Home Blog Page 1505

महागड्या गाड्यांच्या बॅटर्‍या चोरणारे अल्पवयीन ताब्यात

पुणे-महागड्या गाड्यांच्या बॅटर्‍या चोरून विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघा अल्पवयीन मुलांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन महागड्या बॅटर्‍या, दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. त्यांनी आंबेगाव आणि धनकवडी परिसरातील महागड्या गाड्यांच्या बॅटर्‍या चोरल्याची कबुली दिली.

भारती विद्यापीठ ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ आणि उपनिरीक्षक धीरज गुप्ता हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आंबेगावमध्ये दोघे अल्पवयीन बॅटर्‍या विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी व आशिष गायकवाड यांना मिळाली. पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी बॅटर्‍या चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहीरट, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, अमर भोसले, शैलेश साठे, रविंद्र चिप्पा, विश्वनाथ गोणे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांनी केली.

दुसरी नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप, पुणे 2022 स्पर्धा 9 ते 11 डिसेंबर दरम्यान रंगणार 

देशभरातून 1 हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग 

पुणे: अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (USFI )च्या वतीने येत्या 9, 10 आणि 11 डिसेंबर 2022 रोजी  ‘ दुसरी  नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप, पुणे 2022’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळूंगे – बालेवाडी येथे पार पडणार आहे, अशी माहिती युएसएफआयचे  जनरल सेक्रेटरी व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन पाणिग्रही यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेला अचिंता पंडित (कोषाध्यक्ष USFI), रिअर अॅडमिरल पीडी शर्मा (अध्यक्ष आरएलएसएस (आय), कौस्तव बक्षी (महाव्यवस्थापक RLSS(I), जॉर्ज मकासरे (उपाध्यक्ष RLSS(I) आणि WHO चे  प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिक माहिती देताना डॉ. तपन पाणिग्रही म्हणाले, फिनस्विमिंग हा स्पर्धात्मक जलतरण स्पर्धेचा नवीन प्रकार असून जगात हा खूप लोकप्रिय प्रकार आहे. भारतात ते USFI च्या पुढाकाराने हा जलतरण प्रकार लोकप्रिय होत आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून 34 राज्य व केंद्रशासित प्रदेशामधील 300 हून अधिक जिल्ह्यांतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 1000 हून अधिक स्पर्धक व 70 तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहे. या स्पर्धेत स्त्री व पुरुष या दोन्ही गटात विविध वयोगटांमध्ये एकूण 516 पदकांसाठी 172 विभागात स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तसेच या स्पर्धेतील विजेते खेळाडू 13 ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान विंडसर, ओंटारियो, कॅनडा येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटी (इंडिया) चे लाइफसेव्हिंग स्पोर्ट 2022 हे अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

जीव वाचवणारे खेळ हे एकमेवाद्वितीय असतात कारण ते एकमेव असे खेळ आहेत ज्यात प्रथम जीवन वाचवण्यासाठी कौशल्ये शिकली जातात आणि त्यानंतरच समुद्र, समुद्रकिनारे किंवा स्विमिंग पूलमधील स्पर्धांसाठी विविध कौशल्ये आणि तंत्रे वापरली जातात. हे जीवनरक्षक खेळ नागरिकांसाठी ‘प्रशिक्षण शिबिर’ म्हणून काम करतील, असे मत डॉ. तपन पाणिग्रही यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटी (इंडिया) ही रॉयल लाइफसेव्हिंग सोसायटी कॉमनवेल्थची अधिकृत शाखा आहे आणि इंटरनॅशनल लाइफसेव्हिंग फेडरेशनची सदस्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्व निवडींना RLSS (इंडिया) द्वारे मान्यता दिली जाईल. [वर्ल्ड गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्स].

निवडणूक साक्षरता मंडळांचा राष्ट्रीय स्तरावरील पथदर्शी प्रकल्प बनवू – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे, दि. ७: लोकशाही प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा, तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शाळा, महाविद्यालयीन पातळीवर निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्याचा पथदर्शी प्रकल्प पुण्यामध्ये हाती घेतला आहे. पुढील एक दोन वर्षात चांगल्या पद्धतीचे बदल घडवण्यासाठी सर्वांच्या योगदानातून हा राष्ट्रीय स्तरावरील एक पथदर्शी प्रकल्प बनवू, असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक साक्षरता मंडळाच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देशपांडे बोलत होते. याप्रंसगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा कराड, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, वर्शिप अर्थ फांऊडेशनचे संस्थापक पराग मते, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय व्यवस्थापक डी. कार्तीकेयन उपस्थित होते.

लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी तरुणांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करून श्री. देशपांडे म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येत १८ ते १९ वर्षे वयोगटाचा वाटा ३. ५ टक्के इतका असताना मतदार यादीत यापैकी केवळ ०. ३४ टक्क्यांची नोंदणी आहे. २० ते २९ वयोगटातील तरुणांची लोकसंख्या १८ टक्के असताना मतदार यादीत १२ टक्के तरुण मतदारांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील सुमारे ९0 टक्के आणि २० ते २९ वयोगटातील ३० ते ३५ टक्के मुले-मुली मतदार यादीत नाहीत. हे चित्र बदलण्याची गरज आहे.

कोणत्याही नव्या चळवळीमध्ये युवा पिढीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्याप्रमाणेच लोकशाही बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा, तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठे, शाळा महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना केंद्रीभूत माणून काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला जेवढे महत्त्व दिले जाते, तितकेच त्यांच्या सामाजिक बांधिलकीलाही आहे. आंतरराष्ट्रीय संस्था, परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश किंवा शिष्यवृत्तीप्रसंगी या बाबींना विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये याची जाणीव जागृती करण्यासाठी शाळा महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळ प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. शैक्षणिक संस्थांनी आपल्या संस्थेत विद्याशाखानिहाय निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करावीत, असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी केले.

हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्रेरक म्हणून इन्सेंटिव्ह किंवा सवलती देण्याचे ठरवले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची कॉलेज ॲम्बॅसॅडर अर्थात सदीच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या कामाची नोंद मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणार असून विद्यार्थ्यांना आंतरवासिता प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

मतदार यादीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद व्हावी यासाठी शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांनी या कामामध्ये पुढाकार घेतल्याशिवाय अनुकूल बदल होणार नाहीत. विद्यार्थीकेंद्रीत जनमोहिम या प्रकल्पाच्या माध्यमातून यशस्वी करू जेणेकरुन त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर भारत निवडणूक आयोग घेईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, काळानुसार निवडणूकांचे स्वरुप बदलत गेले असून सर्व घटकांचा सहभाग, समावेशकता तसेच वंचित घटकांचा निवडणुकीमध्ये सहभाग आदींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. निवडणूक साक्षरता मंडळ प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील १५ शाळा व ४३ महाविद्यालयांची निवड केली आहे. मतदार नोंदणी आणि मतदानाची टक्केवारी एवढाच मर्यादित उद्देश नसून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास यावरही या प्रकल्पात भर दिला जाणार आहे.

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी जास्तीत जास्त पारदर्शक, सक्षम, अचूक, समावेश असलेली बनवणे या संकल्पनेनुसार काम केले जात आहे. गेल्या दोन वर्षात मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या ४ लाख ६ हजार मतदारांचे छायाचित्रे जमा केली, मतदार यादीतील १ लाखापेक्षा जास्त समान नोंदींची तपासणी करुन कार्यवाही केली. २० लाखापेक्षा जास्त दावे व हरकतींवर निर्णय घेतले. त्यामध्ये ७ लाख ६० हजार नवीन मतदारांची नोंदणी आणि ७ लाख १ हजार नावांची वगळणी केली.

जिल्ह्यात १८ ते २९ वयोगटातील तरुणांची लोकसंख्या २३ लाख असताना त्यापैकी केवळ ११ ते १२ लाख जणांनी मतदार नोंदणी केली आहे. हे लक्षात घेऊन मतदार नोंदणी वाढवण्यासाठी प्रशासनाने महाविद्यालयांच्या सहकार्यातून ४४२ महाविद्यालयांमध्ये विशेष शिबीरे आयोजित केली. त्यामध्ये ४३ हजार पेक्षा जास्त मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त आहेत. तृतीयपंथी १५० पेक्षा जास्त तृतीयपंथी उमेदवारांची नोंदणी केली आहे. देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या नोंदणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ११९ उद्योगांच्या ठिकाणी मतदार नोंदणीसाठी पोहोचलो आहोत, असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. येरवडेकर, डॉ. कराड, डॉ. पांडे तसेच श्री. मते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळा आणि महाविद्यालयांचे प्राचार्य, निवडणूक साक्षरता मंडळासाठी नेमण्यात आलेले समन्वयक अधिकारी व सदिच्छा दूत उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या स्वीप समन्वयक पल्लवी जाधव यांनी निवडणूक साक्षरता मंडळाबाबत सादरीकरण केले. वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी यांनी प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. हा प्रकल्प राबवण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि वर्शिप अर्थ फाऊंडेशन समवेत सामंजस्य करार झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे शिंदे -फडणविसांनी बघावे’..म्हणाले राज ठाकरे

