Home Blog Page 2079

शिवजयंती निमित्त पीएमपीएमएलचे विविध कार्यक्रम संपन्न

0

पुणे-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे स्टेशन आगारामध्ये हडपसर येथील अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये पुणे स्टेशन आगारातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिरात एकूण ५७ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी. चंद्रकांत वरपे यांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी पुणे स्टेशन आगार व्यवस्थापक संजय कुसाळकर, आगार अभियंता विकास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
दत्तात्रय झेंडे व चंद्रकांत वरपे यांच्या हस्ते पुणे स्टेशन आगारातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५ चालक, ५ वाहक व वर्कशॉप विभागातील २ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदात्यांचा देखील सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पुणे स्टेशन आगारातील चालक श्री. दिपक तेली यांचा मुलगा कृष्णा दिपक तेली याने औरंगाबाद येथे झालेल्या ३९ व्या स्टेट रोलर रिले स्केटींग चॅम्पियनशिप मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल गौरवचिन्ह देऊन त्याचाही सत्कार करण्यात आला.

पीएमपीएमएल कात्रज आगार व श्रीमंत सेवा प्रतिष्ठानने सैनिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करून राबवला स्तुत्य उपक्रम

पीएमपीएमएलच्या कात्रज आगारामध्ये श्रीमंत सेवा प्रतिष्ठान व आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या शूर सैनिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
या रक्तदान शिबिरात १८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला जेवणाचा डबा (टिफिन) व पेन भेट म्हणून देण्यात आले. तसेच आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज यांच्या तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
या रक्तदान शिबिरास आमदार मा. श्री. संजय जगताप, आमदार भिमराव तापकीर, नगरसेवक. दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक युवराज बेलदरे, नगरसेवक महेश वाबळे, नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, नगरसेवकराजाभाऊ कदम, नगरसेवक तुषार कदम, नगरसेविका राणीताई भोसले, नगरसेविका अश्विनीताई भागवत, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माधवराव जगताप, माजी नगरसेवक विजयराव मोहिते, माजी नगरसेवक शैलेंद्र नलावडे, मुंबई येथील उद्योजक नितीन दळवी व उद्योजक महेश पोटे ‘रक्ताचे नाते’ ट्रस्टचे राम बांगड, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक . दत्तात्रय झेंडे, प्रशासन अधिकारी नितीन घोगरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश मोहिते, सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे, सामाजिक कार्यकर्ते . दिपक उर्फ बाबा मिसाळ आदी मान्यवरांनी भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक केले. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माधवराव जगताप व सामाजिक कार्यकर्ते. दिपक उर्फ बाबा मिसाळ यांनीदेखील या रक्तदान शिबिरात रक्तदान केले.
श्रीमंत सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पीएमपीएमएलच्या कात्रज आगारातील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून तर दिलेच, त्याचबरोबर या माध्यमातून सर्व रक्तदात्यांनी एक प्रकारे देशसेवाच केली आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कात्रज आगार व्यवस्थापक श्री. विजय रांजणे, सहाय्यक आगार व्यवस्थापक श्री. शैलेंद्र जगताप, आगार अभियंता श्री. सचिन वाबळे यांनी रक्तदान शिबिरास भेट देणाऱ्या मान्यवरांचे स्वागत केले.
या रक्तदान शिबीरासाठी आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम, श्रीमंत सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत गिरे, सदस्य श्री. यशवंत जाधव, श्री. विशाल फडतरे, श्री. धन्यकुमार माने यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच कात्रज आगारातील सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. सुभाष मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. निलेश जगताप यांनी आभार मानले.
श्रीमंत सेवा प्रतिष्ठान सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. दरवर्षी वाखरी येथे प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना अन्नदान केले जाते. तसेच ५ डिसेंबर २०२१ रोजी देव दिवाळीचे औचित्य साधून स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बालसदनातील अनाथ मुलांना कपडे व भांडी भेट म्हणून दिली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट मुख्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. परिवहन महामंडळाचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे व प्रशासन अधिकारी नितीन घोगरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे, कामगार व जनसंपर्क अधिकारी सतिश गाटे यांच्यासह आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, आगार अभियंता, कार्यालय अधीक्षक तसेच प्रशासन, वाहतूक व मध्यवर्ती यंत्रशाळा विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना दत्तात्रय झेंडे म्हणाले,” छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायरूपी अंधकाराच्या काळोखात बुडालेल्या जनतेला प्रकाशात आणलं. परकीयांची गुलामी संपवली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, त्यांचे प्रेरणा देणारे विचार चिरकाल मार्गदर्शक ठरतील. छत्रपती शिवाजी महाराजांमधला एक जरी गुण आपण अंगीकृत केला तर तोच खरा त्यांना मानाचा मुजरा ठरेल.”

शिवाजी महाराजांचा लढा हा कुप्रवृत्तींविरुद्ध होता – प्रा. श्रीधर साळुंखे यांचे प्रतिपादन

0

पुणे, दि. १९ फेब्रुवारी २०२२:छत्रपती शिवाजी महाराज यांनी माणुसकीच्या मूल्यावर स्वराज्य निर्माण केले. त्यांचा लढा हा जाती किंवा धर्माविरुद्ध नव्हे तर कुप्रवृत्तींविरुद्ध होता. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी होता असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी शनिवारी (दि. १९) केले.

महावितरण व महापारेषणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावळे मुख्य वक्ते म्हणून प्रा. श्रीधर साळुंखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार (महावितरण) व श्री. जयंत विके (महापारेषण), अधीक्षक अभियंता श्री. सतीश राजदीप यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करून शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुरेश जाधव तर सूत्रसंचालन श्री. बाबा शिंदे यांनी केले तर श्री. वसंत ढवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण, महापारेषणमधील अभियंते, अधिकारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला इशारा, म्हणाले- हल्ला केल्यास आम्ही युक्रेनला पाठिंबा देऊ

0

रशियाने युक्रेनला चारही बाजूंनी सैनिकांनी घेरले आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दरम्यान अमेरिकासह अनेक पश्चिम भागातील देश युक्रेनला सपोट करताना पाहायला मिळत आहे. रशियासोबत चर्चा करुन हा वाद मिळवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र रशिया कोणचेही ऐकण्यास तयार नाही. दरम्यान आता अमेरिकेने रशियाला इशारा दिला आहे.

आम्हाला संघर्ष नकोय

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी रशियाला इशारा दिला आहे. जो बायडन युक्रेन प्रश्नावर रोजच नव-नवीन ट्विट करताना पाहायला मिळत आहे. बायडन यांनी पुन्हा एक ट्विट करत म्हटले आहे की, “आम्हाला संघर्ष नको आहे, परंतु रशियाने जर युक्रेनवर आक्रमण केले, तर आम्ही युक्रेनला मदत करू. युक्रेनवर आक्रमण करणे हे चुकीचे असुन, विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी रशिया जबाबदार राहिल.” असे जो बायडन यांनी म्हटले आहे.

युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी ट्विट करत लिहले आहे की, युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रशिया अशा प्रकारचे खेळ यापूर्वी देखील खेळला आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका आणि आमचे सहयोगी युक्रेनच्या जनतेचे समर्थन करणार. आम्ही रशियाला त्याच्या कृतींसाठी जबाबदार धरू. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास पाश्चात्य देश रशियावर कठोर निर्बंध लादण्यास तयार आहेत. असे बायडन म्हणाले.

चर्चा करुन उपाय काढू

बायडन पुढे म्हणाले की, युद्धाने काहीही होणार नाही. त्यामुळे आपण चर्चा करून या मुद्द्यावर उपाय काढू. सध्या रशियाकडे वेळ गेलेली नाही. त्यांनी चर्चेस होकार द्यावा. असे बायडन म्हणाले. रशिया अजूनही राजनैतिक मार्गाने या समस्येवर उपाय काढू शकतो. रशियाच्या सैन्याने युक्रेनला चारही बाजुंनी घेरले असून, रशिया पुढील काही दिवसात युक्रेनवर आक्रमण करण्याची योजना आखत आहे. असे भाकित बायडन यांनी केले आहे.

युक्रेनला दिली जाईल मदत
जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर, युक्रेनला मदत केली जाण्याची घोषणा व्हाइट हाउसमध्ये करण्यात आली. युक्रेनसोबत असणारे देश युक्रेनला मदत करणार आहेत.

‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजराने महाराष्ट्र सदन दुमदुमले

0

नवी दिल्ली दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यातील ढोल-ताशांचे दिमाखदार सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फूर्त घोषणांमुळे आज राजधानीतील ल्युटियन दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा परिसर दुमदुमला.

शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने  येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भव्य महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी  कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज्ञी राजे संयोगिताराजे छत्रपती ,युवराज राजे शहाजीराजे छत्रपती  यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेतला. यानंतर पालखी पूजन करण्यात आले.

महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी  स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला छत्रपती परिवारातील सदस्य, खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहिर, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर कुमार बिस्वास, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ. निधी पांडे, महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण

ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले होते आणि सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादून गेले होते.  नाशिक येथील 30 वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांना ठेका धरायला लावला. 

संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

तत्पूर्वी, सकाळी संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले.यावेळी युवराज राजे शहाजी राजे छत्रपती, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0

सातारा दि.19 :   महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची आज सकाळी श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते  अभिषेक व पूजा करण्यात आली.  भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण ॲड. यशोमती  ठाकूर  यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे,  अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले,ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.

यावेळी मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.  पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावाने पूजन  करुन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण  करण्यात आले.

