Home Blog Page 1501

खासदार गिरीश बापट यांच्या निधीतून वडगावशिंदे, दहिवान वस्ती येथे साकवचे काम पूर्ण

पुणे दि. १० : वडगाव शिंदे, दहिवान वस्ती येथे खासदार गिरीश बापट यांनी उपलब्ध करून दिलेल्या 30.०० लक्ष रुपये निधीतून साकवचे काम पूर्ण झाले आहे.
वडगाव शिंदे येथील दहिवान वस्ती येथे नागरिकांना शेतात व वस्तीवर ये-जा करण्यासाठी ओढ्यावर साकव तसेच रस्ता नसल्यामुळे गैर सोय होत होती. पावसाळ्यामध्ये ओढ्याला पाणी असल्यामुळे नागरिकांना तर अधिकच अडचणी येत. नागरिकांची होणारी गैर सोय दूर करण्यासाठी तसेच स्थानिक नागरिकांनी बापट यांच्याकडे याठिकाणी साकव करण्यासाठी निधी उपलब्ध होण्याकरिता विनंती केली. त्यानुसार बापट यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून 30.०० लक्ष रुपये उपलब्ध करून दिले. या उपलब्ध झालेल्या निधीतून या ठिकाणी साकव उभारण्यात आला. हा साकव पूर्ण झाल्यामुळे गावातील नागरिकांना ये-जा करणे सोयीचे झाले आहे.
यापुढेही वडगाव शिंदे गावातील विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न राहील असे बापट यांनी सांगितले.

विद्येच्या देवा,गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, चंद्रकांत पाटलांना बुध्दी दे!:आप

चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधाना विरोधात आपचे इशारा आंदोलन!

पुणे-राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी काल ‘फुले, आंबेडकर आणि कर्मवीर पाटील यांनी शाळेसाठी भीक मागितली असे विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपला इशारा म्हणून आम आदमी पार्टी तर्फे कोथरूड येथील कर्वे पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. त्यावेळेस ‘भीक नको शिक्षण हक्क हवा’, ‘गणपती बाप्पा, चंद्रकांत पाटील यांना अक्कल दे!’ ‘चंद्रकांत पाटील हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
महात्मा फुले ,डॉ आंबेडकर , कर्मवीर पाटील यांच्या संदर्भात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले विधान अत्यंत निर्लज्ज स्वरूपाचे आहे. चंद्रकांत दादा पाटलांनी पुन्हा शाळेत प्रवेश घेऊन इतिहासाचा अभ्यास करावा आणि हे लक्षात घ्यावे की महात्मा फुलेंनी इंग्रजांकडे, हंटर आयोगाकडे मोफत, सक्तीचा शिक्षण हक्क प्रस्ताव मांडला होता, डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या मार्गाने हा शिक्षणाचा हक्क बहुजनांना मिळवून दिला आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करून बहुजनांना संधी उपलब्ध करून दिली. असे असताना त्यांच्या रचनात्मक कामा संदर्भातले हे विधान अत्यंत निषेधार्थ आहे असे आप चे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी म्हंटले.

ज्ञान हा एका विशिष्ठ समाजाचा अधिकार असताना हा सर्व ज्ञानाचा साठा बहुजनांसाठी खुला करण्याचं काम या थोर लोकांनी केलं.मोठ्या कंपन्यांना हजारो कोटी च्या सवलती देणाऱ्या सरकारला अनुदानासाठी ची जबाबदारी घ्यावीशी वाटत नाही हे धोरण गरिबाला शिक्षणापासून वंचित ठेवेल.त्यामुळे आता हा सर्व समाजाला शिक्षण हक्क प्राप्त झाल्यानंतर आम्हाला आता ‘ सी एस आर ‘ची भीक नको आणि यापुढे चंद्रकांत दादा यांनी अशी विधाने करू नयेत अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल व या शिक्षणाच्या माहेर घरातून त्यांना तोंड काळे करायला भाग पाडेल असा इशारा आप तर्फे देण्यात आला.

आज च्या आंदोलनात आम आदमी पार्टीचे पदाधिकारी मुकुंद किर्दत,एकनाथ ढोले, नीलेश वांजळे,अभिजीत वाघमारे , आदित्य जाधव, ऋषिकेश मारणे, फेबियन सॅमसन, मनोज चोरडिया, आरती करंजावणे, सीमा गुट्टे, वैशाली डोंगरे, श्रद्धा शेट्टी, सुजित आगरवाल,मनोज शेट्टी, माधुरी गायकवाड , उमेश शेट्टी, अमोल मोरे, सुरेखाताई भोसले, कीर्तीसिंग चौधरी, अविनाश भाकरे, किशोर मुजुमदार, उमेश बागडे, श्रीकांत चांदणे, नितीन पायगुडे, विक्रम गायकवाड, मिलिंद सरोदे, थोरात मनोज, चंद्रकांत गायकवाड, गजानन भोसले, सय्यद अली, सुहास पवार, निखिल कंद, शिवाजी डोलारे, संदेश सोलेकर, प्रथमेश भोसले, विवेक गोसावी, तुषार कासार, फैजान शेख, किशोर मस्के,तात्यासाहेब आवटे, जयश्री डिंबळे, दिनेश वर्मा, किरण इंगळे, निखिल कंद व इतर कार्यकर्ते सामील झाले होते

