Home Blog Page 1981

सुप्रीम कोर्ट म्हणाले – पोलिसांनी सेक्स वर्कर्सना नाहक त्रास देऊ नये,वेश्यालय चालवणे बेकायदा मात्र ‘प्रॉस्टीट्यूशन’ हा एक व्यवसाय आहे .

0

नवी दिल्ली- वेश्याव्यवसाय अर्थात “प्रॉस्टीट्यूशन”ही एक व्यवसाय असल्याचा महत्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिला. न्यायालयाने या प्रकरणी सर्वच राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना सेक्स वर्कर्सच्या कामात हस्तक्षेप न करण्याचे आदेश दिलेत. ‘पोलिसांनी प्रौढ व सहमतीने लैंगिक कार्य करणाऱ्या महिलांवर फौजदारी कारवाई करु नये,’ असेही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे.खंडपीठाने म्हटले की, ‘या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानातील कलम 21 अंतर्गत सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. पोलिसांना एखाद्या कारणाने त्यांच्या घरावर छापेमारी करावी लागली तर सेक्स वर्कर्सना अटक किंवा त्रास देऊ नका. स्वतःच्या इच्छेने प्रॉस्टीट्यूट बनणे अवैध नाही. केवळ वेश्यालय चालवणे बेकायदा आहे.”पोलिसांनी वेश्यांना आदराने वागवावे. त्यांच्याशी तोंडी किंवा शारिरीकदृष्ट्या गैरवर्तन करू नये. कुणालाही सेक्स वर्कर्सना लैंगिक कार्यासाठी मजबूर करता येणार नाही,’ असेही न्यायालयाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे.

न्यायालयाने सेक्स वर्कर्सच्या समस्यांविषयी दाखल याचिकेवर सुनावणी करताना हा फैसला दिला. कोर्ट म्हणाले -‘सेक्स वर्कर्सही कायद्यांतर्गत सन्मान व समान सुरक्षेच्या हकदार आहेत.’ न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती बी.आर.गवई व न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने सेक्स वर्कर्सच्या हक्कांना सुरक्षित करण्याच्या दिशेने 6 निर्देशही जारी केलेत. कोर्टाने म्हटले आहे की, ‘सेक्स वर्कर्सही देशाचे नागरिक आहेत. तेही कायद्यानुसार समान संरक्षणाचे हकदार आहेत.’

‘महिला सेक्स वर्कर आहे. केवळ यामुळे त्यांच्या मुलांना आईपासून विभक्त करता येत नाही. एखादे मूल वेश्यालय किंवा सेक्स वर्करसोबत राहताना आढळले तर त्यावरुन त्याची तस्करी झाल्याचे सिद्ध होत नाही,’ असेही न्यायालयाने या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.

पोलिसांनी सेक्स वर्कर्सप्रती संवेदनशील व्हावे

‘एखाद्या सेक्स वर्कर्सवर अन्याय झाला तर तिला तत्काळ मदत उपलब्ध करवून द्यावी. विशेषतः तिचा लैंगिक छळ झाला असेल, तर तिला कायद्यानुसार वैद्यकीय मदतीसह लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेसारख्या सर्वच सुविधा मिळाल्या पाहिजेत. काही प्रकरणांत पोलिस सेक्स वर्कर्सप्रती क्रूर व हिंसक भूमिका घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिस व यंत्रणांनी सेक्स वर्क्सच्या अधिकारांबाबत अधिक संवेदनशील असले पाहिजे,’ असे कोर्ट म्हणाले.

ओम दळवी मेमोरियल वनप्लेस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सृष्टी सूर्यवंशीला दुहेरी मुकुटाची संधी 

पुणे, 26 मे 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वनप्लेस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात सृष्टी सूर्यवंशी हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. 

महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने काल अव्वल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या ईश्वरी कारेकरचा 6-4, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या मानांकित रितिका डावलकरने सातव्या मानांकित ऐश्वर्या स्वामिनाथनचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून आपले आव्हान कायम राखले.  दुहेरीत याच गटात सृष्टी सूर्यवंशी व रितिका डावलकर या अव्वल मानांकित जोडीने काव्या तुपे व ऐश्वर्या स्वामिनाथन यांचा 6-0, 6-4 असा तर, रित्सा कोंडकर व काव्या पांडे यांनी शिबानी गुप्ते व मायरा टोपणो यांचा 6-7(5), 6-4, 10-6 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

मुलांच्या गटात अव्वल मानांकित स्मित उंद्रेने सय्यम पाटीलचे आव्हान 6-2, 6-2 असे मोडीत काढले. सर्वज्ञ सरोदेने चौथ्या मानंकित वीरेन चौधरीवर 6-1, 6-4 असा विजय मिळवला. तनिष्क देवरेने अंशुल पुजारीचा 6-2, 6-4 असा तर, सहाव्या मानांकित आर्यन कीर्तनेने दुसऱ्या मानांकित वरद उंद्रेचा 6-4, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी): मुले:
सर्वज्ञ सरोदे वि.वि.स्मित उंद्रे[1]4-6, 6-2, 6-2;
आर्यन कीर्तने[6] वि.वि.तनिष्क देवरे 7-6(5), 6-4;

मुली:
सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.ईश्वरी कारेकर 6-4, 6-1;
रितिका डावलकर[2]वि.वि.ऐश्वर्या स्वामिनाथन[7]6-2, 6-2;

दुहेरी: मुले:उपांत्य फेरी:
स्मित उंद्रे/वरद उंद्रे[1]वि.वि.आर्यन कीर्तने/नमिश हूड[3]  6-3, 2-6, 10-7; 
वीरेन चौधरी/अथर्व डकरे[2] वि.वि. अंशुल पुजारी/सर्वज्ञ सरोदे  6-4, 5-7, 13-11;

मुली:
सृष्टी सूर्यवंशी/रितिका डावलकर[1]वि.वि.काव्या तुपे/ऐश्वर्या स्वामिनाथन[4] 6-0, 6-4;  
रित्सा कोंडकर/काव्या पांडे[2]वि.वि.शिबानी गुप्ते/मायरा टोपणो 6-7(5), 6-4, 10-6.

अशा प्रकारे विरोधक नामोहरम तर होणार नाहीत उलट त्यांचे मनोबल वाढेल -संजय राऊत म्हणाले ,’ ईडीच्या वापरामुळे भाजप खड्ड्यात जाईल .

मुंबई-सर्व निवडणुका सुरळीतपणे होतील, सरकार सुरळीत चालेल आणि अशा कारवायांमुळे भारतीय जनता पक्ष रोज खड्ड्यात जातो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या 55 वर्षात कधी मिळाले नव्हते, तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहे, म्हणून राज्यातील विरोधकांना अशा प्रकारे नामोहरम करणे वाटत असेल तर शिवसेनेचे मनोबल किंबहुना महाविकास आघाडीचे मनोबल अजिबात खच्ची होणार नाही, अशा कारवायांमुळे आमचे मनोबल वाढत जाईल.महाविकास आघाडी परिवहन मंत्री अनिल परबांच्या पाठिशी आहे. ईडीच्या कारवायांमुळे भाजप रोज खड्ड्यात जातोय, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. अनिल परब यांच्या सात ठिकाणांवर आज ईडीने कारवाई केली. त्यानंतर राऊत प्रसारमाध्यमांशी मुंबईत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अनिल परब हे आमचे सहकारी आहेत. ते एक कॅबिनेट मंत्री आहेत. पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहेत. ज्या प्रकारचे ईडीकडून अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर आरोप लावण्यात आले, त्यापेक्षाही गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षांच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कोणीही हात लावत नाही. आम्ही सगळे, पक्ष आणि सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तुम्ही सूडाच्या आणि बदलाच्या भावनेने कितीही कारवाई करा, तरीही आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी आगपाखड केली.शिवसेनेचे उमेदवार आज दुपारी 1 वाजता राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील यावेळी उपस्थित राहणार आहे. महाविकास आघाडी एक होती आणि एकच राहिल, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, आमच्याकडे देखील भारतीय जनात पक्षाच्या लोकांचे असंख्य पुरावे आहेत. कारवाया झालेल्या आहेत. जितू नवलानीला कोणी पळवले? याचा उत्तर त्यांनी द्यावे, असा सवाल राऊतांनी भाजपला केला आहे. महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम बंगालमधल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या ज्या कारवाया सुरू आहेत, ते फक्त राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे. महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी सुरू आहे, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेला त्रास द्यायचा, आम्हाला बदनाम करायचे, महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणायचे, त्यांची कोंडी करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा सरळ सरळ गैरवापर करून हा प्रयत्न केला जातो. पण आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. दिल्लीला देखील भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांचे कागदपत्रे दिले आहेत. त्यावर साधे केंद्राकडून उत्तर येत नाही. विक्रांत घोटाळा हा या देशातला सर्वात मोठा घोटाळा आहे. मात्र, त्यांना दिलासा मिळतो. टॉयलेट घोटाळा अजून मोठ्या प्रमाणात समोर येईल. मानहानीचा गुन्हा दाखल केला म्हणून मी मागे हटणार नाही. इतर काही प्रकरणांमध्ये आम्ही हात घातला आहे. आम्ही त्यासंबंधीचे कागदपत्रे ईडीकडे पाठवलेली आहेत. ती फाईल देखील उघडण्याची त्यांची मानसिकता नाही, पण एक लक्षात घ्या आम्ही पण तुम्हाला पाहून घेऊ, असा इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.

