Home Blog Page 1575

सद्भावनेचे संघटन, प्रेरणा आणि पाठिंबा हा गणेशोत्सवाचा गाभा-ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर

 विधायक पुणेच्या वतीने ‘सन्मान विधायकतेचा’ कार्यक्रम
पुणे : गणेशोत्सवात झुंडशाही उपयोगाची नाही विधायक ताकद गरजेची आहे. ती सगळ्यांमध्ये असते ती वाढायला हवी आणि तिचे प्रकटीकरण व्हायला हवे. सद्भावनेचे संघटन, प्रेरणा आणि पाठिंबा हा गणेशोत्सवाचा गाभा आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी व्यक्त केले.

विधायक पुणे, पुना गेस्ट हाउस स्नेहमंच, चंदुकाका सराफ पेढी तर्फे  ‘सन्मान विधायकतेचा’ या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पुना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते.  यावेळी पुण्यनगरीच्या गणेशोत्सवामध्ये भक्तीभावाने अनेक वर्षे योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा राजेशाही थाटात सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, चंदूकाका सराफ पेढीचे सिद्धार्थ शहा, किशोर सरपोतदार, अजित कुमठेकर, शिरीष मोहिते, गिरीश पोटफोडे उपस्थित होते. शाल, श्रीफळ, मिठाई, गणपतीची प्रतिमा आणि चांदीचे कडे देऊन राजेशाही सन्मान करण्यात आला.

आजतागायत साठ वर्षांहून अधिक काळ घरोघरी जिव्हाळ्याने वर्गणी मागणारे सुरेश पवार, तीन पिढ्यांचा मूर्ती कलेचा संपन्न वारसा जपणारे अभिजीत धोंडफळे, उत्सवाची मर्दानी सुरेलता संघटित करणारे अनुप साठे, इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे आणि कोरोना काळात जनसेवा करताना अकाली मृत्यूला सामोरे गेलेले बाबा जसवंते यांचे कार्य स्मरण करून सन्मान  करण्यात आला.

विजय कुवळेकर म्हणाले, मतभेद बाजूला ठेवून गणेशोत्सवातील चांगल्या गोष्टींच्या मागे उभे राहायला पाहिजे. विधायक शक्तीने एकत्र येऊन एकमेकांना मदत करायला हवी. पूर्वीच्या गणेशोत्सवामध्ये जात धर्म असे काही नव्हते. जात धर्म शोधणे ही गेल्या काही वर्षात सुरू झाले आहे. गणेशोत्सवात गणपती हे एकच सूत्र होते, असेही त्यांनी सांगितले.

आनंद सराफ म्हणाले, १३० वर्षांची परंपरा असलेला पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव वर्धिष्णुवृत्ती आणि परिवर्तनशीलता या अंगभूत गुणवैशिष्ट्यामुळे काळाच्या कसोटीवर टिकून जगभर विस्तारला आहे. या उत्सवाचा भक्कम पायाभूत असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा प्रतिनिधिक सन्मान करण्यात आला. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामधील वी स्मार्टऍग्रीच्या लाभार्थी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.  

नागपुरातील श्री.हर्षल तोंडरे,श्रीमती रीटा गवांदे,वर्ध्यातील श्री.अतुल वंजारी आणि अमरावतीमधील श्री.विनय चौधरी यांना देशाच्या माननीय पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याची अभूतपूर्व संधी मिळाली.

आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेडने (व्हीआयएल) नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस २०२२ (आयएमसी) मध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना आपल्या स्मार्टऍग्री उपक्रमाचे प्रात्यक्षिक दाखवले.  देशभरातील १० राज्यांमध्ये ५ लाख शेतकऱ्यांसाठी वी स्मार्टऍग्री तंत्रज्ञान सुविधा तैनात करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांना पर्यावरणानुकूल शेती पद्धतींचा वापर करून रोजगारामध्ये सुधारणा करता यावी यासाठी मदत म्हणून वी स्मार्टऍग्रीमध्ये विविध आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे, त्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), सेन्सर्स, क्लाऊड तंत्रज्ञान, एचडी कॅमेरे, ड्रोन आणि इन्सेक्ट ट्रॅप्सचा समावेश आहे.

भारत सरकारच्या कम्युनिकेशन्सइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत माननीय पंतप्रधानांसमोर वोडाफोन आयडिया लिमिटेडचे अध्यक्ष रविंदर ठक्कर आणि चीफ रेग्युलेटरी व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर श्री. पी बालाजी यांनी वी स्मार्टऍग्रीचे प्रात्यक्षिक दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह वी ५जी नेटवर्कवर आयएमसीमधून मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील स्मार्टऍग्री लाभार्थी शेतकऱ्यांसोबत व्हर्च्युअली संवाद साधला. शेतांमध्ये तैनात करण्यात आलेल्या स्मार्टऍग्री तंत्रज्ञानाने रोजगारामध्ये कशा प्रकारे सुधारणा घडवून आणल्या आहेत, तसेच रियल-टाइम अपडेट्स, स्थानिक टेक्स्ट आणि व्हिडिओ सल्ला यामुळे पिकांच्या उत्पादनात, गुणवत्तेत कशी वाढ झाली आहे, पाण्याचा वापर, संचालन खर्च कसा कमी झाला आहे व उत्पन्न वृद्धी कशी घडून आली आहे या सर्वांची माहिती शेतकऱ्यांनी यावेळी दिली.

नागपुरातील श्री. हर्षल तोंडरेश्रीमती रीटा गवांदेवर्ध्यातील श्री. अतुल वंजारी आणि अमरावतीमधील श्री. विनय चौधरी यांना देशाच्या माननीय पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याची आणि स्मार्टऍग्री उपक्रमातून त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती देण्याची अभूतपूर्व संधी मिळाली. त्यांच्यासाठी हा प्रसंग संस्मरणीय ठरला.

