Home Blog Page 1982

41 कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन GST घोटाळा -प्रवीण भबूतमल गुंदेचाना अटक

इनपुट टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई

पुणे दि.25: महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने जवळपास 41 कोटीच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाची ७ कोटी ३८ लक्ष रुपयांच्या कर महसूलाची हानी करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक केली आहे.

में जिरावाला मेटल्स या व्यापाऱ्याच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवा कर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहीमे अंतर्गत प्रवीण भबूतमल गुंदेचा यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली आहे. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या  व्यापाऱ्यांचा  कसून शोध घेत आहे. विभागाकडून या आर्थिक वर्षात आतापर्यंत दहा कारवाया करण्यात आल्या आहेत.

अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे,राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त दत्तात्रय व आंबेराव, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर सहाय्यक आयुक्त सतीश दगडु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली आहे.

हेल्मेट सक्ती व विविध कारणांकरिता वाहतूक पोलिसांकडून दंड वसुलीच्या तक्रारी -राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली दखल

0

राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची घेणार बैठक

मुंबई, दि.२५ : राज्यात हेल्मेट सक्ती व विविध कारणांकरिता वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली केल्या जात असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होत आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेणार असल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्यात वाहतूक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने दंड वसुली झाल्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुषंगाने आज मंत्रालयात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोना कालावधीत संचारबंदी असताना बाहेर फिरण्याऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यामागे लोकांचा जीव वाचावा असा उद्देश शासनाचा होता. मात्र या काळात वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली झाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने लवकरच राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्रांना शासन निर्णयानुसार कालबद्धरित्या उत्तर देणे बंधनकारक आहे. त्यानुसार एखाद्या प्रकरणाविषयी ज्यादा कालावधी लागत असल्यास कमीतकमी दोन महिन्यात कार्यवाहीचा अहवाल संबंधित लोकप्रतिनिधींना उपलब्ध करुन देण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कोल्हापूर कारागृहात रंगली भजन-अभंग स्पर्धा

0

पुणे : बंदिवान म्हणून कारागृहात असलो तरी बंदीजनांसाठी जगत्गुरू तुकाबारायांच्या नावाने कारागृहात स्पर्धा घेतल्या, या स्पर्धेत आम्हाला सहभागी होता आले यामुळे कारागृहातच विठुरायाचे दर्शन झाल्याची प्रचिती मिळाली अशी भावना व्यक्त केल्या आहेत, कोल्हापूर जिल्हा कारागृहातील बंदीजनांनी. संत रचनांनंतर ‘माणूस होऊन राहिन मी’ या सादर करण्यात आलेल्या स्वरचित भजनाने भावनिकतेचा कळस गाठला.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. आज कोल्हापूर जिल्हा कारागृहातील बंदीजनांनी आपले सादरीकरण करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. कारागृह निरीक्षक जयवंत भोसले, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ आदी उपस्थित होते.
स्पर्धेविषयी बंदीजनांमध्ये उत्सुकता दिसून आली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी’ या अभंगाच्या सादरीकरणाने स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर संत एकनाथ महाराजांचा ‘ज्या सुखा कारणे देव वेडावला’ आणि अखेरीस संत तुकाराम महाराज यांचा ‘कुठे शोधू जीवाला विसावा’ हा अभंग सादर केला.
बंदीजनांनी एक स्वरचित रचना सादर करावी, अशीही स्पर्धेची एक अट होती. याला अनुसरून ‘माणूस होऊन राहिन मी, व्यसनाचा नाद आयुष्य बरबाद करी, वाईटाची साथ नको आता’ ही समाजप्रबोधनपर रचना सादर करण्यात आली. या रचनेस उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
बंदीजनांमध्ये निश्चितच सुधारणा होईल
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या अभंग-भजन सादरीकरण स्पर्धेमुळे बंदीजनांमध्ये भक्तीरस वाढीस लागून अध्यात्माच्या माध्यमातून चांगले विचार रुजायला आणि त्यांची जडणघडण व्हायला निश्चितच उपयोग होईल. कारागृहातून बंदीजन बाहेर गेल्यानंतर आयुष्याची भविष्यातील वाटचाल चांगल्या मार्गाने करतील असा विश्वास वाटतो.
जयवंत भोसले, कोल्हापूर कारागृह निरीक्षक


घडले विठुरायाचे दर्शन
कारागृहातील बंदीजनांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेचा बंदीजनांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. वारीत सहभागी न होताही येथेच आम्हाला विठुरायाचे दर्शन झाले, अशा भावना बंदीजनांनी व्यक्त केल्या.


महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फे्रम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.

ओबीसी आरक्षण: आघाडी सरकार फसवणूक करत असल्याचा भाजपा प्रदेशाध्यक्षांचा आरोप

मुंबई-ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्याचा निर्धार करून भारतीय जनता पार्टीने बुधवारी मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अटक करून घेतली. महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष आ . चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.

.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, सरचिटणीस आ. अतुल सावे, खासदार प्रीतम मुंडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. राम सातपुते, आ. मनिषा चौधरी, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते.

प्रदेश कार्यालयातून मंत्रालयाकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविल्यानंतर पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात तसेच ओबीसींना परत राजकीय आरक्षण देण्याच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नाकर्त्या सरकारने राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळे ते या विषयाचा अभ्यास करत नाहीत आणि मार्गही काढत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले आव्हान आहे की, त्यांनी एकदा जाहीरपणे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीची तिहेरी चाचणी काय आहे आणि एंपिरिकल डेटा गोळा कसा करायचा हे सांगावे. महानगरपालिकांच्या वॉर्डांची महिला आरक्षणाची सोडत ३१ मे रोजी पूर्ण झाली की त्यानंतर एंपिरिकल डेटा गोळा केला आणि न्यायालयाने तो स्वीकारला तरी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणे अवघड होईल. तरीही आघाडी सरकार डेटाबाबत फसवणूक करत आहे.

त्यांनी सांगितले की, न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या स्तरावर २७ टक्के तिकिटे ओबीसींना देऊन हे आरक्षण लागू करेल. महाविकास आघाडी सरकारची दानत नसेल तर किमान शिवसेनेने जाहीर करावे की येणाऱ्या निवडणुकीत भाजपाप्रमाणे २७ टक्के तिकिटे ओबीसींना देऊ.

आ.सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ओबीसींच्या शत्रूशी आमचे युद्ध सुरू झाले आहे या भावनेने येथे ओबीसी बांधव आले आहेत. महाविकास आघाडी सरकारकडे ठेकेदारांना देण्यासाठी पैसे आहेत पण ओबीसींची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांची फी देण्यासाठी पैसे नाहीत. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने ओबीसी राजकीय आरक्षण टिकवले आहे. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी बांधवांबद्दल प्रेम असेल तर त्यांनी मध्य प्रदेशात मंत्र्यांची समिती पाठवून शिवराजसिंह चौहान यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्रीनाथ भिमालेंवर कारवाई करावी -खुद्द खासदार बापट म्हणाले…

पुणे-सॅलिसबरी पार्कमधील उद्यानाच्या नामांतर प्रकरणी स्थानिक रहिवाशांच्या भावनांची दखल न घेतल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्याविषयी पुण्याचे खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे, यावेळी नाराजी व्यक्त करूनच ते थांबले नाहीत तर भिमाले यांच्यावर कारवाई भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करायला हवी असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.यापूर्वी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना देखील बापट यांनी आपण ४५ वर्षे नगरसेवक आमदार आणि आता खासदार म्हणून राजकारणात आहोत पण पुण्यात कुठे हि आपण आपले अगर आपल्या कुटुंबियांचे नाव कुठल्या बागेला रस्त्याला, प्रकल्पाला दिले नाही असा उल्लेख केला होता.

सॅलिसबरी पार्कमध्ये महापालिकेने उभारलेल्या उद्यानाला महापालिकेच्या सर्व रीतसर प्रक्रिया पूर्ण करून पाच विषयांमध्ये सुवर्णपदके मिळविलेले कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि वनस्पती शास्त्राचे अभ्यासक म्हणून लौकिक ज्यांचा होता त्या स्व.यशवंतराव भिमाले यांचे नाव उद्यानाला देण्यात आले.त्यास काही कार्यकर्त्यांनी तसेच काही नागरिकांनी आक्षेप घेतला व सॅलिसबरी पार्क उद्यान असे नाव द्यावे, असे म्हणणे वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने मांडले आहे. त्यासाठी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट असोसिएशन नावाने गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. दुसरीकडे भिमाले या नावाच्या समर्थनार्थ देखील काही रहिवाशांनी आंदोलन केले.या परिसराचे नाव सॅलिसबरी पार्क आहे पार्क म्हणजे उद्यान.या परिसरात एवढे एकच नाही तर आणखीही उद्य्याने आहेत त्यामुळे हे नाव इथे योग्य होत नाही भिमाले यांचे नाव सार्थक आणि योग्य आहे एका प्राध्यापकाच्या नावाला विरोध केला तर आम्ही सारे आंदोलन करू अशी भूमिका देखील मांडली गेली तर भिमाले या नावाला विरोध करणार्यांनी याबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही साकडं घातलं आहे. या पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेनंतर खासदार बापट म्हणाले, ”सॅलिसबरी पार्क मधील रहिवासी गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. महापालिकेच्या विकास कामांना कुटुंबीयांची नावे देण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही, ते योग्य नाही. त्यामुळे रहिवाशांच्या भावनांची दखल घ्यावी असे मी भिमाले यांना सांगितले आहे. परंतु त्यांनी त्याबाबत कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली आहे.

