अहमदनगर, १ जून – राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. त्या इतिहासाची १ जून २०२२ रोजी अहमदनगर-पुणे दरम्यान पुनरावृत्ती झाली. अहमदनगर-पुणे दरम्यान ‘शिवाई’ या राज्यातील पहिल्या विद्युत घटावरील (ई-बस) सेवेची सुरूवात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले वाहक अहमदनगर येथील लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.
एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेला ७४ वर्ष पूर्ण झाली आहेत. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाले आहे. एसटीची पहिली बस माळीवाडा येथून पुण्याच्या दिशेने धावली होती. शिवाई ही ‘ई-बस’ ही याच मार्गावरून धावणार आहे. आज तारकपूर आगारातून या ‘ई-बस’ सेवेला सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले ,महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार ,निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित ,विभाग नियंत्रक विजय गीते , शिवाई ई -बसचे वाहक जयदेव हेंद्रे व चालक गणेश साबळे आदी उपस्थित होते.
शिवाई ‘ई-बस’ अहमदनगर येथून पहिल्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता व त्यानंतर रोज सकाळी सात वाजता पुण्याच्या दिशेने जाणार आहे. एसटी महामंडळाने एक मोठे पाऊल उचलले आहे. टप्प्याटप्प्याने शिवाई ई-बस वाढविण्याचे नियोजन आहे. या उपक्रमामुळे इंधन बचतीबरोबरच प्रदूषण ही कमी होणार आहे.
विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या शिवाई बसची वैशिष्ट्ये शिवाई बस विद्युत घटावर चालणारी आहे. त्यामुळे बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलीत व आवाज विरहित आहे. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’असे नाव देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर जास्तीत जास्त २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र व स्वनियंत्रित वातानुकुलीत लुव्हर बसविण्यात आले आहे व त्या सोबत वाचण्यासाठी स्वतंत्र दिवा देण्यात आला आहे. ही बस १२ मीटर लांबीच्या सांगाड्यावर बांधण्यात आली असून तिची रुंदी २.६ मीटर व उंची ३.६ मीटर आहे. सांगाड्याच्या खालच्या बाजूस बसच्या मधोमध प्रशस्त असा सामान कक्ष देण्यात आला आहे.
शिवाई बसमध्ये ४३ प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असून प्रवासी सीट हे ‘पुश बॅक‘ प्रकारचे देण्यात आले आहे. प्रत्येक दोन सीटच्यामध्ये दोन्ही प्रवाशांचे मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र युएसबी पोर्ट देण्यात आले आहे. चालक केबिन मध्ये प्रवाशी घोषणा यंत्रणा बसविली आहे. तसेच आपात्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी यंत्रणा असून त्याचे बटन चालक कक्षात देण्यात आले आहे. प्रवासी कक्षातील हालचालीवर देखरेखीसाठी कॅमेरा प्रवाशी कक्षात बसविण्यात आले आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अँड्रॉईड टीव्ही बसविण्यात आला आहे
मुंबई, दि. 1 : सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले.
राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा आढावा गृहमंत्री श्री.पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, प्रधान सचिव सुरक्षा संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक सायबर व आर्थिक गुन्हे मधुकर पांडे, अपर पोलीस महासंचालक नियोजन व समन्वय संजय वर्मा,विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांसह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सायबर गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी राज्यात सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रभावीपणे सायबर कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागाच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात यावा. सायबर गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर करता यावी, आरोपीविरोधातील भक्कम पुरावे गोळा करता यावेत तसेच भविष्यात या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजता यावेत यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याच्या सूचनाही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी यावेळी दिल्या.सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री देण्यात आलेली आहे. या उपलब्ध साधनसामुग्रीचा परिपूर्ण वापर करावा. तसेच या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
धार्मिक भावना भडकावणारे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे प्रकार घडल्यास त्यांना तत्काळ अटकाव करावा लागतो यासाठी सायबर स्पेसवरुन संबंधित मजकूर हटविणे आवश्यक असते. त्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगाराला कठोर शासन करण्यासाठी विद्यमान कायद्यातील ज्या कलमांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यांचा परिपूर्ण अभ्यास करून त्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही गृहमंत्री यांनी यावेळी दिले. सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांकाची प्रभावी प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच या आव्हानाला तोंड देण्यासाठी शासनामार्फत सुरु असलेल्या उपाययोजना, अत्याधुनिक तंत्रप्रणाली आणि व्यवस्थेसंदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.या बैठकीत सायबर विभाग सक्षमीकरण, सद्यस्थितीत सुरु असलेलं प्रकल्प आणि अन्य अनुषंगिक बाबींवर सविस्तर चर्चा झाली.
