पुणे : शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत आज शहरातील विविध मार्गांची पाहाणी करून ‘ऑन द स्पॉट’ काही सूचना केल्या.बीआरटी किंवा सायकल मार्ग काढून रस्ते सर्वांना मोकळे करून देण्याच्या विषयावर चर्चा झाली किंवा नाही हे मात्र महापालिकेने स्पष्ट केलेले नाही.रस्त्याच्या बाजूला असलेल्या इमारतींच्या फ्रंट,साईड मार्जिन मधील अतिक्रमणे,दुकानांसमोरच्या जाळ्या काढणे,अवजड वाहनांना राखीव ठेवलेले भूखंडावर, वाहनतळावर देखील महापालिकेने पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकात गंभीर असा उल्लेख केलेला नाही.
मागील काही महिन्यांपासून अर्थात पावसाळ्याच्या सुरूवातीपासून शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसून येत होती. चोवीस तास पाणी पुरवठा योजना व अन्य सेवावाहीन्यांसाठीच्या खोदाईमुळे रस्ते खड्डेमय झाल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडत होती. अशातच वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच जाणवत नसल्याने ६० लाख पुणेकरांनी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीदेखील प्रचंड वाहतूक कोंडीमध्येच गेली. यावरून सर्वच स्तरातून टीका सुरू झाल्यानंतर अनेकांनी पोलिसांवर जबाबदारी ढकलून महापालिका प्रशासनाला मोकळे सोडून दिले होते.त्यानंतर पोलिसांनी महापालिकेने केलेल्या कोणत्या कार्यपद्धतीने कशी वाहतूक कोंडी होते ते स्पष्ट करणारे लेखी पत्र दिले होते.
पाउस थांबताच पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. तसेच खड्डेमय रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निविदा प्रक्रिया देखिल राबविली. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून ८१५ ट्रॅफीक वॉर्डनही उपलब्ध करून दिले. तर वाहतूक पोलिसांमुळे होत असलेल्या आरोपांची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांसोबतच पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना जबाबदार धरत त्यांनाही वाहतूक नियंत्रणात गुंतवले. यापुढे जाउन आज गुप्ता यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देउन वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानुसार उपस्थित अधिकार्यांना उपाययोजनांबाबत सूचनाही दिल्या.आज झालेल्या चर्चेतून काम सुरू नसताना कुठल्याही रस्त्यांवर बॅरीकेडींग करून रस्ते अडविणार्या संबधित ठेकेदार कंपन्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे देखिल आदेश दोन्ही आयुक्तांनी यावेळी दिले.असे सांगण्यात आले. महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त संयुक्तरित्या दौरा असल्याने शहरातील बहुतांश गर्दीच्या रस्त्यांवर वाहतूक आणि पोलिस ठाण्यातील पोलिस तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची पथके दिसून आली.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सकाळी खराडी आणि जेल रोड परिसरातील रस्त्यांवर पाहाणी केली. यानंतर विक्रम कुमार यांच्यासोबत गणेश खिंड रस्त्यावरील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक, पुणे विद्यापीठ चौक,बाणेर,चांदणी चौक,नवले पूल आणि सिंहगड रस्ता परिसरात सुरू असलेली मेट्रो,उड्डाणपुलांच्या कामाच्या ठिकाणची पाहाणी केली. गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपुलासाठी पायलिंगचे काम सुरू होईस्तोवर विद्यापीठ चौकातून जवाहर चौकात यु टर्न घेउन सेनापती बापट रस्त्याकडे जाण्याचा रस्ता खुला करण्याची सूचना करण्यात आली. या सूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी टाटा कंपनीने मेट्रोच्या कामगारांसाठीचा कंटेनर काढून घेउन रस्ता खुला करण्यात आला. याठिकाणी पायलिंगचे काम सुरू झाल्यानंतर हा रस्ता बंद करण्याचे आदेश देण्यात आले. सेनापती बापट रस्त्याने मॉर्डन शाळेच्या मैदानातून पाषाणकडे जाणार्या रस्त्याचे काम पुढील आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
बाणेर रस्त्यावर ज्या ठिकाणी मेट्रोने पिलर उभारणीचे काम पूर्ण केले आहे. परंतू अद्याप पुढील काम करण्यास अवधी आहे, तेथील बॅरीकेडस काढून रस्त्याची वहन क्षमता वाढविण्याची सूचना करण्यात आली. तसेच दोन महिन्यांहून अधिक काळ काम बंद असतानाही बॅरीकेडस् लावल्याचे आढळल्यास संबधित ठेकेदारांवर कारवाई करावी, असे आदेश स्थानीक पोलिसांना यावेळी देण्यात आले. चांदणी चौकातील कामही जून २०२३ अखेर पूर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अधिकार्यांना आदेश देण्यात आले. अपघात प्रवण नवले पुलावर अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्राथमिक कामांची देखिल दोन्ही आयुक्तांनी पाहाणी केली.
याप्रसंगी गेली सुमारे १५ वर्षांहून अधिक काल वाहतूक विभागचे काम करत आलेले महापालिकेचे मुख्य प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला,पथ विभागाचे प्रमुख व्हि.जी. कुलकर्णी,अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप
वाहतूक शाखेच्या प्रभारी भाग्यश्री नवटके वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या दौऱ्यात नेमके काय ठरले याबाबत महापालिकेने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे –
(१) सेनापती बापट रस्ता ते पाषाण रस्त्याला जोडणारा मॉडर्न हायस्कूल मधून हलक्या वाहनांसाठी
पर्यायी रस्ता १५ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावा.
(२) मेट्रोचे काम ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे बॅरिकेटिंग ठेवून इतर सर्व
ठिकाणचे बॅरिकेटिंग जवळ घेण्यात यावे जेणेकरून वाहतुक सुरळीत होणेस मदत होईल अशा सूचना देण्यात आल्या.
(३) मेट्रो मार्फत काम चालू नाही व गरज नसताना ज्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे.त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने मेट्रो विभागावर कारवाई का करण्यात येवू नये याबाबत खुलासा मागविण्यात यावा.मेट्रो कामाच्या व्यतिरिक्त खाजगी वाहने, बस इ. बॅरिकेटिंग मध्ये
उभी करू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या.
(४) मेट्रोचे काम चालू असलेल्या ठिकाणी पडलेले सर्व खड्डे, चेंबर्स इत्यादी समपातळीत करण्याची कार्यवाही मेट्रो विभागाकडून करण्यात यावी.
(५) विकसनाचे काम चालू असलेल्या रस्त्यावर व बॅरिकेटिंग केलेल्या रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणेस सक्त मनाई करून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई करणेबाबतच्या सूचना देण्यात आल्या.
(६) चांदणी चौकातील सर्व्हिस रस्त्याचे काम व २ उड्डाणपूल अॅप्रोच रस्त्याचे काम पुढील १० दिवसात पूर्ण करणेसाठी सूचना देण्यात आल्या. तसेच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी पुढील ६ महिन्यांत चांदणी चौकातील सर्व विकसनाची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त यांना दिले.
(७) नवले पूल परिसरात जागा पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी बसविलेले रम्बलर, कॅमेरे इत्यादी जागा पाहणी करून वाहतुकीची बेटे (चॅनेलायझर) वाढविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.
(८) सिंहगड रस्ता उड्डाणपूलाची जागा पाहणी करून तेथे अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणे करण्यात येवू नये तसेच ठेकेदारस बॅरिकेटिंग जवळ घेण्यास सूचना देण्यात आल्या.
(९) विविध विकसनाच्या कामांतर्गत उपलब्ध झालेले ट्रॅफिक वॉर्डन यांनी पोलिस उप आयुक्त वाहतुक शाखा यांना रिपोर्ट करणेबाबतच्या सूचना देण्यात आल्या.