Home Blog Page 1983

भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0

मुंबई, दि. 24 : शेतकरी बांधवांनी त्यांच्या कृषी उत्पादनाचा दर्जा आणि वेगळेपणा जपून गुणवत्तापूर्वक उत्पादने तयार करण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर राज्याची ओळख निर्माण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी भौगोलिक मानांकन हा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात राज्यातील 12 भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यात मंगळवेढा मालदांडी ज्वारी, नवापूर तूरडाळ, भिवापूर मिर्ची पावडर, पुणे आंबेमोहोर तांदूळ, महाबळेश्वर ड्राय स्ट्रॉबेरी, सांगली हळद, आजरा घनसाळ तांदूळ, वायगाव हळद, डहाणू चिक्कू पावडर, सांगली बेदाणा, वेंगुर्ला काजू, भंडारा चिन्नोर तांदूळ या उत्पादनांचा समावेश आहे. या शुभारंभप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार तथा प्राधिकृत अधिकारी बाबासाहेब पाटील, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी व पदुम विभागाचे सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, प्राधिकृत अधिकारी मंडळ सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला. या माध्यमातून शेतकऱ्‍यांची गुणवत्तापूर्ण उत्पादने आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. सध्या मॅाल संस्कृती पुढे येत असून या संस्कृतीत शेतकऱ्‍यांची कृषी उत्पादने टिकून ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचे आहे.

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, ग्राहक हा चोखंदळ असतो. त्याला चांगली उत्पादने हवी असतात. ग्राहकाला भौगोलिक मानांकन प्राप्त असलेली उत्पादने ही अधिक विश्वासार्ह वाटतात. गुणवत्ता व दर्जा टिकवून ग्राहकांचा विश्वास संपादन करता येते.

भौगोलिक मानांकन (जीआय) म्हणजे एखादी वस्तू व उत्पादनास विशिष्ट स्थानामुळे प्राप्त झालेला असाधारण गुणधर्म, दर्जा आणि वेगळेपणा होय. वस्तू व उत्पादनांना वैज्ञानिक विश्लेषण, वैशिष्टपूर्ण गुणधर्म व पारंपरिक इतिहास सिद्ध केल्यावरच भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त होते. केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्याद्वारे भौगोलिक मानांकन देण्यात येते. जीआय टॅगमुळे फसवेगीरीस आळा बसतो व अस्सल दर्जाची उत्पादने असल्याची ग्राहकाला शाश्वती मिळते.

मार्टिन करतोय ‘फनरल’ चित्रपटाचं प्रमोशन!

‘जगू आनंदे, निघू आनंदे’ या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा फनरल‘ हा मराठी चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा फनरल चित्रपटरूपात मांडली असून, सध्या हा सिनेमा एका वेगळ्याच कारणामुळं मुंबईपासून महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही पशू-पक्षी अपवित्र मानले आहेत. या यादीत सर्वप्रथम येतो तो कावळा… कावळा आपल्या जवळ जरी आला तरी आपण त्याला हकलतो, त्याचा तिरस्कार करतो. असा हा अपवित्र असलेला कावळा काही वेळी मात्र पवित्र बनतो. मानवाच्या निधनानंतर दशक्रिया विधीवेळी कावळा पिंडाला शिवणं हे शुभ मानलं जातं. त्यावेळी कावळ्याच्या रूपात आपल्याला आपले पूर्वज दिसू लागतात. पिंडाला कावळा शिवला नाही, तर मृत्यू झालेल्या व्यक्तीची कोणतीतरी इच्छा अधूरी राहिल्याचं मानलं जातं. कावळा पिंडाला शिवण्यासाठी चातकासारखे आकाशाकडे डोळे लावून त्याची वाट पाहिली जाते आणि अखेर काव… काव… करत जेव्हा कावळा येऊन पिंडाला शिवतो तेव्हा दशक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतो. धर्मशास्त्रात अशुभ मानल्या जाणाऱ्या याच कावळ्याला सोबत घेऊन ‘फनरल‘ चित्रपटाचं प्रमोशन करण्याची अनोखी शक्कल चित्रपटाच्या निर्मात्यांनी लढवली आहे.

फनरल‘ चित्रपटातही एक कावळा आहे, जो नायक साकारलेल्या आरोह वेलणकरला नेहमी भेटतो. आरोहही त्याला काही ना काही खायला देतो. आरोहनं चित्रपटात या कावळ्याचं नाव ‘मार्टिन’ ठेवलं आहे. चित्रपटातील ‘मार्टिन क्रो’ आता प्रेक्षकांच्याही भेटीगाठी घेत आहे. फनरलच्या प्रमोशनसाठी एक भला मोठा कावळा बनवण्यात आला आहे. हा कावळा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही चर्चेचा विषय ठरला होता आणि इफ्फीमध्येही रेड कार्पेटवर चालूनही त्यांनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हाच मार्टिन सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील लोकांना भेटतोय. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वचजण या कावळ्याला पाहून खुश होत असून, त्याच्या प्रेमात पडले आहेत. कावळ्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत. फनरलच्या निमित्तानं एक वेगळी संकल्पना राबवण्यात येत आहे.

