Home Blog Page 1567

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या रमेश केरेंना शरद पवारांना भेटायचे होते ….

मुंबई-रमेश केरे यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत माझ्याकडे अधिक माहिती नाही. ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ते कदाचित औरंगाबादचे आहेत. मागील १० ते १५ दिवसांपूर्वी त्यांनी मला तुम्हाला भेटायचे आहे, चर्चा करायची आहे, अशा आशयाचे दोन ते तीन मेसेजेच केले होते. मात्र त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्याची टोकाची भूमिका घेतली आहे असे समजत आहे. त्याची माहिती मी घेईन, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतले आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. केरे यांच्यावर सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. १० ते १५ दिवसांपूर्वी मला तुम्हाला भेटायचे आहे, असे संदेश त्यांनी मला पाठवले होते, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. ते.

रमेश केरे पाटील हे मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये दोन व्यक्ती बोलत असल्याचे दिसतेय. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी केरे यांनी पैसे घेतले, असा आरोप या ऑडिओ क्लीमध्ये करण्यात आला होता. ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर माझा याच्याशी संबंध नसल्याचे केरे यांनी सांगितले होते. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून ही ऑडिओ क्लीप व्हायरल होत असल्यामुळे माझी बदनामी होत असल्याचे म्हणत रमेश केरे यांनी विष प्राशन केले. मुंबईत असताना त्यांनी विष प्राशन केले असून त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘आईन्स्टाईनच्या मेंदूचा प्रवास’वर डॉ. मुकुंद मोहरीर यांचे व्याख्यान

पुणे : टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशन (टीटीए) व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे स्थानिक केंद्र यांच्यातर्फे ‘आईन्स्टाईनच्या मेंदूचा प्रवास’ या विषयावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मुकुंद मोहरीर यांचे व्याख्यान आयोजिले आहे. येत्या बुधवारी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) सायंकाळी ६.०० वाजता फिरोदिया सभागृह, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे लोकल चॅप्टर, शिवाजीनगर पुणे येथे हे व्याख्यान होणार आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पदवीधर आणि एअरोस्पेसमध्ये पीएचडी असलेले डॉ. मोहरीर नासामधून शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झालेले आहेत. रॉकेट्स, स्पेस शटल्स, क्रूज मिसाईल्स, स्पेस प्लॅन, एअर वेहिकल्स, स्पेस लॅब आदी प्रकल्पांवर काम केले आहे. या व्याख्यानात डॉ. मुकुंद मोहरीर आईन्स्टाईनच्या विविध शोधांचा, त्यांच्या संशोधक वृत्तीचा आढावा घेणार आहेत. 
‘टीटीए’चे अध्यक्ष यशवंत घारपुरे, खजिनदार वसंत शिंदे, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे लोकल चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. एस. बी. झोपे, सचिव इंजि. विपीन मुनोत आदी उपस्थित राहणार आहेत. हे व्याख्यान सर्व विज्ञानप्रेमीसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

अन्यायाविरुद्धची लढाई इतिहासजमा होऊ द्यायची नाही : श्वेता भट्ट

‘जस्टीस फॉर संजीव भट्ट’ विषयावरील व्याख्यानाला प्रतिसाद

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने ‘जस्टीस फॉर संजीव भट्ट ‘ या विषयावर सौ.श्वेता संजीव भट्ट यांचे व्याख्यान रविवार,दि १६ ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ४ वाजता गांधीभवन(कोथरूड, पुणे) येथे आयोजित करण्यात आले होते. पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाला प्रतिसाद दिला.

फॅसिझमविरोधातील संघर्षात कारावास भोगणारे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांचा संघर्ष समजावून घेण्यासाठी ‘फॅसिझम विरोधी जनआंदोलन’ या उपक्रमांतर्गत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.’ संजीव भट्ट यांना अन्याय्य पद्धतीने गजाआड करण्यात आले आहे. त्यांना न्याय मिळविण्यासाठीचे आमचे प्रयत्न चालू राहतील.अन्यायाविरुद्धची ही लढाई इतिहासजमा होऊ द्यायची नाही ‘ , असा संदेश श्वेता भट्ट यांनी या व्याख्यानात दिला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

संजीव भट्ट यांचे पुत्र शंतनू भट्ट,संयोजन समितीचे संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,अप्पा अनारसे,सचिन पांडुळे , कमलाकर शेटे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी म. गांधीजींची प्रतिमा देऊन श्वेता भट्ट यांचा सत्कार करण्यात आला.

श्वेता भट्ट म्हणाल्या, ‘२२ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात संजीव भट्ट यांना दोषी ठरवून जन्मठेप दिली गेली आणि ४ वर्ष ते तुरुंगात आहेत. जामनगर दंगल नियंत्रणात आणताना त्यांनी पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. २००२ च्या दंगलीत त्यांनी अहवाल बनवला होता. हा अहवाल सूडाचे कारण ठरले. आम्ही संवैधानिक मार्गाने लढत आहोत. कोणत्याही कोर्टात जामीन मिळत नाही.कोर्टात केस उभी राहत नाही. न्यायालयाची अशी हतबलता कधी पाहिली नव्हती.

आम्ही फक्त सत्याची लढाई लढत आहोत. संजीव भट्ट त्यांच्या अहवालाबाबत माघार घेत नाहीत, अन्यथा ते सुटले असते. आमचा लढा राजकीय शक्तींशी आहे. संजीव भट्ट यांच्या केसमध्ये निकाल देणाऱ्या न्यायाधीशाला पंधरा दिवसात बढती मिळाली. कोणत्याही केसमध्ये भट्ट यांचे नाव गोवले जात आहे. आता ही लढाई त्यांची एकटयाची राहिली नाही. आपण सर्वजण मिळून ही अन्यायाविरुद्ध ची लढाई लढली पाहिजे. काही जण स्वतःचे इतके फोटो काढतात, पण, संजीव भट्ट यांचा एकही फोटो माध्यमात येऊ देत नाहीत. पण, आपल्याला हा विषय इतिहासजमा होऊ द्यायचा नाही, असेही श्वेता भट्ट यांनी सांगीतले.

