Home Blog Page 2007

शिरुरमध्ये जाऊन राऊत म्हणाले, पुढचे खासदार आढळरावच असणार, आता अमोल कोल्हेंना आव्हान ?

पुणे : सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असा एल्गार खासदार संजय राऊत यांनी शिरुरमध्ये जाऊन केला. आढळरावांचं शिवसेनेसाठीचं काम मोठं आहे. त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असंही राऊत म्हणाले. त्यामुळे सध्या शिरुर लोकसभेचे खासदार असलेले राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांना हे आव्हान मानायचं काय ? असा प्रश्न राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

खासदार संजय राऊत कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी आढळरावांचं होम ग्राऊंड असलेल्या शिरुर-आंबेगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आढळराव पाटील यांचं शिवसेनेसाठीचं योगदान अधोरेकित करताना एकप्रकारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना इशारा दिला. शिरुर लोकसभेच्या जागेसाठी आम्ही एकत्रित बसणार आहोत. पण एवढं नक्की सांगतो, भविष्यात शिवाजीराव आढळराव पाटील संसदेत असतील, असं राऊत म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. येणाऱ्या काळातील सगळ्या निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचंही राऊत म्हणत आहेत. पण शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेदरम्यान पारंपारिक लढत होते. २०१९ च्या लोकसभेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर अभिनेते अमोल कोल्हेंनी शिवसेनेला धक्का देत आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आणि लोकसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारण्यापासून आढळरावांना रोखलं. शिरुरच्या राजकीय मैदानात नवख्या कोल्हेंनी दिग्गज आढळरावांना चारी मुंड्या चित केलं. आता लोकसभा निवडणूक दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्रित लढण्यासंबंधी निर्णय घेतला तर शिरुरच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मोठी गरमागरमी होणार हे निश्चित… त्यामुळे दोन्ही नेत्यांची महत्त्वकांक्षा आणि त्यांचा समझोता, शिवसेना-राष्ट्रवादी कशा पद्धतीने घडवून आणते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“शिरुर लोकसभेसंदर्भात आम्ही एकत्र बसणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढळरावांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. आढळरावांनी गेल्या अनेक वर्षांपासून सेनेसाठी केलेलं काम, त्यांच्या कामाची इतिहासात नोंद आहे. कुणी काहीही म्हणत असतील, पण भविष्यात शिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेत असतील”, असं राऊत म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती योग्य; विरोधातील याचिका फेटाळली

0

मुंबई-

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती योग्य असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थेत बहु सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका व्हाव्यात यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि हा निर्णय मागे पडला. मात्र, पुन्हा एकदा काही बदलांसह महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेनुसार निवडणूका घेणार असल्याचे जाहीर केले होते.


पुण्यातील परिवर्तन सामाजिक संस्थेसह अन्य दोघांनी जनहित याचिकेद्वारे राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परिवर्तन संस्थेचे तन्मय कानिटकर आणि पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारास बाधा येते, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे या बहुसदस्यीय पद्धतीला स्थगिती देण्याची मागणी देखील याचिकेत करण्यात आली होती.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून त्यामुळे आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत नुकताच सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून त्यानुसार आगामी दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात राज्य सरकार आणि निवडणूक आयोगास लवकरच आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आगामी निवडणुकीवर परिणाम

महानगरपालिका निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा हा निर्णय आहे. त्यानुसार आता आगामी निवडणुका होतील. त्यामुळे आगामी मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर तसेच चंद्रपूर महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या रितिका दावलकर, पुण्याच्या स्मित उंडरे यांना दुहेरी मुकुट

पुणे, 6 मे 2022: डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात स्मित उंडरे याने तर, मुलींच्या गटात रितिका दावलकर यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत  मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत कोल्हापूरच्या तिस-या मानांकीत रितिका दावलकरने चौथ्या मानांकीत सृष्टी सूर्यवंशीचा 2-6, 6-1, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम फेरीत रितिका दावलकरने जान्हवी चौगुलेच्या साथीत काव्या तुपे व प्रांजली पांडुरेचा 6-3,6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. रितिका ही न्यू इंग्लिश मिडीयम शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये प्रशिक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 
मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या स्मित उंडरे याने नमिश हूडचा  6-4, 2-6, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत अंतिम फेरीत स्मित उंडरे व वरद उंडरे या जोडीने आरव पटेल व आर्यन किर्तने यांचा 7-6(4), 6-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी डेव्हिस कूपर संदीप किर्तने आणि नितीन किर्तने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रसनजीत पॉल, स्पर्धा निरीक्षक सेजल केनिया आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम) फेरी:12 वर्षाखालील मुले: स्मित उंडरे[1] वि.वि.नमिश हूड 6-4, 2-6, 6-1;
मुली: रितिका दावलकर [3] वि.वि.सृष्टी सूर्यवंशी[4]2-6, 6-1, 6-3;
दुहेरी गट: अंतिम फेरी: मुले:  स्मित उंडरे/वरद उंडरे वि.वि.आरव पटेल/आर्यन किर्तने 7-6(4), 6-3;मुली: रितिका दावलकर/जान्हवी चौगुले वि.वि.काव्या तुपे/प्रांजली पांडुरे 6-3,6-3.

