Home Blog Page 1542

संभाजी ब्रिगेडने पुण्यातील सर्व चित्रपटगृहातील ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडले; ‘मंगला’वरील पोस्टर फाडले

पुणे- संभाजी ब्रिगेड ने पुण्यात मंगला चित्रपटगृहातील ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडला. संभाजी ब्रिगेड चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, अविनाश अरविंद मोहिते महानगर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे शिवश्री संदीप मनोहर कारेकर सचिव महानगर पुणे नरेश पडवळ संघटक पुणे अमर गजघाटे अध्यक्ष चित्रपट आघाडी पुणे अभिजीत मोरे उपाध्यक्ष चित्रपट आघाडी पुणेतसेच, अखिल भारतीय मराठा महासंघ संजय पासलकर, संपर्क प्रमुख पश्र्चिम महाराष्ट्र, अजय पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र् प्रदेश, रविंद्र कंक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, सौ. सविताताई बलकवडे कार्याध्यक्ष पुणे शहर महिला, मयुर गुजर सरचिटणीस पुणे शहर, मंगेश साखरे कार्याध्यक्ष पुणे शहर, महेश बांदल, अर्चित बांदल, हर्षवर्धन बांदल… आदी उपस्थित होते. यांनी यावेळी , ‘हर हर महादेव’ चित्रपट दाखवणे थांबवा. चित्रपटगृहात पडदे फाटल्याशिवाय थेटर मालकांना अक्कल येणार नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत. इतिहासाची मोडतोड करून ‘हर हर महादेव…’ चित्रपट तयार केला आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ हा सुद्धा चित्रपट शेंबडी आणि फॉल्टी पोरांना घेऊन तयार करण्यात आलेला आहे. विचित्र रूपाचे मावळे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासातील हरामखोरी थांबवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तुत्वान इतिहास बदनाम करू नका…! गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. चित्रपटगृहाचे पडदे फाडल्याशिवाय तुम्हाला अक्कल येऊ येणार नाही. असा यावेळी इशारा देताच पुण्यातील सर्व सिनेमागृहांमधील ‘हर हर महादेव ‘ चित्रपट प्रदर्शित करणे बंद करण्यात आले.

हर हर महादेव चित्रपटातील कलाकारांना व निर्माता दिग्दर्शक आणि लेखकांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यातून प्रशांत धुमाळ यांनी खरा इतिहास समजून सांगत असताना सुद्धा मनुवादी मानसिकता खरा इतिहास समजून घ्यायला तयार नाही म्हणून आता शिवप्रेमी मावळे कार्यकर्ते सरदार व वंशज या सगळ्यांना जोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडला करावा लागेल असेही यावेळी संतोष शिंदे यांनी सांगितले.

९ नोव्हेंबर रोजी पुण्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

पुणे, दि. ७ : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ ९ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे नमूद करून श्री. देशपांडे म्हणाले, मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आगामी काळातील निवडणुकांच्यादृष्टीने महत्वाचा आहे. यानिमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी बालेवाडी येथे सकाळी ६.३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत. या माध्यमातून पुणे शहराच्या विविध भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मतदान नोंदणी अभियानाच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे, शिवाय याठिकाणी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे मतदार जागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करुन घेण्याच्यादृष्टीने निवडणूक आयोग वंचित घटकांनाही महत्व देत असल्याने दोन्ही निवडणूक आयुक्त याच ठिकाणी तृतीयपंथीय समुदायाशी संवाद साधणार आहे.

उद्योग क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांचा निवडणूक प्रकियेत सहभाग वाढविण्यासाठी हिंजेवडी येथील टेक महिंद्रा कंपनीच्या सभागृहात विविध उद्योगसंस्थांमध्ये स्थापन झालेल्या मतदार जागृती मंचच्या प्रतिनिधींशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना निवडणूक प्रकियेत सहभागी करण्यासाठी, मतदार नोंदणी विषयी जागृती करण्यासाठी सिम्बायोसिस विद्यापीठ येथे 10 नोव्हेंबर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.

पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ असा आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवार विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. तर २६ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी नियम १९६० मध्ये केलेल्या सुधारणेनुसार १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर असे अर्हता दिनांक उपलब्ध झाले आहेत. प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १ जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आणि त्यापुढील १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील. १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित पात्र मतदारांच्या अर्जावर वरील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करुन अंतिम प्रकाशनासह मतदार यादी अद्ययावत करण्यात येईल.

छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम शुभारंभ निमित्ताने भारत निवडणूक आयोगाच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य प्रदेशात 1261 कोटी रुपयांच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2022

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज मध्य प्रदेश मध्ये मंडला येथे,  1261 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 329 किमी लांबीच्या 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते, राज्यमंत्री गोपाल भार्गव, बिसाहुलाल सिंह आणि खासदार, आमदार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

मंडला आणि कान्हा राष्ट्रीय अभयारण्य परिसरातील निसर्ग सौदर्य नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थान ठरले आहे, आता या रस्ते प्रकल्पांच्या बांधकामामुळे या भागाला आणि येथील वनवासींना चांगल्या सोई सुविधा उपलब्ध होतील,  या  प्रकल्पामुळे  मंडला,  जबलपूर, दिंडोरी आणि बालाघाट जिल्ह्यांशी जोडले जाईल, असे गडकरी म्हणाले.