माणूस आयुष्यभर खूप चिंता करत असतो. आयुष्य संपायला येतं तेव्हा बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्याचं जाणवतं. याच सर्व गोष्टींवर तिरकस शैलीत भाष्य करताना, कोणाच्याही भावना न दुखावता विनोदी पद्धतीनं वास्तववादी घटनांचं सादरीकरण फनरल मध्ये करण्यात आलं आहे. यातील संवाद खूप अर्थपूर्ण असून, घराघरातील कथा सांगणारे आहेत. आरोह वेलणकर, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे आदी कलाकार या चित्रपटात आहेत. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत फनरल चित्रपट १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे

टाटा मोटर्स आणि टाटा पॉवरची भागीदारी पुण्यामध्ये ७ एमडब्ल्यूपी क्षमतेचा सोलर रुफटॉप एक्सपान्शन प्रोजेक्ट उभारणार

 या विस्तारामुळे टाटा मोटर्स पीव्ही पुणे उत्पादन युनिटमध्ये आता असणार आहे

  • भारतातील सर्वात मोठा१७ एमडब्ल्यूपी क्षमतेचा ऑन-साईट सौर प्रकल्प
  • या प्रकल्पामध्ये २३ मिलियन युनिट्स वीज निर्माण होईल ज्यामुळे ५.२३ लाख टन कार्बन उत्सर्जन रोखले जाईलहे म्हणजे ८.३६ लाख झाडे लावल्यासारखे आहे.

पुणे-: उत्पादन प्रक्रिया पर्यावरणपूरक, शाश्वत असावी या टाटा समूहाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स यांनी पुण्यातील चिखलीमधील टाटा मोटर्सच्या पॅसेंजर वेहिकल प्लांटमध्ये ७ मेगा-वॅट पीक (एमडब्ल्यूपी) क्षमतेचा सोलर रुफटॉप प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन विकसित केलेल्या १७ एमडब्ल्यूपी क्षमतेच्या ऑन-साईट सोलर प्रकल्पाचा हा तिसरा टप्पा आहे. या प्रकल्पातील १० एमडब्ल्यूपी क्षमता आधीच इन्स्टॉल करण्यात आली आहे. टाटा पॉवरने हे नवे नवीन इन्स्टॉलेशन केल्यावर टाटा मोटर्स पीव्ही उत्पादन युनिट हे देशातील सर्वात मोठा ऑन-साईट सौर प्रकल्प असलेले युनिट बनेल.

या सौर प्रकल्पासाठी टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर यांच्या दरम्यान नुकताच एक वीज खरेदी करार करण्यात आला.  कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असलेले, शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल असलेले हे इन्स्टॉलेशनमध्ये एकूण २३ मिलियन युनिट्स वीज निर्माण होईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे ५.२३ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखले जाईल. हे म्हणजे संपूर्ण जीवनभरात ८.३६ लाख झाडे लावण्यासारखे आहे.

या प्रकल्पाबाबत टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्स लिमिटेडचे ऑपरेशन्सचे व्हाईस प्रेसिडेंट श्री राजेश खत्री म्हणाले, शून्य उत्सर्जन उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने टाटा मोटर्स प्रयत्नशील आहे. टाटा पॉवरच्या सहयोगाने आमच्या पुणे प्लांटमध्ये ७ एमडब्ल्यूपी क्षमतेचा अतिरिक्त रूफ टॉप सोलर प्लांट इन्स्टॉल करण्यासाठी हा नवा करार करून आम्ही १००% शुद्ध ऊर्जेच्या आमच्या उद्दिष्टाच्या जवळ जात आहोत. ही क्षमता सुरु झाल्यानंतर आम्ही भारतातील सर्वात मोठे ऑन साईट सोलर इन्स्टॉलेशन असलेली कंपनी बनू.”   

आरई१०० वर स्वाक्षऱ्या करणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून टाटा मोटर्स त्यांच्या संपूर्ण संचालनामध्ये १००% शुद्ध ऊर्जा वापरण्यासाठी वचनबद्ध असून यासाठी त्यांनी त्यांच्या कामांमध्ये शुद्ध ऊर्जेचे प्रमाण हळूहळू वाढवत अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.  आर्थिक वर्ष २०२२ मध्ये या कंपनीने ९२.३९ मिलियन केडब्ल्यूएच शुद्ध वीज निर्माण केली, त्यांच्या एकूण वीज वापराच्या तुलनेत हे प्रमाण १९.४% आहे. २०३० पर्यंत १००% शुद्ध ऊर्जा वापरण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शुद्ध ऊर्जा मिळवण्यासाठी ही कंपनी अथक प्रयत्नशील आहे.

टाटा पॉवरचे न्यू बिझनेस सर्व्हिसेसचे चीफ श्री. गुरिंदर सिंग संधू यांनी या प्रकल्प विस्ताराबाबत सांगितले, टाटा मोटर्सच्या पुणे प्लांटमधील भारतातील सर्वात मोठा ऑन-साईट सोलर प्रकल्प म्हणजे आपापल्या व्यवसायांमध्ये पर्यावरणपूरक पावले उचलण्याची आमची वचनबद्धता दृढ असल्याचे दर्शवतो.  आपल्या प्रकल्प कार्यान्वयन क्षमता आणि तांत्रिक कौशल्ये यांच्या बळावर आपल्या सहयोग्यांना लक्षणीय मूल्य प्रदान करणारीभारतातील सर्वात मोठ्या शुद्ध ऊर्जा कंपन्यांपैकी एक हे टाटा पॉवरचे स्थान या प्रकल्पामुळे अधिक मजबूत झाले आहे.” 

कितीतरी मोठ्या सौर प्रोजेक्ट्सच्या यशस्वी उभारणीचा अनुभव टाटा पॉवरच्या गाठीशी आहे.  एकाच ठिकाणी उभारण्यात आलेले जगातील सर्वात मोठे रुफटॉप – राधास्वामी सत्संग बीस, अमृतसर (१६ मेगावॅट), कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (२.६७ मेगावॅट), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया जगातील सर्वात मोठे सौरऊर्जेवर चालणारे क्रिकेट स्टेडियम (८२०.८ केडब्ल्यूपी), डेल बंगलोर येथे उभारण्यात आलेले सोलर व्हर्टिकल फार्म (१२० केडब्ल्यू), टाटा केमिकल्स, नेल्लोर येथे १.४ मेगावॅट क्षमतेचे फ्लोटिंग सोलर आणि असे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प टाटा पॉवरने उभारले आहेत.  त्याचप्रमाणे देशात सर्वत्र लोकांना सौरऊर्जेविषयी जागरूक करण्यासाठी घरांच्या छतांवर सौरऊर्जा रुफटॉप उभारणीचे काम देखील टाटा पॉवर मोठ्या प्रमाणावर करत आहे.

महाअनुषाच्या माध्यमातून शिक्षण,आरोग्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे- विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि.२४: महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास घटकाच्या विकासासोबतच यापुढे पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. पुणे जिल्ह्यात महाअनुषा पोर्टलला स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूहांने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने महाअनुषा पोर्टल अंतर्गत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त संतोष पाटील, प्रकल्प संचालक शालीनी कडू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, महाअनुषाचे पंकज पाटील उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले,  महाअनुषा पोटर्लच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात पथदर्शी काम होईल. स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. इतर विकास उपक्रमांसोबत माझी वसुंधरा अभियानाचाही यामध्ये अंतर्भाव केला जावा. या अभियानात असलेल्या पाच घटकांचा अंतर्भाव करून काम केले तर पर्यावरण संवर्धनात चांगले योगदान देता येईल. 

महाअनुषा पोर्टलचा पुणे महसूल विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यात विस्तार केला जाणार आहे. पाचही महानगरपालिकाना यामध्ये समावून घेतले जाणार असल्याचे सांगून कोरोना कालावधीत स्वयंसेवी संस्था व उद्योग समूहाने केलेल्या सहकार्याबदल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेलेल्या उपक्रमाबाबत सादरीकरण केले. पुणे जिल्हयात ६० पेक्षा अधीक उद्योग संस्थांनी सामाजिक दायित्व निधीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. त्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आदर्श शाळा संकल्पना प्रभावीपणे राबविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाअनुषाचे पाटील म्हणाले, सीएसआर निधी आणि प्रकल्पांची योग्य अंमलबजावणी हे सयुंक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत (यूएनडीपी) विकसित केले गेलेले पोर्टल आहे. शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य सेवा केंद्रे सुधारण्यासाठी प्रकल्प अपलोड करण्यात आले आहेत. महाअनुषा पोर्टलवर लॉग इन करण्यास उद्योग समूहांचा चांगला प्रतिसाद असल्याचे ते म्हणाले.

कोरोना कालावधीत शासकीय यंत्रणांनी चांगले काम केले आहे, तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही पथदर्शी कामे झालीत,अशा प्रतिक्रिया उद्योग समूहांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.

यावेळी सीएसआरमध्ये सहभागी असलेल्या ६० उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक समूहाच्या प्रतिनिधीने त्यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाबाबत माहिती दिली.

असे आहे महाअनुषा पोर्टल
*महाअनुषा पोर्टलचा पुणे जिल्ह्यातील शासकीय विविध विभाग, स्वयंसेवी संस्था व उद्योगसमूह हे सर्व या पोर्टलचा वापर करतात. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जे प्रकल्प उभे करायचे असतील ते या पोर्टलवर अपलोड केले जातील. जे उद्योगसमूह त्यांचा सीएसआर निधी या प्रकल्पासाठी देणार आहेत, त्या उद्योगसमूहांना ही प्रक्रिया पोर्टलच्या माध्यमातून पुर्ण करता येणार आहे. उद्योगसमूहाना त्यांनी ज्या प्रकल्पासाठी उद्योगसमूहाने निधी दिला त्या प्रकल्पांच्या प्रत्येक टप्प्याचे संपूर्ण परिक्षण करता येणार आहे. सामान्य नागरिकांनाही कोणत्या उद्योगसमूहाने प्रकल्पासाठी किती मदत केली हे पाहता येणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील नाले होणार रुंद;माजी नगरसेविका नागपुरे यांना आशा

