Home Blog Page 1548

जिल्ह्यातील ३०३ कोटींच्या विकासकामांना पालकमंत्र्यांची मंजुरी

पुणे दि.३-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३०३ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे उपस्थित होते.

शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामांना यापूर्वी स्थगिती दिली होती. प्रत्येक कामांची पालकमंत्र्यांनी तपासणी करून मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी वार्षिक आराखड्यात समाविष्ट प्रत्येक कामांची माहिती घेतली. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या ३०३ कोटींच्या कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली. सर्व विकासकामे नियोनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यात यावेत आणि कामांचा दर्जा चांगला राहील याकडेही विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

रिक्त पदांच्या भरतीसोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे, दि.३ : राज्यात शासकीय स्तरावर ७५ हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विभागीय रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, कोल्हापूरचे परेश भागवत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या सूचना विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात एकाचवेळी ६ ठिकाणी अशा स्वरूपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील २ हजार ३३ उमेदवारांना आज नियुक्ती पत्र देण्यात येत आहे.

बेरोजगारी दूर करणे, चांगले, अनुभवी, कुशल मनुष्यबळ प्रशासनात आणणे आणि या माध्यमातून राज्याच्या प्रगतीला गती देणे हा यामागचा उद्देश आहे. कायद्याची आणि शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रशासनाची आहे. नवनियुक्त उमेदवारांनी क्षमतेने काम करीत प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, राज्य शासनाने एका वर्षात ७५ हजार युवकांना रोजगार देण्याचा ‘महासंकल्प’ केला असून त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे विभागामध्ये ऊर्जा, परिवहन आणि ग्रामविकास विभागात एकूण ३१६ पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात येत आहे. नवनियुक्त उमेदवारांनी आपल्या विभागाला सर्वोच्च स्थान देऊन शासकीय सेवेत समर्पित भावनेने उत्कृष्ट काम करावे. निवड झालेल्या उमेदवारांनी आयुष्यातील हा ‘संकल्प दिवस’ समजून राज्याच्या प्रगतीला हातभार लावण्याचा संकल्प करावा असेही ते म्हणाले.

प्रादेशिक संचालक नाळे म्हणाले, राज्यातील युवकांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. उमेदवारांना निर्धारित वेळेत नियुक्ती देण्यासाठी महावितरणने मोहीम स्तरावर कागदपत्रांची छाननी केली. व्यक्तीने एखादा व्यवसाय केल्यास त्याची आर्थिक उन्नती होते, मात्र शासकीय सेवेत आल्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबत देशसेवा घडत असते. नियुक्ती झालेल्या उमेदवारांवर अंधारलेल्या घरात प्रकाश पोहोचविण्याची जबाबदारी आहे. उद्योग क्षेत्राला तत्परतेने सेवा दिल्यास देशाच्या प्रगतीलाही हातभार लागणार असल्याने सर्वांनी पूर्ण क्षमतेने काम करावे.

यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. पुणे विभागात ऊर्जा विभागाअंतर्गत पुणे वीज वितरण कंपनी ६०, कोल्हापूर वीज वितरण कंपनी १०४, बारामती वीज वितरण कंपनी १४३, पुणे वीज पारेषण कंपनी १ असे एकूण ३०८, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे कार्यालयात ३ आणि कोल्हापूर जिल्हा परिषद येथे ५ असे एकूण ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश आणि मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईध्येय वेडेच इतिहास घडवतात, ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या आगामी चित्रपटात धेय आणि ते गाठण्यासाठीचे वेड देखील आहे, त्यामुळे हा चित्रपट सातासमुद्रापार जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासन कलाकारांच्या पाठीशी असून उत्तन जवळ नवीन चित्रनगरी बनविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. 

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या चित्रपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, चित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशी, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांनी गड – किल्ल्यांची केलेली बांधणी, उंचावरील तोफा, गडावरील पाणीसाठा हे काम दूरदृष्टीचे होते. हे वैभव पाहून रयतेचा राजा नजरेसमोर येतो. त्यांच्यावरील सर्वच चित्रपटांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाला देखील रसिकांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट कात टाकतोय असे सांगून हा चित्रपट देखील भव्य बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिवाजी पाटील यांची भूमिका साकारणारे विराज मडके, तुळजा जामकर यांची भूमिका साकारणारे जय बुधाने, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सत्यम मांजरेकर आणि प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणारे प्रवीण तरडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटात वापरण्यात येणारी शस्त्रे प्रदान करण्यात आली. या चित्रपटात शिवाजी महाराज यांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहेत.

डिसेंबर मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून सन 2023 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यू.के.तील विलिंग्टन कॉलेज आता पुण्यामध्ये: सायंकालीन समारंभाने आगमन

‘ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे यांनी २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी समारंभपुर्वक नवीन शाळेच्या  माहितीपत्रकाचे अनावरण केले आणि विलिंग्टन कॉलेजच्या वैशिष्ट्यांची ओळख करून दिली.

पुणे: विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे (डबल्यू.सी.आय.पी.), विलिंग्टन कॉलेज यू के. चे एक भागीदार, यांनी २ नोव्हेंबर ला सायंकाळी विलिंग्टन कॉलेजच्या भारतातील प्रवासाच्या सुरुवातीची नोंद घेण्यासाठी एक शानदार समारंभ आयोजित केला. या समारंभात विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे या शाळेच्या माहितीपत्रकाचे अनावरण केले गेले. यावेळी युनिसन ग्रुप, जे   डबल्यू.सी.आय.पी चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी या कामात सहभागी झाले आहेत आणि विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनलचे वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल चे वरिष्ठ आंतरराष्ट्रीय संचालक श्री. स्कॉट ब्रायन, शिक्षण संचालिका (प्राथमिक आणि इ वाय एफ एस) श्रीमती फियोना कार्टर, विलिंग्टन कॉलेज सर्विसेस लिमिटेड आणि ग्रुप इस्टेट चे खजीनदार श्री. एडविन वाय, विलिंग्टन कॉलेज, भारतचे सहसंस्थापक श्री. अनुज अग्रवाल आणि विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे चे मुख्य संस्थापक (फाऊंडिंग मास्टर) डॉ. मरे टोड यावेळी तेथे होते. प्रेक्षकांना या वेळेस विलिंग्टन कॉलेज आणि युनिसन ग्रुपच्या अग्रगण्य व्यक्तींचे अभ्यासपूर्ण विचार ऐकण्याची संधी मिळाली.

भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखविणारे मोहक असे इंडोवेस्टर्न फ्यूजन नृत्य शिनजिनि कुलकर्णी यांनी सादर केले.

विलिंग्टन कॉलेज यू. के. चे ध्येय भारताच्या शैक्षणिक बाजारपेठेमध्ये अधिक उंची गाठण्याचे आणि गतिमानपणे बदलणाऱ्या उद्योग संधींचा फायदा घेण्यात विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांना भारतीय बालवाडी ते बारावी शिक्षण पद्धतीमधून कौशल्य आधारित शिक्षण देणे आणि अशा शैक्षणिक पद्धतीला प्रोत्साहित करणे हे आहे. विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे ही वय वर्ष दोन ते अठरा या वयोगटासाठी मुले व मुली यांचे सहशिक्षण देणारी दिवसीय शाळा असेल. पुरस्कार विजेते ब्रिटिश वास्तू विशारद  मिका जोन्स यांनी या शाळेच्या आवाराची रचना बनविली आहे.

ही शाळा आय बी डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचे मानले जाणारे इंग्लिश नॅशनल अभ्यासक्रमचे अनुसरण करेल; ज्यासाठी विलिंग्टन कॉलेज हे जागतिक पातळीवरील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे हे ‘ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून नावाजलेल्या

पुण्यामध्ये सुरू होत असून त्यासाठी विस्तृत आणि पर्यावरणपुरक शालेय आवार बनविले जात आहे. डब्ल्यू. सी. आय. पी. क्रीडा संगीत आणि कला या क्षेत्रांमध्येही अतुलनीय सुविधा पुरविणार आहे. त्यांनी भविष्यात पूर्ण बोर्डिंग शाळांसकट अजून बऱ्याच शाळा चालू करण्याचे योजले आहे.

विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे चे सह संस्थापक श्री. अनुज अग्रवाल यावेळी म्हणाले की, “ आम्ही पुण्यामध्ये विलिंग्टन कॉलेजच्या या भव्य प्रारंभाने खूप आनंदित व उत्साहित आहोत आणि बालवाडी ते बारावीच्या या शैक्षणिक विभागाला अत्त्यूत्तम शिक्षण पुरविणे हे आमचे ध्येय आहे. एन. इ. पी. २०२० चे सिद्धांत पायाभूत मानून विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे उत्तम सुविधांसह विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यास सुसज्ज आहे. प्रायोगिक शिक्षण पुरविण्यापासून ते विद्यार्थ्यांना त्यांची आवड ओळखून ती जपायला शिकविण्यापर्यंत , आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रमांपासून ते विद्यार्थ्यांच्या सामाजिक व भावनिक गरजांची पूर्तता करण्यापर्यंत असे सर्व निकष आम्ही या शाळेत देऊ जेणेकरून पालक त्यांचे मूल  पुढे भविष्यात मोठा लीडर होऊ शकेल अशा पूर्ण विश्वासाने मुलांना शाळेत पाठवतील.”

विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे चे फाऊंडिंग मास्टर श्री. मरे टोड म्हणाले की, “विलिंग्टन कॉलेजच्या इतिहासातील या नवीन परकरचा एक भाग होताना मी रोमांचित झालो आहे.