संघर्ष नको असेल तर केंद्राने लक्ष घालावे

पुणे-काल बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला.या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना इशारा दिला आहे.कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे . त्यांनी याच शब्दात ट्वीट करत एक पत्रही पोस्ट केले आहे.

त्यांनी पत्रात नमूद केले की, मी मध्यंतरी बोललो तसे महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतेय हे उघड आहे, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवे.

अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधेसोपे नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावे. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पाहावे.

फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे हि गावे पुणे महापालिकेतून वगळणे हा देखील न्यायालयाचा अवमान- प्रशांत जगताप

पुणे-पंधरा दिवसात निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ करा असे न्यायालयाने आदेश देऊनही ते धाब्यावर बसविणे , वारंवार प्रभाग रचनेचा , आरक्षणांचा घोळ निर्माण करणे अशा क्रियांनी निवडणुका घेणे टाळणे राज्यात सुरु असताना काल फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे हि गावे पुणे महापालिकेतून वगळून त्यांच्यासाठी नगरपालिकेची निर्मिती करण्याचा घेतलेला निर्णय देखील न्यायालयाचा अवमान करणारीच कृती असल्याचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे .

जगताप यांनी असे म्हटले आहे कि,’सध्या पुणे महानगरपालिकेसहित राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निर्णय हे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे.दरम्यानच्या काळामध्ये ऑगस्ट २०२२ ला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती खानविलकर साहेब यांनी या निवडणुकांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सरकार,महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना झालेली रचना बदलण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेऊ नये, याच्यामध्ये नव्याने कुठलीही गावे समाविष्ट होणार नाहीत किंवा याच्यातली कुठलीही गावे वगळणार नाहीत या सगळ्या संदर्भातला स्थगिती आदेश दिलेला असतानासुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे वगळण्याचा हा निर्णय घेतला हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे.त्याचबरोबर यासंदर्भामध्ये मागच्या पंधरा दिवसापूर्वी मुंबई हायकोर्टामध्ये शिवसेनेच्यावतीने जी याचिका दाखल केली होती त्याच्यामध्ये आत्ता मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना राज्य सरकारने चालू केली होती, त्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्यावतीने पुढील आदेश मिळेपर्यंत कुठल्याही प्रकारची नव्याने प्रभाग रचना करणार नाही असे प्रतिज्ञापत्र देऊन माननीय हायकोर्टाची माफी मागावी लागलेली होती. असे असताना सुद्धा माननीय मुंबई हायकोर्ट आणि माननीय सुप्रीम कोर्ट यांचा अवमान करण्याचे काम काल शिंदे सरकारने केलेले आहे.याची दखल येणाऱ्या १३ डिसेंबरला निश्चित माननीय सर्वोच्च न्यायालय घेईल.असेही प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणी कोंढव्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. 07 डिसेंबर 2022: वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोंढवा येथील चार आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या रास्तापेठ विभाग अंतर्गत कोंढवा शाखा कार्यालयाचे जनमित्र शंकर रामकिसन रोंढे हे सहकारी सिद्धार्थ चव्हाण यांच्यासमेवत सोमवारी (दि. 5) कोंढवा येथील भाग्योदयनगर परिसरात दुपारी वीजबिलांची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे सरकारी कर्तव्य बजावत होते. यामध्ये हजरा कॉम्प्लेक्समधील चार घरगुती थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला व मीटर काढून दोघेही कर्मचारी कार्यालयाकडे निघाले होते.

मात्र कोंढवा येथील अफजल कादर कपाडिया, असिफ कादर कपाडिया, मोहमद अफजल कपाडिया व एक अनोळखी इसम यांनी जनमित्र श्री. रोंढे व श्री. चव्हाण यांना अडवून वीजमीटर हिसकावून घेतले व दोघांनाही मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. महावितरणच्या दोन्ही कर्मचाऱ्यांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरुन चारही आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात कलम 353, 332, 323, 504, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस तपास सुरु आहे.

कर्नाटकात झालेल्या तोडफोडीचे मुंबईत पडसाद

​​​मुंबई-सीमावादावरून कर्नाटकात झालेल्या तोडफोडीचे आज मुंबईत पडसाद उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातली वाहने अडवून काळ्या रंगाच्या स्प्रेने नंबरपाट्या रंगवल्या. तसेच जोरदार घोषणाबाजी केली.कर्नाटक सीमावादाचे संसदेतही पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रश्नी गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रश्नी बोलावे, अशी मागणी केली. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे संसदेत सीमाप्रश्नी चर्चेची मागणी केली.

सीमावर्ती भागातील जत तालुक्यातल्या गावांनी आम्ही कर्नाटकात जाणार असल्याचा इशारा दिला आणि राज्यात पुन्हा एकदा सीमावाद पेटलाय. त्यानंतर अक्ककोट, पंढपूर, नांदेड ते थेट सुरगाणा तालुक्यापर्यंत याचे लोण पोहचले. इथल्या अनेक गावांनी मुलभूत सोयी-सुविधांसाठी महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर सहा डिसेंबर रोजी मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील कर्नाटक दौऱ्यावर होते. मात्र, त्यांनी हा दौरा अचानक रद्द केला. महापरिनिर्वाणदिनी सीमावाद चिघळू नये म्हणून दौरा रद्द केल्याची भूमिका सरकारच्या वतीने मांडण्यात आली. मात्र, त्याच दिवशी कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिकेच्या वतीने महाराष्ट्रातल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.

मुंबईत पडसाद

सीमावादाच्या प्रश्नाचे आज मुंबईत तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकाची वाहने थांबवून त्यांना काळे फासले. कानडी वाहनांच्या नंबर प्लेट काळ्या रंगाचा स्प्रे मारून मिटवल्या. तसेच वाहने थांबवून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे नवी मुंबई ते कळंबोली दरम्यान वाहतूक गती संथ झाली.

कर्नाटकी मुख्यमंत्र्यांच्या तोंडी महाराष्ट्र तोडण्याची भाषा, हे चालणार नाही! लोकसभेत सुप्रिया सुळे आक्रमक

नवी दिल्ली- कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्राविरोधात काहीही वायफळ बोलत आहेत. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहेत, हे चालणार नाही, असा दम आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्नाटक सरकारला दिला.सीमावादावरून आज लोकसभेत सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जाणूनबुजून पेटवला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात काहीही वायफळ बोलत आहेत. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. तरीही या हल्ल्यामागे असलेल्या एकावरही अद्याप कर्नाटक सरकारने कारवाई केलेली नाही.

अमित शहांनी आपली भूमिका स्पष्ट करावी

सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचले जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहेत, हे चालणार नाही. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. जाणूनबुजून महाराष्ट्राविरोधात हा वाद निर्माण केला जात आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

शिवसेनेची घोषणाबाजी

सुप्रिया सुळेंनी आक्रमकपणे महाराष्ट्राचा मुद्दा मांडताच सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. कर्नाटकच्या खासदारांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदारही आक्रमक झाले. त्यांनी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा ही दादागिरीची-विनायक राऊत

यावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा ही दादागिरीची आहे. महाराष्ट्र ते सहन करणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटक सरकारने उगीचच वाद उकरून काढला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्याचार केला जात आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. आम्ही याचा धिक्कार करतो.

सभापती म्हणतात- केंद्र काय करणार?

कर्नाटक व महाराष्ट्राच्या खासदारांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली तेव्हा राज्यसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दोन्ही राज्याच्या खासदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी ओम बिर्ला म्हणाले, दोन्ही राज्यांसाठी हा मुद्दा अतिशय संवेदनशिल आहे. त्यावर सविस्तर चर्चा करावी लागेल. आताच चर्चा करता येणार नाही. तसेच, हा वाद दोन राज्यांमधील आहे. आणि ही संसद आहे. या वादात केंद्र सरकार काय करू शकेल. त्यानंतर काही वेळाने दोन्ही राज्यांच्या खासदारांनी घोषणा देणे बंद केले.

लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी एस राजू उद्यापासून तीन दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर

नवी दिल्ली, 7 डिसेंबरः

लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी एस राजू उद्यापासून 10 डिसेंबरपर्यंत मलेशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघणार आहेत. भारत आणि मलेशिया यांच्यात सध्या अतिशय चांगले संरक्षण विषयक सहकार्य आहे.  लष्कर उपप्रमुख आपल्या भेटीदरम्यान मलेशियाचे वरिष्ठ लष्करी आणि नागरी नेत्यांसमवेत अनेक बैठका करून त्या माध्यमातून संरक्षण विषयक सहकार्य आणखी पुढे घेऊन जातील.

मलेशियन लष्कराचे उपप्रमुख आणि तेथील सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ यांच्याशी उपप्रमुख चर्चा करणार असून परस्पर हिताच्या निर्णयांवर आपापल्या विचारांची देवाणघेवाण करतील. मलेशियन संरक्षण आणि सामरिक नीती अभ्यासविषयक  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशीही उपप्रमुख व्यापक चर्चा करतील. 9 डिसेंबर 2022 रोजी, उपप्रमुख सध्या सुरू असलेल्या हरिमाऊ शक्ती या संयुक्त सरावांदरम्यान विविध प्रकारच्या प्रशिक्षण उपक्रमांचीही पहाणी करतील आणि सैनिकांशी संवाद साधतील.

उपप्रमुखांच्या या भेटीमुळे दोन्ही लष्करांदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक सखोल होतील आणि अधिक निकटचे सहकार्य तसेच सामरिक मुद्यांवर दोन्ही देशांतील सहकार्य वाढवण्यासाठी प्रेरणादायी घटक म्हणून काम करेल.

अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज

मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत असून यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ज्यू समाजातील पात्र उमेदवारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख यांनी केले आहे. महामंडळामार्फत २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. निगममार्फत कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना यांची अंमलबजावणी महामंडळामार्फत राज्यात करण्यात येते. या योजनांमध्ये लाभार्थ्याच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेच्या आधारे काही सुधारणा करण्यात आल्या असून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनांतर्गत अर्ज स्वीकारण्यासाठी ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंती दिनापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. योजनांचे अर्ज महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे पत्ते व संपर्क क्रमांक देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये देशातील शिक्षणाकरीता २० लाख रुपयांपर्यंत तर परदेशातील शिक्षणाकरिता ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी क्रेडीट लाईन १ अंतर्गत शहरी भागातील ज्या लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी व ग्रामीण भागातील ज्या लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ९८ हजार पेक्षा कमी आहे त्याला फक्त ३ टक्के वार्षिक व्याजदराने हे कर्ज देण्यात येते. तसेच क्रेडीट लाईन २ अंतर्गत ज्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत आहे त्यांच्यासाठी पुरुष लाभार्थीकरिता ८ टक्के तर महिला लाभार्थीकरिता ५ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

बेरोजगार उमेदवारांना व्यवसाय सुरु करण्यासाठीही २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. यासाठी क्रेडीट लाईन १ मधील लाभार्थींना २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असा ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तसेच क्रेडीट लाईन २ मध्ये ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून यातील पात्र पुरुष लाभार्थीकरिता ८ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे १० टक्के वार्षिक व्याजदर तर महिला लाभार्थीकरिता ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे.

अल्पसंख्याक महिला बचतगटांसाठी सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविली जाते. याअंतर्गत क्रेडीट लाईन १ मधील बचतगटातील प्रत्येक सदस्यास १ लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी हमी शुल्कासह ९ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तर क्रेडीट लाईन २ मधील बचतगटातील प्रत्येक सदस्यास दीड लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी हमी शुल्कासह पुरुषांसाठी १२ टक्के तर महिलांसाठी १० टक्के वार्षिक व्याजदर आहे.

होम लोन पहा असे महागले..

20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृहकर्ज व्याजासह भरावे लागेल 59,77,634

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात 0.35% वाढ केली आहे. यामुळे रेपो दर 5.90% वरून 6.25% झाला आहे. यामुळे किती कसा फरक पडेल ते पहा ..

समजा अभिषेक नावाच्या व्यक्तीने 7.55% दराने 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. त्याच्या कर्जाचा EMI 24,260 रुपये आहे. 20 वर्षात त्याला या दराने 28,22,304 रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजेच त्याला 30 लाखांऐवजी एकूण 58,22,304 रुपये द्यावे लागतील.अभिषेकने कर्ज घेतल्याच्या एका महिन्यानंतर, RBI ने रेपो रेट 0.35% ने वाढवला. या कारणास्तव, बँका देखील व्याजदर 0.35% वाढवतात. आता जेव्हा अभिषेकचा एक मित्र त्याच बँकेत कर्ज घेण्यासाठी येतो तेव्हा बँक त्याला 7.55% ऐवजी 7.90% व्याजदर सांगते.

अभिषेकचा मित्रसुद्धा 30 लाख रुपयांचे 20 वर्षांसाठी कर्ज घेतो, पण त्याचा EMI 24,907 रुपये येतो. म्हणजेच अभिषेकच्या EMI पेक्षा 647 रुपये जास्त. यामुळे अभिषेकच्या मित्राला 20 वर्षात एकूण 59,77,634 रुपये द्यावे लागतील. अभिषेकच्या रकमेपेक्षा ही रक्कम 1,55,330 अधिक आहे.

कर्जे महागली .. RBI ने व्याजदरात केली 0.35% वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात 0.35% वाढ केली आहे. यामुळे रेपो दर 5.90% वरून 6.25% झाला आहे. म्हणजेच होम लोनपासून ते ऑटो आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महाग होईल आणि लोकांना जास्त ईएमआय भरावा लागणार आहे  गेल्या ८ महिन्यांत पाचव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. 

व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी 5 डिसेंबरपासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होती. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्याजदराशी संबंधित घोषणा केली. यापूर्वी सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर 5.40% वरून 5.90% करण्यात आले होते.

2.25% वाढ
चलनविषयक धोरणाची बैठक दर दोन महिन्यांनी होते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली. त्यानंतर RBI ने रेपो रेट 4% वर स्थिर ठेवला. पण RBI ने 2 आणि 3 मे रोजी तातडीची बैठक बोलावून रेपो दर 0.40% ने 4.40% ने वाढवला होता.

रेपो दरातील हा बदल 22 मे 2020 नंतर झाला. यानंतर, 6 ते 8 जून रोजी झालेल्या बैठकीत रेपो दरात 0.50% वाढ करण्यात आली. यामुळे रेपो दर 4.40% वरून 4.90% पर्यंत वाढला. त्यानंतर ऑगस्टमध्ये ते 0.50% ने वाढवून ते 5.40% वर नेले. सप्टेंबरमध्ये व्याजदर 5.90% वर गेले. आता व्याजदर 6.25% वर पोहोचले आहेत.

RBI गव्हर्नरच्या भाषणातील ठळक बाबी

  • महागाई अजूनही चिंतेचे कारण आहे.
  • एमपीसीच्या 6 पैकी 5 सदस्यांनी दर वाढवण्याच्या बाजूने मतदान केले
  • 6 पैकी 4 सदस्य अनुकूल भूमिका मागे घेण्याच्या बाजूने आहेत
  • पुढील 12 महिन्यांसाठी महागाई 4% च्या वर राहण्याची शक्यता आहे
  • महागाई अजूनही लक्ष्यापेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे
  • FY23 महागाईचा अंदाज 6.7% वर कायम
  • ग्रामीण भागातील मागणी सुधारत आहे
  • बँक क्रेडिटमध्ये 8 महिने दुहेरी अंकात
  • FY23 GDP वाढीचा अंदाज 7% वरून 6.8% पर्यंत कमी झाला
  • RBI लिक्विडिटीबाबत कोणतीही अडचण येऊ देणार नाही

भुयारी मेट्रोची यशस्वी चाचणी

पुणे : मेट्रोची भूयारातील चाचणी आज दुपारी घेण्यात आली. ती यशस्वी झाली. शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट या ३ किलोमीटर अंतराच्या भूयारातून मेट्रो चाचणी यशस्वी झाली. जमीनीच्या खाली २८ ते ३० मीटर खोलीवर हे भूयार आहे. आता सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा ३ किलोमीटर अंतराचा टप्पा शिल्लक राहिला असून तोही लवकरच पूर्ण करण्यात येईल. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवरील भूयारी मार्गाचा ६ किलोमीटरचा टप्पा हा तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होता. जमिनीखाली २८ ते ३० मीटर अंतरावर सलग ६ किलोमीटर अंतराचे भूयार खोदायचे होते. तेही वरील कोणत्याही वास्तूला बाधीत न करता. त्यामुळे सर्व प्रकारच्या तांत्रिक चाचण्या झाल्यानंतरच हे काम सुरू करण्यात आले. आता पूर्ण ६ किलोमीटर अंतराची दोन भूयारे तयार असून त्यातील ३ किलोमीटर अंतरावरील चाचणीही यशस्वी झाली असल्याचे डॉ. दीक्षित म्हणाले.

रेंजहिल डेपोमधून चाचणीस दुपारी ३ वाजता सुरूवात झाली. शिवाजीनगरमध्ये असलेल्या भूयारात शिरण्याआधीचा मेट्रोचा उतार रेंजहिल डेपोपासून सुरू होतो. मागील आठवड्यापासून मेट्रोचे ट्रॅक, विद्यूत, सिग्नलिंग, देखरेख, दुरूस्ती असे सर्व विभाग कार्यरत होते. प्रत्यक्ष चाचणीस सुरूवात झाल्यानंतर कसलाही अडथळा न येता मेट्रो सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत पोहचली व तिथून परतही आली. वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोच्या दोन मार्गांचे आता ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. स्थानकांच्या कामाला गती देण्यात आली आहे. येत्या महिनाभरातच फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व वनाज ते सिव्हिल कोर्ट हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील असे महामेट्रोच्या वतीने सांगण्यात आले

धावत्या बसमध्ये चित्र रेखाटणारा अवलिया…

आपल्याकडे विद्येची देवता श्रीगणेश १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याचे नेहमी सांगितले जाते. अन् श्रीगणेशाच्या अंगी असलेल्या याच ६४ कलांपैकी कोणतीही एक कला आपल्या अंगी बाणावी यासाठी आपण त्याची मनोभावे पूजा करतो. या ६४ कलांपैकी चित्रकला किंवा रेखा चित्र हे त्यापैकीच एक!
रंगविलेल्या आकारांतून कलाकृती साकारणे म्हणजे चित्रकला. तर पेन्सिलच्या सहाय्याने आपल्य मनातील भावना कागदावर उतरवून त्या रेखाटणे म्हणजे रेखाचित्र. या दोन्ही कलांच्या साधनेत एकाग्रता हा अतिशय महत्त्वाची असते. या साधनेत थोडीही एकाग्रता भंग झाली; तर त्या चित्रासाठी किंवा रेखा चित्रासाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरलं जाते. पण पुण्यात एका अशा अवलियाने आपली एकाग्रता भंग होऊ न देता, एक उत्तम रेखाचित्र साकारलं असून, त्याच्या कलाकृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

पुण्यातील यज्ञेश सोनटक्के हा इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी. पण त्याची चित्रकला विशेष करुन रेखाचित्रातील हातोटीत कोणीही हात धरु शकत नाही आहे. या विद्यार्थ्यांने आपल्या शाळेत जाण्याच्या मार्गात चालत्या बसमध्ये जो विक्रम केला आहे, त्याची सर्वच स्तरातून दखल घेतली जात आहे. यज्ञेशने ३ डिसेंबर २०२२ रोजी फुलगांव ते स्वारगेट प्रवासादरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे रेखाचित्र आपल्या कुंचल्यातून साकारले आहे. विशेष म्हणजे, धावत्या बसमध्ये त्याने हा विक्रम साकारताना रेखाचित्राची एकही रेष हलेली नाही.

आज त्याच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही त्याच्या कलाकृतीचे मुक्तकंठाने स्तुती केली आहे. सोमवारी ५ डिसेंबर २०२२ रोजी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील निवासस्थानी यज्ञेशचा विशेष सत्कार देखील पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे नेहमीच अशा प्रकारच्या कलाकारांना प्रोत्साहन देऊन, उत्साह वाढवत असतात.

त्याच्या या यशामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल फुलगांवचे संस्थापक दीपक पायगुडे, संचालक नरहरी पाटील, प्राचार्य अमर क्षीरसागर, कला शिक्षक साळुंखे, यज्ञेशची आई माधुरी सोनटक्के, भाजप नेत्या कांचन कुंबरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई, दि. ६: पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणे नगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

या निर्णयासाठी उपस्थित फुरसुंगी आणि ऊरळी देवाची येथील नागरिकांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले. तसेच पुणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य दिले जाईल असे सांगितले.

पुणे महानगरपालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसूंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे.
00000