अमरावती, दि. 08 :- चिखलदरा येथील गाविलगड परिसरात आगीमुळे वनाचे नुकसान झाले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण शोधून वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, तसेच नुकसानग्रस्त भागात पुन्हा झाडे लावून हिरवाई निर्माण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
चिखलदरा येथे गाविलगड परिसरात आग लागून झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि.प अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह वनाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दुर्घटनेची कारणमीमांसा करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. नेमके किती नुकसान झाले हे तपासावे. आवश्यक तिथे कारवाई व्हावी त्याचप्रमाणे, येथे पुन्हा हिरवाई निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व्हावी. ही कामे ‘मनरेगा’च्या माध्यमातून राबवावीत जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळू शकेल. या दृष्टीने आवश्यक कामांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यापुढे पुन्हा अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे वनविभागाने काटेकोर तपासणी, नियंत्रण व आवश्यक कार्यवाही नियमितपणे करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पर्यावरणप्रेमी ,नागरिक राजकारणी सारे एकवटले….म्हणाले, हे तर रामनदी च्या पूर रेषेत अतिक्रमण महापालिकेचेच …
पुणे- चांदणी चौकाकडून मुळशीला जाणाऱ्या पौड रस्त्यावर एकीकडे महापालिका प्रशासनाने ,कचरा डेपो, कचरा संकलन केंद्र ,कचरा हस्तांतरण केंद्र अशा तीन नावाने सोयीचा अर्थ काढीत कचरा डेपोचे काम सुरु केल्याने या परिसरातील नागरिकांत असलेले असंतोषाचे वातावरण आज रस्त्यावर पोहोचले भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत , माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील तसेच अल्पना वर्पे, किरण दगडे यांच्यासह या भागातील नागरिक, पर्यावरण प्रेमी यांनी आज कचरा प्रकल्पाचे काम सुरु आहे त्या समोरच प्रचंड मोठी मानवी साखळी करून भर उन्हात आपला तीव्र विरोध प्रगट केला . लोकशाही मार्गाने महापालिका प्रशासकाला जाग आली नाही तर त्याची जबाबदारी त्यांच्यावरच राहिल असाही इशारा यावेळी झालेल्या सभेतून देण्यात आला .
नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून , पुणे मनपाच्या मुख्य सभेत माहे डिसेंबर चा मान्य ठराव क्र.752 च्या अनुषंगाने स.नं. 64 , बावधन खुर्द येथील नियोजित कचरा हस्तांतरन केंद्र चा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून याठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्र प्रकल्प उभारण्याकरिता स्थानिक नागरिकांचा याबाबत तीव्र विरोध आहे. तरी सुद्धा याठिकाणी प्रशासक हे हटवादी भूमिका घेऊन कचरा हस्तांतरन केंद्र प्रकल्प उभारत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले या भागातील नागरिकाच्या हितासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही यश मिळे पर्यंत हे आंदोलन सुरु ठेऊ आता हे आंदोलन आम्ही कोणत्याही परिस्थितीत थांबविणार नाही .नगरसेवक दिलीप वेडेपाटील म्हणाले की,पुण्याची दुर्लक्षित 19.2 किमी लांबीची राम नदी पुनरुज्जीवित व्हावी, यासाठी सातत्याने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे, की जेथे नदीला आपण ‘माता’ म्हणतो. परंतु, दुर्दैवाने आपले आचरण नेमके विरुद्ध राहिले आहे. पुण्याचा विचार केला तर भावी पिढ्यांसाठी अविरल व निर्मल वाहणारी नदी म्हणून राम नदी असावी, हा आमचा ध्यास आहे आणि त्यासाठी कार्यरत राहण्याचा आमचा निर्धार आहे. भुकूम येथील रामेश्वर मंदिरापासून उगम पावणारी राम नदी भूगाव,बावधन, पाषाण, औंध मार्गे बाणेर येथे मुळा नदीला मिळते. आमच्या ‘राम नदी पुनरुज्जीवन संकल्पा’स धक्का बसला, जेंव्हा 10 मार्च 2022 रोजी मौजे बावधन खुर्द येथील स.नं.६४ येथे रामनदी किनारी कचरा संकलन केंद्राचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. वास्तविक पाहता यापूर्वी प्रस्तुत प्रकल्प सस्थानिकांचा विरोध व मी नगरसेवक असताना सादर केलेल्या प्रस्तावामुळे 29 डिसेंबर 2021 रोजी रद्द करण्यात आला होता आणि तशी नोंद पुणे मनपाच्या ठरावात नमूद आहे. बावधन कचरा संकलन केंद्राचे काम थांबवावे, यासाठी आम्ही पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याशी पत्रव्यवहार केला; पण त्यास कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. कचरा संकलन केंद्राचा स.नं.६४ राम नदीच्या पूररेषेत येतो. असे असताना तेथे काम कसे होऊ शकते ? याच जागेत सुमारे ६०० फुटांचा नदी किनारा असल्यामुळे राम नदी प्रदूषित होणार. मध्यम प्रमाणात पाऊस झाल्यास या प्रकल्पात पाणी शिरणार आहे. यामुळे जमीनिखालून वाहणाऱ्या नदीचे आणि पर्यायाने काठावरील हजारो नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रशासनाचा का आग्रह आहे ? हे आम्हांस आजही कळत नाही. कोथरूड , वारजे, शिवणे इ. गावांमधून कचरा गोळा करायचा, तो सुमारे १०० वाहनांमधून येथे आणायचा आणि १०० वाहनांमधून तो कात्रज, कोंढवा इ. वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा, हा नियमित कर भरणाऱ्या आम्हा नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आहे. या प्रकल्पाशेजारी डीपी रोड आहे आणि दुसऱ्या बाजूला कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. वाढत्या नागरिकीरणामुळे या रस्त्यावर आधीच वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. त्यात या २०० वाहनांची रोज ये – जा केल्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हे प्रकल्पीय ठिकाण हे पुणे शहराच्या पश्चिम भागात येते. पश्चिमेकडून पूर्व दिशेस वाहत असणाऱ्या वाऱ्याने संपूर्ण पुणे शहरात दुर्गंधी व रोगराई पसरून प्रादुर्भाव होवू शकतो. कचरा हस्तांतरण केंद्र प्रकल्प रद्द करण्याचा ठराव महापालिकेने मान्य केला असूनही जर याठिकाणी हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास या परिसरातील नागरिकांच्या रोषास पुणे महापालिकेला सामोरे जावे लागेल व या परिसरातील नागरिकांसह पुणे महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र जन-आंदोलन करण्यात येईल तसेच चांदणी चौकातून एकही पुणे मनपा ची कचरा गाडी या प्रकल्पाकडे येवू देणार नाही असा इशारा माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनास दिला.
