Home Blog Page 2000

तरुण स्त्रियांनी परिचारिका क्षेत्र निवडावे: परिचारिका संघटनेच्या मार्गदर्शिका आशा जोशी यांचे मत

पुणे : आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा स्मरण दिन जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा होतो. सेवेचा आनंद आणि कमाईचे समाधान हे दोन्ही परिचारिका क्षेत्रात मिळते. त्यामुळे तरुण स्त्रियांनी परिचारिका क्षेत्र निवडावे, असे मत परिचारिका संघटनेच्या मार्गदर्शिका आशा जोशी यांनी व्यक्त केले. 
कोविड काळात निष्ठेने व सेवाभावी वृतीने काम करणाऱ्या परिचारिकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याकरिता आशा जोशी यांनी परिचारिका संघटनेला दिलेल्या पंचवीस हजार रुपये देणगी दिली होती. त्यातून हा सन्मान होणार आहे. 

आशा जोशी म्हणाल्या, संपूर्ण जगभरात  २ लाख प्रशिक्षित परिचारिकांची आरोग्य सेवांमध्ये गरज आहे. परिचारिकांना या सेवेच्या निमित्ताने परदेशी जाण्याच्या सुसंधीही मिळतात. त्यामुळे मोठया संख्येने या क्षेत्रात तरुण महिलांनी यावे. 
आशा जोशी या ससून हॉस्पिटलमधीक निवृत्त अधिपरिचारिका आणि परिचारिका संघटनेच्या मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याला सलाम करीत त्यांच्या देणगीतून सन्मान केला जाणार असल्याचे महाराष्ट्र गन्ह नर्सेस असोसिएशनच्या चिटणीस सुमन टिळेकर यांनी सांगितले. 

लाल मातीतील कुस्ती जीवंत ठेवा महाराष्ट्राचे स्वच्छता व पाणी पुरवठा राज्य मंत्री.संजय बनसोडे 

0


रामेश्वर येथे राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड राज्य स्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धेचे उद्घाटन

लातूर, ११ मे:“पंचमहाभूताच्या संवर्धनासाठी नव पिढीने कार्य करावे. याच पंचमहाभूतातील तत्वाला अनुसरून डॉ. विश्वनाथ कराड लाल मातीतील कुस्तीला जीवंत ठेवण्याचे कार्य करीत आहेत. हे अद्वितीय कार्य असून तो वारसा पुढे चालविण्यास नव पिढीने समोर यावे,” असे आवाहन राज्याचे  स्वच्छता व पाणी पुरवठा  राज्य मंत्री ना. श्री.संजय बनसोडे  यांनी केले.  
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
 अध्यक्षस्थानी विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे, औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेशअप्पा कराड व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय कुमार दास सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी आजगावकर, शिवाजीराव केकाण आणि राहुल काळभोर, संयोजन समितीचे सचिव विलास कथुरे आणि राजेश कराड उपस्थित होते.
या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते पंढरीच्या वाटेवर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
ना. श्री. संजय बनसोडे म्हणाले,“ शरदचंद्र पवारसाहेब सतत सांगतात की राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण  यांनी नवे पर्व सुरू केले. तसेच पर्व प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी सुरू केल्यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जगभरात पोहचले आहे. हळू हळू लोप पावत चाललेल्या  मातीतील कुस्तीला जिवंत ठेवण्याच्या कार्यासाठी ते सतत झटत आहेत.”“पर्यावरणाचा र्‍हास मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यावरण संतुलनासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. जल जीवन योजना अंतर्गत २०२४ पर्यंत केंद्र व राज्य शासनााच्यावतीने प्रत्येक घराघरात नळ देऊन प्रति व्यक्तिला ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचा आमचा मानस आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ या पूर्वी स्पर्धेला हिंद केसरी, ट्रीपल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी या सारख्या भारतातील ११ मल्लांनी उपस्थिती दर्शविली होती.  शुद्ध अंतःकरण व निर्मळ मन असल्यास माणूस तंदुरूस्त राहू शकतो. सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टी व्यक्तिचे मन बदलण्यास वेळ लागू देत नाहीत. माणसाला गर्व नसावा अभिमान असावा. तंदुरुस्त व निरोगी शरीरासाठी लाल मातीतील कुस्तीकडे तरुणांनी वळावे.”
सुधाकर श्रृंगारे म्हणाले,“ राज्यातील जिल्ह्यात आखाडे निर्माण करण्यासाठी केंद्राकडून परीपूर्ण मदत केली जाईल. कुस्ती व कबड्डी हे उत्तम खेळ असून यामाध्यमातून शरीराला व्यायामाची सवय लागते. यामुळे आपल्याला कोणतीही व्याधी होऊ शकत नाही. धावपळीच्या युगात लाल मातीतील हा खेळ मन आणि मतिष्क मजबूत करतो.”
अभिमन्यू पवार म्हणाले,“ पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की जो खेलेंगा वहीं खेलेगा, त्यानुसार आजच्या काळात खेळाला अत्यंत महत्व आले आहे. त्यानुसारच औसा येथे हरीशचंद्र बिरासदार यांच्या नावाने स्टेडियम उभारण्याचे कार्य लवकरच सुरू करणार आहे. ”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ राष्ट्र उभारणीसाठी सुरू केलेली ही स्पर्धा खेळाची संस्कृती जगवितांना दिसत आहे. परंतू येणार्‍या काळात डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नावाने खोखो, व्हॉलिबॉल, कबड्डी, क्रिकेट सारख्या खेळांच्या सप्ताहाचे आयोजन करू. स्पोर्टस मीट या नावाने लातूर जिल्हा संपूर्ण भारतात ओळखला जाईल या दृष्टीने कार्य करू.”
शुभारंभाची कुस्ती प्रसाद शिंदे आणि धैर्यशील शिंदे यांच्यात झाली. त्यामध्ये प्रसाद शिंदे विजयी झाला. तसेच, प्रशांत जाधव आणि श्रीवर्धन लोमटे यांच्यातही कुस्ती झाली. यामध्ये श्रीवर्धन लोमटे विजयी झाला.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यासहित कुस्ती खेळाडूंची श्रीप्रभू रामचंद्र मंदिरा पासून संत श्री गोपाळबूवा मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या स्पर्धेत राज्यभरातील मल्लांनी भाग घेतला आहे. उद्घाटन सोहळ्यास रामेश्वर आणि पंचक्रोशितील क्रिडाप्रेमी सहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.  विलास कथुरे यांनी प्रास्ताविक केले.
बाबा निम्हण यांनी कुस्तीचे संचालन केले.
प्रा.गोविंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. पी.जी.धनवे यांनी आभार मानले.

