Home Blog Page 2055

राज्यातील १०० सर्वाधिक कृषी पंप थकबाकीदारांकडे ९.२८ कोटी थकित

0

मुंबई- महाराष्ट्रात कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही ४२ हजार कोटी रुपयांच्यावर पोहचली असून त्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या १०० व्यक्ती वा संस्थांकडे ९.२८ कोटींहून अधिक रक्कम थकित आहे. राज्यातील सर्वाधिक कृषी पंप थकबाकी ही पुणे जिल्ह्यातील सायगाव येथील  शेतकरी सुभकांत पंढरीनाथ काळे यांच्याकडे असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्यातीलच सी. श्रीनाथ पी.पी. मंडळी यांच्याकडे  आणि तिस-या क्रमांकावर औरंगाबाद जिल्ह्यातील देवराव शिर यांच्याकडे थकबाकी आहे.

सर्वाधिक थकबाकीची रक्कम कृषी पंप धोरणांतर्गत ५० टक्के माफ केल्यानंतरची आहे. ५० टक्के सवलत मिळूनही हे कृषी पंप धारक आपली थकबाकी जमा करत नसल्याचे दुर्देवी चित्र या निमित्ताने उघड झाले आहे.

कृषी पंप थकबाकीदारांकडे असलेल्या थकबाकीचा अभ्यास राज्याच्या ऊर्जा विभागाने  आणि महावितरणने सुरू केला आहे. या अभ्यासात महावितरणची राज्यातील सर्वाधिक थकबाकी असलेल्या १०० शेतक-यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीचा अभ्यास केल्यानंतर १० लाखांहून अधिक थकबाकी असलेले २० शेतकरी वा संस्था राज्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या २० थकबाकीदारांकडे एकूण २ कोटी ६३ लाख ८२ हजार ४१० रूपये थकित आहेत. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेत कृषीपंप धोरण आखले असून सप्टेंबर २०२० पर्यंतच्या थकबाकीतील ५० टक्के रक्कम माफ करण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर २०२० पासून आजवरच्या चालू बिलाची रक्कम जोडून या धोरणांतर्गत  देय थकबाकीचा आकडा महावितरणने जारी केला आहे.  

सदर थकबाकीदार हे प्रत्येकी १० लाख रुपयांपासून ३३ लाख रुपयांपर्यंत महावितरणचे थकीत वीज बिल देणे आहे. या थकबाकीदारांमुळे महावितरणवर कर्जाचा डोंगर मोठया प्रमाणात वाढत चालला आहे.

 साखर पट्ट्यात सर्वाधिक थकबाकीदार

राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यात सर्वाधिक  थकबाकी असलेल्या  १०० व्यक्ती वा संस्था असून त्यांच्याकडे एकूण ९ कोटी २८ लाख ९० हजार ६०० रूपये इतकी थकबाकी जमा आहे. १०० पैकी सर्वाधिक ३२ थकबाकीदार हे अहमदनगर जिल्ह्यातील, त्यानंतर २१ थकबाकीदार हे पुणे जिल्ह्यातील तर १६ थकबाकीदार हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. रोख पीक म्हणून ओळखल्या जाणा-या साखरेच्या पट्ट्यातील ६ जिल्ह्यात १०० पैकी सर्वाधिक ८१ थकबाकीदार आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात २, बीड जिल्ह्यात एक, नांदेड जिल्ह्यात १० असे  १०० सर्वाधिक थकबाकीदारांपैकी एकूण १३ थकबाकीदार आहेत. विदर्भात नागपूर  व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक असे केवळ दोन थकबाकीदार या यादीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ४ थकबाकीदार आहेत.

१० सर्वाधिक कृषीपंप थकबाकीदार

राज्यातील सर्वाधिक १० कृषीपंप थकबाकीदारांकडे एकूण १,५७,२२,२०० इतकी रक्कम थकित आहे. राज्यातील सर्वाधिक १० थकबाकीदारांचे नाव, पत्ता व थकबाकी पुढीलप्रमाणे

१.  सुभकांत पंढरीनाथ काळे (सयगाव, राजगुरूनगर,पुणे) – ३३,३८,७१० रुपये

२.  सी. श्रीनाथ पी.पी. मंडळी (केडगाव उपविभाग, जि, पुणे)-  २०,३२,८००

३.  शिर देवराव गणपत (चिखलठाणा, जि. औरंगाबाद)- १५,६६,५८०

४.  नलिनी कांतिलाल रणदिवे (पारगाव, ता. दौंड, जि.पुणे)-  १५,६६,३१०

५.   मेसर्स जयंत वाटर (अढेगाव टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) १३,४८,७६०

६.   श्री. चैवूनय भैरवनाथ (केडगाव, जेऊर उपविभाग, ता. करमाळा, जि. सोलापूर) १३,३९,०५०

७.  रखमाजी डेअरी एग्रो प्रॉडक्ट (मंची हिल,संगमनेर, अहमदनगर) १२,५६,८६०

८.   तमडलगे सहकारी पाणी पुरवठा संस्था (दानोली, ता. शिरोळ, जि, कोल्हापूर) ११,८८,३७०

९.  सौ. गुणाबाई नामदेवर पवार (इस्लामपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) १०,५०,७४०

१०. संत सावता माळी पाणी पुरवठा संस्था ( अकोले, टेंभूर्णी उपविभाग, ता. माढा, जि. सोलापूर) – १०,३४,०२०

आदिवासींसाठी विशेष पदभरती मोहीम – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

0

मुंबई दि. 10 : आदिवासींसाठीच्या पदभरतीला गती देण्यासाठी विशेष पदभरती मोहीम राबविण्यात येणार असून याबाबत एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत अर्धा तास चर्चेत सहा विषयांवर चर्चा झाली.

अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे श्री. भरणे यांनी सांगितले.  सदस्य श्री. सुधीर मुनगंटीवार व श्री.संदीप दुर्वे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनच्या कामाला गती मिळावी, याविषयी चर्चा झाली त्याला उत्तर देताना सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासाठी 15 कोटी 65 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात येईल असे सांगितले. सदस्य श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी धरणाच्या आऊटलेटमधून 27 गावे तसेच या योजनेत नव्याने 7 गावांना पाणीपुरवठा करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. सदस्य श्री. भास्कर जाधव यांनी चर्चेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री.भरणे बोलत होते.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील कृषिपंपाकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाच्या निर्देशानुसार वीजपुरवठ्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. सदस्य श्री. कृष्णा गजबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. राऊत बोलत होते. चर्चेत सदस्य श्री. राजेश पवार, आशिष जैस्वाल, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

पोयसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या विस्थापितांबाबत पुर्नविकास धोरणानुसार सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. त्याकरिता बैठकीचेही आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सदस्य श्री.अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. तनपुरे बोलत होते.

तालुका व जिल्हा न्यायालयात 12 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

0

पुणे, दि. 10 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशाने विधी सेवा प्राधिकरण अधिनियमातील तरतुरदीअंतर्गत जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये  12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोक अदालतीत वाद प्रकरणांचा झटपट निकाल लागतो. तोंडी पुरावा-उलटतपासणी दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. तसेच लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही आणि एकाच निर्णयात न्यायालयीन प्रक्रियेतून कायमची सुटका होते. लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजूतीने होत असल्याने सर्व पक्षाचा विजय होतो, द्वेषभावना वाढत नाही आणि निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो..

लोक न्यालयालात परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणेच लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते. लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार शुल्काची रक्कम परत मिळते.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची दिवाणी प्रकरणे, चेक बाउन्स प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज, पाणी व कर यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे, नोकरीबाबतची प्रकरणे ज्यात पगार, इतर भत्ते व निवृत्तीबाबतचे लाभ  तसेच महसूल बाबतची प्रकरणे ठेवण्यात येतात.

लोक न्यायालयात सामोपचाराने वाद मिटविण्याची इच्छा असलेल्या पक्षकारांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडे अथवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे त्वरीत संपर्क साधावा. भ्र. क्र. ८५९१९०३६१२ वर किंवा dlsapune2@gmail.com या ईमेल पत्त्यावरही संपर्क साधता येईल, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी कळवले आहे.

फेरफार अदालतीमध्ये 3 हजार 221 नोंदी निर्गत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा पुढाकार

0

पुणे, दि 10 : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्यात झालेल्या फेरफार अदालतीला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून या फेरफार अदालतीमध्ये एकुण 2 हजार 221 नोंदी निर्गत करण्यात आल्या.

जिल्ह्यात यापुर्वी झालेल्या फेरफार अदालतीपेक्षा या फेरफार अदालतीचे स्वरुप विशेष होते. या फेरफार अदालतीमध्ये नोंदी निर्गतीबरोबर सातबारामधील चुकांच्या दुरुस्तीचे काम देखील करण्यात आले. फेरफार अदालतीसाठी नायब तहसिलदार व मंडळ अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी कामकाज पाहिले. नोंदी निर्गती बरोबर सातबारा विसंगत दुरुस्ती करण्यासाठी सुनावणी नोटीसा बजविण्याचे कामदेखील करण्यात आले. ई-पीक पाहणीमध्ये रब्बी हंगामासाठी पीकांची नोंदणी करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याचे नागरिकांना अवगत करणेत आले. पीक पाहणीमध्ये जास्तीत जास्त खातेदार नोंदणी करण्यासाठी या फेरफार अदालतीमध्ये माहिती देण्याचे कामदेखील यावेळी करण्यात आले.

1 मार्च ते 8 मार्च या कालावधीमध्ये विशेष मोहिम स्वरुपात  कामकाज करण्यात आले असून उर्वरीत कामकाज  मार्चअखेर पुर्ण करण्याचे नियोजन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका निहाय करण्यात आले आहे.

विसंगत सर्व्हे क्रमांकाची (ODC अहवाल 1 ते 41) संख्या विशेष मोहिम घेण्यापुर्वी 13 हजार 80 इतकी होती. पहिल्या आठवड्यातच 1 हजार 831 विसंगत सर्व्हेचे कामकाज पुर्ण करण्यात आले. उर्वरीत 11 हजार 249 गटांचे दुरुस्तीचे कामकाज मार्चअखेर करण्याचे उद्दिष्ट आहे.

