Home Blog Page 2003

अभिनेत्री मुक्ता बर्वे ने केले ‘बाईचे माणूसपण हिरावून घेणाऱ्या व्यवस्थेवर’ भाष्य

२४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वाय’ या चित्रपटाच्या निमित्ताने केलेली पोस्ट चर्चेत

मातृदिनाच्या निमित्ताने अभिनेत्री मुक्ता बर्वे ने ‘आईचं बाईपण व बाईचं माणूसपण’ या विषयीची सोशल मीडिया वर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ मध्ये मुक्ता बर्वे म्हणते, “बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, कधी तिच्यावर बंधनं लादून, कधी भीती तर कधी स्वप्न दाखवून, धर्म – परंपरा – संस्कृती या सर्वांचं ओझं वाहण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवून आणि हे तिला आणि इतरांना कळूच नये म्हणून की काय, पावलापावलावर तिच्या असण्याचंच गौरविकरण करून बाईचं माणूसपणच हिरावून घेण्याची एक सर्वमान्य व्यवस्था आपल्या आजूबाजूला गेली हजारो वर्षे अस्तित्वात आहे”.

मातृदिनानिमित्त समाजातील प्रत्येक आईला बाई म्हणून आणि बाईला माणूस म्हणून समजून घेतलं पाहिजे असं आवाहन तिने तिच्या आगामी चित्रपट ‘वाय’ च्या निमित्ताने सोशल मीडियावर केलंय.

अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित चित्रपट ‘वाय’ हा २४ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

खानवडीच्या आदर्श निवासी शाळेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही-अजित पवार

0

पुणे दि.९- महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी ३० कोटी खर्च करून खानवडी येथे मुलींची आदर्श शाळा उभारण्यात येत आहे. या शाळेत ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थीनींसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून आदर्श शाळेसाठी कुठल्याहीप्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात येणाऱ्या ज्योती-सावित्री आंतरराष्ट्रीय शाळेच्या आणि महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, फियाट उद्योगाचे राकेश बावेजा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, सरपंच स्वप्नाली होले, महात्मा फुले स्मारक समितीचे सुदाम इंगळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तींचा विचार घेऊन आपण पुढे जायला हवे. यावर्षी ९६ कोटी रुपये शाळा सुधार कार्यक्रमासाठी देण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील ४१० शाळांमध्ये दर्जेदार सुविधा देण्यात येणार असून त्यात जिल्ह्यातील ४० टक्के विद्यार्थी कार्यक्रमात समाविष्ट होत आहे. टप्प्याटप्प्याने इतरही शाळांमधून हा कार्यक्रम राबविण्यात येईल.

शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी खाजगी संस्थांची मदत घेण्यात येईल. ग्रामस्थांनीदेखील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. शासनातर्फे निवासी शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम करण्यात येईल. गावातील १ ली ते ५ वीची शाळाही भविष्यात आदर्श शाळेशी जोडण्यात येईल.

पुरंदरच्या विकासासाठी आवश्यक निधी देणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, अर्थसंकल्पात जेजुरी आणि परिसराच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विकासकामे गतीने होणे गरजेचे आहे. खानवडी पाझर तलावाचा उपयोग गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी होण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. खानवडीच्या विकासासाठी गरजेच्या बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पुण्यातील महात्मा फुले वाड्यासाठीही १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या वडू बुद्रुक येथील स्मारकासाठी २५० कोटी, पुरंदर रिंगरोडच्या जमीन संपादनासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

खासदार श्रीमती सुळे म्हणाल्या, मराठीचा अभिमान बाळगताना इंग्रजीतून शिक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शिक्षणात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासोबत शाळेतील सुविधांबाबत ग्रामस्थांचेही सहकार्य गरजेचे आहे.

पुरंदरची ओळख चांगल्या शिक्षक आणि फळांसाठी आहे. इथे फळप्रक्रिया व्यवसाय विकसीत होत आहे. तालुक्याला जोडणाऱ्या वाहतूक सुविधा वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. उत्तम प्रशासकीय इमारती उभ्या रहात आहेत. तालुक्यातील स्वच्छतेवर अधिक भर देण्याची गरज आहे.

आमदार जगताप म्हणाले,शासनाच्या सहकार्यामुळे महात्मा फुले यांच्या गावी सीबीएसई अभ्यासक्रमाची मुलींची निवासी शाळा सुरू होणार आहे. भविष्यात मुलींसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.

यावेळी श्री.बावेजा यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. आदर्श शाळेमुळे ग्रामीण मुलींना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविकात शाळेच्या कामाविषयी माहिती दिली. गोरगरीब कुटुंबातील मुलींना विविध क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी शासनाच्या धोरणानुसार आदर्श शाळा उभारण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी १२ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. उत्तम शैक्षणिक संस्थासोबत करार करून सुरुवातीस ३०० आणि नंतर १२०० पर्यंत विद्यार्थिनींना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी महात्मा फुले यांचे मुळगाव असलेल्या खानवाडीत मुलींची आदर्श निवासी शाळा उभारण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. या शाळेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ, निराधार आणि अत्याचारग्रस्त मुलींना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे. १२ एकर जमिनीवर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ही शाळा उभारण्यात येणार आहे. शाळेत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

रंग मंदिराचा तथाकथित पुनर्विकास नक्की कोणासाठी ठेकेदारासाठी की रसिक जनतेसाठी ? ‘आप’ चा सवाल

