Home Blog Page 1579

अभियंत्याने व्यापक, सर्वसमावेशक व बहुशाखीय दृष्टीकोन अंगीकारायला हवा-डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ईव्ही’ टेस्टिंग लॅब व रोबोटिक्स-ऑटोमेशन लॅबचे उद्घाटन

पुणे : “आजच्या युगात अभियांत्रिकी अनेक शाखांबरोबर जोडले गेले आहे. त्यामुळे अभियंत्यांनी व्यापक, सर्वसमावेशक आणि बहुशाखीय दृष्टीकोन अंगिकारायला हवा. आपल्या कामाचा जगाला, देशाला आणि समाजाला कसा फायदा होईल, तसेच किमान साधन सामुग्रीमध्ये कमाल उत्पादन कसे देता येईल यावर अभियंत्यांनी लक्ष केंद्रीत करावे ,” असा कानमंत्र ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.

पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेस्टिंग आणि रोबोटिक्स-ऑटोमेशन लॅबचे उद्घाटन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. प्रसंगी वैशाली माशेलकर, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, खजिनदार आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, संचालक प्रा. राजेंद्र कडुसकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे आदी उपस्थित होते.

एआयसीटीई-मॉडरोब योजनेच्या मदतीने, तसेच संस्थेच्या वतीने बावीस लाख रुपयांच्या खर्चातून ही प्रयोगशाळा विकसित केली आहे. ईव्ही तंत्रज्ञानातील सध्याचा ट्रेंड पाहता, विद्यार्थीभिमुख शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधांची पूर्तता करण्यासाठी ही लॅब उपयुक्त ठरेल. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आणि उद्योगाच्या गरजा यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेच्या (सीओईपी) सहकार्याने रोबोटिक्स आणि ऑटोमेशन प्रयोगशाळा विकसित केली आहे, हे आनंददायी चित्र आहे, असे डॉ. माशेलकर यांनी नमूद केले.

तत्पूर्वी, डॉ. रघुनाथ व वैशाली माशेलकर यांनी संस्थेच्या सदाशिव पेठेतील मुख्यालयाला भेट कुलगुरू कै. विष्णू गंगाधर ऊर्फ दादासाहेब केतकर यांच्या ७२ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. आश्रम वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. डॉ. माशेलकर यांनी त्यांच्या बालपणी प्रतिकुल परिस्थितीमध्ये कशाप्रकारे अभ्यास केला याची माहिती देताना आयुष्यातील पहिला गुरु म्हणून स्वतःच्या आईचा उल्लेख केला.

————————–

उद्योगांचा सहयोग महत्वाचा

प्रयोगशाळांच्या उभारणीत नामांकित कंपन्यांनी भरीव आर्थिक व तांत्रिक मदत केली आहे. त्यात प्रामुख्याने डसॉल्ट सिस्टीम, थिसेनक्रुप, एसएपीएल, एस.सिग्मा, नयन मेकॅट्रॉनिक्स, लेजर अ‍ॅटोमेशन आणि हॉरिझॉन अ‍ॅटोमेशन यांचा सहभाग आहे. औद्योगिक गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक, विद्यार्थी केंद्रित मॉड्यूलर अभ्यासक्रम, संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. समाजोपयोगी, शेतीसाठी रोबोट प्रणाली, सांडपाणी निचरा अनुप्रयोग, संगणक दृष्टी प्रणालीसह इतर कामांसाठी रोबो वापरण्याचे प्रयोजन आहे.

– सुनील रेडेकरकार्याध्यक्षपुणे विद्यार्थी गृह

स्वमग्न (ऑटिस्टिक) बालकांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढे यावे :डॉ दिनेश डोके