पंतप्रधानांनी आपला अमूल्य वेळ आणि पाठिंबा या उपक्रमाला दिला यासाठी वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशनचे संचालक श्री. पी बालाजी यांनी त्यांचे आभार मानले. श्री. पी बालाजी म्हणाले,” पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो की ते वी बूथवर आले आणि मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील आमच्या लाभार्थी शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आपला मौल्यवान वेळ दिला. शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या आणि शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या व्हिजनला पाठिंबा देताना वोडाफोन आयडियाला खूप अभिमान वाटत आहे. वी स्मार्टऍग्री प्रकल्प भारतात शेती पद्धतींमध्ये परिवर्तन घडवून आणत आहेउत्पादनक्षमतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञान व इंटेलिजंट सुविधांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहे. आमच्या या तंत्रज्ञान इंटरव्हेन्शनमुळे भारतातील १० राज्यांमधील ५ लाखांहून जास्त शेतकऱ्यांसाठी शेती पद्धतीशेती उत्पादनउत्पन्न आणि एकंदरीत जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणण्यात मदत मिळाली आहे. भारतातील कृषी क्षेत्रामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर आणि अधिक सखोल सामाजिक परिवर्तन घडून यावे यासाठी आमच्या तंत्रज्ञान नैपुण्याचा वापर करण्यासाठी आम्ही सतत वचनबद्ध आहोत.”   

वी स्मार्टऍग्रीमध्ये शेती वैज्ञानिक व तंत्रज्ञान तज्ञांच्या सहयोगाने शेतकऱ्यांना शेतीमध्ये पर्यावरणानुकूल व इंटेलिजंट शेती पद्धतींचा वापर करता यावा यासाठी भौतिक साहाय्य देखील पुरवले जाते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वीने १४० टेक-सॅव्ही युवा शेती उद्योजकांना आणि १८ शेतकरी उत्पादक संघांना (एफपीओ) शेतकऱ्यांची साहाय्य पुरण्यासाठी व पिकांविषयीची महत्त्वाची माहिती सहजतेने मिळवण्यात मदत करण्यासाठी एम्पॅनेल केले आहे. वी स्मार्टऍग्री प्रोग्रामने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा व पश्चिम बंगाल या १० राज्यांमधील ५ लाखांपेक्षा जास्त लघु व मार्जिनल शेतकऱ्यांना सक्षम बनवले आहे.         

‘धगधगती मशाल’ ठाकरेंचे नवे पक्ष चिन्ह:ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाले.

त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याने बाद

मुंबई-केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला दिला आहे. आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले आहे. आयोगाने शिंदे गटाला मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत निवडणूक चिन्हासाठी नवे पर्याय सादर करण्याचे निर्देशही दिलेत. त्यामुळे शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळते याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.

निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संभाव्य निवडणूक चिन्हांची व पक्षाच्या नावाचीही माहिती दिली होती.

ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हे दिली होती. यात त्रिशुळ, उगवता सूर्य व धगधगती मशाल यांचा समावेश होता. परंतु त्यातील त्रिशूळ हे चिन्ह आयोगाने रद्दबातल ठरवले. आयोगाने शिंदे गटाचेही गदा हे चिन्ह रद्दबातल ठरवले आहे. दोन्ही चिन्हे धार्मिक असल्याचेही निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ व ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ही तीन नावे सादर केली होती. त्यातील ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ठाकरे गटाला मिळाले. पण शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आल्यामुळे ठाकरे गट त्याला न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे.

शताब्दी पूर्ती निमित्त आयोजित शोभायात्रेत बालशिक्षण शाळेच्या नावलौकिकाचे दर्शन


पुणे : विद्यार्थ्यांना घडविण्याचा शंभर वर्षांचा जाज्वल्य वारसा, नावलौकिक दर्शवीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (मएसो) बालशिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना शाळेची शताब्दीपूर्ती निमित्त भव्य शोभायात्रा निघाली. भांडारकर रस्त्यावरील बालशिक्षण शाळा, गुडलक चौक, फर्ग्युसन रस्ता, आर्यभूषण प्रेस, बीएमसीसी रस्ता, भांडारकर रस्त्याने पुन्हा शाळेत अशी ही शोभायात्रा निघाली. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे शोभायात्रेच्या मार्गात अंशतः बदल करण्यात आला.

या शोभायात्रेत ‘मएसो’चे अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी  एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष आनंदी पाटील, क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक कानडे, डॉ. आनंद लेले, मएसो सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहसचिव इंजि. सुधीर गाडे,शाळेचे महामात्र डॉ. अंकुर पटवर्धन, प्रा. चित्रा नगरकर, प्रा. सुधीर भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण, शिशु विभागच्या मुख्याध्यापिका रोहिणी फाळके यांच्यासह, पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी,शिक्षक ,पालक, माजी विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक व माजी शिक्षक शोभायात्रेत सहभागी झाले.

शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध महापुरुष, शेतकरी, लष्करी जवान,उद्योगपती,नौदल अधिकारी, वायुसेना अधिकारी, वकील, पत्रकार, नामवंत कलाकार, खेळाडू, राजकारणी यांच्या प्रतीकात्मक वेशभूषेत सहभागी झालेला व मएसोच्या संस्थापकांच्या प्रतिमा विराजमान असलेला चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शोभायात्रेच्या अग्रभागी असलेल्या गरवारे प्रशालेचे टिपरी, ध्वज व ढोल पथकाने आकर्षक व जोशपूर्ण सादरीकरण केले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि. १०: जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

स्वारगेट येथे जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने ‘भेटूया दिग्गजांना’ या पुस्तकाच्या प्रकाशन तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पद्मभूषण डॉ. के. एच.संचेती, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, जनसेवाचे अध्यक्ष विनोद शहा, खजिनदार राजेश शहा, मीना शहा, जे.पी.देसाई उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, शैक्षणिक तसेच उद्योग क्षेत्रात पुण्याचे देशात नाव आहे. प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी पोषक वातावरण असलेल्या महानगरात जेष्ठ नागरिकांसाठी जनसेवा फाऊंडेशन सेवाभावाने काम करत आहे. जेष्ठांची सेवा हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून संस्था यापुढील काळातही ते सुरू ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘भेटूया दिग्गजांना’ या पुस्तकांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील तब्बल १९ दिग्गजांचा जीवन प्रवास मांडण्यात आला आहे. समाजासाठी हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी आणि येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. चांगल्या पुस्तकांच्या वाचनातून चांगले विचार मिळतात असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

डॉ. संचेती म्हणाले, जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जनसेवेचे अखंड कार्य सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तसेच आवश्यक सेवा देण्यात संस्थेने केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

श्री. कराड म्हणाले, भारताने जगाला शांतीचा संदेश दिला आहे. त्याग आणि समर्पण याचे उदाहरण म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे. जनसेवा फाऊंडेशन असेच जनसेवेचे कार्य करते आहे.

