Home Blog Page 1535

भारतीय नौकानयन संघटना वरिष्ठ राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धा 2022

0

भारतीय नौकानयन संघटना (Yachting Association Of India-YAI)  वरीष्ठ राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धा 2022 (आशियाई खेळ निवड चाचणी) मधल्या शर्यती, मुंबई बंदरालगत समुद्रात आयोजित केल्या जातील.

भारतीय नौकानयन संघटना आणि भारतीय नौदल नौकानयन संघटना (INSA) यांच्या अंतर्गत, भारतीय नौदल नाविक कौशल्य प्रशिक्षण केंद्र (INWTC)-मुंबई ने, ही स्पर्धा आयोजित केली आहे. वरिष्ठ वर्गांसाठी आयोजित ही स्पर्धा 13 ते 20 नोव्‍हेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धकांचे गुणांकन करुन त्यांचे मानांकन निश्चित करण्यासाठी, YAI ही स्पर्धा आयोजित करते आणि ही स्पर्धा, चीनमध्‍ये सप्‍टेंबर 2023 मध्‍ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड चाचणीही असणार आहे.

देशभरातील 15 नौविहार क्लबमधील 115 हून अधिक नाविक-स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. आठ प्रकारच्या बोटींच्या आठ श्रेणींमध्ये, प्रत्येक श्रेणीत 12 शर्यती, अशी शर्यतींची मालिका होईल.  ILCA 7, ILCA 6, 49er, 49erFX, 470, NACRA 17, RS:X आणि IQ फॉइल, या आठ प्रकारच्या नौकांचा, या आठ श्रेणींमध्ये समावेश आहे.  पुरुष, महिला आणि मिश्र अशा गटांमध्ये या स्पर्धा होतील.

स्पर्धा आयोजनाची जबाबदारी घेतलेल्या अधिका-यांचे एक पथक, स्पर्धा योग्य वातावरणात नि:पक्षपणे पार पडतेय की नाही आणि सर्व स्पर्धकांना शर्यतीसाठी एकसमान साधनसामुग्री तसच या स्पर्धेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा एक सारख्याच मिळतात की नाही यावर लक्ष ठेवतील, तशी खातरजमा करतील. ओमान, कोरिया आणि सिंगापूर या देशांमधील परदेशी शर्यत अधिकाऱ्यांसह, जागतिक नौकानयनाची  पात्रता मिळवलेले आंतरराष्ट्रीय शर्यत अधिकारी, आंतरराष्ट्रीय परिक्षक आणि स्पर्धकांच्या शर्यतीतील कामगिरीची नोंद  ठेवणारे मोजणीदार यांचा या पथकात समावेश असेल.

विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांनी केली घोषणा: आमदारकीचा राजीनामा देणार

चित्रपट गृहातील मारहाण प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्याने याप्रकरणी मुंब्रो पोलिसांकडे तक्रार केली आहे. गुन्हा दाखल होताच आव्हाडांनी मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा केली आहे.

खोटे गुन्हे दाखल केले

जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आहे, तेही कलम 354चे. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही.

ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात काल रात्री आव्हाडांविरोधात भाजप महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. काल मुंब्रा येथे उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यातच ही घटना घडल्याचे भाजप महिला पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.

महिलेचा नेमका आरोप काय?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते काल ठाण्यात दोन उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रथम कळवा पूल व त्यानंतर मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित भाजप महिला पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि महिला पदाधिकारी आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. या घटनेबाबत महिला पदाधिकाऱ्याने आरोप केला की, आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलले.

घटनेनंतर भाजप महिला पदाधिकाऱ्याने मुंब्रा पोलिस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार केली. पोलिसांनीही तातडीने तक्रारीची दखल घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे संतापलेल्या जितेंद्र आव्हाडांनी 72 तासांत पोलिसांनी माझ्याविरोधात दोन खोट्या केसेस दाखल केल्या. लोकशाहीची हत्या बघू शकत नाही. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा केली.