आबा बागुल म्हणाले ,बड्या मंडळींना ‘अभय’ आणि सामान्यांवर दडपशाही,थांबवा ती नियमबाह्य अतिक्रमण कारवाई,नाही तर ….

आंदोलनाचा इशारा नवीन मुख्यसभा  अस्तित्वात येईपर्यंत अतिक्रमण  कारवाईला स्थगिती द्यावी अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.  

पुणे -सद्यस्थितीत शहरात पालिका प्रशासनाकडून   सुरु असलेली  अतिक्रमण कारवाई नियमबाह्य असून बड्या मंडळींना ‘अभय’ आणि सामान्यांवर दडपशाही असा कारभार सुरु आहे.कोणतीही नोटीस न देता,हिअरिंग न घेता  सर्वसामान्य व्यवसायिकांना  वेठीस धरणे  तसेच   न्यायालयाच्या परवानगीशिवाय मिळकती सील करण्याचा प्रकार काँग्रेस पक्ष कदापी  खपवून घेणार नाही.वेळ पडली तर रस्त्यावरून उतरून आंदोलन छेडले जाईल असा इशारा काँग्रेसचे पालिकेतील माजी गटनेते आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. 

यासंदर्भात काँग्रेसचे पालिकेतील माजी गटनेते आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांना पत्र  दिले आहे. त्यात म्हटले आहे की,गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. छोटे – मोठे व्यवसाय करणाऱ्यांची अवस्था अजूनही बिकट आहे. त्यांचे व्यवसाय पूर्वपदावर येत असताना,सद्यस्थितीत पालिका प्रशासनाकडून ‘ प्रशासकीय राज’ च्या निमित्ताने जोरदार अतिक्रमण कारवाई सुरु आहे. ती अत्यंत चुकीची आहे. एकतर कोणतीही नोटीस न देता,थेट कारवाईचा बडगा उगारला जात आहे. प्रसंगी काही रकमेच्या थकबाकीसाठी  मिळकती जप्त /सील करण्याची प्रक्रिया होत आहे. वास्तविक अशी कोणतीही कारवाई करताना संबंधितांना ३० दिवसांची नोटीस दिली जाते.  ‘हिअरिंग’ घेणे क्रमप्राप्त असताना, काही रकमेच्या थकबाकीसाठी तसेच स्टॉल असो किंवा कोणताही व्यवसाय ठिकाणी  बारीक बारीक गोष्टींचा आधार घेऊन प्रशासनाकडून सुरु असलेली कारवाई एकप्रकारे हुकूमशाहीची दर्शन घडवत आहे. त्यात बड्या मंडळींना ‘अभय’ आणि सामान्यांवर कारवाईची ‘कुऱ्हाड’ असा प्रकार पाहावयास मिळत आहे. एकतर कोरोनामुळे आधीच कर्जबाजारी झालेले लोकं व्यवसायातून उभारी घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यात सध्या महापालिका विसर्जित झाल्यापासून गेले दोन महिने लोकप्रतिनिधी अस्तित्वात  नाहीत , नेमक्या या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरु आहे. परिणामी लोकांनी कुठे दाद मागायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.याकडेही  आबा बागुल यांनी लक्ष वेधले असून  प्रशासनाकडून तडकाफडकी सुरु असलेली कारवाई लोकशाहीला घातक  ठरत आहे.हेही निदर्शनास आणून दिले आहे.   

  कोट्यवधींची थकबाकी असलेल्या मिळकतींवर कारवाई नाही ;पण काही रकमेची थकबाकी असलेल्या मिळकतींना सील लावणे,जप्तीची कारवाई सुरु आहे. वास्तविक न्यायालयाच्या आदेशाशिवाय अथवा परवानगीशिवाय कोणत्याही मिळकतींना सील लावता येत नाही किंवा जप्तीची कारवाईही करता येत नाही.हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे. तो महापालिका आयुक्तांना आणि मुख्यसभेलाही नाही.असे असताना कायद्याचे उल्लंघन करून प्रशासन बेकायदेशीरपणे  कारवाई करत आहे. त्यामुळे या बेकायदेशीर प्रक्रियेला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल,असा इशारा आबा बागुल यांनी दिला आहे. तसेच  आतापर्यंत केलेल्या अतिक्रमण विरोधी  कारवाईची सखोल चौकशी करण्याबरोबरच  सर्व कायदेशीर सल्ला घेऊन आणि नवीन मुख्यसभा  अस्तित्वात येईपर्यंत अतिक्रमण  कारवाईला स्थगिती द्यावी अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.  

पावसकर म्हणाले ,’अहो राष्ट्रपती येताहेत , उद्याची पाणीकपात रद्द ….

पुणे-पुण्यात गुरुवारी होणारी पाणीकपात मागे घेण्यात आलीय.शहरातील पर्वती, लष्कर, SNDT, होळकर व वारजे पाणी पुरवठा झोन अंतर्गत दुरुस्ती कारणाने पाणी पुरवठा बंद करण्याचे महापालिकेने नियोजन केले होते.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे ही पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.गुरुवारी नेहमी प्रमाणे पाणी पुरवठा सुरू राहील अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली

शहरातील पर्वती, लष्कर, एसएनडीटी, होळकर व वारजे पाणी पुरवठा विभागात विद्युत व स्थापत्य विषयत अंतर्गत दुरुस्ती निमित्त गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद असेल असे जाहीर केले होते. पण राष्ट्रपती कोवींद हे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आहेत. महापालिकेकडून एक दिवस पाणीपुरवठा बंद असला तरी त्याचा परिणाम पुढील एक ते दोन दिवस होतो.

अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने गुरुवारी दुरुस्तीच्या कामानिमित्त पाणी बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कामे नंतर केली जाणार आहेत. उन्हाळ्यात महापालिकेने पाणी बंदचा निर्णय मागे घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

८० हजार कोटींचे गुंतवणूक करार, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक

0

दावोस, स्वित्झर्लंड, दि. २४ –  दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी  सरस ठरली. आज ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींचे करार करण्यात आले. यानिमित्ताने तीन दिवसांत सुमारे ८० हजार कोटींचे करार पूर्ण झाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते.

ऊर्जा निर्मितीसाठी ५० हजार कोटी गुंतवणूक करण्यासाठी रि न्यू पॉवर कंपनीने राज्य शासनासोबत करार केला. कंपनीचे संचालक सुमंत सिन्हा उपस्थित होते. याद्वारे राज्यात दहा ते १२ हजार मेगावॅट ऊर्जा निर्माण होणार आहे. याशिवाय आज इंडोनेशियाच्या एशिया पल्प अँड पेपर कंपनीने रायगड जिल्ह्यात सुमारे १.५ बिलियन यूएसडी गुंतवणुकीसाठी करार केला. याशिवाय वेदांता ग्रुपचे संचालक अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीसंबधी अमरा राजा ग्रुपचे संचालक जय गल्ला यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

दरम्यान,  राज्य सरकारने राज्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये आणि मुंबईतील महापालिका शाळांमध्ये डिजिटल सामग्री सादर करण्यासाठी बायजूस यांच्या सोबत सामंजस्य करार केला, याप्रसंगी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, सचिव (शालेय शिक्षण) रणजित सिंग देओल व बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन व दिव्या रवींद्रन उपस्थित होते. शिवाय राज्याने जागतिक ग्रीन बिल्डिंग कौन्सिलसोबत ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, राज्याला शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यास मदत करण्यासाठी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव ( उद्योग ) श्री बलदेव सिंह, महावितरणचे व्यवस्थपकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे सीईओ डॉ पी. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. मलिकनेर आणि महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) अभिजित घोरपडे या सोहळ्यात स्वाक्षरी करणाऱ्या कंपन्यांच्या उद्योग प्रतिनिधींसह उपस्थित होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र अव्वल – मंत्री हसन मुश्रीफ

0

मुंबई, दि. 25 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांचे मूल्यांकन व संनियंत्रण केंद्र शासनाच्या वतीने केले जाते. यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशातील प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येकाच्या मनाचा  उत्सव आहे. त्यामुळे त्याचा महोत्सव पुढेही सुरू ठेवून महाराष्ट्राचे प्रथम क्रमांकाचे स्थान पुढेही टिकून राहिल, असा विश्वास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी  व्यक्त करून सर्व अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

ग्रामविकास व पंचायतराज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध पातळीवर उपक्रम घेण्यासंदर्भातील नियोजन केले होते. त्यामध्ये ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या उमेद अभियान, ग्रामीण गृहनिर्माण विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन, पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) कायदा (पेसा), ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, प्रशिक्षण संस्था, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा विविध स्तरावरील यंत्रणांद्वारे कार्यक्रमांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी सप्टेंबर 2021 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत येणाऱ्या दिनविशेष, सप्ताह, पंधरवडा इ. मध्ये करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास‍ व पंचायतराज विभागाने भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या https://indiaat75.nic.in या संकेतस्थळावर 2 लाख 49  हजार 123 कार्यक्रमांचे आयोजन करून देशात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान मिळविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज्याच्या ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात ४१  हजार ४४० कार्यक्रमांसह दुसऱ्या तर २८ हजार ९०३ कार्यक्रमांसह झारखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या उपक्रमात ग्रामपंचायत स्तरावर २ लाख ४१ हजार ४७१, पंचायत समिती ५२०९  तर जिल्हा परिषदांचे २४४३ असे एकूण २ लाख ४९ हजार १२३ कार्यक्रम छायाचित्रासह भारत सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड झाले आहेत. त्यात राज्यातील अहमदनगर, पुणे, लातूर हे जिल्हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. एकूण २७ हजार ८९८ ग्रामपंचायतींपैकी २६ हजार २०० ग्रामपंचायतींची माहिती या पोर्टलवर अपलोड झाली आहे. उर्वरित ग्रामपंचायतीची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त केले आहे. राज्यात २७ हजार ८९८ ग्रामपंचायतींपैकी २७ हजार ८९२  ग्रामपंचायतींमध्ये नोडल अधिकारी नियुक्त केले असून, ५०६७  समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यातही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ उत्तराखंड २०२० समित्यांसह दुसऱ्या स्थानावर तर १९१६ समित्यांच्या स्थापनेसह राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली राज्यस्तरावरुन राज्य नोडल अधिकारी डॉ. राजाराम दिघे, संचालक-ग्रामीण गृहनिर्माण हे काम पाहत असून त्यांचे समवेत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यक्रम व्यवस्थापक अनंता मुदगले, ग्रामीण गृहनिर्माण कक्षातील संघरत्न सोनोणे व संघपाल चव्हाण हे काम पाहत आहेत.

जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून त्यांचे समवेत सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे (VSTF) जिल्हा कार्यकारी हे सहाय्य करीत आहे.

‘महिंद्रा’ने नागपुरात मोबाईल डिझेल डिलिव्हरी उपलब्ध करून देण्यासाठी‘रेपोज एनर्जी’ आणि ‘नवांकुर इन्फ्रानर्जी’ यांच्यासोबत केली भागीदारी

रस्तेवाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उद्योग विभागातील ‘एमएसएमई’चे संचालक पी. एम. पार्लेवार यांच्या हस्ते ‘बूस्टर डिझेल’ या ‘नवांकुर इन्फ्रानर्जी मोबाईल इंधन पंपा’चे उद्घाटन

·         इंधन प्रत्यक्ष वापरणाऱ्यांची घरपोच डिझेल वितरणाची मागणी पूर्ण करण्यासाठी बूस्टर डिझेल देईल संपूर्ण नागपुरात सेवा.

·         रेपोज मोबाईल बाऊजर सोल्यूशन’मुळे विक्रेते व ग्राहक या दोघांनाही इंधन वितरण प्रक्रिया अखंडीत व सुरक्षित पद्धतीने मिळते. आयओटी तंत्रज्ञानामुळे या ‘बाऊजर सोल्यूशन’ला एक नावीन्यपूर्ण उत्कृष्टतेचे स्वरूप..

·         भारतातील २२०हून अधिक शहरांमध्ये १५००हून अधिक भागीदारांच्या माध्यमातून, २५००हून अधिक रेपो मोबाईल पेट्रोल पंपांद्वारे ‘रेपोज’ची सेवा उपलब्ध.

·         रेपोज एनर्जीने विकसित केलेले पूर्णपणे बिल्ट फ्युएल बाउझर महिंद्रा फ्युरिओ श्रेणीच्या हलक्या आणि मध्यम व्यावसायिक वाहनांवर उपलब्ध.

·         हलक्या व मध्यम ट्रकची श्रेणी असलेली ‘महिंद्रा फ्युरिओ’ वाहने ही खास भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन ‘पिनिनफारिना’ने डिझाइन केली आहेत. जागतिक दर्जाचे डिझाइन आणि उत्कृष्ट अभियांत्रिकी, सर्वात सुरक्षित, सर्वात अर्गोनॉमिक आणि आरामदायक केबिन अशा वैशिष्ट्यांमुळे या श्रेणीने नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत. जास्त मायलेजची हमी आणि उत्पादनाचे इतर श्रेष्ठ गुणधर्म यांमुळे या श्रेणीला एका संपूर्ण बिझनेस सोल्यूशनचे स्वरूप लाभले आहे.

नागपूर२५ मे२०२२ : इंधनाचे घरपोच वितरण हे मॉडेल देशभरात झपाट्याने विकसित झाले आहे आणि कोविडनंतरच्या काळात ते आणखी वेगाने वाढले आहे. जागतिक पुरवठा साखळी आणि इंधन व्यापाराचे अर्थशास्त्र, विद्यमान वितरण मॉडेलची संरचनात्मक मर्यादा, ग्राहकांची बदलती खरेदी वर्तणूक आणि तांत्रिक व्यत्यय अशा अनेक घटकांमुळे हे मॉडेल विकसीत झाले आहे. इंधन प्रत्यक्षात वापरणाऱ्या नागपुरातील ग्राहकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी, नवांकुर इन्फ्रानर्जीने आपला मोबाईल इंधन पंप – ‘बूस्टर डिझेल’ – सादर केला आहे. या मोबाईल इंधन पंपाचे उद्घाटन रस्तेवाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी, तसेच उद्योग विभागातील एमएसएमईचे संचालक पी. एम. पार्लेवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना नवांकुर इन्फ्रानर्जीचे संचालक नचिकेता पांडे म्हणाले, “इंधनाचे प्रत्यक्ष वापरकर्ते आणि उद्योग क्षेत्र यांची घरपोच इंधन पोचवण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी बूस्टर डिझेल हे इंधन बाऊझर संपूर्ण नागपुरात सेवा देण्यास सज्ज आहे. हा बाऊजर ‘महिंद्रा फ्युरिओ ११’ या ट्रकवर बसविण्यात आला आहे. तो दुहेरी वितरण करणारा ‘अल्फा मोबाईल इंधन पंप’ आहे. हा मोबाइल इंधन बाउझर पुण्यातील ‘रेपोज एनर्जी’ या कंपनीने तयार करून आम्हाला पुरविला आहे. ‘डोअरस्टेप डिझेल डिलिव्हरी’ हा उपक्रम एक कार्यक्षम ऊर्जा वितरण पायाभूत सुविधा निर्माण करेल आणि ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिझेल पुरविण्याची एक कायदेशीर व ग्राहकाभिमुख  यंत्रणा उभी राहील.”

“महिंद्रा’ आणि ‘रेपोज’च्या भागीदारीत आम्ही या प्रदेशात मोबाईल इंधन वितरणामध्ये आमची उपस्थिती आणखी वाढवू”, असे नवांकुर इन्फ्रानर्जीचे संचालक महेंद्र निलावार यांनीही म्हटले.

घरपोच इंधन वितरणाची मागणी पूर्ण करण्यासाठी ‘रेपोज एनर्जी’ने हलकी व मध्यम व्यावसायिक श्रेणीची वाहने वापरण्याचे ठरविले असून त्याकरीता ‘फ्युरिओ ट्रक’ उपयोगात आणण्यासाठी ‘महिंद्रा’शी करार केला आहे.

या प्रसंगी बोलताना,’ रेपोज एनर्जीचे सह-संस्थापक चेतन वाळुंज म्हणाले, “फिरत्या सुविधांच्या सहाय्याने सर्व वस्तू उपलब्ध करून देण्याच्या दिशेने संपूर्ण जग वाटचाल करीत असताना, भारतातही डिझेलचे वितरण ग्राहकांना घरपोच इंधन पुरविण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. मोबाईल पेट्रोल पंपांद्वारे डिझेलचे वितरण करणे ही आमची एक मोठी कामगिरी आहे. ‘फ्युएल बाउझर’च्या उपयोजनेसाठी ‘महिंद्रा फ्युरिओ’तर्फे आम्हाला उत्कृष्ट आणि अत्यंत उपयुक्त असे उत्पादन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू शकतो आणि भविष्यात सर्व प्रकारच्या ऊर्जा साधनांच्या वितरणात क्रांती आणू शकतो, असा आत्मविश्वास आम्हाला मिळाला आहे.”

या प्रसंगी बोलतांना, ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमधील व्यापारी वाहन विभागाचे व्यवसाय प्रमुख जलज गुप्ता म्हणाले, “अनेक उद्योगांमध्ये डिझेलचा बराच खप होत असतो. तेथे डिझेल एकदम व मोठ्या प्रमाणात लागत असते. हे उद्योग बॅरल्स आणि बाउझर्स यांसारख्या अयोग्य साधनांचा वापर करून पंपांवरून डिझेल खरेदी करतात. यामध्ये गळती, चोरी, डेड मायलेज अशा प्रकारांतून डिझेल वाया जाते, तसेच मनुष्यबळावर मोठा खर्चही होतो. त्यामुळे या उद्योगांचे मोठे नुकसान होते. ‘फ्युएल बाऊझर’ व्यवसायामधील ‘रेपोज एनर्जी’च्या कौशल्याची जोड घेऊन, आम्ही या उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि राष्ट्रउभारणीत आमचे योगदान देण्यासाठी आकर्षक स्वरुपाचे उत्पादन सादर करीत आहोत. ‘महिंद्रा’च्या व्यापारी वाहनांच्या श्रेणीतील हलक्या व मध्यम स्वरुपाच्या गाड्यांमध्ये काही विशेष गुणधर्म आहेत. या गाड्या ‘फ्युएल बाउझर’च्या कामासाठी अगदी योग्य व फायदेशीर ठरणार आहेत. आम्ही नवांकुर इन्फ्रानर्जीचे अभिनंदन करतो, कारण ते इंधन उद्योजक आहेत आणि भारताच्या ऊर्जा वितरण क्षेत्रात कार्यक्षमता आणण्यासाठी आपले योगदान देत आहेत.”

वीजबिलासाठी १.१६ लाखांवर ग्राहकांकडून कागदाचा वापर पूर्णतः बंद

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’मध्ये पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर

पुणे: वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख १६ हजार २४३ पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी राज्यात आघाडी घेतली आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमधून बिलासाठी कागदाचा वापर बंद केला तरी वीजबिलाची दरमहा प्रत संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच प्रतिबिल १० रुपये सवलत देखील देण्यात येत आहे.

सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात ८० हजार ९१६, सातारा- ८५११, सोलापूर- ८६१५, कोल्हापूर- १० हजार ९५ आणि सांगली जिल्ह्यात ७२८६ वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षभरात ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत ३१ हजार २०० वीजग्राहकांचा सहभाग वाढला आहे. महावितरणची पर्यावरणपुरक ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त ग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये वीजबिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटसह ते तात्काळ ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मान्सून…………..

0

भारतातील पावसाळा हा अनेक मोठ्या आणि विस्तृत प्रक्रियांनी बनलेला असतो. मे-जून महिन्यात भारतीय द्वीपकल्प उष्णता तापू लागते, तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आसपास आणि दक्षिणेकडील तापमान तुलनेने कमी असते. तापमानातील या फरकामुळे समुद्रातील पाण्याचे ढग जड होतात. ते प्रमाणाने उत्तर भारताकडे जातात आणि तिथे जाताना संपूर्ण भारतात पाऊस पडतो, याला मान्सून पाऊस म्हणतात.मान्सून आणि प्री मान्सून कधी होतो?भारतीय द्वीपकल्पात प्री मान्सून पाऊस उत्तरेकडील भागांत आधी येतो आणि प्रथम निघून ही जातो. उत्तर भारतात जून महिन्याला मान्सूनपूर्व हंगाम म्हणतात. मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात आधी दाखल होतो. पण महिनाअखेरीस मान्सून लवकरच उत्तर भारतात पोहोचतो. पण मान्सून आणि प्री मान्सून पावसाच्या वैशिष्ट्यांमध्ये काही फरक आहे.
प्री मॉन्सूनची वैशिष्ट्येप्री मान्सून पाऊस वैशिष्ट्य म्हणजे उष्णता आणि आर्द्रता. ही अस्वस्थता दिवसभर आणि रात्रभर राहते. मात्र जोरदार वाऱ्यांमुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळतो. पण पावसाळ्यात वारे आणि लांब पावसामुळे तापमानात घट होते. याशिवाय ढग आणि त्यांच्या प्रवाहातही मोठा फरक आहे. मान्सूनपूर्व ढग वरच्या दिशेने सरकतात आणि सहसा फक्त संध्याकाळी पाऊस पडतो.ढगांचा फरकजिथे प्री मॉन्सून ढग वरच्या दिशेने सरकतात आणि जास्त तापमानात तयार होतात. तर मान्सूनचे ढग हे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पसरलेले स्तरित ढग असतात. या थरांमध्ये उच्च आर्द्रता असते. मान्सूनपूर्व पाऊस जोरदार आणि तीव्र असतो, जो एक-दोन दिवसांत संपतो. त्याच वेळी, मान्सूनच्या पावसाची पाळी लांब असते आणि हा पाऊसही वारंवार पडतो.
वेळेतील फरकदोन्ही प्रकारचे पाऊस एकत्र दिसत नाहीत. मान्सूनचा पाऊस दिवसाच्या कोणत्याही वेळी येऊ शकतो. पण प्री मान्सून दुपारनंतर किंवा संध्याकाळीच येतो. याशिवाय दोन्ही पावसात वाऱ्याचा फरक आहे. प्री मान्सून पाऊस म्हणजे सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे होणारे धुळीचे वादळ.वार्‍याचं अंतरउष्णता आणि तापमानात जास्त फरक असल्याने, मान्सून सुरू होण्यापूर्वी समुद्र आणि जमिनीवरील वारे अधिक जोर देतात, ज्यामुळे आर्द्रता आणि ढगाळ परिस्थिती निर्माण होते. पण पावसाळ्यात असे वारे ठळकपणे दिसत नाहीत. होय, अनेक वेळा मान्सूनमुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे जोरदार वारे नक्कीच पाहायला मिळतात.

वार्‍याचं अंतरउष्णता आणि तापमानात जास्त फरक असल्याने, मान्सून सुरू होण्यापूर्वी समुद्र आणि जमिनीवरील वारे अधिक जोर देतात, ज्यामुळे आर्द्रता आणि ढगाळ परिस्थिती निर्माण होते. पण पावसाळ्यात असे वारे ठळकपणे दिसत नाहीत. होय, अनेक वेळा मान्सूनमुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे जोरदार वारे नक्कीच पाहायला मिळतात.
म्हटल्याप्रमाणे प्री मान्सून पाऊस हा केवळ मर्यादित क्षेत्रात स्थानिक पावसासारखा असतो. परंतु मान्सूनचा पाऊस बराच मोठा भाग व्यापतो आणि या काळात संपूर्ण परिसरात एकसारखे हवामान असते.
कृषीप्रधान देश असल्याने, भारतातील लोक मान्सूनच्या पावसाची अधिक वाट पाहतात कारण मान्सूनच्या पावसाचा कोटा पूर्ण होतो की नाही यावर पुढील वर्षाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असते.

अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई होणार – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

0

मुंबई, दि २५ : अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, कर्जदारांच्या तक्रारींची दखल घ्यावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. सनदशीर मार्गाने कर्जवसुली न करता ज्या कंपन्या कर्जदारांना अन्यायकारक वागणूक देत आहेत, अशा कंपन्यांविरोधात कर्जदारांनी पोलिसात तक्रार द्यावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.

कोल्हापूर जिह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीने होणाऱ्या कर्जवसुलीबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर, आमदार नरेंद्र दराडे, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून असभ्य भाषेचा वापर करणे, कर्जदारांना रस्त्यात अडविणे, घरात घुसणे अशा प्रकारचे वर्तन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या, अवैध कर्ज वसुलीबाबत पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. तक्रारींची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अवैध कर्ज वसुलीबाबतच्या तक्रारींचा अहवाल पोलिस अधीक्षकांनी सादर करावा. हा अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाईल. कंपन्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीला वेळीच आळा घातला पाहिजे, असेही गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जन्मदिनानिमित्त महानायक सावरकर कार्यक्रमाचे आयोजन.

पुणे – संवाद पुणे व बढेकर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंती निमित्त महानायक सावरकर क्रांती सूर्याची तेजस्वी गाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम व सावरकर विचारधारा युवा पुरस्कार शनिवार दिनांक २८ मे रोजी ५:३० वाजत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे
अभिनेत्री व लेखिका अपर्णा चोथे हिला सावरकर विचारधारा युवा पुरस्कार माननीय नीलम ताई गोऱ्हे – उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बडेकर ग्रुप चे प्रवीण बढेकर उपस्थित राहणार आहेत
पुरस्कार वितरणानंतर महानायक सावरकर हा गीत संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे . कार्यक्रमाची संकल्पना सुनील महाजन यांची असून निर्मिती निकिता मोघे यांनी केली आहे . कार्यक्रमाची संहितां आणि निवेदन ऋचा थत्ते यांची असून श्रुती देवस्थळी , सुजित सोमण , हेमंत वाळूजकर हे पार्श्वगायक सहभागी होतील , वाद्यवृंद दर्शना जोग , अमृता ठाकूर देसाई , ऋतुराज कोरे , केदार मोरे राजेंद्र सबनीस हे सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम सर्व रसिकांना विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा अशे आव्हान संवाद पुणे चे सुनील महाजन यांनी केले आहे.

शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित भजन-अभंग स्पर्धेत सातारा कारागृहात निनादला टाळ-मृदंगाचा गजर

0

बंदिजनांच्या सादरीकणाने भक्तीरसाची अनुभूती
पुणे – कारागृहाचे आवार असले तरी सर्वदूर पसरलेली आमराई आणि टाळ, मृदंगाच्या ठेक्यावर बंदीजनांनी सादर केलेल्या संतरचनांनी भक्तीरसाची अनुभूती आली.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सातारा कारागृहातील बंदीजनांनी आपले सादरीकरण केले.
‘जय जय राम कृष्ण हरि’, ‘अलंकापुरी..’, ‘अंजनीच्या सुता’ या संत रचनांबरोबरच स्वरचित ‘विठ्ठलाची मूर्ती आली भिमा तिरी’ ही रचना मोठ्या भक्तीभावाने सादर केली. वयाची 80 वर्षे पार केलेल्या एका आजोबांच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारागृहात आणखी एक वेगळेपण जाणवले ते म्हणजे बंदिजन आणि तुरुंग अधिकार्‍यांचे जिव्हाळ्याचे नाते. या नात्यातूनच कलाकारांमधील कलागुणांना वाव मिळाल्याचे दिसून आले.
कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर दुबे, प्रशासन अधिकारी आर. टी. भापकर, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ, प्रतिष्ठानच्या सातारा शाखा प्रमुख क्रांती पाटील, सीमा जाधव आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या माध्यमातून सद्मार्ग दाखविला
बंदिजन हा समाजातील दुर्लक्षित घटक समजला जातो. अशा व्यक्तींसाठी कुणीतरी पुढे येऊन काम करणे अपेक्षित असते. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने एक आगळावेगळा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे, याचे कौतुक वाटते. भजनाचे साहित्य, जीवनाला आकार देऊ शकेल असे संतसाहित्य, तुकोबारायांचा अभंग असलेली लक्षवेधी फ्रेम यामुळे बंदिजनांच्या आयुष्याला निश्चितच चांगला मार्ग मिळू शकेल.
ज्ञानेश्वर दुबे, कारागृह अधीक्षक


स्पर्धेेमुळे वारीची सुरुवात
80 वर्षांपेक्षा जास्त असलेले एक आजोबा बंदिवासात आहेत. तेही स्पर्धेत सहभागी झाले होते. वारीला नियमित जात होते. पण सध्या बंदिवासात असल्याने त्यांना पंढरीची वारी करता येत नव्हती. भजन-अभंग स्पर्धेमुळे वारीला सुरुवात झाली असेच वाटते आहे, असे त्यांनी भावविवशतेने सांगितले.


महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फे्रम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.