Home Blog Page 1500

कात्रजमध्ये हॉटेलचालक आणि वेटरकडून ग्राहकाला ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे- कात्रज ,मांगडेवाडी येथील हॉटेल सुमा मल्हार फमिली रेस्टॉरंट चे हॉटेल चालक मनोहर रघुनाथ मांगडे (वय ४४ ,रा. मांगडे वाडी ,पुणे ) आणि वेटर ऋषिकेश जयसिंग देशमुख या दोघांनी आपल्या हॉटेलात आलेल्या ग्राहकांशी काही कारणावरून भांडणे करून त्यांच्यावर चाकूने वार करून आणि डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि निशांत जाधव (वय 25 रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत मल्हार रेस्टॉरंट येथे जेवण्यासाठी गेले होते. तेथे मित्रांसोबत मस्करी करत असताना हॉटेलचा वेटर तेथे आला व त्याने आरडा-ओरड करु नका असे सांगितले. मात्र पुन्हा गप्पा सुरु केल्या त्यानंतर हॉटेलचा मालक तेथे ला व त्याने फिर्यादी व त्यांच्या मित्रांशी वाद गालण्यास सुरुवात केली. यातून फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या बरगडीवर वार करण्यात आला, तसेच फिर्यादीचे मित्र यांच्याही कंबरेवर चाकुने वार करण्यात आला, लाकडी दांडक्याने डोक्यावर व डोळ्यावर मारून गंभीर जखमी केले. यावरून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.पोलीस उप निरीक्षक अतुल थोरात अधिक तपास करीत आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘फ्रीडम पार्क ते खापरी’ दरम्यान मेट्रोने प्रवास

0

नागपूर, दि.11 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी या स्थानकांदरम्यान मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला.

प्रधानमंत्र्यांसोबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते.

नागपूर शहराला नवी ओळख प्राप्त करून देणाऱ्या मेट्रोवर आधारित प्रदर्शनाची पाहणीही श्री. मोदी यांनी केली. यावेळी मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. या पाहणीनंतर श्री. मोदी यांनी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी प्रवास केला. या प्रवासात त्यांनी स्टार्टअप विद्यार्थी, मेट्रो कर्मचारी व इतर प्रवाशांसोबत संवाद साधला.

शिक्षणाबरोबर खेळाच्या विकासावर लक्ष द्यावे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि.११: राज्यशासन खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडाकौशल्य विकसित करण्यावर लक्ष द्यावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

रामचंद्र अभियांत्रिकी व पदविका महाविद्यालय लोणीकंद येथे तंत्र शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटनाअंतर्गत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सचिव डॉ. महेंद्र चितलांगे, तंत्र शिक्षण संचालनालयाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटनेचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल बांदल, महाविद्यालयाचे अध्यक्ष मारुती भुमकर, प्राचार्य डॉ. अविनाश देसाई आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ७ हजार विद्यार्थी आणि २ हजार ५०० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला असून विभागस्तरावरुन ३२२ विद्यार्थी आणि २३० विद्यार्थीनी या ठिकाणी सहभागी झाले आहे. जास्तीत जास्त क्रीडा उपक्रम घेण्याचा सूचना संचालनालयाला देण्यात आल्या आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

राज्य शासनाने राज्यस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग तीन च्या पदावर, राष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त खेळाडूला वर्ग दोन च्या तर आंतरराष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग एक च्या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण न करता नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळ्या खात्यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा विविध पदावर नियुक्ती देण्यात आल्या आहे, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.

डॉ. मोहितकर म्हणाले, तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक अशा सर्वांगीण विकासाला प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटने स्थापना १९६६ या वर्षी करण्यात आली. राज्यात सांघिक आणि वैयक्तिक या दोन प्रकारात मुलांच्या १४ विभागीय आणि मुलींच्या ५ विभागीय स्तरावर स्पर्धा होतात. दर वर्षी या स्पर्धेत मोठ्यासंख्येने विद्यार्थी सहभागी होत असून यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यासह सांघिकवृत्ती, नेतृत्व गुण आदी गुण विकसित होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.

श्री. भूमकर म्हणाले, राज्यातील खेळाडूंच्या अंगी असलेल्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तम खेळ खेळा, त्यासाठी नियोजनबद्ध सराव करा, जीवनात कधीही हार मानू नका, जीवनात खूप मोठी प्रगती करा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पालकमंत्री श्री. पाटील यांना संस्थेच्यावतीने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच संघटनेच्या सुधारित स्पर्धा नियमावलीचे अनावरणही करण्यात आले.

यावेळी राजलक्ष्मी जेधे या विद्यार्थिनीने खेळाडूंना खेळाची शपथ दिली.

विजेत्यांना पालकमंत्र्यांकडून बक्षिसे

या स्पर्धेत प्रत्येक क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला ५ हजार रुपये आणि विद्यार्थिनीला १० हजार रुपयांचे पारितोषिक भेटवस्तू स्वरूपात स्वतःतर्फे देण्याची घोषणा पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केली.

000

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

पुणे-भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून चिंचवड येथे काल त्यांच्या चेहर्‍यावर शाई फेक झाल्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात 11 पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 8 पोलिस कर्मचारी आहेत. तर यामध्ये 3 पोलिस अधिकारी आहेत. चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित झालं होतं. कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडला कसा यावरून प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी दौऱ्यावर असताना त्यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी समता सैनिक दल संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी चिंचवड सचिवांना अटक केली आहे. समता सैनिक दलाचे संघटक आरोपी मनोज भास्कर घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय भाऊसाहेब ईचगज आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओवाळ यांना हे कृत्य केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अटक केली. या तिघांवरही भादवि कलम 307,353,294,500,501,120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)135 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्ग, एम्स, मेट्रोसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण

0

नागपूर, – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.११) नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, नागपूर ते बिलासपूर या वंदेभारत रेल्वेचा शुभारंभ, मेट्रो प्रकल्प टप्पा एकचे लोकार्पण तर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, नाग नदी प्रदूषण निर्मूलनाचा शुभारंभ करतील तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून पोलिसांचा चोख बंदोस्त तैनात करण्यात आला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे,  सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर ते थेट ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे उद्घाटन करण्यासाठी प्रस्थान करतील. नागपूर ते बिलासपूर या देशातील सहाव्या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.  वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते बिलासपूर हे अंतर अवघ्या सहा ते साडे सहा तासात गाठता येणे शक्य होणार आहे. सध्या हे अंतर कापण्यास 7 ते 8 तास लागतात. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेतर्फे ही गाडी चालवली जाणार आहे. 16 कोच असणाऱ्या या गाडीची आसनक्षमता 1 हजार 128 आहे.  नागपूर ते बिलासपूरदरम्यान या गाडीला फक्त गोंदिया दुर्ग व रायपूर येथेच थांबा देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री रेल्वे स्टेशवरून झिरो माईल जवळील फ्रीडम पार्क येथील कार्यक्रमाला उपस्थितीत राहतील.  त्यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होईल. या प्रकल्पाची एकूण लांबी ४० किलोमीटर असून एकूण खर्च ९ हजार २७९ कोटी रुपये आहे. प्रवासी क्षमता १ लाख ५० असणार आहे. त्याचबरोबर नागपूर मेट्रो दोन या प्रकल्पाचा शुभारंभ त्यांचा हस्ते होईल. नागपूर मेट्रो-२ हा एकूण ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. त्याअंतर्गत ४३८ किलोमीटरची मेट्रो लाईन तयार केली जाणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षात म्हणजे २०२८ पर्यत पूर्ण होईल. खापरीला बुटीबोरी एमआयडीसी (१८.६ कि.मी. ) ऑटोमोटिव्ह चौकाला कन्हान (१३ किमी ) प्रजापतीनगरला कापसी (५.५ कि.मी.) तर लोकमान्यनगरला हिंगणा(६.७ कि.मी.) शहराशी जोडले जाईल.

