Home Blog Page 2078

एमएसएमई ग्राहक शिक्षण कार्यक्रमात ट्रान्स युनियन सिबिलची एफआयसीसीआय बरोबर भागीदारी

0

क्रेडीट जागृती निर्माण करणे आणि जलद आणि सुलभ पद्धतीने कर्ज मिळण्यासाठी क्रेडीट प्रोफाईलमध्ये सुधारणा करायला मदत करण्यासाठी एमएसएमई केंद्रांदरम्यान एक हजाराहून जास्त एमएसएमई पर्यंत पोहोचण्यासाठीचा उपक्रम

मुंबई: राष्ट्रीय पातळीवरील वैशिष्ट्यपूर्ण एमएसएमई ग्राहक शिक्षण कार्यक्रम सादर करण्यासाठी ट्रान्स युनियन सिबिलने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) बरोबर भागीदारी केली आहे. हा ग्राहक शिक्षण कार्यक्रम एमएसएमईना म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांमध्ये क्रेडीट व्यवस्थापन, सिबिल रँक आणि व्यावसायिक क्रेडीट माहिती याबद्दल जागृती निर्माण करून पाठबळ देईल. वित्तीय सेवा वेगात आणि सुलभपणे मिळण्यासाठी चांगली क्रेडीट पार्श्वभूमी कशी निर्माण करायची आणि चांगला सिबिल स्कोअर कसा तयार करायचा याबाबत ज्ञान देत एमएसएमईना सक्षम करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, आसाम आणि त्रिपुरा येथील एमएसएमई क्लस्टरपासून या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि भारतातील महत्वाच्या एमएसएमई क्लस्टर मधून हजारो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे ध्येय आहे.

एमएसएमई साठी वित्तीय सेवा सुलभ करताना आणि पोहोच वाढविताना ट्रान्स युनियन सिबिल बँका आणि पतसंस्थांना शाश्वत विकासामध्ये त्यांच्या एमएसएमई पोर्टफोलिओला पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहे. सिबिल रँक आणि व्यावसायिक क्रेडिट रिपोर्ट सारख्या सुविधा एमएसएमई वित्तीय संस्थांना सादर करण्याच्या जोडीलाच, ट्रान्स युनियन सिबिल SIDBI बरोबर एमएसएमई पल्स सारखे अहवालही प्रसिद्ध करते. तसेच एमएसएमई क्षेत्रातील बाजारपेठीय गोष्टींवर आधारित धोरणकर्त्यांना आणि उद्योगक्षेत्राला पाठबळ देणारा अलिकडील इमरजन्सी क्रेडीट लाईन गॅरंटी स्कीम (ECLGS) विश्लेषण अहवालही प्रकाशित केला. १-१० च्या मोजपट्टीवर क्रेडीट हिस्ट्रीच्या आधारावर सिबिल रँक एमएसएमईला रँक बहाल करते. सिबिल रँक -१ म्हणजे सर्वोत्तम रँक तर सिबिल रँक – १० म्हणजे धोकादायक रँक.

या भागीदारीविषयी बोलताना ट्रान्स युनियन सिबिलच्या मुख्य कामकाज अधिकारी हर्षला चांदोरकर म्हणाल्या, “एमएसएमई क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि विकासासाठीचा सर्वात मोठा घटक आहे. अंतर्गत माहितीवरून असे लक्षात येते की भारतातील केवळ एक तृतीयांश एमएसएमई उद्योगांना नियमीत क्रेडीट परिसंस्थेच्या माध्यमातून सेवा मिळते. याचाच अर्थ या महत्वाच्या क्षेत्रात क्रेडीट सुविधा वाढविण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. सिबिल रँक आणि व्यावसायिक क्रेडीट माहिती वित्त संस्थांना जोखीम धोरण ठरविण्यात, सिबिल रँक आधारित डिजिटल वित्तपुरवठा करण्यासाठी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना अधिक न्याय्य, जलद आणि सुलभ पद्धतीने कर्जपुरवठा करण्यासाठी मदत करण्यात महत्वाची भूमीका बजावतात. या कार्यक्रमाच्या सादरीकरणातून एमएसएमई मध्ये अधिक जागृती निर्माण करणे आणि वेगाने आणि चांगल्या वित्तीय संधी मिळण्यासाठी सिबिल रँक उभारणीसाठी त्यांना सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे.”

एफआयसीसीआयच्या उपसरचिटणीस ज्योती वीज म्हणाल्या, “भारताच्या आर्थिक विकासातील अत्यंत प्राधान्याचे क्षेत्र असलेल्या एमएसएमई विकासामध्ये वित्तीय जाणीवेचा अभाव हा बऱ्याचदा मोठा अडथळा ठरतो. एफआयसीसीआयला भारतातील अग्रणी क्रेडीट माहिती कंपनी आणि एमएसएमई विकासामध्ये खूप महत्वाचा कार्यक्रम आखणारी आपल्या देशाच्या आर्थिक पायाभूत रचनेतील महत्वाची संस्था असणाऱ्या ट्रान्स युनियन सिबिल बरोबर भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. एमएसएमई मध्ये पत जागरूकता निर्माण करून एमएसएमई क्षेत्राच्या पुनरुत्थानासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांत योगदान देण्याचे आमचे ध्येय आहे.”

इमरजन्सी क्रेडीट लाईन गॅरंटी स्कीम (ECLGS)वरील प्रभावाचे मुल्यांकन करताना ट्रान्स युनियन सिबिलने ३१ मार्च २०२१ पर्यंत ECLGS १.० आणि २.० वितरणावर आधारित कर्ज विश्लेषण अभ्यास अलिकडेच हातात घेतला होता. या अभ्यासाचा एक भाग म्हणून ट्रान्स युनियन सिबिलने वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांत एमएसएमई सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून असे दिसून आले की ६५% एमएसएमईना असे ठामपणे वाटते की ECLGS क्रेडीट मुळे आर्थिक कोंडीतून स्वतःच व्यवसाय सावरायला त्यांना मदत झाली आणि ६८% लोकांना भविष्यातील सकारात्मक दृष्टीकोनाविषयी आत्मविश्वास आहे. साधारण ८५% प्रतिसादकांनी नमूद केले की त्यांच्या ट्रान्स युनियन सिबिल क्रेडीट हिस्ट्रीने ECLGS वितरण सुविधेत महत्वाची भूमिका पार पाडली.

ECLGS योजनेच्या अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या तरलतेचा परिणाम योजना घेणाऱ्यांच्या सरासरी क्रेडीट बॅलन्स मध्ये घट होण्यात होतो. योजनेचा लाभ न घेणाऱ्यांच्या सरासरी बॅलन्स ८%नी कमी होण्याच्या तुलनेत या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये मार्च २०२० आणि मार्च २०२१ दरम्यान सरासरी बॅलन्स १७%नी कमी झाला.  कर्जदारांचा खूप छोटा विभाग आणि सूक्ष्म विभाग यांनी ECLGS सुविधेचा अंगीकार केल्यावर त्यांच्या सरासरी बॅलन्समध्ये ३३%ची घट झाली. तर लघु आणि मध्यम उद्योग विभागांनी अनुक्रमे २२% आणि १४% ची घट दर्शविली. सर्व विभागांकरता, सुविधेचा लाभ न घेणाऱ्या पात्र कर्जदारांमध्ये बॅलन्समध्ये १०%पेक्षा कमी घट झाली.

“चांगल्या सिबिल रँकसह एमएसएमई करता अधिक चांगले व्याजदर देणाऱ्या असंख्य बँका आणि वित्तसंस्था यांच्यासह एमएसएमई करता सिबिल रँक आणि तिच्या वैशिष्ट्यांची रचना समजून घेणे अधिक महत्वाचे आहे. एफआयसीसीआय सोबत हा भागीदारी कार्यक्रम भारताच्या एमएसएमई क्षेत्राला आणखी बळकटी देईल आणि भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयनला पोहोचविण्याच्या ध्येयात मोठेच योगदान देईल,” असेही हर्षला यांनी सांगितले.

मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीसाठी ४ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना

0

मुंबई, दि. २० : मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली ४ हजार पोस्ट कार्ड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली.

याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा ‘अभिजात’ दर्जा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सुमारे ४ हजार पोस्ट कार्ड महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पाठविण्यात आली. हा पोस्ट कार्डचा दुसरा संच आहे, याआधीसुद्धा एक संच राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यात आला आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले नृसिंहवाडी येथील श्री दत्ताचे दर्शन

0

कोल्हापूर, दि. 20 : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार अपर्णा मोरे, नृहसिंहवाडीच्या सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे, श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव पुजारी, सचिव संजय पुजारी यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन मंदिर परिसराची माहिती दिली.

पुण्यात भाजपाच्या सत्तेमुळेच ११ हजार कोटीचा मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास- आ. चंद्रकांत पाटलांचा प्रचार सुरु

0

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा नव्याने समाविष्ट गावात झंझावाती प्रचार सुरु

पुणे-पुणे महापालिका निवडणुकीचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलं असून, भाजपाने निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या गेल्याच आठवड्यातील वाघोली आणि मांजरीतील प्रचारानंतर आज पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या हवेली तालुक्यातील गावांचा दौरा करुन निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तसेच विरोधकांना ५० विरुद्ध पाच वर्षांचा हिशेब जनतेसमोर मांडण्याचे आव्हान दिले.

पुणे महापालिका निवडणुकीचे पडघम जोरदार वाजत असून, भारतीय जनता पक्षाने कोणत्याही परिस्थितीत १०० पारचा निर्धार केला आहे. त्यातच महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमुळे महापालिका क्षेत्र वाढले असून, या भागात ही भाजपाने आतापासूनच प्रचार सुरू केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपैकी हवेली तालुक्यातील पिसोळी, उंड्री, वडाची वाडी, औतडेवाडी, हांडे वाडी, शेवाळेवाडी, होळकर वाडी, उरळी देवाची, उरळी फाटा, भेकराईनगर आणि फुरसुंगी गावाचा दौरा करुन मतदारांशी संवाद साधला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

हांडेवाडी येथील कार्यक्रमात बोलताना आ.‌चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून पुणे शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने कोणत्या निकषांवर महापालिकेत २३ गावांच्या समावेश करण्याचा निर्णय घेतला माहिती नाही. हम करे सो कायदा तत्वाने जुन्या प्रभागांची मोडतोड करत, नवी प्रभाग रचना केली. पण तरीही महापालिकेत भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येईल.”

राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देताना आ.‌पाटील म्हणाले की, “महापालिकेत भाजपाची सत्तेमुळेच ११ हजार कोटीचा मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाहाणी दौरे आणि उद्घाटने करत आहेत. त्यामुळे माझे राष्ट्रवादी काँग्रेसला खुलं आव्हान आहे की, त्यांनी आणि आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन त्यांनी आपली सत्ता असताना ५० वर्षांच्या काळात काय काय केलं हे जनतेसमोर मांडावं. आम्ही पाच वर्षांचा हिशेब जनतेसमोर मांडू.”

या दौऱ्यात माजी आमदार आणि भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पंडितदादा मोडक, दादासाहेब सातव, नगरसेवक मारुती (आबा) तुपे, संजय घुले, रोहिदास शेठ उंदरे, संदीप लोणकर, राहुल शेवाळे, रणजित रासकर, केशव कामठे, अभिजीत खराडे, आकाश पवार, शोभाताई लागड,‌ जीवनराव जाधव, संदीप हरपळे, धनंजय कामठे, वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे, वैशाली पवार, पांडुरंग रोडे, मंगेश जाधव, विजयाताई वाडकर, स्वाती कुरणे, झांबरे आदी उपस्थित होते.

आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा तळपत्या उन्हात प्रचार

पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिकेत समाविष्ट गावांत संवाद दौरा केला. दुपारी देवाची उरळी येथे वैशाली पवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. भर उन्हातही कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

” संत संताजी महाराज जगनाडे ” यांचे कार्य लोकांपुढे येईल -उल्हास पवार

0

पुणे-संत तुकाराम महाराजां सोबत ज्यांनी टाळकरी म्हणून काम केलं , तुकाराम महाराजांचे अभंग व गाथा लिहण्याचे काम केले व पुढे लोकांसमोर आणून त्यातुन समाज प्रबोधनाचे महान कार्य केले ते थोर ” संत संताजी महाराज जगनाडे ” यांचे कार्य लोकां पुढे येण्यासाठी या उद्यानाचा उपयोग होईल …असे मत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हास पवार यांनीयेथे व्यक्त केले.
प्रभाग क्र .19 पुणे महानगर पालिका हद्दीतील सेव्हन लवज चौक जवळील उड्डाण पूला चे खालील मोकळ्या जागेत , पुणे म.न. पा. चे वतीने नगरसेवक अविनाश बागवे , यांच्या निधीतून विकसित होत असलेल्या
” संत संताजी महाराज जगनाडे उद्यान ” भूमिपूजन समारंभात ते बोलत होते .शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि गटनेते आबा बागुल ,नगरसेवक विशाल धनवडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .


रमेश बागवे आपल्या भाषणात म्हणाले कि, या उद्यानाच्या माध्यमातून तिळवण तेली समाजाची पश्चिम महाराष्ट्रातील मोठया प्रमाणात अनेक वर्षा पासून होत असलेली मागणी आज पूर्ण होताना दिसत आहे यासाठी पुणे मनपा व सर्व पदाधिकारी, नगरसेवक या सर्वांचे त्यांनी आभार मानले .


या प्रसंगी शिवदास उबाळे,घनश्याम वाळुंजकर,शिवराज शेलार,विजय रत्नपारखी,Adv. राजेश येवले ,नामांकित आर्किटेक्ट अभिजित पन्हाळे , दत्तात्रय शेला, संजय जगनाडे ,जनार्दन जगनाडे,तसेच Adv. आनंद धोत्रे,इत्यादी मान्यवर व तिळवण तेली समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियोजित उद्यानास श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे नाव देण्याबाबत पुणे महानगर पालिका यांचेकडे विजयकुमार शिंदे ( उपाध्यक्ष सुदुंबरे संस्थान व माजी अध्यक्ष पुणे तिळवण तेली समाज) यांनी प्रस्ताव सादर केला असून गेली तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा केला असून त्याकामी, Adv. राजेश येवले ( मुख्य चिटणीस सुदुंबरे संस्थान) यांचेही त्यांना वेळोवेळी सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, सुनील बावकर, मारुती कसबे, रोहित अवचित, सौ. सुरेखा खंडागळे व यासेरजी बागवे यांही विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले.विजयकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोज यांनी केले.

वस्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-आ.चंद्रकांतदादा पाटील

0

प्रभाग १० आणि ११ मधील‌ विविध विकासकामांचे भूमिपूजन

पुणे-कोथरूडचा विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.‌ तसेच वस्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १० नवकेतन कॉलनी, धनकुळे चाळ, हमराज चौक, पीएमसी कॉलनी येथे ड्रेनेज लाईन टाकणे आणि प्रभाग क्रमांक ११ मधील सुतारदरा दत्त मंदिर येथे रस्त्याच्या कॉंक्रेटिकरणासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्थानिक आमदार विकासनिधीतून निधी उपलब्ध करून दिला असून, या दोन्ही कामांचे भूमिपूजन आज आ. पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेवक किरण दगडे-पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, छाया मारणे, अजय मारणे, युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत, विलास मोहोळ, अभिजीत गाडे यांच्या सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले की, कोथरुडच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. त्यामुळे मतदारसंघातील कोणतीही समस्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. त्याउलट ज्या कामांना आमदार निधीतून मदत मिळणे शक्य नाही, तेथील प्रश्न सोडविण्यासाठी लोकसहभागातून निधी उपलब्ध करून देऊन, नागरिकांना त्या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे वस्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.

ते पुढे म्हणाले की, आमदार निधीतून मंजूर कामे वेळेत पूर्ण करुन देणं ही जशी कंत्राटदाराची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी ही विकासकामे पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

भारतीय वस्तू आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ खुली करण्यासाठी भारत – संयुक्त अरब अमिराती यांच्यात आर्थिक भागीदारी करार

0

मुंबई, 20 फेब्रुवारी 2022-

 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारत- संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारा हा महत्त्वपूर्ण करार असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे भारतीय वस्तू आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ खुली होईल. शुक्रवारी भारत -यूएई करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

करारानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना पीयूष गोयल म्हणाले, “भारत-यूएई सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) एमएसएमई, स्टार्ट-अप, शेतकरी, व्यापारी आणि व्यवसायाच्या सर्व वर्गांना  अत्यंत लाभदायक ठरेल.  

 क्षेत्रानूसार होणाऱ्या नफ्याबद्दल बोलताना, ते म्हणाले की, वस्त्रोद्योग, रत्ने, दागिने, चामड्याच्या वस्तू, पादत्राणे आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांसारखे श्रम प्रधान उद्योग सर्वाधिक लाभदायक ठरतील.

सीईपीए हा एक संतुलित, निःपक्ष, सर्वसमावेशक आणि न्याय्य भागीदारी करार आहे, जो भारतासाठी वस्तू आणि सेवा या दोनही प्रकारे  वर्धित बाजारपेठेत प्रवेश देईल असे गोयल यांनी अधोरेखित केले. “या करारामुळे आमच्या युवकांसाठी नोकऱ्या निर्माण होतील, आमच्या स्टार्टअप्ससाठी नवीन बाजारपेठ मिळेल, आमचे व्यवसाय अधिक स्पर्धात्मक बनवेल आणि आमच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल,”असेही  ते पुढे म्हणाले.

क्षेत्रनिहाय पाहणी असे दर्शवित  आहे, की या करारामुळे भारतीय नागरिकांसाठी किमान 10 लाख नोकऱ्या निर्माण होतील,अशी माहिती गोयल यांनी दिली. 

याबद्दल प्रसारमाध्यमांना  अधिक माहिती देताना  गोयल पुढे म्हणाले, की सीईपीए केवळ 88 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आणि 90 दिवसांपेक्षा कमी कालावधीत,मे महिन्याच्या सुरुवातीस ते लागू होईल. “भारतातून यूएई मध्ये निर्यात होणाऱ्या जवळपास 90% उत्पादनांवर या कराराच्या अंमलबजावणीमुळे शून्य शुल्क आकारले जाईल, 80% ट्रेड लाइन्सवर शून्य शुल्क आकारले जाईल, उर्वरित 20% आमच्या निर्यातीवर फारसा परिणाम करणार  नाहीत, म्हणून हा एक दोन्ही देशांच्या दृष्टीने लाभदायक करार आहे.”

 या व्यापार करारानुसार  प्रथमच, सीईपीए भारतीय जेनेरिक औषधांची स्वयंचलित नोंदणी आणि विपणन अधिकृतता 90 दिवसांत करण्याची परवानगी दिली गेली आहे, एकदा ती विकसित देशांमध्ये मंजूर झाल्यानंतर  भारतीय औषधांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेश यामुळे मिळेल.

 भारतीय दागिन्यांच्या निर्यातदारांना यूएईमध्ये शुल्क मुक्त प्रवेश मिळेल,  सध्या अशा उत्पादनांवर 5% सीमाशुल्क आहे.  यामुळे दागिन्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ होईल, कारण भारतीय डिझाईन केलेल्या दागिन्यांना बाजारपेठेत मोठी प्रतिष्ठा आहे.  हिरे आणि दागिने क्षेत्राने 2023 पर्यंत आपली निर्यात 10 अब्ज पर्यंत अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढवण्याची अपेक्षा केली आहे.

सीईपीएमुळे  केवळ भारतीय उत्पादनांची स्पर्धात्मकता सुधारणार नाही, तर भारताला धोरणात्मक लाख देखील मिळवून देईल.  “युएई हे व्यापारी केंद्र म्हणून कार्य करत असल्याने, हा करार आफ्रिका, मध्य पूर्व आणि युरोपमध्ये बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करण्यात मदत करेल,” असेही गोयल यावेळी पुढे म्हणाले.

सीईपीएच्या समाप्तीसह, भारत आणि यूएईने पुढील पाच वर्षांमध्ये द्विपक्षीय वस्तूंचा व्यापार 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे पीयूष गोयल यांनी नमूद केले, “तथापि, मला विश्वास आहे की दोन्ही  राष्ट्रांमधील व्यापाराची क्षमता आणखी मोठी आहे, आम्ही स्वतःसाठी निश्चित केलेले लक्ष्य निश्चित पार करू”, असे गोयल  म्हणाले.  यूएई हा भारताचा तिसरा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापारी भागीदार आहे.

 जीसीसी (GCC) सोबत 2022 मध्येच होणार करार

सरकार याच वर्षात गल्फ कोऑपरेशन कौन्सिल देशांसोबत समान आर्थिक भागीदारी करार करण्यास उत्सुक आहे, असेही पीयूष गोयल यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, की जीसीसीच्या सरचिटणीसांनी वाटाघाटी जलद मार्गी लावण्याची इच्छा व्यक्त केली आहे  “आम्हाला आमच्या वाटाघाटी क्षमतेवर देखील विश्वास आहे, आम्ही युएईशी जलद वाटाघाटी केल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की समान करार  या वर्षातच जीसीसी सोबत व्यापार पूर्ण केला जाईल,”असे गोयल यांनी यावेळी सांगितले

जीसीसी हा आखाती प्रदेशातील सहा देशांचे एक समूह आहे, म्हणजे सौदी अरेबिया,यूएई, कतार, कुवेत, ओमान आणि बहरीन यांचा एकत्रित जीडीपी 1.6 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

0

मुंबई, दि. 20 :- मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राची सुरुवात करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा दिला. ‘दर्पण’ वृत्तपत्रातून त्यांनी समाज घडविण्याचे कार्य केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान व कार्य मार्गदर्शक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लोकशिक्षण, ज्ञानप्रसाराच्या उद्देशाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील दिलेले योगदान प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या चुकीच्या धोरणांना त्यांनी विरोध केला. वृत्तपत्र हे समाजप्रबोधनाचे, राष्ट्र घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन्स’ला ‘यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी’कडून महत्त्वपूर्ण सेवा पुरविण्याचे कंत्राट प्रदान

0

• हे कंत्राट २,१०० कोटी रुपयांपर्यंतचे (२१,००० दशलक्ष रु.) असण्याची शक्यता.• दोन वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी कोट्यवधी पौंड्सचे कंत्राट.• यूकेमधील २,००० जणांना ‘वर्क@होम’ स्वरुपात रोजगार देण्याची कटिबद्धता.

बंगळुरू / लंडन, २० फेब्रुवारी, २०२२ : ‘यूनायटेड किंगडम’मधील (यूके) नागरिकांना निकराच्या वेळी महत्त्वपूर्ण अशी ग्राहकसेवा पुरविण्याकरीता ‘यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी’तर्फे (यूकेएचएसए) ‘एचजीएस यूके लि.’ या आपल्या उपकंपनीची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन्स’ (एचजीएस) (बीएसई व एनएसई येथे सूचीबद्ध) या कंपनीने आज दिली. सेवा पुरविण्याचे हे कंत्राट सुरुवातीस दोन वर्षांसाठीचे आहे आणि या कंत्राटाची मुदत आणखीही वाढू शकते. ही भागीदारी गेल्या आठवड्यात कार्यान्वित झाली. या कंत्राटाचे मूल्य २११ दशलक्ष पौंड (२,१०० कोटी रुपये) इतके असण्याची शक्यता असून या कामासाठी संपूर्ण यूकेमध्ये २,००० जणांना ‘वर्क@होम’ स्वरुपात नेमण्यात येणार आहे. 

‘एनएचएस टेस्ट व ट्रेस’ यांबाबतची जबाबदारी ‘यूकेएचएसए’कडे देण्यात आली आहे. कोविड-१९, तसेच फ्ल्यूचा मोठा उद्रेक व नवीन साथीचे आजार यांसारख्या आजारांच्या ट्रेसिंगसाठी भविष्यात संपर्क साधून देण्यात याकंत्राटाची मदत होणार आहे. 

या कंत्राटांतर्गत कमाल जितका खर्च होईल, तितके त्या कंत्राटाचे मूल्य असणार आहे. हा खर्च कंत्राटाच्या एकूण मूल्यापेक्षा कमी असू शकतो.

‘एचजीएस’ने गेल्या दशकभरात यूके सरकारसोबत आपली भागीदारी विकसित केली आहे आणि तिचे प्रमाण वाढवलेही आहे. सार्वजनिक क्षेत्रातील हा या कंपनीचा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यूकेमधील या उपकंपनीने त्या देशात सार्वजनिक उपक्रमांमध्ये दिलेल्या योगदानातून आणि उत्कृष्ट सेवेतून हे स्थान प्राप्त केले आहे. 

“एचजीएस कंपनी यूकेच्या बाजारपेठेत गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून यशस्वीपणे कार्यरत आहे. मार्च २०२१मध्ये संपलेल्या वर्षातकंपनीचे उत्पन्न ६७ दशलक्ष पौंड इतके होते. डिसेंबर २०२१मध्ये संपलेल्या नऊमाहीत, ‘एचजीएस यूके’ कंपनीने ८७ दशलक्ष पौंड इतके उत्पन्न कमावून ते वर्षाकाठी दुप्पट होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. आमचा सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय हा आमच्या या यशोगाथेच्या केंद्रस्थानी असून त्यांत काही ‘मार्की क्लायंट्स’चेही योगदान आहे. या व्यवसाय विभागात आम्ही कौशल्यवाढीसाठी मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक, आमचे केंद्रित विक्री धोरण, क्लाऊड तंत्रज्ञान आणि वर्क@होम स्वरुपात कर्मचाऱ्यांची नेमणूक या सर्व बाबींमुळे या मोठी मागणी असलेल्या बाजारपेठेत आम्हाला आमची कार्यव्यप्ती वाढवता आली आहे. ‘यूकेएचएसए’शी झालेल्या सहयोगामुळे, आमच्या यूकेमधील व्यवसायात वाढीच्या व जबाबदारीच्या दृष्टीने मोलाची भर पडली आहे,” असे प्रतिपादन एचजीएसचे कार्यकारी संचालक व समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पार्था देसरकार यांनी यावेळी केले. 

एचजीएस यूरोपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅडम फॉस्टर म्हणाले, “कोविडच्या साथीतून सावरण्यात आणि या साथीवर मात करण्यात यूके सरकारला एचजीएस मदत करू शकणार आहे, या घटनेचा मला फार मोठा अभिमान वाटतो. ही संधी आम्हाला मिळाल्याने, गेल्या १० वर्षांत आम्ही यूकेमधील व्यवसायाचा ज्या प्रकारे विस्तार केला, सार्वजनिक क्षेत्रात आम्ही जी कौशल्ये विकसीत केली आणि ज्यातून आम्हाला नावलौकिक मिळाला, त्या सर्व गोष्टींचा हा एक प्रकारे गौरवच होत आहे.”

यूके सरकारने ठेवलेला विश्वास आणि तेथील जनतेला अपेक्षित असलेली उत्कृष्ट स्वरुपाची सेवा देण्याची मिळालेली जबाबदारी, याबद्दल एचजीएस कृतज्ञ आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कौशल्य, वितरण क्षमता व पायाभूत सुविधा यांमध्ये कंपनीची सततची गुंतवणूक, तसेच यूकेमधील सार्वजनिक क्षेत्रातील अवकाशात स्पर्धा करण्याची व अनेक प्रकरणांमध्ये प्रमुख प्रतिस्पर्ध्यांपेक्षाही अद्वितीय कामगिरी करण्याची कंपनीची क्षमता या बाबी या कंत्राटामुळे अधोरेखित झाल्या आहेत. 

‘यूकेएचएसए’सोबतची आमची भागीदारी आणि ‘एचजीएस’ला या भागीदारीच्या माध्यमातून देण्यात आलेली जबाबदारी या गोष्टी आम्ही अत्यंत गांभीर्याने हाताळत आहोत. नेमक्या आवश्‍यकता कोणत्या, याचेआम्हाला पुरेसे भान आहे आणि उत्‍तम दर्जाची सेवा देण्‍याच्‍या आमच्या क्षमतेवर आमचा स्वतःचा विश्‍वास आहे,” असे एचजीएस यूकेचे मुख्य महसूल अधिकारी ग्रॅहम ब्राउन यांनी म्हटले आहे. 

हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा उद्या राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा

0

मुंबई, दि. २० – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा उद्या, दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार असून या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि १९ जिल्ह्यांमधील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी  राज्य नाट्य स्पर्धा घेता आली नव्हती. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने व आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत असल्याने त्यास विशेष महत्त्व असल्याचे श्री. देशमुख म्हणाले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा  हौशी मराठी, बाल, हिंदी, संगीत, संस्कृत, दिव्यांग बाल नाट्य अशा सहा विविध प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.

जवळपास  तीन महिने अविरत चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण ६७४ संघ भाग घेणार आहेत अशी माहिती देत सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघ व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी..

0

दिपोत्सव, विविध स्पर्धांचे आयोजन

पुणे, दि. २० जानेवारी: राजमाता जिजाऊजन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाल महाल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चित्रकला आणि पारंपारिपारिक वेषभूषा स्पर्धांबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “जय भवानी, जय शिवाजी” चा जयघोष करत यावेळी दिपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच फ्रांस येथील थॉमस दाम्पत्यांच्या हस्ते शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी नगरसेवक गणेश बीडकर, रविंद्र धंगेकर, योगेश समेळ, नगरसेविका पल्लवी जावळे, सुधा पाटील, कल्पना बहिरट, सुरेखा पायगुडे, राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश यादव, महिला अध्यक्ष सौ. संगीता भालेराव, मार्गदर्शक तानाजी शिरोळे, प्रशांत धुमाळ, प्रफुल्ल गुजर, संतोष शिंदे, तौर, पुजा खामकर, अ‍ॅड. संध्या देशपांडे, छाया खैरनार, विद्या खळदकर, राजश्री सातपूते, नारायण घुटे, राकेश सुतार, सुशील पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

12वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रितिका डावलकर, अव्यक्ता रायावपरू, दिपशिखा विनयामूर्थी यांचा मुख्य फेरीत प्रवेश

0

 मुंबई,  20 फेब्रुवारी, 2022 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 16व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात रितिका डावलकर,  अव्यक्ता रायावपरू, दिपशिखा विनयामूर्थी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत मुख्य फेरीत प्रवेश केला. 
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत रितिका डावलकरने अव्वल मानांकित अविपशा देहुरीचा 7-6(2), 6-4असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्यक्ता रायावपरूने दुसऱ्या मानांकित स्वरा जावळेचा 6-1, 6-2 असा तर दिपशिखा विनयामूर्थीने चौथ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.  
स्पर्धेत देशभरातून 250 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा व मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, स्पर्धेत पहिल्या फेरीपासूनच खेळाडूंना टेनिसहब आणि इनरझलच्या वतीने आकर्षक पारितोषिके तसेच, एकूण 3लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. माजी एआयटीएचे सहसचिव आणि माजी एमएसएलटीएचे मानद सचिव रमेश देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  राष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन आणि स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या एसओपी अंतर्गत, एमवायएएस, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार यांच्या कोविड नियमांचे पालन करून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे अय्यर यांनी नमूद केले. 
एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य यांची स्पर्धा संचालक म्हणून तर, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले: ध्रुव सेहगल वि.वि.वीरेन चौधरी(14) 3-6, 7-6(2), 6-1;अक्षत दक्षिणदा वि.वि.योना मंदा 6-1, 6-2;
रॉनी विजयकुमार(4)वि.वि.विश्वास चंद्रशेखर 6-0, 6-0;
मनन राय वि.वि.राम मगदूम 6-4, 6-4;
प्रणित पॉल वि.वि.निकुंज खुराणा(7) 3-6, 6-3, 6-0;
दर्श खेडेकर(8) वि.वि.साईराज शेवाळे 7-5, 6-1;

मुली:
रितिका डावलकर वि.वि.अविपशा देहुरी(1) 7-6(2), 6-4;
अव्यक्ता रायावपरू वि.वि.स्वरा जावळे(2) 6-1, 6-2;
श्राव्या नुंबुरी वि.वि.रितसा कोंडकर(16) 6-3, 6-0;
दिपशिखा विनयामूर्थी वि.वि.सृष्टी सूर्यवंशी(4) 6-2, 6-2;
रीतिशा चौधरी(7) वि.वि.अक्षिता अनंतरमन 6-2, 6-3;
एंजल वारंग वि.वि.रिया पुडीयोकडा(13) 6-2, 6-1.

मानांकन यादी खालीलप्रमाणे:मुले: 1.तविश पहावा, 2.फझल अली मीर, 3.कुशाग्र अरोरा, 4.शिवा शर्मा, 5.विराज चौधरी, 6.हित कांदोरिया, 7.दिशेंदर लांबा, 8.यश्वीन दहिया; 
मुली: 1.आनंदिता उपाध्याय, 2.अहाना,  3.प्राची मलिक, 4.हविशा चौधरी, 5.सृष्टी किरण, 6.मीराया अगरवाल, 7.नंदिनी कंसाल, 8.अविका.

तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २० : – तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासमवेत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आंतरराज्यीय संयुक्त जलसिंचन प्रकल्पांविषयीही विस्तृत चर्चा झाली.

या शिष्टमंडळासमवेतच्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.

बैठकीत बाभळी बंधारा,  तुम्मीदीहेटी, मेडीगड्डा बॅरेज, चन्खा-कोरटा बॅरेज या सिंचन प्रकल्पांच्या अनुषंगाने चर्चा झाली. तसेच उभय राज्यात सुरु असलेल्या उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध योजना, प्रकल्पांचीही चर्चा करण्यात आली. जलसिंचन प्रकल्पांतील आंतरराज्यीय सहकार्य आणि त्यातील विविध तरतुदींबाबतही यावेळी विस्ताराने ऊहापोह करण्यात आला. दोन्ही राज्यांदरम्यानचे विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्याबाबतही चर्चा झाली.

मुख्यमंत्री श्री. राव यांच्या समवेतच्या शिष्टमंडळात खासदार रणजित रेड्डी, खासदार संतोष कुमार, खासदार बी. पी. पाटील, आमदार पल्ला राजेश्वर रेड्डी, आमदार श्रीमती के. कविता, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे महासचिव श्रवण रेड्डी, तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज आदींचा समावेश होता.

सुरवातीला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री. राव यांचे पुष्पगुच्छ, शाल तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री श्री. राव यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचाही सत्कार केला. मुख्यमंत्री श्री. राव यांच्यासमवेतच्या शिष्टमंडळातील सदस्यांचेही पुष्पगुच्छ आणि तसेच ‘महाराष्ट्र देशा’, ‘पहावा विठ्ठल” देऊन स्वागत करण्यात आले.

शिवजयंतीनिमित्त 392 किलोचा पुष्पहार अर्पण

0

पुणे – महर्षीनगर मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघ व प्रभाग
क्रमांक ३९ महर्षिनगर-मार्केट यार्ड यांच्यावतीने आयोजक स्वाती शेरला व गणेश शेरला, गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून ३९२व्या जयंतीनिमित्त छत्रपतींना ३९२ किलोचा पुष्पहार अर्पण करण्यात आला.पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकर गरड,स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, अश्विनी बावचे, स्वाती शेरला, करण मिसाळ, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे, मानसी देशपांडे, महेश वाबळे, रघुनाथ गौडा, आनंद रिठे प्रसन्न जगताप, विशाल पवार, जितेंद्र पोळेकर उपस्थित होते.

जनतेच्या हिताचे राज्य कार्यरत ठेवणे लोकप्रतिनिधींचे काम- नाना पाटेकर

0

पुणे-बालेवाडी – बाणेर येथील बाणेर गावच्या कमानीजवळ स्वराज्य प्रतिष्ठान बाणेर यांच्या प्रयत्नातून अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा भव्य दिव्य चा लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या  पूर्व संध्येला ता. 18 रोजी पार पडला..नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन,संयोजन केले .

बालेवाडी – बाणेर येथील बाणेर गावच्या कमानीजवळ स्वराज्य प्रतिष्ठान बाणेर यांच्या प्रयत्नातून अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या भव्य दिव्य चा लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या   पूर्व संध्येला ता. 18 रोजी पार पडला. 

यावेळी बोलत असताना नाना पाटेकर यांनी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे, त्यामुळे तुम्ही जनतेसाठी काम करणे, त्यांच्या हितासाठी झटणे हे तुमचं काम आहे, आणि ते काम जर तुम्ही योग्य रित्या केले नाही तर त्याचा जाब विचारण्याचा हक्क आमचा आहे, आणि आम्ही जाब विचारणार असल्याचे त्यानी सांगितले.

बाणेर येथील स्वराज्य प्रतिष्ठान व नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या विशेष प्रयत्नातून बाणेरगावच्या कमानीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले असून, या स्मारकाच्या खाली एकूण आठ विद्यार्थी एका वेळी बसू शकतील अशी एम. पी. एस सी. च्या मुलांसाठी अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. या स्मारकासाठी या भागातील सर्व पक्षाच्या नगरसेवक नगरसेविकांनी तसेच अनेक थोर देणगीदारांनी सढळ हाताने मदत केली . या कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांचे तसेच सर्व उपस्थित नागरिकांचे स्वागत गणेश कळमकर (उपाद्यक्ष, भाजपा पुणे शहर) यांनी केले, तर प्रस्तावना प्रल्हाद सायकर (अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान) यांनी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

स्मारकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात ढोलताशाच्या गजरात शिवगर्जना करत भरगच्च अशा लोक उपस्थितीमध्ये बाणेर येथे पार पडला. यावेळी भाजपा अध्यक्ष कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका ज्योती कळमकर, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, मनसे अनिकेत मुरकुटे, योगीराज पतसंस्था संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे तसेच, इतर मान्यवर उपस्थित होते.