Home Blog Page 1475

अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ४ :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या सकारात्मक प्रतिसादावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

आंदोलकांच्या शिष्टमंडळांने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे म्हणणे तपशीलवार ऐकून घेतले. या सर्व मुद्यांबाबत लवकरच व्यापक बैठक बोलावण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले. यात अंगणवाडी केंद्रांसाठीची जागा, सेविका आणि मदनतीस यांचे मानधन, रिक्त जागा, ऑनलाईन डाटा भरण्यासाठी मोबाईलची उपलब्धता, पोषण आहार आदी मुद्यांचा समावेश असेल.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सकारात्मक आणि दिलासादायक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे संघाचे अध्यक्ष एम. एम. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांबाबचे सविस्तर निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर केले.

बृहन्मुंबई क्षेत्रात फटाके वाजविण्यास ३१ जानेवारीपर्यंत मनाई

मुंबई, दि. ५ : बृहन्मुंबई क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी फटाके विक्रीसह फटाके जवळ बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे आणि वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. बृहन्मुंबई पोलीस दलातील अभियान शाखेचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले आहेत. दि.३१ जानेवारीपर्यंत आदेश लागू राहतील.

नववर्षानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत असल्याने अन्य नागरिकांना होणारा अडथळा, गैरसोय, धोका किंवा अन्य प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी फटाक्यांवर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत.

या ठिकाणी फटाके वाजविण्यास मनाई

दि.३१ जानेवारीपर्यंत ५०० मीटर बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनसोबतच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट बफर झोन, माहूल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, स्पेशल ऑइल रिफायनरीच्या १५ आणि ५० एकर क्षेत्र अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडवू किंवा फेकू नये, असे आदेश, उपायुक्त श्री. ठाकूर जारी केले आहेत.

मधुमेह- हृदयविकारातील नवीन घातक घटकांना वेळीच ओळखा-डॉ. शंतनू सेनगुप्ता

नागपूर- हृदयविकार आणि मधुमेह या नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास आले आहेत, हे घटक वेळीच ओळखून सजग राहून आपला बचाव करावा, असे प्रतिपादन डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी आज येथे केले.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात ‘हृदयविकार आणि मधुमेह या विषयातील नवीन संशोधन’ याविषयावर चर्चा झाली. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. जी. वसिष्ट हे होते. तर या चर्चासत्रात डॉ. शंतनू सेनगुप्ता आणि डॉ. सुनील गुप्ता या तज्ज्ञांनी सहभाग घेतला. हे दोन्ही मान्यवर नागपूरकर आहेत.

डॉ.सेनगुप्ता म्हणाले की, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी लिपोप्रोटीन सारख्या नवीन जोखीम घटकांची लवकर ओळख आणि प्रतिबंध हे महत्त्वाचे आहेत. हार्टअटॅक ला जबाबदार पर्यावरणीय, वर्तणूकीय, रोगनियंत्रण (रक्तदाब-मधुमेह)  इ. घटक आहेत. यावर उपाय म्हणून दररोज 8 ते 10 हजार पाऊले चालावे. अर्ध्या तासापेक्षा अधिक कालावधीसाठी स्थिर बसल्यास थोड्या थोड्या वेळात चालावे. डिजिटल साधनाचा अतिवापर हा घातक आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ.गुप्ता म्हणाले की,  मधुमेह 2021 मध्ये 537 दशलक्ष प्रौढ मधुमेहासह जगत होते. ही संख्या 2030 पर्यंत 643 दशलक्ष आणि 2045 पर्यंत 783 दशलक्षपर्यंत वाढण्याचे अनुमान आहे. रक्तातील ग्लुकोजचे लवकर निदान आणि नियंत्रण यावरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भारतीय लोक इतरांपेक्षा वेगळे आहेत. त्यांची शरीराची रचना बारीक असली तरी शरीरात फॅट्स चे प्रमाण भरपूर असते. मधुमेही व्यक्तीला आपण रोगी न म्हणता ‘पेशंट विथ डायबिटीज’ अस म्हणावं. रोगाचे निदान न होता तसेच इन्सुलिनचे प्रमाण माहिती नसल्यामुळे  मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याबाबत अधिक माहिती असल्यास अनेक रुग्णांचे जीव वाचवता येतील,असे ते म्हणाले.सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा जोशी यांनी केले.

भारतीय विज्ञान काँग्रेस : आनंदीबाई जोशी ते कांदबिनी गांगुली

महिला शास्त्रज्ञांच्या माहितीचे विज्ञान यात्रींना अप्रूप

नागपूर, दि. 5– देशाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. विज्ञान क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात असलेल्या ‘प्राईड आफ इंडिया’ या प्रदर्शनात ‘आनंदीबाई जोशी ते कादंबिनी गांगुली’ या महिला शास्त्रज्ञांचा जीवनपट मांडण्यात आलाय. भारतीय विज्ञान काँग्रेसला भेट देणाऱ्या प्रत्येक विज्ञान यात्रीला या माहितीचे अप्रूप वाटत आहे. महिला शास्त्रज्ञांबद्दल माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची वाढती गर्दी ह्याचेच द्योतक आहे.

यंदाची भारतीय विज्ञान काँग्रेस ही ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या संकल्पनेवर केंद्रित आहे. यामध्ये ‘शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि हे साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका’, या विषयावर विशेषत्वाने चर्चा होत आहे. या अनुषंगाने महिला वैज्ञानिकांचा जीवनपट मांडणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही कालखंडात विज्ञान क्षेत्रात महिलांनी दिलेल्या योगदानाबद्दल या प्रदर्शनातून माहिती  देण्यात आली आहे. ‘हॉल ऑफ प्राईड’ या हॅाल मध्ये असलेल्या या प्रदर्शनात आनंदीबाई जोशी, केतायुन अर्देशिर दिनशॅा, बिमला बुटी, इरावती कर्वे, असीमा चॅटर्जी, डॅा. जानकी अम्माल, अन्ना मणी, कमल रणदिवे, डॅा. विभा चौधरी, कादंबिनी गांगुली, मेरी पूनन लुकोस, कमल रणदिवे या विज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिला चवैज्ञानिकांच्या माहितीचा समावेश आहे.

महत्वपूर्ण अशी माहिती सोप्या भाषेत या प्रदर्शनात पहावयास मिळते. कर्करोगतज्ज्ञ केतायुन अर्देशिर दिनशॅा यांनी वैद्यकीय क्षेत्रात विशेषतः कर्करोग या आजारावरील रेडिएशन थेरपीवर केलेल्या संशोधनाची माहिती इथं देण्यात आली आहे. पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जी या विज्ञान विदुषींची माहिती या प्रदर्शनीत देण्यात आली आहे. भारतीय औषधी वनस्पतींवर त्यांनी विपुल संशोधन केले. त्यांना ‘पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ’ असे संबोधले जाते. रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेऊन ‘डॉक्टरेट इन सायन्स’ पदवी संपादन करीत त्यांनी अमेरिकेत जाऊन संशोधन केले. भारताचे नोबेल पारितोषिक समजले जाणारे शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक मिळवले. भारतीय विज्ञान काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवले. त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने सन्मानित करण्यात आले.

डॉ. जानकी अम्मल यांची विशेष ओळख म्हणजे त्या भारतातील पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतिशास्त्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने १९७७ मध्ये पद्मश्री सन्मान देऊन गौरवले.

भारताच्या ‘वेदर वुमन’ म्हणून अ‍ॅना मणी ओळखल्या जातात. भारतीय हवामान निरीक्षण यंत्रांच्या रचनेत अ‍ॅना मणी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बनवलेली हवामान निरीक्षण यंत्रे भारतातील हवामानाच्या पैलूंचे मोजमाप करण्यात आणि अंदाज व्यक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

यासोबतच बिमला बुटी, इरावती कर्वे, कमल रणदिवे, आंनदी गोपाळ जोशी,  डॉ. विभा चौधरी, कादंबिनी गांगुली, मेरी पूनन लुकोस, कमल रणदिवे या विदुषींनी विज्ञान क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाची प्रेरणादायी माहिती या प्रदर्शनात बघायला, वाचायला मिळते. तसेच विज्ञान क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत देशातील महिला शास्त्रज्ञांचे प्रमाण, अंतराळ संशोधन क्षेत्रातील महिलांचे योगदान यासह इतरही रंजक माहिती या प्रदर्शनात पहावयास मिळते. प्रत्येकाने अवश्य भेट द्यावे असे हे दालन आहे.

स्विच मोबिलिटी तर्फे ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये ३ नवीन इलेक्ट्रिक वाहने सादर होणार

·         दळणवळण उपयोजनात लास्ट माईल आणि मिड माईल सुविधा पुरविण्यासाठी वजनाने हलक्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या leV मालिकेतील संकल्पनाप्रणीत वाहनांची नवीन श्रेणी आणि विशेष अॅप्लिकेशन्सची श्रेणी पुरवणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेसची श्रेणी यांचे स्विच तर्फे अनावरण

·         स्विच ग्रेटर नोएडा येथील एक्स्पो ग्राउंड्स मध्ये हॉल क्रमांक १२ स्टॉल क्रमांक एन १५ मध्ये अशोक लेलँडसह एकात्मिक स्टँडचा भाग असेल.

चेन्नई ०५ जानेवारी २०२३ : अत्याधुनिक कार्बन न्यूट्रल इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलकी व्यावसायिक वाहने बनविणारी कंपनी स्विच मोबिलिटी लिमिटेड (‘SWITCH’) जागतिक बाजारपेठेसमोर आपली बाजारपेठेतील आघाडीची उत्पादने आणि तंत्रज्ञान सादर करण्यासाठी ग्रेटर नोएडा येथील ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये उपस्थित राहणार आहे. स्विच मोबिलिटी १३-१८ जानेवारी २०२३ दरम्यान हॉल क्रमांक १२ स्टॉल क्रमांक एन १५ मध्ये प्रख्यात ऑटो एक्स्पोमध्ये प्रथमच सहभागी होत असून दळणवळण उपयोजनात लास्ट माईल आणि मिड माईल सुविधा पुरविण्यासाठी वजनाने हलक्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या leV मालिकेतील संकल्पनाप्रणीत वाहनांची नवीन श्रेणी आणि EiV मालिकेतील इलेक्ट्रिक बसेसची नवीन श्रेणी यांचे अनावरण करणार आहे. एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक बस लाइन-अप बळकट करणे हे भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर स्विच EiV 22 चे ओपन टॉप व्हेरिएंट देखील असेल. स्विचच्या जागतिक इलेक्ट्रिक बस अनुभवाचा उपयोग करून भारतात डिझाइन केलेली, विकसित आणि उत्पादित केलेली स्विच EiV 22 नवीनतम तंत्रज्ञान, अत्याधुनिक डिझाइन, सर्वोच्च सुरक्षितता आणि सर्वोत्तम आरामदायी वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

