Home Blog Page 1918

योग साधनेने जीवनात क्रांती घडेल-खासदार गिरीष बापट ; एमआयटी डब्ल्यूपीयूत योग महोत्सव साजरा

0

पु णे, २१ जून: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योगाचा प्रचार केला आहे. त्यांनी योगाच्या माध्यमातून क्रांती घडविली आहे. योग साधना करून प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात क्रांती घडवू शकतो.” असे विचार खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, तर्फे ८ आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून आयुष मंत्रालय आणि पतांजली योग पीठ यांच्या सहकार्याने कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात योग महोत्सावाचे आयोजन केले. मानवतेसाठी योग ही संकल्पना या वर्षी ठेवण्यात आली होती.  
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, तेरी पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी योग शिक्षक बापू पाडळकर, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, स्कूल ऑफ योगाचे विभागप्रमुख प्रा. निरंजन खैरे व स्कूल ऑफ पीस स्टडीचे अधिष्ठाता प्रा.डॉ.मिलिंद पात्र हे उपस्थित होते.  
या प्रसंगी पतंजली योग समिती (पुणे जिल्हा प्रभारी) योग शिक्षक गोविंद गाडगीळ यांनी उपस्थित हजारो विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पतांजली योग प्रशिक्षक  यांना योगाचे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“योग साधना व ओमकारातून  मानवाला शांती मिळू शकते. योग साधनेमुळे तरूणांमध्ये स्वत्व, स्वधर्म आणि स्वाभिमान जागृत करता येते. ७३० वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली यांनी योगाची संकल्पना संपूर्ण मानवजाती समोर मांडली. माऊली हे महान योगी होते. योग महर्षी शेलार मामा यांनी योगाला तळागळापर्यंत पोहचविले. तसेच रामदेव बाबा यांनी संपूर्ण जगभरात योगा पसरविला आहे. चारित्र्य आणि शिस्तीचे पालन केल्यास जीवन समृद्ध होईल.”
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले,“ मानवतेसाठी योगा अत्यंत महत्वाचे तर आहेच पण यामध्ये एकसंघपणा आणि मानवतेचा अर्थ दडलेला आहे. निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे योग आहे. निसर्ग आणि मानवता यातील एक दुवा म्हणजे योगा आहे. भविष्यात वातावरण बदल व बायोडाइर्व्हसिटीचा सामना करण्यासाठी विज्ञान, अध्यात्म व शाश्वत विकास महत्वाचा आहे. त्यातूनच शांती निर्माण होऊ शकते.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.
प्रा. अतुल कुलकर्णी आणि प्रा.पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. निरंजन खैरे यांनी आभार मानले.

खडसे म्हणाले,’गेल्या सहा वर्षात खूप छळवणूक झाली

0

मुंबई – आज पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीत एकनाथ खडसे यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर एकनाथ खडसे म्हणाले,’गेल्या सहा वर्षात खूप छळवणूक झाली. ईडी वगैरे तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावला. मंत्रिपदावर असताना खोटे आरोप माझ्यावर झाले राजीनामा घेण्यात आला. आरोप खोटे ठरले, झोटिंग अहवाल आला, तिथेही काही नाही मिळालं. त्यानंतर ईडी चौकशी झाली, जावयाला अटक करण्यात आली. बायको, मुलींना समज देण्यात आली. प्रॉपर्टी जप्त करण्यात आली. अगदी तीन आठवड्यापूर्वी आदेश ईडीकडून काढण्यात आला, माझी राहती घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले. मला बेघर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.माझ्या सर्व खात्यातील सर्व पैसे काढले, एकूण एक पैसा काढून घेतला. अजून छळ थांबलेला नाही. राजकारणातून मला संपवण्याचा प्रयत्न केला जात असताना असताना राष्ट्रवादीने पुनर्वसन केलं. ईडी-सीडीचा विषय योग्य वेळी काढेन, विधानपरिषदेत अनेक विषय मांडणार. राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी मदत करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त मते भाजपमधल्या मित्रांनी दिली

राष्ट्रवादीकडं फक्त ५१ मतं होते तरी आम्हाला ५८ मते मिळाली ज्यापैकी २९ मते मला मिळाली असे खडसे यांनी सांगितले.जी काही मते मिळाली असतील ते मला भाजपमधल्या मित्रांनी दिले असावेत असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील या नेत्यांनी मला संधी दिली या संधीचं मी सोनं करेल, पुर्वीपेक्षा बोलायला अधीक संधी आणि वेळ आहे, असे त्यांनी सांगितले.

…. अग्निपथ वरून राष्ट्रवादीची टीका, युद्धस्मारकाजवळ जोरदार आंदोलन

0

शास्त्रीजी म्हणाले होते ‘जय जवान, जय किसान’ पण मोदीजींचा नारा ‘मर जवान, मर किसान’

