Home Blog Page 1917

शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योगसाधना उपयुक्त -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0

नागपूर, दि. 21 : निरोगी आयुष्य जगण्यासाठी, शारीरिक, आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित योगसाधना करणे अत्यावश्यक आहे. याबाबतचा अनुभव आपण स्वतः गेल्या काही वर्षांपासून घेत असल्याचे  सांगून सर्वांनी आपल्या व्यस्तदिनक्रमातून वेळ काढून दररोज योग साधना करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कस्तुरचंद पार्क येथे आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार  प्रवीण दटके, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सदस्य श्री. अलोक, प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक एन. एल. येवतकर जनार्धन स्वामी योगाभ्यास मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे, योगाचार्य भारतजी, सरोज गुप्ता यावेळी उपस्थित होत्या.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरातील 75 ऐतिहासिक स्थळांवर केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. यामध्ये नागपूर येथील कार्यक्रमाचाही समावेश होता. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत यावेळी योगसाधना केली. ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’ ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना होती.

योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये राष्ट्रसंघामध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार 2015 पासून अनेक देशांमध्ये योग दिवस साजरा होत असून योगसाधनेचे महत्त्व जगभरात पोहचण्यास मदत झाली आहे. विदेशात अनेक ठिकाणी योगशास्त्र शिकविले जावू लागले आहे. दररोज नियमित योगसाधना केल्याने आपल्याला शारीरिक, मानसिक संतुलन साधता येते, याचा अनुभव आपण स्वतः गेल्या काही वर्षांपासून घेत असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

दररोज किमान एक तास योगसाधना केल्यास आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो. आयुर्वेद, अॅलोपॅथी औषधोपचारापेक्षा योग साधना ही उपयुक्त असून त्यामुळे दवाखान्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. योगसाधनेतून जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे श्री. गडकरी म्हणाले. योग प्रसार करणाऱ्या अनेक संस्थांकडून योगाचे निस्वार्थीपणे, निःशुल्क प्रशिक्षण दिले जात असून नागरिकांनी शहरातील बगीचा, मैदानांवर दररोज सामूहिक योगसाधना करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जीवनात समाधान, सुख प्राप्त करण्यासाठी नियमित योगसाधना करणे आवश्यक असल्याचे सांगून श्री. खांडवे यांनी जनार्धन स्वामी योगाभ्यास मंडळामार्फत योग प्रसारासाठी करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कर्नाटकातील मैसूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रसारण करण्यात आले. यावेळी त्यांनी देशवासियांना योगसाधनेचे महत्त्व सांगून नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

कस्तुरचंद पार्क येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महामेट्रोने नागरिकांसाठी  नि:शुल्क मेट्रोसेवा उपलब्ध करून दिली होती. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या यंत्रणांचे अधिकारी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

“१० वी,१२ वी मध्ये चाटेंच्या विद्यार्थ्यांचे निर्विवाद वर्चस्व”.

0

पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेतलेल्या इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चाटें क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबतच चाटे स्कूल कात्रज, चाटे पब्लिक स्कूल धनकवडी, चाटे स्कूल गाऊडदरा मधील विद्यार्थ्यांनीही निर्विवाद असे यश संपादन करत चाटे समुहाची उज्वल यशाची परपंरा कायम राखली.यामध्ये चाटे समुहाच्या पुणे विभागातून प्रांजल वाघमारे 98%,अभिषेक कुलकर्णी 97.80%,सोहम सावंत 97.60%, सिद्धी नाईक 97.60%, श्रावणी सोनवणे 97.40%, खुशी पाटील 97.20%, तनुजा शेलार 97.20%, अभिजीत कोंढाळकर 97%, जानवी कवळे 97%, दीपक बुट्टे 96.80%, श्रेया लोहोत 96.80%, वैष्णवी रेपाळ 96.40%, नंदा श्लोक 96.40%, धनंजय कोष्टी 96.40%, वेदांत दाभाडे 96.40%, पार्थ शिंगे 96.20%, पलक अग्रवाल 96.20%, यश मडके 96.20%, आर्यन नवले 96%, जानवी पल्लादे 96%, भक्ती गवळी 96%, संदेश शिरसे 95.80%, अक्षता बिडवे 95.80%, युवराज गोगावले 95.60%, अनुष्का कुलकर्णी 95.60%, ओंकार लोंढे 95.40%, निकिता चौधरी 95.40%, शिवांजली जगदाळे 95.20% अशा अनेक विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले.यावेळी प्रा. फुलचंद चाटे यांनी सर्व गुणवतांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चाटे समूहाद्वारे दहावी बोर्ड परीक्षा मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांकरीता कौतुक सोहळा आयोजित केला होता.
विद्यार्थ्यांना १० वी मध्ये शिकत असतानाच दहावीची तयारी ही पुढील शिक्षणाचा पाया आहे याबद्दलची असणारी जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये वेळेतच यावी यासाठी चाटे शिक्षण समूह हा नेहमीच प्रयत्नशील असतो आणि जर दहावी मध्येच चांगले गुण मिळाले तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवून पुढील शिक्षणाची वाटचाल यशस्वीपणे करता येते. विद्यार्थी व पालकांनी दहावीच्या निकालामध्ये फारसे अडकून न राहता पुढच्या वाटचालीस सुरुवात करावी असा सल्ला यावेळी चाटे सरांनी विद्यार्थी व पालकांना दिला.
परीक्षेमधील उज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपले पुढील शिक्षण हे आयआयटी पवई, सीओईपी पुणे, बीजे मेडिकल पुणे, एम्स दिल्ली इ. नामवंत संस्थांमधून घेण्याचे ठरवल्याचे सांगितले व काही विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करण्याची इच्छा असल्याचेही या ठिकाणी नमूद केले. जेईई, नीट, सीईटी या करिता आम्ही अगोदरच चाटे कॉलेजमध्ये याची तयारी मे-2022 पासूनच सुरू केल्याची विद्यार्थ्यांनी कल्पना दिली व आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले पालक व चाटे शिक्षण समूहातील सर्व गुरुजन वर्ग यांना जाते असेही यावेळी विद्यार्थ्यांनी नमूद केले
बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत मागील ३३ वर्षापासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अतिशय सक्षम पणे व यशस्वीरित्या चालू आहे यामुळेच आज विद्यार्थी व पालकांचा चाटे शिक्षण समूहावर पूर्ण विश्वास आहे. कार्यक्रमासाठी समूहाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोबतच पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा विजय बोबडे, शैक्षणिक समन्वयक प्रा बापू काटकर,प्रा रत्नाकर सोनवणे आदी मान्यवरही या ठिकाणी उपस्थित होते.

चाटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स चा 100 टक्के निकाल- प्रा. फुलचंद चाटे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये चाटे कॉलेज सोबतच चाटे क्लासेस च्या विद्यार्थ्यांनीही अभूतपूर्व असे यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चाटे शिक्षण समूह पुणे विभागाचे संचालक माननीय प्रा. फुलचंद चाटे सर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व सर्वांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बारावी बोर्ड परीक्षा मध्ये निरांत खराटे 95.50 %, सिमरन नागवेकर 94.83, घाडगे आदिती 94.83, प्राची भोगे 93.50, दीप्ती वसेकर 93.17, शिवानी हेंगणे 93.17, प्रीती जगताप 92.67, श्रुती शिंदे 92.50, शुभम मुंडे 92.33, अभिजीत गंजुरे 92.00, वैभवी नाले 92.00 अशा जवळजवळ 107 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत चाटे शिक्षण समूहाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली
सर्वच विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची आतुरता होती. कोरोणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दोन वर्षानंतर प्रथमच यावर्षी विद्यार्थी लेखी परीक्षेस सामोरे गेले होते.चाटे शिक्षण समूहा द्वारे सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना प्राध्यापक चाटे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनो आपण घेतलेल्या अथक परिश्रमाचे हे फलित आहे त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,आपले पालक यांचाही आपल्या या अभूतपूर्व यशामध्ये तितकाच सहभाग आहे यापुढेही आपण आपल्या या यशाने हुरळून न जाता यापेक्षाही जास्त मेहनतीने पुढील नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत कराल याची आम्हास खात्री आहे.चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी जे यश मिळविले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि हे केवळ चाटे शिक्षण समूहाच्या कार्यप्रणाली मुळेच शक्य करता आले आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत मागील ३३ वर्षापासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अतिशय सक्षम पणे व यशस्वीरित्या चालू आहे यामुळेच आज विद्यार्थी व पालकांचा चाटे शिक्षण समूहावर पूर्ण विश्वास आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. काटकर यांनी केले यावेळी प्रा बोबडे, प्रा सोनवणे आदी मान्यवर मीटिंगमध्ये उपस्थित होते.

अवयवदानाची लोकचळवळ व्हायला हवी – आरोग्य मंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. 21 : ‘अवयवदानाची लोकचळवळ व्हायला हवी. त्यासाठी जाणिव जागृती करायला हवी’, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले, त्यावेळी ते बोलत होते.

दोस्त फाऊंडेशनच्यावतीने आयोजित अवयवदान दिंडी व चित्ररथास श्री. टोपे यांनी ध्वज दाखवून प्रारंभ केला. यावेळी दोस्त फाऊंडेशनचे डॉ. कैलास जवादे, डॉ. वैशाली जवादे, डॉ. गोविंद जवादे, डॉ. स्वाती माने, विजय कोहड आदी उपस्थित होते.

श्री. टोपे यांनी सांगितले की, आपल्या देशात अनेक नागरिकांना प्रत्यारोपणासाठी विविध अवयवांची आवश्यकता असते, मात्र त्या प्रमाणात अवयव उपलब्ध होत नाहीत. अनेक नागरिकांना अवयव मिळत नाहीत. त्यामुळे अवयवदानाबाबत समाजात जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दोस्त फाऊंडेशनच्या वतीने केली जाणारी जाणीव जागृती महत्त्वाची आहे.

अवयवदानाबाबत माहिती देणारा चित्ररथ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. त्यामाध्यमातून अवयवदानाबाबत असणारे गैरसमज दूर करणे, समाजात सकारात्मक विचार रुजवणे हे काम केले जाणार आहे, असे डॉ. जवादे यांनी सांगितले.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

0

मुंबई, दि. 21 : कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरातील घाट भागातील काही ठिकाणी दि 22 ते 25 जून दरम्यान पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार  पाऊस  पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र,कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.

दि. 22 जून रोजी मराठवाड्यात वादळ वारा व विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस तर पुण्यातील घाट भागातील काही ठिकाणी दि. 23 ते 25 जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र- गोवा सागरी किनाऱ्यावर जावू नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनाऱ्यावर दि. 22 जूनच्या मध्यारात्रीपर्यंत 3-3.1 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

देवेन्द्रजींना मुख्यमंत्री होऊ द्यात तर आपण उपमुख्यमंत्री व्हा- एकनाथ शिंदेंची ठाकरेंना शर्त -राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला सोडचिठ्ठी द्या …

0

नार्वेकरांच्या फोनवरुन एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी चर्चा; भाजपसोबत सत्ता स्थापन करा- शिंदेंची प्रमुख अट

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी अटच मुख्यमंत्री ठाकरे यांना शिष्टाई करण्यासाठी सुरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत घातली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा हादरा बसला आहे. शिंदे यांनी 30 आमदारांसह सुरत गाठले असून आता उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. दिग्गज मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 15 शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि 14 अपक्ष आमदार सुरतला गेले असून या गटात आणखी 3 मंत्री असून एकूण 30 आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत.

राज्यातील काँग्रेसही अलर्ट मोडवर असून त्यांचेही आमदार फुटण्याची भिती व्यक्त होत आहे. याच धर्तीवर काँग्रेसने त्यांच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. तर वर्षा बंगल्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले आहेत. दुसरीकडे मातोश्रीवर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली आहे.

शिंदे उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?

  • एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. यात संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली. शिंदेंचा गैरसमज झाला असे राऊत एकीकडे म्हणतात तर दुसरीकडे शिंदेंनी आमदारांचे अपहरण केले असे म्हणतात अशी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
  • मी शिवसेनेविरोधात बोललो नाही, स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा केली नाही. भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही कागदावर सही केली नाही मग मला गटनेते पदावरुन का काढले? असा सवालही शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.

भाजपशी युती करा- शिंदेंची अट

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती तोडून भाजपसोबत युती करण्याची अट ठेवल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपदावर बसायचे असल्याचेही बोलले जात आहे. शिंदे यांनी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे या तीन आमदारांनाही मातोश्रीवर पाठवले आहे. या बैठकीत काय झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.

आमदारांसह शिंदे दिल्लीला जाणार?

सुरतमध्ये उपस्थित असलेल्या आमदारांबाबत दोन शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. प्रथम- त्यांना विमानाने दिल्लीला नेले जाऊ शकते आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नेले जाऊ शकते. दुसरे- त्यांना अहमदाबादमधील कोणत्याही रिसॉर्टमध्ये नेले जाऊ शकते.

मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेंच्या भेटीला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सुरतला पाठवले आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार रवी पाठक हेही सुरत येथील ली-मेरीडीअन या हॉटेलमध्ये गेले. त्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे 1 तास 10 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत ठोस निर्णय काय झाला हे मात्र समजू शकले नाही

एकनाथ शिंदेंच्या या आहेत अटी

  • हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी युती करा
  • काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोडावे त्यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले
  • मीच गटनेता राहणार

उद्धवजी आपण उपमुख्यमंत्री व्हा

एकनाथ शिंदे यांच्यांशी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे यांनी संपर्क साधला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी एकनाथ शिंदे यांची आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत, तर उपमुख्यमंत्री आपली वर्णी लागावी, अशी मागणीही शिंदे यांनी केल्याचे समजते.

शिंदे अन् देशमुखांमध्ये खडाजंगी

नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये 30 हून अधिक आमदार असल्याचे समजते. त्यात बाळापूर (अकोला) येथील आमदार नितीन देशमुख आहेत. देशमुख आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. सूरतला आल्यामुळे देशमुख नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांचे शिंदे यांच्यासोबत खटके उडाले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. देशमुख यांना सध्या सूरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांना हॉटेलमधून बाहेर जायचे होते. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर येऊन बसले. मात्र, वाहन नसल्याने ते पंधरा मिनिटे तिथेच बसून राहिले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमदारांना हलवणार

सूरतच्या हॉटेलमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या नाराज आमदारांना आता अहमदाबादला पाठवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तत्पूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी नड्डा यांच्या घरी पोहचल्याचे समजते.

कोणते आमदार नॉटरिचेबल?

1. शहाजी बापू पाटील

2. महेश शिंदे सातारा

3. भरत गोगावले

4. महेंद्र दळवी

5. महेश थोरवे

6. विश्वनाथ भोईर

7. संजय राठोड

8. संदीपान भुमरे

9. संजय शिरसाठ

10. रमेश बोरणारे

11. प्रदीप जैस्वाल

12. अब्दुल सत्तार

13. तानाजी सावंत

14. सुहास कांदे

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत 151 वर घसरले आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 162 आमदार होते. राज्यसभा निवडणुकीपूर्वी ही संख्या 170 होती. म्हणजेच राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची संख्या 10 पेक्षा कमी झाली. विधान परिषदेनंतर एकूण 19 आमदार महाविकास आघाडीपासून दूर गेले. दुसरीकडे, भाजपला आता 134 आमदारांचा पाठिंबा आहे. सरकार टिकण्यासाठी 144 चे बहुमत आवश्यक आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या आकड्यांमधील फरक खूपच कमी आहे.

पक्षांतर बंदी कायदा

विधानसभेत शिवसेनेचे एकूण 56 आमदार आहेत. कायद्यानुसार शिंदे यांना 2/3 आमदार म्हणजे 37 आमदार जमवायचे असतील. सध्या शिंदे यांच्याकडे एकूण 29 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांना आणखी 8 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

माझ्यावरही ईडीचा दबाव, पण म्हणून मी पक्षाशी गद्दारी केली नाही, शिवसेना म्हणजे माझी आई : राऊत

0

मुंबई : “एकनाथ शिंदेंच्या बंडामागे त्यांची काहीतरी मजबुरी असेल. माझ्यावरही ईडी सीबीआयचा दबाव आहे. पण म्हणून मी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केलेला नाही”, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे आज सायंकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलं. त्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला.”आमची एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने चर्चा होतीये. त्यांची मजबुरी मला माहिती आहे. असं नाही की सेना पक्षप्रमुखांना त्यांचे प्रॉब्लेम माहिती नाहीयेत. माझ्यावरही ईडी सीबीआयचा दबाव आहे, पण म्हणून मी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला नाहीये. मला तर सरकार पाडण्यासाठी इतक्या धमक्या आल्या, पण मी डगमगलो नाही. मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संबंधी पत्र लिहिलं. धमक्या आल्या म्हणून मी पक्ष सोडण्याची भूमिका घेतली नाही. मी पक्षाशी बेईमानी गद्दारी केली नाही, अशा सांगत एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी पुनर्विचार करावा, असं राऊत म्हणाले.”मला जेलमध्ये टाका, माझ्याविरोधात कारवाई करा, पण मी माझ्या आईशी गद्दारी करणार नाही. कारण शिवसेना पक्ष म्हणजे माझी दुसरी आई आहे. मी आईशी बेईमानी-गद्दारी केली नाही, असं मी ठणकावून मला धमकी देणाऱ्यांना सांगितलं”, असं राऊत म्हणाले.”काही लोक दबावात असतील, काही लोकांना दबावात आणलं जाईल. आमच्या अनेक आमदारांना धमकावलं जातंय. सरकार पाडण्यासाठी भाजपचे लोक कोणत्याही थराला जातायत. पण मी त्यांना ठामपणे सांगू इच्छितो, काहीही करा, पण सरकार पडणार नाही” , असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

फडणवीसांची मैत्री खुपली..ठाकरेंचा महत्त्वाच्या निर्णयाला  चाप; झाले एकनाथांचे बंड

0

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा कमी होत असल्याचे पाहून केले बंड

शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा बिगुल वाजवला असून .महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन लोटस सुरू झाले आहे खरे तर समृद्धी द्रुतगती मार्ग प्रकल्पादरम्यान एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात घट्ट राजकीय मैत्री निर्माण झाली. त्याच मैत्रीतून पुढे शिंदे यांच्यावरील उद्धव यांची नाराजी वाढली. कारण एकनाथ शिंदे यांचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले चांगले संबंध शिवसेनेच्या नेत्यांना सुरुवातीपासूनच आवडले नाहीत.

खरे तर फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी एक्स्प्रेस वेमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपला जेरीस आणायचे होते. शिवसेनेला यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर करायचा होता. फडणवीस अडकल्यावर शिंदेही अडकण्याची भीती होती. कारण ते कॅबिनेट मंत्री असताना हा प्रकल्प सुरू झाला होता. यानंतर संजय राऊत, अनिल परब यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यास सुरुवात केली.देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा डीपी तयार करताना एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री म्हणून काही निर्णय घेतले. हे निर्णय नंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या सचिवांमार्फत थांबवली. एकनाथ शिंदे यांना काही IAS आणि ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी नेमायचे होते. मुख्यमंत्र्यांनीही हे होऊ दिले नाही. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना पहिल्या क्रमांकाचे राजकीय स्थान असतानाही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्व देण्यात आले.एकनाथ शिंदे यांच्या खात्याच्या फाइल्स मुख्यमंत्री सतत अडवून ठेवत होते. शिंदे त्यांना भेटायला आले, तर त्यांना खूप वाट पाहावी लागायची. दुसरीकडे शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर गेल्याने एकनाथ शिंदेही संतापले होते. शिंदे यांना ठाणे महापालिका निवडणूक एकट्याने लढवायची होती, तर संजय राऊत यांच्यासह काही नेते त्यांच्यावर राष्ट्रवादीसोबत लढण्यासाठी दबाव आणत होते. या राजकीय मुद्द्यांमुळे संतप्त झालेल्या एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा कमी होत असल्याचे पाहून बंड केले.

फडणवीस यांनी गाठली थेट दिल्लीकारण ..

शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी फडणवीस यांनी दिल्ली गाठली. महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यास त्यांना एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मान्यता घ्यायची आहे. जेणेकरून राज्यात भाजपचे सरकार स्थापनेत कोणताही राजकीय अडथळा येऊ नये. याशिवाय शिंदे यांच्यामुळे मुंबई, ठाण्यासह 14 महापालिकांमध्ये भाजपला किती राजकीय फायदा झाला, याचीही माहिती पक्षश्रेष्ठींना द्यायची आहे. शिंदे यांचे पुत्र श्रीकांत एकनाथ शिंदे हे कल्याणमधून खासदार आहेत. त्यांना केंद्रात काही जबाबदारी देता येईल का? या पर्यायावर फडणवीसांना दिल्लीत पक्षाशी चर्चा करायची आहे.

ऑपरेशन लोटस

गुजरातची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. सूरत शहर मुंबईपासून तीन-चार तासांच्या अंतरावर आहे. याशिवाय गुजरात भाजपचा मजबूत बालेकिल्ला आहे. याच कारणामुळे ऑपरेशन लोटससाठी गुजरातची निवड करण्यात आली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले असते, तर शिवसैनिकांनी त्यांची तोडफोड करून सुटका केली असती. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार असल्याने त्यांना येथे ठेवणे धोक्याचे होते.

गद्दारांना क्षमा नाही असं ब्रीदवाक्यअसलेल्या आनंद दिघेंनी हि गद्दारी सहन केली नसती…आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे

0

“मुंबई-गद्दारांना क्षमा नाही असं दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळे नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे घडली आहे. त्यामुळे येथे एखादा नेता नाही राहिला तरी शिवसैनिकांकडे बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार, तत्वं आहेत. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने जाईल,” असं आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी एबीपी माझाशी सांगितलं आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देण्याची शक्यता असल्याने शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यासोबत पक्षाचे नेतेही पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. केदाऱ शिंदेही शिवसेना भवनाबाहेर उपस्थित असून यावेळी त्यांनी या प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.“एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत,” असं केदार दिघे यांनी सांगितलं.“एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढवण्यात महत्वाची भूमिका घेतली. पण यावेळी ते एकटे नव्हते तर लाखो शिवसैनिक होते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने आपण एकटेच शिवसेना वाढवतो असं समजू नये. शिवसैनिकांमुळे ही संघटना वाढली आहे,” असं केदार दिघेंनी सांगितलं. नेतृत्व सांगेल त्याप्रमाणे पुढील वाटचाल असेल असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

कोविड-19 दरम्यान, भारत हे उपचारांचे केंद्र म्हणून उदयाला आले आणि जगाला योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

0

गोवा , 21 जून 2022

आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सेंट फ्रान्सिस झेवियर, से कॅथेड्रल ओल्ड गोवा (गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट) च्या प्रसिद्ध लार्गो येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात  समाजाच्या सर्व स्तरातील 800 हून अधिक जण सहभागी झाले होते.

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या ‘स्वातंत्र्याचया अमृत महोत्सव’ कार्यक्रमाशी योगायोग साधणाऱ्या योगदिनानिमित्त  योगाच्या सामूहिक प्रात्यक्षिकाचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन, बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी बोलताना नाईक म्हणाले की, केंद्र सरकार  दरवर्षी जगभरात मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करते. भारताचे वैभवशाली  सौंदर्य, विविध स्थळे , भौगोलिक आणि वास्तुकलेचे दर्शन घडवण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर अतुल्य भारताचा प्रसार करण्यासाठी, केंद्र  सरकारने आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 साजरा करण्यासाठी  देशभरातील 75 प्रतिष्ठित पर्यटन स्थळे निवडली आहेत.

गोव्यातली दोन प्रसिद्ध ठिकाणे  केंद्र सरकारने निवडली आहेत हे सांगून त्यांनी आनंद व्यक्त केला. दुसरे ठिकाण अग्वाडा किल्ला आणि तुरुंग संग्रहालय संकुल आहे. नाईक यांनी यंदाच्या योगदिनाची संकल्पना  स्पष्ट केली – या वर्षाची संकल्पना  ‘मानवतेसाठी योगसाधना ’अशी आहे. योगाचे महत्व लक्षात घेता ही संकल्पना योग्य आहे, योगामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते,  कोविड रूग्णांना तणावमुक्त होण्यास आणि लवकर बरे होण्यात उपयुक्त ठरते  असे ते म्हणाले.

तणावरहित  शांतता अनुभवत, आपल्या शंकांवर मात करून, जीवनाचा उद्देश शोधून, योगींनी जीवनातील या सर्वात मूलभूत समस्यांवर दीर्घकाळ चिंतन केले आणि या समस्यांवर उपाय  शोधले. योगसाधना सुंदर जीवन जगण्याचा पर्याय देते. विज्ञान आणि जीवन जगण्याची कला  म्हणजेच योगाद्वारे आपण हेच शिकतो. योगाच्या बहुआयामी बाबी स्पष्ट करताना  केवळ भारतातच नव्हे तर जगभरात योगाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भारतीय योग गुरूंचे त्यांनी आभार मानले.

औपचारिक उद्घाटन समारंभानंतर गोवा राज्य योग अकादमीच्या समन्वयाने योग प्रात्यक्षिक करण्यात आले. प्रात्यक्षिकांमध्ये सामान्य योग प्रोटोकॉलनुसार आसने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा समावेश होता. त्यानंतर गोवा राज्य योग अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.

पर्यटन मंत्रालयाने आज म्हणजेच,21 जून रोजी देशभरातील आपल्या भारत पर्यटन कार्यालयांद्वारे देशातील 75 प्रमुख पर्यटन स्थळे आणि प्रतिष्ठित ठिकाणी  योग सत्र आणि थेट प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे.

म्हैसूर पॅलेस मैदानावर सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी

0

नवी दिल्ली, 21 जून 2022

आयुष मंत्रालय आणि कर्नाटक सरकारने म्हैसूरू इथल्या म्हैसूर पॅलेस  येथे आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिवस (आयडीवाय) 2022 च्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  पंतप्रधानांनी 15,000 हून अधिक लोकांसह म्हैसूर पॅलेस येथे सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे नेतृत्व केले. यात 200 हून अधिक विशेष शारीरिकदृष्ट्या दिव्यांग मुले, 100 अनाथ मुले, 15 तृतीयपंथी, एचआयव्ही रुग्ण आणि आशा कार्यकर्त्यांचा समावेश होता.

यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.

म्हैसूरसारख्या भारतातील अध्यात्मिक केंद्रांद्वारे शतकानुशतके जोपासलेली योग ऊर्जा आज जागतिक आरोग्याला दिशा देत आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. आज योग हा जागतिक सहकार्याचा आधार बनत आहे आणि मानवजातीला निरामय जीवनाचा विश्वास प्रदान करत आहे, असेही ते म्हणाले. आपण पाहतो की घरातल्याघरात केला जाणारा योग आज जगभरात  पसरला आहे. हे अध्यात्मिक अनुभूतीचे, नैसर्गिक आणि सामायिक मानवी जाणीवेचे चित्र आहे, विशेषत: गेल्या दोन वर्षांत अभूतपूर्व महामारीच्या काळात हे दिसून आल्याचे ते म्हणाले. “योग आता जागतिक उत्सव बनला आहे. योग हा केवळ एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळेच, यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे – मानवतेसाठी योग”, असे त्यांनी सांगितले. ही संकल्पना जागतिक पातळीवर नेल्याबद्दल त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि सर्व देशांचे आभार मानले.

पंतप्रधान म्हणाले की, आज योगाशी संबंधित अपार  शक्यता लक्षात घेण्याची वेळ आली आहे. आज योगाच्या क्षेत्रात अनेक नवनवीन कल्पना घेऊन आपले युवा पुढे येत आहेत. आयुष मंत्रालयाच्या स्टार्टअप योगा चॅलेंजबद्दलही त्यांनी माहिती दिली. योगाचा प्रसार आणि विकास यामध्ये मोलाच्या   योगदानासाठीच्या  2021 च्या  पंतप्रधान पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

व्यक्ती, समुदाय, राष्ट्रे आणि संपूर्ण जगाचे आरोग्य आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करून जागतिक शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करणे ही पंतप्रधानांची ध्येयदृष्टी आहे असे   मेळाव्याला संबोधित करताना, केंद्रीय आयुष मंत्री, सर्बानंद सोनोवाल म्हणाले. योगाने जगाला एकत्र आणले आहे, जागतिक मूल्यांना नव्याने आकार दिला जात आहे आणि विविध आरोग्य सेवा प्रणाली जवळ आणल्या जात आहेत असेही त्यांनी सांगितले. आरोग्य आणि विविधता साजरी करण्यासाठी आयुष मंत्रालयाने समाजातील विविध घटकांचा समावेश करण्याकरता अनोखे कार्यक्रम आखले आहेत. मंत्रालयाने योगाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत असे सोनोवाल यांनी सांगितले.

विधानपरिषद निकाल- म्हणजे देवेंद्रजींची कमाल

0

शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे मत

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील विश्वास, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यशस्वी नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची समर्थ साथ, भाजपवरील जनतेचा विश्वास, भाजपचे विकासाचे धोरण, सुशासन आदीचा हा विजय असून, आघाडी सरकारच्या अंधकारमय कारभाराला सुरूंग लावून विकासाची मशाल पेटविणारा हा विजय असून, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेत पाचही जागांवर मिळविलेला विजय हा देवेंद्रजींची कमाल असल्याचे मत भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेतील यशानंतर शहर भाजपच्या वतीने आज महापालिकेसमोरील पक्षाच्या कार्यालयासमोर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मुळीक बोलत होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, सरचिटणीस राजेश येनपुरे, गणेश घोष, प्रमोद कोंढरे, रविंद्र साळेगावकर, धनंजय जाधव, निहाल घोडके, चंद्रकांत पोटे, सुशील मेंगडे, अजय खेडेकर, दत्तात्रय खाडे, संदीप लोणकर, गणेश कळमकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, अन्वर पठाण, संदीप काळे, अजय दुधाणे उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत विजयाची किमया करणारे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविला असून, स्वबळावर म्हणजे काय याचा राजकारणात अर्थ शिकविला. अन्य पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करावे, ज्यांना स्वत:चे आमदार सांभाळता येत नाही, त्यांनी आता न बोललेच बरे राहिल.

डीईएसमध्ये योगदिन साजरा

0

पुणे, ता. २१ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) विविध घटक संस्थांमध्ये जागतिक योगदिनानिमित्त योगासने, सूर्यनमस्कार व प्राणायामाची प्रात्यक्षिके, व्याख्याने आदी कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. नवीन मराठी शाळेत मनाचे आणि शरीराचे आरोग्य जपण्यासाठी योगासने करा असे आवाहन मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी केले. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके करण्यात आली. डीर्इएस प्रायमरी, सेकंडरी आणि एनर्इएमएस स्कूलमध्ये प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात ‘ब्रेन योगा’ सादर करण्यात आला. योग गुरु संगीता मणियार यांनी योगासने करून घेतली. आयुष मांडवे या विद्यार्थ्याने ‘लिफ आर्ट’ झाडांच्या पानावर योगासनाच्या प्रात्यक्षिकांची चित्रे साकारली. रानडे बालक मंदिरात योगशिक्षिका शिल्पा पराडकर यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, उत्कटासन, भुजंगासन, पद्मासन, पश्चिमोत्तानासन ही आसने करून घेतली

योगाच्या रुपाने जगाला ‘सॉफ्ट पॉवर’ची भेट-खासदार जावडेकर यांचे मत

0

पुणे, ता. २१ : मन:शांती, शारीरिक स्वास्थ्य आणि कामातील उत्साह मिळविण्यासाठी योगाच्या रुपाने भारताने जगाला ‘सॉफ्ट पॉवर’ची भेट दिली असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

पुणे विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने जागतिक योगदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. या कार्यक्रमात १०० कर्मचारी सहभागी झाले होते. विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संतोष ढोके, व्यवस्थापकीय संचालक गगन मलिक, माजी नगरसेवक योगेश मुळीक, डॉ. संदीप बुटाला. पतंजली योग संस्थेचे अंकुश नवले उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, योगा ही भारताची ताकद आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. नियमित योगासने केल्याने दिवसभर उत्साहात राहातो, आनंद आणि चपळता वाढते. योगाचा प्रसार करण्यासाठी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव १९० देशांसमोर ठेवला. त्याला जगाने मान्यता दिली. भारताची ही प्राचीन परंपरा सर्व देशांनी स्वीकारली. आज १९३ देशांत योग दिनाचे कार्यक्रम होत आहेत.

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा

0

मुंबई-विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला हादरे बसू लागले आहेत. शिवसेनेचे महत्वाचे नेते एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याने राजकीय चर्चांना ऊधाण आले आहे. दरम्यान, काँग्रेसमध्येही आता धुसपूस पाहायला मिळत असून, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

सोमवारी विधान परिषदेची निवडणूक झाली असून, त्यात काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विधान करत म्हटले की, “या पराभवाची जबाबदारी मी घेतो” काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभूत झाला आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 44 पैकी 41 मते मिळाली आहेत. म्हणजे काँग्रेसचे 3 मते फुटली आहेत. सोमवारी निवडणुकीचा कल हाती येताच बाळासाहेब थोरात यांनी पराभव पत्कारत “आमच्या पक्षाची मते फुटली इतरांना काय दोष घ्यायचा” असे म्हटले होते. त्यानंतर आता थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

विचार करण्याची गरज

सोमवारी विधान परिषदेचे निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमच्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर दुसऱ्यांना दोष देऊन काय फायदा? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही. आता आम्हाला विचार करण्याची गरज आहे. 2.5 वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमके कुठे का चुकते याचा विचार करण्याची गरज आहे.”

शिंदे नॉट रिचेबल

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे तब्बल 13 आमदार नॉट रिचेबल आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेस नेते दिल्लीला जाणार

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार आज दिल्लीला जाणार आहेत. विधान परिषदेतील पराभवानंतर काँग्रेस नेते पक्ष नेतृत्त्वाची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. आता सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागेल, अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे.

भुजबळ, राणे नंतर आता …. एकनाथ शिंदें….अखेर त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी

0

मुंबई- छगन भुजबळ ,नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे असताना सेनेला हादरा देण्याचा प्रयत्न केला होता ,आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आणि सेना प्रमुख असताना सेनेला हिसका दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे १३ आमदारांसह गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घाईघाईने आमदारांची तातडीची बैठक बोलावली, तर मित्रपक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सर्व आमदारांना बोलावले आहे. दुसरीकडे तिसरा सर्वात मोठा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावले आहे. एकनाथ शिंदे सुरतमध्ये गेल्यापासून राज्यातील राजकीय घटनांनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अजय चौधरी शिवसेनेचे नवे गटनेते

शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावर वर्णी लागली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांनी जर पक्ष सोडला तर त्यांच्यासोबत अनेक आमदार आणि नेते पक्ष सोडू शकतात. असा दावा अनेक राजकीय अभ्यासक करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या बैठकीला केवळ 18 आमदार उपस्थित असल्याने इतर आमदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पहाडी जावळी तालुक्यातील आहेत. ठाणे शहरात गेल्यानंतर त्यांनी मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथे ११वीपर्यंत शिक्षण घेतले. ठाण्यात शिंदे यांचा प्रभाव असा आहे की लोकसभा निवडणूक असो की नागरी निवडणूक, त्यांचा उमेदवार नेहमीच जिंकतो. एकनाथ यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेही शिवसेनेच्या तिकिटावर कल्याणमधून खासदार आहेत. ऑक्टोबर २०१४ ते डिसेंबर २०१४ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. २०१४ मध्येच महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये PWD चे कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती तर २०१९ मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण (महाराष्ट्र सरकार) कॅबिनेट मंत्री पद मिळाले.२०१९ मध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय होत नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांची विधानसभेतील विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल असे वाटले होते. पण शरद पवार आणि सोनिया गांधी यांना उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटत होते. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी उद्धव यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव होता. त्यामुळे यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता होता राहिले.