Home Blog Page 1492

सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ; आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार

0

नागपूर दि. २०: स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्यात येईल आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता.बाबा आढाव यासाठी उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री.  शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रयोगशाळेतील विकसीत तंत्रज्ञान समाजापर्यंत पोहोचायला हवे-भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे

पुणे :  देशात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी या क्षेत्रात काम करणा-यांना प्रोत्साहन आणि आव्हान द्यायला हवे. ज्यामुळे औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार होईल. प्रयोगशाळेतील विकसित तंत्रज्ञान समाजापर्यंत पोहोचून त्याचा वापर व्हायला हवा. जोपर्यंत मनुष्यप्राणी अस्तित्वात आहे, तोपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. संशोधन क्षेत्रात बरेच चांगले काम होत आहे, परंतु तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करणे शास्त्रज्ञांना शक्य होत नाही, असे मत भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले. 
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनच्या (एनआरडीसी) आउटरीच सेंटरचा प्रारंभ पुण्यामध्ये झाला. आघारकर संशोधन संस्था (एआरआय) कॅम्पसमध्ये या सेंटरचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी एनआरडीसी नवी दिल्लीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमित रस्तोगी, एनआरडीसीचे संचालक शेखर मुंदडा, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन आॅफ सायन्सचे सचिव डॉ. प्रशांत ढाकेफळकर आदी उपस्थित होते.
डॉ. शेखर मांडे म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण दोन महत्त्वाच्या अडचणींचा सामना करत आहोत. त्यातील एक म्हणजे तंत्रज्ञानाचे उपयोजन. बरेच चांगले काम या क्षेत्रात होत आहे, परंतु तंत्रज्ञानाचा प्रसार करणे शास्त्रज्ञांना शक्य होत नाही आणि दुसरे औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञान विकास. औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञान विकासावर खर्च केला जात नाही. औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचे यशस्वी उपयोजन व्हायला हवे. एनआरडीसी सातत्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले. 
अमित रस्तोगी म्हणाले, एनआरडीसीने जागतिक ओळख मिळवावी अशी आमची इच्छा आहे. संशोधकांना संशोधनासाठी निधी आणि त्यांना पाठिंबा देणे व संशोधनासाठीचे पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही भारतीय शासनाच्या माध्यमातून कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. एनआरडीसीच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी पुण्यातील आघारकर संशोधन संस्था (एआरआय) कॅम्पसमध्ये आउटरीच सेंटर सुरु झाले आहे. क्षेत्रातील शोधक, अकादमी, स्टार्टअपद्वारे विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यास पुढाकार घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शेखर मुंदडा म्हणाले, पुण्यात खूप मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. पुण्यातील आॅटोमोबाईल इंडस्ट्री देखील मोठी आहे. विविध प्रकारचे संशोधन केंद्र देखील पुण्यात आहेत, त्यामुळे संशोधकांसाठी पुण्यात पोषक वातावरण आहे.  महाराष्ट्रात पहिल्यांदा आउटरिच सेंटर पुण्यात सुरु करीत आहोत. याचा फायदा निश्चितपणे स्टार्टअप् व तंत्रज्ञान विकसित करण्यास होईल. इतकेच नव्हे, तर लवकरच आघारकर संस्थेने जी जागा दिली आहे, तेथे या सेंटरसोबतच एन्क्युबेशन सेंटर सुरु होईल. याचा फायदा नव उद्योजकांना होईल.
डॉ. प्रशांत ढाकेफळकर म्हणाले, एनआरडीसी ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सक्रिय कार्यरत आहे. तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करणे आणि संशोधनाचा समाजाला फायदा करून देणे हे एनआरडीसीचे मुख्य ध्येय आहे आणि ते काम चांगल्या पद्धतीने होत आहे.

ई. एस. प्रायमरी स्कूलमध्ये स्नेहसंमेलन संपन्न

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डी. ई. एस. प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांचे विश्व, महाराष्ट्राची संत परंपरा, बाळकृष्ण लीला, पाणी हेच जीवन, वर्ल्ड टूर या विषयांवरील संगीत, नृत्य आणि नाटकांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताचे महामंत्री सतीश कुलकर्णी, एस. पी. एम. स्कूलच्या मुख्याध्यापिका रेवा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका ग्रेसी डिसोजा आणि सिमरन गुजर यांनी संयोजन केले.

खरगे यांच्या श्वानाच्या विधानावरुन भाजपकडून माफीची मागणी-खरगेंचे जोरदार प्रत्युत्तर .. राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली-

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या श्वानाच्या वक्तव्यावरून मंगळवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. खर्गे यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली. खरगे यांनी देशासमोर खोटे बोलण्याचा प्रयत्न केल्याचे भाजपने म्हटले. दुसरीकडे आपण जे बोललो ते सभागृहाबाहेर बोललो, असे खरगे यांचे म्हणणे आहे.

खासदार पियुष गोयल म्हणाले की, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी अलवरमध्ये अशोभनीय भाषण केले. त्यांनी असभ्य भाषा वापरली. निराधार आणि खोटेपणा देशासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खर्गे यांनी भाजप, संसद आणि देशातील जनतेची माफी मागावी. खर्गे यांनी आपल्या वक्तव्यातून मानसिकतेची झलक दिली आहे.

काय होते वादग्रस्त विधान
राजस्थानच्या अलवर येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आमच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले. ते हुतात्मे झाले. तुमच्या गटातून साधा श्वान तरी मेला का? इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी बलिदान दिले. राजीव गांधींनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. तुम्ही कोणते बलिदान दिले? ..असे असूनही ते देशभक्त आणि आम्ही काही बोलले तरी देशद्रोही ठरतो.

आता जाणून घ्या राज्यसभेत काय झाले
सकाळी 11 वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. जेमतेम 15 मिनिटे झाली होती. भाजप खासदारांनी खरगे यांना माफी मागण्याचे आवाहन केले.

पियुष गोयल म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींनी काँग्रेस विसर्जित करा, असे म्हटले होते. खर्गे हे याचे जिवंत उदाहरण आहेत आणि ते देशाला दाखवत आहेत की गांधीजी जे बोलले ते खरे होते आणि ते असे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ज्यांना कसे बोलावे हे माहित नाही.दुसरीकडे खरगे म्हणाले, ‘राजस्थानच्या अलवरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान मी जे बोललो ते सभागृहाबाहेर होते. मी जे बोललो ते सभागृहाबाहेर राजकीय होते. त्यामुळे त्यावर इथे चर्चा करण्याची गरज नाही. स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका नव्हती असे मी अजूनही म्हणू शकतो.

कर्नाटक सरकारला मस्ती चढली असेल, तर आपणही त्याच भाषेत उत्तर दिले पाहीजे- जयंत पाटील

मुंबई-“यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका,” असं माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकारला सांगितलं.

सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरजयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले.

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेला हल्ल्याचा मुद्दा सभागृहात जयंत पाटील यांनी उपस्थित केला. काल सीमाभागात मराठी बांधवांचे संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील एकही नेता पोहोचणार नाही अशी व्यवस्था कर्नाटक सरकारने केली होती. माजी मंत्री हसन मुश्रीफ तेथील मराठी माणसांच्या समर्थनासाठी तिथे पोहोचले असता त्यांच्यावर लाठी उगारली गेली. हे अत्यंत चुकीचे आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

“आम्ही देशासाठी बलिदान दिलं, तुमचा कुत्रा तरी मेला का?”, मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपावर हल्लाबोल

अलवर -आम्ही ( काँग्रेसने ) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिलं आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. तुम्ही काय केलं? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का? कुटुंबातील कोणत्या सदस्याने त्याग केला आहे का?, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात सुरु आहे. तेव्हा एका सभेला मल्लिकार्जुन खरगे संबोधित करत होते. यावेळी अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये सीमारेषेवर भारतीय सैनिक आणि चिनी सैनिक यांच्यातील झटापटीवरूनही खरगेंनी भाजपावर टीका केली आहे.

“मोदी सरकार सांगते की ते खूप मजबूत आहेत. त्यांच्याकडे कोणीही डोळे मोठे करून पाहू शकत नाही. पण, सीमेवर वाद आणि चकमकी वाढल्या आहे. गलवान सीमेवर २० सैनिक शहीद झाल्यानंतर पंतप्रधान मोदी क्षी जिनपींग यांना १८ वेळा भेटले. त्यांच्यावर झोपाळ्यावर झोकेही घेतले. तरीही, चीनच्या सीमेवर हल्ले का होत आहेत,” असा सवाल मल्लिकार्जुन खरगेंनी केला.

“राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का?,” अजित पवारांचा शिंदे सरकारला संतप्त सवाल

नागपूर -हिवाळी अधिवेशनात विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी सरकारला विचारला आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी एकदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

“उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात बजेटमध्ये मंजूर झालेल्या कामांना सभागृहात मान्यता देण्यात आली होती. त्या सर्व कामांना विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सर्व कामांना स्थगिती देण्यात आली आहे. मी स्वत: मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. सरकार येत असतं, जात असतं. आमच्याही इथे सात टर्म झाल्या आहेत. मनोहर जोशी, राणे यांचं सरकार आम्ही पाहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकारही आम्ही पाहिलं आहे. पण मंजूर झालेली व्हाईट बूकमध्ये आलेली कामं कधी थांबली नव्हती. ही महाराष्ट्रातील कामं आहेत. कर्नाटक, गुजरात किंवा तेलंगणाची कामं नाहीत,” असं अजित पवार यांनी सुनावलं.

यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी… स्थगिती सरकार हाय हाय…५० खोके एकदम ओके” अशा घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

0

मुंबई, दि, २० : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे  ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा – सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी जाहीर केला आहे.

३१ ऑगस्ट  २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत आयोजित  स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण ४७९ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांपैकी घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत ३७९, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १०० या गटात  स्पर्धक सहभागी झाले. घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत दीपक हजारे (कोल्हापूर) यांना प्रथम पारितोषिक, राजेश परदेशी (अहमदनगर) यांना द्वितीय पारितोषिक, कोमल अग्रवाल (औरंगाबाद) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गटात पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रत्नागिरी) या मंडळाला प्रथम पारितोषिक, शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ (नाशिक) या मंडळाला द्वितीय पारितोषिक, तर श्री आवडता गणेश मंडळ (नांदेड) या मंडळाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

तसेच, घरगुती गणेशोत्सव सजावट आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या दोन्ही स्पर्धांना मिळून एकूण वीस उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

१.  घरगुती गणेशोत्सव सजावट गट: १. प्रिती पवार (नाशिक), २. प्राची पाटील (कोल्हापूर), ३. अदिरा इंगळे (पुणे), ४. नितीन पाटील (नाशिक), ५. ललिता कोठावदे (नाशिक), ६. स्वप्निल मुळे (पुणे),७. पराग अत्तरदे (जळगाव), ८. रमेश सूर्यवंशी (लातूर),  ९. सुनिल करंबेळे (रत्नागिरी) आणि १०. स्नेहल खराळकर (पुणे).

२. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गट : १.  प. पू गगनगिरी महाविद्यालय सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ (अहमदनगर), २. हाय कमांडो फ्रेंड्स सर्कल मंडळ (कोल्हापूर) ३. राजे शिवाजी विद्यालय गणेश मंडळ (नंदुरबार), ४. गणराज तरुण मंडळ (अहमदनगर) ५. विजय बाल उत्सव गणेश मंडळ (नागपूर), ६. श्री अष्टविनायक मित्र मंडळ (पुणे), ७. भारत क्रिडा मंडळ (नागपूर), ८. शंकरपुरा पेठ सांस्कृतिक विकास मंडळ (पुणे)  ९. सुवर्णयुग तरुण मंडळ (अहमदनगर) आणि १०. श्री.कृष्ण गणेश मित्र मंडळ  (अहमदनगर)

घरगुती गणेशोत्सव सजावट गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे  ११ हजार रुपये, ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपये ; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे  ५१ हजार रुपये, २१ हजार रुपये आणि ११ हजार रुपये; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम चित्रपट अभ्यासक संतोष पाठारे आणि कलावंत विकी शिंदे यांनी पाहिले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी दिली.

आम्हाला हलक्यात घेऊ नका प्रश्न नसुटल्यास देशभर १५ कोटी ड्रायव्हर चक्काजाम करतील

बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा चालकांच्या प्रश्नांसाठी पुणे सह देशभर आंदोलनाला सुरुवात

  • देशपातळीवर नेतृत्व सिद्ध झाल्याने बोगस रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधीकडून वैयक्तिक पातळीवर टीका : बाबा कांबळे

पुणे

देशात संसदेचे व राज्यात विधानभवनाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या मध्ये रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर प्रामुख्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड सह रिक्षा चालकांचे राज्यासह देशव्यापी होणाऱ्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मागण्यांकडे लक्ष वेधून घेणार असल्याचे ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे व महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगीतले तसेच देशपातळीवर रिक्षा संघटनांची एकी झाली आहे. माझ्यावर जबाबदारी दिली आहे. देशपातळीवर माझे नेतृत्व सिद्ध झाल्याने काही बोगस रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी देखील वैयक्तिक पातळीवर टीका करत आहेत. रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी माझ्यावर करण्यात येत असलेली टीका ही द्वेष भावनेतून होतेय हे रिक्षा चालक मालकांच्या देखील लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता मी रिक्षा चालक मालकांना व गोरगरीब कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देणार असेही बाबा कांबळे म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालक, मालकांच्या विविध मागण्यांसाठी पुणे पिंपरी चिंचवड महाराष्ट्र सह देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया वरती देशव्यापी रिक्षा टॅक्सी व टुरिस्ट परवाना असलेल्या बस संघटनांनी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात केली आहे. पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर रिक्षा चालक मालकांनी धरणे आंदोलन सुरू केले असून या वेळी बाबा कांबळे रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो रिक्षा संयुक्त कृती समिती, रिक्षा टॅक्सी फेडरेशन वतीने हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष अनंद तांबे, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे गुलाब सय्यद, महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे विलास खेमसे, मोहम्मद शेख, बाळासाहेब ढवळे लक्ष्मण शेलार सोमनाथ कलाटे,हे उपस्थित होते.
संघटनेच्या मागण्या

१) रॅपिड मोबाईल आपलिकेशन मधून टू व्हीलर ची सुविधा हटवा.
२) रॅपिडो ओला उबेर कंपनीवर जनतेचे फसवणूक केली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करा.
३) मान्यता नसताना टू व्हीलर टॅक्सी व्यवसाय करत असेल तर ही सेवा बेकायदेशीर म्हणून घोषित करा.
४) रिक्षा चालक मालकांसाठी प्रलंबित असलेले कल्याणकारी महामंडळ तातडीने घोषित करा.
५) मुक्त रिक्षा परवाना बंद करा ई रिक्षाला परवाना सक्तीचा करा.
६) पिंपरी चिंचवड पुणे येथे मीटर कॅरीबॅॅशनची मुदत 30 जानेवारीपर्यंत वाढवा. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले

यावेळी बाबा कांबळे म्हणाले,गेल्या अनेक दिवसांपासून माझ्यावर काही रिक्षा संघटनांचे बोगस प्रतिनिधी वैयक्तिक पातळीवर खालच्या स्तराला जाऊन टीका करत आहे. काही जणांना आपल्या वडिलांचा वारसा जपता आलेला नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेलो आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या माध्यमातून रिक्षा चालक मालकांच्या व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. देश पातळीवर रिक्षा चालक-मालकांची एकी करून मोठं संघटन उभे करण्यात यशस्वी पुढाकार घेतला आहे. त्याला यश देखील प्राप्त झाले. त्यामुळे सर्व रिक्षा चालक मालकांनी देशपातळीवरची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. मी केलेल्या कामाचे हे फळ असल्याचे मी समजतो. मात्र माझे नेतृत्व मोठे होत असल्याचे पाहून अनेकांना पोटशुळ निर्माण होत आहे. त्यामुळे रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत आहेत. वास्तविक रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडवून न्याय देणे गरजेचे असताना देखील त्यांना संकटात टाकण्याची कामे बोगस संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत. त्यांना रिक्षा चालक-मालक धडा शिकवतील, असेही बाबा कांबळे म्हणाले.

बेळगावमध्ये मराठी नेत्यांना अटक करणे अयोग्य, सरकार पाठिशी; उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

नागपूर -सीमाप्रश्नावरून नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आज वादळी ठरला. कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज कर्नाटकात जाण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले आहे. त्याचे जोरदार पडसाद आज सभागृहात उमटले.त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’

सीमा भागातील आमच्या मराठी बांधवांशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.आतापर्यंत केंद्र सरकार या प्रश्नात कधीच हस्तक्षेप करीत नव्हते.पहिल्यांदा मा.केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी बैठक घेतली आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्या.आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली60 वर्षाची समस्या 1 तासात सुटू शकत नाही.पण संवाद राहिला पाहिजे, यासाठी दोन्ही राज्यांतील मंत्र्यांची एक समिती गठीत करण्याचा निर्णय झाला.या देशात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तसा महाराष्ट्र एकीकरण समितीला सुद्धा आहे.आज आंदोलन करताना मराठी भाषिकांना अटक करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकार प्रयत्न करेल आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला जात असताना याबाबत तीव्र नाराजी सुद्धा नोंदविण्यात येईल.सीमाभागातील योजना/प्रकल्प विशेषत्वाने हाती घेण्यात येतील. म्हैसाळ योजनेसाठी 2000 कोटी आम्ही मंजूर केले आहेत. इतरही योजनांना गती देण्यात येईल.

50 खोके, एकदम OK: कर्नाटकच्या बोम्मई सरकारविरोधातही घोषणाबाजी;हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा आवाज घुमला

नागपूर –

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीने पुन्हा एकदा पन्नास खोके, एकदम ओके म्हणत शिंदे सरकारचा निषेध केला.कर्नाटकच्या बेळगावमधील धरपकडीचेही नागपूरमध्ये तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी बोम्मई सरकारच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे सरकारला चोहोबाजूंनी घेरले. कर्नाटक सीमाप्रश्न, प्रकल्पांची पळवापळवी, शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले. त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरच कर्नाटक सरकार हाय हाय…बोम्मई सरकार हाय हाय…शिंदे सरकार हाय हाय…गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… पन्नास खोके, एकदम ओके म्हणत जोरदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवले,शिवसेनेचे कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा

नागपूर- हिवाळी अधिवेशना दरम्यान येथील शिवसेनेच्या कार्यालयात उद्धव ठाकरे यांचे समर्थक आधीच पोहचले . पण हे कार्यालय शिंदे गटाला देण्यात आले ,तेथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. पण हे कार्यालय शिंदे गटाला मिळताच ते फोटो हटवून शिंदे गटाने तेथे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला. अखेर ठाकरे गटाला राष्ट्रवादी कार्यालयामागील कार्यालय देण्यात आले.

यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या समर्थकांकडे होता ताबा

महाराष्ट्रात गत जून महिन्यात सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधीमंडळ अधिवेशनातही शिवेसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला मिळणार यावरून वाद झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाने या कार्यालयावर आपला ताबा मिळवला होता. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचे फोटोही लावण्यात आले होते.

कुणकुण लागताच सचिवांकडे धाव

नागपूर विधान भवन परिसरात असणारे शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला देण्यात येत आहे. तसे लेखी आदेश लवकरच जारी होणार असल्याची कुणकुण विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतेली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लागली होती. त्यानंतर त्यांनी लागलीच विधानभवनात धाव घेऊन विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना जाब विचारला होता.

दानवेंनी केला होता सवाल

विधीमंडळाच्या दस्तावेजांनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटच आजही खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिंदे गटाला हे कार्यालय कोणत्या अधिकारात दिले जात आहे, असा सवाल दानवे यांनी यावेळी केला. दुसऱ्या गटाला एखादे कार्यालय द्यायचे किंवा नाही याचा निर्णय तुम्ही घ्या पण आमच्या कार्यालयाला धक्का लावू नका, असा दमही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना भरला.

आधीच येऊन बसला गट

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटही या कार्यालयासाठी आग्रही असल्यामुळे हा वाद चांगलाच ताणला गेला. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपुरात पोहचताच हे कार्यालय शिंदे गटाला दिले गेले.

उद्योग निरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

0

मुंबई, दि.19 : महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – 2021 मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.

या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक दिनांक 20 डिसेंबर, 2022 रोजी 12.00 वाजेपासून दिनांक 26 डिसेंबर, 2022 रोजी 11.59 (रात्री) वाजेपर्यंत सुरु राहील.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून कळविण्यात आले आहे.

राज्यासाठी लोकायुक्त कायदा महत्त्वाचा: चालू हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होईल अशी अण्णा हजारेंना अपेक्षा

पुणे-राज्यासाठी लोकायुक्त कायदा महत्त्वाचा: चालू हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होईल अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना अपेक्षा आहे . आज त्यांनी यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांना एक पत्र पाठविले आहे . यात अन्न हजारेंनी म्हटले आहे कि ,

‘भ्रष्टाचार रोखण्यासाठी व्यवस्था परिवर्तन महत्त्वाचे आहे. त्यासाठी 16 ऑगस्ट 2011 रोजी दिल्लीतील रामलिला मैदानावर जनतेचे मोठे आंदोलन झाले. त्यानंतर वेळोवेळी आंदोलने झाली. संपूर्ण देशातील जनता या आंदोलनात सहभागी झाली. त्यामुळे 1 जानेवारी 2014 रोजी लोकपाल कायदा झाला. पण लोकपाल हा केंद्रासाठी आहे ही बाब अनेकांना माहीत नाही. राज्यासाठी लोकायुक्त कायदा महत्त्वाचा आहे. राज्यातील नागरिकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार करता यावी यासाठी राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा असणे महत्त्वाचे होते. म्हणून आम्ही गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत होतो. काही वेळेला आंदोलनही करावे लागले.

30 जानेवारी 2019 ला या विषयावर राज्यातील भाजपा-सेना सरकारच्या विरोधात राळेगणसिद्धी येथे उपोषण झाले. राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी तालुका, जिल्हा स्तरावर आंदोलन करून यात सहभाग घेतला. त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार एक संयुक्त मसुदा समिती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. त्यात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारच्या विविध विभागाचे 5 प्रधान सचिव व जनतेचे 5 प्रतिनिधी होते. मसुदा समितीचे काम साडेतीन वर्षे चालले. मधल्या काळात सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाले. वेळोवेळी आठवण करून द्यावी लागली. पत्रव्यवहार करावा लागला.

काल मंत्रीमंडळाने मसुदा समितीचा मसुदा (ज्याचे कामकाज साडेतीन वर्षे चालले होते) तो मंजूर केला आहे. ही आनंदाची बाब आहे. मसुदा समितीने एक सुंदर मसुदा तयार केलेला आहे. त्यानुसार चालू हिवाळी अधिवेशनात हे विधेयक ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्याबद्दल मी जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो.असे हजारे यांनी म्हटले आहे . पुढे अण्णा हजारेंनी या पत्रात नमूद केलेले मुद्दे …

लोकायुक्त संबंधी काही महत्त्वाचे मुद्दे….

1.       लोकायुक्त हा राज्यासाठी आहे. हा कायदा क्रांतीकारक होईल यात शंका नाही.

2.       पूर्वीचा लोकायुक्त नामधारी होता. लोक आयुक्ताला कोणतेही अधिकार नव्हते. त्यांना भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्याची तरतूद नव्हती. लोक आयुक्त हे मुख्यमंत्र्यांनी निवडलेले होते. त्यांना स्वायत्तता नव्हती.

3.       नव्या लोक आयुक्त कायद्यात सर्व कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री व मुख्यमंत्री यांच्या चौकशीचे अधिकार आहेत.

4.       भ्रष्टाचाराच्या तक्रारीबरोबरच सरकारमधील कुप्रशासन, गैरकारभार व दप्तर दिरंगाई या सर्व बाबी लोकायुक्तांच्या कक्षेत येतील. त्यामुळे ते कार्यवाही करू शकतील.

5.       हा मसुदा करताना कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांच्या लोकायुक्त कायद्यातील चांगल्या मुद्द्यांचाही विचार करण्यात आला आहे. म्हणून आजपर्यंत ज्या काही मोजक्या राज्यांनी कायदे केले त्यापेक्षा महाराष्ट्र राज्याचा कायदा देशातील इतर राज्यांना अनुकरणीय असा ठरेल.

6.       सर्व महानगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समित्या व जिल्हा परिषदा लोकायुक्तच्या कक्षेत येतील.

7.       खोट्या तक्रारी होऊ नयेत म्हणूनही तरतूद करण्यात आली आहे. खोटी तक्रार करणाऱाविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे.

8.       एकतर्फी कारवाई होऊ नये म्हणून ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्यालाही आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात येणार आहे.

9.       सखोल चौकशीसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे.

10.  लोकायुक्त कायदा हा माहिती अधिकार कायद्याच्या दोन पावले पुढे असणार आहे.

11.  माहिती अधिकारात माहिती घेता येते. तर लोकायुक्त कायद्यानुसार थेट चौकशी व कारवाई करता येईल.

12.  लोकायुक्त कायद्यामुळे लोकांना खऱ्या लोकशाहीचा अनुभव येईल व सत्तेचे विकेंद्रीकरण होईल.

आता हे बिल विधीमंडळात ठेवण्यात येणार आहे. हा कायदा झाल्यानंतर राज्यातील भ्रष्टाचाराला आणखी ब्रेक लागेल व भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होऊ शकेल असा विश्वास आहे.असेही हजारे यांनी म्हटले आहे.

‘बिन देखे पडे नही चैन’ या भैरवीने ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता

संगीतातील बदलात कलाकार आणि श्रोते यांचे महत्त्वाचे योगदान – डॉ. प्रभा अत्रे

पुणे: ” भारतीय संगीत आज जागतिक मंचापर्यंत पोहचले म्हणूनच कलेकडे सुद्धा डोळसपणे पहिले पाहिजे. काळानुरूप काही गोष्टीवर उलट विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. कलाकार आणि श्रोते या दोघांची ही जबाबदारी आहे आणि आपण ती चांगली पार पडली आहे,” अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या कालच्या समारोपाच्या सत्रात डॉ. अत्रे यांनी स्वरमंचावरून श्रोत्यांशी संवाद साधला. 
” मी किराणा घराण्याची आहे, याचा मला खूप अभिमान आहे. उस्ताद करीम खान यांच्यापासून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी संगीतास समृद्ध केले आहे,”  असे सांगत डॉ. अत्रे म्हणाल्या, ”  संगीत हे केवळ शास्त्र नाही, कसरत, करामत अथवा मनोरंजन नाही, तर या जगातील सुंदर, मंगल शाश्वत जे आहे, त्याची जाणीव करून देणारा माध्यम आहे. संगीत परंपरेत काळानुरूप जे बदल झालेत, ते बदल शास्त्र आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून, त्याप्रमाणे मी बदल करत आले आहे. त्याला विरोध होणे स्वाभाविक होते. पण त्यामध्ये नव्याने विचार सुरू होईल, अशी मला  खात्री आहे.”  

भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारात सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सवाचे मोठे योगदान आहे,असेही त्यांनी सांगत त्यांनी राग भैरवी’ने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यामध्ये तराणा व ‘जागी मै सारी रैन’, ‘जगत जननी भवतारी मोहिनी तू नवदुर्गा…’ ठुमरी सादर केली.
त्यांना सुयोग कुंडलकर ( हार्मोनियम ), माधव मोडक (तबला), आरती ठाकूर – कुंडलकर, आश्र्विनी मोडक ( तानपुरा), डॉ.चेतना बनावट व अतींद्र तरवडीकर ( गायन) यांनी साथ केली.

तत्पूर्वी महोत्सवाच्या पाचव्या दिवशी उत्तरार्धातील दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी आपल्या भावस्पर्शी कथक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या ‘श्रीराम स्तुती’ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कथक सादरीकरणासोबतच त्यांची ऊर्जा, हावभाव यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर रूपक तालात सात मात्रा, धमार तालमध्ये १४ मात्रा, २ स्वरचित रचना, चक्रधार पढंत त्यांनी सादर केल्या. धीरगंभीर अशा ‘श्रीराम कथा’ सादरीकरणाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला. त्यांना झुबेर शेख ( सतार ) , पं. कालिदास मिश्रा ( तबला ) वैभव मानकर ( हार्मोनियम व गायन),  वैभव कृष्ण (पढंत) , भुवन ( बासरी) यांनी साथ केली.

महोत्सवाच्या परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या ‘बिन देखे पडे नही चैन’ या भैरवीचे रेकॉर्डींग ऐकून ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता करण्यात आली