Home Blog Page 1568

परकिय आक्रमणे केवळ दोन सुलतानांपुरते मर्यादित नाही, तर ती सांस्कृतिक आक्रमणे- इतिहास अभ्यासक जयकुमार पाठक

डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आणि इतिहास संस्कृती कट्टा यांच्या वतीने ‘बहमनी  साम्राज्याचा इतिहास’व्याख्यान
पुणे : बहमनी साम्राज्याच्या १९१ वर्षांच्या राजवटीचे दूरगामी परिणाम आपल्यावर झाले. मराठी भाषेत अनेक फारसी शब्द आले. पेशवा, बक्षी, फडणवीस अशी आडनावे आली.  भाषा,वेशभूषा, सैन्य व्यवस्था, शासन व्यवस्था यामध्ये अमुलाग्र बदल झाले. परकिय आक्रमणे हे केवळ २ सुलतानापुरते मर्यादित नव्हते. तर ते खूप मोठे सांस्कृतिक आक्रमण होते त्याचे परिणाम आजही आपण भोगत आहोत, असे मत इतिहास अभ्यासक जयकुमार पाठक यांनी व्यक्त केले. 
डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आणि इतिहास संस्कृती कट्टा यांच्या वतीने ‘बहमनी साम्राज्याचा इतिहास’ या व्याख्यानाचे आयोजन सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे करण्यात आले होते. यावेळी  जयकुमार पाठक बोलत होते. इतिहास अभ्यासक मंदार लवाटे, विद्याचरण पुरंदरे , सचिन जोशी, योगेश गायकर, संदीप परांजपे, महेश फळणसंकर, गोपाळ जोशी, चिंतामणी केळकर, विशाल खुळे,भासमती सोमण यावेळी उपस्थित होते. 

जयकुमार पाठक म्हणाले, बहमनी राजवटीचे वैशिष्ट्य म्हणजे १९१ वर्षे अल्पसंख्याकांनी बहुसंख्यांकावर राज्य केले. त्यांची परंपरा, संस्कृती पूर्ण वेगळी असली तरी राज्यकर्ते यशस्वी ठरले. त्यांची राजवट इतकी प्रदीर्घ काळ टिकण्याचे कारण म्हणजे त्यांनी गाव गाडे व्यवस्थेला कधीही धक्का लावला नाही. 

ते पुढे म्हणाले, अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने बहमनी साम्राज्याची स्थापना केली. तुघलकांच्या काळात जे अत्याचार झाले ते बहमनी राजवटीत झाले नाहीत. बहमनी राजवटीला हिंदू आणि मुस्लिम यांचा पाठिंबा मिळाला. धार्मिक बाबींमध्ये बहमनी सुलतानांनी ढवळाढवळ केली नाही तसेच शियाबुद्धीन अहमद वगळता कोणीही धर्मांतर करायला सक्ती केली नाही. त्यामुळे लोकांचा विश्वास बहमनी राजवटीत होता. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी प्रास्ताविक केले. विद्याचरण पुरंदरे यांनी आभार मानले.

अलाउद्दीन हसन गंगू बहमनी मधील गंगू हे हिंदू नाव – अलाउद्दीन हसन गंगू बहमनी या नावातील गंगू या नावाचे कुतूहल अनेक जणांना आहे. कारण गंगू हे हिंदू नाव आहे. अलाउद्दीन हसन गंगू बहमनी हा गंगरस नावाच्या ब्राह्मणाकडे कामाला होता. त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्याने गंगू हे नाव आपल्या नावास जोडून घेतले. 

सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्रसह देशातील ७५ बँकांच्या डिजिटल बँकींग कार्यप्रणालीचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा दि.16 :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशातील 75 डिजिटल बँकींग युनिटची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. डिजीटल कार्यप्रणालीचे लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामण उपस्थित होत्या. तर पायोनिर टॉवर, सातारा येथून खासदार धनंजय महाडीक, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस. राजीव, अंचल प्रबंधक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजीटल बँकेतील अधिकारी हे ग्राहकांना डिजिटल व्यवहार कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच वित्तीय साक्षरता, डिजीटल व्यवहार, ऑनलाईन फसवणूक होणार नाही याचेही ग्राहकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांच्या शंकांचेही निरासण करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 जिल्हृयातील 75 डिजिटल बँक करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद तसेच सातारा येथील बॅक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे. या डिजिटील बँकींगमुळे आर्थिक सक्षमीकरणाला चालना, डिजिटल बँकीग साक्षरता होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न?मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्तकांनी बदनामी केली, रमेश केरेंचा लाईव्ह आरोप

