Home Blog Page 1545

“मनपा कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास तत्वतः मान्यता”

पुणे :- पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणेच 8.33% बोनस व सानुग्रह अनुदान मिळावे, या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या गेटवर विविध आंदोलने करण्यात आली. त्याचे दखल घेऊन आज पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये कंत्राटी कामगार हे कायम कामगारांप्रमाणेच सारखेच काम करत असून कायम कामगारांना मात्र 8.33% बोनस व 19 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आणि कंत्राटी कामगारांना मात्र काहीही देण्यात आलेले नाही. हा त्यांच्यावर अन्याय झाला आहे. ही बाजू कामगार संघटनांनी यांनी यावेळी मांडली ते पुढे म्हणाले कंत्राटी कामगार कायदा अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार या सर्व कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांन प्रमाणे बोनस व सानुग्रह अनुदान दिले पाहिजे. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये डॉ खेमनार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले. सदर बाबींचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव स्थायी समिती व मुख्य सभेपुढे मांडू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, मुख्य लेखापाल उल्का कळस्कर, विधी सल्लागार हे उपस्थित होते.कामगार संघटनेचे एस के पळसे, सिताराम चव्हाण, विजय पांडव, उज्वल साने, जानवी दिघे, संदीप पाटोळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
.

कृष्ण कान्हाई यांच्या चित्रातून साक्षात भगवान श्रीकृष्णाचे दर्शन – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पद्मश्री कृष्ण कान्हाई यांनी साकारलेल्या चित्रांमधून साक्षात भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घडते, अशी भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. आपल्या चित्रांमध्ये सोन्याचा वापर करून त्या चित्रांना सुवर्णापेक्षा जास्त किंमत मिळवून दिली आहे. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम इस्कॉनला देणगी स्वरुपात दिली जाणार आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

वरळी येथील ताओ आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पद्मश्री कृष्ण कान्हाई यांच्या चित्र प्रदर्शनाला मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी भेट दिली. यावेळी शायना एन.सी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

भगवान श्रीकृष्णावर अगाध श्रध्दा असणाऱ्या श्री. कान्हाई यांच्या २४ चित्रांचे प्रदर्शन सध्या ताओ आर्ट गॅलरी येथे सुरू आहे. आतापर्यंत १५ हजारांहून अधिक चित्र साकारणाऱ्या पोट्रेट आणि गोल्ड पेंटिंग यामध्ये निपुण असणारे श्री. कान्हाई यांनी या चित्र प्रदर्शनात कृष्णाची विविध रूपे साकारून याला मिडास टच दिला असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

१९७६ पासून चित्रकारी करणाऱ्या श्री. कान्हाई यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे पोट्रेट (व्यक्तिचित्र) तयार केले असून गुजरात येथील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे ठेवण्यात आले आहे. याशिवाय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे पोट्रेट (व्यक्तिचित्र) नवी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आले आहे.

8 नोव्हेंबरला चंद्रग्रहण

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर (मंगळवार) रोजी होणार आहे. भारताच्या पूर्वेकडील शहरांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण आणि उर्वरित शहरांमध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसेल. सर्वप्रथम, अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे संध्याकाळी 4.23 पासून संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्रोदयासह ग्रहणही दिसणार आहे. नासाच्या अधिकृत वेबसाईटनुसार 8 नोव्हेंबरचे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक, अमेरिका या देशांमध्ये दिसणार आहे. काही ठिकाणी चंद्रग्रहण पूर्ण, काही ठिकाणी आंशिक तर काही ठिकाणी मांद्य चंद्रग्रहण दिसणार आहे.

उज्जैनच्या जिवाजी वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्र गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात चंद्रग्रहण दुपारी 2.38 वाजता सुरू होईल. देशाच्या पूर्वेकडील भागात कोलकाता, कोहिमा, पाटणा, पुरी, रांची आणि इटानगरच्या जवळपासच्या शहरांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल आणि उर्वरित भारतामध्ये आंशिक (खंडग्रास) चंद्रग्रहण दिसेल. जेथे पूर्ण ग्रहण असेल तेथे चंद्र लाल दिसेल.

www.timeanddate.com या वेबसाइटनुसार, न्यूयॉर्कमध्ये 8 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.02 वाजता ग्रहण सुरू होईल, पूर्ण चंद्रग्रहण पहाटे 5.16 वाजल्यापासून दिसेल आणि 6.41 वाजता चंद्रग्रहण अस्त होईल. यावेळी भारतात संध्याकाळचे 4.11 वाजलेले असतील. यानंतर भारतात चंद्रोदयानंतर ग्रहण दिसू लागेल.

राज्यातील नाटय़गृहे अद्ययावत करण्याचा सांस्कृतिक कार्य मंत्री यांचा निर्धार

मुंबई : मराठवाडा मुक्‍ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येईल. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतून उत्कृष्ट ठरणारा लोगो आणि पोस्टरची अंतिम निवड करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्‍ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाडयात शासकीय सांस्कृतिक उपक्रम आयोजित करणे तसेच सांस्कृतिक कार्य विभागातील विविध विषयांवरील बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, उपसचिव विद्या वाघमारे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या संग्रमाची माहिती सोप्या आणि सहज भाषेत लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मराठवाडा सांस्कृतिक महोत्सव मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येईल. मराठवाड्यातील स्थानिक कलाकारांना यामध्ये प्रामुख्याने समावेश असेल. याशिवाय मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास उलगडून हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष गीत तयार करण्यात येईल.

सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत यावर्षी ६ महसूली ठिकाणी विभागीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र हा महोत्सव विभागीय स्तरावर ना करता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘ महासंस्कृती महोत्सव‘ आयोजित करण्यात येईल असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

नाट‌्य़गृहे अद्ययावत करणार ; हौशी रंगभूमी ला बळ देणार!

नाट्य चळवळ सुरू राहावे याकरिता राज्यातील नाट्यगृह आधुनिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करताना नाट्यगृहांमध्ये सोलर, एअर कंडीशन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, नाट्यगृहाच्या खुर्च्या, मेकअप रूम, प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पार्किंग या सगळया बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी मराठी सिनेमांना प्रोत्साहनामार्फत अनुदान देण्यात येते. हे अनुदान देताना सिनेमाचे स्क्रिनिंग तीन महिन्यात पूर्ण करण्यात येऊन याबाबत निर्णय घेण्यात यावा. तसेच काही वेगळे सिनेमा यांची निर्मिती त्या वर्षात केला असल्यास त्यांनाही यामध्ये समावेश करण्यात यावे. महाराष्ट्राच्या कलाकारांना विविध घटकांना एकत्र आणता येईल अशा कलासंकुलाची निर्मिती येणाऱ्या काळात करण्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे नियोजन असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यापूर्वी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजेत्या ठरलेल्या सांघिक संघाला पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र यापुढे विजेत्या संघातील प्रत्येक कलावंतांस सहभाग घेतल्यबद्दल प्रमाणपत्र देण्यात यावे यासंदर्भात व नाट्य स्पर्धेचे, नाटकाचे परीक्षण करणाऱ्यांना देण्यात येणारे मानधन यामध्ये वाढ करण्याचा विचार शासनामार्फत करण्यात येईल असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीकरिता १ व २ डिसेंबरला चाळणी परीक्षा

मुंबई, दि.४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरिता  विविध संवर्गासाठी  संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा १ व २ डिसेंबर २०२२ रोजी  घेण्यात येणार आहे.

परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येणार आहे. विविध विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गट अ, प्रशासकीय अधिकारी गट ब व सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब संवर्ग करिता एकत्रितरीत्या चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकत्रित चाळणी परीक्षा मधील गुणांच्या आधारे अर्ज केलेल्या संबंधित संवर्गाच्या निवडीसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांचा विचार करण्यात येईल, तसेच एकत्रित परीक्षेमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव दक्षता, धोरण व संशोधन यांनी सांगितले आहे.

या परीक्षेची माहिती उदा. शासनाचा विभाग, संवर्ग, परीक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षेची तारीख यासंदर्भातील सविस्तर माहिती लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘यूपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु

मुंबई, दि. ४ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. २५ नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाइन पद्धतीने) घेण्यात येईल परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन मधील निधीचे सर्वांना समान वाटप विकासकामांमध्ये राजकारण नाही -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर -पुणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा नियोजनमधील ३०३ कोटींच्या कामांच्या मंजुरीसंदर्भात झालेल्या बैठकीत सर्वांना निधीचे समान वाटप करण्यात आले असून, कोणावरही अन्याय करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच विकासकामांमध्ये कधीही राजकारण करत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नवीन सरकारच्या स्थापनेनंतर जिल्हा नियोजनमधील आधीच्या कामांना स्थगिती दिली होती. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर ही स्थगिती उठवताना, प्रत्येक काम तपासून घेण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन सचिवांकडून सर्व कामांचा आढावा घेऊन ३०३ कोटीच्या कामांना मंजुरी दिली. यात विरोधी आमदारांच्या एकही रुपयांच्या कामांना कात्री न लावता सर्वांना समान वाटप होईल, अशा पद्धतीने कामे मंजुर केली आहेत.

ते पुढे म्हणाले की, अजित पवार पालकमंत्री असताना जिल्हा नियोजनमधून आमदारांना निधीचे असमान वाटप झाले होते. माननीय अजितदादांनी स्वत: साठी ८० कोटी रुपये घेतले होते. तर दिलीप वळसे पाटील आणि दत्तात्रयमामा भरणे यांना ४० कोटी रुपये दिले होते. यापैकी निम्मा निधी कमी करुन, तुर्तास सर्वांना समान वाटप केले आहे. तसेच, जी निम्मी कामे राखून ठेवली आहेत; त्यांचे वर्षाअखेरिस पुनर्विलोकन करुन ती कामे केली जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निधी वाटपावर बोलताना श्री पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपा आमदारांना शून्य निधी मिळत होता. तेव्हा आम्ही कुठेही केलेले नाही. विकासामध्ये आम्ही कधीही राजकारण करत नाही. त्यामुळे सर्व आमादारांना समान न्याय देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३०३ कोटीच्या कामांना निधी मंजूर केला आहे.

छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

मुंबई, दि. ४ : सर्वसाधारणपणे मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून ही मतदार यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकनार्थ उपलब्ध असेल, यासंदर्भात दावे व हरकती दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील तर दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी  मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाईल.

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार  १ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी तयार करणे, ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे. त्याचप्रमाणे, दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिव्यांग व महिलांसाठी आणि दि.२६ व २७ नोव्हेंबर, २०२२ रोजी तृतीयपंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

या कालावधीत दिनांक १ जानेवारी २०२३  रोजी १८ वर्ष वय पूर्ण होत असलेल्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार असून ज्या नागरिकांचे दि. १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ वर्ष वय पूर्ण होणार आहे, ते पण नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करु शकतील, असे जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भातील दावे व हरकती असल्यास त्या  दिनांक २६ डिसेंबर २०२२ पर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत आणि यानंतर दि. ५ जानेवारी, २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाईल.

या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई शहर जिल्हयातील नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी आणि यासंदर्भात काही दावे व हरकती असल्यास  त्या सुद्धा कळवाव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी केले आहे.

बाणेर बालेवाडीतील हॉटेल्सच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हाथोडा

पुणे- वाहतूक कोंडीने पुणे शहर आणि परिसराला त्रस्त करून सोडलेले असताना या कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या बाबींपैकी एक अशी संबोधली जाणारी व्यावसायिक अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे बांधकाम विभागाने आपल्या रडार खाली आणली आहेत. आज बाणेर बालेवाडी भागातील अशा हॉटेल्स वर महापालिकेचा हाथोडा दणाणला .

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बाणेर बालेवाडी भागातील रुफ टॉप हॉटेल, साईड मार्जिन व फ्रन्ट मार्जिन हॉटेलवर बांधकाम विकास विभाग झोन क्र. ३ यांचे मार्फत आज दिनांक ०४/११/२०२२ रोजी कारवाई नियोजित करण्यात आलेली होती. सदर कारवाई मध्ये हॉटेल विन्टेज ७ (रुफ टॉप हॉटेल), तसेच हॉटेल बासुरी, हॉटेल सोय। अफेरर्स व हॉटेल रुस्तल नेस्ट (साईड मार्जिन व फ्रंन्ट मार्जिन) या हॉटेलचे अनधिकृत सुमारे ६४००.०० चौ.फूट मापाचे बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी गॅस कटर व जे.सी.बी चा वापर करण्यात आला. या कारवाईकरीता पोलीस स्टाफ, अतिक्रमण स्टाफ, इंजिनिअर उपस्थित होते. ही कारवाई पालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता जे.बी. पवार, कनिष्ठ अभियंता संग्राम पाटील, कनिष्ठ अभियंता संदेश कुळवमोडे, कनिष्ठ अभियंता गंगाप्रसाद दंडीमे यांचे पथकाने कारवाई केली.

दोन्ही आयुक्तांचा संयुक्त दौरा तर झाला पण.. सायकल ट्रॅक आणि बीआरटीवर बोलणे काहीच झाले नाही ?

पुणे : शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत आज शहरातील विविध मार्गांची पाहाणी करून ‘ऑन द स्पॉट’ काही सूचना केल्या.बीआरटी किंवा सायकल मार्ग काढून रस्ते सर्वांना मोकळे करून देण्याच्या विषयावर चर्चा झाली किंवा नाही हे मात्र महापालिकेने स्पष्ट केलेले नाही.रस्त्याच्या बाजूला असलेल्या इमारतींच्या फ्रंट,साईड मार्जिन मधील अतिक्रमणे,दुकानांसमोरच्या जाळ्या काढणे,अवजड वाहनांना राखीव ठेवलेले भूखंडावर, वाहनतळावर देखील महापालिकेने पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकात गंभीर असा उल्लेख केलेला नाही.

मागील काही महिन्यांपासून अर्थात पावसाळ्याच्या सुरूवातीपासून शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसून येत होती. चोवीस तास पाणी पुरवठा योजना व अन्य सेवावाहीन्यांसाठीच्या खोदाईमुळे रस्ते खड्डेमय झाल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडत होती. अशातच वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच जाणवत नसल्याने ६० लाख पुणेकरांनी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीदेखील प्रचंड वाहतूक कोंडीमध्येच गेली. यावरून सर्वच स्तरातून टीका सुरू झाल्यानंतर अनेकांनी पोलिसांवर जबाबदारी ढकलून महापालिका प्रशासनाला मोकळे सोडून दिले होते.त्यानंतर पोलिसांनी महापालिकेने केलेल्या कोणत्या कार्यपद्धतीने कशी वाहतूक कोंडी होते ते स्पष्ट करणारे लेखी पत्र दिले होते.

पाउस थांबताच पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. तसेच खड्डेमय रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निविदा प्रक्रिया देखिल राबविली. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून ८१५ ट्रॅफीक वॉर्डनही उपलब्ध करून दिले. तर वाहतूक पोलिसांमुळे होत असलेल्या आरोपांची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांसोबतच पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना जबाबदार धरत त्यांनाही वाहतूक नियंत्रणात गुंतवले. यापुढे जाउन आज गुप्ता यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देउन वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानुसार उपस्थित अधिकार्‍यांना उपाययोजनांबाबत सूचनाही दिल्या.आज झालेल्या चर्चेतून काम सुरू नसताना कुठल्याही रस्त्यांवर बॅरीकेडींग करून रस्ते अडविणार्‍या संबधित ठेकेदार कंपन्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे देखिल आदेश दोन्ही आयुक्तांनी यावेळी दिले.असे सांगण्यात आले. महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त संयुक्तरित्या दौरा असल्याने शहरातील बहुतांश गर्दीच्या रस्त्यांवर वाहतूक आणि पोलिस ठाण्यातील पोलिस तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची पथके दिसून आली.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सकाळी खराडी आणि जेल रोड परिसरातील रस्त्यांवर पाहाणी केली. यानंतर विक्रम कुमार यांच्यासोबत गणेश खिंड रस्त्यावरील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक, पुणे विद्यापीठ चौक,बाणेर,चांदणी चौक,नवले पूल आणि सिंहगड रस्ता परिसरात सुरू असलेली मेट्रो,उड्डाणपुलांच्या कामाच्या ठिकाणची पाहाणी केली. गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपुलासाठी पायलिंगचे काम सुरू होईस्तोवर विद्यापीठ चौकातून जवाहर चौकात यु टर्न घेउन सेनापती बापट रस्त्याकडे जाण्याचा रस्ता खुला करण्याची सूचना करण्यात आली. या सूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी टाटा कंपनीने मेट्रोच्या कामगारांसाठीचा कंटेनर काढून घेउन रस्ता खुला करण्यात आला. याठिकाणी पायलिंगचे काम सुरू झाल्यानंतर हा रस्ता बंद करण्याचे आदेश देण्यात आले. सेनापती बापट रस्त्याने मॉर्डन शाळेच्या मैदानातून पाषाणकडे जाणार्‍या रस्त्याचे काम पुढील आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

बाणेर रस्त्यावर ज्या ठिकाणी मेट्रोने पिलर उभारणीचे काम पूर्ण केले आहे. परंतू अद्याप पुढील काम करण्यास अवधी आहे, तेथील बॅरीकेडस काढून रस्त्याची वहन क्षमता वाढविण्याची सूचना करण्यात आली. तसेच दोन महिन्यांहून अधिक काळ काम बंद असतानाही बॅरीकेडस् लावल्याचे आढळल्यास संबधित ठेकेदारांवर कारवाई करावी, असे आदेश स्थानीक पोलिसांना यावेळी देण्यात आले. चांदणी चौकातील कामही जून २०२३ अखेर पूर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अधिकार्‍यांना आदेश देण्यात आले. अपघात प्रवण नवले पुलावर अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्राथमिक कामांची देखिल दोन्ही आयुक्तांनी पाहाणी केली.
याप्रसंगी गेली सुमारे १५ वर्षांहून अधिक काल वाहतूक विभागचे काम करत आलेले महापालिकेचे मुख्य प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला,पथ विभागाचे प्रमुख व्हि.जी. कुलकर्णी,अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप
वाहतूक शाखेच्या प्रभारी भाग्यश्री नवटके वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

या दौऱ्यात नेमके काय ठरले याबाबत महापालिकेने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे –

(१) सेनापती बापट रस्ता ते पाषाण रस्त्याला जोडणारा मॉडर्न हायस्कूल मधून हलक्या वाहनांसाठी
पर्यायी रस्ता १५ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावा.
(२) मेट्रोचे काम ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे बॅरिकेटिंग ठेवून इतर सर्व
ठिकाणचे बॅरिकेटिंग जवळ घेण्यात यावे जेणेकरून वाहतुक सुरळीत होणेस मदत होईल अशा सूचना देण्यात आल्या.
(३) मेट्रो मार्फत काम चालू नाही व गरज नसताना ज्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे.त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने मेट्रो विभागावर कारवाई का करण्यात येवू नये याबाबत खुलासा मागविण्यात यावा.मेट्रो कामाच्या व्यतिरिक्त खाजगी वाहने, बस इ. बॅरिकेटिंग मध्ये
उभी करू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या.
(४) मेट्रोचे काम चालू असलेल्या ठिकाणी पडलेले सर्व खड्डे, चेंबर्स इत्यादी समपातळीत करण्याची कार्यवाही मेट्रो विभागाकडून करण्यात यावी.
(५) विकसनाचे काम चालू असलेल्या रस्त्यावर व बॅरिकेटिंग केलेल्या रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणेस सक्त मनाई करून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई करणेबाबतच्या सूचना देण्यात आल्या.

(६) चांदणी चौकातील सर्व्हिस रस्त्याचे काम व २ उड्डाणपूल अॅप्रोच रस्त्याचे काम पुढील १० दिवसात पूर्ण करणेसाठी सूचना देण्यात आल्या. तसेच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी पुढील ६ महिन्यांत चांदणी चौकातील सर्व विकसनाची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त यांना दिले.
(७) नवले पूल परिसरात जागा पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी बसविलेले रम्बलर, कॅमेरे इत्यादी जागा पाहणी करून वाहतुकीची बेटे (चॅनेलायझर) वाढविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.
(८) सिंहगड रस्ता उड्डाणपूलाची जागा पाहणी करून तेथे अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणे करण्यात येवू नये तसेच ठेकेदारस बॅरिकेटिंग जवळ घेण्यास सूचना देण्यात आल्या.
(९) विविध विकसनाच्या कामांतर्गत उपलब्ध झालेले ट्रॅफिक वॉर्डन यांनी पोलिस उप आयुक्त वाहतुक शाखा यांना रिपोर्ट करणेबाबतच्या सूचना देण्यात आल्या.

मी काय दहशतवादी आहे का? सुषमा अंधारे संतापल्या

जळगाव : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेला मुक्ताईनगरमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे जळगावमध्ये तणाव निर्माण झाला असून जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. अंधारे यांचा ताफा अडवल्यानंतर अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच सभा घेण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलं.सुषमा अंधारे म्हणाल्या की, मला कळत नाही की काय होतय. साधारण ५०० पोलिसांनी गराडा घातला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असून तणाव निर्माण झाला आहे. माझा काय गुन्हा आहे हेही कळत नाही. माझा गुन्हा काय असा प्रश्न विचारायचा अधिकार मला आहे. माझा पोलिसांवर राग नसून ते आपलं काम करत आहे. मात्र मी दहशतवादी आहे की, ३०२ ची आरोपी आहे असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला. गुलाबराव पाटील सुडाचं राजकारण का करत आहेत, असा आरोपही अंधारे यांनी केला आहे.

ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट करून घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. 04 : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधरकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेर मीटर 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत रिकॅलिब्रेट करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी केले आहे.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. ऑटो रिक्षा व टॅक्सी धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम 1.5  किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 21 रुपये होता. आता वाढीव दर 23 रुपये, असा ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी  14.20 पैसे होता,तो आता 15.33 पैसे केला आहे.  टॅक्सीसाठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वी 25 रुपये होते. तो आता 28 रुपये असा ठरविण्यात आला.असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी  16.93 पैसे होता, तो आता 18.66 पैसे व कूल कॅब (वातानुकूलित) साठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वीचा दर 33 रुपये  भाडेदर होता, तो आता 40 रुपये  असा दर ठरविण्यात आला असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 22.26 पैसे होता, तो सुधारित 26.71 पैसे असा ठरविण्यात आला आहे. ही भाडेवाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून अंमलात आली आहे.

प्रवाशांना योग्य प्रकारे भाडे आकारणी करण्याकरिता ऑटो रिक्षा व टॅक्सीमध्ये बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये नवीन भाडेदराप्रमाणे दुरुस्ती करुन या संबंधित कार्यालयामार्फत रिकॅलिब्रेशन तपासून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयामध्ये नोंदणीकृत असलेल्या ऑटो रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी परवानाधारकांसाठी रिकॅलिब्रेट केलेल्या मीटरच्या चाचणीसाठी यंत्रणा कार्यरत आहे. तारखेनुसार पूर्व नियोजित वेळ घेवून इलेक्ट्रॉनिक मीटर रिकेलिब्रेट केलेल्या वाहनांची चाचणी पूर्व द्रुतगती महामार्ग ( गोदरेज कंपनी गेट क्र. ०२, विक्रोळी पूर्व, मुंबई) या ठिकाणी दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत करण्यात येत आहे.

ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंत एकूण ऑटो रिक्षांपैकी केवळ ११ टक्के परवानाधारकांनी चाचणीसाठी वाहन हजर करून मीटर चाचणी उत्तीर्ण केली आहे. तसेच ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंत एकूण काळी-पिवळी टॅक्सींपैकी केवळ ४ टक्के परवानाधारकांनी चाचणीसाठी वाहन हजर करून मीटर चाचणी उत्तीर्ण केली आहे. हे प्रमाण अत्यल्प असून रिकॅलिब्रेट केलेल्या इलेक्ट्रॉनिक फेअर मोटरसह वाहने या कार्यालयाकडून चाचणी करीता सादर करुन तपासून घेणे आवश्यक आहे.

रिकेलिब्रेशनसाठीची मुदत प्राधिकरणाने दि. ३० नोव्हेंबर २०२२ अखेरची दिली असल्याने त्यानंतर मीटर रिकेलिब्रेशन चाचणीसाठी येणाऱ्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल.

विहित वेळेत रिकॅलिब्रेशन करून कार्यालयामार्फत घेण्यात आलेली चाचणी उत्तीर्ण केली नसल्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या ठरावाप्रमाणे प्रत्येक दिवस एक दिवस परवाना निलंबन मात्र किमान 7 दिवस, जास्तीत जास्त 90 दिवस किंवा मुदत समाप्तीनंतर प्रतिदिन  50 रुपये  आणि जास्तीत जास्त 5 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी 30 नोव्हेंबर, 2022 पूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे नोंदणीकृत असलेल्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी त्यांचे इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर वाढीव भाडेदराप्रमाणे रिकॅलिब्रेट करून  घ्यावे.

रिकॅलिब्रेशनची मुदत दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत  असली तरी वाढीव भाडेदर हे दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत. रिकॅलिब्रेट होईपर्यंत सर्व प्रवाशांना व ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकांना ठरवून देण्यात आलेले दराप्रमाणे प्रवासाचे भाडे अदा करता येतील व घेता येतील. दर हे क्यूआर कोडसह विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑटो रिक्षा व टॅक्सी भाडेवाढ नवीन (New) या टॅबवर क्लिक करून ऑटो रिक्षा, काळी-पिवळी व कूल कॅब टॅक्सीसाठी दराचा आधार घेऊनच भाडेदर प्रवाशांनी अदा करावेत. तसेच संकेतस्थळावर दर हे क्यूआर कोडसह प्रदर्शित केले असल्याने हा क्यूआरकोड ग्राह्य धरण्यात यावा. तसेच ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी देखील रिकॅलिब्रेट होईपर्यंत या दराचा वापर करावा आणि प्रवाशांकडून योग्य भाडेदर आकारावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच दि. 1 ऑक्टोबर, 2022 नंतर आटो रिक्षा व टॅक्सी चालकांकडून विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास त्याविषयीची तक्रार संबंधित  कार्यालयाकडे घटनेच्या इतर तपशीलासह करावी, असे परित्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

पुणे, दि.४: जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवण्यासाठी तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी ३ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत गावस्तरावर स्वच्छतेच्या विविध उद्दिष्ट पूर्तीकरीता सूक्ष्म नियोजन करुन कामे पूर्ण करण्यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कालावधीत जिल्ह्यातील स्वच्छतेच्या कामास गती देऊन स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी मंजूर केलेले वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, गोबरधन प्रकल्प, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शोषखड्डे बांधकाम, नादुरुस्त शौचालय दुरूस्ती करणे आदी प्रकारे सुरु असलेली सर्वप्रकारची कामे पूर्ण करण्यात येणार आहे.

या विशेष स्वच्छता मोहीम कालावधीत ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन सार्वजनिक ठिकाणचे स्वच्छता करण्यात येणार आहेत. एक शोषखड्डे असलेले शौचालयाचे दोन शोषखड्डे शौचालयात रुपांतर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनपूर्वक कामे करण्याचे आवाहन मिलिंद टोणपे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद पुणे यांनी केले आहे.
000

आणिबाणीच्या कालावधीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना मानधन

पुणे जिल्ह्यात ५१५ लाभार्थ्यांना २७ महिन्यांच्या मानधनाचे १२ कोटी १७ लाख रुपये वितरीत करण्यात येणार

पुणे, दि. ४: देशामध्ये १९७५ ते १९७७ या कालावधीत घोषित आणिबाणी कालावधीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना गौरवार्थ मानधन देण्याबाबतची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानुसार ऑगस्ट २०२० ते ऑक्टोबर २०२२ असे २७ महिन्यांच्या मानधनाची एकूण १२ कोटी १७ लाख २ हजार ५०० रुपये रक्कम पात्र ५१५ लाभार्थ्यांना वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. याव्यतिरिक्त या योजनेत नव्याने २३ पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आल्याने एकूण लाभार्थीसंख्या ५३८ झाली आहे.

देशामध्ये २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत आणिबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत मिसा अंतर्गत तसेच डी. आय. आर. (आणिबाणी) राजनैतीक अथवा सामाजिक कारणासाठी बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा सन्मान व यथोचित गौरव करण्याबाबत धोरण राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील ३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेले आहे.

या धोरणानुसार एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा १० हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस/ पतीस ५ हजार रुपये; तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना ५ हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस दरमहा २ हजार ५०० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तथापि, ही योजना ३१ जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार बंद करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने २८ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय जारी करुन पुन्हा ही योजना सुरु केली असून ऑगस्ट २०२० पासूनचे सर्व महिन्यांचे मानधन वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या लाभार्थ्यांचे मानधन फरकासह जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले असून तात्काळ तहसील निहाय वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

त्यानुसार पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या यादीतील एकूण ५१५ लाभार्थ्यांना फरकासह २७ महिन्यांचे मानधन वितरीत करण्यात येणार आहे. तसेच चौथ्या यादीतील नव्याने पात्र २३ लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२२ अशी ३ महिन्यांच्या मानधनाची ५ लाख ४० हजार रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.

तहसीलनिहाय एकूण लाभार्थीसंख्या (कंसात नव्याने पात्र लाभार्थी संख्या):- पुणे शहर- २३८ (९), हवेली- १६१ (८), अपर तहसील पिंपरी चिंचवड- ६१ (४), खेड- ४ (१), मुळशी- ८ (१), भोर- १३, मावळ- १९, दौण्ड-३, बारामती- ३, पुरंदर-२, जुन्नर-३, शिरुर-२२ आणि इंदापूर-१ लाभार्थी.

महावितरणकडून प्रदर्शनीद्वारे वीजग्राहकांचे प्रबोधन

पुणे, दि. ०४ नोव्हेंबर २०२२: इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम)च्या पुणे विभागाकडून आयोजित तीन दिवसीय ‘एक्स्पो-२०२२’ प्रदर्शनीमध्ये महावितरणच्या पुणे परिमंडलाकडून वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी महावितरणची ग्राहकसेवा, वीजसुरक्षा, वीजबचतीबाबत माहितीपत्रक वितरीत करण्यात आले.

वीजक्षेत्रातील अत्याधुनिक उपकरणे व नाविन्यपूर्ण संकल्पना याबाबत माहिती देण्यासाठी कर्वे रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्समध्ये आयोजित तीन दिवसीय ‘एक्स्पो-२०२२’ प्रदर्शनीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ४) एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक यांच्याहस्ते झाले. महावितरणकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनीद्वारे वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. महावितरणचे सोलर रुफ टॉप, ई-व्हेईकल, मोबाईल अॅप, ऑनलाइन वीजबिल भरणा, पर्यावरणपुरक गो-ग्रीन योजना आदींसह वीजसुरक्षेचे महत्व व खबरदारी, वीजबचतीचे उपाय आदींबाबत प्रदर्शनीला भेट दिलेल्या वीजग्राहकांना माहिती देण्यात आली. तसेच संबंधीत माहितीचे पत्रकही वितरीत करण्यात आले.

एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक यांनी या प्रदर्शनीला भेट दिली. यावेळी मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत, श्री. सतीश राजदीप, कार्यकारी अभियंता श्री. संजीव राठोड, श्री. दत्तात्रेय साळी, श्री. संजय वाघमारे आदींची उपस्थिती होती. तीन दिवसीय प्रदर्शनीमध्ये ग्राहक सुविधा केंद्रांचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे व राकेश महाजन, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी व ग्राहक सुविधा केद्रांतील कर्मचारी महावितरणच्या ग्राहकसेवेची माहिती देत आहेत.