Home Blog Page 1466

व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश

एकत्रित प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण

पुणे दि. १४: प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे साडेअकरा लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या असून, यातील सुमारे २.५० लाख तक्रारी या महिलांशी संबंधित होत्या. या प्रणालीतून सरासरी दररोज १९ हजारावर कॉल्स स्वीकारले जातात, तर २८०० तक्रारींचा निपटारा केला जातो. आता यात महाराष्ट्र पोलिसांचे सिटीझन पोर्टल, एसओएस, फेसबुक, ई-मेल, सिटिझन मोबाईल अ‍ॅप, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जलदगतीने तक्रारींचा निपटारा शक्य होणार आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी आणि त्यावर त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. यामुळे पीडितापर्यंत तातडीने मदत पोहोचू शकणार आहे. ११२ महाराष्ट्र या नावाने ट्विटर आणि फेसबुकवर हॅण्डल्स असून, अन्य तपशील महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात, तातडीची मदत पोलिसांना मागू शकतात. यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत आणखी एका जलद प्रतिसाद सेवेची भर पडलेली आहे.
000

ब्लैकमेल इकोसीस्टीममुळे गेल्या वर्षी ६ हजार कोटीचा उद्योग कर्नाटकात गेला -उपमुख्यमंत्री

पुणे शहरातील दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.१४- ब्लैकमेल इकोसीस्टीममुळे गेल्या वर्षी ६ हजार कोटीचा उद्योग कर्नाटकात गेला अशी माहिती देत आज आपण पुण्यात पोलिसांना औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले असून याबाबत संबधित लोक कोणत्याही जाती धर्माचे असो, राजकीय पक्षांचे असो त्याबाबत लक्ष न देता कारवाई करा अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल असा इशारा दिला असल्याचेहीराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले .

पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा २ हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पुढील तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा देण्यात येईल आणि यावर्षापासून काम सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी फडणवीस यांनी केले.

पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित येरवडा गोल्फ क्लब चौकातील धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपुलाच्या कोनाशिलाचे अनावरण करुन लोकार्पण तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर, येरवडा येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे खडकी कटक मंडळ हद्दीतील जुना पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण करुन बी.आर.टी मार्ग, बावधन बुद्रुक या गावामध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या पाईप लाईन, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुनिल कांबळे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे,आदी उपस्थित होते.

प्रगतीशील पुणे तयार करण्याचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करून श्री.फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचे ६० टक्के आणि ४० टक्के महानगरपालिकेने खर्च करण्याच्या योजनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शहरात नाल्यालगतच्या भागातील पूर परिस्थितीचा आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

शहराबाहेरील रिंगरोडचे कामही वेगाने हाती घेण्यात येत आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाला १० हजार कोटी रुपये लागणार असूनही या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्या माध्यमातून पुण्याच्या आर्थिक विकासाला मदत मिळेल. हा रिंगरोड अडीच लाख कोटी रुपयांची व्हॅल्यु तयार करेल. पुढील १० वर्षाची विकासाला दिशा देण्याचे कार्य हा मार्ग करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारीबाबत कडक धोरण
पुण्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. पुण्यात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर देशातील इतर शहरांप्रमाणे चांगले वातावरण पुण्यात निर्माण करून माहिती तंत्राज्ञान, मॅन्युफॅक्चरींग आणि नाविन्यतेच्या क्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्याचा कडक संदेश देण्यात आला आहे. पुण्यात मनुष्यबळाची खाण असल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येत आहेत. येत्या काळात मुंबईप्रमाणे पुणे हे दुसरे ‘ग्रोथ इंजिन’ तयार होईल. पुणे दुप्पट वेगाने आणि दुप्पट क्षमतेने धावावे यासाठी राज्य शासन सहकार्य करेल.

मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल
गेल्या पाच वर्षात महानगरपालिकेने विकासाची बरीच कामे केली. पुण्याचा विकास आराखडा या काळात मंजूर करून पुण्याचा विकासाचा मार्ग मोकळा केला. पुण्याच्या मेट्रोला गती देण्यात आली असून त्याचा एक टप्पा पूर्ण झाला. पुण्यात निर्माण होणाऱ्या मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूकीची कोंडी कमी करण्याचे काम येत्या काळात होणार आहे. शिवाजीनगरच्या पुढे हिंजवडीपर्यंत मेट्रो न्यायची आहे. त्या संदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव आले आहेत. मेट्रो मार्गाचे इंटिग्रेशन झाल्यावर त्यास मान्यता दिली जाईल. पुण्यात पीएमपीएमएलच्या माध्यमातून चांगली बससेवा देण्यात येत आहे. देशात सीएनजी आणि इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या सर्वाधिक बसेस पुण्यात आहेत. शहरात एसी बसेस सुरू करताना तिकीटाचे दरही वाढविण्यात आले नाही. पुण्याचे चित्र बदलण्याचे काम या विविध माध्यमातून होत आहे.

निर्मळ नदीच्या किनाऱ्यावर वसलेले गाव ही मूळ ओळख देणार
शहरात नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. मुळा-मुठा आपली ओळख असल्याने आपली नदी अविरत वाहण्यासोबत निर्मल रहायला हवी यासाठी जायका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. निर्मल नदीच्या किनाऱ्यावर वसलेले पुणे ही मुळ ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चोविस तास पाण्याची योजनेचे काम वेगाने सुरू असून त्याद्वारे गळती रोखण्यासोबत शाश्वत आणि योग्यप्रकारे पाणी देण्याचे काम पुणे महानगरपालिका करेल. नदीकाठ सुशोभिकरण आणि विकासाचे कामही वेगाने सुरू आहे. त्यातून पर्यटकांकरीता आकर्षणाचे केंद्र तयार होईल. पुण्यातील एसआरएचे, पुर्नविकास, म्हाडा प्रकल्प मार्गी लावून पुण्याचा विकास घडवायचा आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

पुणे शहराचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध-पालकमंत्री
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पुणे शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शहरातील अनेक रस्ते, वाहतूक कोंडीच्या जागी उड्डाणपुल, शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा, बावधन येथील पाणी पुरवठा आदी कामे करण्यात आली आहेत. नदी सुशोभिकरण प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे. महानगरपालिकेने स्वत:चे रुग्णालय उभारणे हे स्वातंत्र्यानंतर प्रथमच घडत आहे. शहरातील २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना पुर्णत्वास येत आहे. त्यानंतर शहरातील पाण्याची गळती थांबून पाण्याची समस्या दूर होईल. जायका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अन्य कामांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरता येईल, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अधिकाधिक साठा मिळू शकेल. मार्च अखेरपर्यंत मेट्रोचा ३३ किलोमीटरचा टप्पा पूर्ण होत आहे. पुढच्या टप्प्याला सुरूवात करण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे. शहराची झपाट्याने वाढ होत असून पयाभूत सुविधांचा विकास करण्यात येत असून शहराचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात विक्रम कुमार म्हणाले, पुणे शहर देशात लोकसंख्येप्रमाणे ८ वे आणि क्षेत्रफळाच्या संदर्भात दुसरे शहर झाले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिका कटीबद्ध आहे. नूतन उड्डाणापुलामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. महापालिका क्षेत्रात समाविष्ट गावात सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपुलासाठी केलेल्या कामाबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकाला काही लोकांकडून बट्टा लावण्याचे काम, उपमुख्यमंत्री फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

पुणे – महाराष्ट्र पोलिसांचा जो नावलौकिक आहे, त्याला मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी बट्टा लावण्याचे काम केले. त्यामुळे, पुन्हा महाराष्ट्र पोलिसांना नावलौकिक मिळाला पाहिजे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका केली.

राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची परिषद उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर भूमिका मांडली. या परिषदेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बदललेल्या सत्तांतरात बदल्या आणि भ्रष्टाचार याला समोर जाव लागणार नाही. आम्ही एवढ्यात बदल्या केल्या त्यामध्ये कोणालाही भ्रष्टाचाराला सामोर जावे लागल नसल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. तसेच, आता अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने पारदर्शकपणे कामे केली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

सायबर क्राईम रोखण्यासाठी कायद्यात बदल

ड्रग्स विरोधात एक मोहीम हाती घेण्याचा मानस परिषदेत अधिकारी वर्गासमोर बोलवून दाखविला असून, त्याचे नियोजन आम्ही करीत असल्याचे फडणवीस म्हणाले. सध्या पोलिसांसमोर कोणती आव्हाने आहेत या प्रश्नावर, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेषत: वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने होत आहेत. कुठे जातीय, तर कुठे धार्मिक तणाव निर्माण होत आहे. या गोष्टी कशा कमी करता येतील, त्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यावर, सायबर क्राईम रोखण्यासाठी केवळ पोलीस ठाणे वाढवून चालणार नाही. सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे, कायद्यात बदल अपेक्षित आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत कायद्यात बदल करण्यासंदर्भात आम्ही सूचना केल्या होत्या. केंद्र सरकारकडून या अधिवेशनात सायबर गुन्हे रोखण्यासाठी कायद्यात बदल होतील, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. मुंबईत छोटा राजनचे पोस्टर लावण्यात आले होते त्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यावर, जरूर कारवाई होईल, असेही फडणवीस म्हणाले.

भाजप सत्यजित तांबे यांना निवडणुकीत पाठिंबा देणार का?

शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. यावर योग्य वेळी त्याचा खुलासा केला जाईल, असे सांगत भाजप सत्यजित तांबे यांना निवडणुकीत पाठिंबा देणार का? या प्रश्नावर, मी पुन्हा सांगतो आपण परिस्थितीवर नजर ठेवा. योग्य वेळी योग्य गोष्टी आपणास समजतील, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली

पतंग उडविताना कोणाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी – मंजुश्री खर्डेकर यांचे आवाहन

विविध वस्त्यांमध्ये सूती / देशी मांजा आणि पतंग वाटप

मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चा उपक्रम

पुणे-संक्रांती पासून उत्तरायन सुरु होते आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या काळात मोकळ्या हवेत जावे, जास्तीत जास्त सूर्यकिरण शरीरावर पडावेत या उद्देशाने पतंग उडविण्याची परंपरा असल्याचे माजी नगरसेविका आणि शिक्षण मंडळ अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने मोफत पंतग व मांजा वाटपाच्या उपक्रमात त्या बोलत होत्या. एरंडवणे परिसरातील दहा चाळ, पंडित जवाहरलाल नेहरू वसाहत, राजश्री शाहू वसाहत, सात चाळ अश्या विविध वस्त्यातील मुलांना पतंग उडविण्याचा निर्भेळ आनंद मिळावा आणि त्यांना सूर्यस्नान घडावे यासाठी हा उपक्रम करत असल्याचे मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी,योगेश रोकडे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी सौ. कल्याणी खर्डेकर, श्री.राजेंद्र येडे, श्री.सुनील होलबेले, संगीताताई आधवडे,संगीताताई वांद्रे,कोंडेताई, नागरिक व मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्याला सणाचा आनंद लुटायचा आहे पण त्याचा कोणाला त्रास होऊ नये याची देखील काळजी घ्यायची आहे असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. चिनी मांज्यामुळे पक्ष्यांनाच नव्हे तर सामान्य नागरिकांना ही इजा झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत त्यामुळे पतंग उडविताना काळजी घ्यावी व रस्त्यावर पतंग न उडविता मोकळ्या जागेत उडवावेत असे आवाहन ही मंजुश्री खर्डेकर यांनी केले आहे.
पतंग वाटपाच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे लहान मुलं प्रचंड आनंदली होती व त्यांचा उत्साह ओसंडून वहात होता.

नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी:दाऊद इब्राहिमच्या नावे तासभरात 3 फोन

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आलेला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी त्यांना आलेली आहे. आम्हाला खंडणी द्या नाहीतर तुमच्या जीवाचं काही खरं नाही, असं त्यांना फोनवरुन सांगण्यात आलं. गडकरींच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आल्याची माहिती आहे.

या प्रकारानंतर गडकरींच्या कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.यासंबंधीच्या माहितीनुसार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या नागपूरमध्येच आहेत. त्यातच हे धमकीचे फोन आल्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता त्यांच्या कार्यालय व निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. नितीन गडकरी यांच्या नागरूप येथील खामला परिसरातील कार्यालयात शनिवारी धमकीचे 3 फोन आले. सकाळी 11.30 च्या सुमारास पहिला फोन आला. त्यानंतर काही वेळाने दुसरा व तिसरा फोन आला. त्यात फोन करणाऱ्या व्यक्तीने दाऊदचे नाव घेत गडकरींकडे खंडणीची मागणी करण्यात आली. पैशांची मागणी पूर्ण करण्यात आली नाही तर गडकरींना जीवे मारण्यात येईल, असे धमकी देणारा म्हणाला.

या दूरध्वनीनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना दिली. तद्नंतर पोलिसांनीही तातडीने गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धाव घेऊन तपास सुरू केला. सायबर पोलिसांचे एक पथकसुद्धा घटनास्थळी पोहोचले आहे. एटीएसही पोहोचल्याची माहिती आहे. हे सर्वजण फोन करणाऱ्याचा माग काढण्याच्या प्रयत्नांत आहेत. उच्चपदस्थ पोलिस अधिकारीही गडकरींच्या कार्यालयात पोहोचले आहेत.

पोलिसांनी या घटनेचा वेगवान तपास करत धमकी देणाऱ्याचा फोन ट्रेस केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा फोन कर्नाटकच्या एका भागातून करण्यात आला होता. आता पोलिस फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नांत आहेत.

वाढत्या बेरोजगारीचे चिंताजनक आव्हान! (लेखक:प्रा. नंदकुमार काकिर्डे)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ( इंटरनॅशनल मॉनिटरी फंड – आयएमएफ)  २०२३  या वर्षात जगातील किमान एक तृतीयांश देशांमध्ये मंदी राहील असे सुतोवाच केले आहे. त्याच वेळी भारताचा आर्थिक विकास दर  हा जागतिक पातळीवर सर्वाधिक चांगला असण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र त्याचवेळी देशातील “सीएमआयई”  संरथेने  देशांतर्गत बेरोजगारीचा वाढता दर चिंताजनक ठरत असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळेच मोदी सरकारने  बेरोजगारी समस्येबाबत ताबडतोब क्रांतीकारी  पावले उचलण्याची गरज आहे. त्याचा हा धांडोळा.

आपल्या देशामध्ये सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमी( सीएमआयई )ही संस्था   विविध प्रकारच्या कामगिरीचे विश्लेषण करून त्याचे अहवाल  प्रसिद्ध करत असते. याच अहवालांचा एक भाग म्हणून ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तीन महिन्यातील देशातील बेरोजगारीचा अहवाल यांनी नुकताच प्रसिद्ध केला. या अहवालात देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून याबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर काही हालचाली करण्याची शिफारस करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा ८.३ टक्के होता असे नमूद करण्यात आले आहे. करोनाचा दोन वर्षांचा कालावधी आणि त्यात भेडसावत असलेली बेरोजगारीची समस्या ही खरोखरच चिंताजनक आहे.  गेल्या सलग सोळा महिन्यांमध्ये देशातील बेरोजगारीचा दर सतत वाढताना दिसत आहे. या बेरोजगारीचे थोडेसे विश्लेषण केले तर अनेक राज्यांमध्ये बेरोजगारीचा दर चिंता वाढवणारा आहे. दिल्ली,  जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, सिक्कीम, हरयाणा, आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये तो सर्वाधिक आहे. त्यामानाने महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात खूप कमी बेरोजगारी आढळली आहे.शहरी व ग्रामीण भागांमध्ये सुद्धा असलेले बेरोजगारीचे प्रमाण शहरी भागात नेहमीच जास्त आढळत आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेचा  आढावा घेतला तर असे लक्षात येते की विकसित किंवा  विकसनशील देशांच्या तुलनेत आपली आर्थिक कामगिरी किंवा विकासाचा दर ज्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ( जीडीपी ) म्हणतात तो ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा दर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर देशातील रोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी खूपच कमी होतआहेत किंबहुना अपेक्षेप्रमाणे कोणत्याही क्षेत्रातील रोजगार निर्मिती वाढताना दिसत नाही. गेल्या चार-पाच वर्षाची आकडेवारी पाहिली तर असे लक्षात येतं की विशेष २०१६  पासून देशातील छोटा मध्यम किंवा लघु उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती ही अत्यंत अल्प प्रमाणात होत आहे. त्यावेळी बेरोजगारीचा दर साधारणपणे पाच टक्क्यांच्या घरात होता. आजच्या घडीला तो ८ टक्क्यांच्या घरात आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीमध्ये बेरोजगारीचा दर वाढताना दिसत होता. सप्टेंबर मध्ये तो 6.4% होता तर ऑक्टोबर मध्ये तो वाढून ७.८ टक्के इतका झाला. मात्र डिसेंबर मध्ये तो अजून वाढून आठ टक्क्यांच्या घरात गेला. याचा सरळ अर्थ म्हणजे गेल्या काही महिन्यात देशाच्या कोणत्याही उद्योग क्षेत्रात भरघोस अशी  रोजगारांची संख्या वाढली नाही.

आज जागतिक अर्थव्यवस्था २०२३ मधील मंदीकडे अत्यंत बारकाईने नजर ठेवत असतानाच भारतावर त्याचे काय परिणाम होतात हे बघणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. जगातील अनेक विकसित देशांमध्ये कोरोनापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. करोनानंतरच्या काळात अनेक देशांमध्ये भाव वाढीचे तसेच रशिया युक्रेन  युद्धाचे प्रतिबिंब पडले. त्यामुळे जगभरात अनेक देशात मंदीने ठाण मांडण्यास प्रारंभ केलेला आहे. भारतात कोरोनाच्या आधी आणि नंतरच्या वर्षभरात फारशी रोजगार वाढ  झालेली दिसली नाही. त्याऊलट  बेरोजगारी सातत्याने वाढताना दिसत होती. त्यामुळेच पुन्हा एकदा चांगली आर्थिक प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून बेरोजगारीचा आकडा निश्चित कमी झाला पाहिजे व जेमतेम तीन  इतकीच बेरोजगारी राहील असे प्रयत्न सरकारकडून सातत्याने होण्याची आवश्यकता आहे.  सप्टेंबर ते डिसेंबर २०२२ या तिमाही मधील  चालू खात्यावरील तूट ज्याला करंट अकाउंट डेफिसिट असे म्हणतात तो आकडाही प्रचंड झालेला आहे. 38.4 बिलियन डॉलर्स इतकी ही  प्रचंड तुट आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर व रुपया यांच्यातील विनिमय दर उच्चांकी राहून  74.33 रुपयांवरून तो 82.72 रुपये पातळीवर घसरलेला होता.

याचा अर्थ एकच आहे की 2023 हे वर्ष खऱ्या अर्थाने भारताची कठोर परीक्षा घेणारे ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एका बाजूला 2023 मध्ये जागतिक विकासाचा दर 3.2% वरून खाली येऊन केवळ 2.7 टक्के राहील असे भाकित केले आहे.  या पार्श्वभूमीवर जगातील सर्वच  मध्यवर्ती बँका त्यांचे पतधोरण आणखी कडक  करण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्याचवेळी त्यांच्या व्याजदरामध्ये सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होऊन एकूणच ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाला किंवा आर्थिक विकास दराला काहीशी खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (ज्याला पी एल आय असे म्हणतात ) अशी प्रोत्साहनपर आर्थिक योजना राबवली.  देशाच्या विविध उद्योगांतील उत्पादनाला चालना मिळावी व पर्यायाने रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर वाढावी अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारची फारशी रोजगार निर्मिती  मोठ्या प्रमाणावर होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे. दसरा दिवाळीच्या हंगामानंतर  विविध उद्योग क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती कशाप्रकारे वाढेल याचा प्रत्येक राज्याच्या पातळीवर आढावा स्वतंत्रपणे घेण्याची आवश्यकता आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या सर्व राज्यांमध्ये तसेच शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हेच प्रमाण केवळ एसएससी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये जास्त असून सातवी इयत्तेच्या पेक्षा कमी शिक्षण झालेल्या तरुणांना कोणत्याही प्रकारच्या नोकरीचे भवितव्य नाही.  एका बाजूला शेती व्यवसाय हाच तोट्याचा होत असून तेथेही कामगारांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरज लागत नाही.  कृषी उत्पन्नावर आधारित  नवे उद्योग सुरू झाले असले तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होताना दिसत नाही.  यासाठीच केंद्र सरकारने ताबडतोब बेरोजगारी कमी करण्यासाठी  ज्या काही उपाययोजना करता येतील त्या करून सर्व क्षेत्रातील उद्योगांना रोजगार निर्मिती कशा प्रकारे करता येईल यासाठी  आर्थिक प्रोत्साहन  वाढवण्याची  गरज आहे  दिनांक 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करण्यात येणाऱ्या 2023-24 या वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये बेरोजगारी निर्मूलनासाठी काहीतरी भरीव तरतूद करण्याची  गरज आहे.  तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेतलेल्या तरुणांनाही सध्या चांगल्या नोकऱ्या मिळत नाही.  कृषी क्षेत्रामध्ये आज अपेक्षा एवढा रोजगार मिळत नाही.  तरीसुद्धा अकुशल कामगारांना तेथे कशाप्रकारे काम मिळेल किंवा प्रत्येक राज्याने विविध दुष्काळी कामे काढून “रोजगार हमी योजने” सारख्या संकल्पना पुन्हा राबवण्याची गरज निर्माण झालेली आहे. आज देशाच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती आणि कृषी आधारित उद्योग आहेत. यामध्ये पशुपालनासह फळबागा किंवा अन्य नगदी पिकाच्या उत्पादनाची प्रक्रिया केंद्रे निर्माण केली पाहिजेत.  त्याद्वारे रोजगार निर्मिती  होऊ शकेल. केंद्र सरकार व राज्यांनी याबाबत तातडीने पावले उचलून प्रत्येक राज्यातील सुशिक्षित आणि अशिक्षित अशा दोन्ही वर्गांना योग्य ती संधी रोजगाराची संधी देण्याची नितांत गरज आहे यात शंका नाही. देशातील विविध उद्योगांमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञानात  बदल करण्याची आवश्यकता .  जे हंगामी उद्योग असतात त्यांच्या धोरणामध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये केवळ नोकऱ्या करणारे क्लार्क निर्माण करण्याची जी ब्रिटिशांची पद्धत आहे  त्यामध्ये आमुलाग्र बदल झाला पाहिजे. व्होकेशनल ट्रेनिंग वर जास्त भर दिला पाहिजे.ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण हवे आहे त्यांना विद्यापीठे व महाविद्यालय उपलब्ध होण.  त्या दृष्टिकोनातून नवीन राष्ट्रीय धोरण आखण्यात येत आहे परंतु त्याला अंमलबजावणी साठी फार काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वयंरोजगार निर्मिती यावरही भर दिला पाहिजे. जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या पूर्ण वेळाच्या नोकऱ्या कशा निर्माण होतील याचा सातत्याने विचार करून रोजगार निर्मितीचे विविध कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत. यामध्ये भांडवलावर आधारित उद्योगांपेक्षा कामगार आधारित उद्योगांना व त्या तंत्रज्ञानाला जास्त भाव दिला गेला पाहिजे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये आवश्यक असणारी कुशल अकुशल नोकर भरती करण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. तरच एका बाजूला आपली लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना बेरोजगारीचे प्रमाणही तितकेच वाढत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये अगदी वेळ पडली तर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणे आवश्यक वाटले तर तोही अंमलात आणला पाहिजे अन्यथा आपली  वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी ही खरोखर  चिंतेची बाब ठरेल. यावर वेळीच दीर्घकालीन मार्ग काढला नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत हे विद्यमान  सरकारच्या लक्षात आलेच पाहिजे. बेरोजगारीचे उच्चाटन हाच मूलमंत्र  स्वीकारण्याची हीच वेळ आहे.

प्रा. नंदकुमार काकिर्डे

.*(लेखक पुणे स्थित जेष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत).

बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शन,बालगंधर्व च्या कलादालनात…

  • खासदार डॉ. अमोल कोल्हे उद्घाटक
  • आमदार अतुल बेनके प्रमुख पाहूणे
  • १६,१७ जानेवारी; बालगंधर्व रंगमंदिर कलादालन
  • विशेष परिसंवादाचेही आयोजन

जुन्नर/पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेती, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक वास्तू आदी विविध क्षेत्राचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे. शिवजन्मभूमीचे आमदार अतुल बेनके हे यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतील. छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्याभिषेक दिनी येत्या 16 जानेवारी २०२३ रोजी सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदीराच्या कलादालनात या प्रदर्शनास प्रारंभ होणार आहे.

जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ. प्रमोद पांडे, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, चाईल्ड फंड इंडियाचे वरिषठ प्रकल्प व्यवस्थापक अभिजीत मदने आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवनेरी ट्रेकर्समार्फत बोरी बुद्रुक पर्यटन व सांस्कृतीक वारसा संवर्धन समिती, चाईल्ड फंड इंडिया, जुन्नर वन विभाग, शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान, मोरे मिसळ व रेस्टॉरंट, तालिश रिसॉर्ट व फुडिज् किचन यांचा सहयोगाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

– परिसंवादातून उलगडणार जुन्नरची गुपितं
जुन्नर तालुक्याचे बहुआयामी दर्शन घडविण्यासोबतच या परिसराच्या हजारो वर्षांतील उत्कांतीची आणि पर्यटन व निसर्ग वैभवाची गुपितं उलगडणाऱ्या विशेष परिसंवादाचे आयोजन या प्रदर्शनात करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे हे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता परिसंवादास प्रारंभ होईल. यात ‘पुरातत्विय उत्खननात उलगडलेले जुन्नर’ या विषयावर डेक्कन कॉलेजचे पुरातत्व विभागप्रमुख डॉ. पांडुरंग साबळे तर ‘प्रागैतिहासिक बोरी : ज्वालामुखीय राखेआडचं संपन्न विश्व’ या विषयावर डेक्कन कॉलेजच्या माजी विभागप्रमुख डॉ. सुषमा देव व डॉ. शिला मिश्रा यांचे व्याख्यान होईल. निसर्गअभ्यासक सुभाष कुचिक हे ‘जुन्नरचे पर्यटन व निसर्गवैभव’ उलगडून सांगतील.

– विद्यार्थी व अभ्यासकांना सुवर्णसंधी
एखाद्या तालुक्याचे इत्यंभूत दर्शन घडविणारे आणि व्यक्तीऐवजी विषयकेंद्रीत सादरीकरण असलेले बहुआयामी जुन्नर हे राज्यातील व कदाचित देशातीलही पहिलेच छायाचित्र प्रदर्शन असावे. सोबत संलग्न विषयांची प्रागैतिहासिक काळापासून सद्यस्थितीच्या विलोभनिय अविष्कारापर्यंतच्या बाबींशी थेट जोडणी करुन देणारे तज्ज्ञांचे परिसंवाद ही पुणे व परिसरातील विद्यार्थी, पर्यटक व अभ्यासकांसाठी आगळीवेगळी सुवर्णसंधी ठरेल. अधिकाधिक व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक शिवनेरी ट्रेकर्सचे अध्यक्ष निलेश खोकराळे यांनी केले आहे.

महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख माती विभागातून उपांत्य फेरीत भिडणार

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : शैलेश शेळके, संदीप मोटे, विशाल बनकर, अरुण बोंगार्डे स्पर्धेबाहेर

पुणे : महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख यांनी आपापल्या प्रतीस्पर्ध्याना पराभूत करताना महाराष्ट्र केसरीच्या माती गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सिकंदर शेख समोर बाला रफिक शेखचे तर महेंद्र गायकवाड समोर शुभम शिदनाळेचे आव्हान असणार आहे.

माती विभागाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी ‘उपमहाराष्ट्र केसरी’ असणारा लातूरच्या शैलेश शेळकेला सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने ५-२ असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाडने शैलेश शेळकेवर ताबा घेताना दोन गुण वसूल केले. शैलेश शेळकेने त्यानंतर नकारात्मक कुस्ती केल्याने पुन्हा एका गुण महेंद्र गायकवाडला देण्यात आला. महेंद्र गायकवाडने पहिल्या फेरीत ३ -१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत शैलेशवर ताबा मिळवत महेंद्र गायकवाडने पुन्हा २ गुणांची कमाई केली. त्यानंतर शैलेशने एक गुण मिळवला परंतू विजय साकारण्यात अपयशी ठरला.

कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेने सांगलीच्या संदीप मोटेला ४ – ० असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. शुभमने पहिल्याच फेरीत पहिल्याच प्रयत्नात एका गुणाची कमाई केली. मात्र यावेळी नाकाला जखम झाली असताना देखील संदीप कुस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. पुन्हा एकदा शुभमने संदीपला बाहेर ढकलत एक गुण वसूल केला. शुभमने पहिल्या फेरीत २ मिळवून आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत शुभमने दमदार खेळ करताना कटऑफ करताना २ गुण परत मिळवताना लढत जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

वाशीमच्या सिकंदर शेखने मुंबईच्या विशाल बनकरला १०-० असे एकतर्फी पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. पहिल्या फेरीत सिकंदर शेखने काही सेकंदातच ताबा मिळवताना २ पुन्हा ताबा घेतना २ अशी पहिल्या मिनीटाच ४ गुणांची कमाई केली. विशाल बनकर देखील आक्रमक चाली रचण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सिकंदरने प्रत्येक विशालच्या डावाला दमदार प्रत्युतर देताना विशालला गुण मिळू दिले नाहीत. यानंतर सिकंदरने भारंदाज डाव टाकताना थेट चार गुणांची कमाई करताना आपली बढत ८-० अशी वाढवली. दुसऱ्या डावात सिकंदरने तांत्रिक २ गुण मिळवत विजय साकारला.

जालन्याचा माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखने आपल्या नावाला साजेसा खेळ करताना कोल्हापूरच्या अरुण बोंगार्डेला ७-० असे पराभूत करताना उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. रफिकने पहिल्याच प्रयत्नात कटऑफ करताना २ गुण कमावले. त्यानंतर बाला रफिकने भारंदाज डाव टाकत पुन्हा २ गुण मिळविले. यानंतर बाला रफिक शेखने संयमी कुस्ती करताना पुन्हा एकदा अरुण बोंगार्डेचा ताबा घेताना २ गुण मिळविले. पहिल्याच फेरीत बाला रफिक शेखने ६ -० अशी आघाडी मिळविली. दुसऱ्या फेरीत अरुण बोंगार्डेने लढत देत गुण मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याला यश मिळाले नाही. मात्र बाला रफिकने तांत्रिक एक गुण मिळविताना ७-० असे मैदान मारले.

गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने वाशीमच्या वैभव मानेला ५-० असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. याच विभागातून पुण्याच्या तुषार डुबेने सोलापूरच्या अक्षय मंगवडेला २-० असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या लढतीत हिंगोलीच्या गणेश जगतापने सांगलीच्या सुबोध पाटीलला ५-० असे पराभूत करताना उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. चौथ्या लढतीत शिवराज राक्षेने माऊली कोकाटेला १० -० असे एकतर्फी पराभूत करताना महाराष्ट्र केसरी गटाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.

पुण्याच्या मार्केडयार्ड मधून मुंबईच्या ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखाची खंडणी मागणारे काही तासातच पकडले.

पुणे – पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातून मुंबईच्या एका ठेकेदाराचे आणि त्याच्या दोघा सहकाऱ्यांचे अपहरण करून ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीतील तिघांना अवघ्या काही तासातच पकडून अपहरण झालेल्या तिघांची सुटका पोलिसांनी केली आहे. आणि आता फरार झालेल्या दोघांच्या मागावर पोलीस आहेत .

या संदर्भात पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी कि,’ मुंबईतील कॉन्ट्रेक्टर यांचे पुण्यातुन अपहरण करणा-या आरोपीना काही तासांत गुन्हे शाखा, पुणे यांनी एल. सी. बी. अहमनदनगर यांचे मदतीने केले जेरंबद केले आहे. .दिनांक १३/१/२०२३ रोजी खबर देणार यांनी मार्केडयार्ड पोलीस स्टेशन पुणे येथे कळवले की, त्यांचा भाऊ व इतर दोन इसम यांचे दिंनाक १२/०१/२०२३ रोजी दुपारी मार्केटयार्ड पुणे परिसरातुन अज्ञात लोकांनी अपहरण करुन त्याचे सुटकेसाठी ५०,००,०००/- रु. खंडणी मागणी करुन रक्कम न दिल्यास त्यांना जिवे मारुन टाकण्यात येईल अशा प्रकारे फोनव्दारे कळविले होते.सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केडयार्ड पोलीस स्टेशन पुणे यांनी अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा यांना माहिती दिली. सदर घटनेबाबत अधिक माहिती घेतली असता आरोपीनी मार्केडयार्ड पुणे या भागातुन ३ कॉन्ट्रॅक्टर त्यांचे अपहरण केले असल्याचे सांगीतले.यातील आरोपी हे अपहरण केलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवरुन फिर्यादी व त्यांचे भाऊ यांस संपर्क साधून अपहरित व्यक्तींचे सुटकेसाठी ५० लाख रु. मागणी करीत होते. तसेच व्हॉटअॅपव्दारे व्हिडीओ कॉल करुन मारहाण करीत असलेबाबत फिर्यादींनी सांगीतले होते. याबाबत गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेवुन, गुन्हे शाखेची ५ पथके तयार केली होती. त्यानुसार सिसिटीव्ही तपासणी व तांत्रीक विष्लेषन करुन आरोपींचे शोधासाठी गुन्हे शाखेकडील पथके रवाना केली होती. पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्हयात आरोपी असलेचे निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व पुणे ग्रामीण यांचेशी संपर्क साधुन आरोपीतांचा शोध घेणेबाबत कळविले होते. सदर माहिती वरुन काष्टी श्रीगोंदा जि. अहमदनगर येथुन अपहरण झालेल्या ३ व्यक्तींची सुटका करुन आरोपी नामे १) प्रविण शिखरे २) विजय खराडे ३) विशाल मदने रा. अहमदनगर यांना लॉजवरुन ताब्यात घेण्यात आले आहे. इतर ५ ते ६ आरोपी पसार झालेआहेत.त्यांचा शोध् घेण्यात येत आहे. त्यांचेकडुन अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली फॉरच्युनरव क्रेटा कार हि वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत. सदर प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येतआहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीसनिरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, सुनिल पंधरकर, अजय वाघमारे, सपोनि विकास जाधव, सपोनि विशाल मोहिते, सपोनि कृष्णा बाबर, पोउपनि मोहन जाधव, अविनाश लोहोटे व गुन्हे शाखा पुणेकडील पथकात नेमण्यात आलेल्या अंमलदार यांनी केलेली आहे

जी-20 निमित्त पुण्यात ‘शहरी पायाभूत सुविधा’ या विषयावर परिषद

केंद्र, राज्य तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, शहर नियोजन अभ्यासक आले एकत्र

पुणे, 13 जानेवारी 2023

जी-20 निमित्त ‘जन भागीदारी कार्यक्रमा’चा भाग म्हणून आज पुण्यात ‘शहरी पायाभूत सुविधा’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. केंद्र, राज्य तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक यासाठी एकत्र आले होते. दिवसभर झालेल्या चार सत्रांमधून विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात आली.

अर्थमंत्रालाया अंतर्गत वित्त व्यवहार विभाग, पुणे महानगरपालिका, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर, पुणे व पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुरेंद्र बागडे

पहिल्या सत्रात ‘भविष्यातील शहरांसाठीची दृष्टी’ या विषयावर चर्चा झाली, यामध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुरेंद्र बागडे, पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राचे, प्रा. गुरूदास नूलकर, रायपूर महानगरपालिकेचे आयुक्त मयांक चतुर्वेदी आणि तानाजी सेन, संचालक, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती या तज्ज्ञांनी भाग घेतला. आपत्ती व्यवस्थापन, शहरी भाग आणि पाणी, गरीबी, तापमान, लोकसंख्या ही आव्हाने, भविष्यातील शहरांची कल्पना या मुददयांवर चर्चा करण्यात आली.

‘नगरपालिका वित्तपुरवठा व शहरी पायाभूत सुविधांचा विकास-नगरपालिका वित्तपुरवठ्यामध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारीची भूमिका’ या दुसऱ्या सत्रात सूरत शहराच्या आयुक्त शालिनी अगरवाल, नीती आयोगाच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी विशेषज्ज्ञ अल्पना जैन, पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रा. अभय पेठे, राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी – NIIFचे  सार्वजनिक- खासगी भागीदारी तज्ज्ञ अजय सक्सेना यांनी आपले विचार मांडले.

तिसऱ्या सत्रात ‘शहरी पायाभूत सुविधा व सेवा : संधी, आव्हाने व उपाय’ या विषयावर चर्चा झाली. यामध्ये गोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकनॉमिक्स, पुणेचे कुलगुरू प्रा. अजित रानडे, राष्ट्रिय पायाभूत सुविधा आणि विकास वित्तपुरवठा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय; भारतीय स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक अशोक शर्मा, कोटक पायाभूत सुविधा निधीचे कार्यकारी संचालक मुकेश सोनी यांनी आपली मते मांडली.

शेवटच्या सत्रात ‘शहर नियोजन’ अंतर्गत देशतील पाच शहराच्या आयुक्तांनी विविध विषयातील कार्यपद्धतीवर काय उपाययोजना केली याची माहिती दिली. चेन्नईच्या महसूल व वित्त विभागाचे उपायुक्त विशु महाजन यांनी ग्रेटर चेन्नईमध्ये महसूल निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. बडोदा महापालिका आयुक्त बंचानिधि पाणि यांनी राहण्यायोग्य शहरे करण्यासाठी प्रत्यक्ष नगर नियोजन कसे केले, याबद्दल सांगितले. पटियाला शहराचे आयुक्त आदित्य उप्पल यांनी मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आणि अनधिकृत बांधकामे शोधण्यास ‘जीआयएस’ यंत्रणेचा कसा फायदा झाला यावर प्रकाश टाकला. सुरतमध्ये सांडपाण्याची व्यवस्था काशी लावली आहे, हे उपस्थितांना समजावून सांगितले. त्यानंतर छत्तीसगडच्या रायपूर येथे मालमत्ता कर रचनेसाठी ‘जीआयएस’ यंत्रणेची अंमलबजावणी यशस्वी होत असल्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम-उपमुख्यमंत्री

पुणे, दि.१३: महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून उत्तमप्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे आयोजित ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, मेघना बोर्डीकर साकोरे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस महासंचालक तथा गृह रक्षक दलाचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार, अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंग, पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद आदी उपस्थित होते.

अनेक चांगल्या परंपरा महाराष्ट्राच्या पोलीस दलाने कायम केल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासह लोकशाहीची मुल्ये जपण्याकरिता पोलीस दल कार्यरत आहे. विपरीत परिस्थितीत पोलीस कर्मचारी काम करतात. पोलिसांनी कोरोना काळात जीवनाची जोखीम पत्करून प्रचंड काम केले. त्यादरम्यान काही पोलिसांना शहीद व्हावे लागले. अशाही परिस्थितीत सामान्य माणसाचे जीवन सुकर व्हावे यासाठी पोलीस दलाने काम केले, असेही ते म्हणाले.

पोलीस दलासाठी पुणे येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल
२०१९ मध्ये पुण्यात पोलीस दलातील खेळाडूंसाठी चांगले क्रीडा संकुल तयार करण्याचा मनोदय पोलीस महासंचालकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलीस विभागाकडून अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल. बालेवाडी येथे खेळासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. पण पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यादृष्टीने पायाभूत सुविधांची याठिकाणी व्यवस्था करण्यात येईल.

पोलीस दलातील खेळाडू देशाचे नाव मोठे करतात
उपमुख्यमंत्री म्हणाले, पोलीस दलातील क्रीडापटूंसाठी या स्पर्धा महत्वाच्या असून त्यातून क्रीडा गुणांना वाव मिळतो आणि राष्ट्रीय स्पर्धेतही आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याची संधी मिळते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी पदके मिळवतात, देशाचे नाव मोठे करण्याचे काम करतात. अशा खेळाडूंना वाव देण्यासाठी या स्पर्धांना महत्व आहे.

खेळात जय-पराजय होत असतो शेवटी खिलाडूवृत्ती महत्वाची असते. खिलाडूवृत्ती आत्मसात केल्यास विजय डोक्यात जात नाही आणि पराभवाने निराशा येत नाही. माणूस हरल्यानंतरही जिद्दीने कामाला लागतो. पोलिसांना तणावाचा सामना करावा लागत असल्याने त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी खेळ महत्वाचे आहेत. खेळामुळे शिस्त आणि जिद्द निर्माण हेाते, असे श्री.फडणवीस म्हणाले.

प्रशिक्षण संचालनालयाने क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून यातून पोलीस दलाला सन्मान मिळवून देणारे चांगले खेळाडू मिळतील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दलही कौतुगोद्गार काढले.

पोलीस महासंचालक श्री.सेठ म्हणाले, या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या उत्साहात पार पडल्या. पोलीस खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, संघभावना वाढावी, आरोग्य राहावे मनोबल वाढावे यासाठी या स्पर्धा उपयुक्त आहेत. या स्पर्धेत ६ नवीन विक्रम नोंदले गेले. पुणे येथे २८ एकर जागेत पोलीस क्रीडा संकुल आणि होस्टेल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री. फडणवीस यांचा हस्ते विजयी खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. महिला गटात मंजिरी रेवाळे यांनी सुवर्णपदक, प्रियंका फाळके रौप्यपदक आणि नाजुका भोर यांनी कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात पप्पू तोडकर यांनी सुवर्णपदक, बाबासाहेब मंडलिक रौप्यपदक आणि मल्लिकार्जुन बिराजदार यांनी कांस्यपदक पटकावले.

स्पर्धेमध्ये पुरुष गटात सर्वाधिक पदके मिळवत राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वाधिक क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

प्रास्ताविक अनुप कुमार सिंग यांनी केले. आभार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मानले.

यावेळी राज्य राखीव पोलीस बल, प्रशिक्षण केंद्र नानविज येथील प्रशिक्षणार्थीनी नाईट सायलंट आर्म ड्रील या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

बंगळूरू येथे आयोजित अलंकरण समारंभात दक्षिण कमांडमधील सैनिक आणि युनिटचा गौरव

पुणे 13 जानेवारी 2023-दक्षिण भारत एरिया मुख्यालयाच्या नेतृत्वाखाली, बंगळूरू येथील मद्रास इंजिनिअरिंग गृप अँड सेंटर येथे 12 आणि 13 जानेवारी 2023 रोजी दक्षिणी कमांड अलंकरण समारंभ आयोजित करण्यात आला.
लष्कराच्या दक्षिणी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह,एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम यांनी दक्षिण कमांडमधील 40 लष्करी अधिकारी, जवानांना शौर्य पुरस्काराने गौरवले. तसेच विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल24 युनिटांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या भव्य अलंकरण सोहोळ्यामध्ये मद्रासइंजिनिअरिंग गृप अँड सेंटर, मद्रास रेजिमेंटल सेंटर,बॉम्बे इंजिनिअरिंग गृप अँड सेंटर,महार रेजिमेंटल सेंटर, पॅरा रेजिमेंटल सेंटर तसेच नाशिक आणि हैदराबाद येथील तोफखाना केंद्र या सहा तुकड्यांनी अत्यंत प्रभावी संचलन सादर केले तसेच शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, मोटारसायकल कसरती, कॉम्बॅट फ्री फॉल आणि फ्लायपास्ट यांची विविध थरारक प्रदर्शने हे या समारंभाचे मुख्य आकर्षण ठरले.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आर्मी कमांडर सिंह यांनी सर्व पदकप्राप्त जवानांचे आणि गौरवप्राप्त तुकड्यांचे त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल अभिनंदन केले आणि अशाच प्रकारची कामगिरी भविष्यात करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या सोहोळ्यात गौरवण्यात आलेल्या जवानांनी दाखविलेले धाडस, शौर्य आणि समर्पण वृत्ती यांचे अनुकरण करुन देशाला आणि भारतीय लष्कराला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याचे आवाहन त्यांनी लष्कराच्या सर्वच श्रेणीतील कर्मचाऱ्यांना केले.दक्षिण कमांड हा भारतीय लष्करातील सर्वात प्राचीन आणि सर्वात मोठा विभाग असून तो भारतीय भूभागाचा सुमारे 40% भागावर कार्यरत आहे आणि त्याची कार्यकक्षा देशातील नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तारलेली आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.आर्मी कमांडर म्हणाले की दक्षिणी कमांडने काळाच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध केले असून लष्कराच्या असंख्य कारवायांमध्ये गुणवत्तापूर्ण कामगिरीसह यशस्वी सहभाग नोंदवला आहे.

पारितोषिक वितरण समारंभानंतर, आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी पारितोषिक विजेते जवान आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि त्या जवानांच्या अभूतपूर्व समर्पण तसेच देशसेवेप्रती कटिबद्धतेबद्दल तसेच कर्तव्यावर असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या माजी सैनिकांशी देखील त्यांनी संवाद साधला आणि त्यांचा वारसा, परंपरा तसेच त्यांनी देशाप्रती दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.
माजी सैनिकांचे कल्याण आणि स्वास्थ्याप्रती दक्षिण कमांडच्या वचनबद्धतेचा त्यांनी याप्रसंगी पुनरुच्चार केला.
बंगलुरू येथे प्रथमच दक्षिण कमांड अलंकरण समारंभ आणि सेना दिवस 2023 या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि हा अभिमानाचा क्षण म्हणजे दक्षिण भारतातील समृद्ध लढाऊ परंपरा आणि येथील लोकांचे समर्पण यांच्याप्रती आदरांजली आहे.

नाचणी, वरई, बाजरी, ज्वारी; तृणधान्य आहेत पौष्टिक भारी

पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच तृणधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने ‘मकर संक्रांती भोगी’ हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून घोषित केला आहे. तृणधान्याचे आहारातील महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी कृषि विभागाच्यावतीने वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत.

तृणधान्य सेवनाचे अनेक फायदे आहेत त्याविषयी राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवर आधारित लेख…..

 भारत हा जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे. आजकालची तरुण पिढी आरोग्यदायी खाणे व राहणे यावर लक्ष केंद्रित करत आहे. तृणधान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तंतुमय पदार्थ असल्यामुळे याकडे लोकं ‘सुपरफूड’ म्हणून पाहू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा यासारखे पौष्टिक तृणधान्ये ही कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्व आणि खनिजांनी समृद्ध आहेत.

उत्पादकता वाढवण्यावर भर 

पौष्टिक तृणधान्य पिकाचे उत्पादन प्रामुख्याने कोरडवाहू भागात होते. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांची पौष्टिक तृणधान्याची पीक पद्धती टिकून रहावी, याकरिता सुधारित बियाणे व अवजारे यांचा विविध योजनांद्वारे पुरवठा करुन उत्पादकता वाढवण्यावर महाराष्ट्र शासनातर्फे भर देण्यात येणार आहे. तसेच शासनातर्फे पौष्टिक तृणधान्य पिकाच्या प्रक्रिया व मूल्यसाखळी विकसनावर भर देण्यात येत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांकडून उत्पादित मालाचे मूल्यवर्धन होईल.या निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचा खप वाढेल आणि त्याचा फायदा कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक भाव मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरेल.

तृणधान्यांचे पोषणमूल्य

ज्वारी : रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित करते. रक्ताभिसरण वाढवते. ज्वारी वजन कमी करण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते. शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते. तसेच ह्रदयाचे आरोग्यही ज्वारीमुळे सुधारते.

बाजरी : बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन A, B व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे.

नाचणी : शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते.

राळा : यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटीऑक्सिडन्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. तसेच अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर होतो.

वरई : नवजात शिशु, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. सदृढ आरोग्य व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास वरई उपयुक्त आहे. वरई मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांचा धोका कमी करते.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्यानिमित्ताने करण्यात येणाऱ्या प्रबोधनामुळे महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल तर पौ‍ष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन व उत्पन्न वाढीमुळे बळीराजा सुखावेल.

000000

संकलन : विभागीय माहिती कार्यालय, पुणे

सिंहगड रोडवरील गॅस पाईपलाईनच्या आगीशी महावितरणचा संबंध नाही

पुणे, दि. १३ जानेवारी २०२३:सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ सुरू असलेल्या खोदकामामुळे एमएनजीएलच्या गॅस पाईपलाईनमध्ये काल (दि. १२) मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीशी कोणत्याही प्रकाराचा संबंध नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राजाराम पुलाजवळ महावितरणकडून भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदकाम करण्यात आलेले नाही किंवा त्यासंबंधीचे महावितरणकडून कोणालाही कंत्राट देण्यात आलेले नाही.

पुणे ते जोधपूर रेल्वे दररोज सुरु करा; अन्यथा…

अखिल राजस्थानी समाज संघ पुणेच्या वतीने आंदोलनाचा इशारा

पुणे-पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सुमारे ८ ते १० लाख राजस्थानी समाज वास्तव्यास आहे. व्यापार, व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने राजस्थानहून आलेल्या नागरिकांना जोधपूरला जाण्यासाठी आठवड्यातून एकदाच रेल्वे आहे. त्यामुळे पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे ही रेल्वे दररोज सुरु करावी, या मागणीसाठी अखिल राजस्थानी समाज संघ, पुणेच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवसह अनेक मान्यवरांची भेट घेतली आहे. ही रेल्वे सुरु करण्यासंबंधी आश्वासन मिळाले असली तरी ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळं पुणे ते जोधपूर दररोज रेल्वे च्या मागणीसाठी राजस्थानी समाज सोमवारपासून (दि.१६ जानेवारी) आमरण उपोषण करणार आहे. हे उपोषण पुणे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ केले जाणार असल्याची माहिती अखिल राजस्थानी समाज संघाकडून देण्यात आली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी अखिल राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष ओमसिंह भाटी, पुणे जिल्हा रिटेल व्यापार संघटनेचे अध्यक्ष सुनील गेहलोत, राजस्थानी सुतार समाजाचे अध्यक्ष मोहनलाल सुतार, पालिवाल ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष सुरजमल पालिवाल, कुमावत समाजाचे अध्यक्ष केसाराम कुमावत, कार्याध्यक्ष राधेशाम कुमावत, राजस्थानी माळी समाज, पुणेचे अध्यक्ष नरेश सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे रेल्वे दररोज सुरु करावी, या मागणीसाठी अखिल राजस्थानी समाज संघाने वेळोवेळी भेट घेऊन मंत्री, अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. २०१६ मध्ये महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनाही निवदेन दिले होते. पण आमची मागणी अद्यापपर्यंत मान्य झालेली नाही. दिल्लीमध्ये नुकतीच केंद्रीय संसदीय कार्य आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यांनी ही रेल्वे सुरु करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, यावर तातडीने कार्यवाही करून ही रेल्वे दररोज सुरू करावी, या मागणीसाठी अखिल राजस्थानी समाज संघ आग्रही आहे.


…तर १६ जानेवारीपासून उपोषण : ओमसिंह भाटी
पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे रेल्वे दररोज सुरु करावी यासाठी गेल्या ६ वर्षांपासून ही मागणी करत आहोत. पण आमची मागणी मान्य केली नाही. आमची रेल्वेमंत्र्यांना आणि भारत सरकारला विनंती आहे की आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही १६ जानेवारीला आमरण उपोषण करणार आहोत. तसेच २१ जानेवारीपासून जनआंदोलनही करणार आहोत. रेल्वेमंत्री, संसदीय कार्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनाही निवेदन दिले आहे. अद्यापपर्यंत आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ही रेल्वे दररोज सुरु करावी. अन्यथा राजस्थानी समाजाच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाटी यांनी दिला.

हा मूलभूत प्रश्न, तातडीने निर्णय घ्यावा : अचल जैन
पुणे आणि परिसरात राजस्थानमधून आलेल्या लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. लग्नकार्य असेल किंवा इतर काही कार्यक्रमासाठी राजस्थानला जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणी येतात. हा मूलभूत प्रश्न असून, त्यावर निर्णय घेऊन पुणे ते जोधपूर रेल्वेसेवा त्वरीत सुरु करावी, अशी मागणी सकल जैन समाज संघ पुणेचे अध्यक्ष अचल जैन यांनी केली.

…तर सरकारला मोठा आर्थिक फायदा : सुनील गेहलोत
पुण्यात सध्या ७ ते ८ लाख राजस्थानी नागरिक राहत असून, दररोज ८० ते १०० गाड्या पुणे ते जोधपूर सुरु आहेत. बसेसचे भाडे जास्त असल्याने तेही परवडत नाही. सुट्ट्यांच्या कालावधीत तर एका तिकिटासाठी सहा हजार घेतले जातात. रेल्वेचा प्रवास सुखाचा प्रवास आहे. ही रेल्वे दररोज सुरु केली तर सरकारला याचा मोठा आर्थिक फायदा मिळू शकेल. आम्ही सर्व संघटनांनी विनंती करूनही त्याला यश मिळाले नाही. पण आता ही रेल्वे दररोज सुरु करावी, अशी आमची सरकारला विनंती आहे.

सरकारने लवकर निर्णय घ्यावा : मोहनलाल सुतार
राजस्थानी समाज मोठ्या संख्येने राजस्थानला जात असतो, तेथून येत असतो. पण या लोकांना जाण्या-येण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्याने गैरसोय होत आहे. हा प्रवास १८ ते २० तासांचा असून, इतका मोठा प्रवास व्यवस्थित झाला नाही तर जीवितहानी होऊ शकते. याचे गंभीर परिणाम त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागतात. त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती आहे, असे मोहनलाल सुतार म्हणाले.

सरकारने गांर्भियाने दखल घ्यावी : नरेश सोलंकी
पुणे ते जोधपूर ही रेल्वे सुरु करावी. पुणे शहर आणि परिसरात साधारण १० लाख नागरिक राहतात. दररोज येथील हजारो नागरिक राजस्थानला जातात आणि तेवढेच राजस्थानातून पुण्यात येतात. त्यामुळे केवळ बससेवा आणि आठवड्यातून केवळ एकदाच रेल्वेसेवा एवढ्याशा साधनांवर लोकांना ये-जा करता येणे शक्य नाही. हे मूलभूत प्रश्न आहेत. पण या गोष्टींची सरकारने गांभिर्याने दखल घ्यावी आणि ही रेल्वेसेवा दररोज सुरु करावी, अशी मागणी सोलंकी यांनी केली आहे.

नियमित रेल्वे सुरु केल्यास अपघात टळू शकतात : सुरजमल पालिवाल
राजस्थानचा पुण्यापासून १८ ते २२ तासांचा प्रवास आहे. दररोज जाणाऱ्यांची संख्या हजारोंची आहे. रेल्वेसेवा असेल तर एका रेल्वेत अडीच हजारच्या आसपास लोक ये-जा करू शकतात. त्यामुळे बस आणि इतर खाजगी वाहनातून होणारी संख्या कमी होऊ शकते. होणारे अपघात टळू शकतात. जीवितहानी वाचू शकते. त्यामुळे याचा विचार करून राजस्थानी समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करावी, असे पालिवाल यांनी सांगितले.

सध्याची वाहतूक व्यवस्था तोकडी : केसाराम कुमावत
पुणे शहर आणि परिसरात व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि नोकरी निमित्ताने राजस्थानी समाज लाखोंच्या संख्येने येथे राहतो. जरी येथे स्थायिक झाले असले तरी त्यांचं मूळ राजस्थानात आहे. धार्मिक विधी, कौटुंबिक कार्यक्रम, सण-उत्सव निमित्ताने हा समाज नियमितपणे राजस्थानला जात असतो. पण सध्याची वाहतूक व्यवस्था तोकडी आहे. विमानसेवा परवडत नाही आणि ती थेटही नाही. सरकारने यावर विचार करून आमची मागणी मान्य करावी, असे कुमावत यांनी म्हटले आहे.

लांबपल्ल्याचा प्रवास अधिक धोकादायक : राधेशाम कुमावत
राजस्थानला जाण्यासाठी गुजरातमधून जावं लागतं. त्या रेल्वेत गुजरातचेही प्रवासी असतात. परिणामी, राजस्थानच्या मूळ नागरिकांना आरक्षण मिळत नाही. त्यात आठवड्यातून एकच रेल्वे असल्याने बस किंवा खाजगी गाड्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे रस्त्यांवर गाड्यांचे प्रमाण जास्त असते. लांबपल्ल्याचा प्रवास अधिक धोकादायक होतो. अपघाताच्या घटना घडल्या की कुटुंब अस्ताव्यस्थ होतं. त्यामुळे याचा सरकारने गांभिर्याने विचार करून दररोज रेल्वेसेवा सुरु करावी, ही आमची मागणी असल्याचे राधेशाम कुमावत यांनी सांगितले.