Home Blog Page 1999

महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

नवी दिल्ली , १२ : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख ३१ मे आहे.

भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल,डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२२ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी १० जून २०२२ ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम-या निवडणुकांसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १ जून रोजी अर्जांची छाननी होणार. ३ जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. १३ जून २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

घरगुती गॅस दरवाढ व महागाई विरोधात शिवसेनेचे शहरभरात 58 ठिकाणी उद्या आंदोलन

पुणे- उद्या शुक्रवार दि १३ मे 2022 रोजी सायंकाळी ४.०० वा घरगुती गॅस दरवाढ व महागाई विरोधात शिवसेनेने तब्बल 58 ठिकाणी आंदोलन करण्याचे घोषित केले आहे . शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले कि ,”शिवसेनेच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात प्रत्येक प्राभागानुसार केंद्र सरकार विरोधात वाढलेल्या महागाईच्या भस्मासुरा विरोधात ५८ प्रभागाच्या ५८ ठिकाणी आंदोलन घेण्यात येणार आहे. प्रभागातील वाडी वस्तीच्या आणि मोक्याच्या 58 ठिकाणी हि आंदोलन घेण्यात येणार आहेत. सध्या घरगुती गॅस, डिझेल, पेट्रोल, CNG गॅसच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यांचे जीवनमान खालावले आहे. इंधनांच्या सततच्या दरवाढीमुळे प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. ह्यामुळे सामान्य माणसाचे दैनंदिन जनजीवन संपूर्ण पणे कोलमडून अनेक समस्यांना तोंड देऊन आयुष्य जगावे लागत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा रोष आणि त्यांच्या मनातील असंतोष आता जाहीरपणे जाणवायला लागला आहे, त्यासाठी ह्या आंदोलनाद्वारे जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारच्या विरोधातील राग शिवसेना केंद्रापर्यंत पोहोचवणार आहे.

दळवी हॉस्पिटलमध्ये तातडीच्या प्रसूती ऑपरेशन ची सुविधा द्या!

महिलांसाठीच्या आरोग्य सुविधा पुरवा, पुरेसा स्टाफ नेमा!: आप ची मागणी
 
पुणे- दळवी हॉस्पिटलमध्ये तातडीच्या प्रसूती ऑपरेशन ची सुविधा द्या! महिलांसाठीच्या आरोग्य सुविधा पुरवा, पुरेसा स्टाफ नेमा! अशा मागण्यांंसाठी आम आदमी पार्टीच्या मुकुंद किर्दत यांच्या उपस्थितीत महिलांनी आंदोलन केले व स्मरणपत्र दिले. यावेळेसएशा डोंगरे, काजल दातखिळे, वैशाली डोंगरे, सतीश यादव, मंगल चौधरी, पार्वती परदेशी, पूजा चव्हाण, शंकर थोरात, अनिता श्रीराम, सरस्वती जाधव,लिलाबाई दगडे, तेजस डोंगरे, रूपा माने, झुंबर हवाले, राहुल म्हस्के, विकास चव्हाण, दिनेश चौधरी, विनोद दातखिळे, अभिमान विटकर, ईश्वर तुजारे,माधुरी रणसुरे,आकाश मुनियान, बाबा गोलंदाज, ललिता गायकवाड, संतोष पाटोळे , तुकाराम शिंदे, अभिमान विटकर, शारुक शेख, शालन जोगदंड, आशा गायकवाड, अनुसया शिंदे, अंजना पवार, विकास लोंढे, वैशाली पवार, धर्मेंद्र डोंगरे, संदेश दिवेकर, आदी उपस्थित होते.

यावेळी किर्दत यांनी सांगितले कि,’जनवाडी, गोखलेनगर, मॉडर्न कॉलनी  ते बोपोडी , इंदिरा वसाहत, खैरवाडी, पाटील इस्टेट या भागातील भाभा हॉस्पिटल अजून पूर्ण नाही, त्यामुळे एकमेव दळवी हॉस्पिटलमध्ये प्रसूती सुविधा आहे, परंतु तातडीची इमर्जन्सी सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे महिलांना तातडीने दुसरे हॉस्पिटल शोधावे लागते. ससून मध्ये महिला तेजायला कचरतात. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे खाजगी रुग्णालयात जाणे भाग पडते.त्यामुळे या मोठया परिसरात किमान दळवी हॉस्पिटलमध्ये या तातडीच्या सुविधा सुरू करा अशी या वस्त्यामधील महिलांची मागणी आहे.
तसेच दळवी हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा मुख्य डॉकटर उपलब्ध नसतात.नर्सेस नसतात त्यामुळे सतत नातेवाईकांशी वादाचे प्रसंग घडतात. आपचे शंकर थोरात यांना माहिती अधिकारांतर्गत आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दळवी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा आवश्यक असणारा स्टाफ उपलब्ध नाही. मिळालेल्या माहितीनुसार ७ डॉकटरची गरज असताना केवळ ४ डॉकटर आहेत तर ७ नर्सेस ची गरज आहे.अजून ५ आया असणे आवश्यक आहे. बाह्य रुग्ण विभागात अटेंडन्टच नाही. तसेच अनेक उपकरणांची मागणी प्रलंबित आहे.असेही मुकुंद किर्दत यांनी सांगितले .
 

रस्त्याच्या खोदकामात तब्बल ३५ वेळा वीज वाहिन्या तोडल्या ; कात्रज, आंबेगावच्या ४५ हजार ग्राहकांना खंडीत वीजपुरवठा

वीजवाहिन्या स्थलांतरीत करण्यापूर्वीच राष्ट्रीय महामार्गासाठी खोदकाम सुरु

पुणे, दि१२ मे २०२२: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाच्या वतीने कात्रज चौक ते नवले ब्रिज दरम्यान राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. तथापि गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध ठिकाणी झालेल्या खोदकामामध्ये तब्बल ३५ वेळा महावितरणच्या वीजवाहिन्या तोडलेल्या आहेत. त्यामुळे कात्रज, आंबेगाव, संतोषनगर, दत्तनगर, जांभूळवाडी, गुजरवाडी, मांगडेवाडी, भारती विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे ४५ हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत माहिती अशी की, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाकडून (नॅशनल हायवेज अॅथोरिटी ऑफ इंडिया) गेल्या दीड वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाचे तसेच कात्रज चौकाच्या रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम सुरु होण्यापूर्वी महावितरणकडून रस्त्यालगतच्या भूमिगत वीजवाहिन्या व संबंधित यंत्रणा स्थलांतरीत करण्याबाबत जुलै २०२० मध्ये अंदाजपत्रक मंजूर करून देण्यात आले आहे. हे काम नियमानुसार प्राधीकरणाकडून करण्यात येत आहे. मात्र प्राधीकरणाकडून वीजयंत्रणा स्थलांतरीत करण्यापूर्वीच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले. तर अंदाजपत्रकानुसार वीजयंत्रणा स्थलांतरीत करण्याचे काम सध्या संथगतीने सुरु आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या भूमिगत वीजवाहिन्या वारंवार जेसीबीच्या खोदकामात तोडल्या जात आहेत. आठवड्यातून असे तीन ते चार वेळा प्रकार घडत आहेत.

कात्रज, आंबेगाव, संतोषनगर, दत्तनगर, जांभूळवाडी, गुजरवाडी, मांगडेवाडी, भारती विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे ४५ हजार वीजग्राहकांना महावितरणच्या २२/२२ केव्ही अमित उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र खोदकामात तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे विविध भागातील नागरिकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणासाठी जेसीबीने सुरु असलेल्या खोदकामात गेल्या सहा महिन्यांमध्ये २५ वेळा भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकारांमध्ये विविध परिसरात गेल्या ६ महिन्यांत एकूण सुमारे ४७ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. यासोबतच प्राधीकरणाकडून सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज लाईन) स्थलांतरीत करण्यासाठी रस्त्यालगत खोदकाम सुरु आहे. या खोदकामात देखील आतापर्यंत १० वेळा भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत तर विविध ठिकाणी एकूण सुमारे ४० तास वीजपुरवठा खंडित राहिला आहे.

महावितरणकडून वीजयंत्रणा वेगाने स्थलांतरीत करण्यासाठी प्राधीकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा विनंती करण्यात आली आहे. मात्र या कामास अद्याप गती आलेली नाही. अनेकदा सायंकाळी किंवा रात्रीच्या कालावधीत खोदकाम करून वीजवाहिन्या तोडल्या जात आहेत. तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे पर्यायी व्यवस्थेतून त्वरीत वीजपुरवठा सुरू करणे व वाहिन्यांची दुरुस्ती करणे यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस मोठी धावपळ होत आहे. सोबतच वीजग्राहकांचा नाहक रोष सहन तसेच यंत्रणेच्या दुरुस्तीचा आर्थिक भार, वीजविक्रीचे नुकसान महावितरणला सहन करावा लागत आहे.

साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे विशेष साहित्य संमेलन २०२२ पुणे ची तयारी अंतिम टप्प्यात

संमेलनाच्या पूर्वसंध्येला महात्मा फुले ते संमेलन स्थळापर्यंत (सावित्रीबाई फुले स्मारक)

ग्रंथदिंडीने होणार संमेलनाची सुरूवात –

पुणे . : साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित पुणे येथे होणाऱ्या साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे विशेष साहित्य संमेलन २०२२ ची तयारी अंतिम टप्प्यात झाली असून संमेलन अतिशय मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज संमेलनाच्या लोगोचे अनावरण पत्रकार संघ येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासनचे अध्यक्ष विजय बापु डाकले व स्वागताध्यक्ष अविनाश बागवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष हनुमंत साठे, साहित्य परिषदेचे संस्थापक सचिन बगाडे, निमंत्रक अनिल हातागळे ,बाळासाहेब भांडे ,विनोद शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. या संमेलन स्थळास राजर्षी छत्रपती शाहू महाराज संमेलन नगरी असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच मुख्य विचारपीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच तर प्रवेशद्वारास आनंदराव बागवे व प्रवेशद्वार क्र. २ यास ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे नाव देण्यात व आले आहे. ग्रंथ प्रदर्शनास मुक्ता साळवे ग्रंथ दालन असे नाव देण्यात आले आहे. एकुणच संपूर्ण परिसरास महापुरूषांचे व साहित्यिकांच्या नावांमुळे संपूर्ण संमेलन स्थळ हे विशेष आकर्षण ठरणार आहे. संमेलनच्या पूर्वसंध्येला शनिवार, दि. १४ मे २०२२ रोजी सायं. ६ वा. महात्मा फुले वाडा ते संमेलन स्थळ (सावित्रीबाई फुले स्मारक) ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. य ग्रंथदिंडीमध्ये ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष विठ्ठल भंडारे, रमेश बागवे ( मातंग एकता आंदोलन संस्थापक), विजय ब डाकले यासह पुणे शहरातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व सामाजिक व राजकीय क्षेत्राती विविध मान्यवर सहभागी होणार आहेत

निवडणुकीत खोटी आश्वासने ; तर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा -डॉ. विश्वंभर चौधरी

नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे करणार २ मागण्यांसाठी पाठपुरावा

पुणे- निवडणुकीत खोटी आश्वासने दिली,किंवा पूर्ण केली नाहीत तर नागरिकांना फसवणुकीचा गुन्हा दाखल करता यावा या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे जाहीरनामे,वचननामे यासाठी विशेष कायद्यांतर्गत तरतुदीचा अंतर्भाव करावा अशा मागणी सह २ मागण्यांसाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी यांनी पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे.त्यांच्या या निर्धारामुळे,खरेच असे झाले तर मग कोर्टातच लोक विचारतील ‘पेट्रोल के दाम कम हुये कि नही….?अशा प्रकारच्या चर्चेला आता तोंड फुटणार आहे. आणि एकूणच कर किती असावा यावरही मंथन होऊ शकणार आहे.

विश्वंभर चौधरी यांनी प्रत्यक्षात असे म्हटले आहे कि, राजीव कुमार नावाचे अधिकारी भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून १५ मे पासून पदभार घेत आहेत. त्यांच्याकडे लवकरच या दोन मागण्यांचा पाठपुरावा करणार आहे.त्या पुढील प्रमाणे.

१. IAS आणि IPS च्या धर्तीवर IES अर्थात Indian Election Services ही श्रेणी सुरू करावी. IES अधिकारी फक्त आणि फक्त केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगांमध्येच बदलीवर जातील, कोणत्याही सरकारचे नोकर असणार नाहीत.

२.राजकीय पक्षांचे जाहीरनामे, वचननामे इत्यादी ग्राहक हक्क संरक्षण कायद्याखाली आणावेत. खोटी आश्वासनं दिलेल्या राजकीय पक्षावर,किंवा उमेदवारांवर लोक फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकले पाहिजेत.

भाजपनेही नाना पटोले यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणायचे का ? अजित पवारांचा प्रत्युत्तरार्थ सवाल

मुंबई-भंडारा, गोंदीया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पाठीत खंजीर खुपसला. याचा जाब मी त्यांना नक्की विचारणार, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यालाही अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. नाना पटोले यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. त्यांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही, असे अजित पवार म्हणाले. तसेच, पाठीत खंजीर खुपसण्यासारखे वक्तव्य आम्ही करत नाही. राजकारणाबाबतच बोलायचे तर नाना पटोले पुर्वी भाजपमध्ये होते. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे भाजपनेही नाना पटोले यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणायचे का?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

ओबीसी आरक्षणाशिवाय तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याविषयी राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात बाजू मांडत आहे. त्यानंतर पालिका निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात बहुमतासाठी तिन्ही पक्षांची आघाडी आवश्यक आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांची आघाडी करायची की नाही, याविषयी जिल्हा, स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील, असे अजित पवार म्हणाले.
ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने विधेयक आणावे
महाराष्ट्रानंतर आता मध्यप्रदेश सरकारलाही आता ओबीसी आरक्षणावरून झटका बसला आहे. त्यामुळे याप्रश्नी पुढे काय करायचे यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यातून काही तरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच, हा आता राष्ट्रव्यापी मुद्दा बनला असल्याने केंद्रानेही या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. केंद्र सरकार ओबीसी आरक्षणावर नवे विधेयकही आणू शकते. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्राकडे हा पर्याय आहे. त्याचीदेखील चाचपणी व्हायला हवी, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात निर्माण होऊ नये
आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील नागरिक बेहाल झाले आहेत. महागाई, जिवनावश्यक वस्तूंचा अपुरा पुरवढा, भडकेले इंधन दर यामुळे संतापलेले नागरिक तेथील खासदारांच्या घरावर, गाडीवर हल्ले करत आहेत. भारतात अशी स्थिती कधीही निर्माण होऊ नये. त्यासाठी केंद्राने लवकरात लवकर वाढत्या महागाईला नियंत्रणात आणावे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. यावेळी अजित पवारांनी वाढत्या महागाईवरून केंद्रावर टीका केली. ते म्हणाले, रोज वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. किमान श्रीलंकेतील स्थिती पाहून तरी देशातील राज्यकर्ते याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा असल्याचे अजित पवार म्हणाले.

आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकार समर्थ
राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. त्यावर राज ठाकरे यांना गृहविभागातर्फे सुरक्षा पुरवली जाईल का? यावर अजित पवार म्हणाले, कोणाला असे धमकीचे पत्र आले असल्यास त्यांनी प्रथम रितसर त्याची तक्रार करावी. त्यानंतर पोलिसांकडून त्यांना सुरक्षा का पुरवली जाणार नाही, असा सवाल करत राज्यातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार समर्थ आहे. गृहमंत्री त्यांना सुरक्षा पुरवण्याबाबत निर्णय घेतील, असे अजित पवार म्हणाले.

मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय
मुंबईत येणाऱ्या उत्तर भारतीयांना व्यवसाय, धंद्यात मदत व्हावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत त्यांच्यासाठी विशेष कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यावर अजित पवार म्हणाले, प्रत्येक राज्य सरकारला आपल्या नागरिकांची काळजी असते. त्यासाठी कोणी काही करत असेल तर त्याला विरोध करण्यासारखे काहीच नाही. उद्या उत्तर प्रदेशातील महाराष्ट्रीयांसाठीदेखील तेथे आम्ही एखादे कार्यालय सुरू करू शकतो, असे अजित पवार म्हणाले.

‘खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली स्वराज्य’ स्थापनेची घोषणा …अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार

पुणे-अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार आणि स्वराज्य नावाची संघटना स्थापन करणार असल्याच्या दोन मोठ्या घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी आज केल्या आहेत. खासदारकीची मुदत संपल्यानंतर आज गुरुवारी पुण्यातील पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की आज मी दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यापैकी पहिला निर्णय राज्यसभ्येच्या संदर्भातील आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिलं तर जुलैमध्ये 6 जागा रिक्त होत आहेत. यापूर्वी 3 जागा भाजप 1 जागा राष्ट्रवादी,1 सेना ,1 काँग्रेस अशी होती. आता समीकरण बदलले आहे. भाजपला दोन, काँग्रेसला 1, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा, उरलेली 1 जागा आहे.

संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत जाणार की भाजपसोबत कायम राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. आज संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका जाहीर केल्याने या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.

खासदारकीची मुदत मंगळवारी संपली –

संभाजीराजे छत्रपती यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवत कोल्हापूरच्या राजकारणात प्रवेश केला होता. मात्र, संभाजीराजेंनी पराभवानंतर राजकारणापासून थोडी अलिप्तता स्वीकारली. यानंतर 2016 मध्ये भाजपने त्यांना थेट राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. पण सहा वर्षात संभाजीराजेंनी या पक्षाच्या व्यासपीठावर जाण्याचे टाळले. राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत मंगळवारी संपली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरु होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावे त्यांचे स्वागत करु, असे जाहीरपणे सांगितले होते. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करु असे म्हटले होते. याशिवाय, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने छत्रपती भाजपमध्ये जातील अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे संभाजीराजेंची पुढील राजकीय दिशा नेमकी काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती .

 मानवी अवयव प्रत्यारोपण: रूबी हॉलचे डॉ. परवेज ग्रँट यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे: किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात पुण्यातील नामांकित रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फसवणूक आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ लाख रुपयांच्या आमिषाने एका महिलेचे किडनी प्रत्यारोपण केल्याचा प्रकार मार्चमध्ये उघड झाला होता. याप्रकरणात राज्य आरोग्य विभागाने रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.या प्रकरणात पैशांसाठी किडनी विकलेल्या महिलेलाही आरोपी करण्यात आले आहे.
व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, उपसंचालक रेबेका जॉन, कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी तसेच डॉ. अभय सद्रे, डॉ. मुफ्त भाटी, डॉ. हिमेश गांधी, सुरेखा जोशी यांच्यासह अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, अण्णा साळुंखे, शंकर पाटील, सुनंदा पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने यांच़्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी फिर्याद दिली आहे.अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला पंधरा लाख रुपयांचे आमिष दाखवून रूबी हॉलमध्ये किडनी प्रत्यारोपण केले. साळुंखे याने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली. १५ लाख रुपये मिळाले नाही म्हणून सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला होता

यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघातात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू

0

यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या या अपघातात मृत पावलेले सर्वजण पुण्याचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वाहनाने ट्रकला धडक दिली.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, पहाटे ५ वाजता जेवर टोलनाक्यापासून ४० किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघातानंतर सर्वांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं तर दोघांवर कैलाश रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असून ६० वर्षाच्या वयोगटातील आहेत. चालकाची झोप लागल्याने हा अपघात झाला असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी सध्या ट्रक जप्त केला आहे.याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. नातेवाईक पोहोचल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले जातील. 

दिखावू ई टॉयलेट बिन कामाचे, जनतेचे पैसे वाया: मुकुंद किर्दत,आप चा आरोप

पुणे- -ई टॉयलेटचा ढोल पिटवून प्रसिद्धी मिळवून लोकांना आधुनिकतेचे आणि स्वच्छतेचे स्वप्ने दाखवून तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीचा अपव्यय करून उधळपट्टी केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे  प्रवक्ते  मुकुंद किर्दत यांनी केला आहे .

या संदर्भात त्यांनी सांगितले कि ,’२०१८ मध्ये अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून २१ सिटचे १५ ई टॉयलेट पुण्यात बसवण्यात आले. त्यासाठी दोन कोटी अठरा लाख खर्च झाले. महिलांच्या सार्वजनिक स्वच्तागृहाची पुण्यात कमतरता आहे. त्यामुळे महिलांना याचा प्रामुख्याने उपयोग होईल असा दावा तेव्हा केला गेला. ही ईटॉयलेट थेट घनकचरा विभागाशी इंटरनेट ने थेट जोडली गेली असल्याचे सांगितले जात होते. अशी अत्याधुनिक यंत्रणा असलेली सुविधा योग्य देखरेख नसेल तर कुचकामी ठरते हे सर्वांनाच माहित आहे. तरीही हि ईटॉयलेट बसवली गेली. परंतु यातील निम्मी टॉयलेट दोन वर्षापूर्वीच बंद पडली होती. आता उर्वरित टॉयलेट कुठे कॉइन बॉक्स बिघडल्याने ,तर कुठे सेन्सर बिघडले, पाणी नाही अश्या कारणामुळे  बंद आहेत. १२ स्क्वेअर फुटाचे टॉयलेट साधारण १८००० रुपयात बांधले जाते व इतर खर्च धरून २५ ते ३० हजारात पूर्ण होऊ शकते पण ही एका सीटची ईटॉयलेट प्रत्येकी १० लाखपेक्षा अधिक रकमेला घेतली गेली. हा खर्च दिखावूपणासाठीच होता. ४ वर्षांनी ही ईटॉयलेट पूर्ण निकामी ठरली आहेत. आता तो पांढरा हत्ती आहे. त्याला चालू ठेवायचे तर अवाच्या सव्वा खर्च देखभाल दुरुस्ती वर होईल. यात कॉइन सिस्टीम असल्याने सामान्य घरातील महिला याचा वापर करायला बीचकतात. आज आम आदमी पार्टीच्या सतीश यादव , शंकर थोरात आदी कार्यकर्त्यांनी काही ई टॉयलेटची पाहणी केली असता , तिथे कचरा टाकलेला , दरवाजे बंद , कॉइन बॉक्स तोडलेले , घाण जमा झालेली आढळून आली. कोरोना काळात याचा फारसा वापरही झालेला नाही तरीही हि स्थिती आहे.  त्यामुळे महानगर पालिका बांधत असलेली टॉयलेट परवडली पण हि नको अशी जनतेची भावना आढळून आली. त्यामुळे ‘जनतेचे सव्वा दोन कोटी अक्षरशः गटाराला मिळाले असून हि स्मार्ट सिटीची च्या अपयशाची स्मारके आहेत’ अशी टीका आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे. याबाबत संबंधित कंपनी व घनकचरा व्यवस्थापन विभाग यांची बैठक असल्याचे समजते. आयुक्तांनी दिखावूपणाच्या खर्चाला आतातरी चाप लावावा व महिलांना स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावीत अशी अपेक्षा आम आदमी पार्टीने व्यक्त केली आहे.
 

मराठा आरक्षण आंदोलन: गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करा, गृहमंत्र्यांचे निर्देश

मुंबई-मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही शासनामार्फत सुरू आहे. संबंधित जिल्हय़ाचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी आढावा घेऊन यासंदर्भातील माहिती तत्काळ सादर करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिले.

मंत्रालयात गृहमंत्री यांच्या दालनात मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गृहमंत्री वळसे-पाटील यांनी मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. कोपर्डीसह अन्य प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱयांना दिल्या.

राज्य निवडणूक आयोगाचे कोर्टात शपथपत्र:पालिका निवडणुका सप्टेंबरमध्ये

0

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ऑक्टोबरमध्ये

मुंबई-महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात आणि जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी ऑक्टोबर महिन्यात उडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यामध्ये नागरी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ग्रामीण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घेतल्या जातील असे नमूद केले आहे.

जून -जुलै दरम्यान निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात या प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी महापालिकांच्या पाठोपाठ मुदत संपलेल्या राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या या प्रतिज्ञापत्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणाची सोडत यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. मात्र ओबीसी आरक्षणाचा एक शब्दही त्यात नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाविनाच या निवडणुका होणार हेसुद्धा स्पष्ट झाले. ४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यासंबंधात आयाेगाने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात ड्रोनद्वारे गावठाणांची मोजणी; जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन

0

नंदुरबार, दि. 11 : राज्य शासनाचा महसूल, ग्रामविकास, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. नंदुरबार तालुक्यातील मालपूर येथील गावठाण जमीन ड्रोनद्वारे मोजणी कामाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख स्वाती लोंढे, गट विकास अधिकारी सुवर्णा पवार, मालपूरचे सरपंच प्रशांत वळवी, पोलिस पाटील गणेश वळवी, मालपूर ग्राम विकास समिती अध्यक्ष काळूसिंग वळवी, विस्तार अधिकारी एन.जी. पाटील, मंडळ अधिकारी जयेश जोशी, तलाठी व्ही.पी. गावित आदी उपस्थित होते.

ड्रोनव्दारे गावठाण जमिनीची मोजणी हा केंद्र सरकारचा महत्वाचा प्रकल्प असून, नंदुरबार तालुक्यातील 157 गावांतील गावठाणाची मोजणी याव्दारे करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक गावात ड्रोन फ्लाय करण्यापूर्वी भूकरमापक व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत प्रत्येक घराचे मिळकत, ग्रामपंचायत मिळकत, सरकारी जागा, रस्ते यांचे चुना टाकून सीमांकन करण्यात येईल.

गावठाण मोजणी काम झाल्यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांना त्याचा लाभ होणार आहे.

ग्रामपंचायतील होणारे लाभ- गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक (Property card) तयार होईल. ग्रामपंचायतीला कर आकारणी बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख नकाशा उपलब्ध होईल.  ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होईल, ग्रामपंचायत मालमत्ता कर निर्धारणपत्र (नमुना क्रमांक 8 नोंदवही) आपोआप तयार होईल. गावठाणातील ग्रामपंचायत मिळकत, शासनाच्या मिळकती, सार्वजनिक मिळकती जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सीमा व क्षेत्र निश्चित होईल. जनतेस माहिती उपलब्ध होईल त्यामुळे  वाद कमी होतील.

नागरिक/ग्रामस्थांना होणारे लाभ-  शासनाच्या मालकीच्या मिळकती संरक्षण होईल. गावातील घरे, रस्ते शासनाच्या /ग्रामपंचायत खुल्या जागा, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्चित होईल. कायदेशीर हक्काचा अधिकार अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल. ग्रामस्थाच्या नागरी हक्काचे संवर्धन होईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेत तरलता येवून गावाची आर्थिक पत उंचावेल. प्रशासकीय नियोजनासाठी गावठान भूमापन नकाशे उपलब्ध होतील. उत्पन्नाचे स्त्रोत निश्चित होतील. गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्काबाबत व हद्दीबाबत निर्माण होणारे वाद कमी होतील.

‘आमने सामने’ नाटकाची ‘सेंच्युरी’

उत्सवी प्रयोगांकडून शतक महोत्सवी प्रयोगाकडे

आमने सामने’  हे विनोदी नाटक रविवार १५ मे ला दुपारी ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे आपला शतक महोत्सवी आनंद सोहळा साजरा करणार आहे. विनोदी अंगानेसुद्धा अनेक महत्त्वाचे विषय मांडता येतात हे दाखवून देणाऱ्या ‘आमने सामने या नाटकातून लग्नसंस्थेवर मार्मिकरित्या भाष्य करण्यात आले आहे. येत्या रविवारी १५ मे ला गडकरी रंगायन मध्ये साजऱ्या होणाऱ्या शतक महोत्सवी प्रयोगाला लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेता कवी जितेंद्र जोशी, आरजे दिलीप, दिग्दर्शक रवी  जाधव, लेखक दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

झी नाटय गौरव, आणि मटा सन्मान सोहळयातसर्वोत्कृष्ट नाटकासहित सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री अशा सर्व पुरस्कारांवर या नाटकाने आपले नाव कोरले आहे. आगामी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांमध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, नेपथ्य आणि प्रकाशयोजना अशी ८ नामांकने या नाटकाने पटकावली आहेत. विशेष म्हणजे नाटकाची आगामी आंतरराष्ट्रीय संमेलनात ही निवड झाली असून यानिमित्ताने ‘आमने सामने नाटकाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील न्यू जर्सी अटलांटिक सिटी येथे होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात (BMM 2022 covention ) तसेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे २२, २३, २४ सप्टेंबर २०२२ रोज़ी होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनातही (AAMS  2022) ‘आमने सामने’ नाटकाची निवड झाली आहे.

‘आमने सामने या नाटकाच्या शतकी महोत्सवी वाटचालीबद्दल आनंद व्यक्त करताना अभिनेते मंगेश कदम यांनी आंतरराष्ट्रीय संमेलनात नाटकाची झालेली निवड आमचा हुरूप वाढवणारी असल्याचे सांगितले. नाटकाला मिळत असलेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहता हे नाटक ५०० प्रयोगांचा सुद्धा टप्पा गाठेल असा विश्वास व्यक्त केला.

मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर यांच्या अभिनयाने रंगलेल्या आमने सामने’ या दोन अंकी नाटकात मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा हा विचार रंजकरीत्या मांडला आहे. दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळत प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे. सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित या नाटकाची निर्मिती ‘नाटकमंडळी’ यांनी केली आहे.

करोनाच्या दोन लाटांशी लढा दिल्यानंतर तणावाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ‘आमने सामने’ नाटकाची ‘हास्याच्या लशीची मात्रा’ प्रत्येकाने नाटयगृहात जाऊन अवश्य अनुभवायला हवी. 

-शरद लोणकर sharadlonkarpune@gmail.com