प्रास्ताविकात श्री. शहा यांनी संस्थेची माहिती दिली. यावेळी श्री. जे. पी. देसाई लिखित ‘भेटूया दिग्गजांना’
पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

“वॉक ऑफ कॉन्फिडन्स” मध्ये कलमाडी स्कूल, कन्नड माध्यम विद्यार्थिनींच्या फॅशन शोचा “विक्रम”

पुणे-ग्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशन सिंगापूर आणि रिता इंडिया फाऊंडेशन, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या फॅशनशोचे आयोजन करण्यात आले होते.”वॉक ऑफ कॉन्फिडन्स” या नावाने आठवी, नववी आणि दहावी मधील एकूण ८९ विद्यार्थिनीचा हा फॅशन शो, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल पुणे, भारत येथे “फेस्टिव्ह इव्हेंट 2022” दरम्यान झाला. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन रिता इंडिया फाऊंडेशन च्या संस्थापिका आणि ग्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशन च्या राजदूत डॉ. रिता शेटीया आणि ग्रेस लेडीज च्या क्लब मेंबर डॉ. सविता शेटीया यांनी केले.

“गर्ल्स एम्पॉवरमेंट” या थीम वर आधारित “फेस्टिव्ह इव्हेंट 2022” अंतर्गत विद्यार्थिनींना त्यांच्यातील उत्कट कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने सुरु झालेल्या या फॅशन शो मध्ये विद्याथिनींनी एकमेकांना प्रेरित केले आणि सुंदर पोशाखात स्टेजवर त्यांच्या आत्मविश्वासासह सादरीकरण केले.

एकूण ८९ विद्यार्थिनीनी फॅशन शोसाठी आत्मविश्वासाने चालत “जागतिक विक्रम” प्रस्थापित केला. प्रत्येक सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना “ग्रेस लेडीज ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड्स” कडून जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

शाळेचे प्रिन्सिपल चंद्रकांत हरकूडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शिक्षिका विल्मा मार्टीस , श्रेया हब्बू , उषा मोरे , शोभा पंचांगमठ, पूजा पुजारी आणि ज्येष्ठ शिक्षक सदानंद तावरगेरी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शिक्षकेत्तर बसप्पा जवारी आणि मनीषा परदेशी यांनी सभागृह व तांत्रिक व्यवस्था सांभाळली. काही विद्यार्थ्यांनी उत्साहाने फोटोशूट आणि व्हिडीओ काढण्यात मदत केली.

दिवाळी खरेदी करताना घ्या सावधानता : फसव्या जाहिरातींना भुलू नका : नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त.

पुणे- दिवाळी सणाच्या तोंडावर अनेक आमिषे दाखविणाऱ्या बिल्डरच नव्हे तर अनेक व्यावसायिक कपड्यांच्या दुकानांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात , पण या जाहिरातींना भुलून जाऊ नका ,फसव्या जाहिराती ओळखा आणि त्याकडे पाठ फिरवा असे आवाहन गार्ह्क चळवळीतून होत असताना पिंपरी चिंचवडमध्ये मोठी करवाई करण्यात आली आहे. कपड्यांच्या नामांकित कंपनीच्या नावाचा आणि लोगोचा वापर करुन बनावट कपड्यांची विक्री करणाऱ्या दोघांवर वाकड पोलीस ठाण्यात कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या कारवाई 15 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इम्रान युनुस शेख(रा. ओंकार कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) आणि लुधियाना पंजाब येथील शिव भोले यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नरेंद्र सिंग (वय-44) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ही कारवाई शनिवारी (दि.8) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास काळेवाडी येथील रिझवान ड्रेसेस येथे केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लेझिस्ट आयपीआर सर्व्हिस लि. (या कंपनीचे संचालक असून त्यांच्या कंपनीकडे एडिडास नाईकी ,अंडर आर्मर , इंक, रिबॉक), केलविन क्लेन यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे लोगे व ब्रँड नेमचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार आहे. फिर्यादी यांना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नामांकीत कंपन्यांचे नाव आणि लोगो वापरुन बनावट कपड्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.

फिर्यादी यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी यांच्या मदतीने आरोपी इम्रान युनुस शेख याच्या रिझवान ड्रेसेस या दुकानात छापा टाकला. त्यावेळी आरोपीने नामांकित कंपन्याच्या नावाचा व चिन्हाचा वापर करुन बनावट टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट व जॅकेट असा एकूण 15 लाख 75 हजार रुपये किमतीता माल दुकानात विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. आरोपीने हे कपडे लुधीयाना पंजाब येथील शिव भोले याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हाबळे,शस्त्र विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक देशमुख,दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भांगे , पोलीस अंमलदार खारगे, पुलगम,,महिला पोलीस हवालदार लोमटे, गायकवाड, पोलीस नाईक शेंडगे, कोकणे शेख, अत्तार यांच्या पथकाने केली.

गांधी मार्गानेच भारत पुढे गेला पाहिजे: संजय आवटे

पुणे :

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचा समारोप शुक्रवारी सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे(संपादक, लोकमत,पुणे ) यांच्या उपस्थितीत झाला. गांधी भवन(कोथरूड) येथे शुक्रवारी, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम झाला. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले, नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रशांत कोठडिया, डॉ. प्रवीण सप्तर्षी, सचिन पांडुळे यांच्यासह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते.

संजय आवटे म्हणाले, ‘गांधींशिवाय भारताची जगात ओळख नाही. गांधी हे उत्तर आहे, समस्या नाही, त्यामुळे गंभीर चेहरा करुन गांधींची चर्चा करण्यापेक्षा जल्लोषात गांधी विचार जगात पोहोचविला पाहिजे. भोवतालच्या सर्व प्रश्नांवर गांधी सेलिब्रेट करणे, हे उत्तर आहे.

आपल्याला राष्ट्रपिता म्हणून गांधीजी लाभले, हा वारसा समजून घेतला पाहिजे. संवादाची माध्यमे नसताना अल्पावधीत गांधी हे अखंड , अवाढव्य भारताचे नेते झाले. अहिंसेच्या संकल्पनेवर त्यांनी देश जोडला आणि ते जीवंतपणे दंतकथा झाले.

