Home Blog Page 2004

महा एनजीओ फेडरेशनतर्फे श्री श्री सेवा महोत्सवांतर्गत १० महत्वपूर्ण कार्यक्रम

श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजन ; महाराष्ट्रातील ३० हून अधिक जिल्ह्यांचा समावेश
पुणे : महा एनजीओ फेडरेशनतर्फे श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील ३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये १० महत्वपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अक्षरओळख, वृक्ष संवर्धन, गो संवर्धन, रक्तदान, नवचेतना  शिबीर , शासकीय  योजनांचा प्रचार प्रसार, आरोग्य तपासणी शिबीरे , गाव तिथे वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व वारकरी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, डिजिटल साक्षरता आदींचा समावेश आहे, अशी माहिती फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. 
महा एनजीओ फेडरेशनच्या मुकुंदनगर येथील मुख्यालयात प्रकल्पांच्या पोस्टरचे अनावरण झाले. प्रकल्पांना चंद्रकांत राठी यांची अमूल्य साथ व सुरेश इंदानी, रिसो संस्थेचे वैभव  मोगरेकर यांचे  विशेष  सहकार्य मिळाले आहे. सेवा उपक्रम उत्तमरित्या होण्यासाठी संस्थेचे संचालक मुकुंद शिंदे, कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले, अमोल उंबरजे, प्रणिता जगताप व गणेश  बाकले आदी मेहनत घेत आहेत. 
शेखर मुंदडा म्हणाले, अक्षरओळख हा उपक्रम पूर्व प्राथमिक शिक्षण  घेणा-या लहानग्यांचे  विशेष  आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्रातील  शेकडो  एनजीओ  यात सहभागी  झाल्या आहेत. जवळपास ११०० पेक्षा अधिक शाळांमध्ये अक्षरओळख  आॅडियो चार्ट्स मोफत दिले जात आहेत.  महा एनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातील  २००० हून अधिक  सामाजिक स्वयंसेवी संस्थांची  शिखर  संस्था म्हणून परिचित असून आता  पर्यंत हजारो  संस्थांना विविध उपक्रमासाठी  पाठबळ दिले आहे . 
अक्षय महाराज भोसले म्हणाले, पू.गुरुदेव रविशंकरजी यांच्या संकल्पनेतून असंघटित संस्थांनी एकत्र येऊन उत्तम कार्य उभ  करावे,  या संकल्पनेतून महा  एनजीओ फेडरेशन शेखर  मुंदडा  व सहकारी  वर्गाने स्थापन केली. विविध उद्योग क्षेत्रातील सीएसआर छोट्या सामाजिक संस्थांना मिळवून देण्यासाठी महा  एनजीओ प्रयत्नशील आहे व विशेष बाब यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आता श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनानिमित्त होणारे १० कार्यक्रम देखील सामाजिक संस्था व उपेक्षितांना बळ देतील.

थकीत कर्ज वसूल करणाऱ्या एका टोळक्याची घरात घुसून वकिलाला मारहाण

पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीत एक धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित सोसायटीत राहणाऱ्या वकिलाला थकीत कर्ज वसूल करणाऱ्या एका टोळक्यानं मारहाण केली आहे. आरोपींनी वकिलासह त्यांचे वडील आणि कामगाराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हनुमंत श्रीकांत पाटेकर (वय ३१, रा. कॉलनी नंबर ५, पंत नगर, जाधववाडी, चिखली), सुग्रीव भीमराव गायकवाड (वय ५७, रा. म्हेत्रे गार्डन जवळ, चांदणी चौक, चिखली), विनयकुमार आंबिकाप्रसाद यादव (वय २२, रा. शिंदे वस्ती, रावेत), दिलीप फुलचंद निर्मल (वय ३३, रा. चंदन नगर), शत्रुघ्न सुखदेव पोकळे (वय ३५, रा. फ्लॅट नंबर २, गणेश नगर, वडगाव शेरी) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी ॲड. अमित शहा (वय ४१, रा. आदिनाथ सोसायटी, स्वारगेट) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी शहा हे वकील असून त्यांची कात्रज येथे प्राणीमित्र संस्था आहे. त्यांनी एका कंपनीकडून चार दुचाकी घेतल्या होत्या. या दुचाकीचे काही पैसे परत करायचे राहिले आहेत. या कारणावरून थकीत हप्ते वसुली करणारे खासगी कंपनीतील आरोपी शहा यांच्या घरात शिरले. शहा यांनी घराचा दरवाजा उघडताच टोळक्यानं त्यांना दमदाटी करायला सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी शहा यांच्या वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दुचाकीची चावी आणि मोबाइल हिसकावून घेतला. त्यांच्या कामगारालाही जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी त्याच्याकडीलही मोबाइल संच हिसकावून घेतला.या घटनेनंतर आरोपी टोळक्याने वकिलाकडील दुचाकी जबरदस्तीने पळवून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही आरोपींना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक तुषार भोसले, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, शिवाजी सरक आदींनी ही कारवाई केली. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत अधिराज दुधाने, सृष्टी सूर्यवंशी यांना विजेतेपद 