पाणीपुरवठ्याची जबाबदारी झटकणे चांगले नव्हे; आबा बागुलांचा प्रशासनाला इशारा

पुणे- समाविष्ट २३ गावांसाठी  पाणीपुरवठ्याची जबाबदारी विकसकाची नव्हे, तर पुणे महानगरपालिकेचीच असून येनकेन मार्गे जबाबदारी झटकण्याचे काम प्रशासनाने करू नये अथवा या अनुषंगाने वेळ काढून राजकारण करू नये असा स्पष्ट इशारा महापालिकेतील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे शहरातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी दिला आहे.

या संदर्भात आबा बागुल यांनी म्हटले आहे कि,’महापालिकेत समाविष्ट   २३ गावांमधील नव्या सोसायटी/ सदनिका धारकांना बांधकाम व्यावसायिक  हेच सध्या पाणीपुरवठा करतील असे प्रतिज्ञापत्र पुणे महानगरपालिकेने  उच्च न्यायालयात सादर केले आहे. मात्र ते पूर्णतः चुकीचे आहे. वास्तविक पाणीपुरवठा करणे ही  जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी लिहुन दिले,या नावाखाली जबाबदारी झटकून मोकळे होता येणार नाही. एकप्रकारे  पुणे महानगरपालिका   पाणी प्रश्नात २३ गावांमधील नागरिकांची  शुद्ध फसवणूक करीत आहे. पाणी, ड्रेनेज या मूलभूत सुविधा देणे ही जबाबदारी  एमआरटीपी ऍक्टनुसार  पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए यांचीच आहे. बांधकाम व्यावसायिक /विकसक हे बिल्डिंग बांधतात आणि निघून जातात. मात्र जे प्रत्यक्ष राहावयास असतात,त्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आणि पैसे मोजून पाणी घ्यावे लागते आणि ते मिळतही नाही.  यात नागरिकच भरडले जातात. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी लिहून दिले,हे कारण पुढे रेटून जबाबदारी झटकता येत नाही. प्रशासनाने बांधकाम परवानगी, प्लॅन प्रक्रियेत आम्ही अटी टाकल्या असे म्हणणे गैर आहे. वास्तविक बांधकाम परवानगी, प्लॅन मंजूर करताना अटी फक्त बांधकामाच्या टाकता येतात.मोजणी असो ,बांधकाम यापुरते ते सीमित आहे.याबाबत न्यायालयानेही पाणी, ड्रेनेज या मूलभूत सुविधा महापालिकेने द्याव्यात असे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे    पीएमआरडीए अथवा महापालिकेने बांधकाम प्लॅन मंजूर  केले तरी ज्या हद्दीत बांधकामे आहे,त्यांना पाणी देणे हे त्या प्राधिकरणाचे कर्तव्य आहे.त्यामुळे जबाबदारी झटकण्यासाठी  पुणे महानगरपालिकेने चुकीची माहिती प्रसिद्ध करून   नागरिकांना वेठीस धरू नये.नागरिकांच्या हितालाच  प्राधान्य दिले पाहिजे.जर महापालिका पाणी पुरवठा करू शकत नाही, मग बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कसा काय देते ? हा प्रश्नही दुर्लक्ष करून चालणार नाही.त्यामुळे   समाविष्ट २३ गावामंधील नागरिकांना महापालिकेनेच  पाणीपुरवठा करावा, मग तो समान पाणीपुरवठा योजनेतून किंवा अन्य स्रोतातून कसा करायचा याची   जबाबदारी महापालिकेचीच आहे आणि महापालिकेकडूनच  समाविष्ट २३ गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेच  पाहिजे ही काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आहे. असेही बागुल यांनी म्हटले आहे.

कर नाही भरला तर… 

जरी समाविष्ट   २३ गावांमधील बांधकाम शुल्क पीएमआरडीने घेतले असले तरी आपण राज्यशासनाकडे  मागणी केलेली आहे. त्यामुळे पालिका हद्दीत जी जी गावे समाविष्ट आहेत,त्यांना महापालिकेने पाणीपुरवठा करावा. नाहीतर  या गावांमधील नागरिकांनी जर कोणतेही शुल्क अथवा  कर भरला नाही तर त्यांना दोषी धरू नये.   