ईडी छापेमारी: केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर नको;तक्रारी आल्या तर राज्य सरकारची यंत्रणा कारवाई करू शकते ..उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई-कारवाया करणे, तपास करणे हे तपास यंत्रणांचा अधिकार असून याप्रकरणी आता अनिल परब यांच्यावर कारवाई सुरू आहे. परंतु कुठल्या आधारावर ही कारवाई सुरू आहे, याची माहिती नाही.“मागेही काहींनी सूतोवाच केले होते की आता अमक्याचा नंबर, तमक्याचा नंबर. काही जण बोलतात आणि नंतर तशा पद्धतीने घडतं. यात असा यंत्रणांकडून कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे तपास करण्यासाठी कुणाची ना नाही. तपासाचा अधिकार नियमाने त्यांना दिला आहे. पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा सगळ्यांची असते,अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग राज्य सरकारच्या हातात आहे. सीआयडी राज्य सरकारच्या हातात आहे. त्याच्याकडे काही तक्रारी आल्या तर राज्य सरकारची यंत्रणा कारवाई करू शकते, त्याप्रकारे केंद्राचीदेखील यंत्रणा कारवाई करू शकते. तो अधिकार कायद्याने त्यांना दिलेला आहे, पण त्याचा गैरवापर होऊ नये याची माफक अपेक्षा सर्वांची आहे.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सात ठिकाणांवर आज ईडीने छापेमारी केली. त्याप्रकरणी अजित पवार बोलत होते.

अनिल परब यांच्यावर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे याची माहिती मला नाही. मी आज काहीतरी बोलायचं आणि तिकडे दुसरंच काहीतरी निघायचे. मी माहिती घेतल्याशिवाय या विषयी काही सांगणार नाही. केंद्राच्या यंत्रणांना, राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करण्याचे अधिकार आहेत. मात्र, केंद्राने आणि राज्याने कोणाच्याही बाबतीत दुरुपयोग करू नये, असे अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या काही सहकाऱ्यांवरदेखील अशा प्रकारच्या कारवाया झाल्या होत्या. आता शिवसेनेत कारवाई झाली याचा अधिकार यंत्रणांना आहे. पण त्याचा गैरवापर होऊ नये हीच सर्वांची माफक अपेक्षा आहे.

मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी ईडीचे छापे,सोमैय्या म्हणाले ,अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परबनी तयार राहावे

0

मुंबई-राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरू झाली आहे. आज सकाळी 6.30 च्या सुमारास ईडीने ही छापेमारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिल परबांशी संबंधित 7 ठिकाणांवर ईडीने धाड टाकली आहे. अनिल परबांविरोधात ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा आहे. आता शिवसेनचे अनिल परब यांच्यावर देखील ईडीने कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. मनी लाँड्रिगप्रकरणी ईडीने परबांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्स देखील बजावू शकते.मनी लॉड्रिंगप्रकरणी यापूर्वीदेखील अनिल परबांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे. परिवहन विभागातील बदल्यांमध्ये गैरप्रकार करून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोपही अनिल परबांविरोधात करण्यात आला आहे. याप्रकरमी आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांचीदेखील ईडीने चौकशी केली होती. ईडीची आजची कारवाई याच प्रकरणाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप ईडीकडून याप्रकरणी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय बेनामी संपत्तीप्रकरणी काही दिवसांपूर्वीच आयकर विभागाने परब यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात दापोली रिसॉर्टचादेखील समावेश होता. तसेच खरमाटे आणि वांद्रेतील परबांच्या सीएच्या घरीदेखील धाड टाकण्यात आली होती.

अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परबनी तयार राहावे

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आज ईडीने परबांवर छापा टाकल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या म्हणाले की, सुरुवातीला अनिल देशमुख त्यानंतर नबाव मलिक आणि आता अनिल परब ईडीच्या गुन्ह्यात अडकले आहेत. अनिल देशमुखांनी देखील शेकटो कोटींचा घोटाळा केला आहे. संजय कदम हे अनिल परब यांचे पार्टनर असून त्यांच्या घरी सव्वातीन कोटी रुपये मिळाले होते. 25 कोटींचा बेनामी रिसॉर्ट उद्धव ठाकरेंचे मंत्रालय चालवत होते, मात्र आता सगळं संपलं आहे, असे सोमय्या म्हणाले.सचिन वाझेकडून येणाऱ्या 100 कोटींमध्ये देखील अनिल परब यांचे नाव होते. त्याचे सारे काळे कारनामे बाहेर येणार आहे. आता अनिल परबांनी बॅग भरायला हवी असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

दोन महिन्यांपासून मलिक तुरुंगात

काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरही ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तब्बल दोन महिन्यांपासून नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. आता अनिल परब यांच्यावरही ईडीने थेट गुन्हाच दाखल केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. आता ईडीकडून अनिल परब यांना अटक केली जाणार का, हे पाहावे लागेल.

साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.

सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार…

0

सीबीआयने भ्रष्टाचारा प्रकरणात ४ एप्रिलला सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. याच प्रकरणात सचिन वाझेंनी बुधवारी कलम ३०६ अंतर्गत आपले वकिल रौनक नाईक यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे.सचिन वाझेंनी आपल्या अटकेनंतर सीबीआयने पूर्णपणे तपास केला असून आपण त्यांना तपासात सहकार्य केल्याचं सांगितलं आहे. सचिन वाझेंनी तपास अधिकाऱ्यांना आपण स्वच्छेने कबुली देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. यानंतर, न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांचा जबाब नोंदवला असून याला खटल्यादरम्यान पुराव्याचे मूल्य जास्त आहे.सचिन वाझेंनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी आपल्याकडे असणारी सर्व माहिती, पुरावे देण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.ईडीला दिलेल्या पत्रातही सचिन वाझेंनी आपण स्वच्छेने कबुली देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी सीबीआय आणि ईडी दोघांनाही आपण अनिल देशमुखांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्तराँना करोना काळात वेळमर्यादेपेक्षा जास्त काळ सुरु ठेवण्यासाठी पैसे गोळा केल्याचं सांगितलं होतं

सरकार 100 लाख मेट्रीक टनापर्यंत (एलएमटी) साखर निर्यातीला देणार परवानगी

0

मुंबई-साखर हंगाम 2021-22 (ऑक्टोबर-सप्टेंबर) दरम्यान देशांतर्गत उपलब्धता आणि किंमत स्थिर राखण्यासाठी सरकारने 100 लाख मेट्रीक टनापर्यंत (एलएमटी) साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.  डीजीएफटीने जारी केलेल्या आदेशानुसार, 1 जून 2022 पासून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्यास, साखर संचालनालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या विशिष्ट परवानगीने साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली जाईल.

साखरेच्या विक्रमी निर्यातीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. साखर हंगाम 2017-18, 2018-19 आणि 2019-20 मध्ये, केवळ 6.2 एलएमटी, 38 एलएमटी आणि 59.60 एलएमटी साखर निर्यात झाली. साखर हंगाम 2020-21 मध्ये 60 एलएमटीचं उद्दिष्ट होतं तर सुमारे 70 एलएमटी साखर निर्यात झाली आहे. चालू साखर हंगाम 2021-22 मध्ये, सुमारे 90 एलएमटी निर्यातीचे करार झाले आहेत. सुमारे 82 एलएमटी साखर, कारखान्यांनी निर्यातीसाठी पाठवली आहे आणि जवळपास 78 एलएमटी साखर निर्यात झाली आहे. चालू साखर हंगाम 2021-22 मध्ये साखरेची निर्यात ऐतिहासिकदृष्ट्या सर्वोच्च आहे.

साखर हंगामाच्या शेवटी (30 सप्टेंबर 2022) साखरेचा साठा 60-65 एलएमटी राहील याची खातरजमा या निर्णयामुळे केली जाणार आहे. हा साठा देशांतर्गत वापरासाठी आवश्यक असलेला 2-3 महिन्यांचा आहे (त्या महिन्यांत मासिक गरज सुमारे 24 एलएमटी आहे).  नवीन हंगामातील गाळप कर्नाटकात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि महाराष्ट्रात ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि उत्तर प्रदेशात नोव्हेंबरमध्ये सुरू होते. त्यामुळे साधारणपणे नोव्हेंबरपर्यंत साखरेचा पुरवठा मागील वर्षीच्या साठ्यातून होतो.

साखरेच्या निर्यातीत झालेली अभूतपूर्व वाढ आणि देशात साखरेचा पुरेसा साठा राखण्याची गरज लक्षात घेऊन तसेच साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवून देशातील सर्वसामान्य नागरिकांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारने 01 जून 2022 पासून साखरेचे निर्यात नियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखानदार आणि निर्यातदारांनी साखर संचालनालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून निर्यातीची परवानगी (ईआरओएस स्वरूपात) घेणे आवश्यक आहे.

देशभरातील साखर उत्पादन, वापर, निर्यात तसेच घाऊक आणि किरकोळ बाजारातील किमतीचा कल यासह साखर क्षेत्रातील परिस्थितीवर सरकार सतत लक्ष ठेवून आहे. चालू वर्षात भारत हा जगातील सर्वाधिक साखर उत्पादक आणि दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यात करणारा देश ठरला आहे. साखरेचे विक्रमी उत्पादन होऊनही, केन्द्र सरकारच्या नियमित प्रयत्नांमुळे, 2020-21 च्या मागील साखर हंगामातील उसाच्या थकीत रकमेपैकी 99.5% रक्कम अदा करण्यात आली आहे आणि चालू साखर हंगाम 2021-22 ची सुमारे 85% उसाची थकबाकी देखील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.  

देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. गेल्या 12 महिन्यांत साखरेच्या किमती नियंत्रणात आहेत. भारतातील साखरेच्या घाऊक किमती प्रति क्विंटल 3150 – 3500 रुपयाच्या दरम्यान आहेत तर देशाच्या विविध भागांमध्ये किरकोळ किमती देखील किलोमागे 36-44 रुपयांच्या दरम्यान नियंत्रणात आहेत.