पुणे, 8 मे 2022:बारामती लॉन टेनिस क्लबच्या वतीने आयोजित व प्रविण मसालेवाले प्रायोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट स्पर्धेच्या पहिल्या मालिकेत  मुलांच्या गटात पुण्याच्या अधिराज दुधाने याने तर, मुलींच्या गटात सृष्टी सूर्यवंशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. 
बारामती क्लब टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित अधिराज दुधाने याने दुसऱ्या मानांकित आरव छल्लानीचा 4-2, 4-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. अधिराज हा न्यू इंडिया शाळेत पाचवी इयत्तेत शिकत असून रोहित शिंदे टेनिस अकादमीत प्रशिक्षक रोहित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. 
मुलींच्या गटात अंतिम लढतीत पुण्याच्या अव्वल मानांकित सृष्टी सूर्यवंशी हिने दुसऱ्या मानांकित मायरा शेखचा  4-1, 4-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सृष्टी हि केंद्रीय विद्यालय शाळेत पाचवी इयत्तेत शिकत असून इंटेंसिटी स्पोर्ट्स अकादमीत प्रशिक्षक कपिल किन्नरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तिचे हे या वर्षातील पाचवे विजेतेपद आहे.   
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बारामती लॉन टेनिस क्लबचे सचिव दत्तात्रय बोऱ्हाडे, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी महेश चावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धैर्यशील तावरे, संदीप बेल्लूडी, एमएसएलटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.  
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उपांत्य फेरी: अधिराज दुधाने[1]वि.वि.आरव बेले[3] 6-3;
आरव छल्लानी[2]वि.वि.प्रणव गायकवाड 6-2;अंतिम फेरी: अधिराज दुधाने[1]वि.वि.आरव छल्लानी[2] 4-2, 4-1;
मुली: उपांत्य फेरी: सृष्टी सूर्यवंशी[1]वि.वि.त्रिशा भोसले[3] 6-1;मायरा शेख[2]वि.वि.हर्षा देशपांडे 6-3;अंतिम फेरी: सृष्टी सूर्यवंशी[1]वि.वि.मायरा शेख[2] 4-1, 4-0. 

महाबळेश्वर पर्यटनस्थळी नागरिकांसाठी पायाभूत सुविधांसाठी डॉ. नीलम गोऱ्हे सोमवारी आढावा घेणार

0

महाबळेश्वर : केवळ राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातून पर्यटकांच्या प्रथम पसंतीचे गीरिस्थान महाबळेश्वर ठिकाण आहे. येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. यामुळे महाबळेश्वर हे पर्यटनासाठी पायाभूत सुविधांचे माहेरघर व्हावे असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.सोमवारी दिनांक ९ मे, २०२२ रोजी सातारा येथे आयोजित बैठकीत डॉ. नीलम गोऱ्हे याबाबत अनेक विषयांचा आढावा घेणार आहेत.

महाबळेश्वर येथील वनविभागाच्या विश्रामगृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.या बैठकीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार दगडू सपकाळ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, महाबळेश्वर तहसीलदार सुषमा पाटील, गटविकास अधिकारी अरुण मारभळ, नायब तहसीलदार दीपक सोनवले आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.महाबळेश्वर येथील पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने महाबळेश्वर नगरपालिका आणि ग्रामपंचायत क्षेत्रासाठी एकूण १७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत लवकरच येथे विकासकामांचा श्री गणेशा पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.या अनुषंगाने राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली येथे नियोजन बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महाबळेश्वर येथे भेट देणारे पर्यटकांसाठी पुरेशा प्रमाणात शौचालये, नागरी सुविधा असल्या पाहिजेत. वेण्णा लेक परिसरात प्रस्तावित रस्त्यांच्या रुंदीकरण कामाला गती यावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे, असे यावेळी त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, ‘महाबळेश्वर आणि परिसरातील गावांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कृषी पर्यटन, न्याहारी निवास योजना, खादी ग्रामोद्योग सारख्या अनेक योजनांचा लाभ लोकांनी घ्यावा याकरिता प्रशासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे’.

उदय सामंत यांनी येथे असलेल्या विविध विकास कामांसाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. पर्यटक आणि त्या माध्यमातून होत असलेल्या या ठिकाणच्या प्रसिध्दी बाबत त्यांनी आज लक्ष वेधले. महाबळेश्वर येथील सुविधांबाबत त्यांनी आज नगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या.

रणरणत्या उन्हात शहापूरच्या दुर्गम भागातील गावांना मंत्री आदित्य ठाकरेंची भेट

0

ठाणे, दि.८ : आपली परिस्थिती पहायला मी आलो आहे. घरापर्यंत पाणी येईल अशी यंत्रणा बसविण्यात येत आहे. कामाच्या पाहणीचा आढावा घ्यायला महिनाभरात परत येईन, अशा शब्दात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माळ, बिवलवाडी, गोलभान या दुर्गम भागातील जनतेला दिलासा दिला.भर दुपारच्या रणरणत्या उन्हात मंत्री श्री. ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली आणि त्यांचा वर्षानुवर्षांचा पाणी प्रश्न मिटेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. बिवलवाडी येथील महिलांनी त्यांना पाणी टंचाईचे गांभीर्य सांगितल्यानंतर सौरऊर्जेच्या माध्यमातून तातडीने पाणीपुरवठा करण्याबाबत आश्वस्त केले.यावेळी मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शहापूर, पालघर, ठाणे याभागात पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे दुर्गम भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. वन तलाव, विहिरी यांच्या माध्यमातून भावली धरणाचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणी आणून विहिरीत टाकले जाईल आणि त्यानंतर सोलर पंपने टेकडीवरील गावात पाणी पोहोचविण्यात येईल असे सांगितले.शहापूर तालुक्यातील माळ त्यानंतर पालघर जिल्ह्यातील सावर्डे येथील ग्रामस्थांच्या भेटी घेवुन मंत्री श्री. ठाकरे यांचे कसारा घाटाच्या माथ्यावर असलेल्या आणि ठाणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथे दुपारी दीडच्या सुमारास आगमन झाले. ४५० लोकसंख्या असलेल्या या गावातील कुडाच्या घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंत्री श्री. ठाकरे यांचे गावातील महिलांनी पारंपरिक लोकगीत म्हणून स्वागत केले.

स्वागताचा कार्यक्रम नको असे म्हणत श्री. ठाकरे थेट जमिनीवर बसले आणि महिलांशी संवाद साधायला सुरुवात केली. या गावात ठाकरे आडनावाच्या कुटुंबियांची संख्या अधिक असल्याने गावातील ज्येष्ठ महिला यांनी पाणी टंचाई बाबत माहिती द्यायला सुरुवात केली. त्यावर तुम्ही पण ठाकरे आणि मी पण..आपण एकत्र काम करून गावाची पाणी समस्या सोडवू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी भावली धरणाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तो पूर्ण होईपर्यंत या गावची पाणी समस्या सोडविण्यासाठी टोपाची बावडी येथून पाणी लिफ्ट करून आणू. त्यासाठी कामाला सुरुवात देखील झाली आहे. सोलर पंप बसवून पाणी येईल. “ठाकरेंना ठाकरेंचा शब्द” असल्याचे सांगत मंत्री श्री. ठाकरे यांनी महिलांना आश्वस्थ केले.यावेळी त्यांनी कसारा घाटात असलेल्या आणि अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या टोपाच्या विहिरीची पाहणी केली. या विहिरीत पाणी साठवून ते लिफ्ट करून गावापर्यंत नेण्यात येणार आहे.त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोलभाण येथे भेट दिली. गावातील मारुती मंदिरात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आपले म्हणणे ऐकण्यासाठी मी येथे आलोय. प्रशासकीय यंत्रणेने पाणी पुरवठ्याची कामे वेळेत पूर्ण करावी. महिनाभरात आढावा घेण्यासाठी मी येईन असे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्या समवेत कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, आमदार रवींद्र फाटक, पांडुरंग बारोरा, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील एकल महिलांसाठी राज्य सरकार भक्कमपणे पाठीशी उभे राहणार : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, ता ८: राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील
एकल महिलांसाठी समाधान शिबिरे, मालमत्ता नावावर करण्यासाठी विशेष मोहीम, तालुकानिहाय शिबिरे घेण्यात येत आहेत. या माध्यमातून महिलांची नावे त्यांच्या जमिनी आणि मालमत्तामध्ये सातबारावर नोंद करता येतील, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापतीडॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

पुण्यातील अफार्म आणि मकाम या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित ‘महिला शेतकरी समस्या आणि उपाय योजना’ या विषयावरील ऑनलाईन चर्चासत्राच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या.

नाशिक, जळगाव, पालघर, जालना, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर अशा विविध जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांशी डॉ. गोऱ्हे यांनी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, शेतकरी एकल महिलांना मोफत बी बियाणे, खते देण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्हाधिकारी विमला यांच्याशी विदर्भातील महिलांनी संपर्क साधावा. एकल महिलांच्या गरजू मुलांसाठी शिर्डी संस्थान तसेच समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात व्यवस्था करता येऊ शकते. याकरिता महिला आणि मुलांची जिल्हानिहाय यादी सादर करावी. प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात दर सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनाच्या निमित्ताने या यादीचा पाठपुरावा करता येईल. येत्या तीन महिन्यांत किमान दोनशे ते तीनशे एकल महिलांचे नाव त्यांच्या संपत्तीच्या मध्ये सातबारावर आले पाहिजे असे प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी केले.

नुकत्याच तुकडेबंदीबाबत आलेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार नावावर जमिनी होण्यासाठी आता सुलभ प्रक्रिया करता येईल. त्या – त्या जिल्ह्यांच्या निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून महिलांना योग्य ती माहिती संस्थांनी मिळवून द्यावी असे आवाहन त्यांनी सामाजिक संस्थांना केले.

महिलांचा समावेश वन संवर्धनात यावा याबाबतचा अध्यादेश माहितीसाठी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश त्यांनी दिले. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर लवकरच मराठवाडा विभागांमध्ये बैठका घेणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

कार्यक्रमात अफार्मचे सुभाष तांबोळी,सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार, शुभदा देशमुख आणि अनेक जिल्ह्यातील महीला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नवे बालगंधर्व रंगमंदिर उभारणार ,तीन नवीन ऑडिटोरियम,तीन नवीन कलादालने,साडेतीन लाख स्क्वेअर फुट रंगमंदिराच्या स्वप्नांंचे सादरीकरण

पुणे-बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंदर्भातील अंतिम प्रस्तावाचे सादरीकरण नुकतेच उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर झाले. या वेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रमकुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, भवन विभाग प्रमुख हर्षदा शिंदे आदी उपस्थित होते.या संदर्भात मोहोळ यांनी म्हटले आहेकी,’बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी त्यांच्यासमोर नवीन रंगमंदिराच्या रचनेचे सादरीकरण करण्यात आले. यावर सविस्तर चर्चा झाली असून पालकमंत्र्यांनी नवीन बालगंधर्व मंदिराच्या उभारणीसाठी सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच महापालिकेची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणार असून आपल्या बालगंधर्व रंगमंदिराला अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे रंगमंदीर प्राप्त होईल, असा मला विश्वास वाटतो.

माजी महापौर मोहोळ यांचे दावे :

मोहोळ यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’आपल्या शहरातील बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले. आपली कला सादर करण्याची एकतरी संधी बालगंधर्वला मिळावी हे प्रत्येक कलावंताचे स्वप्न असते. ५४ वर्षांपूर्वी बांधलेल्या बालगंधर्वला नव्याने उभारण्याची, व्यापक करण्याची गरज असल्याचेही लक्षात आले. ही बाब लक्षात घेऊन २०१८ साली स्थायी समितीचा अध्यक्ष असताना बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतुदही केली मात्र कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या कालावधीतमधे हा विषय काही वेळ बाजूला राहीला, तरीदेखील आपण या विषयाचा पाठपुरावा करत पुण्यातील ज्येष्ठ कलाकार, महापालिकेतील सर्वपक्षीय नेते, मनपा अधिकारी आणि वास्तुविशारदांची या सर्वांची एकत्रित समिती नेमून या विषयावर सर्वांगाने चर्चाही घडवून आणली.असा दावा मोहोळ यांनी केला आहे.

केवळ साडे २२ हजार स्क्वेअर फूटामध्ये उभ्या असणाऱ्या या रंगमंदिराला वाढवून साडे तीन लाख स्क्वेअर फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. आज जेमतेम १०० दुचाकी व २०-२५ चारचाकी वाहनांची पार्किंग क्षमता आहे परंतू नवीन वास्तूमधे ८००ते ९०० दुचाकी व जवळपास ३५० चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था असणार आहे. कलावंत आणि रसिकांच्या मागण्या लक्षात घेऊन एक ऐवजी आता १०००/५००/३०० इतक्या आसन क्षमतेची तीन नवीन ऑडिटोरियम उभी राहणार आहेत.

आज बालगंधर्व मधे केवळ एक ५०० फुटाचे कलादालन उपलब्ध आहे परंतू ह्याच नव्या वास्तूमधे आता सुसज्ज अशी १० हजार फुटाचे एक आणि प्रत्येकी ५ हजार फुटाची दोन अशी तीन नवीन कलादालने उभारण्यात येणार आहेत. शिवाय यात पु. ल. देशपांडे व ५४ वर्षांच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत. पुणेकरांना अभिमान वाटावा अशाच प्रकारचे नवीन बालगंधर्व रंगमंदिर आता उभे राहणार आहे.असाही दावा माजी महापौर मोहोळ यांनी केला आहे.

सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

‘सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि.7 : मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या धोरणाच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसाला हक्काचे पाणी मिळणार आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका देशात पहिली महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, नागरी निवारा परिषद गोरेगांव येथे बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील सर्व निवासी रहिवाशांसाठी असणाऱ्या “सर्वांसाठी पाणी” धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सर्वश्री सुनिल प्रभू, राजहंस सिंह, रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ.इकबालसिंह चहल आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळी “सर्वांसाठी पाणी !” धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पर्यावरणाची कमीत कमी हानी करून विकास कामे करावयाची आहेत. महानगरपालिकेची बेस्ट सेवा ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून वाहतूक,पाणी, आरोग्य सुविधा, महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा वाढविण्याच्या होत असलेल्या कामाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

सर्वांसाठी पाणी हे धोरण जाहीर करणे हा ऐतिहासिक क्षण- पालकमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई शहरामध्ये 16 विविध संस्था कार्यरत आहेत. या सर्वांना एकत्रित घेऊन मुंबई शहराला एक दिशा दिली आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण जाहीर करणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

मुंबई 24 तास काम करणारी, स्वप्न बघणारी आणि ती पूर्ण करणारी आहे. ट्रान्स हार्बर लिंक, मालमत्ता करामध्ये सूट, सर्वांसाठी पाणी असे अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांबरोबरच 2026 पर्यंत सुमारे तीन हजार इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत, असे अनेक निर्णय घेत शाश्वत विकास करत मुंबईला पुढे नेण्याचे काम होत असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

सर्वांसाठी पाणी हा कौतुकास्पद उपक्रम –प्रा. वर्षा गायकवाड

अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर पाणी ही मूलभूत गरज आहे. सर्वांसाठी पाणी हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

सर्वांसाठी पाणी धोरणाची उद्दिष्ट्ये

खासगी जमिनीवरील अघोषित झोपडपट्टीधारकांना पाणीपुरवठा करणे. तटीय नियमन क्षेत्रातील (सीआरझेड) झोपडपट्टी धारकांना सार्वजनिक नळ खांबाद्वारे पाणीपुरवठा करणे. क्षमापित निवासी इमारतींमधील अनधिकृत वाढीव बांधकामांना नळ जोडणी देणे. प्रकल्पबाधित झोपडपट्टी धारकांना पाणीपुरवठा करणे. निवासी इमारती किंवा त्यांचा काही भाग ज्याचे नकाशे मंजूर नाहीत, परंतु बांधकाम प्रारंभ पत्राशिवाय झाले आहे, त्यांना नळ जोडणी देणे ही या धोरणाची उद्दिष्टे आहेत.

इपिलेप्सी आजाराबाबत जनजागृती करण्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आवाहन

0

पालकमंत्र्याच्या हस्ते जिल्हा रुग्णलयातील मदत कक्षाचे झाले उद्घाटन

नाशिकदिनांक: 8 मे2022- इपिलेप्सी आजारावर वेळेत औषध उपचार केल्यास तो बरा होतो. म्हणून नागरिकांनी इपिलेप्सी (मिरगी) या आजाराबाबत अंधश्रद्धेला बळी न पडता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेतअसे आवाहन राज्याचे अन्न,नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज आयोजित शिबीरात केले आहे.

आज जिल्हा शासकीय रूग्णालय येथील ईपिलेप्सी आजार निदान व उपचार आयोजित शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलत ते होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुंटुबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. तर माजी खासदार समीर भुजबळजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडआरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. रघुनाथ भोयेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरातजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेरअतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीनिवाससहसंचालक डॉ. पट्टण शेट्टीइपिलेप्सी फाउंडेशनचे डॉ. निर्मल सुर्यानिवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. शरद पाटीलवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटीलन्यूरो फिजिशियन डॉ. आनंद दिवाण, यांच्यासह जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी परिचारीका व इपिलिप्सी फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणले कीकोरोना काळात डॉक्टरांनी नारिकांना आरोग्यसेवा देवून देवदूतासारखे काम केले आहे. हा आजार बरा होत असल्याने नारिकांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवून वेळेत उपचार घेण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. त्यासाठी इपिलेप्सी रुग्णांना कुठल्याही परिस्थितीत औषधे कमी पडणार नाही यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईलअसेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

इपिलेप्सी फाउंडेशनच्या वतीने डॉ.निर्मल सुर्या यांच्या माध्यमातून राज्यात 95 शिबीरे घेण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 10 शिबीरे घेऊन जिल्हा रुग्णालय व इपिलिप्सी फाउंडेशनच्या वतीने या शिबीरांच्या माध्यमातून 350 रुग्णांना मार्गदर्शन करून रूग्णांना औषध उपलब्ध करून दिली त्यासाठी मी इपिलेप्सी फाउंडेशनचे आभार मानतो. तसेच जिल्हा रुग्णालय येथे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना त्यांच्या स्थानीक भाषेत माहिती मिळावी यासाठी मदत कक्ष उभारण्यात आले असून या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी विविध कक्षांची पहाणीही केली.

इपिलेप्सी आजाराबाबत शहरी व ग्रामीण भागात करावी जनजागृती – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

इपिलेप्सी हा ग्रामीण भागातील दुर्लक्षित आजार आहे. या आजाराबाबत शहरी व ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्यात. तसेच या आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने जनजागृती करण्यासाठी अशा सेविकांचीही मदत घ्यावीअशा सुचना केंद्रीय आरोग्य व कुंटुब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी दिल्या आहेत.

यावेळी बोलतांना केंद्रीय आरोग्य व कुंटुबकल्याण राज्यमंत्री डॉ.पवार म्हणाल्या कीराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत व इपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिबिरे घेण्यात येत आहे. या शिबीरांच्या माध्यमातून या रुग्णांना मोफत औषधे व उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याने नारिकांनी त्याचा फायदा घ्यावा. तसेच इपिलेप्सी फाउंडेशनचा हा जिल्ह्यातील पायलेट प्रोजेक्ट असल्याने त्यांनी भविष्यातही असेच मार्गदर्शन करावेअशी आशाही ,केंद्रीय आरोग्य व कुंटुब कल्याण राज्यमंत्री डॉ  पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

हिमाचल प्रदेशमधल्या सिरमौरमधल्या माजरा येथे हॉकी अॅस्ट्रोटर्फची पायाभरणी

0

सिरमौर-हिमाचल प्रदेशातल्या लोकांमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नैसर्गिक गुणवत्ता आहे आणि या गुणवत्तेचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे,  असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशमधल्या सिरमौरमधल्या माजरा येथे सांगितले. इथल्या सरकारी उच्च  माध्यमिक विद्यालयामध्ये हॉकी अॅस्ट्रोटर्फच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये ते आज बोलत होते.

या हॉकी टर्फसाठी सहा कोटी रूपये खर्च करण्यात येणार असून त्यामध्ये खेळाडू मुलींसाठी वसतिगृह, इतर आवश्यक कक्ष, प्रसाधन गृहे, प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सांगून ठाकूर यांनी, गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने  राज्याच्या विविध भागामध्ये ‘टॅलेंट हंट’ सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येवू शकतील, असे सांगितले. आगामी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धां 2021 मध्ये गटका, कलारीपयट्टू, थांग-ता, मल्लखांब आणि योगासन या पाच पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. तसेच या खेळांना जागतिक व्यासपीठावर लोकप्रिय करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे नमूद केले. राज्यांमध्येही  पारंपरिक खेळांची ओळख तयार करता येऊ शकेल, असे मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. पोंता साहिब येथे इनडोअर स्टेडियम बांधण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यंदा बंगलुरू येथे अलिकडेच झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये दोन राष्ट्रीय विक्रम आणि विद्यापीठ स्पर्धांमधले याआधीचे 76 विक्रम मोडले गेले, यावरून आपल्या युवकांमध्ये असलेली क्रीडा प्रतिभा दिसून येते, असे ठाकूर म्हणाले.

जिल्हा रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते शिल्लई तहसीलमधल्या कोटा गावातल्या कुलदीप सिंग या दिव्यांगाला स्कूटी भेट देण्यात आली.

दोन दिवसांच्या दौ-यावर आलेल्या क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये अनेक कार्यक्रम झाले. अनुराग ठाकूर यांनी शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल आणि इतर मान्यवरांसह पंचकुला (हरियाणा) येथे इंद्रधनुष सभागृहामध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 च्या बोधचिन्हाचे तसेच  क्रीडा-स्पर्धागीत,  शुभंकर आणि स्पर्धांच्या जर्सीचे अनावरण केले. यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय)च्या पंजाबातल्या पतियाळा येथे नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली.

शैक्षणिक संस्था या केवळ शिक्षणाचे स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त कलागुणांना पैलू पाडत नवी झळाळी देणारे ठिकाण : राष्ट्रपती राम नाथ कोविंद

0

शैक्षणिक संस्था या केवळ शिक्षणाचे स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त कलागुणांना पैलू पाडत नवी झळाळी देणारे ठिकाण असल्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. नागपूरच्या मिहान, दहेगाव मौजा इथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या स्थायी परिसराचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते. अभ्यासक्रम हा आपल्याला आपले ध्येय, महत्वाकांक्षा याबाबत आत्मपरीक्षणाची संधी देत आपल्या स्वप्नांची पूर्तता करतो, असे राष्ट्रपती म्हणाले.