शनिवारीच मिळाला जामीन

हर हर महादेव चित्रपटाला विरोध करण्यासाठी चित्रपटगृहात धुडगूस व प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणातून दिलासा मिळत नाही तोच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे. पोलिस आता याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुंबई–जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी सायंकाळी माझा विनयभंग केला, असा आरोप भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. याच आरोपावरुन जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यातच ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही आता समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड आणि भाजपच्या महिला पदाधिकारी रिदा रशिद गर्दीत समोरासमोर आले तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी त्यांना बाजुला केल्याचे दिसत आहे. यावरुनच रिदा रशिद यांनी आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ही घटना घडली.

आव्हाडांनी गर्दीचा फायदा घेतला

तक्रारीत रिदा रशिद यांनी म्हटले आहे की, काल सायंकाळी 4 वाजता मुंब्रा येथे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुलाचा लोकर्पण सोहळा होता. या कार्यक्रमासाठी मीदेखील गेले होते. लोकार्पण सोहळ्यानंतर सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीच्या डाव्या बाजुस मी उभे होते. त्याच बाजुने जितेंद्र आव्हाड समोरून आले. मी पुढे थांबली असुनही गर्दीचा फायदा घेवुन माझा विनयभंग करण्याचे उद्देशाने त्यांनी दोन्ही हातांनी माझ्या दोन्ही खांदयास धरले. “काय मध्ये उभी आहे चल बाजुला हो ” असे लोंकाना समजु नये म्हणुन बोलुन मला बाजुला ढकलले.

वेगळ्या उद्देशाने स्पर्श केला

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाडांनी मला वेगळया उद्देशाने स्पर्श केल्याने माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यावेळी मी तेथुन पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 1 यांच्याकडे गेले. त्यांनी या बाबीची तक्रार देण्यासाठी सांगितल्याने मी मुंब्रा पेालिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

मुंबई, : पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना त्यांची कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुलभा आर्या यांनी केले. येत्या २० नोव्हेंबरपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. विविध सिनेमा, नाटक आणि कलाकृती यावेळी सादर होणार आहेत.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने १२ ते २० नोव्हेंबर २०२२ असे एकूण ९ दिवस कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जीवन सुंदर आहे‘ ही यावर्षीच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रम, स्टॉल्स तसेच उपक्रमांची रेलचेल असणार आहे.

१४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, बालचित्रपट महोत्सव असणार आहे. या वर्षी पहिल्यांदाच आदिवासी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याकरता या महोत्सवात आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच अंध, अपंग आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांनाही कला सादरीकरणाकरता निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना काही दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आहे.

अन्य विविध कार्यक्रमांत अंध विद्यार्थांचा संगीत सोहळा, महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण तसेच अन्य विविध कार्यक्रम असतील. मतिमंद, महिला बचत गट, तृतीयपंथीय आणि अपंगांकरिता विविध स्टॉल्सही येथे असणार आहेत.पु.लं. देशपांडे कला महोत्सवात नवोदितांना संधी देण्याचे धोरण असल्याने ज्यांनी मागील तीन वर्षात एकाही महोत्सवात मानधन घेतलेले नाही अशा कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे.

दुसरा दिवस थरारक मर्दानी कलांनी गाजविला!