प्रधानमंत्री त्यानंतर फ्रीडम पार्क येथून मेट्रोने खापरीला रवाना होतील. प्रवासादरम्यान विविध वर्गातील नागरिक, महिला व मुलांशी ते संवाद साधतील. खापरीला पोहोचल्यावर वाहनाने समृद्धी महामार्गाच्या झिरो पॅाईंट येथे पोहोचतील. संपूर्ण राज्यासाठी भाग्यरेखा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ७२० किलोमीटरच्या अत्यंत महत्वाकांक्षी महामार्गाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. या रस्त्यावरून ते दहा किलोमीटर वाहनाने प्रवास करणार आहेत.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) टेंपल ग्राऊंड येथे प्रधानमंत्री यांची जाहीर सभा होणार आहे. १४ एप्रिल २०१७ रोजी प्रधानमंत्री महोदयांनी या संस्थेचे भूमिपूजन केले होते. उद्या राष्ट्राला ही संस्था समर्पित करण्यात येणार आहे. मध्य भारतातील सर्व सुविधायुक्त ही आरोग्यसंस्था असून निर्मितीसाठी सुमारे १ हजार ५७७ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. याच कार्यक्रमादरम्यान सिपेट – सेंटर फॅार स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सीएसटीएस) चंद्रपूरचे आनलाईन लोकार्पण करण्यात येणार आहे.  राज्य शासनाने या संस्थेसाठी 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. सर्व सोईसुविधांनी युक्त ही संस्था आहे. यासोबतच नागपुरात होणाऱ्या नॅशनल इंस्टिट्यूट फॅार वन हेल्थ या संस्थेचा शुभारंभ करण्यात येईल. तसेच सेंटर फॅार रिसर्च, मॅनेजमेंट अँड कंट्रोल आफ हेमोग्लोबिनोपॅथिस या चंद्रपूरच्या संस्थेची आनलाईन पद्धतीने उदघाटन करतील. कार्यक्रमादरम्यान या संस्थांचे माहितीपट दाखविण्यात येणार आहेत.

कार्यक्रम संपल्यानंतर प्रधानमंत्री पुढील कार्यक्रमासाठी गोव्याकडे प्रस्थान करतील.

महाराष्ट्राची भाग्यरेखा

संपर्कसातत्य  संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहेमहाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्कसातत्यसंवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरीसामान्य जनतानव उद्यमी, लहान उद्योजकव्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेकडे नेणारा राजमार्ग आहेहा प्रकल्प आता लवकरच लोकार्पित होणार असून विदर्भमराठवाड्यापासून मुंबईचे अंतर यामुळे लक्षणीयरित्या कमी होणार आहे. यानिमित्त हा विशेष लेख…

महाराष्ट्राचा औद्योगिक विकास प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक या भागात अधिक झाला आहे. कारण या ठिकाणी मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा, चांगल्या रस्त्यांचे जाळे. गुंतवणुकदारांनी मराठवाडा- विदर्भाकडे आगेकूच करण्यासाठी सुसाट वेगाची गरज असल्याचे लक्षात आले. त्यातून सातशे किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचा जन्म झाला. चार डिसेंबरला जेव्हा या रस्त्याची पाहणी करायला विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगरविकास मंत्री व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर उतरले, त्यावेळी दोघांच्या आनंदाला पारावार नव्हता. हा आनंद कर्तव्यपूर्तीचा होता, मनातली स्वप्न प्रत्यक्ष पूर्ण होताना पाहण्याचा होता.

वेदनेची कोंडी फोडणारा मार्ग

नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या भागांतून मुंबईला पोहोचण्यासाठी दोन-दोन दिवसांचा कालावधी लागल्याच्या आठवणी आता जुन्या झाल्या आहेत. नागपूरवरून दिल्ली काय आणि मुंबई काय, सारखेच. पण राज्य कारभार चालणारे स्थळ मात्र मुंबई…

विदर्भात कापूस, सोयाबीन, कडधान्य, तेलबियांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. मात्र, सर्व कारखानदारी मुंबई, पुण्याकडे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त खनिज संपदा असणारा प्रदेश चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व आसपासचा परिसर. मात्र, खनिजावर आधारित कारखानदारी एक हजार किलोमीटरवर. पूर्व विदर्भात मोठमोठ्या नद्या, हजारो मामा तलाव. त्यातून गोड्या पाण्यातील मासळीचे मध्य भारतातील सर्वात अधिक उत्पन्न विदर्भात. मात्र, ताज्या मासळीच्या निर्यातीला जवळचे रस्ते नाहीत. विदर्भातील तरुणाईचे, सुशिक्षितांचे, शेतकऱ्यांचे हे दुःख समजून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दूरदृष्टीच्या नेत्याने या महामार्गाची कल्पना मांडली व विद्यमान द्रष्ट्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण पाठबळ दिले. अशा कितीतरी दुःखांवर फुंकर घालण्याची ताकद या समृद्धी मार्गात आहे.

