पुण्यातील गणेश मंडळांचा पुढाकार – कातकरी लोकांना दिवाळी फराळ, आकाशकंदील
पुणे ः दिवाळीचा फराळ व फटाक्यांची आतीषबाजी हे शब्द कोणाच्या तरी तोंडून ऐकणारी कातकरी समाजाची वस्ती आकाशकंदील, फराळ, फटाके आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. पुण्यापासून अगदी मोजक्या अंतरावर असलेल्या डोंगर द-यामध्ये राहणारे कातकरी समाजातील शेतमजूर दिवाळीनिमित्त आयोजित आनंदोत्सवात सहभागी झाले होते. चिमुकल्यांनी ही फटाके उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला.
गुरुवार पेठेतील वीर शिवराय तरुण मंडळ आणि येरवड्यातील नवज्योत मित्र मंडळ, बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे सातारा रस्त्यावरील कापूरहोळ जवळ चेलाडी या आदिवासी पाड्यावर ५० कुटुंबाला दिवाळी फराळ व आकाशकंदिल देण्यात आले. यावेळी वीर शिवराय मंडळाचे अध्यक्ष किरण सोनिवाल, मोहित झांजले, चैतन्य सिन्नरकर, नवज्योत मंडळाचे अमित जाधव, साईनाथ मंडळाचे पियुष शहा उपस्थित होते.
डोंगरावरील या वस्तीमध्ये प्रत्येक घरात जावून कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळ, उटणे, पणत्या, आकाशकंदील देऊन कुटुंबांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रत्येक घराच्या दरवाजामध्ये आकाशकंदील लावत त्यांना दिवाळीचे महत्त्व सांगितले. चिमुकल्यांनी फटाके उडविण्यासोबतच फराळाचे पदार्थ खाण्याचा आनंदही लुटला
कातकरी वस्तीवर दिवाळीचा आनंद
भारताचा पाक वर शानदार विजय , कोहली-हार्दिक विजयाचे शिल्पकार
टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामना खूपच रोमांचक झाला. 160 धावांचा पाठलाग करताना भारताला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. विराटने नो बॉलवर षटकार ठोकला. यानंतर तो फ्री हिटवर बोल्ड झाला, पण त्यावरही त्याने 3 धावा घेतल्या.
त्यानंतर डीके बाोल्ड पडला. 2 चेंडूत 2 धावा हव्या होत्या. नवाजने वाईड टाकला आणि अखेरच्या चेंडूवर अश्विनने विजय मिळवून दिला. विराट कोहलीने नाबाद 82 धावा केल्या.
सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा 2021 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप ठरले होते. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने राहुलला 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 2021 च्या T-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 0 धावांवर बाद झालेला कर्णधार रोहित शर्माही फ्लॉप ठरला होता. तो 4 धावा करून हारिस राउफचा बळी पडला.
टीम इंडियाला सूर्यकुमार यादवकडून खूप आशा होत्या. त्यानेही चांगली सुरुवात केली, मात्र 10 चेंडूत 15 धावा केल्यानंतर तो हारिस राउफच्या चेंडूवर बाद झाला. हारिस राउफ बॅक ऑफ लेन्थ बॉल मिडल स्टंपवर टाकतो. सूर्याला स्लिपवर वरचा कट करायचा होता, पण चेंडूचा वेग इतका होता की बॅटच्या एजला स्पर्श करणारा चेंडू यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानच्या ग्लोव्हजमध्ये गेला.
रोहितने टॉस जिंकला, फायदा झाला, वस्तुस्थितीही अनुकूल होती
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी कर्णधार रोहितचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. पहिला विश्वचषक खेळणाऱ्या अर्शदीपने सलामीवीर बाबर आणि रिझवानसह पाकिस्तानच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
हार्दिक पांड्यानेही 3 बळी घेतले. याआधी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 6 सामने झाले आहेत. यापैकी भारताने तीन वेळा नाणेफेक जिंकली होती आणि तिन्ही सामने आम्ही जिंकले.
इफ्तिकार-मसूद यांनी पाकिस्तानचा डाव सावरला
पाकिस्तानकडून इफ्तिकार अहमदने 51 धावा केल्या. शान मसूदनेही 52 धावा केल्या. सलामीवीर लवकर गमावलेल्या पाकिस्तानी संघाला या दोघांनी सांभाळले. तसेच 50 धावांची भागीदारी केली.
इफ्तिकारलाही नशिबाची साथ लाभली. त्याचा एक अवघड झेल शमीच्या चेंडूवर अश्विनने हुकवला. पाकिस्तानच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन
राजकारणी खेळाच्या क्षेत्रात का ? पवारांनी दिलेले स्पष्टीकरण
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत युती करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अमोल काळे यांना निवडून आणले. शरद पवार यांच्या या खेळीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आज स्वत: शरद पवार यांनी आपल्या या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
आम्ही खेळात पडत नाही
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, आशिष शेलार जवळपास ५ वर्षांपुर्वीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचे नसते. खेळाडूंना प्रोत्साहित करणे, त्यांना खेळासाठी विविध सुविधा देणे, हे आमचे काम आहे. त्यांच्या खेळात आम्ही कधी पडत नाहीत. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासारखे उभं आयुष्य क्रिकेटला योगदान दिलेल्या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग नवीन खेळाडू निवडणे आणि त्यांना तयार करणे यासाठी व्हायला हवा. हे काम त्यांचं आहे. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचे काम जमणार नाही. ते काम आमचं आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे काम त्यांचे आहे.
लोकांना ‘हे’ माहितच नाही
शरद पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मी क्रिकेटशी संबंधित संस्थांमध्ये आहे. त्यामध्ये मीच काय इतरही राजकारणी कधी राजकारण आणत नाहीत. मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर राहत. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच अरुण जेटली दिल्लीचे तर आता माहिती प्रसारण मंत्री असलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असं आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केलं. तेव्हा लोकांना ते लक्षातही आल नव्हत. फक्त आताच याची चर्चा होत आहे. मात्र, याठिकाणी आम्ही कधीही राजकारण आणत नाही.
यंदाचे वर्ष चांगले जाईल
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. यावरही शरद पवारांनी भाष्य केले. शरद पवार म्हणाले, परतीच्या पावसाने नुकसान झाले असले तरी यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे आताचे पिक गेले तरी पुढील दोन पिके चांगली येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदाच वर्षे चांगले जाईल, अशी आशा आहे.
‘ ये दौलत भी ले लो ”दिल ढुंढता है ‘चुपके , चुपके रातदिन… अप्रतिम संगीतातून संस्मरणीय झाली ‘सुबह – ए-समर्पण ‘
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला शनीवारी चांगला प्रतिसाद मिळाला. शनीवार, २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम झाला. मेहदी हसन, अनुप जलोटा, जगजित सिंग यांनी गायलेल्या रचनांचा ‘ सुबह- ए-समर्पण ‘ हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
व्ही.पी.म्युझिक अॅकेडमी निर्मित या कार्यक्रमात विवेक पांडे, प्रिशिता पांडे यांनी भजन, गरबा गीते, गझलांचे बहारदार सादरीकरण केले. प्रकाश सुतार ( कीबोर्ड ), सारंग भांडवलकर ( तबला ), आसिफ खान उस्मान इनामदार ( संगीतवाद्य ) , अतुल गद्रे (गिटार ) यांनी साथसंगत केली.
‘ मैलि चादर ओढ के कैसे ‘ या भजनगुरू हरी ओम शरण यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. अनुप जलोटा यांच्या ‘ऐसी लागी लगन ‘,च्या समर्पित भजनांनी दिवाळीची पहाट भक्ती रंगांने उजळत गेली. अनुप जलोटा यांनी लोकप्रिय केलेली ‘ रंग दे चुनरिया ‘,’चदरिया झिनी, रे झिनी ‘ अशी भजने रसिक प्रेक्षकांची दाद मिळवून गेली.
‘ ये दौलत भी ले लो ‘ , ‘फिर छिडी बात, रात फुलों की ‘ , ‘ चुपके , चुपके रातदिन ‘ , ‘दिल ढुंढता है ‘, ‘ आज जाने की जिद ना करो ‘ सारख्या काही रसिकप्रिय गझलाही सादर करण्यात आल्या.मेहदी हसन यांची ‘रंजीश ही सही ‘ गझल वाहवा मिळवून गेली.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४४ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. अपर्णा दास यांनी आभार मानले.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल राजन लाखे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
पुणे :
साहित्य व साहित्यिक चळवळ क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांना मातंग साहित्य परिषद तर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते ‘विशेष साहित्य सन्मान ‘ प्रदान करण्यात आला. राजभवन मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय समरसता मंडळाचे सदस्य रमेश पांडव, ह.भ.प.शिवाजीराव मोरे,डॉ.धनंजय भिसे, डॉ.अंबादास सगट उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणा-या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.पिंपरी चिंचवड मधून लाखे यांना हा मान मिळाला.
राजन लाखे यांचे पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिक वाटचालीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी काव्यपहाट, साहित्यिकांची आरोग्य तपासणी हे कार्यक्रम प्रथमच सुरु केले तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनातील ‘कविकट्टा’ या व्यासपीठावर १०२४ कवींना स्थान देऊन साहित्य क्षेत्रात विक्रम केला. पूर्णपणे साहित्याला वाहिलेला ‘अक्षरवेध’ हा दिवाळी अंक सुरु केला. कोरोनाच्या काळात म.सा.प च्या माध्यमातून सर्वाधिक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राच्या नकाशावर पिंपरी चिंचवडला प्रथम क्रमांकावर आणले. याचे फलित म्हणजे मसाप पिंपरी चिंचवड शाखेला ‘सर्वोत्कृष्ठ शाखा पुरस्कार’ दुस-यांदा प्राप्त झाला.
कवयित्री शांता शेळके यांचा जन्मशताब्दी महोत्सव , १०० मान्यवर, १०० आठवणी, १०० कविता याद्वारे मानवंदना देऊन साहित्य क्षेत्रात यापूर्वी कधीही न झालेला असा अभिनव तसेच ऐतिहासिक उपक्रम ते राबवित असून हा उपक्रम सोशल मिडिया च्या माध्यमातून जगभरातील तमाम रसिकांपर्यंत पोहचवत आहेत. या उपक्रमाची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस ‘ने दखल घेतली आहे.
शाही अभ्यंगस्नान, नवे कपडे, फराळाच्याआस्वादाने ‘त्यांचा’ दीपोत्सव आनंदमय ! माजी उपमहापौर आबा बागुल मित्र परिवाराचा उपक्रम
पुणे : रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट, सुगंधी तेल-उटण्यांचा सुवास, औक्षणाचे ताट, गोडाचा घास आणि त्यावर चढलेला नव्या कपड्यांचा साज या साऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव मिळाल्याने ‘त्यांचा’ही दीपोत्सव आनंदमय झाला. शाही अभ्यंगस्नान आणि मनसोक्त फराळाचा आनंद घेताना ही मुले भारावून गेली.
निमित्त होते, पदपथ-सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल आणि मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या ‘शाही अभ्यंगस्नाना’चे!
नामदार गोखले रस्त्यावरील गुडलक चौकात झालेल्या या अनोख्या उपक्रमाने पदपथावर राहणाऱ्या मुलांमुलींची शनिवारची सकाळ सुखद ठरली. खेळण्या-बागडण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. ना दसरा ना दिवाळी असे खडतर जीवन जगणाऱ्या या मुलांना आपल्याप्रमाणेच दिवाळीचा आनंद लुटता यावा, यासाठी बागुल पिता-पुत्र आणि मित्रपरिवाराने गेल्या तेरा वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. शाही अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर या आनंदमय सोहळ्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
प्रारंभी कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वछता करून येथे रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. त्यावर पाट मांडून प्रत्येक मुलाला उटणे लावून स्नान घालण्यात आले. त्यानंतर औक्षण करून, नवे कपडे आणि फराळ देण्यात आला. आबा बागुल, जयश्री बागुल, अमित बागुल, हर्षदा बागुल,अभिषेक बागुल आणि कार्यकर्त्याकडून या मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून मंगलमय वातारणात झालेला अभ्यंगस्नानाचा हा सोहळा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता आणि नागरिकही त्यात सहभागी होत होते. या उपक्रमात विलास रत्नपारखी ,महेश ढवळे,इम्तियाज तांबोळी, सागर आरोळे, धनंजय कांबळे, योगेश निकाळजे,निलेश कदम, राहुल तौर, बाबासाहेब पोळके, संतोष पवार, समीर शिंदे, निखिल सोनावणे, किशोर भालेराव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यंदाच्या इफ्फीमध्ये धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे हा मुख्य प्रवाहातील आणि फ्रेम, शेर शिवराज, एकदा काय झालं हे फिचर फिल्म तर रेखा या मराठी नॉन फिचर फिल्मचा समावेश
नवी दिल्ली- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची घोषणा इंडियन पॅनोरमाने केली आहे. गोव्यामध्ये येत्या 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या काळात होत असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) हे निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीनं (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) इंडियन पॅनोरमाचं आयोजन केलं जातं. इंडियन पॅनोरमाअंतर्गत आखलेल्या नियमांमध्ये नमूद अटी आणि कार्यपद्धतीनुसार सिनेमॅटिक, थिमॅटिक आणि सौंदर्यशास्त्रीय पातळीवर उत्कृष्ट असतील अशा फिचर नॉन फिचर फिल्म्सची निवड करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे.
‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड संपूर्ण भारतभरतातल्या सिनेजगतातील नामवंत व्यक्तींच्या मार्फत केली जाते. यात फिचर फिल्म्ससाठी एकूण बारा सदस्य तर नॉन-फिचर फिल्म्ससाठी सहा सदस्य ज्युरी म्हणून काम पाहतात. हे सर्व ज्युरी, सदस्य आणि संबंधित अध्यक्षांच्या नेतृत्वातील निवड समिती चित्रपटांची निवड करते. आपल्या वैयक्तिक ज्ञान कौशल्याचा वापर करून, ही नामवंत व्यक्तिमत्वांची निवड समिती एकसमान योगदान देत, एकमतानं चित्रपटांची निवड करते. त्यातूनच इंडिअन पॅनोरमा अंतर्गतच्या विविध वर्गवारीत सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली जाते.
फिचर फिल्म्स : यंदाच्या बारा सदस्यांचा समावेश असलेल्या या फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व, निवड समितीचे अध्यक्ष, प्रख्यात दिग्दर्शक आणि संपादक श्री विनोद गणात्रा यांनी केलं. या बारा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसंच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे हे सगळे ज्युरी सदस्य आपल्या व्यवसायातल्या बहुविविधतेचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीमत्वं आहेत.
श्री. ए. कार्तिक राजा; सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार श्री. आनंद ज्योती; संगीतकार, लेखक आणि चित्रपट निर्मातेश्रीमती डॉ. अनुराधा सिंह; चित्रपट निर्मात्या आणि संपादकश्री. अशोक कश्यप; निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार श्री एनुमुला प्रेमराज; दिग्दर्शक आणि पटकथालेखकश्रीमती गीता एम गुरप्पा; ध्वनी संयोजिक / साऊंड इंजिनीअरश्री. इमो सिंग; निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकश्री. जुगल देबाटा; निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार श्री. सैलेश दवे; निर्माताश्री. शिबू जी सुशेलान; निर्माताश्री. व्ही. एन. आदित्य; निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखकश्री. विष्णू शर्मा; लेखक आणि चित्रपट समीक्षक
53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातल्या फिचर फिल्म या वर्गवारीकरता एकूण 354 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 25 चित्रपटांची निवड करण्यात आली. निवडलेले हे 25 चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या बहुरंगी आणि विविधतेचे दर्शन घडवणारे चित्रपट आहेत.
