Home Blog Page 2054

राज्यातील तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात १२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

0

मुंबई, दि. 11 :- विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुरदीअंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात दि. 12 मार्च 2022 या  दिवशी  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे.

प्रलंबित तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरिता महाराष्ट्रातील उच्च न्यायालय व त्यांची  सर्व खंडपीठे, सर्व जिल्हा व तालुका न्यायालये व न्यायाधिकरणे येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये ‘राष्ट्रीय लोक अदालतीचे’ आयोजन नियमितपणे करण्यात येते.

लोक अदालतीचे फायदे :-

  • वाद प्रकरणांचा झटपट निकाल लागतो. तोंडी पुरावा-उलटतपासणी दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात.
  • लोक न्यायालयाच्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. एकाच निर्णयात न्यायालयीन प्रक्रियेतून कायमची सुटका होते.
  • लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजूतीने होत असल्याने सर्व पक्षाचा विजय होतो.
  • लोक न्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो.
  • परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही.
  • न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणेच लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. (Award of Lok Adalat is deemed Decree)
  • वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते.
  • लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार फी ची रक्कम परत मिळते.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणारी प्रकरणे :-

  • सर्व प्रकारची दिवाणी प्रकरणे
  • चेक बाउन्स प्रकरणे
  • बॅक वसुली प्रकरणे
  • अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे
  • कामगार वाद प्रकरणे
  • विज, पाणी व कर यांच्या देयकाबाबतची प्रकरणे
  • वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे
  • नौकरीबाबतची प्रकरणे ज्यात पगार, इतर भत्ते व निवृत्तीबाबतचे फायदे (Service Matters relating to Pay and Alloqances & Retriment Benefits)
  • महसूल बाबतची प्रकरणे (Revenue Cases)

उच्च न्यायालयात आयोजित केल्या जाणाऱ्या लोक अदालतीची माहिती मुंबई येथे उच्च न्यायालय विधी सेवा समिती, 104, पी. डब्ल्यु. डी. इमारत, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई येथे तर नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांसाठी त्या ठिकाणच्या उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीकडे मिळेल. जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये होणाऱ्या लोक अदालतीची माहिती जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये कार्यरत असलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यांच्या कार्यालयांकडून मिळेल, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखतीनंतर त्याच दिवशी निकाल जाहीर

0

मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकूण 34 पदांच्या मुलाखती घेतल्या असून या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पडल्या, त्याच दिवशी आयोगाने संबंधित पदाचे निकालदेखील प्रसिद्ध केले आहेत. ही अतिविशेषीकृत पदे आयोगाने विशेष मोहीम राबवून भरली आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मज्जातंतूशास्त्र (Neurology), नवजात शिशुरोगशास्त्र (Neonatology), अंतस्त्रावी विकारशास्त्र (Endrocrinology), जठारांत्रजन्यशास्त्र, (Eastroenterology), वृक्क विकारशास्त्र (Nephrology), हृदयवाहिका आणि उरोविकृती शल्यचिकित्साशास्त्र (C.V.T.S.), बालरोग शल्यचिकित्साशास्त्र (Paediatric Surgery), मूत्रविकारशास्त्र (Urology), सुघटन शल्यचिकित्साशास्त्र (Plastic Surgery), हृदयरोग चिकित्साशास्त्र (Cardiology), अधिष्ठाता (Dean), शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपसंचालक (Dy. Director) आरोग्य सेवा, औषध वैद्यकशास्त्र (General Medicine), मज्जातंतू शल्यचिकित्साशास्त्र (Neuro Surgery), अतिविशेषीकृत (super speciality) विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकूण 34 पदांच्या मुलाखती आयोगाने घेतल्या असून या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पडल्या त्याच दिवशी आयोगाने संबंधित पदाचे निकालदेखील प्रसिद्ध केले आहेत.

अर्थसंकल्प आणि महिला सक्षमीकरण

0

लोककल्याणकारी राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका बजावतोयाच अर्थसंकल्पाद्वारे शासनाच्या विविध योजनाकार्यक्रमांचा लाभ जनतेला घेता येतोसामाजिक आणि त्यासारख्या विविध सेवांवर अधिकाधिक खर्च करण्यावर भर देण्याचा कल्याणकारी राज्याचादेशाचा प्राधान्यक्रम अर्थसंकल्पामध्ये परिवर्तित होत असल्याने सामाजिकआर्थिक परिवर्तनाचे एक महत्त्वाचे माध्यमयंत्रणा म्हणून अर्थसंकल्पाकडे पाहिले जाते हे स्पष्ट होतेयात महिलांसाठी केलेल्या तरतुदी आणि विकासात्मक कार्यक्रमांमुळे अर्थसंकल्प ही केवळ एक शासकीय प्रक्रिया  राहता ती महिला सक्षमीकरणासाठी सहाय्य ठरणारे एक पूरक माध्यम ठरते

दरवर्षी केंद्र शासनामार्फत आणि प्रत्येक राज्यामार्फत अर्थसंकल्प मांडला जातो. खरेतर केंद्राच्या अर्थसंकल्पात त्या वर्षाचे आर्थिक नियोजन, पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी आणि भविष्यातील तरतूद यावर प्रामुख्याने भर असतो. याशिवाय वेगवेगळ्या विभागांसाठी काही महत्त्वाच्या योजना आखून त्या प्रामुख्याने राबविल्या जातात. तर प्रत्येक राज्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन करताना राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण, महिला व बालकांसाठी योजना, शैक्षणिक सुविधा, उद्योग आणि  रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात येतो.