डोळ्यात भरणारी समृद्धी

समृद्धी महामार्गाच्या वैशिष्ट्यातच विकासाचा मूलमंत्र आहे. 14 ते 16 तास मुंबईपर्यंत पोहोचण्याला लागणाऱ्या काळामध्ये या सर्वात जवळच्या मार्गाने ७ ते ८ तासांत मुंबईला पोहोचता येणार आहे. कच्चा माल, खनिज, दूध, मासळी, शेतमाल या मार्गाने मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत लवकरात लवकर पोहचणार आहे. त्यामुळे समृद्धी मार्ग महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने भाग्यरेखा ठरणार आहे.

701 किलोमीटरची विस्तीर्ण लांबी, 6 मार्गिकांसह 120 मीटरची डोळ्यात भरणारी रुंदी, वाहन गतीने चालवण्यासाठी प्रत्येक मार्गिकेची आखणी, कुणी मध्येच येणार नाही याची शाश्वती देणारे सुरक्षा कठडे, त्यामुळे काही क्षणात डोळ्यासमोरून गतीने वाहन दिसेनासे होणे ही आता समृद्धी महामार्गाची ओळख होईल. समृद्धी महामार्गाच्या पाहणीच्या निमित्ताने नुकतेच हे दृश्य बघायला मिळाले. प्रत्यक्षात जेव्हा ताफ्यामध्ये वाहने धावायला लागली, तेव्हा स्पीडोमीटरच रस्त्याच्या प्रेमात पडते की काय, असे वाटायला लागले. रस्त्यांची रुंदी, प्रत्येक मार्गिकेची आखणी, दर्जा, सजावट, दिशादर्शक फलके, सुरक्षा मानके, नजरेत भरत होती.

नागपूर आणि विदर्भला राजधानी मुंबईच्या जवळ नेणारा हा महामार्ग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वप्नांना मूर्तरुप देणारा ठरणार आहे. आता प्रतीक्षा आहे,  या स्वप्नपूर्तीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकार्पणाची मोहोर उमटविण्याची….

श्रीप्रवीण टाके,

जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर.

जितका प्रवास तितकाच पथकर !

नागपूर ते मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपुरात होत आहे. त्यानिमित्ताने या मार्गावरील पथकराविषयीच्या माहितीपर हा लेख…

समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना सर्वसामान्य नागरिकांना अधिकचा पथकर लागेल, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मात्र, यातील वस्तुस्थिती अशी आहे की, जेवढा तुम्ही प्रवास कराल, तेवढाच तुम्हाला पथकर भरावा लागणार आहे.

निर्गमन पथकर

समृद्धी महामार्गावर प्रवास करण्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्गमन पथकर (एक्झिट टोल).  निर्गमन पथकर म्हणजे काय?, तर निर्गमन पथकर म्हणजे बाहेर पडताना देता येणारा कर… याचाच अर्थ तुम्ही जितके अंतर या मार्गावरुन कापले, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील. समृद्धी महामार्गाने नागपूर ते मलकापूर असा प्रवास केला, तर मलकापूरपर्यंत जितके अंतर होईल, तितकाच पथकर तुम्हाला द्यावा लागेल, तुमच्याकडून मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा पथकर वसूल केला जाणार नाही.

पहिल्या टप्प्यात (नागपूर ते शिर्डी)  मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ येथे पथकर नाका असणार आहे. इतर इंटरचेंजेस धरून एकूण 19 नाके आहेत. निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार असल्याने सद्य:स्थितीत नागपूर ते शिर्डी हलक्या वाहनांकरिता सुमारे 900 रुपये एवढा पथकर असेल. पथकर हा फास्ट टॅग, कार्ड, वॅालेट, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

आपत्कालीन व्यवस्था

महामार्गावर अपघात किंवा बिघाड झाल्यास हेल्पलाईन 1800-2332233, 8181818155 या  क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधता येईल. महामार्गावर ठिकठिकाणी हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करण्यात येतील. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरीता 108 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. १५ रुग्णवाहिका, १५ शीघ्र प्रतिसाद वाहने, १२२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

उद्घाटनानंतर समृद्धी महामार्ग सर्वांसाठी खुला होईल. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास करावा, द्रुतगती महामार्गावर कुठेही वाहने उभी करू नयेत, सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादेचे पालन करुन वाहनधारकांनी सुरक्षित व गतिमान प्रवासाचा आनंद घ्यावा.

 जिल्हा माहिती कार्यालयनागपूर

नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचा दुसरा दिवस पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि केरळ ने गाजवला

पुणे : अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (USFI) द्वारे आयोजित दुसऱ्या नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप पुणे 2022 स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे – बालेवाडी येथे सूरू असून. स्पर्धेत दोन दिवसात पश्चिम बंगालने 19 सुवर्णपदकासह 50 पदके पटकावत आघाडी कायम राखली , तेलंगणाला 13 सुवर्णपदकांसह 23 तर केरळला 8 सुवर्णपदकासह 21 पदके मिळाली.

मागील दोन दिवसांपासून मोठया उत्साहात सुरु असलेल्या नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप पुणे 2022 स्पर्धेत देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशाचे एकूण 34 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या दोन दिवसांत पश्चिम बंगालला 17 रौप्य आणि 17 कांस्य , केरळला 9 रौप्य आणि 4 कांस्य, तर तेलांगणला 5 रौप्य तर 5 कांस्य पदके मिळाली. याशिवाय तामिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, गुजरात, गोवा, महाराष्ट्र, पाॅंडेचेरी संघाच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली.

दुसऱ्या दिवसाचे महत्वाचे निकाल
400 मीटर- बीआई फिन स्विमिंग- सिनिअर
पुरुष- जनन मोम्ब्रिन, ( पाॅडेचेरी ) सुवर्णपदक, चार्ल्स येन्नुला ( तेलंगणा) रौप्य, प्रतिक पासी ( छत्तीसगड) कांस्य,
महिला- दिपान्विता मंडल ( पश्चिम बंगाल) सुवर्ण, सोहेली मंडल( पश्चिम बंगाल) रौप्य, श्रीनिती एन (तामिळनाडू) कांस्य

200 मीटर बीआई फिनस्विमिंग- सिनिअर
पुरुष- चार्ल्स येन्नुला ( तेलंगणा) सुवर्ण, आयुष रौत( पश्चिम बंगाल) रौप्य, सुबीर मलिक ( पश्चिम बंगाल)
महिला- साची ग्रामोपाध्ये (गोवा) सुवर्ण,

200 मीटर सरफेस ( मोनोफिन) ज्युनिअर डी
मुले- सिद्धार्थ कालिया( तेलंगणा) सुवर्ण, जय जसवंत आर ( तामिलनाडू) रौप्य, आदिदेव प्रदीप( केरळ) कांस्य
मुली- आदिती बिस्वास( पश्चिम बंगाल) सुवर्ण, मेहरीन असीफ (केरळ) रौप्य, देवल प्रशांत पांड्या( गुजरात) कांस्य

200 मीटर सरफेस ( मोनोफिन) ज्युनिअर सी
मुले- पाथुरी भुवास ( तेलंगणा) सुवर्ण, ध्रुव टंक ( गुजरात) रौप्य, अदिदेव प्रदिप (केरळ) कांस्य
मुली- अभिरामी पी.जे (केरळ), पवित्रा श्री एस. डी. ( तामिलनाडू) रौप्य, प्रिशा, टांक (गुजरात) कांस्य,

200 मीटर सरफेस ( मोनोफिन) ज्युनिअर बी
मुले-अर्जून कंदोई ( तेलंगाणा) सुवर्ण, जी. जैसे ( केरळ) रौप्य, संदीप मंडल( पश्चिम बंगाल) कांस्य,
मुली- जिनल पित्रोदा (गुजरात) सुवर्ण, थेरस मारिया( केरळ) रौप्य, बांसुरी मकवाना (गुजरात) कांस्य,

शाईफेक: चिंचवड पोलीसचौकी बाहेर भीम सैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांत घोषणाबाजी

पुणे-चिंचवड पोलीस चौकी बाहेर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची त्याचवेळी चंद्रकांत पाटील समर्थक यांची गर्दी झाली. त्यामुळे पोलीस चौकी समोर जोरदार घोषणाबाजी झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. शाई फेकणाऱ्याचे मनोज गरबडे असे नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरात परिचित आहे.मनोज हा पिंपरी-चिंचवड परिसरात समता सैनिक दलासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. डाॅ. बाबाासहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाकडून आयोजित कारण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्याचा पुढाकार असतो. नुकतीच मनोजच्या पुढाकाराने पिंपरीत संविधात जनजगृती अभियान तसेच सहा डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मनोज सोबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन जणांची चौकशी पोलीस चौकशी सुरू आहे.

फडणवीस म्हणाले, टार्गेट करणे योग्य नाही

नागपूर- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड मध्ये एकाने शाईफेक केल्यानंतर यावर भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खरे म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा शब्द चुकला असेल, तरी त्यांच्या वाक्यातील आशय घेतला पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे की, पूर्ण वाक्याचा आशय न दाखवता, केवळ चुकीचा शब्द दाखवणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जी लोकं अशाप्रकारचे कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांनी आधी ते वाक्य नीट ऐकले पाहिजे आणि त्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले आहे, जो शब्द खटकणारा आहे, त्याबद्दल त्यांनी खुलासा केलाय आणि माफीदेखील मागितली आहे. त्यानंतरही त्यांना टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य एवढेच होते की, आज लोकं अनुदानाच्या मागे लागतात. पण त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी जनतेतून पैसा उभा करुन शिक्षणाची व्यवस्था उभी केली. हा आशय महत्त्वाचा घेतला पाहिजे. अशा पद्धतीने टार्गेट करणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले

भुजबळ म्हणाले, नेत्यांनी शब्द जपून वापरावेत अन लोकांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करावीत

चंद्रकांत पाटलांच्या वर झालेल्या शाई फेक वर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया

चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. पाटील यांनी सोमवारी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते.या विधानाच्या निषेधार्थ हि शाई फेकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील ठिकठीकाणी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या विधाना संदर्भात आंदोलने आणि निषेध व्यक्त होत आहे . पिंपरीच्या शाई फेक प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे , ते म्हणाले ,”शाईफेक करणारे कार्यकर्ते कोणाचे होते याची मला कल्पना नाही, मात्र ते फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे असतील, मागच्या काही दिवसांपासून महापुरूषांबाबत मंत्री वादग्रस्त विधाने करत आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांना सांगितलं पाहिजे महापुरूषांबद्दल बोलताना शब्द विचार करून वापरावे, सातत्याने अशी वादग्रस्त विधाने केली जात आहेत,त्यामुळे राज्यातील वातावरण गरम आहे, तर त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केलं की चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाची दिलगिरी व्यक्त केली आहे यावर थांबलं पाहिजे मात्र ज्यांना आंदोलने करायची आहेत त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने करावीत, कोणालाही इजा होईल अशा प्रकारे आंदोलने करू नये” अस मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे- मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निषेधार्थ त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, बंडू केमसे, दिपाली धुमाळ,,बाबा उर्फ प्रदीप धुमाळ , लक्ष्मीताई दुधाने, प्रदीप देशमुख, गिरीश गुरनानी, मिलिंद वालवडकर, किशोर कांबळे, दीपक जगताप, सुषमा सातपुते, हर्षवर्धन मानकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर एकूण 63 वर्षात वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळ्या पक्षांची सरकारे या महाराष्ट्रात स्थापन झाली. परंतु इतक्या वर्षांमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने अथवा नेत्याने जे चुकीचे धाडस केले नाही ते धाडस राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते धाडस करत महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवरायांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र म्हणून जगभरात आहे. त्या महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या, अशा प्रकारचे अवमानजनक वक्तव्य पुण्याचे वाचाळवीर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. अशा प्रकारचे चुकीचे वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा अवमान केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर हे आंदोलन केले.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांचा आवमान केल्याने भारतीय जनता पार्टीने चंद्रकांत पाटील यांची तात्काळ मंत्री मंडळातून हकलपट्टी करावी आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच भारतीय जनता पार्टीने संपूर्ण राज्याची माफी मागावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी यावेळी केली. तसेच इथून पुढे कुठल्याही राष्ट्रपुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विरोधात आणखी तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला.यावेळी “चंद्रकांत पाटील मुर्दाबाद” , “चंद्रकांत पाटील हाय हाय” , “चंद्रकांत पाटील यांचे करायचे काय..? खाली डोकं वर पाय” , “वाचाळविर भाजपचा धिक्कार असो” , अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.