‘पु.ल. कला महोत्सवा’चा दुसरा दिवस छावा प्रतिष्ठान, अतीत जि.सातारा यांच्या थरारक मर्दानी कलांच्या सादरीकरणाने गाजला. यावेळी श्री. उदय यादव आणि त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेल्या साहसी कलांच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. लाठीकाठी, तलवारबाजी, कुऱ्हाड, दांडपट्टा तसेच आगीच्या माध्यमातून केले जाणारे साहसी खेळ यांमुळे टाळ्या आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात सर्वानी मनमुराद दाद दिली.
यानंतर नृत्य समशेर, ठाणे या तृतीयपंथीयांच्या लावणी नृत्य सादरीकरणाने महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर झाला. लावणीचे महाराष्ट्राच्या परंपरेतील योगदान मोठे असून या कलावंतांना महोत्सवाच्या निमित्ताने एक उत्तम व्यासपीठ मिळाल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली.
कलांगणात सादर झालेल्या लावणीच्या ह्या कार्यक्रमात सर्वच रसिकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांची मोठी दाद कलाकारांना मोठी पावती देऊन गेली. ढोलकीच्या तालावर, ह्या लावणी नर्तकांनी धरलेला ताल लोकांना मंत्रमुग्ध करून गेला.

कार्यक्रम :

दुपारी ३:०० वा. गोष्ट ऑस्करची आणि मीनाक्षी पाटील दिग्दर्शित माहितीपटांचे सादरीकरण.

सायंकाळी ४:०० वा.: ‘कुणाल मोतलिंग’ दिग्दर्शित ‘माईम’ या कलेवर आधारित कार्यक्रम

सुयश म्हात्रे दिग्दर्शित बालनाट्य ‘योद्धा’ सायंकाळी ५:३० वा.

रात्री कलांगणात लहान मुलांचा स्टॅन्ड अप कॉमेडी आणि हास्य यांवर आधारित कार्यक्रम

आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंतीच्या पूर्व संध्येला दीपोत्सव संपन्न

पुणे -मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आध्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंतीच्या पूर्व संध्येला आज सायं ६ वासता दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमाचे उदघाटन माजी गृहराज्य मंत्री रमेशदादा बागवे (संस्थापक अध्यक्ष मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक , संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश बागवे , मातंग समाजाचे जेष्ठ नेते अंक्कल सोनावणे, संघटनेचे शहर अध्यक्ष विठ्ठल थोरात, पुणे शहर महीला अध्यक्षराजश्री अडसुळ ,सौ सुरेखा खंडाळे,अरुण गायकवाड, मधुकर चांदणे , संजय साठे, दयानंद अडागळे, सुनिल बावकर, मारुती कसबे, रोहीत अवचिते , हुसेन शेख सचिन वाघमारे ,लक्षमण चव्हाण ,अदित्य गायकवाड , व इतर मान्यवर व महीला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निवडणूक संस्थाचालक गटात बिनविरोध निवडणूक

विद्यापीठाच्या निवडणुकीत पहिलीच घटना

विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार बिनविरोध विजय

पुणे –

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशातील विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटातून अधीसभेवर विद्यापीठ विकास मंचाच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

संस्थाचालकांच्या खुल्या गटातून डॉ. राजेंद्र विखे-पाटील, डॉ.अपूर्व हिरे, प्रा. विनायक आंबेकर, श्री. अशोक सावंत यांची आणि महिला गटात डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांचा बिनविरोध उमेदवारांत समावेश आहे.

विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

पांडे म्हणाले, विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटात बिनविरोध निवडणूक झाली आहे. ही बिनविरोध होण्यासाठी विद्यापीठ विकास मंचच्या प्रयत्नांना यश आले आहे. डॉ गजानन एकबोटे,डॉ. राजेंद्र विखे पाटील, डॉ अपूर्व हिरे, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. नितीन ठाकरे, डॉ संदीप कदम, अभाविप चेप्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले.

बोगस हंगामी फवारणी कर्मचारी ६९ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल….

0

पुणे : हिवताप कार्यक्रमात सन २०२१ मध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्या पद भरतीच्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या एकूण ६९ उमेदवारांचे प्रमाणपत्र चौकशीअंती जणांचे प्रमाणपत्र बोगस आढळल्यानंतर शासनाने उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर यांना गुन्हे दखल करण्यासाठी प्राधिकृत केले होते.त्या अनुषंगाने आज शिवाजीनगर पोलिस स्टेशन , बीड येथे एकूण ६९ जणांवर विहित कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणात संबंधितांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे सदर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे सदर प्रमाणपत्र कोणत्याही पदभरतीमध्ये व शासकीय कामकाजामध्ये वापरले जाणार नाही असे आदेश देण्यात आलेले आहेत.

नोकरीसाठी चुकीची माहिती किंवा बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली तर याची गंभीर दखल घेतली जाईल व बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्यानंतर सक्त कारवाई करण्यात येईल तसेच कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्वरित गंभीर दखल घेऊन त्यावर नियमानुसार कठोर कार्यवाही केली जाईल तसेच या बनावट प्रमाणपत्र प्रकरणांमध्ये ज्या व्यक्तींचा सहभाग आहे त्या सर्व व्यक्तींवर कार्यवाही केली जाईल व कोणाचीही गय केली जाणार नाही असे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे .

या प्रकरणी पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित दावे निकाली काढून पुणे राज्यात प्रथम

पुणे,दि.१३: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ६६ हजार ४३९ प्रलंबित दावे निकाली काढून पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले.

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली १ हजार ४०६, तडजोड पात्र फौजदारी ६ हजार १८६, वीज देयक ३६८, कामगार विवाद खटले १३, भुसंपादन ८८, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १३६, वैवाहिक विवाद १४४, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट १ हजार ५११, इतर दिवाणी ३८४, महसूल ५ हजार १४, पाणी कर ४९ हजार २६१, ग्राहक विवाद २८ आणि इतर १ हजार ९०० प्रकरणे अशी एकूण ६६ हजार ४३९ निकाली काढण्यात आली आहेत.

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ६६ हजार ७४१ प्रलंबित प्रकरणांमधून ९ हजार ६७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ७१ कोटी २९ लाख तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व १ लाख २८ हजार ५४६ दाव्यापैकी ५६ हजार ७६६ दावे निकाली काढण्यात येऊन ६८ कोटी ७३ लक्ष रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण ६६ हजार ४३९ दावे निकाली काढण्यात येऊन १४० कोटी २ लक्ष रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.

घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या ५ जोडप्यांनी लोक अदालतीत सामंजस्याने परत संसार करण्याचा निर्णय घेतला.

विशेष मोहिमेअंतर्गत ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान १३ हजार ७६० दावे सुनावणीसाठी घेण्यात येऊन त्यापैकी १२ हजार २२ निकाली काढण्यात आले आहेत. अशा प्रकारे पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले असे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मंगल कश्यप यांनी सांगितले.
000

फॅमिली डॉक्टर संकल्पना अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी. : पद्मविभूषण डॉ. सुरेश अडवाणी

  • जीपीए मेगाजिपीकॉन परिषदेचे उद्घाटन

पुणे, प्रतिनिधी, (१३ नोव्हेंबर) :
समाजाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फॅमिली डॉक्टरची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या आजाराचे योग्य निदान, त्यावर पूरक उपचार तसेच त्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. करोनाच्या काळात रुग्णसेवेमध्ये फॅमिली डॉक्टरने दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. फॅमिली डॉक्टरची संकल्पना येणाऱ्या काळात अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा प्रसिद्ध कर्करोग तज्ञ पद्मविभूषण डॉ. सुरेश अडवाणी यांनी रविवारी व्यक्त केली.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने (जीपीए) ‘मेगाजिपीकॉन’ षरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन तसेच संघटनेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘ जीपी लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड ‘ (जीवनगौरव पुरस्कार) चे वितरण डॉ. अडवाणी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रुबी हॉल क्लिनिक चे प्रमुख आणि प्रसिद्ध ह्रदय रोग तज्ञ डॉ. परवेझ ग्रॉंड, जीपीएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. हरीभाऊ सोनावणे, उपाध्यक्ष डॉ. श्रीराम जोशी, खजिनदार डॉ. शुभदा जोशी, सचिव डॉ. सुनील भुजबळ, डॉ. अप्पासाहेब काकडे, सहसचिव डॉ. संदीप निकम, डॉ. भाग्यश्री मूनोत-मेहता, डॉ. शिवाजी कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात जीपीएच्या माजी अध्यक्ष डॉ. सौ. संगीता खेनट यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाणेर येथील बंटारा भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
पद्मविभूषण डॉ. अडवाणी म्हणाले की, परदेशात प्रत्येक विषयात तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरची संख्या वाढत आहे. परिणामी तेथील फॅमिली डॉक्टरची संख्या घटत चालली आहे, त्यांचे गंभीर परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. फॅमिली डॉक्टर हा समाजाचा मुख्य पाया आहे, त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णाला होत असलेल्या त्रासाचे योग्य ते निदान करून आवश्यकता वाटल्यास कोणत्या तज्ज्ञाकडे उपचार घ्यावेत, याचे योग्य ते मार्गदर्शन हे डॉक्टर करू शकतात. गेल्या काही वर्षात भारतात महिलांमध्ये ‘ ब्रेस्ट कॅन्सर’ चे प्रमाण वाढत असून यासाठी महिलांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. महिलांनी मेमोग्राफी सारख्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्याची गरज असल्याचेही डॉ. अडवाणी यांनी सांगितले.
हॉस्पिटल उभारणे सोपे असते, मात्र ते चालविणे अवघड असून डॉक्टरांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. परवेझ ग्रॉंड यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. ‘मेगाजिपीकॉन’ ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यामागची भूमिका जीपीएचे अध्यक्ष डॉ. हरिभाऊ सोनावणे यांनी सांगितली. या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘ समग्र आरोग्यम् ‘ या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

विविध विषयांवर तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

दोन दिवसांच्या या परिषदेमध्ये ‘यूरोलॉजीमध्ये रोबोटिक सर्जरी’, ‘मधुमेहाचे व्यवस्थापन’, ‘आहार आणि रक्तविज्ञान’, ‘मधुमेह व्यवस्थापन’, गुडघे बदलण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर का करावा’, ‘मणक्याच्या रुग्णांमध्ये अलीकडील प्रगती, दैनंदिन ओपीडीमध्ये व्यवस्थापन’, ‘ऑन्कोलॉजी’मध्ये प्रगती’, ‘ टाईप-२ डायबिटीज रिव्हर्स करणे शक्य आहे का?’ अशा विविध विषयांवर चर्चासत्रे झाली.

मुंबई विमानतळावर 32 कोटी रुपयांचे 61 किलो सोने जप्त

0

मुंबई -विमानतळ कस्टम्सने 32 कोटी रुपयांचे 61 किलो सोने जप्त केल्याचे वृत्त ANI ने दिले आहे . तसेच आणि दोन वेगवेगळ्या प्रकरणात सात प्रवाशांना अटक केल्याचे वृत्त दिले आहे मात्र याबाबत अधिकृत तपशील मिळू शकलेला नाही .

https://mobile.twitter.com/mumbaicus3/status/1591721351098007552

भारत आता दुर्बळ राहिलेला नाही, कुणी आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

0
झज्जर-भारताकडे वक्र दृष्टीने बघणाऱ्या कुणालाही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपली सशस्त्र दले पूर्णपणे सुसज्ज आहेत अशा शब्दात, संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी राष्ट्राला आश्वस्त केले आहे.  हरयाणात झज्जर इथे आज 13 नोव्हेंबर 2022 रोजी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या  कार्यक्रमाला संबोधित करताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले  की राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे  लक्ष पूर्णपणे केंद्रीत आहे आणि भविष्यातील आव्हानांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी लष्कराला अत्याधुनिक आणि स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांनी/उपकरणांनी शस्त्रसज्ज केले जात आहे. 

भारत आता दुर्बळ देश राहिलेला नाही;  आम्हाला शांतता हवी आहे, मात्र कुणी आम्हाला उपद्रव दिला तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, आपल्या सैनिकांनी हे वारंवार सिद्ध करुन दाखवले आहे.  2016 चा लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक), 2019 चा बालाकोट हवाई हल्ला आणि गलवान खोऱ्यात आपल्या सैनिकांनी गाजवलेले शौर्य हे आपल्या पराक्रमाचा आणि सज्जतेचा सज्जड पुरावा आहेत,” असे  राजनाथ सिंह म्हणाले.

वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, असेही संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.

झज्जर इथे आज झालेल्या या कार्यक्रमात, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते महान लढवय्या राजा पृथ्वीराज चौहान यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.  पृथ्वीराज चौहान हे  एक महान शासक  होते, त्यांनी केवळ मोठ्या प्रदेशावर  राज्यच केले असे नाही तर ते शौर्य, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक देखील होते, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी पृथ्वीराज चौहान यांचा गौरव केला.

भोर तालुक्यातील स्वप्नपुर्ती महिला ग्रामसंघाचा एल.ई.डी. बल्ब प्रकल्प पथदर्थी- अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार

पुणे: स्वप्नपुर्ती महिला ग्रामसंघाने राबविलेला एल.ई.डी. बल्ब निर्मिती प्रकल्प पथदर्शी असून येत्याकाळात राज्यात एक मोठा उद्योग समूह म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक गावातील महिलांपर्यंत अशा स्वरूपाचे नावीन्यपूर्ण उपक्रम पोहचवून त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

भोर तालुक्यात खोपी गावातील स्वप्नपूर्ती महिला ग्रामसंघाच्यावतीने राबविण्यात उपक्रमांना दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे, मिलिंद टोणपे, भोर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय धनवटे, पेसाचे सहसंचालक विक्रांत बगाडे, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ आणि महिला बचत गटातील सदस्या उपस्थित होत्या.

ग्रामसंघाने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून श्री. कुमार म्हणाले, ग्रामसंघातील गटाच्यावतीने राबविण्यात आलेला एल.ई.डी. बल्ब बनविणे व दुरूस्त करण्याबाबतचा उपक्रम पथदर्शी आहे. या उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यातील महिला समूह गटांना उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे सांगत नवनवीन उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. उमेद व एमएसआरएम अभियानाच्यामाध्यमातून अधिकाधिक महिलांपर्यंत महिला समक्षीकरण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे श्री. कुमार म्हणाले.

महिला बचत गट व ग्रामसंघाना सोई-सुविधा पुरविणार
श्री.प्रसाद म्हणाले, शासनाच्या उमेद व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधून जास्तीत जास्त महिला बचत गटांना लाभ मिळण्यासोबतच जिल्हा परिषद निधीअंतर्गत ग्रामसंघाना त्यांचे व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोई-सूविधा व कायदेशीर मार्गदर्शन पुरविण्यात येणार आहे.

महिला बचत गटांना जि.प.निधीअंतर्गत निवडक गटातील प्रति बचत गटास प्रायोगिक तत्वावर २ लाख रूपये अनुदान व राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पुरवठा करणेत आलेल्या अर्थसहाय्यातून पुण्यश्री सुपर शॉपींची स्थापना येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात भोर व मावळ तालुक्यात प्रत्येकी १ किरकोळ विक्रीचे दुकान करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती व उमेद अभियानाअंतर्गत जिल्ह्यात मागील २ वर्षात बचत गटांची संख्या ४ हजारावरुन २४ हजारवर पोहोचली आहे. २०१९ – २० या वर्षात ५९ कोटी, २०२०-२१ वर्षात ९८ कोटी व २०२१-२२ वर्षात २०२ कोटी कर्ज वाटप झाले आहे. चालू आर्थिक वर्षाअखेर जिल्ह्यातील महिला बचत गटांना एकूण ४०० कोटींची कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँकेमार्फत करण्यात येणार आहे, असे श्री.प्रसाद म्हणाले.

स्वप्नपूर्ती महिला ग्रामसंघ
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) पुणे अंतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात खोपी गावामध्ये एकूण २३ महिला बचतगटांनी एकत्रित येऊन स्वप्नपूर्ती महिला ग्रामसंघाची स्थापना केली. या अंतर्गत मैत्री, जिजामाता, जीवन आनंद, क्रांती ज्योती, उत्कर्ष स्फुर्ती व प्रेरणा या एकूण ७ समूहातील एकूण ११ महिलांनी शासन, स्वयंसहायता गटातील महिलांकडील निधी तसेच राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पुरवठा करण्यात आलेले अर्थसहाय्य ड्रीम एल.ई.डी. लाईट प्रकल्पाची सुरुवात केली.

कुक्कुट पालन व्यवसाय अंतर्गत सुरवातीला (१५ हजार पक्षांचे ) वातानूकुलीत व स्वयंचलित १० गुंठ्यात पोल्ट्रीशेड हे मैत्री, उत्कर्ष जिजामाता, जीवन आनंद व प्रेरणा या ५ समुहातील २० महिलांनी एकत्रित येऊन तब्बल ७० लाखाच्या प्रकल्पाची उभारणी केली आहे. त्याच बरोबर स्वयंसहायता महिलां गटांच्या माध्यमातून मनरेगा व कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात आंबा व तैवाण पेरू या फळपिकांची लागवड केली आहे. ग्रामसंघाने गावामध्ये घणकचरा व्यवस्थापन, कंपोस्ट खत, गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी केली आहे.

ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेला भेट

राजेश कुमार यांनी  मांजरी फार्म येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेलाही भेट दिली. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, संस्थेचे प्राचार्य राहूल काळभोर आदी उपस्थित होते.

श्री. कुमार म्हणाले, ग्रामसेवक हा गावपातळीवर काम करणारा महत्वाचा घटक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार यासारख्या आदर्श गावे निर्माण झाली पाहिजे. ग्रावपातळीवर काम करताना विविधप्रकारच्या अडचणी येतात परंतु अशा परिस्थितीत सक्षमपणे काम करणारा ग्रामसेवक तयार झाला पाहिजे, यादृष्टीने शासन काम करीत आहे. गावांचा पायाभूत विकास करुन आदर्श गावे निर्माण करण्यासाठी ग्रामसेवकांनी काम करावे. प्रशिक्षण संस्थेने अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याबाबत नियोजन करावे. पंचायत राज निर्मिती करणे तसेच शासनाच्या इतर घटकावर काम करण्यासाठी राज्य नेहमीच अग्रेसर आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. काळभोर यांनी संस्थेचे कार्याविषयी माहिती दिली. सुरुवातीला संस्था व प्रशिक्षाणार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.

दक्षिण पुण्यात साडेचार हजार अनधिकृत फ्लेक्स:अधिकाऱ्यांचे अभय

0

पुणे- स्वारगेट ते कात्रज आणि पार्वती पायथा ते आंबेगाव पठार या भागात दिवाळी पासून साडेचार हजार अनधिकृत फ्लेक्स झळकत असून महापालिकेच्या प्रशासनाने यास अभय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळी संपल्यावरही हे फ्लेक्स काढण्याचे कष्ट अद्याप कोणी घ्यायला तयार दिसत नाही.

शहर विद्रुपीकरण करू नका असे म्हणणारेच फ्लेक्स बाजीत आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. पार्वती पायथ्यापासून एका आमदाराने पद्मावती आणि बिबवेवाडी च्या परिसरात तब्बल १ हजार फ्लेक्स लावल्याचे सांगितले जातेय . अगदी १५ ते २० फुटावर हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत , पोलीस ठाण्याच्या परिसरात देखील या आमदाराच्या फ्लेक्सने तुफान गर्दी केल्याचे दिसले आहे. या शिवाय कात्रज ,आंबेगाव पठार , गोकुळनगर,बालाजी नगर , धनकवडी अशा एकूण दक्षिण पुण्यातील परिसरात सुमारे साडेचार हजार फ्लेक्स्ने उच्छाद मांडला आहे. कधीही कोणताही नवा प्रकल्प शहर आणि आपल्या भागाला न दिलेले ,नागरिकांना सहजासहजी न भेटणारे असेअनेक चेहरे या फ्लेक्स बाजीतून झळकून लोकांपुढे आपले चेहरे वारंवार ठेवत असल्याचे दिसते आहे.

राज्य सरकार 4 महिन्यांमध्ये पडेल:सुषमा अंधारेंचा दावा

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार अवघ्या 4 महिन्यांत कोसळेल, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. शिंदे गटातील नाराजी पाहता त्यांचे काही आमदार आमच्या गटात येतील, असे त्यांनी म्हटले आहे.शिंदे गटातील अनेक आमदारांची नाराजी उजेडात येत आहे. त्यामुळे त्यांच्यात सर्वकाही ठिक नसल्याचे स्पष्ट होत आहे. कृषीमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर पडताना चिडचीड करताना दिसून आले. तर प्रताप सरनाईकांच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा लागला आहे, असे अंधारे म्हणाल्या. सरनाईकांची जागा भाजपला हवी असल्यामुळे असे केले जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

वैजनाथ वाघमारेंना शुभेच्छा

गेली 4 ते 5 वर्षे मी विभक्त आहे, मी त्यांना शुभेच्छा देते, वैजनाथ वाघमारेंना अचानक प्रवेश दिला आहे. भावना गवळी यांचे पती सुर्वे आमच्यासोबत आहेत, हे केवळ राजकारण आहे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते असे म्हणत भविष्यात सुषमा अंधारे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे. बाळासाहेबांचे नाव उद्धव ठाकरे नाही घेणार तर कोण घेणार. भातखळकर काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही, त्यांच्यावर बोलणे इतके महत्त्वाचे नाही, अब्दुल सत्तारांना, गुलाबराव पाटील यांना आहे का असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.

खासदार संजय राऊतांना अटक करण्याची गरज नव्हती, अटक बेकायदेशीर होती असे कोर्टाने निरीक्षण नोंदवले असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.

सय्यद यांच्या प्रवेशाला भाजपचा विरोध

दीपाली सय्यद यांचा प्रवेश रखडण्यापाठीमागे त्यांनी भाजपविरोधी केलेली वक्तव्ये असल्याचे माझ्या कानावर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेली वक्तव्य यामुळे सय्यद यांचा पक्षप्रवेश रखडला असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यावर जोपर्यंत दीपाली सय्यद माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांचा प्रवेश होणार नाही, अशी भूमिका भाजपकडून त्यांच्या प्रवेश होऊ दिला जाणार नाही असा दावाच अंधारे यांनी केला आहे. 9 तारखेला त्या प्रवेश करणार होत्या, आणि आज 13 तारीख उजाडली आहे, यामुळेच भाजप त्यांचा प्रवेश करुण घ्यायला तयार नाही, असा टोला अंधारेंनी लगावला आहे. प्रवेश करणे हे त्यांचा विषय त्यात आम्ही पडणार नाही.

सुषमा अंधारेंना शह देण्यासाठी खेळी:अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला असून त्यापाठोपाठ बाळासाहेबांच्या शिवसेनेने रविवारी ठाण्यात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे, माजी आमदार योगेश पाटील आणि ठाकरे गटासह विविध पक्षातील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला.

गेल्या तीन महिन्यांपासून किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा होत्या. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे. किर्तीकर यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला असतानाच, रविवारी शिंदे गटाने रविवारी ठाण्यातील टेंभीनाका येथील आंनद मठात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे, माजी आमदार योगेश पाटील, ठाकरे गटासह विविध पक्षातील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी धक्का दिला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हे सरकार असल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया वैजनाथ वाघमारे यांनी दिली. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला.