Home Blog Page 2002

अयोध्या दौऱ्यावरून वातावरण खराब होता कामा नये, हिंदुत्व ही भाजपची मूळ विचारधारा-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

मुंबई, दि. १० मे – उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशवासीयांची माफी मागावी तरच अयोध्येत पाय ठेवण्यास देऊ, असा
इशारा दिला असला तरीही ती त्यांची वैयक्तिक भूमिका असावी. यासंदर्भात उत्तर प्रदेश भाजप, महाराष्ट्र भाजप आणि पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व यांना जर आवश्यकता वाटली तर यामध्ये हस्तक्षेप करून मार्ग काढू शकतील. कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये व अयोध्येमधील वातावरण खराब होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. कारण हिंदुत्व ही भाजपची मूळ विचारधारा आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तेथील स्थानिक लोकांच्या भावना व्यक्त करण्याचा ब्रिजभूषण सिंह यांचा हा प्रयत्न आहे. ही भाजपची अधिकृत भूमिका नसावी. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्रातील आमचे नेते देवेंद्रजी आणि चंद्रकांतदादा पाटील हे एकमेकांशी बोलून समन्वयातून मार्ग काढू शकतील, अशी शक्यताही दरेकर यांनी व्यक्त केली.
अयोध्येच्या दर्शनासाठी कुठलाही नागरिक जाऊ शकतो, रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतो. त्यामुळे कोणीही टोकाची व आतताई भूमिका घेणे योग्य नाही. उत्तर प्रदेशच्या जनतेप्रति असलेली त्यांची जनभावना आम्ही समजू शकतो. कारण स्थानिकांचा मुद्दा, स्थानिकांची भावना नक्कीच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक राज्याला स्वतःची अस्मिता असते, असेही दरेकर यांनी सांगितले.
मुंबईत तसेच महाराष्ट्रातसुद्धा उत्तर भारतीयांना न्याय, सन्मान देण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे या मूळ विचारधारेमध्येच एकमेकांमध्ये संघर्ष होतोय का, असे मांडे जर विरोधक खात बसले असतील, तर त्यांच्या हातात आपण कोलीत देता कामा नये, असे दरेकर यांनी सांगितले.

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनामुळे संगीत -सांस्कृतिक जगताची मोठी हानी:आबा बागुल,नंदकिशोर कपोते यांनी वाहिली श्रद्धांजली

0

पुणे-

संतूर वाद्याला जगमान्यता मिळवून देणारे भारतीय संगीतकार प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनामुळे संगीत -सांस्कृतिक जगताची मोठी हानी झाली आहे,अशा शब्दात पुणे महापालिकेतील  काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांनी श्रद्धांजली वाहिली आणि २०१५ मध्ये त्यांनी  पुण्याला दिलेल्या विशेष भेटीच्या आठवणींना उजाळाही  दिला.  संतूर हे वाद्य जगप्रसिद्ध करण्यात पंडित शिवकुमार शर्मा यांचे योगदान मोठे होते. ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासमवेत पुण्याला  भेट दिली होती. शिवदर्शन येथील कै.वसंतराव बागुल उद्यानातील भारतरत्न भीमसेन जोशी कलादालनात पुणे मनपाच्यावतीने तत्कालीन  उपमहापौर  आबा बागुल यांच्या संकल्पनेतून मॅड  मॅपिंग  या अनोख्या  प्रकल्पात   पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे उत्तम वेशभूषेतील सुमारे साडेतीन फुट उंचीचे फायबरचे बैठे पुतळे बसविण्यात आले. त्यावेळी  पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी स्वतः उदघाटनाआधी भेट देऊन या प्रकल्पाचे आणि संकल्पनेचे कौतुक केले होते.हे पुतळे स्वतः प्रत्यक्ष बोलत असल्याचा भास होतो, काही क्षण कळलंही नाही, इतके हुबेहूब पुतळे आहेत  अशी प्रतिक्रिया त्यांनी  दिली होती.   त्यावेळी  त्यांच्याशी  झालेला संवाद  कायम स्मरणात आहे ,अशी भावना आबा बागुल यांनी व्यक्त केली.

डॉ.पं.नंदकिशोर कपोते म्हणाले,’पं. शिवकुमार शर्मा व माझे ३० वर्षा पासुन संबंध होते. माझी  व पं.शर्मां ची पहीली भेट ताशकंद (रशिया) ला झाली.त्या वेळी मी पं. बिरजू महाराज जीं समवेत नृत्य कार्यक्रमासाठी तेथे गेलो होतो. दोन दिवस आम्ही एकत्र होतो. पं.शर्मा जीं चा स्वभाव अतिशय मनमिळाऊ व विनोदी होता. त्यांनी माझे नृत्य पाहीले ,कौतुक केले व आशीर्वाद दिले.तो दिवस मी कधीही विसरणार नाही. त्या नंतर पं.शर्मां शी अनेक वेळा भेट झाली. ते मला ‘नंदू’ म्हणायचे.
माझी शेवटची भेट पुण्याजवळ हाडशी येथे झाली.त्यावेळी तेथे सत्य साई बाबा आले होते व पं.शिवकुमार शर्मा त्यांच्या दर्शनासाठी आले होते. मलाही दर्शनासाठी आलेले  पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी माझी आवर्जून विचारपूस केली मी त्यांच्या पाया पडुन आशीर्वाद घेतले.                                        
पं.शिवकुमार शर्मा  यांनी संतूर  या दुर्मीळ वाद्याला संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक शिष्य तयार केले.
पं.शिवकुमार शर्मा यांच्या अकस्मित जाण्यामुळे कला क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. कलाविश्व पोरके झाले आहे .कला क्षेत्रातील तेजःपुंज दैद्विप्यमान तारा निखळला आहे.ईश्वर पं.शिवकुमार शर्मा  यांच्या आत्म्यास शांती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. ज्या ज्या  वेळी संतूर वाद्याचे नाव निघेल त्या त्या वेळी पं.शिवकुमार शर्मा यांचे स्मरण होत राहील. शत शत नमन.              

डॉ.पं.नंदकिशोर कपोते    
 प्रसिद्ध कथक नर्तक              
मो: 9371099911

 संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन…

0

 

मुंबई-संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. आज १० मे रोजी सकाळी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. पंडित शिवकुमार हे ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहें.

भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान अतुलनीय होते. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे.‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही त्यांची ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या चित्रपटांना संगीत दिले.

विद्यार्थी रमले सायकल दुरुस्ती अन हवामान नोंदीत

विमलाबाई गरवारे प्रशालेत हवामान केंद्र व सायकल दुरुस्ती कार्यशाळेचे उद्घाटन
पुणे : दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या हवामानाच्या नोंदी आणि सायकल दुरुस्ती करण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. सायकल पूर्ण खोलून पुन्हा बांधणी करणे, रिपेअरिंग करणे, पंक्चर काढणे, बेअरिंग बसवणे आदी गोष्टी अनुभवत विद्यार्थी या कार्यशाळेत रमले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (मएसो) संचालित सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत हवामान केंद्र व सायकल दुरुस्ती कार्यशाळेचे उद्घाटन मंगळवारी झाले. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (आयआयटीएम) संशोधक डॉ. मिलिंद मुजुमदार यांच्या हस्ते हवामान केंद्राचे उदघाटन झाले. मराठी माध्यमाच्या शाळेत उभारलेले पुण्यातील पहिलेच हवामान केंद्र आहे. भालचंद्र गोंधळेकर यांनी सायकलमधील विज्ञान विद्यार्थ्यांना समजावून सांगत रिपेअरिंग प्रात्यक्षिक दाखवली.

प्रशालेचे माजी विद्यार्थी व विज्ञान भारतीचे सक्रिय कार्यकर्ते विलास रबडे, विश्वास काळे, विज्ञान भारतीचे भालचंद्र गोंधळेकर, श्रीकांत कुलकर्णी, एम. एस वर्तक, हवामान केंद्राचे निर्माते अतुल कुलकर्णी, शाला समितीच्या अध्यक्षा आनंदी पाटील, ‘मएसो’चे सहसचिव व प्रशालेचे महामात्र सुधीर गाडे, मुख्याध्यापिका अनिता नाईक, उपमुख्याध्यापक संजय जाधव, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. मिलिंद मुजूमदार म्हणाले, “दैनंदिन जीवनात हवामानाच्या नोंदी घेणे महत्वाचे आहे. तापमानातील बदलाचे नेमके काय परिणाम होतात याचे नेमके विश्लेषण करण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करणे या हवामान केंद्रामुळे उपयोग होईल. मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे असून, आयुष्यभर शिकण्याची इच्छा असावी.”

विलास रबडे यांच्या संकल्पनेतून हे हवामान केंद्र साकारले आहे. विश्वास काळे यांनी अनुभवातून शिकले पाहिजे असे सांगत विद्यार्थ्यांना स्वानुभव आणि प्रशिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी विविध उपक्रम शाळेत राबवले जात आहेत, असे नमूद केले. अतुल कुलकर्णी यांनी दृकश्राव्य माध्यमातून हवामान केंद्राचे विविध पैलू क्यूआरकोड वाचून कसे पाहावे या बाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आता काळाची गरज ओळखून हवामान साक्षर बनले पाहिजे, असे नमूद केले.

सुधीर गाडे म्हणाले, “गरवारे प्रशालाचे विद्यार्थी आता पाऊस कधी, केव्हा पडणार, हे स्वतः ओळखू  शकतात. तंत्रज्ञानात सातत्याने प्रगती होत आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायला हवा. तज्ज्ञ व्यक्तींकडून जास्तीत जास्त शिकून घ्यावे.”

भालचंद्र गोंधळेकर यांनी सायकल मागे असलेले विज्ञान समजून सांगितले. अनिता नाईक यांनी प्रास्ताविक केले. विज्ञान शिक्षिका व प्रयोगातून विज्ञान उपक्रमाच्या समन्वयक मेघना देशपांडे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. अनघा जोशी यांनी केले. लता टिळेकर यांनी आभार मानले.

सरकारविरोधात बोलणे,लिहिणे,आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार;इंग्रजांनी आणलेले राजद्रोहाचे कलम कालबाह्य

कोल्हापूर-इंग्रजांनी 1890 साली आणलेले राजद्रोहाचे कलम आता कालबाह्य आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. नुकतेच केंद्र सरकारने या कायद्याबाबत फेरविचार करणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवार म्हणाले, इंग्रजांनी राज्याविरोधातील उठाव दडपण्यासाठी हा कायदा आणला होता. या कायद्यांतर्गत सरकारला कुणाविरोधातही गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात डांबता येत होते. मात्र, आता इंग्रज गेले तरी कायदा तसाच कायम आहे. आता देशात आपलीच सत्ता आहे. तसेच, आपल्या प्रश्नांसाठी सरकारविरोधात आंदोलन करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. त्यामुळे या कायद्याचा आता वापर करणे योग्य नाही, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले. यावेळी शरद पवारांनी राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत मात्र मौन बाळगले.

कायद्यात सतत बदल होणे गरजेचे!
राजद्रोहाच्या कायद्यामध्ये सतत बदल होत राहणे गरजेचे आहे. पुर्वी राजद्रोह कायदा रद्द करण्याबाबत नकारात्मक असणारे केंद्र सरकार आता या काद्याचा फेरविचार करणार असल्याचे म्हणत आहे. हा बदल सकारात्मक आहे. केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला आहे, असे शरद पवार म्हणाले. आम्ही संसदेतही या कायद्यातील कठोर तरतुदीत बदल होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानुसार केंद्र सरकार पाऊल उचलेल, अशी आशाही शरद पवारांनी व्यक्त केली.

केंद्राच्या यु टर्नचे पवारांकडून स्वागत
इंग्रजांच्या काळातील राजद्रोहाशी संबंधित कायद्याचा बचाव करणे आणि सर्वोच्च न्यायालयात त्यास आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्यास सांगितल्यानंतर सोमवारी केंद्र सरकारने सोमवारी यू टर्न घेतला. सरकारने कालच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले की, आम्ही कायद्याच्या तरतुदींचा नव्याने आढावा आणि विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचे शरद पवारांनी स्वागत केले आहे.

राज ठाकरेंचा दौरा राष्ट्रीय प्रश्न नाही!
मनसे प्रमुख राज ठाकरे 5 मेरोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहे. मात्र, या दौऱ्याला युपी खासदारांकडून विरोध केला जात आहे. त्यावर शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, कुणाचाही अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही. देशात इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

देशात महागाई ही प्रमुख समस्या
देशात सध्या महागाई ही प्रमुख समस्या आहे. पेट्रोल- डिझेल व सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांचे जगणे कठिण होत आहे. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, देशात भोंगे, हनुमान चालिसा अशा मुद्द्यांवरच राजकारण केले जात आहे, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली.

निवडणुका 15 दिवसांत घ्या, असे कोर्टाचे आदेश नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 15 दिवसांत घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले नाहीत. 15 दिवसांत निवडणुकीची प्रक्रिया सुरू करा, असे कोर्ट म्हणाले आहेत. त्यामुळे 15 दिवसांत निवडणुका घेण्याचे सरकारवर बंधन नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले. तसेच, निवडणुकीसाठी प्रभाग, आरक्षण निश्चित करणे, यासाठीच दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे 15 दिवसांत निवडणुका घेणे शक्यही नसल्याचे शरद पवार म्हणाले.

सीएम ठाकरेंना ,राज ठाकरेंचे खरमरीत पत्र-सहनशीलतेचा अंत पाहू नका; सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही!

मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला सुनावले आहे. राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असे म्हणत राज ठाकरे भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायले मिळत आहे.

राज ठाकरेंच्या पत्रात नेमके काय?

सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी 4 मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबले. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलिस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलिस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशाराच दिला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रदिनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती. मशिदींवरील भोंग्यांचा आवाज हाच त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दा होता. भोंग्यांवरून अजान झालीच तर आम्ही पुन्हा दुप्पट आवाजाने मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी त्यांवेळी दिला होता. जोपर्यंत सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमचे उतरत नाही व ही सामाजिक समस्या कायमची संपत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

शिवसेना – मनसे आमने सामने

अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना आणि मनसे आमने सामने आल्याचे पाहायला मिळते आहे. राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर आता त्यावर चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांना त्यांचा अयोध्या दौरा यशस्वी करायचा असून प्रवक्ते वगळता इतर कोणीही आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलू नये अशी स्पष्ट ताकीद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांची माफीशिवाय राज ठाकरे यांना प्रवेश नाही, अशी भूमिका घेतली आहे. सिंह यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंविरोधात रॅली काढून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज ठाकरे हे उत्तर प्रदेशात गेल्यास त्यांचा भाजप खासदारासोबत संघर्ष होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत म्हणून मनसैनिक मोठ्या प्रमाणावर तयारीला लागले आहेत. मनसेकडून मुंबईत ‘अयोध्या चलो’चे पोस्टर लावण्यात आले आहेत.

शिवसेनेकडून अयोध्योत बॅनरबाजी करण्यात आली होती. यावर असली आ रहे है नकली से सावधान अस मजकूर होता. हे बॅनर अयोध्या प्रशासनाने काढले असून यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याला भाजपचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. तर आजच शहनवाज हुसेन यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदारांची भेट घेतली आहे. यात त्यांची समजूत काढल्याची माहिती समोर येत आहे.

राज यांनी केले होते विखारी विधान

राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत बोलताना विखारी विधान केले होते. ते म्हणाले की, मशिदीवरील भोंगे उतरवायला हवे. यांना रस्त्यावर नमाज पठण करण्याचा अधिकार कुणी दिला. आवाज आला तर तोंडात बोळा कोंबा, विनंती करून समजतील तर ठिक अन्यथा एकदा होऊनच जाऊद्या अशी चिथावणीही राज ठाकरे यांनी दिली होती.

४० हजारहून अधिक युवक-युवतींना मिळणार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रशिक्षण

0

मुंबई, दि. 10 : राज्यात उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री श्री. राजेश टोपे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.युथ एड फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राज्यातील विविध भागातील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात्रेच्या प्रारंभ प्रसंगी कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, उपसचिव नामदेव भोसले, युथ एड फाउंडेशनचे अध्यक्ष मॅथ्यू मॅथन, फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया कोठारी यांच्यासह स्वयंसेवक, प्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 40 दिवस सुमारे 4 हजार किलोमीटरचा प्रवास या यात्रेद्वारे करण्यात येणार आहे. यात्रेमध्ये 40  उद्योजकता प्रशिक्षक सहभागी होणार असून हे प्रशिक्षक सुमारे 40 हजारहून अधिक युवकांना भेटतील, त्यांना सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देतील. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांमध्ये उद्योजकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे उद्योगाच्या नवनव्या संकल्पना आहेत अशा युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे.  युवकांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम यात्रेदरम्यान राबविण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात 3 दिवसांच्या उद्योजकता प्रशिक्षणाचा कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व 36 जिल्ह्यामध्ये डिसेंबरअखेर 4 हजार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी विपणन सहाय्य प्रदान करण्याबरोबरच संबंधीत युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शक्य असेल त्या सरकारी योजनांशी जोडण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.