अजितदादा, उद्धव ठाकरे, पवारसाहेब, सुषमाताई अंधारे यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी या हल्ल्याची निंदा करावी- चंद्रकांत पाटील

हिंमत असल्यास समोर या. एका गिरणी कामगाराचा पोरगा स्टेजवर आल्याचे यांना झेपत नाही काय ? – मंत्री पाटलांची शाईफेक नंतर तातडीने प्रतिक्रिया

पुणे-मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणारे कार्यकर्ते कोणत्या संघटनेचे आहेत, याबद्दल अजून माहिती समोर आली नाही. मात्र, शाईफेक करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाईफकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.शाईफेकनंतर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंमत असल्यास समोर या. एका गिरणी कामगाराचा पोरगा स्टेजवर आल्याचे यांना झेपत नाही. भ्याड हल्ले सुरू आहेत. हिंमत असेल, तर समोर या. महाराष्ट्रात झुंडशाही चालणार नाही. पोलिसांच्या दोष देण्याचे कारण नाही. मी कुणाला घाबरत नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे. आत्ताही कार्यक्रमाला चाललोय. उद्याही चाललोय. हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, असल्याचे ते म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले की, ज्यांनी घटना लिहिली ती तीन हजार वर्षे बदलावी लागणार नाही असेही मी बोललो. मात्र मीडियाने पराचा कावळा केला. बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आपण आहोत. हे तुम्ही दाखवले नाही. शाळा कुणी सुरू केल्या. महर्षी धोंडो कर्वे, फुले, आंबेडकरांनी लोकसहभागातून शाळा सुरू केल्या. त्याऐवजी दुसरा शब्द वापरला. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. इतक्या पुढे आलोय. तेच संरजामशाही मनोवृत्तीला झेपत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पोलिसांना सस्पेंड करून मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे करावे म्हणतील ते करा. ते आंदोलन करा म्हणाले, आंदोलन करा. नाही तर नाही. त्यांचे ऐका. डॉ. आंबेडकरांनी कायदा हातात घ्यायला शिकवले नाही. मी त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीच सांगणार नाही. कारण त्यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे. अजित दादा, उद्धव ठाकरे, पवार साहेब, सुषमा ताई अंधारे यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी या हल्ल्याची निंदा करावी.

केवळ सरकारी अनुदानावर विसंबून राहू नका, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संस्थांना केले. ते म्हणाले की, देशात सध्या सर्व सरकारनेच करावे, अशी भावना निर्माण झालीय. यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनी शाळा काढल्या. त्यासाठी सरकारी अनुदान घेतले नाही. भीक मागून शाळा उभ्या केल्या, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवतेय. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार थांबविले

0

मुंबई,दि.10डिसेंबर 2022शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून त्यानुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शनिवारी केली.
श्री विजय सिंघल म्हणाले की, महावितरणकडून थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम चालू आहे. त्यानुसार ज्यांची बिले थकलेली आहेत त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते व बिल भरल्यानंतर पुन्हा जोडले जाते. तथापि, शेतकऱ्यांवर अतिवृष्टी व पूरपरिस्थिती अशी आलेली संकटे आणि सध्या चालू असलेला रब्बी हंगाम ध्यानात घेता त्यांचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश मा. उपमुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानुसार महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे.

गेल्या दोन दशकात, भारताने टंचाईपासून समृद्धतेकडे प्रवास केला आहे- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पुणे-केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन  आज पुण्यातील सिंबॉयसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या  19 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या, की एक उत्तम भविष्यासाठी स्वतःमध्ये  बदल घडवण्यासाठी तयारी करा. “भारताने आता टंचाईपासून ते समृद्धतेपर्यंतचा प्रवास केला आहे. गेल्या दोन दशकात, लँडलाईन फोन्सपासून ते मोबाइल वॉलेट्स पर्यंत आपण परिवर्तनाचा जणू महासागर पाहिला आहे.”

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाविषयी बोलतांना केंद्रीय वित्तमंत्र्यांनी, विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी, “ एक पृथ्वी, एक कुटुंब, एक  भाविष्य” या संकल्पनेसाठी योगदान द्यावे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक डिसेंबर 2022 पासून जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. भारताच्या अध्यक्षपदाचे उद्दिष्ट “ वसुधैव कुटुंबकम: एक पृथ्वी,एक कुटुंब, एक भविष्य” असे आहे. पंतप्रधानांनी लाईफ ही संकल्पना देखील निर्माण केली आहे, ज्याचा अर्थ ‘पर्यावरणअनुकूल जीवनशैली’ असा आहे. परिवर्तन आणणे आणि परिवर्तनासाठी स्वतः सज्ज असणे यांचा लाईफ- संकल्पनेत समावेश  आहे. आपल्याला आपल्या जीवनशैलीत असे बदल घडवायचे आहेत ज्यामुळे,आज आपण पर्यावरणावर जो भार टाकतो आहोत, तो पडणार नाही. आणि असे बदल केले तरच, आपल्याला  पुढच्या पिढ्यांसाठी नैसर्गिक स्त्रोत शिल्लक ठेवता येतील  नाहीतर, आपल्याला हवामान बदलाशी संबंधित गंभीर संकटांचा सामना करावा लागेल.” 

मूल्याधारीत शिक्षणावर भर देतांना, वित्तमंत्री म्हणाल्या की जेव्हा, कोविडोत्तर काळात, सगळ्या जगाची जवळपास पुनर्रचना होत आहे, अशावेळी, मूल्याधारीत शिक्षणाची नितांत गरज आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले, की, काय योग्य आणि काय अयोग्य याचा निर्णय घेण्यासाठी, आपले हृदय आणि अंतरात्मा काय म्हणतो, याचा विचार करा, आणि त्यानुसारच निर्णय घ्या. “काहीही करायचे असेल, तर त्याचा योग्य मार्ग काय आहे, हे तुमचे मन आणि तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्हाला बरोबर सांगत असते. सांस्कृतिक दृष्ट्या वारसा परंपरेने समाजात चालत आलेली मूल्ये, आपल्यात ही विवेकबुद्धी वापरण्याची क्षमता देतात. ही क्षमताच आपल्याला काय योग्य, काय अयोग्य, यातला फरक स्पष्ट करत, आपल्याला अधिक सुजाण बनवत असते.” 

या दीक्षांत समारंभात केंद्रीय वित्तमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना डी लिट पदवी (मानद डॉक्टर ऑफ लेटर्स पदवी), सुवर्ण पदके आणि इतर पुरस्कार प्रदान केले. पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या 13 परिसरात, एमबीएच्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला.

ओमानच्या परराष्ट्र व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, वाणिज्य उद्योग आणि आंतरराष्ट्रीय सहकार मंत्रालयाचे सल्लागार पंकज खिमजी आणि आयसीएमआरच्या पंडित राष्ट्रीय अध्यासनाचे डॉ. रमण गंगाखेडकर, यांनाही या वर्षी विद्यापीठाने डी.लिट.पदवी प्रदान केली.

दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु डॉ. एस बी मुजुमदार होते.