डॉ. लक्ष्मी वेणू यांनी सुंदरम-क्लेटोन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला

चेन्नई, ६ मे २०२२: भारतातील आघाडीच्या वाहन घटक उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या सुंदरम- क्लेटोन लिमिटेड (एससीएल)च्या  आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत डॉ. लक्ष्मी वेणू यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. डॉ. वेणू या सुंदरम क्लेटोनच्या सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या.

डॉ. लक्ष्मी वेणू एका दशकाहून अधिक काळापासून सुंदरम क्लेटोनचे नेतृत्व करत आहेत. जागतिक पातळीवर सुंदरम क्लेटोनचा ठसा उमटविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बहुतांश अमेरिकास्थित ग्राहक पुरवठा साखळीतील जोखीम कमी करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ऑन-शोअर फाउंड्री युनिट्सच्या शोधात असतानाच तीन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना मधील डॉरचेस्टर येथे फाऊंड्री स्थापन करण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत दूरदर्शी होता.

सुंदरम क्लेटोन लिमीटेडला जगातील एक स्पर्धात्मक, कार्यक्षम फाउंड्री बनवण्याचे काम त्यांनी केले आणि कमिन्स, ह्युंदाई, व्होल्वो, पॅकार आणि डेमलर यांच्याशी सखोल ग्राहक संबंध निर्माण केले.

सुंदरम क्लेटोनचे अध्यक्ष श्री आर गोपालन म्हणाले, “लक्ष्मी यांनी ग्राहकांना खोलवर समजून घेतले आहे आणि जागतिक पातळीवरील ग्राहकांशी मजबूत संबंध विकसित केले आहेत. स्पर्धात्मक लाभ उभारण्यासाठी जागतिक स्तरावर ठसा उमटविताना त्यांनी यशस्वीपणे एक धोरण आखले आहे. मला विश्वास आहे की यापुढेही सुंदरम-क्लेटोनचे जागतिक दर्जाच्या वाहन घटक उत्पादक कंपनीत रूपांतर करण्यासाठी त्या कार्यशील राहतील.”

सुंदरम-क्लेटोनच्या ऑडिट समितीचे अध्यक्ष अॅडमिरल पी जे जेकब (निवृत्त) म्हणाले, “सुंदरम क्लेटोनमध्ये लक्ष्मी वेणू यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती ही कंपनीच्या विकासामध्ये, विशेषतः अत्यंत कठीण काळात त्यांनी केलेल्या प्रचंड योगदानाची योग्य ओळख आहे. अगदी शॉप फ्लोअर पासून काम करून कंपनीच्या शिखरापर्यंत पोहोचण्याच्या कठीण मार्गावरून जात त्यांनी ही उंची गाठली आहे. कंपनीला आणखी उंचीवर नेण्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.”

सुंदरम क्लेटोनचे मानद अध्यक्ष श्री. वेणू श्रीनिवासन म्हणाले, “लक्ष्मी यांचे ध्येयकेंद्री उद्दिष्ट आणि गेल्या दहा वर्षांतील समर्पित प्रयत्नांमुळे कंपनीने गुणवत्ता, नफा आणि ओईएमशी संबंध निर्माण करताना मोठा पल्ला गाठला आहे. अलीकडेच कामकाजाला सुरुवात केलेल्या आमच्या यूएस ऑपरेशन्सच्या स्थापनेचे नेतृत्व त्यांनी केले आहे. आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली सुंदरम-क्लेटोन जागतिक स्तरावर नावारूपाला येईल.”

सुंदरम क्लेटोनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारताना डॉ. लक्ष्मी वेणू म्हणाल्या, “सुंदरम क्लेटोनला विकासाच्या पुढील टप्प्यावर नेणे हा खरोखरच मोठा सम्मान आहे. जग खूप वेगाने बदलत आहे आणि ऑटोमोटिव्ह उद्योगातील अडथळे कमी होत आहेत. भविष्यकाळाने रोमांचक, आव्हानात्मक आणि नवीन संधी सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. आमच्याकडे एक उत्कृष्ट टीम आहे आणि आम्ही एकत्रितपणे सुंदरम क्लेटोनला भारतात आणि जागतिक स्तरावर मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत. मला आशा आहे की भागधारक, संचालक मंडळ, कर्मचारी आणि कंपनीच्या व्यवस्थापनाने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ करू शकेन. मानद अध्यक्ष श्री. वेणू श्रीनिवासन आणि अध्यक्ष आर. गोपालन यांच्याकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल मी कृतज्ञ आहे. ते नेहमीच आमचे दीपस्तंभ राहतील.”

एमआरएफ मोग्रिप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा शनिवारी पुण्यात रंगणार

  • 110 रायडर्सचा सहभाग, 700 मीटरचा आव्हानात्मक ट्रॅक

पुणे, दि. 6 – नाशिकमध्ये पार पडलेल्या रोमांचकारी पहिल्या फेरीनंतर एमआरएफ मोग्रिप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीचे आयोजन करण्याची संधी पुणेकरांना येत्या शनिवारी मिळणार आहे. मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयासमोरील मैदानात रंगणार्‍या या स्पर्धेत 110 अव्वल बायकर्स भाग घेणार असून त्यांच्यासाठी 700 मीटर अंतराचा आव्हानात्मक ट्रॅक तयार करण्यात आला आहे.

कोविडच्या काळात अपघातामुळे दुखापतीचा सामना करावा लागलेला पुण्याचा माजी राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेता ऋग्वेद बारगुजे या स्पर्धेत सहभागी होणार असून तो टीव्हीएस पेट्रन्स टीम या नव्या संघाचे प्रतिनिधित्व करतो आहे. पहिल्या फेरीतील पहिल्या मोटोमध्ये तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागल्यानंतर टीव्हीएस आरटीआर-300 मोटारसायकलवर स्वार होताना त्याने दुसर्‍या मोटोमध्ये पहिला क्रमांक पटकावून आपला दर्जा दाखवून दिला. तो आता 500 सीसी गाड्यांच्या गटात 33 गुणांसह सर्वसाधारण दुसर्‍या स्थानावर आहे. टीव्हीएस आरटीआर-300 मोटारसायकल वापरणारा त्याचाच संघसहकारी सी. डी. जिनान 37 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.

1 May MRF Supercross Championship Round 1 at Nashik

पुण्यातील फेरीसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर 20 डबल जम्प, दोन टेबल टॉप आणि 10 व्हूप डी डूज यांचा समावेश असल्यामुळे हा ट्रॅक आव्हानात्मक बनला आहे. वरिष्ठ गटात ऋग्वेद बारगुजे आघाडीवर असताना 15 वर्षांखालील ज्युनियर गटात  500 सीसी गाड्यांच्या विभागात युवराज देशमुख अव्वल स्थान राखून आहे.

कोल्हापूरमध्ये बारगुजेने नाशिकच्या कावासाकी केएक्स 250 मोटारसायकल वापरणार्‍या यश पवारला पराभूत केले होते. तर टीव्हीएस आरटीआर-300 मोटारसायकल वापरणार्‍या मुंबईच्या बादल जोशीला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
पुण्याची स्पर्धा एकूण 17 विविध गटांमध्ये होणार असून त्यातील पाच गट राष्ट्रीय स्तरावरील आहेत. त्यामध्ये 1) फॉरिन ओपन, 2) नॉव्हिस ओपन (250 सीसी फोर स्ट्रोक), 3) ज्युनियर्स ग्रुप बी ओपन, 4) एक्स्पर्ट्स ओपन आणि 5) ग्रुप सी ओपन (250 सीसी पर्यंत फोर स्ट्रोक) या गटांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे एफएमएक्स फ्रीस्टाईल रायडिंग हे या स्पर्धेचे खास आकर्षण ठरेल. यामध्ये काही परदेशी बायकर्स चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवितील. त्यामध्ये ज्यो डफिल्ड (कावासाकी 450) व शॉन वेब (वायझेड250) हे रायडर्स फ्रीस्टाईल कौशल्ये प्रदर्शित करतील. हे दोन्ही ऑस्ट्रेलियन रायडर्स पुण्यात पहिल्यांदाच येत असून त्यांचे कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

बियाणे आणि खतांचा पुरेसा पुरवठा करा-उपमुख्यमंत्री अजित पवार:खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक-२०२२ संपन्न

पुणे, दि.६:-यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कृषि निविष्ठांचा पुरेसा पुरवठा करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल टिंगरे, भिमराव तापकीर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषि सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, ऊसाला पाणी अधिक लागत असल्याने त्याऐवजी सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याची गरज आहे. कृषि विभागाने त्यादृष्टीने प्रयत्न करावे. ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी असल्याने गाळप बंद झालेल्या कारखान्यांकडील हार्वेस्टर इतर क्षेत्रातील ऊसतोडणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. शेतात उभ्या असलेल्या ऊसाच्या वाहतुकीसाठी आणि एकरी तोटा भरून काढण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्ह्यात रेशीम व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून चांगले उत्पन्न मिळत असल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिली.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बोटे यांनी सदारीकरणाद्वारे २०२२-२३ च्या खरीप हंगाम नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात मुख्य पिकाखालील खरीप हंगामासाठी २ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. एकूण २७ हजार ६७६ क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून १५ हजार १२५ क्विंटल उपलब्ध झाले आहे. तर खतांचे २ लाख १५ हजार १२२ टन आवंटन असून ७४ हजार ३८६ टन खते उपलब्ध आहेत. यावर्षी ४ लाख १० हजार ७२ खातेदारांना ४ हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे नियोजन असून १०४७ कोटींचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