पुणे :’इनोसंट टाईम्स स्कुल ‘आणि ‘ अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीडस् ‘  च्या नवीन शैक्षणिक सुविधा केंद्राचे उदघाटन राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.दिनेश डोके,  ‘इनोसंट टाईम्स स्कुल ‘च्या संस्थापक डॉ अंकिता संघवी यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबर,शनिवारी सकाळी  गणेशबाग सोसायटी (औंध ) येथे झाले.
 अर्ली इंटरव्हेंन्शन प्रोग्राम फॉर  चिल्ड्रन विथ स्पेशल नीडस् ‘ , डे केअर,नर्सरी,ज्युनिअर के जी,सिनियर के जी च्या सर्वंकष शिक्षण (इन्क्लुझिव्ह एज्युकेशन)  च्या  सुविधा  यावेळी कार्यान्वित करण्यात आल्या . 
यानिमित्त ‘इनोसंट टाईम्स स्कुल ‘यांच्या वतीने शनिवारी दिवसभर  ‘ सुपर हिरो कार्निव्हल ‘आयोजित करण्यात आला होता .२ ते १३ वर्ष वयातील बालके ,थेरपिस्ट आणि डॉक्टर्स त्यात सहभागी झाले. सुपरमॅन,बॅटमॅन,हल्क,आयर्न मॅन अशा सुपरहिरोंशी संबंधित मजेदार खेळांचा समावेश या कार्निव्हल मध्ये होता.
यावेळी बोलताना डॉ दिनेश डोके म्हणाले,’समाजात स्वमग्न (ऑटिस्टिक) बालकांची  संख्या वाढते आहे.प्रत्येक ऑटिस्टिक मूल हे वेगळे असते,स्वतंत्र असते आणि त्याचे प्रश्न वेगळे असतात.त्यांना शिकवणे आणि काळजी घेणे हे फार मोठे आव्हान आहे.हे आव्हान ‘इनोव्हेटिव्ह टाइम्स स्कुल’ ही संस्था पेलेल याची खात्री वाटते.स्वमग्न बालकांना  लागणाऱ्या विशेष सुविधाचे  केंद्र ‘इनोव्हेटिव्ह टाइम्स स्कुल’ ने औंध मध्ये उभारले ही चांगली गोष्ट आहे.शासन सुद्धा दिव्यांग मुलांसाठी काम करीत आहे.स्वयंसेवी संस्थांनी, खासगी क्षेत्राने पुढे यावे,योगदान द्यावे.प्रत्येक जिल्ह्यात ऑटिस्टिक सेंटर झाले पाहिजे,अशी गरज आहे’. 
 स्वमग्नता (ऑटिझम) असलेल्या बालकांची विशेष काळजी विविध उपक्रमातून घेतली  जात असल्याचे  डॉ.अंकिता संघवी यांनी   सांगितले. डॉ.अंकिता संघवी या बालकल्याण संस्थेत ‘ अर्ली इंटरव्हेंन्शनीस्ट ‘ म्हणून विशेष मुलांसाठी, दिव्यांग मुलांसाठी कार्यरत आहेत.या क्षेत्रातील अनुभव यावेळी त्यांनी सांगितले. त्या  म्हणाल्या,’इनोव्हेटिव्ह टाइम्स स्कुल मध्ये ऑटिस्टिक मुलांसाठी विशेष सुविधा असलेले केंद्र उभारण्यात आले आहे.शिवाय सर्वसाधारण (नॉर्मल) बालकांसाठी  डे केअर,नर्सरी,ज्युनिअर के जी,सिनियर के जी शिक्षणाची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. 
स्वमग्न मुलांसाठी  शिक्षण पद्धती
 स्वत:च्याच विश्वात, विचारात रमणे म्हणजे स्वमग्नता. ही स्वमग्न मुले नेहमी समाजापासून, अवतीभवतीच्या वातावरणापासून अलिप्त राहतात.नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आजूबाजूचे लोक यांच्याशी त्यांफार संवाद नसतो. भाषा संप्रेषणाची, वैचारिक देवाण-घेवाणीची समस्या स्वमग्न मुलांमध्ये जाणवते. स्वमग्न मुलांना नुसतेच शाळेत घालून उपयोग नसतो तर वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब करावा लागतो. या शाळांमध्ये प्रत्येक मुलाची क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे आयईपी तयार करण्यात येतो. त्यानंतर प्रायमरी गोल ठरवून त्यावर काम करण्यात येते. विशेष शिक्षण, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स थेरपी तसेच ड्रामा थेरपीनुसार मुलांना शिकवले जाते. 
स्वमग्न मुलांसाठी ज्या वेगवेगळ्या थेरपीज चा वापर केला जातो त्या म्हणजे स्ट्रक्चर्ड टिचिंग, चित्रबोली, इंद्रियानुभवाचे एकत्रीकरण पद्धती या सर्व पद्धतींनी विशेष मुलांना शिकवून त्यात त्यांना वैयक्तिक कौशल्ये, सूक्ष्मकारक कौशल्ये, संगीत उपचार पद्धती, एस.आय. पद्धती, चित्रकला पद्धती, भाषाविकास पद्धती, शैक्षणिक विकास पद्धती विविध आणि कल्पकतेचा वापर करून शिकवावे लागते. ज्याचा उपयोग मुलांना व्यावसायिकरीत्या सक्षम करण्यासाठी होतो. आठवड्यातून दोन दिवस संगीत उपचार पद्धती, दोन दिवस ऑक्युपेशनल थेरपी, दोन दिवस स्पीच थेरपी, तसेच वर्तन समस्यांवर वन टू वन रेशिओमध्ये काम करून मुलांना प्रशिक्षित करणे अनिवार्य बनते.

अध्यापनाला आधुनिकतेची, संशोधनाची जोड द्यावी-डॉ. मनोहर चासकर 

ट्रिनिटी महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम
पुणे : “एकविसावे शतक हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे. शिक्षकांनी अध्यापनाला आधुनिकता, तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिली, तर अध्यापन आणखी प्रभावी होईल. नवतंत्रज्ञान समजून घेत आपल्या कार्याचे मूल्यमापन करणेही गरजेचे आहे,” असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी दिला.
येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये आयोजित दोन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उद्घाटन डॉ. चासकर यांच्या हस्ते झाले. प्रसंगी डॉ. विजयकुमार जत्थी, केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. अभिजित औटी, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. निलेश उके आदी उपस्थित होते.
कल्याण जाधव म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे. त्यातून देशाचा विकास आणि उज्ज्वल भविष्य घडणार आहे. प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामध्ये विकास व संशोधन करून देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचवावे.”

प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या पुढाकारातून ‘कोर्स आऊटकम बेस्ड एज्युकेशन’ अंतर्गत ही कार्यशाळा आयोजिली होती. या कार्यशाळेत एकूण २०० प्राध्यापकांनी व ५० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. विजयकुमार जत्धी यांनी परिणामाधारित शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. समीर कल्ला यांनीही मार्गदर्शन केले. 
डॉ. अभिजित औटी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. प्रा. उजमा शेख यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. जयश्री सत्रे (विभागप्रमुख), प्रा. महेंद हंडोरे (विभागप्रमुख), डॉ. शुभांगी हंडोरे (विभागप्रमुख), डॉ. गीतिका नारंग (विभागप्रमुख), प्रा. प्रतिक आकरते (विभागप्रमुख), प्रा. वैभव शेलार (विभागप्रमुख), प्रा. गजानन आरसलवाड (विभागप्रमुख), प्रा. विष्णु घागरे, प्रा. मीना काझी, पा. प्राजक्ता जमाले, प्रा. स्वानंद कुलकर्णी, प्रा. जितेश धुळे, प्रशांत रेणुसे, सिध्दार्थ खंडागळे, निलेश वाबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

पुणे, दि. 8- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर सुरळीत पार पडली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशालेतील परीक्षा उपकेंद्राला आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भेट दिली. परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांसह केंद्राची त्यांनी पाहणी केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक या संवर्गातील 800 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी  राज्यभरातील 37  केंद्रांवर आज  पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा प्रक्रियेची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पुणे शहरातील डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशालेच्या केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली.

यापूर्वी देखील लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांच्या वेळी अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना तसेच पुण्यातील काही परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली होती.

रात्रीचे आठ… अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ!

मुंबई, दि. ८: मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्रीदेखील या जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाहीत. काल, शुक्रवारी ७ ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजेपर्यंत मुख्यमंत्री श्री.शिंदे सामान्यांना भेट होते. योगायोगाने काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस झाले त्यावेळी सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ दिसून आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे कायम सांगत असतात. त्याची प्रचिती त्यांच्या कार्यशैलीतून दिसून येते. सामन्यांमध्ये त्यांच्याविषयी असलेले कुतूहल, आपुलकी आणि आपल्यातले मुख्यमंत्री अशी भावना यामुळे त्यांना भेटायला आलेल्यांमध्ये शहरी, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवा वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. हल्ली मंत्रालयात अभ्यागतांची वाढती संख्या ही विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी जास्त आढळून येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी नागरिक येत आहेत.  त्यांची निवेदने स्वीकारून म्हणणे ऐकून घेतले जाते.

शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले..त्यानंतर त्यांनी नियोजित परिवहन विभाग, मीरा भाईंदर महापालिका विकास कामांचा आढावा, कोळी बांधवांच्या  समस्यांबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर विले पार्ले येथे नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी मंत्रालयाबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी अभ्यागतांच्या भेटी घेतल्या. तोपर्यंत सायंकाळचे पावणेआठ वाजले होते. आपल्याला भेटायला समिती कक्षाबाहेर किमान दीडशे ते दोनशे नागरिक उपस्थित असल्याचे त्यांना कळले.

