Home Blog Page 1467

नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

0

नवी दिल्‍ली, 13 जानेवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी (PMNRF) मधून मदत देखील जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

“नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात जीवितहानी झाल्याबद्दल दु:ख झाले. शोकाकूल कुटुंबीयांप्रति संवेदना. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात.  मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून(PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल तर जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल : पंतप्रधान मोदी”

डोंबिवलीत भव्य राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन सुरु

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठ्या डोंबिवली रोझ फेस्टिवलचे उदघाटन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीत झाले. राज्यातील विविध भागातून आलेल्या गुलाब पुष्प स्पर्धेत वांगणीच्या आशिष मोरे यांच्या मोरे नर्सरीच्या गुलाबांनी गुलाबांचा राजा व गुलाबांची राणी हे दोन्ही पुरस्कार पटकविले. नामदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या डोंबिवलीकर रोझ फेस्टिवलचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. पुणे रोझ फेडरेशनच्या फुलांना राजकुमार तर वांगणीच्या चंद्रकांत मोरे नर्सरीला राजकुमारीचा पुरस्कार मिळाला. गुलाब पुष्प स्पर्धेचे परीक्षण डॉ विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रविंद्र भिडे यांनी केले.

रोजच्या धकाधकीच्या जीवनाने त्रस्त झालेल्या समस्त डोंबिवलीकरांसाठी नवीन वर्षाची गोड सुरुवात व्हावी म्हणून गेली डोंबिवली रोझ फेस्टिवल आयोजित करण्यात येत असून १३,१४,१५ जानेवारी रामनगर येथील बालभवन रसिक गुलाबप्रेमींसाठी विनामूल्य असतो. या वर्षी सुमारे हजारावर गुलाब पुष्पे प्रदर्शनात मांडली असून शेकडो रंग, सुवासाची फुले पाहायला मिळतील. त्याच बरोबर दुरंगी, रेघांची, मिनिएचर स्वरूपातील गुलाब पाहण्यासाठी लोकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. सांगलीच्या पटवर्धन यांची अनेक देशांनी प्रसिद्ध केलेली गुलाब चित्र टपालतिकिटे प्रदर्शनात मांडलेली पाहायला मिळतील अशी माहिती नामदार रविंद्र चव्हाण यांनी दिली. इंडियन रोझ फेडरेशन ह्या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये निमंत्रित करण्यात आले असून मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नाशिक येथून प्रदर्शक सहभागी झाले आहेत.

डोंबिवली रोझ फेस्टिवलशी पहिल्या वर्षांपासून निगडित असलेल्या म्हसकर या डॉक्टर दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. कल्याणच्या सुप्रसिद्ध डॉ विकास म्हसकर व डॉ मेघना म्हसकर यांनी सरळगावच्या बागेत गेली तीन चार दशके हजारो गुलाब पुष्पे जोपासली आहेत त्याबद्दल गुलाबाच्या एका नवीन संकरित जातील “मेघना” हे नाव मध्य प्रदेशात झालेल्या रोझ शो मध्ये देण्यात आले. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये डॉ मेघना यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. डोंबिवली रोझ फेस्टिवल रविवार १५ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे.

नाशिक-शिर्डी महामार्गावर बस अपघातात १० ठार

शिर्डीला जायला निघालेल्या भाविकांच्या बसला सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण मृत्युमुखी पडले असून यात मोरीवली गावातील बहुतांशी रहिवाशांचा समावेश आहे. त्यामुळे मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.

अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी काल रात्री 15 बस करून शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातील एका बसचा पहाटेच्या सुमारास नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. यात मृत्युमुखी पडलेले बहुतांशी भाविक हे अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी आहेत. या अपघाताचं वृत्त समजताच मोरीवली गावातील रहिवासी अपघाताच्या ठिकाणी रवाना झाले. मोरीवली गावाच्या इतिहासातील इतकी भीषण अपघाताची ही पहिलीच घटना असून एकाच वेळी गावातील तब्बल 10 जणांवर काळाने घाला घातल्यामुळे मोरीवली गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे. अंबरनाथहून नाशिकला निघालेल्या भाविकांच्या बसला आज पहाटे भीषण अपघात झाला होता. या अपघातात अंबरनाथच्या मोरीवली गावातील 10 जणांवर काळाने घाला घातल्याची माहिती मिळताच अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार आहेत

शिर्डीला जाताना झालेल्या बस अपघातातील जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जात असून आम्ही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे. किणीकर यांनी या अपघातानंतर मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्याचबरोबर अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सरकार करतंय लुट :आदित्य ठाकरे

मुंबई -महापालिकेत 400 किमी रस्त्यांसाठी सुमारे ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या घोटाळ्याला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कारणीभूत धरलं असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी इतरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत अंतर्गत ४०० किमी रस्त्यांच्या काँकेटीकरणासाठी तीन वर्षात ६,००० कोटींची कंत्राट काढणं अपेक्षित होती ती एका वर्षासाठी काढण्यात आली. पण या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर ही टेंडर रद्द करण्यात आली.खोके सरकारकडून मुंबईला एटीएमसारखं वापरलं जात आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

महापालिकेची लूट या सरकारकडून केली जात आहे. या सरकारने काढलेल्या रस्त्याच्या टेंडला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हे टेंडर रद्द करावं लागलं. त्यानंतर आता नवं टेंडर काढण्यात आलंय. 400 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 6080 कोटी रूपयांचं हे टेंडर काढण्यात आलंय. या टेंडमधून कंत्राटदारांना 48 टक्के फायदा करून देण्यात आलाय. त्यामुळेच मुंबईतील सिमेंट-कॉंक्रिटच्या रस्ते कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. “मुंबईतील कामं करण्याचा कालावधी हा 1 ऑक्टोबर ते 31 मे असा असतो. कारण उर्वरित काळात पाऊस असतो. पावसाळ्यानंतर सुरू झालेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण होतात. परंतु, आता हाती घेतलेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण होतील का याचा यांनी अभ्यास केला नाही. हे सर्व होत असताना कंत्राटदारांना 48 टक्के फायदा करून देण्यात आला. मुख्यमंत्र्यांना मुंबईतील कामे कशी करतात हेच माहिती नाही. महापालिकेत कोणतीही बॉडी आणि महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाने ही कामे मंजूर कशी केली? हा खूप मोठा प्रश्न आहे. टेंडरचा हा पैसा मुंबईकरांच्या खिशातील आहे. कामाची समज नसतानाही टेंडर काढण्यात आलं. मुंबईतील टेंडर हे इतर राज्यांतील टेंडरपेक्षा वेगळं असतं. मुंबईत सिमेंटचे रस्ते केले जात आहेत. मग गेल्या सात वर्षांपासून आताचे मुख्यमंत्री हे मंत्री होते, त्यावेळी त्यांनी ठाण्यातील रस्ते सिमेंटचे का केले नाहीत, असा प्रश्न यावेळी आदित्य यांनी उपस्थित केला आहेदरम्यान, राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून मोघलाई आल्यासारखं वाटत असल्याची टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केलीय. “गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात मोघलाई आली आहे असं वाटतं.  गणपती मिरवणुकीत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांकडून फायरिंग करण्यात आली. आमदाराच्याच बंदुकीतून गोळी चालवण्यात आली होती. तरी देखील आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळसारखे अनेक प्रकार राज्यात झाले आहेत. परंतु, कोणावरच कारवाई झालेली नाही. गेल्या सहा महिन्यात आम्ही सतत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करत आहे. परंतु, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके असे सध्या राज्यात सुरू आहे. याबरोबरच अनेकवेळा महापुरूषांचा अपमान दरून देखील राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा प्रकारांच्या मागून मुंबईला लुटण्याचा प्रकार केला जात आहे. नागपूरच्या एनआयटी घोटाळ्बयाद्दल देखील आम्ही बोललो पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. 

पुण्याचं नाव जिजाऊनगर करावं, मिटकरींची मागणी तर दवेंचा विरोध, नामांतरावरुन वादाला सुरुवात

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमानंतर पुणे शहराचं नामकरण जिजाऊनगर करावे, अशी मागणी केली आहे. “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार” असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी यांच्या मागणीवर पुण्यातील हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. “पुणे शहराचं नाव बदलून राजमाता जिजाऊनगरी, जिजाऊनगर करावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. खरंतर प्रात: स्मरणीय जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना वंदनीय आहेत. परंतु, जिजाऊमाता यांचं नाव पुण्याला नाव देणं उचित होणार नाही. लाल महालात राजमाता जिजाऊंचं सर्वात मोठं स्मारक उभारावं, अशी आमची जुनी मागणी आहे. ती का पूर्ण होत नाही, असा सवाल आनंद दवे यांनी विचारला आहे.

यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

यशस्वी खेळाडूंना स्वत:कडून प्रत्येकी एक हजाराचे क्रीडा साहित्य देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा

पुणे दि.१४: पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवातील पदक विजेत्यांना आपल्यावतीने प्रत्येकी एक हजार रुपयांचे क्रीडा साहित्य देण्यात येईल आणि प्रथम क्रमांक मिळविणारा खेळाडू वर्षभरात कुठेही खेळण्यासाठी गेल्यास त्याला रेल्वे किंवा विमानाचे तिकीटही काढून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे – बालेवाडी येथे आयोजित या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, राज्याचे क्रीडा व युवक सेवा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या शोभा खंदारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, देश बुद्धीमत्ता आणि आर्थिक क्षेत्रात पुढे जात असताना क्रीडा क्षेत्रात आपण मागे आहोत. इतर देशात शालेयस्तरावर खेळांना चांगले प्रोत्साहन देण्यात येत असल्याने ते देश आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी होतात. हे लक्षात घेऊनच देशपातळीवर खेळांना प्रोत्साहन देण्यात येत असून राज्यातही शालेय स्तरावर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक विजेत्यांना वर्ग एक अधिकारी म्हणून थेट नियुक्ती देण्यात येत आहे. खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून बघावे यासाठी त्यांना आवश्यक सुविधा व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा आणि खेलो इंडियाचेही आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा स्पर्धांसाठी निवड झाल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करून श्री.प्रसाद म्हणाले, खिलाडूवृत्तीने सर्वांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे. या स्पर्धांमधून पुढे विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धा व नंतर देशपातळीवरील खेलो इंडिया स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षणाधिकारी श्रीमती गायकवाड म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या केंद्र, बीट आणि तालुका स्तरावर स्पर्धा होऊन जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. यामध्ये सुमारे १८ स्पर्धा घटक असून तालुक्यांचे संघ आणि वैयक्तिक स्तरावरील स्पर्धक मिळून ३ हजार ५११ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून मुलांच्या सर्व कलागुणांना वाव मिळतो असेही त्या म्हणाल्या.

यावेळी खेळाडू विद्यार्थ्यांसमवेत श्री.पाटील यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू उमेश थोपटे यांनी खेळाडूंना क्रीडा प्रतिज्ञा दिली.
000

महाबळेश्वर गोठले:वेण्णालेक परिसरात पारा 5 अंशापर्यंत खाली

महाबळेश्वर-वेण्णालेक परिसरात 5 अंश, तर संपूर्ण महाबळेश्वर शहरातील सरासरी तापमान 7 अंशांवर आले आहे. गेल्या दोन वर्षांतील नीच्चांकी तापामानाची नोंद इथे झाली आहे.सातारा जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तर थंडीची लहर पाहायला मिळत आहे. वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातील तापमान घसरल्याने या भागात दवबिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Pune Tmin on Friday morning …

वेण्णालेकच्या लोखंडी जेटी, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील वाहनांच्या टपांवर, स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये फुलांवर, तसेच स्मृतिवन परिसरात पाहावे तिकडे हिमकणांचा सडा पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीने जिल्ह्याला हुडहुडी भरली असून कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी लोक शेकोट्या पेटवून ऊब घेत आहेत.

कडाक्याच्या थंडीने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. महाबळेश्वरसह वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरातील पारा कमालीचा घसरल्याने ढाबे, रेस्टॉरंटच्या बाहेर शेकोट्या पेटविल्या जात आहेत. पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना पाहावयास मिळत आहेत. मुख्य बाजारपेठेत ऊबदार कपडे खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

सातारा शहराचा पारा देखील घसरला असून मंगळवार, बुधवारी साताऱ्यातील पारा 10 अंशांवर आला. दोन वर्षातील हे नीच्चांकी तापमान ठरले. थंडीची तीव्रता वाढल्याने जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. शहरांमधील बाजारपेठेवर थंडीचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. साडेआठलाच बाजारपेठा बंद होत आहेत.

नदी काठावरच्या गावांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून लोक ऊब घेत आहेत. पहाटेच्या सुमारास शेत शिवार धुक्यात हरवून जात आहेत. जिल्ह्यात सध्या थंडीची लाट पाहायला मिळत आहे. ऊसतोड कामगार आणि सकाळी कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाला थंडीचा सामना करावा लागत आहे.

‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप’ हा आत्मनिर्भर भारतातील महत्त्वाचा उपक्रम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ :- रस्ते हे विकासाचा मार्ग असतात, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप’ हा आत्मनिर्भर भारत उपक्रमातील महत्त्वाचा भाग ठरेल, म्हणूनच या स्पर्धा महाराष्ट्रातही व्हाव्यात, असे निमंत्रणही आज येथे दिले.

भारतात पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप या ई व्हेईकल्स च्या कार रेसमधील कारचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, तसेच तेलंगणाचे नगर विकास मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते येथे अनावरण करण्यात आले. यासाठी गेटवे ऑफ इंडियांच्या प्रांगणात शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार अनावरण सोहळ्यास तेलंगणाच्या नगर विकास विभागाचे सचिव अरविंद कुमार, तसेच ग्रीनको समूहाचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चलमाशेट्टी आदी उपस्थित होते. तेलंगणामधील हैद्राबाद येथे ११ फेब्रुवारीला ही ‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप कार रेस’ पार पडणार आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या ‘ई-व्हेईकल्स वर्ल्ड चॅम्पियनशिप’ या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, देशात होणाऱ्या पहिल्या अशा उपक्रमाची सुरुवात मुंबईतून होत आहे, याचे समाधान आहे. मुंबई ही देशाची शान आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात हा सोहळा होतो आहे, यालाही वेगळे स्थान आहे. नुकतीच जी-२० ची आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची बैठक इथे झाली. त्यांना परिसर खूप आवडला होता. अशी ही फार्म्युला- रेस महाराष्ट्रातही व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी इथे रस्त्यांचे उत्तम जाळे आहे. नुकतेच आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खुला केला आहे. हा महामार्ग या रेससाठी उत्तम ठरेल. त्यामुळे यात सहभागी होणारेही खुश होतील, असे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धा आयोजकांना आपल्या भाषणात दिले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांच्या रस्ते विकास आणि पायाभूतसुविधा क्षेत्रातील कामांची प्रशंसाही केली. त्यांच्यामुळेच मुंबईत ५५ उड्डाण पुल उभे राहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. इथे उद्योगांसाठी अनेक पोषक घटक उपलब्ध आहेत. मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि एक खिडकी योजना सारख्या सवलती आहेत. महाराष्ट्रात अनेक रस्ते प्रकल्पांचे काम सुरु आहे. आम्ही वेगाने या महाराष्ट्राने प्रगतीपथावर नेत आहोत. यात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांसह केंद्रातील अनेक मंत्र्यांचे सहकार्य मिळत आहे. या सहकार्यातूनच आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचे आहे. फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, आपल्याला ई-व्हेईकल्सच्या वापरावर भर द्यायचा आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. याशिवाय ईथेनॉलसारख्या ग्रीन फ्युईलच्या वापरालाही प्रोत्साहन द्यायचे आहे. यातून आपल्या इंधनाची आयात कमी करायची आहे. पुढे जाऊन फाईव्ह ट्रीलीयन ईकॉनॉमीचे उद्दिष्टही गाठायचे आहे. यात आपला ॲटोमोबाईल इंडस्ट्रीजचा सर्वात मोठा वाटा असेल. कारण आज हेच क्षेत्र सर्वाधिक जीएसटी भरते. हेच क्षेत्र सर्वाधिक रोजगार निर्मिती करते. आपल्याला अधिकाधिक ई-व्हेईकल्स, कार-ट्रक्सची निर्मिती करायची आहे. आपल्याकडे सौर ऊर्जा मुबलक आहे. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही याच साऱ्या गोष्टींवर भर असतो. म्हणूनच येत्या काळात आपल्याला ई-व्हेईकल्सचा वापर आणि त्यांच्या निर्मितीवर भर द्यायचा आहे. आपल्या आत्मनिर्भर भारताच्या उद्दीष्टांपैकी एक असे हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून आपण ही स्पर्धा आयोजित करत आहोत.

सुरुवातीला या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पिनयनशिप विषयीही माहिती सादर करण्यात आली.

महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे लास्ट- माइल डिलीव्हरीजसाठी महिला ई- बाइक रायडर्सची नियुक्ती

मुंबई– महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) ही भारतातील सर्वसमावेशक लॉजिस्टिक्स आणि वाहतूक सेवा पुरवणारीकर्मचारी वर्गाच्या बाबतीत डीईआयवर (Diversity, Equity, and Inclusion) तत्वांनुसार काम करणारी कंपनी आहे. एमएलएलने आज आपल्या लास्ट- माइल डिलीव्हरीजसाठी महिला ई- बाइक रायडर्सशी करार केला असून त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने समानता साध्य करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करतसर्व प्रकारच्या कामांमध्ये त्यांचा समावेश करत लॉजिस्टिक्स क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. महिलांना समान संधी उपलब्ध करून देत लॉजिस्टिक क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचे कंपनीने ठरवले असून त्यासाठी लॉजिस्टिक क्षेत्रातील अपारंपरिक कामांतही त्यांना सहभागी करून घेत स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत केली जाणार आहे.

हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंपनीने उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईबेंगळुरू आणि नागपूर येथील लास्ट माइल डिलीव्हरी क्षेत्रात ११ महिला रायडर्सची नियुक्ती केली आहे. ही प्रक्रिया आणखी कार्यक्षम बनवत उपक्रमाच्या दमदार अमलबजावणीसाठी महिंद्रा लॉजिस्टिक विशेषत्वाने प्रयत्न करत आहे. त्याशिवाय कंपनी महिला उमेदवारांना ई-  बाइक सुरक्षितपणे चालवण्यासाठीलास्ट माइल डिलीव्हरी हाताळण्यासाठी तसेच सॉफ्ट स्किल्स आत्मसात करण्यासाठी खास प्रशिक्षण देत आहे.

कंपनी या महिला रायडर्सच्या सुरक्षेसाठी बांधील असून त्यासाठी त्यांच्या वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग बसवण्यात येणार आहे. यामुळे बाइक दीर्घकाळ थांबलेली असणे किंवा नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग घेतला जाणे अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करणे एमएलएलला शक्य होईल.

या घोषणेविषयी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, लास्ट- माइल डिलीव्हरीसाठी महिला ई- बाइक रायडर्सची नेमणूक करण्यात आघाडीवर असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. हा कर्मचारी वर्गात लिंग विविधता आणण्याच्या आमच्या बांधिलकीचाच एक भाग आहे. आमच्या मते समान संधींमुळे कामाचे ठिकाण जास्त उत्पादनक्षम आणि यशस्वी होते. अशाप्रकारच्या लॉजिस्टिक क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकणाऱ्या उपक्रमाच्या आघाडीवर राहिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या विस्तार योजनेचा एक भाग म्हणून आम्ही अधिकाधिक महिला रायडर्स, फ्लीट ओनर्स आणि इतर वाहतुकदारांची नेमणूक करण्यावर एमएलएलमध्ये लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अधिक मोठ्या राईज उपक्रमासाठी आम्ही बांधील असून स्त्रियांना प्रगती करण्यासाठीत्यांच्या कौशल्यांसाठी योगदान देण्यासाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

वॉर्डविझार्डतर्फे इलेक्ट्रिक स्कूटर ‘मिहोस’ लाँच

·         नव्या इलेक्ट्रिक स्कुटरची बांधणी Poly Dicyclopentadiene Material (PDCPD) करण्यात आल्यामुळे गाडी जास्त टिकाऊ आणि हादऱ्याचा परिणाम कमी करण्यास जास्त सक्षम झाली आहे.

·         या नव्या युगाच्या वेगवान इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम- इयॉन (एनएमसी) बसवण्यात आले असून चार्जिंगसाठी लागणारा वेळ ४ तास आहे. एका चार्जमध्ये गाडी १०० किमी धावते.

·         स्मार्ट आणि कल्पक वैशिष्ट्यांचा समावेश – रिव्हर्स मोडअँटीथेफ्ट रिजनरेटिव्ह ब्रेकिंगजिओ- फेन्सिंगकिल्लीशिवाय कार्यरत इत्यादी.

·         CAN-आधारित बुद्धीमान इलेक्ट्रॉनिक्स

·         बुकिंगची सुरुवात १२ जानेवारी २०२३ पासून, कंपनीच्या देशभरातील ६००+ अधिकृत वितरकांकडे

ग्रेटर नॉयडा – शाश्वतता आणि हरित वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेत वॉर्डविझार्ड या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी जॉय ईबाइकच्या उत्पादक कंपनीने आज ‘मिहोस’ ही नवीवेगवान इलेक्ट्रिक स्कूटल लाँच केली आहे. रायडर्सना जास्तीत जास्त टिकाऊपणा मिळवून देण्यासाठी या गाडीत Poly Dicyclopentadiene Material (PDCPD) वापरण्यात आले आहे.

वॉर्डविझार्डच्या वडोदरा येथील आर अँड डी टीमने तयार व विकसित केलेली मिहोस ही रेट्रो स्टाइलची इलेक्ट्रिक स्कूटर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आलेल्या या गाडीची सर्व वैशिष्ट्ये ग्राहकस्नेही असून रस्त्यावर रायडरच्या अधिक सुरक्षिततेसाठी त्यात व्हिईकल साउंड स्टिम्युलेटर देण्यात आला आहे. त्याशिवाय गाडी आरामात चालवता यावी यासाठी रूंद सीटही देण्यात आली आहे.

गाडीचे उत्पादन कंपनीच्या वडोदरा, गुजरात येथील आधुनिक उत्पादन कारखान्यात होणार असून त्याचे वितरण देशभरात टप्प्याटप्प्याने केले जाईल.

या लाँचप्रसंगी कंपनीच्या भविष्याविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन गुप्ते म्हणाले, ‘देशातील पहिल्या काही इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपन्यांपैकी एक या नात्याने आम्ही भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरण आणि हरित पृथ्वी उभारण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे नवे उत्पादन मिहोस ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा आणि मागण्या लक्षात घेऊन तयार व विकसित करण्यात आले आहे. ही स्कूटर ग्राहकांना तिची आधुनिक वैशिष्ट्ये रेट्रो रूपाने आकर्षित करेल, शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर जास्त आरामदायीपणा व सुरक्षितता देईल. समग्र ई- मोबिलिटी यंत्रणा तयार करण्यासाठी कंपनी सातत्याने आर अँड डीमध्ये गुंतवणूक करत आहे आणि देशात हरित वाहतुकीचा अवलंब आणि विस्तार वाढावा यासाठी भारतातील पहिले ईव्ही अँक्सिलियरी क्लस्टर उभारत आहे. २०२३ चे वर्ष देशात ईव्ही वाहतूक प्रस्थापित महत्त्वाचे ठरेल.’

इलेक्ट्रिक मोटरसायकल विभागातील उत्पादन श्रेणी आणखी बळकट करण्याच्या हेतूने कंपनीने एक्स्पोमध्ये रॉकफेलर ही शहरी इलेक्ट्रिक मोटरसायकलची संकल्पना लाँच केली. ही कॉन्सेप्ट मोटरसायकल चालकाच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात  घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २४ च्या अखेरपर्यंत ही मोटरसायकल लाँच करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

मिहोसची वैशिष्ट्ये – मिहोस ही रेट्रो स्टाइलची इलेक्ट्रिक क्लासिक स्कूटर चालकाचा आरामदायीपणा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असल्यामुळे कोणत्याही वयोगटाच्या चालकासाठी उत्तम आहे.

·         ७५० मिमी उंची असलेली रूंद आणि लांब सीट, १३६० मिमीचा विस्तारित व्हीलबेस

·         आरामदायीपणासाठी – लांबी = १८६४ मिमी | रूंदी = ७०० मिमी | उंची = ११७८ मिमी.

·         आरामदायीपणा लक्षात घेऊन गाडीच्या पुढच्या बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूस मोनो रिव्हर्सिबल स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आले आहे.

·         मिहोसची रचना भारतीय रस्ते लक्षात घेऊन केलेली असल्यामुळे त्याचा ग्राउंड क्लियरन्स १७५ मिमी आहे.

·         गाडीमध्ये साइड स्टँड सेन्सर आणि हायड्रोलिक कॉम्बी ब्रेक सिस्टीम (सीबीएस) अशी सुरक्षेची अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

·         मिहोसमध्ये Poly Dicyclopentadiene किंवा PDCPD हे अनोखे साहित्या वापरण्यात आले आहे. यामुळे हे उत्पादन इतरांपेक्षा वेगळे, जास्त लवचिक आणि तरीही दणकट ठरते.

·         मिहोस सात सेकंदांपेक्षा कमी कालावधीत ०-४० किमीचा वेग गाठत असून त्याचा टॉर्क ९५ एनएम आहे.

·         CAN-आधारित बुद्धीमान इलेक्ट्रॉनिक्स 

बॅटरी तंत्रज्ञान – मिहोसमध्ये 74V40Ah Li-Ion बॅटरी निकेल मँगेनीज कोबाल्ट केमिस्ट्री देण्यात असून त्याची उर्जा २.५ kWh आहे. बॅटरीमध्ये धक्के सहन करण्याची चांगली क्षमता असून टिकाऊपणासाठी ती विविध प्रकारच्या कठोर निकषांतून यशस्वीपणे तावूनसुलाखून निघालेली आहे. त्यामध्ये सेफ्टी सेन्सर्सची मोठी श्रेणी देण्यात आली आहे, की करंटपासून संरक्षण आणि थर्मल कट- ऑफची सुविधा देते. भारतीय हवामान लक्षात घेऊन ही वैशिष्ट्ये तयार करण्यात आली आहेत.

बॅटरी हे इलेक्ट्रॉनिक वाहनाचे हृदय असते. चांगल्या कामगिरीसाठी यात एनएमसी बॅटरी बसवण्यात आली आहे. एनएमसी हाय एनर्जी डेन्स्टी आणि दीर्घकालीन आयुष्य यांमुळे भारतीय बाजारपेठेसाठी योग्य आहे.

बुद्धीमत्ता: स्मार्ट मिहोस ई- स्कूटरमध्ये वेगवेगळ्या व बुद्धीमान सेन्सर्सचे समीकरण देण्यात आले आहेजे जास्त सुरक्षा व उपयुक्तता मिळवून देते.

·         स्मार्ट कनेक्टिव्हिटी – जॉय ई- कनेक्ट अप हे मिहोस कनेक्टसाठी एका टॅपमध्ये वापरता येणारे असून ब्लूटुथच्या मदतीने स्कूटर नियंत्रित करण्यासाठी वापरता येऊ शकते.

·         रिमोट अप्लिकेशन्स – स्कूटर आणि बॅटरीचे स्टेटस कुठूनही तपासता येऊ शकते.

·         रिव्हर्स मोड – यामुळे अवघड पार्किंगच्या जागी स्कूटर सहजपणे मागे घेता येते.

·         जीपीएस अनेबल्ड – मिहोसमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या इतर वैशिष्ट्यांमध्ये जीपीएस सेन्सिंगरियल टाइम पोझिशन आणि जिओ फेन्सिंग यांचा समावेश आहे.

·         अँटीथेफ्ट – पार्क केलेल्या मिहोसमध्ये काही छेडछाड केली जात असल्यास व्हायब्रेशन्स तयार होतात. असा परिस्थितीत गाडी स्मार्ट रिमोट कंट्रोलच्या मदतीने कुठूनही लॉक करता येऊ शकते.

·         रिजनरेटिव्ह ब्रेकिंग – यातील रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम प्रत्येक वेळेस ब्रेक लिव्हर ओढल्यानंतर बॅटरी रिचार्ज करते व गाडीचा पल्ला वाढतो.

कामगिरी : हब मोटरमुळे बीएलडीसी मोटर बीएलडीसी मोटर पॅकसह या विभागातील सर्वोत्तम टॉर्क देते. त्याशिवाय तीन स्पीड कंट्रोलरमुळे स्कुटरचची व्यवहार्यता वाढली आहे.

·         १५००वॉट मोटर, ९५ एनएम टॉर्क, ७० किमीचा सर्वाधिक वेग

·         युजरची सुरक्षितता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टीममध्ये ट्विन डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत, जे गाडीला शक्य तितक्या कमी अंतरावर थांबवतात.

·         बॅटरीचे रेटिंग 74V40Ah आहे.

·         एक चार्जिंग चार तासांत पूर्ण होते.

·         प्रती चार्जिंगमध्ये १०० किमीचा पल्ला गाठला जातो.

किंमत आणि रंग

मॉडेलरंगाचे पर्यायकिंमत एक्स शोरूम (पॅन भारत)
मिहोस·         मेटॅलिक ब्लू·         सॉलिड ब्लॅक ग्लॉसी·         सॉलिड यलो ग्लॉसी·         पर्ल व्हाइट रू. १,४९,०००

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडविषयी

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. ही इलेक्ट्रिक दुचाकी (ईव्ही) क्षेत्रातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असून ती जॉय ई- बाइक्स ब्रँडच्या दुचाकींचे उत्पादन करते. बीएसईवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रातील पहिली नोंदणीकृत कंपनी या नात्याने कंपनीने भारतीय ईव्ही क्षेत्राच्या संभाव्य विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या तत्वाशी सुसंगत राहात सध्याच्या वाहतूक व्यवस्थेला हरित पर्याय देण्यावर कंपनीचा भर आहे. जॉय ई- बाइक्सच्या माध्यमातून कंपनी नेहमीच्या इंधनांवर चालणाऱ्या बाइक्सना पर्याय उपलब्ध करून देत आहे. कंपनी देशभरातील २५ प्रमुख शहरांत कार्यरत असून ही संख्या आणखी वाढवण्याची योजना आहे.

चाळीस वर्षांपूर्वी दुमदुमला होता मंत्र, ‘हिंदू सारा एक…’

तळजाई पठारावरील पस्तीस हजार संघस्वयंसेवकांच्या शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण

पुणे – तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या ‘प्रांतिक शिबिरा’ला शनिवारी (१४ जानेवारी) चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. तळजाईच्या पठारावर दोनशे एकर जागेवर हे शिबिर उभारण्यात आले होते आणि १४ १५ १६ जानेवारी १९८३ असे तीन दिवस चाललेल्या या शिबिरात तब्बल पस्तीस हजार संघस्वयंसेवकांची उपस्थिती होती. शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्वयंसेवकांकडून या शिबिराच्या आठवणी जागवल्या जाणार आहेत.
पुणे शहर, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा, संभाजीनगर, मराठवाडा, नाशिक आणि खान्देश या भागातील बावीसशे चाळीस गावांमधून या शिबिरासाठी संघस्वयंसेवक आले होते. शिबिराच्या उभारणीसाठी शेकडो स्वयंसेवक तळजाईच्या पठारावर दोन महिने रात्रंदिवस राबत होते. शिबिराला आलेल्या स्वयंसेवकांसाठी छत्तीस स्वयंपूर्ण नगरे उभारण्यात आली होती. एका नगरात एक हजार स्वयंसेवकांची निवास, भोजन आदी सर्व व्यवस्था होती, अशी माहिती संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी शुक्रवारी दिली.
संक्रांतीच्या निमित्ताने शिबिराला आलेल्या सर्वांना गुळाच्या पोळ्यांचे भोजन देण्यात आले होते. या गुळाच्या पोळ्या पुण्यातील घराघरांमधून संकलित करण्यात आल्या होत्या. या उपक्रमाला पुणेकर माता-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि सुमारे पावणेदोन लाख गुळाच्या पोळ्या शहरातून संकलित झाल्या होत्या, असेही डॉ. दबडघाव यांनी सांगितले.
संघाच्या कार्याचे आणि संघाकडून चालवल्या जाणाऱ्या सेवाकार्यांचे दर्शन घडवणारे चारशे चित्रांचे ‘संघदर्शन’ हे प्रदर्शन, शिवधनुष्याच्या आकाराचे प्रवेशद्वार, पृथ्वीच्या आकाराचे आणि त्यावर शेषशाही नागाने फणा धरलेले दोन मजली भव्य व्यासपीठ ही या शिबिराची आकर्षणे ठरली होती. ‘संघदर्शन’ प्रदर्शनाला तीन दिवसात तीन लाख नागरिकांनी भेट दिली होती, अशीही माहिती डॉ. दबडघाव यांनी दिली.
तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासह संघाचे अनेक केंद्रिय अधिकारी या शिबिरात उपस्थित होते आणि शिबिरात १४ जानेवारी रोजी झालेल्या मकरसंक्रमण उत्सवाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक, ‘स्वामी’कार रणजित देसाई यांची उपस्थिती होती. डॉ. अरविंद लेले यांनी लिहिलेले ‘हिंदू सारा एक…’ हे गीत या शिबिरात स्वयंसेवकांनी एकसुरात गायले. विख्यात संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांनी ते व्यासपीठावरून गायले होते आणि प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी हे गीत स्वरबद्ध केले होते.
शिबिराच्या निमित्ताने पुण्यातून १६ जानेवारी रोजी दोन भव्य पथसंचलने काढण्यात आली होती. या संचलनांचेही शहरात जागोजागी स्वागत करण्यात आले होते. या शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यातील स्वयंसेवकांकडून या शिबिराच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. शिबिराची संपूर्ण माहिती देणारी एक फिल्मही तयार करण्यात आली असून ती समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात येत असल्याचे डॉ. दबडघाव यांनी सांगितले.
पस्तीस हजार स्वयंसेवकांची उपस्थिती, समाजाकडून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि पुणेकरांनी शिबिराला आलेल्या स्वयंसेवकांसाठी मोठ्या प्रेमाने दिलेल्या लाखो गुळाच्या पोळ्या ही या शिबिराची खास वैशिष्ट्य ठरली. या शिबिराने कार्यकत्यांना उत्साह मिळाला. संघकार्याला मोठी गती मिळाली. शिबिराने ‘हिंदू सारा एक…’ हा मंत्र महाराष्ट्राला दिला. 
सुरेश उर्फ नाना जाधव प्रांत संघचालक, रा. स्व. संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत

कृषी संस्कृती वाचवली तरच देश वाचेल- पद्मश्री पोपटराव पवार

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील विविध गोसेवकांचा सन्मान 
पुणे : चंगळवाद आणि अति हव्यासाच्या पोटी आपण हरितक्रांतीचे मूळ बिघडवून टाकले आहे. यामुळे आपण देशातील माती आणि पाणी नष्ट करत चाललो आहोत. हीच परिस्थिती राहिली तर देशातील ग्राम संस्कृती नष्ट होईल आणि देश मोठ्या संकटात सापडेल, अशी भीती व्यक्त करतानाच देशातील ग्राम संस्कृती, कृषी संस्कृती,  गोवंश वाचवला तरच देश वाचेल, अशी भावना आदर्श गाव समितीचे प्रमुख पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. 

स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने  राज्यातील विविध गोसेवकांचा पोपटराव पवार यांच्या हस्ते भांडारकर इन्स्टिटयूट च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, शेखर धर्माधिकारी, दादा वेदक, राजेंद्र लुंकड, महेंद्र देवी, रमेश अग्रवाल, विजय वरुडकर, श्रीकांत कुलकर्णी, सुधीर पाचपोर, नितीन आपटे, कान्होपात्रा गायकवाड,सुनील बेनके, डॉ रवींद्र वाघोले, जगदीश गजऋषी, विशाल वरुडकर आदी  मान्यवर उपस्थित होते.
गो विज्ञान संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांना विवेकानंद गोसेवक जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. अनिल पांडे, कमलेश सावला ,डॉ गणपत झिरोनकर, प्रतीक भेगडे, शिवप्रसाद कोरे, परमेश्वर स्वामी, विठ्ठल मुरकेवार, डॉ अजित उदावंत, अमर ढगे, आनंद कोल्हटकर ,नंदा बिरजे, तृप्ती अग्निहोत्री, अश्विनी बेलन या गो सेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

पोपटराव पवार म्हणाले, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये संस्कृती आणि संस्कारांचे शिक्षण पाहिजे त्याप्रमाणात दिले जात नाही. त्यामुळेच आजची तरुणाई ही चंगळवादाकडे झुकत चालली आहे. त्यांना पाणी आणि मातीचे महत्त्व पटवून दिले तरच या तरुणाईला निसर्गाविषयी प्रेम आणि आकर्षण वाटेल.

दादा वेदक म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हिंदुस्तानी परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली पाहिजे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गो सेवेचा प्रचार आणि प्रसार करून गोसेवेला संपूर्ण जगात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, गो सेवक अगरबत्ती, धूप, साबण अशा विविध प्रकारची उत्पादने तयार करतात. परंतु या उत्पादनांचे योग्य प्रकारे मार्केटिंग होत नसल्यामुळे ही उत्पादने शहरापर्यंत पोहोचू शकत नाही. गो सेवेची संस्कृती ही ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये पोहोचविली पाहिजे. त्यासाठी गो सेवेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग होणे गरजेचे आहे. या साठी कोहिनूर ग्रुप यांच्या सहयोगाने आम्ही राष्ट्रीय कर्तव्य अभियान अंतर्गत गो संवर्धन सहयोग अभियान या यूट्यूब चैनल ची आज सुरुवात करत आहोत.

या प्रसंगी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी मागील ८ वर्षांचा सामाजिक संस्थेचा कार्य प्रवास सांगितला. तसेच विवेकानंद जयंती निमित्त व राष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवकांना जागतिक पातळीवर रोजगार उभारणी साठी प्रयत्न व्हावेत यासाठी मिशन अटल आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र माध्यमातून आम्ही काम करणार आहोत अशी भूमिका मांडली. या वेळी टाटा सोशल ट्रस्ट व मोक्ष योगा द्वारे सुरू असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली.

रसायन मुक्त शेती कॅन्सर मुक्त स्वस्थ भारत घडवण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य अभियान अंतर्गत येणाऱ्या ५ वर्षात राज्यातील ७५००० शेतकरी कुटुंब यांना ७५००० देशी गोवंश आधारीत शेती उत्पादन साठी जोडण्याचे काम आम्ही करत आहोत यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली.

सीमा लिमये, नितीन आपटे, श्रीकांत कुलकर्णी,विठल मुरकेवार, प्रतीक्षा ढवळीकर,संतोष सुरवसे, चेतन मराठे, सागर पाटील, रवींद्र चव्हाण, विशाल वरूडकर यांनी कार्यक्रम संयोजन केले होते.  रमेश अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. डॉ आशिष पोलकडे यांनी सर्व मान्यवर व उपस्थित व्यक्तींचे आभार मानले.

राष्ट्रीय कर्तव्य अभियान अंतर्गत सुरू विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी 8446004580 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती संयोजक समिती द्वारे करण्यात आली.

आदर्श व्यक्तींचे कार्य समाजाला, नव्या पिढीला प्रेरक 

खासदार श्रीनिवास पाटील यांचे मत; टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे ‘एक्सलन्स अवॉर्ड’चे वितरणअतुल किर्लोस्कर यांना ‘जीवनगौरव’; डॉ. अरविंद नातू, संदीप कर्णिक, नीता मेहता आदींचा सन्मान
पुणे : “पुण्यात घडलेली प्रत्येक व्यक्ती एक संस्था व विद्यापीठ आहे. एकमेकांच्या साथीने प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या अशा आदर्श व्यक्तिमत्वांचे कार्य समाजाला प्रेरक असते. पुरस्कारांच्या माध्यमातून अशा आदर्शांना नव्या पिढीसमोर ठेवले जात आहे, ही चांगली गोष्ट आहे,” असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना उल्लेखनीय कार्याबद्दल ‘अवॉर्डस ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. खराडी येथील हॉटेल रॅडीसन ब्लू येथे झालेल्या सोहळ्यावेळी सौ. बाहरी मल्होत्रा, लेफ्ट. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग सिंग, ‘टीएमसी’चे अध्यक्ष अश्विनी मल्होत्रा, महासचिव डॉ. जयसिंग पाटील, जेनीस सोमजी आदी, सुंद्री परचानी आदी उपस्थित होते.
उद्योजक अतुल किर्लोस्कर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. अरविंद नातू (विज्ञान व तंत्रज्ञान), जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके (सार्वजनिक आरोग्य), पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक व भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संतोष ढोके (प्रशासन), टेक्नोक्रॅट आनंद शिराळकर (युवा उद्योजक), पॉवरलिफ्टर नीता मेहता (क्रीडा) यांना सन्मानित करण्यात आले.
श्रीनिवास पाटील म्हाणाले, “पुणे विद्येचे, संस्कृतीचे, देवालयाचे माहेरघर आहे. ही संस्कृती आपण जपली पाहिजे. समाजात अनेक गरीब व गरजू लोक आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यायला हवा. सर्वाना सोबत घेऊन प्रगतीचा मार्ग साधायला हवा. वाहतूक कोंडीसह पुण्यातील इतर नागरी प्रश्न सोडविण्यावर काम होण्याची गरज आहे.” ज्या जिजाऊंनी पुण्याची उभारणी केली, त्यांचे नाव पुण्याला देण्याचा विचारप्रवाह जोर धरतोय, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 किर्लोस्कर ग्रुपच्या माध्यमातून उभारलेल्या कार्याचा हा गौरव असून, त्याचा नम्रपणे स्वीकार करत असल्याची भावना अतुल किर्लोस्कर यांनी व्यक्त केली. संदीप कर्णिक, संतोष ढोके, आनंद शिराळकर, डॉ. सुभाष साळुंके यांनीही सत्काराला उत्तर देत आपली मनोगते व्यक्त केली. अश्विनी मल्होत्रा यांनी प्रास्ताविक केले. जुही मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयसिंग पाटील यांनी आभार मानले.

– रॅपिडो बंद करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ; रिक्षा चालक मालकांचा विजय

रस्त्यावरील लढाईबरोबर न्यायालयीन लढाई देखील जिंकलो ः बाबा कांबळे

बाबा कांबळे, आनंद तांबे यांनी दाखल केले होते हस्तक्षेप (entarveshn) याचिका

पिंपरी / प्रतिनिधी

रॅपिडो कंपनीची बेकायदेशीर दुचाकी टॅक्‍सी बंद होण्यासाठी वारंवार निवेदने, आंदोलने छेडत होतो. त्या विरोधात आम्ही रस्त्यावरची लढाई लढली आहे. पुण्यामध्ये रिक्षा बंद करण्याचे मोठे आंदोलन घेतले होते. रस्त्यावरची लढाई जिंकली होती. दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढा देखील सुरूच होता. कोट्यवधी रिक्षा चालक मालकांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर रॅपिडो कंपनीच्या प्रवासी वाहतूकीला बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे न्यायालयीन लढाई देखील आम्ही जिंकलो असून रिक्षा चालक मालकांचा हा विजय असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रतिपादन केले. न्याय दिल्याबद्दल न्यायदेवतेचे आभार व्यक्त करतो, असेही बाबा कांबळे म्हणाले.

रॅपिडो कंपनीने दुचाकी प्रवासी वाहतूकीबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होती. त्या विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे आनंद तांबे यांनी न्यायालयामध्ये आमचे म्हणणे ऐकूण घ्यावे, यासाठी पुर्नयाचिका दाखल केली होती. त्याची आज शुक्रवारी (दि. 13) सुनावणी झाली. या वेळी उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

या सूनावणीवेळी महराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे विजय ढवळे, सर्वसामान्य रिक्षा चालक आप्पा हिरेमठ, संतोष नेवासकर, सचिन रसाळ आदीसह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.

बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालकांचे हातावरचे पोट आहे. दिवसभर राबल्यानंतर आपले घर कसेबसे चालवले जाते. मात्र ओला-उबेर, रॅपिडो या मोठ्या खासगी कंपन्या प्रवासी वाहतूक करायला लागल्यापासून रिक्षा चालकांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. प्रवाशी मिळत नव्हते. संबंधीत खासगी कंपन्यांनी कायदेशीर प्रक्रिया देखील पुर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांची प्रवासी वाहतूक बेकायदेशीर असल्याचे आम्ही सांगत होतो. त्या विरोधात सातत्याने आंदोलने छेडत होतो. नुकतीच न्यायालयात ही आरपारची लढाई पोचली. त्यामध्ये न्यायदेवतेने रिक्षा चालकांचे म्हणणे ऐकून घेऊन रिक्षा चालकांना न्याय दिला असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

माणूस जोडण्यास शिकवते बंधुतेचे तत्वज्ञान

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; दळवी, डॉ. शहा यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ प्रदान

पुणे, ता. १३ : “महापुरुषांचे विचार समाजाला जोडणारे, देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारे आहेत. मात्र, प्रत्येक जाती-धर्माने महापुरुष वाटून घेण्याची स्पर्धा लागल्याचे दिसते. जाती-धर्माच्या नावावर समाजात दुफळी निर्माण होत असताना बंधुतेचा विचार पेरण्याची गरज आहे. कारण बंधुता माणूस जोडण्याचे तत्वज्ञान शिकवते,” असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या संस्थाच्या वतीने नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात २४ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचा समारोपावेळी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक कुमार पगारिया, स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अरुण आंधळे, प्रकाश जवळकर, प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण आदी उपस्थित होते.
माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटचे संस्थापक संचालक ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ञ डॉ. दीपक शहा यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ देऊन डॉ. सबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. दळवी व शहा यांनी पुरस्काराच्या रकमेत प्रत्येकी ११ हजार रुपये घालून ३२ हजारांचा निधी बंधुता परिषदेला सुपूर्त केला.
पुढील वर्षी होणाऱ्या २५ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ, तर स्वागताध्यक्ष पदी बंधुता प्रकाशनाच्या संचालिका मंदाकिनी रोकडे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. बंधुता मायमराठी पुरस्काराने मधुराणी बनसोड (वाशिम), सीमा गांधी (पिंपरी), सचिन शिंदे (उमरखेड), तुकाराम कांबळे (नांदेड), तेजस गायकवाड (सोलापूर), नरेंद्र पाटील (धुळे), साईनाथ फुसे (औरंगाबाद), घनशाम सावरकर (परभणी), प्रतिभा मगर (पुणे) व महादेव सुरवसे (परळी वै.) यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “अनेक महापुरुष संघर्षासाठी वापरले जात आहेत. अशावेळी प्रकाश रोकडे बंधुतेची पताका खांद्यावर घेऊन गेली पाच दशके समाजात बंधुता पेरण्याचे काम करत आहेत. याच विचारांवर चालणाऱ्या दळवी आणि डॉ. शहा यांचा सन्मान दिशादर्शक आहे.”
चंद्रकांत दळवी म्हणाले, “बंधुतेच्या नावाने मिळालेला पुरस्कार विशेष आहे. ‘गर्व से कहो बंधू है’ हा नारा घेऊन रोकडे गेली ५० वर्षे बंधुतेची चळवळ व्यापक करत आहेत. प्रशासनात काम करताना मीही बंधुभावाच्या विचारातून काम केले. हा विचार आणखी व्यापक करण्यासाठी चळवळीला जोडून घेतले आहे.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “दळवी यांनी प्रशासकीय सेवेतून, तर डॉ. शहा यांनी शिक्षण सेवेतून बंधुतेचा विचार जपला आहे. अशा कर्तृत्ववान व संवेदनशील माणसांमुळे समाजात बंधुता पेरण्यास मदत झाली. समाजाला एकसंध ठेवण्याचे काम बंधुतेचा विचार करतो. त्यामुळे त्यांचा आपण सर्वानी अंगीकार केला पाहिजे.”
शंकर आथरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सीए अशोक कुमार पगारिया, प्रा. डॉ. अरुण आंधळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. दीपक शहा यांच्या वतीने त्यांच्या पत्नी प्रतिभा शहा यांनी पुरस्कार स्वीकारला व पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले. संगीता झिंजुर्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी आभार मानले.