Home Blog Page 2053

महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा सकारात्मक अर्थसंकल्प – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

0

मुंबई, दि. ११ – महाविकास आघाडी राज्य सरकारचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प मांडल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देता श्री. चव्हाण म्हणाले की, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांसाठी १५ हजार ७७३ कोटी तर इमारतींसाठी १ हजार ८८ कोटी रूपयांचा नियतव्यय दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. आशियाई विकास बॅंकेच्या माध्यमातून लवकरच ५ हजार कोटी रुपयांच्या कामांची सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रध्वज निर्मिती करणाऱ्या नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची नवी सुसज्ज वास्तू उभारण्यासाठी २५ कोटी रूपये, जालना-नांदेड समृद्धी जोडमहामार्गाच्या भूसंपादनासाठी निधी, मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरावा आदी या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा असल्याचे मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

विधानपरिषदेत राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सादर केला अर्थसंकल्प

0

मुंबई, दि. 11 : विधानपरिषदेत राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी राज्याचा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. भारतीय तत्वज्ञानात असलेले पंचतत्वांचे महत्त्व आपण जाणतोच. त्याप्रमाणेच विकासात अंतर्भूत असलेली पंचसूत्रे आपण अंगिकारली पाहिजेत. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पाच सूत्रांनी झालेली प्रगती म्हणजेच विकास असतो, असे नमूद करुन ही पंचसूत्रीच आपल्या या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा प्राण आहे, असे राज्यमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला अधिक गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विधानपरिषद सभागृहात सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.

विकासाची पंचसूत्री राबविताना या पाच क्षेत्रांसाठी १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. येत्या तीन वर्षात ४ लाख कोटी रुपयांचा नियतव्यय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांचे अनुदान, सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजना, शेततळ्यांसाठी अनुदान रकमेत वाढ, सिंचन प्रकल्पांसाठी भरीव अनुदान, आरोग्यासाठी विविध योजना, विविध ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी, मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा, विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० खाटांची स्त्री रुग्णालये, अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण, पुण्याजवळ अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसीटी, युवकांसाठी इनोव्हेशन हब, बालसंगोपन आणि कुपोषणमुक्तीसाठी विविध योजना, नागरी बालविकास केंद्रांची निर्मिती, रस्ते-रेल्वे-मेट्रो आणि जलवाहतूक विकासासाठी विविध योजना, उद्योगांना प्रोत्साहन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून ३० हजारहून अधिक स्वयंरोजगार प्रकल्प अशा विविध योजनांची राज्यमंत्री श्री. देसाई यांनी घोषणा केली. याबरोबरच राज्याचा पर्यटन विकास, पर्यावरण विकास, घरकुल योजना, झोपडपट्टी सुधार, बार्टी-सारथी-महाज्योती या संस्थांच्या योजनांसाठी भरीव आर्थिक अनुदान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोग, अल्पसंख्याक-आदिवासी समाजासाठी भरीव आर्थिक तरतूद, महिला आणि युवकासाठी विविध योजना अशा विविध योजनांची घोषणा राज्यमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केली.

विविध कवितांच्या काही ओळींचे वाचन करुन राज्यमंत्री श्री. देसाई यांनी अर्थसंकल्प वाचनाचे समापन केले. हा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाची गती आणखीन वाढवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जीएसटी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड ; एका व्यावसायिकाला अटक

0

मुंबई- 11 मार्च, 2022

केंद्रीय वस्तू आणि सेवाकर, मुंबई पश्चिम आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 16.32 कोटी रुपये मूल्याच्या वस्तू आणि सेवाकर इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकीस आणले  आहे. मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवाकर मुंबई विभागाच्या केंद्रीय गुप्तवार्ता  युनिटकडून मिळालेल्या माहितीवरून, अधिकाऱ्यांनी मेसर्स हृतिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक असलेल्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे. आझाद नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे स्थित लि. ही फर्म हायड्रोकार्बन्स आणि ऑरगॅनिक केमिकल्स इत्यादींच्या व्यापारासाठी जीएसटीअंतर्गत  नोंदणीकृत आहे आणि सीजीएसटी कायदा 2017 तरतुदींचे घोर उल्लंघन करत , वस्तू किंवा सेवा न मिळवता 16.32 कोटी रुपये मूल्याचे  इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवून ते वापरले होते.

केंद्रीय वस्तू आणि सेवाकर कायदा 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अन्वये या  संचालकाला अटक करण्यात आली आणि त्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लेनेड, मुंबई यांच्यासमोर त्याला  हजर केले. न्यायालयाने त्याला 23 मार्च 2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .

ही कारवाई केंद्रीय वस्तू आणि सेवाकर, मुंबई पश्चिम आयुक्तालयाच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्क्सचा पर्दाफ़ाश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून गेल्या सहा महिन्यांत मुंबई पश्चिमने 396.84 कोटी रुपयांच्या  जीएसटी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट  घोटाळा उघड करत  28.65 कोटी रुपये वसूल केले. येत्या काही दिवसांत हा  विभाग फसवणूक करणार्‍या आणि कर चुकवेगिरी करणार्‍यांच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

कृषी वीजबिल थकबाकीच्या ५० टक्के सवलतीसाठी राहिले फक्त १९ दिवस

0

मुंबई, दि. ११ मार्च २०२२ : राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार कृषिपंपाच्या वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ १९ दिवस राहिले आहे. कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येत आहे.

महावितरणच्या एकूण थकबाकीपैकी सप्टेंबर २०२० अखेर कृषी ग्राहकांकडे रु. ४५,८०२ कोटी थकबाकी झालेली आहे. त्यामुळे कृषी ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व समावेश “कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२०” जाहीर केले होते. या धोरणा अंतर्गत निर्लेखनाद्वारे रु. १०,४२० कोटी सूट, व्याज व विलंब आकारामध्ये रु. ४,६७६ कोटी सूट दिल्यानंतर सुधारीत थकबाकी रु. ३०,७०६ कोटी निर्धारित करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त रु.२,३७८ कोटी रक्कमेचा भरणा कृषी ग्राहकांद्वारे करण्यात आलेला आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकीचा दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल १५ हजार ३५२ कोटी ५० लाख रूपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे व या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात येत असून या शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मिटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे.  कृषी ग्राहकांच्या वीज देयक दुरुस्ती व मंजूरीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करुन देयक दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येत आहे. या शिबिरांचा कृषी ग्राहकांनी जास्तीजास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषी वीजबिलांच्या चालू व थकीत बिलांच्या भरण्यामधील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हास्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत २८४१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यामध्ये प्रत्येकी ९३७ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी हा ग्रामपंचायत व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे.

सुधारित थकबाकीमध्ये ५० टक्के माफी मिळविण्याची संधी येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व थकबाकीमुक्त योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मुले रमली गोष्टी अन् कवितांच्या सप्तरंगी कल्पना विश्वात

0

पुणेः- कोरोनामुळे बराच काळ घरात अडकलेली लहान मुले आता हळुहळू वेगवेगळ्या निमित्तांनी बाहर पडू लागली आहेत. आज तर पुण्यातील पेशवे उद्यानात मुलांना खेळण्या बागडण्याबरोबर कवितेसह गोष्टीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली आणि त्या सप्तरंगी कल्पना विश्वास मुले भान हरपून रमून गेली.

निमित्त होते पुणे महानगरपालिका उद्यान विभाग आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पेशवे पार्क येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत अक्षर मित्र वाचनालयाच्या उद्घटनाचे. पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन झाले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अ.भा.बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डाॅ.संगीता बर्वे यांनी भूषविले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेविका रेणूताई गावस्कर, बाल साहित्यक राजीव तांबे, नगरसेवक धीरज घाटे, पुणे मनपा उद्यान विभागाचे अधिक्षक अशोक घोरपडे,
संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, नाट्य संस्कारचे प्रमुख प्रकाश पारखी, पुस्तकमित्र प्रसाद भडसावळे, दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे, ग.म.भ.न. प्रकाशनाचे प्रमुख ल.म. कडू आणि जयदीप कडू, उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे, 60 वर्षांपूर्वी पेशवे उद्यानात सुरू झालेल्या फुलराणीला हिरवा झेंडा दाखवीणारे सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर, केतकीबोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. संगीता बर्वे यांनी ‘पुस्तकं नसतात केवळ कपाटात ठेवण्यासाठी’ ही कविता साभिनय सादर केली. राजीव तांबे यांनी ‘प्रेमळ भूत’ ही गोष्ट सांगितली.

यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, हा उपक्रम केवळ पेशवे पार्क उद्यानापुरता मर्यादित न राहता पुण्यातील सर्व उद्यानांमध्ये हा उपक्रम सुरू केला पाहिजे. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन चळवळ वृद्धींगत होण्यास मोठा हातभार लागणार आहे. कारण लहान वयात वाचनाचे संस्कार झाले, तर भविष्यात त्याचे निश्चितच सवयीत रूपांतर होते. वाचनाच्या सवयीमुळे व्यक्तीमत्वाला चांगली धार आणि आयाम प्राप्ता होतात.

यावेळी बोलताना रेणू गावस्कर म्हणाल्या की, लहान वयात मुले निर्भय आणि निष्पाप असतात. आपल्या मोठ्यांना देखील निर्भय बनविण्याची त्यांच्यात ताकद असते. मुले आपल्याला धीट करतात. कधी कधी आपणच या मुलांची मुले होऊन जातो, याचा मी अनुभव घेतला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील महाजन यांनी केले, निकीता मोघे यांनी आभार मानले.

कोरोना महामारीच्या धक्क्यातून सावरताना मांडलेला एक समतोल अर्थसंकल्प – पृथ्वीराज चव्हाण

0

पुणे : आज  विधीमंडळात मांडलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा एक समतोल अर्थसंकल्प आहे. मागील दोन वर्षे कोरोना महामारी आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद होऊन आर्थिक नुकसान झाले. अशा परिस्थितीतदेखील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने १७.९% (चालू किंमत) विकासदर नोंदवला. गुजरात, कर्नाटक यांसारख्या मोठ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्राचा विकासदर अधिक आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोविडच्या अरीष्टातून बाहेर पडून पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे हे याचे द्योतक आहे.

अर्थमंत्र्यांनी या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी विकासाची पंचसूत्री प्रस्तावित केली आहे. कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांकडे विशेष भर देऊन भांडवली खर्चात मोठी वाढ केली आहे. तीन वर्षात भांडवली खर्च दुप्पट झाला असून त्याचा वापर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे ही आश्वासक बाब आहे. कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि निर्यात धोरण तयार केल्याने कृषी क्षेत्राच्या वाढीस चालना मिळेल. तसेच आरोग्य क्षेत्रात नवीन रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वाढीव खाटांची तरतूद केल्याने बळकटी प्राप्त होईल. मनुष्यबळ विकासासाठी अगदी अंगणवाडी स्तरावर पोषण आहारात थेट हस्तक्षेप अतिशय गरजेचा होता कारण २०१५-२० या कालावधीत राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील कुपोषित तसेच अतितीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती.
पायाभूत सुविधा क्षेत्रात सीएनजी वरील कर कमी करणे तसेच मेट्रो, रेल्वे आणि महामार्ग तसेच रस्ते आणि पूलबांधणी वरील भरीव तरतुदींमुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. उद्योग क्षेत्रात विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे कोरोना काळात सर्वाधिक नुकसान झाले, अनेक उद्योग बंद पडले. राज्य शासनाने अशा बंद पडलेल्या उद्योगांचे सर्वेक्षण करून त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहनपर निधीची तरतूद केली पाहिजे.

याचप्रमाणे अर्थमंत्र्यांनी नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात नावीन्यपूर्ण उद्योग उदा: कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवा, फिनटेक सेवा, इंडस्ट्री ४.० येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या भावात वाढ करणार आणि परिणामी महागाई वाढणार. यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबद्दल अर्थमंत्र्यांनी सुतोवाच करणे गरजेचे होते.

जे. जे. रुग्णालयातील अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्याबाबत मार्ग काढणार,विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना वैदयकीय शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

0

मुंबई, दि. ११ मार्च: राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे जे. जे. रुग्णालयात साखळी उपोषण गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. कोविड काळात सेवा देऊनही संपाला बसलेल्या या सहायक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने लवकरात लवकर दखल घ्यावी व यातून मार्ग काढावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली. सेवा नियमित करण्याबाबत लवकरच बैठक आयोजित करून अस्थायी वैद्यकीय प्राध्यापकांच्या सेवा नियमिततेबाबतचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषेद यांनी दिले.

प्रश्नोत्तराच्या तासात यांसदर्भात प्रश्न उपस्थित करताना दरेकर यांनी सांगितले की, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी सेवा नियमित करण्यासोबतच विविध मागण्यांसाठी १७ जानेवारीपासून आंदोलन पुकारले आहे. या संदर्भात स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची भेट घेतली होती. दरम्यान वैद्यकीय शिक्षण विभागाने सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, या आंदोलनाकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री, सचिव, आयुक्त, तसेच संचालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे कोविड काळात सेवा दिली असताना गेल्या दीड महिन्यांपासून उपोषण करण्याची वेळ प्राध्यापकांवर आली आहे. आंदोलनाला दीड महिने झाले तरीही सरकार दरबारी त्याबाबत कोणतीही दखल घेत नसल्याने हे सरकारचे दुर्दैव असल्याची टीका दरेकर यांनी केली.

अस्थायी प्राध्यापकांच्या ८० टक्के मागण्या राज्य सरकार आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्य केल्या आहेत. उर्वरित मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने शिफारशीसह सामान्य प्रशासन विभाग आणि अर्थ व नियोजन विभागाला पत्रव्यवहार केला आहे. तिथून सहायक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असल्याचे समजते. त्यामुळे या प्रक्रियेत अडचणी आहेत. तरी, यासंदर्भात विधिमंडळाच्या काळात शक्य असल्यास बैठक बोलूवून जे. जे. रुग्णालयातील अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

आदिवासींच्या जमिनींच्या प्रश्नावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचा विधानसभेत आक्रमक

0

मुंबई – राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबतचे सरकारने माहिती देण्याची मागणी केली. या लक्षवेधीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बगल दिल्यामुळे आ. चंद्रकांत पाटील यांचा आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच, महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना देता येत नाही, यासंदर्भात राज्य सरकारचा कायदा असून, जेव्हा आदिवासींच्या जमिनी देण्याची गरज असेल, तेव्हा त्यासंदर्भात ग्रामसभेत ठराव मंजूर करुन, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला जातो. त्यानंतर सदर जमिनींचा लिलाव केला होऊन जागेचे योग्य मूल्य आदिवासी बांधवांना मिळते.

त्यामुळे राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्याची किती प्रकरणे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून मान्य करण्यात आली, यासंदर्भातील लक्षवेधी पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. तसेच, यासंदर्भातील तपशील सादर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बगल देत, उत्तर देण्यास टाळाटाळ केली, त्यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नवर आक्रमक होत सरकारला धारेवर धरले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक ठिकाणी आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना दिल्या जात आहेत. त्यातून आदिवासींना बेघर केले जात आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाशिवाय आणि ग्रामसभेतील ठराव आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेल्या लिलावा व्यतिरिक्त किती जमिनी बिगर आदिवासींना देण्यात आली, याचा तपशील देण्याची मागणी आ. पाटील यांनी यावेळी केली.

सर्वसामान्यांचा भ्रमनिरास करणारा बिन आकड्यांचा अर्थसंकल्प – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

मुंबई दि, ११ :- राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणारी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपा सरकारच्या कार्यकाळातील योजनांचा विस्तार करून केवळ श्रेय लाटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. हा अर्थसंकल्प केवळ धनदांडगे, बिल्डर यांच्यासाठी आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांचा विचार नाही, महिला, आदिवासी, धनगर, ओबीसी, मराठा आरक्षणाच्या संदर्भातील यंत्रणांना निधी पुरविण्याच्या तरतुदीबाबत विचार नाही. बेरोजगार व कष्टकरी जनतेला दिलासा मिळेल, अशी कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. फक्त आभासी विकास दाखविणा-या राज्य सरकारप्रमाणेच यंदाचा अर्थसंकल्प हा निव्वळ आभासी असून सर्वसामान्यांचा भ्रमनिरास करणारा बिन आकड्यांचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प असून यावर दरेकर यांनी वास्तवाचे भान नसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका केली आहे. सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्याही भरीव योजना, कर्ज इतर गोष्टींसाठी कुठलीही तरतूद नाही. महिलांच्या उत्कर्षासाठी कुठल्याही प्रकारचे पॅकेज अथवा तरतुदी नाही. केवळ उद्योगांसाठी योजना केल्या आहेत. अर्थ मंत्री यांनी सभागृहात आकड्यांचा खेळ करणार नाही असे सांगितले. परंतु, अर्थसंकल्प हा आकड्यांचाच खेळ असतो. भावनिक अर्थसंकल्प नसतो. म्हणून, भावनिक वातावरण करून महाराष्ट्राच्या जनतेला फसवता येणार नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला.

अर्थसंकल्पात बेरोजगारांच्या रोजगारासाठी कुठेही सोय नाही. अल्पसंख्यांक विभाग, कौशल्य विकास विभाग, मौलाना आजाद योजनांसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्रीभूत करून निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, धनगर ओबीसी समाजासाठी कुठलीही तरतूद नाही. आदिवासी समाजासाठी कोणत्याही योजना नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य घटकांना उपेक्षित ठेवण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाले आहे. सर्वसामान्यांचा विचार केला गेला नसल्याची टीका दरेकर यांनी केली. एसटी कर्मचारी आत्महत्या करताहेत. यांचा विचार या सरकारने केला नाही. एसटी कर्मचा-यांच्या बाबतीत कोर्टामध्ये बजेटमध्ये तरतूद करून त्यांच्या पगाराची हमी घेऊ असे सांगण्यात आले. परंतु, या अर्थसंकल्पात कवडीचीही तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणून विधिमंडळात या अर्थसंकल्पाची चिरफाड करणार आहे. या अर्थसंकल्पाद्वारे कशी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसले आहे ते आकडेवारीसहित स्पष्ट करणार. यांचा पंच सूत्र आहे की कळ सूत्र आहे विधिमंडळात मांडणार असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
  • नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान.
  • कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळणाला चालना.
  • सामाजिक उत्तरदायित्व, पर्यटन विकासाच्या नव्या क्षेत्रांना बळ.
  • संस्कृती जतन आणि वारसा स्थळांचा विकास करण्याचा संकल्प.

मुंबई, दि. 11 :- कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. विकासाची पंचसूत्री, सामाजिक उत्तरदायित्व, पर्यटन विकासाच्या नव्या क्षेत्रांना बळ, संस्कृती जतन आणि वारसा स्थळांचा विकास करण्यासाठी योजना ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणारा सर्व समावेशक अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सादर केला.

सन 2022-23 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 13,340 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. वार्षिक योजनेसाठी 1,50,000 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 12,230 कोटी, अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी 11,199 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. महसूली जमा 4,03,427 कोटी प्रस्तावित असून महसुली खर्च 4,27,780 कोटी रूपये आहे. महसुली तूट 24,353 कोटी रूपये अपेक्षित आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 23,888 कोटी रूपयांची तरतूद

कोवीड-19 च्या कालावधीत कृषी क्षेत्राने

अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. या क्षेत्राला आणखी बळकट करण्यासाठी 23 हजार 888 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत, भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी, आधारभूत किंमतीनुसार शेतमाल खरेदीकरीता 6,952 कोटी रूपयांची तरतूद आणि येत्या दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यांचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करून ती 75 हजार करण्यात आली आहे.

वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देणार

कृषी संलग्न क्षेत्राला बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणासाठी 950 कोटी, मृद आणि जलसंधारणासाठी 4,774 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे. रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेत केळी, ड्रॅगन फ्रुट, अॅव्हॅकॅडो, द्राक्षे फळांचा तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा समावेश करून फळशेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. पशुधन विकासासाठी देशी गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी राज्यात तीन मोबाईल प्रयोगशाळा विकसित केल्या जाणार आहेत, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी 5,244 कोटींची तरतूद

महाराष्ट्राने कोवीड-19 महामारीचा खंबीरपणे सामना केला. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशिल आहे. यासाठी 5,244 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण आणि बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रथम दर्जाचे ट्रॉमा केअर युनिट उभारले जाणार आहेत. 200 खाटांच्या सर्व रूग्णालयात येत्या तीन वर्षात लिथोट्रिप्सी उपचारपद्धती सुरू केली जाणार आहे. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत 16 जिल्ह्यात 100 खाटांची खास महिलांसाठी रूग्णालये उभारली जाणार आहेत. जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारण्यासाठी 60 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले आहे.

मनुष्यबळ विकासासाठी 46,667 कोटींची तरतूद
विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीरित्या होण्यासाठी मनुष्यबळ विकासावर भर देण्यात आला आहे. रोजगारक्षम मनुष्यबळ विकासासाठी इनोव्हेशन हब उभारण्यात येणार असून त्यासाठी 500 कोटी रूपये तर स्टार्टअप फंडासाठी 100 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना ई-शक्ती योजनेतून मोबाईल सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अमृत महोत्सवी महिला व बाल भवन आणि नागरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. शासकीय वसतीगृहातील मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिसपेन्सींग मशिन दिले जाणार आहे.

दळणवळण सेवेचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण
राज्यातील दळणवळण सेवांचा विकास, बळकटीकरण आणि विस्तार करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. यासाठी 28,605 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून 10,000 कि.मी. च्या रस्त्यांसाठी साडेसात हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ केला जाणार असून यातून 6,550 कि.मी.चे रस्ते विकास करण्याचे नियोजन आहे. राज्य परिवहन महामंडळासाठी 3,000 नवीन बसगाड्या घेण्यासाठी तसेच राज्यातील 103 बस स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भांडवली अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर ते भंडारा-गोंदिया, नागपूर ते गडचिरोलीपर्यंत केला जाणार आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. मुंबईतील मेट्रो मार्ग क्रमांक 3- कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गिकेचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगर पर्यंत केला जाणार आहे. पुण्यातील मेट्रो सेवा अधिक व्यापक करण्यावर भर आहे. त्यासाठी स्वारगेट ते कात्रज, पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खडकवासला ते स्वारगेट या मार्गावरील प्रकल्प अहवालाचे काम सुरू करण्यात आले आहे. शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर येथील विमानतळांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी भरीव निधीची तरतूद तर गडचिरोलीसाठी नवीन विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

उद्योग विकासासाठी 10,111 कोटी रूपयांची तरतूद
राज्याला अधिकाधिक उद्योगस्नेही करण्यासाठी 10,111 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0, ई-वाहन धोरण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील कौडगाव, शिंदाळा, धुळे जिल्ह्यातील साक्री, चंद्रपूर जिल्ह्यातील वाशिम आणि यवतमाळ येथील सौर उर्जा प्रकल्पा उभारण्यात येणार आहेत. मुंबईतील पारेषण प्रणालीच्या क्षमेत वाढ करण्यासाठी पाच प्रकल्प उभारले जाणार आहेत, असे उपमुख्यंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. कोयना, जायकवाडी, गोसीखुर्द धरणांच्या जलाशयात जलपर्यटन प्रस्तावित आहे. पुरातत्व स्मारकाच्या जतन, संवर्धन, दुरूस्तीसाठी जिल्हानिहाय महावारसा सोसायटीची स्थापना करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन सफारी तर पुणे वन विभागात बिबट्या सफारी प्रस्तावित करण्यात आली आहे.

नवीन उपक्रमांची घोषणा
स्थानिक संस्थांतील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांना प्रत्येकी 250 कोटी रूपये तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी 250 कोटींची तरतूद वाढविण्यात आली आहे. भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगित महाविद्यालय व संग्राहालय स्थापन करण्यासाठी 100 कोटी रूपये निधी राखीव ठेवला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी उपलब्ध करणार असून छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करणार आहे. महापुरूषांशी संबंधित 10 शाळांकरीता 10 कोटींचा निधी राखीव ठेवणार असून स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत मुंबई, पुणे व नागपूर येथील स्थळांचा हेरिटेज वॉक विकसित केला जाणार आहे.

नैसर्गिक वायूवरील कर, मुद्रांक शुल्कात सवलती प्रस्तावित
महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क थकबाकी तडजोड 2022 अभय योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेमुळे वस्तू आणि सेवा कर लागू होण्यापूर्वी विक्रीकर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध करांवरील सवलती संदर्भात विचार केला जाईल. ही योजना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी असेल. पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक वायुवरील मूल्यवर्धीत कर 13.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आणला जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलती प्रस्तावित करण्यात आल्या असून जल वाहतुकीवरील करात पुढील तीन वर्ष सवलत देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

रास्त भाव दुकानातील धान्याचा इष्टांक वाढवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

0

मुंबई, दि. 11 : राज्यातील रास्त भाव दुकानातून पुरविण्यात येणारा धान्याचा इष्टांक हा २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे केंद्राने ठरवून दिला असून धान्याचा हा इष्टांक वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे, असे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील रेशन प्रणालीतील दोष दूर करुन पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्याची मागणी सदस्य मोहन मते यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभेत केली, त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, सर्व लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमधून धान्य उपलब्ध करुन दिले जात असून नागपूर शहर आणि ग्रामीण भागात ७ लाख ८१ हजार ७६० शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातील धान्याचा लाभ मिळतो. त्यातील ३ लाख ८० हजार ३४७ शिधापत्रिकाधारक हे अप्राधान्य गटातील असल्याने त्यांना कोविड काळात ४ महिने धान्य देण्यात आले, नंतर त्याचे वाटप बंद करण्यात आले. प्राधान्यक्रमाच्या गटातील सर्वांना धान्य देण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. जिल्हा स्तरावर दक्षता समित्या स्थापन करण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना सूचित करण्यात येईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

पंचसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई दि. ११:  कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या  विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्राच्या विकासाला बूस्टर डोस मिळाल्याचे सांगताना हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या, समाजातील दुर्बल घटकांच्या हिताची जोपासना करत असल्याचेही  म्हटले आहे.

विकासाची पंचसूत्री

कोरोनाचे संकट, निसर्गाचा लहरीपणा यामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झालेली असतांनाही राज्य विकासाची घोडदौड कायम असल्याचे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की,विकासाच्या पंचसूत्रीसाठी तीन वर्षात ४ लाख कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राला या अर्थसंकल्पाने मोठा दिलासा दिला आहे.  राज्यातील सिंचन क्षमता वाढवणे, ६० हजार कृषी पंपाना वीज जोडणे देणे, राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे, यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. निर्यातक्षम २१ शेतमालाचे क्लस्टर तयार केल्याने शेतमालाला चांगला भाव मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण

कोरोनाने जेव्हा आपल्या आरोग्यासमोर मोठे संकट निर्माण केले तेंव्हा राज्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी शासनाने मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधांचे निर्माण केले. हीच व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे, आरोग्य सेवांचा दर्जात्मक विस्तार करण्याचे नियोजनही अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. १६ जिल्ह्यात १०० खाटांची स्त्री रुग्णालये उभी करण्यात येणार आहेत.  वैद्यकीय शिक्षणाचाही गुणात्मक आणि दर्जात्मक विकास करण्यावर यात भर आहे. पुणे शहराजवळ देशातील पहिली वैद्यकीय वसाहत आपण निर्माण करत आहोत.

रोजगारसंधीचा विकास

रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी इनोव्हेशन हब स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. नवीन स्टार्टअप्सची राज्यात निर्मिती होऊन त्या माध्यमातून रोजगार संधीत वाढ करण्यासाठी स्टार्टअप फंडासाठी १०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात देण्यात आला आहे.

सामाजिक क्षेत्रासाठी भरीव तरतूद

हा अर्थसंकल्प महिला व बालकांच्या व दुर्बल घटकांच्या हिताच्या रक्षणासाठी, त्यांच्या विकासासाठी आपली कटिबद्धता दाखवतो.  अंगणवाडी मदतनिसांना मोबाईल सेवा देणारी ई शक्ती आपण प्रदान करत आहोत. बालसंगोपन अनुदानात भरीव वाढ करण्यात आली आहे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात अमृतमहोत्सवी महिला व बाल भवनाची उभारणी करण्याचे अर्थसंकल्पात निश्चित करण्यात आले आहे.  नागरी भागातील कुपोषण दूर करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. अल्पसंख्याक, सामाजिक न्याय, इमाव व आदिवासी विभागाच्या योजनांना अर्थसंकल्पात खूप मोठी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे वर्ष  महिला  शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरे होणारे असून महिला शेतकऱ्यांची कृषी योजनेतील ३० टक्क्यांची तरतूद वाढवून ५० टक्के केल्याने महिला शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटी रुपयांचा निधी, थोर समाज सुधारक व महनीय व्यक्तींच्या नावे अध्यासन केंद्रे सुरु करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी, ऐतिहासिक व महत्वाच्या शाळांचा विकास, मराठी भाषा भवनासाठी  निधी देतांना तंत्रचलित नाला सफाईची निश्चिती या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

ई वाहन धोरणाच्या अंमलबजावणीस प्रोत्साहन

इलेक्ट्रिक वाहन धोरणास प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग सुविधा वाढविणे, मोठ्या शहरांत सार्वजनिक वाहतुकीचा 25 टक्के हिस्सा इलेक्ट्रिक वाहनांचा असण्यासाठी टाकलेली पाऊले महत्त्वाची आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात.

पर्यावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिक्षित करणे, माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना सहभागी करणे, नद्यांचे संवर्धन यामुळे पर्यावरण सजगता  निर्माण होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले

पायाभूत सुविधांचा विकास

रस्ते, मेट्रो, बंदरविकास, विमानतळ विकास अशा विविध दळणवळणाच्या साधनांचा दर्जात्मक विकास, गृहनिर्माण क्षेत्रातील उदि्दष्टपूर्ती  करण्याला या अर्थसंकल्पाने प्राधान्य दिले आहे.

एसटी महामंडळाला ३ हजार नवीन बसगाड्या खरेदी करण्यासाठी तसेच १०३ बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी भांडवली अर्थसहाय्य करण्याचा निर्णय देखील या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. मुंबई महानगरप्रदेशातील वाहतूक ताण कमी करण्यासाठी नवीन जलमार्गांची निश्चिती करण्यात आली आहे

नव्या योजना

पिक विमा योजनेत केंद्र सरकारने सुधारणा केली नाही तर शेतकऱ्यांच्या पिक  नुकसानीकरिता अन्य पर्यायांचा विचार करण्याचे सुतोवाच या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. वसमत येथे मा. बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार आहे.  सोयाबीन व कापूस पिकासाठी विशेष कृती कार्यक्रम आखल्याने विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे. मिशन महाग्रामच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा करण्यात आलेला प्रयत्न,  पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजनेची अंमलबजावणी, मुंबई-पुणे, नागपूर येथे स्वातंत्र्य लढ्याशी संबेधित स्थळांचा हेरिटेज वॉक, जिल्हानिहाय महावारसा सोसायट्याची स्थापना, विविध धार्मिक स्थळे आणि परिसर विकासासाठी निधी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती अशा काही नवीन योजना आणि उपक्रमांची आखणीही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

करमाफी

विविध करांवरील सवलतीसाठी अभय योजना, नैसर्गिक वायूवरील कर सवलत, मुद्रांक शुल्कात कर सवलत, जलवाहतूकीस चालना देण्यासाठी कर माफी अशा विविध महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्याने या क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

प्रसाद रेशमे महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदी रूजू

0

मुंबई, दि. ११ मार्च २०२२: महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी (दि. ११) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) म्हणून कार्यरत होते.

संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे हे मूळचे गोंदीया येथील रहिवासी आहे. तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात श्री. रेशमे कनिष्ठ अभियंता म्हणून १९९७ मध्ये रुजू झाले. त्यानंतर सरळसेवा भरतीद्वारे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, प्रादेशिक संचालक, कार्यकारी संचालक या वरिष्ठ पदांवर त्यांची थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. यामध्ये रेशमे यांनी मुख्य अभियंतापदी नागपूर व जळगाव परिमंडल, प्रादेशिक संचालक म्हणून नागपूर प्रादेशिक विभाग तसेच कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे.

महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) म्हणून प्रसाद रेशमे यांनी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना व सौर कृषिवाहिनी योजना, उच्चदाब वितरण प्रणाली, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, विद्युत वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्स पुरविण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून महावितरणची जबाबदारी आदींमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीमधील ग्राहकांना नवीन वीजजोडण्या उपलब्ध करून देण्यासह ग्रामीण व शहरी भागातील वीजयंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणामध्ये महावितरणने केलेल्या कामगिरीत रेशमे यांचे योगदान आहे.

विजेची वाढती मागणी तसेच वीजयंत्रणा सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी प्रस्तावित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील असे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी सांगितले.

पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग 2022 स्पर्धेत एक्स्कॅलिबर्स्, पंडित जावडेकर तलवार्स संघांचे विजय

0

पुणे, 11 मार्च 2022- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत एक्स्कॅलिबर्स्, पंडित जावडेकर तलवार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.  

पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत एक्स्कॅलिबर्स् संघाने किर्पान्स  संघाचा 592-545 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. टेनिस प्रकारात एक्स्कॅलिबर्स् संघाला किर्पान्स संघाने 152-168 असे पराभूत करून आघाडी घेतली. पण टेबल टेनिस प्रकारात मधुर इंगळहाळीकर, अजित बेळवलकर, अभिषेक ताम्हाणे, देवेंद्र चितळे, आनंद शहा, संग्राम पाटील,राधिका इंगळहाळीकर, विश्वेश कटक्कर, अनिरूध्द कोंकर, अमोल कान्हे, कर्णा मेहता, शान मदन, अभिजीत खानविलकर, जय गुजर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एक्स्कॅलिबर्स् संघाने किर्पान्स संघाचा 221-169 असा पराभव करून हि आघाडी कमी केली. त्यानंतर बॅडमिंटन प्रकारात एक्स्कॅलिबर्स्  संघाने किर्पान्स संघाचा 219-208 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. 

दुसऱ्या सामन्यात पंडित जावडेकर तलवार्स संघाने लान्सर्स संघाचा 587-556 असा संघर्षपूर्ण पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरीएक्स्कॅलिबर्स्  वि.वि किर्पान्स  – 592-545टेनिस- एक्स्कॅलिबर्स् पराभूत.वि किर्पान्स 152-168(मधुर इगळहाळीकर/ संग्राम पाटील पराभूत वि हिमांशू गोसावी/अजिंक्य मुथे 26-30, अभिषेक ताम्हाणे/अमोल कान्हे वि.वि तन्मय चोभे/अनिश पाठणकर 30-26, अभिजीत खानविलकर/ शान मदन पराभूत वि अंकूश मोघे/रिया वाशिमकर 18-30, देवेंद्र चितळे/नेहा ताम्हाणे वि.वि क्षितिज नाहर/भाग्यश्री देशपांडे 30-20, हर्षवर्धन आपटे/सचिन अभ्यंकर वि.वि अनूज मेहता/शिरीष साठे 30-22, विश्वेश कटक्कर/प्रिती मराठे पराभूत वि अश्विन हळदनकर/निनाद देशमुख 7-20, कर्णा मेहता/शर्वरी कटक्कर पराभूत वि चिन्मय चिरपुटकर/समिर जोशी 11-20)
टेबल टेनिस-एक्स्कॅलिबर्स्  वि.वि किर्पान्स 221-169 (मधुर इंगळहाळीकर/ अजित बेळवलकर वि.वि अनूज मेहता/ भाग्यश्री देशपांडे 30-18, अभिषेक ताम्हाणे/देवेंद्र चितळे वि.वि किरण गर्गे/तन्मय चोभे 30-27, आनंद शहा/संग्राम पाटील वि.वि अजिंक्य मुथे/अनिश पाटणकर 30-8, राधिका इंगळहाळीकर/ विश्वेश कटक्कर वि.वि चिन्मय चिरपुटकर/शिरीष साठे 30-11, अनिरूध्द कोंकर/अमोल कान्हे वि.वि क्षितिज नाहर/सुसर्शन बिहानी 30-15, कर्णा मेहता/शान मदन वि.वि ईशान लागू/समिर जोशी 30-24, सचिन अभ्यंकर/ विश्वेश कटक्कर पराभूत वि तेजस्विनी चावडा/निनाद देशमुख 11-30, अभिजीत खानविलकर /जय गुजर वि.वि अश्विन हळदनकर/अंकूश मोघे 30-26)
बॅडमिंटन- एक्स्कॅलिबर्स् वि.वि किर्पान्स 219-208 (देवेंद्र चितळे/हर्षवर्धन आपटे पराभूत वि अजिंक्य मुथे/क्षताशी किनीकर 21-30, संग्राम पाटील/राधिका इंगळहाळीकर वि.वि तन्मय चोभे/वृषी फुरला 30-27, मधुर इगळहाळीकर/आनंद शहा वि.वि अभिजीत राजवाडे/ऋषिकेश पेंडसे 30-21, अनिरूध्द कोंकर/हरीश गलानी वि.वि शिरिष साठे/ निनाद देशमुख 30-15, कर्णा मेहता/ देवेंद्र राठी पराभूत वि सुदर्शन बिहानी/अनूज मेहता 29-30, अभिषेक ताम्हाणे/ अमोल कान्हे पराभूत वि ईशान लागू/पार्थ केळकर 19-30, ईरा आपटे/विश्वेश कटक्कर वि.वि देबश्री दांडेकर/चिन्मय चिरपुटकर 30-29, अभिजीत खानविलकर/शान मदन वि.वि मिथाली कुलकर्णी/अनिश पाटणकर 30-26)

पंडित जावडेकर तलवार्स वि.वि  लान्सर्स – 587-556टेनिस- पंडित जावडेकर तलवार्स   पराभूत.वि  लान्सर्स 152-159(रोहन छाजेड/ रोहन जमेनिस वि.वि सन्मय तेलंग/अलोक तेलंग 30-18, तेजस किंजवडेकर/शिव जावडेकर पराभूत वि कल्पक पत्की/तुषार नगरकर 11-30, अवनी क्षिरसागर/ शरयू राव पराभूत वि नरेंद बापट/अरीन माळी 28-30, अंकित दामले/कुणाल भुरट पराभूत वि सिध्दर्थ निवसरकर/ पराग टेपण 19-30, राहूल पाठक/मकरंद चितळे वि.वि अमेय वाकणकर/दत्ता देशपांडे 30-15, आर्य देवधर/प्रशांत वैद्य पराभूत वि विक्रांत पाटील/ अनिश राणे 14-20, ईशान भाले/अक्षय ओक वि.वि जान्हवी कोरे/सत्यजीत लिमये 20-16)
टेबल टेनिस- पंडित जावडेकर तलवार्स   वि.वि  लान्सर्स 216-202(रोहन छाजेड/राहुल पाठक वि.वि मिहिर ठोंबरे/जयंत महाबोले 30-23, शिल्पा पांडे/कौस्तुभ देशपांडे वि.वि तुषार नगरकर/सिध्दार्थ निवसरकर 30-28, तेजस किंजवडेकर/रोहन जमिनीस पराभूत वि नकुल बेलवलकर/ विक्रांत पाटील 22-30, कुणाल भुरट/मनिश शहा वि.वि  आलोक तेलंग/सचिन काळे 30-13, अंकित दामले/आर्य देवधर पराभूत वि अनिश राणे/कल्पक पत्की 18-30, प्रशांत वैद्य /मकरंद चितळे वि.वि चैत्राली नवरे/आशिष देसाई 30-28, ईशान भाले/अविनाश दोशी वि.वि अनिल देडगे/अमोद प्रधान 30-20, गिरीष मुजूमदार/ अभय के पराभूत वि गोपी शेवाळे/ अरिन माळी 26-30)
बॅडमिंटन- पंडित जावडेकर तलवार्स   वि.वि  लान्सर्स 219-195(मकरंद चितळे/आर्य देवधर पराभूत वि तुषार नगरकर/अनिश राणे 26-30, अंकित दामले/तेजस किंजवडेकर वि.वि विक्रांत पाटील/सिद्धार्थ निवसरकर 30-21, मिहिर आपटे/अविनाश दोशी पराभूत वि चैत्राली नवरे/अनिल देडगे 29-30, गिरीष मुजूमदार/अक्षय ओक वि.वि आलोक तेलंग/सचिन काळे 30-16, ईशान भाले/प्रशांत वैद्य वि.वि अमोद प्रधान/ नकुल बेलवलकर 30-26, राहूल पाठक/वेदांत खटोड वि.वि विक्रम ओगळे/कल्पक पत्की 30-12, मनिष शहा/शरयू राव पराभूत वि रमनलाल जैन/दत्ता देशपांडे 29-30, वेदीका राठी/ रोहन जमिनिस पराभूत वि आनंदीता गोडबोले/अरिन माळी 15-30)

आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरण झाल्याच्या तक्रारी प्राप्त होताच तात्काळ कारवाई – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0

मुंबई, दि. 11 : आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तीस विनापरवानगी हस्तांतरण केल्यास  तक्रारी प्राप्त होताच त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.

आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तींना विनापरवानगी हस्तांतरण करण्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होतात असे प्रकार केले असतील त्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी  विधानसभा सदस्य डॉ.किरण लहामटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत विधानसभा सदस्य चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मंजुळा गावीत, यांनी भाग घेतला.

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतुदींशिवाय अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक संहिता १९८९ च्या कलम ३ मध्ये आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे किंवा बळजबरीने आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या किंवा आदिवासी व्यक्तींकडून बेकायदेशीरपणे ताबा काढून घेणाऱ्या किंवा तिचा उपभोग घेणाऱ्याविरूद्ध किमान ५ ते ६ वर्षापर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे, अशा प्रकारच्या तक्रारी असतील त्यांच्याविरूद्ध स्थानिक प्रशासन कठोर कारवाई करेल, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.