या पूर्वी प्रस्तुत प्रकल्प, स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला होता -निकिता सणस
यावेळी बोलताना भूगावच्या सरपंच निकिता सणस म्हणाल्या की, ”दिनांक १० मार्च २०२२ रोजी मौजे बावधनखुर्द येथील सर्व्हे नं. ६४ येथे, राम नदी किनारी कचरा संकलन केंद्राचे काम पुन्हा सुरू करण्यात आले, हे दुर्दैवी आहे. वास्तविक पहाता या पूर्वी प्रस्तुत प्रकल्प, स्थानिकांच्या विरोधामुळे २९ डिसेंबर २०११ रोजी रद्द करण्यात आला होता आणि तशी नोंद पुपो म.न.पा.च्या ठरावात नमूद आहे.
”राम नदी प्रदुषित होणार – वीरेंद्र चित्राव
तसेच किर्लोस्कर वसुंधरा, रामनदी रीस्टोरेशनचे वीरेंद्र चित्राव म्हणाले की, ”प्रस्तुत कचरा संकलन केंद्र राम नदीच्या पूररेषेत येते. याच जागेत सुमारे ६०० फूटाचा नदी किनारा असल्यामुळे राम नदी प्रदुषित होणार आहे.
”नियमित कर भरणाऱ्या आम्हा नागरिकांच्या पैशाचा अपव्यय – सुवर्ण आंग्रे
भुकूमच्या सरपंच सुवर्णा आंग्रे म्हणाल्या की, ”वारजे, शिवणे इ. गावांमधून कचरा गोळा करायचा, तो सुमारे १०० वाहनांमधून येथे आणायचा आणि पुन्हा १०० वाहनांमधून तो कात्रज, कोंढवा इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊनजायचा, हा नियमित कर भरणाऱ्या आम्हा नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आहे‘
बावधन कचरा डेपो हटाव’ मानवी साखळीस या संस्थांनी दर्शवला पाठिंबा
–‘बावधन कचरा डेपो हटाव’ मानवी साखळीस किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पूनरुजीवन, एकोलोजिकल सोसायटी, जीवितनदी, जलबिरादरी, वसुंधरा स्वच्छ्ता अभियान, मिशन ग्राउंड वॉटर, जलदेवता सेवा अभियान, पराडकर फाउंडेशन, सागर मित्र, उदय काळ फाउंडेशन, सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान, सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, एकोलोजी फाउंडेशन, सह्याद्री फाउंडेशन, लायन्स डिस्ट्रिक्ट 3234, लायन्स क्लब पुणे इको फ्रेंड, उमा फाउंडेशन, कम्युनिटी डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर आणि धार फाउंडेशन या संस्थांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या राजर्षी शाहूंच्या विचारांनी सांस्कृतिक कार्य विभाग कार्यरत
कोल्हापूर चित्रनगरी चित्रीकरणाचं आधुनिक स्थळ बनवण्यासाठी निधी देणार
लोकाभिमुख, कलाभिमुख, कलाकाराभिमुख सांस्कृतिक धोरणासाठी प्रयत्न
मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळवून देणार
कोल्हापूर: मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करण्यासाठी तसेच कोल्हापूर चित्रनगरी चित्रीकरणाचं आधुनिक स्थळ बनवण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे १०१ वे स्मृती वर्ष तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षास अभिवादन करुन हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झाला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात या स्पर्धा होत आहेत.
विशेष वेशभूषा केलेले कलाकार व धनगरी ढोल ताशा व विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात अतिथी व प्रेक्षकांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, सिने कलाकार किशोर कदम, परीक्षक, नाट्य कलाकार, प्रेक्षक उपस्थित होते.
कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी १७.१० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून सन २०२२- २०२३ साठीही ७ कोटी रुपयांच्या निधीची भरीव तरतूद करुन दिली आहे. कोल्हापूर चित्रनगरीच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी पहिल्यांदाच उपलब्ध झाला आहे. यापुढेही कोल्हापूर चित्रनगरी नावारुपाला येण्यासाठी अधिकाधिक निधी देण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
श्री देशमुख म्हणाले, हीरकमहोत्सवी राज्य नाट्यस्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक जिल्ह्यांची मागणी असताना देखील राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सुरु असल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आग्रहास्तव कोल्हापूरमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांना कोल्हापूरकर निश्चितच भरभरुन प्रतिसाद देतील. कलेला राजाश्रय देण्याचे शाहू महाराजांचे कार्य पुढे घेवून जाण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध कला आणि कलाकारांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्यात येत आहे. कलागुणांच्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून कलाकारांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येताहेत. अधिक लोकाभिमुख, कलाभिमुख आणि कलाकाराभिमुख सांस्कृतिक धोरण बनवण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा भर आहे. मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून थिएटर पॉलिसी तयार करण्याचाही राज्य शासनाचा विचार आहे. तालुक्यातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर सांस्कृतिक संकुल बनायला हवे, असे सांगून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा तयार करण्यासाठीही प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवडलेल्या कलाकारांचे ऑडिशन घेऊन त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने प्रयत्न करावेत, असे सांगून या मंचावरून दिग्गज कलाकार घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कलाकारांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासारख्या वास्तू राज्याच्या कानाकोपऱ्यात उभ्या रहाव्यात. कोल्हापूर निसर्ग संपन्नतेने नटलेला असल्यामुळे अनेक मालिकांचे आणि चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी होत आहे. यातून सुमारे 5 हजार रोजगार निर्मिती होत असून आणखी वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. मुंबई, चेन्नई, हैद्राबाद अशा देशभरातील कलाकार कोल्हापूरमध्ये येण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. यादृष्टीने कोल्हापूर हून मुंबई, हैद्राबाद, चेन्नई या विमानसेवा नियमित सुरु राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील दुर्मिळ वाद्य हा राज्याचा ठेवा असून दुर्मिळ वाद्यांचे जागतिक पातळीवरील संग्रहालय बनायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विकासासाठी पुरातत्व विभागानेही निधी द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. अनेक कलाकारांना राजदरबारात राजाश्रय दिला म्हणूनच कोल्हापूर ही कलानगरी म्हणून ओळखली जाते. शाहू महाराजांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील. भालजी पेंढारकर, व्ही शांताराम यांचा वारसा कोल्हापूरला लाभला आहे. विविध मालिकांचे, चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापुरात होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा ठिकाणी कलाकारांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोल्हापूरला भरभरून मदत दिली असल्याचे सांगून कोल्हापूर चित्रनगरीला वैभव मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री पाटील यांनी केली.
राज्य नाट्य स्पर्धेस शास्त्रीय संगीत व शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित पोवाड्यातून शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा देत सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
पुणे,६ मे ,२०२२ : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे ला लागून) हे महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ आहे ज्याची स्थापना सर्व वयोगटातील आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील तरुणांना रोजगारक्षम आणि स्वयंरोजगार करण्यायोग्य बनविण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. या विद्यापीठाने आपल्या कम्युनिटी कॉलेजच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी मदत केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने, माननीय महापालिका आयुक्त राजेश पाटील (आय.ए. एस.) यांच्या नेतृत्वाखाली कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना आधार देण्यासाठी ‘उमेद जागर’हा कार्यक्रम सुरू केला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत, पीसीएमसी मधील या महिलांना मोफत कौशल्य कार्यक्रम उपलब्ध करून देत आहे आणि त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. ‘उमेद जागर ‘ कार्यक्रमांतर्गत कोविड मुळे झालेल्या विधवांचा कौशल्य विकास करण्यासाठी आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि पीसीएमसी हे एकत्रित आले आहेत. या कार्यक्रमांतर्गत १५० हून अधिक महिलांना टेलरिंग, सौंदर्य एवं निरोगीपणा आणि हर्बल उत्पादने बनवण्यासारख्या व्यवसायांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे त्या स्वावलंबी झाल्या आहेत आणि त्या आपले जीवन आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जगत आहेत. माननीय डॉ. वीरेंद्र कुमार, ( सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री) यांनी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अशा महिलांना प्रमाणपत्र प्रदान केले. या कार्यक्रमाला राजेश पाटील (आय.ए. एस.) , माननीय महापालिका आयुक्त, पीसीएमसी, डॉ. एस बी मुजुमदार, कुलपती, (एस.एस.पी.यू), डॉ. स्वाती मुजुमदार, प्रो-चान्सलर, (एस.एस.पी.यू ), आणि डॉ. अश्विनी कुमार शर्मा, कुलगुरू, (एस.एस.पी.यू ) हे देखील उपस्थित होते. डॉ. स्वाती मुजुमदार, प्रो-चान्सलर सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांनी महिलांच्या कौशल्य विकासावर आणि कोणत्याही संकटाला तोंड देताना महिलांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगता यावे यावर भर दिला. या महिलांनी तयार केलेली उत्पादने खरेदी करण्यासाठी आम्ही उद्योगाशी सहकार्य करून लघु उद्योजकतेला चालना देण्यासाठी एक अनोखा आदर्श निर्माण केल्याचे त्या म्हणाल्या. समाजाला परत देऊ शकण्याचा आणि महिला सशक्तीकरण इकोसिस्टममध्ये योगदान देऊ शकण्याचा आम्हांला आनंद आहे असे त्यांनी नमुद केले.” “आमचा ठाम विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे. कोविडने नागरिकांच्या जीवनात असंख्य आव्हाने निर्माण केली आहेत आणि अनेक कुटुंबांना आर्थिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे त्रास सहन करावा लागला आहे. अशा उदात्त कारणासाठी एकत्र आल्याबद्दल आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी निर्माण केल्याबद्दल मी सिंबायोसिस आणि पीसीएमसीचे अभिनंदन करतो. हा कार्यक्रम आणखी वाढेल आणि उन्नतीची गरज असलेल्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल अशी माझी इच्छा आहे”असे मत या प्रसंगी डॉ वीरेंद्र कुमारजी , (माननीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, भारत सरकार) यांनी व्यक्त केले.
राजेश पाटील (आयएएस), माननीय महापालिका आयुक्त म्हणाले, “उमेद जागर हा महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीकोनासह देशातील एक प्रकारचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासह, आम्ही पारंपारिक आर्थिक सहाय्य मॉडेलच्या पलीकडे गेलो आणि अधिक शाश्वत समर्थन यंत्रणा लागू केली आहे, ज्यामुळे महिलांना स्वतःचे सन्माननीय जीवनमान मिळू शकले आहे” उमेद जागर या कार्यक्रमातील महिला आज बचत गट, सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीने त्यांच्यासाठी आणलेल्या छोट्या व्यवसायाच्या संधी आणि हाताने बनवलेल्या हर्बल उत्पादनांच्या विक्रीतून आपला उदरनिर्वाह करत आहेत . सिंबायोसिस स्किल युनिव्हर्सिटी देखील त्यांची उत्पादने त्यांच्या उद्योग भागीदार आणि विद्यार्थ्यांकडे घेऊन जाते जेणेकरून महिलांना त्यांचे जीवनमान मिळावे. हे कौशल्य प्रशिक्षण आणि उपजीविका मॉडेल वेगाने विकसित होत आहे आणि साथीच्या रोगाने प्रभावित कुटुंबांच्या जीवनावर खूप सकारात्मक प्रभाव पाडत आहेत.
मुंबई-“भारतातील सामान्य गुंतवणूकदारांनी विशेषत्वाने गेल्या दोन वर्षांत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. एफपीआय प्रमाणे न वागता समर्थपणे उभे राहून आणि धक्के सहन करणारी यंत्रणा म्हणून ते काय करू शकतात हे त्यांनी जगाला हे दाखवून दिले आहे” अशा शब्दात देशाच्या किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारात दाखविलेल्या अमर्याद विश्वासाचे कौतुक करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे भाषण सुरु केले. देशातील सर्वात मोठी भांडार संस्था असलेल्या एनएसडीएल अर्थात राष्ट्रीय सुरक्षा ठेव मर्यादित या संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
किरकोळ गुंतवणूकदारांचे आभार व्यक्त करत त्या म्हणाल्या, “वर्ष 2019-20 मध्ये दर महिन्यात सरासरी 4 लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली. 2020-21 मध्ये या संख्येत तिपटीने वाढ होऊन ती दर महिन्याला 12 लाख इतकी झाली आणि आता आणखी वाढ दर्शवत 2021-22 मध्ये दर महिन्याला सुमारे 26 लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत.”
