Home Blog Page 1506

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन सभा संपन्न.

पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. अभिवादन सभे आगोदर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी अभिवादनपर मनोगत व्‍यक्त करताना उल्हास पवार असे म्हणाले की, ‘‘डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीची रचना करण्यासाठी ज्यांनी जास्त हालअपेष्ठा सहन केल्या आहेत अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर घटना समितीचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली होती. आपले भाग्य आहे की डॉ. बाबासाहेबांनी पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे तीन ते चार महिने वास्तव्‍य करून घटना समितीचा मसुदा तयार केला होता.’’

यानंतर माजी आमदार अनंतराव गाडगीळ म्हणाले, ‘‘घटना समितीत काकासाहेब गाडगीळांचा समावेश होता. कश्मिर प्रश्न व अन्य प्रश्नांसाठी डॉ. बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे.’’

त्यानंतर माजी आमदार दिप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘मागासवर्गीय समाजासाठी संसद ते रस्त्यावर आवाज उठविणारे त्याचप्रमाणे सर्व घटकांचा विचार करून राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुढच्या पिढीने पुढे नेण्याची गरज आहे.’’

यानंतर प्रदेश चिटणीस संजय बालगुडे म्हणाले की, ‘‘आर.बी.आय. ची स्थापना शेती, पाणी यावर डॉ. बाबासाहेबांनी अनेक प्रबंध लिहिले व अमलात आणले.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर सरचिटणीस सुजित यादव यांनी केले तर आभार मेहबुब नदाफ मानले.

यावेळी नगरसेवक अजित दरेकर, कमल व्‍यवहारे, पुजा आनंद, द. स. पोळेकर, संदिप मोरे, सुनिल घाडगे, सतिश पवार, गुलाम खान, सचिन सुडगे, मंगेश निरगुडकर, मनोज पवार, भगवान कडू, बाळासाहेब मारणे, पपिता सोनावणे, ज्योती परदेशी, ॲड. अश्विन गवारे, ॲड. रेश्मा शिकलगार, सोनिया ओव्‍हाळ, संदिप कांबळे, ईश्वर गायकवाड, अनिस खान, चंद्रकांत नार्वेकर, हरिदास अडसूळ, गणेश काकडे, भारत इंगुले, फैय्याज शेख आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी खास मोबाईल अँप तयार करावे निवासासह सर्व व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करावे


सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश
मुंबई, दि. ६ डिसेंबर : ‘कोविड- १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसिध्दि माध्यमांचे प्रतिनिधी आदी सर्वांची निवासाची व्यवस्था पुरविण्याचे सूक्ष्म आणि अचूकपणे नियोजन करावे. त्याचप्रमाणे कोणाचीही कुठलीही गैरसोय होणार नाही. त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनच्या काळात केलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोबाईल अॅप तयार करावे असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
मंत्रालयातील परिषद सभागृहात आज सकाळी विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२२ च्या प्रस्तावित निवास व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, आहार व्यवस्था, वाय-फाय व्यवस्था, प्रसिध्दीमाध्यमांची व्यवस्था आदींचा सविस्तर आढावा चव्हाण यांनी घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागूल, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सुभाष गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री चव्हाण यांनी सांगितले, दोन वर्षांच्या खंडानंतर अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर निवास व्यवस्था तसेच अन्य सर्व व्यवस्था अद्ययावत करावी. ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. आवश्यक तेथे डागडुजी करावी. वीज, पाणी, स्वच्छता आदी सुविधा तत्काळ उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. त्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावे. तसेच शीघ्र प्रतिसाद दल कार्यान्वित करावे. निवास व्यवस्थेचे नियोजन करताना अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदींच्या चालकांची व्यवस्था तसेच आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. स्वच्छतेसाठी तैनात कर्मचाऱ्यांची माहिती दर्शनी फलकांवर लावावी. नियुक्त मनुष्यबळ योग्य गणवेशात राहील याची खबरदारी संबंधितांनी यंत्रणांनी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिवाळी अधिवेशनाच्या काळात करण्यात येणा-या सर्व सोयी -सुविधांची एकत्रिक माहिती असणारे मोबाईल अॅप तयार करावे जेणेकरून त्या अॅपवर सर्व माहिती उपलब्ध होऊ शकेल. असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनीही विविध सूचना केल्या. अधीक्षक अभियंता नंदनवार, कार्यकारी अभियंता कुचेवार यांनी निवास व्यवस्थेबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद! कर्नाटकच्या गाड्यांना फासलं काळं

पुणे-कन्नड रक्षण वेदिका या संघटनेकडून महाराष्ट्रातील वाहनांंवर हल्ले झाल्याच्या प्रकारचे पडसाद आज पुण्यात उमटू लागल्याचे दिसून येत आहे .कर्नाटकच्या बसेस वर आज आंदोलकांनी काळ्या रंगाचे फवारे मारले तर कुठे भगव्या अक्षरात ‘जय महाराष्ट्र ‘ लिहिले गेले. पोलिसांनी तोडफोड होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याची भूमिका घेतलेली दिसली .

आज सकाळी कर्नाटकात महाराष्ट्रातील पाच ते दहा वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांना अटक केली. नारायण गौडा यांना देखील अटक करण्यात आली. कर्नाटकातील हिरेबागेवाडी या ठिकाणी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांवर कन्नड वेदिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केला आहे.यामुळे महाराष्ट्रात देखील आता कर्नाटक विरोधात वातावरण निर्माण होऊ पाहत आहे .

कर्नाटकला जशास तसे उत्तर द्या- अजित पवार

पुणे- कर्नाटकात महाराष्ट्रातील मोटारींवर झालेल्या हल्ल्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते , विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे आज त्यांनी थोड्या वेळापूर्वी फेसबुक वर आपल्या भावना व्यक्त करणारी पोस्ट टाकली आहे .

काय म्हटले आहे अजित पवारांनी नेमके त्यांच्याच शब्दात –

मराठी भाषक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला आहे. अशा हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारनं खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारनं दाखवावी. कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारनं यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीनं सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभे आहेत. सत्तारुढ पक्षांनी देखील आपलं कर्तव्य पार पाडावं. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे.

24 तासांत हल्ले थांबले नाहीत तर बेळगावला जाणार; तर कर्नाटक, केंद्र जबाबदार..शरद पवारांनी दिला थेट अल्टीमेटम..

केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये

मुंबई-महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर हल्ले येत्या चोवीस तासात थांबले नाही तर त्या संयमाला वेगळी किनार मिळेल व त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार त्यासाठी जबाबदार राहतील अशी शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करून बेळगावला जाणार असल्याचे सुतोवाच करत थेट पवारांनी कर्नाटक सरकारला अल्टीमेटम दिला आहे.शरद पवारांनी आज महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर पत्रकार परिषद घेतली. मुंबईत आज ते बोलत होते.पवार म्हणाले, कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादावार आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही अशी भाषा असो की, सीमावादावर भाष्य असो की, जतच्या ग्रामस्थांना केलेले आवाहन असो कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर केलेल्या भाषेवर आता भूमिका घेण्याची गरज आहे.शरद पवार म्हणाले, माझ्याकडे जी माहिती आहे ती चिंताजनक आहे. आज मला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जे काॅल येत आहेत ते चिंता व्यक्त करणारे आहे. एकीकरण समितीच्या कार्यालयासमोर पोलिस तैनात आहेत. समितीला निवेदन देण्यापासून मज्जाव केला जात आहे. मराठी लोकांवर बेळगावात दहशतीचे वातावरण आहे. कर्नाटकात 19 डिसेंबरला अधिवेशन असून त्यापूर्वी दहशत मराठी माणसांवर दडपशाही केली जात आहे.शरद पवार म्हणाले, तुम्ही कुणीतरी आम्हाला येऊन धीर द्यावा असे पत्र एकीकरण समितीचे आहे. या भागातील लोकांची महाराष्ट्रात सामिल होण्याची तयारी आणि इच्छा आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीसांनी केलेला काॅल उपयोग झाला नाही.शरद पवार म्हणाले, आज महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर जे हल्ले झाले, त्यामुळे भितीचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या संयम बाळगत आहे अजूनही बाळगेल. परंतु संयमालाही मर्यादा असतात. येत्या चोवीस तासात महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर त्या संयमाला वेगळी किनार मिळेल व त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार त्यासाठी जबाबदार राहील.शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेची भूमिका अजूनही संयमाची आहे. पण कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याकडून चिथावणीखोर वक्तव्य येत आहे. त्यांच्या सहकाऱ्यांकडून हल्ले होत असतील तर हे देशाच्या ऐक्याला फार मोठा धक्का आहे. हेच काम जर कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही.शरद पवार म्हणाले, उद्यापासून संसदेत सेशन सुरू होत आहे. महाराष्ट्रातील खासदारांना सांगितले की, कर्नाटकाबाबत गृहमंत्र्यांना प्रत्यक्ष परिस्थिती सांगा असे मी त्यांना सांगितले. त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नसेल आणि कायदा जर हातात घेतला जात असेल तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारची असेल.शरद पवार म्हणाले, सीमावादावर आम्ही संवेदनशील आहोत. महाराष्ट्राची भूमिका एका पक्षाची नाही. यावर सर्व पक्ष एकत्र आले आहेत. तेव्हा बैठका घेत न्यायालयीन लढण्याचे निर्णय घेतला आज ती लढाई न्यायालयात आहे. आपापली भूमिका मांडण्याची दोन्ही राज्यांना समान संधी आहे. परंतु, कर्नाटक सरकारकडून कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.

फडणवीस – बोम्मईंची फोनवर चर्चा:महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल केला निषेध

मुंबई-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल निषेध व्यक्त केला. त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन बोम्मई यांनी दिले.कर्नाटक – महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्यात आज मंगळवारी कन्नड रक्षण वेदिका संघटनेने कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापलेय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याने उठलेली आरोप – प्रत्यारोपाची राळ शमत नाही तोच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाने पुन्हा डोके वर काढलेय. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या गावांनी पाणीप्रश्नी आक्रमक होत कर्नाटकात जायचा इशारा दिला. त्यानंतर अक्कलकोट, पंढरपूरमध्येही अशीच मागणी झाली. पुढे नाशिकमधल्या सुरगाणा तालुक्यातल्या नागरिकांनी गुजरातमध्ये तर नांदेड जिल्ह्यातल्या गावांनी तेलंगणामध्ये जायची मागणी केली. त्यामुळे पुन्हा एकदा सीमावादाच्या ठिणग्या पेटल्यात. त्यात आज मंगळवारी कन्नड रक्षण वेदिका संघटनेने कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय.

खरे तर आज मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील कर्नाटक दौऱ्यावर होते. मात्र, महापरिनिर्वाणदिनी सीमावाद चिघळू नये, असे म्हणत या मंत्र्यांनी आजचा दौरा रद्द केल्याचे सांगितले. तर दुसरीकडे आज कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी तीव्र शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंकडे निषेध व्यक्त केला.

फडणवीस आणि बोम्मई यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल फडणवीसांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करू, महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांना संरक्षण देऊ, असे आश्वासन बोम्मईंनी फडणवीसांना दिल्याचे समजते.

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक,ट्रकवर झेंडे मिरवले

कोल्हापूर – कन्नड रक्षण वेदिका या संघटनेकडून महाराष्ट्रातील वाहनावर हल्ला करण्यात आला.कर्नाटकातील हिरेबागेवाडी या ठिकाणी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पाच ते दहा वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांना अटक केली. नारायण गौडा यांना देखील अटक करण्यात आली. पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांवर कन्नड वेदिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केला आहे.कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावादाने सोमवारी नवे वळण घेतले. महाराष्ट्राचे दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी मंगळवारी कर्नाटकच्या बेळगावला भेट देण्याची घोषणा केली होती. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कायदा आणि सुव्यवस्थेला धोका असल्याचे सांगितले. मंत्र्यांना इथे येण्यापासून रोखा. महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात आले तर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर मंत्र्यांचा प्रस्तावित दौरा पुढे ढकलण्यात आला.

कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 6 : “कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे असलेले प्रकल्प स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कोकण भूमी प्रतिष्ठानच्या ‘मी मुंबई अभियान’ अंतर्गत ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, संजय शिरसाठ, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, आयोजक संजय यादवराव आदी उपस्थित होते. नेस्को सेंटर, गोरेगाव येथे आयोजित हा महोत्सव चार दिवस चालणार आहे.

निसर्गसमृद्ध कोकणाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा हा महोत्सव असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला दिशा आणि गती देण्याचे काम केले जात आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी उपलब्ध आहे. काजू, आंबा, मत्स्यव्यवसाय यांच्यासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. कोकणचे वैभव जपणे सर्वांचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊनच कोकणासाठी विविध पर्यावरणपूरक योजना, प्रकल्प, उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.”

लहरी हवामानामुळे कोकण किनारपट्टीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यातून सावरण्याचे बळ देण्याबरोबरच स्थानिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचेही ते म्हणाले. तरूणांना रोजगार उपलब्ध करून कोकणचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

कोकण ही नररत्नांची खाण आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या कला, संस्कृती, वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे दर्शन होत असून येत्या काळात अधिक चांगल्या आणि पर्यावरणपूरक योजना राबवून कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

“कोकणातला आंबा अधिक गोड की माणूस” असा प्रश्न पडतो अशा शब्दात कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाचे कौतुक करून श्री.फडणवीस म्हणाले, “बंदरे, मासेमारी, विविध उद्योग, पर्यटन विकासासह स्थानिकांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा निर्धार आहे” हा महोत्सव म्हणजे कोकणच्या समृद्धी आणि विकासासाठी आवश्यक व्यक्तींचे एकत्रित संमेलन असून राज्य शासन कोकणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

काजूसारख्या उत्पादनात कोकणची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे नारळ, मत्स्यपालन, आंबा प्रक्रिया, पर्यटन, वन उत्पादने असे विविध उद्योग हे कोकणचे वैभव असून प्रत्येक जिल्ह्याची गरज ओळखून त्या उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नमूद केले.

प्रारंभी महोत्सवाचे संयोजक आमदार प्रवीण दरेकर तसेच स्वागताध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, झाशीच्या राणीचे वंशज राजू नेवाळकर यांच्यासह कोकणच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जगात सर्वोत्तम संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले.  सर्वसामान्य व्यक्तीला सर्वोच्च स्थानी जाण्याची संधी आपल्या संविधानामुळे मिळाली आहे.  आजचा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करण्याचा आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाची दिशा बदलण्याचे काम केले. सर्वसामान्य व्यक्तीला समान अधिकार दिले. कोणताही भेद करता येणार नाही असा बीजमंत्र त्यांनी आपल्याला दिला. समता, बंधुत्व, मानवतेचा संदेश दिला.  गौतम बुद्धांचे विचार समाजात रुजविण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून केले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीदेखील ‘देशाच्या संविधानामुळे आपल्याला सर्वोच्च स्थानी पोहोचता आले’ याचा आवर्जून उल्लेख करतात. संविधानाची खरी शक्ती ही आहे.  महाराष्ट्र शासनाच्या वतीने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिभव्य स्मारकाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुंबई महापालिकेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेषांकाचे वितरण मान्यवरांना करण्यात आले.

दिव्यांग विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असलेल्या माहिती पुस्तिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक लवकरच पूर्ण होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने सर्वसामान्यांना जगण्याचा हक्क दिला. डॉ. बाबासाहेब यांचे विचार व कार्य जागतिक पातळीवर पोहोचावे यासाठी इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात-लवकर पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेबांनी सर्वसामांन्याना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून डॉ. बाबासाहेब यांनी राज्यघटना दिली, वैचारिक बळ देऊन गुलामगिरीतून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली.  “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’’ हा मूलमंत्र दिला.  त्यांच्या विचारांवर राज्य सरकार वाटचाल करीत आहे.

दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी आणि ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल. सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कार्यरत राहील. राज्यात शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे, शिष्यवृत्ती वाढविली जात आहे. सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी निर्णय घेतले जात आहेत. नुकतेच स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

…तर देशातील रस्ते देखील खड्डे विरहीत होऊ शकतात

रस्ते बांधणी तंत्रज्ञानातील आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. विजय जोशी यांचे मत – विद्या महामंडळ पुणे पु.ग.वैद्य स्मृती पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : जेव्हा ऑस्ट्रेलियातील सिडनी एअरपोर्टच्या तिसऱ्या रनवेचे काम मला मिळाले तेव्हा तिथे देखील जुन्या पद्धती प्रमाणेच काम केले जात होते. परंतु जेव्हा मी स्टिल उत्पादनादरम्यान तयार होणारी मळी रस्ते बांधण्यात कशी वापरता येईल हा विषय मांडला तेव्हा त्यांनी मला संधी दिली. आज आपल्या देशात देखील अनेक ठिकाणी चांगले रस्ते होत आहेत. जर समाजभान राखून विचार केला तर वेस्ट प्रोडक्टपासून देखील देशात टिकाऊ आणि खड्डे विरहित रस्ते होऊ शकतात, असे मत रस्ते बांधणी तंत्रज्ञानातील आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. विजय जोशी यांनी व्यक्त केले.

डेक्कन येथील विद्या महामंडळ संस्थेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त लोकशिक्षण दिन साजरा केला जातो. यावेळी आपटे प्रशालेच्यावतीने पु.ग.वैद्य स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना पु.ग.वैद्य स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभय आपटे, कार्याध्यक्ष डॉ.अ.ल. देशमुख, कार्यवाह गीता देडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सन्मानचिन्ह,  अकरा हजाराचा धनादेश, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. विजय जोशी म्हणाले, आज देशात रस्ते बांधणी  सल्लागार म्हणून मी काम करीत आहेच. परंतु त्याचे मूल्य कधीच घेतले नाही. किती ही पैसे कमावले तरी देखील शेवटी तुम्ही किती यशस्वी झालात हे महत्वाचे असते, असे ही त्यांनी सांगितले.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अक्षय शिंदे म्हणाले, मी सामान्य कुटुंबातील असलो तरी उच्च ध्येय आणि समाजभानाचे संस्कार मला माझ्या आई वडिलांकडून मिळाले आणि ते जोपासण्याचे संस्कार प्रशाले कडून मिळाले. जर मी या प्रशालेत आलो नसतो तर मी आज या पदाला देखील पोहचू शकलो नसतो. पोलीस म्हणून काम करीत असताना अनेक नकारात्मक गोष्टींना सतत सामोरे जावे लागत असते. परंतु अशा सत्कारांमधून सकारात्मक उर्जा मिळत असते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. अ.ल. देशमुख म्हणाले, पु.ग.वैद्य सरांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार शाळेतील कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना दिला जातो. डॉ. अक्षय शिंदे सारख्या विद्यार्थांकडे पाहून वैद्य सरांनी दिलेली शिकवण या विद्यार्थांमध्ये रुजलेली दिसते, असे ही त्यांनी सांगितले.

दत्तजयंतीनिमित्त दत्तजन्म सोहळा व पालखी नगरप्रदक्षिणा 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे
पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२५ व्या दत्तजयंती सोहळ्यांतर्गत दत्तजयंतीनिमित्त बुधवार, दिनांक ७ डिसेंबर रोजी पहाटे ६ पासून मंदिर खुले राहणार असून संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्तजयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम, दत्तजन्म सोहळा, पालखीची भव्य नगरप्रदक्षिणा होणार आहे. दत्तमंदिराला विविधरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी यांनी दिली.   
बुधवारी सकाळी ६.३० वाजता ट्रस्टचे विश्वस्त अक्षय हलवाई व कुटुंबियांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर ट्रस्टचे विश्वस्त राजू बलकवडे व कुटुंबियांच्या हस्ते श्री दत्तयाग होईल. सकाळी ८.३०  वाजता प्रात: आरती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.पांडुरंग व वर्षा थोरवे यांच्या हस्ते तसेच दुपारी १२.३० वाजता राजकुमार चोरडिया व कुटुंबियांच्या हस्ते माध्यान्ह आरती होईल. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे यांचे दत्तजन्म कीर्तन सायंकाळी ५ वाजता असून सायंकाळी ५.५५ वाजता दत्तजन्म सोहळा पार पडेल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पालखीची भव्य नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कर्नाटक संकेश्वर पीठाचे प.पू. सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती उपस्थित राहणार आहेत. पालखी सोहळ्यात पारंपरिक बग्गी, घोडे, उंट, विद्युत छत्र्यांसह बँड, रुद्र ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहे. रात्री १०.३० वाजता मंदिरात पारंपरिक पालखी व पदे होतील. 
दत्तमंदिराचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी म्हणजेच १२५ वे वर्ष आहे. भाविकांच्या स्वहस्ते अभिषेकाची सुविधा सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत मंदिरासमोरील उत्सव मंडपात करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांनी सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले अभिवादन

मुंबई, दि,६: राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री संजय शिरसाट, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, जयंत पाटील तसेच, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. अशोक स्तंभाजवळील भीम ज्योतीचे दर्शन घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली.बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

यावेळी भंते बी. संगप्पा महाथेरो, सुमेध बोधी, धम्मप्रीय यांनी मान्यवरांच्या उपस्थिती वंदना पठण केली. चैत्यभूमी स्तूप येथे व्यवस्थापक भिकाजी कांबळे, प्रतीक कांबळे, रमेश जाधव, अध्यक्ष उत्तम मग्रे यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन पाहिले.

जिजा परांजपेच्या “अरंगेत्रम”ने प्रेक्षक मंत्रमुग्ध.. 

पुणे: समईच्या मंद उजेडात चमकणारी दाक्षिणात्य थाटातील गायन आणि त्याच्या तालावर मनोहारी विभ्रम करत लयीत, डौलदारपणे पदन्यास करणारी नर्तिका आणि मंत्रमुग्ध होऊन पाहणारे प्रेक्षक.. हे दृश्य होते भरतनाट्यम नृत्यांगना जिजा परांजपे हिच्या “राम वरदायिनी” एक नृत्यसेतू या अरंगेत्रम सादरीकरण सोहळ्यातील. कोथरूडमधील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे हा नृत्याचा कार्यक्रम झाला. नृत्यभक्ती फाउंडेशनच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

गुरु सई परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमचे धडे घेणारी नृत्यांगना जिजा हिने अरंगेत्रम सादर केले. या कार्यक्रमात जिजाने श्रीराम जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्याचा हुबेहूब प्रसंग भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या विविध छटेतून सादर केला. कार्यक्रमाला सिंबोयसेसच्या मुख्याध्यापिका वीणा हवनूरकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमात जिजाने आदिताल वर आधारित श्रीराम कौतुकम, रागमालिका या रागावर आधारित नवरस रामायणा, तालमालिका रागावर आधारित जतीस्वरम, चक्रवकम रागावर आधारित वरनम, आदिताल रागावर आधारित हनुमान चालिसा आणि पदम, रामराज्याभिषेक या प्रकाराचे सादरीकरण केले. जिजाच्या नृत्यात ताल व सुर व पदलालित्याचा सुरेख संगम या वेळी पाहायला मिळाला.

या कार्यक्रमात निवेदन अशितोष परांजपे, तन्मय जक्का यांनी दिली. वेशभूषा लहेजा सई, कार्ड डिजायनर हर्षल वावळे, व्हिडिओ केदार गोडबोले यांनी केला.

अरंगेत्रम सादर करणे हे प्रत्येक नृत्य शिकणाऱ्या शिष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. भरतनाट्यम  नृत्यशैलीतील एका विशिष्ट पातळीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच अरंगेत्रम् सादर करण्याची परवानगी असते. यामध्ये विविध प्रकारातील नृत्यरचना सलग सादर कराव्या लागतात. हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो.

ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत सुरू करा-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना सूचना

पुणे – ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवाबससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना पीएमपीएमएल प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‌अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवादेखील सुरू झाली. त्यामुळे महामंडळाने पीएमपीएमएल प्रशासनाकडे पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करण्याची विनंती केली होती.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला होता. पत्राच्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ११ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून १२ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.‌ पीएमपीएमएल प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती‌. मात्र, ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना आज सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा होणार आहे.