कौशल्य विकासातून शाश्वत विकासाला चालना

मंत्री श्री. टोपे याप्रसंगी म्हणाले की, राज्यातील युवकांमध्ये नवनवीन संकल्पना आहेत, स्टार्टअप्सचा विकास, सूक्ष्म व्यवसाय, लघुउद्योग यांना चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज सुरू झालेल्या उद्यमिता यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या अशा विविध योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील युवक-युवतींपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. युवकांचा कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी, नवनवीन संकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या स्टार्टअपचा विकास या माध्यमातूनच राज्याच्या शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे, असे मंत्री श्री. टोपे म्हणाले.उद्यमिता यात्रेचा आज प्रारंभ झाला असून पालघर, वसई, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या मार्गे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून जनजागृती करत ही यात्रा प्रवास करणार आहे. 20 जून रोजी पुणे येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

साहित्य संस्कृती क्षेत्रात बंगालचे योगदान फार मोठे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 10 :- बंगालने देशाला राष्ट्रगीत दिले तसेच स्वातंत्र्य लढ्यात स्फुल्लिंग चेतविणारे ‘वंदेमातरम’ सारखे देशभक्तीपर गीत दिले. बंकीम चंद्र यांचे ‘आनंदमठ’ तुलसीदासांच्या रामचरित मानसपेक्षा काहीच कमी नाही, असे सांगताना बंगालचे देशाच्या साहित्य संस्कृती क्षेत्रात योगदान फार मोठे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

मुंबईतील बंगाली भाषिक लोकांच्या ‘बंग मैत्री संसद’ या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी राजभवन येथे एका विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

रवींद्रनाथ टागोर यांच्या १६१ व्या जयंतीचे औचित्य साधून टपाल विभागातर्फे विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आले.

भारताच्या विविध राज्यांमध्ये लोकांच्या भाषा, लिपी व वेशभूषा वेगवेगळ्या असल्या तरीही संपूर्ण देश सांस्कृतिक दृष्टीने पूर्वापार एक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. भाषा देखील वरपांगी वेगवेगळ्या वाटत असल्या तरीही ऐकल्यानंतर त्यातील समानतेचे दुवे दिसून येतात असे राज्यपालांनी सांगितले. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी साजरा करीत असताना ‘बंग मैत्री संसद’ ही संस्था देखील ७५ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते बंग मैत्री संसदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्यावतीने राज्यपालांना रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ ग्रंथाची प्रत देण्यात आली

कार्यक्रमाला टपाल विभागाच्या महाराष्ट्र व गोव्याच्या प्रधान पोस्ट मास्टर जनरल वीणा श्रीनिवास, मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, बंग मैत्री संसदचे अध्यक्ष देबब्रत मित्रा, महासचिव बिवास चक्रवर्ती, सहसचिव इंद्रनील मुखर्जी तसेच बंग मैत्री संसदेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील विमानतळ विकासासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचा सन्मान

मुंबई, दि. 10 : राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.कोल्हापूर,चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया व नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू असून देशातील प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार करून गौरवास्पद कामगिरी केली आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. या कामगिरीबद्दल ‘बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर’ या श्रेणीत भारत सरकारकडून एमएडीसीला मिळालेले पारितोषिक मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना प्रदान केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री ॲड अनिल परब, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव विकास खारगे,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानपत्तनच्या प्रधानसचिव वल्सा नायर-सिंग, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.नितीन जावळे, दूरदृश्यप्रणालीव्दारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अनबलगन, नागपूर महापालिका आयुक्त बी.राधाकृष्णन, नागपूर सुधारणा ट्रस्टचे अध्यक्ष मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर.विमला या बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील विमानतळ विकासासाठी शासन करत असलेल्या कृती आराखड्यातील कामे प्राधानान्ये पूर्ण करावीत.शिर्डी विमानतळावरून ३० एप्रिल २०२२ अखेर ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला आहे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे.तसेच शिर्डी येथून कार्गोने भाजीपाला,फुले व फळे हे बेंगलोर,चेन्नई व दिल्ली येथे पाठविण्यात येत आहेत.आतापर्यंत शिर्डी वरून कार्गोने १ लाख ७० हजार किलो पर्यंतची शेतमाल देशाच्या इतर भागात नेण्यात आला कौतुकाची बाब आहे. शिर्डी बरोबरच इतर जिल्ह्यातील सुरू असलेली विमानवाहतूक सेवा दर्जेदार असावी यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास विकास कंपनीने लक्ष द्यावे. मिहान येथे सद्यस्थितीत सुरू असलेले प्रकल्पांची कामे गतीने करावीत.समृध्दी महामार्गामुळेही नजीकच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विमानवाहतूकीस चालना मिळेल त्यामुळे या भागातील प्रस्तावीत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. कोल्हापूर-रत्नागिरी येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी सुरू असलेली कार्यवाही,अमरावती विमानतळ धावपट्टीची लांबी वाढविणे ही कामे देखील गतीने करावीत.पालघर येथे सॅटेलाईट विमानतळाचा प्रस्तावित प्रकल्पाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सद्यस्थितीत एमएडीसीमार्फत सुरू असलेले व भविष्यात राबविण्यात येणारे उपक्रम, मिहानमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, केंद्रशासनाची उडाण योजना राबविण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही याबाबत व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पूर्ण केलेल्या विमानतळांचे हस्तांतरण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे करावे जेणे करून एकाच यंत्रणेकडे विमानसेवेच्या विकासाबाबत काम करता येणे सुलभ होईल असे ही संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले.

सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

0

मुंबई, दि. 10 : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका माहे जानेवारी 2021 मध्ये पार पाडण्यात आल्या आहेत. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात पुनश्च एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सबब जात वैधता प्रमाणपत्र 17 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याबाबतची घोषणा ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे. मात्र वेळेत जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित राहू नये यासाठी सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक 28 फेब्रुवारी 2021 असा करून निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

त्या अनुषंगाने जानेवारी 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी पडताळणी समितीकडून दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 17 जानेवारी 2022 असा होता. तथापि माहे जानेवारी 2021 च्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राखीव प्रवर्गातून उमेदवार निवडून आले आहेत. त्यात राज्यातील कोव्हीड-19 च्या निर्बंधामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होवू शकले नाही. त्यामुळे राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांना पदापासून वंचित राहू नये यासाठी विशेष बाब म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती श्री.मुश्रीफ यांनी दिली आहे.

…म्हणून आम्ही बालगंधर्वच्या पुनर्विकास प्रकल्पाला होकार दिला..एनसीपी सांस्कृतिक विभागाचंही झालं असं ‘घूमजाव’

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील विविध विषयांवर झालेल्या वेळोवेळी च्या घुमजाव ची माहिती राजकीय क्षेत्रात सर्वांना आहेच ,पण कधी काळी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करणारी एनसीपी ची सांस्कृतिक आघाडी देखील आता वरीष्टांचे बोट धरून चालु लागली आहे, अगोदर विरोध असणाऱ्या आघाडीने होकार कसा दिला यावर सांस्कृतिक विभागाने दिलेले हे स्पष्टीकरण पहा …

वाचा त्यांच्याच शब्दात

पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असतानाच बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या संदर्भात सगळ्यात पहिला विरोध व कलाकारांना घेऊन पहिलं आंदोलन हे राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर केल होत,
पण त्या ठिकाणी पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याशी सर्व कलाकारांना घेऊन भेटून त्यावेळी चर्चा केल्याच्या नंतर त्यातले बारकावे त्यातील भव्यता तसेच पुनर्विकास विकास केल्यानंतर होणारा तिथल्या डेव्हलपमेंट एक भव्य अशी वास्तु उभी राहणार हे पाहिल्यानंतर आम्हीसुद्धा पुनर्विकासाला होकार दिला,

तसेच त्याच बरोबर बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या संदर्भात आमचा जसा काही गोष्टींमध्ये गैरसमज प्रशासनाच्या बाबतीत झाला होता, तसाच गैरसमज हा आता काही नवीन संघटनांना झाला असावा याबाबतीत आम्ही लवकरच सर्व पक्षाच्या आणि विविध संघटनेच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्ष यांना घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या बरोबर एक संयुक्तरित्या बैठक लवकरच आम्ही लावण्याचे ठरवीत आहोत, त्या बैठकीमध्ये बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाच्या संदर्भात या सर्व संघटनांना एक चांगलं प्रेझेंटेशन दाखवण्यात येईल हे प्रेसेंटेशन पाहिल्यानंतर या सर्व राजकीय पक्षांच्या व विविध संघटनांच्या मनातील गैरसमज आम्ही दूर होईल

बाबासाहेब पाटील: प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

राज्य सहकारी बँकेला 1,402 कोटीचा ढोबळ नफा तर 602 कोटीचा निव्वळ नफा

  • सन 2021-22 या आर्थिक वर्षात राज्य सहकारी बँकेला रु.1,402 कोटीचा ढोबळ नफा तर रु.602 कोटीचा निव्वळ नफा
  • नेट एन.पी.ए. 0 %,गेल्या 111 वर्षातील उच्चांकी उलाढाल रु.47,028 कोटी प्रोव्हीजन कव्हरेज रेशो -100 %

पुणे – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात एक हजार ४०२ कोटींचा ढोबळ नफा तर, ६०२ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच, नेट एन.पी.ए.चे प्रमाण शून्य असून, गेल्या १११ वर्षांतील उच्चांकी आर्थिक उलाढाल ४७ हजार २८ कोटी रुपयांपर्यंत पोचल्याची माहिती राज्य बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. राज्य बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

अनास्कर म्हणाले, राज्य बँकेने ३१ मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या सर्व आर्थिक निकषांचे पालन केले आहे. बँक प्रशासनाने राबविलेल्या विविध योजना आणि धोरणात्मक निर्णयामुळे बँकेची प्रगती होत आहे.

राज्य बँक दरवर्षी मुख्यमंत्री सहायता निधीला पाच कोटींची रक्कम देते. बॅंकेच्या सभासदांना दरवर्षी १० टक्के लाभांश देण्यात येतो. बॅंकेच्या सहा कर्मचारी संघटनेसोबत करार करण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना १२ टक्के भरीव वेतनवाढ दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवर एक टक्का अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सामाजिक बांधिलकी जपत कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘जिव्हाळा’ कर्ज योजना सुरू केली आहे.

सर्व आघाडयांवर गतवर्षाच्या तुलनेत भरघोस वाढ ,:-
बँकेच्या आकडेवारीमध्ये बँकेच्या नक्त मुल्यांमध्ये गत वर्षीपेक्षा रु.500 कोटीने वाढ होवून ते रु.3,203 कोटी पर्यंत पोहोचले आहे. बँकेचे स्वनिधी रु.6,000 कोटीपर्यंत पोहोचला आहे. बँकेच्या व्यवहारामध्ये रु.3,426 कोटीने वाढ होवून ते रु.47,028 कोटी पर्यंत पोहोचले आहे. बँकेच्या ढोबळ नफ्यामध्ये रु.626 कोटीची भरीव वाढ होवून तो रु.1,402 कोटीवर पोहोचला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये रु.238 कोटीची वाढ होवून तो रु.602 कोटी पर्यंत पोहोचला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार बँकेच्या सेवकांची संख्या कमी केल्याने सन 2018 मध्ये असलेला प्रति सेवक व्यवसाय रु.26 कोटी वरुन आज रु.65 कोटी पर्यंत पाहोचला आहे. अशा प्रकारे सर्वच आघाडयांवर बँकेने प्रगती केलेली असून सोबत तुलनात्मक आकडेवारीची पुस्तिका जोडली आहे.

ऑडिट वर्ग
बँकेस गेली 9 वर्ष लेखापरीक्षणामध्ये सतत `अ’ ऑडिट वर्ग प्राप्त होत आहे. मागील 8 वर्षापासून बँक सभासदांना 10… इतका लाभांश देत आहे. तसेच बँक दरवर्षी रु.5 कोटी इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहे.
बँकेच्या वाढत्या प्रगतीची मुख्य कारणे ः
राज्य बँकेने आपल्या सेवकांची 100 क्षमता उपयोगात आणण्यासाठी तसेच अनावश्यक कर्मचारी संख्या कमी करण्यासाठी जाहीर केलेल्या स्वेच्छा निवृत्ती योजनेमुळे सेवकांच्या संख्येमध्ये मोठया प्रमाणावर घट झाल्याने बँकेची नफा क्षमता वाढली आहे.
• बँकेने आपले व्यवहार फक्त जिल्हा बँका, साखर कारखान्यांपर्यंतच सिमित न ठेवता नागरी सहकारी बँका, पतसंस्था, औद्योगिक क्षेत्र तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारे शेतकऱयांना थेट कर्जपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेमुळे बँकेच्या व्यवसायात कमालीची वृध्दी झाली आहे.
• बँकेने राज्यातील नागरी सहकारी बँकांना सरकारी कर्जरोख्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. तसेच आरटीजीएस/एनईएफटी या व्यवहारांसाठी थेट पोर्टल उपलब्ध करुन दिले आहे. सीटीएस क्लिअरिंगसारख्या अनेक सुविधा राज्य बँकेने सहकारी बँकांना उपल्बध करुन दिल्या आहेत.
• सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी बँकेने `सायबर ऑपरेशन सेंटर’ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
• विदेश विनिमय व्यवहार ः-राज्य बँकेस विदेश विनिमय व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेने अधिकृत परवाना दिला असून आपल्या ग्राहकांना व अनेक नागरी सहकारी बँकांना व त्यांचे ग्राहकांना विदेश विनिमयाची तसेच एक्सपोर्ट व इंपोर्ट क्रेडिट लिमिट देत असून त्यांचे फॉरेक्स व्यवहार राज्य बँक समर्थपणे हाताळत आहे.
बचत खात्यावरील व्याजदरत 4  पर्यंत वाढ ः- सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात 0.50
ने वाढ तो 4 वर नेला आहे.
• आजारी साखर उद्योगासाठी अनेक योजना ः- ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग, सूत गिरण्या यांचेसाठी बँकेने आत्मनिर्भर कर्ज योजना, पुनर्बांधणी कर्ज योजना, एकरकमी परतफेड कर्ज योजना अशा विविध कर्ज योजनांद्वारे या व्यवसायात स्थिरता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
सेवक करार
बँकेच्या सेवक कराराची मुदत दि.31.3.2021 रोजी संपल्याबरोबर अत्यंत अल्प कालावधीत दि.4 मार्च 2022 रोजी पुढील 5 वर्षाकरिता बँकेच्या एकूण 6 कर्मचारी संघटनांबरोबर सेवक करार केला असून, त्याद्वारे सेवकांना सरासरी 12… इतकी भरीव वाढ दिलेली आहे.

सहकारी क्षेत्र आबाधित ठेवण्यासाठी
सहकारी क्षेत्रामध्ये अडचणीत असलेले साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर सहकारी संस्थांची बँकेच्या कर्ज वसुली अंतर्गत विक्री न करता त्या भाडयाने देण्याचा धोरणात्मक निर्णय बँकेने घेतला. त्यामुळे सहकारी क्षेत्रातील संस्थांचे रुपांतर खाजगी क्षेत्रामध्ये न होता सहकारी क्षेत्र आबाधित ठेवण्यासाठी बँकेने प्रयत्न केले आहेत.
अडचणीतील जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱयांना कर्जपुरवठा
राज्य बँकेने अडचणीतील जिल्हा बँकांच्या अंतर्गत येणाऱया विविध कार्यकारी सोसायटयांना थेट कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्डकडे मागितलेल्या परवानगीस नुकतीच मंजुरी मिळाल्याने शेतकऱयांना मोठी मदत होणार आहे.
सामाजिक बांधिलकीः
बँकेने स्वतची प्रतिमा उंचावत असतांनाच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कारागृहातील कैद्यांना त्यांच्या करागृहातील उत्पन्नावर, कैंद्यांच्या कुटुंबातील मुलामुलींचे शिक्षण, आरोग्य, मुलामुलींचे विवाह सारख्या कौटुबिक गरजा भागविण्यासाठी `जिव्हाळा’ कर्ज योजना आखली आहे. अशा प्रकारे कैद्यांना कर्ज देणारी जगातील एकमेव बँक ठरली आहे.
• वरिष्ठ नागरीकांकरिता ज्यादा व्याजदर ः-देशभरातील बँकांनी ठेवींवरील व्याजदरात मोठया प्रमाणावर कपात केली आहे. परंतु राज्य बँकेने कोव्हीड – 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवरदेखील वरिष्ठ नागरीकांकरिता त्यांच्या ठेवींवर एक टक्का अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा वरिष्ठ नागरीकांना काही प्रमाणात नक्कीच दिलासा मिळेल.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धेचे आयोजन


पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा 2022चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा राज्यातील पश्चिम, दक्षिण, मध्य आणि पूर्व अशा चार विभागात होणार असून स्पर्धेत एकूण 27 संघ सहभागी झाले आहेत. बंदिजनांसाठी आयोजित केलेली देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव आणि पहिलीच स्पर्धा असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धाप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले
यावेळी पंडित रघुनाथ खंडाळकर, प्रा सगिरा शेख, प्रा शिवानी अबनावे उपस्थित होते.
पश्चिम विभागाची स्पर्धा दि. 20 ते 30 मे 2022, दक्षिण विभागाची स्पर्धा दि. 1 जून ते 10 जून 2022, मध्य विभागाची स्पर्धा दि. 11 जून ते 20 जून 2022 आणि पूर्व विभागाची स्पर्धा दि. 21 जून ते 30 जून 2022 या कालावधीत प्रत्येक कारागृहात होणार आहे. राज्यातील विविध तुरुंग/कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कलागुणांना भक्तीमार्ग, अध्यात्म व भजनाद्वारे वाव मिळावा, बंदिजनांमध्ये सकारात्मक विचार वाढीस लागावे, थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने एका अध्यादेशाद्वारे कारागृहातील बंदिजनांसाठी स्पर्धा घेण्यास परवानगी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री. अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि तुरुंग महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होऊ घातलेली आहे.
या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ह. भ. प. बापूसाहेब मोरे (देहूकर), विद्यावाचस्पती ह. भ. प. डॉ. रामचंद्र देखणे, देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थांनचे अध्यक्ष ह. भ. प. नितीनमहाराज मोरे, आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. योगेश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
सहभागी स्पर्धकांना सादरीकरणासाठी 25 मिनिटांचा वेळ दिला जाणार असून स्पर्धक एकूण चार रचना सादर करणार आहेत. त्यामध्ये कुठल्याही संत श्रेष्ठींच्या अभंग रचनांपैकी तीन रचना व चौथी रचना कोणत्याही सामाजिक विषयावर अभंग वा भजनाच्या धर्तीवर सादर करायची आहे. ही रचना स्वतंत्ररित्या रचलेली असावी अशी अट आहे. सर्व रचना वाद्यांच्या साथीने सादर करणार आहेत. स्वरचित रचनेसाठी पश्चात्ताप, प्रामाणिकपणा, समाजसेवा असे विषय देण्यात आले आहेत. निवड झालेल्या तीन संघांची महाअंतिम फेरी शासनाच्या निर्देशानुसार घेण्यात येणार आहे.
महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे सदस्य कारागृहात जाऊन स्पर्धेचे परिक्षण करणार आहेत.
स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट
स्पर्धेत सहभागी होणार्‍या संघांना सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय चार फूट आकाराची फ्रेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 100 पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे.

एमआरएफ  मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेत पुण्याचा ऋग्वेद बारगुजे सर्वोत्तम रायडर

  •  एमआरएफ  मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेत पेट्रोनस टीव्हीएस संघांचे वर्चस्व

पुणे, ९ मे २०२२: पुण्याचा माजी राष्ट्रीय विजेता ऋग्वेद बारगुजे याने ७००मीटर अंतराच्या आव्हानात्मक ट्रॅकवर वर्चस्व गाजवताना कॅटेगरी १ मधील दोन्ही शर्यती जिंकून सर्वोत्तम रायडर ‘किताब पटकावताना नुकत्याच पार पडलेल्या एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवला. पुण्यातील मुंढवा येथे पासपोर्टच्या समोरच्या मैदानावर हि स्पर्धा पार पडली. 
ऋग्वेदच्या प्रभावी कामगिरीमुळे प्रेरणा मिळालेल्या पेट्रोनस टीव्हीएस रेसिंग संघातील अन्य रायडर्सनी या स्पर्धेतील इतर कॅटेगरीमधील शर्यतींवर संपूर्ण वर्चस्व गाजवताना स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदासाठी आपल्या संघाचे स्थान भक्कम केले. 
स्पर्धेच्या दिवशी अत्यंत उष्ण वातावरणात स्पर्धंपूर्वी संपूर्ण ट्रॅकला पाणी मारून चुरस आणखीनच वाढविण्यात आल्यानंतर ऋग्वेदने ट्रॅकचा अंदाज घेण्यासाठी एक चाचणी फेरी मारली व क्लास एक मधील हि शर्यत एकदा सुरु झाल्यावर लगेचच आघाडी मिळवताना त्याने आपला अनुभवी संघ सहकारी सीडी चिनन यालाहि दुसऱ्या क्रमांकावरच ठेवले. परिणामी तब्बल १० अवघड वळणे असलेल्या अत्यंत आव्हानात्मक शर्यतीतहि याच दोघांनी पहिले क्रमांक राखून वर्चस्व गाजवले. 
कोविड महामारीतील काळात एका अपघातामुळे झालेल्या दुखापतीमुळे दीर्घकाळानंतर ट्रॅकवर परतलेल्या बारगुजेने या शर्यतीतील कामगिरीच्या जोरावर ४०गुणांची कमाई करताना नाशिक येथील पहिल्या फेरीतील ३७ गुणांमध्ये बहुमोल भर घातली व शर्यतीचा हा मौसम संपत आला असताना सर्वसाधारण विजेतेपदासाठी आपले आव्हान दिले.    

क्लास 1 एसएक्स 1:

1. ऋग्वेद बारगुजे(टीव्हीएस-आरटीआर 300, पेट्रोनस टीव्हीएस संघ), 2. ईक्षण शानबाग(टीव्हीएस-आरटीआर 300पेट्रोनस टीव्हीएस संघ), 3. सीडी जिनन(टीव्हीएस-आरटीआर 300पेट्रोनस टीव्हीएस संघ),4. व्ही प्रज्वल((टीव्हीएस-आरटीआर 300पेट्रोनस टीव्हीएस संघ),5. श्लोक घोरपडे(केटीएम 150–सातारा).

क्लास 2 एसएक्स2:

1. के मनीकरण(कावासाकी केएक्स250—कोईम्बतूर,2.भूमिक लालवानी(कावासाकी केएक्स250—माउंट अबू, 3.अजय श्रीनिवास(कावासाकी केएक्स250—बँगलोर), 4.श्लोक घोरपडे(केटीएम150–सातारा), 5.द्वेन जोहानस(सीआर 250—मुंबई)

क्लास 3 नोव्हिस:

1.जेरवा बुंटेलग(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),2. सचिन डी.(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),3.अरुण टी(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),4.जिनेंद्र सांगवे(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),5. राजेश स्वामी(हिरो इम्पल्स-पेन)

क्लास 4 स्थानिक:

1.जिनेंद्र सांगवे(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ), 2.राजेश स्वामी(हिरो इम्पल्स-पेन),3.रसेल जोस्सी(हिरो इम्पल्स),4.पिंकेश ठक्कर(हिरो इम्पल्स), 5.राकेश भोसले(हिरो इम्पल्स).

क्लास 5 इंडियन एक्स्पर्टस:

1.अरुण टी.(हिरो इम्पल्स),2.आर नटराज(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),3. डी.सचिन जंग(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),4. आर. सबरीश(हिरो इम्पल्स)—कोईम्बतूर, 5. कालिमोहन(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),आर.सबरीश(हिरो इम्पल्स-कोईम्बतूर)

क्लास 6 प्रायव्हेट एक्स्पर्टस:

1.अरुण टी(हिरो इम्पल्स-हस्सन),2.शैलेश कुमार(हिरो इम्पल्स-कोईम्बतूर),3.योगेश पी.(हिरो इम्पल्स-बँगलोर),4.आर सबरीश(हिरो इम्पल्स-कोईम्बतूर), 5.पिंकेश ठक्कर(हिरो इम्पल्स-पुणे)

क्लास 7 ज्युनियर एसएक्स1:

1.श्लोक घोरपडे(केटीएम 150 –सातारा), 2. जिनेंद्र सांगवे(कावासाकी केएक्स250–इचलकरंजी, 3.सुजन जे(कावासाकी केएक्स250–कोईम्बतूर),4.अनास्त्या पॉल(कावासाकी केएक्स100–बँगलोर), 5.फैज सय्यद(केटीएम एसएक्स85–पुणे).

क्लास 8 ज्युनियर एसएक्स2:

1.अक्षत हूपले(केटीएम एसएक्स85–पुणे), 2.भैरव सी(हस्क्वारना—बँगलोर),3.सुजन जे(केटीएम एसएक्स65–कोईम्बतूर),4. यश शिंदे(केटीएम एसएक्स65–पुणे), 5.चैतन्य जोशी(केटीएम एसएक्स65-पुणे),.

‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’चे 12 ते 15 मे दरम्यान आयोजन

पुणे : आर्टक्यूब गॅलेरिया पुणेच्या वतीने ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’ चे आयोजन करण्यात आले आहे. या इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोमध्ये पुणे व महाराष्ट्रासह जगभरातून चित्रकार व शिल्पकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजक अतुल काटकर व प्रमोद माने यांनी दिली.
यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार उमाकांत कानडे, सोशल मीडियाचे चेतन मोरे, उद्योजक सचिन तर्कसे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे शहरातील प्रथितयश व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकार व शिल्पकारांनी एकत्र येत या इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोची संकल्पना मांडली. यामध्ये देश विदेशातून 400 हून अधिक नामवंत चित्रकार व शिल्पकार सहभागी होणार आहेत. तसेच या चार दिवसीय इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोमध्ये काही लाईव्ह पेंटींग डेमो तसेच पेंटींग स्पर्धा देखील असणार आहेत. यातील विजेत्यांना आयोजकांकडून बक्षीस देण्यात येईल. सन 2019 साली झालेल्या इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोमध्ये 16 हून अधिक देशातील नामवंत कलाकारांनी सहभाग नोंदवला होता. यंदाही पुणे, मुंबई सह तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा, गुजरात, दिल्ली या राज्यांतून तसेच दुबई, अमेरिका, मस्कत आदी देशातील चित्रकार, शिल्पकार सहभागी होणार आहेत. यंदा हे प्रदर्शन येत्या 12 ते 15 मे 2022 दरम्यान शुभारंभ लॉंन्स, डीपी रोड, एरंडवणे, पुणे येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 12 मे 2022 रोजी सकाळी 11 वा. कला व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते होणार आहे. या इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोला पुणेकरांनी भेट देऊन कलेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अतुल काटकर व प्रमोद माने यांनी केले आहे.