केंद्रीय अर्थमंत्री, सेबीचे अध्यक्ष मधाबी पुरी बूच आणि महाराष्ट्र मंडळाच्या मुख्य पोस्टमास्तर जनरल वीणा रामकृष्ण श्रीनिवास यांच्या उपस्थितीत आज एनएसडीएलने भारतीय भांडवली बाजारातील सेवेची 25 वर्षे साजरी केली.
मार्केट का एकलव्य
या सोहोळ्याचा भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी ‘मार्केट का एकलव्य’ हा हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रमाची सुरुवात केली. या ‘मार्केट का एकलव्य’ कार्यक्रमातून तुम्ही आर्थिक साक्षरतेची गरज असलेल्या अनेकांपर्यंत पोहोचू शकता. सध्या लोकांमध्ये बाजाराविषयी गोष्टी जाणून घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे, तेव्हा असा मंच सुरु करण्याची ही अत्यंत योग्य वेळ आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी एनएसडीएलने अत्यंत उत्तम दृष्टीकोन ठेवला आहे,”त्या म्हणाल्या. हा उपक्रम इतर जागतिक भाषांमध्ये राबवून त्याला जागतिक पातळीवर न्यावे अशी सूचना देखील त्यांनी केली. “अशा मार्गांनी आपण पंतप्रधान मोदी यांचे भारताला विश्वगुरु करण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात साकारू शकतो. जर हा कार्यक्रम अनेक भाषांमध्ये राबविला गेला तर जगभरात असे अनेक युवक असतील ज्यांना याचा मोठा लाभ होईल.” केंद्रीय अर्थमंत्री पुढे म्हणाल्या.
‘मार्केट का एकलव्य (भांडवली बाजाराचा एकलव्य) याचे उद्दिष्ट भांडवली बाजारातील मूलभूत गोष्टींचा परिचय करून देणे आणि विद्यार्थ्यांना आर्थिक बाजारपेठेचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने देणे हे आहे.
देशातील फिनटेक कंपन्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल आणि भारत या क्षेत्रात बजावत असलेल्या आघाडीच्या भूमिकेबद्दल श्रीमती. सीतारामन यांनी माहिती दिली. “फिनटेकमधील स्टार्टअप्स आज वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करत आहेत,” असे सांगत त्यांनी प्रशंसा केली. आमच्या फिनटेक कंपन्यांच्या यशाकडे जगभरातील गुंतवणूकदार कशा प्रकारे लक्ष देत आहेत, हे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
‘माय स्टॅम्प’ या विशेष कव्हरचे प्रकाशनही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी केले आणि भारतीय भांडवली बाजाराच्या विकासात राष्ट्रीय प्रतिभूती भांडार लिमिटेड (एनएसडीएल,NSDL) देत असलेल्या योगदानाचा त्यांनी गौरव केला. प्रमुख पोस्टमास्टर जनरल, श्रीमती वीणा रामकृष्ण श्रीनिवास यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.
डीएलटी ब्लॉकचेन तंत्रज्ञान
भारतीय प्रतिभूती आणि नियामक मंडळ (सेबी SEBI) अध्यक्ष, माधवी पुरी बुच यांनी डिबेंचर कोव्हेनन्ट मॉनिटरींगसाठी असलेल्या एनएसडीएलच्या डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) ब्लॉकचेन मंचाचे अनावरण केले.
‘डीमॅट’ क्रांती ही संपूर्ण बाजारपेठेने स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाची पहिली पायरी होती. आम्ही बाजारात डीएलटीच्या वापराच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत आहोत, म्हणून हा दिवस संस्मरणीय दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल, असे सेबीच्या अध्यक्ष यावेळी म्हणाल्या.
संपूर्णपणे पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, आणि डिबेंचर मधील गुंतवणूकदारांच्या शुल्काची नोंद ठेवण्यासाठी त्यांना एकाच मंचावर आणत, तसेच मालमत्ता कव्हर रेशो जारी करण्याच्या विविध करारांचे निरीक्षण करत, भांडवली बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी, डीएलटी ब्लॉकचेनची सुरुवात करण्यात आली आहे. एनएसडीएलचा दावा आहे, की यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत, विविध बाँड इन्शुरन्स कराराच्या सुरक्षित देखरेखीसाठी महत्त्वपूर्ण बाजार पायाभूत सुविधा तयार करण्यात येत असून त्यायोगे डिपॉझिटरी एक पाऊल पुढे जाईल.
डिपॉझिटरीद्वारे विशेषत: नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेगाने होत असलेल्या प्रगतीचे सीतारामन यांनी कौतुक केले. एनएसडीएल आपल्या ‘तंत्रज्ञान, विश्वास, आणि व्याप्ती’ या बोधवाक्याच्या कसोटीवर खरे उतरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एनएसडीएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, पद्मजा चंद्रू म्हणाल्या “एनएसडीएल ने 1996 मध्ये भारतात पहिले डीमॅट उघडले. एनएसडीएलची संपूर्ण भारतामध्ये 57,000 सेवा केंद्र आहेत. त्यात 27 दशलक्षाहून अधिक डिमॅट खाती आहेत आणि त्यातील ठेवींचे मूल्य 4 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असून; लवकरच ते 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल”.
कार्यक्रमादरम्यान एनएसडीएलच्या गेल्या 25 वर्षांच्या वाटचालीवर एक चित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यक्रमात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.
एनएसडीएल (www.nsdl.co.in ) ही भारतातील पहिली आणि जगातील अग्रगण्य सेंट्रल सिक्युरिटीज डिपॉझिटरीजपैकी एक आहे. डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणे (होल्डिंग) आणि हस्तांतरीत करणे (ट्रान्सफर) याद्वारे भारतीय सिक्युरिटीज बाजाराचा कायापालट करण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डीमॅट मालमत्तेच्या मूल्यामध्ये एनएसडीएलचा बाजारातील हिस्सा 89% पेक्षा जास्त आहे. एनएसडीएल डिमॅट खाती देशातील 99% पेक्षा जास्त पिन कोडमध्ये आणि जगभरातील 167 देशांमध्ये स्थित आहेत, जी एनएसडीएल ची व्याप्ती दर्शवते.
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 साठीचे बोधचिन्ह, प्रेरकगीत आणि जर्सी यांचे आज पंचकुला येथे अनावरण
मुंबई-
चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे, देशातील साडेआठ हजार क्रीडापटूंचे पथक सहभागी होणार आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या स्पर्धांसाठीचे आज पंचकुला येथील इंद्रधनुष प्रेक्षागृहात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 साठीचे बोधचिन्ह, प्रेरकगीत, जर्सी आणि शुभंकर यांचे अनावरण केले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 2% लोकसंख्या असलेल्या हरियाणा राज्यातील खेळाडूंनी अनेक क्रीडास्पर्धांमध्ये देशाला मोठ्या प्रमाणावर पदके मिळवून दिली आहेत. केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री रत्तन लाल कटारिया यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला, हरियाणा विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता, हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग, हरियाणाचे मुख्य सचिव संजीव कौशल आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पारंपरिक खेळांच्या संरक्षणावर भर देत केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की गटका, कलरीपयटू, थंग-ता, मल्लखांब आणि योगासने हे पारंपरिक क्रीडाप्रकार आगामी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021मध्ये समाविष्ट असतील. ते म्हणाले की, युवा क्रीडास्पर्धा आणि नुकत्याच संपलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यांच्यामुळे युवकांना भविष्यात अधिक मोठी उद्दिष्ट्ये साध्य करण्याची प्रेरणा मिळेल. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री म्हणाले की, क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी करून दाखवावी यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
आपले राज्य या क्रीडास्पर्धांसाठी संपूर्णपणे सज्ज आहे असे सांगून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी आपल्या राज्याला खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021चे यजमानपद भूषविण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. हे राज्य केवळ देशासाठी अन्नधान्याचेच उत्पादन करत नाही तर राज्यातील खेळाडू देशासाठी पदके देखील जिंकून आणतात असे ते म्हणाले. आपल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी खेळ उत्तम ठरतात असे ते पुढे म्हणाले.
‘जया नावाचे काळवीट आणि विजय नामक वाघ’ हे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठीचे शुभंकर आहेत तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 साठी हरीयाणाचा ‘धाकड’ हा शुभंकर असणार आहे. चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 4 जून ते 13 जून या कालावधीत हरियाणामध्ये होणार आहेत.
डी पी रस्त्यावरून कलव्हर्ट छोटा पूलाला मान्यता – रुग्णालय प्रशासनाचे आभार – संदीप खर्डेकर.
पुणे-गेली अनेक वर्षे माई मंगेशकर पथावरील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरातील रहिवासी वाहतूक कोंडीने त्रस्त होते. येथील कोंडी सुटावी आणि नागरिकांना कमीत कमी मनस्ताप व्हावा यासाठी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, रुग्णालय प्रशासन, पोलीस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नशील होते व विविध उपाययोजना देखील करत होते,मात्र त्या छोट्या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे प्रश्न सुटत नव्हता.हिमाली, संकुल यासारखे मोठे गृहप्रकल्प, सेवासदन शाळा ह्या सगळ्यामुळे येथे वाहतुकीवर ताण येत होता.रुग्णालय प्रशासनाने रस्त्यावर पार्किंग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या आणि रुग्णालयाच्या आवारात प्रशस्त पार्किंग उपलब्ध केले,मात्र रुग्णांचे अनेक नातेवाईक रस्त्यावर पार्किंग करून घाईगडबडीत रुग्णालयात जात असतात, याचा ही वाहतुकीला अडथळा होत होता. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनासोबत दोन दिवसापूर्वी संदीप खर्डेकर यांची विस्तृत चर्चा झाली असता आम्ही डी पी रस्त्यावरील ( म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान ) एक प्लॉट खरेदी केला असून तेथून रुग्णालयापर्यंत रस्ता करण्यास मान्यता मिळाली आहे, तसेच तेथील नाल्यावर कलव्हर्ट ( छोटा पूल ) बांधण्यास ही सर्व संबंधित खात्यांची परवानगी मिळाली असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबत मनपा च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी ही यांस दुजोरा दिला.ह्या छोटेखानी पुलाच्या उभारणीचा सर्व खर्च दीनानाथ मंगेशकर रुग्णालय करणार असून त्याबद्दल लवकरच रुग्णालया प्रशासनाचा नागरिकांच्या वतीने सत्कार करणार असल्याचेही संदीप खर्डेकर म्हणाले. येत्या सहा महिन्यात ह्या पुलाची उभारणी पूर्ण होईल आणि रुग्णालयात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी प्रशस्त रस्ता उपलब्ध होईल. ह्या सर्व प्रक्रियेत सकारात्मक भूमिका घेणाऱ्या सर्व घटकांचे जाहीर अभिनंदन व आभार खर्डेकर यांनी मानले आहेत .
खोटी गल्लाभरू पीआरगिरी… निर्मात्यांच्या हाती प्रत्यक्षात चिरीमिरी.. मराठी सिनेसृष्टी फसव्यांंच्या मुठीत ?
अनेक चित्रपटांची एकमेकांशी स्पर्धा आहे,अनेक चित्रपटाना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षक या चित्रपटाची स्तुती करताना दिसत आहे. पत्रकार परिषदांविना माध्यमात मराठी चित्रपटांच्या कौतुकाची लहर असताना नुकतंच प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.महेश टिळेकर यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यातील अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे…निव्वळ फसवेगिरी सुरू आहे. एवढे कोटी तेवढे कोटी. वास्तवात मात्र थिएटर रिकामे…, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर एकाने सगळ्याच चित्रपटांची अवस्था अशी नाही. चांगल्या चित्रपटाला लोक गर्दी करतातच. तमाशाप्रधान चित्रपट पूर्वी चालायचे, पण आता काळ बदललाय, अशी कमेंट केली आहे.महेश टिळेकर हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअरकरताना त्यांनी एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी चित्रपटागृहातील रिकाम्या खुर्च्या दिसत आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शन देताना मराठी प्रेक्षक गेले कुठे? असा प्रश्नही विचारला आहे.
महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट
मराठी प्रेक्षक गेले कुठे?
प्रदर्शना आधी भरपूर प्रसिद्धी करून सिनेमाची हवा करण्यात आलेला आणि नुकताच प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट मी रीलिजच्या पहिल्या दिवशीच थिएटर मध्ये जाऊन पाहिला. त्यावेळी साधारण शंभर एक प्रेक्षक होते. वाटलं आज पहिला दिवस असल्यामुळे कदाचित प्रेक्षक कमी असतील.पण चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवस झाले तसे या चित्रपटात काम केलेल्या प्रसिद्ध कलाकारांनी आपापल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकून आणि डिजिटल मीडिया ने सातत्याने बातम्या मधून या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून करोडो रुपयांचा गल्ला या सिनेमाने जमवला आहे अशी माहिती दिली.ते पाहून माझ्या ओळखीच्या ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला नव्हता त्यांना मी थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघायचा आग्रह केला.सिनेमाला गर्दी असणार म्हणून ऑनलाईन तिकीट आधी बुक करा असेही सांगितले. आज माझे दोन मित्र अडव्हान्स बुकिंग न करताच अंधेरीतील मल्टिप्लेक्स मध्ये हा सिनेमा पहायला गेले.तर संपूर्ण थिएटर मध्ये ते दोन मित्रच.बाकी प्रेक्षकच नाही. त्यांनी तिथूनच मला फोन करून सांगितलं ” तुम्ही तर सांगत होता गर्दी असणार आधी तिकीट बुक करा, पण इथे तर प्रेक्षकच नाही, बरं झालं ऑनलाईन तिकीट नाही बुक केलं नाहीतर जास्त पैसे गेले असते”. त्यांचं बोलणं ऐकून मला वाटलं कदाचित ते माझी थट्टा करत असतील. मी त्यांना तसे बोलूनही दाखवले.रोज सोशल मीडियावर ज्या सिनेमाच्या विक्रमी कलेक्शन बद्दल बातम्या येतायेत, ते खोटं कसं असेल? बरंऑनलाईन बुक माय शो वर तर या सिनेमाला 80% पेक्षा जास्त रिस्पॉन्स असल्याचं दाखवतायेत. मग हे सगळं खोटं कसं असू शकेल?. मित्राने लगेच थिएटर मध्ये प्रेक्षक किती आहे ते दाखवण्यासाठी मोबाईल वर व्हिडिओ शूट करून मला पाठवला.तो व्हिडिओ पाहून माझी खात्री पटली. सिनेमाच्या इंटरव्हल मध्ये परत फोन करून त्याने मला सांगितलं की आधी ते दोघेच होते नंतर आणखी चारजण आले. चारमधील, एक वयोवृद्ध जोडपे होते आणि दुसरे जोडपे जे आले होते ते सिनेमापेक्षा थिएटर मधील अंधाराचा व्यक्तिगत आनंद घेण्यासाठी आल्याचे दिसत होते. करोडो रुपये खर्च करून बनविण्यात आलेला आणि त्यावर करोडो रुपये पब्लिसिटी खर्च केलेल्या सिनेमाला बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक यावे हे त्या चित्रपटाच्या संपूर्ण टीम विशेषतः कलाकारांच्या साठी किती दुःख दायक असेल. त्या सिनेमाला प्रेक्षक नाही हे त्या सिनेमाचं दुर्दैव की प्रेक्षक जबाबदार????
बारामती दि.७:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे उत्कृष्ट, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
श्री. पवार यांनी आज मौजे बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, बारामती येथील पोलीस वसाहतीच्या इमारतीचे बांधकाम, दुर्गा टॉकीजच्या समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स, शादी खान येथील नदीवरील बांधकाम, बाबूजी नाईक वाडा आणि दशक्रिया विधी घाटा शेजारील कऱ्हा नदीवरील गॅबियन वॉल इत्यादी ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.
यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर आदी उपस्थित होते.
लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन
जिल्हा क्रीडा संकुल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सुंदर अय्यर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी महादेव कासगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश धावले आदी उपस्थित होते.
बारामती तालुक्यात 220 स्वस्त धान्य दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी 180 स्वस्त धान्य दुकाने, तहसिल कार्यालय आणि शासकीय धान्य गोदाम यांना आय. एस. ओ. 9001-2015 आणि आय. एस. ओ. 28000-2007 मानांकन प्राप्त झाले आहे. आज विद्या प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात 5 स्वस्त धान्य दुकानदारांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
तसेच या चांगल्या कामगिरीसाठी तहसिलदार विजय पाटील, पुरवठा निरीक्षण संजय स्वामी, पुरवठा अव्वल कारकून प्रमिला लोखंडे यांना श्री. पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले.
कारगिल युद्धात शहीद झालेले नामदेव गणपत गडदरे यांच्या पत्नी उषा गडदरे रा. गडदरवाडी यांना शासनातर्फे देण्यात आलेल्या 5 एकर जमिनीचा 7/12 उतारा श्री. पवार यांच्या हस्ते उषा गडदरे याना प्रदान करण्यात आला.
दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र वाटप
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यासह पुरंदर, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. श्री. पवार यांनी प्रातिनिधिक स्वरूपात 8 दिव्यांगांना आज ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण केले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता चंद्रकांत मस्के, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, पौर्णिमा तावरे, अभ्यागत समितीचे सदस्य सचिन सातव, मिलिंद संगई आदी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले.
पुणे, 7 मे 2022: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 70वर्षांवरील पुरुष गटात रामराव डोसा यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, 55वर्षांवरील पुरुष एकेरीत पुण्याच्या अजय कामत यांनी विजेतेपद पटकावले. एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 70वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित रामाराव डोसाने अव्वल मानांकित ताहीर अलीचा टायब्रेकमध्ये 4-6, 7-6(5), 10-8 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरीत याच गटात अंतिम लढतीत ताहीर अली व रामराव डोसा यांनी रत्नाकरराव आनी व धवल पटेल यांचा 6-3, 6-7(8), 10-7 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 55वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत अजय कामत याने अव्वल मानांकित आलोक भटनागरचा 7-5, 6-0असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत 55वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत उल्हास फुलझेली व पॉल वरघसे यांनी कुबेर धोंडिबा चावरे व कुलदीप सिंग या जोडीचा 6-1, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि बाबा रॉड्रिक्स यांच्या हस्ते करण्यात आले. निकाल: 40 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी: मंदार वाकणकर(भारत)[4]वि.वि.नीरज आनंद(भारत)[7] 6-2, 6-2;आदित्य खन्ना(भारत) [1]वि.वि.स्वरणदिप सिंग दोडी(भारत)[3]6-3, 6-3; 55वर्षांवरील पुरुष एकेरी: अंतिम फेरी:अजय कामत(भारत)वि.वि.आलोक भटनागर(भारत)[1] 7-5, 6-0; 70वर्षांवरील पुरुष एकेरी: अंतिम फेरी:रामाराव डोसा(भारत)[3]वि.वि.ताहीर अली(भारत)[1]4-6, 7-6(5), 10-8; महिला 45 वर्षांवरील: राउंड रॉबिन:मायुका सकाय(जपान)[1]वि.वि.नंदिता नूलकर(भारत)6-0, 6-0;ज्योत्स्ना पटेल(भारत)[2]पुढे चाल वि.प्रेरणा आपटे(भारत) दुहेरी: 40 वर्षांवरील पुरुष: उपांत्य-फेरी: स्वरणदिप सिंग दोडी(भारत)/आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.रमझान शुक्ला(भारत)/बद्री विशाल(भारत)[3] 6-3, 6-2;कमलेश शुक्ला(भारत)/मंदार वाकणकर(भारत)[2]वि.वि.जॉय बॅनर्जी(भारत)/रवी कोठारी(भारत)4-6, 6-1, 10-4; 55वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी: उल्हास फुलझेली(भारत)/पॉल वरघसे(भारत) वि.वि.कुबेर धोंडिबा चावरे(भारत)/कुलदीप सिंग(भारत)6-1, 6-0; 70वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी:ताहीर अली(भारत)/रामराव डोसा(भारत)[1]वि.वि.रत्नाकरराव आनी(भारत)/धवल पटेल(भारत)6-3, 6-7(8), 10-7.
पुणे, 7 मे 2022:बारामती लॉन टेनिस क्लबच्या वतीने आयोजित व प्रविण मसालेवाले प्रायोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट स्पर्धेच्या पहिल्या मालिकेत अनय सुमंत, अखिलेश चव्हाण, शर्विल गंगाखेडकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली. बारामती क्लब टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात अनय सुमंत याने आदित्य उपाध्येचा टायब्रेकमध्ये 6-5(4) असा संघर्षपूर्ण पराभव केला. अखिलेश चव्हाण व शर्विल गंगाखेडकर यांनी अनुक्रमे आहान जैन व विराज कुलकर्णी यांचा 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. रेयांश गुंड याने कुमार सुहानवर 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला. याआधी स्पर्धेचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रविण मसालेवालेचे संचालक विशाल चोरडिया आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, बारामती लॉन टेनिस क्लबचे सचिव दत्तात्रय बोऱ्हाडे, एमएसएलटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आणि बारामती लॉन टेनिस क्लबचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: पहिली फेरी: रेयांश गुंड वि.वि.कुमार सुहान 6-0; अनय सुमंत वि.वि.आदित्य उपाध्ये 6-5(4); अखिलेश चव्हाण वि.वि.आहान जैन 6-4; आश्वथ भुजबळ वि.वि.आगम जैन 6-0; सोहम रणसुभे वि.वि.गौरांग सुपले 6-2; शर्विल गंगाखेडकर वि.वि.विराज कुलकर्णी 6-4;आवीर पतोडीया वि.वि.प्रसाद क्षितिज 6-5(6)
सुनील माने यांचे आयुक्त तसेच वाहतूक पोलीस उपायुक्तांना निवेदन
पुणे ता.७ : औंध – परिहार चौक, नागरस रोड, डीपी रोड, औंध – सांगवी जोडणारा राजीव गांधी पुल या परिसरात भाले चौक येथे दररोज आणि प्रामुख्याने सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात अशी विनंती भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना ई-मेलद्वारे तर वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना प्रत्यक्ष भेटून दिले.
निवेदनात म्हटले आहे की, औंध – परिहार चौक, नागरस रोड, डीपी रोड, येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. येथील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी औंध – सांगवी जोडणारा राजीव गांधी पुल बांधण्यात आला. मात्र तरीही येथील वाहतूक समस्या कायम आहे. अरुंद रस्त्यामुळे येथील भाले चौक येथे बॉटल नेक तयार होऊन सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या भागात असणारे शॉपिंग मॉल, आय.टी कंपन्या, दुकाने, स्थानिक रहिवासी यांच्यासाठी वाहतुकीचा प्रश्न जटील होत आहे. यासाठी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे.
या भागातील स्थानिक नागरिकांना आणि परिसरात विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करणे, बैठक करणे, आणि सूचना घेऊन तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे.
रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी सिंगापूर प्रमाणे बिल्डींग मधील रिकाम्या जागांचा उपयोग करता येईल का? काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक करता येईल का? लोकांची वाहने दूर अंतरावर पार्क करून त्यांना इलेक्ट्रिक बस व अन्य साधनांनी त्यांच्या इच्छित स्थळी नेता येईल का? या उपायांचा विचार करता येईल काय हे पाहावे, त्याचबरोबर या परिसरात प्रामुख्याने संध्याकाळ ते रात्रीपर्यंत अतिरिक्त वाहतूक पोलीस व वॉर्डन नियुक्त करावे. अशाप्रकारचे उपाय त्यांनी महापालिकेला तसेच वाहतूक विभागाला सुचवले आहेत. या पर्यायांवर विचार करून स्थानिक नागरिक व या भागात येणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी विनंती ही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा
-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख
पुणे,दि.7: लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने सलग चार वेळा आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे. सामंजस्य व तडजोडीने वाद मिटवत सुखी जीवन जगण्यासाठी लोक अदालत महत्त्वाची आहे. लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवादही तेवढाच महत्त्वाचा आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यात पुण्याचे अग्रस्थान कायम राहील ,असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी व्यक्त केला.
जिल्हा व सत्र न्यायालयात आज राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायधीश एस.एस.गोसावी, जिल्हा न्यायधीश के. पी. नांदेडकर, न्यायधीश श्री.सुनील वेदपाठक, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रताप सावंत, जिल्हा सरकारी वकील एन.डी.पाटील, पुणे वकील बार आसोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणांचा निपटारा गतीने करू शकल्यामुळे लोक अदालतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली कसे निघतील यासाठी प्रयत्न करावे. यापूर्वी झालेल्या चारही लोक अदालतीमध्ये पुणे प्रथम क्रमांकावर आहे. हेच अग्रस्थान आजची लोक अदालत कायम ठेवेल. एका दिवसात न्याय देणे हे अत्यंत मोठे कार्य आहे, त्याकामी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे ठरतील.
श्री. सावंत म्हणाले, लोक अदालतीमध्ये पुणे येथील ४३ हजार ८४८ प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व ८७ हजार १८३ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुण्यात १२४ पॅनल उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी न्यायाधीश, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
पुणे – मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्हयांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहिर लिलाव ई-लिलाव पध्दतीने 12 मे रोजी सकाळी 10 वाजता ठेवण्यात आला आहे. वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे, आळंदी रोड कार्यालय व वाघेश्वर पार्किंग, पुणे येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहिर ई-लिलावात एकूण 34 वाहने उपलब्ध आहेत. यात टूरिस्ट टॅक्सी, ट्रक, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा, खाजगी वाहन या वाहनांचा समावेश आहे.
लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहिल. याची वाहन मालकांनी नोंद घ्यावी. ई लिलावात सहभागी होण्यासाठी 9 ते 10 मे 2022 सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात हलके वाहनास रूपये 25 हजार व अवजड वाहनास रूपये 50 हजार रक्कमेचा R.T.O. Pune या नावाने कागदपत्र व अनामत धनाकर्ष सह नाव नोंदणी करून प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी. जीएसटी धारकांनाच ई-लिलावात सहभागी होता येईल. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगमपुल, पुणे या कार्यालयाशी संपर्क साधावा.कोणतेही कारण न देता जाहिर ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकारी, पुणे यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत, असे पुणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
मुंबई-केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत हज हाऊस येथे ‘खादीम-अल-हज्जाज’ या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले.
‘खादीम-अल-हज्जाज’ हे प्रशिक्षित स्वयंसेवक भारतीय हज यात्रेकरूंना मक्का-मदिना येथे मदत करतील. यात्रेकरूंचे आरोग्य आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केंद्रीय मंत्री नक्वी यांनी या स्वयंसेवकांना केली. या वर्षीच्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये 12 महिला प्रशिक्षणार्थींसह देशाच्या सर्व राज्यांमधून आलेले 400 हून अधिक ‘खादीम-अल-हज्जाज’ सहभागी होत आहेत. मक्का-मदिना येथील यात्रेकरूंची निवास व्यवस्था, वाहतूक, आरोग्य आणि सुरक्षितता या गोष्टींसह हज यात्रेशी संबंधित सर्व प्रक्रियांबद्दल या प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षणादरम्यान तपशीलवार माहिती देण्यात येईल. भारतीय हज समितीचे पदाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन संस्था, डॉक्टर्स, विमान कंपन्यांचे अधिकारी, सीमाशुल्क तसेच स्थलांतरण विभागाचे अधिकारी या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतील.
वर्ष 2022 मधील हज यात्रेसाठी 79,237 भारतीय मुसलमान नागरिक जाणार असून त्यात निम्म्या संख्येने महिलांचा समावेश आहे. यातील 56,601 भारतीय मुसलमान भारतीय हज समितीच्या माध्यमातून तर 22,636 मुसलमान एचजीओ अर्थात हज समूह आयोजकांच्या माध्यमातून हज 2022 यात्रेसाठी जाणार आहेत. एचजीओची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावर्षीच्या हज यात्रेसाठी 1800 हून मुस्लीम महिला ‘मेहरम विना’ म्हणजे पुरुष सहकाऱ्याच्या सोबतीविना आणि लॉटरी पद्धतीमध्ये भाग न घेता या यात्रेला जाणार आहेत. हज 2022 साठी एकूण 83,140 अर्ज सादर झाले आहेत.2022 च्या हज यात्रेसाठी महाराष्ट्रातून 4874 आणि गोव्यातून 67 नागरीक रवाना होणार आहेत.
भारतीय हज समितीच्या माध्यमातून हज 2022 साठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मुंबई, अहमदाबाद, बेंगळूरू,कोचीन, दिल्ली, गुवाहाटी,हैदराबाद,कोलकाता,लखनौ आणि श्रीनगर ही 10 प्रवेशस्थाने निश्चित केली आहेत.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, हज 2022 या यात्रेला हज यात्रेकरूंचे आरोग्य आणि कल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन महत्त्वपूर्ण सुधारणांसह आरंभ होत आहे. ते म्हणाले की संपूर्ण हज 2022 या यात्रेची प्रक्रिया भारत सरकार आणि सौदी अरेबिया सरकारच्या आवश्यक मार्गदर्शक सूचनांसह तयार करण्यात आली आहे. यामध्ये पात्रता निकष, वयोमर्यादा, आरोग्य संबंधित आवश्यकता इत्यादींचा समावेश आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हज यात्रा होऊ शकलेली नाही,असे सांगत केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “यात्रेकरूंवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत कारण ते कोणत्याही अनुदानाशिवाय हज यात्रा करणार आहेत. सौदी अरेबियाकडून परवडणाऱ्या दरात निवासव्यवस्था, वाहतूक आणि इतर आवश्यक सुविधांसाठी प्रक्रिया सुरू आहे.”
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया संपूर्ण करताना कोरोना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा आणि भारत सरकार आणि सौदी अरेबिया सरकारने ठरवलेल्या आवश्यक निकषांची पूर्तता करून निश्चित करण्यात आली आहे.
संपूर्ण हज 2022 प्रक्रिया 100 टक्के डिजिटल/ऑनलाइन करणे हे पारदर्शक, सुलभ, परवडणारे आणि सोयीस्कर असून त्यासोबत हज यात्रेतील लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरले आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. यावर्षी 72170 हज अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले, ही उत्साहवर्धक बाब असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना नकवी म्हणाले, डिजिटल हेल्थ कार्ड, “ई-मसिहा” आरोग्य सुविधा आणि “ई-लगेज प्री-टॅगिंग”, मक्का-मदीनामधील निवास/वाहतूक यासंबंधी सर्व माहिती प्रदान करून, सर्व हज यात्रेकरूंना वेळोवेळी दिली जाईल.
हा संपूर्ण गुजरातसाठी प्रवासासाठी प्रवेशबिंदू अहमदाबाद येथे असेल. संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यासाठी बेंगळुरू आहे. केरळ, लक्षद्वीप, पुदूच्चेरी, तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार या भागांसाठी कोचीन हा प्रवास आरंभ बिंदू असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगड, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशातील पश्चिम जिल्ह्यांसाठी दिल्ली हा प्रवास आरंभ बिंदू असेल. आसाम, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि नागालँडचा यासाठी गुवाहाटी प्रवास आरंभ बिंदू असेल. हैदराबाद प्रवास आरंभ बिंदू हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांसाठी आहे. कोलकाता प्रवास आरंभ बिंदू हा पश्चिम बंगाल, ओडिशा, त्रिपुरा, झारखंड आणि बिहार या राज्यांसाठी आहे. लखनऊ प्रवास आरंभ बिंदू पश्चिमेकडील भाग वगळता उत्तर प्रदेशातील सर्व भाग व्यापेल; महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली यासाठी मुंबई प्रवास आरंभ बिंदू असेल तर जम्मू-काश्मीर, लेह-लडाख-कारगिल या भागांसाठी श्रीनगर प्रवास आरंभ बिंदू असेल.