सांगली : सहकारी आर्थिक संस्था या चांगल्या चालल्या पाहिजेत यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आरबीआयचे यापुर्वी ठेवीवर 1 लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार आहे.सहकारी आर्थिक संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे.संस्था चालविणाऱ्या संचालकांनी शासनाचे धोरण व सभासदाचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कोल्हापूररोड सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, मर्या सांगली यांच्या नुतन मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील उपस्थित होते.
सहकारी पतसंस्थांसमोर फार मोठी आवाहने आहेत, संपुर्ण सहकार क्षेत्रासमोरच अनेक अडचणी आहेत. तरीसुध्दा या सर्व अडचणींवर मात करुन सहकार पुढील वाटचाल करीत आहे. सहकराचे सक्षमीकरणासाठी शासनही पुढाकार घेत आहे. वेगवेगळ्या उपाया योजना राबवित आहे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सहकरी संस्थां योग्य चालण्यासाठी संस्थेतील संचालकांचा कार्यभारही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे संचालकांची आपल्या सभासदाचे व संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. येणाऱ्या काळामध्ये सहकार क्षेत्र अधिक लोकाभिमुख व पारदर्शी करावे त्यामध्ये व्यवसायीकता यावी व आधुनिकीकरणाचा आवलंब करावा यामध्ये डीजिटल माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकिंगसेवा उपलब्ध करुन द्याव्यात. याबाबत शासन नेहमीच सहकारी संस्थांच्या पाठीशी राहील असे त्यांनी यावेळी सांगितले
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची इमारत ही अत्यंत देखणी उभारण्यात आली असून ती सांगली शहराच्या वैभवात भर घालेल. असे गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यामध्ये अनेक कार्यक्रमांसाठी जाणे होते पण एकाद्या पतसंस्थेची अशी इमारत पाहण्यात आली नाही. ही वास्तु अत्यंत सुंदर पध्दतीने तयार करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या जवळपास 51 शाखा कार्यरत आहेत. आता आणखीन 10 शाखा सुरु होणार आहेत. या संस्थेतून चालणारा कारभार कर्मवीर आण्णांच्या नावाला शोभेल अशा पध्दतीचे आहे.
सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी म्हणाले, सहकार क्षेत्रासमोर खुप मोठी आवाहने आहेत या सर्व आवाहनांवर मत करुन कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेने प्रगती साधली आहे. 1987 साली लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. तळागाळातील कष्टकरी जनतेला मदत करत खऱ्या अर्थांने या संस्थेने त्यांना सक्षम केले आहे. ही पतसंस्था सांगलीच्या वैभवात भर घालेल.
सहकारी आर्थिक संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल-उपमुख्यमंत्री अजित पवार
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अभिराम निलाखे, ईशान दिगंबर, सिद्धी खोत, श्रावणी देशमुख यांचा मुख्य फेरीत प्रवेश
पुणे, 15 मे 2022: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अभिराम निलाखे, ईशान दिगंबर यांनी तर, मुलींच्या गटात सिद्धी खोत, श्रावणी देशमुख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात अभिराम निलाखेने पंधराव्या मानांकित आर्यन घाडगेचा 7-5, 6-2 असा तर, अथर्व बिराजदारने आदित्य तलाठीचा 6-4,4-6,6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. ईशान दिगंबर याने सातव्या मानांकित चन्नामल्लिका यलेचा 6-2, 6-3 असा पराभव केला.