चालू वर्षी सर्व १९२२ गावांचा ग्रामस्तरीय कृषि आराखडा तयार करण्यात आला आहे. ७ हजार हेक्टर क्षेत्रावर चार सूत्री भात लागवड करण्यात येणार आहे. हुमणी नियंत्रण अभियान अंतर्गत १० हजार सापळे लावण्यात येणार आहे. ६० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस पाचट अभियान राबविण्यात येणार आहे. २०५० हेक्टरवर कोरडवाहू फळबाग लागवड करण्यात येणार असून १० हजार विहिरींचे पुनर्भरण करण्यात येणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

बैठकीस कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शाहू महाराज जनतेप्रती प्रेमामुळेच लोकराजे झाले!

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

पुणे-राजर्षी शाहू महाराज हे जनतेचे राजे होते. केवळ राजवाड्यात बसून भाषण देण्याचे काम केले नाही. उलट जनतेमध्ये जाऊन, त्यांचे दु:ख दूर केले. त्यामुळे जनतेप्रती असलेल्या प्रेमामुळेच आणि आचरणामुळेच ते लोकराजे झाले, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज भाजपा राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्र प्रभारी सीटी रवीजी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे विद्यापीठ परिसरातील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. त्याचबरोबर 100 सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराजांना आदरांजली वाहिली.

यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ,प्र कुलगुरू एन. एस उमराणी सर, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, आनंद छाजेड, शिवाजीनगर मंडल अध्यक्ष रवी साळेगावकर, सुनील पांडे, गणेश बगाडे, प्रतुल जागडे, राजेश नायडू, प्रदीप मोरे,विश्वास गुंड पाटील, राहुल जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांनी आपले राजे होण्याचा जनतेच्या विकासासाठी, प्रबोधनासाठी, सुखासाठी उपयोग केला. ते राजे म्हणून जगलेच नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी त्यांना जेव्हा समजले, तेव्हा त्यांच्या मुंबईच्या चाळीतील घरी जाऊन डॉ. बाबासाहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यासोबतच कोल्हापुरातून जाती प्रथा निर्मुलानासाठी जे कार्य केले, ते नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी राहिले. केवळ राजवाड्यात बसून भाषण केले नाही. तर आपल्या कृतीतून त्यांनी समाजात अनेक आदर्श निर्माण केले.

ते पुढे म्हणाले की, शाहू महाराजांनी सर्वात पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षणाचा अधिकार दिला. त्यांनी हे देऊ केलेले आरक्षण १९६८ पर्यंत टिकलं. पण त्यानंतर ते कुठे गायब झालं, हे कुणालाही समजलं नाही. महाराजांनी आपल्या कार्यकाळात लागू केलेला शिक्षण हक्क कायदा आजही लागू करु शकलो नाही. कारण, या कायद्यान्वये जे पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाहीत, त्या पालकांना दंड करण्याचा अधिकार होता. त्यामुळे अशा लोकराजाला केवळ आदरांजली वाहण्याऐवजी, त्यांना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेस प्रारंभ

पुणे, 6 मे 2022: देशांतील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक 10वर्षांखालील गटांतील ‘प्रविण करंडक’ स्पर्धा, कोविडनंतर आता नव्या फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात येणार असून एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट या स्पर्धेचे संपूर्ण राज्यभरात आयोजन करण्यात येणार आहे. या सर्किटमधील पहिली स्पर्धा ही बारामती क्लब टेनिस या ठिकाणी शनिवार 7 मे व रविवार 8 मे या दिवशी होणार आहे.

एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किटच्या लोगोचे अनावरण प्रविण मसालेवालेचे अध्यक्ष व प्रविण करंडक स्पर्धेचे संस्थापक राजकुमार चोरडिया आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना एमएसएलटीएच्या समितीचे माजी सदस्य राजकुमार चोरडिया म्हणाले की, “आमच्या कंपनी राष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून याबरोबरच सुहाना ब्रँडसची उत्पादने देखील राष्ट्रीय ब्रँड झाली आहेत. यामुळेच आमच्या ब्रँडसारखेच 10वर्षांखालील टेनिस स्पर्धा एक नवी ब्रँड स्पर्धा करण्याची आमचा मानस आहे”.

चोरडिया पुढे म्हणाले की, “प्रविण करंडक टेनिस स्पर्धेचे सलग गेल्या 30वर्षांपासून आयोजन करण्यात येत असून मागील 2वर्षांच्या कोविड महामारीच्या संकटामुळे आम्हांला या स्पर्धेचे आयोजन करता आले नाही. पूण्यात हि स्पर्धा वर्षातून एकदा आयोजित करत असतो, पण यावेळी आम्ही एमएसएलटीएशी संलग्न होऊन एका स्पर्धेच्या ऐवजी 10वर्षांखालील टेनिस सर्किट स्पर्धा संपूर्ण राज्यभर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एमएसएलटीएला या वयोगटातील गुणवान खेळाडू हेरून या खेळाडूंना भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी मदत मिळेल.

एमएसएलटीए सुहाना स्मार्ट टेनिस 10वर्षांखालील टेनिस सर्किटमध्ये 15 स्पर्धांचे संपूर्ण राज्यभरात आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेतील कामगिरीनुसार अव्वल आठ खेळाडूंची निवड हि सुहाना 10 मास्टर्ससाठी करण्यात येणार आहे.  याशिवाय 10वर्षांखालील अव्वल आठ खेळाडूंसाठी   टेनिस प्रशिक्षण शिबिराचे तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येणार असून या निवड झालेल्या खेळाडूंना या शिबिरासाठी निमंत्रणदेखील असणार आहे.

प्रविण करंडक टेनिस स्पर्धेशी प्रारंभापासून जोडले गेलेले एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर या वेळी म्हणाले, की सुमारे 30 वर्षांपूर्वी टेनिस स्पर्धांचा दुष्काळच होता. टेनिस स्पर्धांचे आयोजन हे एक आव्हान होते. अशा काळात राजकुमार चोरडिया यांच्या सहकार्याने केवळ टेनिसचा प्रचार आणि प्रसार हे ध्येय ठेवून आम्ही प्रवीण करंडक स्पर्धेला प्रारंभ केला. राजकुमार चोरडिया यांच्या दूरदृष्टीलाच याचे श्रेय दिले पाहिजे.

सुंदर अय्यर पुढे म्हणाले, की स्थानिक स्तरावर सुरू झालेली ही स्पर्धा लवकरच राष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वाची स्पर्धा बनली. इतकेच नव्हे तर भावी काळात या स्पर्धेतून अनेक डेव्हिस चषक व फेड चषक स्पर्धा गाजविणारे खेळाडू पुढे आले. दहा वर्षांखालील गटाची स्पर्धा आम्हीच पहिल्यांदा सुरू केली आणि नंतर ही स्पर्धाच आमची प्रमुख ओळख बनली.

प्रवीण मसालेवाले कंपनीचे संचालक आणि टेनिसप्रेमी विशाल चोरडिया म्हणाले, की आता तीन दशकांची समृद्ध परंपरा पाठीशी असल्यामुळे आणि आमच्या कंपनीचाही भारतभर विस्तार झाला असल्यामुळे या स्पर्धेचा भौगोलिक विस्तार करण्याची आमची योजना आहे. सध्या महाराष्ट्रात ही स्पर्धामालिका सुरू असली, तरी लवकरच ही 10 वर्षांखालील स्पर्धामालिका गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या राज्यांमध्येही नेण्याची आमची योजना आहे. गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना आपली गुणवत्ता लहान वयातच सिद्ध करण्याची संधी मिळावी, असेही ध्येय आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून बाळगले आहे.

 रविवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

पुणे, दि. ०६ मे २०२२: महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर या १३२ केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम करणे अत्यावश्यक असल्याने नगररोड, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा या परिसरामध्ये रविवारी (ता. ८) पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे. उन्हाच्या झळा तसेच दैनंदिन कामांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पहाटेच्या सुमारास महापारेषणकडून दोन तासात हे दुरुस्ती काम पूर्ण करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या थेऊर ते खराडी तसेच लोणीकंद ते खराडी या टॉवर लाईनचे जम्प बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम तातडीचे व अत्यावश्यक असल्याने पूर्वनियोजन करून रविवारी (ता. ८) पहाटे दोन तासांत ते पूर्ण करण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे खराडी अतिउच्च दाब उपकेंद्रातून होणाऱ्या महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या १९ वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून १९ पैकी ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा महापारेषणच्या मगरपट्टा, थेऊर, व्हीएसएनएल या अतिउच्च दाब उपकेंद्राद्वारे पर्यायी स्वरुपात सुरु ठेवण्यात येणार आहे. तथापि विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास काही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पहाटे दोन तास नाईलाजाने बंद ठेवावा लागणार आहे. या परिसरातील संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर याबाबत ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येत आहे.

रविवारी (ता. ८) पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान गांधीनगर, यशवंतनगर, गणेशनगर, जयप्रकाशनगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा गाव, रामनगर, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, पीडब्लूडी वसाहत, त्रिदलनगर, नागपूर चाळ, सह्याद्री हॉस्पीटल परिसर, विमानगर, रोहन मिथीला सोसायटी, साकोरेनगर, राजीवनगर नॉर्थ व साऊथ, गणपती मंदिर चौक, दत्त मंदिर चौक, श्रीकृष्ण हॉटेल, फिनिक्स चौक, श्रीरामनगर, पारेशरनगर, फॉरेस्ट पार्क, खुळेवाडी, खांदवेनगर, विमानतळ रोड, रामवाडी गावठाण, चंदननगर, संघर्ष चौक, प्रितनगर, अष्टविनायक नगर, पद्मय्या सोसायटी, बोराटेवस्ती, यशवंतनगर, तुकारामनगर, गणपती हाऊसिंग सोसायटी, शेजवळ पार्क, साई पार्क, वृंदावन कॉलनी, म्हाडा कॉलनी या परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांचे दरमहा हजारांवर ‘चेक बाऊंस’

प्रत्येक वीजबिलासाठी जीएसटीसह ८८५ रुपयांचा दंड

धनादेशाऐवजी ऑनलाईन वीजबिल भरण्याचे आवाहन

पुणेदि६ मे २०२२: पश्चिम महाराष्ट्रात महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी दरमहा सुमारे ९५० ते एक हजार धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५/- रुपयांचा दंड पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी ‘ऑनलाईन’द्वारे बिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध असली तरी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात अद्यापही सुमारे १ लाख ९ हजार वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. मात्र त्यापैकी दरमहा सुमारे ९०० ते एक हजार ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश अनादरित होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पुणे जिल्हा- ७०० ते ८००, सोलापूर- ४० ते ५०, सातारा- ३० ते ४०, सांगली- ३० ते ४० आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ११० ते १२० धनादेश अनादरीत होत आहेत. या सर्व ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी ७५०/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५/- रुपये असे एकूण ८८५/- रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक ग्राहक क्रमांकाच्या वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक ग्राहक क्रमांकाच्या वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येते. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधीत रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहे. धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीजबिलामध्ये थकबाकी दिसून येते.

महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करणे लघुदाब वीजग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबत सेवा उपलब्ध आहे. तसेच क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. तर क्रेडीटकार्ड वगळता सर्व ‘ऑनलाईन’द्वारे होणारा भरणा निशुल्क आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांचे बिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरांतून 100 खेळाडू सहभागी

पुणे, 6 मे 2022: ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातून 100 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर या ठिकाणी 7 ते 13 मे 2022 या कालावधीत होणार आहे. 
स्पर्धा संचालक रिया किर्तने यांनी सांगितले की, स्पर्धेत अहमदाबाद, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणांहून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये स्मित उंडरे, राम मगदूम, आर्यन किर्तने, शौर्य गडदे, अनुष्का जोगळेकर, शिबानी गुप्ते,   रित्सा कोंडकर, काव्या पांडे या मानांकित खेळाडूंचा सहभाग आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक व गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सेजल केनिया यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

भाजपा किसान मोर्चाचे साखर संकुलसमोर आंदोलन

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची भेट देऊन निवेदन स्वीकारले. त्यांनी कार्यक्षेत्राबाहेरील उसाला प्रतिटन प्रति किलोमीटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी मान्य केली. उशिरा तोडलेल्या उसाला अनुदान देण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. परंतु उर्वरित मागण्या मान्य पूर्ण होइपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

– वासुदेव काळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा

पुणे : राज्यात गाळपाविना शिल्लक उसाचे नियोजन करावे. तसेच, शेतकऱ्यांना एफआरपी दोन टप्प्यांत देण्यासाठी साखर सम्राट हे अतिरिक्त उसाची समस्या निर्माण करीत आहेत, असा आरोप करीत भाजपा किसान मोर्चाने गुरुवारपासून साखर संकुलसमोर आंदोलन सुरू केले.सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप देशमुख, जिल्हाध्यक्ष संजय थोरात, शहराध्यक्ष भारत जगताप, विलास बाबर, उध्दव नाईक, उत्तम माने, रंगनाथ सोळंके, रोहित चिवटे, प्रदीप आडगांवकर, केशव कामठे, मनोज फडतरे यांच्यासह अन्य शेतकरी सहभागी झाले आहेत.

राज्यात ऊस गाळपाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे ५० लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. फेब्रुवारी महिन्यात कारखान्यांना जाणारा ऊस अद्याप तोडला नाही. उन्हामुळे उसाच्या वजनात कमालीची घट झाली आहे. साखर कारखानदार हे सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला.

प्रमुख मागण्या –

  • राज्य सरकारने ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, याची हमी द्यावी.
  • अतिरिक्त उसाचे नियोजन करताना वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याच्या बिलातून कपात करू नये.
  • उशिरा तोडलेल्या उसाला प्रति हेक्टर २५ हजार रुपये अनुदान द्यावे.
  • गाळपाविना ऊस शिल्लक राहिल्यास पंचनामे करून हेक्टरी ७५ हजार रुपये अनुदान द्यावे.

पंधरा वर्षे नाही झाला, भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर मात्र भोंग्याचा त्रास सुरू झाला

पुणे – ज्यांना पंधरा वर्षे भोंग्याचा  त्रास झाला नाही, त्यांना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्रास सुरू झाला आहे.राज्याचा मुख्यमंत्री शिवसेना ठरवेल. त्यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून काम करावे, अशी राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस  यांच्यावर टीका  करीत दोन दिवसात आरोपपत्र दाखल होऊन पुढील पाच दिवसात सोमय्या  जेलमध्ये जाणार असल्याचे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत  यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

शिवसेना हडपसर मतदारसंघाच्या वतीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माळवाडी रोड येथे जाहीर मेळाव्याचे आयोन केले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना खासदार राऊत बोलत होते.