श्वेता भट्ट म्हणाल्या, ‘आम्हाला धमक्या येतात. राजकीय शक्तींनी कोणत्याही कारणाविना आमचे घर अर्धे तोडले आहे. आजवरची बचत खर्च करून, आमच्या मिळकती विकून ही न्यायालयीन लढाई लढली जात आहे.आम्हाला अपघात घडविण्याचा प्रयत्न झाला. पण, देशभरातून पाठिंबा देखील मिळत आहे. फोनवरून अनेक जण धीर देतात. लवकरच ‘ जस्टीस फॉर संजीव भट्ट ‘ हे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. आणि या लढाईला व्यापक रुप देण्यात येणार आहे.

शंतनू भट्ट म्हणाले, ‘ सामूहिक प्रयत्नांनी, लढयानेच संजीव भट्ट यांना न्याय मिळू शकतो. एकटयादुकटयाच्या उभे राहण्याने न्याय मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे ‘.अध्यक्षस्थानावरून बोलताना अन्वर राजन म्हणाले, ‘ दडपशाहीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याची गरज आहे.आत्मबलानेच हा लढा लढला पाहिजे. तो यशस्वी होईल, याबद्दल आमच्या मनात शंका नाही ‘.संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. जांबुवंत मनोहर यांनी आभार मानले.डॉ. प्रवीण सप्तर्षी, प्रशांत कोठाडिया, अॅड.संतोष म्हस्के, मिलिंद चंपानेरकर, श्रीकृष्ण बराटे सभागृहात उपस्थित होते.

न केलेल्या गुन्हयासाठी ४ वर्ष गजाआड : संजीव भट्ट प्रकरणाची कथित पार्श्वभूमी

आय आय टी शिक्षण घेऊन आय पी एस झालेले अधिकारी संजीव भट अटकेला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सध्याची राजवट किती खुनशी आहे यासाठीचे हे उदाहरण पुरेसे आहे.जामीन देणे दूरच पण उलट नव्या गुन्ह्यात त्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आला आहे.5 सप्टेंबर 2018 रोजी सीआयडी क्राईम ब्रँचने सकाळी आठ वाजता घरात येऊन संजीव यांना प्रश्न विचारले व अटक करून घेऊन गेले. २३ वर्षांपूर्वी संजीव भट पोलीस उपअधीक्षक असताना त्यांनी एका पोलिस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी तुरुंगात असलेल्या एका कैद्याची सुटका झाल्यावर 12 दिवसाने त्याचा मृत्यू झाला .या कैद्याला संजीव भट यांनी बघितले ही नव्हते. त्या कैद्याच्या मृत्यूबाबत संजीव भट्ट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व त्याबद्दल २३ वर्षांनी अटक करण्यात आली . याबद्दल त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली. या केसबद्दल कागदपत्रे त्या पोलीस स्टेशनला मागितली तर ते माहिती अधिकारात उपलब्ध नाही, असें उत्तर देतात .त्यामुळे अपील ही नीट होत नाही. न्यायालये,सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका सुनावणीलाच येत नाहीत. त्यावर अद्याप युक्तीवादच झालेला नाही. न्यायव्यवस्था किती दबावाखाली आहे, हे दिसून येते.अशी कथित पार्श्वभूमी आहे.

स्टार्टअप यात्रा, सप्ताहातील उत्कृष्ट स्टार्टअप्सना विविध पुरस्कारांचे वितरण

मुंबई, दि. १६ : मागील काही वर्षात आपला देश विकासविषयक विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे. देशामध्ये युवकांमधील नवनवीन संकल्पनांवर आधारीत स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स यांना चालना देण्यात येत आहे. या क्षेत्रात योगदान देत असलेल्या युवक-युवतींनी आपल्या कल्पना, आपले कार्य भारत देशासाठी समर्पित करावे, यामुळे देशातील इतरही युवक-युवतींना पुढे येण्यास मदत होईल. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सच्या विकासासाठी राज्यात विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्यामधून नाविन्यता आणि उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात आलेल्या स्टार्टअप सप्ताह आणि स्टार्टअप यात्रेतील विजेत्यांना आज राजभवन येथे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी़ डॉ. रामास्वामी एन. आदी मान्यवर उपस्थित.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विविध क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. यामध्ये सर्वांचे योगदान आहे. मागील आठ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रात मोठी आघाडी मिळवली आहे. यापुढील काळातही देशाला अधिक प्रगत बनविण्यासाठी सर्वांनी परिश्रम, दृढसंकल्प आणि आत्मविश्वासाने साथ द्यावी. देशातील युवक नवनवीन संकल्पना आणून यात योगदान देत आहेत, स्टार्टअप्स, युनिकॉर्न्सची निर्मिती करीत आहेत. या क्षेत्रामध्येही आता युवकांनी ‘युनिक’ काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. देशात मागील वर्षभरात नव्याने सुरू झालेल्या ४२ युनिकॉर्नपैकी ११ युनिकॉर्न महाराष्ट्रातील आहेत. रजिस्टर्ड स्टार्टअप्समधील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही २०१८ मध्ये राज्याचे स्वतंत्र स्टार्टअप धोरण आखले होते. यामुळे राज्यात स्टार्टअप्सच्या विकासासाठी इकोसिस्टीम तयार झाली. आपण देशाला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये इनोवेशन्सचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, देशामध्ये आता 5G तंत्रज्ञान लागू झाले आहे. हे तंत्रज्ञान आपण काळाच्या खूप आधी स्वीकारले आहे. भविष्यात 6G तंत्रज्ञान स्वीकारणारा आपला भारत देश हा जगातील पहिला देश ठरेल. इंटरनेटचे जाळे आता देशातील गावोगावी आणि दुर्गम भागातही पोहोचले आहे. 5G तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रातील नवनवीन संकल्पना दुर्गम भागापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता येतील. किंबहुना आपत्ती व्यवस्थापनासाठीही नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्स योगदान देऊ शकतील. शासनाच्या विमा विषयक विविध योजना आहेत. याचेही नियोजन करण्यासाठी कल्पक स्टार्टअपचा वापर करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. स्टार्टअपविषयक कोणत्याही उपक्र, योजनेसाठी राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत भरीव अर्थसहाय्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आयटीआयचे आधुनिकीकरण करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी युवकांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य विकासाची सुरुवात केली. राज्यामध्येही त्यानंतर स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु करण्यात आला. स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील अगदी दुर्गम भागातील युवक-युवतींकडूनही स्टार्टअप्स विकसीत केले जात आहेत. नुकत्यात राबविण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेला राज्यातील सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्याकडील नवनवीन संकल्पनांचा शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजामध्ये करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये कालानुरुप बदल करण्यात येत असून त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. आयटीआयमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना उद्योजकतेची जोड देणे, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे याअनुषंगाने बदल करण्यात येतील, असे श्री. लोढा यांनी सांगितले.