पुणे – केंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेवरून युवकांमध्ये संपूर्ण देशभर अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून सुमारे १४ राज्यांतील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. ही योजना केंद्र सरकारने कोणत्याही समाजघटकांशी चर्चा न करता नेहमीप्रमाणे अतिशय घाईघाईने रेटली आहे. परंतु यामुळे सैन्यदलासारख्या अतिशय महत्वाच्या संस्थेवर आघात होत असल्याची टिका करत शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठा युद्ध स्मारक कॅम्प येथे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख रवींद्र माळवदकर, किशोर कांबळे मृणालिनी वाणी ,अजिंक्य पालकर ,मनोज पाचपुते, गोविंद जाधव , पुजा झोळे ,राहूल तांबे , सौ. सुगंधा तिकोणे,मंगेश मोरे, धनंजय पायगुडे,सौ.वंदना मोडक, आदिल सय्यद , विकास झेंडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष जगताप म्हणाले की,’
सध्याची सैन्यभरतीची प्रक्रिया अतिशय उत्तम दर्जाची असून यातून निवड झालेल्या अधिकारी आणि जवानांनी वेळोवेळी सीमेवर शौर्य गाजवून देशाचे रक्षण केले आहे. याशिवाय देशांतर्गत शांतता राखण्यासाठी देखील जवानांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा देशातील प्रत्येक जनतेला अभिमान आहे. सैन्यभरतीची ही अतिशय सक्षम यंत्रणा असताना अग्निपथ सारखी योजना अचानक राबविण्याची सरकारला का घाई आहे असा सवालही पक्षाकडून विचारण्यात आला आहे.
या देशाने आतापर्यंत तीन-चार युद्धांचा प्रत्यक्ष सामना केले आहे. जेंव्हा देशावर परचक्र आणि अन्नटंचाई असे दुहेरी संकट होते तेंव्हा तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान,जय किसान’ अशी घोषणा देऊन देशाच्या उभारणीतील जवान आणि किसान यांचे महत्त्व अधोरेखित केले होते. परंतु केंद्रातील सरकार बहुमताच्या अहंकारात एवढे अंध झाले की, त्यांनी देशाच्या विकासाचा मूलमंत्र असणारी ही घोषणाच संपविण्याचा घाट घातला आहे. शेतकऱ्यांना पूर्णतः चिरडल्यानंतर आता हे जवानांकडे वळले असून ‘मर जवान, मर किसान’ असा यांचा उघड नारा आणि अजेंडा असल्याचे आता उघड झाले आहे.
आपल्या हातून देशसेवा घडावी तसेच आपल्या कुटुंबाचा चरितार्थ ही चालावा अशा दुहेरी उद्देशातून देशभरातील अनेक युवक सैन्यदलामध्ये भरती होण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करीत असतात. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार सैनिक भरती होणाऱ्या युवकांना फक्त चारच वर्षे नोकरी मिळणार असून सैन्यदलाच्या या कंत्राटीकरणामुळे त्याचे पुढील भवितव्य अंधःकारमय असणार आहे एकीकडे बुलेट ट्रेन सारख्या अनावश्यक योजनांवर एक लाख कोटी रुपयांचा खर्च केला जातो अनेक उद्योगपती मित्रांची कर्जे मोदी सरकारकडून रद्द केली जातात. पण दुसरीकडे देशाच्या संरक्षणाकरता पैसे शिल्लक नाही असे सांगितले जाते यातूनच ते देशाच्या संरक्षण क्षत्राविषयी गंभीर नाहीत हेच दिसत आहे , देशातील सार्वजनिक उपक्रम मोडीत काढताना ते पन्नास वर्षे शंभर वर्षे एवढ्या मोठ्या काराराने भाड्याने दिले जातात मात्र गोरगरीब युवकांना पूर्णवेळ नोकरी न देता तो कालावधी मात्र फक्त चारच वर्षांचा असतो यामागे सरकारची व्यापारी मानसिकता दिसून आलेली आहे अशी टिका यावेळी पक्षाकडून करण्यात आली.
केंद्रीय मंत्री जी कृष्णन रेड्डी व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी सैनिकांबद्दल केलेल्या वक्तव्याचाही तीव्र निषेध करण्यात आला.

अखेर काँग्रेसचाच घात-विधानपरिषद निकाल जाहीर

0

भाजपाने बाजी मारली, राष्ट्रवादी,सेनेने गड राखले .

काँग्रेसच्या एकाचा विजय तर एकाचा पराभव

मुंबई -संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विधानपरिषदेच्या 10 व्या जागांसाठी 11 उमेदवार उभे होते.काँग्रेस चे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले.संख्याबळ नसताना देखील भाजप उमेदवार प्रसाद लाड यांनी त्यांचा पराभव केला. हाती भाजपने विजय मिळवला.

काँग्रेसच्या भाई जगताप यांचा विजय झाला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजें निंबाळकर, एकनाथ खडसे शिवसेनेचे आमशा पाडवी आणि सचिन अहीर, भाजपचे श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, आणि प्रवीण दरेकर यांचा विजय झाला. ही सर्व मते पहिल्या पसंतीची होते.

काँग्रेसचे भाई जगताप ,चंद्रकांत हंडोरेआणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात खरी काटे की टक्कर होती. अखेर यात प्रसाद लाड यांनी बाजी मारत हंडोरे यांचा पराभव केला. आणि काँग्रेसचे भाई जगताप एकटे विजयी झाले, महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या निकालामुळे महाविकास आघाडीत एकी नाही हे दिसून आले.काँग्रेसला एकाकी पाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले.काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील मते नेमकी किती ,कुणाची फुटली यावर आता मंथन होईल पण महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम असती तर भाजपाच्या पाचव्या उमेदवाराला मते गेली नसतीआणी काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आला असता, या विचाराने आता राज्यातील आघाडी सरकारमध्ये काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष लागून राहणार आहे .

भाजपाचे सगळे नेते विजयाचा आनंद साजरा करत आहेत. किंगमेकर फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेते विजयी जल्लोष साजरा करत आहेत

भाजपला पहिल्या पसंतीची तब्बल १३३ मत पडले आहेत. राष्ट्रवादीला एकून ५७ मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीला एकून ६ अपक्षांची मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्याही पहिल्या पसंतीची ३ मतं फुटली आहेत. दरम्यान भाजपला अधिकची २७ मतं मिळाली आहेत.

विजयी उमेदवार

भाजप-

1. प्रवीण दरेकर –

2. राम शिंदे –

3. श्रीकांत भारतीय

4. उमा खापरे

5. प्रसाद लाड

शिवसेना –

1. सचिन अहिर

2. आमसा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेस-

1. रामराजे निंबाळकर
2. एकनाथ खडसे

काँग्रेस-

1. भाई जगताप

दरम्यान काँग्रेसने आपले आमदार फुटल्याचं मान्य केलं आहे. दरम्यान शेवटच्या क्षणाला काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला यासंदर्भात आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.काँग्रेसने आपले आमदार फुटल्याचं मान्य केलं आहे. काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे तर भाई जगताप विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीतील आमचे मत फुटल्याचं माध्यमांना बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. या कारणावरून त्यांनी फुटलेल्या आमदारांबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.काँग्रेसकडील त्यांचे स्वत:चे तीन मत फुटल्याचं समोर आलं आहे. तर शिवसेनेचे तब्बल १२ मत फुटल्याचं समोर आलं असून थोरातांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान अकरा उमेदवारांपैकी काँग्रेसच्या हंडोरेंचा पराभव झाला आहे

राष्ट्रवादीची चाणाक्ष खेळी, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेत सर्व जागा राखल्या

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा चाणाक्ष खेळी केली आहे. राष्ट्रवादीने आपले दोन्ही उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना अगदी पद्धतशीपणे निवडून आणलं. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील सर्वात सुरक्षित आणि चाणाक्ष पक्ष म्हणून समोर आला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले ,

विधान परिषदेच्या निवडणूकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत, आम्ही राज्यसभेच्या निवडणूकीत आम्ही १२३ मते घेतली होती आता १३४ मते घेतली आहेत असे त्यांनी सांगीतले. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीये म्हणून आमदारांनी आम्हाला मते दिली असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हतं, तरीही आम्ही कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली असे फडणवीस यावेळी म्हणाले. या निकालानंतर महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली असे ते म्हणाले, या सरकारच्या विरोधातील असंतोष समोर आला आहे, यापुढे असाच संघर्ष सुरू राहील आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच तो थांबेल असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

गेल्या वर्षाच्या तुलनेत पुण्याच्या धरणात निम्मा पाणीसाठा ..टेमघर रिकामे ..मान्सून आज बरसला ….

0

पुणे- गेल्या वर्षी आजच्या दिवशी चारही धरणात मिळून ७ .७०/२६.४२% टीएमसी एवढा पाणी साठा होता, आज संध्याकाळी मात्र या चारही धरणात मिळून एकूण ३.३२ टीएमसी /११.४० % पाणी शिल्लक आहे,आज खडकवासला- ०.३१ टीएमसी /१५.९४% ,पानशेत- १.४९/१४.०२,वरसगाव- १.५२/११.८२,टेमघर- ०/० असा पाणी साठा होता. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत चारही धरणात मिळून निम्म्याहून कमी पाणी साठा होता, मात्र आता मान्सून सुरु झाल्याने पाणी साठा होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत

दरम्यान मान्सूनचा पाऊस आज पुण्यात रिमझिम बरसला , खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात देखील बरसला. मान्सून कधी येणार याची प्रतीक्षा होती. लांबलेल्या मॉन्सूनच्या सरी अखेर सोमवारी सकाळी रीमिझीम रिमझिम बरसल्या . खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार धरणात बऱ्या पैकी पाऊस झाला . खडकवासला येथे दोन मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत येथे १०, वरसगाव येथे १० मिलिमीटर तर व टेमघर येथे १५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर एक जून पासून खडकवासला येथे ०, पानशेत ३२, वरसगाव ३४ व टेमघर २३ मिलिमीटर पाऊस झाला .

पाटबंधारे विभागाने आज सायंकाळी असलेल्या पाणी साठ्याबाबत प्रसारित केलेली माहिती पुढील प्रमाणे –

1)Khadakwasala –
02/02/0.31/15.94%/+9/578.33
NMRBC- 00
ww-00
Total water released over spillway KDK dam =00 TMC till now.

2)Panshet– 10/32/1.49/14.02%/-23/610.82
PH-00
ww-00
LLIO-455

3)Warasgaon–
10/34/1.52/11.82%/-32/612.40
ww-00
PH–530
HLIO-00
LLIO-00

4)Temghar–
15/23/0.00/0.00%/Nil/ 660.80
ICPO– 00
ww–00
PH–00

Total Inflow 4 Dam=00 mcft

Total contents of 4 Dams-
3.32 TMC/11.40%
Last year-
7.70 TMC/ 26.42%

श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावाचे महाराष्ट्रातील पहिले उद्यान पुण्यात …लोकार्पण सोहळा संपन्न

0

पुणे- श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावाने महाराष्ट्रातील पहिले उद्यान कासेवाडी – लोहियानगर प्रभागातील सेव्हन लव्हज चौक, शंकर शेठ रोड या ठिकाणी उभारण्यात आले आहे .त्याचा लोकअर्पण सोहळा येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, पुणे म.न.पा चे माजी गटनेते आबा बागुल,शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे, स्थानिक नगरसेवकअविनाश बागवे, श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे चे अध्यक्ष सतीश उबाळे, वाघोली चे सरपंच सौ. उबाळे, तेली समाजाचे प्रतिष्ठित सर्व प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.


यावेळी उल्हास पवार यांनी आपल्या भाषणात येणा-या पिढीला जगनाडे महाराजाच्या कामाची माहिती, सर्व वारकरी संप्रदाय तसेच भागवत समाजाची माहिती देणारे व समाजसेवेची प्रेरणा देणारे , दिशादर्शक हे उद्यान ठरणार आहे.. असे मत त्यांनी व्यक्त केले.
रमेश बागवे यांनी पुर्वीच्या काळात देखील जगनाडे महाराज व तुकाराम महाराज यांच्या वर करमठ वादयान कडून अन्याय होत होता. तसेच अताचे काही लोक प्रयत्न करतायत ते सर्व समाज बांधवांनी एकत्र येवून ते हाणून पाडला पाहिजे असे मत मांडले.
महाराष्ट्रात कुठेच जगनाडे महाराज यांचे नाव असलेले सार्वजनिक उद्यान, समाजमंदिर, वास्तू किंवा चौक, नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून तेली समाजाच्या मागणीनुसार हे उद्यान साकारण्यात आले आहे..या उद्यानात महाराष्ट्रातील सर्व संतांची माहिती, त्यांचे अभंग, भागवत समाज व वारकरी संप्रदाय ची परंपरा तथा इतिहासाची माहिती दर्शविणारे चित्र येथे आहे असे स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे यांनी सांगितले.प्रास्ताविक सुदुंबरे संस्थांचे उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी केले तर आभार क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान चे विठ्ठल थोरात यांनी केले.

सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज ….

0

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सोमवारी रुग्णालयातून घरी परतल्या. त्यांना 2 जून रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर गत 12 तारखेला नाकातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सोनिया गांधींच्या श्वसननलिकेच्या खालच्या भागात फंगल इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे गुरूवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन होते. काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी सोमवारी एका ट्विटद्वारे त्यांच्या डिस्चार्जची माहिती दिली.

23 तारखेला ईडीपुढे हजेरी

नॅशनल हेराल्ड प्रकरणात 75 वर्षीय सोनियांची 23 जून रोजी चौकशी होणार आहे. सध्या या प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणी सोनियांना नवा समंस जारी करुन 23 जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिलेत.उल्लेखनीय बाब म्हणजे ईडीने यापूर्वी 8 जून रोजी सोनियांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. पण, कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांनी तपास यंत्रणेला नवी तारीख देण्याची विनंती केली होती.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप

0

पुणे, दि. 20:- आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आषाढी वारी 2022’ ॲप विकसित करण्यात आले आहे.

या ॲपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक व गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची सोय, पालखीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकरी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टॅकर सुविधा, अन्न पुरवठा आणि वितरणबाबत, विद्युत सेवा, पशुधन बाबत सेवेसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

पालखी सोहळ्याशी संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकदेखील या ॲपमध्ये देण्यात आले आहेत.  भाविकांनी गुगल प्लेस्टोवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.deecto.ashadhiwari या लिंकवरुन आषाढी वारी 2022 हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच भाविकांनी वारीदरम्यान अडचणीच्या वेळी या ॲपवरील संबंधित संपर्क अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

२ तासानंतर अखेर मतमोजणीला सुरुवात…

0

मुंबई-  विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अखेर 2 तासानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणी रखडली होती. केंद्रीय निवडणूक आयोगानेही काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत.खरंतर, भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप सध्या आजारी आहेत. मुक्ता टिळक यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. दोघंही आजारी असताना आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आले होते. पण यावेळी त्यांनी स्वत: मतदान न करता दुसऱ्यांकडून मतदान करून घेतलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला असून याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. पण केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २५ ते २६ मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जाते. राज्यसभेत राजकीय पक्षांची मते फुटली नव्हती. पण, विधान परिषदेत काहीही होऊ शकते, हे साऱ्याच पक्षांचे नेते सूचित करीत आहेत. 

पडणार कोण ? याबाबत उत्सुकता … 

विविध पक्षांचे उमेदवार खालीलप्रमाणे –

भाजपा – राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

शिवसेना – आमश्या पाडवी, सचिन अहिर

राष्ट्रवादी – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे

काँग्रेस – चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप

गोदरेज कन्स्ट्रक्शनने भारतात स्वदेशी थ्रीडी कन्स्ट्रक्शन प्रिंटिंग सुरु करण्यासाठी आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांचे स्टार्ट-अप ‘त्वस्त’ सोबत भागीदारी केली

गोदरेज कन्स्ट्रक्शन आणि त्वस्त‘ यांनी बांधकाम व स्थावर मालमत्ता क्षेत्राला पाठिंबा देणारा प्रवर्तकस्वदेशी थ्रीडी कन्स्ट्रक्शन प्रिंटिंग तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म प्रस्तुत करण्यासाठी एकमेकांसोबत काम करण्याचे ठरवले आहे.

या भागीदारीमार्फत या कंपन्यांनी मिळून एक अतिशय पर्यावरणानुकूलशाश्वत आणि अशाप्रकारचे पहिले काँक्रीट मिश्रण तयार केले आहे ज्यामध्ये जवळपास ३०% रिसायकल्ड काँक्रीट ऍग्रीगेट्सचा समावेश आहे.

पुणे 20 जून२०२२:  गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने आपला व्यवसाय गोदरेज कन्स्ट्रक्शनने त्वस्त‘ मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्ससोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे.  त्वस्त‘ हे आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेले स्वदेशी स्टार्ट-अप असून भारतात थ्रीडी कन्स्ट्रक्शन प्रिंटिंग (थ्रीडीसीपी) हे अभिनव तंत्रज्ञान आणूनव्यावसायिकदृष्ट्या त्याचा वापर करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.  राष्ट्रीय पातळीवरील आत्मनिर्भर भारत‘ अभियानाने प्रेरित होऊनगोदरेज कन्स्ट्रक्शन व त्वस्त‘ यांनी विविध पर्यावरणानुकूल पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पनिवासी सुविधाआपत्तीकाळातील मदतीसाठीच्या संरचनाराष्ट्रीय पातळीवरील संरक्षणसंबंधी ऍप्लिकेशन्स आणि भारत व जगभरातील इतर अनेक सार्वजनिक सुविधा यांच्या विकासासाठी या तंत्रज्ञानाचा सर्वात पहिल्यांदा वापर करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही वाटचाल सुरु केली आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रात सखोल कार्य करणारे स्टार्ट-अप त्वस्त‘, चेन्नई व बंगलोरमध्ये स्थित असून त्यांनी हा स्वदेशी थ्रीडीसीपी तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित केला आहेज्यामध्ये बांधकामाच्या पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत अधिक जास्त वेगवान व अधिक पर्यावरणानुकूल प्रक्रियेसाठी ऑटोमेशन व रोबोटिक्सचा वापर केला जातो. या नवीन प्लॅटफॉर्मवर मॉड्युलर ऑफ-साईट बांधकाम तंत्रांचा वापर करण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. या घटकांमुळे बांधकाम प्रकल्पांचे एकंदरीत कार्बन उत्सर्जन कमी होण्यात मदत होऊ शकते आणि साईटवर काम करणाऱ्या कामगारांना दुखापती होण्याच्या संभावना कमी होऊन सुरक्षेमध्ये देखील सुधारणा होते.   

पर्यावरणानुकल आणि सर्वसमावेशक बस थांबा तयार करण्यासाठी थ्रीडीसीपी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले संकल्पनेची व्यवहार्यता दर्शवणारे प्रात्यक्षिक

भारतातील स्थावर मालमत्ता व पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोदरेज कन्स्ट्रक्शन आणि त्वस्त‘ ने एकत्र मिळून संकल्पनेची व्यवहार्यता दर्शवणारे एक प्रात्यक्षिक तयार केले आहे. (कृपया वर दिलेले चित्र पहा) या बस थांब्याचे थ्रीडी प्रिंटिंग अवघ्या ३२ तासात पूर्ण करून साईटवर ८ तासात असेम्बल करण्यात आले. बांधकाम उद्योगक्षेत्रात चक्राकार अर्थव्यवस्था तत्वांचा अवलंब करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज कन्स्ट्रक्शनने त्वस्तच्या सहयोगाने पहिलेअतिशय पर्यावरणानुकूल काँक्रीट मिश्रण डिझाईन तयार केले आहे ज्यामध्ये मुंबईतील विक्रोळी येथील गोदरेज रिसायकल्ड काँक्रीट प्लान्टमध्ये रिसायकल करण्यात आलेल्या काँक्रीट कचरा डेब्रिजमधून मिळवण्यात आलेले रिसायकल्ड काँक्रीट ऍग्रीगेट्स जवळपास ३०% प्रमाणात वापरण्यात आले आहे.  या अनोख्या संरचनेचे फिजिकल डिझाईन अतिशय अनोखे आहेया तंत्रज्ञानातून बांधकाम उद्योगक्षेत्राला प्रस्तुत केले जात असलेले सौंदर्यातील वैविध्यतासंरचनेतील लाभ आणि उत्कृष्ट क्षमता हे प्रदर्शित करण्यासाठी वक्ररेषांनी युक्त भौमितिक रचनांचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.  बस थांब्यावरील आणि त्यावरील कमर्शियल साईनेजेससाठी रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्थेसाठी स्वतंत्र सोलर पॅनेल्ससह ऊर्जेची संपूर्ण बचत करण्यात सक्षम अशी याची रचना आहे. गोदरेज अँड बॉयसच्या स्प्रिंट‘ या इंट्राप्रिन्युरियल इन्नोव्हेशन उपक्रमादरम्यान ही संकल्पना अस्तित्वात आली आणि विकसित करण्यास सुरुवात झाली.