शिवसेना नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, संपर्क प्रमुख सचिन आहीर, आदित्य शिरोडकर, शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय शिवतरे, , संजय मोरे, समीर तुपे, राजेंद्र बाबर, नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची अल्हाट, संगिता ठोसर, पल्लवी जावळे, पृथ्वीराज सुतार, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, बाळासाहेब चांदेरे शंकरनाना हरपळे, राजाभाऊ होले, तानाजी लोणकर, प्रा. विद्या होडे, शादाब मुलाणी, महेंद्र बनकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी माळवाडी येथील शिवसेना कार्यालयाचे खासदार राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.खासदार राऊत म्हणाले, ‘स्वत: शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा ही वृत्ती जोपसणारे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. मात्र, आम्ही त्याला घाबरत नाही. ठाकरे सरकार कोरोनापासून सर्व आजारांवर उपचार करणारे आहे. हा महाराष्ट्र बहुजन समाजाचा आहे, छत्रपती शिवरायांचा, शाहु, फुले, आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा आहे. शिवसेनेचा प्रवास गल्ली ते दिल्ली आहे. शिवसैनिकाच्या खांद्यावरील भगवा हा बाळासाहेबांनी दिलेला ओरिजनल आहे. व्यंगचित्रांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्याने मराठी माणसाला न्याय देण्याचे काम केले.

आज लोक पेटवापेटवीची भाषा करतात. सवाल यह है की बंदर के हात माचिस किसने दी? पण कसे काय पेटणार त्यासाठी आतून आग आणि मनगटात रग असावी लागते. हा महाराष्ट्र आंडू पांडुंचा नाही तो शिवसेनेचा आहे.

भोंग्याचे राजकारण सध्या सुरू आहे. बाळासाहेबांनी मुस्लीम बांधवांसाठी जागा उपलब्ध करून देत रस्त्यावरील नमाज बंद केले.

आपण जेंव्हा समस्या निर्माण करता तेंव्हा त्यावरील उपायही देणे गरजेचे आहे. भोंगे प्रकरणात या लोकांनी आमच्या हिंदूंचाच गळा आवळला आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, हे लोकांना सांगा. आयोध्येत बाबरी पाडण्याचे काम शिवसैनिकांनी केले. आमच्याकडे छत्रपती आणि तुमच्याकडे औरंगजेब जन्मला आहे हे विसरू नका. आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्र झुकणारा नाही. शिवसेनेला संपविण्याच्या दिल्लीतून सुपाऱ्या दिल्या जातात. महापालिकेच्या पायरीवर आमची मनगटे कमी नाहीत हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. पालिका निवडणूकीचा संदर्भ देत खासदार राऊत यांनी आता केवळ मुंबई, ठाणे नाही तर पुणेही जिंकायचे आहे. सावधपणे पावले टाकण्याची गरज आहे, अशी सूचनाही शिवसैनिकांना दिली.

डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे महाराष्ट्र अस्वस्थ करीत आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात आदित्य ठाकरे हे मर्चिडीस बेबी आहे. त्यांचे म्हणणे असे असेल तर तुमचा हडपसर येथील एक माणूस मर्चिडीस चोर आहे.

समीर तुपे यांनी प्रास्ताविक केले तर नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी आभार मानले.

उद्योगपती पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांचे कार्य प्रेरणादायी – डॉ. नितीन करमळकर

पुणे-छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी वंचित घटकांसाठी देशाच्या स्वातंत्र्या पूर्वी आरक्षण सुरु केले. त्याचबरोबर, या वंचित  समाज घटकांच्या मध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा या साठी शाळा व बोर्डिंगसही उभारली. एवढेच नव्हेतर संस्कृत पाठशाळा ही काढून या घटकांना संस्कृत शिकण्याची देखील संधी दिली. खऱ्या अर्थाने त्यांनी, सामाजिक ध्रुवीकरणाचे मुहूर्तमेढ रोवली. ते  दूरदृष्टीचे राजे होते. डॉ. बाबा साहेब आंबेडकर हे देशाचे नेतृत्व करतील असे भाकीत त्यांनी एका परिषदेत १९२० मध्येच केले होते व ते खरे ठरले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रमाणेच महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणेतून देशातील वंचित समाज घटकातील वर्गाला उद्योजक बनण्याचे स्वप्न बघून त्यासाठी अविरत झटणारे पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांचे मोठे योगदान आहे आपल्या वंचित समाजाला पुढे आणायचे आहे हे आपले कर्तव्य आहे असे मानून काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांचे  कौतुकच केले पाहिजे. त्यांच्या दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची सुरुवात त्यांनी पुण्यातून केली .ही मोठी बाब असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कुलगरू या नात्याने त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. असे उद्गार सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज काढले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षाच्या पूर्व संध्येला जेष्ठ उद्योजक डॉ मिलिंद कांबळे यांना विशेष पुरस्कार पत्रकार भवन येथील  कार्यक्रमात  प्रदान करण्यात आला त्या वेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

संवाद पुणे आणि समर्थ युवा फौंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांना शिंदेशाही पगडी, मानपत्र, स्मृतीचिन्ह, उपरणे  व छत्रपती शाहू महाराजांवरील पुस्तक कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर संवाद पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन आणि समर्थ युवा फौंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे होते .

सत्काराला उत्तर देताना पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले की छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच आरक्षण देऊन अनुसूचित जाती जमाती, दलित व मागासवर्गीय यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना दिली. महात्मा ज्योतिबा फुले हे जसे समाज सुधारक होते तसेच ते उत्तम व्यावसायिक म्हणजे उद्योजकही होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्याघटनेचे शिल्पकार होते तसेच उत्तम व्यावसायिक वकीलही होते त्यांचे आदर्श घेत अनुसूचित जाती जमाती, दलित मागासवर्गीय समाज घटकातील युवा वर्गाने आरक्षणाचा लाभ घेत शिक्षण नोकरी करावी त्याच बरोबर उद्योजक बनण्याचा पर्यायही त्यांना उपलब्ध आहे. असे सांगून त्यांनी म्हटले की, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्य या युवा वर्गाला उद्योजक बनविण्याचे असून देशात त्या साठी अवश्यक धोरणे व संस्थात्मक सहयोगही मिळत आहे. ‘मुद्रा लोन’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आज देशात २९ राज्ये व ७ परदेशांमध्ये संस्थेचे काम चालू असून अनुसूचित जाती जमाती दलित मागासवर्गीय समाज वर्गातील युवकांनी उद्योजक बनण्यावर भर द्यावा असे आवाहन केले. पुणेकरांनी कौतुकाने पाठ थोपटली याबद्दल पुणेकरांचे मी आभार मानतो असे ते शेवटी म्हणाले.

प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली . संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील  महाजन यांनी स्वागत केले. समर्थ युवा फौंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन केले. या प्रसंगी सौ सीमाताई कांबळे यांचा देखील सत्कार करण्यात आला .आभार प्रदर्शन निकिता मोघे यांनी  केले.

बांधकाम व्यवसायिक पाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

 पुणे-पुण्यातीलअमित वास्तू व्हेंचर्सचे भागीदार असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किशोर गोविंद पाटे , संकेत किशोर पाटे , रोहन किशोर पाटे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्यासह पंकज छल्लानी आणि भागचंद छल्लानी यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.अशोका बिल्डकॉनचे संचालक आशिष अशोक कटारिया यांच्या फसवणुकीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,अमित वास्तू व्हेंचर्स या बांधकाम कंपनीने सहकारनगर येथे मोंन्टेसिटी नावाची साईट बांधली आहे. या साईटमधील 701, 702, 1001, 1002 हे चार फ्लॅट ऑगस्ट 2018 मध्ये पंकज छल्लानी आणि भागचंद छल्लानी यांनी विकत घेतले होते.मात्र, त्यांना पैशांची आवश्यकता असल्याने छल्लानी यांनी हे फ्लॅट त्यांचे नातेवाईक असलेल्या आशिष अशोक कटारिया यांना विकण्याचा निर्णय घेतला .त्यानुसार, छल्लानी आणि कटारिया यांच्यामध्ये एकूण 14 कोटी रुपयांचा व्यवहार ठरला.त्यातील 2 कोटी रुपये कटारिया यांनी छल्लानी यांना दिले. तसेच बँक लोन केले.याचे आजवर 2 कोटी 26 लाख रुपयांचा बँकेचा हप्ता भरला. छल्लानी आणि कटारिया यांच्यामध्ये व्यवहार होण्यापूर्वी पाटे आणि छल्लानी यांच्यातील खरेदीचा व्यवहार रद्द करण्यात आला.आरोपींनी संगनमत करून 500 रूपयांच्या स्टॅम्प वर नमूद करण्यात आलेल्या 17 सप्टेंबर 2018 या तारखेमध्ये खाडाखोड करून 7 सप्टेंबर 2018 अशी तारीख केली. त्याद्वारे छल्लानी आणि पाटे यांच्यातील व्यवहार रद्द करून या चार फ्लॅटची मालकी पाटे यांच्याकडे असल्याचे भासविले. छल्लानी आणि कटारिया हे दोघेही नातेवाईक आहेत.

पोलीस निरीक्षक इंदलकर यांच्या माहितीनुसार, पाटे यांनी 2020 साली याच प्रकरणात कटारिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. तर, त्यांच्यामध्ये आणखी एक सिव्हिल मॅटर सुरू आहे. पोलीस आता आरोपींनी स्टॅम्प कधी खरेदी केला हे तपासणार आहेत. न्यायालयाने 156 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिल्याने दत्तवाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.