भारतात येणे हे आमच्यासाठी एक स्वप्न होते आणि आम्ही आशा करतो की, आम्ही भारतीय शालेय शिक्षणास दोन्ही जगातील सर्वोत्तम देऊ, बालवाडी ते बारावीसाठी सर्वोत्तम अध्यापन प्रक्रिया आणि कार्यपद्धती पुढे आणू आणि सकारात्मक व दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पाडू. पुण्यासारख्या अनोख्या शहरात राहणे हे अत्यंत रोमांचकारक आहे आणि आम्ही आता सप्टेंबर २०२३ मध्ये शाळा चालू होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.”

जवळपास १७० वर्षांचा इतिहास, राज घराण्याचे संबंध आणि सांस्कृतिक वारसा असलेले विलिंग्टन कॉलेज हे जगातील आय. बी. डी. पी. शाळांमधील एक अग्रगण्य नाव आहे. ब्रिटिश शिक्षण पद्धती आणि भारतीय शिक्षण पद्धती या दोहोंमधील जे सर्वोत्तम आहे ते दोन्ही मिळवून आमची ही पुण्यातील शाखा विलिंग्टन कॉलेजची नैतिक मूल्ये, शाश्वत गुणवत्ता आणि महत्वाकांक्षा निश्चितच जपेल. युनिसन ग्रुप भारतातील पहिले विलिंग्टन कॉलेज स्थापन करणार आहे जे सप्टेंबर २०२३ मध्ये पुण्यामध्ये चालू होईल. शैक्षणिक विचार आणि अभ्यासात ही शाळा आघाडीवर असेल.

नवनियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्षभरात ७५ हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध करणार : राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात प्रतिपादन

मुंबई, दि. 3 :- रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात 75 हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री तथा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव साप्रवि (सेवा) नितीन गद्रे, प्रधान सचिव वलसा नायर सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, “राज्याच्या दृष्टीने आज आनंद सोहळा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दहा लाख रोजगार उपलब्ध करण्याचे जाहीर केले. राज्यांनीही यास प्रतिसाद देण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार प्रतिसाद देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून येत्या वर्षभरात 75 हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात कोकण विभागीय कार्यक्रमात आज सुमारे 600 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून राज्यात सुमारे दोन हजार उमेदवारांना विभागीय पातळीवर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे”.

राज्यात गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी पायाभूत सुविधा आणि विकास कामांसाठी केंद्र सरकारच्या वतीने मोठा निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “नगरविकास विभागाच्या 14 हजार कोटींच्या प्रस्तावास केंद्राची मान्यता मिळाली आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याबरोबरच लहान उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंकद्वारेदेखील रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात परकीय गुंतवणूक वाढत असून वांद्रे कुर्ला संकुलाला सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट घोषित करण्यात आले आहे. जपानी कंपनीद्वारे दोन हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक करण्यात येत असून याद्वारे पाच ते सहा हजार रोजगार उपलब्ध होणार आहे”. मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातूनदेखील अनेक प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात भरती प्रक्रिया राबविताना एमपीएससीला प्राधान्य देऊन त्याचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे टीसीएस आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांमार्फत पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येईल”. शासन लोकहिताचे निर्णय घेत असून नवनियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र पहिले राज्य

                              – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले, “मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  देशातील सर्व राज्यांना  आवाहन केले होते की, देशात अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार  दहा लाख  लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. राज्यांनीही आपल्या रिक्त पदावर तरूण-तरूणींना रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रातही 75 हजार रिक्त जागा आम्ही भरणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली. गेल्या काही वर्षात शासकीय पदभरतीवर काही निर्बंध होते. आता हे निर्बंध शासनाने उठवले असून राज्यातील 75 हजार तरूण-तरुणींना शासकीय नोकरी मिळणार आहे. नवीन युवा पिढी प्रशासनात आली तर शासनदेखील गतिमान पध्दतीने काम करू शकते यासाठी ही  पदभरती आवश्यक आहे, असे ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘येत्या आठवडाभरात 18 हजार 500 पोलीस भरतीची जाहिरात काढत आहोत. एका महिनाभरात  ग्रामविकास विभागात 10 हजार 500 पदांची भरती करणार आहोत. सर्व विभागांमध्ये पदभरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अनेक पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत.विभागाकडून पदभरतीतही आमूलाग्र बदल करणार आहोत. कोणत्याही पदभरतीमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे. महिनाभरापूर्वी या शासनाने निर्णय घेतला की उत्तम पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या देशातल्या दोन नामांकित संस्थांमार्फत पदभरतीच्या परीक्षा होतील. येत्या वर्षभरात सर्व पदभरती करून  या सर्व नियुक्त्या आम्ही देणार आहोत. शासनाच्या सर्व विभागांनी पदभरती करताना सर्व गोष्टींची पडताळणी करावी जेणेकरून कायदेशीरदृष्ट्या पदभरतीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. या माध्यमातून तरुण पिढीला सांगू इच्छितो की, ही आपल्या जीवनातील शेवटची संधी आहे, असे समजू नये. 75 हजार पदभरती झाली तरी जी पदे रिक्त होतील त्यांचीही पदभरती केली जाईल.

कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. यातूनही रोजगार उपलब्ध होतील.शासकीय विभागाबरोबर खासगी क्षेत्रातही  १ लाख नोक-या उपलब्ध होण्यासाठी  शासन विविध संस्थाबरोबर  करार केले जाणार आहेत.संधी अनुरूप तरुणाई तयार करणे व त्यांना योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.आपण राज्यातील पहिले कौशल्य विद्यापीठ तयार केले आहे. आजची तरूणाई नोक-या देणारी देखील तयार होत आहे.या प्रकारचे स्टार्ट अप तयार होत आहेत  हे र्स्टाट अप हजारो तरूणांना रोजगार देत आहेत.महाराष्ट्र हा स्टार्ट अप कॅपिटल झाला असून देशात जे ८० हजार नोंदणीकृत स्टार्ट अप आहेत त्यातील पंधरा हजार फक्त महाराष्ट्रातील आहेत.जो देशात प्रथम क्रमांक आहे.हे स्टॉर्ट अप जेव्हा मोठे होतात तेव्हा हजारो कोटींचे होतात त्यावेळी त्यांना आपण युनिकॉर्न म्हणतो देशात जे १०० युनिकॉर्न आहेत त्यापैकी २५ युनिकॉर्न महाराष्ट्रातील आहेत. एक युनिकॉर्न २० ते २५ हजार लोकांना रोजगार देत आहे.तरुणाईने स्टार्ट अप सुरू केल्यापासून त्याला आर्थिक पाठबळ  देखील शासनाच्या वतीने देण्यात येते. शासनाच्या विविध महामंडळामार्फतही रोजगार व स्वयंरोजगारासाठी मदत करत आहोत. शासनाची सेवा करताना आपण सर्वजण विश्वस्त म्हणून काम पाहत असतो.आज ज्यांना नियुक्तीपत्र मिळाले आहे, त्यांनीही आपल्या सेवेचा भाव कधीच कमी होऊ देवू नये, आपण काम करत असताना जनतेच्या हितासाठी काम करा व महाराष्ट्राला प्रगतीकडे नेऊया असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रधानमंत्र्यांमडून कौतुक        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे संदेश दिला. नियुक्तीपत्र प्राप्त उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, महाराष्ट्र शासन रोजगार देण्याच्या संकल्पाकडे एका ध्येयाने मार्गक्रमण करीत आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. केंद्र शासनाने दहा लाख नोकऱ्या देण्याच्या अभियानाची सुरूवात केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही आज सामूहिक नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात गृह आणि ग्रामविकास विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, ही बाब अभिनंदनीय असल्याचे ते म्हणाले.          प्रधानमंत्री म्हणाले, ‘विकसित भारत होण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. मुद्रा योजनेद्वारे तरूणांना स्वयंरोजगारासाठी 20 लाख करोड रूपयांची मदत केली. याचा मोठा लाभ महाराष्ट्रातील तरुणांनाही झाला. स्टार्टअप, लघु उद्योग यासाठी शासन मदत करीत आहे. ग्रामीण भागातील बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे. मागील आठ वर्षात आठ कोटी महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करीत आहेत. बचत गटांना साडेपाच लाख कोटीची मदत दिली गेली आहे. त्यामुळे उत्पादन निर्मिती व रोजगार निर्मितीही होत आहे. पायाभूत सुविधांवर खर्च केल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी रूपये व रस्ते विकासासाठी 50 हजार कोटी रूपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत, यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.­’

रोजगार मेळाव्याबाबत माहिती :

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित 75 हजार पदांची भरती करण्याचा राज्यशासनाचा मानस आहे.

आज पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील सुमारे 600 उमेदवारांना मुंबईत झालेल्या कार्यक्रमात नियुक्ती आदेश प्रदान. निवड झालेल्या इतर उमेदवारांना राज्यातील उर्वरित 5 विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संबंधित पालकमंत्री व अन्य मंत्र्याच्या उपस्थितीत नियुक्ती आदेश देण्यात आले.

गृह विभागाच्या पोलीस शिपाई, पोलीस चालक व सशस्त्र पोलीस या पदांची 18 हजार 331 पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार.

ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद व क्षेत्रीय कार्यालयातील पदे भरण्यासाठी 10 हजार 500 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार.

राज्यसेवा २०२२ परीक्षेची १६१ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जुन्या अभ्यासक्रमानुसार होणारी ही शेवटची परीक्षा असल्याने उमेदवारांच्या विनंतीनुसार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी राज्यसेवा २०२२ यामध्ये ६२३ जागांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील सदस्याचे रिक्त पद भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदर नियुक्ती अंतिम टप्प्यात आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय बळकटीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व वर्ग-३ मधील लिपिकाची राज्यातील सर्व रिक्त पदे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

00000

 देशातील विषमतेचे वातावरण नष्ट करण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ पुणे काँग्रेसच्या वतीने मोटार सायकल रॅली

पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालीर पुणे शहरामध्ये खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी गृहराज्य मंत्री आ. सतेज पाटील व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरूवात करण्यात आली संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही रॅली फिरून आगाखान पॅलेस येथे तीचा समारोप करण्यात आला.

     यावेळी बोलताना माजी गृहराज्य मंत्री आ. सतेज पाटील म्हणाले की, ‘‘आमचे नेते राहुल गांधी हे कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत भारतात तयार झालेले विषमतेचे वातावरण धर्म व जातीमधील तेढ तसेच देशातील याच्या विरोधात भारत जोडण्यासाठी यात्रा करीत आहेत. या यात्रेला संपूर्ण भारतभर मोठा प्रतिसाद मिळत असून पुण्यात देखील आज या समर्थनार्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.’’

      मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, ‘‘गेल्या आठ वर्षांमध्ये या देशामध्ये माणासांमाणसांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काही जातीयवादी शक्ती करीत आहेत. काँग्रेस नेते राहुलजी गांधी या विरोधात भारत जोडो यात्रा काढीत आहेत या यात्रेमध्ये सर्वसामान्यांबरोबरच बुध्दीजीवी वर्ग सुध्दा जोडला जात असून देश एकसंघ ठेवण्यासाठी या यात्रेचा उपयोग होत आहे.’’

     यावेळी भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री रमेश बागवे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, प्रशांत बधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपक मानकर, शुक्राचार्य वांजळे, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, नगरसेवक चंदूशेठ कदम, दत्ता बहिरट, बाळासाहेब दाभेकर, विजय खळदकर, संगीता तिवारी, पुजा आनंद, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, मनीष आनंद, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, नीता रजपूत, शिवाजी केदारी, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, सुनिल घाडगे, अजित जाधव, विनोद रणपिसे, साहिल केदारी, सुनिल शिंदे, राहुल शिरसाट, विशाल मलके, प्रशांत सुरसे, रजनी त्रिभुवन, शानी नौशाद, लेखा नायर, अरुण वाघमारे, भुजंग लव्हे, सुनील मलके, बाबा नायडु, भरत सुराना, मीरा शिंदे, वैशाली रेड्डी, सुनिल पंडित, भगवान कडू, अनिल अहिर, ॲड. राहुल ढाले, सेल्वराज ॲथोनी, संदिप मोकाटे, राजू मगर, दत्ता जाधव, शिवराज भोकरे, अक्षय माने, आयुब पठाण, हेमंत राजभोज, योगेश भोकरे, सौरभ अमराळे, नितीन परतानी, रवि आरडे, राहुल तायडे, शिलार रतनगिरी, विठ्ठल गायकवाड, अजित ढोकळे, कुणाल काळे, स्वाती शिंदे, पपिता सोनावणे, सुबकडेताई, शारदा वीर, आनंद दुबे, विशाल गुंड, ज्योती परदेशी, सुरेश कांबळे आदींसह पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

कोची इथे 4 ते 6 नोव्हेंबर-राष्ट्रीय शहरी वाहतूक परिषद आणि एक्स्पो 2022

0

केरळमध्ये कोची इथे 4 नोव्हेंबर 2022 रोजी, 15 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) या राष्ट्रीय शहरी वाहतूक परिषदेचं आणि एक्स्पो 2022 चं  उद्घाटन, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, हरदीप सिंग पुरी आणि केरळचे मुख्यमंत्री,  पिनारई विजयन संयुक्तपणे करतील. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, केरळ सरकारच्या सहकार्यानं, कोची इथल्या हॉटेल ग्रँड हयात मध्ये  4 ते 6 नोव्हेंबर 2022 दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करणार आहे.  या कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारचे धोरणकर्ते वरिष्ठ अधिकारी, मेट्रो रेल्वे कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, वाहतूक उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आंतरराष्ट्रीय तज्ञ, व्यावसायिक, शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

परिषदेला उपस्थित राहणाऱ्या त्या त्या शहरांमधील अधिकाऱ्यांना आणि तज्ञांना, जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या सध्याच्या नवीन आणि सर्वोत्तम शहरी वाहतूक व्यवस्थांची माहिती जाणून घेता यावी आणि या माहितीचा प्रचार-प्रसार त्यांनी आपापल्या शहरांमध्ये करावा, हे या परिषदेचं प्राथमिक उद्दीष्ट आहे. या परिषदेमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा इतर  व्यावसायिकांशी, तसच तंत्रज्ञान आणि सेवा पुरवठादारांशी संवाद साधण्याची संधीही उपस्थितांना मिळणार आहे. त्यामुळे उपस्थित प्रतिनिधी त्यांच्या शहरात शाश्वत पद्धतीनं शहरी वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी, या परिषदेतून मिळालेल्या संकल्पना राबवू शकतील. या कार्यक्रमामुळे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ, तंत्रज्ञान तसच सेवा पुरवठादार , धोरणकर्ते, अभ्यासक आणि शहरी वाहतूक क्षेत्रातील अधिकाऱ्यांना आपापल्या संकल्पना, विचार यांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करण्यासाठी  एकत्र असं एक व्यासपीठ उपलब्ध होतं.

यावर्षी, अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद आणि एक्स्पो 22, “आझादी@75 – शाश्वत आत्मनिर्भर नागरी वाहतूक” या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणार आहे.  शहरांमध्ये, कार्यक्षम, उच्च दर्जाची आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था तयार करुन  तिची अंमलबजावणी कशी करता येईल यावर, यात भर दिला जाणार आहे.  माहिती तंत्रज्ञानात  वेगानं होणारी  प्रगती आणि वाहतूक क्षेत्रातील नवकल्पनांमुळे, सर्वांच्या वाहतूक विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त योग्य वापर करणं शक्य होत आहे.

“केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 225 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे”-पंतप्रधान

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र सरकारच्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी, धनत्रयोदशीच्या दिवशी केंद्रीय स्तरावर रोजगार मेळाव्याच्या संकल्पनेचा शुभारंभ केला. केंद्र सरकारच्या पातळीवर 10 लाख नोकऱ्या देण्याच्या मोहिमेची ही सुरुवात होती. तेव्हापासून पंतप्रधानांनी गुजरात आणि जम्मू-काश्मीर सरकारच्या रोजगार मेळाव्यांना संबोधित केले आहे. इतक्या कमी कालवाधीत झालेले रोजगार मेळाव्याचे आयोजन पाहता “महाराष्ट्र सरकार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृढ संकल्पाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अशा रोजगार मेळाव्यांचा अधिक विस्तार होईल याचा मला आनंद आहे”. महाराष्ट्राचा गृह विभाग आणि राज्याच्या ग्रामीण विकास विभागात हजारो नियुक्त्या होणार आहेत असे मोदी म्हणाले.

अमृत काळामध्ये देश, तरुणांची भूमिका महत्त्वाची असेल अशा विकसित भारताच्या ध्येयावर काम करत आहे याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. “बदलत्या काळात नोकऱ्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे, सरकारही विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी सतत संधी निर्माण करत आहे.”  मुद्रा योजना तरुणांना तारणमुक्त कर्ज देत आहे आणि 20 लाख कोटी रुपयांचे कर्ज यापूर्वीच वितरित केले गेले आहे. त्याचप्रमाणे, स्टार्ट-अप आणि एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले जात आहे. महाराष्ट्रातील तरुणांना याचा फायदा झाला आहे, असेही ते म्हणाले.

“सरकारच्या प्रयत्नांबाबतची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या या संधी दलित-मागास, आदिवासी, सामान्य वर्ग आणि महिला सर्वांना समान प्रमाणात उपलब्ध होत आहेत यावर त्यांनी भर दिला.”  बचत गटांशी जोडलेल्या 8 कोटी महिलांना मिळालेल्या 5 लाख कोटी रुपयांच्या मदतीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

“देशभरात आज पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात सरकार करत असलेली विक्रमी गुंतवणूक रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे.”  महाराष्ट्राच्या संदर्भात पंतप्रधानांनी माहिती दिली की केंद्र सरकारने राज्यासाठी 2 लाख कोटींहून अधिक मूल्याच्या सुमारे 225 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.  75 हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प आणि आधुनिक रस्त्यांच्या 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.  “या प्रकल्पांचे काम सुरू आहे किंवा लवकरच काम सुरू होणार आहे”, असे ते म्हणाले. “सरकार पायाभूत सुविधांवर एवढा मोठा खर्च करते, तेव्हा रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होतात” अशा शब्दात त्यांनी समारोप केला.”

चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट, काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे, दि. २: चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बुधवारी या प्रकल्पाची पाहणी केली व प्रकल्प पूर्ण करण्याच्यादृष्टीने उर्वरीत कामाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

सद्यस्थितीत प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवा रस्त्यासाठी व इतर कामासाठी दोन्ही बाजूचे खडकाचे खोदकाम प्रगतीत आहे. सद्यस्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा दिशेला पाच लेन व सातारा-मुंबई साठी तीन लेन अशा एकूण आठ लेन वाहतुकीसाठी उपलब्ध केल्या आहेत. तसेच साताऱ्याकडून एनडीए मार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त २ लेन उपलब्ध आहेत.

बेंगळुरू मुंबई हायवेवरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे आधार भिंतीचे (रिटेनिंग वॉल) व माती भरावाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम १५ दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. श्रृंगेरी मठाच्या बाजूने सातारा वारजे कडे जाणाऱ्या ४ पदरी सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहतूकीस खुला करण्यात आलेला आहे. बावधन कडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्र. ६ चे काम प्रगतीत असून दिड महिन्यात पूर्ण करण्यात येईल.

कोथरुड- वारजे- सातारा हा सेवा रस्ता महामार्गाला जोडला असून वाहतूकीस खुला करण्यात आला आहे. उर्वरीत काम पुढील १५ दिवसात पूर्ण करण्यात येईल. एन डी ए ते मुंबई या रॅम्प क्र. ५ चे काम प्रगतीत असून पुढील १० दिवसात पूर्ण होईल. मुळशी ते कोथरुड या रस्त्यावरील जुन्या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीत असून पुढील दीड महिन्यात काम पूर्ण होईल. मुळशी ते सातारा रॅम्प चे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून त्यावरून मुळशी वरुन येणारी वाहतूक १३ सप्टेंबरपासून वळविण्यात आली आहे.

मुळशी मुंबई रॅम्पच्या उर्वरीत भूसंपादनाच्या कामाच्या अनुषंगाने न्यायप्रविष्ठ प्रकरणात २० ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने भूसंपादनाचे काम करण्यास परवानगी दिलेली आहे. पुणे महानगर पालिकेकडून जागेचा ताबा मिळाल्यानंतर १ नोव्हेंबर २०२२ रोजी पासून प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आलेली आहे. उर्वरीत काम पुढील एक महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुळशी कडून मुंबई कडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती यावेळी श्री. कदम यांनी दिली.

एनडीए सर्कल सुशोभीकरणास लवकरच प्रारंभ
कोथरुड- एनडीए रोड- मुळशी व एनडीए – मुंबई च्या दरम्यान असणाऱ्या ‘एनडीए सर्कल’ चे सुशोभीकरण करण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी एनडीए, पुणे महानगर पालिका व एनएचएआय यांची संयुक्त बैठक घेवून चौकाचे सुशोभीकरण करणेविषयी सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार दिशा कन्सल्टंट यांचेकडून बनवण्यात आलेल्या आराखड्यास (मॉडेल) एनडीए कडून नुकतीच सहमती मिळालेली आहे. हे सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असेही श्री. कदम यांनी सांगितले.

महात्मा जोतिबा फुले मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी भाड्याने जागा देण्यासाठी आवाहन

मुंबई दि. 2 : समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत असलेल्या महात्मा जोतिबा फुले मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी खाजगी इमारत जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, बांद्रा या परिसरामध्ये भाड्याने घ्यावयाची आहे. १५,००० चौ. फूटाची जागा, स्वतंत्र विद्युत व पाणीपुरवठा असलेल्या स्वतंत्र इमारतीत असल्यास समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर येथे अथवा 022 25222023 अथवा acswomumbaisub@gmail.com या ईमेल वर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

वसतीगृह शासकीय असल्याने इमारतीचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे राहील, अशी माहितीही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पुण्यातील नियोजित जी-२० परिषदेच्या आयोजनासंदर्भात आढावा बैठक

पुणे, दि. २ : पुणे येथे पुढील वर्षी जून 2023 मध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव अमितेश कुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे बैठक घेण्यात आली.

बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अवर सचिव सोमकुवर, वैज्ञानिक अतिफ खान, आर.आर. तिवारी, व्यवस्थापक अनुज कौशल आदी उपस्थित होते.

जी-२० राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशात करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे व औरंगाबादला या परिषदेतील सत्रांच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. या निमित्ताने भारताचे डिजिटल क्रांतीतील सामर्थ्य समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्य जगासमोर आणण्याची संधी मिळाली असून त्यादृष्टीने तयारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त श्री. राव यांनी यावेळी दिली.

श्री. अमितेश कुमार यावेळी म्हणाले, परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत भारत, महाराष्ट्र तसेच पुण्याची वैशिष्ट्ये ठळक दिसतील अशा पद्धतीने नियोजन करावे. देशाची प्रतिमा या परिषदेच्या आयोजनातून अधिक उंचावण्याची संधी मिळत असल्याने त्यादृष्टीने तयारी करावी.

पुण्यातील ऐतिहासिक महत्त्वाची वारसा ठिकाणे, मानाचे गणपती, शैक्षणिक ठिकाणे, उद्योग आदी ठिकाणी परिषदेतील प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन करण्यात येईल. शहरातील सौंदर्यीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. देश, राज्य तसेच पुणे जिल्ह्याबाबत माहितीच्या लघुचित्रफीती, कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीस महसूल विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पर्यटन विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उद्योग विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, आरोग्य, महसूल, परिवहन विभाग आदींचे विभागस्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

२७ कोटींहून अधिक रकमेच्या बोगस कर परताव्यासंदर्भात वस्तू व सेवाकर विभागाकडून एकास अटक

मुंबई, दि. 2 : शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून 27 कोटींहून अधिक रकमेच्या बोगस कर परताव्या संदर्भात रहमत अली मोमीन, वय 26 वर्ष यांस दिनांक 1 नोव्हेंबर 2022 रोजी अटक करण्यात आली. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सन 2022-23 मधील केलेल्या कार्यवाही पैकी ही 48 वी अटक आहे.

मे. फ्लोवेज मार्केटिंग (ओपीसो) प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. आऊटसोर्स ऑप्टिमायझेशन (ओपीसी) प्रा.लि. या कंपन्यांबाबत वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात या कंपन्याची निर्मीती आणि कामकाज चालवणाऱ्या सूत्रधारांपैकी रहमत अली मोमीन ही एक व्यक्ती असल्याचे आढळून आले. हा आरोपी या कंपन्यांचा एकमेव संचालक असून त्याने 238 कोटी रूपयांची बोगस देयके जारी केली असून या आरोपीने 27.20 कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचा जीएसटी परतावा प्राप्त केला होता. याप्रकरणातील आणखी काही सूत्रधारांचा तपास सुरू आहे.

महानगर दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कार्यवाही अन्वेषण क विभागाच्या सहायक राज्यकर आयुक्त रूपाली काळे, अजित विशे, श्रीनिवास राऊत, बाळकृष्ण क्षिरसागर आणि बापुराव गिरी यांनी संयुक्तपणे राबवली आहे.ही संपूर्ण कार्यवाही महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागातील अन्वेषण- क विभागाचे राज्यकर उपायुक्त, दिपक गोजमगुंडे व अनिल भंडारी (भा.प्र.से.), राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-क यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

भिडे गुरुजी पूर्वीच्या प्रथा परत आणू इच्छित आहेत -रुपाली पाटलांसह सुषमा अंधारेंचा प्रहार

पुणे- साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लाऊन ये मगच तुझ्याशी बोलतो ‘ असे वादग्रस्त विधान मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला आलेल्या भिडे गुरुजी यांनी केल्याने महिला वर्गात खळबळ उडाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील यांनी,’ ते आता म्हातारं माणूस झालेले आहेत. ते’साठी बुद्धी नाठी’ म्हटलं तरी चालेल, अशा माणसांचे बाईटच घेऊ नयेत. हे महिलांना अपमान करत आहेत, पूर्वीची प्रथा ते परत आणू इच्छित आहेत. असे म्हटले आहे रुपाली पाटील म्हणाल्या, “मुळात बाईनं टिकली लावायची की नाही हा तिचा वैयक्तिक अधिकार आहे. ती कुठल्या धर्माची आहे हे महत्वाचं नाही. कारण कुठल्या धर्मात जन्माला येताना धर्म मागून जन्माला येत नसतं. भिडे गुरुजींचं कुठे मनावर घेता…

“ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “संभाजी भिडे यांनी कोणत्या धर्माचं पालन करावं, कोणता धर्माची आचारसंहिता मानावी हा सर्वस्वी भिडे यांचा प्रश्न आहे. पण भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण तीन कलम १९ मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या धर्माप्रमाणं राहण्याचा, आचरण करण्याचा स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कुठलीही वेशभुषा करावी यावर इतर कोणी भाष्य करु नये. हा प्रकार निषेधार्ह आहे. याद्वारे तुम्ही एखाद्याच्या आचार स्वातंत्र्याचा घाला आहे”

भाजपचे आध्यात्मिक आघाडी समर्थन करणार नाहीतुषार भोसले

संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले म्हणाले, कुठल्याही धर्मात किंवा संस्कृतीत महिलांचा अनादर करणं हे बसत नाही. महिलांचा सन्मान करणं हीच आपली संस्कृती आहे. महिलांचा सन्मान केला जावा हीच आमची भूमिका आहे. पण ते कशामुळं असं बोलले हे मला सांगता येत नाही. त्यामुळं ते जे बोलले आहेत ते अयोग्य बोलले आहेत, त्यामुळं या गोष्टीचं आम्ही कदापी समर्थन करणार नाही.

“आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो”, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं विधान

संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

मुंबई- शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर त्यांच्याशी एका महिला पत्रकारानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आधी कुंकू लाव त्यानंतरच तुझ्याशी बोलेनं अशा शब्दांत भिडे यांनी बोलण्यास नकार दिला.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना एका मराठी टिव्ही चॅनेलच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे वादग्रस्त विधान केले.

संजय राऊतांना जामिनासाठी पुन्हा पुढची तारीख

मुंबई- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण त्यावर कोणताही निर्णय झाला नसून त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी न्यायालात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.

संजय राऊतांच्या जामीनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. मात्र निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे.