Home Blog Page 1452

प्रजासत्ताकदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण

नागपूर, दि.२६ : येथील कस्तुरचंद पार्कवर आयोजित भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह  राज्य  शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. फडणवीस यांनी नागपूर पोलीस, होमगार्ड, छात्रसेना, स्काऊटगाईड आदी १७ पथकांचे खुल्या जिप्सीमधून निरीक्षण केले. परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या नेतृत्वात या सर्व पथकांनी मुख्यमंचासमोरून पथ संचलन केले. श्री. फडणवीस यांनी  या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली. अश्वदल, श्वानपथक आणि अग्नीशमनदलाचेही पथसंचलन झाले. जिल्हा क्रीडा परिषदेचा चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाला. विद्यार्थ्यांनी या चित्ररथावर मल्लखांबासह योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केली.

उपमुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थी आणि जवानांचे कौतुक

दरम्यान  प्रजासत्ताक दिनाच्या कस्तुरचंद पार्क येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यात जवानांचे आणि आजच्या पथसंचलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पालकमंत्र्यांनी त्यांना सन्मानित केले.

शहीद जवानांच्या वारसांना व अपंग जवानांचा ताम्रपट, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मंगेश रामटेके या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा तसेच निलेश दमाहे, ले. कर्नल अमोल चौधरी, मेजर प्रतर्दन गोपाळ साखळकर, तल्हार विजय मनोहर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमस्थळी उपस्थित नागपूर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीर पत्नी व परिवारातील सदस्यांची भेट घेत त्यांनी विचारपूस केली.

केंद्रीय गृहमंत्री पदक तसेच उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्काराबद्दल नागपूर शहरच्या सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त शाळांच्या विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करीत पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

०००

विधानभवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजवंदन

पुणे दि.२६: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त विधानभवन प्रांगणात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, उपायुक्त वर्षा लढ्ढा उंटवाल, राहुल साकोरे, रामचंद्र शिंदे, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.
000

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे दि.२६:-भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा येथील प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात येऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे दि. २६: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सुधाकर काटे आणि पुणे शहराचे सहायक पोलीस उपनिरीक्षक धनंजय बारभाई तसेच केंद्रीय गृहमंत्री पदक प्राप्त पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री.पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करावा- पालकमंत्र्यांचे आवाहन
पालकमंत्री श्री.पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. लोकशाही बळकट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री म्हणाले, भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान न्याय, बंधुता आणि सर्वांना समान मूल्य देणारी समता दिली. अनेक देशांना मताचा अधिकार मिळण्यासाठी विशेषतः गरीब, महिलांना संघर्ष करावा लागला. भारतीय राज्यघटनेने मात्र पहिल्या दिवसापासूनच सर्वांना समान मताचा अधिकार दिला. त्यातून सर्वसामान्य माणूस त्याच्या कर्तृत्वाच्या बळावर उच्च पदावर पोहोचू शकतो. नागरिकांनी अधिकारासोबतच कर्तव्य पालनाबाबत सजगता दाखवावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी पद्मभूषण पूरस्कार जाहीर झालेले शास्त्रज्ञ डॉ. दीपक धर यांच्यासह राज्यातील पद्म पुरस्कार विजेते, राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचे आपल्या मनोगतात अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मतदार नोंदनीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल भारत निवडणूक आयोगाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

पोलीस दलाने शानदार संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २, पुणे शहर पोलीस दलाचे पुरुष पोलीस, महिला पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस, लोहमार्ग पोलीस, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस, वन, अग्निशामक दल तसेच इमॅन्युएल मार्थोमा स्कूल, भारती विद्याभवन स्कूल या शाळांच्या मुले व मुलींच्या पथकांनी शिस्तबद्ध संचलन केले. तसेच पोलीस वाद्यवृंद, श्वानपथक, वज्र वाहन, जलद प्रतिसाद दल वाहन, वरुण वाहन, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, बालभारतीचा चित्ररथ, महानगरपालिकेची स्वच्छ्ता वाहने यांनीही संचलनात सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले.

शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली .
000

सिरीयल किलरला जायबंदी करणाऱ्या बार्शीच्या शिरीष पवारांचा गौरव!


रायगडातील खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील शिक्षक कृष्णात पवार यांचा मुलगा शिरीष मोठ्या जिद्दीने कृषी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला जातो. जीवनात काही तरी घडवून दाखविण्याचे स्वप्न घेवून कृषी पदवीचे शिक्षण घेत असताना जिवाभावाच्या मित्रांचे प्रचंड मोठे जाळे विणत स्पर्धा परिक्षेच्या तयारीला लागतो.आपली वाटचाल सुकर करण्यासाठी आपण काढलेल्या अभ्यासाच्या नोट्स चे बुकलेटस बनवूनही विकतो.स्पर्धा परिक्षेत यश संपादन करुन पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस खात्यात रुजू होतो. प्रेमळ, दिलखुलास स्वभाव आणि माणुसकीचा उपजत पिंड लाभलेल्या शिरीष कृष्णात पवार या कमिटेड तरुणाचा पोलिस खात्यातील सेवेचा प्रवास तब्बल २५ वर्षांपूर्वी सुरु झाला. अभ्यासू वृत्ती, संघटन कौशल्य आणि आपल्या अखत्यारीतील प्रशासनावर जबरदस्त पकड यामुळे पोलिस खात्यात मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी न्याय दिला.आर्थिक गुन्हे असो वा अट्टल गुन्हेगारांचा शोध असो आपल्या कौशल्याने त्यांनी अनेक प्रकरणे तडीस नेली. काही वर्षांपूर्वी तर नवी मुंबईत चिंतेचा विषय ठरलेल्या सिरीयल किलरला जायबंदी करताना स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.आपल्या कर्तव्याच्या कमिटमेंटला जीव धोक्यात घालण्याच्या जिद्दीची जोड देणे,हे शिरीष पवार यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे.सध्या रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या शिरीष पवार यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक बहाल करुन गौरव करण्यात आला.त्यांचे आणि त्यांच्या जीवन प्रवासात खंबीर साथ देणारी पत्नी सौ.प्रतिमा,मुलगा सार्थक व आई-वडिलांचे मनःपूर्वक अभिनंदन!
राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र.
शिरीष पवार यांचा मोबाईल नंबर:- +91 98701 55201

अमृता खानविलकर साकारणार ‘ललिता शिवाजी बाबर’


प्लॅनेट मराठी आणि एंडेमॅाल शाईन इंडिया घेऊन येत आहेत मराठीतील भव्य सिनेमा

जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ‘ललिता शिवाजी बाबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषि नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. आजवर अनेक हिंदी शोज, चित्रपट राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे एंडेमॅाल शाईनं इंडिया आणि मराठी कॅान्टेन्टला एका वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देणार, हे नक्की! ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा तिचा पहिलाच बायोपिक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून पुढील वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘ललिता बाबर’ यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ”एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. ऑलिंपिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिल्या धावपटू आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, जेणे करून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेन.’’

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” साताऱ्यातील एका लहान गावात, शेतकरी कुटुंबात ललिता बाबर यांचा जन्म झाला. ललिता बाबर यांच्या प्रवासाला त्यांच्या लहानपणापासूनच सुरुवात झाली. त्या रोज शाळेत धावत जात असत आणि तिथूनच त्यांनी आपला धावण्याचा सराव सुरु केला. त्यांच्या या मार्गात अनेक अडथळे आले, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. आज संपूर्ण जगात त्या ‘माणदेशी एक्सप्रेस’ या नावाने ओळखल्या जातात. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकालाच नवीन ऊर्जा देणारा आहे. म्हणूनच त्यांचा हा स्फूर्तिदायी प्रवास जगभरात पोहोचावा, याकरता एंडेमॉल शाईन इंडिया यांच्या साथीने आम्ही या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. त्यांची आजवरची कारकीर्द पाहता ‘ललिता शिवाजी बाबर’चे पोस्टर प्रदर्शित करण्यासाठी प्रजासत्ताक दिनासारखा दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. आज या चित्रपटाचे पोस्टर झळकवून आम्ही त्यांच्या कारकिर्दीला सलाम करत आहोत.’’

एंडेमॅालचे शाईन इंडियाचे गौरव गोखले म्हणतात, ‘’अनेक प्रादेशिक, राष्ट्रीय चित्रपट आम्ही केले आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही मराठी प्रादेशिक चित्रपट करत आहोत. प्लॅनेट मराठी हे मराठीतील एक नावाजलेले प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे त्यांच्या सहयोगाने काम करताना आनंद होतोय. आम्हाला हा प्रोजेक्ट एका आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे, जेणे करून जगभरातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतील. अमृतासारखी गुणी अभिनेत्री ही भूमिका साकारतेय, म्हणजे ‘ललिता शिवाजी बाबर’ला शंभर टक्के न्याय मिळणार, हे नक्की. अमृता मुळात खिलाडू वृत्तीची असल्याने ही भूमिका ती योग्यरित्या साकारेल, याची खात्री आहे.’’

न्यायसंस्थेच्या स्वायतत्तेसाठीचे -नागरी स्वाक्षरी आंदोलनास मोठा प्रतिसाद

पुणे -“प्रजासत्ताक दिना”च्या पुर्व संध्येस… देशातील न्याय व्यवस्थेच्या स्वायत्ततेच्या समर्थनार्थ व रक्षणार्थ मुक निदर्शने, लाक्षणिक आंदोलन राजीव गांधी स्मारक समितीची तर्फे करण्यात आले. या प्रसंगी राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस लिगल सेल उपाध्य ॲड शाहीद अख्तर, ॲड संदीप ताम्हणकर, ॲड मोहनराव वाडेकर, श्री संजयजी चौगुले, ॲड श्रीकांत पाटील, ॲड फैयाझ शेख, ॲड बाळासाहेब बामणे, ॲड आश्विनी गवारे, ॲड सुरेश नांगरे, ॲड केदार गोराडे, ॲड रशीदा शेख, ॲड संतोष म्हस्के, ॲड रेश्मा शिकलगर, ॲड राजश्री अडसुळ, ॲड शाबीर शेख, ॲड बी आर रोकडे, ॲड पुजा जाधव इ सह अनेक जेष्ठ – कनिष्ठ वकील वर्ग, युक्रांद चे संदीप बर्वे इ सह – महीला वर्ग व स्मारक समितीचे सन्माननीय सदस्य सुर्यकांत उर्फ (नाना) मारणे, के डी पवार, माजी पोलीस उपायुक्त मारूतराव देशमुख, रामचंद्र भाऊ शेडगे, भोला वांजळे, धनंजय भिलारे, नितीन पायगुडे, घनश्याम निम्हण, पै शंकर शिर्के, विनायक पाटील, आरिफ कांचवाला, सुरेश ऊकीरंडे, रमाकांत शिंदे, बाळासाहेब बाणखेले, आशीष गुंजाळ, ज्योती परदेशी, संजय अभंग, प्रकाश आरणे, योगीराज नाईक, ऊदय लेले इ. ऊपस्थित होते..
ऊच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकां बाबत, केंद्र सरकार अनावश्यक मतप्रदर्शन करीत, न्याय संस्थेची विश्वासार्हता व प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करीत आहे..! कोलेजीयम पध्दतीस व न्यायधिशांच्या नेमणुकी बाबत शिफारसी नाकारणे, त्या परतावून लावणे, विलंब व टाळाटाळ करणे व एखाद्या केस मध्ये ‘सरकार विरोधी ताशेरे ओढणाऱ्या’ न्यायधिशाच्या पदोन्नतीस विरोध करणे अशा प्रकारांमुळे देशाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीत मोठा खंड पडत असून, न्यायदानास मोठा विलंब होतो आहे.. व त्याचे परीणाम नागरीकांना भोगावे लागत आहेत.. त्यामुळे लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी, संविधान व नागरी अधिकारांचे संरक्षण करणाऱ्या “न्याय-संस्थेची स्वायतत्ता” जपण्यासाठीच “नागरी स्वाक्षरी आंदोलन व मुक निदर्शने” करण्यात आल्याचे निमंतिरक गोपाळ तिवारी यांनी या प्रसंगी सांगितले.
यामध्ये विविध पक्ष, सामाजिक संस्था, संघटना व प्रमुख्याने वकील वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला.
“भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार आणि जबाबदाऱ्या देणारे ‘भारतीय संविधान’ हीच आयडिया ऑफ इंडिया असुन, नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य न्यायसंस्था करते..त्या मुळे न्यायव्यवस्थेची अस्मिता जपली पाहीजे”.. असे मत ॲड संदीप ताम्हणकर यांनी व्यक्त केले. ॲड शहीद अख्तर यांनी आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार: झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण

नवी दिल्ली 25: सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसिध्द तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, सुप्रसिध्द भारतीय सैध्दांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपुर यांना पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून प्रसिध्द तबला वादक, झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिध्द गायिका सुमन कल्याणपुर, प्रसिध्द उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच भिकू रामजी इदाते व गजानन माने यांना समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी, शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (मरणोपरांत) यांना व्यापार व उद्योग क्षेत्रात, कला क्षेत्रात गडचिरोलीतील सुप्रसिध्द झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिध्द सिने अभिनेत्री रवीना टंडन व कुमी वाडिया यांना पद्मश्री जाहिर झाला आहे.

महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानासाठी दोन मान्यवरांची निवड झाली आहे, यात साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांचा समावेश आहे.या वर्षी एकूण 106 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह 19 महिला तर 02 हे परदेशी नागरिक आहेत. 7 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.


प्रकाश आंबेडकरांचाआरोप:म्हणाले – शरद पवार आजही भाजपसोबतच, लवकरच समजेल!

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकरांनी एक धक्कादायक विधान केले आहे. ”शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत. हे लवकरच समजेल असा दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. विशेष म्हणजे हा दावा करण्यापूर्वी ​​​​​​दोनच दिवसांआधी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती झाली व ठाकरे गट हा पवारांसोबतच महाविकास आघाडीचे घटक आहेत.

शरद पवारांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्ताचा दाखला दिला. ते म्हणाले की, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर मुलाखत दिली होती. तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, मला लोक दोष का देतात? हे तर आमच्या पक्षाचे ठरले होते. मी फक्त सर्वात आधी गेलो. हे लोकसभेआधीच आमचे ठरले होते. हा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

भाजपविरुद्ध सर्व विरोध पक्षांना एक करण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केला या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही प्रयोग केला. आताच्या असलेल्या प्रयोगात शिवसेनेला भाजपला सोडून बाहेर पडायचे होते. मी त्यावेळीही म्हणालो आजही म्हणतो की, शिवसेनेने काही तरी करून ती सत्ता आपल्या हातात ठेवून जर ते चालले असते, तर सरकार पडले नसते. सत्तेची गरज ही काँग्रेस-राष्ट्रवादीला होती, शिवसेनेला नाही.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे बदलले हे मी म्हणणार नाही. दोघांत भांडण आहे. दोघेही हिंदुत्ववादी आहेत. मी जे भांडण म्हणतोय त्यात वैदीक हिंदु आणि संत हिंदु परंपरा हा असा आहे.

शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून लोणावळा लोकल सेवा सुरु करण्याच्या खासदार बापट यांच्या मागणीला यश

पुणे दि. 25 : खासदार बापट यांनी केलेल्या मागणीवरुन शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरु करण्यास रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली असून ३० जानेवारी पर्यंत बापट यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असून पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरु होणार आहे.
खासदार बापट यांनी सांगितले की पुणे रेल्वे स्टेशन येथून परराज्यात लांब पल्याच्या गाड्यांनी तसेच पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढत आहे. यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड ताण येत असून स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना वेळेत स्टेशनवर पोहचणे अवघड होते. तसेच पुणे रेल्वे स्टेशनवर इतर मुलभूत सुविधांवरही ताण येत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करता पुणे रेल्वे स्टेशन वरील ताण कमी करण्यासाठी शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर स्टेशन वरून लोकल तसेच बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्यास पुणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होऊन पुणे स्टेशन वरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत मी मागील काही वर्षे होणाऱ्या सर्व बैठकांमध्ये तसेच प्रशासनाकडे वेळोवेळी काही रेल्वे गाड्या शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर स्टेशन येथून सुरु करण्यासाठी मागणी केली.
शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर स्टेशनवर नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध देण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन शिवाजीनगर ते लोणावळा या मार्गावर सध्या चार लोकल गाड्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून सुरू करणार आहे. याबाबतची सर्व तयारी रेल्वे प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून येत्या तीन चार दिवसांमध्ये खासदार बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे  पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले

पुणे  : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे   २५ ते २९ जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले असून. प्रदर्शनाचे उद्‍घाटन आज  खासदार श्रीनिवास पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले . या वेळी संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे आणि विश्वस्त अनुपमा बर्वे ,श्रीनाथ कवडे ,सुमन किलोस्कर , प्रशांत काळे , प्रशांत चव्हाण ,आदी मान्यवर उपस्थित होते . ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया  या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे..  या वर्षीचे प्रदर्शन संस्थेचे मा. अध्यक्ष स्व. श्री. राहुल बजाज यांच्या स्मृतीस अर्पित करीत आहोत.

पुष्पप्रदर्शन २६ ते २९ जानेवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल असणार आहेत.

यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विविध झाडे, वेली नटलेले एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली बहरलेले असून लवकरच पुणेकरांना यांचा आनंद घेता येणार आहे.
संस्थेमार्फत अगदी १०० वर्षापूर्वीपासून जनमानसात निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने पुष्पप्रदर्शने भरविली जात होती. मध्ये काही कालावधीचा खंड वगळता संस्थेने आजवर ती परंपरा कायम ठेवलेली आहे.

बागेमध्ये पुन्हा नव्याने पुष्पप्रदर्शन भरविण्यास जानेवारी, १९९८ सालापासून सुरूवात झाली. अगदी पहिल्या प्रदर्शनापासून पुणेकरांनी यास उस्फूर्त प्रतिसाद दिला.

पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात.या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती इ. गोष्टींचा समावेश असतो.
पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेस निरनिराळ्या शाळांमधून सुमारे १००० विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदाच्या वर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवार दि. २२ जाने. २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

पुष्पप्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षीदेखील) जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील,

एरवी केवळ पानांनी, वेलींनी व हिरवाईने नटलेली एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

नाल्यांना फाशी दिले आता नदीच्या वहन क्षमतेवर हल्ला चढविणार काय ?

…तोपर्यंत नदी सुधार प्रकल्पाचे काम बंद ठेवा सांगूनही आयुक्त ऐकत नाहीत -नेमके दडलंय तरी काय ?

पुणे : विशिष्ट लॉबी हाथी धरून महापालिकेचा कारभार फारच चांगला आहे अशी शोखी मिरवीत काम करणाऱ्या महापालिका आयुक्तांनी पुण्यातील खासदार ,आणि पर्यावरण क्षेत्रातील ,तसेच प्रसार माध्यम क्षेत्रातील अनेकांचा विरोध डावलून त्यांच्या शकांना उत्तरे देण्याऐवजी काही हजार कोटीचा नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प रेटण्याचे काम सुरूच ठेवल्याने आयुक्त आणि त्यांच्या भवतालचे मधमोहोळ संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे महापालिकेतील वर्तुळात बोलले जात आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काॅंगेसच्या खासदार वंदना चव्हाण,नितीन कदम,प्रदीप देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाबाबत विविध मुद्दे पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत .

राष्ट्रवादी काॅंगेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना केली. प्रवक्ते प्रदीप देशमुख , नितीन कदम यासंदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले कि,’सदोष असलेला मुळा मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यास राष्ट्रवादी अर्बन सेलचा आक्षेप असून प्रकल्प मुळात तांत्रिक दृष्ट्या सदोष असल्याने व त्यामुळे पुणेकरांवर गंभीर नैसर्गिक संकट ओढवण्याची शक्यता असल्याने हा प्रकल्प नागरिकांच्या पाठींब्याने होत आहे असे दर्शविण्याचा प्रशासनाचा अट्टहास दिसत आहे.” Pune re” ही मोहीम महानगरपालिकेने ताबडतोब मागे घ्यावी, अशी आमची मागणी आम्ही थेट आयुक्तांपर्यंत पोहोचविली आहे.

चव्हाण यांनी नमूद केले की, पुणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या मुळा मुठा नदी सुधार व सुशोभीकरण योजनेसंदर्भातील त्रुटी व धोके राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आपल्या निदर्शनास आणले होते. यासाठी पुणेकर नागरिक व पुणे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तज्ञाकडून प्रकल्पाचे सादरीकरण देखील आयोजित केले होते. या प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे आम्ही आपणास वारंवार सूचित करत आलो. राज्य शासनाच्या पातळीवर देखील अनेक तज्ञ पुणेकरांच्या वतीने या शंका मांडल्या गेल्या होत्या व जोपर्यंत या शंकाचे निरसन होत नाही तोपर्यंत नदी सुधार प्रकल्पाचे काम बंद ठेवावे असे ठरले. आता दुर्दैवाने पुणे मनपाच्या वतीने हा प्रकल्प पुढे रेटण्याचे काम सुरु आहे.

चव्हाण यांनी नमूद केले की काही नागरिकांनी आमच्या निदर्शनास आणून दिले आहे की पुणे महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत योजनेस नागरिकांचा पाठिंबा असल्याचे दर्शवण्यासाठी नागरिकांचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत आहे. असा प्रयत्न अत्यंत धक्कादायक व निंदनीय आहे. पुणे शहरातील इतर महत्वपूर्ण प्रकल्पासाठी नागरिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत व त्यांच्या भावनेचा कुठेच आदर केला जात नाही. मात्र आता लहान मुलांना वेठीस धरून बक्षिसांची आमिष दाखवून, त्यांची दिशाभूल करून त्यांचा माध्यमातून त्यांच्या पालकांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत असून ते चुकीचे व आक्षेपार्ह आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन

0

पुणे, दि. २५: विभागीय आयुक्त कार्यालयात १० हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या मॉड्युलर बायोगॅस प्रकल्पाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोंदार्डे, रामचंद्र शिंदे, राहुल साकोरे, सह आयुक्त पूनम मेहता उपस्थित होत्या.

विभागीय आयुक्त राव म्हणाले, हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याने उपयुक्त आहे. यामध्ये दररोज १०० किलो कचरा जिरवला जाणार आहे. आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेल्या उपहारगृहातील ओला कचरा या बायोगॅस प्रकल्पासाठी वापरला जाणार असून ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरितीने होणार आहे.

ते पुढे म्हणाले, विभागीय आयुक्त कार्यालय, कष्टकरी पंचायत व वायू कंपनीच्या संयुक्त प्रयत्नाने हा प्रकल्प सुरु करण्यात आला असून असे प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद आदी ठिकाणी कार्यान्वित करावेत. तसेच पुणे विभागातील अन्य सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी कायालयातही प्रकल्प सुरु करावा, असे सांगून प्रकल्प राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडवल्या जातील याकडे लक्ष द्यावे. तसेच इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, अशा सूचनाही श्री. राव यांनी दिल्या.

यावेळी आयुक्त राव यांनी प्रकल्पाची पाहणी करुन माहिती घेतली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला विशेष संस्थात्मक योगदान पुरस्कार

मुंबई, दि.25 : लोकशाहीमध्ये निवडणुका महत्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे. प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, कुलसचिव विलास नांदवडेकर, उपसचिव मनोहर पारकर यांच्यासह मिलिंद बोकील, सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, डॉ.सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, डॉ.उज्वला चक्रदेव आदी पाहुणे उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक कार्यात योगदान देणाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे प्रसिद्धीसाठी नेहमीच अग्रेसर असते. राज्याच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि त्याचे अधिनस्त कार्यालय हे निवडणूक कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्राथम्याने करते. त्यामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना विशेष संस्थात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

निवडणूक कार्यात राज्यातील अधिकारी वर्गाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी शण्मंगराजन (वाशिम), रूचेश जयवंशी (हिंगोली), अशोक शिनगारे (ठाणे), डॉ.विपिन इटनकर (नागपूर), डॉ.राजेंद्र भोसले (अहमदनगर) आणि राजेश देशमुख (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन (वाशिम), दिलीप कच्छवे (हिंगोली), श्रीमती अर्चना कदम (ठाणे), श्रीमती मिनल कळसकर (नागपूर), जितेंद्र पाटील (अहमदनगर), पुण्याच्या श्रीमती आरती भोसले आणि श्रीमती मृणालिनी सावंत यांना विभागून पुरस्कार देण्यात आले.

त्याचप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कारात गणेश राठोड (मेहकर, जि.बुलडाणा), धीरज मांजरे (कारंजा, जि.वाशिम), डॉ.सचिन खल्लाळ (वसमत, जि.हिंगोली), श्रीमती क्रांती डोंबे (कळमनुरी, जि.हिंगोली), राहुल मुंडके (पनवेल, जि.मुंबई उपनगर), श्रीमती वैष्णवी बीष्वा (भाप्रसे)(तुमसर, जि.भंडारा), संदीप भस्के (ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर), श्रीमती ज्योती कावरे (सिन्नर, जि.नाशिक), डॉ.शशिकांत मंगरूळे (संगमनेर, जि.अहमदनगर), सुशांतकिरण बनसोडे (कागल, जि.कोल्हापूर) आणि गणेश मरकड (पलूस कडेगाव, जि.सांगली) या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे असल्याने समाजमाध्यमावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडणूक कार्यालयाचा गौरव करण्यात आला. यात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, शिवडी, जत आणि कोल्हापूर उत्तर यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे उत्कृष्ट मतदार मित्र पुरस्कारात किन्नर मॉ ट्रस्ट व कोरो इंडिया या सामाजिक संस्थाचा गौरव करण्यात आला. निवडणुकीचे वार्तांकन करून जनजागृती करणारे लोकसत्ताचे पत्रकार निखिल अहिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात लोकशाही दिंडी, पथनाट्य, रांगोळी प्रदर्शन, मतदार जागृती दालन, ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण, शपथ घेणे, ओळखपत्राचे वाटप, अहवाल प्रकाशन आदी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले तर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आभार मानले.
000

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

पुणे दि.२५-जिल्हाधिकारी कार्यालयात १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचा सत्कार करण्यात आला.

अपर जिल्हाधिकारी विजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे, डॉ.पी.ए.इनामदार, तहसीलदार स्वाती रेडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.मोरे म्हणाले,लोकशाही व्यवस्थेत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारतात निवडणूका मुक्त आणि निष्पक्ष होण्याचे श्रेय निवडणूक यंत्रणा आणि सर्वसमावेशक मतदार यादीला आहे. देशात लोकशाही रुजल्याने देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव आणि तपशील तपासावा आणि पात्र युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. प्रास्ताविकात श्रीमती रेडकर यांनी राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाबाबत माहिती दिली. ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’ ही संकल्पना यावर्षी मतदार जागृतीसाठी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मतदार नोंदणी शिबिर आयोजनासाठी सहकार्य करणारी महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी यांना यावेळी गौरविण्यात आले. मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण आणि छायाचित्र मतदार यादी तयार करण्यात चांगली कामगिरी करणारे मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी,नायब तहसीलदार, केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.