मुलींच्या गटात सहाव्या मानांकित सिद्धी खोतने चौथ्या मानांकित निशिता देसाईचा 6-3, 1-6, 6-3 असा पराभव केला. पाचव्या मानांकित प्रिशा शिंदेने अनन्या देशमुखचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. श्रावणी देशमुख हिने रितिका कापलेचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले: आश्विन नरसिंघानी वि.वि.अर्जुन किर्तने 6-3, 6-3;पियुश जाधव वि.वि.आर्यन हूड 6-3, 6-3;सिद्धार्थ मराठे [12] वि.वि.विश्वजीत सणस6-3, 6-2;अथर्व बिराजदार वि.वि.आदित्य तलाठी 6-4,4-6,6-4;अभिराम निलाखे वि.वि.आर्यन घाडगे[15] 7-5, 6-2;मिहीर कांतावाला वि.वि.ओम पाटील 6-3, 6-2;ईशान दिगंबर वि.वि.चन्नामल्लिका यले [7] 6-2, 6-3;सौमिल चोपडे[8]वि.वि.अनुश घनबहादूर 6-3, 6-1;
मुली:सेजल भुतडा[1] वि.वि.श्रेया पठारे 6-3, 6-4;ग्रेटा अनिल[2]वि.वि.यग्मसेनी चक्रवर्ती [8] 6-1, 6-0;हर्षरी आशेर [3]वि.वि.श्रेया होनकन 6-4, 6-0;आर्या शिंदे वि.वि.काव्या देशमुख 7-5, 6-0;सिद्धी खोत[6]वि.वि.निशिता देसाई [4] 6-3, 1-6, 6-3;वैष्णवी चौहान वि.वि.कनिका बाबर 6-2, 5-7, 6-0;प्रिशा शिंदे [5] वि.वि.अनन्या देशमुख 6-0, 6-0;श्रावणी देशमुख वि.वि.रितिका कापले 6-2, 6-3.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीश गांधी यांना’बंधुता : सत्यार्थी जीवन साधना पुरस्कार
‘बंधुता दिनानिमित्त २ जून रोजी शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमहोत्सवाचे आयोजन
पुणे : ज्येष्ठ विचारवंत आणि वनराई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांना बंधुता परिवाराच्या वतीने दिला जाणारा पहिलाच ‘बंधुता : सत्यार्थी जीवन साधना पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते २ जून रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित काव्यमहोत्सवात गांधी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, यावेळी माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रशांत रोकडे यांनी दिली.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध आणि भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय भोसरी या संस्थांच्या वतीने बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त बंधुतादिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचे औचित्य साधून या दिवशी एकदिवसीय बंधुता काव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ निवेदक कवी शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या काव्यमहोत्सवाचे उद्घाटन सकाळी १० वाजता ज्येष्ठ कवी सिराज शिकलगार (सांगली) यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, हरिश्चंद्र गडसिंग, डॉ. माधवी खरात, व प्रकाश जवळकर उपस्थित राहतील. काव्य महोत्सवाच्या संयोजनासाठी प्राचार्य डॉ. सदाशिव कांबळे, संगीता झिंजुरके आणि प्रा. अनंत सोनवणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
दुपारच्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन होईल. ३० पेक्षा अधिक निमंत्रित यात सहभागी होतील. स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘आई म्हणते…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. तसेच नारायण खेडकर (सिल्लोड) यांना ‘बंधुता प्रकाशपर्व साहित्य’ पुरस्कार, नामदेव जाधव (पलूस) यांना ‘बंधुता प्रकाशयात्री साहित्य’ पुरस्कार, दिनेश मोडोकर (पाथर्डी) यांना ‘बंधुता प्रकशगाथा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
पुरस्कार वितरणाने कार्यक्रमाचा समारोप होईल. त्यामध्ये प्रदीप इक्कर (जालना), मिलिंद घायवट (ठाणे), गोपाळ कांबळे (पुणे), कुशल राऊत (अकोला), अमोल घटविसावे (अहमदनगर), तुकाराम कांबळे (नांदेड), अनिल काळे (हिंगोली), सचिन शिंदे (उमरखेड) यांना ‘बंधुता शब्दक्रांती’ पुरस्काराने, तर प्रवीण देवरे (मुंबई), रवींद्र यशवंतराव (मुरबाड), विनोद सावंत (पलूस), राजेश साबळे (ठाणे), मनोहर कांबळे (खेड), पल्लवी पतंगे (मुंबई), ज्ञानेश्वर शिंदे (कोपरगाव), विद्या अटक (पुणे) यांना ‘बंधुता मायमराठी’ पुरस्कराने गौरविण्यात येईल, असे रोकडे यांनी नमूद केले.
विद्युत व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीसाठी ‘पीएमआय’तर्फे पुण्यात कारखान्याची पायाभरणी
· पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये २५० एकरांत, २५०० विद्युत व्यावसायिक वाहने तयार करण्याची सुविधा २०२३पर्यंत कार्यान्वित करण्याची योजना.
· ‘पीएमआय’च्या ५०० विद्युत व्यवसायिक वाहनांनी आतापर्यंत व्यापला ९५ लाख हरीत किलोमीटर इतका मार्ग, तसेच वाचविले ‘सीओटू’चे ५५०० मे.टन उत्सर्जन.
नवी दिल्ली, : भारतात विद्युत बसचे उत्पादन करणारी ‘पीएमआय’ ही आघाडीची कंपनी आता पुण्यात आपला सर्वात मोठा विद्युत व्यावसायिक वाहन निर्मिती प्रकल्प उभारत आहे. कंपनीतर्फे आज ही घोषणा करण्यात आली. चाकणच्या औद्योगिक वसाहतीत ३५ एकरात उभ्या राहणाऱ्या या कारखान्यात सुमारे १५०० कर्मचारी काम करतील. हरीत बांधकामांविषयीच्या नियमांचे पालन करणारा हा कारखाना ऑगस्ट २०२३पर्यंत कार्यान्वित होईल. दरवर्षी २५०० विद्युत व्यावसायिक वाहने तयार करण्याची क्षमता असलेल्या या कारखान्यात ऑक्टोबर २०२३पासून व्यावसायिक उत्पादन सुरू होईल.
विद्युत वाहनांचे बहुविध प्रकार, तसेच विद्युत ट्रक यांचे उत्पादन करण्यास हा कारखाना सक्षम असेल. ‘पीएमआय’च्या दिल्ली एनसीआर येथील कारखान्यात वर्षाकाठी १५०० विद्युत बसेस बनविण्याची क्षमता आहे. आता पुण्यात होणाऱ्या विस्तारामुळे, ‘पीएमआय’ची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता ४००० विद्युत व्यावसायिक वाहनांपर्यंत वाढेल.
या आगामी कारखान्याच्या पायाभरणी समारंभानंतर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार जैन म्हणाले, “पुण्यातील कारखान्याच्या निमित्ताने आमच्या वाढीच्या पुढील टप्प्याची पायाभरणी करताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. ‘मेक-इन-इंडिया’ आणि ‘मेक-फॉर-इंडिया’ या सरकारच्या कार्यक्रमांमध्ये योगदान देत जागतिक स्तरावर अग्रगण्य विद्युत व्यावसायिक वाहन उद्योग बनण्याचे आमचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यात या कारखान्याची आम्हाला मदत होईल. कार्बनचे शून्य-उत्सर्जन असणारी व्यावसायिक वाहने बनविणारी प्रणेती कंपनी अशी आमची ओळख आहे. स्वच्छ ऊर्जेद्वारे चालणारी व्यावसायिक वाहने ही शाश्वत गतिशीलतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, यावर आमचा ठाम विश्वास आहे. या विशिष्ट उद्योगाच्या भविष्यातील वाढीसाठी आम्ही सक्रियपणे योगदान देऊ इच्छितो आणि भारत सरकारने घालून दिलेले शाश्वततेचे लक्ष्य साध्य करू इच्छितो.”
पुण्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कारखाना उभारल्यामुळे, न्हावा-शेवा बंदराची सुविधा, तसेच पुण्यातील पुरवठा-साखळी परिसंस्था यांचा लाभ कंपनीला घेता येईल. तसेच महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश यांसारख्या देशाच्या पश्चिम / मध्य / दक्षिण भागांतील प्रमुख बाजारपेठांसाठी लॉजिस्टिक्सचा फायदाही होईल.
