Home Blog Page 1914

महाबीजचे प्रमाणित बियाणे अनुदानीत दरात उपलब्ध

0

पुणे दि.२३: शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे व १० वर्षाच्या आतील व १० वर्षावरील कडधान्य पिकांच्या नवीन वाणांचा शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य व गळीतधान्य पिका अंतर्गत भात, तूर, मूग, बाजरी व सोयाबीन या पिकांसाठी अनुदानीत दराने बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

महाबीज तसेच त्यांच्या अधिकृत विक्रेत्याकडे प्रत्येक तालुक्यात भात, तूर, मूग, बाजरी व सोयाबीन या पिकांचे प्रमाणित बियाणे परमीटद्वारे उपलब्ध आहे. अनुदानीत दराने उपलब्ध प्रमाणित बियाण्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

पिके (कंसात वाण) वजन आणि अनुदानित विक्री दर पुढीलप्रमाणे :
भात (को ५१)- २५ किलो – अनुदानित विक्री दर ४२५ रुपये, भात (इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती)- २५ किलो- अनुदानित विक्री दर ९५० रुपये. तूर (राजेश्वरी, बीडीएन ७१६, बीडीएन ७११)- २ किलो- अनुदानित विक्री दर १८० रुपये, तूर (‘आय सी पी एल ८८६३ आशा’)- २ किलो- अनुदानित विक्री दर २०० रुपये.
मूग (उत्कर्षा, बी एम २००३-२)- २ किलो पॅकिंग- २१० रुपये, मूग (बी एम २००२-१)- २ किलो- अनुदानित विक्री दर २४० रुपये. बाजरी (धनशक्ती)- १०५ किलो- अनुदानित विक्री दर २२.५० रुपये.
सोयाबीन (फुले किमया, फुले संगम, एम ए सी एस ११८८)- ३० किलो- अनुदानित विक्री दर ३ हजार रुपये.

‘लोकशाही वारी’ दिंडीचा शुभारंभ

0

पुणे, दि. २३:- आषाढी पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर युवक व खेळ, मंत्रालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुख्य निवडणूक अधिकारी, राष्टीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी, निर्मल वारी-हरित वारी-लोकशाही वारी’ दिंडीचा कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत असून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये ही दिंडी सहभागी होत आहे. दिंडीच्या शुभारंभप्रसंगी यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालीनी सावंत, प्र. कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, प्र. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. काळे म्हणाले, या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले येणार आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात या दिंडीमध्ये तरुण विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून त्यामध्ये सामाजिक नेतृत्व विकसित होत आहे. भारताचा तरुण जागतिक पातळीवर एक आदर्श तरुण ठरावा, देशाच्या तरुणाने सामाजिक आदर्श जोपासावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उपजिल्हाधिकारी श्रीमती सावंत म्हणाल्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी, निर्मल वारी-हरित वारी’ दिंडीचे आयोजन करण्यात येते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने या वर्षीपासून ‘लोकशाही वारी’ दिंडी पंढरपूरपर्यंत सहभागी झाली आहे. लोकशाहीच्या मूल्यांचे महत्त्व या दिंडीतून जनतेमध्ये बिंबवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. पांडे आणि डॉ. चाकणे यांनीदेखील विचार व्यक्त केले.

‘वारी पंढरीची वारी लोकशाहीची’ चित्ररथाचा शुभारंभ

आषाढी वारीमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत ‘वारी पंढरीची वारी लोकशाहीची’ या निवडणूकविषयक जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून शुभारंभ करण्यात आला. चित्ररथाच्या माध्यमातून पालखीमार्गावरील गावागावात मतदान नोंदणी विषयक जनजागृती केली जाणार आहे. स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी दिंडीचे स्वागत करणार आहेत. या दिंडीसोबत राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले असून पथनाट्याचे सादरीकरण करुन जनजागृती करणार आहेत.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील विठूरायाच्या गजरात दंग!

0

वारकरी बांधवांना खाद्यपदार्थ, चादरी आदींचे वाटप

पुणे-जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे बुधवारी पुण्यात आगमन झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून दोन्ही पालखींचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पवृष्टी करुन, वारकऱ्यांना अभिवादन केले. तसेच, वारकरी बांधवांना खाद्यपदार्थ आणि चादरींचे वाटप देखील यावेळी केले.

कोरोनाच्य संकटानंतर यंदा पहिल्यांदाच पायी वारी निघत असल्याने, वारकरी आणि विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे २० जून रोजी श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान झाले. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २१ जून रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान झाले.

बुधवारी दोन्ही पालख्यांचे पुणे शहरात आगमन झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून दोन्ही पालख्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षआ. चंद्रकांतदादा पाटील हेदेखील यावेळी विठूरायाच्या गजरात दंग झाल्याचे पाहायला मिळाले.

आ. पाटील यांनी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करुन अभिवादन केले. तसेच, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन दोन्ही पालख्यांचे सारथ्य केले. यावेळी वारकरी बांधवांना खाद्य पदार्थ आणि थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी चादरींचे वाटपही आ. पाटील यांच्यवतीने करण्यात आले.

वोडाफोन आयडियाने VoLTE क्षमता दुपटीने वाढविली …

  • महाराष्ट्र आणि गोव्यातील अजून जास्त वी ग्राहकांना HD व्हॉइस गुणवत्ता आणि अधिक वेगवान कॉल कनेक्टिव्हिटीचा आनंद घेता येणार

पुणे, २३ जून, २०२२: आघाडीचा टेलिकॉम ब्रँड ‘वी ने महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये VoLTE क्षमता दुपटीने वाढवून तेथील ग्राहकांना मिळणाऱ्या व्हॉइस कॉलिंग अनुभवात अजून जास्त सुधारणा केली आहे.नेटवर्कने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे आता अजून जास्त ‘वी ग्राहकांना VoLTE वापरून कॉल्स करता येतील आणि सुपरफास्ट कॉल कनेक्टसह HD क्वालिटी स्पष्ट आणि उत्तम आवाजाचा आनंद घेता येईल.महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये सर्व शहरे आणि गावांमध्ये ‘वी ग्राहकांना VoLTE कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षभरात ‘वी‘ ने ९०० MHz आणि २१०० MHz अतिरिक्त तैनात करून महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये 4G क्षमता वाढवली आहे. या टेलिकॉम सर्कलमध्ये सर्वात कार्यक्षम ९०० MHz बँड स्पेक्ट्रम सर्वात जास्त तैनात करून ‘वी ने आपल्या ग्राहकांसाठी अधिक सुस्पष्ट आवाज आणि इमारती, घरांच्या आत अधिक चांगला नेटवर्क अनुभव मिळवून दिला आहे.

वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड श्री. रोहित टंडन म्हणाले, महाराष्ट्र आणि गोव्यातील 4G मोबाईल युजर्सना मी आग्रहाचे आमंत्रण देऊ इच्छितो की त्यांनी वी VoLTE नेटवर्कवर यावे आणि वरच्या दर्जाचा कॉलिंग अनुभव मिळवावा. या सर्कलमध्ये आमचा 4G नेटवर्क विस्तार वाढवण्यासाठी आणि शहरी व ग्रामीण ठिकाणी कव्हरेज अधिक जास्त मजबूत करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेतले होते. आता आम्ही या दोन राज्यांमध्ये आमची VoLTE क्षमता दुपटीने वाढवली आहे त्यामुळे आता अजून जास्त वी ग्राहक त्यांच्या कुटुंबियांसोबत, मित्रमंडळींसोबत दीर्घकाळ, अखंडित बोलू शकतील.वी VoLTE मार्फत तातडीने कॉल कनेक्ट आणि अल्ट्रा HD व्हॉइस सुस्पष्टता यांचा अनुभव घेण्यासाठी वी ग्राहकांना VoLTE सक्षम डिव्हाईस असणे आवश्यक आहे.”

राष्ट्रीय स्तरावर वी ने व्हॉइस कॉल्सची उच्च गुणवत्ता प्रदान करण्याची परंपरा कायम राखली असून, नोव्हेंबर २०२० ते मे २०२२ या १९ महिन्यांपैकी १७ मध्ये TRAIच्या “मायकॉल” ऍप डेटानुसार देशात वीच्या आवाज गुणवत्तेला सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे.

महत्त्वाची बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करत ‘वी’ पुण्यामध्ये 5G चाचण्या करत आहे.  ५.९२ Gbpsचा सर्वाधिक डाउनलोड वेग प्रदर्शित करत ‘वी’ ने त्यांच्या पुणे येथील 5G चाचण्यांमध्ये तंत्रज्ञानात एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. 

सारथीमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सपंन्न

0

विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत योग्य चौकशी करण्याची व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही

पुणे, दि. २३: छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) २५० विद्यार्थ्यांना पुणे येथील नामांकित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्येसवा) स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रवेश देण्याकरीता सामाईक प्रवेश परीक्षा १९ जून रोजी घेण्यात आली. परीक्षेबाबत काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीसंबंधी तांत्रिक व प्रशासकीय चौकशी पूर्ण करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.

सारथीच्यावतीने नियुक्त संस्थेमार्फत एमपीएससी-२०२३ करीता ‘सारथी एमपीएससी सीईटी २०२२’ पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापुर, औरंगाबाद व अमरावती येथील २७ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. सर्व परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी ७ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ९९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी लोणी काळभोर येथील एका परीक्षा केंद्रावर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या.

एमआयटी व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी काळभोर पुणे या परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे, संगणकाची स्क्रीन वारंवार हँग होत असल्यामुळे त्याच दिवशी दुपारी या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात आली. याबाबत काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीसंबंधी तांत्रिक व प्रशासकीय चौकशी पूर्ण करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याबाबत काळजी घेऊनच योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालकांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी

0

मुंबई, दि. 23 : राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु असून, विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. हिंगोली, जालना, अंबड (जि. जालना), लातूर, नांदेड, वांद्रे (मुंबई), रत्नागिरी, ठाणे, ब्रम्हपुरी (चंद्रपूर), जळगाव, पुणे, कराड (जि. सातारा), सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक) तसेच शासकीय मुद्रण तंत्रज्ञान संस्था (मुंबई) येथे अल्पसंख्याकांसाठी विशेष तुकडी सुरु असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याकांसाठी 1 हजार 155 जागा उपलब्ध असून याशिवाय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित तंत्रनिकेतनमध्येही प्रवेशाचा हक्क आहे. विशेष तुकड्यांमध्ये मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटींग टेक्नॉलॉजी अशा विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांना वार्षिक 7 हजार 750 रुपये इतक्या अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेशाची संधी आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचीही संधी मिळणार असून केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत तर राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी 8 लाख रूपयांपर्यंत आहे. अर्ज भरण्याचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 300 रुपये इतके आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी कालावधी 30 जून 2022 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://poly22.dte.maharashtra.gov.in तसेच ०२२- ६८५९७४३०, 8698781669, 8698742360 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ ..का उगाच वणवण भटकताय ? संजय राऊतांचा बंडखोरांना सवाल

0

मुंबई- आता काही मिनिटापूर्वी शिवसेनेचे खासदार ,नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना अगदी निर्वाणीचा इशारा दिला आहे, चर्चेतून मार्ग निघू शकतो .घरचे दरवाजे उघडे आहेत .. का उगाच वणवण भटकताय ? असा सवाल करत गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ असे आवाहन केले आहे .

एकनाथ शिंदेंनी वेगळा गट केला तरी ते स्वतः मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत हे स्पष्ट आहे , आणि आता हि त्यांच्याकडे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या अनेकांकडे मंत्रिपदे देखील आहेत . शेवटी भाजपाला पाठींबा देऊन सरकारमध्ये सामील झालात तरी उरलीत २ वर्षे .. त्यात हेच भाजपावाले तुम्हाला काय देणार .. किती कामे करू देणार .. स्वतः काय करणार ? शेवटी तिथे तुम्हाला नंतर हाजी हाजी करायची आहेच ,आणि उमेदवारीलाही मागे पुढे धावायचे आहेच … अशा आशयाने हे ट्वीट राउत यांनी केले असावे असे सूत्रांचे म्हणणे आहे .जर आघाडीत अजितदादांच्या बद्दल गाऱ्हाणी असतील तर ती अजित पवारांपुढे न मांडता थेट शरद पवारांपुढे मांडता येतील असेही सूत्रांचे म्हणणे आहे . आणि शरद पवार हे अजित पावरांविरोधातील गाऱ्हाणी गांभीर्याने घेतील आणि दादांना देखील त्याची खास दक्षता घ्यावी लागेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. या अनुषंगानेच राऊत यांनी हे ट्वीट केले असावे जेणेकरून बंडखोर माघारी येतील आणि हा तिढा सुटू शकेल असे काहींना वाटते आहे.

बंडखोर गटाचे स्पेशल फोटो सेशन ..बंड ठाकरेंविरोधातले …

0

गुवाहाटीत गुरुवारी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोर गटाचे स्पेशल फोटो सेशन केले. यावेळी एकूण 42 आमदार उपस्थित होते.

घोषणा कोणाच्या ..बंड कोणाविरुद्ध

दुसरीकडे शिवसेनेची आज मुंबई बैठक पार पडली असून, त्या बैठकीला फक्त 17 आमदारांनी हजेरी लावली.राजकीय उलथापालथीच्या तिसऱ्या दिवशी शिवसेनेच्या 41 आमदारांसह 50 आमदार गुवाहटीत पोहोचले आहेत. शिंदेंना आपला स्वत:चा वेगळा गट करण्यासाठी केवळ 37 आमदारांची गरज आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या 19 पैकी 9 हून अधिक खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर गटाचे एकनाथ शिंदे लवकरच आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना पाठवणार आहेत.

परत आलेले शिवसेना आमदार नितीन देशमुखांचे आरोप शिंदे गटाने फेटाळले. नितीन देशमुख यांना खास विमानाने नागपूरला पाठवल्याचे फोटोज शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आले.

राष्ट्रवादीने आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवार आणि सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रातील राजकीय गदारोळाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. बंडखोरी करणाऱ्या आमदाराला 5 वर्षे निवडणूक लढवण्यास मनाई करावी, असे काँग्रेसने न्यायालयाला सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार

1) एकनाथ शिंदे 2) अनिल बाबर 3) शंभूराजे देसाई 4) महेश शिंदे 5) शहाजी पाटील 6) महेंद्र थोरवे 7) भरतशेठ गोगावले 8) महेंद्र दळवी 9) प्रकाश अबिटकर 10) डॉ. बालाजी किणीकर 11) ज्ञानराज चौगुले 12) प्रा. रमेश बोरनारे 13) तानाजी सावंत 14) संदीपान भुमरे 15) अब्दुल सत्तार नबी 16)प्रकाश सुर्वे 17) बालाजी कल्याणकर 18) संजय शिरसाठ 19) प्रदीप जयस्वाल 20) संजय रायमुलकर 21) संजय गायकवाड 22) विश्वनाथ भोईर 23) शांताराम मोरे 24) श्रीनिवास वनगा 25) किशोरअप्पा पाटील 26) सुहास कांदे 27) चिमणआबा पाटील 28) सौ. लता सोनावणे 29) प्रताप सरनाईक 30) सौ. यामिनी जाधव 31) योगेश कदम 32) गुलाबराव पाटील 33) मंगेश कुडाळकर 34) सदा सरवणकर 35) दीपक केसरकर 36) दादा भुसे 37) संजय राठोड

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे अपक्ष आमदार

1) बच्चू कडू 2) राजकुमार पटेल 3) राजेंद्र यड्रावकर 4) चंद्रकांत पाटील 5) नरेंद्र भोंडेकर 6) किशोर जोरगेवार 7) सौ.मंजुळा गावित 8) विनोद अग्रवाल

शिवसेनेकडे असलेले आमदार

1) सुनील प्रभू 2) राजन साळवी 3) प्रकाश फातर्पेकर 4) सुनील राऊत 5) वैभव नाईक 6) आदित्य ठाकरे 7) रमेश कोरगावकर 8) कैलास पाटील 9) नितीन देशमुख 10) अजय चौधरी 11) राहुल पाटील 12) संतोष बांगर 13) भास्कर जाधव 14) सुजित मिणचेकर 15) रवींद्र वायकर 16) संजय पोतनीस

अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे बेंचमार्क सर्वेक्षण

0

पुणे दि.२३: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे बेंचमार्क सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सर्वेक्षण अंतर्गत राज्याच्या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व ५९ जातीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सद्यस्थिती तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण, लाभ न घेण्याची कारणे इत्यादी विषयावर संशोधन करण्यात येणार आहे. धोरणात्मक शिफारशीसह संशोधन अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार राज्यामध्ये अनुसूचित जातीमधील अनेक जातींची लोकसंख्या अत्यल्प आहे. त्यामुळे सर्वेक्षणात सर्व ५९ जातींचा समावेश अत्यंत आवश्यक आहे. राज्यात वेगवेगळ्या परीक्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध समाजाच्या संस्था, संघटना, अशासकीय संस्था यामधील शिष्टमंडळ यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारे क्षेत्र, कुटुंब यादी तसेच त्याअनुषंगिक माहिती बार्टी कार्यालयाला कळवावी. ही माहिती research@barti.in या ईमेल वर पाठवावी. प्राप्त माहिती अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातीचे सर्वेक्षण करण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रकाशन व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख उमेश सोनवणे यांनी कळविले आहे.

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली..पत्र संजय शिरसाठांचे अन एकनाथ शिंदे म्हणतात ,’हीच आमची भावना ….

0

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे वर्षाची दारे पहिल्यांदाच सामान्यांसाठी खुली झाली आहेत, असे पत्र शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे.

प्रति,
श्री. उद्धवजी ठाकरे,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय. काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात, पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही. कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही. मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे, अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय, असा निरोप बडव्यांकडून यायचा, पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का, हा आमचा सवाल आहे. हीच सर्व हाल, अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली.

आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र, याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान… आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.

हिंदुत्व, अयोध्या राममंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ? तुम्ही स्वत: फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते. आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की, आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता. आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते. मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामाचं दर्शन का घेऊ दिले नाही?

साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता, तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भूमिपूजन आणि उद्घाटनं करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता, तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा.या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं.

हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत आणि उद्याची राहतील. या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं, पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.

कळावे, लोभ असावा..
आपलाच, संजय शिरसाट

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल

0

पुणे दि.२३: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी या मार्गावरील वाहतूकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ ते २८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल:
पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – २३ जूनच्या रात्री ११ वाजल्यापासून ते २६ जूनच्या रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – २६ व २७ जून या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करावा.

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)- २७ जून रोजी रात्री ११ वाजता ते २८ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- २५ ते २८ जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहतूक शिरवळ मार्गे पुण्याकडे येईल. तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग:
लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)– २५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- २६ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- २७ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.

बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. सदर रस्त्यांवरील वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर- पुणे महामार्गावर येईल. बारामती पाटस जाणारी वाहने ही बारामती- लोणीपाटी- सुपा- चौफुला- पाटस या मार्गाने जातील. तसेच पाटस- बारामती जाणारी वाहने पाटस- चौफुला- सुपा- लोणीपाटी- बारामती या मार्गाने जातील.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- २८ जून रोजी पहाटे २ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.

बारामती ते सणसर ( सणसर मुक्काम)- २९ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वोजपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतुक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण- कळसमार्गे जंक्शनकडे जाईल.

सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगांव केतकी (निमगांव केतकी मुक्काम)- ३० जून व १ जुलै रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.

निमगांव केतकी ते इंदापूर ( इंदापूर मुक्काम) २ जुलै रोजी पहाटे ते रात्री १० वाजेपर्यंत निमगांव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतुक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस- जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी देवकर- भिगवण मार्गे बारामतीकडे जाईल.

इंदापूर- ३ जुलै रोजी पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतुक ही अकलूज- बावडा- नातेपुते- बारामती मार्गे जातील. अकलुजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतुक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविण्यात येईल.

इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)– ४ जुलै रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत व ५ जुलै रोजी पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर- हिंगणगांव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज या मार्गे जातील. तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज- नातेपुते- वालचंदनगर- जंक्शन- भिगवण या मार्गे जातील.

पाद्यपूजनाने वारकरी भारावले … 

0

पुणे-कोरोनामुळे गेली २ वर्षे पंढरीची वारी झाली नाही. वारी सुरु झाल्यामुळे  अतिशय आनंदात वारकरी या वारीत सामील झाले आहेत. दरवर्षी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्यावतीने वारकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यंदा वारकऱ्यांचे  पाद्यपूजनाने स्वागत करण्यात आले असून चौरंग पाठ, सुगंधी तेल,गुलाब पुष्प,स्वस्तिक, फुलांची रांगोळी  हे शाही स्वागत अनुभवताना वारकरीही भारावले होते. 

आबा बागुल यांच्या वतीने शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिरात वारकऱ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वधर्मियांकडून वारकरी बांधवांच्या पायाला तेलाने मालिश करण्यात आली. भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल व आबा बागुल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच वारकऱ्यांसाठी दाढी करणे,चप्पल बुटांची दुरुस्ती ही करण्यात आली. वारकरी बांधवांना भजनासाठी उत्तम व्यवस्था व लसीकरणाची व्यवस्था  देखील श्री लक्ष्मी माता मंदिरात करण्यात आली असल्याचे आबा बागुल यांनी सांगितले. 

आबा बागुल म्हणाले की जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन आम्ही गेली ३० वर्षे वारकऱ्यांची सेवा करत आहोत. कोरोनामुळे पहिल्यांदा या वारीत खंड पडला होता. आता वारी पुन्हा सुरु झाली आहे. पंढरीच्या वाटेवर जाणाऱ्या  वैष्णवांचे यंदा पाद्यपूजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले असून पुन्हा असे संकट जगावर येऊ नये यासाठी विठ्ठलाला साकडे घातले आहे असे आबा बागुल शेवटी म्हणाले. 

यावेळी जयश्रीताई बागुल, नंदकुमार बानगुडे, घनशाम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पीएसआय उत्तम वीर, महेश ढवळे,सागर बागुल,सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, वासिम शेख,समीर शिंदे, संतोष पवार,भरत तेलंग,संतोष गंगावणे, योगेश खटावकर,योगेश निकाळजे व कार्यकर्ते उपस्थित होते.

महालक्ष्मी मंदिरात १ हजार वारक-यांची आरोग्य तपासणी

0

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने आयोजन ; मोफत औषध वाटपासह सल्ला व मार्गदर्शन
पुणे : अंगदुखी, पायदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला अशा प्राथमिक आजारांपासून ते रक्तदाब, उच्चशर्करा सारख्या आजारांपर्यंत सर्वच आजारांविषयीची वारक-यांची आरोग्य तपासणी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात करण्यात आली. गुरुवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत आयोजित शिबीरात तब्बल १ हजारहून अधिक वारक-यांनी सहभागी होत आरोग्य तपासणी केली. 
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने मंदिरामध्ये वारक-यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी आदी उपस्थित होते. 
अमिता अग्रवाल म्हणाल्या, पायी वारीच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कान, नाक, घसा यांसह इतरही अनेक तपासण्या यावेळी करण्यात आल्या. तीन तज्ञ डॉक्टरांसह रुग्णवाहिकेमध्ये औषध वाटप करण्यात आले. ज्या वारक-यांना इतरही काही आजार आढळून आले, त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन डॉक्टरांनी दिले.

बंडखोर आमदारांनी 24 तासांत येऊन आमच्याशी संपर्क साधावा, – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचेव आवाहन

0

महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. बंडखोर आमदारांनी 24 तासांत येऊन आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. ते मुंबईत बोलत होते. यावेळी शिंदे गटाच्या तावडीतून सुटून आलेले आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर राऊत, पाटील आणि देशमुख यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

तर विजय आमचाच

संजय राऊत म्हणाले की, सध्या आमच्याकडे वीस आमदार आहेत. शिवाय एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले 21 आमदार हे आमच्या संपर्कात आहेत. उद्या विधानसभेत संघर्ष झाल्यास. तिथे बहुमत चाचणी झाल्यास. महाविकास आघाडीचा विजय नक्की होईल. इतका आकडा आमच्याजवळ आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार नक्की आमच्या बाजून आहेत, असा दावा त्यांनी केला. यावेळी शिंदे यांच्या गटातून आलेले आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी आपण कसे सुटून आलो, याची आपबिती पुन्हा एकदा माध्यमांसमोर सांगितली.

अंधारात ठेवून नेले

कैलास पाटील म्हणाले, आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेण्यात आले. पहिल्यांदा मी दरवाजा उघडून गाडीतून उतरलो. डिव्हायडर ओलांडून मुंबईच्या दिशेने लागलो. मागून लोक आले, तर मला शोधतील म्हणून रस्ता बदलला. दोन ट्रकच्यामधून चालत आलो. मोटारसायकलवाल्याला लिफ्ट मागितली. त्याने एका गावापर्यंत सोडले. तिथे हॉटेल होते. तिथे विचारणा केली. मुंबईकडे जायचे असल्याचे ट्रकवाल्यांना सांगितले. मात्र, ते तयार झाले नाहीत. खासगी वाहनांना विनंती केली. शेवटी एका ट्रकवाल्याने मला लिफ्ट दिली. त्या दरम्यान पाऊस सुरू होता. पावसात भिजलो. ट्रकवाल्याने मला दहिसर टोलनाक्यापर्यंत सोडले. तिथे मला न्यायला एक व्यक्ती आली. ज्या शिवसेनेने मला जिल्हा परिषद सदस्य केले, आमदार केले, त्या शिवसेनेशी प्रतारण करणं मला नको वाटलं. तिथे असलेल्या आमदारांनाही ग्रुप-ग्रुपने नेले असेल. बरेच आमदार असतील की, त्यांची यायाची इच्छा असेल. मात्र, त्यांच्या अडचणीमुळे ते येऊ शकत नाहीत.

अन् वस्तुस्थिती कळली

नितीन देशमुख म्हणाले की, २० तारखेला विधान परिषद निवडणुका झाल्या. पाचच्या दरम्यान शिंदे साहेबांनी बंगल्यावर बोलावलं. माझ्यासोबत कोल्हापूरचे आमदार प्रकाशभाऊ होते. त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं. ते म्हणाले चला जाऊया. आमच्या मनात शंका नव्हती. त्यामुळे बसलो. गाडी ठाण्याच्या दिशेने गेली. तिथून पालघरला गेलो. कोल्हापूरचे आमदार म्हणाले कुठे चाललो. ते म्हणाले वनगांकडे जाऊ. तिथे शंका निर्माण झाली. तिथल्या हॉटलेचालकांना विचारले, रस्ता कुठे जातो. त्यांनी सांगितले गुजरातला जातो. तिथे तीन मंत्री आले. शंभूराज, सत्तार साहेब आणि भुमरेसाहेब. त्यांची शिंदेंसोबत चर्चा झाली. प्रकाशभाऊ भ्यालेले होते. त्यांनी प्रकाशभाऊंना उतरवलं. तिथे सत्तार साहेब, शंभूराज बसले. तेव्हा त्यांचे फोन सुरू झाले. हा निघाला की नाही, तो निघाला की नाही. आमदारांनी शंका विचारण्या सुरू केल्या. तेवढ्यात कैलास गायब झाल्याचे समजले. वस्तुस्थिती कळाली होती.

अधिकाऱ्यांशी वादावादी

आमदार देशमुख म्हणाले की, सूरतमध्ये हॉटेल मोठे होते. तगडा बंदोबस्त होता. आयपीएस अधिकारी होते. त्यांच्याशी वाद झाले. त्यांना प्रशासन चालवता की भाजपची गुलमागिरी करता म्हणालो. त्यांच्याशी वाद झाले. मी तिथून पायी निघालो. साडेबारा ते तीनपर्यंत रस्त्यावर चालत होतो. पाऊस सुरू झाला. मोबाइलमधली बॅटरी कमी झाली. आमचे संभाषण पोलिस ऐकत असल्याचा संशय आला. पोलिसांनी उचलून गाडीत टाकलं. नेलं. सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं. मला शंका निर्माण झाली.

खरा शिवसैनिक रस्त्यावर येऊन रडत आहे…म्हणाले विश्वंभर चौधरी तर बंडखोरांना संजय सोनवणी म्हणाले, हे तर ‘नरपुंगव’

पुणे- एकीकडे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना , खुद्द बाळासाहेब शिवसैनिकांना सांगून गेले , उद्धवला तुमच्या हाथी सुपूर्त करतो आहे , त्याला सांभाळून घ्या … आणि आता आम्ही बाळासाहेबांच्याच मार्गावर त्यांचेच शिवसैनिक असे सांगत आता बंडखोरच बनलेले नाहीत तर उद्धवलाच बाजूला सारून शिवसेनाच काबीज करण्याची रणनीती हाताळू लागल्याने …आपल्याच सैनिकातून बाळासाहेबांच्या पुत्रावर वारावर वार होऊ लागल्याने निव्वळ शिवसैनिकच नाही तर नागरिकांत देखील उद्धव आणि ठाकरे कुटुंबाबद्दलचे प्रेम उफाळून येत असताना आता समाजवादी म्हणणारे, धर्मनिरपेक्ष म्हणणारे ,आणि कडवे मुस्लीम नेते सुद्धा या बंडाला ‘अयोग्य दिशेचे राजकारण ‘ठरवू लागले आहेत .

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक विश्वंभर चौधरी या सार्या बातम्यांवर नजर ठेऊन वेळोवेळी प्रतिक्रिया देत आहेत , काल रात्री जेव्हा उद्धव ठाकरेंनी वर्ष बंगला सोडला तेव्हा रस्त्यावर जो जनसागर लोटला आणि उद्धव आणि ठाकरे कुटुंबाप्रती त्यांनी जे प्रेम व्यक्त केले त्यानेच आमदार सारे एका बाजूला आणि जनता सारी दुसऱ्या बाजूला असल्याचे दर्शविले आहे मात्र यातही काही भाजपच्या लोकांनी उद्धव ठाकरेंनी कोरोन झालेला असताना ते लोकात मिसळले म्हणून पोलिसात तक्रार दिल्याची बातमी कालच झळकत होती यावर विश्वंभर चौधरी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पहा ….

मी उदारमतवादी भारतीय आहे, खूनशी संघी नाही.

तुम्ही भारतीय आहात की संघी हे पुढच्या दोन दिवसात फेसबुकवर दिसणार आहे. एखादा मनुष्य जबाबदारीतून मुक्त झाला की त्याला farewell देण्याची अर्थात भावूक निरोप देण्याची परंपरा आहे. तर त्या व्यक्तीला त्या दिवशीही खुन्नस देणे ही संघीय परंपरा आहे. आज उद्धव ठाकरे कोरोना असूनही लोकांत मिसळले म्हणून भाजपानं पोलिसांमध्ये तक्रार केलीय असं वाचलं. हा आहे संघीय पद्धतीचा खूनशी send off. उद्धव ठाकरे आणि मविआवर टीका करणाऱ्या माझ्या अनेक पोस्ट्स फेसबुकवर आहेत. टीका करणे हा माझा हक्क आहे. पण दीर्घद्वेष ही माझी संस्कृती नाही. कारण मी उदारमतवादी भारतीय आहे, खूनशी संघी नाही.

खरा शिवसैनिक रस्त्यावर येऊन रडत आहे. ही कमाई किती जणांच्या नशिबात आहे?

विश्वंभर चौधरी यांनी अशी हि प्रतिक्रिया दिली आहे ….. उद्धव ठाकरे एका बिनभरवश्याच्या आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून वर्षा बंगल्यात आले आणि आज एक सहृदयी माणूस, सरळमार्गी आणि निष्कपटी माणूस, आपल्या घरातला एक माणूस म्हणून बाहेर पडले. खरा शिवसैनिक रस्त्यावर येऊन रडत आहे. ही कमाई किती जणांच्या नशिबात आहे? शिवसेना संपली म्हणणारे लोक घाई करत आहेत. पुन्हा एकदा शिवसेना जोमानं उभी राहील. उद्धवजी, आदित्य, मिलिंद नार्वेकर आणि तमाम शिवसैनिक यांना नवी भरारी घेण्यासाठी शुभेच्छा.

ठाकरेंनी जनमानसाला जिंकले- संजय सोनवणी

प्रसिद्ध लेखक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनीही या राजकीय घडामोडींवर आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे ,पहा त्यांनी काय म्हटले आहे ….

देशातील राजकीय संस्कृती बीभत्स रूप घेत असतांना सेनाप्रमुख मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे सुसंस्कृत आणि शालीन भूमिका घेत आपल्या मुद्द्यावर ठाम राहतात ही एक आश्वासक गोष्ट आहे. सेनेच्या राडा संस्कृतीला वेगळे वळण देण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्यच होता आणि आहे. आताच्या या राजकीय घडामोडी कोणती दिशा घेतील हे अनिश्चित असले तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी ही घडामोड अशोभनीय आणि निन्दनीय आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समाजहिताचा बळी देऊन सत्तेसाठी कोणतेही टोक गाठू शकणारे नरपुंगव येथे असावेत ही वेदनादायक बाब आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचे संयमी वर्तन दिलासादायक आहे. ते पदावर असतील किंवा नसतील, सेना त्यांच्या अखत्यारीत असेल किंवा नसेल पण त्यांनी जनमानसाला जिंकले आहे हे निश्चित.