या मार्गांच्या निर्मितीमुळे पंचमढी, भेडाघाट आणि अमरकंटक यांसारखी धार्मिक स्थळे तसेच जबलपूरहून अमरकंटकमार्गे बिलासपूर, रायपूर आणि दुर्गकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय नजीकच्या प्रदेशातून होणारी कृषीमाल आणि औद्योगिक उत्पादनाची वाहतूक करणे सोपे झाल्यामुळे वेळ आणि इंधन यांची बचत होईल. असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार मध्य प्रदेशची समृद्धी आणि विकास साध्य  करण्याच्या दिशेने सातत्याने कार्य  करत आहे, असे गडकरी म्हणाले.

आश्चर्य : राष्ट्रवादीच्या अंकुश काकडेंची कन्या शिवसेनेतून राजकारणात…

पुणे-नगरसेवक,महापौर पद भूषवून आयुष्य राष्ट्रवादीत काढलेल्या पवारांशी घनिष्ठ जवळीक असलेल्या अंकुश काकडे यांची कन्या सौ. मेघना काकडे माने यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्ष प्रवेश केला. यावेळेस निलम गोरे, सुषमा अंधारे, अनिल परब, सचिन आहिर, आदेश बांदेकर उपस्थित होते.

अंकुश काकडे हे स्वतः राष्ट्रवादीचे प्रवक्ते देखील आहेत.त्यांच्या कन्येला शिवसेनेतून राजकारण प्रवेश करावा लागतोय यावर कार्यकर्त्यांत आणि एकूणच सर्वपक्षीय मैत्रीची भावना कायम प्रजव्लीत ठेवणाऱ्या अंकुश काकडे यांच्यावर या निमित्ताने चर्चा रंगते आहे.हजरजबाबी,सर्वांशी स्नेहाचे संबध,राजकीय भूमिका काहीही असली तरी प्रत्यक्षात व्यक्तिगत पातळीवर त्याचा दुरान्वये संबध येऊ न देता आपुलकि जपणाऱ्या अंकुश काकडे यांच्या कन्येने आता उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे,सचिन आहिर,पुण्यातील विशाल धनवडे,संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समवेत राहून आपली राजकीय वाटचाल सुरु केली आहे असे म्हटले जाणार आहे.

“ ‘अब्दुल गद्दार, असे घाणेरडे लोक…”, सुप्रिया सुळेंवरील विधानाचा आदित्य ठाकरेंकडून समाचार

बुलढाणा -राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना सत्तारांची जीभ घसरली. त्यांनी गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तारांच्या या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या घरावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे. तर काही कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या मुंबई येथील घरावर दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडल्या.

या घटनाक्रमानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही अब्दुल सत्तारांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. संबंधित विधानाचा निषेध करताना आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांचा उल्लेख ‘अब्दुल गद्दार’ असा केला आहे. तसेच अशी घाणेरडी लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवी आहेत का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारला विचारला आहे.बुलढाणा येथील सभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

 “आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का?”

“महाराष्ट्रातील जनता म्हणून मी तुम्हालाही विचारत आहे की, असे घाणेरडे लोकं तुम्हाला हवी आहेत का? जी लोकं महिलांना शिवीगाळ करतात. शेतकऱ्यांची मजा उडवतात. जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का?’ असं विचारतात, अशी लोकं तुम्हाला मंत्री म्हणून चालणार आहेत का?” असे सवालही आदित्य ठाकरेंनी विचारले आहेत.

राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत एच. ए. स्कूलला विजेतेपद  

पुणे, दि. 7 – मराठी विज्ञान परिषदेच्या मुंबई शाखेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स माध्यमिक स्कूलच्या (एच. ए.) ‘द बिगिनिंग’ या एकांकिकेला चार वैयक्तिक पारितोषिकांसह विजेतेपद मिळाले.
शिक्षक जगदीश पवार यांना लेखन, दिग्दर्शन आणि प्रकाश योजनेसाठी प्रथम क्रमांकाची तीन पारितोषिके आणि सृष्टी पाटील या विद्यार्थिनीला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. आदिती झरकर, सृष्टी पाटील, हर्षदा वाघचौरे, सृष्टी भागवत, ऋषभराज सिंह, सौम्य साबळे आणि तन्वी हनपुडे या विद्यार्थ्यांचा विजयी संघात समावेश होता.
रोख एकतीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. सहभागी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी अतिरिक्त 15 गुण मिळणार आहेत. मंगल साठे, रमेश गाढवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वृत्तनिवेदिका शिबानी जोशी आणि दिग्दर्शक देवेंद्र प्रेम यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. शाला समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, शालाप्रमुख एकनाथ बुरसे, उपशालाप्रमुख दीपा अभ्यंकर, पर्यवेक्षिका आशा बनसोडे व सुनीता पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.

‘खोके घेऊन बोके इतके माजलेत की…’, सत्तारांच्या विधानावर केदार दिघेंनी व्यक्त केला संताप

मुंबई: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. यानंतर सत्तार यांनी वापरलेल्या भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान केदार दिघे यांनी खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत अशा शब्दात सत्तारांवर निशाणा साधला आहे.आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी सोशल मिडीयावर याबद्दल पोस्ट लिहीली आहे, त्यांनी म्हटले की, “मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्या बाबत त्यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा महिलांचा सन्मान ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे…खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत.”सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.

