Home Blog Page 2080

बॉडी बिल्डर्सची शिवरायांना मानवंदना व महिलांचा मशाल उत्सव…

0

पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शरीर सौष्ठवाच्या शक्तीच्या बळावर असाध्य असे पराक्रम केले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षी हा अनोखा मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिलांच्या मशाल उत्सव साजरा करण्यात आला. बॉडी बिल्डर्सच्या मानवंदेसाठी महाराष्ट्रश्री पै.संदेश नलावडे, विक्रांत घेरपडे, समीर हळंदे, व इतर शरीर सौष्ठव पटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या स्नेहाताई खेडेकर, प्रा.सुवर्णाताई बनबरे, जयश्रीताई पाटील, रुचिका रणपिसे, पूजा झोळे, मराठा सेवा संघाचे मारूतीराव सातपुते, मिलिंद लवांडे, जितेंद्र साळुंखे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, राजाराम महाराज स्मृती मंडळाचे बापूसाहेब देशमुख, मयूर शिरोळे, युवराज ढवळे, महादेव मातेरे, संजय चव्हाण, सचिन जोशी आदि उपस्थित होते. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले, तर कैलास वडघुले यांनी आभार मानले.

नोटीस न देता लाईट तोडू नका अन्यथा उग्र आंदोलन – आप

0

पुणे- वीज बिले न भरल्याचे कारण देऊन ,वाढीव रकमेची बिल वसुली केली तर खबरदार , वीज ग्राहकाला १५ दिवसांची नोटीस देऊन त्यांची बाजू मांडण्याची संधी द्या त्याशिवाय थेट वीज तोडली तर मात्र आप च्या वतीने उग्र नागरी आंदोलन छेडले जाईल असा इशारा आप च्या वतीने देण्यात आला आहे. .आम आदमी पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष कृष्णा गायकवाड ,प्रवक्ते डॉ अभिजित मोरे तसेच संपर्क प्रमुख तुषार जंगम व त्यांचे सहकारी निलेश चाटी सर, सागर शिंदे, पर्वती मतदार संघांचे संघटक. विनोद जवळकर धनकवडी रिक्षा चालक सचिन जगताप यांनी या संदर्भात महावितरणच्या पद्मावती कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन निवेदन दिले आहे

या वेळी कृष्णा गायकवाड म्हणाले कि,’ कोवीड काळात लॉकडाऊन मुळे लोकांची या राज्य सरकार ने बिकट अवस्था केलेली असताना दुसरीकडे महावितरण कंपनी ने वाढीव बिले देऊन मनमानी कारभार चालवलेला आहे लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील पंधरा दिवसांची नोटीस न देता वीज कनेक्शन तोडून मीटर घेऊन जातात व पुन्हा ते जोडण्या साठी नवीन मीटर चे कनेक्शन घेण्यासाठी सांगितले जाते. अशा प्रकारच्या विविध नागरिकांच्या अडचणीवर आम आदमी पक्षाने बालाजीनगर धनकवडी येथे 7 दिवसांचे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात नागरिकांच्या अभिप्राय व सह्यांची मोहीम घेऊन पद्मावती येथील महावितरण कंपनी चे कार्यकारी अभियंता काळुमाळी साहेब यांना निवेदन देऊन सांगण्यात आले कीजर नोटीस न देता कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नये. अन्यथा संपूर्ण पुण्यात विविध मार्गानी आमचे आंदोलन घेण्यात येईल .

ई कॉशेस मोबीलिटी इलेक्ट्रीक व्हेईकल नवीन प्रकल्पाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

0

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीही दिली प्रकल्पाला भेट

पुणे दि.१९: ई कॉशेस मोबीलिटी इलेक्ट्रीक व्हेईकल या नवीन इलेक्ट्रीक वाहन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीदेखील प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली.

तळेगाव एमआयडीसी येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, उद्योग समूहाचे अध्यक्ष पीटर केन्झ,संस्थापक राम तुलुमूरी, संचालक रवी पंगा उपस्थित होते.

ई कॉशेस मोबीलिटी या युकेच्या उद्योग समूहाने महाराष्ट्र राज्याची गुंतवणूकीसाठी निवड केली, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, राज्य शासनाने या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार केले आहे. इलेक्ट्रिक वाहने निर्मिती, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन सातत्याने प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या उद्योग, संस्थांना पाठबळ देण्याचे शासनाचे धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्योग मंत्री श्री.देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक वाहन धोरण चांगले असल्याने गुंतवणूकदार गुंतवणूकीसाठी महाराष्ट्राला पसंती देत आहे. या धोरणामुळेच राज्यात गुंतवणूक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा प्रकल्पांना शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते

न्याय हक्क मिळण्यासाठी कायद्याचे शिक्षण घेणे गरजेचे-पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख

0

कस्तुरी शिक्षण संस्थेत मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन

पुणे : “नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांना समाजात चुकीच्या प्रवृत्तीचा सामना करावा लागतो. महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. या कायद्यांच्या आधाराने या प्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे. कायद्याचे ज्ञान घेतले, तर असुरक्षित वातावरणातही आपल्याला संकटावर मात करता येते आणि न्याय मिळवता येतो,” असे प्रतिपादन पुणे येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख यांनी केले. चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर यशाची शिखरे गाठता येतात, असेही त्यांनी नमूद केले.

शिक्रापुर (ता. शिरुर) येथील कस्तुरी शिक्षण संस्थेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त स्कुल ऑफ लॉ यांच्यातर्फे आयोजित मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य केंद्राच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. यावेळी दिवाणी न्‍यायाधीश (कनिष्‍ठ स्‍तर व फौजदारी दंडाधिकारी वर्ग-१ घोडनदी) व्ही. व्ही कुलकर्णी, सहदिवाणी न्‍यायाधीश पी .के. करवंदे, द्वितीय सहदिवाणी न्यायाधीश आर. डी. हिंगणगावकर, तृतीय सहदिवाणी न्यायाधीश के. एम. मुंढे, कस्तुरी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंडित पलांडे, संस्थेच्या अध्यक्षा आणि विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री पलांडे, उपाध्यक्ष डॉ. प्रतीक पलांडे, उपप्राचार्या डॉ. सपना देव आदी उपस्थित होते.


डॉ. पंडित पलांडे म्हणाले, “शिरुर तालुक्यातील विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण घ्यायचे असेल, तर पुणे किंवा अहमदनगरला जावे लागत होते. त्यामुळे गेली चार ते पाच वर्षे लॉ कॉलेजची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. दोन वर्षांपूर्वी कॉलेजला मान्यता मिळाली. कोरोनामुळे दोन वर्ष प्रवेश प्रक्रियापासून अभ्यासापर्यत सगळेच ऑनलाईन होते. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि कोरोनाचे सावट बऱ्यापैकी कमी झाल्याने विद्यार्थ्याशी संवाद साधण्याचा योग आला.”

डॉ. जयश्री पलांडे, डॉ. प्रतीक पलांडे यांनी संस्थेच्या वाटचाली विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. संजय राऊत, रीना क्लिंटन यांनी केले. डॉ. सपना देव यांनी आभार मानले.

शेकडो लोकांनी घेतले मार्गदर्शन

१४ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत मोफत कायदेशीर सल्ला व सहाय्य सप्ताह पार पडला. सप्ताहात सामान्य लोकांच्या अनेकविध अडचणी व कौटुंबिक कलह, घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार, तसेच लहान मुलांचे हक्क व अधिकार, मुलांकरता कौन्सिलिंग, शेती विषयक कायदे आदीसाठी कायदेशीर मदत देण्यात आली. पुण्यातील तसेच शिरूर भागातील विधिज्ञ, समुपदेशकांनी मार्गदर्शन केले, असे डॉ. सपना देव यांनी नमूद केले.

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

शिवजन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. १९ :- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात,
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. स्वराज्यावर अनेक संकटे आली, काही स्वकीयांकडून तर काही परकीयांकडून, पण महाराज कधीही झुकले नाहीत. त्यांचे शौर्य, व्यक्तिमत्व, रयतेच्या हितासाठी केलेले कार्य, दूरदृष्टी याचे दाखले आजही दिले जातात.
महाराजांचे वेगळेपण हे की, ते युगपुरुष होते , त्यांची दूरदृष्टी, आदर्श राज्यकारभार, रणनीती याचे आज आपल्यासमोर उदाहरण आहे. त्यांचे आज्ञापत्र वाचले तर शिवराय किती प्रजा दक्ष होते याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, समयसूचकता ही वैशिष्ट्ये आजच्या व्यवस्थापनशास्त्रालाही अभ्यासण्यासारखी आहेत.
शिवराय सर्वांचे होते. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी बांधलेल्या सेनेत अठरा पगड जातीचे लोक होते, जात-धर्म-भाषा यांच्या भिंती ओलांडून शिवरायांवर प्रेम करणारे लोक होते. शिवरायांच्या युद्ध नितीमुळे भारतीय लष्कर त्यांना आज आपले दैवत मानते.
राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करून आपण हा पराक्रमी इतिहास पुढील अनेक पिढ्यांच्या मार्गदर्शनासाठी जतन करण्याचे कामही हाती घेतले आहे. शिवछत्रपतींची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन आमचे सरकार काम करीत आहे आणि पुढे देखील करणार आहे,अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

0

शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी गड-किल्ल्यांचा विकास
–उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.१९:  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव  उत्साहात साजरा झाला, त्यावेळी श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके,  मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करणारे युगपुरुष होते. त्यांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन केलं. महाराजांसारख्या युगापुरुषाने महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. ४०० वर्षानंतरही शिवाजी महाराजांविषयी नव्या पिढीच्या मनात आदर आणि अभिमान कायम आहे. महाराजांच्या नावाने प्रत्येक पिढीला शौर्याची आणि जनकल्याणाची प्रेरणा दिली आहे.

छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाची भूमिका असून यासाठी पुरातत्व, पर्यावरण, वन विभाग आदी विभागांच्या माध्यमातून जुन्या बांधकाम रचनेला धक्का न लावता या वारसास्थळांचे जतन करण्यात येईल. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवनेरी किल्ले संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून किल्ल्याच्या परिसरात विकास कामे सुरू आहेत. किल्ले रायगड  संवर्धनासाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिला असून अनेक विकासकामे तेथे सुरू आहेत.

शिवजयंती ही मराठी माणसांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे किल्ल्यावर काही बंधनात जयंती साजरी करावी लागली. कोरोनाचे सावट कमी झाल्यावर सर्व निर्बंध खुले करण्याबाबत विचार केला जाईल.

शिवाजी महाराजांनी जुन्नर येथील हापूस आंबा जपला. या आंब्याचे जतन करण्याचे काम सुमारे साडेतीनशे वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी केले. त्याला भौगोलिक मानांकन (जी.आय.) मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेल्या २७ लाख रुपयांच्या निधीतून प्रयत्न केले जातील.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही कायमच राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र घटनात्मक तरतुदीमुळे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेता येणार नाही ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी प्रधानमंत्री महोदयांचीही भेट घेऊन कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत विनंती केली आहे. कोणतेही राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे.

प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी उपमुख्यमंत्र्यांनी वाहीली.

भारतीय डाक विभागाने केलेल्या ‘जुन्नर रत्न’ या पोस्टकार्ड संचाचे प्रकाशनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. १५ सचित्र पोस्ट कार्डाच्या या संचात येथील किल्ले, जैवविविधता, पर्यटन स्थळे, मंदिरे आदींचा समावेश आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांची संकल्पना यामागे होती.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार स्व. अनिल अवचट यांना जाहीर झाला होता तो त्यांची कन्या मुक्ता पुणतांबेकर यांनी स्वीकारला. तसेच शिवनेर भूषण पुरस्कार प्रा. विनायक खोत यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, माजी जि.प. अध्यक्ष देवराम लांडे, मराठा सेवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डुबे, यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

मुठा नदीवरील पुलासाठी दुधाने कुटुंबियांकडून तब्बल १३ गुंठे जमीन महापालीकेच्या स्वाधीन

0

पुणे- कर्वेनगर व सनसिटी सिंहगड रोडला जोडणाऱ्या नदीवर पूल बांधण्यासाठी दुधाने कुटुंबाने १३ गुंठे जमीन पुणे महापालिकेच्या स्वाधीन केली असल्याचे जाहीर केले आहे .

या संदर्भात स्वप्नील दुधाने यांनी असे म्हटले आहे कि ,’आपण प्र. क्र. ३१ मधील कर्वेनगर व सनसिटी सिंहगड रोडला जोडणाऱ्या नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. हा पूल सत्यात उतरावा, यासाठी दुधाने कुटुंबियांकडून तब्बल १३ गुंठे जमीन पुणे मनपाला सुपूर्द करण्यात आली आहे. या पुलाचे कामाबाबत आज पुणे मनपाच्या प्रकल्प विभागाच्या मुख्य अधीक्षक अभियंता शिर्के मॅडम यांची अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष ठिकाणी व्हिजिट घेण्यात आली. या व्हिजिटदरम्यान पुलासाठी येणारा एकूण खर्च, पुलाची आखणी, या विकासकामाची सद्यपरिस्थिती आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी लक्ष्मीताई दुधाने यांच्या लोकप्रतिनिधी या नात्याने पुणे शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा पूल ठरावा, अशा पद्धतीने या पुलाची डिजाईन असावी तसेच भविष्यातील वाहतूक प्रश्नांचा विचार यावेळी केला जावा, अशी विनंतीवजा सूचना करण्यात आली. याचप्रसंगी येणाऱ्या मनपा अंदाजपत्रकात या पुलासाठी १० कोटी रुपये असा निधी प्राथमिक स्वरूपात उपलब्ध करून घ्यावा आणि तशा प्रकारची निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पुलामुळे दोन महत्त्वाची उपनगरे जोडली जाणार असून यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे, तसेच या पुलामुळे भविष्यातील अनेक वर्षांचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे असेही स्वप्नील दुधाने यांनी म्हटले आहे.

पंजाबचाच न्याय महाराष्ट्राला लावत राहुल गांधी यांनी उर्जामंत्री नितीन राउत यांचा राजीनामा घ्यावा: आप

पुणे-पंजाब विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काल कॉंग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी अमरिंदर सिंह यांनी गरिबांना वीज मोफत देण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्री पदावरून हटवल्याचे विधान केले आहे.
महाराष्ट्रात ठाकरे यांनी निवडणुकीत विचारपूर्वक वीजबिल सवलतीचे आश्वासन दिले होते. गेले दोन वर्षे किमान कोरोना काळात वीजबिल माफी करा असा आग्रह करीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने केली आहेत. त्यानंतर ‘महाराष्ट्रातील कॉंग्रेसचेच मंत्री असलेले नितीन राउत यांनी ऐन दिवाळीपूर्वी वीजबिल माफीची घोषणा केली होती पण लगेचच यु टर्न घेतला. त्यामुळे पंजाबचाच न्याय महाराष्ट्राला लावत राहुल गांधी यांनी उर्जामंत्री नितीन राउत यांचा राजीनामा घ्यावा व ही सर्व जुमलेबाजी नसून, गरिबांचा कळवळा खरा असल्याचे दाखवून द्यावे’ असे आवाहन आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केले आहे .
पंजाब मध्ये खाजगी वीज कंपन्याशी अमरिंदर सिंह यांचे हितसंबंध होते असेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे. तसेच काही हितसंबंध महाराष्ट्रात या महाविकास सरकारच्या आड येत आहेत का?, अशी वीजबिल माफी केल्यास शिवसेनेलाही दिल्या वचनाला जागल्याचे समाधान मिळेल, अशी खोचक प्रतिक्रिया आप चे अध्यक्ष राचुरे यांनी दिली आहे.  

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांचा विषय पुढे आणणे संशयास्पद-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

पुणे–शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी पुणे येथे पत्रकारांना सांगितले.

आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती तर त्यांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत बोलायला हवे होते. पाटकर कोण, राऊत कोण, तुमच्या मुलीची व्यावसायिक भागिदारी आहे की नाही, ज्यांना कोविड सेंटरची कामे मिळाली ते कोण, त्यात भागिदारी आहे का याबद्दल संजय राऊत यांनी बोलायला हवे होते. पण त्याऐवजी त्यांनी खूप दिवसांपूर्वी बाहेर आलेला मुख्यमंत्र्यांचा १९ बंगल्यांचा विषय पुन्हा काढून तो विषय पटलावर आणला तसेच रश्मी उद्धव ठाकरे यांचा विषय पुढे आणला. संजय राऊत यांनी बंगल्यांचा विषय काढण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांचा हेतू संशयास्पद आहे. त्यांना मातोश्री डळमळीत करायची आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. ज्या आयटी विभागाला पाच वर्षांची तरतूद ३८० कोटींची होती, त्या विभागात पंचवीस हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा राऊत यांनी केला. एकूणच सर्व संशयास्पद होते व कोणता विषय का काढला जात आहे हे समजत नव्हते.

संजय राऊत हे कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालतात. कोणाच्या ते सर्वांना माहिती आहे. त्या इशाऱ्यानुसार राऊत मातोश्रीचा पाया उखडण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा इशारा करणाऱ्यांना आपला मुख्यमंत्री करायचा आहे का, त्यांना संजय राऊत यांना मुख्यमंत्री करायचे आहे का, असे प्रश्न संजय राऊत यांनी अचानक मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीच्या संपत्तीचा विषय पुढे आणल्याने निर्माण झाले आहेत, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा हे खूप हुषार राजकारणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ध्यानात येत नाही की, हे सर्वेसर्वा कठपुतळीच्या खेळाप्रमाणे आपल्याला खेळवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, हे सुडाचे राजकारण चालू आहे. क्रिया प्रतिक्रिया चालू आहे. त्यांना जे करायचे ते त्यांनी करावे मग आम्हीही आम्हाला जे करायचे ते करू.

राज्याच्या घराघरात, मनामनातशिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

0

मुंबई, दि. 18 :- ‘”महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनाही वंदन केले असून, शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शब्दात राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवजयंतीनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. महाराजांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं आणि ते रयतेला अर्पण केलं. महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी होतं. महाराज दूरदृष्टीचे नेते होते, बिकट प्रसंगात त्यांनी प्रसंगी तात्पूरती माघार घेतली, परंतु रयतेला धोका होईल, असा निर्णय घेतला नाही. महाराजांच्या या इतिहासातून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा शिकला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचं हित, जनतेचं कल्य़ाण, डोळ्यासमोर ठेवून, दूरदृष्टीनं घेतला होता, हे आपल्या लक्षात येईल. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, धोरणांना, कारभाराला आदर्श मानून काम करत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं आहे. शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शुभेच्छाही त्यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत.

आमचा विरोधच -महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकणारा कोणताही कट यशस्वी होऊ देणार नाही – प्रशांत जगतापांचे स्पष्टीकरण

विरोधी पक्षनेत्या राष्ट्रवादीच्या ..नगरसेवकच काय पण त्यांनीही विरोध केलेला नाही – गणेश बिडकर

पुणे- बाणेर ;बालेवाडी येथील हजार कोटीच्या रुग्णालयांच्या भाजपच्या प्रस्तावाला आमचा विरोधच आहे , कालच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीला अनुसरून या विषयालाही आमचा विरोधच आहे. माझ्यासह सभागृहातील अनेक ज्येष्ठ सदस्य गैरहजर असताना हा विषय चर्चेस घेण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीने भूमिकेत बदल केला हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करत पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकणारा कोणताही कट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यशस्वी होऊ देणार नाही हीच आमची भूमिका आहे. असे आज राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथे म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणी भाजपाचे सदस्य आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांनी मात्र मुख्य सभेत हा विषय आला तेव्हा राष्ट्रवादीच्या कोणत्याही सदस्याने विरोध केलेला नाही, खुद्द राष्ट्रवादीच्या नगरसेविका या विरोधी पक्ष नेत्या आहेत त्यांनीही यावर विरोध केलेला नाही आणि त्यामुळे मतदान घेण्याचा प्रश्नच उदभवलेला नाही असे सांगितले.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष जगताप यांनी म्हटले आहे कि,’महानगरपालिकेची मुख्य सभा आज ऑनलाईन माध्यमातून संपन्न झाली. पुणे महानगरपालिकेच्या परंपरेप्रमाणे महिन्यातील पहिली सभा ही दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात येते. ही परंपरा मोडीत काढत यावेळी प्रथमच विविध विषय चर्चेस घेण्यात आले. वारजे व बाणेर येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयांच्या बाबतीतही चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यक्रम पत्रिकेत समावेश नसतानाही परिपत्रकाद्वारे ऐनवेळी वारजे व बाणेर येथील रुग्णालयांचा विषय चर्चेत समाविष्ट करण्यात आला. ऑनलाईन सभा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नगरसेवक या सभेस उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे शहराध्यक्ष म्हणून मीही या सभेस सुरुवातीची १० मिनिटे हजर होतो, मात्र त्यानंतर सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यास हजर राहण्यासाठी मला जावे लागले. प्रस्तुत रुग्णालयांची विषयांची पूर्ण माहिती महानगरपालिकेच्या विरोधीपक्षनेत्या सौ. दिपाली धुमाळ यांनाही देण्यात आली नव्हती. म्हणून त्यांनीही मुख्य सभेत याविषयी काही भाष्य केले नाही पण ठरावाच्या बाजूने मतदान पण केले नाही .कालच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीला अनुसरून या विषयाला आमचा विरोधच आहे. माझ्यासह सभागृहातील अनेक ज्येष्ठ सदस्य गैरहजर असताना हा विषय चर्चेस घेण्यात आला. मात्र पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , माननीय नगरविकास मंत्री, गृहमंत्री यांची भेट घेऊन सदर ठराव निरस्त करणे तसेच या प्रस्तावाची सखोल चौकशी करण्याची विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाकडे करणार आहोत.