पुणे-सिंहगड रस्त्यावरील पाटील हॉस्पिटल जवळ सुरू असलेल्या पावसाळी पूर्व कामांची मंगळवारी माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी पाहणी केली. या परिसरात असलेल्या ओढ्यावर कल्व्हर्टचे काम महानगरपालिकेने सुरू केले आहे, याची नागपुरे यांनी पाहणी करत कामाचा आढावा घेतला.
गेल्या दोन वर्षापासून शहरात पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वात अधिक फटका सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना बसला आहे. पावसाळयात या परिसरातील इमारतींच्या संरक्षक भिंती कोसळणे, दुकाने, रुग्णालयांमध्ये पावसाचे पाणी शिरणे, गाळ साचणे, गाड्या वाहून जाणे असे प्रकार या भागात काही तासांत झालेल्या पावसामुळे घडलेले आहेत.
या भागात असलेल्या खोराडवस्ती, रोकडोबा मंदिर, विठ्ठलवाडी, विठ्ठल नगर, पाटील हॉस्पिटल, मधुकर हॉस्पिटल, संतोष हॉल या सर्व ठिकाणी गेल्या पावसाळयात पाण्याचे मोठे लोट वाहत होते. पाणी वाहून जाण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने उतारावरचे आणि ओढ्याचे पाणी बहुतेक घरांमध्ये, दुकानांत तसेच मधुकर आणि पाटील रुग्णालयात घुसले होते. परिणामी नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
या घटनेची पुनरावृत्ती यंदाच्या पावसाळ्यात होऊ नये यासाठी या परिसरात असलेल्या सर्व ओढे, नाले यांची स्वच्छता करून त्यांची रुंदी आणि खोली वाढवावी, अशी मागणी नगरसेविका नागपुरे यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. तसेच याचा सतत पाठपुरावा देखील त्यांनी ठेवला होता. या भागात असलेल्या ओढ्यांवर नवीन कल्व्हर्टचे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यापैकी सिंहगड रस्त्यावरच्या प्रचंड वाहतुकीमुळे पाटील हॉस्पिटल जवळच्या ओढ्यावर कल्व्हर्ट बांधणे खूप अवघड झाले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे आता या कामाला गती मिळाली, असल्याचे नागपुरे यांनी सांगितले.
पालिकेच्या वतीने पाटील हॉस्पिटल जवळ सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली. हा ओढा अधिक खोल आणि रुंद करावा, जेणेकरून पावसाळ्यात याचा फटका नागरिकांना बसणार नाही, अशी मागणी नागपुरे यांनी केली. हे काम पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वात असलेला तीन मीटर रुंद ओढा ५ ते ६ मीटर रुंद होणार आहे. तसेच किमान १० फूट खोल होणार असल्याचे नगरसेविका नागपुरे यांनी स्पष्ट केले. यावेळी पालिकेतील अभियंता सुप्रिया वळसे पाटील, उपअभियंता दिलीप पांदकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

‘माहिती भवन’ प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘माहिती भवन’ इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार

मुंबई, दि. २४- पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे ‘माहिती भवन’ प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि सिडको यांच्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यात सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, दैनिक सामनाचा मी देखील काही काळ संपादक होतो, त्यामुळे राजकारण आणि पत्रकार यांच्यातील संबंध लहानपणापासून पाहत मी मोठा झालो, त्यामुळे पत्रकारितेशी माझे कायम ऋणानुबंध आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये बराच बदल झाला असून खिळ्यांच्या ब्लॉकच्या टाईपसेटिंगपासून मोबाईलपर्यंतचा पत्रकारितेचा प्रवास थक्क करणारा आहे. आता एका क्षणात जगभरात माहिती पाठवता येते आणि हे काम करण्यासाठी पत्रकारांना एका ठिकाणी बसता यावे याकरिता माहितीभवन निश्चितच उपयुक्त ठरेल. चुकीच्या माहितीवर आधारित अनेक बातम्या प्रसारित किंवा प्रसिद्ध होत असतात, त्या बातम्यांची वस्तुस्थिती वेळोवेळी जनतेसमोर मांडण्याबरोबरच चुकीच्या बातम्यांचे खुलासे होणे आवश्यक आहे. माहिती भवनची संकल्पना महत्त्वपूर्ण असून येथे सुरु करायच्या उपक्रमांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजाचे कौतुक केले. नवी मुंबईतील नेरूळ येथे माहिती भवनाची अत्याधुनिक इमारत विभागाच्या कामकाजास उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. या माहिती भवनामध्ये पत्रकार संघटनांच्या कार्यक्रमांबरोबरच महासंचालनालयाकडील असलेल्या ग्रंथांचे डिजिटायझेशन करुन डिजिटल ग्रंथालय लवकरच सुरु होईल. असा विश्वास व्यक्त करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे बळकटीकरणाची ग्वाही यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे यांनी दिली.

माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. ते म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय वृत्तसंकलनाबरोबरच माहितीचे विश्लेषण देखील करीत असते. अलिकडच्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार विभागाने केल्यामुळे कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. या बदललेल्या कामाच्या पद्धतीसाठी माहिती भवनाची संकल्पना उपयुक्त ठरेल. माहिती भवनसाठी केलेल्या सहकार्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांचे आणि सिडकोचे श्री. कपूर यांनी आभार मानले. या माहिती भवनामध्ये माध्यम प्रतिसाद केंद्र, डिजिटल ग्रंथालय, माध्यम प्रशिक्षण केंद्र आणि पत्रकार कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. कपूर यांनी सांगितले.

यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. सिडकोची ही इमारत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, आता ही इमारत प्रत्यक्ष आज हस्तांतरित करण्यात येत असल्याचे सांगून या इमारतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे डॉ. मुखर्जी यांनी सांगितले.

या कार्यक्रमास संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळे, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्रिया रातांबे यांचेसह माहिती व जनसंपर्कचे आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी तर संचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी यांनी आभार मानले.

असे आहे माहिती भवन…

● नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती भवन

● सिडको इमारतीच्या सुमारे ६ हजार ८८३ चौरस फुट क्षेत्रफळाच्या भव्य जागेत माहिती भवन सुरु होणार.

● तळमजला आणि पहिला मजला असे स्वरुप असलेल्या या इमारतीत कॉन्फरन्स रुम, कार्यालये, बहुद्देशीय सभागृह, अतिथी कक्ष, प्रतिक्षा कक्ष, स्वयंपाकघर, वाहनतळ आदी सुविधा.

● इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे २.५८ कोटी रुपये खर्च.