मुंबई, दि. 1 : स्वस्त धान्य दुकादारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या दुकानांवर स्वस्त धान्याव्यतिरिक्त काही वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली असून त्यात स्टेशनरीचा समावेश आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
मंत्रालयात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पुष्पराज देशमुख, राज्य संघटना अध्यक्ष, डी.एन पाटील, उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, चंद्रकांत यादव, विजय पंडित, प्रभाकर पाडले यांच्यासह महाराष्ट्रभरातून आलेले स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक समस्या आहेत. त्यातल्या काही मागण्या केंद्र सरकारशी निगडित आहेत. शासन त्याबाबत देखील पत्रव्यवहार करत आहोत. स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याव्यतिरिक्त अन्य पदार्थ विकायला शासनाने परवानगी दिली आहे. त्यात स्टेशनरी, शाम्पू, साबण, डिटर्जंट, हॅण्डवॉश, चहापत्ती, कॉफी या वस्तूंचा समावेश आहे. येणाऱ्या काळात आणखी काही गोष्टींचा समावेश यात करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी दिली.
स्वस्त धान्य दुकानदारांच्या धान्य पुरवठा आणि अन्य काही मागण्यांबाबत आगामी काळात बैठक आयोजित करून ते प्रश्न देखील तातडीने सोडवू, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
मुंबई, दि. 1 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य निर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत व्यावसायिक, संगीत व प्रायोगिक नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
या समितीमध्ये अहमदनगरचे शाम शिंदे, पुण्याचे गिरीश परदेशी, मुंबईचे प्रभाकर सावंत आणि नागपूरचे राजेश चिटणीस अशा 4 सदस्यांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
मे 2022 मध्ये एकूण जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,40,885 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 25,036 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 32,001 कोटी रुपये, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 73,345 कोटी रुपये (माल आयातीवर संकलित केलेल्या 37469 कोटींसह) आणि उपकर 10,502 कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या 931 कोटी रुपये सह ) यांचा समावेश आहे.
सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला 27,924 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 23,123 कोटी रुपये चुकते केले आहेत.
नियमित समझोत्यानंतर मे 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 52,960 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 55,124 कोटी रुपये आहे.याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने 31.05.2022 रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 86,912 कोटी रुपये जीएसटी भरपाई देखील जारी केली आहे.
मे 2022 चा जीएसटी महसूल हा मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 44% जास्त आहे.या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 43% अधिक नोंदवण्यात आला. आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 44% अधिक आहे.
जीएसटी लागू झाल्यापासून मासिक जीएसटी संकलनाने चौथ्यांदा तर मार्च 2022 पासून सलग तिसऱ्या महिन्यात 1.40 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे . मे महिन्यातील संकलन, जे एप्रिलच्या पहिल्या महिन्याच्या परताव्याशी संबंधित आहे , ते एप्रिलमध्ये नेहमीच कमी असते. मात्र तरीही मे 2022 मध्ये, जीएसटी महसूलाने 1.40 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल 2022 मध्ये एकूण ई-वे बिलांची संख्या 7.4 कोटी होती, जी मार्च 2022 मधील 7.7 कोटी ई-वे बिलांपेक्षा 4% कमी आहे.
एप्रिल 2021 च्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलाची राज्यनिहाय आकडेवारी खालील तक्त्यांमध्ये दिली आहे.
खालील तक्त्यामध्ये चालू वर्षातील मासिक एकूण जीएसटी महसुलातील कल दाखवला आहे. मे 2021 च्या तुलनेत मे 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित जीएसटीची राज्यनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :
State-wise growth of GST Revenues during May 2022[1]
मुंबई-विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज मुंबई महानगर पालिकेतील अधिकारी यांच्यासमवेत पश्चिम उपनगरातील मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील दहिसर, बोरिवली व कांदिवली येथील महापालिकेच्या विविध वॉर्डमधील सुरु असलेल्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांची, नाल्यांची साफसफाई, नाल्यांचे खोलीकरण तसेच डिपी रोड , सर्व्हीस रोड, भुमिगत वाहनतळ ,श्री कृष्ण नदिवरील पुलाची पाहणी केली व त्या कामांचा आढावा घेतला. यावेळी येथील उपस्थित नागरिकांनी पालिकेच्या रखडलेल्या रस्ते व नाल्याच्या कामाबद्दल विरोधी पक्ष नेत्यांकडे आपली गा-हाणी मांडली त्यानंतर या परिसरातील विविध ठिकाणची रखडलेली रसत्यांची, नाल्यांची आदी कामे दोन दिवसात तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थित महापालिका अधिका-यांना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सूचना दिल्या. यावेळी या पाहणी दौ-यात मुंबई महापालिकेचे उपायुक्त भाग्यश्री कापसे सहाय्यक पालिका आयुक्त आंडे, जावेद, नांदेडकर यांच्यासह एमएमआरडीए, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, प्रकाश दरेकर, सचिन शिरवाडकर, निशा परुळेकर, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय,माजी नगरसेविका प्रितम पंडागळे, विक्रांत चौगुले,अमित उतेकर, रश्मी भोसले, आदी उपस्थित होते.
मुंबई – समाजातील वंचित, उपेक्षित,श्रमिक, कष्टकरी यांना महाविकास आघाडी सरकारने न्याय दिला तर हा घटक आक्रोश करणार नाही. त्यामुळे दुर्बल व वंचित धनगर समाजाला प्राधान्याने आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. सार्वजनिक जयंती समारोह समितीतर्फे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती के.सी.कॉलेज सभागृह, चर्चगेट, मुंबई येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा पाढा वाचायला गेला तर तास न तास कमी पडतील. अहिल्यादेवी यांचे कर्तृत्व सर्वव्यापी, सर्वस्पर्शी होते. त्यांच्याकडे पाहत असताना एक कुशल प्रशासक म्हणून पाहिले जाते. ज्या काळात अत्याधुनिक साधनसामग्री, आधुनिक नेटवर्क उपलब्ध नसताना वेगवेगळ्या विषयांचे नियोजन कसे करावे, राज्यकारभार कसा चालवावा याचा त्या आदर्श मानल्या जातात. म्हणून एवढ्या वर्षानंतर त्यांच्या प्रशासकीय कारभाराचे आपण कौतुक व गौरव करत आहे. अहिल्यादेवी या पराक्रमी, लढवय्या होत्या. त्यांचे पराक्रम नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही वेळेला त्यांचा दृष्टिकोन पाण्याच्या संदर्भात दूरदृष्टीचा होता. म्हणून पाण्यासाठी विहिरी काढणे, साठवणूक करणे, साठवण तलाव करणे, यावर त्या आग्रही असायच्या. विधवांच्या विषयांमध्ये विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीमध्ये पहिला वाटा मिळाला पाहिजे हे सांगणाऱ्या अहिल्यादेवी होळकर होत्या. मुलांना दत्तक घेण्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. अन्नछत्र तयार करणे, धर्मशाळा बांधणे अशा वेगवेगळ्या घटकांना ज्याची गरज असेल त्याची त्यांनी उभारणी केली. त्यांचे धर्माच्या बाबतीत कामही सर्वश्रुत आहे. आजही आम्ही मंदिराच्या विषयावरून वादविवाद करतोय. आजही लोकांना मंदिर व धर्माच्याबाबतीत लढावे लागतेय, हे दुर्दैव आहे. म्हणून त्यांच्या स्मृती आज प्रेरणादायी आहेत. त्याही वेळेला धर्माचे गुणगान, धर्माचे रक्षण यासाठी अहिल्यादेवी होळकर आघाडीवर होत्या. मंदिराचा जीर्णोद्धार करणे, मंदिरांची प्रतिष्ठापना करणे, देवी देवतांची स्थापना करणे यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी पुढाकार घेतला होता. आपले हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत आणि म्हणून सर्वात प्रथम आपण सर्व समाज बांधवांनी संघटित होण्याची गरज आहे. आमच्या मागण्या या किरकोळ व छोट्या आहेत. आम्हाला आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे असे सांगताना दरेकर म्हणाले की, आम्ही आमच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करू. आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी कुठल्याही पक्षाचे दुमत नाही. परंतु त्याला गती देऊन ते लवकरात लवकर मिळण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करू. धनगर समाजाला आर्थिक पाठबळ देताना सरकारच्या वित्त विभागाने हात आखडता घेता कामा नये.२८ एप्रिलला वेगवेगळ्या महामंडळाना आपण निधी दिला मग अहिल्यादेवी महामंडळाला एक कवडी देता आली नाही. उन्हं, वारा, पावसात आमचा धनगर समाज काम करतो त्याला ४००-५०० कोटी रुपये का देऊ शकत नाही? बिल्डरच्या सबसिडीसाठी हजारो कोटी रुपये देतो त्यातला एक चतुर्थांश रूपये दिले तरी पुरेसे आहे. दारूसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देण्यात येतात, त्या कशासाठी देतो, त्या बंद करा, त्यापेक्षा जे वंचित आहेत, त्यांना थोडे आर्थिक पाठबळ दिले तरी हा समाज आक्रोश करणार नाही. याप्रसंगी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील, सार्वजनिक जयंती समारोह समितीचे अध्यक्ष गणेश हाके, मुरहरी केळे, हेमालया देवकाते, शशिकांत झोरे, नगरसेविका सुरेखा पाटील, शिवाजी शेंडगे, उज्वला हाके, डॉ. स्मिता काळे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
पुणे – नामवंत नृत्य संस्था डाॅ.नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी च्या वतीने मध्य प्रदेश येथील आंतरराष्ट्रीय कीर्ती चे प्रसिद्ध कथक कलाकार महामहोपाध्याय पद्मश्री डाॅ.पुरू दाधीच (वय ८१) व डाॅ.विभा दाधीच यांना विमल भास्कर हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पूर्वी हा विमल भास्कर पुरस्कार कथक क्वीन सितारा देवी (मुंबई), पदमविभूषण पं.बिरजूमहाराज व शाश्वती सेन(दिल्ली), रायगड घराण्याचे मुख्य गुरु पं रामलाल बारेथ व मथुरा देवी बारेथ (छत्तीसगड) या नामवंत कलाकारांना देण्यात आला आहे. रविवार दिनांक ५ जुन रोजी सायंकाळी ५ वाजता पं.जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे पद्मश्री डाॅ.पुरू दाधीच व डाॅ.विभा दाधीच यांना विमल भास्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह, शाल, हार, बुके व रूपये पंचवीस हजार रोख असे आहे. डाॅ.पुरू दाधीच यांना पद्मश्री पुरस्कार (२०२०), संगीत नाटक अकादमी पुरस्कार(२०१८), भारत सरकार तर्फे टैगोर फेलोशिप, मध्य प्रदेश सरकार चा शिखर सम्मान अशा अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यांनी कथक नृत्यावर अनेक पुस्तके लिहीली आहेत. संपूर्ण भारतात कथक नृत्याच्या परीक्षा देणारे विद्यार्थी केवळ डाॅ.पुरू दाधीच यांचीच पुस्तके वाचत असतात. या पुरस्कार सोहळ्यानंतर डाॅ.पुरू दाधीच नृत्य प्रात्यक्षिक व आपल्या सहकाऱ्यांसह कथक नृत्य प्रदर्शन करणार आहेत.या नृत्य कार्यक्रमात डाॅ.विभा दाधीच, हर्षिता दाधीच, पियुष राज आदी कथक कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास प्रवेश मुल्य नाही.सर्वांसाठी खुला आहे.
मुंबई, दि. 1 : पोलंड गणराज्याचे भारतातील राजदूत प्रो. ऍडम बुराकोवस्की यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
दिनांक ३१ मे रोजी पोलंडची राजधानी वॉर्सा येथून मुंबई पर्यंत थेट विमानसेवा सुरु झाल्यामुळे भारत व पोलंड देशांमधील व्यापार व पर्यटनाला चालना मिळेल, असे राजदूत बुराकोवस्की यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. पोलिश एअरलाईन्सची ही विमानसेवा आठवड्यातून तीनदा असेल असे त्यांनी सांगितले.
पोलंड – भारत राजनैतिक संबंध १९५४ साली सुरु झाले असले तरी मुंबई येथील दूतावास सन १९३३ पासून सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलंडमध्ये ४० हजार भारतीय राहत असून ते विविध क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रात देखील पोलंड भारताशी सहकार्य करण्यास इच्छूक असून आजच मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंची भेट घेतल्याचे राजदूतांनी सांगितले.
महाराष्ट्राशी जुने संबंध
पोलंड येथून काही निर्वासित दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूर येथे आले होते त्यामुळे पोलंडचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंड सरकारच्या वतीने कोल्हापूर येथे एक स्मारक तयार करणार असून या संदर्भात संभाजी छत्रपती यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील काही चित्रपट पोलंड येथे चित्रीत झाल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन इरझिक हे देखील उपस्थित होते.
संकल्पनेची संकल्पनाच हद्दपार करणार म्हणाले प्रशांत जगताप
पुणे : कामापेक्षा दिखाऊपणा व चमकोगिरीवरच अधिक भर देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपुरुषांची पुतळे- स्मारके यांवर संकल्पनाच्या नावाखाली नामफलक लावण्याचा जो लाजीरवाणा प्रकार सुरू केला आहे, तो त्वरित बंद करावा. पुणेकर व राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रकार कदापि खपवून घेणार नाही. सिंहगड रस्त्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर लावण्यात आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या नामफलकाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे, संतोष नागरे, विपुल म्हैसुरकर, महेश हांडे, किशोर कांबळे, संतोष पिसाळ, समीर पवार, प्रदीप शिवचरण, हेमंत गायवाड, विक्रम जाधव, शिवम इभाड, अभिजीत बारवकर, दिनेश खराडे, वैशाली थोपटे, श्वेता होनराव, सारिका पारेख, अनिता पवार, भावना पाटील, शिल्पा भोसले, शालिनी जगताप, भक्ती कुंभार, ललिता मोरे, शालन उभे, मोनाली गोडसे, स्वाती जाधव, भक्ती कुंभार, तृप्ती पोकळे, मनीषा होते, उर्मिला गुंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.येत्या आठ दिवसांत हे नामफलक हटविले गेले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ते हटविण्याचे काम करतील. तसेच, महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर संकल्पना ही संकल्पनाच हद्दपार केली जाईल. तसा शब्दच आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांना देणार आहोत. असे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
जगताप यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिकेत सत्तेत असताना मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाला कोणतीही ठोस कामगिरी करता आली नाही. पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी सोयी, नवीन आस्थापनांची उभारणी अशा सर्वच आघाड्यांवर भाजपला अपयश आले आहे. कामापेक्षा दिखाऊपणा आणि चमकोगिरीवरच भर देण्याच्या भाजपच्या या प्रवृत्तीचा झालेला पर्दाफाश पुणेकरांनी पाहिला आहे. अलीकडे तर राष्ट्रपुरुषांची पुतळे – स्मारके यांपेक्षाही स्वत:चे कर्तृत्व मोठे असल्याचे भाजपकडून दाखवून दिले जात आहे. संकल्पनाच्या नावाखाली स्वत:चा डंका वाजवून घेण्याचा प्रकार घडत आहे. अलीकडेच ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यावर संकल्पनाच्या नावाखाली भाजपच्या एका माजी नगरसेविकेच्या सासूचे नामफलक लावण्यात आले होते. महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा नामफलक खाली उतरवला. परंतु, भाजपने त्यातून काही धडा घेतलेले दिसत नाही.
सिंहगड रस्त्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर भाजपच्या एका माजी नगरसेवकाने संकल्पनाच्या नावाखाली नामफलक लावले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमारजी यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसांत हे नामफलक हटविण्यात आले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ते हटवतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. या महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल, तेव्हा ही संकल्पनेची संकल्पनाच आम्ही हद्दपार करणार आहोत.
आपण कोण, आपण काय संकल्पना राबवली आहे, याचा विचारच भाजपचे माजी नगरसेवक करताना दिसत नाहीत. मुळात ज्या कर्तृत्वाचा मान राखण्यासाठी महापुरुष, राष्ट्रपुरुषांची स्मारके, पुतळे उभारण्यात आली आहेत, त्या राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक, स्वराज्यातील मावळे यांच्यापुढे आपली पात्रता काय, आपण संकल्पनाच्या नावाखाली काय दर्शवू पाहात आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. स्वराज्याची राजधानी रायगडाची निर्मिती करणारे स्वराज्याचे बांधकामप्रमुख हिरोजी इंदुलकरांनी रायगडाच्या निर्मितीच्या बदल्यात रायगडावर फक्त एक पायरी मागितली होती. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला जातील, तेव्हा त्यांच्या पायाची धूळ कायम आपल्या नावावर पडावी, एवढीच इंदुलकरांची इच्छा होती. रायगडाची निर्मिती करणाऱ्या इंदुलकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी जागा हवी होती, तर भाजपचे हे माननीय मावळ्यांच्या, छत्रपतींच्या सरदारांच्या डोक्यावर स्वत:च्या नावाचा डंका वाजवत आहेत. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांबाबत भाजपला काय आदर आहे, याचे प्रदर्शन या ‘माननीयां’नी घडवून आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असे प्रकार कदापि सहन करणार नाही, हे भाजपने व माजी नगरसेवकांनी लक्षात घ्यावे.असेही जगताप म्हणाले.
सकाळी 9 वाजता कार्यक्रमाची नियोजित वेळ…मात्र अर्धा तास अगोदरच म्हणजे साडे आठ वाजता उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची उपस्थिती…प्रमुख मान्यवर न आल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी गोल खुर्च्या टाकून चक्क रिक्षा चालकांशी दिलखुलास गप्पा मारायला सुरुवात केली…प्रश्न समजून घेऊन उपयाबाबत चर्चा केली…ही घटना आहे. बुधवारी (दि. 1) रोजी घडलेली सकाळी 7 वाजताची.
पुणे आळंदी रोड येथे रिक्षा टेम्पो व छोट्या बांधवांसाठी पासिंग ट्रॅकचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता नियोजित होते. मात्र नियोजित वेळेआधी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेआठलाच कार्यक्रमस्थळी हजर झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी मुंबईला होते. यामुळे त्यांना यायला उशीर होईल, असे बहुतेकांना वाटले. मात्र नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर आल्याने सर्वांचा एकच गोंधळ उडाला.
ते आले तेव्हा प्रमुख पाहुणे उपस्थित नव्हते. इतरही मान्यवर येणे बाकी होते. त्यामुळे घड्याळाकडे बघत ‘अरे मी काय लवकर आलो का’ अशी विचारणा केली. या वेळी उपस्थितांनी अर्धा तास अगोदर आल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्वांना एकत्र बसायला लावून चर्चा करायला सुरुवात केली.
रिक्षाचालकांचे प्रश्न, त्यांचे कल्याणकारी मंडळ व सध्या सुरू असलेला ट्रॅक व इतर अडचणी याबद्दल चर्चा केली. या नंतर समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल, याबद्दल विचारणा केली.
या वेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव हे देखील लवकरच आले होते. त्यामुळे त्यांच्या देखील तब्येतीची विचारपूस करत अनेक विषयावरती चर्चा केली. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे, मुक्त रिक्षा परवाना बंद करणे, इतर विविध प्रश्नांवर यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चर्चा केली.
या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी विविध मागण्यांचे निवेदन देखील त्यांना दिले. त्यांच्याशी केलेल्या चर्चेमुळे रिक्षाचालक मालकांचे कल्याणकारी महामंडळ मुक्ता रिक्षा प्रमाणा सह अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा असल्याचे बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
पुणे दि.१: हरियाणा येथे होत असलेल्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धांसाठी बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडापीठ येथील सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संघाने पदक मिळवण्याचा निर्धार केला. क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे स्पर्धेचे समन्वय अधिकारी आहेत. क्रीडा अधिकारी अरूण पाटील हे मुख्य व्यवस्थापक आहेत. त्याच बरोबर इतर पदाधिकारीदेखील महाराष्ट्राच्या संघासोबत आहेत. गीता साखरे (पुणे) या मुलींच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षक, राजेश पाडावे (मुंबई) मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आणि क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे हे संघ व्यवस्थापक आहेत.
चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेचे ४ जून रोजी उद्घाटन होईल आणि १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे. आजपासून हे संघ हरियाणाकडे रवाना होत आहेत. ८ जूनपर्यंत सर्व संघ तिकडे रवाना होतील.
क्रीडामंत्री सुनील केदार- यावर्षी यशस्वी खेळाडूंसाठी बक्षिसाची रक्कम वाढविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तो नक्कीच खेळाडूंचा उत्साह वाढविणारा ठरेल. बालेवाडी येथे सुरू असलेला खेळाडूंचा सराव पाहता नक्कीच महाराष्ट्र क्रमांक एक मिळवेल असा विश्वास वाटतो. देशात कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक क्रीडासुविधा दिल्या जातील.
क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे- महाराष्ट्राचे खेळाडू प्रत्येक क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करीत आहेत. यावर्षीदेखील महाराष्ट्र हॅटट्रीक करेल. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासन खेळाडूंना विशेष सुविधा देत आहे. यापूर्वी खेळाडूंना आपापल्या जिल्ह्यातून प्रवास करून स्पर्धेच्या ठिकाणी पोचावे लागत असे. त्यामुळे त्याचा कामगिरीवर परिणाम होत असे. परंतु, आता महाराष्ट्र सरकार आणि क्रीडा विभागाने खेळाडूंना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून जाण्या-येण्यासाठी थेट विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मराठी मालिकांमध्ये विविध कामं केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला जगतापने रौद्र सिनेमातून पदार्पण केले.
एप्रिलमध्ये रौद्र हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातल्या उर्मिलाच्या कामाचं कौतुक झालं होतं. आता पुरस्कार रुपानेही कौतुकाची थाप मिळाली आहे. उर्मिलाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आयोजीत ७ व्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये उर्मिलाला हा पुरस्कार मिळाला आहे.
रौद्रमध्ये उर्मिलाने मृण्मयी नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. ७० च्या दशकातील सिनेमा असल्याने त्या काळची भाषा, वागणं हे सर्व उर्मिला शिकलली होती. त्याचबरोबर उर्मिला संस्कृतही शिकली. या पुरस्काराबाबत उर्मिला म्हणते, ‘’पहिला पुरस्कार हा नेहमीच खास असतो. शाळेत असताना कराटेसाठी पारितोषिक मिळाले होते. त्यावेळी जग जिंकल्यासारखं वाटत होतं आणि आता या क्षेत्रात आल्यावर हा पहिला पुरस्कार त्याचा आनंदही तेवढाच आहे. पण, हा पुरस्कार जास्त स्पेशल आहे कारण हा पुरस्कार माझ्या महत्वाकांक्षेसाठी मिळवलेला पुरस्कारआहे. या पुरस्काराने माझ्या पंखात बळ आलं आहे आणखी चांगलं काम करण्यासाठी. रौद्र सिनेमाची टीम आणि मला आत्तापर्यंत माझ्या प्रवासात साथ दिली त्या सर्वांचे आभार.”
यानंतर उर्मिला श्यामची आई या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत आहे, याशिवाय काही गाण्यांमध्येही दिसून येणार आहे.
राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले
पुणे दि.१: राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी कामगिरीचा गौरव केला.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाला परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी एम. के. भोसले, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
श्री.ठाकरे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना एसटीदेखील अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात त्यांना अपेक्षित ठिकाणी नेण्याचे कार्य एसटी गेली ७५ वर्ष करीत आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यातही एसटीचा वाटा आहे. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे आशिर्वाद घेताना संस्कृतीची जपणूकही एसटीच्या माध्यमातून होते आहे.
एसटीचा गौरशाली इतिहास जनतेपर्यंत न्यावा
कोरोना काळात अनेक जोखिमा असताना एसटी कर्मचाऱ्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात , प्रत्येक दिवशी आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात एसटीचा सहभाग आहे. एसटीमुळे आपले जीवन सुखकर झाले असे सांगणारे अनेक जण भेटतील. एसटीची ही वाटचाल चित्रफीतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बदलत्या काळानुसार नव्या संकल्पनांचा स्वीकार
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत सुधारणा करताना नव्या संकल्पना शासन स्वीकारत आहे. सर्वात जास्त विद्युत बस आणणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले. विद्युत बसचे तंत्रज्ञान नवीन आहे, त्याची सवय व्हायला वेळ लागेल. एसटीची सेवा प्रदूषण विरहीत कशी होईल याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. काळाच्या गरजा आणि तंत्रज्ञानात होत असलेले बदल लक्षात घेऊन त्यानुसार प्रगती करणे हे आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. एसटी बसला पुण्यातून सुरूवात झाली आणि पुण्यातच अमृत महोत्सवाला सुरूवात होत आहे, हा योगायोग असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
जनसेवेचे व्रत हातात हात घालून पुढे नेऊया
मुख्यमंत्री म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांकडे आपल्या परिवारातले सदस्य म्हणून शासन पाहत आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सेवा देताना तोटा सहन करावाच लागतो. हे लक्षात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुढील काही वर्षांची हमी शासनाने घेतली आहे. यापुढेदेखील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शक्य असलेली सर्व मदत करण्यात येईल. आपण एका मोठ्या वैभवाचे भाग आहोत याची जाणीवही कर्मचाऱ्यांनी ठेवावी. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे, त्यातील प्रत्येक सदस्याला आनंदात आणि समाधान ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. राज्याच्या प्रगतीचे एसटी कर्मचारी अविभाज्य घटक आहेत. आपण घेतलेले जनसेवेचे व्रत हातात हात घालून पुढे सुरू ठेवूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
एसटीला गतवैभव मिळवून देणारच- परिवहनमंत्री अनिल परब
एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून एसटीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. त्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पण हा एसटीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. एसटीच्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. रस्त्यात अडचणी येतात, खड्डे असतात मात्र मार्ग काढत एसटीचा प्रवास सुरू आहे. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. ही प्रत्येक गावातील माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
एसटीचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. कोरोनाच्या काळात एसटीने आगळेवेगळे काम केले आहे. टाळेबंदीमध्ये साडेसात लाख कामगारांना पराराज्याच्या सीमेवर जाण्यासाठी मोलाचे काम एसटी कर्मचाऱ्यांनी केले. कोरोनानंतर एसटी पूर्वपदावर येत आहे. एसटीचा तोटा कमी करून फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. त्यासाठी मालवाहतूकीकडेही अधिक लक्ष देण्यात येत आहे. एसटी बदलांना सामोरे जात असून आज पहिली एसटी इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ बस सुरू केली आहे. कोरोना संकटाचा काळ विसरून एसटीच्या वैभवासाठी नव्या दमाने सुरूवात करण्याचे आवाहन ॲड.परब यांनी केले. प्रवाशांची सेवा, कर्मचाऱ्यांची काळजी आणि आणि आपल्या व्यवसायिक कर्तव्यावर प्रेम अशा त्रिसूत्री नुसार काम करूया, असेही ते म्हणाले.
सक्षम व कार्यशील सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य-डॉ.नीलम गोऱ्हे
उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, सक्षम व कार्यशील सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण करत एसटीने केले आहे. बदलत्या काळानुरुप एसटीने आपले पाऊले उचलली आहेत. आराम ते निमआराम तसेच आज नव्याने सुरू झालेली ‘शिवाई’ बस सेवा त्याचेच द्योतक आहे. राज्यभर या सेवेचा विस्तार लवकरच होत आहे ही आनंदाची बाब आहे. एसटी महामंडळाच्या मनुष्यबळ विकास तसेच विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी आपल्या सोबत आहे, असा विश्वास देत अपघात विरहित सेवेबद्दल त्यांनी वाहनचालकांचे कौतुक केले.
प्रास्ताविकात श्री. चन्ने म्हणाले, महाराष्ट्राच्या अनेक जडणघडणीत लालपरीचा महत्त्वाचा वाटा. राज्यात व ३६ बसपासून सुरू झलेला एसटीचा प्रवास २५० पेक्षा जास्त आगर आणि १७ हजार बसेसपर्यंत पोहोचला आहे. कोरोना कालावधीतही एसटीने बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना आपल्या गावी पोहोचविण्याची महत्वाची कामगिरी केली. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद असताना अनेकांना वाहतुकीची सेवा देण्याचे कार्य एसटीने केले. महामंडळाने व्यावसायिक तत्वावर मालवाहतूक सेवा सुरू केली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ‘महाकार्गो’ ब्रॅण्ड विकसित केला आहे. भविष्यात तांत्रिकदृष्टया सक्षम बस सेवा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या अमृत महोत्सवी गौरवशाली कामगिरीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली. गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ विनाअपघात सेवा दिलेल्या ३० चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी ॲड. परब याना ‘विठाई’ आणि गोऱ्हे यांना ‘शिवशाही’ गाडीची प्रतिकृती देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. यामुळे लाखो चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये येथे कॉन्सर्टसाठी आले होते लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
केके यांचा कॉन्सर्ट कोलकाता येथील नजरुल मंच येथे झाला. जिथे त्यांनी त्यांची अनेक लोकप्रिय गाणी गायली, पण ‘हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल’ हा शेवटचा परफॉर्मन्स ठरला. केकेच्या या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे पाहून चाहते भावूक होत आहेत.
35 हजार जिंगल्स गायल्या केके यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत झाला. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी केके यांनी जवळपास 35000 जिंगल्स गायल्या आहेत.
‘पल’ अल्बममधून गायनाची सुरुवात 2021 मध्ये, केके यांना मिर्ची म्युझिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान, केके यांनी भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी ‘जोश ऑफ इंडिया’ हे गाणे गायले. त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही दिसले. केके यांनी ‘पल’ या म्युझिक अल्बममधून गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.