आम आदमी पक्षाचे बालगंधर्व रंगमंदिरासमोर आंदोलन

पुणे-बालगंधर्व रंगमंदिर हा पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. या ठेव्याचा पुणेकरांना सार्थ अभिमान आहे. हे बालगंधर्व रंग मंदिर पाडण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार आणि प्रशासक विक्रमकुमार यांनी घेतल्याचा आरोप करून आपने म्हटले आहे कि,’ माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याचे स्वागत केले आहे. 2018 साली मुरलीधर मोहोळ यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव आणला होता आणि त्याला त्यावळी राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. आता महानगरपालिकेची मुदत संपल्यावर नगरसेवकांची कोणतीही कटकट राहिली नसताना प्रशासकांना हाताशी धरत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी यांची अभद्र युती झाल्याचे दुर्दैवी चित्र पुणेकरांना बघायला मिळत आहे. या निर्णयाबाबत कोणतीही पारदर्शकता ठेवलेली नाही. पुणेकर जनतेला, कलाकारांना, रसिकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला आहे. असाही आरोप करत या निर्णयाविरोधात आज आम आदमी पक्षाने बालगंधर्व रंगमंदिरसमोर आंदोलन करून याचा निषेध व्यक्त केला .

आप चे राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले कि,’ 2018 साली सुद्धा हेच बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय मुरलीधर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष असताना घेतला गेला होता… ज्याला जनसामान्यांनी आणि कलाकारांनी कडाडून विरोध केला, त्यामुळे हा निर्णय त्यावेळी मागे घ्यावा लागला होता. आता महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर अशा पद्धतीचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे. ही सर्व प्रक्रिया अपारदर्शक पद्धतीने जनसामान्यांना व कलाकारांना पुरेशी माहिती न देता रेटून नेली जात आहे. बालगंधर्व रंग मंदिर पाडून त्याचा केला जाणारा तथाकथित पुनर्विकास हा नक्की कोणासाठी ? ठेकेदारासाठी ? की पुणेकर रसिक जनता व कलाकारांसाठी ? सामान्य जनतेची आणि नगरसेवकांची कटकट नको म्हणून प्रशासक नेमला यावर जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला जात आहे का ?या प्रश्नाचे उत्तर महानगरपालिका प्रशासन पालकमंत्री अजित पवार, मनपा आयुक्त विक्रम कुमार व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी द्यायला हवं, अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे.

का बाळगली आजवर गोपनीयता :पुनर्विकास प्रकल्पाचे का केले नाही जाहीर सादरीकरण?

“दरवेळी असा प्रस्ताव देताना अथवा निर्णय घेताना वेगवेगळी कारणे दिली जातात. 2018 साली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचे कारण पुढे करत बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता. आता 2022 मध्ये मेट्रोसाठी लागणारे पार्किंग उपलब्ध व्हावं म्हणून बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय होत आहे, अशी चर्चा आहे. नक्की कशासाठी बालगंधर्व रंगमंदिर पाडले जात आहे ? तशी मागणी कोणी केली आहे ? याबाबत कुठलीही माहिती सार्वजनिकरीत्या जाहीर केलेली नाही… ही माहिती सार्वजनिक करावी, पारदर्शकता ठेवावी आणि पुणेकर रसिक जनता, कलाकार, प्रतिष्ठित पुणेकर नागरिक यांना विश्वासात घेत बालगंधर्व रंगमंदिरबाबत पुढील वाटचाल निश्चित करावी”, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास सुद्धा भरकटला जाईल

पुणे शहराला सांस्कृतिक, वैचारिक वारसा आहे. शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या सल्ल्याने, मार्गदर्शनाने संपूर्ण भारतावर यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्याचा ठसा उमटवला आहे. असे असून सुद्धा पुण्यामध्येच त्यात उल्लेखनीय काम केलेल्या लोकांना मात्र विचारात न घेता निव्वळ आर्थिक लोभापोटी आणि राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी जनमत न घेता, पारदर्शकता न पाळता अनेक प्रकल्प राबविले जातात. पुढे ते अयशस्वी होताना आपण पाहिले आहे. उदा. विद्यापीठ उड्डाण पूल.

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास सुद्धा अशाच पद्धतीने भरकटला जाईल, याची भीती पुणेकरांच्या मनामध्ये आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली महानगरपालिकेच्या इतर नाट्यगृहमध्ये पालिकेने खेळखंडोबा अगोदरच मांडलेला आहे. अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची लाखो रुपयांची साऊंड सिस्टिम चोरीला जाण्याचा प्रकार याच पुण्यात घडलेला आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या स्वच्छतेबाबत उदासीन असलेली पुणे महानगरपालिका आता पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली काय करणार आहे, ऐतेहासिक ठेव्याचे काय होईल या कल्पनेनेच सर्वसामान्य रसिक पुणेकर घाबरलेले आहेत.जनतेला विश्वासात घेत याबाबत पुढील वाटचाल व्हावी, अशी आपची मागणी आहे.

महाराणा प्रतापसिंह यांची जयंती २५ मेऐवजी २ जून रोजी साजरी होणार

0

मुंबई, दि. ९ : सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार बुधवार दिनांक २५ मे २०२२ रोजी साजरी करण्यात येणार होती. ती आता २५ मे ऐवजी २ जून २०२२ रोजी साजरी होणार आहे.

शासनाने दिनांक ५ मे २०२२ रोजी शुध्दीपत्रक काढले असून त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार २ जून २०२२ रोजी साजरी करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांची ( तिथीनुसार ) जयंती आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करून त्याच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने शुद्धीपत्रक जारी केले आहे.

अन्न कचऱ्यापासून निर्मित वीजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान मुंबईला!

0
  • केशवराव खाड्ये मार्गावरील प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले लोकार्पण
  • महानगरपालिकेचा डी’ विभाग व एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नाने प्रकल्प उभारणी

मुंबई, दि. 9 :- मुंबई महानगराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि ‘स्वच्छ – सुंदर मुंबई’ साठी एका पाठोपाठ उपक्रम सुरु करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज आणखी एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. ‘डी’ विभागातील केशवराव खाड्ये मार्गावर अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरुपाचे भारतातील हे पहिलेच चार्जिंग स्टेशन असून त्याचे लोकार्पण राज्याचे पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज (दिनांक ९ मे २०२२) करण्यात आले.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, फूड वेस्टमधून निर्मित वीजेचा उपयोग करुन इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे भारतातील हे पहिलेच केंद्र आहे. अशा स्वरुपाचे केंद्र मुंबईतच नव्हे तर राज्यातील शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गांवर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यातून विद्युत वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच, सोबत सेंद्रिय, जैविक स्वरुपाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन देखील होईल, असे त्यांनी नमूद केले.

महानगरपालिकेचा ‘डी’ विभाग आणि एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. हाजी अली परिसरात केशवराव खाड्ये मार्गावर माँसाहेब स्व. सौ. मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ महानगरपालिकेने टाकावू अन्नापासून (फूड वेस्ट) वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकाऊ अन्नपदार्थांवर प्रक्रिया करुन वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

या प्रकल्पातून तयार होणारी वीज आता विद्युतभारित वाहनांसाठी अर्थात इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी उपयोगात येणार आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पाला जोडून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण देखील पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. या ठिकाणी चार्जिंगसाठी दोन पॉईंट आहेत, म्हणजेच एकावेळी दोन वाहने आणि तेही जलद गतीने चार्ज होऊ शकतात.  माफक दरात ही चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल.

या लोकार्पणप्रसंगी उप आयुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, एरोकेअर क्लीन  एनर्जीचे संस्थापक अंकित झवेरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नवीन मुक्ताबाई मंदिर ते मुक्ताईनगरपर्यंत रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

0

मुंबई, दि. 9 :- श्री संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता नवीन मुक्ताबाई मंदिर ते मुक्ताईनगर शहरापर्यंतच्या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले.

मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन मुक्ताईनगर येथील रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी केली होती. या मागणीची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन आज या संदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. बैठकीला ॲड. पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता श्री. भोसले, जळगावच्या अधीक्षक अभियंता श्रीमती गिरासे आदी अधिकारी उपस्थित होते.

मुक्ताईनगर येथे दर तीन महिन्यांनी होणारे कार्यक्रम आणि त्यासाठी वारकऱ्यांसह लाखो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात, त्याशिवाय 25 मे रोजी श्री संत मुक्ताई पुण्यतिथी असून यावेळी साधू-महंत, वारकरी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. ती लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी नवीन मुक्ताबाई मंदिर ते मुक्ताईनगर शहरापर्यंतच्या रस्त्याची रुंदी वाढविण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. या रस्त्याच्या कामाचा राज्य रस्ते प्रकल्पांमध्ये समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुक्ताईनगर शहर ते संत मुक्ताबाई यांचे जुने मंदिर या रस्त्यावरील खड्डे बुजवून या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही मंत्री. श्री. चव्हाण यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अर्णव पापरकर, सार्थ बनसोडे, साहिल तांबट, प्रिशा शिंदे यांचे सनसनाटी विजय  