राष्ट्रवादीचे आंदोलन :महागाई कमी करण्यासाठी श्री.हनुमानाची आरती

पुणे- येथील शनिपार चौक येथे वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्री.हनुमानाची आरती करून महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाई ची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘ कमळाबाई ‘ ची आरती करण्यात आली.
देशातील सर्व प्रश्न सुटले असून, हनुमानाची आरती केल्याने उर्वरित प्रश्न देखील सुटणार आहेत असा संदेश गेल्या काही दिवसांत भाजप,मनसे,नरेंद्र मोदी , राज ठाकरे देत असून त्या अनुषंगाने सर्वसामान्य पुणेकरांना हनुमान प्रसन्न व्हावे व महागाई कमी व्हावी यासाठी आज शनिपार येथे हनुमानास साकडे घालण्यात आल्याने आता येत्या काळात सिलेंडर १ हजार रुपयांवरून ३०० रुपये , पेट्रोल १२५ रुपयांवरून ५० रुपये व्हावा अशी आम्हाला अपेक्षा आहे.

जनतेचा विचार न करता केवळ आपले निर्णय त्यांच्यावर लादणारे सरकार म्हणून मोदी सरकारचा नावलौकिक आहे. वेग -वेगळे कायदे असतील, नोटबंदी जी.एस.टी लागू करणे, सरकारी कंपन्या – बँका विकणे,जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवणे असे अनेक निर्णय मोदी सरकारने या देशाला दिले आणि या निर्णयामुळे हा देश होरपळत आहे.
वेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, ” मला आजही आठ वर्षांपूर्वी स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांचे एक वाक्य आठवते ” आकडों से पेट नही भरता साहब धान से भरता है” आज केंद्रातील भाजप सरकारने किमान स्व.सुषमा स्वराज यांच्या या वक्तव्याची जाण ठेवत देशातील महागाई कमी करावी नागरिकांना दिलासा द्यावा.
गेल्या दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरमध्ये तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली. एकाच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत पाच टक्क्यांनी झालेली ही वाढ खरोखर अन्यायकारक अशीच आहे .आज जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी, पी.एन.जी,घरगुती गॅस,व्यवसायिक गॅस, खाद्यतेल अश्या सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत”.

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे,विशाल तांबे,निलेश निकम, प्रदीप गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख,महिला अध्यक्षा सौ.मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर , कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे, सौ.रुपाली ठोंबरे पाटील आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्राचा स्थापना दिवस साजरा

पुणे-‘नको व्हीलचेयर नको कुबड्या’, हे बोधवाक्य असलेल्या पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्राची सात दशकांची अभिमानास्पद वाटचाल आहे, 1944 मध्ये स्थापन झाल्यापासून, हे केंद्र भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांना, जे चकमकींत आपले हात – पाय गमावतात त्यांना कृत्रिम हात – पाय, उपकरणे आणि पुनर्वसन सुश्रुषा देण्यात सक्रीय आहे. या केंद्रात अपंगांसाठी कृत्रिम अवयव आणि ऑर्थोटिक असे पुनर्वासनाधारित सर्वंकष उपचार देण्यात येतात.

स्थापना झाल्यापासून इथे 60,000 पेक्षा जास्त रुग्णांवर उचार करण्यात आले आहेत, असा हे केंद्र अभिमानाने दावा करू शकते. या केंद्रात शारीरिक अपंगत्व आलेल्या रुग्णांना सर्वोत्तम कृत्रिम अवयव आणि ऑर्थोटिक उपचार देण्यात येतात, जेणेकरून ‘प्रत्येक अपंगाचे स्वतःच्या पायावर चालण्याचे स्वप्न खरे करण्याचे’ ध्येय गाठता येईल.

या केंद्राच्या ग्राहकांमध्ये सशस्त्र सैन्य दलांचे कर्मचारी, सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, आसाम रायफल्स, इंडो तिबेटीयन सीमा पोलीस यासारख्या निमलष्करी दलातील आणि नागरी रुग्णांना देखील आवश्यक ते कृत्रिम आणि ऑर्थोटिक उपचार पुरविण्यात येतात, मात्र त्यासाठी शुल्क आकारले जाते. नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश वगैरे शेजारी देशांतील रुग्णांची देखील या केंद्रात पुनर्वसन आणि शुश्रुषा दिली जाते.

अपंग पुनर्वसन केंद्राच्या संकल्पनेत, अनेक व्यापक उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. यात असेही उपक्रम आहेत, ज्यात, अपंगत्व आणि त्याचे अपंग व्यक्तीवर होणारे, भावनिक, मानसिक तसेच सामाजिक स्तरावरचे तात्कालिक आणि दूरगामी असे दोन्ही परिणाम विचारात घेऊन, त्यावर उपाययोजना करणारे उपक्रमही आहेत. या केंद्रात ‘करुणामय मनाने काळजी घ्या’ या तत्वाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. खासकरुन, अपंग पुनर्वसन केंद्रात या सर्व गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. 

कृत्रिम अवयव केंद्र-एएलसी इथला बहुशाखीय अपंग पुनर्वसन चमू एकसंधतेने काम करतो, जेणेकरुन, अपंग व्यक्तीला, समाजाच्या मुख्य प्रवाहात, एक उत्पादकक्षम, स्वयंपूर्ण, आत्मविश्वास असलेली स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपले स्थान निर्माण करता येईल.

हे केंद्र, लष्कराच्या खडकी येथील पॅरालिंपिक क्रीडा विभागाशी देखील जोडलेले आहे. तसेच, या केंद्रात अनेक अपंग पॅरालिंपिक खेळाडूंवर अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. एएलसी पुणे मुळे अनेक ‘ब्लेड रनर्स’ खेळाडू भारतीय लष्कराचे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करु शकले आहेत, एवढेच नाही, तर त्यांनी भारतासाठी अनेक पदकेही जिंकली आहेत.

या केंद्रात अपंग व्यक्तींना सुगम ठरेल असा तरण तलाव आहे. त्याशिवाय ‘मल्टी स्टेशन जिम’, खेळाचे मैदान, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलची मैदाने अशा सुविधा आहेत. या सर्व ठिकाणी अपंग जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी विविध क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन आणि सुविधा दिल्या जातात.

कचरा प्रश्न:शहराच्या चारही दिशेने ५०० एकरचे ‘ बफर झोन’ करा: आबा बागुल

पुणे  : पुणे शहर दिवसेंदिवस  विस्तारत आहे. मात्र कचरा प्रश्न जटील होत चालला आहे. समाविष्टमुळे आगामी काळात कचरा प्रश्न आणखीनच पेटणार आहे. त्यामुळे आतापासूनच नियोजन केल्यास या कचरा प्रश्नावर मात करता येईल. त्यासाठी महापालिका हद्दीलगत शहराच्या चारही दिशेने  कचरा निर्मूलन व प्रक्रियेसाठी ५०० एकर जागा आरक्षित करून त्याच्या एक कि.मी. पेरिफेरीमध्ये ‘बफर झोन’ तयार करण्याची  मागणी पुणे महापालिकेतील काँग्रेसचे  माजी गटनेते  व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे केली आहे. यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी  पीएमआरडीएसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालिका आयुक्त यांनाही  पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे कि, सद्यस्थितीत पुणे शहराचा कचरा प्रश्न बिकट बनला आहे. त्यात पुणे महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश झाल्याने भविष्यात कचरा प्रश्न आणखीनच चिघळणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर  कायमस्वरूपी मात करण्यासाठी आतापासूनच कृती तसेच नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज आहे. सध्या पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) तयार केला जाणारा विकास आराखडा (डीपी) हा त्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. या डीपीमध्ये त्यानुसार नियोजन होण्याची आवश्यकता आहे. पुणे शहराच्या हद्दीलगत चारही दिशांनी ५०० एकर  जागा आरक्षित करून त्या जागेच्या एक कि.मी. पेरिफेरीमध्ये बफर झोन (नो मेन्स झोन्स ) केल्याने  निवासी भाग त्यात असणार नाही  व सद्यस्थितीत निर्माण झालेले प्रश्न भविष्यात उद्भवणार नाहीत. त्यासाठी शासनाच्या तसेच अन्य जमिनी ताब्यात घेऊन कचरा निर्मूलन व प्रक्रियेसाठी त्या जागा आरक्षित केल्यास  कचरा वर्गीकरण, निर्मूलन, प्रक्रिया आदींची  कामे नियोजनबद्ध होतील आणि त्याचा ताणही वाढणार नाही. तसेच सार्वजनिक आरोग्य सुरक्षिततेच्यादृष्टीने ही बाब महत्वाची आहे ;अन्यथा भविष्यात  कचरा प्रश्नच बिकट होईल. पुणे शहराला कचऱ्याच्या जटिल समस्येतून बाहेर काढण्यासाठी  शहराच्या चारही दिशेस कचरा निर्मूलन व प्रक्रियेसाठी पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात ५०० एकर जागा आरक्षित ठेवावी व बफर झोनचा देखील यात प्रामुख्याने विचार करावा, असे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी  नमूद केले आहे. तसेच पुणे महानगरपालिका आयुक्तांनी  पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात ५०० एकर जागेच्या आरक्षणासाठी पीएमआरडीएकडे तातडीने  पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे.  

तोंडाची वाफ घालवण्यापलीकडे नाना पटोले काही करू शकत नाहीत -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर


मुंबई, दि. ११ मे – एका बाजून खंजीर खुपसला बोलायचे आणि सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसायचे. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो, याच अर्थाने आम्ही नाना पटोले यांच्या विधानाकडे पाहतो. खंजीर खुपसला असे त्यांना वाटत असेल तर मग आहे का हिम्मत सत्तेतून बाहेर पडण्याची? त्यामुळे तोंडाची वाफ घालवून गप्प बसण्यापलीकडे नाना पटोले काही करू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे वक्तव्य महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, ते वाद घालतील, एकमेकांना शिव्याही घालतील, तरीही ते एकमेकांना घट्ट पकडून आहेत, त्यामुळे वाद वगैरे हे पेल्यातील वादळ आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक वगैरे आहे, असे मला वाटत नाही. स्थानिक ठिकाणी काही निर्णय झाले असतील तर त्याची मला माहीती नाही असेही दरेकर यांनी सांगितले
ज्या प्रकारे राज्य सरकारने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करणे, आमच्या नेत्यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे, असे राज्याच्या इतिहासात कोणत्याही सरकारने हुकुमशाही पध्दतीने कारवाया केलेल्या नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार मस्तवाल झालेले आहे. आमच्या हातात सरकार आहे, आम्ही काहीही करू शकतो, असा अहंभाव त्यांना आलाय. परंतु फार काळ सत्तेची मस्ती चालत नसते अशी टिकाही दरेकर यांनी केली.

राज्याचा विकास झाला,तरच देशाचा विकास होईल
दरेकर पुढे म्हणाले की, प्रत्येक मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. उत्तर प्रदेशचे कार्यालय मुंबईत सुरू होऊन उत्तर प्रदेश आणि मुंबईचे संबंध वाढणार असतील, येथील उत्तर भारतीयांना त्यांच्या सरकारच्या माध्यमातून मदत होणार असेल, तर महाराष्ट्र सरकारवरचा भार कमी होऊ शकतो त्यामुळे यामध्ये कोणाला वाईट वाटायचे कारण नाही. प्रत्येक राज्य सरकारला आपली लोक जिथे जिथे आहेत, त्या राज्यात मदत करण्यात गैर नाही, असेही मतही दरेकर यांनी व्यक्त केले.

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरेची विजयी घौडदौड कायम 

पुणे, 11  मे 2022: डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात बिगरमानांकीत सोलापूरच्या आकृती सोनकुसरे हिने कर्नाटकाच्या चौथ्या मानांकित प्रेशा शंथामूर्तीचा 6-3, 0-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. 
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात अव्वल मानांकित रुमा गायकवारीने क्वालिफायर प्रिशा शिंदेचा 6-0, 6-0 असा सहज पराभव केला.  तिसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या श्रीनिधी बालाजी हिने महाराष्ट्राच्या सेजल भुतडाचे आव्हान 6-1, 6-2 असे सहज संपुष्टात आणले. सहाव्या मानांकित कर्नाटकाच्या एन हर्षिनी हिने महाराष्ट्राच्या आस्मि आडकरला 6-1, 6-0 असे पराभूत केले. 
मुलांच्या गटात निशित रहाणे याने पात्रता फेरीतुन मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अर्णव पापरकरचा 6-2, 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित अजमीर शेखने अभिराम निलाखेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. अव्वल मानांकित तेलंगणाच्या तरुण कोरवारने सार्थ बनसोडेचा 6-4, 5-7, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. तनिष्क जाधव याने जय दिक्षितचा 6-2, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. दुहेरीत मुलींच्या गटात देवांशी प्रभुदेसाई व सिया प्रसादे यांनी अव्वल मानांकित रुमा गाईकवारी व राधिका महाजन या जोडीचा 6-3, 6-3 असा पराभव केला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी): मुले:तरुण कोरवार(तेलंगणा)[1]वि.वि.सार्थ बनसोडे(महा) 6-4, 5-7, 6-2;निशित रहाणे(महा)वि.वि.अर्णव पापरकर(महा) 6-2, 6-0;अजमीर शेख(महा)[3]वि.वि.अभिराम निलाखे(महा)6-0, 6-0;तनिष्क जाधव(महा)वि.वि.जय दिक्षित(महा)6-2, 6-2; 
मुली: 
रुमा गायकवारी[1](महा)वि.वि.प्रिशा शिंदे(महा)6-0, 6-0;आकृती सोनकुसरे(महा)वि.वि. प्रेशा शंथामूर्ती(कर्नाटक)[4] 6-3, 0-6, 6-3; श्रीनिधी बालाजी(कर्नाटक)[3]वि.वि.सेजल भुतडा(महा) 6-1, 6-2;  एन हर्षिनी(कर्नाटक)[6]वि.वि.आस्मि आडकर(महा)6-1, 6-0.
दुहेरी: मुले: उपांत्यपूर्व फेरी: अजमीर शेख/साहिल तांबट[1] वि.वि.सार्थ बनसोडे/सिद्धार्थ मराठे 6-7(3), 6-3, 12-10; पार्थ देवरुखकर/जय पवार[4] वि.वि.अनिष रांजळकर/अर्जुन अभ्यंकर 6-4, 6-4;जश शहा/प्रद्युम्न तोमर वि.वि.प्रणव गाडगीळ/यग्ना पटेल[3] 6-4, 6-1;
जय दिक्षित/निशित रहाणे वि.वि.तनिष्क जाधव/तरुण कोरवार[2] 5-7, 6-2, 10-8;

मुली:
देवांशी प्रभुदेसाई/सिया प्रसादे वि.वि.रुमा गाईकवारी/राधिका महाजन[1]6-3, 6-3;
मेह्क कपूर/प्रिशा शिंदे वि.वि.ऐश्वर्या जाधव/आकृती सोनकुसरे 7-5, 3-6, 10-6;
आस्मि आडकर/श्रीनिधी बालाजी[3]वि.वि.मृण्मयी जोशी/श्रुती नानजकर 7-5, 6-2;
एन हर्षिनी/प्रेशा  शंथामूर्ती[2]वि.वि.कौशिकी समंथा/डान्सिया फर्नांडो 6-0, 6-3.

म्हसोबावाडी होतेय रेशीम व्यवसायाची वाडी

0


पुणे दि.११- इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावातील शेतकरी तुतीची लागवड करून रेशीम व्यवसायाकडे वळत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि रेशिम संचालनालयातर्फे अल्पभूधारक शेकऱ्यांना अनुदान देण्यात येत असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरला आहे.

साधारण २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मोजके शेतकरी २००६ पासून या क्षेत्राकडे वळले आहेत. त्यातील काहींनी पुन्हा पारंपरिक शेती सुरू केली. मात्र गेल्या दोन वर्षात रेशमाच्या कोशाला मिळणारा चांगला दर आणि इतर पिकांपेक्षा अधिकचे होणारे उत्पन्न यामुळे शेतकरी तुतीच्या लागवडीकडे वळले आहेत.

पाच वर्षापूर्वी केवळ ५ ते ६ शेतकरी तुतीची लागवड करीत होते. गेल्यावर्षी ही संख्या ३६ वर पोहोचली आणि ७३ नव्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. इंदापूर तालुक्यातील ३११ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली असून त्यापैकी ३६ एकर म्हसोबावाडीतील आहे. यात आणखी प्रति शेतकरी एक एकर याप्रमाणे ७३ एकरची भर पडणार आहे.

शेतकरी रेशीम उद्योगासाठी लागणारे अंडीपूंज कर्नाटक अणि गडहिंग्लज येथून आणतात. काही बाल्या वस्थाद केंद्रात (चॉकी सेंटर) १० दिवस सांभाळलेल्या बाल्यावस्थेतील अळ्यादेखील उपलब्ध होतात. संगोपन गृहातील बेडवर १७ ते १८ दिवसात कोश तयार होतात. हे कोश साधारण ५ ते ६ दिवसात विक्रीसाठी तयार होतात. पहिल्यावर्षी एक किंवा दोन बॅच घेता येतात. नंतर पाच बॅचपर्यंत उत्पादन वाढविता येते.

असे आहे अर्थकारण
एक एकर क्षेत्रात २५० अंडीपूंजाची एक बॅच असते. १००० अंडीपूंजापासून सरासरी ८०० किलोपेक्षा अधिकचे कोश तयार होतात. सरासरी ६०० रुपये दराने ४ लाख ८० हजार उत्पन्न मिळते. दर चांगला मिळाल्यास हे उत्पन्न ७ लाखापर्यंतही जाते. एका बॅचला सरासरी २५ हजार खर्च येत असल्याने रेशीम उद्योग किफायतशीर ठरू शकतो.
शासनाचे मार्गदर्शन आणि अनुदान
पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी रेशीम उद्योगाचे अनुदान मिळविण्यासाठी पात्र आहेत. त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगारा हमी योजनेअंतर्गत तीन वर्षासाठी १ लाख ६९ हजार १३६ रुपये अकुशल मजूरी, साहित्य क्षरेदीसाठी ६१ हजार ७३० रुपये, किटक संगोपन गृहासाठी अकुशल मजूरी ५२ हजार ८२४ आणि कुशल मजूरी ४९ हजार ५० असे एकूण ३ लाख ३२ हजार ७४० रुपये अनुदान मिळते.

शेतकऱ्यांना प्रोत्साहनामुळे क्षेत्र वाढले
म्हसेाबावाडीत क्षेत्र सहाय्यक बाळासाहेब माने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने यावर्षी ७३ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्वत: या क्षेत्राला भेट देऊन शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकडे वळण्याचे आवाहन केले.

दरवर्षी १५ दिवस शेतकऱ्यांना नोंदणीची संधी असते. नवीन शेतकऱ्यांचे १५ दिवसांचे प्रशिक्षण रेशीम संचालनालयातर्फे घेण्यात येते. त्यांना ८०० अंडीपूंजासाठी एका वर्षाला ७५ टक्के अनुदान देण्यात येते. शिवाय कोश तयार झाल्यानंतर दर ३०० रुपयांच्या आत मिळाल्यास प्रति किलो ५० रुपये अनुदान देण्यात येते.

इंदापूर परिसरात सिंचनासाठी पाणी कमी आहे. इतर बागांच्या तुलनेत तुतीला पाणी कमी लागते. शिवाय दरमहा शाश्वत उत्पन्न देणारा हा उद्योग असल्याने आणि तुतीची एकदा लागवड केली की १२ ते १५ वर्ष लागवडीचा खर्च येत नसल्याने शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाचा पर्याय स्विकारला आहे. अळ्यांनी खावून राहिलेला पाला जनावरांना खाद्य म्हणून किंवा कंपोस्ट खतासाठी वापरता येत असल्याने त्याचाही शेतकऱ्यांना फायदाच होतो. म्हणूनच म्हसोबावाडीची आता रेशीम उद्योगाची वाडी होण्याकडे वाटचाल सुरू आहे.

मनोज चांदगुडे, शेतकरी म्हसोबावाडी-इतर पिकांच्या तुलनेत पाणी कमी लागते. हा तसा कोरडा पट्टा असल्याने शेतकरी शेततळे करून कमी पाण्यात तुतीची लागवड करीत आहेत. आर्थिक उत्पन्न चांगले होत असल्याने स्वत: खर्च करून एक एकर क्षेत्र वाढविले.

नामदेव चांदगुडे, शेतकरी म्हसोबावाडी- पूर्वी ऊस, कांदा घ्यायचो. मात्र चांगले दर मिळत नसल्याने आणि पाणी अधिक लागत असल्याने रेशीम शेतीकडे वळलो. आता चार बॅचेसमधून ५ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. या उद्योगात कष्टही तुलनेत कमी आहेत.
बाळासाहेब माने, क्षेत्र सहाय्यक इंदापूर-शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा हा व्यवसाय अधिक लाभदायक वाटल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. हा कोरडा पट्टा असल्याने कमी पाण्यात शेतकरी तुतीची लागवड करून शकतात. त्यांना मार्गदर्शन करून म्हसोबावाडीत आणखी क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न आहेत.

शैक्षणिक दाखल्यांसाठी १७ ते ३१ मे या कालावधीत विशेष मोहिम

पुणे दि.११: शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर दाखले, अधिवास दाखले पावसाळा सुरु होण्यापुर्वीच सुलभपणे उपलब्ध करुन देण्यासाठी भोर व वेल्हा तालुक्यात १७ ते ३१ मे २०२२ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

भोर उपविभागातील भोर व वेल्हा हे दोन्ही तालुके अति पर्जन्य क्षेत्रात मोडणारे आहेत. दोन्ही तालुक्यांमधील बराच भाग हा दुर्गम असून दरवर्षी सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून पावसाची सुरवात होते. त्यामुळे विशेष मोहिमेअंतर्गत प्राप्त परिपुर्ण दाखल्यांच्या प्रस्तावावर निर्णय घेऊन तात्काळ दाखले देण्यात येणार आहेत.

दाखले देण्याच्या मोहिमेसाठी सर्व तलाठी, मंडल अधिकारी, सेतू चालक व महा ई सेवा केंद्रचालक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मोहिम कालावधीत जास्तीत जास्त दाखल्यांचे वितरण अत्यंत कमी कालावधीत करण्याचे उद्दीष्ट आहे. मोहिमेचा लाभ भोर व वेल्हा तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिक व पालक यांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.

महापालिकेच्या टॅॅक्सच्या बोगस पावत्या..कोंढव्यात गुन्हा दाखल

पुणे- गेल्या पंचवार्षिक सत्रात ‘माय मराठी’ ने महापालिकेतील मिळकतकर विभागात बोगस कर्मचारी बसत असल्याचा प्रकार चव्हाटयावर आणल्यावर निव्वळ एकास पकडून गुन्हा दाखल करून कारवाई केल्याचे दाखविणाऱ्या महापालिकेच्या टॅॅक्सच्या बोगस पावत्या प्रकरणी आता कोंढव्यात गुन्हा दाखल झाला आहे.मिळकत कर विभागात ३ वर्षांपूर्वी बोगस कर्मचारी बसून कारभार हाकीत असल्याचा प्रकार मायमराठी ने उघडकीस आणला होता मात्र तरीही एकास अटक केल्यानंतर यातील काही जणांना नंतर महापालिका प्रशासनाने बिनधास्त अभय दिले होते.आता महापालिका एकीकडे सर्वच क्षेत्रात उत्पन्नाची भरारी घेत असताना ३ लाख ६५ हजार ८५० रुपयांच्या महापालिकेच्या टॅॅक्सच्या बोगस पावत्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बोगस गुंठेवारी,बोगस कामगार अशा प्रकरणात गेल्या पाच वर्षात कारवाई का झाली नाही असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आहे.

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार,५६ वर्षे वयाच्या विजय वालिया या कोंढवा बुद्रुक येथील राहिवाश्याने याबाबत पोलिसात तक्रार नोंदविली आहे.वालिया यांचे येथे कार्पेटचे गोडाऊन आहे.या गोडाऊनला महापालिकेचा टॅॅक्स लावून देतो असे सांगून एक महिला आणि एक पुरुष अशा दोघांनी त्यांच्याकडून ३ लाख ६५ हजार ८५० रुपये घेतले आणि महापालिकेच्या टॅॅक्सपावत्याही दिल्या.मात्र त्यानंतर वालिया यांना संशय आल्याने त्यांनी महापालिकेत चौकशी केली असता या पावत्या बोगस असल्याचे निष्पन्न झाले.या पावत्या कोणी दिल्या ?त्या महापालिकेत केल्या गेल्या काय ? दोन आरोपी नेमके कोण आहेत ? त्यांनी या पावत्या कशा कोठे बनविल्यात? आणि अशा प्रकारे किती जणांची फसवणूक झालेली आहे अशा सर्व बाबींवर प्रकाशझोत टाकण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यातील फौजदार सचिन खेतमाळ्स हे अधिक तपास करीत आहेत .

इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

0

मुंबई, दि. 11 : दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करीत आहेत. या शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात असून,  मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल आयोजित बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवासन, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, प्रसिध्द वास्तुविशारद शशी प्रभू, सहसचिव दिनेश डिंगळे यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री. मुंडे म्हणाले, स्मारक उभारणीसाठी प्रगती तक्ता तयार करून दर पंधरा दिवसांनी या कामाच्या प्रगतीचा अहवाल घेण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती धोरण निश्च‍ितीसंदर्भातील सर्व कार्यवाही पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करावा. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. स्मारक उभारणीचे काम जरी एम. एम. आर. डी. ए. कडे असले तरी राज्य शासनाने इंदूमिल स्मारक उभारणीच्या संनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात या कामासाठी लागणारा निधी विहित वेळेत उपलब्ध करून देणे तसेच वेळोवेळी कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल तपासणे हे काम सातत्याने सुरू आहे. या स्मारकासाठी लागणारा निधी तत्काळ एम. एम. आर. डी. ए. ला वितरित करण्याचे निर्देशही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी दिले.

यावेळी आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवासन यांनी या परिसरात करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचे सादरीकरण तसेच प्रत्यक्ष भेट देवून माहिती सांगितली. प्रवेशद्वार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, बेसमेंट वाहनतळ याबद्दल सविस्तर माहिती दिली. एमआरडीए हे सर्व काम गतीने करत असून उर्वरित काम गतीने करणार असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली.

सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, सचिव सुमंत भांगे, एस.व्ही.आर.श्रीनिवासन, डॉ.प्रशांत नारनवरे, प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू, दिनेश डिंगळे यांनी इंदूमिल येथील स्मारक उभारणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली तसेच चालू कामाचा समग्र आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

मंत्रिमंडळाने मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाचे सनियंत्रण व जलदगतीने पूर्ण करणे यासाठी  एक उपसमिती नेमली असून, या उपसमितीमध्ये श्री. मुंडे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे.या स्मारकाचे काम जलदतीने पूर्ण व्हावे यासाठी दर पंधरा दिवसांनी या कामाचा आढावा घेणार असल्याचेही मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.

ओबीसी युवक-युवतींच्या कौशल्य विकासाकरिता नवीन वेबपोर्टल

0

मुंबई, दि. 11 : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील युवक -युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने नवीन वेबपोर्टल www.msobcfdc.org तयार करण्यात आले आहे. ओबीसी युवक-युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माहितीसाठी या  वेबपोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या www.msobcfdc.org या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालयासमोरील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर, कौशल्य विकास अधिकारी विजय काटोलकर यावेळी उपस्थित होते.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केले आहे. इतर मागासवर्ग प्रवर्गातील परंपरागत व्यवसायात असलेल्या व्यक्तींनाही या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेवून व्यावसायिक स्पर्धेत उतरता येईल. कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थींना महामंडळाच्या थेट कर्ज योजना व व्याज परतावा योजनेचा लाभ घेवून व्यवसायदेखील उभा करता येईल.  या योजनेचा लाभ 18 ते 50 वर्ष वयोगटातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना घेता येवू शकतो. अधिक माहितीकरिता www.msobcfdc.org या वेबपोर्टलवरील कौशल्य प्रशिक्षण योजना या लिंकला भेट द्यावी.

कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षीसासाठी पुढील वर्षापासून १ कोटी रुपयांचा निधी देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

0

सांगली : आंतरराष्ट्रीयराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध खेळाप्रमाणे राज्यातील नवीन खेळाडूंना संधी मिळावी त्यासाठी शासनाकडून राज्यस्तरावर चार मोठ्या स्पर्धा भरविण्यात येतात. त्यामध्ये कुस्तीकबड्डीखो-खो व व्हॉलीबॉल यांचा समावेश आहे. या प्रत्येक स्पर्धेसाठी 75 लाख इतका निधी बक्षिसासाठी देण्यात येतो तो निधी पुढील वर्षापासून 1 कोटी रुपयांपर्यंत करण्यात येईल. चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्यात विभाग स्तरावरील क्रिडा संकुलासाठी 50 कोटीजिल्हास्तरावरील क्रिडा संकुलासाठी 25 कोटीतालुका क्रिडा संकुलासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे खेळाडू घडतील,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

      इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू क्रिडानगरी पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटीलगृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटीलसांगलीमिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशीआमदार मानसिंगराव नाईकआशियाई व्हॉलीबॉल फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष रामअवतार जाखडप्रांताधिकारी संपत खिलारीजिल्हा क्रिडा अधिकारी माणिक वाघमारेमहाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटीलपी. आर. पाटीलभारतीय व्हॉलीबॉल संघाचे महासचिव अकी चौधरीज्येष्ठ व्हॉलीबॉल खेळाडु महमंद मुल्ला आदी उपस्थित होते.

      राज्यातील खेळाडूचे हित जपण्यासाठी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूना वर्ग 1 व वर्ग 2 च्या नोकऱ्या त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार सरकारकडून देण्यात येत आहेत. असे सांगूनउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेविविध खेळामध्ये प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांनी योग्य मार्गदर्शन व पाठबळ देणे आवश्यक आहे. खेळामध्ये लक्ष घातल्यानंतर शैक्षिणक नुकसान होईल या भावनेतून खेळाडुंची अडवणूक करु नये. कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये  कोणत्या खेळामध्ये प्राविण्य प्राप्त करण्याची क्षमता आहे. त्यानूसार त्याला प्रशिक्षण द्यावेशासन खेळाडुंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेच पण त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना पाठबळ द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.

      यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेगेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध स्पर्धा राज्यामध्ये भरविता आल्या नाहीत. उत्तमातील उत्तम खेळाडु आपल्या राज्यामध्ये आहेत. परंतु त्यांना संधी देता येत नव्हती. आता परिस्थिती बदलेली आहे. आता त्या दोन वर्षाचा बॅकलॉक भरुन काढावयाचा आहे. राज्यात आयपीएलप्रो-कब्बडी स्पर्धांच्या धर्तीवर राज्यातही व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. राज्यातील खेळाडुना विविध सवलतीही देण्यात येत आहे. राज्यातील सर्व खेळाडूंच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा आहे.

      यावेळी गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील म्हणालेराष्ट्रीय स्तरावरील व्हॉलिबॉलच्या स्पर्धा भरविण्याचा मान यावेळी महाराष्ट्राला मिळाला आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून यामुळे येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिडा क्षेत्रात कामगिरी केल्यास थेट शासकीय सेवा करण्याची संधी शासन उपलब्ध करुन देते. त्यामुळे हे ही आता एक प्रकारचे करिअर झाले आहे. प्रो-लिग कब्बडी प्रमाणेप्रो-लिग व्हॉलीबॉल स्पर्धाही येत्या काळात भरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.

      प्रास्ताविक महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केले. यावेळी आमदार मानसिंग नाईकरामअवतार जाखड यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

      प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलन करुन क्रिडा ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या अभिनंदन धामणकर याने क्रिडा शपथ दिली. या स्पर्धेत विविध राज्यातील 22 पुरुष व 20 महिला संघांनी सहभाग घेतला आहे.

 ग्रामीण डाक सेवक पदासाठी ५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. 11 :- भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील 67 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 5 जून 2022 पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांनी केले आहे.

https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येतील. अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अर्जदाराला अर्जाचे शुल्क प्रधान डाकघर, पनवेल-410206 येथे जमा करता येईल.

टपाल विभाग उमेदवारांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी पत्रव्यवहार केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करु नयेत आणि अनधिकृत दूरध्वनी संदेशापासून सावध रहावे. अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे