Home Blog Page 1446

भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

पुणे, दि.२५ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाच्यावतीने नवीन मध्यवर्ती इमारत येथे आयोजित एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक विक्री केंद्राचे उद्धाटन राज्याच्या भाषा संचालक विजया डोनीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, भाषा संचालनालयाचे सह संचालक शरद यादव, अधीक्षक सुनील शिरसाट आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनात प्रशासन वाक्यप्रयोग, संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, वाणिज्य शास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान व तर्कशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन, भुगोलशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, भाषा विज्ञान व वाड्मय विद्या, धातुशास्त्र परिभाषा कोश आदी पुस्तके मांडण्यात आली होती.

‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात

मनोरंजनाची चौकट न मोडताही आशयपूर्ण आणि जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत. पिकोलो या आगामी मराठी चित्रपटाच्या ‘संगीतमय’ चित्रचौकटीतून एका कलावंताच्या भावविश्वाचा प्रवास सुरेखरित्या उलगडण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारील ‘पिकोलो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगण्याची प्रेरणा देणारा आशय, सुंदर कथा, अभिनयाने मोहून टाकणारे निरागस चेहरे आणि त्याला सुश्राव्य संगीताची जोड ह्या सगळ्याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे पिकोलो चित्रपट.  फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित पिकोलो चित्रपटाची निर्मिती  राजेश मुद्दापूर यांनी केली आहे.

पिकोलो संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर  मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे पिकोलो मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे पहाणं रंजक ठरणार आहे.

प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून या दोघांसोबत ‘पिकोलो’ चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव,  रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत. चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओ करीत आहे.

येत्या २६ जानेवारीला पिकोलो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील ‘गणेश जन्म ; सोहळा ..हा असा रंगला ..

सुवर्णपाळण्यात मंगल स्वरांच्या नादघोषात दगडूशेठ मंदिरात गणेशजन्म सोहळा

पुणे : श्रीगणेशा पाळणा हलके हलके जोजवा… पाळण्याचा मधोमध याला ग निजवा… अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा दुपारी १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला डॉ. कृतार्थ क्षीरसागर, डॉ. रिद्धी  क्षीरसागर, केदार गोडसे, प्राजक्ता गोडसे  यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. मंदिरावर केलेली तिरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला. शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृध्दी नांदू दे अशी प्रार्थना सर्वांनी श्रीं चरणी केली.
यावेळी शारदा गोडसे, मृणालिनी रासने,  ज्योती सूर्यवंशी, तृप्ती चव्हाण, संगीता रासने, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्चना भालेराव, डॉ. अनघा राजवाडे, प्रेरणा देशपांडे, चित्रा जोशी, रत्ना  नामजोशी, मानसी गिजरे यांसह इतर महिलांनी जन्माचा पाळणा, गणेश गीत व  गणपतीचा गजर केला. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.
भक्तांनी दिलेल्या देणगीतून सुवर्णपाळणा साकारण्यात आला.  सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग, मधोमध विसावला,माझा गणराज ग…असे म्हणत यंदाचा जन्मोत्सव सुवर्णपाळण्यात झाला. पाळण्याकरिता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टॅड तयार करण्यात आला असून त्यावर ८.५ किलो चांदी वापरण्यात आली. तसेच त्यावर सोनाचे पॉलिश देखील करण्यात आले आहे. या स्टँडवर १६ बाय २४ इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्याकरिता २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.
बुधवारी पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. त्यापूर्वी पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पार पडला. सकाळी ७ वाजता गणेशयाग, दुपारी ३ वाजता सहस्त्रावर्तने झाली.
सायंकाळी ६ वाजता श्रीं ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बंड आदी सहभागी झाले होते. दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर रामेश्वर चौक- टिळक पुतळा मंडई – कोतवाल चावडी – बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक – नू.म.वि. प्रशाला अप्पा बळवंत चौक – तांबडी जोगेश्वरी मंदिर या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

‘पटलं तर घ्या विथ जयंती’ मधून होणार आपल्या आवडत्या कलाकारांची पोलखोल !

प्लॅनेट मराठीच्या नव्या शोचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजबद्दल, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्या सोबतच्या गप्पा, त्यांचे धमाल किस्से, जुन्या आठवणी आपण नेहमीच ऐकतो. वाचतो. मात्र त्यांच्या आयुष्यात असेही काही किस्से असतात, जे अजूनही त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचलेले नसतात. कलाकारांच्या अशाच अनेक गोष्टी, किस्से, रहस्यं प्लॅनेट मराठी चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे. लवकरच एक नवा शो आपल्या भेटीला येणार असून ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ असं या शोचं नाव आहे. यात सेलिब्रेटींसोबत दिलखुलास गप्पा, काही न ऐकलेले किस्से, मजेशीर खेळ यांसारख्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नुकताच या शोचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रेक्षकांना ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ हा शो प्लॅनेट मराठीच्या ओटीटीवर विनामूल्य पाहता येईल.

या शोचा हा पहिला सिझन असून या सिझनमध्ये एकूण ८ एपिसोड्स आहेत. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’चा पहिला एपिसोड येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून दर शुक्रवारी या शोचे नवीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येतील. पहिल्या एपिसोडमध्ये अभिजीत पानसे आणि तेजस्विनी पंडित आपल्या भेटीस येणार आहेत. तर पुढील एपिसोड्समध्ये अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, ओम राऊत, प्राजक्ता माळी, यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत गप्पा रंगणार आहेत.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवीन पाहण्याची उत्सुकता लागलेली असते. चित्रपट, वेबसीरिज सोबतच यावर्षी अनेक फिक्शनल, नॅान फिक्शनल शोज, टॅाक शोज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ हा त्याचाच एक भाग आहे. या शोमधून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीबाबत माहीत नसलेल्या अनेक गोष्टी कळणार आहेत.’’

या शोचे सुत्रसंचालन जयंती वाघधरे करणार असून त्या म्हणतात, “गेल्या १२ वर्षांपासून मी मनोरंजन क्षेत्रात पत्रकार म्हणून काम केलं आहे. अनेक मराठीतील, बॅलिवूडमधील बड्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक पत्रकाराचं एक स्वप्न असतं, की स्वतःच्या नावावर त्याचा एक शो असावा आणि ही संधी मला प्लॅनेट मराठीवरील या शोच्या माध्यमातून मिळाली. दर शुक्रवारी प्लॅनेट मराठीच्या ओटीटी ॲपवर ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या शोमधून मी तुमच्या भेटीस येणार आहे.”

आनंद एल राय, क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ ची घोषणा

‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. नुकताच त्याचा एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद एल. राय आणि क्षिती जोग या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते आहेत विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ.

या व्हिडीओत निर्मला (निर्मिती सावंत) पुन्हा एकदा फिरायला जाण्यासाठी साहेबांकडे (अनंत जोग यांच्याकडे) परवानगी मागताना दिसत आहेत. यावेळी साहेबांनीही ट्रीपला येण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना नकार देत, पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं निर्मला समजावते. साहेब मात्र निर्मलाला सूनबाईंना बरोबर घेऊन जा, असं सांगतात… आता सूनबाई कोण? यावेळी ही ट्रीप कुठे जाणार आणि यात केवळ ‘त्याच’ मैत्रिणी असणार की, आणखी मैत्रिणींची भर पडणार? हे लवकरच कळणार आहे.

निर्माते आनंद एल. राय म्हणतात, ‘’पुन्हा एक मराठी सिनेमा करताना आम्हाला खूप आनंद होतोय. ‘झिम्मा’ला प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच २०२१ मधील बॅाक्स ॲाफिसवर जबरदस्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला. चित्रपटातून एक चांगला संदेश देण्यात आला ज्याने प्रेक्षक प्रभावित झाले आणि म्हणूनच आम्ही ‘झिम्मा २’ आणण्यास चलचित्र मंडळींना पाठिंबा दिला. क्षिती आणि हेमंत सोबत काम करण्यात आनंद आहे.’’

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘’ ‘झिम्मा’वर प्रेक्षकांशी भरभरून प्रेम केले. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. ‘झिम्मा’ सर्वांनाच खूप जवळचा वाटला. आजही मी कुठे गेल्यावर मला अनेक जणी ‘झिम्मा’ आवडल्याचे आवर्जून सांगतात. अनेकींनी ‘झिम्मा २’ लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन या, अशी मागणीही केली. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा २’चा निर्णय घेतला आणि आता लवकरच ‘झिम्मा २’ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. या वेळी मजा डबल झाली असून हा चित्रपटही प्रेक्षक तितकाच एन्जॅाय करतील.’’

महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ; येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

विधान भवन येथे एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा या अभियानाचे मुख्य प्रवर्तक म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोविड संकटाच्या काळात अडीच वर्ष राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. राज्याच्या एकूण १३ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास १४ लाख ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याआधारे यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून तसेच काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून या अभियानांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.

कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नव्हे खूनच:4 चुलत भावांनीच कुटुंबाला संपवले, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीत फेकले

पुणे- जिल्ह्यात दौंड परिसरात पारगाव येथील भीमा नदीत काल मंगळवारी 7 जणांचा मृतदेह आढळले होते . संबंधित कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. 3 चिमुरड्यासह 7 जणांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.चार चुलत भावांनीच कुटुंब प्रमुखासह सात जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. पवार कुटुंबीयांनीच आपल्या मुलाचा अपघात करुन त्याचा खून केल्याचा संशय एका चुलत भावाला होता. त्यातून त्याने इतर तीन भावांसह पवार कुटुंबातील 7 जणांची हत्या केली व नंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकल्याचे तपासात समोर आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय 40), श्याम कल्याण पवार (वय 30 ),प्रकाश कल्याण पवार (वय 32) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत.

मोहन पवार यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय 20) हा त्यांच्याच समाजातील महिलेसह 17 जानेवारी रोजी लग्नाकरिता पळून गेला होता. त्यानंतर हे भयानक हत्याकांड घडले. त्यामुळे सुरुवातीला पवार कुुटुंबातील 7 जणांनी बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता.मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात मोहन पवार यांच्या चुलत भावांनीच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे.

 तीन वर्षांचा एक मुलगा असलेल्या व पतीपासून विभक्त राहत असलेल्या विवाहितेस पळवून नेल्याने समाजात बदनामी होईल व कुटुंबाची प्रतिष्ठा लयास जाईल म्हणून मोहन पवार यांनी कुटुंबासह आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. चार मृतदेहाचे शवविच्छेदन अहवालात पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

मोहन उत्तम पवार (वय 50), संगीता मोहन पवार (वय 45), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (वय 32), पत्नी राणी शामराव फुलवरे (वय 27), त्यांचा मुलगा रितेश शामरावर फुलवरे (वय 7), छोटू शामराव फुलवरे (वय 5) व कृष्णा फुलवरे (वय 3), यांचे मृतदेह मंगळवारी भीमा नदीत आढळली होती. याबाबत यवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. तर, त्यांचे जावई शामराव फुलवरे हे आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद, वाशी येथे राहत होते.

गणेश जयंती:दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक आरास, पद्मश्री उस्मान खान यांचे  सतारवादन संपन्न

पुणे -श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आज पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्री चरणी स्वराभिषेक अर्पण केला. त्यापूर्वी पहाटे तीन वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक देखील झाला.

स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा साजरा करण्यात येत आहे.

मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता होणार आहे. यंदा सुवर्णपाळण्यात हा सोहळा पार पडणार आहे. भक्तांनी दिलेल्या देणगीतून हा पाळणा साकारण्यात आला आहे. पाळण्याकरीता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टँड तयार करण्यात आला असून त्यावर 8.5 किलो चांदी वापरण्यात आली आहे. तसेच त्यावर सोनाचे पॉलिश देखील करण्यात आले आहे.

या स्टँडवर 16 बाय 24 इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्यासाठी 2 किलो 280 ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता सहस्त्रावर्तने होणार आहेत. तर, सायंकाळी 6 वाजता नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. तसेच रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत गणेश जागर मंदिरामध्ये होणार आहे.

मंदिरावर तिरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . मंदिर पहाटे 3 पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फेकरण्यात आले आहे .

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – अमित शहांसोबत सहकार क्षेत्रातील बदलांवर चर्चा

नवी दिल्ली – राज्यातील साखर कारखाने आणि सहकार क्षेत्राविषयी दिल्लीत आज अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याबाबतच्या वक्तव्यावरही चर्चा झाली. तसेच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.आज महत्वाची बैठक अमित शहांसोबत झाली. सहकार क्षेत्राशी संबंधीत बैठकीनंतर सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, इथेनाॅल आणि को जनरेशन यासह साखर उद्योग आणि त्यातील अडचणी व सशक्त उपाययोजना यावर चर्चा झाली. सहकारमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर नव्हे तर साखर उद्योगावर चर्चा झाली.

दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत शिंदे गट आणि भाजप यांच्यातील मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला किती मंत्रिपदे याचे गणित लावले जात असण्याची शक्यता आहे. मंत्रिमंजळ विस्ताराचे त्रांगडे अमित शहा यांच्या सूचनेनुसार आणि अनुमतीने सोडवण्यावर उभय नेत्यांचा भर दिसतो. यावर सीएम शिंदे म्हणाले की, लवकरच राज्यमंत्रिमंडळ विस्तार होईल.

महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली. राज्यपालांच्या या भूमिकेबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातल बदलांची शक्यता असून याही एका महत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत एक बैठक झाली. यात काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. विशेषतः या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे याही उपस्थित हेत्या.