पुणे, 9 मे 2022: डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अर्णव पापरकर, सार्थ बनसोडे, साहिल तांबट यांनी तर, मुलींच्या गटात प्रिशा शिंदे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून आजचा दिवस गाजवला.     डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ पहिल्या फेरीत मुलांच्या गटात क्वालिफायर सार्थ बनसोडे याने आठव्या मानांकित गुजरातच्या यग्ना पटेलचा 6-3, 6-1 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. बिगरमानांकीत साहिल तांबटने चौथ्या मानांकित आपला राज्य सहकारी प्रणव कोरडेचे आव्हान 6-4, 4-6, 6-2 असे संपुष्टात आणले. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अर्णव पापरकर याने सातव्या मानांकित जय पवारचा 6-4, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. 
मुलींच्या गटात प्रिशा शिंदे हिने चौथ्या मानांकित श्रीया श्रीनिवासचा 6-0,6-0 असा एकतर्फी पराभव केला. महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित रुमा गायकवारीने रिद्धी शिंदेचा 6-0, 6-1 असा तर, क्वालिफायर श्रेया पठारेने साईइति वराडकरचा  6-2, 6-2 असा पराभव केला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुले:तरुण कोरवार(तेलंगणा)[1]वि.वि.अर्जुन गोहड(महा)3-6, 6-2, 6-4;
आर्य कळंबेल्ला(कर्नाटक)वि.वि.अनिष्ट रांजळकर(महा)6-4, 6-4;आर्यन कोटस्थाने(महा)वि.वि.वेदांत रावळ(महा)3-6, 6-4, 7-5;सार्थ बनसोडे(महा)वि.वि.यग्ना पटेल(गुजरात)[8] 6-3, 6-1;साहिल तांबट(महा)वि.वि.प्रणव कोरडे(महा)[4] 6-4, 4-6, 6-2;निशित रहाणे(महा)वि.वि.तेजल पाल(महा) 6-0, 6-1;ओजस दबस(महा)वि.वि.सिद्धार्थ मराठे(महा)7-6(2), 6-7(3), 6-4;अर्णव पापरकर(महा)वि.वि.जय पवार(महा)[7] 6-4, 6-3;अभिराम निलाखे(महा)वि.वि.वेद शेट्टी(कर्नाटक)6-0, 6-2;तनिष्क जाधव(महा)वि.वि.पार्थ देवरुखकर(महा)6-2, 2-6, 6-4;
मुली: 
रुमा गायकवारी[1](महा)वि.वि.रिद्धी शिंदे(महा)6-0, 6-1;श्रेया पठारे(महा)वि.वि.साईइति वराडकर 6-2, 6-2;प्रिशा शिंदे(महा)वि.वि.श्रीया श्रीनिवास(महा)[4] 6-0,6-0;पुरेशा शंथामूर्ती(कर्नाटक)[4]वि.वि.ईश्वरी मार्कंडे(महा)6-0, 6-0.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर-उपाध्यक्षपदी सूर्यकांत पाठक तर राष्ट्रीय सचिव म्हणून अरूणराव देशपांडे

पुणे : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून पुण्याचे सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय सचिव म्हणून औरंगाबादचे अरूणराव देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. 
हरियाणातील फरिदाबाद येथे ही सभा पार पडली.  त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गुजरात मधील बडोद्याचे नारायणभाई शहा यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तीन दिवस चाललेल्या या सर्वसाधारण सभेस देशभरातून २३७ प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या समारोपामध्ये पुढील तीन वर्षांकरिता ३४ सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली गेली.
सूर्यकांत पाठक ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासून आजतागायत कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रांताचे संघटनमंत्री, क्षेत्रीय संघटनमंत्री तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इ. जबाबदार्‍या सांभाळल्या होत्या. औरंगाबादच्या अरूणराव देशपांडे यांनी यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तसेच राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.

सत्तेसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसशी संग केल्यामुळेच शिवसेनेला आता अयोध्येला जाण्याची गरज -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची टीका

मीरा-भाईदर कार्यकर्ता मेळावा संपन्न
भाईंदर, दि. ९ मे – राज्यातील सत्तेसाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसशी संग केल्यामुळेच शिवसेनेला आता अयोध्येला जाण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शिवसैनिकांनी अयोध्येला जावे, अशी खोचक टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. भाजपच्या मीरा-भाईंदर जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात दरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या तडाखेबंद भाषणात दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नियोजनशून्य कारभाराचा समाचार घेतला. तसेच शिवसेनेच्या बेगडी हिंदुत्वावर जोरदार टीका केली.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संगतीमुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल जनतेत संशय निर्माण झालाय. त्यामुळे असली-नकली अशा प्रकारची चर्चा आज सुरू आहे. राम मंदिरात जाऊन आम्ही हिंदुत्ववादीच आहोत, अशी भूमिका शिवसेनेला अधोरेखित करायची गरज असेल तर त्याचा आम्हाला आनंदच आहे, असा टोलाही दरेकर यांनी मारला.
आम्ही हिंदुत्ववादी भूमिका घेतोय हे त्यांना आता सांगावे लागत आहे, यातच सर्व काही आले. आदरणीय बाळासाहेबांना कधी हे सांगावे लागले नाही. जनतेनेच त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हटले. आता खरे हिंदुत्व, खोटे हिंदुत्व म्हणायची वेळ त्यांच्यावर का आली? याचा अर्थ तुम्ही हिंदुत्ववादी विचारधारा सोडून ज्यांनी कायम हिंदुत्वाला विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून केवळ सत्तेसाठी बसलेले आहात. त्यामुळे जनतेच्या मनात, विशेषतः हिंदू जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. त्यामुळे तुम्हाला हे सांगावे लागत आहे. तुम्हाला नकली हिंदुत्व, असली हिंदुत्व सांगत दवंडी पिटावी लागतेय. सभा घ्याव्या लागतायत, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
राणा दाम्पत्याची छळवणूक ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारने मांडलीय त्यातून स्वाभाविकपणे संताप व्यक्त होत आहे. तुम्ही त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा टाकलाय आणि न्यायालय सांगतेय की त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा होऊ शकत नाही याचा अर्थ तुम्ही चुकीचे केले होते, असे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, जर चुकीचे केले असे सरकारला वाटत असेल तर राणा दांम्पत्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही या आपण जनतेच्या दरबारात जाऊ. आमच्यासमोर निवडणुकीला उभे राहा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. राणा दाम्पत्य लढवय्ये असे दाम्पत्य आहे. त्यांनी तशा प्रकारचे आव्हान दिले आहे. ते मुख्यमंत्र्यांनी स्वीकारायचे की काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

मीरा-भाईंदरमध्ये भाजपचेच राज्य असेल
भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते ज्या ताकदीने पार्टीचा झेंडा घेऊन सामील आहेत ते पाहून भाजपला हलवण्याची ताकद कोणातच नाही, नजीकच्या काळात मीरा-भाईंदरमध्ये भाजपचेच राज्य असेल, असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
संघटन ही भाजपची खूप मोठी ताकद आहे. इतर सर्व पक्षांमध्ये परिवाराचा राजकीय वारसा असतो. शिवसेना म्हटले की, ठाकरे परिवाराचा पक्ष, राष्ट्रवादी म्हटले की शरद पवार यांचा पक्ष. कॉँग्रेस म्हटले की, सोनिया गांधींचा, राहुल गांधी यांचा पक्ष. पण भाजपा म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजप पक्ष असा आहे ज्याचा अध्यक्ष कोण असेल हे कोणीही सांगू शकत नाही. भाजपमधील निर्णय सामुदायिक रीतीने होतो, असे दरेकर यांनी सांगितले.
गटबाजीला थारा नाही
भाजपमध्ये कधीही गटबाजी चालत नाही. भाजपमध्ये दोन-तीन गट असे राजकारण कधीच नव्हते. भाजपमध्ये फक्त एकच गट आहे तो म्हणजे फक्त भाजपचाच आहे. कोणामध्ये काही मतभेद असतील तर ते चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा नक्की प्रयत्न करण्यात येईल. भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे, त्यामुळे पक्ष हा त्या ध्येयधोरणानुसारच चालेल, कोणा व्यक्तीनुसार पक्ष चालणार नाही. पक्षामध्ये त्या जिल्ह्याचा प्रमुख हा पक्षाचा असतो, त्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय होत असतो, त्यामुळे जर कोणाला वाटत असेल की पक्ष आपल्या मर्जीनुसार चालावा तर तसे येथे होणार नाही. भाजपच्या येथील जिल्हा संघटन व पक्ष बांधणीची जबाबदारी आपल्याला सोपविल्यानंतर पक्षातील सर्व स्तरावरील घटकांशी सविस्तर चर्चा करण्यात येईल. पक्षाने ज्यांच्यावर विश्वास टाकला आहे त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळेच पक्षात सर्व जण मिळूनमिसळून काम करतील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महापौर ज्योत्स्ना हस्नाले, ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास काका पाटील, भाजप नेते हेमंत म्हात्रे, भाजपा सचिव ॲड अखिलेश चौबे, जिल्हा अध्यक्ष रवी व्यास, प्रदेश पदाधिकारी दिपाली मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना मीरा-भाईंदर जिल्ह्याच्या भाजपच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मीरा-भाईंदर मधील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडला. दरेकर यांच्या स्वागतासाठी येथील भाजपच्या कार्यकर्त्यानी बाईक रॅली काढली होती. तसेच मीरा-भाईंदर मधील नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला कार्यकर्ता- पदाधिकारी तसेच भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांच्याशी वैयक्तीक संवाद साधला. पक्ष संघटनाच्या दृष्टीने त्यांच्यासमवेत चर्चा केली.

बालगंधर्वची वास्तू पाडण्याचा मनसुबा तर जुनाच ..

पुणे-पुण्याचे वैभव ,सांस्कृतिक नगरीची सर्वाधिक महत्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू अशा शब्दांनी आणि अनेकांच्या कर्तुत्वातील घडणीच्या ,संघर्षाच्या किस्स्यांनी कलाक्षेत्राचे हृदय बनलेली बालगंधर्व रंगमंदीराची वास्तू पाडून तिथे नविन वास्तू उभारण्याचे मनसुबे आता पुन्हा बाहेर पडून स्पष्ट अधोरेखित झाले आहेत .विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींची महापालिकेवर सत्ता नसताना प्रशासकीय कारकिर्दीत याबाबत राज्यातील सत्ताधीशांशी संपर्क साधून रंगमंदिराचा ‘पुनार्विकास ‘ साधण्याच्या हालचालींना वेग कसा आला ? याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्यता असताना ,बालगंधर्व च्या वास्तू बद्दल मात्र कला क्षेत्रातील अनेकांची हृदये हेलावून जात आहेत .दुमजली पूल ,मेट्रो आणूनही वाहतूक कोंडी तर सुटली नाहीच पण हे बालगंधर्व पाडून त्याचे ‘नटराज थियेटर ‘तर होणार नाही ना ? असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतो आहे. रंगमंदिराच्या ३/ ३ ऑडीटोरीयम ची स्वप्ने दाखविणारी मंडळी या शिवाय इथे आणखी कोणकोणत्या व्यावसायिक बाबींच्या उभारण्या करणार आहे हे अद्यापही गुलदस्त्यात असल्याने ,नक्की यांना पुनर्विकासात रस आहे कि ..आणखी कशात ? अशा प्रश्नांनी देखील अनेकांच्या मनात काहूर केले आहे. तर काहींनी, ‘आहे ती वास्तू जपा … आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्यिकरण करून जुनं सोनं नाहीसे नका करू , अशी भावनिक साद देखील घातली आहे .ऐतिहासिक कोतवाल चावडी पाडली तेव्हा लोक ढसाढसा रडले तशी काहीसी अवस्था इथे होईल किंवा होऊ शकते याचाही अंदाज आता घ्यायला हवा . ज्यांनी मुळशी पैटर्न पाहिला त्यांनी तरी बालगंधर्वच्या बाबतीत सावध भूमिका घेणे गरजेचे आहे असे रसिकांनाही वाटते आहे.

हे नाट्यगृह केवळ पुणेकरांचेच नव्हे, तर जगभरातील सर्व मराठी जनांचे लाडके नाट्यगृह आहे. मराठी माणसांनी ज्यांच्यावर अपरंपार प्रेम केले, त्या बालगंधर्व आणि पु. ल. देशपांडे यांच्या नावांशी निगडित हे नाट्यगृह आहे, हे त्यातले प्रमुख कारण. पुलंच्या पुढाकाराने १९६२ मध्ये खुद्द बालगंधर्वांच्या हस्ते या नाट्यगृहाची पायाभरणी झाली. हे नाट्यगृह पूर्ण झाले १९६८ मध्ये. तेव्हा मात्र बालगंधर्वांचे निधन झाले होते. रसिकाग्रणी कॉंग्रेसचे नेते यश‌वंतराव चव्हाण यांच्या हस्ते या रंगमंदिराचे उद्घाटन झाले, तेव्हाच्या काळाच्या मानाने अतिशय आधुनिक, भव्य, वातानुकूलित आणि सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे हे नाट्यगृह अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरले. या नाट्यगृहाच्या बाहेर जवळ‌पास रोजी संध्याकाळी झळकणारा ‘हाउसफुल’चा बोर्ड आणि दरवळणारा मोगऱ्याच्या गजऱ्यांचा सुगंध ही पुणेकर रसिकांच्या नाट्यप्रेमाची जणू पावतीच!

. ‘बालगंधर्व’ हा पुणेकरांच्या एवढ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, की त्यावर तातडीने नकारात्मक प्रतिक्रिया येणे साहजिक आहे . राजकारणी मंडळींवरचा सामान्यांचा उडालेला विश्वास हेही एक प्रमुख कारण आहेच. मोक्याच्या जागांवर डोळा ठेवून असलेले राजकारणी आणि त्यातून शहराचे मानबिंदू असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणांचा होत असलेला ऱ्हास याला आपण सर्व जण साक्षी आहोत. पुनर्विकास म्हटले, की त्यात निविदा आणि मलिदा हे विषय येतातच. त्यामुळे ‘पुलंच्या कल्पनेतून बांधलेले एवढे देखणे रंगमंदिर पाडायचे ?’ अशी एक स्वाभाविक आणि भावनिक प्रतिक्रिया उमटते आहे मात्र, शांतपणे, गांभीर्याने विचार केल्यास आणि पुढील ५० ते शंभर वर्षांचा काळ डोळ्यांसमोर ठेवल्यास . सध्याचे रंगमंदिर न पाडता, या वास्तूचे नूतनीकरण करणे आणि आजूबाजूचा सर्वच परिसर विकसित करणे हाही एक पर्याय मांडला जातोय . नदीकाठच्या परिसराचे सुशोभीकरण करून, तेथे आकर्षक कॅफेटेरिया तयार करता येईल आणि डोळ्याचे पारणे फिटेल असा नैसर्गिक संवर्धन राखूनच असा विकास होईल , पण जर अन्य व्यवसायिक म्हणजे जसे डेक्कन सिनेमाच्या जागेवर झालेला व्यावसायिक वापर पाहता त्या सिनेमागृहाला दुय्यम दर्जा प्राप्त होतो तसे होऊ नये . या निसर्गाच्या सानिध्यातील कलाकारांसाठी वरदान ठरणारी निव्वळ रंगमंदिराची वास्तू आणि तेवढीच वास्तू असावी .नाही तर मोक्याच्या जागेवर डोळा होता असाच आरोप होईल असे कोणतेही अन्य बांधकाम इथे होऊ नये असेही अनेकांचे मत आहे

बावधनमध्ये कचरा संकलन केंद्राचा अट्टाहास का ?. चंद्रकांतदादा पाटील‌ यांचा आयुक्तांना थेट सवाल

रामनदीचा समावेश असलेला एकूण नदी सुधार प्रकल्प का रखडला?

२३ गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची आयुक्तांचा धक्कादायक दावा

पुण्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

पुणे -महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने रद्द केलेला कोथरुड मधील बावधन येथील कचरा‌ संकलन केंद्र सुरू करण्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोध दर्शवत, नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे पूर्ण समाधान होत नाही; तोपर्यंत हा प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका आ.‌ पाटील यांनी आज मांडली.‌ पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आलेला कोथरूड मधील बावधन कचरा प्रकल्प पुन्हा उभारण्यात येत आहे. या प्रकल्पास स्थानिकांचाही विरोध आहे. तसेच नगरविकास खात्याकडून विखंडनाचा अभिप्राय आलेला नसताना हा प्रकल्प उभारण्याचा अट्टाहास का? असा सवाल त्यांनी आयुक्तांना विचारला.तसेच नदी सुधार प्रकल्पासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या असतानाही हा प्रकल्प का रखडला असाही सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आयुक्तांकडे उपस्थित करुन, प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले.

कोथरूडसह पुण्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यात प्रामुख्याने बावधनमधील कचरा प्रकल्प, २३ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न, रामनदीचा समावेश असलेला नदी सुधार प्रकल्प, यांसह विविध विषयांचा समावेश होता.

या बैठकीला या कचरा प्रकल्पाला विरोध करणारे आंदोलक माजी खासदार प्रदीपदादा रावत,माजी नगरसेवक दिलीप वेडे-पाटील,नगरसेविका अल्पना वर्पे, तसेच माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस दीपक पोटे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सेव्ह पुणे ट्रॉफिकचे हर्षद अभ्यंकर, कर्वे रस्ता व्यापारी संघटनेचे मंदार देसाई, नगरकर सराफ यांसह इतर मान्यवर आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ,’ बावधनमधील प्रकल्प हा ट्रान्झिट स्टेशन म्हणजे तात्पुरत्या स्वरुपातील कचरा संकलन केंद्र असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण रामनदीच्या शुद्धीकरणावर याचा परिणाम होणार असल्याने हा कचरा प्रकल्प उभारु नये, अशी भूमिका आ.‌पाटील यांनी मांडली. त्यावर आयुक्तांनी स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या जाणून घेऊन, त्यांवर उपाययोजना करण्याचे मान्य केले. त्यानंतर रामनदीच्या शुद्धीकरणास बाधा पोहोचू नये; तसेच नागरिकांचे पूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका आ. पाटील यांनी यावेळी मांडली.

२३ गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची आयुक्तांचा धक्कादायक दावा

पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. पण तरीही त्याची अंमलबजावणी का होत नाही? असा प्रश्न मा. पाटील यांनी यावेळी बैठकीत उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी बांधकाम व्यावसायिकांकडून उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेऊन, सध्या पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची असल्याचे नमुद केले. त्यावर आ. पाटील यांनी सध्या सदर गावांमध्ये एक दिवसाने पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या भागांमध्ये पाणीपुरवठा दररोज करण्याची मागणी केली. त्यावर बैठक घेऊन निर्णय‌ घेण्याचे आयुक्तांनी मान्य केले.

.तसेच, कोथरूड मधून वाहणाऱ्या रामनदीच्या शुद्धीकरणासाठी त्याचा समावेश पुण्यातील नदी सुधार प्रकल्पात करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. तरीही अद्याप त्याचे काम सुरु झाला नसल्याने चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हा प्रकल्प का रखडला आहे, असा सवाल आ. पाटील यांनी आयुक्तांना विचारला. त्यावर आयुक्तांनी शासनस्तरावर धोरण स्पष्ट करण्याची सूचना केल्याचे सांगितले. ते धोरण स्पष्ट करुन कोणत्याही परिस्थितीत नदी सुधार प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी आ.‌पाटील‌ यांना दिली. त्यावर आ. पाटील यांनी समाधान व्यक्त करुन, तातडीने शासकीय प्रक्रीया पूर्ण करुन नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्याची सूचना केली.

कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या बालभारती-पौड रस्त्याचे‌ काम अद्याप का सुरू झाले नाही? असा सवाल आ. पाटील यांनी आयुक्तांसमोर उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी त्याचा विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र या प्रकल्पास काही पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला असल्याचे पाटील यांनीही सांगितले. त्यावर त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आयुक्तांनी मान्य केले.दरम्यान, पुण्यातील प्रस्तावित उड्डाणपूलांबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासाठी ‘सेव्ह पुणे ट्रॉफिक’चे हर्षद अभ्यंकर यांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पीपीटीद्वारे सादरीकरण करुन, त्याबाबत काही सूचना प्रशासनास केल्या. त्यावर आ. पाटील यांनी पुण्यातील प्रस्तावित उड्डाणपुलाचे नियोजन करताना स्थानिक नागरिक, व्यापारी, पर्यावरणप्रेमी, तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करावी, अशी सूचना केली. तसेच नळस्टॉप चौकातील उड्डाणपूलाखाली स्थानिक व्यापाऱ्यांना ‘पे ॲन्ड पार्किंग’ तत्वावर वाहन लावण्यास आयुक्तांनी या बैठकीत तत्वतः मान्यता दिली. त्याचे नियोजन तातडीने करण्याची सूचना आ.‌पाटील यांनी केली.

दांगट पाटील नगरातील क्लबवर मध्यरात्रीनंतर छापा, २२ गजाआड

पुणे शिवण्यातील दांगट पाटील नगर येथील ‘त्या’ बहु चर्चित क्लब वर अखेरीस मध्यरात्रीनंतर १ वाजता पोलिसांनी छापा मारला आणि २२ जणांना रंगेहाथ पकडून अटक केली .पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच संदीप कर्णिक,रामनाथ पोकळे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राजेश पुराणिक ,फौजदार पांढरकर ,पोलीस अंमलदार राजेश कुमावत ,बाबा करपे,नीलम शिंदे,मनीषा पुकाळे ,हनुमंत कांबळे ,इरफान पठाण,अश्विनी केकाण यांनी हि कारवाई करून येथून २ लाख ३० हजाराचा ऐवज जप्त केला. १५ टेबल आणि ६५ खुर्च्या लाऊन येथे रात्रभर जुगार अड्डा चालू असे .बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळमजल्यात हा क्लब सुरु होता .

११ मे रोजी फेरफार अदालतीचे आयोजन

फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात – जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे दि. ९ : आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड १९ बाबतच्या नियमांचे पालन करुन पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर ११ मे २०२२ रोजी फेरफार अदालत आयोजित केली जाणार आहे.

फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी ११ मे रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित रहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.

लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येवून जनतेच्या प्रलंबित साध्या, वारस, तक्रारी फेरफार नोंदी निर्गत करण्याच्या सूचना आहेत. पुणे जिल्ह्यात ९ मे २०२२ अखेर मुदत पूर्ण झालेल्या १४ हजार १३४ नोंदी प्रलंबित असून या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गती करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केलेले असून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनादेखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

मान्सूनपूर्व कामे गतीने करा;आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर रहावे – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

0

आपत्ती प्रतिसाद यंत्रणेबाबत देण्यात येणार सर्व जिल्ह्यांना प्रशिक्षण

मुंबई, दि.9 : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

आज कोकण व पुणे महसूली विभागातील जिल्ह्यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाली. यावेळी मंत्रालयातील कक्षातून आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार बोलत होते. या बैठकीला मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन संचालक संजय धारूरकर यांच्यासह दूरदृश्यप्रणालीव्दारे कोकण विभागीय उपायुक्त मकरंद देशपांडे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पी.बी.पाटील, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव,कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.नारळीकर, पालघरचे जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन, सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, साताराचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) श्री.मुधोळकर तसेच दोन्ही विभागातील जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा (Incidence Response System) ही राज्यात लागू करण्यात येत आहे.आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय राहावा यासाठी ही यंत्रणा काम करणार आहे.त्यामुळे या यंत्रणेसाठी लागणारे प्रशिक्षण व इतर माहिती जिल्हांना तात्काळ पुरवावी अशा सूचना यावेळी श्री.वडेट्टीवार यांनी बैठकीत दिल्या.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात पावसामुळे आपत्तीला तोंड देत आहोत. यंदाच्या वर्षीही सरासरीपेक्षा जास्त व वेळेपूर्वी पाऊस येणार असल्याचा अंदाज आहे. हा अंदाज पाहून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती निवारणाची कामे करण्यात यावीत. अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे आदी आपत्तीला तोंड देण्यासाठी स्थानिक ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा गतीमान असली पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पूर व अतिवृष्टीमुळे पाणी साठू नये यासाठी ज्या क्षेत्रात नागरीकरण मोठ्या प्रमाणात आहे, तेथे पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची, धोकादायक वृक्ष तोडणे अथवा फांद्या तोडणे, रस्ते दुरुस्ती, बांधकामाचे कामे पूर्ण करावीत. यंदाही पाऊस लवकर सुरू होणार आहे, हे लक्षात घेता सर्व यंत्रणांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपली आपत्ती यंत्रणा बळकट करावी. विशेषत: मुंबई प्रशासनाचा रेल्वे प्रशासनाशी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे.

मान्सूनपूर्व बैठका, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे, तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करून कोणत्याही प्रकारची आपत्ती कालावधीत जिवीत हानी होवू नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. शासनाने मंजूर केलेले कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातंर्गतची कामे गतीने करावीत, अशा सूचना यावेळी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिल्या.मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, कोल्हापूर, सातारा व सांगली या भागात वाढता पुराचा धोका लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची टीम कायमस्वरूपी या भागात राहण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. आपत्ती कालावधीत मदत करणाऱ्या साहसी टीमची नियुक्ती करून त्यांचे दूरध्वनी क्रमांक अद्यावत करावेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने स्थानिक मागणीनुसार अद्यावत वाहने अथवा साहित्य मागणीसाठी प्रस्ताव सादर करावेत.

पावसाचे प्रमाण वाढल्यास दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. त्याची आतापासूनच तयारी करण्यात यावी. पूरप्रवण गावे, नदीकाठची गावे यांचा संपूर्ण अभ्यास करावा. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयांनी काम करणे अत्यंत गरजेचे आहे, अशा सूचनाही मंत्री. श्री.वडेट्टीवार यांनी बैठकीत केल्या.

कोकण विभागात पावसाळ्यात अनेकदा आपत्ती ओढावते. अशा वेळी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेऊन तात्काळ मदत पोचविण्यासाठी पथके तयार करण्यात यावीत. या पथकांना लागणारे आवश्यक ते साहित्य पुरविण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्हा पातळीवर तरुणांचे पथक तयार करून त्यांना आपत्ती काळातील मदतीसंदर्भातील प्रशिक्षण देण्यात यावे. रायगड येथे राज्य आपत्ती निवारण पथकाचे दल तैनात ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथकही येथे तैनात करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करण्याच्या व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत आवश्यक साहित्यांची मागणी करण्याच्या सूचना विभागाचे प्रधान सचिव श्री. गुप्ता दिल्या.

यावेळी दोन्ही विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्या आपत्ती निवारणासाठी तसेच पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजनासंदर्भात माहिती दिली.

जितो कनेक्ट मधून पारख -लुणावत -रांकांचे सुमारे ५ लाख चोरीला

पुणे- नुकत्याच झालेल्या जितो कनेक्ट ला एक जोरदार झटका चोरट्यांनी दिला आहे. ४ लाख ९६ हजार रुपयांची चोरी निलेश पारख ,प्रशांत लुणावत ,प्रतिक रांका ,योगेश चुत्तर यांच्या बीसी स्टोल नंबर ७६ मधून ७ मे ते ८ मे च्या रात्र आणि दिवस भरातून चोरीला गेल्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पारख यांनी नोंदविली आहे.गंगाधाम अनेक्स येथील राजयोग लोन्स मध्ये जितो कनेक्ट हे प्रदर्शन सुरु होते . या प्रदर्शनात यांच्या एकत्रित स्टोल मधील काउंटर मधून हि चोरी झाली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आदलिंग याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत .