Home Blog Page 1916

लाखो विठ्ठल भक्तांसह ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’ही पंढरीच्या वारीमध्ये सहभागी

0

वारकऱ्यांसाठी वैद्यकीय शिबिरे उभारून ‘मुकुल माधव फाउंडेशन’चेही (एमएमएफ) वारीत योगदान

पुणे-ज्येष्ठ महिना मावळतीला आला आहे आणि आषाढाची, त्यातही पंढरीच्या वारीची चाहूल लागली आहे. विठ्ठलाच्या लाखो भक्तांची ती यात्रा, ते मेळे, त्या दिंड्या, त्यांची ती भजने, रिंगण, आनंदाने नाचणे, तो टाळ-चिपळ्यांचा व मृदुंगाचा नाद या सगळ्यांनी भारून जाण्याचे दिवस जवळ आले आहेत. भगवे ध्वज आणि चंदनाचा सुगंध यांनी वातावरण-निर्मिती झालेली आहे. संतांनी श्रीविठ्ठलाला भेटण्याची ही ८०० वर्षांची परंपरा, संतांच्या पालख्यांचा हा प्रवास प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात, त्याच्या घामात, नामाचा जप करण्यात आणि भजनात पुन्हा नव्याने जिवंत होणार आहे.

दरवर्षी महाराष्ट्रभरातील लाखो भाविक पंढरपूरच्या विठोबा मंदिरात एकादशीला पोहोचण्यासाठी २१ दिवसांची पायी यात्रा करतात. या मिरवणुकीला वारी आणि या भक्तांना वारकरी म्हणतात. ही ८०० वर्षे जुनी परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.

गेल्या अनेक दशकांप्रमाणे, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी या वर्षीही या अद्भुत मानवी आणि आध्यात्मिक अनुभवात सहभागी होत आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांना अपूर्व आनंद मिळतो, परंतु त्याचबरोबर त्यांना उन्हा-पावसाचा त्रासही होतो. प्रत्येक वारकऱ्याकडे काही सामान, एक लहान वाद्य, तुळशीचे रोप किंवा विठ्ठलाची मूर्ती असते. फिनोलेक्स या वारकऱ्यांना आणि संपूर्ण वारीवर देखरेख करणार्‍या हजारो पोलिसांना रेनकोट आणि सोयीस्कर अशा पिशव्या यांसारख्या आवश्यक गोष्टी पुरवून हा प्रवास थोडा आरामदायी करीत असते.

याशिवाय, ‘फिनोलेक्स’ची सीएसआर शाखा असलेली मुकुल माधव फाउंडेशन ही संस्था यात्रेच्या विविध महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे १० वैद्यकीय शिबिरे आयोजित करीत आहे. पुण्यातील अनेक रुग्णालयांनी या सेवेमध्ये ‘एमएमएफ’ला सहकार्य केले आहे.

या उपक्रमावर भाष्य करताना फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.चे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे प्रेसिडेंट प्रदीप शास्त्री वेदुला म्हणाले, “गेल्या ४० वर्षांमध्ये फिनोलेक्सची उत्पादने देशातील प्रत्येक राज्यात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचली. ‘फिनोलेक्स’ने सर्वांना सेवा दिली. त्यामुळे पीव्हीसी पाईप उद्योगातील काही महत्त्वाच्या राष्ट्रीय कंपन्यांमध्ये आमची गणना होते. महाराष्ट्र हे आमच्या कंपनीचे जन्मस्थान आहे आणि त्यामुळेच पंढरपूरच्या वारीचे आम्हाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अनोख्या खास परंपरेशी निगडीत राहणे हा आमचा विशेष विशेषाधिकार आणि सन्मानही आहे.”

‘फिनोलेक्स’ला अर्थातच परंपरेची ताकद कळते. भारतातील सर्वात मोठा आणि एकमेव बॅकवर्ड इंटिग्रेटेड असा पीव्हीसीचा एकात्मिक उत्पादक असलेला हा ब्रॅंड आज कृषी, प्लंबिंग आणि सॅनिटेशन या क्षेत्रांमध्ये बाजारपेठेतील प्रबळ नेता बनला आहे. विश्वास, गुणवत्ता या पारंपारिक मूल्यांची काळजीपूर्वक जोपासना करून आणि आपल्या शेकडो वितरकांना, हजारो रिटेलर्सना व लाखो ग्राहकांना सेवा देऊन या ब्रॅंडने हा बहुमान कमावला आहे.

“पंढरपूरची वारी ही केवळ आध्यात्मिक यात्रा नाही, ही एक सामुदायिक सृजनशक्ती आहे. वारीच्या या प्रवासात जात, धर्म, लिंग किंवा सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता लोक एकत्र प्रवास करतात, खातात, झोपतात. या मूल्यांवरच आमचा ठाम विश्वास आहे. मुकुल माधव फाऊंडेशन या आपल्या सीएसआर संस्थेच्या माध्यमातून ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’ने समानता, सशक्तीकरण, आरोग्यसेवा आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये अथक परिश्रम घेतले आहेत. ज्या समुदायांमध्ये आम्ही कार्यरत आहोत, त्यांना सशक्त करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,” असे वेदुला यांनी नमूद केले.

पहिला पाऊस सुरू झाला आहे. ओल्या मातीचा सुगंध राज्यभरातील नागरिकांना मंत्रमुग्ध करीत आहे. आणि अर्थातच, वारकऱ्यांच्या पावलांना लागणारी पंढरीची माती ही त्यांच्यासाठी एक दैवी सुगंध घेऊन येणार आहे.

मी शिवसेनेचाच म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंचे सेनाप्रमुख ठाकरेंनाच आव्हान

0

मुंबई -मी बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच नियुक्त केलेल्या उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देणे सुरूच ठेवले आहे.बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून (Shivsena) कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे.या पत्रातून बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचं आमदारांना ठणकावून सांगितलं आहे.तर आता हे पत्रच बेकायदेशीर असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत केला आहे .शिवसेना पक्ष प्रतोदपदी आता आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात असल्याची माहिती बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी एक आदेश काढला होता. तो आदेश अवैध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.

काय म्हटलंय पत्रात? 

पत्रात नमूद केलंय की, पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आणि राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज म्हणजेच, बुधवार 22 जून, 2022 रोजी, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी 5 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल, पत्यावर पाठवण्यात आली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमं, व्हॉट्स अॅप आणि एसएमएस द्वारेही पाठवण्यात आली आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणं दिल्याशिवाय या बैठकीला तुम्हाला गैरहजर रहाता येणार नाही. सदर बैठकीत आपण उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेनं शिवसेना पक्षाचं सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असं मानलं जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदीं नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

आदित्य ठाकरेंची मंत्रिपद सोडण्याची दिसली तयारी ..

0

मुंबई, 22 जून : शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइलवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच हे दिसून आले आहे.शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख आणि त्यांच्या कुटुंबातील व सहकारी मंडळींनी सत्ता सोडण्याच्या मानसिकतेला स्वीकारणे सुरु केल्याचे जाणवते आहे .

दरम्यान, सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आणखी आमदार येणार असा दावा केला होता. त्यांचा हा दावा आता खरा ठरला आहे.

गुवाहाटी विमानतळावर आणखी एक सेनेचा आमदार एकनाथ शिंदेंचा तंबूत पोहोचला आहे. आमदार योगेश रामदास कदम हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे. गुहाहटी विमानतळावर भाजपा आणि सेनेचे काही जण योगेश कदम यांना घेण्यासाठी थांबलेले आहे. तर त्यांच्यासोबत संजय राठोड हे सुद्धा पोहोचले आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदेंचा गटाची ताकद आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्यांना रसद पुरवण्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर झाला होता. त्यानंतर रामदास कदम हे विधान परिषदेतून निवृत्त झाले होते. पण, सेनेनं त्यांना संधी दिली नाही.

योगेश कदम यांनाही पक्षाने डावललं होतं. अधूनमधून योगेश कदम हे शिवसेनेला घरचा अहेर देत होते. आता योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहे. दरम्यान,’आम्ही 40 आमदार सोबत आहे.

आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही. विकासाचं राजकारण केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्तीच्या दिशेने ..संजय राऊत

0

मुंबई- आज थोड्यावेळापूर्वी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे त्यांनी म्हटले आहे कि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु आहे.

तत्पूर्वी आज सकाळी माध्यमांशी बोलताना मात्र राऊत आशावादी विधाने करत होते . “एकनाथ शिंदे आणि आमदारांची नाराजी हा आमच्या घरातील विषय आहे. सर्व लोक पुन्हा आपल्या घरी येतील. एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांशी व्यवस्थित संवाद सुरु आहे.” राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आमदार नाराज असल्यासंबंधी विचारल्यावर राऊत म्हणाले की, “मला याबद्दल माहिती नाही. त्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत. असं कोणत्याही आमदारानं म्हटलं असेल असं मला वाटत नाही.” असं राऊत म्हणाले होते त्यानंतर दोन तासातच त्यांनी नवे ट्वीट केले आहे ज्यातून विधानसभा बरखास्तीचे संकेत दिले आहेत.

सकाळी ते असेही म्हटले होते ,'”आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेंसोबत बोलणं झालं आहे. त्यांच्याशी पक्षाचा संवाद सुरु आहे. ते शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत त्यांनी शिवसेनेत काम केलं आहे. त्यांच्याशिवाय आमच्या मनात कायम आदर आहे. चर्चा, संवाद सुरुच असतात. एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेबद्दल मी उद्धव ठाकरेंनाही कल्पना दिली आहे. शिवसेनेत काही होतंय असं वाटत असेल तर तसं नाही. बाहेर असणारे सर्वजण शिवसैनिक असून त्यांना शिवसेनेसोबतच राहायचं आहे. काही गैरसमजातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर केल्या जातील.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदे यांच्याशी आज सकाळीच फोनवरुन तासभर चर्चा झाली. झालेल्या चर्चेती माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचंही संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोप नाही, असंही ते म्हणाले. नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचं बंड शांत होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच, आसाममध्ये सर्व आमदार सध्या पर्यटनासाठी गेले आहेत. आमदारांनी फिरायला हवं, नाराज कोणीच नाही. एकनाथ शिंदेंसोबत सतत संपर्कात आहोत. शिवसेनेचे नेतेही त्यांच्याशी संपर्क साधत आहेत, असंही राऊतांनी सांगितलं. 

माझ्यासोबत एकूण 40 आमदार-एकनाथ शिंदे; राज्यपाल कोश्यारींना कोरोना; मोहित कंबोज आणि संजय कुटे बंडखोर आमदारांसमवेत

0

महाराष्ट्राचा राजकीय पेच आता गुजरातमधून आसामकडे सरकणार आहे. शिंदे यांच्यासह 40 बंडखोर आमदार सुरतहून विशेष विमानाने गुवाहाटीत पोहोचले आहेत. सुरत विमानतळावर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडले नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे अशी माझी इच्छा आहे. माझ्यासोबत एकूण 40 आमदार आहेत, त्यापैकी 34 शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आहेत.आणखी १० आमदारही येणार आहेत

गुवाहटीत एकनाथ शिंदेसह उपस्थित सर्व आमदारांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारांसाठी ते रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. दुसरीकडे, बंडखोर गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अद्याप राज्यपालांना भेटण्याचा तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही गुवाहाटीत 40 पेक्षा जास्त आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला नाही, फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची भूमिका पुढे घेऊ जात आहोत.”

ते पुढे म्हणाले की, सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड आम्ही करणार नाहीत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे त्यांच्या विचारांवर आम्ही काम करणार आहोत. म्हणून, बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व आमदार एकत्र आले आहेत. सध्या आम्ही कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कालही कट्टर शिवसैनिक होतो आणि आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आमची भूमिका सुरुवातीपासून हिंदुत्वाची होती. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहे. माझ्यासोबत कुठल्याही जोर जबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. स्वत:च्या मर्जेने ते माझ्यासोबत आले आहेत. 40 पेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आहेत.

लाइव्ह अपडेट्स :

  • आसामचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता
  • एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत दाखल झाले असून, आज दुपारी ते विशेष विमानाने मुंबईत येणार आहेत
  • शिवसेनेचे संजय राठोड, योगेश कदम गुवाहटीकडे रवाना.
  • संध्याकाळपर्यंत 50 आमदार ठाकरे सरकारविरोधात जाण्याची शक्यता.
  • राज्यपालांचा चार्ज दुसऱ्या राज्याकडे सोपवला नाही.
  • राजभवनाचे स्पष्टीकरण. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहणार.
  • राज्यपाल कोश्यारींना कोरोना.
  • शिंदे समर्थक आमदारांची गुवाहटीत बैठक.
  • दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीची बैठक.
  • काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार.
  • विमानतळावर भाजपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे बंडखोर आमदारांसोबत दिसले आहेत.
  • आसामचे पाणीपुरवठा मंत्री हॉटेल रॉडिसनमध्ये दाखल
  • रॉडीसन हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन
  • आमदारांना सुरक्षा देण्याचे हे राज्य सरकारचे काम – सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते

बंडखोर आमदारांची यादी

1. एकनाथ शिंदे – कोपरी

2 अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद

3. शंभुराज देसाई – पाटण, सातारा

4. संदिपान भुमरे – पैठण, औरंगाबाद

5. भरत गोगावले – महाड, रायगड

6. नितीन देशमुख – बाळापूर, अकोला

7.अनिल बाबर – खानापूर-आटपाडी, सांगली

8.विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम

9. लता सोनवणे- चाेपडा

10. संजय गायकवाड – बुलडाणा

11. संजय रायमूलकर – मेहकर

12. महेश शिंदे – कोरेगाव, सातारा

13. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर

14. प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर

15 संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ

16. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद

17. तानाजी सावंत – परंडा, उस्मानाबाद

18. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम

19. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद

20. श्रीनिवास वनगा, पालघर

21. बालाजी कल्याणकर -नांदेड

22. बालाजी किणीकर- अंबरनाथ

23. सुहास कांदे -नांदगाव

24. महेंद्र दळवी- अलिबाग

25. प्रकाश सुर्वे -मागाठणे

26. महेंद्र थोरवे -कर्जत

27. शांताराम मोरे -भिवंडी 28.किशोर पाटील- पाचोरा

29. चिमणराव पाटील- एरंडोल

30. प्रदीप जैस्वाल- औरंगाबाद

ठाकरेंच्या संपर्कातील आमदार :

1. वैभव नाईक

2. उदयसिंह राजपूत

3. रवींद्र वायकर

4. राहुल पाटील

5. उदय सामंत

6. प्रकाश फातर्पेकर

7. सुनील प्रभू

8. गुलाब पाटील

9. भास्कर जाधव

10. संतोष बांगर

11. आदित्य ठाकरे

12. राजन साळवी

13. अजय चौधरी

14. दिलीप लांडे

15. सदा सरवणकर

16. दादा भुसे

17. संजय पोतनीस

18. सुनील राऊत

19 कैलास पाटील

20. दीपक केसरकर

21.यामिनी जाधव

22. रमेश कोरगावकर

23. योगेश कदम

24. मंगेश कुडाळकर

25 प्रताप सरनाईक यापैकी काही आमदार शिंदेंच्याही संपर्कात

उद्धव ठाकरे हे एक अतिशय सज्जन गृहस्थ :राज्याच्या गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांना धोका दिला

0

एक वेळ भाजपा राष्ट्रवादीचे सरकार होईल पण सेना भाजपचे होणार नाही – विश्वंभर चौधरींचा कयास

पुणे – विधान परिषदेनंतर घडलेल्या राजकीय घटनांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे लक्ष वेधून घेतले असून यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक विश्वंभर चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे .

ते म्हणाले ,’ चाळीस गुवाहटीत पोचलेत. अजून दहा शिंदेंसोबत आहेत असा दावा आहे. तसं असेल तर सेनेकडे फक्त चार आमदार उरतात. आदित्य ठाकरे सोडून इतर तीन निष्ठावान कोण एवढाच उत्सुकतेचा मुद्दा आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री परागंदा होतात पण ते पोलिसांना कळत नाही हे बुद्धीला पटत नाही. गृहखातं स्वतःकडे न ठेवण्याचा फटका मुख्यमंत्र्यांना बसला आहे. हा कट एका दिवसात शिजला नसणार. मात्र सीआयडीला त्याची खबर नसावी हे आश्चर्य आहे. राज्याच्या गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांना धोका दिला असा याचा अर्थ आहे. गृहमंत्री गृहखातं चालवत असले तरी सगळं रिपोर्टींग मुख्यमंत्र्यांना मिळावं अशी व्यवस्था असते.’तुम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हा’ हा सल्ला उद्धवजींनी नाकारला असता आणि तेव्हाच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं तर प्रतिष्ठा गेली नसती. हा दिवस पहावा लागला नसता. बाकी जे घडलं त्याचं बरंच श्रेय संजय राऊतांना द्यायला पाहिजे. दररोज सकाळी नऊ वाजता चॅनलवर येऊन भाजपाच्या रोषाच्या संपूर्ण फोकस शिवसेनेवर राहील याची काळजी त्यांनी घेतली. राजकारणात परतीचे दोर कधीच कापायचे नसतात, ते दररोज सकाळी नऊ वाजता सपासप कापून राऊतांनी अप्रत्यक्षरित्या किंवा नकळत राष्ट्रवादीला सेफ पॅसेज दिला. संजय राऊतांचा उद्देश तो नक्कीच नसणार पण घडलं मात्र तेच. तिकडे स्वतःचे दोन मंत्री आत टाकले तरी राष्ट्रवादीनं संयत प्रतिक्रिया देत दोर पूर्णतः कधीच कापले नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की एकवेळ भाजप-राष्ट्रवादी सरकार होईल पण भाजप-सेना सरकार बनणार नाही. उद्धव ठाकरे हे एक अतिशय सज्जन गृहस्थ आहेत. कदाचित हा त्यांचा प्रांतच नव्हता किंवा आसपास सगळेच दगाबाज होते.असे विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.

फार मोठ्या कोंडीत सापडले आहेत. पक्ष, पक्षप्रमुखपद आणि धनुष्यबाण हे चिन्ह वाचवायचं असेल तर शिंदेंसोबत तडजोड करण्याला पर्याय दिसत नाही.राजकारणात असे पेच येतात ते काही तरी गमावून सोडवावे लागतात. शिवसेनाप्रमुखपद की मुख्यमंत्रीपद याचा निर्णय उद्धवजींना घ्यायचा आहे. ही अभूतपूर्व आणि तितकीच दुर्दैवी कोंडी आहे पण दुसरा पर्याय दिसत नाही.सेही विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

0

पुणे, दि.२१ :  ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले….  ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज (दि २१ )पंढरपूरकडे प्रस्थान केले.

आळंदी येथील समाधी मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पूजेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे आदी उपस्थित होते.

मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी फुगडीचा फेर धरला. विणा व टाळ वाजवत वारकऱ्यांसह त्यांनी भजनातही सहभाग घेतला.

वारकऱ्यांसाठी सुविधा

आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी   जिल्हा प्रशासन, मंदिर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे.

पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

0

मुंबई, दि. 21 :- इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून शासनाने सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय 21 जून 2022 रोजी जारी करण्यात आला आहे.

            सुधारित योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व (दोन अवयव/ दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) झाल्यास एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, अपघातामुळे कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी) आल्यास 75 हजार रुपयांचे अनुदान, विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये अनुदान, विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रूपयांचे अनुदान तसेच विद्यार्थी कोणत्याही कारणाने (क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून) जखमी झाल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

            विद्यार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक/ गट शिक्षणाधिकारी/ शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/ माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक यांची असणार आहे. या योजनेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणे, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, मोटार शर्यतीतील अपघात याबाबींचा समावेश राहणार नाही.

            या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांपैकी विद्यार्थ्याची आई, विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील किंवा विद्यार्थ्याचे आई-वडील हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक यांना या प्राधान्य क्रमानुसार सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा केली जाईल.

            या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे. या समितीसमोर इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींकरिता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील. तर, बृहन्मुंबई शहराकरिता संबंधित शिक्षण निरीक्षक यांनी प्रस्तावांची छाननी करून समितीसमोर सादर करावेत, असे यासंबंधीच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्यातील आगा खान पॅलेस येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने साजरा केला आंतरराष्ट्रीय योगा दिन

0

पुणे दि. 21 जून, 2022

देशातील नागरिकांना योगचे महत्व व त्याचे लाभ सांगणे, या उद्देशाने योग दिन महत्वाचा आहे. आत्मनिर्भर होत असताना प्रत्येक नागरिक निरोगी व्हावा, हे गरजेचे आहे , अशी भावना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पुणे इथे  व्यक्त केली.

आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यामध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये योग उत्सवाचे उद्घाटन झाले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर भारत सरकार तर्फे या योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

   
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुष मंत्रालय, पुणे; केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, पुणे व पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.


मेट्रो स्थानकावर योग दिन साजरा होणे व फलाटावर योग सराव करणे, हे विशेष आहे; त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या स्थानकावर योग करताना नागरिकांना पाहणे, याचा आनंद आहे, असेही राणे यावेळी म्हणाले.


माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे आयोजित योग व योगगुरुंबद्दल माहिती देणारे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. हे योग चित्र प्रदर्शन फुगेवाडी मेट्रो स्थानकात तीन दिवस विनामूल्य पाहण्यास उपलब्ध आहे. 
केंद्रीय संचार ब्यूरोच्या विभागीय कलाकारांनी यावेळी योग आधारित गीते सादर करून  उपस्थितांचे स्वागत केले.


   
उपस्थित नागरिकांनी मेट्रो  स्थानाकाच्या तीन मजल्यांवर आयोजित  योग सत्रात सहभाग  घेतला . प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मवर योगासने करणे अविस्मरणीय अनुभव देणारे होते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
      


  
योगोत्सवात सहभागी झालेल्या पहिल्या एक हजार नागरिकांना याप्रसंगी फुगेवाडी ते पिंपरी आणि परत असा मोफत प्रवास  (जॉय राईड) देण्यात आला. 


भारतीय पुरातत्व सर्वेक्षण  विभागाने आपल्या  आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत  आज पुण्यातील आठवा आंतरराष्ट्रीय योगा दिन-2022  आज आगाखान पॅलेसच्या आवारात साजरा केला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने इंडिया टुरिझम, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, विमानतळ प्राधिकरण, योगाभ्यास स्कूल आणि केंद्रीय विद्यालय संघटना यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण  विभागाच्या प्रादेशिक संचालक (पश्चिम विभाग)  डॉ. नंदिनी भट्टाचार्य-साहू, इंडिया टुरिझमच्या अपर्णा आठल्ये, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क इंडियाचे संचालक  डॉ. संजय कुमार गुप्ता ,केंद्रीय विद्यालय संघटन, मुंबईचे सहाय्यक आयुक्त एस व्ही जोगळेकर आणि योगा अभ्यास  स्कूलच्या प्रमुख प्रशिक्षक निवेदिता आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी एएसआय मुंबई विभागाचे  अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र यादव यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत केले.  


यावेळी योग अभ्यास स्कूलच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगा दिनाचे प्रात्यक्षिक आणि आसने करण्यात आली. योग कार्यक्रमात पुणे येथील केंद्रीय विद्यालयाच्या १०० विद्यार्थ्यांसह ३५० हून अधिक जण सहभागी झाले होते.  


 
आंतरराष्ट्रीय योगा दिन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण  विभागाच्या मुंबई विभागातील विविध वारसास्थळी  अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवमंदिर परिसरात केंद्रीय विद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण  विभागाच्या सहकार्याने योगासने सादर  केली. तर पुण्यात शनिवारवाडा येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण  विभाग यांनी संयुक्तपणे योगा प्रात्यक्षिकांचे कर्मचार्यांसाठी आयोजन केले. त्याचप्रमाणे, अलिबाग येथील सातखणी बुरूज, जुन्नर येथील लेण्याद्री लेणी, पालघर जिल्ह्यातील वसईचा किल्ला, जुन्नर येथील  शिवनेरी किल्ला, रत्नागिरी येथील विजयदुर्ग, मुंबईतील सायन किल्ला, कान्हेरी लेणी, रायगड किल्ला, पुण्यातील पाताळेश्वर लेणी, सोलापूर किल्ला या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण  विभागाच्या इतर वारसास्थळी जनतेसाठी योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते.

गरजू मुलांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा उभारल्याचे समाधान-रुक्साना अंकलेसारिया

0

‘लायन्स क्लब’तर्फे गोसावी महाविद्यालयात सोयीसुविधांचे उद्घाटन 
पुणे : “समाजातील गरीब व गरजू मुलांसाठी विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष यासह इतर अत्याधुनिक सोयीसुविधा उभारता आल्याचे समाधान आहे. निवृत्तीनंतर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दिलेली देणगी सत्कारणी लागली,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या रुक्साना अंकलेसारिया यांनी व्यक्त केले.
लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंकलेसारिया कुटुंबाच्या अर्थसाहाय्यातून नामदेवराव मोहोळ महाविद्यालय अँड क्रीडा प्रतिष्ठान संचालित टीजी गोसावी महाविद्यालय, विठ्ठलवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या ‘नरिमन अर्देशीर’ दुमजली इमारतीचे, रतनलाल मर्चंट हॉल (संगणक कक्ष), नौरोजी प्रकाश हॉल (विज्ञान प्रयोगशाळा) अंकलेसारिया पाणपोई आदी सोयीसुविधांचे उद्घाटन करण्यात आले.
सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथील गोसावी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी मेहेर मानेकजी अंकलेसारिया, रुक्साना मेहेर अंकलेसारिया, खोर्देह मेहेर अंकलेसारिया, लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, ट्रस्टचे चेअरमन फतेचंद रांका, उपप्रांतपाल परमानंद शर्मा, सुनील चेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार अशोकराव मोहोळ, कार्याध्यक्ष सदानंद मोहोळ, मीरा मोहोळ, रोहिदास मोरे, बाळासाहेब गांजवे, उद्योजक तुषार गोसावी, संग्राम मोहोळ, डॉ. हिरेन निरगुडकर, सदाशिव लाळे, विद्यालयाचे प्राचार्य किरण सूर्यवंशी, लायन्स क्लबच्या अध्यक्ष दीपाली गांधी, आशा ओसवाल, पूनम अष्टेकर, अंजली ओसवाल, माजी नगरसेवक श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी आदी उपस्थित होते.
अशोकराव मोहोळ म्हणाले, “ग्रामीण भागातील, गरीब व गरजू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यावर, तसेच रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. अंकलेसरिया कुटुंबिय आणि लायन्स क्लबच्या मदतीने हे मोठे काम उभे राहिले. अशा दानशुरांच्या मदतीने मुलांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे गरीब व गरजू मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊ शकतो, याचे समाधान वाटते.”

फतेचंद रांका म्हणाले, “गरजू विद्यार्थ्यांसाठी या सोयीसुविधा उपलब्ध केल्याचे आनंद आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम होणार आहे. चांगले संस्कार व शिक्षण यासोबतच अत्याधुनिक सोयीसुविधा गरजेच्या आहेत.”

हेमंत नाईक म्हणाले, “लायन्स क्लबने जपलेली सामाजिक बांधिलकी समाजाला उपयुक्त अशी आहे. हाच सामाजिक कार्याचा वारसा यापुढेही चालू राहील. इच्छाशक्ती आणि मूल्यांची सांगड घालून उभारलेले काम चांगले होते.”

सुनील चेकर, परमानंद शर्मा यांनीही मनोगते व्यक्त केली. स्वागत-प्रास्ताविक दीपाली गांधी, किरण सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन विलास बनसुडे यांनी केले. आभार बाळासाहेब गांजवे यांनी मानले.

चित्रकार अमित राणे यांनी रेखाटलेल्या सरदार तुळाजी आंग्रे यांच्या चित्राचे अनावरण

0

शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने ‘दर्यावरचे मराठे’ या कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने ‘दर्यावरचे मराठे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्यातील युवा चित्रकार अमित राणे यांनी रेखाटलेल्या सरदार तुळाजी आंग्रे व मराठा आरमाराच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. विजयदुर्ग किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमात आरमार अभ्यासक अनिकेत यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष योगेश रोकडे, सामाजिक कार्यकर्ते किरण सोनिवाल, भारतीय दुर्ग अभ्यासक चेतन घाडगे, निलेश काणकोणकर, अभिजीत सोनावणे, प्रशांत जाधव, प्रफुल्ल भालेकर, सुनिल यादव, रुपेश जाधव, बंडू माळी, ओंकार पोतदार, विकी मगदूम, राजकिरण सावडकर, बजरंग गावडे, प्रशांत पाटील, विजयराव कातळे आदी उपस्थित होते. 
अनिकेत यादव म्हणाले, हिंदुस्थानात अनेक सत्ताधिश असूनही त्यांनी समुद्राच्या संरक्षणाकडे लक्ष दिले नाही, मात्र वयाच्या २७ व्या वर्षी शिवाजी महाराजांना समुद्राचे महत्त्व समजले आणि त्यांनी स्वतःचे लढाऊ आरमार निर्माण केले. त्याच प्रबळ आरमाराच्या जोरावर आंग्रे-धुळप यांनी हिंदी महासागरावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. अशा थोर इतिहासाचे साक्षीदार असणारे विजयदुर्ग व त्याभोवतालच्या वास्तू जपणे हे आत्ताच्या मराठ्यांचे परमकर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘दगडी चाळ भाग- २’ येतोय १८ ऑगस्टला…

0

डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव, बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या ‘दगडी चाळ’मधील ‘चुकीला माफी नाही’, असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला. नुकतीच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली असून मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे, हे नक्की.

संगीता अहिर यांनी यापूर्वी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये निर्माती म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर संगीता अहिर यांनी ‘दगडी चाळ’च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता त्या ‘दगडी चाळ’चा सिक्वेल घेऊन सज्ज झाल्या आहेत. चित्रपटाच्या घोषणेबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ”आज आम्हाला ‘दगडी चाळ २’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. ‘दगडी चाळ’ला प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही या चित्रपटाचा सिक्वेल करण्याचा विचार केला. प्रेक्षकांसोबतच मलाही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड रिलीज करण्याचा आमचा मानस आहे.”

आता ‘दगडी चाळ २’ मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भारतीय लष्कराच्या पुणे इथल्या दक्षिण कमांडच्या मुख्यालयातील तुकड्यांनी साजरा केला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस

0

पुणे , 21 जून 2022

भारतीय लष्कराच्या पुण्यातील दक्षिण कमांडच्या मुख्यालयातील तुकड्यांनी मोठ्या उत्साहाने 21 जून 2022 रोजी ” आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन” कार्यक्रमात सहभाग घेतला. पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा संकुलात “सामान्य योग प्रोटोकॉल” नुसार सर्वांनी मिळून योगाभ्यास केला. यामध्ये मोठ्या संख्येने अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आणि इतर दर्जाचे अधिकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कुटुंबे आणि मुलेही सहभागी झाली होती.

ताणतणाव कमी करणारे आणि एक प्रभावी पर्यायी निरामय शारीरिक व्यवस्था म्हणून या प्राचीन जुन्या योगासनांचे महत्त्व भारतीय सैन्याने जाणले आहे. आपल्या सैनिकांना कामावर असताना मानसिक एकाग्रता सुधारण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी विविध योग तंत्र शिकण्याकरता आणि त्याचा अवलंबण्यास योगाभ्यासामुळे प्रोत्साहन मिळते . विविध खेळ आणि स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांनी त्यांच्या अभ्यासक्रमात योगाचा औपचारिक समावेश केल्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. सैनिकांची कुटुंबे आणि संबंधितांनाही त्यांच्या दैनंदिन जीवनात योगाचा सराव आणि अवलंब करण्यास सक्रियपणे प्रोत्साहन दिले जाते. योग हा आपल्या सैनिकांच्या दिनक्रमाचा  एक भाग बनत आहे आणि त्यांना त्याचा खूप फायदा होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत भाजपाचे ‘वेट अँड वॉच’चे धोरण

0

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

मुंबई-शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेल्या भूमिकेमागे भारतीय जनता पार्टीचे कोणतेही नियोजन नाही. मा. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या स्थैर्याबाबत भाजपाचे सध्या ‘वेट अँड वॉच’ अर्थात थांबा आणि वाट पाहा असे धोरण आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केले.

ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, कृपाशंकरसिंह, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, उत्तर भारतीय मोर्चाचे संयोजक संजय पांडे व प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत आताच मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. ते शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते आहेत. त्यांची भूमिका व त्यातून निर्माण झालेली परिस्थिती ही त्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे. भाजपाने मा. शिंदे यांना सत्तास्थापनेचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा त्यांच्याकडूनही कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली व महाविकास आघाडीमार्फत सत्ता मिळवली. पण ही अनैसर्गिक युती असल्याने त्यामध्ये शिवसेनेच्या खासदार व आमदारांची घुसमट होत आहे. आगामी निवडणूक आपण भाजपासोबत युतीशिवाय जिंकू शकत नाही, असे अनेकांना वाटते. त्यातून पक्षाच्या नेत्यांची खदखद बाहेर पडणे स्वाभाविक आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे सर्व पाच उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले. त्यापूर्वी १० जून रोजी राज्यसभा निवडणुकीतही भाजपाचे सर्व तीन उमेदवार विजयी झाले. या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल रणनितीमुळे भाजपाला विजय मिळाला. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाचा राज्याला पुन्हा एकदा अनुभव आला. आपण प्रदेश भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मा. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो.

त्यांनी सांगितले की, अन्य पक्षातील आमदारांनी सद्सदविवेक बुद्धीला स्मरून भाजपाला मतदान केले. त्यांच्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये विजय संभव झाला. त्यांचे आपण आभार मानतो. महाविकास आघाडीच्या आमदारांमधील खदखद आणि असंतोष किती आहे याची या निवडणुकीच्या निमित्ताने चाचणी झाली. भाजपाला या निवडणुकांमध्ये भाजपाला आपल्या ११२ या संख्याबळापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे १३४ मते मिळाली.

सरकार अल्पमतात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

0

मुंबई दि.21 – एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे.महाविकास आघाडी चे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या दणक्यात भाजप चा कोणताही हात नाही.
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केल्यामुळे शिवसेनेचे आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आमदार नाराज होते. एकनाथ शिंदे आणि आणि अनेक आमदार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेने ने केलेल्या युतीवर नाराज होते. भाजप सोबत शिवसेनेने युती करावी अशी एकनाथ शिंदें आणि अनेक शिवसेना आमदारांची इच्छा होती.मात्र संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीचा चुकीचा निर्णय घेतला.त्यातून एकनाथ शिंदे आणि अन्य शिवसेना आमदारांची नाराजी वाढत गेली. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दणका दिला असून महाविकास आघाडीचे सरकार लवकर कोसळणार आहे.एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेने चे बहुसंख्य आमदार असून महाविकास आघाडी चे सरकार अल्पमतात गेले असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.