या कारखान्याच्या रचनेमध्ये नवीनतम तंत्रज्ञान आणि किफायतशीर उत्पादन पद्धती यांचे योग्य ते संयोजन साधण्यात येणार आहे. त्यातून सर्वोत्तम दर्जाची गुणवत्ता, इष्टतम श्रम उत्पादकता, त्वरीत येणाऱ्या ऑर्डर्ससाठी जलद प्रतिसाद आणि मालमत्तेच्या उलाढालीचे उच्च प्रमाण या गोष्टी साधता येतील.
पर्यावरणपूरक व्यावसायिक वाहनांचे डिझाईन व त्याचे तंत्रज्ञान या बाबी भारतात आणता याव्यात, याकरीता ‘पीएमआय’ने ‘फोटॉन’ या जागतिक व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीसोबत सहयोग / भागीदारी केली आहे.
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पियुश जाधव, अभिराम निलाखे यांची आगेकूच
पुणे, 14 मे 2022: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पियुश जाधव, अभिराम निलाखे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या तिसऱ्या चरणात प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, शिवछत्रपती म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात पियुश जाधव याने दुसऱ्या मानांकित अनिकेत चोभेचा 9-2 असा तर, अभिराम निलाखेने पाचव्या मानांकित मीर वेरेकरचा 9-3 पराभव करून आगेकूच केली.सिद्धार्थ मराठे व आर्यन हूड यांनी अनुक्रमे अर्णव बनसोडे व यशराज जेरवाल यांचा 9-1 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. आनंद विहारीने आर्यन पटेलला 9-4 असे पराभूत केले. सन्मय तेलंगने साईराज श्रोत्रीवर 9-7 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी पात्रता फेरी: मुले: पियुश जाधव वि.वि.अनिकेत चोभे[2] 9-2; अभिराम निलाखे वि.वि.मीर वेरेकर[5] 9-3;सक्षम चव्हाण वि.वि.संकल्प पवार 9-5;करण भामरे वि.वि.अर्णव चावला 9-0;अर्चित डहाळे[6]वि.वि.ऋषिकेश चितळे 9-3;ओम पाटील वि.वि.वेदांत माणकेश्वर 9-1;सन्मय तेलंग वि.वि.साईराज श्रोत्री 9-7;आर्यन हूड वि.वि.यशराज जेरवाल 9-1;सिद्धार्थ मराठे वि.वि.अर्णव बनसोडे 9-1;आनंद विहारी वि.वि.आर्यन पटेल 9-4;
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजाला सोमवारी ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सोमवार, दिनांक १६ मे रोजी सकाळी ९ वाजता मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणपती बाप्पांना तब्बल ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण केला जाणार आहे. वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक जयंती हा अवतार झाला होता.
वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. तसेच दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे. सोमवारी पहाटे ४ वाजता पंडित सुरेश तळवळकर यांचा स्वराभिषेक कार्यक्रम त्यानंतर गणेशजन्म महाअभिषेक व गणेशयाग होणार आहे.
राष्ट्रवादीची गुंडगिरी खपवून घेणार नाही भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा इशारा
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, वेळ आल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.
भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर आक्षेप घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गुंडांनी त्यांच्या कार्यालयात घुसून शिवीगाळ केली आणि हल्ला केला, या घटनेचा मुळीक यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
मुळीक म्हणाले, पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासनावर शासनाचा वचक राहिलेला नाही. आता राष्ट्रवादीच्या गुंडांनी कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच आघाड्यांवर येत असलेल्या अपयशामुळे खचून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. जनता या अराजकतेला कंटाळली असून, महाविकास आघाडीला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
मुळीक पुढे म्हणाले, ‘शहर भाजपच्या वतीने फडगेट पोलीस चौकीत तक्रार नोंदविली आहे. हल्लेखोरांवर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन केले जाईल.’
साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने उत्साहात सुरुवात
पुणे – साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनानिमित्त महात्मा फुले वाडा ते राजश्री शाहू संमेलन नगरी(सावित्री बाई फुले स्मारक ) ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी कामगार नेते व ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या गीताचे गायन करून सुरुवात केली .

त्यांनतर ग्रंथ दिंडीचे पूजन डॉ.बाबा आढाव ,माजी मंत्री रमेश बागवे ,संमेलनाध्यक्ष विठ्ठल भंडारे यांनी केले. महात्मा फुले , डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,राजश्री शाहू ,आण्णा भाऊ साठे आणि महापुरुषांचे प्रतिमांचा मिरवणूकित सहभाग करण्यात आला होता . यावेळी आण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे घोष वाक्य देखील घेऊन अनेक लोक सहभागी झाले होते .या दिंडीत वारकरी संप्रदायाचे महाराज ज्येष्ठ किर्तनकार माधवराव डोंगरे व वारकरी समुदाय सहभागी झाले होते .सुरुवातीला राज्याच्या विविध भागातील हलगी वादक वादन करीत होते .त्यापाठोपाठ वारकरी त्यामागे ग्रंथदिंडी आणि पाठीमागे सहभागी लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. संमेलन उद्यापासून राजश्री शाहू संमेलन नगरी (सावित्रीबाई फुले सभागृह ) पुणे येथे होत आहे .

संमेलनाध्यक्ष विठ्ठल भंडारे ,ज्येष्ठ कामगार नेते डॉ.बाबा आढावा,माजी मंत्री रमेश बागवे ,मुक्ता साळवे साहित्य परिषद संस्थापक व संमेलनाचे आयोजक सचिन बगाडे,,लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती चे अध्यक्ष ( महाराष्ट्र शासन)विजयबापू डाकले , स्वागताध्यक्ष अविनाश बागवे ,मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोपान खुडे , ,ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक जयवंत अवघडे,हनुमंत साठे ,इतिहास संशोधक प्रा.सुहास नाईक ,ज्येष्ठ सामाजिक नेते अंकल सोनवणे ,पुणे शहर जिल्हा मातंग समाज सचिव संजय केंदळे,लेखक ,चित्रपट दिग्दर्शक सुरेश पाटोळे , पटकथा लेखक बाळ बारस्कर ,किर्तनकार माधवराव डोंगरे ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे संमेलनाचे निमंत्रक निमंत्रक अनिल हतागळे,रवी पाटोळे ,निलेश वाघमारे ,सुरेखाताई खंडाळे , प्रा.बबिता लोंढे ,नंदा गवळी यासह पुणे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी , महीला ,युवक व विविध सामाजिक ,राजकीय संघटनाचे कार्यकर्ते साहित्यसम्राट आण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन निम्मित आयोजित ग्रंथदिंडी मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ज्या महिलांनी, खलाशी हे करियर निवडले, त्यांनी चाकोरी मोडून नवे मार्ग स्वीकारले आहेत – परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री
मुंबई-केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते आज, सागरी क्षेत्रात कार्यरत, महिलांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून झालेल्या समारंभाचे मुंबईत उद्घाटन झाले. भारतीय जहाजबांधणी महामंडळाच्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.
आजचा हा समारंभ विशेष होता कारण, गेल्याच वर्षी म्हणजे 2021 साली संयुक्त राष्ट्र सागरी संस्थेने, 18 मे हा सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीचा दिन म्हणून जगभर साजरा केला जावा, असा ठराव मंजूर केला होता. याचे औचित्य साधून हा विशेष कार्यक्रम आज साजरा करण्यात आला.
जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत, याशुकाता फुकाहोरी हे ही या समारंभाला उपस्थित होते. त्याशिवाय, भारतीय जहाजबांधणी महामंडळाच्या महिला अधिकारी आणि एमटी स्वर्ण गोदावरी या जहाजांवरील महिला खलाशांचा चमू देखील यावेळी उपस्थित होता.


यावेळी मीनाक्षी लेखी यांनी, भारतीय जहाजबांधणी महामंडळाच्या महिला अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी कॅडेट्ससह जहाजवरच योगाभ्यास करुन, योग उत्सव 2022 मध्ये सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय योगदिनाची उलटगणती आता सुरु झाली असून, त्यानिमित्त देशभर योग उत्सव साजरा केला जात आहे. भर समुद्रात एमटी स्वर्ण गोदावरी जहाजावरच, मंत्री महोदया आणि अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन, आगळ्यावेगळ्या पद्धतीने समारंभ साजरा केला.
भारतीय जहाजबांधणी महामंडळाने, सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांच्या पहिल्या आतंरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत, या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता दरवर्षी 18 मे रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान, तसेच या क्षेत्रात अधिकअधिक महिलांच्या भरतीला प्रोत्साहन देण्यासह, या पुरुषप्रधान व्यवसायात, महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जाणार आहे. या क्षेत्रात, महिला सध्या केवळ दोनच टक्के असून, त्यात, लक्षणीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यावेळी लेखी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा भाग म्हणून पाचवे उद्दिष्ट- लिंगभेद समानता साध्य करण्यासाठी तसेच, सागरी उद्योगात, सध्या असलेली स्त्री पुरुष असमानता दूर करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी भारतीय नौदलात महिलांची संख्या सर्वाधिक म्हणजे 6.5% असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले सामर्थ्य, कर्तृत्व सिद्ध केले असून खलाशी हा व्यवसायही त्याला अपवाद नाही, असे त्या म्हणाल्या. याच मुद्दयाबद्दल बोलतांना त्यांनी ‘नाविका सागर परिक्रमेचे’ उदाहरण दिले. भारताच्या सर्व महिला खलाशांनी भारतीय नौदलाच्या ‘तारिणी’ या जहाजवरून जगाची सागरी सफर यशस्वीपणे पूर्ण केली होती. 1957 साली, भारतीय महिला, सुमाई मोराजी यांनी जहाजमालकांच्या संघटनेचे प्रमुखपद स्वीकारून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे, याचा गौरवपूर्ण उल्लेख लेखी यांनी केला. त्या काळात, इतक्या मोठ्या देशांतही, अशी परंपरा नव्हती. भारताने हा निर्णय घेत नवी आधुनिक परंपरा निर्माण केली. असे त्या पुढे म्हणाल्या. याचाच संदर्भ पुढे नेत, त्या म्हणाल्या की “आपला समाज प्रागतिक आहे. भारतात महिला आणि पुरुषांना समानतेची वागणूक आणि सन्मान देण्याची जुनी परंपरा आहे.”

यावेळी लेखी यांनी, उल्लालच्या राणी अबकका यांचा उल्लेख करत, त्यांनी पोर्तुगीजांशी केलेल्या लढाईचे वर्णन केले, तसेच, झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांनीही आपल्या पाठीवर मूल बांधून इंग्रजांशी युद्ध केले. समाजात असलेल्या मोकळेपणामुळेच झाशीच्या राणीला हे युद्धकौशल्य शिकणे सोपे गेले..
जहाजांना किंवा नौकांनाही ‘ती नौका’ असे म्हटले जाते, असाही उल्लेख केला, यामागची कल्पना अशी असेल माता किंवा देवता, आपल्या जहाजाप्रमाणेच, मोठे सामर्थ्य असलेल्या हव्यात. महिलांसाठी सागरी सफारीचे नेतृत्व करणे, सोपे आहे, असे त्या म्हणाल्या.
महिला खलाशांचे अभिनंदन करत, मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, “की तुम्ही, सामर्थ्य, धैर्य साहसाचे जिवंत प्रतीक आहात.” ज्या महिलांनी खलाशी हे करियर म्हणून स्वीकारले आहे, त्यांनी जुन्या चौकटी मोडल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. आज आपण सगळे जण अमृतमहोत्सव साजरा करत असताना, एक समाज म्हणून आपण असा संकल्प करायला हवा, की आपल्या महिलांना त्यांच्या आवडीची जहाजबांधणी क्षेत्रासारखी साहसी क्षेत्रे निवडता यावीत यासाठी प्रोत्साहन देऊ, आणि जमेल तेवढी मदत करु. केंद्र सरकार आणि जहाजबांधणी महामंडळ सर्व मुलींना समान संधी आणि सुरक्षितता देण्यासाठी सातत्याने परिश्रम करत आहेत, असे त्यांनी सांगितले. जहाजबांधणी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, एच. के जोशी आणि इतर महिला अधिकारी यावेळी उपस्थित होत्या
केतकी चितळे सारख्या समाजातील वाईट प्रवृत्तींचा बीमोड करणे आवश्यक-माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ
पुणे-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासारख्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात पोस्ट करणारी केतकी चितळे म्हणजे समाजातील वाईट प्रवृत्ती असून तिचा वेळीच बीमोड करणे आवश्यक आहे. अभिनय क्षेत्रात काम मिळत नाही म्हणून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी चितळे ने केलेला हा प्रयत्न म्हणजे तिला मिळालेल्या संस्काराचे दर्शन आहे. अशा विकृत मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी.अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.
त्या म्हणाल्या ,’केतकी चितळे, वकील नितीन भावे आणि निखील भामरे यांची पोस्ट समाजात तेढ निर्माण करणारी व असंतोष पसरवणारी आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड करून महाराष्ट्र घडवण्यासाठी अविरत झटणाऱ्या पवार साहेब यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राच्या संस्कृतिला परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न अशा समाज कंटकांकडून सुरू असून त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवावी लागणार आहे.कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे मनोरंजन करायचे असते पण या स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्या केतकी चितळे मध्ये वेगळेच कलागुण असून ते समाजाला घातक असल्याने तिच्यावर पोलिसांनी योग्य कारवाई करून बंदोबस्त करावा.
केतकी चितळे विरोधात पुण्यात तक्रार दाखल
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्या प्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी केतकी चितळे हिच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. केतकी चितळेने फेसबुकवर एक कविता पोस्ट केली आहे.
या कवितेच्या माध्यमातून तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, समीर शेख, उदय महाले, गणेश नलावडे, प्रीती धोत्रे आदींनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ॲड. विकास शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्यात ही फिर्याद दाखल केली आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंताचा संघर्ष’ ग्रंथाचे शरद पवार यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी प्रकाशन होणार
पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंताचा संघर्ष’ या ऍड. जयदेव गायकवाड लिखित ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. पद्मगंधा प्रकाशन व लोकशाहीसाठी समंजस संवाद आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्याचप्रमाणे पद्मगंधा प्रकाशनचे अभिषेक जाखडे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, विजय जाधव, मयूर गायकवाड, अनोश मालेकर, पंडित कांबळे आदी उपस्थित असतील, असे संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

समाजातील दलित, वंचित, अस्पृश्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच देशाच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेकदा संघर्ष करावा लागला. समर्पित भावनेने देशहितासाठी, प्रत्येक भारतीयाला समान अधिकार मिळण्यासाठी व समाजातील जातीनिर्मूलनासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या याच वैचारिक संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम ऍड. जयदेव गायकवाड यांनी या ग्रंथाद्वारे केले आहे.
शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली,केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
मुंबई-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर फेसबूक पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतील कळंबोली येथून आज सायंकाळी ताब्यात घेतले आहे. शरद पवारांवरील केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर सर्व थरातून टीका होत आहे.
शरद पवार यांच्यावर पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला आहे. बदनामी करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याची कलमे तिच्याविरुद्ध लावण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली असून आक्षेपार्ह पोस्टचे प्रकरण तिच्या अंगलट आले आहे.
शरद पवारांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकी चितळेवर राज ठाकरेंपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता पोलिसांनीही तिला ताब्यात घेतले आहे.अभिनेत्री केतकी चितळेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अत्यंत वाईट भाषेत टीका केली. पोस्टच्या खाली -Advocate Nitin Bhave असे नाव या पोस्टमध्ये लिहिले आहे. पण याच पोस्टमध्ये आठ ओळीत शरद पवारांबाबत असभ्य भाषा केली गेली आहे. या प्रकरणी मुंबईतील कळवा पोलिस स्टेशनमध्ये 153 आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याने केतकीच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून आता पोलिसांनीही तिला ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई, दि. १४:- स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले आहे.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, ‘स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून शंभुराजे यांनी अतुलनीय असा पराक्रम गाजवला. शिवबाच्या या छाव्याने आपल्या पराक्रमाने मुघलांना गुडघे टेकायला भाग पाडले. औरंगजेबाला जेरीस आणून, त्याचा दख्खन बळकावण्याचा मनसुबा मातीत गाडून टाकला. युद्धनीती, शास्त्र, कला यांसह अनेक भाषांमध्ये विविधांगी लेखन करून शंभुराजेंनी विद्वत्तेचा परिचय करून दिला. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी साकारलेल्या स्वराज्यासाठी त्यांनी प्राणपणाने लढा दिला. महान योद्धा, धुरंधर, प्रजाहितदक्ष, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा आणि जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!’
पावसाळ्यात पाझर तलावात पाणी भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्हा गाळमुक्त ल.पा.योजनेअंतर्गत पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ
पुणे दि.१४- पुणे जिल्हा परिषद व पुणे नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा गाळमुक्त ल.पा.योजनेअंतर्गत बारामती तालुक्यातील पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भिलारवाडी येथे करण्यात आला. पावसाळ्यात परिसरातील धरणातील पाणी सोडावे लागत असताना पाझर तलाव भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग कांजाळकर, स्नेहा देव, नाम फाऊंडेशनचे मल्हार पाटेकर, गणेश थोरात आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, पाझर तलावातील गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेऊन जावा. तसेच पावसात पुन्हा गाळ तलावात येणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचे प्रमाण कमी असते. म्हणून या भागातील ल.पा.योजनेतील गाळ काढण्यात येणार आहे. ११४ ल .पा. योजनेतील गाळ काढण्याचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम नाम फाऊंडेशनच्या मदतीने हाती घेण्यात आला आहे. पाझर तलावातील पाणी जमिनीत मुरल्यास परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढेल. सामाजिक बांधिलकी म्हणून नाम फाऊंडेशनने यात घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या योजना योजना मंजूर केल्या आहेत. पुढील २५ वर्षातील गरज लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना दिवसा किंवा रात्री वीज पुरवठा देण्यात येईल यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत आहे. मान्सून वेळेपूर्वीच येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर आवश्यक बाबी वेळेवर मिळाव्यात यासाठी नियोजन करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.
परिसरातील विकासकामांसाठी सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सौर पंपाद्वारे पाणी देण्याबाबत योजना तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून त्याबाबत सहकार्य करण्यात येईल, असेही श्री.पवार म्हणाले.
यावेळी आयुष प्रसाद म्हणाले, नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने पाणी टंचाई क्षेत्रातील ११४ पाझर तलावातील गाळ काढण्यात येणार असून जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी २२ लक्ष रुपये डिझेलसाठी देण्यात येणार आहे. नाम फाऊंडेशनकडून जेसीबी व पोकलंड यंत्रण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. उर्वरीत गाळ गायरान जमिनीवर आणि सामाजिक वनीकरण क्षेत्रावर टाकण्यात येणार आहे. भूजल पुनर्भरणासाठी ३०३ रिचार्ज शाफ्ट बांधण्यात येत आहेत. नवीन पाणी साठवण संरचनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
गाळ काढण्यामुळे पाण्याचा साठा वाढेल आणि भूजलस्तर वाढण्यास मदत होईल. गाळ काढण्यात येणाऱ्या तलाव परिसरातील १०३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जल जीवन मिशनच्यादृष्टीने याचा लाभ होण्यासोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना गाळ काढण्याचा थेट लाभ होईल. पुढील २० ते २५ दिवसात गाळ काढण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री.थोरात यांनी यावेळी नाम फाऊंडेशनच्या कामाची माहिती दिली. गाळ काढण्यासाठी सर्व प्रकारच्या यंत्रांची मदत फाऊंडेशनतर्फे करण्यात येईल. नाम फाऊंडेशनच्या कामात युवकांचा चांगला सहभाग मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, पुणे जिल्हा सह.बँकेचे संचालक संभाजी होळकर, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