ज्या काळात जगात हिटलर, मुसोलिनी यांच्यासारखे भयंकर नेते पुढे येत होते, तेव्हा भारतात गांधीसारखा महान नेता पुढे येत होते. आज हिटलर, मुसोलिनींना त्यांच्या देशात मान्यता नाही, पण जगात गांधीजींना मान्यता मिळाली.

लोकांच्या शहाणपणावर गांधींचा विश्वास होता.लोकांकडून ते शिकत होते. परंपरेच्या अधिष्ठानावर ते उभे होते.ते लोकशाहीवादी होते, व्यक्ती स्वातंत्र्याचे पाठीराखे होते.

गांधी, पटेल, नेहरू, बोस, आंबेडकर हे थोर नेते होते. ते प्रचंड मोठे काम करत होते, त्यांच्यात कार्यपध्दतीचे मतभेद असू शकतील, पण जे कामच करत नव्हते, त्यांनी या उठाठेवी करुन काय उपयोग ?

आवटे पुढे म्हणाले, ‘आपण आज बोलभांड, प्रतिक्रियावादी झाले आहोत. स्वातंत्र्यलढा, क्रांती हे पुण्याचे काम आहे, हे गांधीजींमुळे सर्वसामान्य माणसाला वाटले.गांधीजींनी प्रत्येकाला कार्यरत ठेवले. नंतर गांधीजींना आपण सोडून दिले. गांधीजींचे मॉडेल उलटे करुन त्यांच्या विचाराच्या विरोधकांनी वापरले. म्हणून त्यांचा राम वेगळया रथात बसला, गाय वेगळया गोटात गेली.

गांधींच्या आधीच्या आंदोलनांनी देशभक्त तयार केले. पण, गांधींनी देश उभा केला.गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर हाच खरा भारत आहे.

गांधीजींसमोर जितकी भयंकर परिस्थिती होती, तितकी आज आपल्यासमोर नाही. नौआखालीत मुस्लीमाने गांधींजींचा खून केला नाही, तो खून नंतर कोणी केला, हे सर्वांनाच माहित आहे.गांधी समजून घेऊन पुढे गेले पाहिजे. गांधी मार्गाने आपण पुढे गेले पाहिजे. ‘आयडिया ऑफ इंडिया ‘ ही संकल्पना आपण मांडत राहिली पाहिजे,असेही आवटे यांनी सांगीतले.

अनिल देशमुखांना न्यायालयाकडून खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची परवानगी

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. अनिल देशमुख यांना हृदय विकाराचा त्रास होता, यावर उपचार घेण्यासाठी त्यांनी त्यांना सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे.

अनिल देशमुख आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. ईडीच्या प्रकरणात त्यांना 4 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण, त्यांच्यावर सीबीआयनेही गुन्हा दाखल केल्याने अद्याप या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नाही. सीबीआयकडून जामीन मिळेपर्यंत, त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही.

दरम्यान, अनिल देशमुख यांना हृदय विकाराचा त्रास आहे. त्यांनी अँजिओग्राफीसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे, अशी मागणी न्यायालयाला केली होती. त्यावर सुनावणी घेताना मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांना जसलोकमध्ये अँजिओग्राफी करण्यासाठी दाखल केले जाईल.

अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक; १४ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणार – जिल्हाधिकारी निधी चौधरी

मुंबई, दि. 10 : अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर असल्याची माहिती, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या  एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 3 ऑक्टोबर 2022 पासून या मतदार संघ क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 7 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 14 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2022 (सोमवार), मतदानाचा दिनांक – 3 नोव्हेंबर 2022 (गुरुवार), मतमोजणीचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2022 (रविवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 8 नोव्हेंबर 2022 (मंगळवार) आहे.

या पोटनिवडणुकीसाठी दि. 1 जानेवारी 2022 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला आहे.

मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक / पोस्ट ऑफिसचे फोटोसहीत पासबुक, वाहन परवाना, पॅन कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टार अंतर्गत रजिस्टर जनरल ऑफ इंडीया यांचे स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसहीत निवृत्ती कागदपत्रे, केंद्र / राज्य / महामंडळ / मंडळ यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, विधानमंडळ सदस्य / लोकसभा सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाने दिलेले अंपगत्वाचे ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र मतदारांकडे असणे अनिवार्य आहे.

या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहे, त्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवाराला किंवा राजकीय पक्षाला वृत्तपत्रे किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उमेदवाराची प्रसिद्धी करावयाची असल्यास ती जाहिरात व विहित नमुन्यातील फॉर्म ‘माध्यम संनियंत्रण व प्रमाणन समिती’ कडे सादर करून प्रमाणित करून घ्यावा, असेही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी कळविले आहे.

बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात

अकोला,१०  बालन्याय अधिनियम : मुलांची काळजी आणि संरक्षण २०१५ ह्या कायद्यात सन २०२१ ला सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार, अनाथालयातील बालकांना दत्तक देण्याची  प्रक्रिया, जी न्यायालयातून होत असे त्याऐवजी ती जिल्हादंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकरवी करण्यात येते. या बदलानंतर दत्तक हस्तांतरण आदेश देणाऱ्या पहिल्या जिल्हाधिकारी अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा ठरल्या आहेत. उत्कर्ष शिशुगृहातील साडेचार महिने वयाची  बालिका ही अशा पद्धतीने दत्तक म्हणून सिंगापूरच्या पालकांनी घेतली आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली आहे.

येथील उत्कर्ष शिशुगृहात जानेवारी २०२२ मध्ये एक बालिका आणण्यात आली. यावेळी ही बालिका केवळ ४-५ दिवसांची होती. बालगृहात तिचे संगोपन सुरु होतेच. दरम्यान, कारा(Central Adaption Resource Agency-CARA)   या अनाथ बालकांचे देशांतर्गत तसेच आंतर्देशीय दत्तक पालकत्व प्रक्रियेचे काम करणाऱ्या संस्थेकडे सिंगापूर येथील भारतीय दाम्पत्याने बालकासाठी मागणी नोंदवली होती. त्या पालकांपर्यंत या बालिकेची माहिती पोहोचवण्यात आली. त्यांनी ही बालिका दत्तक घेण्याचे मान्य केले. त्यानंतर उत्कर्ष शिशुगृहातील अधीक्षक प्रीती दांदळे यांनी हा प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांच्याकडे पाठवला. त्याप्रमाणे बालन्याय अधिनियम २०१५ मधील सुधारित तरतुदींनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले. या प्रकरणात तीन सुनावण्या झाल्या. या सुनावण्यांना पालकांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष हजर राहावे लागले.  या सुनावण्यांनंतर गुरुवारी (दि.६ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश जारी करुन या बालिकेस तिच्या पालकांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

नव्या सुधारणांनुसार अशा प्रकारे दत्तक प्रक्रिया करणारा अकोला हा पहिला जिल्हा ठरला असून असे आदेश देणाऱ्या जिल्हाधिकारी निमा अरोरा ह्या पहिल्या जिल्हाधिकारी तर दत्तक जाणारी पहिली बालिका ही अकोल्यातील उत्कर्ष शिशुगृहातील बालिका ठरली आहे.

अशी होते दत्तक प्रक्रियाः

‘आफा’  (Authorized foreign Adaption Agency-AFAA) ही संस्था आंतरराष्ट्रीय दत्तक पालकत्व प्रक्रियेचे काम करणारी संस्था आहे. तर भारतात  भारत सरकारच्या ‘कारा’ (Central Adaption Resource Agency-CARA)  ही संस्था आंतरदेशीय व देशांतर्गत दत्तक पालकत्व प्रक्रियेचे काम करते. देशात जिथं जिथं म्हणून शासनाच्या अनुदानित  अनाथाश्रमात  कायदेशीररित्या अनाथ असलेल्या बालकांची माहिती  ‘कारा’ च्या  www.cara.gov.in  या संकेतस्थळावर अपलोड केली जाते. या वेबसाईटद्वारे ज्या विदेशी पालकांची ‘आफा’ कडे नोंदणी असते; त्या पालकांना मुलांची माहिती दाखविली जाते. देशातील पालकांची ‘कारा’ कडे नोंदणी केली जाते. मूल दाखवल्यानंतर ४८ तासात पालकांना आपलं मूल नक्की करावं लागतं  त्यानंतर २० दिवसांत त्यांनी संस्थेशी संपर्क करावयाचा असतो. त्यासाठी या पालकांना भारतात येऊन काराच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागते. तेथे त्यांची सर्व कागदपत्रे तपासली जातात. याच वेळी तेथे त्यांची प्रत्यक्ष मानसिकताही तपासली जाते. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष मूल दाखवले जाते. प्रत्यक्ष भेटीनंतर मग त्यांचे दत्तक पालकत्वासाठीचा अर्ज दाखल केला जातो.  यावर प्रक्रिया व तपास पूर्ण करुन  मान्यता दिली जाते. मगच या  मुलांचे नवे पालक म्हणून संबंधित दाम्पत्याची नोंद होते. तसा जन्मदाखला स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मिळतो.  यादरम्यान हे दत्तक पालक हे निरीक्षणाखाली असतात.  ही सर्व प्रक्रिया बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये केली जाते. जिल्ह्याचे जिल्हा महिला  बालविकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे दोन अधिकारी ही प्रक्रिया पार पाडत असतात.  कायद्यातील सुधारणा २०२१ मध्ये झाली. त्यानुसार आता ही प्रक्रिया न्यायालयाऐवजी जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत पार पाडली जाते.

येत्या सहा-सात वर्षांच्या काळात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था एक अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठेल: उपमुख्यमंत्री

मुंबई, 10 ऑक्‍टोबर 2022

केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योगमंत्री पीयूष गोयल आज मुंबई येथे गुंतवणूकदार गोलमेज परिषदेला उपस्थित होते. एमआयटीएल अर्थात महाराष्ट्र औद्योगिक टाऊनशिप लिमिटेडने  या चौथ्या गुंतवणूकदार गोलमेज परिषदेचे आयोजन केले.

एयुआरआयसी अर्थात औरंगाबाद औद्योगिक शहरासारख्या औद्योगिक स्मार्ट शहरांचे महत्व अधोरेखित करत केंद्रीय वाणिज्यमंत्री म्हणाले, “एयुआरआयसीसारख्या आधुनिक औद्योगिक टाऊनशिपमध्ये व्यवसाय उभारण्यातच खरी व्यावसायिक समज आहे. या औद्योगिक स्मार्ट शहरांचे नियोजन  आंतरराष्ट्रीय मानकांनुसार  करण्यात आले आहे. अशा ठिकाणी व्यवसायासाठी येणारे उद्योग देशाच्या उत्पादन क्षेत्राला अधिक सामर्थ्य प्रदान करतील.”  

एमआयटीएलचा सर्वात महत्त्वाचा औद्योगिक भाग असलेले एयुआरआयसी म्हणजेच औरंगाबाद औद्योगिक शहर हे जागतिक पातळीवर सर्वात अधिक विकसित अत्याधुनिक औद्योगिक शहरांपैकी एक आहे. या भागात 7,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक आणि समर्पित निवासी जागांसह हा भाग मराठवाड्यातील औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. एयुआरआयसीने पंतप्रधान एमआयटीआरए योजनेअंतर्गत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या पाठबळासह उभारण्यात येणारा एमआयटीआरए वस्त्रोद्योग पार्क, नियोजित मेगा फूड पार्क तसेच आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर यांच्या विकासासाठी योजना तयार केली असून या तीनही सुविधांची उभारणी होत असल्यामुळे, हा भाग खऱ्या अर्थाने जागतिक गुंतवणुकीसाठी सुयोग्य भाग ठरणार आहे.

गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देत केंद्रीय वाणिज्यमंत्री गोयल यांनी सांगितले की, मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी तसेच व्यापार  सुलभता वाढविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध हितधारकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार सर्व उपाययोजना करेल अशी ग्वाही त्यांनी उद्योजकांना दिली.

भारतातील व्यापारविषयक परवानग्यांसाठी लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय एक खिडकी यंत्रणेबाबत बोलताना केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल म्हणाले की, जगभरात कोठेही असलेल्या व्यक्तीला बसल्या जागेवरून एक बटण दाबून भारतात उद्योग स्थापन करण्यासाठी, जमीन खरेदीसाठी किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळवता याव्यात  हा राष्ट्रीय एक खिडकी यंत्रणा सुरु करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे.

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ (NICDC) हे एक विशेष उद्देशाचे माध्यम आहे जे नवीन औद्योगिक शहरे “स्मार्ट शहरे’ म्हणून विकसित करून पायाभूत सुविधा क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान एकत्रित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या भारतातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा कार्यक्रम म्हणजेच राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाची निर्मिती, प्रोत्साहन आणि विकास सुलभ करते. या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील नियोजित शहरीकरणाला चालना देणे आणि उत्पादन क्षेत्र हे त्यातील प्रमुख चालक आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, देशाचा कायापालट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत. महाराष्ट्रावर आपला विश्वास असल्याचे सांगून ते म्हणाले, “मला खात्री आहे की सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील सर्वात औद्योगिक, प्रगतीशील आणि वेगाने विकसित होणारे राज्य म्हणून स्वत:ला सिद्ध करेल.”

अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधा क्षेत्राच्या महत्त्वाचा पुनरुच्चार करताना, पियुष गोयल म्हणाले की अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात पायाभूत सुविधांनी ऊर्जा आणि अर्थव्यवस्था निर्माण केली आहे आणि नवीन संधी जागृत केल्या आहेत. त्यांनी माहिती दिली “आपल्याकडे जवळपास 111 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन आहेत आणि त्यातील मोठा भाग महाराष्ट्रात आहे”. ते पुढे म्हणाले, “मेट्रो प्रकल्प, ट्रान्स-हार्बर लिंक, किनारी रस्ता प्रकल्प, द्रुतगती मार्गाचा विस्तार हे महत्वाचे प्रकल्प आहेत ज्यांचा महाराष्ट्राला मोठा फायदा होईल.”

पियुष गोयल पुढे म्हणाले की, बृहत अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत आहेत, पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने होत आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. “आपण सर्व मिळून भारताला, जगाचे भविष्य बनवू शकतो.”

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढील 6-7 वर्षात ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची महाराष्ट्राची महत्वाकांक्षा आहे. गुंतवणूकदारांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्याकडे गुंतवणुकदारांसाठी प्रोत्साहनपर पॅकेज आहे. आम्ही उद्योग क्षेत्राच्या विशेष गरजा देखील पूर्ण करत आहोत.”

पूर्वी औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड म्हणून ओळखला जाणारा एमआयटीएल, हा भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुणे, दि. १० : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२२-२३ आंबिया बहार मध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्रा, व पपई या फळपिकांना लागू करण्यात आली असून या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा सरंक्षणाचे कवच लागू राहणार आहे. नुकसान भरपाई महावेध प्रकल्पातंर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारी नुसार ठरविण्यात येते.

दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरुर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापूर व सासवड या तालुक्यातील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १५ हजार ४०० रुपये इतकी आहे.

दौंड, आंबेगाव बारामती, जुन्नर, इंदापुर, सासवड, शिरूर, हवेली व खेड या तालुक्यातील डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जानेवारी २०२३ असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ९ हजार ७५० रुपये इतकी आहे.

दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर,व शिरूर या तालुक्यातील द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १६ हजार रुपये इतकी आहे.

दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, खेड, हवेली व शिरूर या तालुक्यातील केळी फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ७ हजार रुपये इतकी आहे.

इंदापूर तालुक्यातील मोसंबी फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे.

शिरुर तालुक्यातील संत्रा फळपिकासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे.

आंबेगाव, जुन्नर व इंदापूर तालुक्यातील पपई फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १ हजार ७५० रुपये इतकी आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आंबिया बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय विमा कंपनीचे १८०० ४१९ ५००४ दूरध्वनी क्रमांक ०२२-६१७१०९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.

फेरफार अदालतीमध्ये प्रलंबित नोंदी निर्गत करून घेण्याचे जिल्हांधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे दि. १०: जिल्हा प्रशासनातर्फे दुसऱ्या बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहत फेरफारविषयक प्रलंबित नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जनतेच्या कामकाजाचा निपटारा होणेचे दृष्टीने फेरफार अदालतीच्या वेळेस फेरफार अदालतीशिवाय जनतेच्या इतर कामकाजामध्ये ७/१२ मधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रार नोंदी विहीत मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे अनुषंगाने तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण करणे. संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्विकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे उत्पन्नाचे व इतर दाखले वितरीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

तरी फेरफार अदालतीसाठी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडल अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील भरूच मधील आमोद येथे 8000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

“आज, गुजरातच्या या भूमीवरून आणि माता नर्मदेच्या तीरावरून आदरणीय मुलायमसिंहजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”

देशाच्या आणि गुजरातच्या विकासात भरुचचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे

एखाद्या उल्केच्या गतीने कामे पूर्ण करण्याच्या नरेंद्र – भूपेंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या कार्याचे हे फलित आहे.

सक्षम वातावरण निर्मितीचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी उद्देश आणि धोरणे यांची नितांत आव्यश्यकता असते.

भारतीय अर्थव्यवस्थेने 2014 पासून दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

कोविड विरुद्धच्या लढ्यात गुजरातने राष्ट्राला फार मोठे साहाय्य केले आहे. देशाच्या औषधनिर्माण निर्यातीत गुजरातच्या 25 टक्के वाटा आहे.

विकासाच्या या प्रवासात आदिवासी समाजाने अतिशय मोलाचे योगदान दिले आहे.

भरूच आणि अंकलेश्वरचा विकास हा ट्विन सिटी विकास मॉडेलच्या धर्तीवर केला जात आहे.

नवी दिल्‍ली, 10 ऑक्‍टोबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  आज गुजरात मधील भरूच मधील आमोद येथे 8000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले. पंतप्रधानांनी जंबुसर येथे बल्क ड्रग पार्क. दहेज येथीलखोल समुद्रातील  पाइपलाइन प्रकल्प, अंकलेश्वर विमानतळाचा पहिला टप्पा  आणि अंकलेश्वर आणि पानोली येथे बहुस्तरीय औद्योगिक शेडचा विकास या प्रकल्पांची  पायाभरणी केली. गुजरातमधील रसायन क्षेत्राला चालना देणारा गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड (GACL) प्रकल्प, भरुच भूमिगत ड्रेनेज आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. (IOCL) दहेज कोयाली पाइपलाइन  असे अनेक प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले

सर्वप्रथम पंतप्रधानांनी दिवंगत मुलायमसिंग यादव यांना श्रद्धांजली वाहिली. मुलायमसिंग यादव यांच्या समवेतचे माझे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते,  मुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा आमची भेट होत असे तेव्हा परस्परांमधील जवळीक आणि आपुलकीची जाणीव होत असे, असे पंतप्रधान म्हणाले.  पंतप्रधान पदाचा उमेदवार होतो  तेव्हा  विविध नेत्यांना भेटत होतो, तेव्हा मुलायम सिंग यांनी दिलेला सल्ला आणि आशीर्वाद आपल्यासाठी आजही तितकाच महत्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. बदलत्या काळातही मुलायम सिंग यांनी 2013 मध्ये दिलेले आशीर्वाद कायम राहिले आहेत, असेही ते म्हणाले.   पंतप्रधानांनी मागील  लोकसभेच्या शेवटच्या सत्रात मुलायमसिंगजींनी दिलेल्या  आशीर्वादाचेही स्मरण केले. मुलायम सिंग यांनी  कोणतेही राजकीय मतभेद मनात न बाळगता 2019 मध्ये पंतप्रधानपदी मोदींच्या पुनरागमनाचे भाकीत केले होते, अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. मुलायमसिंग जी हे सर्वाना सोबत घेऊन जाणारे नेते होते, असे ते म्हणाले. “आज, गुजरातच्या या भूमीवरून आणि माता नर्मदेच्या  तीरावरून आदरणीय मुलायमसिंगजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना हे असह्य नुकसान सहन करण्याची शक्ती देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान  म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात आपण भरूच मध्ये आलो होतो, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भरूचच्या या भूमीने अशा सुपुत्रांना जन्म दिला आहे ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाचे नाव एका नवीन उंचीवर नेले आहे. त्यांनी  संविधान सभेचे सदस्य आणि सोमनाथ चळवळीतील सरदार पटेल यांचे प्रमुख साथीदार कन्हयालाल माणेकलाल मुन्शी आणि भारतीय संगीतातील महान कलाकार  पंडित  ओंकारनाथ ठाकूर यांचे स्मरण केले. भरुचने गुजरातच्या आणि भारताच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, जेव्हा जेव्हा आपण भारताच्या इतिहासाचे वाचन करू आणि भविष्यातील भारताविषयी भाष्य करू, तेव्हा तेव्हा भरुचचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाईल, असे ते म्हणाले. भरुच जिल्ह्याच्या उदयोन्मुख जागतिक स्वरूपाचीही त्यांनी नोंद घेतली.

रसायन उद्योग क्षेत्रातील अनेकविध प्रकल्पांसोबतच भरूच मध्ये पहिल्या  बल्क ड्रग पार्कचे लोकार्पण होत आहे.  “दळणवळणाशी संबंधित दोन मोठे प्रकल्प देखील आज सुरू करण्यात आले आहेत”, असे पंतप्रधान  म्हणाले. अंकलेश्वर येथे भरूच विमानतळाची पायाभरणी देखील करण्यात आली आहे, जेणेकरून भरूच मधील नागरिकांना बडोदा आणि सुरत विमानतळांवर अवलंबून राहावे लागणार नाही. देशाच्या इतर कुठल्याही लहान शहरांपेक्षा भरूच मध्ये सर्वाधिक उद्योगधंदे आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आणि आता विमानतळाच्या उभारणीसह या क्षेत्राच्या  विकासाला नवीन गती मिळेल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.   एखाद्या उल्केच्या गतीने कामे पूर्ण करण्याच्या नरेंद्र – भूपेंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या कार्याचे हे फलित आहे, असे ते म्हणाले. हा गुजरातचा नवीन चेहरा आहे, गेल्या दोन दशकात गुजरातने झपाट्याने प्रगती केली असून सर्वच बाबतीत पिछाडीवर असलेले राज्य अशी ओळख असलेल्या गुजरातचा चेहरामोहरा बदलून  एक संपन्न औद्योगिक आणि कृषी राज्य अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. सतत कार्यमग्न असणारी बंदरे आणि विकसित होणाऱ्या किनारपट्ट्यामुळे आदिवासी आणि मच्छीमार समाजाचे जीवन बदलले. गुजरातच्या जनतेच्या मेहनतीमुळे  स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवी कालखंडात  राज्यातील तरुणांसाठी सुवर्णकाळ सुरू झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण आता  अडथळेविरहित सक्षम वातावरणाची निर्मिती करायला हवी आणि या संधीचा लाभ घ्यायला हवा. सक्षम वातावरण निर्मितीचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी उद्देश आणि धोरणे यांची नितांत आवश्यकता असते. भरूच मधील सुधारलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत कृषी , आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी सुधारत गेली, याचाही त्यांनी उल्लेख केला. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी एकावेळी एकच प्रश्न कसा हाती घेऊन  ते कसे सोडवले याची आठवण त्यांनी सांगितली. ” आजकालच्या मुलांना एकेकाळी अतिशय प्रचलित असलेला संचारबंदी हा शब्द माहित नसावा. आज आमच्या मुली केवळ सन्मानाने जगत नाहीत आणि उशिरापर्यंत काम करत नाहीत तर समाजाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करत  आहेत, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे भरूच मध्येही शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याने युवा वर्गाला नवनवीन संधींची द्वारे खुली झाली आहेत. दीर्घकालीन नियोजन आणि आतापर्यन्त कमी प्रमाणात  वापरलेल्या संसाधनांचा लाभ घेतल्यामुळे, गुजरात एक उत्पादन, औद्योगिक आणि व्यवसाय केंद्र म्हणून उदयास आले आहे त्याचप्रमाणे   जागतिक दर्जाच्या अनेक सुविधा येथे उदयास आल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. डबल-इंजिन सरकार हे दुहेरी फायद्याचे उत्तम उदाहरण बनले आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या वोकल फॉर लोकल या धोरणाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. स्थानिक उत्पादनांचा जास्तीत जास्त अवलंब करून आणि विदेशी वस्तूंचा त्याग करून आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करू शकत, असे ते म्हणाले. यंदाच्या दिवाळीत आपण स्थानिक पातळीवर बनवलेल्या वस्तू वापरूया  स्थानिक व्यवसाय आणि कारागिरांना मदत करूया, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय  अर्थव्यवस्थेने  2014 पासून दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.  आणि भारतावर राज्य करणाऱ्या वसाहतवादी राष्ट्राला मागे टाकून आपण हे यश साध्य केले आहे, त्यामुळे हा पराक्रम अधिक महत्त्वाचा झाला आहे, असे ते म्हणाले. या यशाचे श्रेय तरुण, शेतकरी, कामगार, छोटे-मोठे व्यावसायिक  आणि उद्योगपती यांचे आहे, असे ते म्हणाले. औषधनिर्मिती करून लोकांचे आयुष्य वाचवण्याच्या अतिशय उद्दात कार्यात आघाडी घेतल्याबद्दल त्यांनी भरूच मधील जनतेचे अभिनंदन केले. महामारीने फार्मा क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले. “कोरोनाविरुद्धच्या लढाईत गुजरातने देशाला मोठी मदत केली. देशाच्या औषध  निर्यातीत गुजरातचा वाटा 25 टक्के आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले.

काही समाजविघातक शक्तींनी भरूचच्या विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्याविषयीच्या आठवणींचा  पंतप्रधानांनी उल्लेख केला. ज्यावेळी  2014 मध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा गुजरातने   डबल इंजिन सरकारच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला, आमच्या सरकारने विकासाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले. सरदार सरोवर धरणाच्या विकासादरम्यान शहरी नक्षलवाद्यांनी निर्माण केलेल्या अडथळ्यांकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. झारखंड, बिहार, ओडिशा, छत्तीसगड,  मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये नक्षलवाद्यांचे अस्तित्व असल्याचे त्यांनी सांगितले.  गुजरात मधील  आदिवासी समुदायाने नक्षलवाद्यांचा प्रसार गुजरात मध्ये होऊ दिला  नाहीआणि राज्यातील लोकांचे प्राण वाचवले, असे सांगून पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.  शहरी नक्षलवादाचा शिरकाव राज्यात होऊ नये याकरता सदैव दक्ष राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. विज्ञान आणि गणित या विषयात योग्य आणि उत्तम शिक्षण घेतल्याशिवाय  सरकारी प्रयत्नांमुळे होत असलेल्या सकारात्मक कृती  आणि इतर योजनांचा योग्य लाभ मिळणे शक्य नाही, असे ते म्हणाले.  आज आदिवासी तरुण  प्रशिक्षण घेऊन डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि वकील बनत आहेत. आदिवासी समाजाने राज्याच्या आणि देशाच्या विकासाच्या या प्रवासात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ज्यांना देशभरातील आदिवासी बांधव आपले दैवत मानतात . अशा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सरकारने शूर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला समर्पित जनजाती गौरव दिवस घोषित केला होता, असे पंतप्रधानांनी सांगितले.

भरूच आणि अंकलेश्वरचा विकास अहमदाबाद आणि गांधीनगर सारख्या विकासाच्या जुळ्या शहरांच्या मॉडेलच्या धर्तीवर केला जात आहे. “लोक जसे न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीबद्दल बोलतात तसे भरूच आणि अंकलेश्वरबद्दल बोलतील, असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेंद्र पटेल, केंद्रीय रसायन आणि खते मंत्री  मनसुख मांडविया , खासदार सी आर पाटील आणि मनसुख वसावा इत्यादी मान्यवर  उपस्थित होते.


पार्श्वभूमी

भारताला औषधनिर्माण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने टाकलेलं आणखी एक पाऊल म्हणून जंबुसर येथे पंतप्रधानांच्या हस्ते बल्क ड्रग पार्कची  पायाभरणी झाली. 2021-22 मध्ये, एकूण फार्मास्युटिकल आयातीपैकी 60% पेक्षा जास्त वाटा औषधांचा होता. औषधांच्या आयातीला पर्याय म्हणून  आणि भारताला मोठ्या प्रमाणात औषधांसाठी स्वावलंबी बनवण्यात मदत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. पंतप्रधानांनी दहेज येथे खोल समुद्रातील  पाइपलाइन प्रकल्पाची पायाभरणीही केली, ज्यायोगे  औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. याशिवाय  देशातील सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योगांना चालना देणाऱ्या अंकलेश्वर विमानतळाचा पहिला टप्पा  आणि अंकलेश्वर आणि पानोली येथे बहुस्तरीय औद्योगिक शेडचा विकास या प्रकल्पांची  पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते  झाली

पंतप्रधानांच्या हस्ते अनेक औद्योगिक पार्क्सच्या विकासासाठी भूमिपूजन समारंभ झाले. यामध्ये वालिया (भरूच), अमीरगड (बनासकंठा), चकलिया (दाहोद) आणि वानार (छोटा उदयपूर) या चार आदिवासी औद्योगिक उद्यानांचा समावेश आहे; त्याच प्रमाणे मुडेठा (बनासकांठा) येथील अॅग्रो फूड पार्क; काकवाडी दांती (वलसाड) येथील सी फूड पार्क; आणि खांडीवाव (महिसागर) येथील एमएसएमई पार्कचा देखील समावेश आहे.

रसायन उद्योगाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक प्रकल्प या कार्यक्रमात पंतप्रधानांनी राष्ट्रांला समर्पित केले.  त्यांनी 800 TPD (Temperature Programmed Desorption) कॉस्टिक सोडा प्रकल्प समर्पित केला जो दाहेज येथील 130 मेगावॅटच्या सहवीजनिर्मिती वीज प्रकल्पाशी जोडला गेला आहे. यासह त्यांनी दहेज येथील विद्यमान कॉस्टिक सोडा  प्रकल्पाचा विस्तारित प्रकल्प देखील राष्ट्राला  समर्पित केला, ज्यामुळे आता क्षमता वाढली असून ती प्रतिदिन 785 मेट्रिक टन वरून प्रतिदिन 1310 मेट्रिक टन इतकी झाली आहे. पंतप्रधानांनी दाहेज येथे प्रतिवर्षी एक लाख मेट्रिक टन क्लोरोमेथेनच्या उत्पादनक्षमतेचा   प्रकल्प समर्पित केला. पंतप्रधानांनी समर्पित केलेल्या इतर प्रकल्पांमध्ये दाहेज येथील हायड्रॅझिन हायड्रेट प्लांटचा समावेश आहे या योगें या उत्पादनाच्या आयातीला पर्याय मिळू शकेल , तसेच IOCL दाहेज-कोयाली पाइपलाइन प्रकल्प, भरूच भूमिगत गटार आणि सांडपाणी व्यवस्थापन  प्रकल्प  आणि उमल्ला आसा पनेथा रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण यांचा समावेश आहे.