नियोजित कार्यक्रम असला, तरी सामान्यांना न भेटताच कसं जायचं म्हणून त्यांनी सगळ्यांना भेटायचं ठरवलं. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात मुख्यमंत्री आले. त्यांनी प्रत्येकाची भेट घेतली. निवेदने स्वीकारली त्यावर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी सूचनाही लिहिल्या. एवढ्या उशीराही मुख्यमंत्री भेटताहेत हे पाहून त्यांना भेटून बाहेर पडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयातून नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले.

डीईएस शाळेत पणत्यांची प्रात्यक्षिके

पुणे, दि. ८ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत दिवाळीनिमित्त कुंभाराने शाळेत येऊन मातीपासून पणत्या बनविण्याची प्रात्यक्षिके दाखविली. चाकावर माती ठेवून पणत्या घडवून दाखवल्या.  विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. मुख्यध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. 

ए बालसुब्रमण्यम यांची भारतातील असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडच्या अध्यक्षपदी फेरनिवड

·         सुश्री राधिका गुप्ता यांची एएमएफआयच्या उपाध्यक्षपदी पुन्हा निवड

·         २७ व्या एजीएम आणि नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर झाली पुनर्रचना

मुंबई- श्री. ए बालसुब्रमण्यन यांची सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या २७ व्या एजीएम नंतर एएमएफआयच्या नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीत असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे. बोर्डाने श्री. ए. बालसुब्रमण्यन यांची एएमएफआयचे अध्यक्ष म्हणून आणि सुश्री राधिका गुप्ता यांची एएमएफआय च्या उपाध्यक्षा म्हणून २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीपर्यंत पदावर राहण्यासाठी एकमताने पुन्हा निवड केली.

एएमएफआय चे अध्यक्ष या नात्याने श्री. ए. बालसुब्रमण्यन हे पुढील एजीएमच्या समाप्तीपर्यंत एएमएफआय वित्तीय साक्षरता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहतील.

·         श्री. विशाल कपूर (मुख्य कार्यकारी अधिकारी, आयडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड) यांची एमएफआय कमिटी ऑफ सर्टिफाइड डिस्ट्रिब्युटर्स (ARN समिती) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली आहे.

·         श्री. संदीप सिक्का (ईडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, निप्पॉन लाइफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड) यांची एमएफआय ईटीएफ समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

·         सुश्री राधिका गुप्ता (व्यवस्थापकीय संचालक – मुख्य कार्यकारी अधिकारी, एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट लि.) यांची एमएफआयच्या कामकाज, अनुपालन आणि जोखीम विषयक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

·         श्री. निलेश शाह (व्यवस्थापकीय संचालक, कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड) यांची एमएफआयच्या मूल्यांकन समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे.

·         श्री. नवनीत मुनोत (व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड) यांची एमएफआय इक्विटी सीआयओ समितीमध्ये पुन्हा निवड झाली आहे.

हे निर्णय सेबी नोंदणीकृत म्युच्युअल फंडांच्या उद्योग मंडळाने एमएफआयने नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीत घेतले.

काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर

खासगी प्रवासी बस जळून 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू

बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत

जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार

 अपघातातील प्रत्येक जखमीची केली आस्थेवाईकपणे विचारपूस

सर्वांना वेळेत, संपूर्ण उपचार दिला जाणार

दुर्घटनास्थळाची केली पाहणी

नाशिक, दि.8 – काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत विश्वास दिला.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवासी बस जळून 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला तर काही प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आज शासकीय रूग्णालयात दाखल होत प्रत्येक जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली, त्याप्रसंगी धीर देताना ते बोलत होते.

यावेळी बंदरे व खनिकर्म तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण  व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार हेमंत गोडसे,  आमदार देवयानी फरांदे, सुहास कांदे, मुफ्ती मोहम्मद, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार रचना पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, डॉ.आवेश पलोड, आणि इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आज पहाटे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा परिस्थितीत  अपघातग्रस्त प्रवासी व त्यांचे नातेवाईकांच्या सोबत शासन आहे. जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या अपघातात मृत पावलेला प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्याआधी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटना स्थळास भेट दिली.

ही टीम देतेय उपचार…

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ.गोपाळ शिंदे यांच्यासह चार अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक. शल्य चिकित्सक डॉ.भामरे यांच्या नियंत्रणाखाली 3 शल्य चिकित्सक डॉक्टरांचे पथक, भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पवार त्यांच्या नियंत्रणाखाली 2 भूलतज्ज्ञ, 2 न्यायवैदिक तज्ज्ञ, 4 अपघात वैद्यकीय अधिकारी असे एकूण 19 वैद्यकीय पथकासह आपत्कालीन कक्षाच्या सर्व अधिकारी, कक्षाच्या मेट्रन व वर्ग चार चे सर्व कर्मचारी सेवा देत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून एका गंभीर  अवस्थेत असलेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात 108 रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले आहे.

या बस अपघातात 12 मृत्यू, चार घरी सुखरुप पोहचले असून व्हिजन हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण उपचार घेत आहेत. पंचवटीतील सिल्वर हॉस्पिटलमध्ये पाच रुग्ण, सुविधा हॉस्पिटलमध्ये एक, जिल्हा रुग्णालयात एकूण 31 जखमी प्रवासी उपचार घेत आहेत.

फर्ग्युसनमध्ये सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार

पुणे, दि. ८ – फर्ग्युसन महाविद्यालयातील ’सोशल आऊटरीच अ‍ॅण्ड एनाबलिंग सेंटर‘च्या (एसओएसी) वतीने महाविद्यालयातील 58 सफाई कर्मचार्‍यांचा (आरोग्य मित्र) डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सेवकांनी स्वच्छता आणि आरोग्य या क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल हे सत्कार करण्यात आले. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक समन्वयक प्रसन्न देशपांडे, अमृता शिरपूरकर यांनी संयोजन केले.

आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, शाश्वत विकास या क्षेत्रांत काम करण्यासाठी ‘एसओएसी’ची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी या संस्थेत आठशेहून अधिक स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबर सामाजिक ज्ञान जोपासावे हा संस्थेचा उद्देश आहे. 

कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

पुणे दि.७:  कामगारांच्या आरोग्य, शिक्षणासोबतच त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याऱ्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासोबतच कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

क्रेडाई संस्थेच्या सर्वोत्तम सुविधा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीष मगर, राज्याचे अध्यक्ष सुनील फुरडे, पुण्याचे अध्यक्ष  अनिल फरांदे आदी उपस्थित होते.

कामगार मंत्री श्री. खाडे म्हणाले, आपला प्रत्येक कामगार ही आपली शक्ती आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. कामगारांच्या  सुरक्षेसाठी शासनाच्या विविध योजना आहेत.  कामगारांना सुरक्षे संदर्भात देण्यात आलेल्या सुविधांचा कामगारांनी उपयोग करावा.

कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालय स्तरावर कामगार भवन उभारण्यात येईल तसेच कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्यात येईल. संघटित कामगारांसोबतच असंघटीत कामगारांसाठीदेखील सोई सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, कामगारांना सोईसुविधा देणाऱ्यांचा गौरव केला जात आहे, हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. कामगारांना चांगल्या सोईसुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कामगाराच्या आरोग्यासाठी असलेल्या विमा योजनेसाठी कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी क्रेडाई संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी क्रेडाईचे श्री. मगर आणि श्री. फुरडे यांनी मनोगत व्यक्त केले. क्रेडाई संस्थेच्या सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील तसेच विविध उद्योग समूहांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

महापालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीविषयक लाभ तात्काळ द्या – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 7 : महापालिकेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनविषयक लाभ सात दिवसात देण्यासंदर्भात महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. या अभियानाचा प्रारंभ 6 ऑक्टोबरपासून झाला असून 4 नोव्हेंबर, 2022 पर्यंत हे अभियान चालू राहणार आहे.

कांदिवली येथील साऊथ वॉर्ड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेच्या शाळांतून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक दिवस शिक्षकांना सेवानिवृत्ती व इतर देय लाभ मिळत नसल्याची तक्रार आमदार श्री. भातखळकर यांनी मांडली. मंत्री श्री. लोढा यांनी अशी प्रकरणे असल्यास दिरंगाई न करता तत्काळ निकाली काढावीत असे निर्देश दिले. पाणी वेळेत न येणे, कमी दाबाने येणे, स्वच्छता, शौचालयासंबंधी प्रश्न, नादुरूस्त पथदिवे, झोपडपट्टी पुर्नविकास करणे अशा विविध 269 विषयांवर नागरिकांनी तक्रार अर्ज दिले. तर या तक्रारीपैकी 95 अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. महापालिकेच्या मैदानावर भरणाऱ्या बचतगटांच्या बाजारांची सवलत तीनऐवजी सहा दिवस वाढवावी अशी मागणी बचतगटांच्या महिलांकडून करण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नी कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.

दरम्यान सोमवार 10 ऑक्टोबर रोजी आर सेंट्रल व आर नॉर्थ वॉर्ड – बोरिवली पश्चिम येथे पालकमंत्री श्री. लोढा भेट देणार आहेत. नागरिकांना आपल्या तक्रारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या   : https://mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या : portal.mcgm.gov.in संकेतस्थळावरही ऑनलाइन तक्रारी दाखल करता येतील.

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशात यंदा १५ टक्क्यांनी वाढ

मुंबई, दि. ७ शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका हा अभ्यासक्रम रोजगारक्षम बनविण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षाची प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली आहे. मागील तीन वर्षों प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सलग १० टक्के होत असलेली वाढ यावर्षी १५ टक्के झाली आहे. या प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या आता जवळपास ८५ टक्के झालेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या सन २०१८-१९ मध्ये ४१ टक्के होती, ही संख्या २०१९-२० मध्ये ५० टक्के तर २०२०-२१ मध्ये ६० टक्के आणि २०२१-२२ मध्ये ७० टक्के होती. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षांत ही संख्या ८५ टक्के एवढी विक्रमी झाली आहे. पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व संस्थांनी व अध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे सांगून पदविका अभ्यासक्रम प्रवेशाचा चढता आलेख कायम ठेवावा असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत आहे. शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थांचा ओघ या क्षेत्राकडे वाढला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता एकुण प्रवेशक्षमता जवळपास १ लाख आहे. पदविका अभ्यासक्रमांना एकुण ८४ हजार ४५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. विभागनिहाय विचार केल्यास अमरावती विभाग ९१ टक्के, औरंगाबाद विभाग ८६ टक्के, मुंबई विभाग ८२ टक्के, नागपुर विभाग ६८ टक्के, नाशिक विभाग ७८ टक्के व पुणे विभाग ९० टक्के असे प्रवेश झालेले आहेत. तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी औद्यगिक क्षेत्राच्या सहकार्याने रोजगार देणारे क्षेत्र म्हणून हे विकसित करावे असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

कामगारांच्या कल्याणार्थ चांगल्या प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करावेत -कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

पुणे, दि.७ : कामगारांच्या कल्याणार्थ चांगले प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. कामगारांच्या मुलांसाठी क्रीडांगण निर्मितीसाठी प्रयत्न करण्यासह प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासिका, जलतरण तलाव, महिलांसाठी शिवणकला वर्ग, कौशल्य विकास आदी सोयीसुविधा टप्प्या टप्प्याने निर्माण केल्या जातील अशी ग्वाहीदेखील डॉ. खाडे यांनी दिली.

साखर संकुल पुणे येथे आयोजित कामगार कल्याण मंडळ, माथाडी कामगार मंडळ, राज्य कामगार विमा हॉस्पिटल व सुरक्षा रक्षक मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, अपर कामगार आयुक्त अभय गिते, कामगार कल्याण मंडळाचे सहायक कल्याण आयुक्त समाधान भोसले, राज्य कामगार विमा हॉस्पिटलचे रविंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

श्री. खाडे म्हणाले, कामगारांच्या कल्याणकारी योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कामगारांच्या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात जागा उपलब्ध करून क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच अन्य सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध केला जाईल. सर्व कामगारांची नोंदणी करणे तसेच कामगारांचा डेटा अद्यावत असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

माथाडी कामगारांचे हक्क त्यांना मिळावेत

माथाडी कामगार मंडळाच्या आढावा बैठकीत श्री. खाडे म्हणाले, जास्तीत जास्त कंपन्यांनी माथाडी अधिनियमानुसार नोंदणी करावी. ज्या कंपन्या माथाडी कामगारांचा वापर करत नाहीत त्यांची यादी बोर्डाने सादर करावी. कामगारांसाठी चांगल्या योजना राबवाव्यात. कंपनी मालकाकडून १०० टक्के लेव्ही कर येणे आवश्यक आहे, त्यासाठी बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. माथाडी कामगारांचे हक्क त्यांना मिळायलाच हवेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

राज्य कामगार विमा हॉस्पिटलच्या बैठकीत श्री. खाडे म्हणाले, बिबवेवाडी येथे कामगार रुग्णालयाचे काम सुरु असून या परिसरातील अतिक्रमण पोलिसांची मदत घेवून हटवण्यात यावे. या हॉस्पिटलचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम  विभागाकडून  करण्यात येत आहे. त्यासाठी पुणे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी कार्यवाही करावी.

राज्य सुरक्षा मंडळाच्या बैठकीत बोलताना श्री. खाडे म्हणाले, सुरक्षा रक्षकांचा प्रॉव्हिडंट फंडाची कपात झाली पाहिजे. कामगारांना कायद्यानुसार सर्व लाभ गतीने मिळतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी प्रत्येक विभागाने सादरीकरणाने माहिती दिली. बैठकीस पुणे विभागातील सर्व सहायक कामगार आयुक्त, माथाडी कामगार मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

एसटीच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक आणि सीएनजीवरील बसगाड्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला परिवहन विभागाचा आढावा

मुंबई, दि. ७-  एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे,  त्या माध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला दिले.

परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्तायालयाची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज पार पडली.  मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांचेसह राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार या बैठकीस उपस्थित होते.

११८ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना

संपकाळात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होते, त्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होती, या कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

इलेक्ट्रिक, सीएनजीवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार

लोकसंख्येचा भार वाढला त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असून ही संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दीडशे इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेतली जाणार असून ५०० नवीन डिझेल बसेसची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. सुमारे एक हजार बसगाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतरण करण्यात येत असून जून २०२३ पर्यंत सुमारे दोन हजार इलेक्ट्रिकवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील त्यातून प्रवाशांना आरामदायी, पर्यावरणपूरक प्रवासाचा आनंद घेता येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ५४ लाख ज्येष्ठांचा मोफत प्रवास

सामाजिक बांधिलकी म्हणून विविध  घटकांना एसटीच्या २१ सवलती दिल्या जातात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत देणारा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे, सरकारच्या या निर्णयामुळे आतापर्यंत ५४ लाख ज्येष्ठ प्रवाशांनी लाभ घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाचे कौतुक केले.

मालवाहतूक सेवेतून १०७.८० कोटींचे उत्पन्न

एसटीचे महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरु केलेल्या मालवाहतूक सेवेतून आजपर्यंत सुमारे १०७.८० कोटींचे उत्पन्न मिळाले असून या सेवेद्वारे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्न धान्याची वाहतूक करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

‘डीबीओएलटी’ तत्वावर बसपोर्टचा होणार विकास

एस.टी. महामंडळाच्या सुमारे ८१२ ठिकाणी १४२३.९० हेक्टरच्या जागा असून त्यातील ५ शहरातील १८ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा डीबीओएलटी (डिझाईन-बिल्ड- ऑपरेट-लीज-ट्रान्सफर) तत्वावर विकसित करण्यात येणार आहेत. त्यातून सुमारे ३ हजार ८०० कोटीपेक्षा अधिक महसूल मिळणार आहे. हे करताना त्या जागा केवळ व्यावसायिक वापरासाठी विकसित न करता निवासी- वाणिज्य या संमिश्र वापरासाठी करा आणि तसा आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करा

महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. वाहनचालकांचे प्रशिक्षण, वाहनांची स्थिती, वाहतूक नियमांचे पालन आदी गोष्टींवर भर देऊन व्यापक उपाययोजना करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

आई – वडिलांना शिव्या द्या,चालेल:पण मोदी-शहांना शिव्या देणे सहन करू शकत नाही ; पालकमंत्र्यांच्या ‘त्या’वक्तव्याने राजकीय धुरळा (व्हिडीओ)

पुणे- चंद्रकांत पाटलांनी आपल्याला संपवल्यांची भाषा केलीय, अशी खंत राजू शेट्टी यांनी एका केंद्रीय नेत्यापुढे केली होती. ते पुढे म्हणाले होते की, तुम्ही चंद्रकांत पाटलांना आई -वडिलांवरून शिव्या द्या चालेल,आमची कोल्हापूरची पद्धत आहे मात्र, मोदी आणि शहांना शिव्या देणे सहन करू शकत नाही . एक किस्सा सांगताना पुण्यातील सत्कार समारंभात पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटीलांनी केलेल्या वक्तव्यावर आता राजकीय धुराळा उठतो आहे.पाटलांनी एकप्रकारे तुम्ही आई-वडिलांना शिवा द्या, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काही बोलू नका, असा इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे.कोल्हापुरात आई वरून शिव्या देण्याची पद्धत आहे असा उच्चार त्यांनी केल्याने काही पुणेकरांना मात्र हि वक्तव्ये रुचलेली नाहीत .त्यामुळे सोशल मीडिया वरून यावर टीका सुरु झाली आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुणे भाजपकडून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हे वक्तव्य केले. ते म्हणाले, आई-वडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी आणि शहांना शिव्या दिलेले चालणार नाही. त्यामुळेच तुम्ही हातकंणगलेमधून लोकसभेला पडलात, असे एका केंद्रीय नेत्याने आपल्याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते असणाऱ्या राजू शेट्टी यांना सांगितल्याचा दावा पाटलांनी केला.

दिल्लीतील लोकांनी उमेदवारी देताना उगाच पुण्यातून उमेदवारी दिली नाही. त्यामागे काही कारणे आहेत. मात्र, सत्ता गेल्याने अडीच वर्षे आपल्याला काही करता आले नाही. आता सातारा, सांगली, पुणे, सोलापूर सगळे साफ करायचे आहे, असे म्हणत विरोधकांना इशारा दिला आहे.राजू शेट्टींना लोकसभेच्या वेळेस वाटत होते की, आपला पराभवच होऊ शकत नाही. मात्र, त्यांना सव्वालाख मतांनी मी प्रदेशाध्यक्ष असताना हरवल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले. ​​​​माढ्यातून स्वत: पवार उभे राहणार होते काय झाले? आमच्या निंबाळकरांना 84 हजार मतांनी निवडून आणले, असे म्हणत आपल्या पुण्यात येण्यामागे भाजपने पुण्यात लक्ष घातले असून आता पवारांचा बालेकिल्ला आपण काबीज करणार, असा इशाराच पाटील यांनी दिला आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शंभर नगरसेवक निवडून आले तरच, भाजपने पुणे महापालिका जिंकली असे मी मानेन.९९ नगरसेवक आल्यावर महापौर आपला होईल; पण भाजपने महापालिका जिंकली असे मी कधीच म्हणणार नाही. त्यामुळे आपापसांतील भांडाभांड बंद करा, अशा स्पष्ट शब्दांत यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले..गेल्या अडीच वर्षांत भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांनी मोठा त्रास दिला. तरीही भाजपचे कार्यकर्ते टिकून राहिले. फडणवीस सरकारचे निर्णय रद्द करणे व खुन्नस काढणे एवढेच काम त्यांनी केले. परंतु, या काळात हे सरकार कसे जाईल असे आमचे नियोजन चालूच होते व शेवटी ते खरे झालेच. आता पुढील काळात खूप मोठी आव्हाने पेलावी लागणार असून, शहरातील रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, जायका प्रकल्प पूर्ण करणे, रिंग रोड, मेट्रो, आदी कामांसाठी अठरा-वीस तास कामाची तयारी सर्वांनीच ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.बाहेरचा आला म्हणून हिणवले; पण फरक नाहीकोल्हापूरहून येऊन पुण्यात कोथरूडमधून निवडणूक लढवून लाखो मतांचा मेवा मिळविला, असा आरोप करीत मला बाहेरचा म्हणून बाेलतात. याबाबत अनेकांनी मला विचारले की, तुमच्या मनात याची खदखद आहे का? परंतु, मी याकडे अधिक लक्ष देत नाही. मी याच्याकडे एक खेळ म्हणून पाहतो, असे स्पष्ट करीत पाटील यांनी, मी वरिष्ठांच्या आदेशानुसार पुणे व परिसर जिंकण्याचे टार्गेट घेऊन येथे आलाे असल्याचे सांगितले.

‘पुणे शहर – स्वच्छ शहर सुरक्षित शहर’ हा माझा संकल्प आहे. तरीही माझ्या निवडीच्या अभिनंदनाचे फ्लेक्स शहरभर लावले गेले. शहर विद्रूपीकरणात अशाच अनधिकृत फ्लेक्सचा मोठा हातभार असतो. तुम्हाला एवढीच हौस असेल तर अधिकृत बोर्ड भाड्याने घेऊन तेथे दहाऐवजी दोनच फ्लेक्स लावा, असे परखड मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच माझ्या कार्यक्रमात यापुढे फटाके वाजविले तर मी गाडीतून न उतरताच परत जाईन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.