Home Blog Page 1947

उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

0
  • राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन.

मुंबई, दि. २ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समुह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्या नागरीकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

भारतीय संस्कृतीचा देश विदेशात प्रचार करण्यासाठी संस्कृती शाळा मॉडेल ठरेल- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.२ :- भारतीय संस्कृतीचा देश विदेशात प्रचार करण्याच्याकामी संस्कृती शाळा मॉडेल ठरेल, तसेच या शाळेतून विविध क्षेत्रात कामगिरी करणारे उत्तम नागरिक निर्माण होतील, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

भुकुम येथील संस्कृती शाळेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘संस्कृती पुरस्कार–२०२२’ वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हाईस ॲडमिरल अजय कोच्चर, संस्थापिका देवयानी मुंगली, विश्वस्त कॅ. गिरीजाशंकर मुंगली, अनुज मुंगली व प्रणित मुंगली, भुकुम शाळेच्या प्राचार्या दामिनी जोशी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आपण आपल्या संस्कृतीचा आदर बाळगला पाहिजे. आई-वडील, शिक्षक आणि देशाची सेवा करावी आणि त्यांचा आदर ठेवावा. सांस्कृतिक मूल्य जोपासल्याने आपल्या क्षेत्रात प्रगती साध्य करता येईल. आपल्या क्षेत्रात चांगले विचार घेऊन मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळेल. शैक्षणिक जीवनात महत्त्वकांक्षाबरोबरच एक ध्येय समोर ठेवून पुढील वाटचाल करत राहा.

माणसाच्या चांगल्या कृतीतूनच संस्कृतीची निर्मिती होत असते. देशाची सेवा नि:स्वार्थपणे केली पाहिजे. व्यक्तीव्यक्तींमध्ये कनिष्ठ-वरिष्ठ असा भेदभाव न करता त्यांच्या चांगल्या गुणांचा सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करायला हवा, आणि यशाच्या शिखरावर असतानाही आपल्या मातृभूमीला विसरता कामा नये. तसेच आपण आपल्या मातृभाषेतूनच बोलले पाहिजे, असेही श्री.कोश्यारी म्हणाले.

व्हाईस ॲडमिरल श्री. कोच्चर म्हणाले, शाळेत आल्यानंतर ४० वर्षापूर्वीच्या डेहराडून येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमधील शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रबोधनीमधील पायाभूत शिक्षणामुळे तसेच येथील शारीरिक, मानसिक, सामाजिक अशा सर्वांगीण विकासामुळे देशसेवा करण्याची संधी मिळाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे देशाचा विकासास हातभार लागणार आहे. संस्कृती शाळेमध्ये शिक्षण घेवून उत्तम नागरिक समाजात घडतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उत्कृष्ट राष्ट्रीय सेवेबद्दल राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल अजय कोच्चर यांना सन्मानित करण्यात आले. जहांगीर रुग्णालयाचे अध्यक्ष एच. सी.जहांगीर (आरोग्य), लेखिका नमिता गोखले (साहित्य), आमदार सिद्धार्थ शिरोळे (प्रशासन), ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले आणि शिक्षणतज्ज्ञ कमला इदगुंजी (शैक्षणिक) मिरर नाऊचे सहसंपादक मंदार फणसे आणि सकाळचे संपादक सम्राट फडणीस (पत्रकारिता), नेमबाज प्रियेशा देशमुख (क्रीडा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्यपाल महोदयांच्या हस्ते संस्कृती शाळेच्या प्रागंणात वृक्षारोपण करण्यात आले.

देशसेवेसाठी जीवन समर्पित करणारे अधिकारी निर्माण व्हावेत – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.२- देशातील आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून देशसेवेसाठी जीवन समर्पित करणारे चारित्र्यवान आणि कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठने संयुक्तपणे सुरू केलेल्या स्पार्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, माजी सनदी अधिकारी प्रवीण दीक्षित, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, स्पार्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक धनंजय काळे, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे संचालक पुरूषोत्तम लोहिया, मार्गदर्शन केंद्राचे कार्यवाह महेश पोहनेरकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशसेवेसाठी विविध क्षेत्रात लोक कार्य करीत आहेत. एक श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी कर्तव्यनिष्ठ आणि कार्यप्रवण लोकांची गरज आहे. हीच गरज ओळखून समाजातील आर्थिक दुर्बल, उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने स्पार्क अकॅडमीची सुरुवात करण्यात आलेली आहे. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

देशात सुमारे एक लाख विद्यार्थी भारतीय प्रशासकीय, पोलीस सेवेची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तयारी करतात. त्यापैकी साधारण ८०० विद्यार्थ्यांची निवड होते. उर्वरीत विद्यार्थ्यांनी निराश होवू नये. आपल्या प्रशासकीय सेवेसाठी केलेल्या तयारीचा आणि या अनुभवाचा समाजहितासाठी उपयोग करावा. स्पार्क या नावाप्रमाणेच येथील विद्यार्थी देशसेवेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत चांगले कार्य करून यश संपादन करतील, पुढील चार ते पाच वर्षात येथून जास्तीत जास्त अधिकारी निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी पोलीस महासंचालक श्री. दीक्षित म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला वाहून घेणारे सनदी अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलेले आहे. समाजातील सर्व घटकातील होतकरु विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी या मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करावा आणि अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

संचालक श्री.लोहिया म्हणाले, श्री मुकुंद भवन ट्रस्ट विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होवून आपले योगदान देत आहे. कोरोनाच्या काळात गरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले. आळंदी, पंढरपूर, पैठण आदी ठिकाणी भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय करण्यात आलेली आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मातंग एकता आंदोलनच्या महीला आघाडीच्या शहराध्यक्षपदी अॅड राजश्री अडसूळ

पुणे – मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेची निर्धार बैठक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी महिलांसाठी लढणाऱ्या,त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या सक्रीय अशा वकील आणि कार्यकर्त्या  अॅड राजश्री अडसूळ यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी नियुक्तीचे पत्र रमेश बागवे यांनी त्यांना प्रधान केले. यावेळी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, समन्वयक विठ्ठलराव थोरात, जनरल सेक्रेटरी अरुण गायकवाड, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना बागवे म्हणाले कि,राज्यात दिवसेंदिवस मागासवर्गीय महिला भगिनीच्या अत्याचार मध्ये लक्षणीय वाढ झाली असून, ह्या अन्याय अत्याचाराला पायबंध घालण्यासाठी, संघटनेच्या महिला भगिनींची एक सक्षम फळी निर्माण करण्यासाठी अॅड राजश्री अडसूळ आपण पुढाकार घ्यावा. असे आव्हान करण्यात आले.

औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी परिसरातील पावसाळ्या पूर्वीची कामे तातडीने करा – सुनील माने

पुणे :औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी येथे दरवर्षी पावसाळयामध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी पावसाळा सुरु होण्यास अत्यंत थोडा कालावधी शिल्लक असूनही या भागातील पावसाळ्या पूर्वीची कामे अद्याप सुरु झालेली नाही.  ही कामे तातडीने सुरु करावीत अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी आज औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त संदीप खलाटे यांच्याकडे केली.

सुनील माने म्हणाले, औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी येथील नागरिकांना पावसाळ्यात त्रास होत असल्याने माझ्याकडे नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. चिखलवाडी येथील बुद्ध विहारासमोरील तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडीयम येथील ड्रेनेज लाईनची स्वच्छता झाली नसल्याने, येथे रस्त्यावर पाणी साठण्याची शक्यता आहे. माता रमाबाई आंबेडकर शाळेच्या ड्रेनेज लाईनची स्वच्छता नसल्याने या शाळेच्या मैदानावर पाणी साठते तेच पाणी स्थानिकांच्या घरात येते. माउंटवर्ड सोसायटी ते खडकी स्टेशन या मार्गावर सुद्धा पावसाळ्यात पाणी साठते.

त्याचप्रमाणे औंध रोड चव्हाण वस्ती येथील पाठीमागील बाजूस असलेले चेंबर्स मध्ये गाळ साचल्याने तेथे ड्रेनेजचे पाणी साठून राहते. पावसाळ्यापूर्वी या ड्रेनेजमधील गाळ काढणे आवश्यक आहे, बोपोडी येथील लहूजी वस्ताद साळवे नगर तसेच बोपोडी सर्वे नंबर २४ येथील चेंबरचे पाणी नागरिकांच्या घरात जाते, बोपोडी येथील हॅरीस ब्रिजच्या खाली ही प्रतिवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठून रहदारीला अडथळा निर्माण होतो. ही कामे लवकरात लवकर करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रभागातील सर्व गोल चेंबर्स तसेच मेन लाईनचा गाळ पावसाळ्याच्या आधी काढणे ही गरजेचे आहे. आपण वैयक्तिक लक्ष घालून पावसाळयापूर्वी ही कामे करून या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती खलाटे यांच्याकडे सुनील माने यांनी केली.  

३ जून जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने चला, एक दिवस सायकल चालवूया!

तंत्रज्ञानाच्या शोधाने मानवी जीवन सुखी आणि समृद्ध जसे केले तसे पर्यावरणाच्या हानीसारखे काही प्रश्नदेखील निर्माण झाले आहे. त्यावर उत्तरे शोधण्याठीदेखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. पण त्यासोबत आपण रोजच्या जीवनशैलीत काही बदल घडवून आणला तर अशा समस्यांमधून मार्ग काढणे अधिक सोईचे होणार आहे. आज जगभरात साजऱ्या होणाऱ्या सायकल दिनाचाही हाच उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने १२ एप्रिल २०१८ रोजी केलेल्या ठरावानुसार दरवर्षी ३ जूनला हा दिवस साजरा करण्यात येतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चालण्यासाठी आणि सायकलींगसाठीच्या सुरक्षित पायाभूत सुविधा उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी महत्वाच्या ठरतात. खाजगी वाहनाचा उपयोग न परवडणाऱ्या सामान्य माणसासाठी पायी चालण्याची आणि सायकल चालविण्याची सवय त्याला हृदयरोग, मधूमेह, विशिष्ठ प्रकारच्या कर्करोगापासून दूर ठेवते. अशा प्रकारची वाहतूक सुरक्षितच नाही तर किफायतशीरदेखील असते.

सायकल चालविल्या्ने माणसाची रोगप्रतिकारशक्तीह वाढते. केपटाऊन विद्यापीठाचे प्रा.नोक्स यांच्या मते अशाप्रकारचे व्यायाम शरिरातील प्रथिनांचे प्रमाण वाढवतात आणि पांढऱ्या पेशींना क्रीयान्वीत करून प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. मानसीक स्वास्य्ा, वजन कमी करणे, भूक वाढविणे, फुफ्फुसाचे आरोग्य, चांगली झोप येण्यासाठी, बुद्धीचे सामर्थ्य वाढविण्यासाठीदेखील सायकलचा वापर उपयुक्त ठरतो.

जागतिकीकरणाच्या प्रक्रीयेत शहरांचा झपाट्याने विकास होताना रस्त्यावरील सुरक्षित वाहतूक आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठीदेखील सायकलचा उपयोग महत्वाचा आहे. कोरोनाच्या संकटाने वाहतूकीच्या पर्यायाबाबत विचार करण्यास आपल्याला भाग पाडले आहे. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास सायकलची उपयुक्तता आणखी उठून दितसे.

पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर असे बदल स्विकारणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त महानगरात सायकल चालविण्यासाठी स्वतंत्र पथ तयार करण्याचाही विचार करण्यात आलेला आहे. धकाधकीच्या जीवनात निकोप जीवनासाठी नवी जीवनशैली स्विकारतांना नव्या पिढीसाठी हा चांगला पर्याय आहे. म्हणून सायकल दिनाच्या निमित्ताने वाहतूकीच्या या साध्या, सोप्या, प्रदूषण विरहीत आणि स्वस्त पर्यायाकडे जगाचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न दरवर्षी करण्यात येतो.

सायकलवर होणारा खर्च लक्षात घेता ती सामान्यांच्या आवाक्यात असल्याने असमानता कमी करण्यासोबत ती इतर सामाजिक सेवा अधिक सुलभ बनविण्यातही उपयुक्त ठरते आणि हवामान बदलाविरुद्धच्या लढ्याला बळ देते. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यात आणि शहरातील हवा शुद्ध ठेवण्यासही सायकल मदत करते. ही उपयुक्तता लक्षात घेऊन सायकल वापराबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थादेखील प्रयत्न करतात. जागतिक सायकल दिन हा सामुहिकरित्या केलेला महत्वाचा प्रयत्न आहे.

या दिवसाच्या निमित्ताने प्रशासनासोबतच सामाजिक संस्था, क्रीडा संघटना, खाजगी क्षेत्र आणि अन्य संबंधित क्षेत्रांनी या दिवसाच्या निमित्ताने जनजागृती उपक्रमात सहभाग घेण्याची गरज आहे. सायकल स्पर्धा, सायकल रॅली, जुन्या सायकलींचे प्रदर्शन, सायकल चालविणाऱ्या वयोवृद्धांचा सन्मान, ‘एक दिवस सायकलचा’ सारखे उपक्रम राबवून सहभागी झाल्यास उद्दीष्ट गाठण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. शारीरिक व्यायामासोबत शाश्वत विकासाची हमी देणारे ही सायकल आपणही एक दिवस चालवूया!
-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

साहित्यिकांनी मराठी भाषेच्या दर्जाशी तडजोड करू नये सिराज शिकलगार यांचे प्रतिपादन; बंधुता दिन व ‘बंधुता काव्य महोत्सव’चे उद्घाटन

पुणे : “मराठी भाषा टिकवण्यासाठी साहित्य निर्मितीत शुद्ध लेखन व व्याकरण कटाक्षाने तपासले पाहिजे. अलीकडच्या काळात आभासी माध्यमाच्या वापरामुळे लेखनात याकडे दुर्लक्ष होत आहे. लेखकांनी पुस्तक आणि आभासी माध्यमांवरील लेखन यातील फरक समजून घेत मराठी भाषेच्या दर्जाशी तडजोड करू नये,” असे प्रतिपादन लेखक व कवी सिराज शिकलगार यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रितम प्रकाश महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित बंधुता दिन व ‘बंधुता काव्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सिराज शिकलगार बोलत होते. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजिला होता.
प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, बंधुता काव्य महोत्सवाचे अध्यक्ष कवी शंकर आथरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, लेखिका डॉ. माधवी खरात, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, रजनी पाचंगे, संयोजक प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. अनंत सोनवणे, प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनंत सोनवणे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन रंगले. ‘बंधुता प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार’ सिल्लोड येथील कवी नारायण खेडकर यांना, ‘बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार’ पलूस येथील कवी नामदेव जाधव यांना, तर ‘बंधुता प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार’ पाथर्डी येथील दिनेश मोडोकर यांना प्रदान करण्यात आले. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘आई म्हणते’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले.
सिराज शिकलगार म्हणाले, “समाजाला दिशा दाखवण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. प्रस्थापित साहित्यिकांनी नवोदितांना प्रोत्साहन द्यावे. बंधुतेची चळवळ विस्तारण्याची गरज आहे. बंधुतेचे तत्व आणि मराठीचा संस्कार रुजण्यासाठी असे महोत्सव उपयुक्त आहेत.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “माणसे जोडण्याचा, बंधुभाव जोपसण्याचा माझा छंद आहे. बंधुतादिन साजरा होतोय, याचा आनंद आहे. बंधुतेचा विचार आपल्या प्रगतीसाठी महत्वाचा असून, त्यातूनच सामाजिक समानता प्रस्थापित होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.”

शंकर आथरे म्हणाले, “कसदार, आशयघन काव्यासाठी कवीला निसर्ग आणि माणसांकडे सूक्ष्मपणे पाहावे लागते. संवेदना प्रत्येकाला असतात; पण त्याचे कवितेत रूपांतर करण्यासाठी कवी मातृह्रदयी असावा लागतो. कविता आपले अंतरंग, दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असते.”

डॉ. माधवी खरात, डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोक पगारिया, रजनी पाचंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रोकडे यांचे अभीष्टचिंतन केले.

डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एन हर्षिनी, ऐश्वर्या जाधव, अस्मि आडकर, प्रणव रेथीन आरएस यांचा उपांत्य फेरीत प्रवे

0

कोल्हापूर, 2 जून 2022 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या एन हर्षिनी, महाराष्ट्राच्या अस्मि आडकर, ऐश्वर्या जाधव यांनी तर, मुलांच्या गटात तामिळनाडूच्या प्रणव रेथीन आरएस, कर्नाटकाच्या तनुष घिडयाल या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या बिगरमानांकीत एन हर्षिनी हिने चौदाव्या मानांकित तामिळनाडूच्या हरिताश्री वेंकटेशचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(0), 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. पुण्याच्या दहाव्या मानांकित अस्मि  आडकरने अव्वल  मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या तामिळनाडूच्या माया राजेश्वरनचा 7-6(5), 6-4 असा तर, दुसऱ्या मानांकित कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने आंध्रप्रदेशच्या सहाव्या मानांकित मनोज्ञ मदासूचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. नवव्या मानांकित महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरेने श्री तन्वी दसरीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. 

मुलांच्या गटात तामिळनाडूच्या आठव्या मानांकित प्रणव रेथिन आरएस याने ओडिशाच्या दुसऱ्या मानांकित देबासिस साहूचा 6-3, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तेलंगणाच्या वेंकट बटलांकीला 6-2, 6-2 असे पराभूत केले. 

निकाल: उपांत्यपुर्व फेरी: मुली
ऐश्वर्या जाधव(महा)(2)वि.वि.मनोज्ञ मदासू(आंध्रप्रदेश)(6) 6-2, 6-1;  

आकृती सोनकुसरे(महा)(9)वि.वि.श्री तन्वी दसरी 6-3, 6-2; 

अस्मि  आडकर(महा)(10)वि.वि. माया राजेश्वरन(तामिळनाडू)7-6(5), 6-4;  

एन हर्षिनी(कर्नाटक)वि.वि.हरिताश्री वेंकटेश (तामिळनाडू)(14)3-6, 7-6(0), 6-0;

मुले:
क्रिश त्यागी(कर्नाटक)(1)वि.वि.वेंकट बटलांकी(तेलंगणा)6-2, 6-2; 
 तनुष घिडयाल(कर्नाटक)(13)वि.वि. आराध्य क्षितिज(कर्नाटक)6-2, 4-6, 6-3;  

तेजस आहुजा(हरयाणा)(4)वि.वि.अर्जुन राठी(हरयाणा)(6) 6-3, 6-3; 
प्रणव रेथिन आरएस(तामिळनाडू)(8)वि.वि.देबासिस साहू(ओडिशा)(2) 6-3, 6-1; 

दुहेरी: मुले: उपांत्य फेरी: 
तेजस आहुजा/क्रिश त्यागी[1] वि.वि.अर्जुन पंडित/जैसन डेव्हिड[3]6-2, 6-1;  

प्रणव रेथीन आरएस/महालिंगम खांडवेल वि.वि.वेंकट बटलांकी/देबसिस साहो 6-4, 7-6(5);


मुली:  उपांत्यपूर्व फेरी: 
सेजल भुतडा/माया राजेश्वरन वि.वि.हर्षिनी विश्वनाध/मनोज्ञ मदासु  [1] 6-3, 3-6, 10-6; 

ऐश्वर्या जाधव/आकृती सोनकुसरे[3] वि.वि.अस्मि आडकर/अवनी चितळे  6-3, 6-2;

नैनिका बेन्द्रम/शगुन कुमारी[4]वि.वि.अपरा खांडरे/प्रिन्सी मांडागला 6-1, 6-2;सायली ठक्कर/श्रीनिधी बालाजी[2] वि.वि.आरुषी रावळ/इशिता मिधा 6-1, 6-2. 

कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष द्या – मुख्यमंत्री

0

कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई; मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा  घेणार आढावा

मुंबई, दि. २- मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, औरंगाबाद शहराच्या १६८० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दिले.

औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीला उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी,  पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा हे उपस्थित होते तर दूरदृश्य प्रणालीद्वारे औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय आदी सहभागी झाले होते.

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणे हे प्राधान्याचे काम असून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम निधीअभावी  रेंगाळणार नाही, याची दक्षता शासनाने घेतली आहे.  शहराच्या पारोळ्यापर्यंत पाणी आणणे, ते साठविण्यासाठी टाक्या बांधणे ही कामे तातडीने करावी लागणार असून या योजनेचा काही भाग हा जायकवाडी प्रकल्पात असल्याने त्यासाठी केंद्रीय वन विभागाची परवानगी आवश्यक आहे, ही परवानगी मिळविण्यासाठी वन विभागाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

शहरात पाणीपुरवठ्याची नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार असून कोणत्याही परिस्थितीत  शहरात पाण्याअभावी परिस्थिती बिकट होणार नाही यासाठी गतीने कार्यवाही करून विभागीय आयुक्तांनी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले. शहर पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम कंत्राटदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी आहेत ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. वेळेत काम पूर्ण करुन घेण्यासाठी संबंधित कंत्राटदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबरोबरच कालबद्धरित्या काम पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक तयार करा आणि मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी आवाहन

0

पुणे दि.२: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील समर्थ ज्ञानपीठ संस्था, सोमेश्वरनगर, ता. बारामती संचलित सह्याद्री पब्लिक स्कूल, बाघळवाडी, ता. बारामती या शाळेची निवड करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. इच्छुकांनी या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, आळंदी रोड, पुणे व शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

अखेरीस ईडीचे समन्स .. सोनिया गांधी, व राहुल गांधीनाही…

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले आहे.

राहुल गांधी यांनी आज, गुरुवारी (दि.२ जून) व सोनिया गांधी यांनी ८ जूनला ईडीच्या मध्य दिल्लीतील मुख्यालयात हजर राहावे असे या समन्समध्ये म्हटले आहे.

देशाची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकारने रचलेले हे कारस्थान आहे, अशी टीका काँग्रेसने समन्स प्रकरणावर केली आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य देतील. विदेश दौऱ्यावर असल्याने आपल्याला ५ जूननंतर चौकशीला बोलाविण्यात यावे असे पत्र राहुल गांधी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना लिहिले आहे.

खरगे, बन्सल यांची आधीच चौकशी

नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचे मालक असलेल्या यंग इंडियन या संस्थेवर गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. तेथील मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीला सोनिया व राहुल गांधी यांचे जबाब नोंदवून घ्यायचे आहेत. नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून प्रसिद्ध केले जाते. या वृत्तपत्रातील गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, पवन बन्सल यांची ईडीने नुकतीच चौकशी केली होती.

लोकशाहीवरील हल्ला : सुरजेवाला
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ईडीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठविलेले समन्स हे केंद्र सरकारच्या डावपेचांचा भाग आहे. या संकटावर काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळाच्या आधारे निश्चित मात करेल. लोकशाहीवरील हा हल्ला आम्ही परतवून लावू.

सोनिया गांधी, राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर नॅशनल हेरॉल्डमधील आर्थिक व्यवहारांबाबत प्राप्तिकर खात्याने चौकशी केली. त्याची न्यायालयाने दखल घेतली होती. त्यानंतर ईडीने मनी लाँडरिंगविरोधी कायद्यानुसार नव्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी हे यंग इंडियनचे प्रवर्तक व समभागधारक आहेत.

‘गैरकृत्य केले नसेल तर चिंता कशाला’

केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविल्याने सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी चिंता करण्याचे कारण नाही. जर त्या दोघांनी काहीही चुकीचे कृत्य केले नसेल तर त्यांनी चिंता करू नये. काँग्रेस नेत्यांनी यावर संतप्त केला होता. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर किशन रेड्डी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नॅशनल हेरॉल्डसारख्या खोट्या प्रकरणांत गुन्हे दाखल करून मोदी सरकारच्या हाती काहीही लागणार नाही. या सरकारचे कारस्थान कदापिही यशस्वी होणार नाही.
– अभिषेक मनू सिंघवी

मायग्रेन टाळता येऊ शकतो..

0

मायग्रेन (Migraine) ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे जी जगातील प्रत्येक सातव्या व्यक्तीस प्रभावित करते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मायग्रेन तीन पटीने अधिक सामान्य आहे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला मायग्रेन असतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला डोक्याच्या एका बाजूला तीक्ष्ण किंवा मध्यम डोकेदुखीचा अनुभव येतो. ही डोकेदुखी (Headaches) 4-72 तास टिकते. या दरम्यान व्यक्तीला मळमळ, उलट्या, चक्कर येणे, प्रकाश सहन न होणे आणि मोठा आवाज यासारख्या समस्या उद्भवतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ‘मायग्रेन हा न्यूरोलॉजिकल (Neurological) आजार आहे. ज्या लोकांना मायग्रेनची समस्या आहे, त्यांना महिन्यातून अनेक वेळा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मायग्रेनची काही जुनी प्रकरणे देखील आहेत ज्यात व्यक्तीला महिन्याच्या 15 दिवसांपेक्षा जास्त काळ डोकेदुखी असू शकते.

मायग्रेन कशामुळे होऊ शकते? –

चीज, अल्कोहोल (Alcohol), चॉकलेट, नट, प्रक्रिया केलेले पदार्थ, विशिष्ट गंध, तेजस्वी प्रकाश, झोपेचा त्रास, मासिक पाळी, रजोनिवृत्ती, प्रवास, हवामानातील बदल आणि तणाव या सर्वांमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

मायग्रेनचे चार टप्पे –

मायग्रेनचे चार टप्पे असतात. प्रोड्रोम फेज (Prodrome phase) नावाचा पहिला टप्पा डोकेदुखी सुरू होण्याच्या काही तास आधी सुरू होतो. या दरम्यान व्यक्ती चिडचिड आणि उदास होईल. त्याला पुन्हा पुन्हा जांभई येईल आणि त्याची खाण्यापिण्याची इच्छा वाढेल.

दुसरा टप्पा ऑरा फेज आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या डोळ्यांसमोर प्रकाशाच्या तिरक्या रेषा दिसतात. याला डोळे आंधळे करणे म्हणतात. या दरम्यान, व्यक्तीला असे वाटते की त्याचे शरीर सुन्न झाले आहे आणि त्यात मुंग्या आल्या आहेत.

तिसरा टप्पा म्हणजे डोकेदुखीचा टप्पा जो 4-72 तास टिकतो आणि चौथा टप्पा म्हणजे मायग्रेन हँगआउट टप्पा (Migraine hangout stage) ज्यामध्ये व्यक्ती सामान्यतः अस्वस्थ, चिडचिड आणि गोंधळलेली असते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ‘महिलांना मासिक पाळी दरम्यान मायग्रेन होऊ शकतो कारण या काळात इस्ट्रोजेन हार्मोन कमी होते. दोन तृतीयांश प्रकरणांमध्ये, रजोनिवृत्तीनंतर मायग्रेन कमी होतो. पण काही रुग्णांमध्ये रजोनिवृत्तीनंतरही ते सुरू होऊ शकते.’

मुलांनाही मायग्रेन होतो –

लहान मुलांमध्येही मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. मुलांमध्ये मायग्रेन डोकेदुखीसह नसतात, परंतु त्यांना उलट्या होतात किंवा पोटशूळ होतो. अगदी लहान मुलांमध्ये, पोटशूळ हे मायग्रेनचे पहिले लक्षण असू शकते. जर पालकांपैकी एखाद्याला मायग्रेनचा त्रास होत असेल तर त्यांच्या मुलास हा त्रास होण्याची शक्यता 50 टक्क्यांपर्यंत वाढते. दुसरीकडे, आई-वडील दोघांनाही मायग्रेनची समस्या असल्यास, मुलामध्ये मायग्रेनचा धोका 75 टक्क्यांनी वाढतो.

बचाव कसा करायचा? –

डॉक्टर म्हणतात की मायग्रेन ही धोकादायक समस्या नाही, पण काही उपायांनी याला प्रतिबंध करता येतो. यामध्ये धूम्रपान सोडणे, अल्कोहोलपासून दूर राहणे, जास्त प्रमाणात कॅफिन कमी करणे आणि मायग्रेनने पीडित महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या टाळणे यांचा समावेश होतो.

औषधांशिवायही मायग्रेन थांबवता येतो, असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये दीर्घ श्वास घेणे आणि योगासने करणे समाविष्ट आहे. शरीराला पुरेशी विश्रांती देऊनही मायग्रेन टाळता येऊ शकतो.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भगीरथ कार्यातील मी एक छोटा सीपाही….हार्दिक पटेलच्या ट्वीट ने चर्चाच चर्चा

हार्दिक पटेल आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आज सकाळी सकाळी प्रवेशाच्या कार्यक्रमापूर्वी हार्दिक पटेल याने केलेले ट्वीट मोठे चर्चेचा विषय ठरणारे आहे.

पाटीदार समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून हार्दिक पटेल हे नाव पुढे आले.पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेल यांनी केले. त्यांच्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल यांनी आक्रमक होत भाजपा सरकारशी संघर्ष केला. शिक्षाही भोगली. त्यानंतर हार्दिक यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. आणि आता त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश करत आहेत. हार्दिक यांच्या भाजपा प्रवेशानंतरच्या घडणाऱ्या कृतींवर त्यांचे पाटीदार आंदोलनातील सर्व सहकारी लक्ष ठेवून असणार आहेत. हार्दिक पटेल त्यांच्या आंदोलनातील काही प्रमुख मागण्या आता भाजपा सरकारकडून कशा पूर्ण करून घेतात याकडे यावर त्यांच्या सहकाऱ्यांची पुढची भूमिका अवलंबून असणार आहे.

पाटीदार अनामत आंदोलन समिती ( पीएएएस) च्या  नेतृत्वाखाली २०१५ साली झालेल्या आंदोलनानंतर अखेसरीस सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गासाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. पण, भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने पाटीदार आंदोलकांवर देशद्रोहाच्या आरोपासह अनेक फौजदारी गुन्हे दाखल केले. या आंदोलना दरम्यान १४ आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हे आंदोलन शांत करण्यासाठी सरकारने प्रतिसाद देत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काही लोकांवरील गुन्हे मागे घेतले तर काही लोकांवर अजूनही गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे मागे घेण्यासह आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या घरातील प्रत्येकी एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी अजून कायम आहे. 

स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांचे स्थान आजही अबाधित – माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

0

मुंबई, दि. 1 : स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांचे स्थान आजही अबाधित असल्याचे मत माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंडिया ग्राऊंड रिपोर्ट (आयजीआर) प्रकाशनाच्या माध्यमातून दै. दो बजे दोपहर या वृत्तपत्राचे पुन:प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार महादेव जानकर, माजी आमदार भाई जगताप, माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, दै. दो बजे दोपहर चे संपादक अरुण लाल, सह संपादक राजा अदाते उपस्थित होते.

राज्यमंत्री मंडळातील तरुण महिला सदस्य तसेच पालकमंत्री म्हणून केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानपत्र देऊन राज्यमंत्री कु. तटकरे यांना सन्मानित करण्यात आले.

राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना नियमित वृत्तपत्र वाचनाची चांगली सवय जडली. पत्रकारितेच्या कार्यकक्षा बदलत असताना प्रिंट मिडीया प्रमाणेच सोशल मीडिया, ई-न्यूज या माध्यमातून राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडमोडींची माहिती दिवसभरात स्मार्टफोनच्या माध्यमातून पहायला मिळते. तरीही माझ्यासारख्या अनेकांना सकाळच्या चहासोबत वृत्तपत्र हाती असावे, असे नेहमी वाटते. वृत्तपत्रासाठी चिकाटीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हे सर्व उपलब्ध होते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या माध्यमातून होणाऱ्या जबाबदारीपूर्ण लिखाणातून आम्ही बऱ्याच नवीन गोष्टी शिकत असतो, असेही दै. दो बजे दोपहर या वृत्तपत्रास शुभेच्छा देताना राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या.

राजकारणाचा वारसा लाभला असला तरी विधिमंडळाची पहिली पायरी चढताना एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या पद, कर्तव्य व जबाबदारीची भावना अधिक प्रकर्षाने जाणवते. क्षेत्र कोणतेही असो आपल्या कर्तव्याची जबाबदारी, चिकाटी व यासारख्या सन्मानपूर्ण प्रोत्साहान सोहळ्यातून मिळणारी ऊर्जा मोठी भरारी घेण्यासाठी उपयुक्त ठरते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी भाग्याचा क्षण असल्याची भावना मंत्री कु. तटकरे यांनी बोलून दाखवली.

भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त

0

मुंबई, दि.1 : राज्यातील भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनीच्या संदर्भात शासनाची भूमिका ठरविण्याकरिता सर्वंकष अभ्यास करुन शासनास योग्य शिफारस करण्यासाठी महसूलचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे.

महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी नामनिर्देशित केलेले प्रधान सचिव किंवा सचिव स्तरावरील अधिकारी या समितीत सदस्य असतील. याशिवाय विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, पुण्याचे विभागीय आयुक्त, नाशिकचे विभागीय आयुक्त, नागपूरचे विभागीय आयुक्त या समितीत सदस्य असतील. महसूल व वन विभागाचे उपसचिव या समितीचे सदस्य सचिव असतील.

राज्यातील विविध भागातील भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनीच्या वापराच्या सद्यस्थितीचा अभ्यास करुन अशा जमिनीचे झालेले बेकायदेशीर हस्तांतरण व वापरात बदल यावर उपाययोजना सुचविणे, नागरीकरणाच्या प्रभाव क्षेत्रातील भूदान व ग्रामदान जमिनींच्या वापर व विनियोगाच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनाविषयी शिफारशी करणे ही या समितीची कार्यकक्षा राहणार आहे.

महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीस अहवाल सादर करण्याकरिता मदत करण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय उपसमिती गठित करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातील भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनींच्या वापराची सद्यस्थितीचा अभ्यास करुन अशा जमिनींचे झालेले बेकायदेशीर हस्तांतरण व वापरात बदल यावर उपाययोजना सुचविणे, नागरीकरणाच्या प्रभाव क्षेत्रातील भूदान व ग्रामदान जमिनींचा वापर व विनियोगाच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनाविषयी शिफारशी करणे हे या समितीचे काम असणार आहे.