केंद्र असो किंवा महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर दरवर्षी अर्थसंकल्पावर महिला वर्गाचे विशेष लक्ष असते. कारण हा अर्थसंकल्प महिला सबलीकरणाची एक प्रकारची नांदीच असते. वेगवेगळ्या महिलाकेंद्रित योजना सुरू करताना घराचे अर्थकारण सांभाळणाऱ्या महिलांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली जावी असा आग्रह महिला वर्गाचा असतो. महिलांचे आरोग्य व सुरक्षा विद्यार्थिनीसाठी शैक्षणिक सुविधा, महिला वर्गासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करत त्यांच्या सबलीकरणावर भर देण्यात यावा अशी महिला वर्गाची अपेक्षा असते. या अर्थसंकल्पात महिला बचतगटांना प्रोत्साहन मिळावे, लघु उद्योजिकांना व्यवसायासाठी पाठबळ मिळावे, विद्यार्थिनींसाठी शिक्षणाची तरतूद व्हावी अशी अपेक्षाही या अर्थसंकल्पाकडून असते.

अर्थसंकल्पात महिलावर्गाच्या संबंधी असलेल्या गरजांची पूर्तता कशा प्रकारे करायची याची पडताळणी करण्यासाठी लिंगभावात्मक अर्थसंकल्पाकडे पाहिले जाते. स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक असणारी उद्दिष्टे साध्य करण्याकरिता आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि कृतीच्या सक्षमतेवर या जेंडर बजेटद्वारे विशेष भर दिला जातो. या जेंडर बजेटच्या संकल्पनेमुळे किंवा महिलांविषयक भरीव तरतुदींमुळे विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांच्या सक्षमीकरणाला गती मिळाली आहे. २००४ मध्ये अर्थमंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये लिंगभाव अर्थसंकल्प कक्ष स्थापन करुन शासनाच्या विविध पातळ्यांवर आणि क्षेत्रांमध्ये लिंगभावात्मक अर्थसंकल्पाचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत.

आपण नेहमीच म्हणतो की जर आपण कुटुंबातील महिलेला सक्षम केले तर सगळे कुटुंब सक्षम होते.आपण महिलांना शिक्षण दिले तर सगळे कुटुंब शिक्षित होते. तिचे आरोग्य जपले तर कुटुंबाचे आरोग्य आपोआप जपले जाते. जर आपण तिचे भवितव्य सुरक्षित केले तर सगळ्या घराचे भवितव्य सुरक्षित होईल.

आजच्या काळात महिला सक्षम, सबल होत असून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अर्थसंकल्प आणि महिला सक्षमीकरण हे जणू समीकरणच बनले आहे आणि त्यामुळेच दरवर्षी सादर होणारा केंद्रीय आणि राज्याचा अर्थसंकल्प हा महिला वर्गासाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरतो.

—-

महाविकास आघाडी सरकारमार्फत महिला वर्गासाठी विशेष तरतुदी

  • गेली दोन वर्षे जगभरासह महाराष्ट्रावर कोविड-19 चे संकट होते. देशासह महाराष्ट्रसुद्धा कोविड-19  या महामारीशी मुकाबला करीत होता, असे असले तरी 6 मार्च 2020 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी 2020 -21  च्या मांडलेल्या अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलिस ठाणे निर्माण करणे,महिला आणि तरुणींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
  • गेल्या वर्षी म्हणजेच जागतिक महिला दिन अर्थात 8 मार्च 2021 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी 2021- 22 च्या अर्थसंकल्पात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेअंतर्गत गृहखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्याने सवलत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आणि त्याची अंमलबावणीही सुरू झाली.
  • ग्रामीण विद्यार्थ्यांना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासासाठी सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना घोषित करण्यात आली. याअंतर्गत शासनाकडून राज्य परिवहन महामंडळात दीड हजार सीएनजी आणि हायब्रीड बस उपलब्ध करून देण्यात आल्या.
  • शहरातील महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी योजनेअंतर्गत आणखी विशेष महिला बस उपलब्ध करून देण्यात आल्या.

————

केंद्रातमहाराष्ट्रात प्रत्येकी 3 महिलामंत्र्यांनी सादर केला होता अर्थसंकल्प

1958 ते 1964 या काळात केंद्रीय वित्तमंत्री असताना श्रीमती तारकेश्वरी सिन्हा यांना देशाचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी  भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू होते. तर भारताच्या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून 1970-71 मध्ये भारताचा अर्थसंकल्प सादर केला होता.तर सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत चार वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

महाराष्ट्रात सन 1979- 80 चा अर्थसंकल्प 7 मार्च 1979 रोजी वित्त राज्यमंत्री श्रीमती शांती नाईक यांनी सभागृहात मांडला. तर वित्त राज्यमंत्री म्हणून श्रीमती सेलीन  डिसिल्वा यांनी 25 मार्च 1985 रोजी 1985-86 चा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. याच वर्षी 24 जून 1985 रोजी अतिरिक्त अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला. सन 2000-2001 चा अर्थसंकल्प 22 मार्च 2000 रोजी वित्त राज्यमंत्री म्हणून श्रीमती वसुधा देशमुख यांनी नव्या सहस्रकाचा पहिला अर्थसंकल्प मांडला.

——–

  • वर्षा फडकेआंधळेमुंबई

लेखन महिलांना स्वतःची ओळख करून देते-ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले

0

आम्ही लेखिका या संस्थेचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन 

पुणे : आधुनिक जगामध्ये महिला छोट्याशा अपयशाने खचून जातात. हाती घेतलेले काम सोडून देतात आणि निराश होतात. या निराशेतून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी लेखन हे उपयोगी पडते. प्रत्येक महिलेने व्यक्त झाले पाहिजे आणि लिहिले पाहिजे अशी भावना ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली.
आम्ही लेखिका या संस्थेचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्या नलिनी पाटील, संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा पाटील, केतकी देशपांडे, मृदुला कुलकर्णी, ममता मुंगेलवार, रेणुका पांचाळ, शिल्पा दिवाकर, उल्का मोकासदार, अर्चना नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते. 
मंगला गोडबोले म्हणाल्या, आपण जे जगतो तेच आपण लिहिले पाहिजे.आपण जे कधीच अनुभवले नाही ते लिहिण्याचा अट्टाहास करू नये कारण तसे लिखाण उघडे पडते. सोपे लिहिणे अवघड असते. आपण ज्या उमेदीने आणि उत्साहाने रोज नव्याने स्वयंपाक करतो त्याच प्रमाणे आपण नव्या उमेदीने लेखन केले पाहिजे. 
नलिनी पाटील म्हणाल्या, महिलांना व्यक्त होण्याची संधी देऊन त्यांच्यातील लेखक बाहेर काढण्याचे काम ही संस्था करत आहे. महिला या लेखनाच्या माध्यमातून केवळ स्वतःचाच शोध घेत नाहीत तर त्या एका अर्थाने समाजालाही नवीन दिशा देत असतात. लेखन आणि वाचनातून केवळ साक्षरता घडत नाही तर एक समाज घडत असतो आणि यामध्येही महिला मागे नाहीत.
माधुरी जोशी. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाशन समारंभानंतर अभिवाचन आणि कविता सादरीकरण  झाले. यामध्ये प्रभा सोनवणे, जागृती निखारे, शैलजा साळुंखे, शशिकला सुखाला, सुनीता शिंदे, अर्चना  मवाळ, वृषाली वजरकर, केतकी देशपांडे यांसह अनेक लेखिका सहभागी झाल्या होताना.

महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई दि. 11 : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वाभिमानी’ विचारच प्रेरक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनानिमित्त कृज्ञतापूर्वक वंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराष्ट्राला  शौर्य, स्वाभिमान, स्वराज्यबाणा आणि पुरोगामी विचार दिला. त्यांचे संघर्षमय जीवन आपणा सर्वांसाठी ऊर्जास्रोत आहे. कुशल राज्यकारभार, युद्धनीतीबरोबरच त्यांनी बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद, सातसतक हे ग्रंथ लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्यावर आलेल्या संकटाचा त्यांनी मोठ्या धैर्याने सामना केला. स्वराज्याचे रक्षण करतानाच त्यांनी स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या. आपल्या कार्यकाळात छत्रपती संभाजी महाराज एकही युद्ध हरले नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्यातील रयतेला स्थैर्य प्राप्त झाले, स्वराज्याला सक्षम छत्रपती मिळाले, स्वराज्याच्या शत्रूंवर वचक बसला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या शिकवणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार केला. रयतेसाठी आणि स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी त्यांनी समर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर मार्गक्रमण करत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन केले आहे.

राज्य मागासवर्गीय आयोगाला निधी देण्यात उशीर का ? विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा सवाल

0


मुंबई दि, १० :- ओबीसी समाजाच्या राजकीय अरक्षणासाठी
इम्पीरिकल डेटा गोळा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले. मात्र, राज्य मागासवर्गीय आयोगाला यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात उशिरा का? विलंबाचे कारण काय? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या समोर उपस्थित केला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळण्यासाठी “ओबीसी इम्पिरिकल डाटा” गोळा करण्याची जबाबदारी राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे दिली. ओबीसी प्रवर्गाचा सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेचा इम्पिरिकल डाटा उपलब्ध नसल्याने शासनाने प्रशासकीय यंत्रणा वापरुन जातीनिहाय जनगणना करावी, यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने ऑगस्ट, २०२१ त्यादरम्यान शासनास ठराव सादर केला आहे, हे सत्य आहे काय? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला
मागासवर्गीय आयोग गठीत केल्यानंतर आयोगाने शासनाकडे साधारण ४३५ कोटींची मागणी केली होती. मात्र, फक्त ८४ कोटींचा निधी देण्यात आला. हा निधी नऊ महिन्यांनी देण्यात आला. नऊ महिने शासनाने आयोगाला निधीच दिलाच नाही. याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात शासनाकडून विलंब झाला नसल्याचे सांगण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा वापरून जातिनिहाय जनगणना करण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने शासनाला ठराव सादर केला नाही असे लेखी उत्तर देण्यात आले.मात्र, शासनाने दिलेले उत्तर हे तांत्रिक स्वरूपाचं आहे. हे अत्यंत चूक आहे असे दरेकर म्हणाले. जातनिहाय जनगणना करण्याबाबत मागासवर्गीय आयोगाने शासनाशी चर्चा केली होती का? तसं पत्र किंवा प्रस्ताव पाठवला होता का? सरकारने जी कागदपत्र आयोगाला पुरवली त्यामध्ये राजकीय मागासलेपणाची माहिती दिली नाही हे खरं आहे का? अंतरिम अहवाल सादर करण्यासाठी आयोगाने विरोध केला होता पण शासनाने आयोगाला बाध्य केले नाही हे खरे आहे का असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.

धनगर समाजातील बांधवांना उद्योग-व्यवसायासाठी
२५ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून द्या


धनगर समाजातील युवक व युवतींना स्वयंरोजगार व उद्योग-व्यवसायासाठी २५ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात आपला प्रश्न उपस्थित करतना दरेकर यांनी सांगितले की, धनगर समाजातील युवक व युवतींना कर्ज प्रतिपूर्ती तत्वावर देण्यात यावे. या कर्जामुळे त्यांना आर्थिक साहाय्य प्राप्त होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होईल. ओबीसी समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास गटातील बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून २५ लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. याच पार्श्वभूमीवर धनगर समाजातील बांधवांना उद्योगासाठी २५ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देणार का? धनगर समाजाला कर्ज उपलब्ध करण्यासंदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेणार का असा सवालही दरेकर यांनी याप्रसंगी उपस्थित केला.

ऑस्ट्रेलियाच्या लष्करप्रमुखांनी लोंगेवाला इथे दिली भेट, पोखरण येथे एकात्मिक अग्निशक्ती प्रात्यक्षिकाचे साक्षीदार

0

नवी दिल्ली : 10 मार्च 2022

ऑस्ट्रेलियाचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल रिचर्ड मॅक्सवेल बर  AO, DSC, MVO,  08 मार्च 2022 पासून भारताच्या चार दिवसांच्या  दौऱ्यावर आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या लष्करप्रमुखांनी आज 10 मार्च 2022 रोजी,  राजस्थानमधील जोधपूर, पोखरण आणि  लोंगेवाला इथल्या स्थळांना  भेट दिली. ऑस्ट्रेलियाच्या लष्करप्रमुखांचे लोंगेवाला  येथे आगमन झाल्यावर,  लेफ्टनंट जनरल राकेश कपूर, जीओसी, डेझर्ट कॉर्प्स यांनी त्यांचे स्वागत केले.  त्यानंतर त्यांनी, 1971 च्या भारत-पाकिस्तान  युद्धात शहीद झालेल्या भारतीय  वीरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या युद्ध स्मारकावर  आदरांजली वाहिली.  भारतीय सैनिकांच्या मूल्यांचा आणि शौर्याचा साक्षीदार असलेली  ‘युद्ध स्मारके’ उभारणे  आणि त्यांची देखभाल करणे आणि सामान्य लोकांपर्यंत ती पोहोचवण्यासाठी भारतीय लष्कर करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
लेफ्टनंट जनरल रिचर्ड बर  यांनी पोखरण फील्ड फायरिंग रेंजलादेखील भेट दिली. तिथे त्यांनी  शस्त्रास्त्र, तोफखाना, पायदळ आणि विमानचालन मालमत्तेचा समावेश असलेले लष्करी संचलन पहिले.  ऑस्ट्र्रेलियाच्या लष्करप्रमुखांनी  भारतीय सैनिकाच्या खंबीरपणाची आणि विविध भूप्रदेशात व  कठीण परिस्थितीत काम करण्याच्या त्याच्या क्षमतेची प्रशंसा केली.

कर्नाटकात बेळगाव येथे धर्म गार्डियन-2022 युध्दसरावाचा समारोप

0

नवी दिल्ली 10 मार्च 2022

भारतीय लष्कर आणि जपानचे जमिनीवरील स्वसंरक्षण दल यांचा सहभाग असलेल्या धर्म गार्डियन-2022 या 27 फेब्रुवारी 2022 पासून बेळगावच्या परदेशी प्रशिक्षण मैदानावर सुरु झालेल्या  वार्षिक सराव कार्यक्रमाचा 12 दिवसांच्या यशस्वी संयुक्त लष्करी प्रशिक्षणानंतर  आज 10 मार्च 2022 रोजी समारोप झाला. भारत आणि जपान या देशांमध्ये असलेल्या कालातीत मैत्री संबंधांना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमध्ये समन्वय आणण्यासाठी या लष्करी सरावाने अत्यंत अनोखी संधी प्राप्त करून दिली. या युद्ध सरावाने सहभागींना व्यावसायिक आणि सांस्कृतिक शिक्षणासाठी तसेच सामाजिक चर्चांसाठी मंच देखील उपलब्ध करून दिला आणि त्यातून हिंद-प्रशांत परिसरात एकीकृत सह-अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने ज्ञान आणि सहकार्य यांच्या बाबतीतील त्यांची क्षितिजे रुंदावली.

या सरावादरम्यान परस्पर प्रशिक्षण आणि युध्द क्षेत्रावरील लढाईच्या वेळची परिस्थिती हाताळण्यापासून ते क्रीडा आणि सांस्कृतिक बाबींचे आदानप्रदान अशा विस्तृत कक्षेतील विषय हाती घेतल्यामुळे हा सराव अत्यंत यशस्वी ठरला आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांनी गोळीबाराचा सराव आणि इतर युद्धविषयक कारवायांबाबतच्या विविध सादरीकरणामध्ये खांद्याला खांदा भिडवून भाग घेतला. दोन्ही बाजूंकडील पथकांनी दहशतवाद विरोधी कारवायांसारख्या समकालीन समस्यांविरुध्द वापरले जाणारे नैपुण्य एकमेकांशी सामायिक केले, एवढेच नव्हे तर त्यांनी ड्रोन आणि ड्रोनविरोधी शस्त्रांसारख्या विनाशक तंत्रज्ञानाचा वापर करताना आलेले अनुभव देखील सामायिक केले.

“धर्म गार्डियन” हा युध्द सराव भारतीय लष्कर आणि जपानचे जमिनीवरील स्वसंरक्षण दल यांच्यातील संरक्षण विषयक सहकार्याची पातळी वाढवेल तसेच यासारखे लाभ आणखी संघटीतपणे मिळविण्याच्या उद्देशाने आयोजित भविष्यातील अशा संयुक्त कार्यक्रमांसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाला निवडणुकीत विजय–प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

0

प्रदेश कार्यालयात जल्लोष

देवेंद्र फडणवीस यांचे गोव्यातील यशाबद्दल अभिनंदन

मुंबई-उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजय मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेश कार्यालयात प्रचंड जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाला यश मिळाले आहे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

गोवा विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. निवडणूक प्रभारी म्हणून मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. त्यानंतर आता गोव्याची विधानसभा निवडणूक भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जिंकली असल्याचे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, नाचत आणि जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजपाचा चार राज्यातील विजय साजरा केला. भाजपा नेते मा. गिरीश महाजन, आशिष शेलार, सुभाष देशमुख, राधाकृष्ण विखे पाटील, श्रीकांत भारतीय, अतुल सावे, किरीट सोमय्या, देवयानी फरांदे, संजय कुटे, बबनराव लोणीकर, जयप्रकाश ठाकूर, उमा खापरे, ऐजाज देशमुख, संजय पांडे, केशव उपाध्ये, अभिमन्यू पवार, गणेश हाके आणि मुकुंद कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले.

चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकास कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सामान्य लोकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने देशातील जनतेची सेवा केली. याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या राज्य सरकारने गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातही सामान्य माणसासाठी काम केले. त्यामुळे भाजपाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.

ते म्हणाले की, भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यकाळात पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी आणि बळकटीसाठी व्यापक काम करण्यात आले. भाजपा अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना आणखी बळकट झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचे रुपांतर पक्षाच्या मतांमध्ये झाले.

त्यांनी सांगितले की, गोवा विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशासाठी पक्षाचे गोव्याचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महाराष्ट्रात भाजपाचे उद्दीष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विजय मिळविण्याचे आहे. भाजपा मुंबई महानगर पालिकेवर आपला भगवा झेंडा फडकवेल.

सुवर्णयुग सहकारी बँकेचे नवीन संचालक मंडळ जाहीर

0

बँकेची निवडणूक बिनविरोध पडली पार ; सन २०२२ ते २०२७ करीता निवड ; बँकेचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापित सुवर्णयुग सहकारी बँक मर्यादित पुणे च्या सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन संचालक मंडळाची नियुक्ती झाली आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली असून नवनियुक्त संचालक मंडळाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणरायाचे दर्शन घेत आरती देखील केली.

ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्वस्त व पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण त्याचप्रमाणे गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या पुढाकाराने ही निवडणूक बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

नवनियुक्त संचालक मंडळामध्ये हेमंत रासने, राजेंद्र सूर्यवंशी, राहुल चव्हाण, अमर कोद्रे, बाळकृष्ण सातपुते, नितीन राऊत, राजेंद्र पायमोडे, इंद्रजित रायकर, सुनील जाधव यांसह राखीव विभागातून महिलांमध्ये शोभा गोडसे, आसावरी रायकर व पुरुष राखीव गटातून चंद्रकांत मंचे, सुनिल माने यांची नियुक्ती झाली आहे. सहकार विभागाकडून शाहूराज हिरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

बँकेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, सुवर्णयुग सहकारी बँकेची स्थापना सन १९७३ साली झाली. बँकेच्या पुणे जिल्ह्यात २० ठिकाणी शाखा आहेत. बँकेच्या ८५० कोटी रुपयांच्या ठेवी असून ६५० कोटी रुपयांची कर्ज आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षात बँकेतर्फे विविध योजना व उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने समाजातील कमकुवत घटकांसाठी व गरीबांसाठी योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले स्मारक येथील कमानीचे उद्घाटन

0

पुणे (प्रतिनिधी):

महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले स्मारक येथील मेघडंबरीचे आणि कमानीचे उद्घाटन मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजय खेडेकर यांच्या हस्ते मा. महापौर यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिताताई वाडेकर, अध्यक्ष सम्राट थोरात, क्रिडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर, सभासद आरती कोंढरे विजयालक्ष्मी हरिहर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महाज्योती संस्थेमार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मुलींकरिता निवासी प्रशिक्षण केंद्रास २४ कोटी रूपयांची तरतूद – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

0

मुंबई, दि. 10 :  सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव मौजे नायगांव येथे महाज्योती संस्थेमार्फत 200 मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व अन्य स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवासी स्पर्धा प्रशिक्षण संकुल उभारणे. सर्व सोयी सुविधेसह प्रशिक्षण केंद्र सुरु करणे व चालविणे याकरिता 24 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, यासंदर्भातील शासन निर्णय 7 मार्चरोजी जारी करण्यात आला आहे.

महाज्योती ही स्वायत्त संस्था असून विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर वंचित व दुर्लक्षित घटकातील युवक व युवतींसाठी विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती संस्थेने दिलेल्या प्रस्तावानुसार 100 विद्यार्थिनींची निवास व्यवस्था सर्व अत्याधुनिक सुविधांसह उभारण्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील उजव्या बाजूस खुल्या जागेत 100 विद्यार्थिनीकरिता 50 रूम बांधण्यासाठी 30 लाख रूपये, 100 विद्यार्थिनींना निवासाची व्यवस्था करणे रूम फर्निचर व सुविधा यासाठी एकूण 50 रुममध्ये प्रत्येकी 2 टेबल, खुर्च्या, कपाट, कॉट गाद्यांकरिता 5 लाख रूपये, इमारत डागडुजी बाथरूम, रंगकाम, इलेक्ट्रीक व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी) या करिता अंदाजित 10 लाख रूपये, कार्यालयीन सोयी-सुविधा व उपकरणे, टेबल, खुर्च्या, कपाट, संगणक, इंटरनेट सुविधा, रंगकाम, इलेक्ट्रिकल व इतर बाबीसाठी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी) याकरिता 10 लाख रूपये, मेस उभारणी, डायनिंग टेबल, खुर्च्या सेट, केटरर्स व्यवस्था जेवणथाळ्या वाट्या, ग्लास, चमचे इत्यादी साहित्यसंपूर्ण व्यवस्था करणे याकरिता अंदाजित 10 लाख रूपये, डिजिटल क्लासरुम व्यवस्था, 3 क्लासरूम मधील डेस्क बेंच, प्रोजेक्टर, Inter- active पॅनेल, टेबल, इंटरनेट सुविधा व इतर बाबी  १० लाख रूपये खर्च,वाचनालय व अभ्यासिका, 50 बैठक व्यवस्थेसह टेबल, खुर्च्या, पुस्तक कपाट, संगणक, इंटरनेट सुविधा, रंगकाम, इलेक्ट्रिकल व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी याकरिता अंदाजित  20 लाख रूपये, वाचनालय व अभ्यासिका करीता पुस्तक खरेदी, एकूण 1 लक्ष पुस्तके अभ्यासिकेकरिता 20 लाख रूपये, प्रशिक्षणासाठी मैदान व्यवस्था तयार करण्यासाठी अंदाजित 10 लाख रूपये, सुसज्ज व्यायाम शाळा बांधणी, व्यायाम शाळा उभारणी व साहित्य खरेदी करणे या करिता 10 लाख रूपये, सभागृह बांधणी, प्रेक्षागृह उभारणी व इतर आवश्यक बैठक व्यवस्था व साउंड व्यवस्था याकरिता 45 लाख रूपये,प्रशिक्षणासाठी नवीन जमीन खरेदी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेच्या शेजारी लागून असलेली मोकळी जागा याकरीता. 60 लाख रूपये  असे एकूण सर्व कामांसाठी  एकूण अंदाजित खर्च 24 कोटी रूपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी २०२१-२२ चा अहवाल

0

मुंबई, दि. 10 : राज्याच्या अर्थव्यवस्थेत २०२१-२२ च्या पूर्व अनुमानानुसार १२.१ टक्के वाढ, देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ तसेच दरडोई राज्य उत्पन्न 2,25,073 अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2021-22 मांडला.

सेवा आणि उद्योग क्षेत्रात भरीव वाढ अपेक्षित

आर्थिक पाहणीनुसार यंदाच्या आर्थिक वर्षात कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात ४.४ टक्के वाढ, उद्योग क्षेत्रात ११.९ टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात १३.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार 2021-22 मध्ये सांकेतिक (‘नॉमिनल’) (चालू किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 31,97,782 कोटी अपेक्षित आहे. वास्तविक (‘रिअल’) (सन 2011-12 च्या स्थिर किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 21,18,309 कोटी अपेक्षित आहे. 2021-22 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्याची महसुली जमा 3,68,987 कोटी, कर महसूल 2,85,534 कोटी आणि करेतर महसूल 83,453 कोटी (केंद्रीय अनुदानासह) आहे. एप्रिल ते नोव्हेंबर,2021 या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा  1,80,954 कोटी आहे. 2021-22 नुसार राज्याचा महसुली खर्च 3,79,213 कोटी सन 2020-21 च्या सुधारित अंदाजानुसार विकास खर्चाचा एकूण महसुली खर्चातील हिस्सा 68.1 टक्के आहे.

वार्षिक कार्यक्रमाकरिता 1,30,000 कोटी निधी प्रस्तावित

वार्षिक कार्यक्रम 2021-22 करिता 1,30,000 कोटी निधी प्रस्तावित करण्यात आला असून त्यापैकी जिल्हा योजनांचा हिस्सा 15,622 कोटी आहे. 2021-22 ते 2025-26 या कालावधीत 3,37,252 कोटी रक्कमेची वित्तीय संसाधने राज्यास हस्तांतरित होणे अपेक्षित असून राज्याला केंद्र शासनाकडून सन 2021-22 ते 2025-26 या कालावधीत राज्य आपत्ती जोखिम व्यवस्थापन निधीअंतर्गत 17,803 कोटी अनुदान प्राप्त होणे अपेक्षित आहे.

राज्यात 1.88 लाख कोटींची गुंतवणूक

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत जून, 2020 ते डिसेंबर, 2021 मध्ये राज्यात 1.88 लाख कोटी गुंतवणूक व  3.34 लाख अपेक्षित रोजगार असलेले प्रस्ताव प्राप्त झाले. महाराष्ट्र इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण, 2018 अंतर्गत पाच इलेक्ट्रीक वाहन उत्पादन घटक आणि एका बॅटरी उत्पादन घटकाकडून 8,420 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यामध्ये 9,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे ऑक्टोबर, 2021 अखेर राज्यात 10,785 स्टार्ट-अप होते, असे पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

देशाच्या 28 टक्के गुंतवणूक राज्यात

ऑगस्ट, 1991 मध्ये उदारीकरणाचे धोरण अंगिकारल्यापासून नोव्हेंबर, 2021 पर्यंत राज्यात 15,09,811 कोटी गुंतवणुकीसह 21,216 औद्योगिक प्रकल्प मंजूर करण्यात आले. 2021 मध्ये नोव्हेंबर पर्यंत 74,368 कोटी प्रस्तावित गुंतवणुकीच्या 258 प्रकल्पांची नोंदणी झाली. एप्रिल, 2000 ते सप्टेंबर, 2021 पर्यंत राज्यातील थेट परदेशी गुंतवणूक 9,59,746 कोटी असून ती अखिल भारताच्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीच्या 28.2 टक्के होती. नोव्हेंबर, 2021 पर्यंत, 61.85 लाख रोजगारासह राज्यात एकूण 10.31 लाख (9.86 लाख सूक्ष्म, 0.39 लाख लघु व 0.06 लाख मध्यम) उपक्रम उद्यम नोंदणी अंतर्गत नोंदणीकृत होते.

वॉक टू वर्क संकल्पनेवर औद्योगिक विकास

दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेचा एक भाग म्हणून वॉक-टू-वर्क या संकल्पनेवर आधारीत सुनियोजित आणि हरित स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून राज्यातील 4,039 हेक्टर क्षेत्रात वसलेल्या औरंगाबाद औद्योगिक शहराचा (ऑरिक) विकास केला जात आहे. माहे नोव्हेंबर, 2021 पर्यंत, ऑरिकमध्ये सुमारे 337 एकर क्षेत्रावरील 126 भूखंडांचे गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आले आहे. ऑरिकमध्ये 5,500 कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक  झाली असून सुमारे 5,909 रोजगार निर्मिती झाली आहे

पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी धोरण

पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मार्च, 2021 मध्ये कॅराव्हॅन धोरण आणि ऑगस्ट, 2021 मध्ये साहसी पर्यटन उपक्रम धोरण राज्याने जाहीर केले. श्री एकवीरा देवी, कार्ला येथे फ्युनिक्युलर रेल्वे/ रोपवे आणि पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ला येथे रोपवे उभारण्याकरिता सामंजस्य करार करण्यात आला. नोव्हेंबर, 2021 मध्ये राज्याने वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनाला चालना देण्यासाठी बांगलादेश आणि ओमान या देशांसोबत सामंजस्य करार केले, असे अहवालात नमूद आहे.

पाहणीतील ठळक मुद्दे :

  • ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत 2021 मध्ये 14,245 शिधापत्रिकाधारकांनी इतर राज्यांतून आणि इतर राज्यांतील 49,996 शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातून अन्नधान्याची उचल केली.
  • जानेवारी, 2022 पर्यंत 8.24 कोटी शिवभोजन थाळींचे वितरण.
  • महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ति 2019 योजनेतून 22 डिसेंबर, 2021 पर्यंत 31.71 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 20,243 कोटी रकमेचा लाभ.
  • दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेचा एक भाग म्हणून वॉक-टू-वर्क या संकल्पनेवर आधारीत सुनियोजित आणि हरित स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून राज्यातील 4,039 हेक्टर
  • 2020-21 मध्ये 0.68 लाख हेक्टर क्षेत्र नव्याने सूक्ष्म सिंचनाखाली आले
  • 84,726 पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 158.23 कोटी अनुदान जमा करण्यात आले.
  • सप्टेंबरअखेर वित्तीय संस्थांद्वारे 33,066 कोटी पीक कर्ज तर 24,963 कोटी कृषि मुदत कर्ज, डिसेंबरपर्यंत प्राथमिक कृषि सहकारी पतपुरवठा संस्थांनी शेतकऱ्यांना एकूण 14,536 कोटी कर्ज वितरित केले.
  • दि.30 सप्टेंबर, 2020 रोजी एकूण 1,06,338 प्राथमिक (इयत्ता 1 ली ते 8 वी) शाळा होत्या व त्यातील पटसंख्या 153.9 लाख होती तर 28,505 माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता 9 वी ते 12 वी) शाळा होत्या व त्यातील पटसंख्या 65.2 लाख होती.
  • अखिल भारतीय उच्च शिक्षण पाहणी 2019-20 अहवालानुसार राज्यात 65 विद्यापीठे, 4,494 महाविद्यालये आणि 2,393 स्वायत्त संस्था होत्या व त्यातील पटसंख्या 52.31 लाख होती.

सावित्रीमाईंना कॉंग्रेसचे अभिवादन

0

   पुणे- महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना सावित्रीबाईंनी अनेक संघर्षांचा सामना करत स्त्री शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली. समाजसेवेचे व्रत अंगीकारून स्त्री सक्षमीकरण व अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. समाजोद्धारासाठी झटणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष रमेश बागवे, महिला काँग्रेस अध्यक्षा पुजा आनंद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

     यावेळी माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी महापौर रजनी त्रिभुवन, इंदिरा अहिरे, वाल्मिक जगताप, सुनिल शिंदे, एस.के. पळसे, मुन्नाभाई शेख, राजेंद्र पेशने, विठ्ठल गायकवाड, अनिस खान, सुविधा त्रिभुवन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार कि.मी. च्या रस्त्यांची कामे होणार – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

0

मुंबई, दि. 10 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये राज्यात पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या 30 हजार कि.मी. च्या रस्त्यांची कामे सुरु असून दुसऱ्या टप्प्यात 10 हजार कि.मी. रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांना येत्या दोन महिन्यात प्रत्येक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंजूरी देणार असून त्यानंतर दिवाळीपासून कामे सुरु करण्यात येतील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी  विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य चंद्रकांत नवघरे यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील रुखी (ता. वसमत) येथील नॅशनल रोड ते रुखी हा रस्ता वाहतुकीमुळे खराब झाला आहे, या रस्त्याची समितीने तपासणी केली असून 15 दिवसांच्या आत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंत्राटदाराने स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त न केल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. यापूर्वी जे अधिकारी या रस्त्याच्या तपासणीसाठी गेले होते त्यांना त्रुटी आढळल्या नाहीत मात्र समितीने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या रस्त्याच्या कामात त्रुटी आढळल्या आहेत, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार असून त्यांचे उत्तर समाधानकारक नसल्यास संबंधितांना निलंबित करण्यात येणार असल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यामधील रस्त्यांची कामे सुरु करण्यापूर्वी दर्जेदार कामांसाठी सदस्यांच्या सूचनांचा विचार करु असेही ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य सर्वश्री हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, किशोर पाटील, प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल, सागर मेघे, श्रीमती सरोज अहिरे, नारायण कुचे आदी सदस्यांनी भाग घेतला.