मराठा साम्राज्याच्या शिलेदारांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा : सुनील रेडेकर

0

अशोक खिलारी लिखित ‘मराठा दौलतीचे खांब’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : मराठा साम्राज्याच्या उभारणीसाठी अनेक वीरांनी आपले रक्त सांडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात योगदान दिलेल्या सवंगडी, सेनानी, सरदार यांच्यापासून ते पेशवाई पर्यंतच्या शिलेदारांच्या लेखाजोखा ‘मराठा दौलतीचे खांब’ पुस्तकात मांडला आहे. दोनशे वर्षांचा हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा,” असे प्रतिपादन पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने पुणे विद्यार्थी गृह प्रकाशित व मुंबई अग्निशमन दलातील प्रमुख अग्निशामक अशोक बाजीराव खिलारी लिखित, ‘मराठा दौलतीचे खांब’ पुस्तकाचे प्रकाशन रेडेकर यांच्या हस्ते झाले. पुणे विद्यार्थी गृह संस्थेत झालेल्या या कार्यक्रमावेळी संस्थेचे कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, माजी कार्याध्यक्ष प्राचार्य हणमंत भोसले, संचालक कृष्णाजी कुलकर्णी, रमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रा. राजेंद्र कांबळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द, त्यांचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असा तीन पिढ्यांचा इतिहास यामध्ये लिहिला आहे. प्रत्येक शिलेदाराला न्याय देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. स्वराज्याच्या उभारणीत योगदान देणाऱ्या शिलेदारांचा इतिहास सर्वांनी जाणून घेतला पाहिजे.”
अशोक खिलारी म्हणाले, “मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे काम ज्या सेनापतींनी, सरदारांनी केले, अशा ४५ लोकांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. या पुढील काळात आणखीन काही शिलेदारांच्या गाथा मांडण्याचा मानस आहे.”

बोपोडीत सर्वधर्मीयांकडून शिवजयंती साजरी

0


पुणे :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्त बोपोडी येथे सर्वधर्मीयांनी मिळून शिवजंयती उत्साहात साजरी केली. यावेळी बोपोडी भागातील बोपोडी ग्रामस्थ तसेच कोरोनाकाळात विशेष कार्य करणार्‍यांचा भगवा फेटा, शिवाजी महारांजाची प्रतिमा भेट देवून सम्मान करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनोद दादासाहे रणपिसे यांनी केले होते. यावेळी बोपाडी ग्रामस्थ निवृत्ती बहिरट, (पाटील), राजीव ज्ञानोबा बहिरट, (पाटील), रामचंद्र बहिरट (पाटील), लक्ष्मण बाबूराव बहिरट, (पाटील), हभप सुनिल महाराज बहिरट (पाटील), दत्तात्रय बहिरट (पाटील), धन्नाभाऊ सूर्यवंशी (पाटील), शेखर बहिरट (पाटील), विनायक बहिरट (पाटील), नारायण चौधरी (पाटील), सुधीर बहिरट (पाटील),ाळासाहे बहिरट (पाटील), विजय कांबळे (अध्यक्ष), सुरेश यादव, अतुल गायकवाड, जय चव्हाण, जीवन भोंगडे, राजेंद्र भुतडा (अध्यक्ष बोपोडी ब्लॉक कांग्रेस), रमेश पवळे (सरचिटणीस पुणे शहर कांग्रेस कमेटी), इंद्रजीत भालेराव (अध्यक्ष शिवाजीनगर अनु. विभाग), विशाल जाधव (माजी अध्यक्ष युवक कांग्रेस शिवाजीनगर), साजीत शेख (अध्यक्ष बोपाडी ब्लॉक कांग्रेस अल्पसंख्यक सेल), मयूरेश गायकवाड (अध्यक्ष बोपोडी ब्लॉक कांग्रेस) ,मैनुद्दीन  अत्तार, ज्येष्ठ कांग्रेस कार्यकर्ते प्रशांत टेके, सुंदरताई ओव्हाळ (अध्यक्ष महिला कांग्रेस अनु. विभाग), कांताताई ढोणे (अध्यक्ष बोपाडी महिला कांग्रेस), सौ. शीला आरुडे (अध्यक्ष बोपाडी महिला कांग्रेस), ज्योतीताई परदेशी (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल), अमित थेटे, रवि नायर, भीमराव बनसोडे, विनय बहिरट, अँथोनी आई (वार्ड अध्यक्ष बोपाडी कांग्रेस) ,  विजय कांबळे,  सुरेश यादव,   सुनील वाघमारे,  योगेश पवार,  निखिल गायकवाड,  आकाश मोरे,  हेन्री अल्मेडा,  जॉन पॅट्रिक आदी मान्यवर उपस्थित होते.

वाघाच्या ‘एंट्री’ने पुण्यात वाढणार शिवसेनेचे ‘वैभव’

0

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वैभव वाघ यांचा शिवसेनेत प्रवेश
पुणे : गेली दोन दशके सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या वैभव वाघ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाघ यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. वाघ यांच्या प्रवेशामुळे पुण्यात शिवसेनेच्या वैभवात भर पडणार आहे. वैभव वाघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ढोलताशा पथके आणि वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून गेली २० वर्षे सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांना दांडगा अनुभव आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा अशा तब्बल १११ पेक्षा अधिक निवडणुकांचे रणनीतीकार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

गणेशोत्सव मंडळ, ढोलताशा पथक आणि वंदे मातरम संघटनेतील कामामुळे युवावर्गात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क पक्षाला येत्या काळात फायद्याचा ठरणार आहे. कोरोना काळात वैभव वाघ यांनी गरजूंसाठी केलेले कार्य, अंत्यसंस्काराच्या कामात दिलेले योगदान, प्लाझ्मा प्रीमियर लीग उपक्रम अशा वैविध्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामासाठी वैभव वाघ यांना देशभरातून ‘हेल्थगिरी अवॉर्ड चे तिसरे नामांकन मिळाले होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून वाघ यांनी वंदे मातरम संघटनेला राज्यभर विस्तारले आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि रणनीतीच्या कामाच्या अनुभवाचा शिवसेनेला आगामी निवडणुकांत फायदा होणार आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वैभव वाघ म्हणाले, “गेली २० वर्षे सामाजिक संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून काम करत आहे. आजवर करत असलेल्या समाजकारणाला व्यापक रूप देण्यासाठी योग्य राजकीय पक्षाची निवड करणे गरजेचे होते. उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे यांच्यासह उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर व अन्य काही नेत्यांशी गेल्या काही दिवसांपासून संपर्क सुरु होता. शहराच्या, राज्याच्या हितासाठी काम करण्याचे व्हिजन या नेत्यांकडे आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या बरोबरीने शिवसेनेला मजबूत करण्याचा प्रयत्न राहील.”

कोळी बांधवाच्या प्रलंबित प्रश्नांना विधीमंडळात न्याय मिळवून देणार -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


मच्छी विक्रेते कोळी बंधू व भगिनींना मोफत शितपेटी वितरण
मुंबई, दि. १९ फेब्रुवारी- कोळी समाज हा मुंबईचा मूळ मालक आहे. मुंबई शहराचा विकास होत असताना दुर्दैवाने कोळी समाज आजही उपेक्षित राहिला आहे. कोळी बांधवाचे अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. त्यामुळे आता मच्छिमार बांधवांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांना विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाचा फोडल्याशिवाय व त्या प्रश्नांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलच्यावतीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मच्छी विक्रेते कोळी बंधू व भगिनींना मोफत शितपेटी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते कोळी बंधू व भगिनींना मोफत शितपेटीचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर यांनी सांगितले की, आपले राजकीय हित साधण्यासाठी गेली अनेक वर्षे काही राजकीय पक्षांनी व राजकारण्यांनी मच्छिमार समाजाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. निवडणुकांचा काळ आला की काही राजकीय पक्षांना कोळी बांधवांची आठवण होते. मच्छिमार बांधवांच्या जीवावर अनेक नगरसेवक, आमदार व खासदार झाले. परंतु निवडणुकानंतर मात्र या सर्वांनी कोळी समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. परंतु भाजपने कोळी समाजाला नेहमीच विधीमंडळात प्रतिनिधीत्व दिले. फडणवीसजी मुख्यमंत्री असताना त्यांनी मच्छिमार समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. कोळी बांधवाच्या विकासाच्या दिशेने भाजपा सरकारच्या काळात सुरुवात झाली. भविष्यातही कोळी बांधवाच्या विकासासाठी भाजपा कटीबध्द आहे, असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक चेतन पाटील कोळी बांधवांसाठी धडपडणारे सच्चे कार्यकर्ते आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीने मच्छीमार समाजाच्या भावना व संवेदना समजणा-या कार्यकर्ता रमेश दादा पाटील यांना आमदारकीची संधी दिली. आमदार पाटील यांनी मच्छिमार वसाहतीमधील मच्छीमार बांधवांचे जे जे प्रश्न आहेत ते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सोडविण्याचा प्रामणिक प्रयत्न केला. आमदार पाटील यांची मच्छिमारांच्या प्रश्नांच्या प्रति असलेली धडपड मी बघितली आहे. आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चेतन पाटील आपल्या समाज बांधवांसाठी भगिनींसाठी काम करीत आहेत. चेतन पाटील यांच्या कार्याचा गौरव म्हणून व कोळी समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने आपण त्यांना रायगड सहकारी बँकेवर संचालकपदाची जबाबदारी दिली व त्यांच्याकडे रायगड सहकारी बँकेचे उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविली आहे.
भविष्यामध्ये रायगड सहकारी बँकेच्या माध्यमातून कोळी समाजाला नवीन दिशा मिळू शकेल, बँकेच्या माध्यमातून समाज बांधवांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकेल, तसेच समाजाच्या तरुण-तरुणींच्या उत्कर्षासाठी रायगड सहकारी बँकेच्या कार्याचा नक्कीच विस्तार होईल अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.
कोळी बांधवाच्या विकासासाठी व आपल्या समाजाला जागरुक ठेवण्यासाठी आम्ही सारे आपल्या पाठीशी आहोत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आपल्या समाजाच्या पाठीशी आहे. आम्ही सारेजण महासंघाच्या पाठीशी आहोत. आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मागे आपले आशीर्वाद कायम ठेवा, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.
यावेळी नगरसेविका राजेश्री शिरवाडकर, दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेश शिरवाडकर, भाजपा मच्छिमार सेलचे अध्यक्ष व आयोजक चेतन पाटील,महिला संयोजक सुनीता माहुलकर,कोकण विभाग संयोजक सचिन पगधरे,महामंत्री नरेंद्र पाटील, मिलिंद म्हात्रे,सरोज माहुलकर,हेमंत कोळी,वितेंद्र मांगेला,राहूल नायक,विकास मंडलिक,मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक निकेश वैती,भानुदास वेताळे, भाग्येश भाये, प्रमोद कोळी व रश्मी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

नव्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.१९- पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या माध्यमातून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते बारामती पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प. अध्यक्ष निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, न.प.अध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, शासकीय इमारती जनतेने दिलेल्या कराच्या पैश्यातून उभ्या रहातात, त्याला जनतेच्या घामाचा सुगंध असतो. त्यामुळे इमारतीत काम करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि इथे येणाऱ्या व्यक्तीच्या करातून आपल्याला पगार मिळतो याची जाणीव ठेवावी. काम करताना लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करण्याची आवश्यकता आहे. विकासाची कामे करताना गोरगरीबांनाही त्याचा उपयोग होईल याची दक्षता घेण्यात येईल.

पंचायत समितीच्या इमारतीत बँकेसह इतरही सुविधा देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीतून दूरदृष्य प्रणालीची सुविधा देण्यात येणार आहे, त्यामुळे कामकाज गतिमान होण्यास मदत होईल. ही इमारत राज्य आणि देशातील पंचायत समितीची भव्य इमारत असावी. इमारतीच्या माध्यमातून चांगले काम उभे रहावे.

पंचायत समितीच्या कामकाजाचे वेगळे महत्व आहे. लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगले कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यामुळे राज्यात पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रात रुजली. याच माध्यमातून सत्ता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम झाले. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची ही परंपरा यशस्वी झाली. लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण होऊन लोकशाही मजबूत झाली.

बारामती शहर आणि तालुक्याचा वेगाने विकास
बारामती शहरात अनेक कार्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुंदर इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. कवी मोरोपंतांच्या स्मारकचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समितीची सर्व सुविधायुक्त वास्तू, अद्ययावत क्रीडा संकुल, पाणी पुरवठा योजना आदी सुविधा जनतेसाठी निर्माण करण्यात येत आहे.

बारामती बसस्थानकाचे काम पूर्ण होत आहे. हे बसस्थानाक राज्यातील प्रमुख स्थानकात गणले जाईल. बारामती हे शिक्षणाचे ‘हब’ म्हणून ओळखले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा दूर करण्यात येईल, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

बचत गटांचे सबलीकरण आणि गरजूंना हक्काचे घर-हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महिला समृद्धीसाठी स्वयंसहायता बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. गरजूंना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी महाआवास अभियानांतर्गत ४ महिन्यात ५ लाख घरे बांधण्यात आली असून यावर्षीदेखील ५ लाख घरे बांधण्याचा संकल्प केला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात ४० हजार किलामीटर रस्ते तयार येणार आहेत, त्यापैकी १० हजार किलोमीटरच्या रस्त्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्व.आर.आर. पाटील यांच्या स्मृती दिनी सुंदर गाव स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या ग्रामीण गावातील घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंधराव्या वित्त आयोगातील निधी ग्रामपंचायतीसोबत काही प्रमाणात जि.परिषद आणि पंचायत समित्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्याने यशस्वीपणे राबविलेली पाणंद रस्ते आणि गोठे बांधण्याची योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. नगरोत्थान योजनेप्रमाणे मोठ्या गावांचा विकास करण्याची योजना आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीचा उत्तम कामासाठी लौकीक-शरद पवार
खासदर पवार म्हणाले, सामान्य माणसाच्या हृदयात जागा असलेला राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देशात आदराने आणि अभिमानाने घेतले जाते. इतिहासातील विविध साम्राज्ये राजांच्या नावाने ओळखली जातात. याला अपवाद शिवाजी महाराजांचे राज्य होते. हे राज्य रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले गेले. महाराजांच्या जन्मदिवशी चांगली इमारत जनतेच्या सेवेसाठी उभे राहिली आहे.

बारामतीमध्ये अनेक उत्तम वास्तू उभ्या राहिल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शहरात असे चांगले काम होत आहे. प्रत्येक काम दर्जेदार असायला हवे आणि स्वच्छतेकडेही लक्ष दिले जायला हवे. चांगल्या वास्तू असल्याने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना तेथे जावेसे वाटते. संस्था नेटक्या आणि स्वच्छ कारभाराच्या असावयास हव्या. इथे येणाऱ्या माणसाच्या मनात संस्थेबद्दल विश्वास वाटायला हवा. असे चांगले काम बारामतीला होत आहे.

पंचायत राज कायदा जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. ही व्यवस्था महाराष्ट्राने चांगल्यरितीने राबवली आहे. चांगली परंपरा आपल्या पाठीशी आहे. ती कायम राखण्याची काळजी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पंचायत समितीचे उपसभापती रोहित कोकरे, एकात्मिक पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पंचायत समितीचे सदस्य, नागरिक आदी उपस्थित होते

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना केले नमन

0

छत्रपती शिवाजी महाराजांना  त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.  त्यांचे समर्थ नेतृत्व आणि सामाजिक कल्याणावर त्यांनी दिलेला भर पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे,असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे 


आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त मी नमन करतो.  त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणाचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे रहाताना त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अफगाणिस्तानातून परतलेल्या शीख-हिंदू शिष्टमंडळाची भेट

0

नवी दिल्ली (शरद लोणकर )– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या निवासस्थानी- 7 लोककल्याण मार्ग येथे अफगाणिस्तानमधील शीख- हिंदू शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेतली. त्यांनी पंतप्रधानांचा सन्मान केला आणि अफगाणिस्तानातून शीख आणि हिंदूंना सुरक्षितपणे भारतात आणल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

पंतप्रधानांनी शिष्टमंडळांचे स्वागत केले. तुम्ही काही पाहुणे नसून स्वतःच्याच घरामध्ये आले आहात, भारत म्हणजे, तुमचे घर असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.  अफगाणिस्तानमध्ये भेडसावणा-या अडचणी, समस्या यांची माहिती मिळाल्याचे सांगून त्यांना सुखरूपपणे मायदेशी आणण्यासाठी सरकारने केलेल्या मदतीविषयी माहिती दिली. अशा घटनांमुळे सीएए म्हणजेच नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचे महत्व आणि समुदायासाठी त्याचे असलेले फायदे याविषयीही पंतप्रधान बोलले. या समाजाला येत असलेल्या अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी भविष्यामध्ये सातत्याने सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला दिले.

गुरूग्रंथ साहिबचा गौरव, सन्मान राखण्याच्या परंपरेचे महत्व पंतप्रधानांनी सांगितले. तसेच त्या अनुषंगाने अफगाणिस्तानातून गुरूग्रंथ साहिबचे स्वरूप परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अफगाण लोकांकडून त्यांना काही वर्षांपासून मिळत असलेल्या प्रेमाविषयी त्यांनी सांगितले तसेच आपल्या काबूल भेटीविषयी आठवणी सांगितल्या.

सर्व शीख- हिंदू समुदायाला अफगाणिस्तानातून सुखरूप परत आणण्यासाठी भारताने जी मदत केली, त्याबद्दल मनजिंदर सिंग सिरसा यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की, ज्यावेळी आम्हा सर्वांच्या पाठीशी कोणीही उभे नव्हते, अशा संकटकाळी पंतप्रधानांनी सतत पाठिंबा दिला आणि वेळेवर मदत मिळेल, असा विश्वासही दिला. शिष्टमंडळातल्या इतर सदस्यांनीही पंतप्रधानांनी अतिशय अवघड काळात केलेल्या मदतीबद्दल, समुदायाच्या पाठीशी ठाम उभे राहिल्याबद्दल आभार मानले. अफगाणिस्तानातून गुरूग्रंथ साहिबचे स्वरूप श्रद्धापूर्वक भारतामध्ये परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत बोलताना ऐकून, त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सीएए आणल्याबद्दल त्यांनी आभार मानले. त्याचा आपल्या समुदायाला खूप उपयोग होणार असल्याचेही सदस्यांनी नमूद केले. शिष्टमंडळातले सदस्य म्हणाले, नरेंद्र मोदी केवळ भारताचे पंतप्रधान आहेत असे नाही, तर अवघ्या जगाचे पंतप्रधान आहेत, कारण  त्यांना जगभरातल्या हिंदू आणि शीखांना भेडसावणा-या अडचणी, समस्या समजतात;  आणि अशा सर्व प्रकरणांमध्ये आपल्या लोकांना ते त्वरित मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यावेळी उपस्थित होते.

रायगडावरील मेघडंबरीच्या फुलांच्या प्रतिकृतीमध्ये शिवरायांच्या मूर्तीचे पूजन

0

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने आयोजन ; शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त आकर्षक फुलांमध्ये सजवलेल्या रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृती मध्ये शिवछत्रपती विराजमान झाले. शासनाच्या आदेशाचे पालन करुन शिवजयंती उत्सव यावर्षी देखील साधेपणाने साजरा करण्यात आला.

कोतवाल चावडी येथे झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी परिमंडळ १ पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, विशाल केदारी, अतुल चव्हाण उपस्थित होते. यावेळी डॉ.प्रियांका नारनवरे यांचा सन्मान करण्यात आला. सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी आणि मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दरवर्षी शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रसंग भव्य रंगमंचावर नाटकाद्वारे सादर केले जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांचे पालन करीत ट्रस्टने पुष्पसजावट केली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्यविषयक उपक्रम राबविले असून यापुढेही सामाजिक उपक्रम राबविणार आहे. रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान शिवरायांच्या मूर्तीची छबी पुणेकरांनी आपापल्या मोबाईलमध्ये टिपली.

संयुक्त अरब अमिराती आणि भारताने ऐतिहासिक व्यापार करारावर स्वाक्षरी केली, आर्थिक सहकार्याच्या नव्या युगाची केली सुरुवात

0
पंतप्रधान मोदी: हा करार उभय देशांमधील दृढ मैत्री, सामायिक दूरदृष्टी आणि विश्वास प्रतिबिंबित करतो आणि हा करार आपल्या द्विपक्षीय आर्थिक संबंधांच्या एका नवीन युगाची सुरुवात करेल.

अबू धाबीचे युवराज आणि यूएई सशस्त्र दलाचे उप सर्वोच्च कमांडर मोहम्मद बिन झाएद अल नाहयान आणि भारताचे पंतप्रधान महामहिम नरेंद्र मोदी यांच्या व्हर्चुअल उपस्थितीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली

मोहम्मद बिन झायेद: राष्ट्रपती खलिफा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिराती व्यापार आणि गुंतवणुकीचे प्रवेशद्वार म्हणून जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत करत आहे.

सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे (सीईपीए) द्विपक्षीय व्यापार पाच वर्षांत 100 अब्ज डॉलर्सवर जाणे आणि दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे

संयुक्त अरब अमिरातीच्या 50 प्रकल्पांतर्गत दोन्ही देशांच्या संबंधित दीर्घकालीन आर्थिक विकास योजनांमध्ये उभय नेत्यांच्या सामायिक दूरदृष्टीचा पाठपुरावा करण्याच्या अनुषन्गाने सीईपीए हा एक महत्त्वाचा टप्पा आहे

मुंबई-

आज, 18 फेब्रुवारी 2022 रोजी, अबू धाबीचे युवराज आणि यूएई सशस्त्र दलाचे उप सर्वोच्च कमांडर आणि कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, आणि भारताचे पंतप्रधान महामहिम  नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल शिखर परिषदेचे आयोजन केले होते.  या परिषदेत  दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांची भविष्यातील कल्पना मांडली. आज भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि संयुक्त अरब अमिराती त्याच्या स्थापनेची  50 वर्षे साजरी करत असताना हे महत्वपूर्ण ठरले आहे.

भारत- संयुक्त अरब अमिराती व्यापक आर्थिक भागीदारी करारावर (India-UAE CEPA) स्वाक्षरीच्या वेळी  दोन्ही देशांतील संबंधित वाणिज्य आणि उद्योग/अर्थमंत्री उपस्थित होते. भारत-   युएई  सीईपीए हा संयुक्त अरब अमिराती चा पहिला द्विपक्षीय व्यापार करार आहे तर मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रांतातील ( MENA ) भारताचा पहिला द्विपक्षीय व्यापार करार आहे. महामारीच्या काळात द्विपक्षीय संबंधांमध्ये सीईपीए हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे आणि एक प्रमुख व्यापार करार आहे जो दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्याचे नवीन पर्व सुरू करेल. यामुळे द्विपक्षीय आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांमध्ये परिवर्तन घडेल, आफ्रिका आणि आशिया दरम्यान उदयोन्मुख व्यापार मार्ग खुले करेल, जागतिक व्यापार उदारीकरणाला चालना देईल आणि कोविड नंतरच्या काळात आर्थिक वाढीला गती  देईल.

“संयुक्त अरब अमिराती , राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या नेतृत्वाखाली, व्यापार आणि गुंतवणुकीचे प्रवेशद्वार म्हणून जागतिक स्तरावर आपले स्थान बळकट करत आहे,असे महामहिम शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांनी सांगितले. “भारत हा आमच्या सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे आणि हा करार आमचे संबंध   पूर्वीपेक्षा अधिक दृढ करणारा  आहे. आज आम्ही पंतप्रधान मोदींसोबत जो करार केला आहे, तो केवळ जवळच्या भागीदारासोबतचे आमचे आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक घनिष्ठ  करत नाही तर आमच्यासाठी जागतिक सहकार्याच्या एका नवीन टप्प्याचे द्वार  उघडतो.”, असे ते म्हणाले.

महामहिम पुढे म्हणाले,“ हा ऐतिहासिक आर्थिक करार आमच्या पुढील  50 वर्षांच्या प्रगती आणि समृद्धीसाठीच्या   प्रयत्नात सुरू केलेल्या 50  धाडसी प्रकल्पांसाठी आमच्या नेत्यांची वचनबद्धता दर्शवितो.विकासाला चालना देणे आणि जगासोबतचा आपला व्यापार दुप्पट करणे तसेच संयुक्त अरब अमिरातीची  ज्ञान आणि नवोन्मेष -आधारित अर्थव्यवस्था बळकट  करणे हा उद्देश असलेल्या,  दूरगामी दृष्टीकोनाचा भविष्यातील पिढ्यांना  फायदा होईल.आफ्रिकेपासून आशियापर्यंतच्या व्यापार मार्गिकेमध्ये नवी पहाट होत असताना आणि संपूर्ण क्षेत्राला फायदा होईल अशा विकासाचा  आणि समृद्धीचा पाया रचत असताना,  हा करार संयुक्त अरब अमिरात आणि भारतीय उद्योगांना  कमी दर आणि बाजारपेठेतील प्रवेश वाढण्यासह महत्त्वपूर्ण फायदे प्रदान करण्याचे  वचन देतो”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले:आज आपल्या दोन्ही राष्ट्रांमधील  सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी करताना मला आनंद होत आहे.हा महत्त्वपूर्ण करार हा  3 महिन्यांपेक्षा कमी विक्रमी कालावधीत पूर्ण झाला आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. असे करार पूर्णत्वाला जाण्यासाठी  साधारणपणे वर्षे लागतात. हा करार दोन्ही देशांमधील घनिष्ठ मैत्री, सामायिक दृष्टीकोन आणि दृढ विश्वास दर्शवतो.मला विश्वास आहे की, यामुळे आमच्या द्विपक्षीय आर्थिक संबंधांमध्ये नवीन युगाची सुरुवात होईल आणि येत्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापाराचे प्रमाण सध्याच्या  अंदाजे 60 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 100 अब्ज अमेरिकी डॉलर्स पर्यंत वाढेल.”

भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यानचे  द्विपक्षीय संबंध गेल्या काही वर्षांमध्ये परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात बळकट झाले आहेत ;उभय देशांनी  2017 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी सुरू केली होती. दोन्ही देशांचे नेते गेल्या काही वर्षांपासून नियमित संपर्कात आहेत, विशेषत: कोविड-19 महामारीच्या काळात महामारीचा  सामना करण्यासाठी उभय देशांनी आरोग्य सेवा आणि अन्न सुरक्षेसारख्या  महत्वाच्या क्षेत्रांमध्ये एकत्रित  सहकार्य केले आहे.दोन्ही पक्षांमधील मंत्रीस्तरीय भेटीही सुरूच आहेत.  याच  धोरणात्मक भागीदारीने दोन्ही देशांदरम्यान आज स्वाक्षरी झालेल्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराचा (सीईपीए ) पाया रचला आहे.

भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील  द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा संबंध मजबूत राहिले आहेत.सीईपीएवर स्वाक्षरी करणे हे  या दीर्घकालीन द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचे  गमक आहे.हरित  हायड्रोजन, हवामान बदलासंदर्भातील कृती , स्टार्ट-अप्स, कौशल्ये , आर्थिक तंत्रज्ञान  आणि आरोग्य तंत्रज्ञान यांसारख्या नवीकरणीय उर्जेच्या नवीन क्षेत्रांमध्ये दोन्ही देश त्यांचे सहकार्य बळकट  करत आहेत.संयुक्त अरब अमिरात  हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे आणि हा द्विपक्षीय व्यापार चालू आर्थिक वर्षात  60 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा  टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे. बिगर – तेल निर्यातीसाठी संयुक्त अरब अमिरातीचा पहिल्या क्रमांकाचा  व्यापारी भागीदार म्हणून भारताचा क्रमांक लागतो,.जागतिक स्तरावर संयुक्त अरब अमिरातीच्या   एकूण गैर-तेल निर्यातीपैकी सुमारे 14 टक्के वाटा भारताचा आहे. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे ,पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापाराचे एकूण मूल्य  100 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा  जास्त वाढू शकते.उभय  देशांतील लोकांना  शाश्वत कल्याण आणि निरामयता  प्रदान करणाऱ्या भविष्यासाठी बळकट  आणि अधिक लवचिक अर्थव्यवस्थांसाठी या ऐतिहासिक व्यापार कराराच्या माध्यमातून  सामायिक दृष्टीकोनासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करणे अपेक्षित आहे.

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा २७ रोजी मेळावा

0

पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ३३ वा स्नेहमेळावा येत्या रविवारी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) आयोजिला आहे. माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत शिवाजी हौसिंग सोसायटी येथील समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन वसतिगृहात हा मेळावा होत असून, यंदा मेळाव्याचे प्रायोजकत्व सोलापूर जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांकडे आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी मंडळाचे कार्यवाह सुनील चोरे व मेळावा समन्वयक नंदकुमार तळेकर यांनी दिली.
ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि मुंबई येथील जीएसटी उपायुक्त गणपत (अण्णा) वावरे हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त रमाकांत तांबोळी, मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात ज्येष्ठ कार्यकर्ता, देणगीदार व कर्मचारी यांचा सन्मान, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान, कार्यपरिचय यासह गप्पा-गोष्टी, विचार विनिमय व जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. अधिकाधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मेळाव्यात सहभागी होण्याचे, तसेच अधिक माहितीसाठी नंदकुमार तळेकर (९९२२४४४४२८), गणेश काळे (९८२२७७८३२६), मनीषा गोसावी (९९२३४६२४४९), गणेश ननावरे (८३८०८५१७३०) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या गरीब व हुशार विद्यार्थ्यांची अल्पदरात भोजन व निवासाची सोय व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, या उद्देशाने गेली ६७ वर्षे विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे ही संस्था काम करते. येथून बाहेर पडलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा संस्थेत योगदान द्यावे, संस्थेशी संलग्नित राहून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, या निमित्ताने असे मेळावे उपयुक्त ठरतात, असे मंडळाच्या वतीने नमूद करण्यात आले.