मंत्री चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर शाई फेकली (व्हिडीओ)

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांनी काल भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शाळा काढण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण करत दिलगिरी व्यक्त केली होती. पणत्यानंतर . त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यापूर्वी भाजपचे कार्यकर्ते मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी चहापानासाठी थांबले. यानंतर घरातून बाहेर पडल्यावर काही क्षणात अज्ञाताने त्यांच्या अंगावर शाई फेकली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांची धावपळ उडाली. पाटील यांना पुन्हा शेडगे यांच्या घरी नेले.

आपल्या कार्यकर्त्याच्या घरुन निघत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक एका व्यक्तिनं शाई फेकली. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तिला लगेच ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देखील यावेळी शाई फेकणारा व्यक्ती करत होता. त्या व्यक्तिचं नाव अद्याप समजलेलं नाही. श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटन समाधीसाठी चिंचवड गावात आले होते, त्यावेळी त्यांना हे काळे झेडे देखील दाखवण्यात आले. 

चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे विद्यार्थी (NSUI) आक्रमक झाले होते. महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्यावरुन कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशा घोषणा करत भर रस्त्यात त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले यांचे फोटो हातात घेतले होते. ते फोटो दाखवत त्यांना काळे झेंडे देखील दाखवले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेगवेगळ्या शहरात कॉंग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या संभाव्य गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यासाठी ते राहणार उपस्थित आहेत.  महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या घराजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. असं असतानाही चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर एका व्यक्तिनं शाईफेक केली.

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शहर युवक काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यातील कोथरुड  भागात लावण्यात आले आहेत. “भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदार संघ” असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आला आहे. यावर काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये त्यांचा कार्टूनसारखा फोटो बॅनरवर लावण्यात आलं आहे. शहरात कोथरुड भागातच नाही तर इतर भागात देखील असे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. 

पुणे विभागात महावितरणने पकडल्या कोट्यवधी रुपयांच्या विजचोऱ्या

नोव्हेंबरमध्ये 3 कोटी 56 लाख 60 हजार रुपयांची 175 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस

पुणे : गेल्या नोव्हेंबरमध्ये महावितरणच्या भरारी पथकाने पुणे प्रादेशिक विभागात 3 कोटी 56 लाख 60 हजार रुपयांची 175 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली असून यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.
उघडकीस आणलेल्या वीज चोरीमध्ये मोठया प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. यात 4 प्रकरणात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये पुणे ग्रामीण भागातील उरुळीकांचन परिसरात रात्रीच्यावेळी भरारी पथकाने धाड टाकुन पेट्रोल पंपाची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरला जंपर टाकुन बायपास करून वीजचोरी करण्याची तरतुद केलेली होती. ग्राहकास 90 हजार 179 युनिटचे रू. 19 लाख 42 हजार 182 रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात पुणे शहर भागातील 80 केडब्ल्यु जोडभार असलेल्या व्यावसायिक ग्राहकाची वीजचोरी पकडण्यात आली. सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरच्या आधी एल.टी. केबलला टॅप करून मीटर बायपास करून वीजचोरी केलेली होती. सदर ग्राहकानी 80 हजार 438 युनिटसची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून त्यांना 28 लाख 14 हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
तिसऱ्या प्रकरणात कोल्हापुर मधील इचलकरंजी भागातील 91 एच.पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले व 90 हजार 208 युनिटस्  चोरी केल्यामुळे त्यांना 15 लाख 21 हजार 710 रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
चवथ्या प्रकरणात सोलापुर मधील नातेपुते भागातील 60 एच.पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने दुसऱ्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवरून एल.टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे त्यांना  69 हजार 555 युनिट्सची वीज चोरी केल्यामुळे  11 लाख 55 हजार 300 रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
सदर वीजचोरीची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नियमानुसार मुदत देण्यात आली असून विहित कालावधीत या ग्राहकांनी वीजबिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरूध्द  विद्युत अधिनियम – 2003 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. 
विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 व 136 नुसार वीज चोरी हा दंडनीय अपराध असून यात आरोपींना  सश्रम कारावसाच्या  शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.
आगामी काळात वीजचोरांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी दिले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उप संचालक सुमित कुमार हे पुणे प्रादेशिक विभागातील वीज चोरांवर कडक पाळत ठेवत आहे.

जिल्हा प्रशासनाकडून ५०० आपत्ती मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

पुणे, दि.१० : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून राज्यातील २० जिल्ह्यामध्ये आपत्ती मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातून ५०० स्वयंसेवकांसाठी १६ डिसेंबरपासून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल सुदुंबरे, मावळ या ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी विविध तालुक्यातून ५०० आपत्ती मित्रांची निवड करावयाची आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असणारे युवक-युवतीं, माजी सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना आणि एनसीसीचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे युवक-युवती, होमगार्ड, पोलीस मित्र, वनमित्र, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक तसेच विविध संस्थेचे युवक-युवती नाव नोंदणी करू शकतात.

प्रशिक्षणासाठी इच्छुक स्वयंसेवकाचे वय १८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत असावे. प्रशिक्षणार्थी १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण पूर्ण करण्यास तयार असावा. प्रशिक्षणानंतर प्रशासनास आपत्कालीन प्रसंगी सहकार्य करण्यास तयारी असावी. आपत्ती मित्रांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येवून त्यांचा ५ लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ०२०-२६१२३३७१ किंवा ९३७०९६००६१ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी संबंधित तहसिलदार कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

१२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत ‘तांदूळ महोत्सव’

पुणे, दि. १०: ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणेमार्फत १२ डिसेंबर २०२२ रोजी तांदूळ महोत्सव नवीन जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील वेल्हा, मुळशी, मावळ, आंबेगाव, भोर, हवेली, खेड, पुरंदर व जुन्नर या तालुक्यातील महिला स्वयंसहाय्यता समुह सहभागी होणार आहेत. यामध्ये पुणेकरांना अस्सल इंद्रायणी सेंद्रिय तांदुळ आणि त्याचबरोबर कोलम, वाडा कोलम, आंबेमोहर, काळा तांदुळ, बासमती स्थानिक वाणाचा दप्तरी आदी विविध प्रकारचा तांदुळ खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहेत.

सर्व पुणेकर नागरिक तसेच सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तांदुळ महोत्सवास भरघोस प्रतीसाद देत खेरदी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

लोकशाही, राज्यघटनेच्या संरक्षणासाठी जागृती शिबीरे घ्यावीत-काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात

१८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप
पुणे : “गेल्या काही वर्षात लोकशाही, राज्यघटना आणि महापुरुषांवर सातत्याने आघात होत आहेत. लोकशाहीचे मूल्ये, तत्वांना पायदळी तुडवले जात आहे. समाजात द्वेष पसरवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीचे, राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थी, तरुणांसाठी राज्यघटनेच्या मूल्यांवर, तत्वांवर शिबिरे घेऊन जागृती करायला हवी,” असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे नेते बेभान झाले असून, त्यांना वठणीवर आणण्यासाठी निवडणुकीतून उत्तर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला. काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे,आबा बागुल माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे,रजनी त्रिभुवन, अविनाश बागवे,दत्ता बहिरट, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर, चंदुशेठ कदम, लता राजगुरू, मनीष आनंद, सुजाता शेट्टी, रफिक शेख, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, रोहन सुरवसे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल सिरसाट, भूषण रानभरे, शिवा मंत्री, कैलास गायकवाड, प्रवीण करपे, विजय खळदकर, रमेश सोनकांबळे, सतीश पवार, रमेश सकट, राजेंद्र भुतडा, अजित जाधव, सुनील धाडगे, चंद्रशेखर कपोते, रतनगिरी शिलार, प्रशांत सुरसे, रामदास मारणे, भरत सुराणा, बाळासाहेब अमराळे, भीमराव पाटोळे, बाळासाहेब मारणे, भगवान धुमाळ, ऍड. शब्बीर खान, सीमा सावंत, स्वाती शिंदे, प्राची दुधाने, रमेश पवळे, किशोर मारणे, रमेश अय्यर, चेतन अगरवाल,  जया किराड, गौरव बोराडे, कान्होजी जेधे, अजय पाटील, अस्लम बागवान, निलेश बोराटे, द. सु. पोळेकर, रेखाताई घलोत, अनुसया गायकवाड, साहिल केदारी, विशाल मलके, श्रीकृष्ण बराटे आदी उपस्थित होते. 
बाळासाहेब थोरात म्हणाले, “सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ‘युपीए’ सरकारने सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. मुक्त अर्थव्यवस्थेला चालना दिली. माहिती अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा योजना, रोजगार हमी योजना अशा लोकोपयोगी निर्णय घेतले गेले. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मोहन जोशी या सप्ताहाद्वारे करत आहेत. सलग १८ वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचे काम केवळ मोहन जोशी करू शकतात. भारत जोडो यात्रेला ते माझ्याबरोबर सहसमन्वयक म्हणून काम पाहत होते. त्यांचे काम एखाद्या लॅपटॉपप्रमाणे आहे. सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ते अपडेट असतात. पक्षासाठी एकनिष्ठ व कर्तव्य भावनेने करत असलेल्या मोहन जोशी यांचे कार्य कौतुकास्पद आहे.”
“आज देशात वेगळी परिस्थिती आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे चुकीचे निर्णय लादले गेले. त्यातून महागाई वाढत आहे. स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना सुरु आहे. प्रकल्प गुजरातला जाताहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज दडपशाहीची भाषा वापरात आहेत. राज्यातील सरकार, मुख्यमंत्री त्यावर बोलत नाही. याउलट छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांचा अवमान करण्याची चढाओढ भाजप त्यांच्या नेत्यांमध्ये लागल्याचे दिसते. त्यामुळे बेताल आणि बेभान वागणाऱ्या भाजपचा बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल,” असे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, “राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशासाठी कठीण असणाऱ्या या कालखंडात राहुल गांधी पायी चालत महागाई, बेरोजगारी, द्वेषभावना याला वाचा फोडत आहेत. सामान्यांचा, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम या यात्रेतून होत आहे. हजारोंच्या संख्येने लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. एका चांगल्या हेतूने देशहितासाठी निघालेल्या राहुल गांधींच्या यात्रेमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. देशवासियांना आशेचा किरण दाखवण्याचे काम या यात्रेने केले आहे. गुजरातमध्ये भाजपाला चांगल्या जागा मिळाल्या असल्या, तरी त्यांचा नैतिक पराभव तिथे झाला आहे. आप, एमआयएम पक्षाने काँग्रेसची मते खाल्ल्याने भाजपाला गुजरातमध्ये यश मिळाले. मात्र हिमाचलमध्ये काँग्रेस आणि दिल्लीमध्ये आप पक्षाला मिळालेला वीज भाजपाला जनतेने दाखवलेला लाल कंदील आहे,” 
प्रास्ताविकात मोहन जोशी यांनी सप्ताहात झालेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मोहन जोशी म्हणजे, “श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २ ते ९ डिसेंबर या कालावधीत हा अठरावा सप्ताह उत्साहात साजरा झाला. शहराच्या विविध भागात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. आरोग्य शिबिरे, शालेय साहित्याचे वाटप, शिष्यवृत्तीचे वाटप, जनजागृतीचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी यंदा हा सप्ताह एका वेगळ्या उंचीवर गेला आहे.”
आबा बागुल, कैलास कदम यांनीही मनोगते व्यक्त केली. वीरेंद्र किराड यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र धंगेकर यांनी आभार मानले. 

संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि.10 : मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाबरोबरच विविध बाराशे प्रकल्प हाती घेणार आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मुंबई स्वच्छ, सुंदर असली पाहिजे. मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल येथे मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार ॲड.आशीष शेलार, आमदार अमित साटम, आमदार डॉ. भारती लव्हेकर, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुंबईचा कायापालट या प्रकल्पाच्या डिजिटल कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबई येथील सुशोभीकरणाची कामे झाल्यानंतर मुंबई सुंदर ठेवण्याची जबाबदारी मुंबईकरांची आहे. मुंबईचा विकासात्मक बदल करण्यासाठी मुंबईतील पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेणार आहोत. मुंबईतील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाने 15 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्य केला आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे फायदे सर्वसामान्य नागरिकांना होणार आहेत. मुंबईत चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण करणे, स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावर्षी जी-20 परिषदेच्या आयोजनचा मान आपल्या देशाला मिळाला आहे ही अभिमानास्पद बाब आहे. यानिमित्ताने मुंबईस‍ह राज्यातील इतर शहरांमध्ये विविध बैठका होणार आहेत. या बैठकांसाठी जगभरातून येणाऱ्या मान्यवर प्रतिनिधींसमोर राज्याचे ब्रॅंडिंग करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सामाजिक परिवर्तनाची सुरवात -उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा कायापालट करण्याची संकल्पना मांडली आहे. मुंबई महानगरपालिका सक्षम आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर, सुसज्ज दिसण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत भिंती सुशोभित करणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, वीस हजार शौचालये निर्माण करणे आणि ते चोवीस तास स्वच्छ ठेवणे आदी प्रकल्प हाती घेतले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, आकांक्षित शौचालये तयार करण्यासाठी दुप्पट निधी देण्यात येणार आहे. झोपडपट्ट्यांमध्येही या कार्यक्रमांतर्गत आकांक्षित शौचालये, कम्युनिटी वॉशिंग मशिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच हँगिंग लाईटच्या माध्यमातून प्रकाश व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. सामाजिक परिवर्तनाची सुरवात मुंबईचा कायापालट या माध्यमातून करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चहल यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी आभार मानले.

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

0

मुंबई-फड सांभाळ तुऱ्याला गं आला.., पाडाला पिकलाय आंबा, मला म्हणत्यात पुण्याची मैना यांसारख्या एकाहून एक ठसकेबाज लावण्या स्वरबद्ध केलेल्या, साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले . आज फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार त्यांची स्मृतीही कमी झाली होती. यावर काही उपचार नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरीच ठेवण्याचा सल्ला दिला होता. अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर वाजता आज ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी आचार्य अत्रे यांच्या “हीच माझी लक्ष्मी” या चित्रपटात गायली. संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी चित्रित झाली होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. त्या लावणीचे शब्द होते “मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी…”. आचार्य अत्रे यांनीच त्यांना “लावणीसम्राज्ञी” असा किताब दिला.सुलोचना चव्हाण यांना महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे 2009चा राम कदम पुरस्कार, 2011चा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर आज (10 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. याचवर्षी कला क्षेत्रातील अमुल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रसिद्ध मराठी लावणी सम्राज्ञी म्हणून त्यांची ख्याती होती. सुलोचना चव्हाण या माहेरच्या सुलोचना कदम… मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी गायनला सुरुवात केली होती. त्यावेळी मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता “श्रीकृष्ण बाळमेळा”. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका साकरल्या. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या.श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते “कृष्ण सुदामा”. पहिले गाणे जेव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. नंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत. मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले.वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या “भोजपुरी रामायण” गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले.

वादग्रस्त वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांची दिलगिरी,म्हणाले-डॉ.आंबेडकर,फुले माझ्या रक्तारक्तात

मुंबई-भिकेच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले, कर्मवीर आपल्या रक्तारक्तात असल्याचे ते म्हणाले.मी इतक्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या मनात श्रद्धा आहे. डॉ. आंबेडकर, महात्मा फुले माझ्या रक्तारक्तात आहेत. त्यांच्याविषयी बोलताना भीक या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, माझं भाषण चांगलं झालं. त्याच वारकऱ्यांनी कौतुक केलं. माझी क्लिप पुन्हा ऐका. अनेकांना बातम्या मिळवण्यासाठी वाद निर्माण करायचा असतो.

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पैठण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचालित संतपीठाच्या पहिल्या प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला. यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य वादात सापडलय.

केवळ सरकारी अनुदानावर विसंबून राहू नका, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संस्थांना केले. ते म्हणाले की, देशात सध्या सर्व सरकारनेच करावे, अशी भावना निर्माण झालीय. यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनी शाळा काढल्या. त्यासाठी सरकारी अनुदान घेतले नाही. भीक मागून शाळा उभ्या केल्या, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवतेय. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. औरंगाबादमध्ये प्रकरणी आंदोलनही करण्यात आले.

मंत्री चंद्रकांत पाटील काल वक्तव्यावर ठाम होते. वाद निर्माण झाल्यानंतरही त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याची भूमिका मांडली. ते म्हणाले, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांना अ‌ॅप्रिशियट करतोय. ते सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. त्याला आताच्या शब्दांत वर्गणी म्हणू. सीएसआर म्हणू. मात्र, तेव्हा भीक मागितली म्हणायचे. सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहता?, असे म्हणायचे असल्याचे सांगितले.

वाद वाढल्याने माघार

वाद वाढल्यानंतर आज पाटील यांनी माघार घेतली. ते म्हणाले की, मी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांनी भीक मागून शाळा उभी केल्याचे म्हणालो. पण भीक म्हणजे काय? आज आपण गणपती, नवरात्री, आंबेडकर जयंती, शिवजयंतीला जाऊन फिरतो. तेव्हा हेच म्हणतो ना, आम्हाला जयंती साजरी करायचीय. वर्गणी द्या. मी काल बोलताना खांद्यावरचा गमछा काढून भीक मागितल्याची अॅक्शन करून दाखवली. माझ्या भीक या शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे .

महात्मा फुले टाटांपेक्षा श्रीमंत होते , चंद्रकांत पाटलांना माफी मागावीच लागेल -संजय राऊत

शिंदे गट पळपुटा ,त्यांच्या तोंडाला कुलूप ,अन चावी दिल्लीत

मुंबई-“ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. एकेकाळी ज्योतिराव फुलेंचं उत्पन्न हे टाटांपेक्षा जास्त होतं. त्यांनी आपली सगळी संपत्ती शाळा-कॉलेज, दलितांसाठी वापरली. त्या काळात टाटांचं उत्पन्न २० हजार होतं, तेव्हा ज्योतिबा फुलेंचं उत्पन्न २१ हजार होतं. याची इतिहासात नोंद आहे, हे यांना माहिती नाही. त्यांना हे शब्द मागे घ्यावे लागतील आणि महाराष्ट्राची माफी मागावी लागेल”, असा स्पष्ट इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे .शाळा उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यावर टीका करताना ते पुढे म्हणाले,’भाजपमध्ये अकलेचे कांदे भरले आहेत. या महापुरुषांनी लोकवर्गणीतून दलितांसाठी शाळा उभारून मोठे समाजकार्य केले. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई काहीही बरळले तरी फरक पडत नाही. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लढाईत का उतरत नाहीत?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही या बसवराज बोम्मईंच्या वक्तव्याचा आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी समाचार घेतला. तसेच, यावरून शिंदे गटावरही टीका केली. संजय राऊत म्हणाले, कर्नाटकच्या अत्याचाराविरोधात ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, शिंदे सरकारच्या तोंडाला कुलूप लागले आहे. आणि त्याची चावी दिल्लीत आहे.संजय राऊत म्हणाले, बसवराज बोम्मई सातत्याने महाराष्ट्राविरोधात बरळत आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात शिंदे-फडणवीस सरकार लढाईत उतरणार की नाही? या लढाईत सरकार कुठेच दिसत नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाच्या आमदार, खासदारांनी अद्याप तोंड उघडलेले नाही. कालदेखील मविआचेच खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले व सीमावादावर आपली भूमिका मांडली. लोकसभेतही मविआचेच खासदार कर्नाटकच्या अत्याचाराविरोधात बोलले.संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाचे खासदार पळपूटे आहेत. त्यामुळेच कर्नाटकात भाजप सरकार सत्तेत असल्याने ते तोंड उघडत नाही. त्यांच्या तोंडाला कुलूप आहे आणि त्याची चावी दिल्लीत आहे. खरे तर शिंदे गटाला ढाल-तलवार ही चुकीची निशाणी भेटली आहे. चावी-कुलूप हीच त्यांची निशाणी हवी, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

भाजप’ने राम मंदीरासाठी भीक मागितली(?) असे म्हणावे काय..? काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारींचा सवाल

हे तर देशास मनुवादी संस्कृती वा गुलामशाहीत ढकलण्याचे मनसुबे

पुणे दि १० -सामाजिक क्रांतीचे प्रणेते, महापुरूष डॅा आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आदींनी शाळा – शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितल्याचे विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले त्यावर राज्य काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजप’ने देखील राम मंदीरा साठी वर्गणी नव्हे तर भीक वा खंडणी मागितली काय(?) असा सवाल केला आहे .या विषयी प्रदेश काँग्रेस ने दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी भाजप ची नियत, निती व संस्कारां विषयी टिका करतांना सांगितले की, येन-केन प्रकारे महाराष्ट्राच्या अस्मिता व मानांकनां विषयी अवहेलना करण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसुन येत आहे. एकीकडे ‘स्वातंत्र्योत्तर लोकशाही रूपी भारतास’ २१ व्या शतकाची दृष्टी देत सक्षम, शिक्षीत, स्वयंपुर्ण व प्रगतीशील बनवण्याकरीता पुर्वीच्या काँग्रेस सरकारांनी शिक्षणाचा व साक्षरतेचा प्रचार व प्रसार करीत शिक्षणाची कवाडे युवापिढी साठी खुली केली.मुलींना मोफत शिक्षण, गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी माफी साठी नादारी दिली. पुढे जाऊन तत्कालीन युपीए अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेसच्या पुढाकाराने ‘शिक्षण हक्क’ कायदा केला. पुरोगामी महाराष्ट्राचे नेते स्व वसंतदादा, विलासराव देशमुख, रामकृष्ण मोरे सर इ नी राज्यात शिक्षण प्रचार प्रसाराचा कृतीशील कार्यक्रम राबवला. स्वातंत्र्य प्राप्त होते वेळी साक्षरता-प्रमाण १४% असणाऱ्या देशात २०१४ अखेर ७८% पर्यंत नेले.मात्र याच्या नेमके विरोधी पाऊल देशातील सत्ताधारी भाजप व राज्यातील न्याय प्रविष्ट ईडी सरकार उचलत असल्याचे स्पष्ट होते आहे.
राज्यात ‘पट-संख्येच्या’ कारणावर ग्रामीण भागातील शेकडो शाळा बंद करणे, गरीब व मागास वर्गीय विद्यार्थ्यांना फी माफी सवलत रद्द करणे व शाळा-महाविद्यालये यांना सरकारी अनुदान देण्यास टाळाटाळ करणे, शिक्षणा बाबत सरकारी कर्तव्ये निभावण्या विषयी अनिच्छा, अनास्था वा तिरस्कार व्यक्त करणे व देशाचे बोध वाक्यात ‘सत्यमेव जयते’ ऐवजी ‘श्रममेव जयते’ (श्रमास प्रतिष्ठा) करण्याचा घाट घालत, देशास संविधान कर्तव्यांपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करीत देशास १६ व्या शतकात / मनुवादी संस्कृती वा गुलामशाहीत ढकलण्याचे मनसुबे स्पष्ट होत आहेत..असेही गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निवेदनात म्हटले आहे.

कामाची माहिती नाही अन श्रेयासाठी पुढे राही.. भाजपच्या माजी नगरसेवकाची राष्ट्रवादीच्या माजी ज्येष्ठ नगरसेवकावर टीका

म्हटले हा पहा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांच्या पत्राचा फुसका बार..

पुणे- एकीकडे भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर श्रेय लाटण्याचा आरोप केला असताना दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक चांदेरे यांच्यावर कामाची धड माहिती नाही अन श्रेय लादायला पुढे राही.अशा शब्दात टीका केली आहे .बालवडकर यांनी हि टीका करताना काही कागदपत्रे सादर केली आहेत.

बालवडकर म्हणाले भारतीय जनता पक्षाचे काम बघून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची पायाखालची वाळू सरकली आहे.बालेवाडी – बाणेर परिसराचा पाणी प्रश्न मार्गी लागावा या अनुषंगाने सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. त्याचेच फलित म्हणजे पुणे शहरासाठीच भारतीय जनता पक्षाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच २४x०७ पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर झाला,या योजनेंतर्गत वारजे चांदणी चौक पाषाण सुस ब्रिज ते बाणेर बालेवाडीपर्यंत सर्व पाण्याच्या टाक्यांपर्यंत ट्रान्समिशन लाईन्स ची कामे होत आहेत.ही ३० इंच व्यासाची ट्रान्समिशन लाईन सुस ब्रिज ते सेव्हन अव्हेन्यू सोसायटी शेजारील टाकीपर्यंत येत असून या पाईपलाईनची एकूण लांबी ३.४२३ किमी आहे. यापैकी १.२०० किमी चे काम पूर्ण झाले असून २.२२३ किमी चे काम अद्याप बाकी आहे. भारतीय जनता पक्षाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येत असून हे चित्र विरोधकांना मात्र पहावले जात नाही. त्यामुळे या योजनेचे श्रेय घेण्याच्या कुरघोडी सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांना २०२० पाणीप्रश्नाबाबत पत्र दिले होते. जेणेकरून मंजूर झालेल्या या योजनेचे श्रेय लाटता यावे.

परंतु या योजनेची वर्क ऑर्डर २०१८ सालीच निघालेली आहे. हे काम लार्सन अँड टूरबो या कंपनीमार्फत केले जाणार आहे, याची माहिती त्यांनी घ्यावी.हे सर्व काम भारतीय जनता पक्षाच्या काळात मार्गी लागले असून पॅकेज ३ व ६ च्या माध्यमातून होत असणाऱ्या या सर्व कामांची वर्क ऑर्डर देखील २०१८ साली निघालेली आहे. मात्र आत्ता आणि २०२० साली याच पाईपलाईनच्या कामाचे पत्र प्रशासनाला देणे हा निव्वळ अडाणीपणा म्हणता येईल. विशेष म्हणजे हेच पत्र लोकांना दाखवून त्याचे श्रेय घेणे हा तर चिकटू पणाचा कळस गाठण्यासमानच आहे. २०१७ च्या मुख्य सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच या प्रकल्पास विरोध दर्शविला होता. मात्र तेच आता या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत आहेत, ही बाब अतिशय दुर्दैवी म्हणता येईल. प्रशासनाला पत्र लिहून आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी किती पोटतिडकीने प्रयत्न करतो आणि आमच्यामुळेच कसे लोकांचे प्रश्न सुटतात हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न करू नये, यातून काहीही सिद्ध होणार नाही. मुळात कोणती योजना कोण राबवित आहे आणि त्यासाठी किती प्रयत्न केले आहेत याचा या महाशयांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीला ही वर्क ऑर्डर मिळालेली असून त्यात संपूर्ण योजनेचे आणि योजना राबविण्यात येणाऱ्या जागेचे विश्लेषण उच्च अभियंत्यांमार्फत करण्यात आले आहे. कायदेशीरपणे सर्व गोष्टी अमलात आणण्यासासाठी एक टीम यावर काम करीत असते. या सर्व गोष्टींचे भान विरोधकांना असायला हवे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच महाशयांनी पाषाण-सुस खिंडीचे ४० कोटींचे बजेट आणण्यासाठी स्वतःची औकात नाही हे कबूल केलं होतं. आज तेच महाशय या २२० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे श्रेय निव्वळ एका पत्राच्या बळावर घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. श्रेय घेण्याच्या नादात सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी थोडे सबुरीने आणि विचारपूर्वक पाऊले उचलावीत हीच अपेक्षा आहे . जेणेकरून वेळोवेळी तोंडघशी पडण्याच्या शृंखलेस तरी आळा बसेल.तसेच या महाशयांच्या पत्राने महानगरपालिकेच्या रद्दी मध्ये वाढ झाली एवढे मात्र खरे आहे असेही बालवडकर यांनी म्हटले आहे.

भाजप अध्यक्ष नड्डा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना शांतता राखण्यास सांगितले बसवराज बोम्मई यांचा गौप्यस्फोट-म्हणाले ,’ महाराष्ट्राचे शिष्टमंडळ अमित शहांना भेटल्याने फरक पडत नाही’

सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचले आहे. बोम्मई यांनी ट्विट केले आहे की, आपले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही. कोणतीही तडजोड करणार नाही. महाराष्ट्रातील कन्नडिगांच्या संरक्षणासाठी खबरदारी कर्नाटक सरकारकडून घेतली जात आहे.भाजप अध्यक्ष नड्डा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितले आहे, असा गौप्यस्फोटही बसवराज बोम्मई यांनी केला.

विशेष म्हणजे काल महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कर्नाटकाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत तक्रारी मांडल्या. त्यानंतर बोम्मई यांनी ट्विट करून या भेटीमुळे काहीही फरक पडणार नाही, अशी वल्गना केली आहे. बोम्मई यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. यापूर्वीही महाराष्ट्राने असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमचा न्यायप्रविष्ट खटला मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर तडजोड करणार नाही.

तसेच, आपले उद्याप केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी बोलणे झाले नाही. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांशी बोलणे झाले आहे. सोमवारी कर्नाटकचे खासदार अमित शहा यांना भेटणार आहे. राज्याची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मी देखील लवकरच अमित शहांना भेटणार आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

मी भेटल्यानंतर भाजप अध्यक्ष नड्डा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितले आहे, असा गौप्यस्फोटही बसवराज बोम्मई यांनी केला. महाराष्ट्रात असलेल्या कन्नडिगांच्या संरक्षणासाठी खबरदारी घेतली आहे. याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांशी चर्चा केल्याचा दावाही बसवराज बोम्मई यांनी केला.

मेट्रो प्रकल्पातील १०० वा एक्स्लेटर बसला दापोडीत!

पुणे – 9डिसेंबर 2022 रोजी पुणे आणि पिंपरी तील मेट्रो च्या प्रकल्पातील शंभरावे एस्किलेटर बसविण्याचे काम पूर्ण झाले. हा एस्किलेटर दापोडी स्थानकावर बसविण्यात आला. अत्यंत गर्वाची बाब म्हणजे हे बसविण्यात आलेले शंभर एस्किलेटर ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत पुण्यात तयार झालेले आहेत.

The 100th escalator in the Dapodi metro station Pune had been installed, taking a lot of pride to tell you all that this comes under the Indian government policy – Make In India.

एकूण १६६ एक्सलेटर बसविण्यात येणार आहेत. त्यातील शंभरावा एक्सलेटर दापोडी स्थानकात बसविण्यात आला. हा एक्सलेटर शिंडलर कंपनीच्या पुण्यातील कारखान्यात तयार करण्यात आला आहे. तसेच मेट्रो प्रकल्पांत एकूण १३७ लिफ्ट बसविण्यात येणार असून त्यापैकी ७१ लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. भविष्यात प्रवासी संख्या वाढू शकते, हे लक्षात घेऊन एक्सलेटर आणि लिफ्ट बसविण्यात येत आहेत. बसविण्यात आलेले शंभर एक्सलेटर हे ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत पुण्यात तयार झालेले आहेत. लिफ्ट आणि एक्सलेटरमुळे प्रवाशांना वेगाने मेट्रो स्थानकातील प्लॅटफॉर्मवर जाणे-येणे शक्य होणार आहे. तसेच दिव्यांगजन व जेष्ठ नागरिक कोणाच्याही मदतीशिवाय मेट्रो करू शकतील.

सर्व मेट्रो स्थानकांवर दोन्ही बाजूला लिफ्टची व्यवस्था केल्यामुळे व्हीलचेअर वापरणारे दिव्यांग कोणाच्याही मदतीशिवाय सहजरित्या मेट्रो प्रवास करू शकतात. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ”पुणे मेट्रोची स्थानके ही अत्याधुनिक असून जागतिक दर्जाची मानांकनानुसार आहेत. प्रवाशांना जलद रीतीने ट्रेनमध्ये बसणे व ट्रेनमधून बाहेर पाडण्यासाठी या सुविधा गरजेच्या आहेत. आज बसविण्यात आलेला शंभरावा एस्किलेटर हा भारतात आणि पुणे शहरात बनविण्यात आला आहे.”पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट (१७ किलोमीटर) आणि वनाज स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किलोमीटर) असे ३३ किलोमीटर मेट्रोचे काम सध्या दोन्ही शहरांत सुरू आहे. त्यातील पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी (७ किलोमीटर) आणि वनाज ते गरवारे (५ किलोमीटर) या मार्गांचे उदघाटन ६ मार्च रोजी झाली आहे. मेट्रो प्रकल्पाचे शहरातील ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या काही आठवड्यात गरवारे कॉलेज ते शिवाजीनगर न्यायालय आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय हा मेट्रोचा पुढील टप्पा सुरू होणार आहे.