नवोन्मेश आणि उद्योजकता यांना प्रशंसेची पावती देत प्रोत्साहन देणाऱ्या युगात आपण राहत आहोत. नवोन्मेश आणि उद्योजकता या दोन्हीतही, तंत्रज्ञानाद्वारे आपले जीवन अधिक सुकर करण्याची क्षमता तर आहेच त्याचबरोबर अनेकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याचेही सामर्थ्य आहे. आयआयएम नागपूर इथली परिसंस्था, रोजगार मागणारे ऐवजी रोजगार पुरवणारे होण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


आयआयएम नागपूरने, आपल्या उद्योजकता केंद्राद्वारे आयआयएम नागपूर फौंडेशन फॉर इंट्राप्रेनरशिप  डेव्हलपमेंट (InFED) उभारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इनफेडने महिला स्टार्ट अप कार्यक्रमातून महिला उद्योजकांना यशस्वी पदवीधारक होण्यासाठी सक्षम केल्याची बाब निश्चितच अभिमानास्पद असल्याचे सांगून त्यापैकी सहा जणींनी उद्योगाचा प्रारंभ केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. असे कार्यक्रम, महिला सबलीकरणासाठी प्रभावी मंच पुरवतात.
कोणतीही गोष्ट परस्परांमध्ये वाटून घेण्याच्या, विशेषकरून ज्ञान क्षेत्रात आपल्याकडचे ज्ञान इतरांनाही देण्यावर आपल्या संस्कृतीचा नेहमीच भर राहिला आहे. म्हणूनच आपल्याकडे जे ज्ञान आहे ते सर्वांना देणे हे आपले कर्तव्य आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. आयआयएम अहमदाबादने ज्याप्रमाणे नागपूर आयआयएमसाठी मार्गदर्शन पुरवले आहे, त्याचप्रमाणे देशातल्या तंत्र, व्यवस्थापन क्षेत्रातल्या  अग्रगण्य व्यावसयिक शिक्षण देणाऱ्या संस्था अशाच संस्थांच्या उभारणीसाठी मार्गदर्शन पुरवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ज्ञान दान केल्याने, दुसऱ्याला दिल्याने  ज्ञानाची वृद्धी होते असे राष्ट्रपती म्हणाले. पुणे, हैदराबाद आणि सिंगापूर इथे उपग्रह परिसर उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयआयएम नागपूरचे अभिनंदन केले.


आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की नागपूरला शैक्षणिक, वैद्यकीय आणि लॉजिस्टिक्स केंद्र  करण्याचे स्वप्न आम्ही साकार करत आहोत. नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आय आय एम ने सहाय्य करावे. आय आय एम ने विदर्भातल्या उद्योग जगताशी समन्वय ठेवावा. विदर्भात,खनिज संसाधने, वने आणि वन्य जीव पर्यटन यामध्ये विपुल संधी उपलब्ध आहेत, असावं ते म्हणाले.


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, NEP 2020 च्या अनुषंगाने आयआयएम नागपूरने उद्योजकतेला प्रोत्साहन  देण्यासाठी आणि भारताला रोजगार निर्माण करणारे राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी नवीन मार्ग विकसित केले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये समाजाला परत देण्याची भावना रुजवण्याचे आवाहन करत प्रधान म्हणाले, ‘आयआयएमएनने विदर्भातील अविकसित भागातील  शाळा दत्तक घ्यावी आणि क्षमता निर्मिती कार्यक्रमांद्वारे तिचा कायापालट करण्याचे ध्येय बाळगायला हवे. ‘आयआयएम नागपूरचे प्राध्यापक आणि विद्यार्थी देखील या विद्यार्थ्यांना शिकवू शकतील आणि त्यांना प्रोत्साहन देऊ शकतील’, असे ते म्हणाले.
लोक आयआयएम नागपूरला भेट देऊन नागपूरचे भविष्य पाहण्यासाठी येतील. भविष्यातील जागतिक नेते घडवण्याचा वारसा या संस्थेकडे असेल अशी भावना आयआयएम नागपूरच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सी पी गुरनानी यांनी व्यक्त केली. आयआयएम नागपूरला मिहान  येथील जागेत जाण्यापूर्वी  व्ही.एन.आय. टी. ने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभारही मानले.
आयआयएम कॅम्पसच्या भेटीदरम्यान, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी राष्ट्रपतींना कॅम्पसच्या पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली. 
याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री मंत्री सुभाष देसाई, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, आयआयएम नागपूरचे अध्यक्ष सी.पी. गुरुणानी, संचालक डॉ. भीमराया मैत्री, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयआयएम नागपूर विषयी
आयआयएम नागपूरच्या 132 एकरावरच्या परिसरात पहिल्या टप्प्यात 600 विदयार्थ्यांना शिक्षण देण्याची क्षमता आहे.  यामध्ये 20 हाय-टेक खोल्या आहेत, 24 प्रशिक्षण आणि सेमिनार सभागृह आहेत. तसेच 400 आसन क्षमता असलेले संमेलन सभागृह आहे. आयआयएम नागपूरची पायाभरणी 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती.

मंदार वाकणकर यांना दुहेरी मुकुट 

पुणे, 8 मे 2022: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 40वर्षांवरील पुरुष गटात पुण्याच्या मंदार वाकणकर यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर,  35 वर्षांवरील एकेरीत आरती गणेश हिने,  45 वर्षांवरील एकेरीत जपानच्या मायुका सकाय यांनी विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 40 वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम लढतीत चौथ्या मानांकित पुण्याच्या मंदार वाकणकरने अव्वल मानांकित आदित्य खन्नाचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत याच गटात अंतिम फेरीत मंदार वाकणकरने कमलेश शुक्लाच्या साथीत स्वरणदिप सिंग दोडी व आदित्य खन्ना यांचा 6-4, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकवले. 
35 वर्षांवरील महिला गटाच्या एकेरीत आरती गणेश हिने अव्वल क्रमांक पटकावला.  तर, प्रियांका मेहता व प्रणिता पेडणेकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. दुहेरीत आरती गणेश व मायूका सकाय या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. महिला 45 वर्षांवरील एकेरीत जपानच्या मायुका सकाय हिने अव्वल क्रमांक, तर भारताच्या नंदिता नूलकर हिने दुसरा क्रमांक पटकावला.
तसेच, मंदार वाकणकर आणि मायूका सकाय यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून क्रीडा संचालक स्वर्गीय नरेंद्र सोपल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नरेंद्र सोपल स्मृती करंडक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण बाबा रॉड्रिक्स, स्पर्धा संचालक डीएस रामाराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
निकाल:40 वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी: मंदार वाकणकर(भारत)[4]वि.वि.आदित्य खन्ना(भारत) [1]6-4, 6-4;  दुहेरी:40 वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी: कमलेश शुक्ला(भारत)/मंदार वाकणकर(भारत)[2]वि.वि.स्वरणदिप सिंग दोडी(भारत)/आदित्य खन्ना(भारत)[1]6-4, 6-2; महिला 35 वर्षांवरील एकेरी: 1. आरती गणेश(भारत). 2.प्रियांका मेहता(भारत), 3.प्रणिता पेडणेकर(भारत);
महिला 35 वर्षांवरील दुहेरी गट: 1. आरती गणेश(भारत)/मायूका सकाय(जपान); 2.प्रियांका मेहता(भारत)/प्रणिता पेडणेकर(भारत) महिला 45 वर्षांवरील एकेरी:  1. मायुका सकाय(जपान), 2.नंदिता नूलकर(भारत). 

राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेतील विजेत्यांचा सुभाष घई यांच्या हस्ते गौरव

पुणे-
बालकांप्रमाणे सतत काही ना काही शिकण्याची इच्छा आपल्यात पाहिजे. कितीही प्रगती केली तरी शिकण्याची भूक कायम असली पाहिजे कारण शिकणे बंद झाले तर प्रगती देखील संकुचित होऊन बसेल. कोणतेही काम करताना त्यात सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. इतरांपेक्षा वेगळा विचार करून आपण आपली कलाकृती निर्माण करा. आज प्रत्येकजण शिक्षण घेत आहे, परंतु त्यातील एकालाच पदक मिळते, कारण त्याने इतरांपेक्षा वेगळा विचार केलेला असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट शिका आणि ती गोष्ट अफलातून करा तरच यश मिळेल, असे प्रतिपादन मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल कौन्सिलचे अध्यक्ष आणि भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांनी केले.   

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि नव उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेत पुणे येथील डिजाईन स्किल अकादमीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी करत विजेतेपद पटकाविले. मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल कौन्सिल आणि डिजाईन स्किल अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या सर्व विजेत्यांचा गौरव सुभाष घई यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी डॉ. आशिष कुलकर्णी (अध्यक्ष, एफआयसीसीआय. एव्हीजीसी.), मोहित सोनी (सीईओ, मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल कौन्सिल ), डिझाईन स्कूल अकादमीचे संस्थापक सतीश नारायणन व संचालिका श्रीदेवी सतीश, जे पी सराफ, राहुल बन्सी, संतोष रासकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

सतीश नारायणन म्हणाले, ऍनिमेशन क्षेत्रात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. पाच वर्षांपूर्वी १५% असलेली वाढ आता ४५% पर्यंत येऊन पोहोचली आहे. याशिवाय हॉलिवूड इंडस्ट्री आता ऍनिमेशनसाठी भारतीय कौशल्यांकडे आकर्षित होताना दिसून येत असल्याने या क्षेत्रात कुशल डिझाईनरची आवश्यकता आहे. हीच बाब विचारात घेऊन आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या जागतिक ऍनिमेशन स्पर्धांसाठी तयार करत आहोत जेणेकरून त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल तसेच त्यांना जागतिक पातळीवर व्यासपीठ देखील मिळेल.

डॉ. आशिष कुलकर्णी म्हणाले, ऑलिंपिक स्पर्धांमध्ये विविध खेळ असतात, परंतु कौशल्य स्पर्धेत खेळ नसून यात ग्राफिक डिझायन, अनिमॅशन, ३ डी गेम डिझाईन आदी प्रकार असतात. या स्पर्धेत यश मिळविण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. ध्येयापासून तुम्ही कधी विचलित होऊ नका. योग पद्धतीने नियोजन केल्यास नक्की यश मिळते.

श्रीदेवी सतीश म्हणाल्या, जागतिक स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी आमच्या विदयार्थ्यांसाठी आम्ही २०१२ पासून प्रशिक्षण देत आहोत. रशिया येथील कझानमध्ये २०१९ साली झालेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेत आम्ही कांस्यपदक पटकविले होते. भारतीयांसाठी हा सर्वात मोठा  अभिमानाचा क्षण होता. याच वर्षी झालेल्या सरकारच्या भारत कौशल्य आणि राज्य कौशल्य स्पर्धेत डिझाईन स्किल्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे. येत्या ऑक्टोबर २०२२ मध्ये चीन येथील शांघायमध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी आमचे विदयार्थी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत, आणि आम्हाला विश्वास आहे कि ते या जागतिक स्पर्धेत उतुंग कामगिरी करत भारतासाठी पदक घेऊन येतील. 

————–
इंडिया स्किल स्पर्धेत विजयी झालेले उमेदवार

३ डी डिजिटल गेम आर्ट 
१) पंकज सिंग – सुवर्ण पदक
—-
ग्राफिक डिझाईन टेक्नोलजी
१) उत्सव सिंग – सुवर्ण पदक
२) स्टीव्हन हॉरीस – रौप्य पदक
३) वाघिशा जैन – कांस्य पदक
——-
ज्युनिअर (१९ वर्षा खालील)
ग्राफिक डिझाईन टेक्नोलॉजी  
१) किमया घोमण – कांस्य पदक

जर तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार; संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई: आपल्याकडे विरोधकांना बदनाम करण्याची सुरुवात झाली ती हिटलरनीती आहे. विरोधक आपल्याला बदनाम करायला लागले, पण आपण नैतिकता सांभाळत बसलो, पण तुम्ही जर नैतिकता सांभाळत नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलचा मेळावा मुंबईत आयोजित केला होता. त्यामध्ये ते बोलत होते.

जे शिवसेनेच्या अंगावर आले, त्यांना डम्पिंगमध्ये फेकून दिले आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. मुंबईत शिवसेनेच्या सोशल मिडीयाच्या मेळाव्यात ते बोलत होते. ताकद शिवसेनेचे आहे, आणि शिवसेनेचीच राहणार असे म्हणत विरोधकांना थेट इशारा दिला आहे. तर सोशल तितकेच काम करा असा टोला राणा दाम्पत्याला लगावला आहे.

बाळासाहेबांचा फेस हेच त्यावेळचे देशाचे राजकारण होते. ते तरूणाचे नेते होते, त्यामुळेच देशातील सर्व भाषांमध्ये सामनाचे अनुवादन करावे लागते. शिवसेना ही देशातील राजकारणाचा ब्रँड आहे. असे म्हणत शिवसेनेची ताकद कुणी विसरू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

हिटलरच्या आणि मोदींच्या प्रचारात साम्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलर यांच्या प्रचारात अनेक साम्य आहे. मोदी पूर्णपणे हिटलरला फॉलो करतात असा दावा संजय राऊतंनी केला आहे. हिटलरच्या काळातही विरोधकांना बदनाम करण्यात येत होते. तर आताही विरोधकांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. हिटलर प्रमाणे मोदीही अनेक इव्हेंट करतात. असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केला आहे.

नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा अधिकार

उत्तर प्रदेशात भाजपकडून विषारी प्रचार करण्यात आला. मात्र तुम्ही निवडणुकांच्या वेळेस नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा आम्हाला अधिकार आहे. राहूल गांधींची प्रतिमा मलिल करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. गेली अनेक दिवस विरोधी पक्षांच्या विरोधातील पोस्ट करण्यासाठी पैसै दिले जातात असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

सोमय्या बाप बेटे जेलमध्ये जाणारच

आयएनएस घोटाळा प्रकरणात भाजपचे नेते करीट सोमय्या यांनी पैसा गेाळा केला आणि तो कुठे गेला याची काही माहिती नाही. असे म्हणत त्या प्रकरणात कोर्टाने सध्या जामीन दिला असला तरी ते न्यायालयात जाणारच असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले शिवसेना नेते संजय राऊत

  • सुशांतसिंग, कंगना राणावत प्रकरणात आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले.
  • गांधीजींनी परदेशी कापडांची होळी केली. गांधींजींचे नारे त्यांची शब्दांची रचना लोकांना पटकन पटणारी होती.
  • बाळासाहेब ठाकरे हे तरूणांचे नेते होते
  • आपल्या चेहऱ्यावर पराभव दिसणे, हाच आपला पहिला पराभव
  • महाराष्ट्रात शिवसेनेशी लढणे तितके सोपे नाही
  • आम्हाला जे करायचे ते आम्ही केले, म्हणून 170 आमदार शिवसेनेच्या पाठिमागे उभे राहिले
  • असली नकली ठाकरे कोण हे लोकांना माहितीये, आणि तशी पोस्टर जनतेने जावली आहेत

युवासेनेच्या सोशल मिडीयाच्या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी मनसे, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलरमध्ये बरेच साम्य असल्याचा टोलाही लगावला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे हे नकली ठाकरे असून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच असली आहेत असे पोस्टर जनतेने आयोध्येत लावले आहे. अशी जहरी टीका राज ठाकरेंवर केली आहे.

लग्न भाजपशी ठरलं, पण शिवसेना राष्ट्रवादीसोबत पळून गेली, मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव यांनी आम्हाला सोडलं

जालना -”लग्न आमच्याशी ठरले होते पण शिवसेना राष्ट्रवादी अन् काॅंग्रेससोबत पळुन गेली. स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडलं अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.”आम्ही त्यांना युतीतून बाहेर काढले की ते स्वतःच पळून गेले, याचा निर्णय आता जनतेने करायला हवा” असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही टीका केली आहे.

युपीमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याआधी, ‘असली आ रहा है नकली से सावधान’ असे बॅनर लावण्यात आले आहे. यावर बोलताना कोण असली आणि कोण नकली याचा फैसला करण्याचा अधिकार मतदाराला आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनताच याचा फैसला करेल, असा पलटवार रावसाहेब दानवेंनी केला आहे. तर इम्पेरिकल डाटाशी केंद्र सरकारचा काही संबंध नाही, न्यायालयाने हा डाटा द्या अशी कोणतीही सुचना केली नाही. कोर्टाने जेव्हा राज्य सरकारकडे इम्पेरिकल डाटा मागत आहे. तेव्हा ती राज्य सरकारची जबाबदारी आहे.

हे राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरलेले आहे. वीज प्रश्न, कोविडचा काळ, मराठा आरक्षण, धनगर किंवा ओबीसींचे आरक्षण असू द्या, सर्वच ठिकाणी ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे अशी टीका रावसाहेब दानवेंनी केली आहे. ओबीसीवर अन्याय करणे हे राज्य सरकारचे धोरण आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर

युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून सुरू असलेल्या,’ असली आ रहा है नकली से सावधान’ या बॅनरबाजीवर रावसाहेब दानवेंनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अच्छे दिनाच्या वक्तव्यावर देखील दानवेंनी टीका केली आहे.

जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मतदान केले होते. मात्र शिवसेनेने धोका देत सत्तेसाठी भाजपला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेली असा आरोप दानवेंनी केला आहे. मुख्यमंत्री झाले, तुम्हाला तर अच्छे दिन आले. मात्र त्यामुळे राज्यातील 12 कोटी जनतेला बुरे दिन आले, असा टोला दानवे यांनी लगावला.