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबूक लाईव्ह करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.आपण समाजाला कधीही विकले नाही. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तकांनी आपली बदनामी केली. ही बदनामी असह्य झाल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे रमेश केरे यांनी म्हटले आहे.मुंबईत असताना त्यांनी विष प्राशन केले असून त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोशल मीडियात बदनामी सहन करू शकत नाही

रमेश केरे यांनी फेसबूक लाईव्हमध्ये म्हटले आहे की, मला माफ करा. सर्व बांधवांना हा माझा शेवटचा जय शिवराय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, सोशल मीडियात माझी ऑडिओ क्लिप फिरवून माझी बदनामी केली जात आहे.

रमेश केरे म्हणाले, हे माझे शेवटचे फेसबूक लाईव्ह आहे. मी मराठा आरक्षणासाठी प्रमाणिक प्रयत्न केले. याची सरकारनेही दखल घेतली. सरकारने मराठा आरक्षणासाठी उपसमिती गठीत केली. त्याचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांना करण्यास मी विरोध केला. चंद्रकांत पाटलांचे हस्तक विनाकारण माझी बदनामी करत आहेत. ही बदनामी मी सहन करू शकत नाही.

मुख्यमंत्र्यांना आवाहन

रमेश केरे म्हणाले, समाजाचे नुकसान होईल, असे मी कधीही काहीही केलेले नाही. मी कधीही समाजाला विकले नाही. त्यामुळे ज्यांनी माझी बदनामी केली, माज्यावर आरोप केले, त्या सर्वांची चौकशी करावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे माझी मागणी आहे. त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे आरोपी सुटता कामा नये.

मी गेल्यानंतर माझ्या बायकोला, मुलाला सांभाळा, असे आवाहनही रमेश केरे यांनी केले आहे. रमेश केरे म्हणाले, माझी क्लिप कोणी व्हायरल केली हे मुख्यमंत्र्यांनी शोधून काढावे. त्याची सविस्तर चौकशी करावी. समाजाला मी आई मानतो, तिलाच विकण्याचे काम मी कसे करू शकतो.

नेमकी काय आहे ऑडिओ क्लिप

लाईव्ह व्हिडिओमध्ये रमेश केरे ज्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख करत आहेत ती क्लिप सोशल मीडियावर यापूर्वी व्हायरल झाली आहे. यामध्ये युती सरकारच्या काळात मराठा क्रांती मोर्चात फूट पाडण्यासाठी काही समन्वयकांनी पैसे स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातूनच रमेश केरे यांचे नाव समोर आले होते. मात्र, रमेश केरे यांनी आपल्या बदनामीसाठी ही क्लिप व्हायरल करण्यात आल्याचे म्हटले आहे.

३० वर्षे कॉंग्रेस मध्ये निष्ठेने राहिलेले सुधीर कुरुमकर अखेर बाळासाहेबांच्या शिवसेनेत:पुण्यातून कॉंग्रेसला खिंडार पडण्याची चिन्हे

सारसबागे समोर उभारणार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे भवन

पुणे- कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी देशभर भारत जोडो चे अभियान राबवीत असताना पुण्यातून कॉंग्रेस ला भगदाड पद्न्याची चिन्हे दिसत आहेत . सुमारे ३० वर्षे निष्ठेने कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सुधीर कुरुमकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हळू हळू कॉंग्रेसचे अनेक निष्ठावंत देखील आता बदलत्या राजकीय स्थितीत पक्ष बदलण्याच्या मार्गावर जाऊ शकतात असे चित्र आहे. कुरुमकर यांच्या पुढाकाराने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सेना भवन हे त्यांच्या सारसबागे समोरील देवीच्या मंदिराजवळील इमारतीत लवकरच उभारले जाते आहे. सुमारे साडेचार हजार चौरस फुटाचे ऑफिस या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेला प्राप्त होणार आहे.