राष्ट्रवादी- डबल ढोलकी ?…काल तक्रार : आज पाठींबा : आत भाजपके साथ-बाहेर भाजप के खिलाफ…

0

पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने महापलिकेत वेगवेगळ्या प्रकरणावर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या कधी भाजपा के साथ आणि कॉंग्रेस के खिलाफ चे धोरण पत्करलेल्या या पक्षाचे नेते ,नगरसेवक भाजपबरोबर जाताना शिवसेनेच्या विरोधातही कधी कधी उभी राहिल्याचे स्पष्ट झालेले आहे. सभागृहात एक भूमिका , महापौरांच्या अँँटीचेम्बर मध्ये दुसरी भूमिका आणि बाहेर तिसरी भूमिका घेणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांनी वारंवार रंग बदलले हे घडत असताना अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली पण नेत्यांपुढे जाऊन ठाम राहण्याचे धारिष्ट्य कोणी दाखविले हीच स्थिती अगदी महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाही बदलली नाही हे खूपच महत्वपूर्ण मानावे लागणार आहे . परवा नदी सुधारणा प्रकल्पाला आणि गुजरात दौऱ्यावरून या पक्षाच्या या प्रकल्पाबाबतच्या धोरणाला विरोध करणाऱ्या आणि एकूणच या प्रकल्पाबाबत संशयाची भूमिका वारंवार अधोरेखित करणाऱ्या या पक्षाने प्रत्यक्षात एसीबी कडे तक्रार केली तेव्हा या प्रकल्पाचा साधा उल्लेख देखील केला नाही राष्ट्रवादीने संशयित म्हणून उपस्थित केलेल्या निविदांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये नदी सुधारणा प्रकल्प सर्वाधिक खर्चाचा म्हणजे पावणेपाच हजार कोटीचा प्रकल्प आहे .आजच्या मुख्य सभेत तर त्याही पुढे या पक्षाने मोठ्ठी छलांग मारली. काल त्यांनी एसीबी कडे ज्या प्रकल्पाबाबत संशय व्यक्त करणारी हरकत घेऊन ज्याच्या चौकशीची मागणी केली आज त्याच प्रकल्पाला चक्क पाठींबा देऊन त्याबाबतचा सुमारे १ हजार कोटीचा प्रस्ताव संमत केला .

वारजे आणि बाणेर- बालेवाडी येथे सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून पीपीपी तत्वावर बांधण्यात येणार्‍या हॉस्पीटलचे काम ठराविक कंपन्यांना डोळ्यासमोर ठेउन करण्यात येत असल्याची चौकशी करावी अशी मागणी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) कडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने केली होती पण चोवीस तासांच्या आतच या पार्टीच्या नेत्यांनी , आणि त्यांची भूमिका काल जाहीर होऊनही आज त्यांच्या नगरसेवकांनी देखील घुमजाव केले आहे.यामुळे अगदी शेवट्च्या क्षणापर्यंत ‘घुमजाव’ च्या भुमिकेमध्ये यांनी सातत्य ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे. अशा पक्षाबरोबर शिवसेना आणि कॉंग्रेस येत्या निवडणुकीत आघाडी करणार काय ? केली तर कुठे कुठे काय होईल ? हे सांगायला आता कुठल्याही तज्ञ अशा समीक्षकांची आवशक्यता भासणार नाही .

स्थायी समितीमध्ये वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल तर बाणेर- बालेवाडी येथे कॅन्सर हॉस्पीटल उभारणीचा प्रस्ताव आठवडाभरापुर्वी मंजूर करण्यात आला. पीपीपी तत्वावर उभारण्यात येणार्‍या या हॉस्पीटलसाठी महापालिका केवळ जागा देणार असून ही हॉस्पीटल उभारणी करणार्‍या कंपन्याच पुढील ३० वर्षे सर्व व्यवस्थापन पाहील. यासाठी या कंपन्या जे कर्ज काढतील या कर्जाची महापालिका गॅरंटी घेणार. तसेच या रुग्णालयांमध्ये महापालिकेच्यावतीने पाठविण्यात येणार्‍या रुग्णांवर अत्यल्प दरात उपचाराची सुविधाही देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून परवानगी घेण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे होता.दरम्यान, दोनच दिवसांपुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव ठराविक कंपन्या डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पुढील पिढ्यांच्या अर्थार्जनाची सोय केल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर यासह मागील पाच वर्षात मंजुर झालेल्या प्रकल्पांमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची चौकशी करावी, असे निवेदन पुणे एसीबी अधिक्षक कार्यालयात दिले आहे. यानंतरही आज सर्वसाधारण सभेत मात्र प्रस्तावांना पाठींबा दिल्याने
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने पुन्हा एकदा घुमजाव केल्याचे समोर आले आहे. यापुर्वीही कोरोनावरील कॉफी टेबल बुकसह अन्य प्रस्तावांना अगोदर विरोध आणि नंतर पाठींबा दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
या प्रस्तावाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या परवानगीनंतरच करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिल्यानंतर अन्य विरोधी पक्षांचेही समाधान झाले.काल हि असंख्य नगरसेवकांचे महापालिकेच्या जागा नाममात्र दराने मिळण्याबाबतचे प्रस्ताव संमत करण्यात आले त्यास राष्ट्रवादीच्या वतीने तातडीने अनुमोदन देण्यात येत होते . अन्य पक्षांनी हरकत घेताच सभागृहनेते जागा वाटप नियमावली नुसार जागा देण्यात येतील असे सांगत होते पण ते तोंडी होते , कोणत्याही विषयपत्र तसे नमूद नसल्याने अशा सर्व प्रस्तावांची अंमलबजावणी अखेरीस प्रशासनाला हाताशी धरूनच केली जाईल असे दिसते आहे.

महावितरणच्या खासगीकरणाच्या वावडया भाजप उठवत आहे-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

0

खासगीकरणाचे वृत्त निराधार,असा कोणताही प्रस्ताव नाही
मुंबई- महावितरणच्या खासगीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही अपयशी झाल्याच्या नैराश्यातून महावितरणच्या सोळा विभागाच्या खाजगीकरणाबाबत भाजपा वावड्या उठवीत आहे,असे स्पष्ट प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी केले आहे.खासगीकरणविषयक बातम्या जनतेची निव्वळ दिशाभूल करणाऱ्या असून असा कोणताही प्रस्ताव कोणत्याही पातळीवर महावितरण वा राज्य शासनाच्या विचाराधीन नसल्याचे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले आहे.”भाजपसारखे राजकीय पक्ष वा काही संघटना स्वार्थी व राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशा अफवा पसरवित आहेत आणि जनतेने यावर विश्वास ठेवू नये “, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले आहे.
“महावितरणच्या काही  विभागाचे खाजगीकरण करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी सरकार व माझ्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी हे बातम्या पेरण्याचे षड्यंत्र तर रचण्यात आलेले नाही ना,अशी शंका या निमित्ताने येत आहे”,असेही ते म्हणाले. ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी अनेक जनोपयोगी निर्णय व धोरण आखल्याने ऊर्जा विभागात  निहित स्वार्थ असलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहे. भारतीय जनता पार्टीने देशात सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाचा सपाटा लावला असून अनेक सार्वजनिक उद्योग मोडीत काढत भांडवलदारांच्या खिश्यात घातले आहे. 
खासगीकरणासाठी भाजपचेच प्रयत्न

गेल्या 2014 पासून केंद्रातील भाजपा सरकारने विद्युत क्षेत्राचे खाजगीकरण करण्यासाठी 5 ते 6 वेळा विद्युत कायद्यात सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट राज्यावर लादून आडमार्गाने खासगीकरणाचा प्रयत्न ही केंद्र सरकारने करून पाहिला. मात्र ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी याला कडाडून विरोध केलेला आहे. एवढेच नव्हे तर देशातील इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केंद्र शासनाच्या वीज क्षेत्राच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध केलेला आहे.राज्यातील महावितरणचे खासगीकरण करण्याच्या वातावरण निर्मितीसाठी भाजपने महावितरणची थकबाकी ५ वर्षात तिपटीने वाढू दिली. मात्र सत्ताबदल झाल्याने व खासगीकरणासाठी केंद्राचा दबावही राज्य झुगारत असल्याने आडमार्गाने खासगीकरणासाठी ही नवी मोहीमच भाजपने उघडली आहे,असा आरोप ही त्यांनी केला.मागील भाजप सरकारच्या काळात महावितरणला तोट्यात आणून खाजगीकरण करण्याचा घाट भाजपने घातला होता. भाजपच्या काळात महानिर्मितीच्या नफ्यात चालणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाचे खाजगीकरण करण्यात आले आहे.  भाजप प्रवक्ते  विश्वास पाठक यांनी ऊर्जामंत्री यांच्यावर केलेले आरोप हे राजकिय आकसापोटी केले आहेत,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.तिन्ही वीज कंपन्यांना नफ्यात आणून राज्यातील जनतेला स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. राऊत हे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. शेतकरी वर्गासाठी उपयुक्त असे नवीन कृषिपंप धोरण व अपारंपरिक ऊर्जा धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत असून कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या महावितरणला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकरी, सामान्य ग्राहक व कर्मचारी यांच्या हितासाठी महावितरणचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी मी वेळोवेळी खंबीर भूमिका घेतली असून भविष्यातही अशीच भूमिका घेत राहील,असे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

निवास, न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेबाबत एमटीडीसीमार्फत दिवेआगर येथे कार्यशाळा

0

मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) दिवेआगर येथे 20 व 21 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांची निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहचावी जावी या उद्देशाने येथे सहभागी होणाऱ्या इच्छुकांना या योजनांचे स्वरूप व त्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण या योजनांना आजवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पर्यटन क्षेत्रात या उपक्रमांचे महत्त्व सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना तसेच सामान्य जनतेला उत्पन्नाचा स्रोत म्हणून निवास व न्याहारी योजनेअंतर्गत नोंदणी करून आपली जागा, कक्ष किंवा निवास व्यवस्था पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक अनुभवांसह परवडणाऱ्या दरात प्रदान करता येते.

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कुणबी समाज हॉल, दिवेआगर येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या विशेष प्रयत्नाने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेदरम्यान महामंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे हे या योजनांबाबत सादरीकरण करतील. तसेच महामंडळाच्या स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग संस्था व भविष्यातील जल पर्यटन प्रकल्प आदींबाबतचीही माहिती देतील.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 1 हजार 485 जणांनी निवास व न्याहारी योजनेचा तसेच 144 जणांनी महाभ्रमण योजनेचा लाभ घेतला आहे. व्यावसायिक पात्रता प्रस्थापित करण्यासाठी या उपक्रमांतर्गत नवीन नाव नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिकांसाठी महामंडळामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनांमुळे निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेद्वारे स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होत असून कमीत कमी गुंतवणुकीसह उत्पन्न कसे वाढवता येईल, याचेही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे एमटीडीसीमार्फत कळविण्यात आले आहे.

राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी सर्व मिळून काम करूया-शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

0

पुणे दि. १८: शैक्षणिक क्षेत्रात राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी सर्व मिळून एकत्रित समन्वयाने काम करूया, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
सिम्बॉयसिस विद्यापिठ येथे आयोजित शालेय शिक्षण विभागाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राजेश कृष्णा यांच्यासह शिक्षण विभागाचे संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

श्रीमती गायकवाड म्हणाल्या, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात शैक्षणिक क्षेत्रात समन्वयातून चांगले कार्य सुरू आहे. विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी शालेय शिक्षण विभागात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शिक्षण विभागात कार्य करताना त्यांनी अत्यंत लहान बाबी विचारात घेत नियोजन केले आहे. शालेय शिक्षण विभाग एक कुटुंब आहे, राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी हे कुटुंब सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येकाचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांकरिता चांगले, सुदृढ वातावरण निर्माण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कोरोना कालावधीत शिक्षकांनी ऑनलाईन, ऑफलाईनसह विविध माध्यमातून शिक्षण देण्याचे कार्य केले. यापुढेही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासोबतच पायाभुत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापरही वाढविण्यात येणार असल्याचे श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा म्हणाल्या, शालेय शिक्षण विभागात खुप काळ सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. विभागात सेवा करताना अनेक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. आदर्श शाळा उपक्रमा अंतर्गत राज्यातील काही शाळा मॉडेल करण्याचा प्रयत्न आहे.

शिक्षण आयुक्त श्री. सोळंकी यांनी राज्याला शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले.

यावेळी सेवापुर्तीनिमित्त शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांच्या हस्ते श्रीमती वंदना कृष्णा व राजेश कृष्णा यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षण विभागातील संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.