सहकार क्षेत्राची पुर्नरचना, ​​​​​​​​​​​​​​अडचणीतील साखर कारखान्याला सहकार्य, आजारी साखर कारखान्याला कर्ज स्वरुपात मदत यासह विविध मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध

मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ मधील उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचे (Opting Out) विकल्प मागविण्यात आले आहेत.

परिक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही वेबलिंक दि. २५ जानेवारी, २०२३ रोजी १२.०० वाजेपासून दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाही.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही. विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support – online@mpsc.gov.in या ई-मेल पत्त्यावर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

झवेरी बाजार लूट प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक; ३ संशयितांचा शोध सुरू

मुंबई- झवेरी बाजार लूट प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच ३ संशयितांचा शोध सुरू आहे. सहा पथक आरोपीच्या मागावर होते. अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव विशाखा मुधूळे असं असून ती खेडची रहिवासी आहे. चोरी झालेल्या सोन्यापैकी अडीच किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे.झवेरी बाजारात ईडीचे अधिकारी असल्याचं भासवून छापा टाकून व्यावसायिकाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर काल दुपारी दोनच्या सुमारात अज्ञातांनी ईडी अधिकारी असल्याचं सांगत बनावट छापा टाकला. बनावट अधिकाऱ्यांनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि जवळपास तीन किलो सोनं लुटलं आहे. सोन्याची किंमत जवळपास १ कोटी ७० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काही अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेट सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं. दरम्यान लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तसंच आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे, दहिसर आणि इतर काही ठिकाणी पथकं रवाना झाली आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरीच्या धडकेमुळे दोन महिलांचा मृत्यू

पुणे :पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा येथे रस्ता ओलांडताना लक्झरी बसने चिरडल्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू, तर तिच्या मावशीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.माळीमळा येथे राहत असलेल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी त्या दोघी गुलबर्गा येथून आल्या होत्या. मुलगी सुरेखा नरसिंग घायाळू (वय ३८) व मावशी मंमादेवी सूर्यवंशी (वय ४७, दोघेही रा. खंडाळा, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

सुरेखा घायाळू यांचे वडील तुळशीराम माणिक मुळे (वय ६५, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना भेटण्यासाठी मुलगी सुरेखा घायाळू व मावशी मंमादेवी सूर्यवंशी या गुलबर्गा येथून लक्झरी बसने सोमवारी (दि. २३) निघाल्या होत्या. पहाटे त्या हडपसर येथे उतरून सव्वा पाचच्या सुमारास रिक्षा करून लोणी येथे आल्या. माळीमळा येथे पावणे सहाच्या सुमारास उतरून पुणे – सोलापूर महामार्ग ओलांडत असताना सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात मुलगी सुरेखा घायाळू यांचा जागीच मृत्यू झाला, तर मावशी मंमादेवी सूर्यवंशी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना लोणी काळभोर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारदरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

“शेवटचा घोट” नाटिका आणि “फुलवूया ही वनराई” नृत्यगीताने जिंकला “वनराई करंडक”

“फुलवूया ही वनराई” या गीत नृत्याने रसिकांची मने जिंकली…
पुणे, दि. २४ जानेवारी : नव्या पिढीकडून बळीराजाला जगण्याची नवीन उमेद देत त्याला येणार्‍या संकटावर मात करून आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश देणार्‍या “शेवटचा घोट” या सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या नाटिकेस वनराई करंडक मिळाला. तर सुरेल गीत गायन, वाद्यांची उत्तम साथसंगत, विद्यार्थ्यांच्या समूहाने सादर केलेल्या “फुलवूया ही वनराई, वनराईची नवलाई” या गीत नृत्याने रसिकांची मने जिंकली. डी.ई.एस.सेकंडरी शाळेने सादर केलेले या पर्यावरण संवर्धन नृत्यगीतास प्रथम परितोषिक मिळाले आहे. कै. अण्णासाहेब बेहेरे सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. बक्षीस समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे बालकलाकार आर्या घारे, दिग्दर्शक सतीश फुगे, वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे, धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर, वनराई पर्यावरण वाहिनी प्रकल्प संचालक भारत साबळे, बॅक टू स्कूल या चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थितीत होते. कै. इंदिरा बेहेरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बेहेरे यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले.
नाटिका विभागात – प्रथम- सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल, द्वितीय- चंद्रकांत दरोडे माध्यमिक विद्यालय, तृतीय- न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, उत्तेजनार्थ- चं. बा. तुपे साधना विद्यालय, हडपसर आणि एन. सी. एल. इंग्लिश मेडियम प्रायमरी स्कूल यांना परितोषिक मिळाले.
नृत्य विभागात प्रथम- डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, द्वितीय- मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल, तृतीय- विद्यापीठ हायस्कूल पुणे, उत्तेजनार्थ- आदर्श विद्यालय नातूबाग शाळा आणि महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर यांना परितोषिक मिळाले.
स्पर्धेचे परीक्षण ज्योती रावेरकर, जतीन पांडे, किरण तिवारी यांनी केले.
वनराई संस्थेच्या वतीने पुण्यातील शाळांसाठी वनराई पर्यावरण वाहिनी अंतर्गत वनराई करंडक दरवर्षी आयोजीत केला जातो. यंदा हे स्पर्धेचे २० वे वर्ष आहे. सिंहगड रोड येथील सानेगुरुजी स्मारक स्व. निळू फुले सभागृह येथे करंडकाची प्राथमिक फेरी झाली होती. यावेळी ३० शाळांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण जनजागृती संबंधी नाटिका, गायन-नृत्य सादरीकरण हा “वनराई करंडकाचा” मुळ उद्देश आहे.  नाटिका, गीत, पर्यावरण संदेश, समूह नृत्याविष्कार, काव्य व संगीत या निकषांच्या आधारे स्पर्धेचे मुल्यांकन होते. विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार घडावे, पर्यावरणाविषयी त्यांच्यात प्रेम निर्माण व्हावे यासाठी हा करंडक दरवर्षी पुण्यामध्ये आयोजित केला जातो.

2022 मध्ये फास्टैग द्वारे इलेक्ट्रॉनिक पथकर संकलन 46% नी वाढले

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023

मागील काही वर्षात फास्टैग द्वारे केलेल्या इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनात सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे.  वर्ष 2022 मध्ये राज्य महामार्गांवरील टोलनाक्यांसह इतर टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे झालेल्या एकूण टोल संकलनात 2021 च्या 34,778 कोटी रुपये संकलनाच्या  तुलनेत अंदाजे 46 टक्क्यांनी वाढ होऊन ते 50,855 कोटी रुपये झाले आहे. 

डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे सरासरी दैनिक पथकर संकलन 134.44 कोटी रुपये झाले आणि एका दिवसातील सर्वाधिक  संकलन 24 डिसेंबर 2022 रोजी 144.19 कोटी रुपये झाले.

याचप्रमाणे वर्ष 2022  मध्ये फास्टैग व्यवहारांमध्ये वर्ष 2021च्या तुलनेत 48%नी वाढ दिसून आली. वर्ष 2021 आणि वर्ष 2022 मध्ये अनुक्रमे 219 कोटी आणि 324 कोटी फास्टैग व्यवहार झाले.

आजमितीला एकूण 6.4 कोटी फास्टैग वितरीत करण्यात आले आहेत तर  फास्टैग उपलब्ध असलेल्या टोलनाक्यांच्या संख्येतही  वाढ झाली असून ती 2022 मध्ये 1,181 (323 राज्य महामार्ग टोलनाके ) इतकी झाली आहे मागील वर्ष 2021 मध्ये ही संख्या 922 होती.

यात उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, फास्टैग कार्यक्रमांतर्गत आगमनानंतरच्या ऑन-बोर्डिंग राज्य टोलनाक्यांसाठी  29 वेगवेगळ्या राज्यांच्या  संस्था/अधिकारिणी सह  सामंजस्य करार करण्यात आले आहेत ज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक इत्यादी राज्यांचा समावेश आहे.

झवेरी बाजारात बनावट ईडी अधिकाऱ्यांनी छापे टाकून केली करोडोंची लूट

मुंबई : मुंबईच्या झवेरी बाजारामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्ही ‘स्पेशल २६’ हा सिनेमा पाहिलाच असेल. अगदी तसाच प्रकार इथे घडला आहे. या सिनेमात खोटे अधिकारी बनून लूट करण्यात आली होती. अशाच पद्धतीने झवेरी बाजारात बनावट ईडी अधिकाऱ्यांनी छापे टाकून करोडोंची लूट केली. खरंतर, राज्यात ईडी म्हटलं की लोकांना घाम फुटतो. याचाच फायदा घेत भामट्यांनी खोटे ईडी अधिकारी बनून छापा टाकला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर ४ अज्ञात लोकांनी खोटा छापा टाकला. यावेळी त्यांनी स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचं सांगितलं. इतकंच नाहीतर आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही हातकडी घातल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यानंतर आरोपींनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि ३ किलो सोने चोरून नेले.या सोन्याची एकूण किंमत एक कोटी ७० लाख असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.