डिजीटल भारत, स्टार्टअप भारत आवश्यक – डॉ. माशेलकर

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर म्हणाले की, देशात काही काळापुर्वी वर्षाला एक युनिकॉर्न तयार होत असे, आता आठवड्याला एक युनिकॉर्न तयार होतो आहे. डिजीटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. आता आपण डिजीटल भारत, स्टार्टअप भारत याकडे वळणे गरजेचे आहे. देशातील युनिकॉर्नपैकी ५० टक्के युनिकॉर्न हे टू आणि थ्री टायर शहरांमधील आहेत. अकोला, अमरावती, दापोली यांसारख्या छोट्या शहरांमधूनही आता कल्पक स्टार्टअप्स पुढे येत आहेत. यापुढील काळात आपल्याला अधिक सर्वसमावेशक होऊन स्टार्टअप्सच्या विकासाला चालना देता येईल, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण, निमशहरी भागातील इनोव्हेशन्सना चालना – प्रधान सचिव मनिषा वर्मा

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वर्मा म्हणाल्या की, राज्यात स्टार्टअप्सच्या विकासासाठी इकोसिस्टम तयार करण्यात येत आहे. कौशल्य विद्यापीठांच्या माध्यमातून तसेच इन्कुबेशन सेंटर्समार्फत स्टार्टअप्सना प्रोत्साहन तसेच विविध प्रकारचे सहकार्य देण्यात येत आहे. राज्यातील ग्रामीण, निमशहरी, दुर्गम भागातील नवसंकल्पनांना व्यासपीठ मिळावे, या भागातील स्टार्टअप्सनी पुढे यावे यासाठी स्टार्टअप यात्रासारख्या उपक्रमांचा चांगला उपयोग होत आहे. यामाध्यमातून राज्याच्या सर्वच भागातून स्टार्टअप्स पुढे येत आहेत. तळागाळातील इनोव्हेशन्सना चालना देण्यात येत आहे. कौशल्य विकास विभागामार्फत यापुढील काळातही विविध प्रभावी उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला स्विडनचे संपूर्ण सहकार्य – कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल

स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल म्हणाल्या की, स्विडन हे इनोव्हेशन्समधील जगातील एक प्रमुख आघाडीवरील राष्ट्र आहे. महाराष्ट्रात स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्रामध्ये या क्षेत्राच्या विकासाला खूप मोठा वाव आहे. यासाठी महाराष्ट्राला स्विडनचे संपूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.

       शासनामध्ये होणार नवनवीन संकल्पनांचा वापर

राज्य शासनाच्या विविध विभागात नवनवीन संकल्पनांचा वापर करण्याच्या अनुषंगाने नुकताच स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. यामध्ये देशभरातील स्टार्टअप्सना सहभागी झाले होते. यामधील निवडक उत्कृष्ट स्टार्टअप्सना आज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विजेत्यांना शासनाच्या विविध विभागात काम करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येतील. यामध्ये कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी श्रीनिवास सुब्रमण्यम (अरिती बिझनेस सोल्युशन्स), डॉ. रीचा पवार-नायर (खेतीबडी ॲग्रीटेक), आशिष आनंद (व्हर्ल फिनटेक सोल्युशन्स), शिक्षण आणि कौशल्यविषयक स्टार्टअपसाठी मनु कोहली (कॉगनिबल इंटरनॅशनल), नेहा चौहान (ॲव्हिओट्रॉन एअरोस्पेस), हेमाली तुराखीया (स्यात एंटरप्रायजेस), गव्हर्नन्स क्षेत्रातीस स्टार्टअपसाठी अमन संघवी (एजरक्राफ्ट सोल्युशन्स), जागृती दबस (आर्म्स फॉर एआय), पुनम गुप्ता (ड्रोनामॅप्स), आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअपसाठी सेंथीलकुमार मुरुगसन (सेव्ह मॉम), निशांत काठपाल (अयाती डिव्हायसेस), प्रतिक लोढा (निओ डॉक्स), साईप्रसाद पोयरेकर (पॅसिफाय मेडीकल टेक्नॉलॉजीज), इतर विविध क्षेत्रातील स्टार्टअपसाठी सुनिल जलीहाल (इंडिक इन्स्पिरेशन्स), बिस्वजित सवाईन (कोराशिया टेक्नॉलॉजिज), नितीन देशपांडे (कॅटोनिक इंडिया), स्मार्ट इन्फ्रा आणि मोबिलीटी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी आशिष शर्मा (निओमोशन असिस्टीव्ह सोल्युशन्स), प्रबोध महाजन (लर्न अँड एम्पॉवर), रवी कौशिक (एअर्थ रिसर्च), डॉ. श्रीकांत सोला (डेव्हीक अर्थ), शाश्वतता क्षेत्रातील स्टार्टअपसाठी गिरीधरन सेनेगाई (स्मार्टटेरा अर्बन वॉटर मॅनेजमेंट), निता सोनी (औमसॅट टेक्नॉलॉजीज), डॉ. प्रेरणा गोराडीया (एक्स्पोजोम), सचिन पाटील (कार्बन क्राफ्ट) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्टार्टअप यात्रेमधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान

याशिवाय कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नुकतीच महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा संपन्न झाली. यामधील उत्कृष्ठ स्टार्टअप्सना सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी प्रशांत आखरे, आदित्य दिदवानिया, सरोजिनी फडतरे, शिक्षण क्षेत्रातील स्टार्टअपसाठी योगेश बियानी, प्रबोध महाजन, सिद्धी सावंत, गव्हर्नन्स क्षेत्रातील स्टार्टअपसाठी सारंग वाकोडीकर, यश दारोलकर, पर्यावरण क्षेत्रातील स्टार्टअपसाठी माधुरी कळंबते, ई-कॉमर्स क्षेत्रातील स्टार्टअपसाठी अमोल सोनार, रोबोटीक्स क्षेत्रातील स्टार्टअपसाठी मैथिली कांबळे, स्मार्ट इन्फ्रा आणि मोबिलीटी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी जयेश चौधरी, यश सावंत, काजल राजवैद्य, शाश्वतता क्षेत्रातील स्टार्टअपसाठी समिर बहलकर, पुष्यमित्र जोशी, प्रतिभा मुंडे, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअपसाठी किशोरकुमार ठाकरे, डॉ. सुनिल साहुजी, सोहीली पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथम विजेत्या तसेच सर्वोत्तम महिला स्टार्टअप्सना प्रत्येकी १ लाख रुपयांचे तर द्वीतीय विजेत्या स्टार्टअप्सना ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन सोडत

पुणे दि.१६- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपालिका व कटक मंडळ या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राच्या असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

आपले सरकार सेवा केंद्राच्या असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. एकूण २ हजार ८०२ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत. मुदतीत प्राप्त सर्व ऑनलाईन अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र अर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने सोडत आयोजित केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, सर्व कॅन्टोनमेंट बोर्ड सर्व व नगरपालिकांसाठी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता, पुणे महानगरपालिका १९ ऑक्टोबर सकाळी १० आणि ग्रामीण सर्व तालुक्यांसाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सोडत काढण्यात येईल. सर्व सोडत कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय बी विंग येथील चौथ्या मजल्यावर होईल.

पात्र अर्जदारांची यादी https://aaplesarkarpune.com व https://pune.gov.in या संकेतस्थळाव अपलोड केली आहे. संबंधीत अर्जदार यांनी त्यांच्या क्षेत्रानुसार नमुद केलेल्या दिनांकास व वेळेवर ऑनलाईन सोडतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

अभिनेत्री मनवा नाईकला कॅब चालकाने धमकावले:विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली तातडीने दखल

मुंबई-मराठी चित्रपट निर्मात्या तथा सुप्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक यांना उबेर कॅब चालकाने धमकावल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. स्वतः मनवा नाईकने शनिवारी रात्री एका फेसबुक पोस्टद्वारे या घटनेची आपबिती कथन केली आहे.मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टला उत्तर देत दोषीवर लवकरच कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.

मनवाच्या माहितीनुसार, ‘तिने शनिवारी रात्री घरी जाण्यासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सवरून एक उबेर टॅक्सी बूक केली. त्यानंतर या प्रवासात तिला एकदा नव्हे तर अनेकदा भयंकर प्रसंगांचा सामना करावा लागला. टॅक्सी चालक सातत्याने फोनवर बोलत होता. मनवाने त्याला कार चालवाना फोनवर न बोलण्याची सूचना केली. पण त्यानंतरही त्याने तिचे ऐकले नाही.’मनवा म्हणाली – ‘एवढेच नाही तर पुढे जाऊन त्याने एका रेड सिग्नलचेही उल्लंघन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी अडवली. त्याच्या गाडीचा फोटोही काढला. तेव्हा तो पोलिसांशी हुज्जत घालत होता. मला इच्छित स्थळी लवकर पोहोचायचे होते. त्यामुळे मी पोलिसांना जावू देण्याची विनंती केली. त्यानंतर उबर चालकाने थेट मलाच उद्धटपणे बोलण्यास व धमकावण्यास सुरूवात केली. थांब तुला पाहतोच…असेही तो म्हणाला.’मनवाने सांगितले की, ‘चालकाचे हे वर्तन पाहून मी त्याला गाडी थेट पोलिस स्टेशनमध्ये नेण्याची सूचना केली. पण तो काही ऐकला नाही. तो सतत मला धमकावत होता. हे पाहून मी उबेर सेफ्टीला फोन करुन या प्रकाराची माहिती दिली. पण तेथूनही काही मदत मिळाली नाही.”त्यानंतर ड्रायव्हरने अचानक गाडी चुनाभट्टीच्या दिशेने वळवली आणि कुणाला तरी फोन केला. हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी घाबरले आणि गाडी आहे तिथेच थांबवण्याची सूचना केली. पण ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही. त्यानंतर मी आरडाओरडा करण्यास सुरूवात कली. माझे ओरडणे ऐकून दोन दुचाकीस्वार व ऑटोचालकांनी आमची कार थांबवली व माझी सुटका केली.’

‘ये रिश्‍ता क्‍या कहलाता है’च्या अभिनेत्री वैशाली ठक्करची आत्महत्या

इंदूर-स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये संजनाची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने आत्महत्या केली आहे. वैशालीचा मृतदेह इंदूरच्या साईबाग स्थित तिच्या घरी आढळला. तेजाजी नगर पोलिसांच्या माहितीनुसार, वैसालीने 16 ऑक्टोबर रोजी गळफास घेतला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम एस रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, उज्जैनच्या महिपालपूरची वैशाली ठक्कर गत वर्षभरापासून इंदूरमध्ये राहत होती. तिच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोटही आढळली आहे. सकृतदर्शनी ही घटना प्रेम प्रकरणामुळे घडल्याचा दावा केला जात आहे.

वैशाली ठक्करने इंदूरच्या साईबाग स्थित आपल्या घरात गळफास घेतला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना वैशालीच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट आढळली आहे. पोलिसांनी लव्ह अफेअरमुळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करत आपला तपास सुरू केला आहे. वैशालीच्या सुसाइड नोटमधील तपशील अजून उजेडात आला नाही. त्यामुळे याविषयी विविध अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.

वैशाली ठक्करने स्टार प्लसच्या ये रिश्ता क्या कहलाता है या सिरिअलद्वारे आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला होता. या मालिकेत तिने संजनाची भूमिका साकारली होती. त्यानतंर वैशालीने ये वादा रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क तथा विष व अमृत सारख्या अनेक टीव्ही मालिकांत काम केले.ससुराल सिमर का-2 मध्ये अंजली भारद्वाजचा रोल प्ले करण्यासाठी वैशालीला बेस्ट एक्ट्रेस इन निगेटिव्ह रोलचा गोल्डन पेटल अवॉर्ड मिळाला होता. वैशाली 2019 मध्ये मनमोहिनी मालिकेत शेवटची दिसली होती.

मुंबई महानगराचा संपूर्ण कायापालट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.१५ : मुंबई महानगर क्षेत्रात विविध पायाभूत सुविधांची विकासात्मक कामे प्रगतीपथावर आहेत. ‘स्वच्छ मुंबई-सुंदर मुंबई’ तसेच ‘खड्डेमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई’ करुन संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राचा कायापालट करण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिट – २०२२ चे आज वरळी येथे आयोजन करण्यात आले होते,  मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या परिषदेस  खासदार राहुल शेवाळे आणि डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार कालिदास कोळंबकर, एमएमआरडीएचे आयुक्त  एस.व्ही.आर. श्रीनिवासन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, कन्स्ट्रक्शन टाईम्सचे राममूर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, ज्या देशातील रस्ते चांगले असतील  त्या देशाची वेगळी ओळख निर्माण होते, तेथील विकासाची गती अधिक असते. यामुळे उद्योगधंद्यांना अधिक चालना मिळते. दळणवळण सुलभ झाले तरच सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, त्यासाठी मुंबई शहरातील ४५० कि.मी. रस्ते  सिमेंट काँक्रीट करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्याचे काम नामांकिंत कंपन्यांना देण्यात येणार असून कालमर्यादेपूर्वी आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्यांना कामे दिली जातील. उर्वरित ४५० कि.मी.च्या कामांची निविदा येत्या मार्च महिन्यात काढण्यात येणार आहे. अशाप्रकारे मुंबईतील १०० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आज आयोजित समिटमधून आलेल्या सूचनांचा शासन सकारात्मक विचार करुन या माध्यमातून विकासाची कामे करण्यात येतील. असे सांगून  सध्या ३३७ कि.मी.मेट्रोचे कामे सुरु असून ही संपूर्ण कामे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ही कामे झाल्यानंतर १९ लाख प्रवासी मेट्रोमधून प्रवास करतील, यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक सुरळीत होऊन इंधनाच्या  बचती बरोबरच पर्यावरणात काही प्रमाणात सुधारणा होईल आणि प्रवासी  वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करू शकतील, असेही श्री. शिंदे म्हणाले.

मुंबई महानगरातील कोळी बांधवांसाठी पुनर्विकासाचे  कामे करत असताना मुंबईतील १४३ कोळीवाड्यातील नागरिकांच्या सल्ल्याने विकासाचे कामे करण्यात येणार आहेत. कोळी बांधव हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगारासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

धारावी झोपडपट्टी पुनर्विकासात आलेल्या समस्या काही प्रमाणात सोडवण्यात आल्या आहेत. धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या ठिकाणी साधारणत: 8 लाख नागरिक राहतात. विविध व्यवसाय करतात. त्यांचेही जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. धारावी पुनर्विकासासाठी विविध तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून विकास करण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुंबई- गोवा मार्गाची कामे सुरू आहेत, आता मुंबई -सिंधुदुर्ग रस्त्याचे कामे करण्यात येणार आहेत. यामुळे कोकण पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईच्या विकासात सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून  एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेने समन्वयाने विकासाचे कामे करण्याची आवश्यकता आहे. तसेच सर्व विकासात्मक कामे करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करतानाच शहराच्या विकासात अनेक बांधकाम उद्योजकांचे मोठे योगदान आहे. या उद्योगांना विविध सवलती देण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबई शहरातील नागरिक स्थलांतर होऊ नये, यासाठी मुंबई शहरातच बांधकाम उद्योजकांनी नागरिकांना कमी किमतीत घरे देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

बलात्कार करुन पाच लाखांची खंडणीही घेतली -परमार वर गुन्हा दाखल ,अटक नाही .

पुणे-महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडून पाच लाखांची खंडणी घेतल्या प्रकरणी एका व्यावसायिकाच्या विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.संजय कुंदनलाल परमार (वय ५७, रा. एकबोटे काॅलनी, अंजली अपार्टमेंट, घोरपडे पेठ) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. परमार यांच्या विरोधात खडक पोलिसांनी खंडणी; तसेच बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित महिला आणि आरोपी परमार ओळखीचे आहेत. परमार यांनी महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतली. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.

अपहरण करुन वीस कोटींची खंडणी:गज्या मारणेचा शोध सुरूच :टोळीतील आणखी एक गुंड अटकेत

पुणे-शेअर दलालाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी गुंड गज्या मारणे टोळीतील सराईतास गुन्हे शाखेने पकडले. सिंहगड रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली.मयूर राजेंद्र निवंगुणे (वय २४ रा. वसंत प्लाझा, नऱ्हे) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. शेअर दलालाच्या अपहरण प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मारणे टोळीचा म्होरक्या गजानन उर्फ गज्या मारणेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.शेअर दलालाचे अपहरण करुन वीस कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गज्या मारणेसह साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

खंडणी प्रकरणातील आरोपी निवंगुणे सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलाजवळ येणार असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, सहायक फौजदार शाहीद शेख, हवालदार निलेश शिवतरे, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळपे आदींनी सापळा लावून निवंगुणेला पकडले.

रस्ते वाहतूक सुरक्षा जागृतीसाठी टीव्हीएस युरोग्रीपतर्फे बाईक रॅली

पुणे : हेल्मेट वापरा, वेगाची मर्यादा, वाहतुकीचे नियम पाळा, सहप्रवाशांचा आदर करा, असा नारा देत भूगाव येथील रॉयल लेक बँक्वेट्स ते लवासा सिटी अशी बाईक रॅली निघाली. रस्ते वाहतूक सुरक्षा जागृतीसाठी टीव्हीएस युरोग्रीपतर्फे ‘ब्रंच अँड बाइकिंग’ या बाईक रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये १२५-१५० बाईक रायडर्सनी सहभाग घेतला.
परस्परांत सामाजिक बंध निर्माण व्हावा, बाईक रायडिंगचा सामूहिक आनंद घेता यावा, त्यातून वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती करावी, हा या उपक्रमाच्या आयोजनामागील उद्देश होता. देशभरातील हौशी बाइक रायडर्स उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. महिलांचाही लक्षवेधी सहभाग होता. ‘ब्रंच अँड बाइकिंग’ उपक्रमाची चौथी आवृत्ती पुण्यात पार पडली. 
टीव्हीएस युरोग्रीपचे ट्रेड मार्केटिंग हेड के. कार्तिक यांच्या हस्ते ध्वज दाखवत रॅलीला प्रारंभ झाला. प्रसंगी कुणाल नागपाल, शैलेश गिडिया, राकेश मुथियन, बेरार्ड मस्कारेन्हास आदी उपस्थित होते. यापूर्वी भुवनेश्वर, बंगलोर, चेन्नई येथे हा उपक्रम झाला. रायडर्सच्या सुरक्षेसाठी रॅलीमध्ये मोटारबाइक मेकॅनिक, ऍम्ब्युलन्स, डॉक्टर आणि स्वयंसेवक उपलब्ध होते.
बाइक रायडर स्मिता म्हणाल्या, “गेल्या १० वर्षांपासून बाईक रायडींग करत आहे. माझ्या पतीने प्रोत्साहन दिले. हा अनुभव अतिशय आनंद देणारा आणि अनुभवसंपन्न करणारा आहे. रस्ते सुरक्षा जागृतीसाठी ही रॅली समाजासाठी उपयुक्त ठरेल. प्रत्येकाने सुरक्षित जीवनासाठी वाहतुकीचे नियम पाळायला हवेत.”

“पुणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या बाइकर्सना पाहून आनंद वाटतोय. एकत्रितपणे रस्ते सुरक्षेचा संदेश देत ही रॅली ४५ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. देशभरातील विविध शहरात ‘ब्रंच अँड बाइकिंग’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे उत्साही, साहसी तरुण-तरुणी एकत्रित रायडिंगचा अनुभव घेऊ शकतील.” – के. कार्तिक, प्रमुख, ट्रेड मार्केटिंग, टीव्हीएस युरोग्रीप

‘एमएसएमई’ला जगभरात विस्ताराच्या मोठ्या संधी-हेमंतकुमार तांतिया

‘जीआयबीएफ’तर्फे ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापाराच्या संधी’वर चर्चासत्र
पुणे : “सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना जगभरात विस्ताराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. युरोप, मध्य आशिया व आफ्रिकन खंडातील देशांत भारतीय उद्योजकांना अनेक क्षेत्रात व्यापार वाढीची संधी आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी ‘एमएसएमई’ अंतर्गत व्यवसायाची नोंदणी करावी. ‘एमएसएमई’ला सक्षम करण्यात ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने घेतलेला पुढाकार उल्लखेनीय आहे,” असे मत कस्टम व जीएसटीचे सहआयुक्त हेमंतकुमार तांतिया यांनी व्यक्त केले.
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) व आरडी रियल्टी यांच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापाराच्या संधी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात तांतिया बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील ‘एमसीसीएआय’मध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी कोस्टारिकाचे राजदूत क्लाऊडिओ अनसॉरेना (ऑनलाईन), केनियाचे उच्चायुक्त जारेड मेथिका, मॉरिशसचे कौन्सिल सिवराज नंदलाल, ‘जीआयबीएफ’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, ग्लोबल कोऑर्डिनेटर दीपाली गडकरी, आरडी रिअॕलिटीचे अनुराग कश्यप आदी उपस्थित होते. यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘बिझनेस एक्सलन्स अवार्ड’ प्रदान करण्यात आले.
हेमंतकुमार तांतिया म्हणाले, “डॉ. जितेंद्र जोशी ‘जीआयबीएफ’च्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्याने ‘एमएसएमई’ला उभारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नवउद्योजक व एमएसएमई दोघांनाही याचा फायदा होईल. काही देशांत कच्चा माल मिळतो, तर इतरत्र त्यावर प्रक्रिया होते. पेट्रोल, जेम्स, ज्वेलरी, हिरे, सोने आदी क्षेत्रात भारत उत्पादनाचा स्रोत नाही. मात्र, आपल्याकडे त्यावर प्रक्रिया होत असल्याने मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. अनेक व्यवसायात भारताचे योगदान मोठे आहे. अशा सर्व उद्योगांना हेरून ‘एमएसएमई’मध्ये आणावे.”
जोखीम घेण्याची तयारी असेल, तर व्यवसाय चांगला होऊ शकतो असे सांगत उद्योगाने आत्मविश्वास दुणावल्याचे अनुराग कश्यप यांनी सांगितले. कोस्टारिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध चांगले असून, भारतीयांना आम्ही व्यापाराच्या संधी उपलब्ध करून देऊ असे क्लाउडिओ अनसॉरिनो यांनी नमूद केले.
सिवराज नंदलाल यांनी मॉरिशसचे उद्योग धोरण लवचिक असून, तेथील निसर्गरम्य वातावरणात व्यवसाय आणखी बहरेल असे सांगत भारतातील उद्योगधंद्याना आमंत्रित केले. केनियामध्ये उद्योगांचे नोंदणीकरण आवश्यक आहे. जीएसटी ऐवजी व्हॅट असून, येथे उद्योगांना पोषक वातावरण दिले जात असल्याचे जारेड मेथिका यांनी सांगितले. छोट्या व्यावसायिकांनी ‘एमएसएमई’कडे नोंदणी करून या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोस्टारिका, केनिया, मॉरिशससह युरोपियन व आफ्रिकन देशांत व्यापाराच्या मोठ्या संधी आहेत. या संधींबाबत आपल्या देशातील लघु व मध्यम उद्योगांना माहिती करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून येथील उद्योजकांना जागतिक स्तरावर व्यवसायाचा विस्तार करणे शक्य होईल.- डॉ. जितेंद्र जोशी, संस्थापक अध्यक्ष, जीआयबीएफ

मायरा म्हणतेय… मी जर मोबाईल असते तर…

विविध व्हीडिओजच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणारी, लहान वयातच सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी चिमुरडी मायरा वायकुळ आता मोबाईल पोल्युशनवर मेसेज देण्यासाठी सज्ज झाली आहे. मोबाईल पोल्युशनवर एक अतिशय समर्पक असणारी अशी काळजाचा ठाव घेणारी शॉर्टफिल्म गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. बऱ्यापैकी व्हायरल झालेल्या या शॉर्टफिल्मचं प्रमुख आकर्षण आहे, तिची कन्सेप्ट आणि मायरा वायकुळ. मुख्य म्हणजे ही शॉर्टफिल्म मराठी, हिंदी आणि कन्नड अशा तीन भाषांमध्ये बनवली आहे.

मोबाईलमुळे जग जवळ आलं असलं तरी नात्यांमधला जिव्हाळा कुठेतरी हरवत चालला आहे. त्यामुळे ‘सतर्क व्हा’ असा इशारा करणारी ही फिल्म अगदी रोजच्या आयुष्यात  घडणारा एक प्रसंग घेऊन आली आहे. छोट्या अनूच्या (मायरा वायकुळ) पाचव्या वाढदिवसाचं जंगी आयोजन केलं जातं.  पण वाढदिवसाच्या दिवशी हजर असलेले नातेवाईक मोबाईलमध्ये व्यस्त असतात. एकमेकांच्या समोर असून सुद्धा मोबाइलच्या माध्यमातून कनेक्ट होतात. जेव्हा केक कापण्याची वेळ येते, तेव्हा तर सगळे मोबाईलला समोर धरून तो इव्हेंट शूट  करतात.  मात्र अनूला हे काही नकोय.. तिला मोबाईलच्या माध्यमातून नात्यांशी  जोडायचं नाहीय; तर माणसांच्या सहवासातून नात्यांच्या घट्ट बंधनात गुंफलं जायचंय. तिला मोठ्ठा केक नकोय, मोठाले गिफ्ट नकोयत, तर तिला हवाय  ‘वेळ’.  या वेळेतूनच तिला हरवत चाललेली नाती जोडायची आहेत.  त्या नात्यांमधला जीवंतपणा निर्माण करायचा आहे.  तसं ती आग्रहाने सांगत Disconnect to Reconnect…हा महत्त्वाचा मेसेज  देते.

नात्यांना जोडणाऱ्या या शॉर्टफिल्मची निर्मिती अद्भुत या निर्मिती संस्थेने केली आहे. ही शॉर्टफिल्म कौशिक मराठे यांची असून दिग्दर्शन वैभव पंडित यांनी केलं आहे. शॉर्टफिल्मविषयी वैभव सांगतात, ” तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय.  वेळ वाचत आहे. हे खरंय, पण अशा काही चांगल्या परिणामांचे दुष्परिणामही आहेत. सगळ्यात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे नात्यांमध्ये कृत्रीमता वाढू लागली आहे. माणसं एकमेकांना वेळ देण्यापेक्षा तंत्रज्ञानाला सर्वात जास्त वेळ देत आहेत. तंत्रज्ञानाचे फायदे मानवी नात्यांवर कसा परिणाम करतात हेच तर आम्ही शॉर्टफिल्ममधून मांडण्याचा प्रयत्न  केला आहे.  त्यासाठी  आम्ही मोबाईलचं उदाहरण शॉर्टफिल्ममध्ये दिलं आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण शॉर्टफिल्मद्वारे केलेला हा प्रवास स्वागतार्ह आहे.

 
कौशिक मराठे म्हणतात की, आजकाल सणासमारंभात सगळेच मान खाली घालून मोबाईलमध्ये अडकलेले दिसतात. अशीच परिस्थिती घराघरांतून दिसते. त्यामुळे अजाणतेपणी आलेले हे संकट पुढे नात्यांमध्येआणि किती अंतर वाढवेल, या विचाराने मी डिस्टर्ब झालो. म्हणून हा मेसेज देणारी ही फिल्म आम्हाला करण्याची गरज भासली. मोबाईलच्या माध्यमातून आम्हाला आपल्याला Disconnect to Reconnect…हा महत्त्वाचा मेसेज देणं सोप्पं गेलं आहे. अद्भुत क्रिएटिव्हज आणि मायरा या दोघांनी आमच्या संकल्पनेला  समाधानकारक स्वरूप दिलं आहे.’
 ‘आपल्या कन्व्हींसिंग बोलण्यातून Disconnect to Reconnect हा मोलाचा संदेश देणारी मायराची शॉर्टफिल्म पहिली नसेल तर अवश्य पाहा. ‘तुझी माझी रेशीमगाठ’ मधल्या ‘परी’नंतर मायराची या ‘शॉर्टफिल्म’ मधली ‘अनू’ही सर्वांना खूप आवडतेय आणि वायरल होतेय.

क्षारकर्म  हे आयुर्वेदातील एक वरदान- डॉ.कुणाल कामठे

पुणे –  सुश्रुत ज्यांना फादर ऑफ सर्जरी असे म्हटले जाते, त्यांनी  मूळव्याधीवर क्षारकर्म सारखी उपचार पद्धती सांगितली आहे. जी आज कालबाह्य होताना दिसते. क्षार कर्म ही एक अतिशय सुलभ उपचार पद्धती असून या उपचारांमध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. कुणाल कामठे यांनी केले.

पारुल युनिव्हर्सिटी बडोदा येथे देश पातळीवरील परिषदेमध्ये ‘क्षारकर्म मिनिमल इंवसिव पाईल्स ट्रीटमेंट’ हा शोधनिबंध डॉ. कामठे यांनी सादर केला. डॉ. कामठे हे पुण्यातील एकमेव डॉक्टर होते, ज्यांचा शोध निबंध या परिषदेमध्ये निवडण्यात आला होता.

डॉ. कुणाल कामठे म्हणाले, मूळव्याध हा आजार अतिशय सर्वसामान्य झालेला आहे. प्रत्येक घरामध्ये एखाद्या व्यक्तीस मूळव्याधीचा त्रास होताना दिसतो, परंतु आजही लोकांच्या मनामध्ये अनेक समज आणि गैरसमज दिसून येतात.

मूळव्याधीवर क्षारकर्म उपचार हे कसे साध्य ठरतात व विना उपद्रव कशा पद्धतीने केले जातात, याबद्दलचे संशोधन त्यांनी या परिषदेमध्ये सादर केले. आयुर्वेदशास्त्र अतिशय मोलाचे शास्त्र आहे, यात दिलेली प्रत्येक उपचार पद्धती ही अतिशय रामबाण आहे. परंतु तिचा उपयोग योग्य निदानपूर्वक व आधुनिकीकरणाची जोड देऊन करणे, हे या काळामध्ये अतिशय लाभदायक ठरते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पारुल विद्यापीठ ,बडोदा येथे शृतायु या देशपातळीवरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जामनगर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुकुल पटेल यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी देशाच्या वेगवेगळ्या भागातील तज्ञांनी त्यांचे संशोधन व नाविन्यपूर्वक मूळव्याध भगंदर फिशर यावरील उपचारात्मक पद्धती सादर केल्या गेल्या.

ज्योतिषशास्त्राच्या मदतीने जीवनात आनंद निर्माण करावा: अतुलशास्त्री भगरे

पुणे :

बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फल ज्योतिष अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित ज्योतिर्विदांचा मेळावा रविवारी उत्साहात पार पडला.कै पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.गो.ल. आपटे सभागृह(आपटे रस्ता) अथर्व हॉल मध्ये रविवार,दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ८ या दरम्यान हा मेळावा पार पडला.

अतुलशास्त्री भगरे,प्रतिभा शाहू मोडक, नंदकिशोर जकातदार,चंद्रकांत शेवाळे, विजय जकातदार यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले.अनिल चांदवडकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला, तर डॉ प्रसन्न मुळ्ये यांचा षष्टब्दिपूर्ती निमित्त गौरव करण्यात आला. मंडळाच्या वतीने नंदकिशोर जकातदार,विजय जकातदार, अॅड.मालती शर्मा,सौ नयना जकातदार,वरुण जकातदार मेघश्याम पाठक,आनंदकुमार कुलकर्णी यांनी मेळाव्याचे संयोजन केले.ऍड.मालती शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. सतीश जकातदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विवाहयोग,संतती योग,शिक्षणयोग,नोकरी व्यवसाय योग,परदेशगमन,कुंडलीवरून आरोग्य मार्गदर्शन,वास्तुशास्त्र,रुलिंग प्लॅनेट,हस्तलक्षण,भावेश विचार,उपासना महत्व इत्यादी विषयावर नामवंत ज्योतिर्विदांची व्याख्याने,संशोधनात्मक प्रबंधांची मांडणी,पुस्तक प्रदर्शन यांचे आयोजन या मेळाव्यात करण्यात आले होते.

उद्घाटन सत्रात बोलताना अतुलशास्त्री भगरे म्हणाले, ‘ कै. श्रीकृष्ण जकातदार यांच्या ज्योतिषशास्त्राच्या पोस्टल कोर्समुळे गावोगावी ज्योतिषशास्त्राचा प्रसार झाला.पुण्याईच्या मागे न लागता प्राणीमात्रांची काळजी घेण्याचा जो संदेश एकनाथ महाराजांनी दिला, तो आदर्श ज्योतिषांनी डोळ्यासमोर ठेवावा, आणि सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करावा. नवनवीन गोष्टी ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी शिकाव्यात, ज्ञान अद्ययावत ठेवावे, त्यासाठी असे मेळावे उपयुक्त ठरतात. कै. श्रीकृष्ण जकातदार यांच्या स्मृती जपणारा हा उपक्रम अनोखा आहे.

प्रतिभा मोडक म्हणाल्या, ‘ जीवन क्षणभंगुर आहे, हे कळाले की अध्यात्म कळते.

नंदकिशोर जकातदार म्हणाले,’विरोध , टीका सहन करण्याची तयारी भविष्यकाराने ठेवली पाहिजे. फक्त ब्राहमण समाजात ज्योतिषी निर्माण होतात असे नाही, तर बहुजन समाजातही ज्योतिषी निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी मेळाव्याचे प्रयोजन आहे .
ज्योतिष हे गणितशास्त्र आहे. त्यात भावना ओताव्या लागतात.त्या माध्यमातून लोकसेवा केली पाहिजे.ज्योतिष सांगणे हा व्यवसाय आहे, हे मान्य केले पाहिजे.केवळ क्लासेस न घेता भविष्यकाळ घडवला पाहिजे.स्वतःला मोठा न करता, भविष्य शास्त्राला मोठे केले पाहिजे.

विजय जकातदार म्हणाले, ‘ कै. श्रीकृष्ण जकातदार यांनी कृतीतून संस्कार दिले. ज्योतिषांनी मानमरातब किती मिळवले, यापेक्षा अश्रू किती पुसले हे महत्वाचे आहे, ही त्यांची धारणा होती. आपल्याकडे आलेल्या जातकाला ऊर्जा देण्याचे काम ज्योतिषांनी करावे.’

‘महिला ज्योतिर्विद या क्षेत्रात निर्माण झाल्या, हे श्रेय कै. श्रीकृष्ण जकातदार यांचे आहे, असे चंद्रकांत शेवाळे यांनी सांगीतले. ज्योतिष शास्त्र हे जीवन सुखी करण्यासाठी उपयोगात आणले पाहिजे, असेही ते म्हणाले.