भारतामध्ये थ्रीडी कन्स्ट्रक्शन प्रिंटिंग तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्याबाबत गोदरेज कन्स्ट्रक्शनचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट व बिझनेस हेड श्री. अनुप मॅथ्यू म्हणालेभारतामध्ये विकसित करण्यात आलेल्या थ्रीडी कन्स्ट्रक्शन प्रिंटिंग तंत्रज्ञान स्वदेशी स्टार्ट-अपसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बांधकाम उद्योगक्षेत्रासाठी अभिनव व पर्यावरणपूरक पद्धतीने डिझाईन करण्यात आलेल्या ग्राहककेंद्री सुविधा पुरवण्यासाठी गोदरेज कन्स्ट्रक्शन वचनबद्ध आहे.  हा पायलट प्रकल्प संयुक्तपणे विकसित केल्यामुळे आम्ही असे मानतो कीआमच्या हितधारकांच्या फायद्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या आणि तो वाढवण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

चक्राकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही संयुक्तपणे एक अभिनव काँक्रीट मिक्स-डिझाईन देखील विकसित केले आहेज्यामध्ये लक्षणीय प्रमाणात रिसायकल्ड काँक्रीट ऍग्रीगेट्सचा वापर करण्यात आला आहे.  हा थ्रीडीसीपी तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा एक भाग आहे.  या नव्याने विकसित करण्यात आलेल्या थ्रीडीसीपी काँक्रीट मिक्समध्ये तुलनेने कमी कार्बन असलेले बांधकाम साहित्य विकसित केले जाते आणि वापरले जाते ज्यामुळे आम्हाला अधिक पर्यावरणपूरक बांधकाम क्षेत्रासाठी अभिनव सुविधा डिझाईन व विकसित करण्यात मदत मिळू शकते.

जागतिक स्तरावर अद्यापही नवीन आणि विकासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या या थ्रीडीसीपी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सुयोग्य संधी शोधण्यासाठी उद्योगक्षेत्रातील प्रमुख हितधारकांना आमच्यासोबत जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.” गोदरेज अँड बॉयसचा व्यवसाय असलेल्या गोदरेज कन्स्ट्रक्शनची आर्थिक उलाढाल १००० कोटी रुपयांची असूनबांधकाम क्षेत्रातील सेवासुविधांमध्ये सातत्याने वाढ करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

त्वस्तचे सह-संस्थापक व सीओओ श्री. विद्याशंकर सी म्हणालेगोदरेज कन्स्ट्रक्शनसारख्या बांधकाम साहित्य क्षेत्रातील प्रवर्तक आणि नव्या विचारांचे नेतृत्व करणाऱ्या कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की या भागीदारीमुळे आमच्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मची वेगाने वृद्धी होण्यात मदत मिळेल. देशातील अनेक वेगवेगळ्या युज केसेसना त्वस्तकडून ज्या विविध प्रकारच्या बांधकाम सुविधा पुरवल्या जातात त्यामध्ये नक्कीच वाढ होईल.”   

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोथरुडमधील वृत्तपत्र व दूध वितरकांना २००० रेनकोटचे वाटप

0

पुणे-भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमधील वृत्तपत्र आणि दूध वितरकांना सस्नेह भेट देऊ केली असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र आणि दूध वितरकांना दोन हजारापेक्षा जास्त रेनकोटचे वाटप केले.

या वाटपावेळी भाजपा संस्कृतिक आघाडीचे प्रदेश प्रमुख शैलेश गोजमगुंडे, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, माजी नगरसेविका हर्षाली माथवड, अल्पना वर्पे, नगरसेवक जयंत भावे, पुणे शहर भाजपा सरचिटणीस दीपक पोटे, चिटणीस अनिता तलाठी, कोथरुड मंडल सरचिटणीस श्रीधर मोहोळ, दिनेश माथवड, विठ्ठल (आण्णा) बराटे, अनुराधा एडके, गिरीश भेलके, उपाध्यक्ष राज तांबोळी, राहुल कोकाटे, लहू बालवडकर, रुपेश भोसले, युवा मोर्चाचे गणेश वर्पे, अभिजीत राऊत, दीपक पवार, स्वप्नील राजीवडे, कुणाल तोंडे, महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, सांस्कृतिक आघाडीचे सुचित देशपांडे, आशुतोष वैशंपायन, ओबीसी आघाडीचे विजय राठोड, अजित जगताप, विशाल रामदासी, विवेक मेथा, जगन्नाथ कुलकर्णी, सचिन दळवी, अभिजीत ठाकूर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील दरवर्षी आपला वाढदिवस दरवर्षी लोकोपयोगी उपक्रमाद्वारे साजरा करतात. गेल्या वर्षी रिक्षा चालकांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी एक हजार रुपये किमतीचे सीएनजीचे कुपन वाटप; तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नागरिकांचे मोफत लसीकरण केले होते.

यावर्षी आ. पाटील यांनी वृत्तपत्र वितरक आणि दूध वितरकांचे पावसापासून संरक्षणासाठी व्हावे, यासाठी रेनकोट वाटप करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी आपल्या वाढदिवसानिमित्त हार, तुरे नको! वृत्तपत्र आणि दूध वितरकांना रेनकोट आणि घरकाम करणाऱ्या ताईंसाठी छत्री वाटपासाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्याला अनुसरून अनेक कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले होते. त्यानंतर लोकसहभागातून वृत्तपत्र वितरक आणि दूध वितरकांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. कोथरुडमधील जवळपास दोन हजारापेक्षा जास्त वृत्तपत्र आणि दूध वितरकांनी याचा लाभ घेतला.

दरम्यान, उद्या दिनांक २१ जून २०२२ रोजी कोथरुडमधील रिक्षाचालकांनाही रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते ५ या वेळेत आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात याचे वाटप करण्यात येणार असून, यासाठी रिक्षाचालकांनी आधार कार्ड आणि वाहन कागदपत्रे घेऊन जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून, याचाही लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादांसारखी संवेदनशीलता अंगीकारावी – राजेश पांडे

0

पुणे-चंद्रकांतदादा हे नेत्यापेक्षा कार्यकर्ते म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यात समाजाप्रती जी संवेदनशीलता आहे ती प्रत्येक कार्यकर्त्याने अंगीकारली पाहिजे असे भाजपा चे संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे म्हणाले. दादा निस्पृह कार्य करण्यात अग्रेसर असून योग्य वेळी योग्य मदत करायची हा त्यांचा गुण असल्याचे ही ते म्हणाले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनानुसार त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे घरेलू कामगार महिलांना छत्री आणि रेनकोट चे वाटप करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. पावसाळ्याच्या तोंडावर घरेलू कामगार भगिनींना छत्री व रेनकोट चे वाटप हे खऱ्या अर्थाने सेवाभावी कार्य असून राजकारण करताना प्रत्येकाने सेवाभावी वृत्ती जोपासणे गरजेचे आहे ,आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन काम करणे आणि गरजवंतांना योग्य मदत करणे हेच आपले संस्कार असून यातूनच समाजातील एकोपा वाढतो असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
. यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका माजी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, भाजप सरचिटणीस व माजी नगरसेवक दीपक पोटे, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर चिटणीस प्रशांत हरसुले,चिटणीस सुनील पांडे,माजी स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, मंडल सरचिटणीस दिनेश माथवड, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे, कोथरूड महिला मोर्चा उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, महिला मोर्चा चिटणीस संगीता आदवडे,शंतनू खिलारे पाटील,युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक खर्डेकर,ओबीसी आघाडीचे अभिजित फरांदे, सौ. संगीता वांद्रे, वृषभ मोकाटे, आय टी सेल च्या संयोजिका कल्याणी खर्डेकर इ मान्यवर उपस्थित होते.पावसाळ्यात जेव्हा भगिनी घरकाम करायला जातात तेव्हा त्या अनेकवेळा भिजत जातात व स्वतःच्या प्रकृती कडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घेऊन त्यांना छत्री / रेनकोट याची भेट देत असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.क्रिएटिव्ह फाउंडेशन ही विश्वस्त संस्था कायमच समाजकार्याला प्राधान्य देत आली आहे व हे करताना आपण समाजाचे जे देणे लागतो त्यातून काही अंशी उतराई होते असे भावपूर्ण उद्गार फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काढले. समाजातील दानशूर आणि गरजवंत यांच्यातील मध्यस्थ म्हणून क्रिएटिव्ह फाउंडेशन गत 20 वर्षांपासून कार्यरत असून यातून मिळणारा आत्मिक आनंद अनमोल असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी चंद्रकांतदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी नगरसेवक दीपक पोटे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
संदीप खर्डेकर यांनी संयोजन व सूत्रसंचालन, मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक, प्रशांत हरसूले यांनी आभार प्रदर्शन केले तर संगीताताई वांद्रे आणि वृषभ मोकाटे यांनी संयोजन साहाय्य केले.

पाणीबाणी विरोधात आपचा मनपावर हंडा मोर्चा

0

पुणे-पुण्यातील पाणीटंचाई कृत्रिमरीत्या वाढवून तिचे रूपांतर पाणीबाणीमध्ये केलेले आहे. पुणे मनपा प्रशासनाला पाणीचोरीला पायबंद घालण्यात अपयश आले आहे. टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवकांचे आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संरक्षण असून या पाणीबाणी विरोधात आज सोमवारी दिनांक २० जून रोजी सकाळी ११ वाजता आम आदमी पक्षातर्फे हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्ते, त्रस्त नागरिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पुणे महानगरपालिके मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहेच. त्याशिवाय पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील परिघावरील भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत आहे. याबाबत वारंवार पुणे महानगरपालिकेला निवेदने देऊन सुद्धा परिस्थितीमध्ये कोणताच फरक न पडल्याने आज या हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते असे
आप पुणे शहर जल हक्क आंदोलन समितीचे आबासाहेब कांबळे (8390906656) यांनी सांगितले

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक परिसरांमध्ये मनपाद्वारे पाणी पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे नाइलाजास्तव शेकडो सोसायट्यांना दरमहा लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करून पाणी विकत घ्यावं लागतं. पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना टँकरचे पैसे सुद्धा द्यावे लागतात हा दुहेरी कर नागरिकांवर अन्याय कारक आहे. पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ४०% पाण्याची गळती होत आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी देखील होत आहे. टॅंकर लॉबीचे शहरावर वर्चस्व असून त्यांना नगरसेवक आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संरक्षण लाभलेले आहे आणि त्याचा भुर्दंड पुणेकरांना सहन करावा लागत आहे, असे आप पुणे जल हक्क आंदोलन समितीचे सुदर्शन जगदाळे (9527911911) यांनी म्हटले आहे.

पुणे मनपातर्फे अनेक बिल्डिंगना बेकायदेशीरित्या पाणी प्रतिज्ञापत्र घेऊन बांधकामाला परवानगी दिली जाते. नंतर बिल्डर पाणीपुरवठा करत नाही. मनपा देखील पाणीपुरवठा करत नाही आणि नागरिक पाण्याअभावी वाऱ्यावर सोडले जातात. हा बेकायेशीर प्रकार थांबला पाहिजे असे विद्यानंद नायक यांनी म्हटले आहे.

यावेळी सुदर्शन जगदाळे, आबासाहेब कांबळे, अमोल काळे, निलेश वांजळे, विद्यानंद नायक, अन्वर बाबा शेख, उमेश बागडे, फेबियन आण्णा सॅमसन, यशवंत बनसोडे, आरती करंजावणे, ज्योती ताकवले, सुनंदा जाधव, वैशाली डोंगरे, सीमा गुट्टे, सचिन कोतवाल, शहर संघटक एकनाथ ढोले यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.

टँकर लॉबीच्या दबावाखाली पुणे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण केली गेली असून त्यामूळे टँकर लॉबीचे उखळ पांढरे झाले आहे. या टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवक आणि प्रशासनाचे संरक्षण आहे. पुण्यातील विशेषत: बाणेर, बालेवाडी, हडपसर, फुरसुंगी, काळे पडळ, साडे सतरा नळी, मोहम्मदवाडी, खडी मशीन चौक, उंद्री, पिसोली, वडकी नाला, येवलेवाडी, कोंढवा बू. वानवडी, कात्रज, आंबेगाव पठार,आंबेगाव बू. , नऱ्हे, वडगाव बू. सिंहगड रोड, धायरी, नांदेड फाटा, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला, वारजे_ माळवाडी गणपती माथा, कोंढावे- धावडे, NDA गेट, बावधान, ससरोड, सुसगाव, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, दापोडी, बोपोडी, मुळा रोड, विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, विमान नगर, खराडी, चंदन नगर बायपास, मांजरी, वाघोली या भागांमध्ये तीव्र पाणटंचाई निर्माण केली गेल्याने या परिसरातील हजारो गृह सोसायट्यांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी अक्षरशः लाखो रुपये प्रत्येक महिन्याला एका सोसायटीला मोजावे लागत आहे. महागाईच्या जमान्यात तुटपुंज्या पैशात घर चालवणारे वस्तीत राहणाऱ्या लोकांना सुद्धा पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

माननीय उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा पुणे मनपाने शहराच्या परीघावरील नवीन समाविष्ट गावांना आणि पूणे मनपा हद्दीतील जुन्या भागांना पुरेसा पाणी पुरवठा केलेला नाही. नको त्या योजनांवर, भ्रष्ट कंत्राटावर, फुटकळ खरेदीवर, वायफळ बांधकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करणारी पुणे मनपा नागरिकांना पाणी देण्यासाठी मात्र हात वर करत आहे.

मनपाला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी डॉ अभिजीत मोरे, आबासाहेब कांबळे, विद्यानंद नायक, सीमा गुट्टे, ज्योती ताकवले यांच्या शिष्ट मंडळाने आयुक्त विक्रम कुमार आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी पाणी टंचाई बाधित सोसायट्यांची यादी आम आदमी पक्षाने दिली. संबंधित सोसायट्यांना पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. तसेच टँकर पुरवठा वाढविण्याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन अनिरुद्ध पावसकर यांनी दिले. तसेच आपच्या शिष्टमंडळासोबत पुढील आठवड्यात आढावा बैठक आयोजित करण्याचे पावसकर यांनी मान्य केले. यावेळी पाणी प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्याचा भोंगळपणा बंद करण्याची मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली.

केंद्रीय संचार ब्यूरो पुणे तर्फे योग चित्र-प्रदर्शन,केंद्रीयमंत्री नारायण राणे करणार उद्घाटन

0

पुणे  20, जून  2022

आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त पुण्यामध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये योग उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर भारत सरकार तर्फे या योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुष मंत्रालय, पुणे; केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, पुणे व पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी हा योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे आयोजित योग व योगगुरुंबद्दल माहिती देणारे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येईल. या तीन दिवसीय योग चित्र प्रदर्शन विनामूल्य आहे. योगोत्सवात सहभागी होणाऱ्या पहिल्या एक हजार नागरिकांना फुगेवाडी ते पिंपरी आणि परत असा मोफत प्रवास/ जॉय राईड मिळणार आहे.

 

उद्याच्या योग दिनाचे औचित्य साधून नांदगाव, नाशिकच्या न्यू इंग्लिश प्रशालेमध्ये दिनांक 18 जून रोजी योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रात्यक्षिक, व्याख्यान, प्रश्नमंजुषा स्पर्धा व जागृती फेरी द्वारे योगप्रचार करण्यात आला.  

केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद, योग संवर्धन संस्था व भारतीय योग संस्थान, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने काल भानुदास चव्हाण सभागृह प्रांगण येथे योग दिंडी काढण्यात आली होती. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, डॉ. भागवत कराड यांनी या दिंडीला सुरुवात करून दिली. योग प्रात्यक्षिक केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद तर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमात योग लोगो छापलेल्या टोप्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी औरंगाबाद शहरातील विविध योग संस्थेतील योग प्रेमी तसेच स्काउट गाइडचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्र औरंगाबादचे स्वयंसेवक या योग दिंडीत मोठ्या संखेने सामिल झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवदर्शन सांस्कृतिक संच, औरंगाबाद यांच्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर शहरात 500 लोकांच्या रॅलीने काल जनजागृती केली. 21 जून रोजी हरिभाई देवकरण प्रशाळेमध्ये नागरिक योग जागर करतील. सुमारे सात हजाराहून अधिक नागरिक यावेळी उपस्थित असतील. सोलापूरमधील प्रतिष्ठित योग गुरूंचा सत्कार यावेळी करण्यात येईल. नेहरू युव केंद्र, जिल्हा प्रशासन, विवेकानंद केंद्र, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजलि योगपीठ या कार्यक्रमात सहभागी हॉट आहेत.

पोलीस परेड ग्राऊंड, अलिबाग येथे एका विशेष प्रचारात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये योग अभ्यासक, मार्गदर्शन, प्रचार फेरी व महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ जसे की मल्लखांब, लाठी-काठी, दांडपट्टा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. केंद्रीय संचार ब्यूरो सह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था, श्री अंबिका योग कुटीर, ठाणे यांचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर तसेच नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे कॉमन योग प्रोटॉकल वर आधारित योग प्रात्यक्षिके करण्यात येतील; योगाला प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी शाहिरी पोवाडा कला मंच कोल्हापूर, प्रोत्साहनपर पोवाड्याचे सादरीकरण करतील. नेहरू युवा केंद्र संघटन मार्फत 17, 18 आणि 19 जून रोजी झालेल्या तालुका स्तरावरील योग प्रात्यक्षिक आधारित स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील करण्यात येईल. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एक दिवस आधी कळंबा तर्फ ठाणे येथे जिल्हा महिला व बालविकास विभाग, कळंबा ग्रामपंचायत आणि केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने योगावर आधारीत कार्यशाळेचे आणि योग आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सर्व शाळांना आंतरराष्ट्रीय योग दिनी योगाभ्यास करण्याविषयी देखील आवाहन करण्यात आलेले आहे.

केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्यूरो, नागपूर तर्फे 20 जून रोजी रांगोळी व चित्रकला स्पर्धा आणि 21 जून 2022 रोजी बजाज नगर येथील कृषीकुंजच्या कम्युनिटी हॉल मध्ये योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळमध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ योग प्रसारक यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हा केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, नगर परिषद प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, होमगार्ड कार्यालय, पतंजली योग समिती, रविशंकर आर्ट ऑफ लिव्हींग, क्रीडा भारती, यवतमाळ जिल्हा हौसी असोसिएशन, यवतमाळ जिल्हा शारिरीक शिक्षण संघटना, आरोग्य भारती, संस्कार भारती, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, विविध योग समिती संघटना मंडळ अशा सुमारे अकराहून अधिक विविध सामाजिक संस्था व संघटना यांच्या सयुंक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. यावेळी नृत्याधारीत योग प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/IMG-20220617-WA00017QB4.jpg

जळगावच्या निमखेडी मार्ग येथे योग शिबिर व प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय संचार ब्यूरोचे जळगाव मधील क्षेत्रीय कार्यालय, इंद्रदेवजी योग विद्या संस्था व आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल यासर्वांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील ७५ स्थळांमध्ये योगोत्सव साजरा होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन स्थळांचा समावेश आहे. पैकी सेवाग्राम, वर्धा येथील चरखा गृहामध्ये जिल्हास्तरीय योग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, पर्यटन संचालनालय, नागपूर विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा, महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी पतंजली योग संस्थान वर्धा आणि वर्धा जिल्हा योग काऊन्सिल या संस्थांचे सहकार्य लाभले आहे. योग प्रशिक्षकांमार्फत सहभागींना योगासने आणि त्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. मन आणि शरीर यांच्यात ताळमेळ साधण्यासाठी योगाचा फायदा आपल्याला कसा होते, याची माहिती या सत्रात देण्यात येईल.

केंद्रीय संचार ब्यूरो, नांदेड तर्फे परभणी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान, धर्मापुरी येथे ग्रामपंचायत व महविद्यालयासोबत योग सत्र आयोजित करण्यात आले आहे. 

गोव्यातील पणजी शहराजवळील पर्वरी येथील संजय स्कूलमधील विशेष मुलांची योग कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने चित्रकला व योग प्रात्यक्षिके स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. गोव्याचे पहिले पद्म पुरस्कार विजेते ब्रम्हानंद सांखळवालकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.  

इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन क्षेत्रात महावितरणची आघाडी 

0

मुंबई दि. 20 जून 2022: पर्यावरण पुरक आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना मोठ्या प्रमाणात स्विकारल्या जात आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशात विकल्या जाणा-या एकूण वाहनापैकी 30 टक्के ही इलेक्ट्रीक वाहने असणार आहेत. या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहन धारकांना त्यांच्या वाहनांच्या चार्जींगची व्यवस्था सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी पुढाकार घेत महावितणने राज्यात 13 ठिकाणी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरु केली असून राज्यातील विविध ठिकाणी 2,375 स्टेशन्स प्रस्तावित केले आहेत.

आत्तापर्यंत महावितरणने आपल्या उपकेंद्रातील अतिरिक्त जागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करुन ठाण्यात 5, नवी मुंबई येथे – 2, पुणे येथे 5 आणि नागपूर येथे 1 अशी एकूण 13 चार्जिंग स्टेशन सुरु केली आहेत. याशिवाय महावितरणमार्फत प्रस्तावित अतिरिक्त 49 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कामे प्रगतिपथावर आहेत. यात नवी मुंबई येथे 10, ठाणे-6, नाशिक -2, औरंगाबाद-2, पुणे 17, सोलापूर- 2, नागपूर -6, कोल्हापूर – 2, अमरावती येथे – 2 चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे.

याचसोबतच राज्य शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण- 2021 दि. 23 जुलै 2021 रोजी जाहीर केले आहे. यानुसार सन 2025 पर्यंत राज्यातील इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा बृहन्मुंबई शहर समुह 1500, पुणे शहर समुह 500, नागपुर शहर समुह 150, नाशिक शहर समुह 100, औरंगाबाद शहर समुह 75, अमरावती 30. सोलापुर 20 अशी एकुण 2,375 तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक, नाशिक-पुणे हे पुर्णत: इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक चार्जिंग इकोसिस्टम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्याची परवानगी दिली आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉलजवळ कुणीही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करु शकतो. याशिवाय आता महामार्गाच्या बाजूला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येत आहेत. शिवाय राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा पुरविण्याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. शिवाय खाजगी व्यक्तींना चार्जिंग स्टेशन उभारायचे असल्यास त्यांना महावितरणतर्फे प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येत आहे. राज्य शासनाने जाहिर केलेल्या निर्णयात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी वित्तीय प्रोत्साहन जाहिर करण्यात आले आहे. निमसार्वजनिक चार्जिंग स्टेशन्ससाठी मंदगतीचे 15,000 चार्जर व मध्यम वेगवान चार्जर 500 अशी एकूण 15,500 चार्जिंग पायाभुत सुविधासाठी अंदाजे रु. 40 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही वित्तीय प्रोत्साहने वितरित करण्याकरिता महावितरणमार्फत अद्ययावत वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.

महावितरणचे मोबाईल अॅप – पॉवरअपईव्ही (PowerUpEV) – इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती तसेच भौगोलिक निर्देशांकाची माहिती प्रदान करण्यासाठी महावितरणने ‘पॉवर अप ईव्ही’ (PowerUpEV) नावाचे मोबाईल अॅप विकसीत केलेले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती (उपलब्ध किंवा वापरात आहे), स्टेशन वर्णन, प्लग टाईप, शक्ती (डीसी, एसी). सुरु करण्याची वेळ, उपलब्ध वेळ (अॅपद्वारे बुकिंग). सद्यस्थळापासूनचे अंतर, चालू स्थळावरुन जवळचे स्टेशन सर्व्हिसमध्ये नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास जवळचे पर्यायी चार्जिंग स्टेशन इत्यादी माहिती उपलब्ध आहे.