स्विच मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ” वेगाने वाढणाऱ्या दळणवळण क्षेत्रामध्ये परिवर्तन करण्यासाठी अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे शून्य कार्बन वाहतुकीचे सार्वत्रिकरण करण्यासाठी स्विच कटिबद्ध आहे. ग्राहक आणि भागीदारांशी जोडले जाण्यासाठी भविष्यकालीन तंत्रज्ञानाने युक्त उत्पादने सादर करण्यासाठी कंपन्यांकरिता ऑटो एक्स्पो हे एक आदर्श व्यासपीठ आहे. या उद्योगातील सर्वोत्कृष्ट नवकल्पना सादर करण्यासाठी, समजून घेण्यासाठी ४ वर्षांनंतर आपण एकत्र येत असल्याने स्विच सर्व-नवीन IeV मालिका आणि EiV मालिकेच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि प्रकार प्रदर्शित करणार असून अतुलनीय प्रवासी आराम आणि सुविधेसह सर्वोत्तम मूल्य प्रस्ताव देत आहे. ग्राहकांनी दिलेली सखोल माहिती आणि देशाच्या भविष्यातील दळणवळणाच्या गरजांवर आधारित ही उत्पादने तयार केली गेली आहेत.”

एप्रिल २०२१ मध्ये स्थापना झाल्यापासून स्विच मोबिलिटीने जगभरात ५५ दशलक्ष इलेक्ट्रिक किलोमीटर्सचा टप्पा पार करून लक्षणीय प्रगती केली आहे. हरित दळणवळणाद्वारे, सर्वांसाठी योग्य स्वच्छ, स्मार्ट प्रवास सुविधा पुरवत जीवन समृद्ध करणे या आपल्या ध्येयाच्या समर्थनार्थ महत्त्वाचे धोरणात्मक मैलाचे दगड  पार करत आहे.

सकल जैन संघातर्फे सोमवारी (९ जानेवारी) मूक मोर्चा

पुणे : झारखंड येथील गिरडोह जिल्ह्यातील श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थानास दिलेला पर्यटन स्थळाचा दर्जा रद्द करून ते ठिकाण तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी सकल जैन संघ पुणे च्या वतीने सोमवारी (९ जानेवारी) सकाळी ९ वाजता भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पुणे शहरातील शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू समाज कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे. यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील जैन समाज हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहे.

पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सकल जैन संघ, पुणेचे अध्यक्ष अचल जैन, उपाध्यक्ष विजय भंडारी, उपाध्यक्ष मिलिंद फडे, सचिव अनिल गेलडा, प्रसिद्धी प्रमुख सतिश शहा व योगेश पांडे यांनी ही माहिती दिली.

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासह अनेक राजकीय पक्ष आणि हिंदू, मुस्लिम, बौद्ध धर्मियांनी देखील श्री सम्मेद शिखरजी संबंधीच्या जैन धर्मियांच्या मागणीला पूर्ण समर्थन दिले आहे. त्यामुळे सोमवारी निघणाऱ्या भव्य मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने जैन समुदाय सहभागी होईल. तसेच, या मूक मोर्चामध्ये जास्तीत जास्त जैन समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

महाराष्ट्रासह देशातील मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, इंदोर, सुरत, बंगळुरु, कोल्हापूर याठिकाणी हजारोंच्या संख्येने जैन समाजाचा मोर्चा निघाला आहे. या विषयाकडे केंद्र व झारखंड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इतर शहरांमध्येही असेच मोर्चे निघणार आहेत.

श्री सम्मेद शिखरजी या पवित्र स्थळाविषयी जैन समाजाच्या भावना तीव्र आहेत. सरकारने याची त्वरित दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे. जैन धर्मियांच्या भावना तीव्र असण्याचे कारण म्हणजे जैन धर्माच्या २४ पैकी २० तीर्थंकरांची निर्वाणभूमी श्री सम्मेद शिखरजी येथे आहे. हिंदु धर्मियांसाठी जसे काशी तीर्थस्थान आहे तसेच, जैन धर्मियांसाठी श्री सम्मेद शिखरजी आहे. जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदातरी या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची इच्छा ठेवते आणि दर्शनासाठी जाते.  याठिकाणी दर्शन घेतल्याशिवाय मोक्ष मिळत नाही, अशी जैन धर्मियांची भावना आहे.

श्री सम्मेद शिखरजी येथील तीर्थस्थानाचा परिसर आदिवासीबहुल आहे. जंगल, डोंगर यांनी तो व्यापला आहे. हे स्थळ समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार फूट उंच आहे. येथे २० तीर्थंकरांच्या चरण पादुका आहेत. दर्शनासाठी येथे २७ किलोमीटरची परिक्रमा पायी करावी लागते.

“श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान असल्याने त्याला पर्यटनस्थळ म्हणून मिळालेली मान्यता योग्य नाही. त्याला जैन समाजाचा विरोध आहे. हे पवित्रस्थळ असून त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. देशामध्ये कोणत्याच धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थानाच्या ठिकाणी असा निर्णय झालेला नाही. त्यामुळे जैन धर्मियांच्या या पवित्र तीर्थस्थानासंबंधीही चुकीचा निर्णय होऊ नये. श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ म्हणून न राहता ते तीर्थक्षेत्रच राहिले पाहिजे, त्याचा तीर्थक्षेत्राचा दर्जा कायम राहावा, अशी सकल जैन समाजाची मागणी आहे.”

– अचल जैन (अध्यक्ष, सकल जैन संघ, पुणे)

“आज खऱ्या अर्थाने जैन वर्ग दु:खी झाला आहे. प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरून मगच निर्णय घ्यायला पाहिजे का? हा एक प्रश्न मोठा आहे. आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा विरोध केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत यासंदर्भात परिपत्रक काढले गेले नाही. जैन समाज हा नेहमी शांतीप्रिय असा समाज आहे. मक्का, मदिना, काशीसारखा आमचे तीर्थक्षेत्र आहे. हजारो वर्षांची परंपरा आहे. लोकांच्या भावना दुखवल्या जातील, असं कार्य आम्हाला सरकारकडून अपेक्षित नाही. हा फक्त विषय धर्माचा नाही. हा विषय आहे संस्काराचा, इतिहासाचा. या गोष्टी आस्थेवर अवलंबून आहेत. आमची सरकारला विनंती आहे की, आता आश्वासन नको तर परिपत्रक काढून निर्णय घ्यावा.”

– विजय भंडारी (उपाध्यक्ष, सकल जैन संघ, पुणे)

“जैन धर्मियांचे पवित्रस्थान म्हणून हे स्थान हजारो वर्षांपासून याठिकाणी आहे. मुघल व त्यानंतरची ब्रिटिश राजवट ते आतापर्यंत हे तीर्थस्थान टिकून राहिले आहे. झारखंड राज्याच्या निर्मितीपूर्वी हे स्थळ बिहारमध्ये होते. सध्या ते झारखंड राज्यात असून २०१८ मध्ये झारखंड सरकारने हे स्थळ पर्यटनस्थळ घोषित केले व तशी अधिसूचना काढली. त्यानंतर याला भारत सरकारच्या वन मंत्रालयाने इको सेंसिटिव्ह झोन सोबतच पर्यटनस्थळ म्हणून ५ ऑगस्ट २०१९ मध्ये मान्यता दिली.”

मिलिंद फडे (उपाध्यक्ष, सकल जैन संघ, पुणे)

“श्री सम्मेद शिखरजी हे पवित्रस्थान असून, पर्यटनस्थळ म्हणून याला आमचा विरोध आहे. झारखंड सरकारने काढलेले परिपत्रक आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आमच्या समाजात याबद्दल प्रचंड रोष आहे. आमची सरकारला ही विनंती आहे की, सरकारने पर्यटनस्थळाचा दर्जा रद्द करून पवित्रस्थळ राहण्याबाबतचे परिपत्रक काढावे. आमचा हा विषय आस्था आणि भावनेशी निगडित आहे. त्यामुळे हे स्थळ पुन्हा पवित्रस्थळ राहावे, ही जैन समाजाची एकमुखी मागणी आहे.”

– अनिल गेलडा (सचिव, सकल जैन संघ, पुणे)

“सरकार कोणाचेही असो जैन समाजाने सरकारला नेहमीच साथ दिली आहे. तीर्थस्थानाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन तेथील अस्मिता, पवित्रता बिघण्याचे काम होणार आहे. अनेक ठिकाणी आमचे साधू-महाराज आजही उपोषण करत आहेत. त्यामुळे हे पुन्हा पवित्रस्थळ राहावे, या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढणार असून, सरकारने लक्ष द्यावे आणि निर्णय रद्द करून परिपत्रक काढावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.”

– सतिश शहा (प्रसिद्धी प्रमुख, सकल जैन संघ, पुणे)

मातृमंदिरच्या नूतन इमारतीत अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ५ :नव्या शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर अभ्यासाचा विचार न करता ज्या-ज्या गोष्टीचा विकास होऊ शकतो त्याचा सर्वाधिक विकास करण्याचा विचार किंवा व्यक्तिमत्व फुलविण्याचा विचार केला असून मातृमंदिरच्या नूतन इमारतीत अशाप्रकारे अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण तयार केले आहे. उद्याची पिढी घडविण्यासाठी अशा शिक्षणाचा फायदा होईल आणि त्यातून देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

न्यू इंग्लिश स्कूल परिसरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुरलीधर लोहिया मातृमंदिर नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे क्रीडामंत्री गिरीष महाजन, संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तमदास लोहिया, डॉ.रवींद्र आचार्य, आशिष पुराणिक, कार्यवाह धनंजय कुलकर्णी , मुख्याध्यापिका माधुरी बर्वे आदी उपस्थित होते.

मोठा इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून श्री.फडणवीस म्हणाले, लोकमान्य टिळक, आगरकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या द्रष्ट्या महापुरुषांनी या संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था एका वटवृक्षाप्रमाणे विविध शाखांमध्ये बहरली असून ५० हजार विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे कार्य करते आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परंपरेला साजेसे मातृमंदिर सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता असलेल्या काळात स्थापन झालेल्या या संस्थेने देशात नवे शिक्षणाचे प्रयोग होत असताना आणि नवे धोरण अंमलात येते तेव्हा अग्रेसर राहून त्याचा अवलंब आपल्याकडे करावे हेच अपेक्षित होते आणि ते मातृमंदिरने केले असल्याचे सांगून श्री.फडणवीस यांनी शाळेचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना शाळा हवीशी वाटेल असे वायुमंडल अपेक्षित
कुठल्याही संस्थेचे मूल्यमापन हे सुंदर इमारतीच्या आधारे किंवा पायाभूत सुविधांच्या आधारे करता येत नाही, तर त्या शाळेची इमारत आपले बाहु उघडून प्रत्येक व्यक्तीला आपल्या कवेत घ्यायला तयार आहे का यावर होते. विद्यार्थ्यांना तिथे जाण्याची इच्छा होईल असे वातावरण शिक्षक करतात का, तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना भिती न वाटता तिथले वातावरण हवेहवेसे वाटेल असे वायुमंडल तिथे तयार होते काय या आधारावर शाळेचे मूल्यमापन होते. जुन्या काळात शिक्षणाची पद्धत कठोर होती.आज शिक्षणाची ओढ तयार व्हावी, विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल असे शिक्षण अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्तीतील गुणांची अभिव्यक्ती करता येईल असा विचार नव्या शैक्षणिक धोरणाने केला आहे.

मातृभाषेला ज्ञानभाषा करायची आहे
इंग्रजी जगात बोलली जाणारी मोठी भाषा असल्याने तिचा तिरस्कार करून चालणार नाही, मात्र मातृभाषेचा पुरस्कार करावा लागेल. जगात प्रगत राष्ट्रांच्या विकासात मातृभाषेचा वाटा आहे, त्यामुळे मातृभाषेचा विचार इंग्रजी शिक्षण घेताना करावाच लागेल. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतल्या शिक्षणाचा समावेश सर्व विषयात करण्यात आला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत घेता येणार आहे. आपली भाषा ज्ञानभाषा केल्याने आणि त्या भाषेत ज्ञान दिल्याने प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणानुरूप विकसीत होण्याची संधी मिळेल. ग्रामीण युवकांनाही स्वतःची प्रगती साधता येईल.

शिक्षणाच्या माध्यमातून आपण नवभारत घडवत आहोत. विद्यार्थ्यांना विजयाचा इतिहास शिकवायला हवा. आपली उज्ज्वल संस्कृती आणि परंपरेचा स्विकार करत आणि त्याचवेळी संविधानाने दिलेल्या मुल्यांची जोपासना करत आपल्याला पुढे जायचे आहे. संविधानाची मूल्ये रुजवली आणि आपल्या संस्कृतीतील चांगल्या बाबी शिक्षणात आणल्यास भारत विश्वगुरू पदापर्यंत पेाहोचेल. असा पाया भरण्याचे कार्य मातृमंदिर संस्थेने केले असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.

यावेळी श्री.लोहिया यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. संस्थेची वाटचाल नव्या युगाला साजेशी असल्याचे ते म्हणाले.

संस्थेचे विश्वस्त कदम यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. शाळेच्यावतीने राष्ट्रीय शिक्षण आणि अनुभवावर आधारित शिक्षण पद्धतीवर भर दिला जातो असे त्यांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणाला अनुकूल नूतन इमारत असल्याचे ते म्हणाले.

नूतन इमारत उभी करण्यात योगदान देणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. ५: जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम आदींसह खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची डिसेंबर २०२२ अखेरची सांख्यिकी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर ३० जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहितीचा नमुना ईआर-१ प्रत्येक तिमाहीस सादर करणे आवश्यक आहे. डिसेंबर २०२२ अखेर संपणाऱ्या तिमाहीचा नमुना ईआर-१ संकलनाचे काम सुरू आहे. त्याला सर्व आस्थापनांनी प्रतिसाद देत माहिती भरावी यासाठी आस्थापनांना यापूर्वी दिलेल्या युझर नेम व पासवर्डचा वापर करून प्रत्येकाने www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे आणि आपली अचूक माहिती ऑनलाईन पद्धतीने मुदतीत सादर करावी.

प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावा. यासंबंधी माहिती अथवा मदत आवश्यक असल्यास punerojgar@gmail.com किंवा asstdiremp.pune@ese.maharashtra.gov.in या ईमे

छत्रपती संभाजी महाराज नसते तर हिंदू उरले नसते!:त्यांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोहच, जाणते राजे फक्त शिवाजी महाराज – देवेंद्र फडणवीस

पुणे – छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होतेच मात्र, ते धर्मवीर ही होते.देव देश आणि धर्मासाठी ते आयुष्यभर झगडले असून संभाजी महाराज नसते तर राज्यात हिंदू उरले नसते. त्यामुळे त्यांना धर्मवीर म्हणणेच योग्य आहे. त्यांना धर्मवीर न म्हणणे हा एक प्रकारचा द्रोह आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे देशात एकच ‘जाणते राजे ‘ असून इतर कोणाला ‘जाणता राजे ‘ म्हणायचे असेल तर म्हणू दे मात्र, जनता त्यांना ‘जाणता राजे ‘ म्हणत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया मातृ मंदिर या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ फडणवीस यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम ,मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तमदास लोहिया, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे ,उपाध्यक्ष महेश आठवले ,कार्यवाहक धनंजय कुलकर्णी ,मुख्याध्यापिका माधुरी बर्वे उपस्थित होते.खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्या महिलांच्या संदर्भात राज्यात गलिच्छ राजकारण सुरू असून याबाबत राजकारण थांबवले गेले पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या पक्षापासून केली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यांचे मत त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रथम ऐकले पाहिजे.कारण खालच्या दर्जाची महिलांबाबतची टीका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करताना सोशल मीडियात दिसून येतात. त्यामुळे पक्षातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे म्हणणं ऐकले पाहिजे असा टोला त्यांनी यावेळी लागवला.

पुण्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

पुणे, दि. ५: नोकरीइच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने यापुढे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पहिला प्लेसमेंट ड्राईव्ह येत्या ११ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करुन, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. याचाच एक पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याप्रसंगी विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची तात्काळ नोकरभरती आवश्यक आहे अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या कार्यालयात उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्याकरिता पाचारण करण्यात येणार आहे. या मुलाखतींना प्रत्यक्ष हजर राहून पात्र होतील अशा उमेदवारांना लगेच जागेवरच नोकरीची संधी मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी नसल्यास प्रथम आपली नांवनोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.

उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्ड मधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘1स्ट प्लेसमेंट ड्राइव्ह- पुणे’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी. उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार ११ जानेवारी रोजी समक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-११ येथे आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ

पुणे, दि. ५ : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रिपेटरी मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी ८ विभागांच्या क्रीडा ज्योतीचे समायोजन करून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजित सिंग देओल आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झेंडी दाखवून क्रीडाज्योत रॅलीची सुरुवात करण्यात आली.

यावेळी क्रीडा व युवक सेवा संचालनालयचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, उपाध्यक्ष संजय शेठे, सहसचिव प्रशांत देशपांडे, क्रीडाज्योतीचे मुख्य समन्वयक अमित गायकवाड, समन्वयक उदय पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी, छत्रपती शिवाजी महाराज प्रिपेटरी मिलिटरी स्कूलचे शिक्षक, क्रीडा शिक्षक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज प्रिपेटरी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कवायत आणि योगासन प्रात्यक्षिक सादर केले. नूतन मराठी विद्यालय, रेणुका स्वरूप, अहिल्या देवी हायस्कूल, विमलताई गरवारे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात क्रीडाज्योत रॅलीचे स्वागत केले. या उपक्रमात मार्गावरील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रीडा मंडळे, खेळाडू सहभागी झाले.

क्रीडाज्योत लाल महाल-कसबा गणपती-दगडूशेठ गणपती-समाधान चौक-तुळशीबाग चौक-शगुन चौक-भानु विलास टॉकिज चौक- अल्का टॉकीज छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून गाडीने फर्ग्यूसन मार्गे पुणे विद्यापीठ चौक-बाणेर फाटा या मार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे पोहोचली.

आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी सावंतने रॅलीचे नेतृत्व केले. त्यांच्या सोबत खेलरत्न पुरस्कारार्थी पद्मश्री शीतल महाजन, ध्यानचंद पुरस्कारार्थी, तसेच अनेक राष्ट्रीय खेळाडू या रॅलीत सहभागी झाले.

महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही:चित्रा वाघ यांचा इशारा अन् सवालही, उर्फीसारखा महिला आयोगही बेफाम झालाय का?

मुंबई- मराठी अभिनेत्री,महाराष्ट्राची लेक तेजस्विनी पंडितला अनुराधा वेब सीरिअल मधील पोस्टर मधील अंग प्रदर्शनामुळे महिला आयोगाने नोटीस काढली,पण उर्फिच्या बाबत मात्र दखल घ्यायला वेळ नाही, तिला गोंजारायचे काम चालू आहे , महिला आयोगाने महिलांचा सन्मान जपायला हवा परंतु महिला आयोग सुमोटोही दाखल केली नाही. महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला.

चित्रा वाघ म्हणाल्या, अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी ओंगळवाणे प्रदर्शन केल्याचा व्हिडीओ एका महिलेने मला दाखवला. दीड वर्षांपुर्वी या महिलेची मुलगी घाणेरड्या विकृतीला बळी पडली असे तिने मला सांगितले व या विकृतीला कुणी जाब विचारणार की नाही असे म्हटले. त्यानंतर आम्ही हीच भुमिका घेतली. आता आम्ही हा नंगानाच चालू देणार नाही.चित्रा वाघ म्हणाल्या, विरोध धर्माला नाही परंतु, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात नंगानाच सुूरु आहे त्या विकृतीला विरोध आहे. उर्फीला विरोध नाही तर तिच्या नंगा नाचला विरोध आहे. कुणी काय कपडे घालावे आणि कुणी घालू नये. यावर काय बोलावे. आधी कपडे तर घाला मग ठरवा.चित्रा वाघ म्हणाल्या, समाजाचे स्वास्थ महत्वाचे आहे. तिथे राजकारण करायची गरज नाही. पण तसे राज्यात झाले नाही. राज्यात सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच सुरू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? याचे उत्तर उर्फीला समर्थन करणाऱ्यांनी द्यावे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार झालाय. असला नंगा नाच चालू देणार नाही.चित्रा वाघ म्हणाल्या, ही भुमिका घेतल्यानंतर उड्या पडणे साहाजिकच होते. अधिकारपदावर बसलेल्या महिला काय म्हणतात ते मी सांगते. कुणी काय कपडे घालायचे हा ज्याचा त्याचा अधिकार महिला आयोग याबाबतीत वेळ वाया घालणार नाही. महिलांचा सन्मान जपणे, सन्मान राखणे हे काम परंतु, महिलांची इभ्रत, इज्जत,उघड्या फिरणाऱ्या महिलांना जाब विचारावा वाटत नाही. महिला आयोगाने सुमोटात दखल का घेतली नाही. कारवाई का केली नाही. हेअरिंग घेणे ते कामच महिला आयोगाचे आहे.चित्रा वाघ म्हणाल्या, अश्लील गोष्टी आणि कृतीवर महिला आयोग दखल घेत नसेल तर महिला आयोगावर बसण्याचा कुणाला अधिकार नाही. उर्फीसोबत महिला आयोगही बेफाम झालाय का? स्वैराचाराला लगाम घालणे ही नैतिक जबाबदारी पण महिला आयोग ती विसरत आहे का, समाजात चुकीचे घडत असेल तर त्याला वाईटपणा घ्यावा लागतो व मी ते करीत आहे.चित्रा वाघ म्हणाल्या, पोस्टरमुळे अंगप्रदर्शन होते व त्यामुळे समाजमनावर परिणाम होतो हे महिला आयोग एकीकडे सांगते. एका पोस्टरची दखल घेणारा महिला आयोग मुंबईच्या रस्त्यावर चालणाऱ्या नंगा नाचाबाबत महिला आयोग दखल का घेत नाही. हेच सांगायला मी आलेय.चित्रा वाघ म्हणाल्या, कुठल्या महिलांना पीडीतांना न्याय द्यायचाय तर केंद्राकडे दाद मागा मी म्हणते का? महिला आयोगाने हात टेकले काय तुमच्या पक्षाने महिला आयोगावर तुम्हाला बसवले याची स्पष्टता द्या. अ‌ॅडव्हायझर चुकीचे सल्ले देत असल्यानेच महिला आयोग तोंडावर आपटत आहे. महिला आयोगाचे पद संविधानिक आहे ती व्यक्ती नाही. ती ऑथोरिटी आहे व ती तोंडावर पडत नसेल तर राज्यासाठी योग्य नाही.चित्रा वाघ म्हणाल्या, धर्माला व उर्फीला विरोध नाही. नंगा नाचला विरोध आहे. हा राज्यात चालू देणार नाही. धर्माबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून आरोप होत आहेत. चोवीस तास हिंदु मुस्लिम वाद राष्ट्रवादी काॅंग्रेस करतो. धर्माचा, उर्फीचा नाही विषय नंगटपणाचा आहे.

१८ वे जागतिक मराठी संमेलन:६ जानेवारी रोजी उद्घाटन – पूर्वतयारी पूर्ण

पुणे –जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६,७, व ८ जानेवारी या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’ २०२३ या १८ वे जागतिक मराठी संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्त डी. वाय.पाटील विद्यापीठ प्रेक्षागृहाचे सर्व आवार सजविण्यात आले आहे. प्रवेशद्वाराची भव्य कमान, सुंदर रांगोळी व फुलांची आरास याबरोबरच मुख्य इमारतीपर्यंत सेल्फी-पॉईंट्स, स्वागताचे बोर्ड्स व झालर उभारण्यात आली असून सनई, वाजंत्री अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पिंपरीमध्ये कार्यक्रम स्थळाकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत. देशातील व परदेशातील सर्व पाहुण्यांचे कुमकुम तिलक लावून व ओवाळून स्वागत केले जाणार आहे. देशातील व परदेशातील बहुसंख्य निमंत्रित पाहुणे पुण्यात पोहोचले असून परदेशी  पाहुण्यांची व्यवस्था हेल्टन हॉटेल येथे आणि देशातील पाहुण्यांची व्यवस्था फन हॉटेल येथे करण्यात आली आहे. याशिवाय डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या हॉस्टेल्समध्येही निवासासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या स्टेजवर आकर्षक इलेक्ट्रॉनिक बोर्डने बॅकड्रोप सजविण्यात आला आहे. तसेच जेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, मिडिया रूम आदि व्यवस्था पूर्ण झाली आहे.  सर्व भागात उत्तम सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी दिली.

या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण कोरिया, नेदरलँड, मॉरिशस, न्यूझीलंड, या देशांमधील मराठी मान्यवर सहभागी झाले आहेत.

या संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज शुक्रवार दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ.प्रमोद चौधरी यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार २०२३’ आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट, वसई- ‘जागतिक मराठी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी भाई जयंत पाटील, हितेंद्र ठाकूर, नागराज मंजुळे, अभिनेते सयाजी शिंदे, उद्योगपती अरुण फिरोदिया, हणमंतराव गायकवाड आणि परदेशातील व महाराष्ट्रातील निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

उद्घाटन सोहळ्यापूर्वी दिनांक ६ जानेवारी रोजी दुपारी २:०० वाजता ‘समुद्रापलीकडे’– भाग-१ हा परदेशस्थ मान्यवरांशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला हैद्राबाद (तेलंगणा राज्य) पोलीस आयुक्त महेश भागवत यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये मनोज शिंदे (अमेरिका), आर्या तावरे (ब्रिटन), भरत गीते (जर्मनी), राजेश बाहेती (दुबई), रोहिदास आरोटे (दक्षिण कोरिया), वृंदा ठाकूर (नेदरलँड्स), विद्या जोशी (अमेरिका), ब्रायन परेरा (ऑस्ट्रेलिया) आदी मान्यवर सहभागी होणार असून त्यांच्याशी सचिन इटकर संवाद साधतील.

याच दिवशी दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी ३:३० वाजता प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व उद्योगपती डॉ.प्रमोद चौधरी यांची मुलाखत होणार असून त्यांच्याशी प्रा.मिलिंद जोशी संवाद साधतील. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सायं. ६:३० वाजता ‘कलावंतांच्या सामाजिक जाणिवा’ या कार्यक्रमात दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे, अभिनेते आकाश ठोसर आणि अभिनेते सयाजी शिंदे सहभागी होणार आहेत.

 या जागतिक मराठी संमेलनासाठी प्रवेशिका आवश्यक असून या प्रवेशिका डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे या कार्यक्रम स्थळी उपलब्ध असतील.

मुंबईला विशेष पोलीस आयुक्त नेमून समांतर प्रशासन चालवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न !: अतुल लोंढे

राजकीय महत्वाकांक्षेपोटी प्रशासकीय यंत्रणेचे वाट्टोळे करु नका.

मुंबई
मुंबई पोलीस दलात आयुक्त हेच सर्वोच्च पद असताना विशेष पोलीस आयुक्त नेमून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वतःची वेगळी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी शिस्तीचा प्रशासकीय विभाग असलेल्या पोलीस दलात मोडतोड करून विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणे चुकीचे आहे, अशी विशेष नेमणुक करून देवेंद्र फडणवीस हे स्वतःची समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवणे रुचले नाही. सत्ता स्थापन होताच त्यांनी लगेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा दर्जा बरोबर करण्यासाठी दोन वेगळ्या वॉर रुम काढल्या. आता शिस्तीचे खाते असलेल्या पोलिस विभागाचे एक प्रकारे विभाजन करण्याचे काम सुरु केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त बदलता येत नाहीत किंवा काही अडचणी असतील म्हणून विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करून देवेन भारती यांची त्यावर नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीमुळे पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांचा तर विशेष पोलीस आयुक्त उपमुख्यमंत्र्यांचा असा संदेश गेला आहे. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी प्रशासनाची अशी मोडतोड केली आहे. असेच असेल तर आता प्रत्येक जिल्ह्यालाही विशेष जिल्हाधिकारी, विशेष जिल्हा पोलीस अधिक्षक, विशेष तहसिलदार, विशेष नायब तहसिलदार अशी वरपासून खालीपर्यंत विशेष पदांची निर्मिती करून दोन सत्ता केंद्रे तयार करा, एक शिंदे गट आणि दुसरे भाजपाला असे वाटून घ्या व प्रशासकीय यंत्रणेचा बट्टयाबोळ करा खोचक सल्ला लोंढे यांनी दिला.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रशासकीय स्तरावर कोणतेही काम होत नसून हे स्थगिती सरकार झाले आहे. समांतर यंत्रणा उभी करून महाराष्ट्राचा बट्याबोळ करण्याचे काम केले जात आहे. हे आम्हाला मान्य नाही व योग्यही नाही, असेही लोंढे म्हणाले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ

पुणे, दि. ४: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा किल्ले रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शुभारंभ करण्यात आला. पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी ज्योत प्रज्वलित केल्यानंतर ऑलम्पियन खेळाडू श्री अजित लाकरा यांना सोपवून रॅलीस सुरुवात करण्यात आली.

यावेळी महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद महाड, शिवछत्रपती पुरस्कारार्थी संजय कडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा गायकवाड, राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू सिद्धेश शिर्के मुख्य समन्वयक अमित गायकवाड, समन्वयक उदय पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रागंणात गुरुवार ५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्यातील आठही जिल्ह्यातून आलेल्या क्रीडाज्योती पुण्यातील एसएसपीएमएस येथे रायगड येथील मुख्य ज्योतीत विलीन करण्यात येणार आहेत. ही क्रीडाज्योत लाल महाल-कसबा गणपती-दगडूशेठ गणपती-समाधान चौक-तुळशीबाग चौक-शगुन चौक-भानु विलास टॉकिज चौक- अल्का टॉकीज छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून गाडीने फर्ग्यूसन मार्गे पुणे विद्यापीठ चौक-बाणेर फाटा या मार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे दुपारी १ वाजता पोहोचणार आहे.

या रॅलीत खेलरत्न पुरस्कारार्थी अंजली भागवत, पदमश्री पुरस्कारार्थी शितल महाजन, ध्यानचंद पुरस्कारार्थी स्मिता यादव (शिरोळे), ऑलिम्पियन खेळाडू मारुती आडकर, धनराज पिल्ले, अजित लाकरा, विक्रम पिल्ले बाळकृष्ण आकोटकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वपनिल कुसाळे, रुतुजा भोसले, श्रद्धा तळेकर, अर्जून पुरस्कारार्थी निखील कानिटकर, शंकुतला खटावकर, शांताराम जाधव, रेखा भिडे, गोपाळ देवांग, मनोज पिंगळे, काका पवार, राहूल आवारे, नंदन बाळ, संदीप किर्तने, नंदू नाटेकर, सुयश जाधव व मुरलीकांत पेटकर सहभागी होणार आहेत.