कुरुमकर यांचे वडील शंकरराव कुरुमकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी कार्यकर्ते म्हणून ओळखले जात , गाडगीळ यांच्या समवेत कॉंग्रेसचे पाईक म्हणून त्यांचे नाव घेतले जात .पर्वती मतदार संघ, कसबा मतदार संघ या सह शहराच्या विविध भागात एक समंजस सहयोगी कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले सुधीर कुरुमकर यांना ३० वर्षात कॉंग्रेस कडून एकदा फक्त पीएमटी सदस्य पदावर काम करण्याची संधी मिळाली होती. पण अन्यत्र कुठेही कधी त्यांचा विचार झाला नव्हता . त्यांच्या अशा पक्ष बदलाने निष्ठावन्तांमधील वर्षानुवर्षे दबलेली खदखद बाहेर पडू लागल्याचे दिसत आहे. सुधीर कुरुमकर आता उपशहर प्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे काम पाहणार आहेत .

साईबाबांच्या सुटकेचा हायकोर्टाचा निर्णय धक्कादायक: सुप्रीम कोर्टाची स्थगिती-उपमुख्यमंत्री

मुंबई-दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांच्या निर्दोष सुटकेचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय धक्कादायक, आश्चर्यकारक होता, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आज सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारमधील काही आमदारांमध्ये मंत्रिपदावरून अस्वस्था असल्याचे वाटते, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्यालाही आमचे सरकार स्थिर असून अजित पवारच अस्वस्थ असल्याची टीका फडणवीसांनी केली.

साईबाबांसंबंधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाने अतिशय आनंदी आहोत. मुळात काल नागपूर खंडपीठान दिलेला निर्णयच हा आश्चर्यजनक व धक्कादायक होता. साईबाबा यांचा नक्षलवाद्यांशी संबंध होता, याबाबतचे अनेक पुरावे आम्ही उच्च न्यायालयात दिले आहे. मात्र, केवळ तांत्रिक मुद्द्यावर साईबाबांना सोडणे चुकीचे होते. ​​​​​​

फडणवीस म्हणाले, नागपूर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात आम्ही तातडीने सुप्रीम कोर्टात गेलो. कोर्टानेही तातडीने बेंच गठीत करत निर्णय दिला. आमचे जे पोलिस नक्षलवाद्यांशी लढले, नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिलासादायक आहे. तर, नागपूर खंडपीठाने काल साईबाबांच्या सुटकेचा दिलेला निर्णय पोलिसांसाठी क्लेशकारक होता.

अजित पवारच अस्वस्थमविआमध्ये मंत्र्यांकडूनच काळाबाजार

तसेच, राज्य सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही होत नाहीये. त्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत म्हटले होते की, शिंदेंनी अनेकांना मंत्रिपदाची ऑफर देऊन आपल्याकडे वळवले होते. त्यामुळे काही जणांमध्ये अस्वस्था असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांतच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार स्थिर आहे. सरकारमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल व पुन्हा निवडून येईल. उलट अजित पवारांमध्येच अस्वस्थता आहे. त्यामुळेच ते असे वक्तव्य करत आहेत.मविआ सरकारमध्ये मंत्रीच रेतीचा काळाबाजार करत होते, असा गंभीर आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीस म्हणाले, मविआ सरकारमध्ये ज्या मंत्र्यांनी तसेच इतरांनी रेतीचा काळाबाजार केला, अशा सर्वांना जेलमध्ये टाकणार आहोत. असा भ्रष्टाचार आमच्या सरकारमध्ये चालणार नाही. आम्हाला भ्रष्टाचाऱ्यांकडून एक पैसाही नको. नियमाप्रमाणे सर्व पैसा सामान्यांसाठी सरकारच्या तिजोरीतच गेला पाहिजे. मविआ काळात ज्यांनी हा भ्रष्टाचार केला, त्यांना मी सोडणार नाही.

अग्नीवीरांच्या वेतन पॅकेजसाठी भारतीय लष्कराने अकरा बँकाबरोबर केला ऐतिहासिक करार

नवी दिल्‍ली, 15 ऑक्‍टोबर 2022 

भारतीय लष्कराने नोंदणीकृत अग्नीवीरांच्या वेतन पॅकेजसाठी तसेच त्यांना बँकिंग सुविधा प्रदान करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि बंधन बँक या 11 बँकांबरोबर सामंजस्य करार केला आहे. लेफ्टनंट जनरल व्ही श्रीहरी, डीजी (एमपी आणि पीएस) आणि बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 14 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय लष्कराचे ऍडज्युटंट जनरल, लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

अग्नीवीर वेतन पॅकेज अंतर्गत असलेली वैशिष्ट्ये आणि लाभ  संरक्षण वेतन पॅकेज सारखेच आहेत. याव्यतिरिक्त, बँकांनी अग्निवीरांना त्यांच्या उद्योजकीय कौशल्यांना चालना देण्यासाठी आणि वाढविण्यासाठी अल्प दराने कर्ज (सॉफ्ट लोन) देऊ केली आहेत. “अग्निपथ योजने” अंतर्गत अग्निवीरांची पहिली तुकडी जानेवारी २०२३ पर्यंत प्रशिक्षण केंद्रांमध्ये सामील होणार आहे.

80 वा इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स कोअर (ईएमई) दिन 15 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा

पुणे, 15 ऑक्‍टोबर 2022

इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स कोअर यांनी  15 ऑक्टोबर 2020 रोजी 80 वा स्थापना दिवस  साजरा केला. भारतीय सैन्यासाठी आवश्यक  असलेल्या उपकरणांच्या विशाल श्रेणीची  देखभाल करण्याची जबाबदारी ईएमई कोअर वर असते. ईएमईच्या स्थापनेपासून म्हणजे 1943 पासून, या दलाने प्रत्येक आघाड्यांवर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे आणि वेगळी  ओळख निर्माण  केली आहे. ईएमई चा हा सात दशकांचा प्रवास,  त्यांच्या नैतिकतेचा मजबूत पाया, तंत्रकुशलता आणि अनुकरणीय व्यावसायिकतेच्या उदाहरणांनी परिपूर्ण आहे.

याप्रसंगी, दक्षिण कमांड मुख्यालयाचे  चीफ ऑफ स्टाफ, लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, यांनी  लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक, एडीसी, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमांड यांच्या वतीने ईएमई कोअर च्या सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांचे,  दर्जेदार कामगिरी कायम राखल्याबद्दल आणि कर्तव्याप्रती असलेल्या समर्पण भावनेबद्दल अभिनंदन केले. यापुढील काळातही अशाच भावनेने आणि निष्ठेने काम सुरू ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषिउद्योगांची महत्वाची भूमिका-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे दि.१५- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविल्याशिवाय त्यांना शहराकडे जाण्यापासून रोखता येणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करताना ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषिउद्योगांची महत्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणे येथे आयोजित कृषिउद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ‘सूत्र २०२२’ परिषदेत ते बोलत होते. कार्यक्रमाला वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थाचे संचालक पार्थ राय, संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संतोष रामगिरे, डॉ.हेमा यादव, डॉ.डी. रवी, अनिल तिवारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, पारंपरिक शेतीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविता येणार नाही. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याला शासन प्रोत्साहन देत आहे. कृषिउद्योग ग्रामीण विकासासाठी महत्वाचे असल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून शेतमालाला बाजार मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

सहकार क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी सहकारी संस्थांना बळकट करावे लागेल. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थानी या क्षेत्रात चांगले काम करणारे विद्यार्थी घडवले. सहकार विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमच्या फार कमी संस्था देशात आहेत. या क्षेत्रातील विविध शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व करण्याची क्षमता या संस्थेत आहे असे त्यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग क्षेत्रात अनेक सुधारणा करण्यात येत असून राज्याला वस्त्रोद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी उद्योजकांच्या सूचनेनुसार लवकरच मुंबईत खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न आहेत, असेही श्री. पाटील म्हणाले.

कार्यक्रमात उपस्थितीत अन्य मान्यवरांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

भाविकांना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुविधा द्या- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि.१५-तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सरकारचे प्राधान्य असून भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी विकास आराखड्याव्यतिरिक्त इतर विकासकामांसाठीचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

पालखीतळ/मार्ग विकास आराखड्यातील पुणे जिल्ह्यातील देहू, आळंदी, भंडारा डोंगर व सुदुंबरे विकास आराखडा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील यांनी तिर्थस्थळाच्या परिसरातील नवीन रस्ते, पुल,भक्तनिवास बांधकाम, घाट बांधकाम, मल:निःसारण, स्वच्छतागृहे आदी कामांचा आढावा घेतला.

श्री. पाटील म्हणाले, तीर्थक्षेत्रांच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून भाविकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत. देहू येथे पूर्ण झालेली कामे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करण्यात यावी. तिर्थस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता राहील आणि भाविकांना असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी व त्यासाठी आवश्यक कामे प्रस्तावित करावी.

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सर्व विभाग आणि पंचायत समित्यांच्या कामगिरीचा अहवाल यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केला. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चांगल्या कामगिरीसाठी आरोग्य विभागाला सर्वोत्कृष्ट विभाग तर मावळला सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे आणि रुग्णवाहिकांसाठी उपकरणे खरेदी करून पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि पथकांकडून तपासणी करून चांगली कामगिरी केली आहे.

पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात ५६० उमेदवारांची निवड

पुणे, दि. १५: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह अंतर्गत नौरोसजी वाडिया कॉलेज पुणे येथे आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी मुलाखतीद्वारे ५६० बेरोजगार उमेदवारांची रोजगारासाठी प्राथमिक निवड केली.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे नौरासजी वाडिया कॉलेज आणि नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, टॅलेंटकॉर्प सोल्युशन प्रा.लि.,पुणे आणि भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्टस असोसिएशन,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

महारोजगार मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार, मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ.मनोहर सानप, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सा. बा. मोहिते आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील उद्योजकांशी समन्वय साधून बेरोजगार उमेदवारांना रोजगारांची संधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यामध्ये ६ हजार ६४६ रिक्त पदांच्या भरतीसाठी ३४ उद्योजकांनी सहभाग नोंदविला.मेळाव्यात १ हजार ११३ उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहिले. त्यापैकी सुमारे ५६० बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला नौरोसजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ.फरहान सुर्वे, नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्य डॉ.वृषाली रणधीर यांचे सहकार्य लाभले.
00

पीएमपीएल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरिया

पुणे-महापालिकेत ३०० कोटीच्या इलेक्ट्रिक बसेसच्या टेंडर वरून उच्च पातळीवरील २ अधिकाऱ्यांत वादंग सुरु असताना आता पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल ) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमपीचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या जागेवर बकोरिया यांची बदली करण्यात आली असून राज्य शासनाने त्याबाबतचे आदेश काढले आहेत. बकोरिया येत्या काही दिवसांत पदभार स्वीकारतील, अशी माहिती पीएमपीकडून देण्यात आली.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय सहाय्य म्हणून लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नेमणूक दिल्ली येथे करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद रिक्त होते. त्यामुळे ओमप्रकाश बकोरिया यांची या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

ओमप्रकाश बकोरिया यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार सांभळला होता. त्यानंतर त्यांची बदली क्रीडा आयुक्त म्हणून करण्यात आली होती. महापालिकेत कार्यरत असताना वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने उपाययोजना करण्यावर भर दिला होता. आळंदी रस्ता आणि नगर रस्ता बीआरटी मार्गाचे कामही त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. तसेच या दोन्ही मार्गांचे लेखापरीक्षणही त्यांनी करून घेतले होते. त्यांच्याकडे पीएमपीएलचा कार्यभार आल्याने पीएमपीच्या कामकाजात लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील गरीब जनतेला सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार सेवा मिळण्‍यासाठी एम्स नागपूरची स्थापना – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर, 15 ऑक्‍टोबर 2022

विदर्भातील गरीब जनतेला सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार सेवा आणि आरोग्य निगडित सोईसुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून याच प्रयत्नातून एम्स नागपूरची स्थापना झालेली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले. 

नागपूरच्या मिहान येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था – एम्सच्या फिजीओलॉजी (शरीरविज्ञान) विभागाद्वारे 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान’ असोसिएशन ऑफ फिजीओलॉजिस्ट ऑफ इंडिया – असोपीआय’  या संघटनेव्दारे आठव्या ‘असोपीकॉन -2022 ’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून  नितीन गडकरी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन  करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, एम्स पटनाचे कार्यकारी संचालक श्री.जी.के.पाल,  किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजचे मुख्य प्राचार्य श्री. नरसिंग वर्मा  आणि परिषदेच्या आयोजन अध्यक्षा डॉ . मृणाल फाटक , एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता उपस्थित होत्या.

नागपूर नजीकचे इतर राज्य सुद्धा उपचार सेवेसाठी नागपूर येथील आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत.  थॅलीसिमिया, सिकलसेल, बोन मॅरो यासारख्या आजारासाठी एम्स नागपूरमध्ये निदान व्हावे आणि याचा लाभ विदर्भातील जनतेला व्हावा यासाठी एम्स नागपूर आग्रही असायला हवे. यकृत, हृदय, किडनी प्रत्यारोपणाची सुविधा एम्स नागपूर मधे उपलब्ध होऊन अवयव प्रत्यारोपण संबधी जनजागृती होणे आवश्यक आहे. या विषयावर विस्तृत संशोधन आणि उत्तम यंत्रणा स्थापित होणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

डॉक्टरांची कमतरता हा एक गंभीर विषय असून देशात वैद्यकीय महविद्यालयाची संख्या वाढली तर या समस्येला आटोक्यात आणता येईल.मागास क्षेत्रात आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे असून गरीब जनतेला माफक दरात ह्या अत्याधुनिक सेवा मिळायला हव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

उत्कृष्ट उपचार सेवेसाठी  नागपूर एम्स सदैव आग्रही असून या परिषदेचा पुरेपूर फायदा विद्यार्थी, तज्ञ यांना होईल असा विश्वास  एम्स नागपूरच्या संचालिका (मेजर जनरल नि.) डॉ. विभा दत्ता यांनी व्यक्त केला. 

असीपीकॉन परिषदेविषयी :

12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान आयोजित आठव्या  ‘असोपीकॉन -2022’ या परिषदेची संकल्पना ‘व्यक्ती, विद्यार्थी, रुग्ण यांच्यासाठी फिजिओलॉजीच्या क्षेत्रातील दृष्टीकोन’  अशी असून परिषदेमध्ये  आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ  फिजिओलॉजीसंदर्भातील विविध शैक्षणिक पैलूंवर मार्गदर्शन करणार आहेत. चार दिवस चालणा-या  या परिषदेदरम्यान  शरीरविज्ञानाशी  संबंधित उपकरणांचे स्टॉल्स देखील लागले आहेत . यामाध्यमातून पदवीधर तसेच पदव्युत्त्तर विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन सादर करण्याकरिता एक मंच उपलब्ध होणार असून सुमारे  100 शोधपत्र  या परिषदेदरम्यान सादर होत आहेत   . परिषदेकरीता  देश विदेशातून सुमारे  300 प्रतिनिधींनी   सहभागी नोंदणी केली असल्याची माहिती आयोजन अध्यक्षा  डॉ. फाटक यांनी  दिली आहे.

पुण्यातील मिळकतकराद्वारे नागरी लुट नको -राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

मुंबई-काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंचं स्वागत केलं. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंतही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. यावेळी पुणेकरांची मिळकत कराद्वारे लुट होऊ नये यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात असे म्पुहटले आहे कि,’पु णे महानगरपालिकेचा १९७० सालचा एक ठराव आहे. ज्यानुसार करपात्र मूल्यात कायद्यातीलतरतुदीप्रमाणे १०% ऐवजी १५% सूट आणि घरमालक स्वतः राहात असेल तर करात ४०% सूट देण्यातयावी असा निर्णय झाला होता आणि इतकी वर्षे त्यानुसार कार्यवाहीही होत होती. पण २०१० नंतर झालेल्या लेखापरीक्षण अहवालात यातील १०% पेक्षा जास्त सूट कायद्याप्रमाणे देता येत नाही आणि यामुळे पुणे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. २०१८ मधे पुन्हा हा आक्षेप घेण्यात आला आणि हा १९७० चा ठराव राज्य सरकारने १ ऑगस्ट २०१९ रोजी विखंडित केला. खरंतर हा ठराव पूर्णपणे विखंडित करण्याची आवश्यकताच नव्हती कारण ४०% जी घरभाडयानुसार
करात सूट देण्यात येत होती त्याबाबत महालेखापाल किंवा स्थानिक निधी लेखापरीक्षण यांच्या अहवालात
१९७० पासून ते २०१८ पर्यंत आक्षेप घेण्यात आलेले नव्हते.
त्यानंतर पुणे मनपाच्या नुकसानीस जबाबदार म्हणून २०१० नंतरच्या आयुक्तांवर कारवाई करावी, २०१०-११ पासून लोकांकडून अतिरिक्त ५% कराची वसुली करावी, २०१९ पासूनची ४०% सवलतीची वसुली करावी असा निर्णय राज्य सरकारने केला. ही रक्कम शेकडो कोटी रुपये असणार आहे. पण यात सर्वसामान्य पुणेकरांचा काय दोष? की त्यांच्यावर हे आर्थिक संकट आणलं जात आहे? संबंधित ठराव पुणे महानगरपालिकेनेचं केला होता त्यानुसारच लोकं कर भरत आले आहेत. ४० वर्षे ही कर आकारणी किंवा करातील सूट कायद्यातील तरतुदीनुसार नाही हे १९७० पासून कुणाच्याही अगदी लेखापरीक्षण करतानाही लक्षात कसं आलं नाही ? मग एकदम ४९ वर्षांनी एखादा ठराव रद्द होतो आणि तो रद्द होण्याच्या आधीपासूनचा वसुलीचा आदेश येतो, हा आदेश देण्यामागचा तर्क तरी नक्की काय ? तत्कालीन महानगरपालिका आयुक्तानी “पूर्वलक्षी प्रभावाने वसुली करण्यास आणि २०१० नंतरच्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्याबाबत मान्यता मिळावी म्हणून राज्य सरकारकडे ०९/०३/२०२१ रोजी प्रस्ताव पाठवला. त्यावर राज्यसरकारने ही सगळी वसुली करण्यास आणि अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्यास १७/०९/२०२१ रोजी मान्यताही दिली. त्यानंतर ही काहीजणांना नोटीसा आल्यानंतर पुणे शहरात जनक्षोभ उसळला आणि या वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. अजून लाखो पुणेकरांना अशा नोटीसा येणं बाकी आहे. त्यापूर्वीच याबाबतचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेणं गरजेचं आहे.

खरंतर कोविडच्या संकटाने लोकांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला हादरे दिले आहेत. अनेकांची कर्जे थकली आहेत, रोजगार गेले आहेत, व्यवसाय बुडले आहेत, रोजचं जीवनमान जगणं अवघड झालं आहे. अशा गंभीर परिस्थितीत सरकारने लोकांना आधार द्यायला हवा. लोकशाहीतील राज्य हे लोकांचं आणि लोकांच्या हितासाठी काम करणारं असावं. अशीच सर्वसामान्य जनतेची सरकारकडून अपेक्षा असते.असेही या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात दोघांमध्ये अर्धातासापेक्षा जास्त चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे गट- भाजप एकत्रित अंधेरी पोटनिवडणुकीला सामोरे जात आहेत. यात भाजपचे मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील काही लोकांनी टॅक्स संदर्भात राज ठाकरेंची भेट घेतली होती, यावर राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत अशी देखील माहिती आहे.

याआधी देखील दोघांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या 3 महिन्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती. तर त्यांनतर राज ठाकरेंनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी जात बाप्पाचे दर्शन घेतले, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीचे सत्र पाहता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोडत इतर सर्व ठाकरेंशी आपले संबंध सुधारण्याचे प्रयत्न करताना दिसून येत आहे.

निधीची अजिबात कमतरता नाही –पालकमंत्री

पुणे दि.१५: जिल्ह्यातील विकासकामे वेगाने मार्गी लावायची असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासकीय निधीसोबतच उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही सहकार्य घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मंजूर निधी वेळेत खर्च होईल याचे नियोजन करण्यात यावे अशा सूचना देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने लंपी आजार नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. शिरूर परिसरात बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीती असल्याने बिबट्या पकडण्यासाठी अधिकचे पिंजरे लावावेत आणि तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक नियोजन करावे.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी निवडक स्थळ घेऊन तेथील विकासाचे नियोजन करावे, जेणेकरून अशा ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू शकेल. आगामी काळातील रोजगार कौशल्याधारित असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात यावा. त्यासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

शासकीय कार्यालयांच्या छतावर सौर पॅनेल बसवावेत
शासकीय कार्यालयांचा वीजेचा खर्च वाचवण्यासाठी आवश्यक वीज सौरऊर्जेवर निर्मित करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या छतावर सौरऊर्जा पॅनेल बसवण्याचा उपक्रम हाती घ्यावा. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते समाज कल्याण विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या सेवा पंधरवडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

अग्रणी बँकेतर्फे बँक मित्र नेमणूक पत्राचे वितरण
अग्रणी बँकेतर्फे जिल्हा परिषदेकडून कामे करण्याचा ठेका मिळालेल्या कंत्राटदारांना कर्ज मंजुरीचे पत्र पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले.

गाव पातळीवर बँकिंगच्या प्राथमिक सेवा पुरविण्याचे काम बँक मित्र यांचेमार्फत केले जात आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात अशा बँक मित्र महिलांना बँक ऑफ महाराष्ट्र कडून नेमणूक पत्राचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा सादर केला. विविध विभागांच्या खातेप्रमुखांनीही आपापल्या विभागांची माहिती सादर केली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी आज सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सर्व व्यापारी बँका तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा रविवारीही त्यासाठी सुरू राहणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
000

कोरोना कालावधीत पोलीस पाटलांनी बजावलेली कामगिरी कौतुकास्पद- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे दि १५: गावची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची आहे. कोरोना कालावधीत पोलीस प्रशासनासोबतच पोलीस पाटलांनी बजावलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत झाली, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील भीमा शंकर हॉलमध्ये पुणे ग्रामीण पोलीस दल स्मृतिचिन्हांचे अनावरण श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, श्रीमती उषा लक्ष्मण आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोना संसर्गाच्या कालावधीत पोलीस प्रशासन, आरोग्य तसेच स्चच्छता कर्मचारी यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पोलीस प्रशासनाला नागरिकांनीही चांगले सहकार्य केले. सर्वांच्या मदतीमुळे संसर्ग रोखण्याबरोबरच अनेकांचे प्राणही वाचले आहेत. कोरोना कालावधीत कार्य करताना काही पोलीस पाटलांना यामध्ये आपले प्राण गमवावे लागले, प्राण अमूल्य आहेत मात्र त्यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात का होईना मदत देण्यात येत आहे. प्रत्येक अडचणीच्या वेळी शासन त्यांच्या कुटुंबासोबत असेल, असे त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनाला गुन्ह्यांचा तपास करताना साक्षीदार अत्यंत महत्त्वाचा आहे. साक्षीदाराच्या साक्षीनेच गुन्ह्याचा तपास उलगडण्यात मदत होते. त्यामुळे आज गौरव करण्यात येत असलेले साक्षीदार नागरिक यांची कामगिरी समाजासाठी महत्त्वाची ठरणार आहे. सर्वसामान्य माणसासाठी पोलीस यंत्रणेला सहकार्य देण्याबाबतचे प्रशिक्षण, तपासातील कौशल्य याबाबत मार्गदर्शन मिळाले तर गुन्ह्यांचा तपास गतीने होईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

श्री. लोहिया म्हणाले, जनतेसोबतचे पोलिसांचे सबंध वाढावेत यासाठी हे स्मृतिचिन्ह तयार करण्यात आले आहे. समाजाची सेवा करताना आपण समाजसेवक आहोत या भावनेने पोलिसांनी काम करावे, तसेच कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर सर्वसामान्यांसाठी करावा, असेही ते म्हणाले.

पोलीस अधीक्षक डॉ.देशमुख म्हणाले, पोलीस व सर्वसामान्य नागरिक यांच्यातील सहकार्याचे नाते स्पष्ट करणारे स्मृतिचिन्ह महत्वाचे आहे. कोरोना कालावधीत पोलीस पाटील यांनी केलेले सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले. पोलीस प्रशासन व नागरिक एकत्रितपणे समाजात चांगले काम करूया, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती उषा लक्ष्मण यांनीही मनोगत व्यक्त केले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरोनाने निधन झालेल्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले तसेच पोलीस तपासात सहकार्य केलेल्या नागरिकांचाही पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिल्पकार गिरीश चरवड व प्रशांत गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस दलातील अधिकारी, पोलीस पाटील, त्यांचे कुटुंबिय, नागरिक उपस्थित होते.