डिजीटल साईन सातबारा करण्यावर शिल्लक संख्या विशेष मोहिम घेण्यापुर्वी 10 हजार 446 इतकी होती. पहिल्या आठवड्यात 1 हजार 996 गटांचे डिजीटल साईन काम पुर्ण झाले असून उर्वरीत 9 हजार 250 एवढे गट सातबारा डिजीटल साईन करण्याचे कामकाज  मार्चअखेर करण्याचे नियोजन आहे.

ई पीक पाहणीमध्ये जिल्ह्यात मार्च महिन्यातील 1 ते 8 मार्च या कालावधीतील विशेष मोहिमेमध्ये 41 हजार 656  खातेदारांची नोंदणी करण्यात आली असून मार्च अखेर जास्तीत जास्त खातेदारांना सहभागी करुन घेण्याचे नियोजन आहे. आज 5 लाख 70 हजार 448 खातेदारांची नोंदणी पुर्ण झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आज अखेर 10 लक्ष 70 हजार नोंदी भरण्यात आल्या असून त्यापैकी केवळ 7 हजार 188 नोंदी मुदतीवरील प्रमाणीकरणासाठी शिल्लक आहेत. तांत्रिक कारण, अपिलात स्थगिती असलेल्या नोंदी बाबतची माहिती संकलित करण्याचे कामकाज सुरू आहे. प्रलंबित तक्रार केसेस जलदगतीने निर्गत करणे शक्य होणार आहे. फेरफार विषयक केले जाणारे नाविन्यपुर्ण कामकाज मार्च महिन्यात दर बुधवारी फेरफार अदालत मंडळ मुख्यालयी घेण्यात येणार आहे.

येणाऱ्या फेरफार अदालतीपासून नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित संजय गांधी, रेशनकार्ड महसूल विभागाशी संबंधित अर्ज फेरफार अदालतीमध्ये स्विकरण्याच्या कामकाजाबाबत भर देण्यात येणार असून त्याप्रमाणे सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत, असे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.

स्थायी अध्यक्षपदाची हौस फिटेना ..विक्रमकुमारांना रासनेंच्या हट्टाचे ओझे पेलवेना..

0

….म्हणाले साडेआठ हजार कोटीचे हे बजेटही मीच सादर करणार ..

पुणे : महापालिकेची मुदत संपत असल्याने तसेच कायद्यातील तरतूदीनुसार स्थायी समिती अध्यक्षांना अंदाजपत्रक सादर करणे शक्‍य नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी महापालिकेची मुदत संपली तरी स्थायी समिती ही विसर्जित होत नाही असा दावा समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केला आहे.१४ मार्च रोजी सर्वांचेच नगरसेवकपद संपुष्टात येते आहे.असे असले तरी आपण स्थायी समितीचे अध्यक्ष आहोत आणि आपली समिती काही बरखास्त होणार नाही अध्यक्ष मीच राहणार,जोवर नवीन येत नाही तोवर मीच कारभार करणार या हट्टाला रासने पेटले आहेत.यंदा सुमारे साडे आठ हजार कोटीचे बजेट आयुक्तांनी फुगवून फुगवून सादर केले आहे जे मिळणाऱ्या उत्पन्ना पेक्षा कितीतरी जास्त आहे. सर्वसाधारणपणे तुम्ही कर लावा आम्ही कमी करतो अशा नाटकी अविर्भावात आजवर बजेट सदर करण्याचा इतिहास राहिला आहे. परंतु १४ मार्चला सध्या असलेल्या सर्वच नगरसेवकांच्या नगरसेवक पदाचीच मुदत संपत आहे. निवडणुका लांबल्याने आता निवडणूक होत नाही आणि नवीन नगरसेवक निवडून येत नाही तोवर आयुक्त हेच प्रशासक म्हणून कारभार पाहणार आहेत .

