर केली असून हे फंडिग प्रामुख्याने सॉफ्टबँक व्हिजन फंड २ आणि गोल्डमन सॅक्स असेट मॅनेजमेंट यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या राउंडमध्ये चिमेरा तसेच इनोव्हेन आणि दीर्घकाळापासून गुंतवणूकदार असलेले प्रोसस व्हेंचर्सही सहभागी झाले होते.

या गुंतवणुकीमुळे कंपनीला आपली ग्रामीण भागातील व्याप्ती ३० पेक्षा जास्त राज्यांत विस्तारता येणार असून त्यामुळे लाखो किराणा (जवळपासची रिटेल) दुकांनाना ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे मोठे ग्राहकोपयोगी व खाद्यपदार्थ ब्रँड्स उपलब्ध होणार आहेत. इलॅस्टिकरनतर्फे या निधीचा वापर आपली सेवा राष्ट्रीय पातळीवर रिटेलर्सना कर्जपुरवठ्यासारखी सेवा पुरवून त्यांच्याद्वारे ग्राहकांना दिला जाणारा खरेदीचा अनुभव आणि पर्यायाने सेवेचे एकंदर मूल्य उंचावण्यासाठी केला जाणार आहे.

भारतात एकूण १२ दशलक्ष किराणा दालने असून त्यापैकी १० दशलक्ष दुकाने ग्रामीण बाजारपेठेत आहेत. इलॅस्टिकरन भारतीय ग्राहकांना भौतिक आणि डिजिटल अक्सेसचे लोकशाहीकरण करून देत असून त्यासाठी व्यवसायांना भारतातील दुर्गम ग्रामीण भागात असलेल्या रिटेल दुकानांद्वारे पारंपरिकदृष्ट्या सेवा न मिळणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत आहे. या ग्रामीण दुकानांना पारंपरिक वितरण नेटवर्कच्या उच्च किंमतींमुळे तसेच शहरापासून ग्रामीण भागातल्या या दुकानांपर्यंतच्या अंतरामुळे आणि ऑर्डरचे आकारमान लहान असल्यामुळे ग्राहकोपयोगी ब्रँड्सतर्फे सेवा दिली जात नाही.

इलॅस्टिकरनचे सह- संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप देशमुख म्हणाले, ‘आमच्या व्यवसायात असलेल्या रुपांतरण करण्याच्या क्षमतेचा आम्हाला अभिमान आहे. या क्षमतेमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण दालने तसेच ग्राहकांचा लाभ झालेला आहे. महामारीच्या काळात आमचे बळकट लॉजिस्टिक्स आणि चॅनेल फ्रेमवर्क यामुळे ग्रामीण किराणा भागीदारांना अखंडित पुरवठा मिळाला. आमचा वेगाने विकास होत आहे तसेच सातत्याने आमच्या स्टोअर नेटवर्कचा पूर्ण भारतात विस्तार केला जात आहे. जास्तीत जास्त ग्रामीण किराणा रिटेलर्स आणि ग्रामीण ग्राहकांना भारतात सुरू असलेल्या डिजिटल क्रांतीमध्ये सहभागी करून घेण्याच्या आमच्या प्रयत्नांत सॉफ्टबँक आणि गोल्डमन सॅक्सची साथ मिळाल्याचा आनंद आहे.’

इलॅस्टिकरनच्या अंदाजानुसार ग्रामीण बाजारपेठांमधील किराणा दुकानांत होणारी विक्री पुढील पाच वर्षांत ६०० अब्ज डॉलर्सवर जाणार आहे. कंपनी गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित झाली असून ग्रामीण भागाला सेवा पुरवताना कंपनीने अवलंबलेल्या तंत्रज्ञानाला प्रथम प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना ई-कॉमर्सचा लाभ करून दिला जात राहील. या प्लॅटफॉर्मद्वारे ३०० पेक्षा जास्त ब्रँड्सना ग्रामीण व्यवसायाविषयी कृतीयोग्य माहिती पुरवली जाते.

सॉफ्टबँक इन्व्हेस्टमेंट अडव्हायडर्सचे उपाध्यक्ष नरेंद्र राठी म्हणाले, ‘स्थानिक बाजारपेठेला अभिनव सेवा देणाऱ्या संस्थापकांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही कायमच उत्सुक असतो. इलॅस्टिकरनची ग्रामीण भागातील व्याप्ती आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मचे तंत्रज्ञान लक्षात घेता कंपनी ई- कॉमर्सच्या पुढील लाटेचा लाभ करून घेण्यासाठी सज्ज आहे असे आम्हाला वाटते. आम्ही जवळून कंपनीच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहोत आणि त्याची प्रगती, युनिट अर्थकारणावरील त्यांचे लक्ष तसेच किराणा दुकाने भागीदर व ब्रँड्ससाठी मूल्यनिर्मिती करण्यावर असलेला त्यांचा भर यांनी आम्ही भारावून गेलो आहोत.’

गोल्डमन सॅक्स असेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक रजत सूद म्हणाले, ‘तंत्रज्ञानाचा वापर करून किराणा दुकानांसाठी आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या पुरवठा साखळीचे रूपांतर करण्याच्या कंपनीच्या धोरणावर आमचा ठाम विश्वास आहे. टीमच्या अमलबजावणी करण्याच्या क्षमतेनं आम्ही प्रभावित झालो आहोत. इलॅस्टिकरनच्या विकासाच्या पुढील प्रवासात आणि ग्राहकांवर सकारात्मक परिणाम घडवून आणण्याच्या त्यांच्या धोरणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

प्रोसस व्हेंचर्सच्या भारतातील गुंतवणूक विभागाचे प्रमुख आशुतोष शर्मा म्हणाले, ‘प्रोसस व्हेंचर्समध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या सामाजिक गरजा पूर्ण करणाऱ्या व्यवसायांशी भागिदारी करतो. इलॅस्टिकरन ग्रामीण भारतातील पुरवठा साखळी यंत्रणेत मोठे रुपांतर घडवून आणत आहे. टीमने ऑपरेशनल मेट्रिक्सवर भर देत आणि भागीदारांसाठी मूल्यनिर्मिती करत स्थिर विकास साधला आहे. त्यांच्याशी दीर्घकाळ भागिदारी करताना आणि विकासाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात साथ देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.’

तंबाखू सेवनाविरोधात लोकचळवळ हवी – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. 17 : तंबाखू सेवनाच्या व्यसनांविरोधात लोकचळवळ उभारायला हवी. याबाबतच्या कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. या प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे व्यक्त केली.

सार्वजनिक आरोग्य विभाग, एनएचएम आणि टाटा मेमोरियल सेंटरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आवाहन केले. यावेळी स्टेट लेव्हल यूथ टोबॅको सर्व्हेचे – महाराष्ट्र फॅक्ट शीटचे प्रकाशन श्री. टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

टाटा मेमोरियल सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला श्री. टोपे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महासंचालक डॉ. एल. स्वस्तिचरण, डॉ. राजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

श्री टोपे यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थी विशेषतः महिला आणि मुलींमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. तंबाखू सेवन आरोग्याला हानिकारक आहे, याबाबत लोकांत जाणिव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तंबाखू सेवन आरोग्याला धोकादायक आहे याची जाणीव असूनही तंबाखू सेवन केले जाते. तंबाखूजन्य उत्पादनाची मागणी कमी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग , पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन आणि शालेय शिक्षण विभागाने एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.

यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणामाबाबत मुलांना शिक्षित करायला हवं. रंगपंचमीला धोकादायक रंगाचा वापर करु नये, ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी फटाके वापरु नये याबाबत मुलांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण केली गेली. त्यामुळे फटाके आणि रंगाचा वापर कमी झाला. त्याचप्रमाणे तंबाखूबाबत मुलांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ साधना तायडे, उपसंचालक डॉ पद्मजा जोगेवार, टाटा मेमोरियल सेंटरचे राजेंद्र बडवे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. शर्मिला पिंपळे यांनी सूत्रसंचालन तर सहाय्यक संचालक डॉ. संजीव कुमार जाधव यांनी आभार मानले.