चांगला अभिनेताच नाही तर त्यासोबत चांगला माणूसही होण्याची सोहम चाकणकर ची इच्छया…

‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘तू आणि मी, मी आणि तू’ चित्रपटाच्या पोस्टरचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न

पुणे- सिनेसृष्टी जरी झगमगती ,रंगीबेरंगी आकर्षक असली तरी या सृष्टीत पडद्याआडच्या बऱ्याच गोष्टी चिंताजनक आहेत .अशा सृष्टीत पदार्पण करताना केवळ चांगला अभिनेता च होऊन चालणार नाही तर त्या सोबत मला चांगला माणूस म्हणून हि जीवन व्यतीत करायचे आहे असे मत आज आपल्या वाढदिवशी होणाऱ्या पहिल्याच चित्रपटाच्या पोस्टर च्या अनावरण प्रसंगी सोहम चाकणकर याने व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या नेत्या , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम … त्याचा पहिलाच चित्रपट विना अॅटम सॉंग असलेला आणि आई -मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकू पाहणारा चित्रपट असला तरी त्याकडे लव स्टोरी म्हणूनही पाहिलं जाणार आहे. त्याची नायिका शिल्पा ठाकरे आणि चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक, संपूर्ण टीम तसेच प्रसिद्ध व्याख्याते दत्ता कोहिनकर,भाऊसाहेब भोईर आणि स्वतः रुपाली चाकणकर ,काका चव्हाण आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते .

‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘तू आणि मी, मी आणि तू’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. सोहमच्या वाढदिवशी आई मुलाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरचे त्याच्या आईच्या म्हणजेच रुपाली चाकणकरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत याची जाणीव या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर यांच्या फ्रेशजोडीने करून दिली. शिल्पाने आजवर बऱ्याच मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या असून सोहम या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकत आहे. ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत निर्माते सागर जैन, ऋषभ कोठारी, राजू तोडसाम निर्मित आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी लिखित आहे. तर चित्रपटाचे संगीताची बाजू संगीतकार प्रशांत सातोसे यांनी सांभाळली आहे,

प्रेमाची आगळीवेगळी कथा घेऊन येत शिल्पा आणि सोहमची जोडी रसिक प्रेक्षकांवर राज्य करण्यास ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटातून सज्ज झाली आहे.

आजच्या या कार्यक्रमादरम्यान रुपाली चाकणकर असे म्हणाल्या की,”सर्वप्रथम सोहमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि टीम यांचे मनापासून आभार की माझ्या मुलाला या क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी त्यांनी दिली. राजकारणात मला कोणताही वारसा नसताना मी जशी या क्षेत्रात उतरले तसेच माझ्या मुलाने सोहमने चाकणकर कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसताना अभिनयक्षेत्रात स्वकर्तृत्वावर करिअर करण्याचा निर्णय घेतला. माझे बॅकग्राऊंड राजकीय असल्याने, शूटिंग दरम्यान सोहमने मला एक विनंती केली की, तू चुकूनही सेटवर येऊ नको कारण तू जर सेटवर आलीस तर संपूर्ण टीमला राजकीय दबावाच दडपण येईल आपण ही क्षेत्र वेगवेगळी ठेवू असे त्याने मला सांगितले.”

मुळा-निळवंडे धरणांच्या सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाख तरतूद – मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख

0

मुंबई, दि. २५ : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मुळा धरणाच्या जलाशय/ नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

१०१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या १७ योजनांसाठी एकूण ३,९०० हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी २ कोटी ३७ लाख ३१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

योजनांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच उपसा सिंचन योजनांच्या कामासाठी निधी उपलब्ध होण्याबाबतची मागणी वेळोवेळी करण्यात येत होती. त्यामुळेच उपसा सिंचन योजनांची क्षेत्रीय प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शिंदोडी, मांडवे, बिरेवाडी, खरशिंदे, साकुर, वरवंडी, पेमगिरी, शिरापूर, डिग्रस, पारेगाव खु. व बु., तिगाव, काकडवाडी, करुले, क-हे, निमोन, व सोनोशी या १७ गावातील अवर्षण प्रवण क्षेत्राचा समावेश आहे. या भागात उपसा सिंचन झाल्यास पिण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. २५१  ते ६००  हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या १८००  हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी ९६ लाख ९८  हजार १४१  रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर १०१ ते २५०  हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या २१०० हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी १ कोटी ४०  लाख ३३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सर्वेक्षणानंतर प्रामुख्याने नलिका प्रणालीचे सखोल संकल्पन केल्यानंतर अहवाल सादर करण्यात येईल. याशिवाय नदीपात्र, नदीकाठ ते जॅक वेल तसेच संपूर्ण नलिका वितरणाचे तलांक नकाशावर दर्शविण्यात येतील.

डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत लक्ष गुजराथी, अभिराम निलाखे, ओमकार शिंदे, अभिलिप्सा मल्लिक, श्रावणी देशमुख, रितिका मोरे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश 

पुणे,  25 मे 2022: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील  टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात लक्ष गुजराथी, अभिराम निलाखे, ओमकार शिंदे, पियुश जाधव यांनी तर, मुलींच्या गटात देवांशी प्रभुदेसाई, रितिका मोरे, अभिलिप्सा मल्लिक, श्रावणी देशमुख यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अभिलिप्सा मल्लिक हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित साईइती वराडकरचा 6-3, 7-6(8-6) असा पराभव केला. श्रावणी देशमुखने काल अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या वैष्णवी सिंगचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. चौथ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाईने रिशीता पाटीलचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आठव्या मानांकित रितिका मोरेने श्रीमोई कामतचे आव्हान 6-3, 6-1 संपुष्ठात आणले. 
मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित लक्ष गुजराथीने कडवी झुंज देत अवनीश चाफळेचा 4-6, 6-2, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. अभिराम निलाखे याने अमोघ दामलेवर 6-2, 6-4 असा विजय मिळवला. बिगरमानांकीत ओमकार शिंदेने तिसऱ्या मानांकित राघव अमीनचा 3-6, 7-6(2), 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. पियुश जाधवने निमय महाडिकला 6-0, 6-1 असे पराभूत केले. 
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत अर्णव बनसोडे व अभिराम निलाखे यांनी तिसऱ्या मानांकित मनन अगरवाल व अनिकेत चोभे यांचा 6-3, 6-3 असा तर, अर्जुन कीर्तने व अद्विक नाटेकर यांनी ओमकार शिंदे व अनुज तशीलदार यांचा 6-2, 6-7(6-8), 10-2 असा पराभव केला. 
निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी): मुले:लक्ष गुजराथी[1] वि.वि.अवनीश चाफळे 4-6, 6-2, 6-4;अभिराम निलाखे वि.वि.अमोघ दामले 6-2, 6-4; ओमकार शिंदे वि.वि.राघव अमीन[3] 3-6, 7-6(2), 6-4; पियुश जाधव वि.वि.निमय महाडिक 6-0, 6-1;  
मुली:श्रावणी देशमुख वि.वि.वैष्णवी सिंग 6-2, 6-0; देवांशी प्रभुदेसाई[4] वि.वि.रिशीता पाटील 6-3, 6-2; अभिलिप्सा मल्लिक वि.वि.साईइती वराडकर[3] 6-3, 7-6(8-6);रितिका मोरे[8] वि.वि.श्रीमोई कामत 6-3, 6-1; 
दुहेरी: मुले: उपांत्यपूर्व फेरी:लक्ष गुजराथी/स्वराज ढमढेरे[1] वि.वि.अमोघ दामले/शिवम पाडिया 6-2, 6-4;  आशुतोष कवडेकर/निमय महाडिक वि.वि.शार्दूल खवळे/क्रिशांक जोशी 5-7, 6-2, 10-8; अर्णव बनसोडे/अभिराम निलाखे वि.वि.मनन अगरवाल/अनिकेत चोभे[3] 6-3, 6-3; अर्जुन कीर्तने/अद्विक नाटेकर वि.वि.ओमकार शिंदे/अनुज तशीलदार 6-2, 6-7(6-8), 10-2; 
मुली: क्षीरीन वाकलकर/दुर्गा बिराजदार वि.वि.भक्ती ताजने/ईश्वरी मार्कंडे[3] 6-1, 6-4;रिशीता पाटील/श्रीमोई कामत वि.वि.श्रीया साई/निशिता देसाई[4] 6-2, 6-1;आर्या शिंदे/रिद्धी शिंदे वि.वि.वैष्णवी सिंग/रितिका मोरे[2] 6-4, 2-6, 10-8.  

कान्सच्या व्यासपीठावर ‘बनी’चं पहिलं पाऊल!

आपला चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी चित्रपटाचे निर्माते कलावंत वेगवेगळ्या कल्पक योजना आखतात, ठिकाणं निवडतात. आपलं प्रमोशन इतरांपेक्षा वेगळं असावं, रसिकांनी त्याची दखल घेऊन आपली कलाकृती पहाण्याची उत्सुकता दाखवावी, चार कौतुकाचे शब्द बोलावेत यासाठी हा सगळा प्रपंच सुरू असतो. अशीच एक चमकदार कल्पना अखून निर्माते शंकर धुरी आणि दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांनी ती प्रत्यक्षात उतरविली देखील.

‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित ‘बनी’ या चित्रपटाचा फर्स्टलूक ‘७५व्या ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान ‘इंडिया पॅव्हेलियन’मध्ये करण्यात आला. या मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली ‘झलक’ पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आणि चित्रपटाचे पोस्टर उघडताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली.

आपल्या पहिल्या-वहिल्या ‘बनी’ या चित्रपटाचं आणि प्रसिद्धीचं कॅम्पेन जगप्रसिद्ध कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सत करून मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीची नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला आहे. धुरी हे गेली अनेक वर्ष अनेक यशस्वी चित्रपटांच्या निर्मितीची कार्यकारी धुरा सांभाळत आहेत. नवोदित दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांसोबत चित्रपट निर्मितीच्या अनुभवांचं भारदस्त गाठोडं घेऊन पदार्पण करणाऱ्या निर्माते शंकर धुरी यांची ‘बनी’ ही पहिली कलाकृती असून ती नीट आणि आशयपूर्ण पद्धतीने आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून त्यांनी कान्सचे व्यासपीठ निवडल्याचे म्हटले आहे.

आपला मराठी चित्रपट सीमोल्लंघन करून जगभरातील जिज्ञासू, रसिकांसमोर या पूर्वीच पोहचला आहे. चित्रपटाचा विषय आणि त्याविषयीचं कुतुहल निर्माण करण्याचं काम गेली अनेक वर्ष आपले मराठी चित्रपट चोख करीत आहेत, “जगभरातील सुजाण प्रेक्षक आपल्या चित्रपटांचे मनःपूर्वक कौतुक करतात, तेव्हा खरा आनंद होतो आणि त्याहून अधिक जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात तिकीट काढून चित्रपट पाहतात” असे उद्गार दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांनी काढले. कान्स सोबत सुरु झालेला हा प्रवास भारतासह जगभरातील इतर मानांकित महोत्सव व पुरस्कारांमध्ये सुरु ठेवणार असल्याचे या महोत्सवाचे क्युरेटर मोहनदास यांनी सांगितले.

ओम दळवी मेमोरियल वनप्लेस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ईश्वरी कारेकर, ऐश्वर्या स्वामिनाथन, सर्वज्ञ सरोदे, आर्यन कीर्तने यांचे विजय 

पुणे: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वनप्लेस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात ईश्वरी कारेकर, ऐश्वर्या स्वामिनाथन यांनी तर, मुलांच्या गटात सर्वज्ञ सरोदे, आर्यन कीर्तने या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.  
महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात ईश्वरी कारेकर हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत अव्वल मानांकित स्वरा जावळेचा 6-4, 1-6, 6-1 असा पराभव करून आणखी एका सनसनाटी निकालाची नोंद केली. सातव्या मानांकित ऐश्वर्या स्वामिनाथनने तिसऱ्या मानांकित रित्सा कोंडकरचा 7-5, 6-1 असा तर, चौथ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने शिबानी गुप्तेचा 6-4, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. दुसऱ्या मानांकित रितिका डावलकरने पाचव्या मानांकित काव्या पांडेचा 6-1, 6-4 असा पराभव केला. 
मुलांच्या गटात अव्वल मानांकित स्मित उंद्रेने सय्यम पाटीलचे आव्हान 6-2, 6-2 असे मोडीत काढले. सर्वज्ञ सरोदेने चौथ्या मानंकित वीरेन चौधरीवर 6-1, 6-4 असा विजय मिळवला. तनिष्क देवरेने अंशुल पुजारीचा 6-2, 6-4 असा तर, सहाव्या मानांकित आर्यन कीर्तनेने दुसऱ्या मानांकित वरद उंद्रेचा 6-4, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.  स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी): मुले:स्मित उंद्रे[1]वि.वि.सय्यम पाटील  6-2, 6-2;  सर्वज्ञ सरोदे वि.वि.वीरेन चौधरी[4]  6-1, 6-4; तनिष्क देवरे वि.वि.अंशुल पुजारी 6-2, 6-4;  आर्यन कीर्तने[6] वि.वि.वरद उंद्रे[2] 6-4, 6-2; मुली: ईश्वरी कारेकर वि.वि.स्वरा जावळे[1] 6-4, 1-6, 6-1; सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.शिबानी गुप्ते  6-4, 6-3; ऐश्वर्या स्वामिनाथन[7]वि.वि.रित्सा कोंडकर[3] 7-5, 6-1; रितिका डावलकर[2]वि.वि.काव्या पांडे[5]6-1, 6-4; 
दुहेरी: मुले:उपांत्यपूर्व फेरी: स्मित उंद्रे/वरद उंद्रे[1]वि.वि.आदिनाथ कचरे/शौर्या गडदे 6-0, 6-2; आर्यन कीर्तने/नमिश हूड[3] वि.वि.पृथ्वीराज दुधाने/नील देसाई 6-2, 6-2; अंशुल पुजारी/सर्वज्ञ सरोदे वि.वि.प्रजीत मदिरेड्डी/आश्रित माज्जी 6-4, 6-3;  वीरेन चौधरी/अथर्व डकरे[2] वि.वि.रतन कुबसाद/अर्चन पाठक 6-3, 6-4;
मुली: सृष्टी सूर्यवंशी/रितिका डावलकर[1]वि.वि.हर्षा देशपांडे/रितू ग्यान 6-2, 6-1; काव्या तुपे/ऐश्वर्या स्वामिनाथन[4] वि.वि.सान्वी राजू/आर्या पाठक 6-1, 6-1; 
रित्सा कोंडकर/काव्या पांडे[2]वि.वि.अनुष्का जोगळेकर/ओजसी देगमवार 6-0, 6-0.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान शनिवारी

 अभिनेते विक्रम गोखले, प्रविण तरडे यांची उपस्थिती
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर जयंती समिती पुणे तर्फे व्याख्याते व सावरकरप्रेमी शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठेतील भरत नाटय मंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून शरद पोंक्षे हे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन याविषयावर व्याख्यान देणार आहेत. 
कार्यक्रमात शब्दांमृत प्रकाशन तर्फे शरद पोंक्षे यांच्या दुसरं वादळ या पुस्तकाचे प्रकाशन देखील होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते व दिग्दर्शक प्रविण तरडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सावरकरप्रेमींनी ठिकठिकाणी साजरी करावी, याकरिता समिती गेली काही प्रयत्न करीत आहे. पहिल्या वर्षी पुण्यामध्ये एकाच ठिकाणी हा कार्यक्रम झाला. मात्र, मागील वर्षी तब्बल २५० ठिकाणी सावरकर जयंती साजरी करण्यात आली होती. यंदा देखील गणेशोत्सव मंडळे, सोसायटया, सामाजिक संस्था आदींनी विविध ठिकाणी सावरकर जयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी करावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. 
समितीतर्फे सूर्यकांत पाठक, विद्याधर नारगोळकर, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, श्रीकांत जोशी, प्रकाश दाते, अतुल व्यास, उल्हास पाठक, अजय कुलकर्णी, सुजाता मवाळ आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

महावितरण कार्यालयात तोडफोड करणाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल

पुणे, दि. २५ मे २०२२: जानेवारीपासून वीजबिलाची थकबाकी असल्याने नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणच्या कोंढवा शाखा कार्यालयात तोडफोड व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या रास्तापेठ विभागाच्या कोंढवा शाखा कार्यालय अंतर्गत कोंढवा बुद्रुक येथील वीजग्राहक दिनकर साळवे यांच्याकडे वीजबिलापोटी २७ जानेवारी २२ पासून ६ हजार ३९६ रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे त्यांच्याकडील वीजपुरवठा महावितरणकडून मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता खंडित करण्यात आला. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास कोंढवा शाखा कार्यालयात वीजपुरवठा खंडित करता काय म्हणून एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांना शिविगाळ सुरु केली. स्वतःचे नाव जितेंद्र दिनकर साळवी असे सांगत त्याने कार्यालयात तोडफोड केली. टेबलवरील रजिस्टर फेकून दिले. त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. निवास आळवेकर यांना ढकलून दिले. याप्रकरणी जितेंद्र दिनकर साळवी विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे  – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, दि.२५:आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माणिक मोरे आदी उपस्थित होते.

दोन वर्षानंतर पालखी सोहळा होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक संख्या राहण्याचा अंदाज असल्याचे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून त्यासाठी गेली ३-४ महिन्यापासून पालखीबाबत नियोजन सुरू आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासोबत पालखी सोहळा प्रमुखांसमवेत बैठका घेऊन तसेच पालखी मार्ग, पालखी मुक्काम येथील पाहणी केली आहे.

जिल्ह्याला वारीची असलेली दीर्घ परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा नेहमीप्रमाणे संपूर्ण योगदान देतील असा विश्वास व्यक्त करून जिल्हाधिकारी म्हणाले, या वर्षीचा पालखी सोहळा आगळा वेगळा राहील यादृष्टीने सर्व नियोजन प्रभावीपणे करण्यात येईल. पालखीमार्ग, पालखी मुक्काम या ठिकाणच्या लक्षात आलेल्या सर्व त्रुटी १० जूनपर्यंत दूर कराव्यात. यावर्षीची वारी अधिक प्रभावीपणे ‘निर्मल वारी’ व्हावी यासाठी सर्व ते प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, यावर्षी गतवेळच्या वारीपेक्षा दीडपट अधिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. शौचालयांच्या ठिकाणी वीज, पुरेसे पाणी आदी व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर रुग्णालयांतील खाटा आरक्षित करणे, पुरेसा औषध पुरवठा आदी आरोग्य सुविधा केल्याचेही ते म्हणाले.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता आदींकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला.

पालखी सोहळा प्रमुखांकडून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचा संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व श्री संत तुकाराम महाराज देवस्थानचे पदाधिकारी, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, महानगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, घनकचरा व्यवस्थापन, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.