दरम्यान आज पत्रकार परिषदेत 14 मार्च रोजी स्थायी समितीचे अंदाजपत्रक मंजुर करून ते मुख्यसभेपुढे मांडण्यासाठी पाठविले जाईल असा दावाच रासने यांनी केला आहे. तसेच याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले असून कायदेशीर सल्ला घेऊनच हे पत्र देण्यात आल्याचे ते म्हणाले. तर प्रशासनाने अंदाजपत्रक सादर करू न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही रासने यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्तांकडून सर्वसाधारणपणे 17 जानेवारी पूर्वी स्थायी समितीस अंदाजपत्रक सादर केले जाते. मात्र, या वर्षी महापालिका निवडणूका लांबल्या असल्या तरी आयुक्तांनी सात मार्चला अंदाजपत्रक सादर केले. त्याच वेळी,14 मार्चला पालिकेची मुदत संपत आहे. अशा स्थितीत स्थायी समितीला अंदाजपत्रक मुख्यसभेत मांडण्यासाठी सात दिवसांची सभा बोलविण्याची नोटीस देणे आवश्‍यक असते. मात्र, आता पालिकेची मुदत संपणार असल्याने ही सभाच होणार नाही. त्यामुळे आयुक्तांचे अंदाजपत्रक मान्य करून स्थायी समिती अध्यक्ष 14 मार्च पूर्वी आपले अंदाजपत्रक प्रशासनाकडे पाठवू शकले असते. मात्र, 9 मार्च रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत वाद झाल्याने भाजपनेच अंदाजपत्रकाची सभा तहकूब करून ती आता शेवटच्या दिवशी म्हणजे 14 मार्चला ठेवली आहे. त्यामुळे त्याच दिवशी आयुक्तांचे अंदाजपत्रक मान्य करून समिती अध्यक्ष मुख्यसभेत अथवा प्रशासनाकडे कसे पाठवणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्थायी विसर्जित होत नाही – रासने
दरम्यान, महापालिकेची स्थायी समिती निवडून आलेल्या सदस्यांमधूनच नियुक्त होते. मात्र, आता या सदस्यांची मुदतच संपत असल्याने ही समितीही बरखास्त होते. मात्र, सार्वत्रिक निवडणूकीत पुढीचे सदस्य येई पर्यंत स्थायी समिती बरखास्त होत नाही असा दावा रासने यांनी केला आहे. केवळ स्थायी समितीबाबतच महापालिका अधिनियमात ही तरतूद असल्याचा दावा रासने करत आहेत. त्यामुळे रासने यांनी महापालिका आयुक्तांना नोटीस वजा पत्र पाठवित आपण अंदाजपत्रक सादर करणार असल्याचे पत्र दिले आहे. तसेच आपण मुदत संपण्यापूर्वी अंदाजपत्रक सादर करणार असून प्रशासनाने त्याचे काय करावे हा त्यांचा प्रश्‍न असल्याचे रासने या वेळी बोलताना म्हणाले.

अंदाजपत्रक ठेवण्यासाठी सात दिवस आधी नोटीस देऊन सभा बोलवावी लागेलनगर सचिव शिवाजी दौंडकर

नगर सचिव शिवाजी दौंडकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार मुख्यसभेपुढे हेे अंदाजपत्रक ठेवण्यासाठी सात दिवस आधी नोटीस देऊन सभा बोलवावी लागेल असे नमूद केले. विद्यमान सभागृहाची मुदत १४ मार्च रोजी संपत आहे. यामुळे ही सात दिवसांची मुदत विद्यमान सत्ताधारी भाजपला मिळू शकत नाही हे स्पष्ट झाले होते. 

राजकीय समीक्षक म्हणतात हा तर अतातायीपणा

जाणकार पत्रकार, आणि राजकीय समीक्षकांनी रासने यांच्या या हट्टाला अतातायीपणा आणि चटक लागणे अशा उपमा दिल्या आहेत.सूत्रांच्या म्हणण्यानुसार महापालिका निवडणुका दर पाच वर्षांनी जेव्हा होतात तेव्हा जुन्या नगरसेवकांचे पदाची मुदत संपलेली नसते,तरी त्या निवडणुका अशी मुदत संपण्यापूर्वीच महिनाभराच्या कालावधीत घेतल्या जातात. कित्येक जन पडले तरी तेव्हा नगरसेवक असतात. आणि त्यांची म्हणजे जुन्यांची मुदत संपताच नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना कारभार सोपविला जातो.आता विद्यमान नगरसेवकांची मुदतच संपत आली आहे तरी निवडणुका घेतलेल्या नाहीत. पण त्यांची मुदत १४ मार्च पर्यंतच आहे. त्यामुळे १५ मार्च पासून प्रशासक कारभार पाहील ,आणि निवडणूक होईल, निकाल लागेल तेव्हा नवे नगरसेवक रुजू होऊन काम पाहू लागतील .

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची लोककला पथकांद्वारे गावोगावी जागर

0

पुणे, दि. 10 : गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात शासनाच्या जन कल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यात येत आहे.

लोकांसाठीच्या योजना सोप्या, सहज आणि लोकांच्या भाषेत सांगितल्या की त्या लोकांपर्यत लवकर पोहोचतात. म्हणूनच या पारंपरिक माध्यमाचा उपयोग ग्रामीण भागापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी केला जात आहे.

कलाछंद कलापथकाच्यावतीने लोणावळा, कामशेत, आळंदी, जय मल्हार कलामंच पथकाच्यावतीने डोणजे, पिंरगूट आणि प्रसन्न प्रॉडक्शन्सच्यावतीने दौंड, सुपे, वरंवड, यवत, कानगाव, दौंड येथे कार्यक्रम करण्यात आले आहे.

राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत असा या मोहिमेचा उद्देश आहे.

कोविड काळात नागरिकांना केलेली मदत, कोविड लसीकरण अभियान, माझे गाव-कोरोना मुक्त गाव, माझे कुटुंब माझी जबाबदारी, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दिन दयाळ उपाध्याय योजना, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शिवभोजन थाळी योजना, शेतकऱ्यांसाठी विमा योजना,मुला-मुलींसाठी मोफत शिक्षण यासह विविध योजनांची लोककलेच्या माध्यमातून माहिती या पथकांनी दिली.  कला पथकाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुणे येथे 1 ते15 मार्च या कालावधीत तांदूळ महोत्सव, अधिकाधिक नागरीकांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

0

पुणे, दि. 10 :  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला उच्च दर्जाचा अस्सल इंद्रायणी, आंबेमोहर व स्थानिक वाणांचा तांदुळ, नाचणी, कडधान्ये आदी शेतमाल शेतकऱ्यांकडून थेट शहरातील नागरिकांना रास्त दरात उपलब्ध व्हावा आणि शेतकरीगटांना शेतमालाच्या विक्रीतून योग्य आर्थिक मोबदला मिळावा यासाठी 13 ते 15 मार्च या कालावधीत कृषी विभाग व ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ (आत्मा) यांच्यावतीने तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 13 मार्च रोजी शिवाजीनगर येथील कृषी भवन इमारतीजवळ या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे,  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

कृषी भवन इमारतीच्या पाठीमागे, साखर संकुल शेजारी, के. बी. जोशी पथ, नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळेत महोत्सव असणार आहे. तांदूळ महोत्सवास ग्राहकांनी भेट देऊन रास्त दरातील खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

ऊस गाळप संपल्याशिवाय साखर कारखाने बंद करु नयेत, साखर कारखान्यांना सूचना – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

0

मुंबई, दि. 10 : राज्यात यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. त्या त्या भागातील ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद करु नयेत, अशा सूचना साखर कारखान्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विधानपरिषदेत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

विधानपरिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी ऊसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देतांना सहकार मंत्री बोलत होते. या चर्चेमध्ये सदस्य सर्वश्री गोपीचंद पडळकर, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला होता.

सहकार व पणन मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्याने सहकार क्षेत्रात प्रगती करुन महाराष्ट्राच्या आर्थिक परिवर्तनात मोठे योगदान दिले आहे. या सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठी  मदत झालेली आहे आणि सहकार क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. चालू वर्षाच्या गळीत हंगामाचा उतारा माहिती नाही म्हणून गेल्या गळीत हंगामाचा उतारा गृहित धरावा अशा केंद्राच्या सूचना होत्या, पण साखर कारखानाच बंद असेल किंवा प्रथमच सुरु होत असेल तर कोणत्या वर्षाचा ऊस गळीत हंगाम उतारा गृहित धरावयाचा असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे राज्यशासनाने या विषयासाठी अभ्यास गट नेमून सविस्तर चर्चा करुन अभ्यास गटाने केलेल्या शिफारशी व त्या अनुषंगाने सर्वकष विचार करुन केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफआरपीप्रमाणे राज्यातील साखर कारखान्यात गाळपासाठी आलेल्या ऊसासाठी घ्यावयाची किंमत अदा करण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे आवश्यक असल्यामुळे चालू हंगामातील साखर उतारा व चालू हंगामाचा ऊसतोडणी, वाहतूक खर्च गृहीत धरुन एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.

दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वजन काट्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. वजन काटे तपासण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना साखर कारखान्यात जाण्यास परवानगी आणि वजन काटे ऑनलाईन करता येतील का असा  प्रश्न उपस्थित झाला होता. यावर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सहकार मंत्री यांनी शेतकरी संघटनेचे नेते, ऊस उत्पादक शेतकरी, या विषयातील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी अशा सूचना दिल्या.

सहकार मंत्री श्री.पाटील म्हणाले, साखर उद्योगपेक्षा इथेनॉल उत्पादन वाढ अधिक कशी करता येईल यासाठी साखर कारखान्यांनी प्रयत्न करावेत. तसेच त्या त्या भागातील ऊसाचे क्षेत्र वाढलेले असल्याने ही वाढ लक्षात घेऊन साखर कारखान्यांच्या विस्तार वाढ करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये ऊसाचे क्षेत्र वाढले आहे त्या जिल्ह्याचा आढावा सातत्याने सुरु आहे. शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही यासाठी साखर कारखान्यांनी नियोजन करावे, अशा सूचना साखर कारखान्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता करु नये, तसेच ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम दिली नाही, अशा साखर कारखान्यांवर कार्यवाही सुद्धा करण्यात आली आहे, असेही सहकार मंत्री यांनी यावेळी सांगितले.

दहावीचे हॉल तिकिट देण्याचे अधिकार आता शिक्षणाधिकारी यांना सुद्धा – राज्यमंत्री बच्चू कडू

0

मुंबई, दि. 10 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित माध्यमिक शाळांकडून हॉल तिकिट देण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली असून काही विद्यार्थ्यांनी शिक्षण तसेच परीक्षा शुल्क न भरल्याने मुख्याध्यापकांकडून हॉल तिकिट न देण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याकरिता पर्यायी व्यवस्था केली असून आता मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीशिवाय शिक्षण निरीक्षक, शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण प्रमुख, शिक्षण अधिकारी तसेच प्रशासन अधिकारी यांनाही हॉल तिकिट देण्याचे अधिकार देण्यात आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू नियम 93 अन्वये विचारलेल्या प्रश्नाला दिली.

कोविड काळात विद्यार्थ्याने शाळेची फी, थकीत फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापनाने कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करून नये, विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये, किंवा अशा विद्यार्थ्यांचे निकाल देखील रोखून धरण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या सूचना सर्व मंडळांना व सर्व माध्यमांच्या शाळांना शासनस्तरावर देण्यात आल्या असल्याचेही राज्यमंत्री श्री.कडू यांनी  सांगितले.

विधान परिषद सदस्य अॅड निरंजन डावखरे यांनी याबाबतची सूचना मांडली होती

योगींनी भाजप कार्यालयात केली गुलालाची उधळण

0

लखनऊ-उत्तर प्रदेश भाजपने273 जागांवर आघाडी घेतल्याने भाजपचा विजय निश्चित झाला आहे. योगी आदित्यनाथ भाजपच्या लखनऊ कार्यालयात पोहोचले. त्यांनी येथे गुलालाची जोरदार उधळण केली.योगी म्हणाले, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. संपूर्ण देशाच्या आणि जगाच्या नजरा विशेषतः उत्तर प्रदेशकडे लागल्या होत्या. आज उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि भाजपच्या मित्रपक्षांना प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्याबद्दल उत्तर प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार. बंधू आणि भगिनींनो, 7 टप्प्यांत पहिल्यांदाच उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मतमोजणीचा भ्रामक प्रचार सुरू होता. उत्तर प्रदेशातील जनतेच्या शक्तीने त्या भ्रामक प्रचाराचा धुव्वा उडवला आणि भाजपला विजयी केले.उत्तर प्रदेशात सुशासनासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला पंतप्रधानांचे सहकार्य आणि दिशा मिळाली आहे. आज सर्वांच्या सहकार्याने भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे आणि देशातील सर्वात मोठ्या राज्यात मिळाले आहे. हे बहुमत म्हणजे भाजपच्या राष्ट्रवाद, विकास आणि सुशासनाच्या मॉडेलला उत्तर प्रदेशातील जनतेचा आशीर्वाद आहे. सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास – सबका प्रयासाने आम्ही पुढे जाऊ.

बहुमताचा आकडा : 202
एकूण जागा : 403

उत्तर प्रदेश निवडणूक निकाल/ट्रेंड अपडेट्स…

पक्षआघाडीविजय
भाजप27350
सपा12507
काँग्रेस0101
बसपा0100
इतर0101
  • प्रतापगडमधील रामपूर खास मतदारसंघातून काँग्रेसच्या आराधना मिश्रा विजयी झाल्या आहेत. यूपीमध्ये काँग्रेसची ही पहिलीच जागा आहे, ज्यावर त्यांनी विजय मिळवला आहे.
  • प्रतापगडच्या बाबागंज विधानसभा मतदारसंघातून राजा भैय्या यांच्या जनसत्ता दलाचे विनोद कुमार विजयी झाले आहेत.
  • बहराइच जिल्ह्यातील नानपारा विधानसभा मतदारसंघातून अपना दलाचे राम निवास वर्मा विजयी झाले आहेत.
  • रायबरेली सदर मतदारसंघातून आदिती सिंह ९ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल आणि प्रियंका या दोघांनीही या जागेवर प्रचार केला होता. असे असतानाही काँग्रेसला आपला बालेकिल्ला वाचवता आला नाही.
  • मेरठच्या सरधना मतदारसंघातून भाजपचे संगीत सोम पराभूत झाले आहेत.
  • करहलमधून अखिलेश यादव, तर जसवंत नगरमधून त्यांचे काका शिवपाल यादव विजयी झाले आहेत. या विजयापूर्वी अखिलेश यांनी ट्विट केले होते – इम्तिहान बाकी है हौसलों का, वक्त आ गया है फैसलों का.

दिग्गजांचे बालेकिल्ले भुईसपाट

निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांसोबत गेलेले स्वामी प्रसाद मौर्य फाजीलनगरमध्ये पराभूत झाले. टीईटी पेपर लीकमुळे घेरलेले योगींचे मंत्री सतीश द्विवेदी यांना सिद्धार्थनगरची इटावा जागा जिंकता आली नाही. कैराना येथेही भाजपचा पराभव झाला, जिथे सपाच्या नाहिद हसन विजयी झाल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय सिंह लल्लू यांचा कुशीनगरमध्ये पराभव झाला.

गुंठेवारी नियमितीकरणासाठीचे प्रशमन शुल्क कमी करा!भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

0

मुंबई-सन २००१ सालच्या गुंठेवारी कायद्यानुसार राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बांधकामे गुंठेवारी नियमित करण्याचा अधिनियम एकमताने मान्य केला. मात्र यासाठीचे प्रशमन शुल्क अवाजवी असून, त्यामुळे गुंठेवारी नियमितीकरणाचा लाभ सर्वांना मिळत नाही. त्यामुळे प्रशमन शुल्क कमी करा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली.

सन २००१ सालच्या गुंठेवारी कायद्यानुसार राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बांधकामे गुंठेवारी नियमित करण्याचा अधिनियम एकमताने मान्य केला. मात्र या संदर्भात ऑक्टोबर २०२१ मध्ये राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीनुसार गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचे आदेश काढले. हे आदेश काढताना अतिशय जाचक अटी घालण्यात आल्या.

पुणे महापालिकेसह इतर महानगरांमधील बहुतांश गावांमध्ये गुंठेवारीमध्ये झालेली बांधकामे ही ९ मीटरच्या आतील रस्त्यांवर आहेत. त्यामुळे नियमीतीकरणासाठी अत्यल्प प्रस्ताव दाखल झाले आहेत. तसेच यासाठीचा प्रशमन शुल्क अवाजवी असून, गुंठेवारी नियमित करणाचा लाभ सर्वसामान्य नागरीकांना घेता येत नाही. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली असा समज झाला आहे. त्यामुळे प्रशमन शुल्क कमी केले जावे, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.

गोव्यात आप ची एन्ट्री …..भाजपा चे बहुमत . शिवसेना राष्ट्रवादीला भोपळा

0

पणजी -दे शातील सर्वात लहान राज्य गोव्यात भाजपचे सरकार स्थापन होणे जवळपास निश्चित झाले आहे. 20 जागा जिंकल्या असून बहुमताच्या तुलनेत फक्त एक जागा मागे आहे. त्यांना अपक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाला (AAP) पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश मिळाला आहे. त्यातील दोन उमेदवार विजयी झाले आहेत, पण पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री चेहरा बनवलेले अमित पालेकर निवडणुकीत पराभूत झाले आहेत.शिवसेना राष्ट्रवादीला एक हि जागा मिळालेली नाही .

पक्षजागा जिंकल्याआघाडीएकूण
BJP20020
काँग्रेस12012
AAP202
GFP101
RGP101
MGP202
अपक्ष203
एकूण40140

अपडेट्स…

  • भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री पराभूत झाले आहेत. मनोहर आजगावकर यांचा काँग्रेसच्या दिगंबर कामत यांनी सुमारे 6000 मतांनी तर चंद्रकांत केवलेकर यांचा काँग्रेसच्या अल्टोन डिकोस्टा यांनी सुमारे 3000 मतांनी पराभव केला.
  • निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी गोव्यात पोहोचलेल्या TMCने सर्व 26 जागा गमावल्या आहेत. त्यांना केवळ 5.21% मते मिळाली. त्यांचा मित्रपक्ष MGP ला 7.72% मते मिळाली.
  • उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर क्वेपम मतदारसंघातून 1422 मतांनी पिछाडीवर आहेत.
  • लेंगुटमधून काँग्रेसचे मायकेल लोबो आणि दाबोलिममधून भाजपचे माविन एच गोडिन्हो विजयी झाले आहेत.
  • नवेलिममधून भाजपचे उल्हास तुएनकर यांचा विजय झाल्यानंतर टीएमसीच्या उमेदवाराने येथे आक्षेप नोंदवला. आता पुन्हा मतमोजणी होत आहे.
  • बिचोलीममधून अपक्ष उमेदवार डॉ.चंद्रकांत शेट्टी विजयी झाले आहेत.
  • तिविममधून भाजपचे नीलकंठ रामनाथ 2018 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या लोत्लिकर यांचा पराभव केला.
  • सांकेलीममधून मुख्यमंत्री प्रमोद सावंत 604 मतांनी आघाडीवर आहेत.
  • दुस-या फेरीनंतर, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर क्वेपम जागेवरून 1422 मतांनी पिछाडीवर आहेत.
  • काँग्रेसचे दिग्गज नेता दिगंबर कामत मडगाव मतदारसंघातून 5,849 मतांनी आघाडीवर आहेत.
  • गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई फातोर्डा मतदारसंघातून 1500 मतांनी आघाडीवर आहेत.
  • TMC आणि MPG युती 4 जागांवर चुरशीची लढत आहे. सध्याच्या ट्रेंडमध्ये त्यांना 10 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
  • पणजी मतदारसंघात भाजपचे बाबूश मॉन्सेरात हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र अपक्ष उमेदवार उत्पल यांच्यापासून अवघ्या 334 मतांनी आघाडीवर आहेत.
  • मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांचा विधानसभा मतदारसंघ सांक्लिम येथील मतमोजणी केंद्रावर पोहोचले आहेत.
  • कलंगुटमध्ये काँग्रेसचे मायकल लोबो आघाडीवर आहेत.
  • राजधानी पणजीत BJPचे अतानासियो मोन्सेराटे आघाडीवर आहेत. ते अपक्ष उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
  • गोव्याचे मंत्री विश्वजित राणे त्यांच्या मतदारसंघातील वायपोल येथील मतमोजणी केंद्रावर पोहोचले.
  • BJP, TMC आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागेवर आघाडीवर
  • दोन केंद्रांवर मतमोजणी सुरू झाली आहे. उत्तर गोवा जिल्ह्यात येणाऱ्या जागांची मतमोजणी पणजीतील सरकारी पॉलिटेक्निक आणि दक्षिण गोव्यातील दामोदर कॉलेज मरगाव टाऊनमध्ये सुरू आहे.
  • सर्व उमेदवार आणि त्यांचे एजंट लसीकरण प्रमाणपत्र किंवा RTPCR निगेटिव्ह रिपोर्टसह मतमोजणी केंद्रात प्रवेश घेत आहेत.

टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मृणाल शेळके हिला विजेतेपद-दुहेरीत श्रावणी देशमुख व रितिका मोरे या जोडीला विजेतेपद

0

पुणे, 10 मार्च 2022: जागतिक महिला दिनानिमित्त डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डेक्कन जिमखाना-पीएमडीटीए मानांकन महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात मृणाल शेळके हिने विजेतेपद संपादन केले., तर दुहेरीत खुल्या गटात श्रावणी देशमुख व रितिका मोरे या जोडीने विजेतेपद मिळवले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मृणाल शेळके हिने अंजली निंबाळकरचा 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. मृणाल ही महाराष्ट्र मंडळ इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असून मॅस्ट्रो अकादमी, हिराबाग प्रशिक्षक प्रणव वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. जानेवारी महिन्यात एमडीटीए 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेत याआधी विजेतेपद पटकावले होते.
दुहेरीत अंतिम फेरीत श्रावणी देशमुख हिने रितिका मोरेच्या साथीत शांभवी नाडकर्णी व रितू ओक यांचा 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखानाच्या नियामक मंडळाचे सदस्य अभिजीत आपटे, क्लबच्या नियामक मंडळ माजी सदस्या आदिती आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, स्पर्धा निरीक्षक वेंकटेश आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: एकेरी: 14वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:मृणाल शेळके वि.वि.श्रावी देवरे 6-4;अंजली निंबाळकर वि.वि.काव्या पाटील 6-0;अंतिम फेरी: मृणाल शेळके वि.वि.अंजली निंबाळकर 6-2;
दुहेरी गट: उपांत्य फेरी:रितिका मोरे/श्रावणी देशमुख वि.वि.भावना अगरवाल/स्नेहा स्वामी 6-3;शांभवी नाडकर्णी/रितू ओक वि.वि.मृणाल शेळके/आरोही देशमुख 6-2;अंतिम फेरी: श्रावणी देशमुख/रितिका मोरे वि.वि.शांभवी नाडकर्णी/रितू ओक 6-3.

तलाठ्यांना सजांमध्ये थांबण्याच्या सूचना; अन्यथा घरभाडे बंद करणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0

मुंबई, दि. 10 :- गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक असून अनेक सजांमध्ये तलाठी कार्यालयाजवळच त्यांचे निवासस्थान बांधण्यात आले आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांना त्यांच्या सजातच थांबण्याच्या सूचना असून यानंतरही जे तलाठी सजांमध्ये राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथील तलाठी कार्यालय बंद असल्याबाबत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले की, ७/१२ उताऱ्यासह इतर सर्व महसूल कामकाजाचे संगणकीकरण केलेले असून ते कागदपत्रे आता कुठेही ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतात, तरीही ही कामे वेळेवर व्हावीत, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील.

आंबीदुमाला गावात नियमित तलाठी नियुक्त करण्यात आले असून वीजेची अडचण असली तरी लॅपटॉपद्वारे संगणकीकृत ७/१२ उतारे दिले जात आहेत. या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेऊ असे सांगून आंबी दुमाला भागात अवैधपणे गौण खनिज उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारीची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

केजरीवालांच्या दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा मोठा विजय- शरद पवार

0

मुंबई – पंजाबमधील शेतकऱ्यांचा राग मतमदानातून दिसला. त्यांनी भाजपाला हरवलं काँग्रेसला हरवलं आणि नव्या पक्षाच्या हातात सत्ता दिली. केजरीवालांच्या दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला. लोकांच्या बोलण्यातून केजरीवालांच्या कामांबाबत उत्सुकता दिसत होती. पंजाबमधील निकाल हा भाजपाला अनुकूल नाही आणि काँग्रेससाठीही धक्कादायक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे.

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने मोठं यश मिळवलं आहे. पाचपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपाला आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाबाबत पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की,चार राज्यातील जनादेश हा भाजपाच्या बाजूने आला आहे. तर केजरीवालांच्या दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल आहे. या जनादेशाचा आदर केला पाहिजे. आता पुढच्या काळात आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात एक प्रभावी पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केला पाहिजे.दरम्यान, गेल्या काही काळातील निवडणुकांचा विचार केला तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये राज्यांत भाजपेत्तर पक्षांना यश मिळालं आहे. राष्ट्रीय विषयांवर जनतेचं वेगळं मत दिसून येतं. मात्र आपण जनतेने दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे. कारण तो लोकांचा निर्णय असतो, तो स्वीकारला पाहिजे. मात्र या निकालांमुळे विरोधकांनी नाऊमेद होता कामा नये. आता देशातील विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. विरोधकांच्या एकत्र येण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसच्या उडालेल्या घसरगुंडीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, पंजाबमध्ये काँग्रेस कुठे पडली याबाबत विचार करणे हा काँग्रेसचा प्रश्न आहे. दरम्यान, निकाल सुरू असताना माझी कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याशी चर्चा झालेली नाही. त्यांच्याशी न बोलता त्यांच्याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही.