पुणे: निगडीमधील भक्ती-शक्ती चौकात एलपीजी गॅसचा टँकर उलटल्यानंतर संभाव्य धोका टाळण्यासाठी महावितरणचे सहायक अभियंता श्री. संतोष झोडगे व सहकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्याहस्ते पालिकेच्या सभागृहात नुकताच गौरव करण्यात आला.
निगडीमधील कै. मधुकरराव पवळे पुलाजवळ मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणारा भारत पेट्रोलियमचा एलपीजी गॅस टँकरला पहाटे अपघात झाला होता. टँकरमध्ये १८ टन गॅस असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलीस विभागाकडून महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार महावितरणकडून निगडी गावठाण, सेक्टर २४ व २६ तसेच साईनाथनगर परिसरातील पहाटे पाच वाजता चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच सहायक अभियंता श्री. संतोष झोडगे तसेच प्रशांत माळोदे, जितेंद्र सारंगधर, गोपाळ गिरी, किरण नलगे हे सर्व जनमित्र त्याच ठिकाणी दिवसभर उपस्थित राहून कर्तव्य बजावले होते. सुदैवाने सर्व यंत्रणेच्या योग्य समन्वयामुळे अपघातग्रस्त टँकरपासून मोठा धोका टळला. महावितरणच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्याहस्ते सहायक अभियंता श्री. संतोष झोडगे यांचा गौरव करण्यात आला.
पुणे : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कलावर्धिनी संस्थेतर्फे आयोजित ‘अनुग्रह ‘या भरतनाट्यम नृत्य सादरीकरण कार्यक्रमात गुरूंप्रती कृतज्ञ भावनेचे दर्शन घडले ! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी(मयूर कॉलनी, कोथरूड )सभागृहात ३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून यावेळी कलावर्धिनी ‘ च्या शिष्य परिवाराने ज्येष्ठ नृत्य गुरु डॉ. सुचेता भिडे- चापेकर यांचा कृतज्ञ भावनेने सत्कार केला. ‘वारसा ‘आणि ‘परंपरा’ अशा दोन सत्रात हा कार्यक्रम पार पडला. ‘वारसा’ मध्ये स्मिता महाजन,रमा कुकनूर,वृषाली चितळे-लेले ,शिल्पा देशमुख, केतकी नेवपूरकर यांचे नृत्य सादरीकरण झाले . ‘ परंपरा’ या सत्रामध्ये ज्येष्ठ नृत्य गुरु डॉ.सुचिता भिडे-चापेकर,अरुंधती पटवर्धन, सागरीका पटवर्धन यांचे नृत्य सादरीकरण झाले.डॉ.सुचिता भिडे-चापेकर,त्यांची कन्या-शिष्या अरुंधती पटवर्धन आणि नात सागरीका पटवर्धन या ३ पिढ्यांतील कलाकारांचे नृत्य सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय ठरले. या सर्व सादरीकरणांना पुणेकर रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तंजावूरच्या शहाजीराजांनी लिहिलेल्या मंजूळ पदांवर आधारित नृत्यरचना सादर करून डॉ. सुचेता भिडे- चापेकर यांनी नृत्य सादरीकरणाची सुरवात केली.नायिकांवरील सोलो ( एकल) नृत्य, ‘ नृत्य गंगा ‘ तील काही प्रवेश तसेच ‘ आओ प्यारे नंदलाला ‘ ही बंदीश सादर करून डॉ. सुचेता भिडे- चापेकर यांनी उपस्थितांची मने जिंकली.
त्या आधी आदी शंकराचार्यांच्या गुरू अष्टकम् रचनेवरील नृत्याने प्रारंभ झाला. ‘ परंपरा ‘ सत्रात अरूंधती पटवर्धन आणि शिष्यांनी ‘ आलारूपी (‘ अलरू ‘ ) संरचना सादर केली. कार्तिकेय स्तुती ‘ ही रचना सादर करण्यात आली.शिल्पा देशमुख आणि शिष्यांनी सरस्वती रचना सादर केली. वृषाली चितळे -लेले,रमा कुकनूर यांनी ‘ नच सुंदरी करू कोपा ‘ या नाटयपदातून कृष्ण -रूक्मीणीतील रुसवा विलोभनीय स्वरूपात सादर केला.’ रामनाम बभुव ‘ श्लोकावर आधारित रचना सादर करण्यात आली. नृत्य ही सर्वसमावेशक कला : डॉ. सुचेता भिडे- चापेकर नृत्य ही सर्वसमावेशक कला आहे.आकाशाच्या कॅनव्हासवर रेषा उमटविण्याचे ही कला आहे. सर्व कलांना ही कला सामावून घेते. अभिनयही हालचालीतून केला जातो. ही दृश्य रुपं मला समजत गेली, घरचा पाठींबा मिळाला. सगुण- निर्गुण कल्पना आपल्याकडे सुरेख आहेत. भारतीय तत्वज्ञान या कल्पनांना सामावून घेतात. देवाची व्यक्तीमत्वे नृत्यशैलीतून व्यक्त होतात. सर्व कलाकार परफॉर्मर होतील असे नाही, पण,आयुष्यभर पुरणाऱ्या जाणीवा नृत्यकलेतून दिल्या जातात.नृत्य ही संगीत,साहित्य, हस्तमुद्रांची भाषा आहे.ती पुढे जात राहावी.
मुंबई-अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या कालच्या बंडानंतर आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन टीम जाहीर केली आहे. खासदार सुनील तटकरे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. तटकरेंनी नवीन नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे.काही दिवसापूर्वी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद देण्यात आले होते. त्या साध्य देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. आता त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुन्हा देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या विद्या चव्हाण या शरद पवार यांच्या सोबत आहेत.यावेळी सुनिल तटकरे यांनी विविध संघटनात्मक नियुक्त्या केल्या. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केली. तर युवक काँग्रेस अध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती केली. यावेळी प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे आणि सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती, तटकरे यांनी दिली.
रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या.2002 पासून पुढची 5-6 वर्षं रुपाली चाकणकर यांनी परिसरातील महिला बचतगटासाठी काम केलं. पुढे चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. तिथून रूपाली चाकणकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. रुपाली चाकणकर यांचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांची पुणे शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 2019 ला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अचानक भाजपात प्रवेश करून धक्का दिला. तेव्हा रुपाली चाकणकर यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पदाची जबादारी देण्यात आली. आता पुन्हा अजित पवारांच्या बंडानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबादारी दिली आहे.
जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र ठरविण्यासाठी कार्यवाही सुरु …
मुंबई-
रविवारच्या शपथविधी समारंभानंतर अजित पवार यांच्या गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी खासदार सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही पटेलांनी आज पत्रकार परिषदेतून दिली.
अजित पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करत असल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.याशिवाय अनिल पाटील हेच आमचे प्रतोद असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे–डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर केवळ हेरगिरीचे आरोप पत्र ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल केला गेला नाही असा संतप्त सवाल विचारत पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे शिवाजीनगर येथील एटीएस कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, कॉंग्रेसचे नेते दत्ता बहिरट, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूजा आनंद यांनी यावेळी एटीएस कार्यालयात निवेदनही दिले.
शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असल्यामुळेच देशद्रोहाचा गुन्हा न नोंदवता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर दुर्दैवाने देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला नाही . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असल्यामुळेच त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे हे स्पष्टपणे दिसत आहे असेही निवेदनात म्हंटले आहे.
पुण्यातील डीआरडीओ ही अत्यंत महत्वाची संशोधन संस्था पंतप्रधान कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असते मात्र तरीही देशद्रोहाचा आरोप लावला जात नाही. त्यामुळेच शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर पुरवणी चार्जशीटमध्ये भारतीय दंड संहिता १२४अ च्या अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत कॉंग्रेस पक्ष अधिक तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीच्या गेल्या ९ वर्षात अनेक पर्यावरणवादी, मानवी हक्कासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते अशा निरपराध शेकडोंवर देशद्रोहाचे गुन्हे नोंदवले गेले आहे. या राज्यवाटीला विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी असे देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र ज्याने खरच देशद्रोह केला आहे अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्याशी निगडीत असणाऱ्या शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर मात्र देशद्रोहाचा आरोप न ठेवता त्यांना या गंभीर गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे निषेधार्य आहे, संतप्तजनक आहे. त्याचा प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयाने विरोध केला पाहिजे असे निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी एटीएस कार्यालयाबाहेर झालेल्या निदर्शनात सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत अविनाश बागवे, रमेश अय्यर, प्रशांत सुरसे, नुरुद्दीन सोमजी, चेतन अग्रवाल, चैतन्य पुरंदरे, शाबीर शेख, शानी नवशाद, अजित जाधव, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे पाटील, आशिष व्यवहारे, बाळासाहेब मारणे, विनोद रणदिवे, सुरेश कांबळे, अनिल पवार, अॅड राजेन्द्र काळभरे, नुर भाई अँथनी, शिरवराज भरत सुराणा, बाबा सय्यद, आशा पाटोळे, राधिका मखामले, आयुब पठाण, बबीता सोनवणे, सोनी ओव्हळ, परवेज तांबोळी, आशुतोष जाधव, हार्दिक परदेशी, राहुल सुपेकर, सचिन बहिरट, अंजली सोलापुरे, विनोद रणपिसे, राजु नाणेकर, जयसिंग भोसले आदी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
मुंबई-शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे ,विजय देशमुख यांना पक्षातून बडतर्फ केल्याचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. ट्वीट र वर हे पत्र पोस्ट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या पत्राची दखल घेऊन पक्षविरोधी कारवाई केल्यानं शरद पवार यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे.अजित पवार यांच्या शपथविधीला पाठिंबा देऊन आणि शपथविधीला उपस्थित राहून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे, असं ट्विट शरद पवार यांनी केलं. तत्पूर्वी अजित पवार यांना साथ दिलेल्या नऊ आमदारांवर राष्ट्रवादीने पक्ष शिस्तीचा भंग केल्याची कारवाई केली आहे.
I, as the National President, Nationalist Congress Party hereby order removal of the names of Shri Sunil Tatkare and Shri Praful Patel from the Register of Members of NCP Party for anti-party activities.@praful_patel@SunilTatkare
सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी २ जुलैला पक्षाची घटना आणि नियमांचं स्पष्टपणे उल्लंघन केलं आहे. पक्ष शिस्त तसंच पक्षाच्या ध्येयधोरणांविरोधात कृती केल्यानं तटकरे आणि पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तटकरे आणि पटेल यांच्यावर पक्षाकडून झालेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. अजित पवारांनी काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रफुल पटेल आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर शरद पवारांकडून कारवाई करण्यात आली आहे.
पुणे : निराश्रीत, विधवा, कष्टकरी, तळागाळातील, मागासलेल्या वर्गासाठी कार्य करणे गरजेचे आहे. केवळ मदत न देता, त्या वर्गाच्या यशानंतर त्यांचे कौतुक देखील होणे गरजेचे आहे. याप्रकारचे कार्य शांताई सारख्या महाराष्ट्रातील सामाजिक संस्था करीत आहेत. दृष्टी असेल तर आपल्याला सगळे दिसते. कोणतीही गोष्ट पाहून आपण ती आत्मसात करतो. ती सामाजिक दृष्टी देण्याचे कार्य समाजात व्हायला हवे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. शांताई संस्थेतर्फे येरवडा येथील शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झेप पुरस्कार वितरण सोहळा, गुणवंत विद्यार्थी व आदर्श मातांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष अरुण वाघमारे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, बिशप थॉमस डाबरे, सामाजिक कार्यकर्ते आयुब शेख, व्याख्याते दत्ता कोहिनकर, संस्थेचे अध्यक्ष बाप्पू कांबळे, संचालिका रश्मी कांबळे, फादर रॉबिन, अमोल राजगुरू, राजू गायकवाड, सुहास राजगुरू, अनिरुद्ध हळंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देखील देण्यात आले. शांताई जीवनगौरव पुरस्कार गुलामअली सोमाजी, अॅड. टेÑव्हर आयझॅक, उषा वाजपेयी, समाज भूषण पुरस्कार प्रशांत वाघमारे, पूजा आनंद, जितेश खरात, झेप पुरस्कार सिद्धार्थ भांगे, अतुल गायकवाड, विशेष पुरस्कार मनीष भोसले, नील परब व निखील परब यांना प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. डॉ.दिलीप पाटील भुजबळ म्हणाले, समाजातील वेगवेगळे घटक आहेत, त्या घटकांकरिता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्यरत असणे गरजेचे आहे. माणसाचे आयुष्य अनमोल आहे. त्या काळात अनेक गोष्टी आपण करु शकतो. फक्त समाजासाठी कार्य करण्याची तळमळ असणे गरजेचे आहे. बाप्पू कांबळे म्हणाले, शिक्षणाची गंगा तळागाळात पोहोचविण्याकरीता आम्ही कार्यरत आहोत. त्यासोबतच घरातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याकरिता पाठबळ देतो. शांताई संस्था विद्यार्थी, महिलांना मदतीचा हात देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न गेल्या २० वर्षांपासून करीत आहे. जीवनात प्रेरणा मिळावी आणि आत्मविश्वास मिळावा, याकरिता वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. दत्ता कोहिनकर म्हणाले, संकटाला तोंड दिले तर संकटे दूर पळून जातात. संकटाला तोंड देण्यासाठी आपली तब्येत धष्टपुष्ट असायला हवी. त्याकरिता रोज व्यायाम करायला हवा. शरीराने बलवान व मनाने सबल असाल, तर आपण यशस्वी होऊ. पुस्तकी ज्ञान म्हणजे करिअर नाही. मुलांचे शरीर, मन कसे आहे, हे पाहण्याकरिता मुलांना बाहेरच्या जगात पाठवायला हवे. मुले कोणाच्या संगतीत राहतात, त्यावर त्यांचे करिअर व यशस्वीता ठरते, असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिपरिषदेची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत अमित शहा, जे पी नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. आज दुपारी साडे चार वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची जोरदार चर्चा आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीसांना यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिलं जाणार आहे. अजित पवार यांच्यासह एकूण नऊ आमदारांनी रविवारी शपथ घेतली. अजित पवार यांच्या पाठीशी असणाऱ्यांमध्ये शरद पवारांचे निष्टावान प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश आहे. गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत फेरबदलांविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे असणारे प्रफुल्ल पटेल या बंडात सहभागी झाले असून सूत्रांच्या माहतीनुसार प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिलं जाणार आहे.
नियमानुसार केंद्र सरकारमध्ये पंतप्रधानांसह एकूण 81 मंत्री केले जाऊ शकतात. मंत्रिमंडळात सध्या 78 मंत्र्यांचा समावेश असून केवळ तीन पदे रिक्त आहेत. गेल्या वेळी मंत्रिमंडळ विस्तारात 12 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यावेळी 36 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली, तर सात मंत्र्यांना बढती देण्यात आली.
पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. पीटीआयने भाजपच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, पंतप्रधान मोदी जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतील तेव्हा मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता आहे. 20 जुलैपासून सुरू होणार्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
सोलापूर:महाराष्ट्र राज्यातील १५ ते २५ वयोगटातील मुली, युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे व हिंसाचाराच्या विरुद्ध त्यांचे मनोबल उंचावणे या हेतूने राबवण्यात येणाऱ्या राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज येथे राज्यस्तरीय उद्घाटन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते पाटील, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रभारी कुलगुरू रजनीश कामत, महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षाधीन अधिकारी नितीन इरकल आणि दीपक धायगुडे , जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अतुल वाघमारे आदि उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत आज महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग येथे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. हे प्रशिक्षण दि. १५ जुलै पर्यंत देण्यात येणार असून, सोलापूर जिल्ह्यातील ५०, पश्चिम महाराष्ट्र ५०० तर संपूर्ण महाराष्ट्रातील ३ लाख ५० हजार महाविद्यालयातील युवतींना राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये एक हजार मुलींना आणि जिल्हास्तरीय एक हजार अशा एकूण १२ हजार युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत.
अलिकडील काळात महिला व मुलींवर होणारा हिंसाचार व त्यातून त्यांची केली जाणारी हत्या हे शासन व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन तरुण – तरुणी यांची जीवनशैली तंत्रज्ञानाने बदलली आहे व त्यातून सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. म्हणून राज्यातील युवतींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देणे व त्यांचे समुपदेशन करणे या हेतूने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आजपासून राज्यस्तरावर सुरू करण्यात येत आहे.
प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास हार घालण्यात आला. यावेळी मंत्री श्री. लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून युवतींना विविध प्रात्यक्षिकांतून स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.
एकूण ३६३.५ किलो वजन उचलून शर्वरी ठरल्या स्ट्रॉंग वुमन ऑफ एशिया- पॅसिफिक- आफ्रिकन रीजन पुणे : आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवरलिफ्टिंग आणि बेंच प्रेस स्पर्धेत पुण्याच्या डॉक्टर शर्वरी इनामदार यांनी दुहेरी यश संपादन केले. त्यांनी नवीन ‘आशियाई स्क्वॉट रेकॉर्ड’ व नवीन ‘आशियाई टोटल रेकॉर्ड’ सह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. क्लासिक बेंच प्रेस स्पर्धेमध्ये सुवर्णपदकासह ‘बेस्ट लिफ्टर ऑफ एशिया- पॅसिफिक- आफ्रिकन रिजन’ हा “स्ट्रॉंग वुमन” एशिया- पॅसिफिक- आफ्रिका म्हटला जाणारा मानाचा किताबही पटकावला
क्वीन एलिझाबेथ स्टेडियम, हॉंग कॉंग येथे स्पर्धा पार पडल्या. एशिया, पॅसिफिक व आफ्रिकन अशा तीन खंडातील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मंगोलिया, श्रीलंका, चायना, चायनीज ताईपै, हॉंगकॉंग, जपान, साऊथ आफ्रिका, कझाकिस्तान, इराण, इराक, सिंगापूर फिलिपिन्स आदी १८ देश या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. डॉ. शर्वरी इनामदार यांनी ५७ किलो महिला गटात क्लासिक पाॅवरलिफ्टिंग मध्ये एकूण ३६३.५ किलो वजन उचलले. चुरशीच्या स्पर्धेत विजयश्री खेचून आणली. त्या पुणे येथे ‘कोड ब्रेकर’ नावाची जिम व ‘आहार आयुर्वेद’ हे क्लिनिक चालवतात. परिश्रम, सातत्य चिकाटी, घरच्यांचे व आप्तस्वकीयांचे पाठबळ या गोष्टी स्पर्धा खेळण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रोत्साहित करतात, असे डॉ. इनामदार त्यांनी सांगितले.
पुणे : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… गुरुदेव दत्त… च्या जयघोषाने बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या परिसर दुमदुमून गेला. दत्तमंदिर ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने मंदिरात व मंदिर परिसरात विविधरंगी फुलांची आकर्षक आरास व नयनरम्य विद्युतरोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून भाविकांनी दर्शनाकरिता मंदिरात मोठया प्रमाणात गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेची माध्यान्ह आरती प्रविण मसाले चे चेअरमन राजकुमार चोरडिया व कुटुंबियांच्या हस्ते झाली. याप्रसंगी श्री बालाजी सोसायटी व अभिमत विद्यापीठाचे बालसुब्रमन्यम परनधामन व त्यांच्या पत्नी चेंदूरवर्धिनी उपस्थित होत्या. तसेच दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे आदी उपस्थित होते. संपूर्ण मंदिरावर देखील आकर्षक पुष्परचना करण्यात आली होती. त्यामध्ये गुरु-शिष्याचे चित्र फुलांमध्ये साकारण्यात आले. कळसापर्यंत करण्यात आलेली फुलांची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. सोमवारी पहाटे ६.३० वाजता ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग व अंजली काळकर यांच्या हस्ते लघुरुद्र झाला. त्यानंतर प्रथमेश व मीनल गाडवे यांच्या हस्ते श्री दत्तयाग संपन्न झाला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सपत्नीक दर्शन घेऊन आरती केली. तर, सकाळी आमदार रवींद्र धंगेकर व प्रतिभा धंगेकर यांच्या हस्ते प्रात:आरती पार पडली. संपूर्ण दिवसभर मंदिरासमोरील उत्सव मंडपात भाविकांनी स्वहस्ते अभिषेकाचा देखील लाभ घेतला. सायंकाळी डॉ.अनघा राजवाडे यांचा गुरु साक्षात परब्रह्म हा गायन सेवेचा कार्यक्रम देखील झाला. उत्सवात आयोजिलेल्या कीर्तन महोत्सवात ह.भ.प. रामनाथ अय्यर, मानसी बडवे, रेशीम खेडकर, नम्रता निमकर, शेखर व्यास, वासुदेव बुरसे, विश्वास कुलकर्णी, हर्षद जोगळेकर या दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन झाले. त्यांना हार्मोनियमवर कौस्तुभ परांजपे, चिंतामणी निमकर आणि तबल्यावर सोहम जोशी यांनी साथसंगत केली. गुरु-शिष्य परंपरेची संकल्पना घेऊन विविध सांप्रदायातील गुरु-शिष्यांच्या आख्यानांवर कीर्तन झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लुई ब्रेल अंध अपंग संस्थेचा कार्यक्रम, हटके म्युझिकल ग्रुपतर्फे गीतरामायण आणि आरव पुणे निर्मित नाम रंगी रंगुनी हा कार्यक्रम झाला. तसेच दररोज सकाळी मंदिरामध्ये श्री गुरुचरित्र पारायण, उत्सव मंडपात दुपारच्या वेळेत विविध भजनी मंडळांतर्फे भजनाचे कार्यक्रम आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. ओम ब्लड बँकेच्या सहयोगाने रक्तदान शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते.
मुंबई-राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर होणाऱ्या कायदेशीर कारवाईला सामोरे कसे जाणार? तसेच नवीन मंत्र्यांचे खातेवाटप, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जात त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. काही वेळातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील सागर या बंगल्यावर दाखल झाले. त्यामुळे जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेबाबत कायदेशीर प्रक्रियेवर सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणत्या मंत्याला कोणते खाते
तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते देण्यात यावे, यावर देखील या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना मंत्रालयात केबिन देण्याची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. या सर्व राजकीय घडामोडी दरम्यान राज्यातील राजकारणात चांगलीच रंगत आली आहे.
अजित पवारांकडे अर्थ खाते जाणार का?
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार हे आधीच्या सरकारमध्ये म्हणजेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अर्थ मंत्री होते. आता शिंदे – फडणवीस सरकारमध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात येईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. सध्या अर्थ मंत्रालय देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहत आहेत. मात्र आता ते अजित पवारांकडे एवढे महत्त्वाचे खाते सोपवणार का? त्यांचा अर्थमंत्री पदाचा अनुभव पाहता त्यांच्याकडे अर्थ खात देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना पहिला धक्का बसला आहे. कारण शपथविधीला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे.अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन आपली भूमिका जाहीर केली आहे. “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत” असं अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुनिल तटकरे काल (2 जुलै) राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं जात होतं. तर शरद पवार यांना हा मोठा धक्का समजला जात होता. मात्र आज अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबत असल्याचं ट्वीट केलं आहे.अमोल कोल्हे म्हणाले की, “काल शपथविधीची मला कल्पना नव्हती. मी वेगळ्या चर्चेसाठी अजित पवारांकडे गेलो होतो. त्यावेळी अचानक शपथविधी झाला. पण माझी भावना आहे की मी शरद पवार साहेबांसोबतच आहे. मी जाहीरपणे सांगतोय, साहेबांना भेटूनही सांगेन की मी त्यांच्यासोबतच आहे. वडिलधाऱ्यांना वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे. काल शपथ घेणाऱ्यांचं मी अभिनंदन केलं. पण शपथ घेतली म्हणून अभिनंदन केलं, मात्र मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण हाच माझ्यासाठी धक्का होता. ज्यांनी शपथ घेतली त्यांचा तो निर्णय होता.
मुंबई: शरद पवार यांना कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून अजित पवारांच्या शपथविधीवेळी सह्या करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रचंड धास्तावले आहेत. लोकनेता असलेल्या शरद पवारांना कराडमध्ये लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ही गर्दी पाहून राष्ट्रवादीच्या आमदारांना भीती वाटू लागली आहे. शरद पवार मतदारसंघात विरोधात उभे ठाकल्यास काय होईल, ही चिंता शपथविधीला उपस्थित असणाऱ्या आमदारांना सतावत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.याशिवाय, अजित पवार यांच्या समर्थकांकडून बॅनर्सवर शरद पवार यांचा फोटो वापरला जात असल्याबद्दलही आव्हाड यांनी टिप्पणी केली. अजित पवार यांनी विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता अजित पवार यांच्या समर्थकांनी बॅनर्सवर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो लावावा, असे आव्हाड यांनी म्हटले.अजित पवार हे सोमवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. खातेवाटप निश्चिती करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरु असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४२ आमदारांचं समर्थन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रातून शरद पवारांना प्रचंड मोठा पाठींबा , साताऱ्यात तुडुंब गर्दी …
सातारा : राष्ट्रवादीत झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना पवार यांनी राजकीय लढाईचं रणशिंग फुंकलं आहे. ‘महाराष्ट्रातील सामान्य माणूस राज्यात राजकीय उलथापालथ घडवणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची योग्य जागा दाखवून देईल,’ असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
#WATCH | NCP President Sharad Pawar addresses party workers in Satara after Ajit Pawar joins BJP-Shinde Shiv Sena govt in Maharashtra pic.twitter.com/O3LDambrIS
प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावरून बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘राज्याराज्यांतील सरकारे उलधून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेशमध्येही सुरू आहे. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवरायांच्या, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू केला आहे. लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या पक्षाला धक्का देण्याचा हा प्रयत्न आहे. देशात यांना जातीय हिंसा वाढवायची आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवून आणण्यात आली आहे. याच प्रवृत्तींना तुमच्या आमच्यातील काही सहकारी बळी पडले आहेत. पण ठीक आहे, एखादा व्यक्ती बळी पडला असेल, मात्र या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील, परंतु तो या महाराष्ट्राची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय आणि या शक्तीतून महाराष्ट्रात उलथापालथ घडवणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीला फार अवकाशही राहिलेला नाही. वर्ष-सहा महिन्यांमध्ये निवडणुकांतून ही जागा दाखवली जाईल,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.’यशवंतराव चव्हाणसाहेब आज नसले तरी त्यांनी दिलेला विचार तुमच्या माझ्या अंत:करणात आहे. हा विचार पुढे नेण्याची भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. महाराष्ट्रात आणि देशात आज माणसा-माणसांमध्ये संघर्ष निर्माण करण्याची काळजी सत्ताधाऱ्यांकडून घेतली जात आहे. महाराष्ट्र हे बंधुत्वाचा पुरस्कार करणारं राज्य आहे. मात्र याच महाराष्ट्रात शाहू महाराजांचं कोल्हापूर असो किंवा नांदेड, संगमनेर, अकोला यांसारख्या शहरांमध्ये एकमेकांमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या शहरांमध्ये जातीय दंगली झाल्या आणि हे महाराष्ट्राला शोभणारं नाही,’ असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.