● अद्ययावत स्टुडिओ, लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा, राज्यस्तरीय माध्यम प्रशिक्षण केंद्र, पत्रकार कक्ष, ग्रंथालय, डिजिटल ग्रंथालय, विविध प्रकाशनांचे दालन, प्रदर्शन दालन, दुर्मिळ छायाचित्रांचे दालन, दुर्मिळ दृकश्राव्य दालन, समाजमाध्यम कक्ष, पत्रकार परिषद कक्ष, माध्यम प्रतिसाद केंद्र आदींचा माहिती भवनात समावेश

महावितरणच्या विद्युत सहायक पदभरतीत समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

0

मुंबई, दि. 24 : महावितरण कंपनीच्या विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक व पदविकाधारक/ पदविधारक शिकाऊ अभियंता (वितरण/स्थापत्य) या पदांच्या भरती प्रक्रियेत शासन निर्णयानुसार समांतर आरक्षण धोरण राबवावे. या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

विद्युत सहायक पदभरतीसंदर्भात प्रतिक्षा यादीमध्ये समांतर आरक्षण लावून सुधारित निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सु.ह.आंधळे, महावितरणचे महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, सहायक महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, कक्ष अधिकारी  पल्लवी पालांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले की, शासन सेवा प्रवेशासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे धोरण ठरविण्यात आले आहे. समांतर आरक्षण धोरणानुसार एखाद्या समांतर आरक्षण प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास ते पद त्या-त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरण्यात येते. त्यामुळे निवड यादीमध्ये पात्र समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास उमेदवार प्रतिक्षा यादीतून भरणे आवश्यक आहे.

महावितरणच्या पदभरतीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यशासनामार्फत ऊर्जा विभागाला एकत्रित शपथपत्र दाखल करण्याबाबत सूचित केले असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देखील राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिले.

अपघाताची कारणे शोधली तरच अपघात कमी होतील-सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती राजश्री गुंड

पुणे- रस्ता सुरक्षिततेबाबत जागृती करणेकरिता पीएमपीएमएल कडील चालकांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन व वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केल्याने पीएमपीएमएल चालकांना याचा नक्कीच फायदा होईल. तसेच चालकांनी अपघाताची कारणे शोधली तर अपघात कमी होतील; असे मत पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी व्यक्त केले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चालकांसाठी दि. २४मे ते दि. ०१जून पर्यंत आयोजित
केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर (अॅडमिनअॅण्ड एच.आर.) सुबोध मेडसीकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अभिजीत वसगडे, चिफ मॅकेनिकल इंजिनीअर सुनील बुरसे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) राजेश रूपनवर, झोनल मॅनेजर सतिश गाटे,झोनल मॅनेजर . विक्रम शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. श्रीमती राजश्री गुंड म्हणाल्या, “पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेच्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चालक सेवकांना पीएमपीएमएल ने सात दिवस प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक यांचेकडून चालकांना त्यांच्याकडून होणाऱ्या चुका कोणत्या अपघाताची कारणे कोणती व ती कशी टाळता येथील या करीता मार्गदर्शन करणार आहेत. तसेच चालकांनी अपघाताची कारणे शोधली तर अपघात कमी होतील.” पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर (अॅडमिन अॅण्ड एच.आर.) मा. श्री. सुबोध मेडसीकर म्हणाले, “चालक हा समाजामधील नाक, कान व डोळे असुन चालकावरच पीएमपीएमएलची प्रतिमा तयार होते. तसेच चालक व वाहक यांनी
लोकांना चांगली सेवा दिली तर त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा तयार होत असते त्यामुळे अधिकाऱ्यांचीही चांगली प्रतिमा तयार होत असते.”
यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मा. श्री. अभिजीत वसगडे यांनी चित्रफितद्वारे रोडमार्किंग, ट्रॅफिक सिग्नलचे प्रकार, ट्रॅफिकचे नियम मोडल्यास किती दंड व शिक्षा असते या बाबतची माहिती दिली. तसेच अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झोनल मॅनेजर सतिश गाटे यांनी केले तर आभार जनरल मॅनेजर (अॅडमिन अॅण्ड एच.आर.) सुबोध मेडसीकर यांनी मानले.

बासर (तेलंगणा) येथे ५ ते ८ जून दरम्यान श्री दत्त मंदिराचाजीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठापना व दत्तधाम वास्तुपूजन सोहळा

0

पुणे : ज्ञानसारस्वतीचे अधिष्ठान, तसेच गुरुचरित्रातील १४ व्या अध्यायाचे पवित्र स्थान असलेल्या तेलंगणा येथील बासर गावातील पुरातन दत्त मंदिराच्या जीर्णोद्धार व भक्तार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त दि. ५ ते ८ जून २०२२ दरम्यान तीन शंकराचार्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्रीगुरुमंदिर नागपूर प्रणित श्री नृसिंह सरस्वती आणि सायंदेव सेवा समिती बासर यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्नाटकातील हम्पी पीठाचे पूज्यपाद श्री जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्यारण्य भारतीस्वामी, कंपाली नारायण भारती पीठाचे पूज्यपाद श्री जगद्गुरू शंकराचार्य श्री नारायण विद्याभारतीस्वामी आणि करवीर पीठाचे मठाधिपती पूज्यपाद श्री जगद्गुरू शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी या तीन शंकराचार्यांसह परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी चार दिवस हा सोहळा रंगणार आहे. या काळात श्रीगुरुचरित्र अखंड शृंखला पारायण दि. ६ रोजी पहाटे ६ पासून ते दि. ८ रोजी पहाटे ६ पर्यंत श्रीदत्त मंदिरात होणार आहे.
रविवार (५ जून) दुपारी ३ वाजता सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. बासरी व व्हायोलिनच्या सुरेल मैफलीचा ‘सुरनाद संध्या’ हा कार्यक्रम होणार असून, यात प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक व प्रसिद्ध व्हायोलिन वादक श्रुती भावे यांचा कलाविष्कार पेश होणार आहे. सोमवारी (६ जून) पहाटे ६ पासूनच कार्यक्रम सुरु होतील. यात काकड आरती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा त्रिदिवसीय विधी प्रारंभ, उपासना आदी उपक्रम होतील. सकाळी १० वाजता नागपूरचे मोहनबुवा कुबेर यांचे कीर्तन पुष्प पहिले सादर होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हंपी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हातून ‘कल्याण’ पादुकांची स्थापना व श्रींची नगर प्रदक्षिणा होईल.
मंगळवारी (७ जून) काकड आरती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा द्वितीय दिवस विधी, उपासना आदी उपक्रम होतील. सकाळी १० वाजता नागपूरचे मोहनबुवा कुबेर यांचे कीर्तन पुष्प दुसरे होईल. त्यानंतर १२ वाजता कंपाली पीठ व संकेश्वरपीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते गोपूजन व कामधेनू स्थापना होणार आहे. दुपारी ४ वाजता उपासनेचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘कलादर्शन’ होणार आहे. यानंतर सायंकाळी ७ वाजता सद्गुरुदास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा होणार आहे. यावेळी दोन्ही शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत.

शेवटच्या दिवशी बुधवारी (८ जून) नियमित विधी उपासनांबरोबर सकाळी ९ वाजता तेलगू नाटिका सादर होणार आहे. त्यानंतर भजन सेवा होईल. सकाळी पावणेअकरा वाजता मरडसगाव येथील गुरु गंगागिर महाराज मठ संस्थानचे संत दत्तगीर महाराज यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. भक्तार्पण सोहळा, संतपूजन, संत आशीर्वचन व सद्गुरुदास महाराज यांचे समारोपीय आशीर्वचन याने सोहळ्याचा समारोप होईल.

अधिकाधिक उपासकांनी या चार दिवसांच्या श्रीदत्त मंदिराच्या जीर्णोद्धार व भक्तार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे. येणाऱ्या दत्तभक्तांसाठी ४ दिवस राहण्या-जेवण्याची व्यवस्था निःशुल्क करण्यात आली आहे. तसेच पुण्यातून नाममात्र शुल्क घेऊन जाण्या-येण्याची व्यवस्था केली आहे. भक्त व उपासकांनी सहभागासाठी संपर्क ९८२३००६६७६, ८३८१००१९२६, ९८२२९६८६८९ या दूरध्वनींवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री नृसिंह सरस्वती आणि सायंदेव सेवा समिती बासर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सैनिकी मुलां – मुलींना वसतिगृह प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 24: शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी सैनिकी मुलां-मुलींसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून इच्छुक युद्ध विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक व सेवारत सैनिक यांनी आपल्या पाल्याच्या वसतिगृह प्रवेशासाठी संबंधित वसतिगृह अधीक्षक किंवा अधीक्षिका यांच्याकडे ३० जून २०२२ पर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (नि.) यांनी केले आहे.

मुलां-मुलींच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित माहिती पत्रक व प्रवेश अर्ज पर्वती येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह व नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे १ जूनपासून कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

प्रवेशासंबधी वसतिगृह व्यवस्थापन समितीची बैठक संबधित वसतिगृहामध्ये सोमवार ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार असून पालकांनी व प्रवेश घेणाऱ्या पाल्यांनी संबंधित वसतिगृहामध्ये उपस्थित राहावे. यावेळी सेवानिवृत्तीबाबतचे पुस्तक, पीपीओ, माजी सैनिक ओळखपत्र, विधवा ओळखपत्र, ईसीएचएस ओळखपत्र आदी सैन्यातील कागदपत्रे सोबत आणावीत.

विद्यापीठाची प्रवेश प्रक्रियेस विलंब होत असल्यास वसतिगृह प्रवेश अर्ज जमा करण्याची तारीख वाढवून देण्यात येणार आहे, असेही कळवण्यात आले आहे.
000

सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहामध्ये नौकर भरती: १५ जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 24:- सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहाकरिता अशासकीय कर्मचाऱ्यांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, इतर नागरिकांनी १५ जून पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज सादर करावेत.

पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये सहाय्यक वसतिगृह अधीक्षक ३ (पुरूष), मानधन १४ हजार ८५२ रुपये, स्वयंपाकी ९ (महिला) मानधन ८ हजार ९११ रुपये, सफाई कर्मचारी ३ (पुरूष), मानधन ७ हजार ९२१ रुपये, माळी १ (पुरूष) मानधन ४ हजार ९२० रुपये तसेच नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहामध्ये सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका ३ (महिला), मानधन १४ हजार ८५२ रुपये, स्वयंपाकी ७ (महिला) मानधन ८ हजार ९११ रुपये, सफाई कर्मचारी २ (पुरूष), मानधन ७ हजार ९२१ रुपये, माळी १ (महिला) मानधन ४ हजार ९२० रुपये अशी पदे भरण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी ०२०-२६१२२२८७ या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर तसेच वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल (भ्र.ध्व. क्र. ७०२०४१०९५४) आणि वसतिगृह अधीक्षिका अनिता पाटेकर (भ्र.ध्व. क्र. ९४०४५८१९४७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (नि.) यांनी केले आहे.

तारकर्लीत २० पर्यटकांना घेऊन येणारी बोट बुडाली – दोघांचा मृत्यू

0

सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटकांची बोट बुडून झालेल्या अपघातामध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. जय गजानन नावाची २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असताना ती बुडून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर सात जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, ११ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.आकाश भास्करराव देशमुख (वय ३० रा. शास्त्रीनगर अकोला), डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय ४१ आळेफाटा, पुणे) अशी दोन्ही मृतांची नावं आहेत. रश्मी निशेल कासुल (वय ४५ रा. ऐरोली, नवी मुंबई) यांच्यावर रेडकर हॉस्पीलट येथे तर संतोष यशवंतराव (वय ३८ बोरिवली, मुंबई), डॉ. अविनाश झांटये हॉस्पीटल येथे उपचार सुरु आहेत.तसेच, मृणाल मनिष यशवंतराव (वय ८), ग्रंथ मनिष यशवंतराव (वय दीड वर्ष), वियोम संतोष यशवंतवराव (वय- साडेचार वर्ष), सर्व रा. बोरिवली मुंबई. वैभव रामचंद्र सावंत(वय ४० रा. वायरी तारकर्ली), उदय भावे (वय ४० ऐरोली, नवी मुंबई ) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुभम गजानन कोरगावकर (वय २२) शुंभागी गजानन कोरगावकर, (वय २६ रा. दोघेही केरवडे , कुडाळ) लैलेश प्रदिप परब (वय ३०), अश्विनी लैलेश परब (वय ३० रा. दोघेही कुडाळ). मुग्धा मनिष यशवंतराव (वय ४०) मनिष यशवंतराव (वय ४०) आयुक्तीे यशवंतराव (३१ रा. सर्व बोरिवली, मुंबई). सुशांत आण्णाासो धुमाळे (वय ३२), गितांजली धुमाळे (वय २८रा. दोघेही जयसिंगपूर जि. कोल्हापूर). प्रियन संदिप राडे (वय १४ रा. प्रज्ञानंद नगर, पुणे), व सुप्रिया मारुती पिसे (वय ३१ रा. पुणे) यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.

डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत वैष्णवी सिंग, अभिलिप्सा मल्लिक, श्रावणी देशमुख, ओमकार शिंदे यांचा मानांकित खेळाडूंवर विजय 

पुणे,  24 मे 2022: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील  टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात ओमकार शिंदे याने तर, मुलींच्या गटात वैष्णवी सिंग, अभिलिप्सा मल्लिक, श्रावणी देशमुख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात वैष्णवी सिंग हिने अव्वल मानांकित श्रीया साईचा 6-1, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. बिगरमानांकीत अभिलिप्सा मल्लिक हिने कडवी झुंज देत पाचव्या मानांकित प्रतिष्ठा सानीचा 6-4, 0-6, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. श्रावणी देशमुख हिने सातव्या मानांकित रिद्धी शिंदेचा 6-1, 6-2 असा सहज पराभव केला. लकी लुझर ठरलेल्या श्रीमोई कामतने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या ध्रुवा मानेचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. 
मुलांच्या गटात ओमकार शिंदेने आठव्या मानांकित अर्चित धूतचे आव्हान 6-3, 6-4असे संपुष्ठात आणले. चुरशीच्या लढतीत अवनीश चाफळे याने अद्विक नाटेकरवर 7-5, 4-6, 6-3 असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. अभिराम निलाखेने आशुतोष कवडेकरचा 5-7, 6-1, 6-0 असा तर, अमोघ दामलेने दिव्यांक कवितकेचा 6-2, 6-2 असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. 
निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुले:लक्ष गुजराथी[1] वि.वि.अनुज तशीलदार 2-6, 6-1, 6-0;अवनीश चाफळे वि.वि.अद्विक नाटेकर 7-5, 4-6, 6-3; अमोघ दामले वि.वि.दिव्यांक कवितके 6-2, 6-2;अभिराम निलाखे वि.वि.आशुतोष कवडेकर 5-7, 6-1, 6-0;ओमकार शिंदे वि.वि.अर्चित धूत[8] 6-3, 6-4; पियुश जाधव वि.वि.अर्जुन कीर्तने  6-4, 6-4;राघव अमीन[3] वि.वि.सिद्धांत कुलकर्णी 6-4, 6-1;

मुली:वैष्णवी सिंग वि.वि.श्रीया साई[1]  6-1, 6-4; श्रावणी देशमुख वि.वि.रिद्धी शिंदे[7] 6-1, 6-2;देवांशी प्रभुदेसाई[4] वि.वि.भक्ती ताजने 6-0, 6-3; 
रिशीता पाटील वि.वि.आर्या शिंदे 3-6, 6-1, 6-3;अभिलिप्सा मल्लिक वि.वि. प्रतिष्ठा सानी [5] 6-4, 0-6, 6-3;साईइती वराडकर[3]वि.वि ह्रितिका कापले  3-6, 1-0 सामना सोडून दिला; श्रीमोई कामत वि.वि.ध्रुवा माने 6-2, 6-3;रितिका मोरे[8] वि.वि.नेहा केळकर 7-6(5), 6-1; 
दुहेरी: मुले: दुसरी फेरी:लक्ष गुजराथी/स्वराज ढमढेरे[1] वि.वि.पारस घाडगे/संतोष भुजबळ 6-0, 6-1;अमोघ दामले/शिवम पाडिया वि.वि.सिद्धांत कुलकर्णी/अंकित रे 6-1, 6-2;शार्दूल खवळे/क्रिशांक जोशी वि.वि.नचिकेत गोरे/स्वर्णिम येवलेकर 6-1, 6-2;अर्णव बनसोडे/अभिराम निलाखे वि.वि.समीहन देशमुख/सूर्या काकडे 6-0, 6-1;

ओम दळवी मेमोरियल वनप्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ईश्वरी कारेकर, स्वरा जावळे, शिबानी गुप्ते यांचे विजय 

 पुणे, 24 मे 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वन प्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात ईश्वरी कारेकर, स्वरा जावळे, शिबानी गुप्ते ये खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली. 

महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात ईश्वरी कारेकर हिने सहाव्या मानांकित काव्या तुपेचा 6-4, 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित स्वरा जावळेने नम्रता झंवरचा 1-6, 6-1, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. शिबानी गुप्तेने सारा फेंगसेला 6-1, 6-1 असे सहज पराभूत केले. 
मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अतीतटीच्या सामन्यात सर्वज्ञ सरोदेने नीरज जोर्वेकरचा टायब्रेकमध्ये 4-6, 6-2, 7-6(2) असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित वरद उंद्रेने सुजय देशमुखचा 6-0, 6-3 असा तर, सहाव्या मानांकित आर्यन कीर्तनेने क्वालिफायर युगंधर शास्त्रीचा 6-2, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली.  स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुले:स्मित उंद्रे[1]वि.वि.कियान पटेल 6-1, 6-1; सय्यम पाटील वि.वि.अवी मिश्रा 6-0, 6-4;  वीरेन चौधरी[4] वि.वि.पृथ्वीराज दुधाने 6-0, 6-1;सर्वज्ञ सरोदे वि.वि.नीरज जोर्वेकर  4-6, 6-2, 7-6(2); तनिष्क देवरे वि.वि.अझलन शेख 6-3, 6-3; अंशुल पुजारी वि.वि.रतन कुबसाद  7-6(1), 6-1; वरद उंद्रे[2]वि.वि.सुजय देशमुख 6-0, 6-3;आर्यन कीर्तने[6] वि.वि.युगंधर शास्त्री 6-2, 6-1;  मुली: स्वरा जावळे[1]वि.वि.नम्रता झंवर 1-6, 6-1, 6-2;  ईश्वरी कारेकर वि.वि.काव्या तुपे[6] 6-4, 6-2; सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.आर्या पाठक  6-0, 6-2;  शिबानी गुप्ते वि.वि.सारा फेंगसे 6-1, 6-1; ऐश्वर्या स्वामिनाथन[7]वि.वि.रितू ग्यान 6-2, 6-0;   रित्सा कोंडकर[3] वि.वि.अहाना पाटील 6-1, 6-2; काव्या पांडे[5]वि.वि.श्रावी देवरे 2-6, 6-4, 7-5;रितिका डावलकर[2]वि.वि.ओजसी देगमवर 6-0, 6-0;
दुहेरी: मुले: दुसरी फेरी: आदिनाथ कचरे/शौर्या गडदे वि.वि.मिहीर काळे/प्रत्युश काळे 6-2, 6-1;पृथ्वीराज दुधाने/नील देसाई वि.वि.तनिश पाटील/अझलन शेख 5-7, 7-6(4), 10-4;अंशुल पुजारी/सर्वज्ञ सरोदे वि.वि.त्रिशिक वाकलकर/सुजय देशमुख[4] 6-1, 7-5;प्रजीत मदिरेड्डी/आश्रित माज्जी वि.वि.सय्यम पाटील/राघव अगरवाल 7-5, 3-6, 10-6;रतन कुबसाद/अर्चन पाठक वि.वि.रुद्र मेमाने/अथर्व बगाडे 6-3, 6-4;
मुली: शिबानी गुप्ते/मायरा टोपणो वि.वि.आदिती खानापुरी/ईश्वरी कारेकर 6-4, 5-7, 10-1. 

टाटा रुग्णालयातील बाल कर्करुग्णांचा राज्यपालांशी संवाद

0

मुंबई, दि. 24 : टाटा कर्करोग रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या 40 बाल कर्करुग्णांनी मंगळवारची सकाळ राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासोबत आनंदात घालवली. राज्यपालांनी यावेळी मुलांशी संवाद साधला, त्यांना खाऊ वाटला तसेच बच्चे कंपनीची राजभवन सैर करवली.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या इम्पॅक्ट फाउंडेशनतर्फे बालरुग्णांच्या राजभवन भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

आई-वडील आपल्यावर जितके प्रेम करतात तितकेच प्रेम उपचार करणारे डॉक्टर्स देखील करतात असे यावेळी संवाद साधताना राज्यपालांनी मुलांना सांगितले. डॉक्टर्स हे देवाचेच रूप असतात असे सांगून कर्करोगातून लवकर बरे होऊन गरीब आणि गरजू लोकांची सेवा करावी असे राज्यपालांनी मुलांना सांगितले.

राजभवन येथे आलेल्या अनेक बाल कर्करुग्णांनी समुद्र आणि मोर प्रथमच पाहिल्यामुळे मुले अत्यंत आनंदी झाल्याचे टाटा रुग्णालयातील निवासी डॉक्टर अनिशा चक्रवर्ती यांनी राज्यपालांना सांगितले.

टाटा रुग्णालयात गेल्या वर्षभरात नोंदणी झालेल्या 1 लाख रुग्णांपैकी 1800 बालरुग्ण असल्याचे सांगून मुलांचे लवकर रोगनिदान झाले तर कर्करोगातून बरे होण्याचे प्रमाण वाढते असे त्यांनी सांगितले.

यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटल इम्पॅक्ट फाउंडेशनच्या जान्हवी सावंत यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली, अनिल त्रिवेदी यांनी सूत्रसंचालन केले तर सुरेश मिश्रा यांनी भजन म्हटले.