इंडियन पॅनोरमा 2022 अंतर्गत फिचर फिल्मस वर्गवारीसाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे :
| S.No. | Title of the Film | Language | Director |
| Mahananda | Bengali | Arindam Sil | |
| Three of Us | Hindi | Avinash Arun Dhaware | |
| The Storyteller | Hindi | Ananth Narayan Mahadevan | |
| Major | Hindi | Sashi Kiran Tikka | |
| Siya | Hindi | Manish Mundra | |
| Dhabari Quruvi | Irula | Priyanandanan | |
| Hadinelentu | Kannada | Prithvi Konanur | |
| Naanu Kusuma | Kannada | Krishne Gowda | |
| Lotus Blooms | Maithili | Pratik Sharma | |
| Ariyippu | Malayalam | Mahesh Narayanan | |
| Saudi Vellakka CC.225/2009 | Malayalam | Tharun Moorthy | |
| Frame | Marathi | Vikram Patwardhan | |
| Sher Shivraj | Marathi | Digpal Lanjekar | |
| Ekda Kaay Zala | Marathi | Dr. Saleel Shrinivas Kulkarni | |
| Pratikshya | Oriya | Anupam Patnaik | |
| Kurangu Pedal | Tamil | Kamalakannan S | |
| Kida | Tamil | RA.Venkat | |
| Jai Bhim | Tamil | Tha. Se. Gnanavel | |
| Cinema Bandi | Telugu | Kandregula Praveen | |
| Kudhiram Bose | Telugu | Vidya Sagar Raju |
Mainstream Cinema Section
| The Kashmir Files | Hindi | Vivek Ranjan Agnihotri | |
| RRR (Roudram Ranam Rudhiram) | Telugu | S S Rajamouli | |
| Tonic | Bengali | Avijit Sen | |
| Akhanda | Telugu | Boyapati Srinivasa Rao | |
| Dharmveer….Mukkam Post Thane | Marathi | Pravin Vitthal Tarde |
इंडियन पॅनोरमा 2022 च्या फिचर फिल्म्स या वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून निवडसमितीनं श्री पृथ्वी कोनानूर दिग्दर्शित ‘हादीनेलेंतू’ या कन्नड चित्रपटाची एकमतानं निवड केली आहे.
नॉन फिचर फिल्म्स
यंदाच्या सहा सदस्यांचा समावेश असलेल्या नॉन फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व, या निवडसमीतीचे अध्यक्ष प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते, श्री ओइनम डोरेन यांनी केलं. या सहा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसंच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे हे सगळे ज्युरी सदस्य आपल्या व्यवसायातल्या बहुविविधतेचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीमत्वं आहेत :
श्री चंद्रशेखर ए; चित्रपट समीक्षक, पत्रकार आणि माध्यम शिक्षणतज्ञश्री हरीश भीमानी, चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, निवेदक आणि, अभिनेताश्री मनीष सैनी; चित्रपट निर्माते, लेखक आणि संपादकश्री. पी. उमेश नाईक; चित्रपट निर्माते आणि पत्रकारश्री राकेश मित्तल; चित्रपट समीक्षक, पत्रकार आणि लेखकश्री संस्कार देसाई; चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, शिक्षणतज्ज्ञ
53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या नॉन फिचर फिल्म या वर्गवारीकरता एकूण 242 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 20 चित्रपटांची निवड करण्यात आली. निवडलेल्या या 20 चित्रपटांमधून भारतातील उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या एखादा विषयाचे ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करणे, त्या त्या विषयांसाठी संशोधन करणे आणि त्याचवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासंबंधीच्या क्षमतेचे दर्शन घडते.
इंडियन पॅनोरमा 2022 अंतर्गत नॉन फिचर फिल्म्स वर्गवारीत निवड झालेल्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे:
| S.No. | Title of the Film | Language | Director |
| Pataal-Tee | Bhotiya | Mukund Narayan &Santosh Singh | |
| Taangh | English | Bani Singh | |
| Ayushman | English | Jacob Varghese | |
| Other Ray: Art of Satyajit Ray | English | Jaydip Mukherjee | |
| Gurujana | English | Sudipto Sen | |
| Hatibondhu | English | Kripal Kalita | |
| Clinton | English | Prithviraj Das Gupta | |
| The Show Must Go On | English | Divya Cowasji | |
| Khajuraho, Anand Aur Mukti | Hindi | Ramji Om & Deepika Kothari | |
| Vibhajan Ki Vibhishka Unkahi Kahaniyan | Hindi | Hitesh Shankar | |
| Fatima | Hindi | Sourabh Kanti Dutta | |
| Chhu Med Na Yul Med | Hindi | Munmun Dhalaria | |
| Before I Die | Hindi | Nakul Dev | |
| Madhyantara | Kannada | Basti Dinesh Shenoy | |
| Wagro | Konkani | Sainath S Uskaikar | |
| Veetilekku | Malayalam | Akhil Dev M | |
| Beyond Blast | Manipuri | Saikhom Ratan | |
| Rekha | Marathi | Shekhar Bapu Rankhambe | |
| Yaanam | Sanskrit | Vinod Mankara | |
| Little Wings | Tamil | Naveenkumar Muthaiah |
इंडियन पॅनोरमा 2022 च्या नॉन फिचर फिल्म्स या वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून निवडसमितीनं कुमारी दिव्या कोवासजी दिग्दर्शित ‘द शो मस्ट गो ऑन’ या इंग्रजी चित्रपटाची एकमतानं निवड केली आहे.
भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशासह भारतीय चित्रपटांना चालना देण्याच्या उद्देशानं, 1978 भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गतच (इफ्फी) इंडियन पॅनोरमा हा विभाग सुरू करण्यात आला होता. त्या त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट दाखवण्यासाठी इंडियन पॅनोरमा वचनबद्ध आहे, आणि इंडियन पॅनोरमाच्या स्थापनेपासून हे काम अव्याहतपणे सुरू आहे. इंडियन पॅनोरमा विभागासाठी चित्रपट निवडीमागे चित्रपट कलेच्या प्रसाराचा मुख्य उद्देश आहे, त्यामुळेच या विभागा अंतर्गत निवडलेले चित्रपट, भारत आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, द्विपक्षीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांच्यावेळी आयोजित भारतीय चित्रपट सप्ताहात, तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या अधिकृत चौकटीपलिकडे आयोजित होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सव आणि भारतातील विशेष भारतीय पॅनोरमा महोत्सवांमध्ये ना-नफा तत्वावर दाखवले जातात.
मुंबईतील रोजगार मेळाव्यात 395 उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियुक्तीचे मिळाले पत्र
मुंबई-भारत सरकारने 10 लाख युवकांना भारतीय नागरी सेवांमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्याने झाला. या मोहिमेच्या सुरुवातीलाच भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये 75,000 युवकांची भरती करण्यात आली आहे. या संदर्भात पंतप्रधानांनी मनुष्य बळ विकास खात्याचा आढावा घेतल्यानंतर देशभरामध्ये भरती मोहीम राबविण्याची घोषणा पंतप्रधानांनी 14 जून 2022 रोजी केली होती. या घोषणेनुसार आगामी एक वर्षाच्या आत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती सरकारकडून केली जाणार आहे. ही भरती मंत्रालये आणि विभाग करणार आहेत किंवा यूपीएससी, एसएससी आणि रेल्वे भर्ती मंडळ यांसारख्या भरती संस्थांद्वारे केली जात आहेत. जलद भरतीसाठी निवड प्रक्रिया सरलीकृत आणि तंत्रज्ञान-सक्षम करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमात रोजगार मेळा सुरू केला आणि देशातील पन्नास ठिकाणांहून या कार्यक्रमात सामील झालेल्या नव नियुक्त उमेदवारांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान रोजगार मेळ्याचे कारण स्पष्ट करताना म्हणाले की, स्वातंत्र्याची 75 वर्षे लक्षात घेऊन केंद्र सरकार एकाच कार्यक्रमांतर्गत 75,000 तरुणांना नियुक्ती पत्र देत आहे. “आम्ही ठरवले की, एकाच वेळी नियुक्तीपत्रे देण्याची परंपरा सुरू करावी त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा सामूहिक स्वभाव, भावना सर्व विभागांमध्ये विकसित होईल”. आगामी काळातही उमेदवारांना शासनाकडून वेळोवेळी नियुक्तीपत्रे मिळणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मजकूर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.’’
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल रोजगार मेळाव्याच्या मुंबईतील कार्यक्रमात सहभागी झाले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात एकूण 395 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. केंद्रीय मंत्र्यांनी तीस नवीन भरती झालेल्यांना समारंभपूर्वक नियुक्तीचे पत्र दिले. नवीन भरती झालेल्यांना टपाल विभाग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, तटरक्षक दल, सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, भारतीय नौदल, सीआयएसएफ, आरसीएफ, माझगाव डॉक्स लिमिटेड, प्राप्तीकर, सीबीआयसी, ईएसआयसी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अशा विविध ठिकाणी नियुक्ती मिळाल्या आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, कॅनरा बँक, एनबीसीसी आणि सीमेन्स प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मुंबई, आयआयटी मुंबई, एनआयएफटी आणि बीएसएफ या कार्यालयांमध्ये नव्या उमेदवारांची नियुक्ती केली आहे.

केंद्र सरकारमध्ये नवनियुक्त युवकांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सेवाभावी वृत्ती आणि जबाबदारीच्या भावनेने काम करण्याचे आवाहन केले. सरकारी सेवेत प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या काय अपेक्षा होत्या, याचा विचार करा. सरकारी कार्यालये व्यवस्थित चालावीत, नागरिकांना चांगली सेवा तेथून दिली जावी आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता राखली जावी, अशा आम्ही सहसा अपेक्षा करतो. हे सांगत असतानाच गोयल यांनी नागरिकांच्या या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने काम करण्याचा सल्ला त्यांना दिला. नवीन उमेदवार जे पारदर्शक प्रक्रियेतून इथपर्यंत आले आहेत, ते लोक सेवा करण्याची मानसिकता घेऊन काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते जसे काम करत जातील तसतसे त्यांच्याकडील कौशल्याचा दर्जा उन्नत होत जाईल, असे गोयल म्हणाले.


केंद्रीय मंत्र्यांनी नवीन निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कामात आपण कोणते नवीन दृष्टीकोन आणू शकतो, यावरही विचार करावा, असे आवाहन केले. आपल्या जबाबदार्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी स्वतःला अर्धे बाहेरचे आहोत, असे कल्पून विचार करावा आणि त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा घडवत जावी.
गोयल यांनी नव्या उमेदवारांना सरकारी विभागांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल, यावर विचार करण्याचाही सल्ला दिला. केंद्रीय मंत्र्यांनी नवीन भरती झालेल्यांकडून प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवीन कल्पना आणि सूचनांही करण्याचे आवाहन केले. देशाच्या 135 कोटी नागरिकांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची मनिषा बाळगून सर्व सरकारी सेवकांनी वाटचाल करण्याचे आग्रहपूर्वक सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्यासाठी काम करण्याचे आग्रहाने बजावले आहे, असे सांगतानाच, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नव्य़ाने भरती झालेल्या तरूणांना प्रत्येक नागरिकाला उज्वल भविष्याची भेट कशी देता येईल, याचा विचार करण्यास सांगितले. ते म्हणाले की विकसित भारताची उभारणी करायची असेल तर त्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आम्ही सर्वांनीच विकसित देश बनवण्याच्या कामी योगदान दिले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, जुन्या फायलींचा ढिग साचून ठेवण्याची आमची वसाहतवादी मानसिकता झटकून टाकली पाहिजे. आम्ही सर्वांनी असा निर्धार केला की आम्ही आमचे काम संपूर्ण डिजिटल करू आणि वसाहतवादी मानसिकतेला पूर्णविराम देऊ, तर कल्पना करा राष्ट्राप्रती केवढे महान योगदान असेल. सरकारी विभागांमधील डिजिटायझेशनच्या कामाबद्दल केंद्रीय मंत्री म्हणाले की, अनेक सरकारी विभागांमध्ये ई फाईल्स बनवल्या जात आहेत. तसेच, थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेत जेएम ट्रिनिटीद्वारे गळती रोखण्यास सहाय्य झाले आहे, ज्यामुळे लाभ लोकांच्या बँक खात्यांत थेट जमा होतात. या प्रत्येकाचे कळफलक म्हणजे डॅशबोर्ड संकेतस्थळांवर सार्वजनिक दृष्ट्या पाहायला उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की पंतप्रधानांनी आपलियी मुळांकडे जाऊन काम करण्याचाही आम्हाला उपदेश केला आहे. आमच्या परंपरांकडून खूप काही आम्हाला शिकण्यासारखे आहे. देशाचे ऐक्य आणि अखंडत्व यांना कायमच लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, 135 कोटी लोक जोपर्यंत राष्ट्राच्या विकासासाठी काम करताना जबाबदारीची जाणीव ठेवत नाहीत, तोपर्यंत कामाच्या परिणामात सुधारणा होणार नाही. एकदा आम्ही कर्तव्यभावना त्यात आणली की काम अधिक चांगले होईल आणि ते लोकांच्या हिताचे असेल. भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने आम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे, असे ते पुढे म्हणाले.
विविध मंत्रालये आणि सरकारी विभागांमधील नव्याने नियुक्त झालेल्यांच्या बरोबर, महाराष्ट्र सरकारमधील पर्यटन, कौशल्य विकास आणि व्यावयासिकता तसेच महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उत्तर मुंबईचे लोकसभा मतदारसंघातील सदस्या पूनम महाजन, मुख्य पोस्टमास्तर जनरल वीणा श्रीनिवास उपस्थित होत्या.
नागपूर येथील कार्यक्रमात 213 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यासह केंद्र शासनाच्या विविध जवळपास 38 विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे. आज एकाच दिवशी देशभरात 75 हजार युवकांना नियुक्ती पत्र दिले गेले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
रामदास आठवले यांनी सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठविण्याची घोषणा केल्याबद्दल राज्य सरकारचे कौतुक केले. केंद्राप्रमाणे राज्य शासनाने हे धाडसी पाऊल उचलल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व शासकीय नोकऱ्यांमध्ये भारतीय ही प्रक्रिया यापुढे गतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शंभर रूपयांत दिवाळी किट हिच भाजपची फसवणुकीची रित
पुणे-महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने दिवाळीनिमित्त जाहीर केलेल्या “शंभर रुपयात किराणा किट” हि फसवी योजना असल्याचा आरोप करत या फसवणुकीच्या निषेधार्थ व अन्नधान्य वितरण व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दांडेकर पुल येथे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख ,संतोष नांगरे, सौ.मृणालिनी वाणी, सौ.प्रिया गदादे, विपुल मैसुरकर, बाळासाहेब अटल, विजय बागडे, समीर पवार, शशिकला कुंभार, अमोल ननावरे, मोनहाज शेख, संजय दामोदरे, राहुल गुंड, प्रदीप शिवशरण, शिवम ईभाड, संकेत शिंदे,व इतर प्रमुख मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले,’ मोठमोठी आश्वासन् देवून ती पूर्ण न करणाऱ्या या भाजपवाल्यांनी नेहमीप्रमानेच यावेळीही राज्यातील जनतेला फसविलेच आहे.दिवाळी सुरू होवून सुध्दा अजूनही कार्डधारकांना धान्य मिळालेले नाही. शंभर रुपयात किराणा किट ची घोषणा केली, पुरवठादाराने किराणा किट उपलब्ध देखील करून दिल्या परंतु या किटवर फसवणुकीचे बोधचिन्ह असणाऱ्या शिंदे -फडणवीस यांचा फोटो नसल्यामुळे या किट वितरित करण्यात आल्या नाही. अखेर गरिबांना दिवाळीच्या एक दिवस अगोदर देखील संबंधित किट मिळालेल्या नाहीत. प्रगत व विकसित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. एकीकडे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, गेल्या दोन वर्षात कोविडमुळे दिवाळी आनंदाने व उत्साहात साजरी करता आली नव्हती यावर्षी ती आनंदात साजरी करता येणार अशी खोटी आश्वासने देत शिंदे- फडणवीस सरकारने ही लोकप्रिय घोषणा केली. परंतु आजही गरिबांना संबंधित किट मिळू शकलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गोष्टीचा निषेध करते महाविकास आघाडी सरकारच्या काळात कडक लॉकडाऊन असताना देखील सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था अत्यंत सुनियोजितपणे सुरू होती. या सरकारने लोकप्रिय घोषणांच्यापायी संबंधित व्यवस्था बिघडवली असून जी काही आश्वासने दिली होती ती देखील यांना पूर्ण करता आली नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदर बाबीचा निषेध व्यक्त केला येत्या दोन दिवसात सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली पुन्हा पूर्ववत सुरू न झाल्यास पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील असेही जगताप यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळावा- 10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहीमेचा शुभारंभ-देशभरासह पुण्यात नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान
देशाच्या विकासात शासकीय सेवेचे मोठे योगदान- केंद्रीय मंत्री नारायण राणे
पुणे, 22 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज रोजगार मेळावा- या 10 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरभरती मोहिमेचा शुभारंभ झाला. या समारंभात, देशभरातील 75 हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, टपाल सेवा, पुणे क्षेत्राच्या संचालक सिमरन कौर, पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल, रामचंद्र जायभाये देखील यावेळी उपस्थित होते.
भारतीय टपाल विभाग, पुणे कार्यालयाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.
भारत सर्व क्षेत्रात विकसित व्हावा, हा पंतप्रधान यांचा प्रयत्न आहे. भारत आज आर्थिक क्षेत्रात सुरक्षित आहे, हा विश्वास पंतप्रधान देत आहेत, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
आजचा कार्यक्रम आगळावेगळा आहे. 75 हजार व्यक्तींच्या माध्यमातून 75 हजार कुटुंबे जोडली गेली आहेत, असे सांगून भारताला मोठे करण्यात सरकारी सेवेत येणाऱ्यांचा मोठा हातभार आहे. प्रामाणिक सेवा देणे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव राणे यांनी उपस्थित नवनियुक्त कर्मचाऱ्यांना करून दिली.

देशासाठी, कुटुंबासाठी योगदान देण्यासाठी नोकरी आवश्यक ठरते, अशी भावना व्यक्त करून राणे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांना नवीन सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
नारायण राणे पुढे म्हणाले की, पंतप्रधान आम्हाला दर आठवड्याला देशाच्या प्रगतीसाठी, नागरिकांसाठी काय करता येईल यावर मार्गदर्शन करतात. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही आमच्या सोबत या, भारत आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण करूयात. आर्थिक क्षेत्रात दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आलो आहोत, तिसऱ्या आणि त्यानंतर पहिल्या स्थानावर जायचा प्रयत्न करू, असे आवाहन राणे यांनी केले. राणे यांनी उत्तम कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल पुणे टपाल विभागाचे अभिनंदन देखील केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
पंतप्रधान मोदी यांच्या, युवकांना रोजगाराच्या संधी प्रदान करण्याच्या तसेच नागरिकांच्या कल्याणाप्रति असलेल्या कटिबद्धतेची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशांनुसार, सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये असलेल्या मंजुरीप्राप्त रिक्त जागा भरण्याचे काम मिशन मोडवर सुरु झाले आहे.
देशभरातून निवडले गेलेले नवनियुक्त कर्मचारी, ती सुलभ आणि तंत्रज्ञानयुक्त करण्यात आली आहे.
वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देणार, सीसीटीव्ही मार्फत कारवाई होईल – चंद्रकांत पाटील
पुणे : ” विविध कारणांमुळे शहरातील वाहतुक कोंडी होत आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पोलिस ठाण्यांकडील पोलिस, गृहरक्षक दल, खासगी वॉर्डन अशा स्वरुपाचे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कर्मचाऱ्यांऐवजी सीसीटीव्हीद्वारे ऑनलाईन दंडाची कारवाई होईल.” असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले.शहरातील वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस ते उपस्थित होते. यावेळी माजी महापौर व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी आमदार बापू पठारे उपस्थित होते.
चौतीस गावांमध्ये 1000 कोटीची कामे करणार
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या चौतीस गावांमध्ये बांधकाम आराखडा मंजूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) विकसन शुल्क घेतले. त्याचे पाचशे कोटी रुपये निधी “पीएमआरडीए’कडे आहे. मात्र, त्यातून”पीएमआरडीए’ ने चौतीस गावांमध्ये कोणतेही विकासकाम सुरू केले नाही. हा विरोधाभास असून, “पीएमआरडीए’ ने हा निधी दिल्यास, त्यामध्ये महापालिका व नगरविकास खाते आणखी पाचशे कोटी रुपयांची भर घालून समाविष्ट गावात एक हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू केली जातील. त्यातून समाविष्ट गावांमधील अनेक नागरी प्रश्न मार्गी लागतील, असेही पाटील यांनी सांगितले.
आठशे पोलिस पुण्यातुन भरती केले जाणार
राज्यातील पोलिस दलामध्ये लवकरच वीस हजार पोलिसांची केली जाणार आहे. त्यापैकी आठशे पोलिस पुण्यातुन भरती केले जाणार आहेत. याबरोबरच पुणे पोलिस दलात वाघोली, खराडी, बाणेर, फुरसुंगी, आंबेगाव, नांदेड सिटी, काळेपडळ अशी सात नवीन पोलिस ठाणीही मंजुर झाली आहेत. त्यासाठी आवश्यक निधीसाठी राज्याच्या वित्त मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छतेबाबत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांशी संवाद
पुणे दि. २२: पुण्याचे उद्योग संशोधन आणि उत्पादनात पुढे आहेत. स्वच्छतेबाबतही उपयुक्त संशोधन करीत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे आणि पुण्याला स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मराठा चेंबरचे अध्यक्ष डॉ.सुधीर मेहता , माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शहरातील नागरिकांसाठी शहर स्वच्छता, वाहतूक नियोजन आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होणे असे तीन महत्वाचे विषय आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आणि कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातून उत्पन्न घेण्याचे प्रयोग गरजेचे आहेत. अशा विषयांबाबत चांगल्या सूचना चेंबरने कराव्यात.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि त्यांना कचरा वेचण्यासाठी आवश्यक सुविधा देणे गरजेचे आहे. त्यांना काही प्रमाणात वस्तूंच्या स्वरूपात मदत करून त्यांची कार्यक्षमता वाढवता येईल. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसारखे प्रकल्प राबविण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य महत्वाचे ठरेल. स्वच्छतेबाबत सर्व संबंधित घटकांचा सहभाग वाढवून जनप्रबोधनावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाऊस बंद होताच ही कामे सुरू करण्यात येईल. एनडीए चौकातील वाहतूक समस्याही दूर होत आहे, असेही श्री.पाटील म्हणाले.
डॉ.मेहता यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. शहर स्वच्छ करण्यासाठी शासन आणि प्रशासनासोबत चेंबर काम करेल. स्वच्छतेचे उद्दीष्ट सामुहिक प्रयत्नातून साध्य करता येईल असे ते म्हणाले.
बैठकीला उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर
मुंबई–भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. तथापि, या दोन पक्षांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी असून ते पक्ष स्वतःहून राजकीयदृष्ट्या बुडतील. आगामी काळात भाजपामध्ये अनेक आश्चर्यकारक पक्षप्रवेश झालेले दिसतील, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण पाटील असतील व त्यांना शिक्षक परिषद समर्थन देईल, अशी घोषणा बावनकुळे यांनी यावेळी केली. किरण पाटील व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) हे पक्ष सोबत आले होते. पण तीन पक्ष एकत्र आले तरी त्यांच्या रिक्षाची तीन चाके वेगवेगळ्या दिशेला आहेत. हे तीनही पक्ष आपसात इतके भांडतील की त्यांची दाणादाण उडेल. सत्तेच्या अडीच वर्षात मुख्यमंत्री कोणाला भेटत नव्हते तर पालकमंत्री केवळ मतदारसंघापुरते होते. त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. परिणामी या पक्षांमध्ये काहीही होऊ शकते.
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे काम करण्याची संधी होती पण त्यांनी त्यावेळी हिंदू सणांवर बंदी घातली. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळी अशा सर्व सणांवरील निर्बंध उठवले. भारतीय जनता पार्टीने हिंदू संस्कृतीतील सण धुमधडाक्यात साजरे केले तर त्यावर राजकारण म्हणून टीका योग्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे करण्यापासून कोणी अडवलेले नाही. त्यांनी सत्तेत असताना या सणांसाठी पुढाकार घेतला नाही आणि आता विरोधी पक्ष असतानाही ते भाजपाप्रमाणे मराठी दांडिया किंवा दीपोत्सव का करत नाहीत ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामध्ये कोणतेही राजकारण नाही, असे ते म्हणाले.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ट्वीट करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणे हा संस्कृतीचा भाग आहे. त्यावरून राजकारण करू नये, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या साडेआठ वर्षांच्या कारकिर्दीत लाखो तरुणांना रोजगार मिळाला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांच्या पुढाकाराने ७५,००० तरुणांना नियुक्तीपत्रे देणे ही दिवाळीच्या वेळी सर्वांना आनंद देणारी घटना आहे, अशा शब्दात त्यांनी स्वागत केले.
भाजपाचे माजी नगरसेवक, हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता
पुणे -पौड रस्त्यावरील कोंडवाड्यात ठेवलेली जनावरे घेऊन जाण्यासाठी आलेल्या दोघांना मारहाण केल्याच्या आरोपातून भाजपाचे माजी नगरसेवक, हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. डाफरे यांनी दिले. १९ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला.
या प्रकरणात न्यायालयात दोषाराेपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींच्या वतीने ॲड. महेश गजेंद्रगडकर, ॲड. एम. डी. झोडगे, ॲड. देशपांडे, ॲड. डोंगरे यांनी कामकाज पाहिले.या खटल्यात सरकारी वकिलांनी पाच साक्षीदार तपासले होते. खटला प्रलंबित असताना आरोपी मनोज रासगे यांचे निधन झाले. एकबोटे यांनी आरोपींशी संगमनत करून दंगा घातला. आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप सरकारी वकील सिद्ध करू शकले नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
या प्रकरणात मिलिंद एकबोटे यांच्यासह हरिश्चंद्र शिवराम कोंढरे, हेमंत बबनराव बोरकर, बापू बबन काळे, प्रकाश नामदेव शेलार, राजेश बापूराव कोल्हापुरे, रामदास नारायण आंबेकर, पंडित परशुराम मोडक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोंडवाड्यात ठेवलेली जनावरे आणि गाई घेऊन जाण्यासाठी आलेल्या शकील कुरेशी आणि नासीर कुरेशी यांना जमावाने मारहाण केल्याची फिर्याद शकील कुरेशी यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात दिली होती. ४ जून २००३ रोजी ही घटना घडली होती.
‘साखळीपीर’, जय आनंद ग्रुपने केली वंचित-संचितांची दिवाळी आनंदमय
पुणे : साखळीपीर तालिम राष्ट्रीय मारुती मंदीर, जय आनंद ग्रुप संचालित ऋषीआनंदवन व लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित-संचितांची दिवाळी साजरी करण्यात आली. जैन साध्वी इंद्रकवरजी महाराज साहब यांच्या जयंतीनिमित्त ‘समाजधनपुजन’ करण्यात आले. यावेळी १०० गरजू परिवारांना दिवाळीनिमित्त दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
वंचितांची व संचितांची एकत्रीत दिवाळी व समाजातील उपेक्षित घटकांना अभ्यंगस्नान घालुन, औक्षण करुन त्यांना नविन कपडे-साडीचोळी देऊन फराळ वाटप करण्याचे हे विसावे वर्ष आहे. यासह वर्षभर कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचारी, फायर ब्रिगेड जवान, मनपा सफाई कर्मचारी यांचे औक्षण करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने नाना पेठेतील साखळीपीर तालिम चौकात झालेल्या या कार्यक्रमावेळी रविंद्र माळवदकर, विजयकुमार मर्लेचा, भाई कात्रे, शिवानी माळवदकर, जयप्रकाश सोनी, शांतीलाल नवलाखा, ईश्वर बोरा, संजय कटारिया, संतोष कर्नावट, प्रवीण तालेडा, विजय धोका, नितीन ओस्तवाल, विजय चोरडिया, रमणलाल कोठारी, बबन लाहोटी, रमेश लाहोटी आदी उपस्थित होते.
जय आनंद ग्रुपचे सदस्य संतोष भुरट यांच्या धर्मपत्नी प्रतिभा भुरट व शांतीलाल नवलखा यांच्या मातोश्री श्रीमती चांदकॅंवर बाई दगडूलालजी नवलाखा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम घडविण्यासाठी जय आनंद ग्रुप, पुणे संचलित ऋषी आनंदवनचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा व कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी विशेष प्रयत्न केले.
