पुणे-आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागर रचनेचा अंतिम आराखडा जाहीर झाला आहे. येत्या काही दिवसात आरक्षण सोडत जाहीर होईल. असे निवडणूक शाखा प्रमुख डॉ. यशवंत माने यांनी सांगितले.
अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली.शहरातील किमान ३२ प्रभागात सुधारणा करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला. इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणा शिवाय निवडणुका घ्याव्यात आणि दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तत्पूर्वी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करून त्यावरील हरकती सूचनांची कार्यवाही १० मार्च रोजी पूर्णकेली होती. त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचे सादरीकरण आयुक्तांनी गेल्या मंगळवारी केले होते. त्याला निवडणूक आयोगाने मान्यतादिली. त्यानुसार अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली. आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार शहरात ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत. यातील ५७ प्रभाग तीन नगरसेवकांचे तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा असेल.
पुणे दि१३- ‘ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’ (एएमबीआयएस) या संगणकीय प्रणालीचे उदघाटन गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम) सुरेश मेखला,पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक संजय शित्रे, पिपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक ए.डी. शिंदे, श्री.देशपांडे उपस्थित होते.
एएमबीआयएस प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरून केवळ बोटांचे ठसेच नाही तर तळवे चेहरा व डोळे स्कॅन करुन ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस घटकांकडून या यंत्रणेचा वापर झाल्यावर गुन्ह्यांची झटपट उकल होऊन दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ होईल असे श्री. रितेश कुमार यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमद यांनी केली. यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंगुली मुद्रा विभागाचे वरिष्ठ तज्ज्ञ रोहोदार कसार, प्रथम तज्ञ पोलीस निरीक्षक अविनाश सरवीर, प्रथम तज्ञ प्रथम तज्ञ पोलीस निरीक्षक रुपाली गायकवाड, यांचेसह अंगुली मुद्रा केंद्रातील सर्व अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रीय कार्यालये जिल्हा कार्यालय येथील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
अशी आहे एएमबीआयएस प्रणाली पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या दशावरून आरोपीची ओळख पटवली जायची मात्र आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. या प्रणालीत आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताचे ठसे, चेहरा व डोळ्यांची बुबुळे हे डिजीटल स्वरुपात जतन करुन ते इतर छायाचित्रांशी जुळविण्याची क्षमता आहे.
पोलीस ठाणे स्तरापर्यंत ‘एएमबीआयएस’ यंत्रणा राबविणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे. या यंत्रणेअंतर्गत सुमारे ६.५ लाख अटक व शिक्षाप्राप्त आरोपीचा अभिलेख संगणकीकृत करण्यात आलेला आहे. एएमबीआयएस प्रणाली ही भविष्यात सीसीटीएनएस, प्रिझम, सीसुटीव्ही व राष्ट्रीय स्तरावरील एनएएफआयएस या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व पोलीस ठाणे, परिक्षेत्रीय कार्यालये, पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस मुख्यालय, अंगुली मुद्रा केंद्रे, प्रशिक्षण केंद्रे व मध्यवर्ती कारागृह येथे एएमबीआयएस प्रणालीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. इंटरपोल आणि एफबीआय येथे हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.
पोलीस ठाण्यात अटक आरोपीच्या अंगुली मुद्रा पत्रिकेची ऑनलाइन नोंदणी करुन त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्व इतिहास तपासण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या संगणकीय यंत्रणेचा उपयोग होणार आहे. एएमबीआयएस प्रणालीतंर्गत देण्यात येणा-या पोर्टेबल एएमबीआयएस या यंत्रणेचा वापर करून गुन्ह्यांच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्सप्रिटद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे काही मिनिटातच शक्य झाले आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात वाढ होवून राज्याच्या दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ होणार आहे.
एएमबीआयएस प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असुन यंत्रणेची गती व अचुकता यामुळे तो इतर प्रणालीपासून वेगळी ठरली आहे. महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी एएमबीआयएस यंत्रणा महत्वाची भूमिका पार पडणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षणात एएमबीआयएस प्रणालीवर सन २०२० पासून एप्रिल २०२२ पर्यंत ५२ केसमध्ये २.१४ कोटींच्या चोरीस गेलेल्या मालमत्तेच्या प्रकरणात आरोपीचा शोध लावण्यात आला.
पुणे -महानगरपालिका समाज विकास विभाग आणि जनाधार दिव्यांग चारीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरी येथे दिव्यांग मेळावा संपन्न झाला.
पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग आणि जनाधार दिव्यांग चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने मांजरी बुद्रुक येथील जयमाला कॉम्प्लेक्स येथे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग आणि जनाधार दिव्यांग चारीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरी बुद्रुक येथील जयमाला कॉम्प्लेक्स येथे अपंग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त समाज विकास विभाग श्रीमती रंजना गगे , समाज विकास विभागाचे सहाय्यक अधिकारी सुनील साळवी, सहाय्यक समाज विकास अधिकारी राजेंद्र मोरे, जनाधार देवगन चारीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे, पुणे महानगरपालिकेच्या समाजसेविका सुजाता टिळेकर, समूह संघटिका सोनाली घोडके, निर्मला शिंदे, हेमलता भोसले, पल्लवी पाटील यांच्यासह मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शिवाजीराव आदमाने, अमित घुले, पंचायत समितीचे माजी सदस्य जितीन कांबळे, पोलीस पाटील अमोल भोसले, सामाजिक कार्यकर्ते सुभाष घुले, राजेंद्र साळवे, बाळासाहेब भोसले, गौरव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनाधार दिव्यांग चारिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष दत्तात्रय ननावरे यांनी केले तर पुणे महानगरपालिकेच्या वतीने अपंगांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध विकास योजनांची माहिती पुणे महानगरपालिकेच्या समाजसेविका सुजाता टिळेकर यांनी दिली तर मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शिवाजीराव आदमाने यांनी खादी मंडळाच्या वतीने दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाऱ्या क्लस्टर योजनेची माहिती देत असताना सांगितले की, दिव्यांग बांधवांनी पुणे महानगरपालिकेच्या योजने बरोबरच महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. क्लस्टर योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांच्या समूह गटाना व्यवसायासाठी 40% सबसिडीवर एक करोड रुपये दिले जातात त्याच बरोबर दिव्यांग बांधवांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठही मिळवून दिले जाते अशा योजनांचा दिव्यांग बांधवांनी फायदा घेतल्यास त्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो असे ते म्हणाले. त्याच बरोबर मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित घुले यांनी मांजरी आणि परिसरातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून परिसरातील सर्व दिव्यांग बांधवांना पुणे महानगरपालिकांच्या विविध योजनांची माहिती देऊन या सर्व योजना आपल्या परिसरात राबवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले. यावेळी जनाधार दिव्यांग चारीटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले. त्याबरोबरच पुणे महानगरपालिकेचे समाज विकास अधिकारी सुनील साळवी आणि राजेंद्र मोरे यांच्यासह मांजरीचे पोलीस पाटील अमोल भोसले, सुभाष घुले, राजेंद्र साळवे, गौरव जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पुणे, १३ मे : ‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ या पुस्तकाचे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते येत्या सोमवारी (१६ मे) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे शहर भाजपच्या वतीने प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कळविली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पुस्तकाचे मूळ लेखक शिवानंद द्विवेदी, मराठी अनुवादक डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्राची जांभेकर उपस्थित राहणार आहेत.
गॅस सिलेंडरला फाशी देऊन शिवसेनेच्या वतीने महागाईचा निषेध
पुणे, १३ मे २०२२: ज्याप्रमाणे श्रीलंकेच्या सत्ताधारी नेत्यांना नागड करून जनतेने सरकारचा निषेध केला त्याच प्रकारे गॅस महागाईच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्र्यांचे कपडे फाडून जनाक्रोष करण्याची वेळ देशात निर्माण होते की काय..! अशी भीती शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केली.
शिवसेना पुणे शहराच्या वतीने महागाई विरोधात शहरातील प्रत्येक प्रभागात आंदोलन करण्यात आले. त्याच क्रमांत शिवसेना प्रभाग क्रमांक १७ दांडेकर पूल येथे कसबा विधानसभा उपप्रमुख प्रसाद काकडे व महिला आघाडीच्या प्रज्ञा प्रसाद काकडे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर व इंधन महागाईचा पुतळा उभारून त्याला फाशी देण्यात आली. या वेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकूडे, उपशहर संघटक उमेश गालिंदे, नंदू यवले, नितीन रावळेकर, रमेश लडकत, अनंत घरत, राजेश मांढरे, देवेंद्र शेळके महिला आघाडीच्या किर्ती मोहळ, स्वाती मोहळ, वैजयंती फाटे, मनीषा गरूड, मनिषा फाटे, युवासेनेचे युवराज पारिख, विलास नावडकर, ओंकार मालुसरे, राहुल बामणे, निलेश ओहाळ, सागर काळे, तेजस ननावरे, विक्रम रणदिवे, अमित चव्हाण,राज भोसले आदींच्या उपस्थित शिवसैनिकांनी केंद्र/मोदी सरकारच्या विरोधात हल्ला बोल करून गॅस व इंधन वाढीचा तीव्र विरोध करण्यात आला. तसेच आंदोलनात महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना, जेष्ठ शिवसैनिक, बालगोपाळ या प्रभागातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी होते.
प्रज्ञा प्रसाद काकडे म्हणाल्या, आजच्या महागाईच्या काळात गोर गरिबांनी जगायचं कसे? हा मोठा प्रश्न नागरीकांना पडला असून मोदी ९सरकार स्वतःच्या राजकीय व निवडणूकीच्या फायदयासाठी सत्तेचा गैरवापर करून जनतेच्या भावनांचा खेळ मांडत आहेत यांचा मी निषेध करतो. येत्या काळात हीच जनता तुम्हाला घरचा दरवाजा दाखवून देईल याच भान मोदी सरकारने ठेवून काम करावे असा सल्ला देखील काकडे यांनी केंद्र सरकारला दिला.
मुंबई, दि. 13 राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
सुधारित दरवाढ पुढीलप्रमाणे आहे. दुचाकी वाहन -५० (जुने दर ३५), पेट्रोल वरील तीनचाकी वाहन -१०० (जुने दर ७०), पेट्रोल सीएनजी एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन -१२५ (जुने दर ९०), डिझेलवर चालणारे वाहन-१५० (जुने दर ११०) हे दर तात्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायूप्रदूषण तपासणीसाठी देय राहतील.
पुणे – गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारी प्रभात रोड-भांडारकर रोड भागातील नागरिकांनी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी त्या भागात महापालिका अधिकाऱ्यांसह पहाणी केली आणि येत्या आठ दिवसांत प्रश्न सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रभात रोड आणि भांडारकर रोड येथील १७ सोसायट्यांमध्ये जावून पहाणी केली आणि तेथील रहिवाशांशी संवाद साधला. पाणी प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता प्रसन्न जोशी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या पहाणीच्या वेळी आमदार शिरोळे यांच्या समवेत सुनील पांडे, गणेश बगाडे, जय जोशी, निलेश घोडके यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही सोसायटी, वसाहतीमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार शिरोळे यांनी केले आहे. नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा मी आणि माझी टीम करेल आणि प्रत्यक्ष जागेवर पहाणी करुन पाणी प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही आमदार शिरोळे यांनी दिली आहे.
पुणे : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात पुण्यासह बीड, अहमदनगर, रायगड, राजगड, मुळशी, वेल्हा, शिवनेरी व सर्व गड-किल्ले तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या निरंजन सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. नवनीत मानधनी यांची निवड झाली आहे. तर, सचिवपदी सीए दुर्गेश चांडक यांची नियुक्ती झाली.
पुढील तीन वर्षांसाठी ही निवड झाली असून संस्थेच्या नारायण पेठेतील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनेचे माहिती व प्रसारण मंत्री प्रमोदकुमार जाजू उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला शपथ दिली व मार्गदर्शन केले.
नव्या आर्थिक वर्षाकरीता उपाध्यक्षपदी सीए विशाल राठी, आनंद कासट यांसह सहसचिव मुकेश माहेश्वरी, खजिनदार स्वप्निल देवळे, जनसंपर्क अधिकारी व नियोजन समिती प्रमुखपदी विशाल सारडा तसेच धीरज धूत, विराज तावरे यांची कार्यकारिणीमध्ये निवड झाली आहे.
डॉ. नवनीत मानधनी म्हणाले, संस्थेतर्फे वर्षभरात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून त्याकरीता विविध समित्यांची नियुक्ती देखील करण्यात आली. पुढील काळात गरजू, उपेक्षित व वंचित घटकातील मुलांसह ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी संस्था प्रामुख्याने कार्यरत राहणार आहे. याशिवाय विद्यार्थी पालकत्व योजना, डिजीटल क्लासरुम, शाळेत शुद्ध व थंड पाणी जलकुंभ, डिजिटल शाळा उभारणी, सायकली प्रदान, अनाथ मुलांकरीता आंबे खाणे स्पर्धा, विशेष मुलांचा दांडिया असे विविध उपक्रम देखील सामाजिक संस्थांकरीता राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे-राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निमंत्रित केलला सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रम काल कोंढव्यातील लोणकर लॉन्स येथे संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर देशातील नामवंत कवी व कलाकारांनी सादर केलेले मुशायरा व कवी संमेलन देखील पार पडले.हिंदू,मुस्लिम,शीख,बौद्ध,ईसाई,पारशी, बोहरी,इराणी या विविध धर्मगुरुंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी बोलतांना खासदार शरद पवार म्हणाले की, देशातील कुठल्याही नागरिकाला देशातील सरकार जर धर्माच्या जातीच्या नजरेतून पाहणार असेल, तर देश कधीही प्रगती करू शकत नाही. आपल्या भारतात असलेली परिस्थिती अभूतपूर्व अशी आहे. या अगोदर देशातील कुठल्याही सरकारने या पद्धतीने कधीही राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही त्याचाच परिणाम म्हणून भारत आज शिक्षण, उद्योग, व्यापार, सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात प्रगती करु शकला. दुर्दैवाने गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये सर्व क्षेत्रात असणारी घौड दौड मागे पडून निव्वळ धार्मिक कट्टरतावादी , सामाजिक तेढ निर्माण करणारे वातावरण निर्मिती सुरू असून, ही बाब आपल्या सर्व धर्म समभाव जपणाऱ्या देशात अशोभनीय आहे. आदरणीय पवार म्हणाले, “राजकीय कारकीर्दीत मी कधीही कुठलेही पद देताना कुणालाही धर्माच्या अथवा राजकीय नजरेतून पाहिले नाही आणि मुस्लिम बांधवांनी देखील मी जगातील ज्या ज्या देशांमध्ये जाईल त्या त्या देशाने प्रेम आणि आपुलकी दिली हे या धर्माचे वैशिष्ट्य असून आपली एकी हेच आपल्या प्रगतीचे गमक आहे”.
सामाजिक सलोख्याचा विचार जतन करणं, भागा-भागांमध्ये, लोका-लोकांमध्ये, जाती-जातींमध्ये, भाषा-भाषांमध्ये एकप्रकारची एकवाक्यता निर्माण करणं, भाईचारा वाढवणं, संकटाच्या काळामध्ये मदतीला धावून जाणं, जो आपल्यापेक्षा दुबळा असेल त्याला देखील शक्ती देण्यासाठी प्रयत्न करणं या अनेक गोष्टीसाठी आजही विविध धर्मांच्या माध्यमातून सहकार्य मिळते.कोणताही धर्म कधीही कोणाचा द्वेष करा असे सांगत नाही. ईद होऊन गेली आहे. मात्र ईदच्या निमित्तानं, एकवाक्यता तयार करण्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की सामान्य माणसाला संघटित करून, त्याचा आत्मसन्मान वाढवून सामान्य लोकांचं राज्य प्रस्थापित करू. काही लोक जाती-धर्माच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्हाला भांडणतंटा नको. आम्हाला विकास पाहिजे. आम्हाला महागाईपासून सुटका पाहिजे. आमच्या नव्या पिढीला रोजगार पाहिजे. आपलं राज्य व देश सगळ्या दृष्टीनं प्रगत कसा होईल, अशी स्थिती आम्हाला निर्माण करायची आहे”.
या कार्यक्रमानंतर सर्वधर्मीय बांधवांनी स्नेह भोजनाचा लाभ घेतला तसेच मुशायरा व कवी संमेलनासाठी सुप्रसिद्ध मुशायराकार संपत सरल व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली तसेच मोठ्या संख्येने सर्व धर्मीय नागरिक देखील उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच खासदार सौ.वंदना चव्हाण,खासदार डॉ.अमोल कोल्हे,आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे जयदेवराव गायकवाड, , माजी नगरसेविका सौ नंदाताई लोणकर,सौ.रत्नप्रभा जगताप,फारुख भाई इनामदार,ॲड.हाजी गफुर पठाण, हाजी फिरोज शेख,हाजी रईस सुंडके,मोहसिन शेख,समीर शेख आदींसह मोठ्या संख्येने सर्वधर्मीय बंधु भगिनी उपस्थित होते.
पुणे- महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक सत्रात कोथरूडलाच शिवसृष्टी होईल असे वारंवार मुख्य सभेत आश्वासन दिले गेले पण प्रत्यक्षात हे आश्वासन कोणीच पाळले नाही, कर्वे रस्त्यावरील फसलेल्या दुमजली उड्डाणपुलाचाही आता गवगवा होत असताना, पुण्याचे माजी महापौर यांनी बालगंधर्वाच्या पुनर्विकासासाठी त्यांनी कंबर कसली आहे. बालगंधर्वचा पुनर्विकास करताना त्यात व्यापारी संकुल असेल, असा अपप्रचार काहींकडून जाणीवपूर्वक केला जात असून यात काडीचेही तथ्य नाही. केवळ विरोधाराला विरोध म्हणून हा खोटा प्रचार केला जात आहे. कारण या पुनर्विकास प्रकल्पात एक इंचही बांधकाम व्यावसायिक कारणासाठी नसेल, असेही माजी महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
एवढेच नव्हे तर आज त्यांनी तथाकथित पुनर्विकास प्रकल्पाचे तब्बल २५ डिझाईन फोटोग्राफ आज माध्यमांना प्रसिद्धीसाठी पाठविले आहेत.जे काम महापालिका प्रशासकाने करायला हवे ते कोणी पूर्वी सत्तेत असलेले माजी पदाधिकारी यांनी करून या प्रकल्पाचे मार्केटिंग केले जातेय काय ? असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे.यासाठी आज महापालिका प्रशासन, पीआरओ यांनी नाही तर खाजगी २ पीआर कंपन्यांनी काम केल्याचे निदर्शनास आले आहे.
बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाचा अट्टाहास कशासाठी ? येथे अन्य व्यापारी संकुले उभारणार काय ? इमारत जीर्ण धोकादायी नसून भक्कम आहे तर कोट्यावधींचा खर्च कशासाठी ? दर वर्षी दुरुस्त्यांसाठी केलेली आर्थिक तरतूद कधीही ५० टक्केच्या वर खर्च केली नाही, ते का ? अशा अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,नारळ प्रशासक विक्रम कुमार यांनी फोडला तरी चालेल पण पुनर्विकास व्हावा,जागतिक दर्जाचे जास्त रसिकांची सोय करणारे अत्याधुनिक केल्याने जास्त कलावंतांना संधी मिळेल यासाठी ७५ कोटीचे पूर्वगननपत्रक केले आहे.प्रशासक आणि आम्ही पुनर्विकासाचे काम वेळेत पूर्ण करू.लोकांनी केवळ विरोधाला विरोध करू नये.
मोहोळ हे आता माजी महापौर आहेत आणि परंतु त्यांनी आम्ही आणि प्रशासक हे काम वेळेत पूर्ण करू असे म्हटल्याने अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत.
पुनर्विकासाचे काम विक्रमी वेगाने पूर्ण करणार : मोहोळ
काळाजी गरज ओळखून पुण्याची शान असणारे बालगंधर्व रंगमंदिर नव्याने साकारण्यात येत असून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन अद्ययावत असे जागतिक दर्जाचे रंगमंदीर साकार होणार आहे. शिवाय शहराची अस्मिता असणाऱ्या ‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासात सर्व घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेऊन सादरीकरणही करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सादरीकरणानंतर पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचेही मोहोळ म्हणाले.
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘आपल्या शहरातील बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून आणि देखरेखीखाली हे रंगमंदिर उभे राहिले. आपली कला सादर करण्याची एकतरी संधी बालगंधर्वला मिळावी हे प्रत्येक कलावंताचे स्वप्न असते. ५४ वर्षांपूर्वी बांधलेल्या बालगंधर्वला नव्याने उभारण्याची आणि व्यापक करण्याची गरज असल्याचेही लक्षात आले. ही बाब लक्षात घेऊन २०१८ साली स्थायी समितीचा अध्यक्ष असताना बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतुदही केली’.
‘कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या कालावधीत पुनर्विकासाचा विषय काही वेळ बाजूला राहीला, तरीदेखील आपण या विषयाचा पाठपुरावा करत पुण्यातील ज्येष्ठ कलाकार, महापालिकेतील सर्वपक्षीय नेते, मनपा अधिकारी आणि वास्तुविशारद या सर्वांची एकत्रित समिती नेमून या विषयावर सर्वांगाने चर्चा घडवून आणली, ज्यात पुनर्विकासाबाबत सकारात्मक कल दिसून आला’, असेही महापौर म्हणाले.
‘केवळ साडे २२ हजार स्क्वेअर फूटामध्ये उभ्या असणाऱ्या या रंगमंदिराला वाढवून साडेतीन लाख स्क्वेअर फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. आज जेमतेम १०० दुचाकी व २०-२५ चारचाकी वाहनांची पार्किंग क्षमता आहे. परंतु नवीन वास्तूमधे ९०० दुचाकी व जवळपास २५० चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था असणार आहे. कलावंत आणि रसिकांच्या मागण्या लक्षात घेऊन एक ऐवजी आता १०००/५००/३०० इतक्या आसन क्षमतेची तीन नवीन प्रेक्षागृह उभी राहणार आहेत, अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.
‘बालगंधर्वमध्ये आजच्या घडीला केवळ एक ५०० फुटाचे कलादालन उपलब्ध आहे. परंतु ह्याच नव्या वास्तूमध्ये आता सुसज्ज असे १० हजार फुटाचे एक आणि प्रत्येकी ५ हजार फुटाची दोन, अशी तीन नवीन कलादालने उभारण्यात येणार आहेत. शिवाय यात पु. ल. देशपांडे आणि ५४ वर्षांच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत. पुणेकरांना अभिमान वाटावा, अशाच प्रकारचे नवीन बालगंधर्व रंगमंदिर आता उभे राहणार आहे’, असेही मोहोळ म्हणाले.
पुणे : आदिवासी भागातील महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. पालघर, भीमाशंकर आणि गडचिरोलीतील आदिवासी गावांसाठी स्वच्छता, सामाजिक विकास आणि जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी महिलांसाठी मधमाशी पालन प्रशिक्षण व साहाय्य हा त्यातील एक उपक्रम आहे. मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि फिक्की फ्लो दिल्लीच्या ऍग्रीकल्चर अँड फार्मिंगच्या राष्ट्रीय प्रमुख रितू प्रकाश छाब्रिया यांच्या नेतृत्वात फिक्की फ्लो मुंबई चॅप्टर, फिक्की फ्लो पुणे चॅप्टर, रोटरी क्लब ऑफ मुंबई सोबो या समविचारी संस्थांच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील आदिवासी महिलांसाठी मधमाशी पालन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने मधमाशी पालन व्यवसायासाठी १० दिवसांचे प्रशिक्षण व ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. मोखाडा गटातील वाघ्याची वाडी गावातील एकूण ४७ महिलांना या उपक्रमाचा लाभ मिळाला. महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाचे श्री चौधरी, रोटरी मुंबईचे अध्यक्ष राजीव पूनातर, राकेश जव्हेरी, मुकुल माधव फाऊंडेशनचे बबलू मोकळे आदी टीम उपस्थित होती. रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशन ग्रामीण व शहरी भागात सामाजिक उपक्रम राबवून तळागाळातील लोकांसाठी काम करत आहे. खेड्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी शाश्वत विकासाचे उपक्रम राबविले जातात. खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनसोबत २०१७ पासून फाऊंडेशन दुर्गम भागातील गावांमध्ये प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधणे, शिक्षण, वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य राखणे, परिसर स्वच्छता राखणे आदी उपक्रम राबवत आहे. आजवर पालघर जिल्ह्यातील १३ गावांसाठी व गडचिरोली जिल्ह्यातील आठ गावांना १०३८ स्वच्छतागृह बांधून देण्यात आली आहेत. ही स्वच्छतागृहे घरातील महिलेच्या नावाने आहेत. सौर दिवे, सौर पंप बसविण्यात आले आहेत. हिंदुजा फाउंडेशनच्या मदतीने तीन गावांमध्ये पाणी संवर्धन प्रकल्प उभारण्यात आले आहेत.” लॉकडाऊन काळात पालघर मध्ये स्थलांतरित झालेल्या अनेकांचे खेरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन अंतर्गत शेतीचे प्रशिक्षण, बी-बियाणे, खत, भाज्या व फळांची रोपे देऊन पुनर्वसन करण्यात आले. प्रशिक्षण ‘सिस्टीम ऑफ राईस इंटेंसिफिकेशन’ पद्धतीने देण्यात आल्याने कमी कच्चामालात अधिक उत्पादन मिळाले. आता हे १५० स्थलांतरित आपापल्या गावी जाऊन शेती करत असून आधीपेक्षा अधिक पैसा कमवत आहेत. जी. पी. इको सोल्युशन्स सोबत सोनाळे व शेले गावांना ४० रस्त्यावरील सौर दिवे दिले.
पुणे : वेदघोष, मंत्रपठण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार, पारितोषिक वितरण, सदिच्छा भेटी, स्नेहमेळावा अशा विविध कार्यक्रमांनी पुणे विद्यार्थी गृहाचा ११३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. दोन वर्षे कोरोनामुळे वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात येत होता. यंदा सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक दादासाहेब केतकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य पूर्णिमा लिखिते यांच्यासह कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, उपकार्याध्यक्ष एस. एम. जिर्गे, कार्यवाह राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, संचालक मंडळातील संजय गुंजाळ, रमेश कुलकर्णी, राजेंद्र बोऱ्हाडे, राजेंद्र कडुसकर, कृष्णाजी कुलकर्णी, दिनेश मिसाळ यांच्यासह सदानंद केंगे, एस. के. लिमये, अमरेंद्र गोरे, म. अ. जोशी आदी उपस्थित होते. संस्थेच्या आवारातील राम-लक्ष्मण मंदिरात कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांच्या हस्ते सकाळी अभिषेक करण्यात आला. यानंतर संस्थेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी रमेशचंद्र कुलकर्णी (वय ८४) यांचे ‘पत्रसंवाद भाग १ व २’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. पुस्तक विक्रीच्या रकमेतून एक लाख रुपयाची देणगी कुलकर्णी यांनी संस्थेला दिली. समितीचे हितचिंतक डॉ. सतीश देसाई, शामकांत देशमुख, अनुसंधान समितीचे हणमंत भोसले, कृष्णाजी शिरकांडे आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात ‘मला संस्थेने काय दिले’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाईन स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. माजी विद्यार्थी महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. वर्षभराचा आलेख मांडत कार्याचा आढावा घेण्यात आला.
कोरोना काळात विविध विभागातील निवृत्त सेवकांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळच्या सोहळ्याची सुरुवात पाच ब्राह्मणांच्या मंत्रघोषात झाली. संस्थेच्या सर्व शाखांतील पदाधिकारी, कर्मचारी, माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सदिच्छा भेटीसह पानसुपारीचा कार्यक्रम झाला.
पुणे-अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रिया चालू आहे. पुण्याचे निवडणुक निर्णय अधिकारी दौलत राम नायक यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी दौलत राम नायक यांचा श्री गणेशाची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी आज दौलत राम नायक यांच्या उपस्थितीत ही बैठक बोलविण्यात आली आहे. बुथ पातळीवरून शहर पातळीपर्यंत टप्प्या टप्प्याने निवडणुका घेण्यात येणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण संघनात्मक निवडणुक व्यवस्थित पार पाडू.’’
मुख्य निवडणूक अधिकारी दौलत राम नायक म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेस कार्यकारिणीच्या आदेशानुसार देशात काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संघटनात्मक निवडणुका पारदर्शक करण्यासाठी राहुल गांधी यांनी यावेळी डिजीटल सभासद नोंदणीची प्रक्रिया राबविली. या डिजीटल सभासद नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी बुथ पातळीवर सभासद नोंदणी केली आहे. बुथ पातळीवरची निवडणुक २८ मे पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यानंतर ब्लॉक व शहर पातळीवरच्या निवडणुका होणार. ज्यांनी संघटनेसाठी काम केलेले आहे त्यांना संघटनेमध्ये स्थान देण्यात येणार आहे. १० जून पर्यंत शहर काँग्रेची निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची निवडणुक ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे.’’
यानंतर माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाची संघटनात्मक निवडणुक मिस कॉलने करता येत नाही. भारतीय जनता पक्ष मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतात. वास्तविक पाहता मिस कॉलद्वारे केलेली निवडणुक प्रक्रिया पारदर्श नसते. काँग्रेस एकमेव पक्ष आहे की ज्याची निवडणुक प्रक्रिया बुथ पातळीवरून अखिल भारतीय पातळीपर्यंत पारदर्शक पध्दतीने राबविली जाते. मला खात्री आहे की, आपणा सर्वांच्या सहकार्याने आपण संघटनात्मक निवडणूक यशस्वीपणे पार पाडू.’’
यावेळी माजी आमदार माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांची भाषणे झाली.
पुणे दि.१३: पुणे महसूल विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांच्या खरीप हंगाम २०२२ नियोजनाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी १६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन कारण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे तसेच विभागातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत खरीप हंगामात खते, बियाणे, कृषि निविष्ठांची आवश्यकता, मागणी, आवंटन व उपलब्धता तसेच पिक कर्ज, वीज वितरण, विस्तार मोहिमा आणि सिंचन सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.
ऑनलाईन महाडीबीटी प्राप्त अर्ज, प्रत्यक्ष लाभ, गावनिहाय बैठका, कृषि प्रक्रीया योजना, विकेल ते पिकेल अभियान, कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, जमिन सुपिकता निर्देशांक वापर, पिक स्पर्धा आयोजन, ऊस पाचट कुजविणे, हुमणी किड नियंत्रण, विस्तार मोहिमा, मग्रारोहयो फळबाग लागवड तसेच ग्राम कृषि विकास समितीचादेखील आढावा घेण्यात येणार आहे. खरीप हंगामच्या यशस्वीतेसाठी लोकप्रतिनिधींच्या सुचनांचा अंतर्भाव करुन सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.
बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे विभागीय कृषि सहसंचालक यांनी कळविले आहे.
मुंबई, दि. 13 : नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावर कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत, औरंगाबाद विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नाशिक विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ५.३० ते ७.३० या वेळेत, कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे रोजी २.३० ते ४.३० या वेळेत, अमरावती विभागीय कार्यालयात २८ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात २८ मे रोजी ४.३० ते ६.३० या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील.