Home Blog Page 1598

“हर हर महादेव ” च्या घोषणांनी मनसे ने पीएफआयला दिला इशारा

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याचा ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेनंतर मनसेने पुण्यात एल्गार पुकारला आहे. ‘आता मनसेकडून ‘हर हर महादेव’ अशा घोषणेने उत्तर देण्यात येत आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन करण्यात आले.

‘दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे’ या घोषणा देत मनसे कडून आंदोलन करण्यात येत असून पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती जाळून निषेध करण्यात आला . यावेळी अलका टॉकीज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..

पुण्यात एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती.या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इस्लामिक संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी अटक केले असता काही आंदोलनकर्त्यानी यावेळी “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या असे सांगणारे या घटनेचा व्हिडिओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाले .
राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार देश रक्षणार्थ “हर हर महादेव “म्हणत महाराष्ट्र सैनिक उद्या रस्त्यावर उतरून इशारा देईल असे मनसे ने जाहीर केले होते त्या नुसार आज मोठया संख्येने हिंदूस्थान जिंदाबाद हर हर महादेव च्या घोषणा देत मनसे रस्त्यावर उतरली होती.हिंदुस्तान जिंदाबाद चे मोठं पोस्टर मनसेने अलका चौकात लावले होते . जोरदार घोषणा नी अलका चौक दणाणून सोडत मनसे सैनिकानी पाकिस्तानचा झेंडा जाळला
यावेळी मनसे चे महाराष्ट्र राज्याचे नेते,सरचिटणीस,उपाध्यक्ष,शहर पातळी वरील सर्व पदाधिकारी ,सलग्न संघटनाचे पदाधिकारी, महिला सेनेच्या पदाधिकारी lव मोठया संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होत

.’पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या कि नाही याबाबत व्हिडिओंचा फॉरेन्सिक तपास होणार

पुणे : पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.’पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली आहे.

एफआयकार्यकर्त्यांनी आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.यामुद्दावर राजकारण तापू लागले असताना पुणे पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पीएफआय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या त्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपास होणार असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे.

पुणे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी म्हटले की, सोशल मीडियामधून जे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते एकत्र करणार आहोत. या सगळ्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रस्ता अडवणे, बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, हिंसाचाराचा प्रयत्न आदींबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा तपास करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा तपास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या तपासात ज्या गोष्टी निष्पन्न होतील, त्यानुसार आणखी काही कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. पोलिसांकडून याबाबत कठोर भूमिका घेतली जाणार असून दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरात छापेमारी केली. महाराष्ट्रातही एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई करत पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. पुण्यात या कारवाईच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुणे जिल्ह्यात पीएफआयचे मुख्य कार्यालय आहे.

या आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याची परवानगी त्यांनी पोलिसांकडे मागितली होती. मात्र, पोलिसांनी ही परवानगी नाकारली. आणि आंदोलकांना ताब्यात घेतले.आंदोलकांना ताब्यात घेतले जात असताना पीएफआय कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला. याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणा नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजप मुर्दाबाद, एनआयए मुर्दाबाद, मासूमो को रिहा करो, अशा घोषणांचा समावेश आहे. मात्र, पाकिस्तान जिंदाबादची घोषणा पोलिसांनी नमूद केली नाही.

कॉंग्रेस जोडण्याची खरी गरज-आठवलेंचा राहुल गांधींना टोला

पुणे-भारताला जोडण्याची गरज नसून त्यांनी काँग्रेस पक्षाला जोडावे. राहुल गांधी यांना केरळमधूनही हरवणार आहोत. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधी स्वीकारत नाहीत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना म्हणजे बच्चों का खेल नहीं. असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लावला. राहुल गांधींनी सुरु केलेली ‘भारत जोडो यात्रा’ ही काँग्रेस कमकुवत करणारी यात्रा असून त्याचा कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार नाही. सत्तेत असताना त्यांच्याकडे देश जोडण्याची कोणतीही भूमिका नव्हती. भारताला जोडण्याची गरज नसून त्यांनी काँग्रेस पक्षाला जोडावे, जी २३ गटाला जोडावे. कोणताही चेहरा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी आला तरी फरक पडणार नाही. देशाचा विकास आणि आगामी लोकसभा निवडणुकीत चारशेहून जागा मिळविणे हेच आमचे लक्ष्य आहे,असे आठवले यांनी सांगितले.

बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे, पण आमचाही किल्ला आहे. दलित आणि धनगर समाजाची चांगली मते आहेत. महादेव जानकर यांच्या विरोधात सुप्रिया सुळे कमी मताधिक्याने निवडून आल्या. त्यामुळे बारामतीही आम्ही जिंकू शकतो, असा विश्वास व्यक्त करत राज्यातील लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे आठवले यांनी सांगितले.

आठवले पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मॉरिशस मराठी मंडळी संस्थेतर्फे २७ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे. फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाने डॉ. आंबेडकरांचा पुतळा तयार केला आहे. पुतळ्याचे अनावरण होणे ही आंबेडकरी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे आठवले यांनी यावेळी सांगितले.

कात्रजच्या पेशवे तलावात युवकाचा बुडून मृत्यू

0

पुणे- : कात्रज येथील  पेशवे तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी काही तरुण निघाले होते. त्यावेळी काहीजण बोटीने पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, ज्ञानेश्वर पांचाळ (वय २३, रा. कात्रज) या तरूणाने पोहत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो कडेपर्यंत पोहोचू न शकल्याने पाण्यात बूडून त्याचा मृत्यू झाला.कात्रज अग्निशामक दलाच्या ५ जवानांनी मिळून दोन तासांच्या प्रयत्नानंतर पाण्यातून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. पेशवे तलावात पूजेसाठी पाण्यातून पोहून जाताना तलावाच्या मध्यात बूडून तरुणाचा मृत्यू झाला. सोबतच्या सहकाऱ्यांनी बोटीने येण्याचा आग्रह करुनदेखिल तलावात पोहण्याचा हट्ट युवकाला महागात पडल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले आहे. तत्पूर्वी, भारती विद्यापीठ पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल केला आहे.

माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

ठाणे, दि. २५ : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक आदी उपस्थित होते.

कष्टकरी, मेहनती माथाडी बांधवाचे नेते म्हणजे आपले स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन करतो, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांचं सामाजिक , राजकीय व कामगार क्षेत्रातील योगदान मोलाचं आणि आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. स्व. अण्णासाहेब यांनी मराठा समाजातील तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दूरदृष्टीनं अनेक योजना , प्रकल्पांची मांडणी केली.

माथाडी कामगारांचे अनेक रखडलेले प्रश्न पुढील काळात मार्गी लावण्यात येतील. माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी मुंबई बँकेच्या मदतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपसमिती स्थापन झाली आहे. तसेच मराठा युवकांच्या शासकीय नोकरीत नियुक्तीसाठी अधिसंख्य पदे निर्माण केली असून नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यासाठी अनेक योजनांवर राज्य शासन काम करत आहे.महामंडळाची जबाबदारी पुन्हा एकदा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने गेल्या अडीच महिन्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यात पोलीस भरती प्रक्रिया आणि ७५ हजार रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबईतील माथाडी तसेच भूमीपुत्रांना न्याय देण्यात येईल. नवी मुंबईतील प्रकल्पाना चालना देण्यात येईल. राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनही आपल्यामागे खंबीरपणे उभे आहे, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, मागील २०१४ ते २०१९ च्या काळात माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले. अनेक प्रश्न सोडविले. या काळात स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळाला पुनरुज्जीवित केले. त्यामाध्यमातून मागील काळात ५० हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली.
माथाडी कामगाराच्या घराचा प्रश्न सोडविणे कठीण होते. पण जास्तीचा एफएसआय देऊन तो प्रश्न मार्गी लावला. या पुढील काळातही यासाठी निधी कमी पडू देणार नाही. माथाडी कामगारांचे उर्वरित प्रश्न निश्चितपणे सोडविल्याशिवाय राहणार नाही. नाशिकच्या लेव्हीचा प्रश्नही बैठक घेऊन लवकरच सोडविणार आहे. माथाडी कामगारांच्या चळवळीच्या मागे आपण भक्कमपणे उभे आहोत. माथाडी कामगार संघटनामध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
हे सरकार सर्वसामान्यांचे निर्णय घेणारे सरकार आहे.
मुख्यमंत्री महोदय हे काल नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी दोन तास पायी चालत होते. हे जनतेच्या मनात कोरले जाते, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले की, कोरोना काळात माथाडी कामगारांनी महत्वपूर्ण काम केले आहे. माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सकारात्मक निर्णय घेऊ. माथाडी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.

माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये माथाडी कामगारांच्या समस्या मांडल्या. माथाडी कामगारांना वडाळा ट्रक टर्मिनल येथील घरांसाठी कर्ज उपलब्ध द्यावेत. नाशिक येथील लेव्हीचा प्रश्नही तातडीने सोडविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. आमदार श्री नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांनी स्व अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माथाडी भूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी प्रकाश भिलारे

पुणे :शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पुणे विभागीय उपाध्यक्ष पदी प्रकाश भिलारे  बिनविरोध निवडून आले आहेत. या पदासाठीची निवडणूक शनिवार २४ सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन पुणे येथे झाली.पुणे विभागातून एकूण ३ उमेदवार उभे होते. संजय बोराटे,दुर्गादास जाधव या  उमेदवारांनी प्रकाश भिलारे  यांना संघटनेच्या एकजुटीचा संदेश देत पाठिंबा दिला. पुणे विभागातील सर्व ५ जिल्ह्यांच्या  पदाधिकाऱ्यांनी  उपस्थित राहून  भिलारे यांना मतदान केले. 
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे  अध्यक्ष बाजीराव देशमुख , राज्य पदाधिकारी, सैनिक  फेडरेशन कार्याध्यक्ष नारायण अंकुशे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भिलारे यांचे अभिनंदन केले.बाळासाहेब जाधव,  जगन्नाथ लकडे, अमोल पोतदार,निरंजन काकडे, सुभेदार मेजर(नि) नरेंद्र गायकवाड,बर्गे,पवार,शहाजी जगताप, कुलकर्णी,शरद शिंदे, प्रमोद जाधव, शिवाजी माने, समाधान पाटील,संजय बोराटे,नवनाथ इंदलकर, दयानंद अनपट, नितीन मतकर, विकास तांदळे, माधवराव दुधे पाटील, शिवाजी साळुंखे,नारायण पाटील, सुनील खामकर,सुरेश पाटील, सुनिल देसाई, निवडणूक प्रमुख कमलाकर शेटे, सहाय्यक  निवडणूक अधिकारी विलास घाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  
ही संघटना बारा वर्षांपासून 36 जिल्ह्यांमध्ये कार्यरत   आहे . माजी सैनिकांच्या शासन दरबारी प्रलंबित प्रश्नांचा एकजुटीने पाठपुरावा करण्याचा संकल्प केल्याचे भिलारे यांनी यावेळी  सांगितले

कल्लोळातही सहीसलामत राहण्यासाठी माध्यम साक्षरता, तारतम्य गरजेचे

अतुल पेठे यांचे प्रतिपादन; मनोविकास प्रकाशनातर्फे नीलांबरी जोशी लिखित ‘माध्यम कल्लोळ’ ग्रंथाचे प्रकाशन व मुक्तसंवाद
पुणे : “माध्यमे ही जशी जागृतीची साधने आहेत, तशी ती भीतीची दुकानेही आहेत. माध्यमांमधील हा कल्लोळ पूर्वीपासून आहे. त्यामुळे माध्यमांना दोष देण्याऐवजी त्यातले चांगले-वाईट समजून घ्यायला हवे. त्यासाठी तारतम्य बाळगत, मधली ओळ वाचत आपण माध्यम साक्षर व्हायला हवे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक अतुल पेठे यांनी केले.
मनोविकास प्रकाशनातर्फे नीलांबरी जोशी लिखित ‘माध्यम कल्लोळ’ ग्रंथाचे प्रकाशन व मुक्त संवादात अतुल पेठे बोलत होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदमजी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी अभिनेते गिरीश कुलकर्णी, माध्यम अभ्यासक समीरण वाळवेकर, ज्येष्ठ पत्रकार रवि आमले, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.

अतुल पेठे म्हणाले, “बाह्यजगात आपल्याला उत्पादन आणि ग्राहक म्हणून वापरले जाते. हिंसा आणि लैंगिकता माध्यमाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. त्यातून अनेकदा मानसिक आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. अशावेळी आपल्यातील विवेक जागृत ठेवायला हवा. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपण बदल स्वीकारले पाहिजेत. जीवनशैली बदलली, तरी जीवनमूल्ये बदलता कामा नयेत. तसे झाले तर आपण या कल्लोळातही सहीसलामत राहू शकतो.”
गिरीश कुलकर्णी म्हणाले, “सद्यस्थितीत माध्यमांत माहिती आणि कलकलाट अधिक आहे. आपल्या आकलन, अनुभवाइतकेच आपण बोलावे. ग्राहककेंद्री माध्यमात रोज नवे भोग करून विकले जातात. जगण्याची स्पर्धा, भांडवलाची गरज यामुळे हा कल्लोळ सातत्याने होत राहील, त्यात आपण किती बुडायचे हे प्रत्येकाने ठरवावे. माणूस बनण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु असते. या कल्लोळापासून जे दूर आहेत, ते आजही खळाळून हसतात. आनंदी जीवन जगतात.”
समीरण वाळवेकर म्हणाले, “माहिती आणि बातमी यात फरक आहे. सध्या ब्रेकिंगच्या जमान्यात खऱ्याचा आभास निर्माण करून ती बातमी पोहोचवली जाते. त्यातून फेक न्यूज प्रतिबिंबित होते. आपण माध्यम साक्षर आहोत हा भ्रम आहे. विकृत प्रयोगातून निर्माण झालेले उत्पादन आपल्यापर्यंत येऊ द्यायचे नसेल, तर आपण माध्यम साक्षर होण्याची गरज आहे.”

रवि आमले म्हणाले, “असत्य, अर्धसत्य हा प्रपोगंडाचा पाया असून, माध्यमे त्याचे वाहक आहेत. परंतु माध्यमांचे व्यवस्थापन चालण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत. अर्थकारण जुळत नसल्याने माध्यमातील अनेक लोक दरिद्री अवस्थेत आहेत. त्यामुळे वाचक, प्रेक्षक म्हणून आपण जागृत राहून त्यातील चांगले ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
अरविंद पाटकर म्हणाले, “वाचनसंस्कृती लोप पावतेय, हा माध्यमातून होणारा अपप्रचार आहे. आपण  वाचकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो. ही दुरावस्था थांबवण्यासाठी वाचकांनी जागृतपणे पुस्तके वाचली पाहिजेत. लोकांपर्यंत पुस्तके पोहोचण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पुस्तकांवरील जीएसटीमध्ये सवलत द्यावी. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यात ललित साहित्याचे दुकान नाही, याची खंत वाटते.”
माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद पाटकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.

राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान; नागरिक,स्वयंसेवी संस्था व पर्यटन प्रेमींनी सहभागी होण्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

0

मुंबई, दि.25 : उद्यापासून राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियानास सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन दिनाच्या पुर्वसंध्येला स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. गेट-वे ऑफ इंडिया येथे उद्या दि. 26 सप्टेंबर, 2022 रोजी  दुपारी  3.00 ते सायं.6.00 या वेळेत होणाऱ्या स्वच्छता अभियानात नागरिक, स्वयंसेवी संस्था व पर्यटनप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

27 सप्टेंबर, 2022 या दिवशी जागतिक पर्यटन दिन जगभरात साजरा केला जातो. पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन मंत्री, मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सुप्रसिद्ध असणाऱ्या मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन  विभाग व दिव्याज फाऊंडेशन यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविला जात आहे.

या अभियानात श्रीमती अमृता फडणवीस, दिव्याज फाउंडेशनचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भारतातील प्रमुख नृत्यशैलींचा एकत्रित रंगमंचीय नृत्याविष्कार;दीक्षा प्रवाह कार्यक्रमात सादरीकरण 

पुणे: ओडीसाचे पारंपरीक ‘ओडीसी’ नृत्य…उत्तर भारतातील शास्त्रीय नृत्य ‘कथक’…दक्षिण भारतीय नृत्य शैली ‘भरतनाट्यम’ या नृत्यशैलींसोबतच आसामच्या माती आखाड्यात जोपासली गेलेली ५०० वर्षे जुनी सत्रीय नृत्य परंपरा…या भारतातील प्रमुख नृत्यशैलींचा देखणा नृत्याविष्कार एकत्रित पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. 

निमित्त होते, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत संगीत नाटक अकादमीचे सत्रीय केंद्र गुवाहाटी यांच्यावतीने आणि भारती विद्यापीठ अधिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि असोमि यांच्या सहयोगाने आयोजित दीक्षा प्रवाह या कार्यक्रमाचे. कोथरुडमधील बालशिक्षण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तब्बल ६० कलाकारांनी सत्रिय संगीत आणि नृत्यशैलीचे सादरीकरण केले. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार विजेते नरेन चंद्र बरुआ , संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या अनिता शर्मा, सत्रिय संगीतातील दिग्गज भास्कर ज्योती ओझा, संगीत नाटक अकादमीचे सहाय्यक संचालक राजू दास, पं.मनिषा साठे, प्रा.शारंगधर साठे, डाॅ. देविका बोरठाकूर उपस्थित होत्या. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्रीय संगीताचे सादरीकरण करण्यात आले. वाद्य संवाद या सादरीकरणात मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि गायनाने उपस्थितींना भारताच्या समृद्ध सांस्कृतीक परंपरेची अनुभूती दिली. सत्रीय संगीतातील वाद्याच्या जुगलबंदीला उपस्थितींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कृष्णाय वासुदेवाय…या श्लोकाच्या सादरीकरणात कृष्णाच्या लीला सादर करण्यात आल्या. 


यानंतर नरेन बरुआ यांच्या बहार आणि अनिता शर्मा यांच्या या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थित रसिक थक्क झाले. सुंदर हस्तमुद्रा, तालबद्ध पदन्यास आणि त्याला भक्तीची जोड याद्वारे सत्रीय नृत्याचे सौंदर्य अतिशय देखण्या पद्धतीने कलाकारांनी उलगडले. 

प्रा. शारंगधर साठे म्हणाले, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय, संगीत नाटक अकादमीच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने आणि असोमी च्या सहकार्याने भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्यावतीने सत्रीय नृत्य आणि संगीताची १६ दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत गुरुंकडून जे ज्ञान प्राप्त झाले त्याचे सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले. 

….अखेर त्यांच्याही आत्म्याला मिळाली शांती ..  बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधीवत पूजन आणि विसर्जन

पुणे : हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केले जाते, तरचआत्म्यास मोक्ष प्राप्ती होते अशी धारणा आहे. परंतु अपघात किंवा इतर कोणत्याहीकारणाने रस्त्यांवर अनेक जण मृत्युमुखी पडतात काही मृतदेहांची ओळख पटवणे देखीलअवघड असते त्यामुळे हे मृतदेह बेवारस अवस्थेतच राहतात. मृत व्यक्तीची जात-धर्म न पाहता माणूसकीच्या भावनेतून अशा बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वपित्री अमावस्या निमित्त ८० बेवारस अस्थींचे विसर्जन नदीत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर या अस्थींचे विधिवत पूजन देखील करण्यात आले. यावेळी मंदार रांजेकर, रोमा लांडे, अतुल सोनावणे, योगेश गोलांडे, सदाशिव कुंदेन, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मिलिंद भोई, बाला शुक्ला, राजू बलकवडे, संगीता ठकार अमर लांडे, विवेक टिळे ,किरण फाळके, सुरज लेकावळे उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा १२ वे वर्ष आहे. यावेळी सदाशिव कुंदेन यांच्या हस्ते अस्थींचे पूजन करण्यात आले.

मंदार रांजेकर म्हणाले, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जात असून या उपक्रमाचे हे बारावे वर्ष आहे. पुण्यामध्ये अनेक बेवारस मृतदेह येतात त्यांचे कोणीही नसते. त्यामुळे त्यांचे अंतिम विधी होत नाहीत. अशा मृतांच्या अस्थी विसर्जित करून त्यांना शांती लाभण्यासाठी सर्वपित्री अमावास्येला या अस्थी विसर्जित केल्या जातात.  

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेवर बंदी घाला-पुण्यातील भाजपा पदाधिकारी भेटले पोलीस कमिशनरांना

सर्व कार्यकर्त्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

पुणे- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर तातडीने बंदी घालण्यात यावी आणि
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या सर्व कार्यकर्त्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना समक्ष भेटून दिलेल्या निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक तसेच आमदार माधुरी मिसाळ,मुरलीधर मोहोळ यांनी येथे दिली या भेटीच्या समयी आमदार भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे,गणेश बिडकर योगेश टिळेकर, , सरचिटणीस गणेश घोष, राजेश येन पुरें, दिपक नागपुरे, दिपक पोटे, संदिप लोणकर, दत्ता खाडे,, धीरज घाटे, सुशिल मेंगडे, संघाचे महेश पोहणेरकर, धनंजय काळे, बजरंग दलाचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद पदाधिकारी यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात शुक्रवारी, २३ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे शहर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.या आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी ६० ते ७० जणांचा बेकायदेशीर जमाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनधिकृतपणे जमा झाला होता.कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणे आणि देशाच्या विविध भागांत अंतर्गत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडविण्याच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेचा उद्देश स्पष्ट होतो.

आईच्या प्रेमाच्या भेटीच्या राजकीय मार्केटिंगवर अजित पवारांचा पीएम ना टोला

पुणे- मी सुद्धा बारामतीला आईला भेटायला येतो, मात्र फोटो काढत नाहीस, असे म्हणत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. सध्या अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत.अजित पवार एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, मला काठेवाडीवरून मुंबईला पाठवले. गेलो ना तिथे. राहतोय ना तिथे. कधी म्हटलंय का मला राहायचे आहे. मीसुद्धा आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही. भेट घेतो आणि जातो. आताही ही सभा संपल्यावर आईला भेटायला जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.अखेर शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी संध्याकाळी राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा केली. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, एक जिल्हा सांभाळताना मला नाकी नऊ येत होते. सहा सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद घेणारे काम कसं करणार? तरीही देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा, अशा खोचक शब्दात अजित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला.

यावेळी बारामतीमधील सहकारी संस्थ्यांच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जी जबाबदारी जनता आपल्यावर देईल. आपले वरिष्ठ आपल्यावर देतील. आपले सहकारी आपल्यावर देतील. आपले सभासद आपल्यावर देतील. त्यापद्धतीने तुम्हाला मला वागावच लागेल, असे ते म्हणाले.

आमदार माधुरी मिसाळांना खंडणीसाठी धमकी

पुणे-आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर मेसेज करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.याप्रकरणी आमदार माधुरी यांचे दीर माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ (वय 56,रा. फेअर रोड, गोळीबार मैदान, कॅम्प,पुणे) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडीगाव,पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 18 ते 23 सप्टेंबर दरम्यान घडला आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठीचा संपर्क क्रमांक याच्यावर आरोपीने मेसेज केले. त्याने कधी 2 लाख कधी 3 लाख तर कधी 5 लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले. सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी भा. द. वि. 386 आणि आय टी अ‍ॅक्ट कलम 66 सी नुसार गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदर गुन्ह्याच्या तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांनी सांगितले की,बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्हयात आमदार माधुरी मिसाळ यांचे दिर दीपक मिसाळ याना खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठी असणारा मोबाइल नंबर वापरण्यात आला आहे. असा गुन्हा दाखल असून त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे.

 बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या प्रकरणी सीबीआयचे मोठ्या प्रमाणात छापे

0

मेघ चक्र’ अभियानांतर्गत सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने,  बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या डाउनलोड/ सर्क्युलेशनशी संबंधित दोन प्रकरणी देशभरातील 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 59 ठिकाणी छापे टाकले. यात  फतेहाबाद (हरियाणा), डेहराडून (उत्तराखंड); कच्छ (गुजरात); गाझियाबाद (उत्तर प्रदेश); मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल); मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूर (महाराष्ट्र); रांची (झारखंड); चित्तूर (आंध्र प्रदेश); कृष्णा (आंध्र प्रदेश); राम नगर (कर्नाटक); कोलार (कर्नाटक); फरीदाबाद (हरियाणा); हाथरस (उत्तर प्रदेश);बेंगळूरू  ; कोडागू; रायपूर (छत्तीसगड); नवी दिल्ली; चेलाक्करा (केरळ); दिंडीगुल (मदुराई); गुरुदासपूर आणि होशियारपूर (पंजाब); चेन्नई; धनबाद; राजकोट; गोवा; हैदराबाद; अजमेर; जयपूर; कुड्डालोर (तामिळनाडू); मल्लपुरम (केरळ); लुनावडा (गुजरात); गोध्रा (गुजरात); गुवाहाटी; धिमाजी (आसाम); इटानगर (अरुणाचल प्रदेश); बर्धमान (पश्चिम बंगाल); महाराजगन (उत्तर प्रदेश); अरण (बिहार); भागलपूर (बिहार); आगरतळा (त्रिपुरा); मंडी (हिमाचल प्रदेश) यांचा समावेश आहे.

बालकांविरोधातील गुन्ह्यासंदर्भात  इंटरपोल सिंगापूरच्या विभागाने   दिलेल्या  माहितीच्या आधारे सीबीआयने  माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदी अंतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत  न्यूझीलंड  पोलिसांनी  सिंगापूरच्या इंटरपोलला संबंधित देशाला सामायिक करण्यासाठी ही माहिती दिली होती. क्लाउड-आधारित स्टोरेज वापरून बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या संचलन/डाउनलोडिंग/ट्रान्समिशनमध्ये अनेक भारतीय नागरिकांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यूझीलंडच्या कायदा अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांकडून इंटरपोलला मिळालेल्या माहितीचे सीबीआयकडून  विश्लेषण  करण्यात आले  आणि या सामग्रीचे आणखी वितरण करणाऱ्या  संशयित व्यक्तींची ओळख पटवली गेली आणि या साहित्याचे पुढील वितरण रोखता आले. 

आजची कारवाई हा  सीबीआयने गेल्या वर्षी ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीविरुद्ध हाती घेतलेल्या मोठ्या मोहिमेचा  (ऑपरेशन कार्बन) पाठपुरावा होता.

छाप्यांदरम्यान  50  हून अधिक संशयितांचे मोबाईल, लॅपटॉप यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. सायबर फॉरेन्सिक साधनांचा वापर करून या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे की अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बाल लैंगिक अत्याचार सामग्री आहे.  इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सापडलेल्या बाल लैंगिक अत्याचार सामग्री  संदर्भात  संशयितांची चौकशी केली जात आहे , जेणेकरून  पीडित मुले आणि अत्याचार करणार्‍यांची ओळख पटवता येईल.

आंतरराष्ट्रीय संबंधा असलेल्या  ऑनलाइन बाल लैंगिक शोषण प्रकरणांना जलद प्रतिसाद देण्यासाठी सीबीआय राबवत असलेल्या जागतिक अभियानांपैकी  ऑपरेशन चक्र हे अलिकडच्या काळातले  एक अभियान  असून  पीडित, आरोपी, संशयित, यासह आंतरराष्ट्रीय अधिकारक्षेत्रातल्या कटकारस्थाने करणाऱ्याना शिक्षा देण्यासाठी जागतिक स्तरावर समन्वित कायदा आवश्यक आहे.

ऑपरेशन चक्र भारतातील विविध कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांकडून माहिती एकत्रित करते,  जागतिक स्तरावर संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांशी संवाद साधते ,  आणि ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि अशा संघटित सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी इंटरपोल द्वारे  समन्वय साधण्याचा प्रयत्न करते. अशा सायबर गुन्ह्यांचे जाळे नष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी इंटरपोल आणि परदेशी कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींसोबत समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी यंत्रणा गतीमान करा- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पुणे, दि. 24: केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीला वेग देणे गरजेचे असून त्यासाठी सर्व यंत्रणांना गतीमान करा, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्याची केंद्रपुरस्कृत योजनांची आढावा बैठक विधानभवन येथे झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम शिंदे, माधुरी मिसाळ, राहूल कुल, भीमराव तापकीर, महेश लांडगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर श्रीमती सीतारामन म्हणाल्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सौरपंप वितरण, सौर पॅनेलद्वारे ऊर्जानिर्मिती आणि त्यातून शेतकऱ्याला उत्पन्नाची संधी उपलब्ध करुन देणारी प्रधानमंत्री कुसुम योजना प्रभावीपणे राबवावी. पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाची क्षमता पाहता अधिकाधिक योजनांचे प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऑप्टीकल फायबर जाळ्याने गतीमान इंटरनेंट सेवा पुरवण्याच्या भारत नेट योजनेला गती द्यावी.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा आढावा घेताना या योजनेंतर्गत आता केवळ शेतकरीच नाही तर मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आदी पूरक व्यवसायांचाही कर्जपुरवठ्यासाठी समावेश केलेला असून त्यानुसार कर्जवितरण होते का अशी विचारणा करुन श्रीमती सीतारामन यांनी यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोस्ट विभागाकडील प्रधानमंत्री जन विमा योजनेप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विभागात राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांविषयी माहिती दिली. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अमृत सरोवर योजना, प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय), मुळा मुठा नदी सुधार, संपूर्ण कचरा प्रक्रिया, पीएमपीएमल कडून विद्युत व सीएनजी बसेसद्वारे प्रदुषणास आळा आदीबाबत सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, रिंग रोड आदींसाठीचे भूसंपादन, योजनांच्या लाभासाठी आधार लिंकींग, पीएम-किसान योजना आदींबाबत सादरीकरण केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्मार्ट सिटी, पीएमएवाय आदी विषयक सादरीकरण केले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो प्रकल्पाचे, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहूल महिवाल यांनी मेट्रो तसेच रिंगरोडबाबत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हर घर जल, पीएमएवाय- ग्रामीण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आदींबाबत सादरीकरण केले.

यावेळी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे विमानतळ यांच्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. पर्यटन, महापारेषण, महावितरण, डाक विभाग, बीएसएनएल, कृषी, कौशल्य विकास आदी विभागामार्फत अंमलबजावणी होणाऱ्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदींसह केंद्र शासनाच्या विभागाचे तसेच राज्य शासनाच्या विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.