देशाच्या कला परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि.7 : देशाला नृत्य, कला आणि संगीताची परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

अंधेरीतील भवन कल्चरल सेंटरमध्ये नृत्य सम्राज्ञी सितारा देवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कला कृती केंद्राद्वारे 28 व्या आचार्य चौबे महाराज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटनपर भाषणात राज्यपाल बोलत होते. यावेळी कला कृती केंद्राच्या अध्यक्ष जयंती माला मिश्रा, सचिव राजेश मिश्रा आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले , “मी नृत्य, कला आणि संगीत क्षेत्राचा जाणकार नाही. मात्र, आपल्या देशाला साहित्य, नृत्य, कला आणि संगीत परंपरा लाभलेली आहे. संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून ईश्वर दर्शन देखील घडू शकते, इतकी शक्ती या कलेत आहे.  केवळ मनोरंजन नव्हे तर, आत्मिक समाधानही संगीतातून मिळते. देश-विदेशात जेव्हा अत्याचार, हिंसाचार आणि दहशतवादासारख्या मानवी समाजाला नुकसान पोहचवणाऱ्या घटना वाढतात, तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी नृत्य,संगीत व कला क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरते”.

देशाची संस्कृती जोपासण्यात कला कृती केंद्राचे मोलाचे योगदान आहे. नृत्य सम्राज्ञी सितारा देवी आणि आचार्य चौबे महाराज यांची कला, त्यांचे ज्ञान नव्या पिढीला मिळत राहावे; या माध्यमातून देशाची वैभवशाली नृत्य आणि संगीत कला जगात प्रसिद्ध व्हावी, अशी अपेक्षा देखील राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी व्यक्त करून कलाकारांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यपालांच्या हस्ते जयंती माला मिश्रा (कला कृती केंद्र, अध्यक्ष), राजेश मिश्रा (नाट्य कलाकार), ऋषिका मिश्रा (कथ्थक नृत्यांगना), पं. कालिनाथ मिश्रा (तबला),  सोमनाथ मिश्रा (गायन), सौरव मिश्रा (कथ्थक डान्सर बनारस), गौरव मिश्रा (कथ्थक नर्तक बनारस), हिरोको सारा फुकुडा (जयंती माला मिश्राची कथ्थक नृत्यांगना जपानची विद्यार्थिनी), अपर्णा देवधर (सतार), संदीप मिश्रा (सारंगी), कुणाल पाटील (पखावाज), बालकिशन मिश्रा (अभिनेता),  रवीकिशन मिश्रा (कथ्थक नर्तक), गुरु श्रीमती केतकी तांबे,  दिलीप तांबे(नृत्य निकुंज संस्था), डॉ. वैदेही रेले लाल (नालंदा नृत्य कला महाविद्यालय) या कलाकरांचा सत्कार करण्यात आला.

‘एमआयटी डब्ल्यूपीयू’च्या स्कूल ऑफ मीडिया कम्युनिकेशनतर्फे तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे आयोजन

१० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत विश्वराजबाग लोणी काळभोर येथे होणाऱ्या परिषदेत
सुशील कुमार माहापात्रा, नितु सिंग, रविलीन कौर यांना ‘जर्नालिझम फॉर पीस’ पुरस्कार

पुणे, ७ नोव्हेंबर : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कंमुनिकेशन, पुणे तर्फे तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे आयोजन करण्यात आले. दि. १० ते १२ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत लोणी काळभोर येथील विश्वराज बागेत असलेल्या जगातील सर्वात मोठा घुमट अर्थात तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्वशांती सभागृहात ही परिषद होणार आहे, अशी माहिती ‘एमआयटी’चे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि परिषदेचे निमंत्रक व स्कूल ऑफ मिडिया कम्युनिकेशनचे धीरज सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रसंगी ‘एमआयटी’चे कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, संचालक डॉ. महेश थोरवे, स्कूल ऑफ मीडिया अँड कंमुनिकेशनच्या प्रा. डॉ. मिथिला बिनीवाले उपस्थित होते. मुंबई प्रेस क्लब, पुण्यातील आर. के. लक्ष्मण म्यूझियम, फॉरेन करस्पॉन्डन्ट क्लब ऑफ साउथ एशिया, नवी दिल्ली आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या सहयोगाने ही परिषद होत आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली होत असलेल्या परिषदेची यंदाची संकल्पना ‘संवाद, सर्वसमावेशकता आणि शांतता’ अशी आहे.

डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, “परिषदेचे उद्घाटन येत्या गुरुवारी (दि. १०) सकाळी १०.३० वाजता ‘एएनआय’च्या संपादिका स्मिता प्रकाश, खासदार जवाहर सरकार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आर. के. लक्ष्मण म्यूजियमच्या संचालिका उषा लक्ष्मण, ‘आयसीएचआर’चे अध्यक्ष पद्मश्री राघवेन्द्र तन्वर, न्यूज २४ च्या संपादिका अनुराधा प्रसाद, द डेली मिलापचे वरिष्ठ संपादक ऋषी सुरी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, प्राची कुलकर्णी, प्रा. प्रियंकर उपाध्ये आदी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील.”

धीरज सिंग म्हणाले, “यावर्षीपासून शांततेसाठी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना ‘जर्नालिझम फॉर पीस’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यंदाचा पहिला पुरस्कार एनडीटीव्हीचे सहयोगी संपादक सुशील कुमार माहापात्रा (ब्रॉडकॉस्टींग), नितु सिंग (डिजिटल) आणि डाउन टू अर्थ मुक्तपत्रकार रविलीन कौर (प्रिन्ट) यांना प्रदान करण्यात येणार आहे. ५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. परिषदेचा समारोप शनिवारी (दि. १२) सकाळी १० वाजता होणार असून, सुप्रसिद्ध पत्रकार प्रा. के. जी. सुरेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.” देशातील पत्रकार व पत्रकारितेतील विद्यार्थी या परिषदेत सहभागी होतील. ही परिषद मोफत आहे. मात्र, नियोजनाकरिता www.mitwpu.ncmj.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असेही धीरज सिंग यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. मिथिला बिनीवाले म्हणाल्या, “भारतीय पत्रकारितेची ७५ वर्षे, ओटीटी : क्बॉक ब्लस्टरचे काय झाले, भूतकाळ-वर्तमान आणि भविष्याचे दस्तऐवजीकरण करणे, नवीन माध्यमात नव्या नोकर्‍यांची संधी, संघर्षाच्या काळात शांततेचा आवाज या विषयांवर पाच सत्रे होणार आहेत. दिग्दर्शक दिव्यांशु मल्होत्रा, अभिनेता, लेखक व गीतकार दिपेश सुमित्रा जगदीश, पटकथा लेखक सुलग्ना चॅटर्जी, अभिनेता सायनदीप सेनगुप्ता, दुरदर्शनचे माजी संचालक मुकेश शर्मा, कन्नड चित्रपट उद्योगाचे संचालक के. एस. श्रीधर, डॉक्युमेंटरी चित्रपट निर्माता मिरयम चंडी मेनाचेरी, जेडडीएफ जर्मन टेलिव्हिजन येथील निर्माता राघवेंद्र वर्मा, पुणेकर न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक, बीआयएमएस इंडियाचे सीईओ मुबारक अन्सारी, द मॉर्निंग कॉन्टेक्स्टचे व्यवस्थापकीय संपादक टी. सुरेंदर आणि रेडिओ सिटी येथे डिजिटल सामग्रीचे प्रमुख आमिर तमीम यांच्यासह प्रतिष्ठित माध्यमाचे संपादक, पत्रकार आदी सत्रांमध्ये चर्चा करणार आहेत. याशिवाय, ‘मीडिया टू मीडिया कनेक्ट’ व ‘यूथ टू यूथ’ अशी दोन सत्रे होतील.”

मनुस्मृती मागच्या दाराने लादली जातेय:आर्थिक आरक्षणाच्या निर्णयामुळे संविधानाच्या मूळ गाभ्यास धक्का; आंबेडकरांचा आरोप

पुणे-देशात मागणाच्या दाराने मनुस्मृती आणली जात आहे. आर्थिक आरक्षणाच्या निर्णयामुळे संविधानाच्या मूळ गाभ्यास धक्का पोहचतो आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सर्वसाधारण प्रवर्गातील 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यावर आंबेडकर यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली.

आर्थिक आरक्षणबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा संविधानाच्या मूळ गाभ्यास धक्का पाेहचवणारा आहे. हा निर्णय चुकीचा असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांसह दाेन न्यायाधीशांनी त्यास विराेध दर्शवला आहे. हा निर्णय सुप्रीम कोर्टाने नाही, तर न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला आहे. संसदेची घटना दुरुस्ती परिच्छेद 367 च्या विराेधात आहे. दहा टक्के आर्थिक आरक्षण वगळता उर्वरित एससी, एसटी आरक्षणात ही आर्थिक मागास आरक्षणबाबतचा विषय आगामी काळात येऊ शकताे. सर्वाेच्च न्यायालयाचे प्राधान्य सामाजिक विषमतापेक्षा आर्थिक विषमतेला महत्त्व देत असल्याचे दिसून येते. मागच्या दाराने मनुस्मृती आणायचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी साेमवारी केली आहे.

सर्वाेच्च न्यायालयाने दहा टक्के आर्थिक आरक्षणाच्या प्रस्तावावर शिक्कामाेर्तब केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर बाेलत हाेते. आंबेडकर म्हणाले, संविधानाने मागासवर्ग असे कलम 16 (अ) मध्ये वापरले आहे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाणीवपूर्वक जात शब्द वापरला नाही. जात विरहित परिस्थितीकडे जाण्याची परिस्थिती असताना, नवीन आर्थिक आरक्षण मंजूर करणे हे संविधान विराेधात आणि चुकीचे आहे.

आरक्षण जातीवर हवे

आंबेडकर पुढे म्हणाले की, जातीचे मागासलेपणावर आरक्षण असावे परंतु आर्थिक विषमतेवर आधारित आरक्षण निर्माण करणे चुकीचे आहे. केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक आरक्षण वैध असून हे आरक्षण घटना विराेधी नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला आहे. मात्र, हा निकाल याेग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत व न्या. रवींद्र भट यांनी दाखवून दिल्याचे ते म्हणाले.राज्य घटनेत केवळ सामाजिक दृष्टया मागास जाती जमातींना आरक्षणाची तरतूद केली आहे, असे असताना आर्थिकदृष्टया मागासांना देखील नवीन आरक्षण देण्याचा निर्णय चुकीचा पायंडा घालणारा आहे. हे आरक्षण राज्यघटनेची सुसंगत नाही आणि ते संविधानाच्या मूळ गाभ्याला धक्का लावणारे आहे, असे न्यायमूर्ती भट यांनी निकालाच्या सुनावणी वेळी सांगितले आणि त्यास सरन्यायाधीश लळीत यांनीही सहमती दर्शवली आहे, त्यामुळे हा निकाल सर्वोच्च न्यायलयाने नाही तर घटनापीठाने दिल्याचे दिसून येते.

कृषिमंत्र्यांची जीभ घसरली:सुप्रिया सुळेंबद्दल उच्चारले अपशब्द; ‘राष्ट्रवादी’कडून सत्तारांच्या घरावर दगडफेक, त्यानंतर म्हणाले सॉरी

मुंबई– इतकी भिकारXXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ’, असे वादग्रस्त वक्तव्य करून कृषिमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आलेत. याप्रकरणी सत्तारांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा, पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. तर सत्तार यांना राज्यात फिरून देणार नाही, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होताच, अब्दुल सत्तार यांनी कुणाची मने दुखवले असतील, तर सॉरी म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत सत्तारांच्या घरी धडक देत आंदोलन केले.

काय म्हणाले सत्तार?

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची एका वृत्तवाहिनशी बोलताना जीभ घसरली. सत्तार म्हणाले की, ‘इतकी भिकारXXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ. ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत. आमचे खोके आणि त्यांचे डोके तपासावे लागेल. ज्यांना खोक्याची आठवण येऊ लागली आहे, त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके – खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो’, असे सत्तार म्हणाले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईत सत्तारांचे घर गाठत दगडफेक केली. सत्तारांच्या घरांच्या काचा फोडल्या. एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा त्यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिला.

अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सत्तारांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना २४ तासांच शब्द मागे घेत माफी मागावी, असा इशारा दिला आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख यांनी सत्तार यांचे पुतळे महाराष्ट्रभर जाळू, म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे.

सत्तारांनी मागितली माफी

प्रकरण पेटताच सत्तारांनी सॉरी म्हणत मी कोणाबद्दलही काही बोललो नाही. कोणत्याही महिलांची मने दुखावली असे बोललो नाही. कोणाला वाटले असेल, तर मी खेद व्यक्त करतो. मी फक्त खोक्याबद्दल बोललो. महिलांबद्दल एक शब्दही बोललो नाही. पुढेही बोलणार नाही. मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. सॉरी, असे म्हणत सत्तारांनी माघार घेतली.

शरद पवारांची तब्येत ठणठणीत:मुंबईतल्या ब्रीच कँडीमधून मिळाला डिस्चार्ज

मुंबई- आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झालेत.पवारांवर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. याच काळात त्यांनी शिर्डीतल्या अधिवेशनालाही हजेरी लावली. मात्र, त्यांचे भाषण दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले.

पवार यांच्यावर गेल्यावर्षी मार्चमध्ये ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, पोटदुखीमुळे त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या पित्ताशयात खडे झाल्याचे समोर आले. एन्डोस्कोपीद्वारे पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले. मात्र, अजून त्यांच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झाली नव्हती. याच काळात त्यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरालाही हजेरी लावली. मात्र, तिथेही त्यांनी अवघ्या चार-पाच मिनिटांत भाषण संपवले. पुन्हा त्यांचे भाषण दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले. या शिबिरातून ते पुन्हा ब्रीड कँडीमध्ये दाखल झाले. आत आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज सकाळीच मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर आता भुजबळ अॅडमिट झाल्याचे समजते.

भुजबळांना काय झाले?

छगन भुजबळ यांना आज सकाळी मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हायरल इंफेक्शन झाल्याचे समजते. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. उपचार घेतल्यानंतर आज सायंकाळपर्यंतच त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो, असे समजते. गेल्या आठ दिवसांपासून शरद पवारांची तब्येतही ठीक नाही. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. या काळात त्यांनी शिर्डीच्या शिबिरालाही हजेरी लावली. अखेर त्यांना आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

काही दिवसांपासून दगदग

छगन भुजबळ हे सतत कार्यक्रमात व्यस्त असतात. गेल्या काही दिवसांपासूनही त्यांचे कार्यक्रम सुरूच होते. शिवाय शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरातही ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी गेलेले भाषण चांगलेच गाजले. गुजरातला फॉक्सकॉन, तर महाराष्ट्राला पॉपकॉर्न मिळाले. गेल्या 8 वर्षांपासून लोक मोदींनी दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाची वाट पाहतायत. राज्यात धार्मिक द्वेषाचे राजकारण काही मंडळी करू पाहत आहेत, पण ते विसरतात की धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद फुले – शाहू – आंबेडकर आम्हाला देतात. धर्मांध पक्षाशी लढा हा विकासाच्या मुद्दावरूनच करावा लागेल, अशी घणाघाती टीका त्यांनी भाजपवर केली होती.

53 व्या इफ्फीमध्ये सुवर्ण मयुरासाठी काश्मीर फाईल्स सह 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांत चुरस

By Sharad Lonkar (PUNE)

#TheWorldOfFilms, 7 नोव्हेंबर 2022

20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या काळात गोव्यात होणाऱ्या इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या  53 व्या आवृत्तीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 चित्रपटांमध्ये प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयुरासाठी चुरस आहे. चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या, कला आणि राजकारण अशा बहुसंख्य  प्रचलित विषयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे

इफ्फीच्या तिसर्‍या आवृत्तीपासून  सुरु झालेल्या पहिल्या सुवर्णमयुर पुरस्कारापासून आजपर्यंत  हा पुरस्कार आशियातील सर्वाधिक प्रतिष्ठित  चित्रपट पुरस्कारांपैकी एक मानला जातो. या वर्षी देखील  विजेते निवडण्याचं  अशक्यप्राय  काम सोपवलेल्या ज्युरींमध्ये  इस्त्रायली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड, अमेरिकन निर्माते जिंको गोटोह, फ्रेंच चित्रपट संकलक पास्केल चॅव्हन्स, फ्रेंच डॉक्युमेंटरी फिल्म मेकर, चित्रपट समीक्षक आणि पत्रकार जेव्हियर अँगुलो बर्चुरेन आणि आपल्या भारतातले प्रसिद्ध  चित्रपट दिग्दर्शक सुदीप्तो सेन  यांचा समावेश आहे.

स्पर्धेसाठी निवड झालेल्या  चित्रपटांची यादी

1. परफेक्ट नंबर (2022)

पोलंडचे  चित्रपट निर्माते क्रिस्झटॉफ झानुसी यांचा  परफेक्ट नंबर हा चित्रपट नैतिकता आणि मृत्यूबद्दलच्या विचारांना नाट्यमय पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणतो. इटली आणि इस्रायल यांची  सह-निर्मिती असलेला , हा चित्रपट एक तरुण गणितज्ञ आणि त्याचा दूरचा चुलत भाऊ यांच्यातील नातेसंबंध अधोरेखित करतो आणि त्या दोघांमधील भेटीमुळे जगातील रहस्यमय  वास्तव, जीवनाचा अर्थ आणि जीवन व्यतीत होण्याचा प्रवास यावर भाष्य करतो.

2. रेड शूज (2022)

मेक्सिकन चित्रपट निर्माता कार्लोस आयचेलमन कैसरने त्याच्या रेड शूज या चित्रपटाचे वर्णन इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा एक भावनिक प्रतिबिंब म्हणून केले आहे. ही कथा एका शेतकऱ्याची आहे जो त्याच्या मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर  एकाकी जीवन जगत असतो.  हा शेतकरी एका अपरिचित आणि परक्या जगात प्रवेश करून त्याच्या मुलीचा मृतदेह घरी आणण्याचा प्रयत्न करत असताना चित्रपटाची कथा पुढे सरकते. या चित्रपटाला  अनेक पुरस्कारांसाठी  नामांकन मिळालं असून व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रेक्षक पुरस्कारासाठी मिळालेलं नामांकन विशेष चर्चेत होतं .

3. ए  मायनर  (2022)

1970 च्या दशकातील इराणी चित्रपटांमधील नवीन युगाच्या संस्थापकांपैकी एक  दारियुश मेहरजुई हे इराणी चित्रपटसृष्टीतील  तज्ज्ञ म्हणून सुपरिचित आणि  प्रसिद्ध आहेत. ए मायनर या त्यांच्या  नवीन चित्रपटासह ही हस्ती  इफ्फीमध्ये परतली आहे. ही कहाणी एका मुलीची आहे जिला वडिलांचा विरोध असूनदेखील संगीतकार होण्याची इच्छा आहे, एकाच कुटुंबातील सदस्यांमधील गुंतागुंतीची समीकरणे, पालक आणि मुले  यांच्यातील भिन्न आकांक्षा आणि संगीताची संमोहित करणारी जादू अशी या चित्रपटाची संकल्पना आहे.

4. नो एन्ड (2021)

इराणी चित्रपट  , नो एन्ड  इराणमधील गुप्त पोलिसांच्या हेराफेरी आणि कारस्थानांचे चित्रण करतो. एक शांत आणि सचोटीने वागणारा  माणूस आपले घर वाचवण्यासाठी  खोटे बोलून गुप्त पोलिस असल्याचा बनाव करतो. मात्र जेव्हा प्रत्यक्षातील  गुप्त पोलिस या नाट्यात प्रवेश करतात तेव्हा गोष्टी क्लिष्ट  होतात.

बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाफर पनाही आणि त्यांचे सहयोगी नादेर सायवर यांनी एकत्रितपणे  केलेलया या दुसऱ्या चित्रपटाला   न्यू करंट्स पुरस्कारासाठी  नामांकन मिळाले होते. जाफर पनाही यांनी  या चित्रपटासाठी  सल्लागार आणि संकलक म्हणून कार्य केले आहे.

5. मेडिटेरेरियन फीव्हर (2022)

पॅलेस्टिनी-इस्त्रायली लेखक-दिग्दर्शक महा हज यांचा  मेडिटेरेरियन फीव्हर हा चित्रपट म्हणजे दोन मध्यमवयीन ‘फ्रेनीज’ बद्दलची  ब्लॅक कॉमेडी आहे. कान चित्रपट महोत्सवाच्या  अनसरटेन रिगार्ड  स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार विजेता ठरलेला , हा चित्रपट एक महत्त्वाकांक्षी लेखक आणि एक यथातथा व्यक्ती   यांच्यातील  असंभव अशा  भागीदारीभोवती विणलेला आहे.

6. व्हेन द वेव्हस आर गॉन  (2022)

‘व्हेन द वेव्हस आर गॉन’ हा चित्रपट फिलिपिनो चित्रपट निर्माते लव्ह डियाझ यांच्या कथेवर आधारित असून ही कथा फिलीपिन्समधील गुन्हे अन्वेषण विभागातल्या अधिकाऱ्याच्या जीवनावर भाष्य करते. नैतिकतेच्या निर्णायक   टप्प्यावर असलेला हा अधिकारी त्याच्या भूतकाळातील काही गोष्टीमुळे आलेल्या अपराधीपणाच्या भावनेने त्रस्त आहे आणि तो त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याला त्याच्या भूतकाळाची जाणीव सातत्याने करून दिली जाते.

लव्ह डियाझ,  त्यांच्या  स्वतःच्या अशा ‘सिनेमॅटिक टाईम’ शैलीसाठी ओळखले जातात  (त्यांचा  2004 चा चित्रपट, इव्होल्यूशन ऑफ अ फिलिपिनो फॅमिली, जवळजवळ 11 तासांचा चित्रपट आहे )  या चित्रपटातील भाष्य  उत्कृष्टरीत्या  पडद्यावर उलगडण्यासाठी 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

7. आय हॅव  इलेक्ट्रिक ड्रीम्स (2022)

2022 च्या लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोस्टारिकन चित्रपट निर्मात्या व्हॅलेंटीना मौरेल यांनी ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटात  घटस्फोटित पालक, आपल्या दुरावलेल्या वडिलांबद्दल आपुलकी असलेल्या  16 वर्षांच्या इवा या मुलीची कथा आहे,जेव्हा ती त्यांच्याशी  पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला तिच्या वडिलांबद्दल आणि स्वतःबद्दल आश्चर्यकारक गोष्टी समजतात. या चित्रपटातील कामगिरीबद्दल लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये  रेनाल्डो अमीनला  सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि डॅनिएला मारिन नवारोला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या  पुरस्काराने गौरवण्यात आले.

8. कोल्ड  ॲज मार्बल  (2022)

पत्नीची हत्या केल्यानंतर तुरुंगात टाकलेल्या वडिलांच्या अनपेक्षितरित्या  परतण्याबद्दलचा  ‘कोल्ड ॲज मार्बल’ हा अझरबैजानचे  दिग्दर्शक आसिफ रुस्तमोव्ह दिग्दर्शित चित्रपट, गुन्हेगारी -नाट्य /सायको-थरारपट आहे.  हा चित्रपट  एका तरुणावर केंद्रित आहे, ज्याला  दिग्दर्शकाने बदलत्या समाजाचा विरोधी -नायक  म्हणून दाखवले आहे. जेव्हा त्याला शेवटी कळते की त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला का मारले तेव्हा .एक संवेदनशील चित्रकार आणि थडग्याचे खोदकाम करणारा करणाऱ्या या नायकाच्या आयुष्याला  धक्का बसतो , हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

9. द लाईन  (2022)

बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये  गोल्डन बेअरसाठी नामांकन मिळालेला  उर्सुला मेयरर्सच्या  ‘द लाइन’ या चित्रपटात  नात्यांचा  स्वीकार आणि नाजूक  कौटुंबिक बंधांचा व्यासंग मांडण्यात आला आहे. फ्रेंच-स्विस चित्रपट दिगदर्शकांचा हा  चित्रपट आई आणि मुलगी यांच्यातील प्रक्षुब्ध  नात्याचा शोध घेतो.स्वित्झर्लंडमध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटतात   मातृत्व आणि हिंसा या दोन्हींचे संयोजन पाहायला मिळते

10.सेव्हन डॉग्स (2021)

43 व्या कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  प्रीमियर झालेला , सेव्हन डॉग्स हा चित्रपट पैशासंदर्भात  गंभीर अडचणींमधून जात असतानाही एका एकट्या राहणाऱ्या  माणसाने आपल्या सात कुत्र्यांसाठी केलेल्या धडपडीबद्दलची कथा सांगतो. हा चित्रपट अर्जेंटिनियन दिग्दर्शक रॉड्रिगो ग्युरेरो यांचा चौथा चित्रपट आहे. फक्त 80 मिनिटांच्या या चित्रपटात , एक माणूस आणि त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील संबंध दाखवण्यात आले आहेत.

11. मारिया : द ओशन एंजेल  (2022)

‘मारिया : द ओशन एंजेल’ हा चित्रपट ,समुद्रात एका सेक्स डॉलचा शोध लागल्यानंतर ज्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे, अशा मच्छिमारांच्या समूहावर  आधारित  आहे. श्रीलंकन चित्रपट निर्मात्याआणि  दिग्दर्शिका अरुणा जयवर्धना या त्यांच्या  2011 च्या ऑगस्ट ड्रिझल चित्रपटासाठी प्रसिद्ध आहेत.

‘मारिया: द ओशन एंजेल’ हा चित्रपट  सुवर्णमयुर  जिंकणारा दुसरा श्रीलंकन चित्रपट ठरावा अशी जयवर्धना यांची इच्छा आहे.

इफ्फीच्या 50 आवृत्त्यांच्या कालावधीत  श्रीलंकेच्या लेस्टर जेम्स पेरीसच्या गॅम्पेरलिया या चित्रपटाने  प्रथमच हा पुरस्कार जिंकला होता.

12. द कश्मीर फाइल्स (2022)

‘द कश्मीर फाइल्स’ हा हिंदी चित्रपट  1990 च्या कश्मीरमधून झालेल्या कश्मिरी पंडितांच्या पलायनावर केंद्रित आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, या चित्रपटाची कथा ,  आपल्या पालकांच्या अकाली निधनाबद्दल सत्य शोधण्यासाठी निघालेल्या  एका  तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी या चित्रपटाचा नायक कृष्णाला मध्यवर्ती ठेवून बांधण्यात आली आहे.

13. नेझोह (2022)

2022 च्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षक पुरस्कार विजेता चित्रपट , नेझोह हा  युद्धग्रस्त सीरियातील एका कुटुंबाविषयीचा चित्रपट  आहे. सीरियाच्या वेढलेल्या भागात तिथेच राहणाऱ्या कुटुंबावर आधारित हा अरबी चित्रपट आहे.  दिग्दर्शिका  सौदे कादन यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या शेजारी बॉम्बस्फोट झाला तेव्हा पहिल्यांदा त्यांनी स्वतः घराबाहेरची परिस्थिती अनुभवली.

14. द स्टोरी टेलर (2022)

अनंत महादेवन यांचा ‘द स्टोरीटेलर’हा चित्रपट , थोर  लेखक सत्यजित रे यांच्या तारिणी खुरो या पात्रावर आधारित आहे.तारिणी खुरो आपल्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर कथाकार होण्यासाठी एका विचित्र परिस्थितीत कसा  सापडतो  याची ही कथा आहे.2022 बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात किम जी-सीओक पुरस्कारासाठी या चित्रपटाचे नामांकन झाले  होते, तिथेच या चित्रपटाचा   प्रीमियर झाला.

15.कुरंगु पेडलl (2022)

रसी अलगप्पन यांच्या ‘सायकल’ या लघुकथेवर आधारित, दिग्दर्शक कमलकन्नन यांचा कुरंगू पेडल हा चित्रपट एका शाळकरी मुलाला ,  त्याचे वडील त्याला शिकवण्यास असमर्थ असतानाही  सायकल चालवायला शिकायचे  आहे, याविषयीची कथा सांगतो..  ग्रामीण भागात घडणारी ही कथा  पाच मुले पुढे नेतात . कमलकन्नन हे चित्रपट दिग्दर्शक त्यांच्या  2012 च्या मधुबानाकदाई चित्रपटासाठी प्रसिद्ध आहेत.

पर्यटन संचालनालय वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी होणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबईदि.6 : महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी दिनांक  7 ते 9 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट  2022 मध्ये  पर्यटन  विभाग सहभागी  होणार आहे. साहसी, कृषी, समृद्ध संस्कृती, वारसा  आणि वन्यजीव  पर्यटन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या लंडनमधील आघाडीच्या प्रवासी भागीदारांशी महाराष्ट्र शासनाचे  पर्यटन विभाग संवाद साधणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

पर्यटन मंत्री श्री. लोढा म्हणाले, “राज्यात कृषी, सांस्कृतिक आणि साहसी पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे.  वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट -2022 च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत राज्यातील ही माहिती पोहचण्यास मदत होईल.  पर्यटन विभाग अधिक शाश्वत, लवचिक आणि सर्वसमावेशक पर्यटनाचा अवलंब करून पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे, याची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहचेल,” असेही श्री.लोढा म्हणाले.

महाराष्ट्रात प्रवास करणे सुरक्षित :पर्यटन सचिव सौरभ विजय

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने अनेक महत्त्वपूर्ण  निर्णय घेतले आहेत.  कोविडनंतर, महाराष्ट्राने पर्यटनाच्या सर्व विभागांसाठी नियमावली  जारी केली आहे. निवास युनिट्स, ट्रॅव्हल कंपन्या, वाहतूक, टूर गाईड, पर्यटक, मनोरंजन आणि वॉटर पार्क यांचा यामध्ये समावेश आहे. भारत सरकारच्या (आदरातिथ्य उद्योगासाठी मूल्यमापन, जागरूकता आणि प्रशिक्षणासाठी प्रणाली) योजनेअंतर्गत, 400 पेक्षा अधिक हॉटेल्सनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात प्रवास करणे आणि राहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. याची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत वर्ल्ड ट्रव्हल्‍ मार्टच्या या माध्यमातून देता येईल असे पर्यटन सचिव सचिव सौरभ विजय यांनी  सांगितले. 

महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचा सहभाग

वर्ल्ड ट्रॅव्हलमार्ट मध्ये सहभागी होण्यासाठी  महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या  शिष्टमंडळामध्ये   पर्यटन मंत्री  मंगल प्रभात लोढा, पर्यटन सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमटीडीसीच्या एमडी श्रद्धा जोशी -शर्मा आणि सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर  यांचा सहभाग आहे.

महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीची माहिती देण्यासाठी पर्यटन विभागाचा स्टॉल

राज्य पर्यटन संचालनालयतर्फे  पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले  व राज्यातील प्रवेशाचे ठिकाण गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती असलेला स्टॉल  उभारण्यात आला आहे.

या तीन दिवसांदरम्यान  हे शिष्टमंडळ प्रमुख टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट आणि मीडिया भागीदारांना भेटणार आहे. लंडन येथील पर्यटन, सांस्कृतिक आणि वारसास्थळे, उत्साहवर्धक साहसी अनुभव, विदेशी पाककृती, वाइन पर्यटन, कृषी पर्यटन यांसारख्या अनुभवांची  चर्चा आणि विचार जाणून घेणार आहेत.

महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारी पंढरपूरची वारी, महाराष्ट्रातील विवाह समारंभ याचेही  सादरीकरण  यावेळी करण्यात येणार आहे .राज्याने नव्याने तयार केलेल्या डायमंड सर्किट- मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांची वैशिष्ट्य माहितीपत्रक तसेच व्हिडीओ स्वरूपात येथे दाखवण्यात येतील. राज्याची समृद्धता  विविधता आणि वारसा याची माहिती होण्यासाठी या दरम्यान रोड शो देखील आयोजित करण्यात येणार आहे.

अजिंठा, एलोरा, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईतील आर्ट डेको इमारतींचे समूह आणि पश्चिम घाटाचा भाग म्हणून चार नैसर्गिक स्थळे यासारख्या प्रसिद्ध सहा जागतिक वारसा स्थळांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. त्यामुळे, युनिस्कोने  वारसा स्थळांचे नव्याने तयार केलेले 360 अंश व्हिडिओ देखील  येथे दाखवण्यात येतील.