Home Blog Page 1998

कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ

0

सध्याच्या धावपळीच्या युगात विशेषतः शहरातील नागरिकांना विरंगुळा हवा असतो. परंतु हा वेळ केवळ रिकामा न घालवता त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहता आले आणि त्यातही पारंपरिक आणि आधुनिक शेतीची माहिती घेता आली तर विरंगुळ्याबरोबरच माहितीपूर्ण पर्यटनाची सुवर्णसंधी साधता येईल. त्याचबरोबर शेतकरी आणि संबंधितांना रोजगारदेखील उपलब्ध होईल. रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ साधण्याचा हाच प्रयत्न पर्यटन विभागाने केला आहे.

राज्याच्या पर्यटन विभागाने नुकतेच आपले कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. या धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती, शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन, ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभवांचा ठेवा मिळतोय. शेतीची कामे कशी चालतात त्याचा  स्वतः  अनुभव  घेऊन  निसर्गाशी मैत्री करण्याची संधी मिळतेय आणि निरामय आयुष्य जगण्याची प्रेरणा देखील मिळतेय.

आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विभाग व कृषी पर्यटन विकास कंपनी (एटीडीसी) संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 16 मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी पर्यटन विकासाशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात राज्यात नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना पुरस्कृत केले जाणार आहे.

कृषी-पर्यटन ही एक उदयोन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना आहे. कृषी पर्यटनामुळे नवीन अर्थाजनाच्या संधी निर्माण होत आहेत. याद्वारे गावांचा शाश्वत विकास होईल. 2020 मध्ये धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून, गेल्या दोन वर्षांत केवळ ऑनलाइन कृषी पर्यटन परिषद झाली होती, यंदा कोविडबाबतचे नियम शिथील झाल्याने आणि उद्योगधंद्यांना संजीवनी मिळाल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यामध्ये अनेक कृषी पर्यटन केंद्र संचालकांना कृषी पर्यटन विकासासाठीच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे नेहमी सांगतात, आपल्या राज्यात बर्फ आणि वाळवंट सोडले तर पर्यटनाच्या सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. गड किल्ले, थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे, डोंगर दऱ्यांनी संपन्न निसर्ग, ऐतिहासिक वास्तू आदींसह वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती ही देखील महाराष्ट्राची विशेष ओळख आहे. अजिंठा वेरूळ सारख्या लेण्या, बिबीका मकबरा, पाणचक्की, लोणार सरोवर, प्राचीन मंदिरे, अष्टविनायकाची ठिकाणे, देशातील ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख मंदिरे यांची जागतिक स्तरावर कीर्ती आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर रिसॉर्टच्या माध्यमातून राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पर्यटनाच्या या पारंपरिक साधनांना राज्याच्या पर्यटन विभागाने नावीन्यपूर्ण कल्पनेची जोड देऊन साहसी पर्यटन, कॅराव्हॅन, बीच शॅक्स, कृषी पर्यटन आदींच्या माध्यमातून पर्यटन विकासाची धोरणे जाहीर केली आहेत. यातील कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना व्यावसायिक लाभ तर होतोच शिवाय रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटनाची आणखी एक संधी उपलब्ध होत आहे.

पर्यटन संचालनालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्या 354 कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांच्या रोजगारात सुमारे 25 % वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कृषी पर्यटन केंद्रांवर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या काही लाखांमध्ये आहे. इतकेच नाही तर कृषी पर्यटनातून विशेषतः ग्रामीण भागातील सुमारे एक लाख महिला आणि तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांच्या जीवनाला नव्हे तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागल्याचे पुणे, रायगड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अनुभवायला आले आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.

कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरू शकते. म्हणूनच या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील मार्गदर्शक या कार्यक्रमात पर्यावरण पूरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या नव्याने आणि वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ज्यांची माहिती करून घेण्यासाठी अधिकाधिक तरूणांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

– ब्रिजकिशोर झंवर

विभागीय संपर्क अधिकारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजपा प्रवेशासाठी लगबग सुरु .. चंद्रकांत पाटील म्हणाले तो तर एका कुटुंबाचा पक्ष .. भाजपा देशाचा पक्ष

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक उपाध्यक्ष आनंद शेजवळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यांचे‌‌ पक्षात स्वागत करुन भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे महापालिकेत भाजपाचे सभागृह नेते गणेश बिडकर, माजी नगरसेविका कल्पना बहिरट, लक्ष्मी ताई घोडके, भाजपा कोथरूड मंडल पुनित जोशी, पुणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रणय शिंदे, निलेश आलाट, वैशाली सोनवणे, विशाल दरेकर, विशाल कोंडे, सुजीत पुजारी, सागर अफुवाले, कौस्तुभ दबडगे, सतिश गायकवाड, पोपटराव गायकवाड, सुवर्णा भरेकर, बाळासाहेब घोडके, उद्धव मराठे आदी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या  आगामी निवडणुकीच्या तोंडावर  राजकीय फोडाफोडीलाही वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला  धक्का द्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांनी गणेश बिडकर यांच्या माध्यमातून आपल्या  कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम असल्याचं मला सांगण्यात आलं. एखाद्या हॉलमध्ये कार्यक्रम असेल आणि 50 लोक असतील असं मला वाटलं होत. पण संख्या बघून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली असं वाटू लागलं आहे. गणेश बीडकर आणि भाजपच्या प्रेमापोटी एवढ्या मोठ्या संख्येने हे लोक आले आहेत. हा प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होतोय. दोन तरुण कार्यकर्त्यांना लवकर कळालं की राजकीय पक्षात काम करायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही.या वेळी चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी हा केवळ एका माणसाचा पक्ष आहे. त्यांनी सांगितलं की रांगेत बसायचं. पक्षाचा प्रमुख देईल ते त्यांच्याकडून घ्यायचं. त्यांनी आयुष्य घालवलं पक्ष उभं करायला त्यामुळं त्यांचं ऐकल तर चालेल. पण आता हा पक्ष एका कुटुंबाचा पक्ष बनला आहे आता त्यांच्या कन्या खूप तापट आहे. त्या म्हणतात हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे.

कॉंग्रेस मध्ये बदल : कुटुंबात एक तिकीट, पक्ष बदलुंसह सर्वानांच 5 वर्षे पक्षात काम केल्यानंतरच तिकीट, तीन वर्षाच्या अंतरानेच दुसरे पद

उदयपूर – पुढील निवडणुकांपूर्वी तिकीट देण्याच्या बाबतीत काँग्रेसने मोठा फेरबदल करण्याची तयारी केली आहे. आता एका कुटुंबाकडून एकच तिकीट मिळणार आहे. उदयपूर येथील चिंतन शिबिर येथील संघटनेत बदल आणि राजकीय बाबींवर समितीने ही शिफारस केली आहे.काँग्रेसचे राजस्थान प्रभारी सरचिटणीस अजय माकन यांनी उदयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले- आमच्या पॅनलमध्ये एका कुटुंबात एक तिकीट हा फॉर्म्युला लागू करावा यावर चर्चा झाली आहे. ज्याला तिकीट दिले जाईल, त्याने किमान 5 वर्षे पक्षात काम केलेले असावे. डायरेक्ट तिकीट देऊ नये. नवोदित नेत्यांना तिकीट मिळणार नाही, मात्र गांधी परिवाराला या नियमात सूट देण्यात आली आहे. हे सूत्र त्यांना लागू होणार नाही.

एखाद्या नेत्याला तीन वर्षांच्या कूलिंग पीरियडनंतर मिळेल दुसरे पद

माकन म्हणाले- सलग पाच वर्षे पक्षात काम केल्यानंतर कोणालाही दुसरे पद देऊ नये, अशी शिफारसही करण्यात आली आहे. किमान 3 वर्षांचा कूलिंग पीरियड असावा. पुढील कोणतेही पद तीन वर्षांच्या अंतरानंतरच दिले पाहिजे.एखाद्या नेत्याच्या मुलाला किंवा दुसऱ्या नेत्याला तिकीट घ्यायचे असेल, तर त्याला किमान पाच वर्षे संघटनेत काम करावे लागेल. सलग 5 वर्षे पदावर न राहण्याचा नियम काँग्रेसमध्ये लागू झाल्यास निम्म्याहून अधिक नेते बाहेर होतील. नेत्यांच्या मुलांनाही पाच वर्षे पक्षात काम केल्यावरच तिकीट मिळणार आहे.

गांधी कुटुंबाला नियमातून सूट

गांधी घराण्यावर या तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत माकन यांना विचारले असता ते म्हणाले की, हा प्रश्न गांधी घराण्याचा नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक संघटना निवडणुकीच्या प्रक्रियेतून होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष निवडीचा चिंतन शिबिराशी काहीही संबंध नाही.एक कुटुंब एक तिकीट ही तरतूद गांधी कुटुंबाला लागू होणार नाही, असेही अजय माकन यांनी सूचित केले. काँग्रेसने एक कुटुंब-एक तिकीट फॉर्म्युला लागू करण्याची शिफारस केली आहे, परंतु मोठ्या राजकीय घराण्यांसाठीही वाट सोडली आहे.वास्तविक, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला तो 5 वर्षे सक्रिय असेल तरच तिकीट दिले जाईल, काँग्रेसमध्ये नवा सदस्य आल्यास त्याला पहिली 5 वर्षे संघटनेत काम करावे लागेल, त्यानंतरच त्याला तिकीट दिले जाईल.

सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल;

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या चिंतन शिबीरात हजेरी लावली असून पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन केले आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तीन दिवस हे चिंतन सुरु असणार आहेत. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात ध्रुवीकरणाचं वातावरण आणि भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी सोनिया गांधींनी केला.

“पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या ‘कमाल प्रशासन, किमान सरकार’ या घोषणेचा अर्थ वेदनादयीपणे स्पष्ट झालं आहे. याचा अर्थ देशाला सतत ध्रुवीकरणाच्या स्थितीत ठेवणं तसंच लोकांना नेहमी भीती आणि असुऱक्षित स्थितीत राहण्यात भाग पाडणं आहे. याशिवाय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारित आणि अनेकदा क्रूरपणे लक्ष्य करणे”.नवसंकल्प चिंतन शिबीरच्या निमित्ताने भाजपा, आरएसएस आणि त्यांच्या सहाकऱ्यांमुळे देशासमोर निर्माण झालेल्या अनेक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचं यावेळी सोनिया गांधींनी म्हटलं.काँग्रेसचं चिंतन शिबीर १३, १४ आणि १५ मे असे तीन दिवस चालणार आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला मजबूत करणं यामागचा मुख्य उद्धेश आहे. शुक्रवारी चिंतन शिबीरामध्ये मार्गदर्शन करताना सोनिया गांधींनी राष्ट्रीय तसंच अर्थपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही संधी आहे असं सांगितलं.यावेळी सोनिया गांधींनी संस्थेत बदल गरजेचे असून आपण आपल्या कामाची पद्धत बदलली पाहिजे असं स्पष्ट मत मांडलं. “आपल्या वैयक्तिक अपेक्षांपेक्षा संस्थेला वरती ठेवलं पाहिजे. पक्षाने आपल्याला भरपूर काही दिलं असून आता परतफेड करण्याची वेळ आहे,” असं सोनिया गांधींनी सांगितलं.

तत्पूर्वी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, “यूपीए सरकारच्या काळात लोक काय म्हणतील याचा विचार केला जात होता. पण, आज या लोकांनी धर्माच्या नावाने संपूर्ण देश ताब्यात घेतला आहे. धर्म, जातीच्या नावाने दंगली पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता राजस्थान त्यांच्या हिटलिस्टवर आहे. राज्यात केव्हाही दंगली, सीबीआय व ईडीची छापेमारी सुरू होते.”

गहलोत म्हणाले -“देशाने 70 वर्षांत खूप प्रगती केली. काँग्रेसचे सिद्धांत, धोरण देशाच्या डीएनए सारखी आहेत. त्यानंतरही ते निर्लज्जपणे काँग्रेसने 70 वर्षांत काय केले असा प्रश्न करतात. आम्ही काम करतो. पण, मार्केटिंग करत नाही. हा आमचा कच्चा दुआ आहे. याऊलट हे खोटारडे लोक काम कमी व मार्केटिंग जास्त करतात. कधी गुजरात मॉडेलची गोष्ट करतात.”

लेकसिटीच्या ताज अरावलीत होणाऱ्या या शिबिरात काँग्रेसच्या ओल्ड गार्डपासून तरुण चेहरे दिसून येत आहेत. येथे येणारे बहुतांश नेते या शिबिरावर समाधान व्यक्त करत आहेत. हे शिबिर सर्वसाधारण इव्हेंट नाही. यात पक्ष नेतृत्वापासून घराणेशाहीपर्यंतच्या मुद्यांवर ठोस निर्णय घेतले जातील, असे ते म्हणालेत.

अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी महापालिकेने घेतले सव्वातीन कोटीचे हायड्रोलिक डीमोलीशन मशीन: दरमहा ५ लाखाचा खर्च ऑपरेटिंग आणि मेंटेनन्सवर करणार …

पुणे- महानगरपालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाकरिता Hydraulic Demolition Machine with Trailer ५ वर्षाकरिता ऑपरेशन व मेंटेनन्ससह खरेदी करण्यात आली. या मशीन द्वारे २० मीटर उंचीपर्यंत ची इमारत पूर्णतः उध्वस्त करता येणार आहे , यापूर्वी अशा इमारतींना केवळ मोठ मोठे गोलाकार आकारा सारखी भगदाडे पाडली जात होती . पण या मशीनने संपूर्ण इमारत पाडली जाईल . कोबाल्को या जपानी कंपनीची हि मशीन सवातीन कोटी ला महापालिकेने खरेदी केली असून दरमहा ५ लाख रुपये या मशिनच्या ऑपरेटिंग आणि मेंटेनन्स साठी पाच वर्षे दिले जाणार आहेत .

पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाकरिता Hydraulic Demolition Machine with Trailer ५ वर्षाकरिता ऑपरेशन व मेंटेनन्ससह खरेदी करण्यात आली. आज दि. १२ रोजी या मशीनचे महापालीकार्पण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे, उप आयुक्त माधव जगताप, महेश डोईफोडे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख इत्यादी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनधिकृत बांधकामांना आळा घालणेकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत वारंवार कारवाई करण्यात येत असतात. कार्यकारी अभियंता विभाग क्र. १ ते ७ यांना अतिक्रमण विभागामार्फत पोलीस बंदोबस्त व मशिनरी उपलब्ध करून देऊन साप्ताहिक नियोजनानुसार कारवाई करणेत येते.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेकारिता मशिनरी भाडेतत्वावर घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. सदर खर्चामध्ये बचत करणेच्या दृष्टीकोनातून महापालिकेचे स्वता:च्या मालकीचे मेकॅनिकल माउंटेड जॉ क्रशर मशीन खरेदी करण्यात आले. या मशीनद्वारे ५ ते ६ मजल्यापर्यंतच्या इमारतींवर कारवाई करता येणे शक्य होणार आहे.
सदर मशीनचा वापर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणेकरिता होणार आहे. तसेच पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये आपत्ती निर्माण झाल्यास या प्रकारचे मशीन पुणे शहरात उपलब्ध बसल्याने मुंबई, ठाणे ई. शहरातून मागवावे लागत असल्याने त्यामध्ये किमान २-३ दिवसांचा विलंब होतो. आपत्ती व्यवस्थापन करतेवेळी सदर मशीन अभावी झालेल्या नैसर्गिक, प्राण व वित्त हानी या सर्व बाबी टाळता येणेसाठी सदरचे मशीन अत्यंत उपयोगी असणार आहे.

सुस्थितीत ‘बालगंधर्व’ च्या नाहक पुनर्विकासाला १०० कोटी आहेत अन लोकांना पाणी द्यायला मात्र पैसे नाहीत काय ? आप चा महापालिका आयुक्तांना सवाल

शहरातील नागरिकांना पाणी द्या अथवा टँकरचे पैसे द्या, कोर्टाच्या आदेशाचे पालिका प्रशासनाने पालन करावे: आम आदमी पक्ष, पुणे

पुणे-“बालगंधर्व रंगमंदिर जे आजही अत्यंत सुस्थितीत आहे, ज्याला केवळ चांगल्या देखभालीची गरज आहे मात्र त्यावर काम न करता पुनर्विकासाच्या नावाखाली प्रशासन १०० कोटी खर्च करणार आहे परंतु तहानलेल्या पुणेकरांना पाण्यासाठी पैसे नाही आहेत. आम आदमी पक्ष पुढील काळात पाणी लढा अधिक तीव्रपणे उभारणार आहे”

याबाबत आप चे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे,कनिष्क जाधव,पाणीप्रश्न समन्वयक सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले कि,’भयंकर उन्हाळ्याने नागरिकांची अक्षरशः लाही लाही केली आहे, अशा वेळी पालिका प्रशासनाच्या, राजकीय नेत्यांच्या आणि टँकर माफियांच्या संगनमताने सामान्य पुणेकर मात्र तहाणलेलेच आहेत. पाणी ही मूलभूत गरज असताना देखील, पुणे शहरासह मनपा कार्यक्षेत्रात समाविष्ट २३ गावातील नागरिकांना पाण्यासाठी शुक्लकाष्ठ सहन करावे लागत आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर देखील महापालिका प्रशासन समाविष्ट २३ गावांमधील मोठ्या सोसायट्यांना पाणी देण्यास नकार देत आहे.पुणे शहरात पालिका प्रशासन शहरातील राजकीय नेत्यांच्या प्रभावाने टँकर माफियांना संरक्षण देत आहे, त्यासमोर न्यायालयाच्या आदेशाची देखील पायमल्ली करत आहे.

आम आदमी पक्षाची मागणी आहे की, ज्यावेळी या गावांचा पालिका हद्दीत समावेश झाला त्यावेळपासून गावातील सोसायट्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा अथवा टँकरचे पैसे द्यावे. पुण्याच्या अनेक भागांमध्ये सुद्धा सोसायट्यांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे त्यांनाही महानगरपालिकांनी पाणीपुरवठा करावा अथवा टँकरचे पैसे द्यावे.एकीकडे पालिका प्रशासन पुनर्विकासाच्या नावाखाली काहीही आवश्यकता नसताना अनेक ठिकाणी शेकडो कोटी रुपये विनाकारण खर्च करत आहेत मात्र नागरिकांना पाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. शहरातील तसेच या समाविष्ट गावातील लोकांच्या पाणी प्रश्नावर आम आदमी पक्ष सातत्याने लढा देत आहे, शहरातील अनेक रहिवासी सोसायट्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रचंड खर्च केवळ पाण्याच्या टँकरसाठी होत असल्याचे समजते. पुढील काळात जर न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पालिका प्रशासनाने अंमलबजावणी केली तर आम आदमी पक्ष पाणी लढा अधिक तीव्र करेल.”बालगंधर्व रंगमंदिर जे आजही अत्यंत सुस्थितीत आहे, ज्याला केवळ चांगल्या देखभालीची गरज आहे मात्र त्यावर काम न करता पुनर्विकासाच्या नावाखाली प्रशासन १०० कोटी खर्च करणार आहे परंतु तहानलेल्या पुणेकरांना पाण्यासाठी पैसे नाही आहेत. आम आदमी पक्ष पुढील काळात पाणी लढा अधिक तीव्रपणे उभारणार आहे”

“या समाविष्ट गावात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अनेक रहिवासी सोसायटी व्यवस्थापनाच्या संपर्कात आहे, सोसायटी देखभाल खर्चापैकी बहुतांश खर्च केवळ पाण्यासाठी होत आहे. अनेक वेळा निवेदन देऊन देखील प्रशासन लक्ष देणार नसेल तर आम आदमी पक्ष आपला लढा अजून तीव्र करेल. यासाठीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. असे आपच्या वतीने त्यांनी सांगितले

इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’चे उद्घाटन 

देशभरातील चित्रकार व शिल्पकारांचा सहभाग, रविवारपर्यंत पुणेकरांना पर्वणी 

पुणे : वॉटर कलर, म्युरल, चारकोल, ग्लासपेटींग, पोट्रेट, पोस्टर कलर, ऑइल कलर, सिरॅमीक, अॅकरॅलीक, स्क्लपचर, कॅलिग्राफी अशा विविध प्रकारच्या आधुनिक व पारंपारीक चित्र, शिल्पांचा मेळ असलेल्या ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’  या वैविध्यपूर्ण चित्र – शिल्प प्रदर्शनाचा शनदार उद्घाटन सोहळा गुरुवारी संपन्न झाला.  येत्या रविवारपर्यंत पुणेकरांना या प्रदर्शनाची पर्वणी अनुभवता येणार आहे.

आर्टक्यूब गॅलेरिया पुणेच्या वतीने ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’ चे आज मिस इंडिया रनरप सोनाली काकडे व दिवा पीजेन्ट्स मॉडेल ग्रुमिंगचे कार्ल मासकेरन्स यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंतराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार उमाकांत कानडे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या विभाग प्रमुख अनुपमा पाटील, चित्रकार चारूहास पंडित, आर्टक्यूब गॅलेरियाचे अतुल काटकर, प्रमोद माने, कॅमल चे झोनल बिजनेस मॅनेजर नंदकुमार गायकवाड, ग्राफीनेट सोल्युशनचे चेतन मोरे, एमआयटी स्कुल ऑफ डिझाईन च्या एचओडी श्रुती निगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोमध्ये जवळपास 400 चित्रकार सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रासह कलकत्ता, चेन्नई, चंदीगड, मेरठ, गुजरात, वेस्ट बंगाल तसेच सिंगापूर आणि दुबई येथूनही कलाकार आपली कला येथे सादर करीत आहेत.

यावेळी मिस इंडिया रनरप सोनाली काकडे म्हणाल्या, कलेला आपल्याकडे प्रोफेशनली पाहण्याचा दृष्टिकोण खूप कमी आहे. पण प्रामुख्याने पुण्यात कलेकडे खूप आदराने पाहिले जाते. सर्वाधिक चित्रप्रदर्शन ही पुण्यात भरवली जातात. अन् अशा पद्धतीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्र प्रदर्शन पाहिली की कलाकारांना काम करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळते.

आर्टक्यूब गॅलेरियाचे अतुल काटकर म्हणाले, या प्रदर्शनात जवळपास 400 हून अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्र व शिल्प येथे पुणेकरांना पहायला उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन येत्या 15 मे 2022 पर्यंत शुभारंभ लॉंन्स, डीपी रोड, एरंडवणे, पुणे येथे सर्वांना पाहण्यासाठी खुले असणार आहे. या चार दिवसीय इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोमध्ये रोज संध्याकाळी 6 ते 7.30 या वेळेत लाईव्ह पेंटींग डेमो असणार आहेत. या इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोला पुणेकरांनी भेट देऊन कलेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अतुल काटकर व प्रमोद माने यांनी केले आहे.

मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचा पंचनामा व्हावा-माजी आमदार मोहन जोशी यांची मुख्य मंत्र्यांकडे मागणी


पुणे ; पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून पुण्यात करण्यात आलेल्या कामांची चौकशी व्हावी आणि संपूर्ण योजनेचा पंचनामा करून पुणेकरांपुढे मांडावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी मुख्य मंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण मिशन ( जेएनएनयूआरएम )द्वारे पुणे शहरात१ हजार५०० कोटींहून आणि विकास कामे झाली, मनमोहन सिंग सरकारची ही उपयुक्त योजना बंद पाडून मोदी सरकारने स्मार्ट सिटी आदी फसव्या योजना आणल्या.पंतप्रधान मोदी यांनी मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटी योजनेचे उदघाटन पुण्यात केले. त्यानंतर गेल्या सहा वर्षात पुण्यासह देशभरातील १०० शहरांमध्ये योजना अपयशी ठरली आहे. याकरिता या योजनेच्या यशापयशाचा पंचनामा होणे गरजेचे आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

स्मार्ट सिटी योजनेचा पहिला टप्पाही पुण्यात यशस्वी झालेला नाही. मात्र, या योजनेसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे महापालिका आणि खासदार निधीतून कामे करण्यात आलेली आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी पुणे महापालिका आणि खासदार निधीचा वापर करण्यात आला आहे. त्याचा विनियोग कसा करण्यात आला? त्यातून कोणती कामे झाली? या सर्वाची चौकशी होणे गरजेचे आहे. पुणेकरांसाठी ही योजना फसवी ठरलेली आहे. योजना अपयशी ठरत असल्याचे जाणवल्यावर केंद्र सरकारने ही योजना गुंडाळण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात काँग्रेसने आवाज उठवला होता. सध.या या योजनेला मुदतवाढ दिलेली असून घाईघाईने कामे उरकण्यात येत आहेत. एका फसव्या योजनेसाठी खर्च झालेल्या जनतेच्या पैशाचा पंचनामा व्हायला हवा आणि अनाठायी खर्च रोखला जायला हवा, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

उस्ताद झाकीर हुसेन यांनी पदवी स्वीकारणे हा विद्यापीठाचा बहुमान – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 12 :- जागतिक कीर्तीचे कलाकार, तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी मुंबई विद्यापीठातर्फे दिलेल्या पदवीचा स्वीकार करणे हा विद्यापीठाचा मोठा सन्मान असून या पुरस्कारामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षान्त समारंभात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

संगीत क्षेत्रात व इतर विद्याशाखांमध्ये आपला शिष्य आपल्याही पुढे जावा असे गुरुजनांना वाटते, दुःखद प्रसंगी संगीत मनाला सांत्वन देते ही संगीताची शक्ती आहे. निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा दिलेली असते. या प्रतिभेला शिस्त, एकनिष्ठपणा व परिश्रमातून फुलवता येते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय अध्ययनास चालना देण्यात येत असून यानंतर विद्यार्थ्यांना विज्ञानासह संगीतदेखील शिकण्याची व्यवस्था असेल असे सांगून या धोरणाची अंमलबजावणी चांगली झाली तर विद्यापीठांमधून झाकीर हुसेन, शशिकांत गरवारे यांच्याप्रमाणे प्रतिभावंत विद्यार्थी निर्माण होतील असे राज्यपालांनी सांगितले. पंतप्रधान मोदी ‘मेक इन इंडिया’चे आवाहन करीत आहेत. मात्र गरवारे समूहाने 80 वर्षांपूर्वीच ‘मेक इन इंडिया’ ची सुरुवात केली होती असे राज्यपालांनी सांगितले.

लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद : उदय सामंत

ज्या झाकीर हुसेन यांचा तबला ऐकून आपण लहानाचे मोठे झालो त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसावयास मिळणे हा आपला बहुमान असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जयंतीच्या दिवशी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय सुरु होईल, असे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. या महाविद्यालयासाठी शासनाने 100 कोटी रुपयांची तरतूददेखील केली असल्याचे त्यांनी सांगितले. या महाविद्यालयातील अभ्यासक्रम ठरविण्यासाठी झाकीर हुसेन, शंकर महादेवन, उषा मंगेशकर यांनी मदत करावी असे त्यांनी सांगितले. राज्यातील शैक्षणिक क्षेत्र प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाची पदवी हा कृपाप्रसाद : उस्ताद झाकीर हुसेन

जगातील सर्वाधिक जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने दिलेली पदवी हा आपण थोरामोठ्यांचा कृपाप्रसाद आहे, असे समजतो व तो सन्मान आपले वडील व गुरु उस्ताद अल्लारखाँ यांना समर्पित करतो असे सत्काराला उत्तर देताना उस्ताद झाकीर हुसेन यांनी सांगितले.

जीवनात गुरु होण्याचा प्रयत्न न करता उत्तम शिष्य होऊन राहा असा सल्ला आपल्याला वडिलांनी दिला होता व तो आपण पाळत आहोत असे सांगून आज अनेक उत्तमोत्तम संगीतकार असून आपण केवळ त्यापैकी एक असल्याचे विनम्र उद्गार झाकीर हुसेन यांनी यावेळी काढले.

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात पार पडलेल्या विशेष दीक्षान्त सोहळ्यात उद्योगपती शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही पदवी देण्यात आली तर रसायन शास्त्रातील योगदाबाबद्दल वैज्ञानिक डॉ मुकुंद चोरघडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशिकांत गरवारे उपस्थित राहू शकले नाही. त्यांची कन्या मोनिका गरवारे यांनी पदवीचा स्वीकार केला.

कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन कार्य केल्यास तो व्यक्ती घडतो आणि दुसऱ्यालाही घडवतो. भारतीय संगीत आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे. उस्ताद झाकीर हुसेन हे संगीत क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि अंगभूत गुणांमुळे स्वयंभू राजे बनले.

विशेष दीक्षान्त समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर विशेष कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, संगीत क्षेत्रातील शंकर महादेवन, कुलसचिव सुधीर पुराणिक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, पं. विभव नागेशकर, सत्यजित तळवलकर, राकेश चौरसिया, विजय घाटे तसेच विविध कलाकार व विद्यापीठाचे प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.

शिवसेनेकडून पुणे व पिंपरी महापालिका प्रभारी समन्वयकपदी वैभव वाघ यांची नियुक्ती

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभारी समन्वयक पदी वैभव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वपूर्ण आहे. शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी वैभव वाघ यांच्या नियुक्तीचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

वैभव वाघ गेल्या २० वर्षांपासून संघटनात्मक व सामाजिक कार्यात भरीव योगदान देत आहेत. वंदे मातरम संघटनेच्या, तसेच गणेशोत्सव मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, युवक संघटन क्षेत्रात मोठे काम उभारले आहे. या कामांमुळे युवा वर्गात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.  निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांचा दांडगा अनुभव आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा अशा तब्बल १११ पेक्षा अधिक निवडणुकांचे रणनीतीकार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि निवडणूक व्यवस्थापनेचे कौशल्य शिवसेनेला येत्या काळात फायद्याचे ठरणार आहे. कोरोना काळात वैभव वाघ यांनी गरजूंसाठी देशभर केलेले कार्य, प्लाझ्मा प्रीमियर लीग सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम, कोरोना मृतांच्या अंत्यविधी कामातील सहभाग अशा उल्लेखनीय कामासाठी वैभव वाघ यांना देशभरातून ‘हेल्थगिरी अवॉर्ड’चे तिसरे नामांकन मिळाले होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून वाघ यांनी वंदे मातरम संघटनेला राज्यभर विस्तारले आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि रणनीतीच्या कामाच्या अनुभवाचा शिवसेनेला आगामी निवडणुकांत फायदा होणार आहे. वैभव वाघ ह्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना उमेदवारांच्या निवडणुकींच्या तयारीवर आणि पर्यायाने निवडणूक निकालांवर चांगला परिणाम होईल अशी चर्चा पुणे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

शिवसेनेने प्रभारी समन्वयक पदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल आनंद व्यक्त करत वैभव वाघ म्हणाले, “हे केवळ पद नाही, तर जबाबदारी  आहे. ही संधी दिल्याबाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे, खासदार संजयजी राऊत, खासदार अनिलजी देसाई, डॉ. नीलमताई गोऱ्हे, शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आणि शिवसेना उपनेते सचिनजी आहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोडकर या सर्वांचे आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनाने आगामी काळात पक्षासाठी भरीव काम करण्याचा विश्वास व्यक्त करतो.”

“पुढील काळात पुणे, पिंपरी-चिंचवडचे सर्व सन्माननीय शहरप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसेना परिवारातील प्रत्येक शिवसैनिक ह्यांच्या सोबत समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचत विकासाभिमुख आणि दूरगामी काम करण्याचा संकल्प आहे. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण ही शिवसेनेची कार्यपद्धती सार्थ करत आम्ही सगळे चांगले काम उभे करत राहू ह्याची खात्री देतो,” असेही वैभव वाघ यांनी नमूद केले.

‘परिचारिका म्हणजे रुग्णाची काळजी घेणारे मन आणि आत्मा ” : डॉ. भारती प्रवीण पवार

0

नवी दिल्ली, 12 मे 2022

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज संबोधित केले. भारतीय परिचर्या परिषदेने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. परिचारिकांचे परिश्रम आणि समाजाच्या सेवेसाठी देत असलेल्या योगदानासाठी ,आरोग्य सेवेतील परिचारिकांचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने, आधुनिक परिचर्या क्षेत्राच्या संस्थापिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो.

देशासाठी समर्पित सेवा देत असल्याबद्दल  संपूर्ण परिचारिका समुदायाचे अभिनंदन करून डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, “आरोग्य सेवा क्षेत्रात परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात तसेच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा असतात.दिवस असो वा रात्र, चेहऱ्यावर कोणतीही नाराजी न दर्शवता रुग्णांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या परिचारिका या नायक आहेत. अथकपणे रुग्णांच्या सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या परिचारिका आरोग्य क्षेत्राचा आधारस्तंभ  आहेत.”

कोविड महामारीच्या काळात परिचारिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानण्यासाठी शब्द अपुरे आहेत असे सांगत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी कोविड महामारीमध्ये परिचर्या क्षेत्राच्या  उल्लेखनीय योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.  या महान पेशाबद्दल  कृतज्ञता आणि आदराची भावना त्यांनी व्यक्त केली. परिचर्या  हा सध्या आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठा व्यावसायिक गट आहे, यामध्ये  अंदाजे 59% आरोग्य व्यावसायिक आहेत आणि संपर्काचा पहिला बिंदू म्हणून ते कार्यरत असल्यामुळे  आरोग्य सेवा वितरण प्रणालीमध्ये त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची बनते.असे त्या म्हणाल्या.  “एक बळकट परिचर्या  क्षेत्र हा  भक्कम आरोग्य सेवा क्षेत्राचा एक अत्यावश्यक भाग आहे. परिचारिका हा रुग्णालयांचा पाया आहे. परिचारिका म्हणजे रुग्णाची काळजी घेणारे मन आणि आत्मा आहेत.   वैयक्तिक आणि समुदायाच्या आरोग्यामध्ये  परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात.परिचर्या क्षेत्रात गुंतवणूक केल्याने सुधारित आरोग्य सेवा आणि रोग प्रतिबंधाच्या माध्यमातून वैश्विक आरोग्य व्याप्तीची  आमची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होईल”,असे त्यांनी सांगितले.
 
परिचारिका  क्षेत्रासाठीचे  सरकारचे उपक्रम अधोरेखित करताना, परिचारिकांच्या थेट नोंदणीसाठी भारतीय परिचर्या परिषद आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘परिचारिका नोंदणी आणि मार्गनिरीक्षण प्रणाली’ या तंत्रज्ञान मंचाबद्दल केंद्रीय राज्यमंत्र्यांनी माहिती दिली. भारतीय परिचारिका थेट नोंदणी  ही एक ऑनलाइन नोंदणी प्रणाली आहे जी  सध्या रुग्णसेवा देत असलेल्या  परिचारिकांची नवीनतम माहिती प्रदान करते,यामुळे भारतातील परिचर्या व्यावसायिकांसाठी उत्तम मनुष्यबळ नियोजन आणि धोरण तयार करण्यात सरकारला मदत होणार आहे. या व्यतिरिक्त, भारतीय परिचर्या परिषदेने  (आयएनसी  ) परिचर्या अध्यापकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी दिल्ली एनसीआरमध्ये कौशल्य सिम्युलेशन प्रयोगशाळेची स्थापना केली आहे. भारतीय परिचर्या परिषदेने क्रिटिकल केअर रेसिडेन्सी प्रोग्राममधील परिचारिका व्यवसायी  विकसित करण्यात आले  आहेत. त्याचप्रमाणे  जेरियाट्रिक आणि मानसोपचार परिचर्येमधील  विशेष अभ्यासक्रम सुरु होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली.

कान महोत्सवात‘गोदावरी’या मराठी चित्रपटासह हिंदी, तमिळ, मल्याळम आणि मिशिंग भाषेतील चित्रपट केंद्रस्थानी

नवी दिल्ली 12 मे 2022

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 75 व्या कान चित्रपट महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर केली. सुप्रसिध्द अभिनेते आर माधवन यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि त्यांची भूमिका असणाऱ्या रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट या चित्रपटाचा जागतिक पातळीवरील प्रिमियर हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. हा चित्रपट पलाइस के या चित्रपटगृहात सदर होणार असून या महोत्सवात सादर होणारे इतर चित्रपट ऑलिम्पिया चित्रपट गृहात प्रदर्शित केले जातील.

रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट हा आर. माधवन निर्मित आणि दिग्दर्शित चित्रपट हिंदी, इंग्लिश आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिध्द सुपरस्टार आणि बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान याने एका टी.व्ही. कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीतून नम्बी नारायणन याची जीवन कथा आपल्यासमोर उलगडत जाते. त्याची बुद्धीमत्ता आणि त्याने घेतलेला  ध्यास यांच्यामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण होतात आणि त्या संघर्षातून तो आधुनिक नायक म्हणून कसा घडतो याची कथा या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. आपल्या समाजातील निरागस आणि दुर्बल व्यक्तींसाठी आपण सत्तेच्या वर्चस्वाला विरोध करण्याच्या उद्देशाने एकत्र का येत नाही असा प्रश्न हा चित्रपट प्रेक्षकांना विचारतो.

या कान महोत्सवात दिग्दर्शक निखील महाजन यांचा गोदावरी हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे

गोदावरी या चित्रपटातील कथा महाराष्ट्रातील गोदावरी नदीकाठच्या शहरात राहणाऱ्या निशिकांत देशमुख या व्यक्तीची आहे. निशी आणि त्याचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून घरभाडे घेत असतात.जुन्या शहराच्या एका भागात त्यांचा मोठा जमीन जुमला असतो. त्याचे आजोबा नारोपंत यांना स्मृतिभ्रंश झालेला  आहे तर त्याचे वडील नीलकंठ यांना  विस्मृतीचा छंद आहे. जुन्या शहरातील जीवनपद्धती आणि स्वतःच्या जीवनाच्या व्यर्थतेवर तो चिडतो आणि त्याचा राग भाडेकरू आणि शहराची परिस्थिती यावर काढत राहतो. बायको-मुलीला स्वतःच्या पालकांसोबत जुन्या वाड्यात सोडून आलेला निशी भाडे गोळा करतो आणि नदीपासून दूर असलेल्या त्याच्या छोट्या घरात राहून नदीवर आणि त्यासोबत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर चिडत राहतो.

मात्र, जीवन आणि मृत्यू हे नेहमीच योगायोगाने होतात, ते परस्परांशी जोडलेले असतात आणि ज्या शहरात एखाद्याचा मृत्यू हे अनेकांच्या जीवनाचे साधन असते तिथे हे एकत्रीकरण अधिकच स्पष्टपणे जाणवते याचा साक्षात्कार नायकाला होण्याची गोष्ट म्हणजे चित्रपट.

या दोन चित्रपटांसह अल्फा,बीटा,गामा हा शंकर श्रीकुमार दिग्दर्शित हिंदी चित्रपट, विश्वजित बोरा यांचा मिशिंग भाषेतील बुम्बा राईड हा चित्रपट, अचल मिश्रा यांचा धुईन हा हिंदी आणि मराठी भाषेत सादर होणारा चित्रपट तसेच जयराज दिग्दर्शित ट्री फुल ऑफ पॅरेट्स हा मल्याळम भाषेतील चित्रपट याचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे.

रेड कार्पेट वरील मान्यवरांमध्ये ए.आर.रहमान, शेखर कपूर, अक्षय कुमार, रिकी केज यांचा समावेश

नवी दिल्‍ली-

पंचाहत्तराव्या कान महोत्सवात ‘रेड कार्पेट इव्हेंट’ म्हणजे भारतीय प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यावेळी 17 मे 2022 रोजी कान चित्रपट महोत्सव 2022 च्या उद्घाटनाच्या वेळी ‘रेड कार्पेट’ वर भारतभरच्या चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची पावले पडणार आहेत. हे सर्व प्रतिष्ठित कलाकार भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे सदस्य म्हणून तेथे उपस्थित असणार आहेत. 

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वात हे प्रतिनिधी मंडळ भारतातून कान येथे जाणार आहे. या प्रतिष्ठित व्यक्तींच्या सूचीमध्ये भारताच्या संगीत क्षेत्रातील ठिकठिकाणच्या महत्त्वाच्या कलाकारांचा समावेश आहे. सदर प्रतिनिधिमंडळात पुढील प्रसिद्ध कलाकारांचा अंतर्भाव असेल-

  1. अक्षय कुमार (अभिनेता आणि निर्माता, बॉलिवूड)
  2. ए.आर.रहमान (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगीतकार)
  3. मामे खान (लोकसंगीताचे संगीतकार, गायक)
  4. नवाजुद्दीन सिद्दीकी (अभिनेता, बॉलिवूड)
  5. नयनतारा (अभिनेत्री, मल्याळम, तामिळ)
  6. पूजा हेगडे (अभिनेत्री, हिंदी, तेलगू)
  7. प्रसून जोशी (अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ)
  8. आर.माधवन (अभिनेता आणि निर्माता)- ‘रॉकेटरी’चा कान येथे वर्ल्ड प्रीमिअर (जगातील पहिला खेळ)
  9. रिकी केज (संगीतकार)
  10. शेखर कपूर (चित्रपट निर्माते/दिगदर्शक)
  11. तमन्ना भाटिया (अभिनेत्री, हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपट)
  12. वाणी त्रिपाठी (अभिनेत्री)

विविधतेने नटलेले भारताचे लोकजीवन, संस्कृती, वारसा आणि अनेक घडामोडी हे सर्व भारतीय चित्रपटांच्या माध्यमातून मांडून संपन्न भारतीयत्वाचा गंध जगापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश यावर्षी ठेवण्यात आला आहे. देशाची विभिन्न बलस्थाने आणि भारतीयत्वाचे विभिन्न आयाम या सर्वांना प्रतिनिधित्व मिळावे या हेतूने देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या कलाकारांचा समावेश प्रतिनिधिमंडळात करण्यात आला आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या बावन्नाव्या इफ्फी-म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले होते. उदा-नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम अशा ओटीटी मंचांशी सहयोग, भविष्य घडवू शकणाऱ्या 75 प्रतिभावंतांना हेरून त्यांचा ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ हा उपक्रम आणि ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) चित्रपट महोत्सव. त्याच पद्धतीने यावर्षीच्या कान महोत्सवासाठीही नवीन आणि उत्साहवर्धक उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, यावर्षीच्या महोत्सवात ‘कान फिल्म मार्केट / कान चित्रपेठेत’ अधिकृत सन्माननीय देशाचा मान भारताला देण्यात आला आहे. हा मान एखाद्या देशाला देण्याची ही पहिलीच वेळ असून, भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना हा मान भारताला मिळत आहे. भारत आणि फ्रान्सच्या मुत्सद्दी संबंधांचेही हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.

‘कान नेक्स्ट’मध्येही सन्माननीय देश असण्याचा मान भारताला मिळाला असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पूर्वी घोषित केले होते. या अन्तर्गत 5 नवीन स्टार्टअप उद्योगांना दृक् – श्राव्य उद्योगक्षेत्रात काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

“एकता सायकल स्वारी” मोफत सायकल वापर उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे- अरण्येश्वर येथील एकता मंडळाच्या वतीने स्थानिक नागरिकांच्या हितार्थ “एकता सायकल स्वारी” ह्या मोफत सायकल वापर सामाजिक उपक्रमाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

“एकता सायकल स्वारी” हा अनोखा व लोकपयोगी मोफत सायकल वापराचा सामाजिक उपक्रम पार पडला. या उपक्रमाचे लोकार्पण स्थानिक कार्यक्षम नगरसेविका सौ. अश्र्विनी कदम व नितीन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते संपन्न झाला. यावेळी शिरीष शहा व मिलिंद तांबोळी हे ही उपस्थित होते आणि हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी या दोघांचे विशेष सहकार्य लाभले.

उदघाटन प्रसंगी बोलताना नितीन कदम यांनी मंडळाच्या आजवरच्या कार्याचे कौतुक केले. सर्वांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करताना मंडळातील नागरिकांनी आवर्जून सायकलचा वापर करावा आणि एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या या संकल्पनेचे समाजातील इतर घटकांनी नक्की अनुकरण करावे असे आव्हान केले. विशेषतः प्रत्येक सोसायटीच्या सभासदांनी आपल्या नागरिकांसाठी १ ते २ सायकल सोसायटीत उपलब्ध करून देऊन आसपासच्या छोट्या छोट्या कामांकरिता सायकलचा वापर सुरू करावा असा विचार मांडला.तसेच मंडळाच्या वतीने मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक व सल्लागार दादा बोडके यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी दादांतर्फे सर्वांसाठी अल्पोपहार आयोजित करण्यात आला होता.

हा उपक्रम सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या दैनंदिन जीवनात महागाई झपाट्याने वाढत असताना प्रत्येकजण इंधन वाहनांना प्राधान्य देत आहे. त्यातच कोरोना महामारी नंतर पेट्रोल, डिझेल व सर्वच इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा विचार करत एकता मंडळाच्या वतीने ‘करूयात सायकलचा वापर, होईल पर्यावरण संरक्षणाचा जागर…!’ ह्या ब्रीदवाक्याची घोषणा करत स्थानिक नागरिकांच्या हितार्थ एक अनोखा व लोकपयोगी असा “एकता सायकल स्वारी” हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एक काळ होता की, पुणे शहराला सायकलचे शहर म्हणून ओळखले जायचे पण आजच्या घडीला हे चित्र अदृश्य झाल्यासारखे दिसते. यामुळे एकता कार्यकर्त्यांच्या प्रभावी संकल्पनेतून नागरिकांसाठी मोफत सायकल्स उपलब्ध करून देऊन सर्वांना पर्यावरण संरक्षण, इंधन बचत, शारीरिक गुणवत्ता वाढ व इतर अनेक फायदे समजण्यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे. या सामाजिक उपक्रमातून अनेकजण सायकलचा नक्कीच वापर करून या उपक्रमाचे स्वागत करतील असा विश्वास सर्वांना आहे.

सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न

पुणे दि.१२-महिलांच्या संरक्षणासाठी हुंडा निर्मुलन, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, देवदासी प्रथा निर्मुलन, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) यासारख्या सामाजिक कायद्याची अणि महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा सरकारी वकील ॲड.एन.डी.पाटील, तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

यावेळी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत संरक्षण अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यासेाबतच हुंडा प्रतिबंधक कायदा, महिला व आर्थिक विकास महामंडळातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना, महिला समुपदेशन केंद्र आदींचा आढावा घेण्यात आला. पिडित महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी सर्व संबंधितांनी संवेदनशिलतेने आणि तत्परतेने कार्यवाही करावी, असे श्री.तेली यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यात दोन शासकीय महिला आधारगृह असून त्यांना संरक्षणगृह म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत १३ तालुक्यांसाठी १३ संरक्षण अधिकारी आणि पुणे शहरासाठी एक जिल्हा संरक्षण अधिकारी कार्यरत आहे. उज्ज्वला योजना आणि स्वाधार योजनेअंतर्गत प्रत्येकी एक संस्था कार्यरत आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात ४ समुपदेशन केंद्र कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाचे प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 12 : कोरोना कालावधीत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग अतिशय चांगले काम केले. मात्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याची आवश्यकता असून त्यादिशेने राज्य शासन काम करीत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी केले.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्यावतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मार्गदर्शन करताना श्री. पवार बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भास्कर जाधव, महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, संचालक डॉ. साधना तायडे, हर्षवर्धन देशमुख, डॉ. समीर दलवाई आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही आरोग्य विभागाच्या व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. अलिकडेच पाच ते सहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नियोजन केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
कोरोना कालावधीत आपण स्वच्छतेच्या बाबतीत चांगल्या सवयी लावून घेतलेल्या आहेत. या सवयी कायम ठेवायला हव्यात. आरोग्याच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता आहे, असेही श्री पवार यांनी सांगितले.

तत्पूर्वी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले. महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेत कालसुसंगत बदल करण्यासाठी सूचना द्याव्यात. या योजनेत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश करता येईल का, याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी खासदार सुप्रिया सुळे, डॉ. साधना तायडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.