Home Blog Page 1445

मुंबईत सरकत्या जिन्यासह असलेल्या पहिल्या पादचारी पुलाचे लोकार्पण

मुंबई – मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज (दिनांक १५ जुलै २०२३) करण्यात आले. मुंबईकर नागरिकांना अधिकाधिक सुविधा देऊन जगातील अग्रेसर व सुलभ शहर बनवण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे उद्गार यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी काढले.

या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, कॅप्टन तमिल सेल्वन, प्रसाद लाड, महानगरपालिकेचे उपआयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, माजी नगरसेविका श्रीमती राजेश्री राजेश शिरवडकर, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले की, विद्यमान राज्य शासनाने आरोग्य, महिला सक्षमीकरण, मुंबई सुशोभीकरण, मंड्या आणि कोळीवाड्यांचा विकास यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईतील नागरिकांना तसेच जेष्ठांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यामुळेच मुंबईत स्वच्छता, सुशोभीकरण, आपला दवाखाना यासारख्या नावीण्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबईतील जेष्ठ नागरिकांसाठी प्रवासाच्या सुविधेकरिता बेस्ट उपक्रमाकडून दहा बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. न्यूयॉर्क येथील जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्याच्या ठिकाणी बसने नेऊन त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवला जातो. याच धर्तीवर मुंबईतील जेष्ठ नागरिकांनाही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बेस्ट बसेस देण्यात येणार आहेत. मुंबईतील कोळीवाड्यात स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ‘फूड ऑन ट्रक’ ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने व्यवसायासाठी जागाही पुरवणार असल्याचे सांगून मंडयांमध्ये दर्जेदार सुविधेचा भाग म्हणून लोअर परळ येथे वातानुकुलित मंडई उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शीव (सायन) येथील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाबाबतची संक्षिप्त माहिती

मुंबई शहरात पूर्व द्रुतगती महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी शीव पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल बांधावा, अशी एफ उत्तर विभागातील नागरिकांची सातत्याने मागणी होती. त्यानुसार शीव येथे हा पूल बांधण्यात आला आहे. या पादचारी पुलामुळे सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, धारावी, गांधी मार्केट या परिसरात ये जा करणार्‍या नागरिकांना फायदा होणार आहे. पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला दोन सरकते जिने, सामान्य जिने आहेत. एकूण ४४ मीटर लांबीचा तर ४.१५ मीटर रूंदीचा हा पूल आहे. दिवसापोटी किमान ७ हजार ते ८ हजार नागरिक या पुलाचा वापर करतील, असा अंदाज आहे. पूल बांधणीसाठी ५.६३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

कोविड काळातील ताळेबंदी, सरकते जिने पुरवठादाराकडून झालेला विलंब, वृक्ष प्राधिकरण आणि वाहतूक विभागाची परवानगी अशा अनेक आव्हानांना सामोरे जात या पुलाचे काम ५२ महिने कालावधीत पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे गांधी मार्केटला जाण्यासाठीची सुविधा उपलब्ध होणार असून धारावीतून गांधी मार्केट आणि सायन कोळीवाडा येथे जाणाऱ्या नागरिकांना या पुलाचा फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पादचाऱयांना सुरक्षितता लाभून रस्त्यांवर होणारे अपघात टाळणेही शक्य होणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक विनाअडथळा सुरू राहण्यासाठी देखील या पुलाची मदत होणार आहे.

वंचित विकास संस्थेला म्हसोबा ट्रस्टतर्फे ५१ हजारांचा आरोग्यनिधी

पुणे : धार्मिकते सोबत सामाजिकता जपणा-या अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे वंचित विकास संस्थेला ५१ हजार रुपयांचा आरोग्यनिधी देण्यात आला. मंडईमध्ये बुरुड आळीत सुरु असलेल्या म्हसोबा उत्सवात केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचा अंतर्भाव न ठेवता दररोज सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा ट्रस्टने यंदाही सुरु ठेवली आहे. 
वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. आरोग्य निधी प्रदान कार्यक्रमाला परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, उद्योजक राहुल येमुल, अमोल येमुल, अभिनेत्री अंजली अत्रे, उद्योजक संग्राम मुरकुटे, वंचित विकास संस्थेच्या तेजस्वीनी थिटे, म्हसोबा ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी वंचित विकास मधील चिमुकल्यांच्या हस्ते म्हसोबारायाची आरती देखील करण्यात आली. 
संदीपसिंह गिल्ल म्हणाले, आपल्या देशाचे भविष्य ही लहान मुले आहेत. त्यामुळे वंचित मुलांच्या अंध:कारमय जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचे काम व्हायला हवे. मुलांना शालेय शिक्षणासोबतच शारिरीक शिक्षण देखील मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण मुलांना प्रोत्साहित करायला हवे. म्हसोबा ट्रस्टने मुलांच्या आरोग्याच्या काळजीसाठी निधी दिला असून हे काम अत्यंत कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

* दीप अमावस्येनिमित्त १ हजार दिव्यांचा दीपोत्सव
सोमवार, दिनांक १७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त १ हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प.पू. कालीपूत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची  आकर्षक आरास यानिमित्ताने  होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

आ. रोहित पवारांची सायकल अज्ञातांनी जाळली .. अधिवेशनाच्या आदल्या दिवशीची घटना

पुणे- आमदार रोहित पवार यांच्या हडपसर येथील जनसंपर्क कार्यालयानजीक पार्क केलेली रोहित पवार यांच्याच मालकीची एक सायकल अज्ञात इसमांनी रात्री जाळल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यावरुन हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर- १०४४/२०२३ भा.द.वि. कलम – ४३५, ४४७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी शोध घेण्याचे काम चालू असून गुन्हयाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी हे करित आहेत
याबाबत पोलिसांनी सांगितले कि, हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे इसम नामे सुनिल महादेव पाटील वय ३० वर्षे, रुम नं. ३०१, तिसरा मजला सी विंग, श्रेयस विहार, पुरंदर कॉलनी, भेकराईनगर पुणे. यांनी पोलीस स्टेशन येथे समक्ष येवुन कळविले की, आमदार रोहित पवार यांचे जनसंपर्क कार्यालय, सृजन निवास, चिनार बेकरीजवळ, मगरपट्टा सिटी हडपसर पुणे येथे ते कामास असून त्याठिकाणी ते त्यांच्या भावाच्या नावावर असलेली कि.रु. २०००/- ची हिरो कंपनीची हिरव्या रंगाची सायकल हि सुनिल पाटील तसेच त्याठिकाणी कामास असलेला रामबहादुर बि के हे दोघेजण त्यांच्या वैयक्तीक कामासाठी वापर करित असतात. त्यांचे कामे झाल्यानंतर ते सायकल जनसंपर्क कार्यालयाच्या बिल्डींगच्या खाली पार्क करित असतात. दि. १५/०७/२०२३ रोजी रात्रीच्या वेळेस सायकल पार्क करुन ते घरी गेले. व दुसऱ्या दिवशी सकाळी येवुन पाहिले असता त्यांना त्यांची सायकल हि जळालेल्या अवस्थेत दिसली..
सदरची सायकल हि आमदार रोहित पवार यांचे मालकीची व त्यांचे वापरातील नसून सदरची सायकल हि त्यांचेकडे काम करणारा इसम नामे सुनिल महादेव पाटील यांचे भावाच्या मालकिची आहे. सदर घटनेमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे अथवा कार्यालायाच्या बाहेर कोणतेही नुकसान झालेले नाही. इसम नामे सुनिल महादेव पाटील यांनी त्यांची सायकल कोणीतरी अज्ञात इसमांनी ऑईल पेन्टच्या सहाय्याने सायकल पेटवुन सायकलचे सिटचे व टायरचे नुकसान केलेबाबत तक्रार दिली आहे.

विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातल्यावर काय म्हणाले शिंदे,फडणवीस आणि अजितदादा ..

बळीराजासह शासन जनसामान्यांच्या पाठीशी:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 16: राज्यातील जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर तसेच संबंधित मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पावसाळी अधिवेशनाकडून सामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत याची जाणीव ठेवून या अधिवेशनातून सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने शासन गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवत असून ‘शासन आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जनसामान्यांना सुलभतेने योजनांचे लाभ मिळवून देत आहे. या उपक्रमात आतापर्यंत 70 लाख लोकांना लाभ मिळाला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर असून मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत 86 कोटी रुपयांचे वितरण गरजूंना करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जनतेला 5 लाखापर्यंतचा उपचार मिळणार आहे. राज्यात सातशे ठिकाणी ‘बाळासाहेब आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. ‘लेक लाडकी’ योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन तर महिलांना एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सवलतीचा निर्णय तसेच 75 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना मोफत एसटी प्रवास ही योजनाही लक्षणीय प्रमाणात यशस्वी झाली आहे. मूलभूत सोयीसुविधांच्या सक्षमीकरणासोबतच राज्याच्या गतीमान विकासाठी अनेक पायाभूत प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत. सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक होतील याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासोबत राज्यात जास्तीत जास्त प्रकल्प आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विधीमंडळाच्या सभागृहात जे जे प्रश्न उपस्थित होतील, त्यांना योग्य न्याय देण्याचे काम शासन करेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सन 2022-23 मध्ये परकीय गुंतवणूकीत (एफडीआय) महाराष्ट्रामधील गुंतवणूक 2.38 लाख कोटींवर गेली असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठीच्या उद्योजकांच्या विश्वासाला अधोरेखित करणारी ही बाब आहे. राज्यात आतापर्यंत समाधारकारक पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या सर्व गोष्टींवर सरकारचे लक्ष असून त्यादृष्टीने अधिवेशन काळात चर्चा केल्या जाईल असे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अधिवशेनात राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यत येईल. तसेच विरोधकांद्वारे विविध आयुधांच्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिल्या जातील. बळीराजासाठी योग्य ते सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याची ते म्हणाले.
यावेळी राज्य शासनाच्या वतीने पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येनिमित्त आयोजित चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर मंत्री, विधीमंडळ सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन-2023
विधान परिषदेत प्रलंबित विधेयके -1
संयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयक -1
पूर्वीचे प्रलंबित विधेयके एकूण -2
प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त)- 10
एकूण -14
पटलावर ठेवावयाचे अध्यादेश -6
(1) सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 1.- महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, 2023 (ग्राम विकास विभाग) (सन 2023 चा महा. अध्या. क्र.1) (जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत देणे)
(2) सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक.2.-महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अध्यादेश, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) (सन 2023 चा महा. अध्या. क्र.2) (सदस्यांच्या सक्रीय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठीची तरतूद)
(3) सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 3.- महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (सुधारणा ) अध्यादेश, 2023 (नगर विकास विभाग) (नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसूदा सादर करण्याचा कालावधी वाढविण्याची तरतूद करणे) (नगर विकास विभाग)
(4) सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 4.- महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा अध्यादेश, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग) (महाराष्ट्र राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यची गरज लक्षात घेता, राज्यात अधिकाधिक गुंतवणुक आकर्षित करणेसाठी तसेच राज्यामध्ये व्यवसाय सुलभीकरण करण्यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेले परवाने, संमती विहीत वेळेत मिळवण्यासाठी तसेच त्याद्वारे उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी एक खिडकी योजनेला वैधानिक दर्जा मिळवण्याची तरतुद करण्याकरिता)
(5) सन 2023 चा महा. अध्या. क्र.5- महाराष्ट्र सहकारी संस्था (दूसरी सुधारणा) अध्यादेश, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग).
(6) सन 2023 चा महा. अध्या. क्र.6- महाराष्ट्र (ग्रामपंचायतींच्या, जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणूकांकरिता) वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे अध्यादेश, 2023 (ग्राम विकास विभाग).
विधान परिषदेत प्रलंबित विधेयके
(1) स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
संयुक्त समितीकडे प्रलंबित
(1) महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग)
प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त)
(1) महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2023 (ग्राम विकास विभाग) (अध्या. क्र. 1 चे रुपांतरीत विधेयक) (जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत देणे)
(2) महाराष्ट्र सहकारी संस्था (दूसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) (अध्या. क्र. 2 चे रुपांतरीत विधेयक) (सदस्यांच्या सक्रीय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठीची तरतूद करणे)
(3) महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (सुधारणा) विधेयक, 2023 (नगर विकास विभाग) (नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसूदा सादर करण्याचा कालावधी वाढविण्याची तरतूद करणे) (अध्या. क्र. 3 चे रुपांतरीत विधेयक)
(4) महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग) (अध्या. क्र. 4 चे रुपांतरीत विधेयक) (महाराष्ट्र राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यची गरज लक्षात घेता, राज्यात अधिकाधिक गुंतवणुक आकर्षित करणेसाठी तसेच राज्यमध्ये व्यवसाय सुलभीकरण करण्यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेले परवाने, संमती विहीत वेळेत मिळवण्यासाठी तसेच त्याद्वारे उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी एक खिडकी योजनेला वैधानिक दर्जा मिळवण्याची तरतुद करण्याकरिता विधेयक)
(5) महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) (अध्या. क्र. 5 चे रुपांतरीत विधेयक)
(6) महाराष्ट्र (ग्रामपंचायतींच्या, जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणूकांकरिता) वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविने विधेयक, 2023 (ग्राम विकास विभाग) (अध्या. क्र. 6 चे रुपांतरीत विधेयक)
(7) महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) (सुधारणा) विधेयक, 2023. (लॉकिंग पिरेड कमी करणे) (गृहनिर्माण विभाग)
(8) महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (कृषि व पदुम विभाग)
(9) महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2023 (वित्त विभाग).
(10) महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2023.

विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला ! असे म्हणत छगन भुजबळांनी धरले शरद पवारांचे पाय; तासभर चर्चा, पवारांचे मात्र मौन

अजित पवारांसह नवनिर्वाचित मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित मंत्र्यांसह शरद पवार यांची आज वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये जाऊन अचानक भेट घेतली. जवळपास पाऊन तास चर्चा झाल्यानंतर हे सर्व नेते बाहेर पडले. पण यात शरद पवारांनी मौन बाळगल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बंडानंतर प्रथमच शरद पवारांच्या भेटीला गेल्यानंतर काही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट पवारांचे पाय धरत विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, अशी विनवणी केली. त्यानंतर सर्वच नेते पवारांच्या पाया पडले. या सर्व घटनेची इनसाइट स्टोरी आता माध्यमांसमोर आली आहे.

अजित पवारांसह नवनिर्वाचित मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी सर्वच नऊ मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले. शरद पवारांना वाय.बी. चव्हाण सेंटरवर अजित पवारांचा गट भेटला. यावेळी छगन भुजबळ पवारांच्या समोर आले आणि विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, असं म्हणत थेट पवारांच्या पाया पडले. त्यानंतर जवळपास सर्वच नेत्यांनी पवारांच्या पाया पडत हात जोडत आम्हाला माफ करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या, अशी भूमिका मांडत विनंती केली.

तासभर झाली चर्चा, पवारांचे मात्र मौन
विठ्ठला सांभाळून घे रे असे उद्गार काढत छगन भुजबळ शरद पवारांच्या पाया पडले. याभेटी दरम्यान जवळपास सर्वच मंत्र्यांनी शरद पवारांच्या पाया पडत हात जोडले. मंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजतेय. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी दिली.

शरद पवार आमचे दैवत : प्रफुल्ल पटेल
शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीविषयी माहिती दिली. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्हा सर्वांचे दैवत आदरणीय शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली. शरद पवार हे बैठकीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये असल्याचं समजलं. त्यामुळे वेळ न मागता आम्ही इथे आलो आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचाही विचार करुन त्यांनी येत्या काही दिवसात मार्गदर्शन करावा अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतले आहे.

शरद पवार काय निर्णय घेणार?
अजित पवार गटातल्या मंत्र्यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनीच सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार यावर काय निर्णय घेणार हे येत्या काळातच समजणार आहे.

अजित पवार आणि नेत्यांनी शरद पवार यांची वेळ घेतली नव्हती. अजित पवारांनी मात्र, अचानक भेट घेत शरद पवारांची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली. तर मार्ग काढण्याची काढावा म्हणत पक्ष एकसंध ठेवण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान जयंत पाटील म्हणाले की, विरोधी पक्षातील जो पक्षाचे सर्वात जास्त आमदार असतात त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो, आमच्यासोबत जवळपास 19 आमदार आहेत. तर कागदावर आमचा पक्ष मोठा असला तरीसुद्धा आमच्यातील 9 आमदारांनी सत्तेत सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता ज्यांच्याकडे सर्वांत जास्त आमदार असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल.

जयंत पाटील म्हणाले की, विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात विरोधकांची बैठक सुरू होती, त्यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी मला फोन केला. यावेळी अजित पवारांसोबत शपथ घेतलेले सर्व मंत्री व नेते भेटायला आले होते. अजित पवार गटाने त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर दिलगिरी व्यक्त केली. तर यातून काही तरी मार्ग दाखवा अशी विनंती केली. मात्र, शरद पवारांनी यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आम्ही सत्तेला पाठिंबा दिला नसल्याने विधानसभा अध्यक्ष बसण्याची व्यवस्था करतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, विरोधी पक्ष म्हणून आम्ही व्हीप बजावणार असून तो सर्व आमदारांनी पाळायला पाहिजे असे मत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली यानंतर राश्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केले आहे.

कोवळ्या वयातील गुन्हेगारीला पायबंद घालून युवा भवितव्य घडविण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीसांचा पुढाकार “ऑपरेशन परिवर्तन”

पुणे-मोबाईलवर दिसणाऱ्या शिवराळ ,हिंसाचाराने ओथंबून वाहणाऱ्या वेबसेरीजेस ,शिक्षणाचे चुकलेले पवित्रे,आसपासच्या परिस्थितीने काळवंडलेली, कुठे भयग्रस्त झालेली मने कोवळ्या वयातच भरकटत राहतात आणि मग बहुसंख्य गुन्हेगारीच्या मार्गावर जीवन जगत राहतात या बदलत चाललेल्या युवमार्गाला कोवळ्या वयातच दिशा देण्यासाठी पुण्याच्या पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
अलीकडच्या काळात शरीराविरुध्द तसेच मालाविरुध्दच्या गुन्हयामध्ये विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा सहभाग मोठया आढळून येत आहे तसेच पुणे शहरातदेखील विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे गुन्हे करण्याचे प्रमाण अधिक असल्याची बाब लक्षात घेवून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने सदर बालकास गुन्हयापासून परावृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन व त्यांचे सामाजीक व शैक्षणीक पुनवर्सन करुन त्यांना त्यांचे आयुष्याची उज्वल सुरुवात करता येईल व त्यांचे हातून पुन्हा गुन्हा होणार नाही समुपदेशन कार्यशाळा आयोजीत करण्याचा निर्धार करुन त्याकरीता रेकॉर्डवर असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचे तसेच गुन्हेगारी मार्गाकडे वळू पाहणा-या बालकाचे तज्ञाकडून दि.०५/०४/२०२३ रोजी तसेच दि.०९/०५/२०२३ रोजी समुपदेशन कार्यशाळा घेवून ८३ बालकांना मार्गदर्शीत केले आहे या तरुणाई कडून वा बालकाकडून तदनंतर पुन्हा गुन्हा घडला नसल्याने सदर कार्यशाळेचे महत्व व त्याचे यश लक्षात घेवून सदर विधीसंघर्षग्रस्त बालकाचे भविष्य सुधारण्यासाठी आता त्यांना कौशल्यपूर्ण व्यावसायीक शिक्षण तसेच ज्यांचे अर्धवट शिक्षण सोडलेल्या बालकांना पुढील शिक्षण देणे, ज्यांचे नुकतेच अठरा वर्षे वय पूर्ण झाले आहे त्यांना त्यांचे कौशल्याप्रमाणे नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच पोलीस आयुक्त यांचे संकल्पनेतून विधीसंघर्षग्रस्त बालकांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी “ ऑपरेशन परिवर्तन” राबविण्यात येत असून याचाच एक प्रयत्न म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी सदर उपक्रम हाती घेतला आहे.
दिनांक १५/०७/२०२३ रोजी आनंद दरबार, दत्तनगर, कात्रज, पुणे याठिकाणी मल्टी जिनिअस प्रोफेशन प्रा. लिमी. पुणे तसेच एस.एम. एंटरप्रायजेस कंपनी, दत्तनगर, पुणे कश्मिरचे रहिवाशी व समोपदेशकार श्री. जाहीद भट, अॅड. रूपाली थोपटे, समाजसेवक व व्यावसायिक विक्रांत सिंग यांचे सहयोगाने विधी संघर्षग्रस्त बालके त्याचे पालक, मोठया गुन्हेगारांकडून गुन्हेगारी क्षेत्रात येणारी लहान मुले, गुन्हेगारांची रिल्स यांना फॉलोअर्स करणारी मुली अशी एकूण १५० बालके व त्यांची पालके यांची कार्यशाळा आयोजीत करुन या बालकाकरिता वेगवेगळे कोर्सेस, भविष्यातील त्यांना रोजगारांची संधी, गुन्हेगारीपासून परावृत्त करणेसाठी समुपदेशन असे उपक्रम घेण्यात आले त्यातील १८ वर्षे पूर्ण असलेल्या ०३ युवकांना जागेवरच रोजगार उपलब्ध करुन देता आले तसेच उपस्थीत बहुतांश बालकाना वरील संस्थेच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण प्रशिक्षण,संगणक तंत्रज्ञान, अर्धवट शिक्षण सुटलेल्या मुलांना पुढील शिक्षणाकरीता निःशुल्क प्रवेश प्रक्रीया सदर जागेवरच राबवण्यात आली सदर कार्यक्रमास स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ २, पुणे शहर, नारायण शिरगावकर, सहा पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, विजय कुंभार यांनी उपस्थीतांना भावनीक साद घालून गुन्हेगारीचे भविष्यातील दुष्परिणाम याबाबत अवगत करुन भविष्यातील चांगल्या वाटचालीसाठी बहमूल्य मार्गदर्शन केले तसेच समुपदेशनकार यांनी त्यांचे उत्कृष्ठ शैलीमध्ये बालक व त्यांचे पालकाना मार्गदर्शन करुन प्रभावित केले त्यामुळे ही बालके व त्यांचे पालक यांनी स्वता:हून पुढाकार घेवून यापुढे त्यांचे हातून कुठलाही गुन्हा अथवा गैरकृत्य होणार नाही अशी हमी दिली या कार्यशाळेच्या माध्यमातून पोलीसांनी नागरिकाना विधी संघर्षग्रस्त बालके यांचे संबधी काही समस्या असल्यास त्यांचेशी संपर्क करणेबाबत आव्हान केले आहे.
सदर विधीसंघर्षग्रस्त बालकासंबधी कार्यशाळा ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह- आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, प्रवीणकुमार पाटील यांचे मार्गदशनाखाली पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ०२ स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर, भारती विद्यापीठ पो स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, पोलीस निरीक्षक गुन्हे, विजय पुराणीक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गिरीश दिघावकर, मल्टी जिनिअस प्रोफेशनल प्रा. लिमी. या कंपनीचे मॅनेजींग डायरेक्टर फिरोज शेख, एस. एम.इंटरप्रायझेस कंपनी, दत्तनगर, पुणेचे डायरेक्टर, प्रशात तांबोळी, समोपदेशक जाहीद भट, अॅडव्होकेट रुपाली थोपटे, समाजसेवक व व्यवसायीक, विक्रांत सिंग व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अधिकारी व अमंलदार यांचे प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला आहे.

छतावरील सौर ऊर्जानिर्मितीत महावितरणकडून ७५ टक्के उद्दीष्ट पूर्ण

मुंबई, दि. १५ जुलै २०२३ : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ला चालना दिली असून घरगुती ग्राहकांनाही सौर ऊर्जा निर्मितीचा लाभ मिळावा, यासाठी मदत करण्याची सूचना महावितरणला केली आहे. राज्यातील वीज ग्राहकांकडून छतावर सौर ऊर्जानिर्मिती करून वीजबिलात बचत करण्याच्या ‘रूफ टॉप सोलर’, योजनेत महावितरणने यंदा ७५ मेगावॅट क्षमता गाठली असून एका वर्षात १०० मेगावॅटचे उद्दीष्ट मुदतीपूर्वीच गाठले जाईल, असा विश्वास महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती. सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करायचा अशी ही योजना आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या अधिक व्यापक व महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने इतर राज्यांना या योजनेप्रमाणे शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्याची सूचना केली आहे. शेतकऱ्यांप्रमाणे घरगुती ग्राहकांनाही सौर ऊर्जा निर्मितीचा लाभ व्हावा यासाठी महावितरण प्रयत्न करत आहे.

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला ‘रूफ टॉप सोलर’साठी १८ जानेवारी २०२४ पर्यंत एक वर्षात १०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट दिले आहे. त्यापैकी ७५.५५ मेगावॅटची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता शुक्रवार दि. १४ जुलै रोजी गाठली गेली. यामुळे ‘रूफ टॉप सोलर’ बसविणाऱ्या ग्राहकांना ७३ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. महावितरणने साडेसहा महिन्यात ७५ मेगावॅटचा टप्पा गाठला आहे. तसेच छतावरील सौर ऊर्जा निर्मितीला वाढती पसंती मिळत आहे, हे ध्यानात घेता केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॅटचे उद्दीष्ट मुदतीच्या आधीच गाठले जाईल.

वीज ग्राहकांनी रूफ टॉप सोलर यंत्रणा बसविल्यास सौर ऊर्जेद्वारे वीज निर्माण होऊन ग्राहकाचे वीजबिल कमी होते. कधी कधी शून्य वीजबिलही येते. ग्राहकाच्या वीजवापरापेक्षा अधिक वीज निर्माण झाली तर ती महावितरणला विकली जाते व त्याचे पैसे ग्राहकाच्या वीजबिलात कपातीच्या स्वरुपात मिळतात. सर्वसाधारणपणे घरगुती ग्राहक तीन किलोवॅट क्षमतेचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसवितात व त्यांना केंद्र सरकारकडून ४३ हजार रुपये सबसिडी मिळते. चार किलोवॅटला ५१ हजार रुपये तर दहा किलोवॅटला ९४ हजार रुपये अनुदान मिळते. गृहनिर्माण संस्थांनी रूफ टॉप सोलर बसविल्यास त्यांनाही अनुदान मिळते व त्यांचा लिफ्ट, पाण्याचा पंप इत्यादीसाठीचा विजेचा खर्च कमी होतो.

रूफ टॉप सोलर बसविण्याबाबत महावितरणने आपल्या वेबसाईटवर सर्व माहिती ग्राहकांना उपलब्ध केली आहे. महावितरण ग्राहकांना सर्व प्रकारची मदत करते. आतापर्यंत राज्यात महावितरणच्या ९३,३२९ ग्राहकांनी रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविले असून त्यांची एकत्रित क्षमता १५८१ मेगावॅट झाली आहे. यामध्ये सबसिडी मिळालेले घरगुती ग्राहक व अन्य ग्राहकांचा समावेश आहे.

राज्यभरातील ३ कोटी घरापर्यंत भाजपा पोहचणार! • चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार

• कामठी विधानसभा क्षेत्रात घर चलो अभियान

नागपूर –भाजपाच्या घर चलो अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील भाजपाचे सर्व नेते व कार्यकर्ते ३ कोटी घरापर्यंत पोहचणार असून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती ते सर्वांना देणार आहेत, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ते कामठी विधानसभा क्षेत्रात आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह घर चलो अभियानात सहभागी झाले. कामठी विधानसभा क्षेत्रातील नागपूर ग्रामीण, कामठी व मौदा तालुक्यातील १५ गावांतील मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, २०१४ नंतर पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या सरकारने मागील ९ वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून समर्थन मिळविण्यासाठी घर चलो अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व आजी माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ता यात सामील होणार आहेत. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेली कामे पूर्ण झाल्याची माहिती जनतेपर्यंत पोहचून आम्ही देत आहोत. मतदारांकडून आम्ही मताचे कर्ज घेतले होते, ते विकासाच्या माध्यमातून परत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

• प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ६० हजार तर लोकसभा क्षेत्रातील साडेतीन लाख व महाराष्ट्रातील ३ कोटी घरांपर्यंत पोहचण्याचा आम्ही निर्धार केला आहे. मतदारांपर्यंत पोहचून ९०९०९०२०२४ या क्रमांकावर कॉल करून मोदीजींसाठी समर्थन मागणार आहोत, असेही ते म्हणाले.

• दिवसभरात पंधरा गावांना भेटी
प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीण तालुक्यातील डोंगरगाव येथून घर चलो अभियानाला सुरुवात केली. दिवसभराच्या दौऱ्यात त्यांनी नागपूर ग्रामीण तालुक्यातील खापरी, खापरी पुनर्वसन, बेलतरोडी, बेसा, पिपळा, हुडकेश्वर, नरसाळा, गोन्हीसीम, बहादुरा, खरबी, कामठी तालुक्यातील बिडगाव, भूगाव, वडोदा व मौदा येथे भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत नागपूर जिल्हा ग्रामीण सरचिटणीस अनिल निधान, अजय बोढारे, सुनील कोढे, नरेश मोटघरे, रमेश चिकटे, डी.डी सोनटक्के, भगवान मेंढे, पूजा धांडे, आदर्श पटले, प्रिती मानमोडे, विद्या मडावी, किशोर बेले, हरीष जैन यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

• नागरिकांत उत्साह, जागोजागी स्वागत
भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांचे भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. विशेषत: महिला व लहान मुलांमध्ये या अभियानाचा विशेष उत्साह दिसून आला. श्री बावनकुळे यांनी घरोघरी पोहचत मोदी सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहितीचे पत्रक दिले व मतदारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. घर चलो अभियानात सहभागी होणाऱ्या कार्यकर्ते व भाजपा समर्थकांचे त्यांनी आभार व्यक्त केला.

राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात याचिका, गुजरात हायकोर्टाच्या शिक्षा कायम निर्णयास आव्हान

नवी दिल्ली- मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी आपल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली आहे. याच प्रकरणात राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने 7 जुलै रोजी नकार दिला होता.उच्च न्यायालयाने म्हटले होते की, या प्रकरणाव्यतिरिक्त राहुल यांच्याविरुद्ध किमान 10 खटले प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत सुरत न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. गुजरात हायकोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले होते.

सुप्रीम कोर्टात राहुल यांच्या याचिकेवरील सुनावणीची तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यास राहुल यांचे सदस्यत्व बहाल केले जाईल आणि ते 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकतील. तसे झाले नाही तर त्यांना 8 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.दुसरीकडे, राहुल गांधींविरोधात बदनामीची तक्रार दाखल करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. मोदी आडनाव प्रकरणात राहुल यांची बाजू तसेच त्यांची बाजू ऐकून घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर 24 मार्च रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास राहुल यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. केरळमधील वायनाड येथून ते लोकसभेचे सदस्य होते. लोकसभा सचिवालयाने एक पत्र जारी करून याबाबत माहिती दिली होती. लोकसभेच्या वेबसाईटवरूनही राहुल यांचे नाव हटवण्यात आले.लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यात न्यायालयाने हा आदेश दिला होता. यापूर्वी न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत आमदार किंवा खासदारांचे सदस्यत्व रद्द न करण्याची तरतूद होती.

….यातून थोडं उद्धवजींनी शिकलं पाहिजे – मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार

मुंबई:- दि. १५ जुलै २०२३

महाराष्ट्रात प्रगल्भ सांस्कृतिक परंपरा आहे. राजकारण एका बाजूला आणि पारिवारिक संबंध एका बाजूला असतात. पवार कुटुंबीय नातेसंबंध जपत असतील; एकमेकांना अडचणीच्या, सुखदुःखाच्या प्रसंगी भेटत असतील तर त्यात काही वावगं नाही. हे शोभनीय आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत दाखवणार आहे. यातून थोडं उद्धवजींनी शिकलं पाहिजे असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला.

आदित्य ठाकरेंना राजकीय कावीळ
आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले,
‘एक सही भविष्यासाठी’ हा उपक्रम युवक विद्यार्थी आणि देशाच्या भविष्यासाठी आहे. ज्यांना कावीळ झाली आहे; त्यांना सगळे पिवळे दिसते. आदित्य ठाकरे यांना ती होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आजकाल पावसानंतरचे आजार पसरत आहेत. राजकीय कावीळ त्यांना का झाली हा प्रश्न मी त्यांना नक्की विचारेल असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना लगावला.

आदित्य ठाकरे ‘इज इक्वल टू’ विद्यार्थ्यांच्या विकासाचा विरोध
राजकारणाची चर्चा करून जे स्वतःचा स्पेस निर्माण करू पाहत आहेत त्या पक्षावर टीका टिप्पणी आलोचना करणार नाही असा अप्रत्यक्ष टोला आ. ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी मनसेला लगावला. त्यांचा विषय आंदोलन राजकीय आहे असेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी विरोधी भूमिका महाराष्ट्रात घेतली आहे. त्यांचे सरकार असताना विद्यापीठाच्या विरोधातले निर्णय घेतले गेले. सर्व निर्णय कुलगुरूंच्या कुलपतींच्या दालनात न होता आदित्य ठाकरे यांच्या दालनात होत होते. विद्यापीठाच्या स्वायत्तेला बट्टा लावण्याचे काम आदित्य ठाकरे यांनी केले आहे. पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी परीक्षाच देऊ नये असा तुघलकी निर्णय त्यांनी घेतला होता. विद्यार्थ्यांच्या माथी कोरोना पदवीधर असा शिक्का मारून संधीपासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंचा होता. विद्यापीठात थेट राजकीय नेमणुका करण्याचा कायद्यातील बद्दल हा आदित्य यांचा होता. त्यामुळे आदित्य ठाकरे इज इक्वल टू विद्यार्थ्यांच्या विकासाचा विरोध असेच म्हणावे लागेल. ते यावर बोलतील अशी आमची अपेक्षा नाही. किमान त्यांच्याकडे थोडे खासदार राहिले आहेत त्यांनी सभागृहात जेव्हा हे विधेयक येईल तेव्हा त्याच्या बाजूने बोलावे एवढे केले तरी खूप होईल असाही टोला आ. ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी लगावला.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘एक सही भविष्यासाठी’ अभियान

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची माहिती

मुंबई दि- १५ जुलै २०२३

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुंबईतील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधणारे ‘एक सही भविष्यासाठी’ हे अभियान सोमवारी सुरू होत आहे अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी थेट त्यांच्याकडे जाऊन जे काम मोदी सरकारने केले आहे तेच पारदर्शकपणे मांडून त्यावर युवकांच्या सूचनाही घेणार आहोत असेही आ. ॲड. आशिष शेलार यावेळी म्हणाले.

याबाबत माहिती देताना आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले की,
मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. ६५ वर्ष काँग्रेसचे राज्य असताना मुंबईकरांना जे मिळाले नाही असे नवीन आयआयएम मुंबईला देण्याची
मान्यता देण्यात आली आहे. नुकतीच मंत्रीमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग, पवई
( नीटी)ला आयआयएम ची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तरुणांना अन्य राज्यात जाण्याची गरज नाही.
मुंबईत ३५० जागा एमबीएच्या घेवुन आयआयएम सुरू होणार आहे.

आता आमचे राजकीय विरोधक तोंड बंद का करून आहेत? असा आमचा सवाल आहे. खोट्या आणि विपर्यास असणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करून मुंबईतून, राज्यातून हे गेले बाहेर ते गेलं बाहेर असं खोटं सांगितलं जातं. केवळ राजकीय स्वार्थासाठी काम करणारे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे असो हे आज मुंबईला आयआयएम आले याच्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. ते आज मूग गिळून गप्प आहेत. मुंबईकरांशी यांचं पुतना मावशीचं प्रेम आहे. अन्य पक्ष राजकारणातले स्कोर सेटल करण्यासाठी काम करतात भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींचे सरकार हे उद्याचे भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत. विकासाचे काम करत आहेत असेही ते म्हणाले.

यावर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यान्वित होईल. रोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम त्यात असतील.
म्हणून स्वाक्षरी अभियानातून आयआयएमची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. अगोदरच्या सरकारच्या काळातील एम्सपेक्षा २१४ टक्के वाढ मोदी सरकारमध्ये झाली आहे. मेडिकलच्या पदव्युत्तर जागांमध्ये ९३ टक्के वाढ झाली आहे. हे मोदी सरकारचे यश आहे. या सर्व बाबी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. मेडिकल पदवी संबंधी जागा ७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सात नवीन आयआयटी आठ नवीन आयआयएम होत आहे. यामुळे जगाच्या पातळीवर भारतीय विद्यार्थी चमकणार आहेत. शहरी बेरोजगारीचा दर ६.८ टक्क्यांनी कमी झाला हे आकडेवारी सांगते. मुंबईला आज भरभरून मिळत असल्याचा आनंद आम्हाला आहे. या सर्व योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी ‘एक सही भविष्यासाठी’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई आणि देशाचे भविष्य घडवण्याचे काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात होत आहे असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले

अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​हिला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये कथलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी (महिला) नामांकन ! 

सात वर्षांत सान्या मल्होत्राने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे आणि या अभिनेत्री ने दंगल, पटाखा, फोटोग्राफ, पगलाईट, लव्ह हॉस्टेल आणि तिचा सर्वात अलीकडील, कथल यासह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. IFFM मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी (महिला) या साठी तिला नुकतेच नामांकन मिळालं आहे हा तिच्या उल्लेखनीय कामाचा पुरावा आहे.

कथल मधील महिला पोलीस इन्स्पेक्टर महिमा बसोर या तिच्या भूमिकेने प्रेक्षक आणि समीक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे आणि तिच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेले आहे. राणी मुखर्जी, ऐश्वर्या राय बच्चन आणि सई पल्लवी यांसारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील काही बड्या अभिनेत्रींसोबत नामांकन मिळणे हा सान्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.IFFM मध्ये सान्या मल्होत्राचे नामांकन इच्छुक अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी प्रेरणादायी आहे. 
https://www.instagram.com/p/Cuq2EPIycbb/?igshid=MTc4MmM1YmI2Ng
जवानच्या मध्ये ती इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेता शाहरुख खान , नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्यासोबत दिसणार आहे. जवानाशिवाय तिच्याकडे विक्की कौशल आणि मिसेससोबत सॅम बहादूर हा चित्रपट देखील आहे.

देहव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी समिती गठित करून प्रस्ताव सादर करावा – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई: देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांनासुद्धा शिक्षणाचा समान अधिकार आहे. या महिलांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी समिती गठित करण्यात येईल. या समितीने प्रस्ताव सादर करावा, असे महिला व बालविकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने आज देहविक्री करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांसाठी ‘कायदा, आरोग्य, व्यवसाय आणि शैक्षणिक आव्हाने’ याविषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांचे शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. या क्षेत्रात सामाजिक कार्य करणे कठीण आहे. या घटकाची परिस्थिती बदलणे आवश्यक असून सामाजिक संस्था करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, भारतीय संविधानाने सर्वांना समानतेचा आणि शिक्षणाचा अधिकार दिला आहे. देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांनाही शिक्षणाचा अधिकार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी शासन, पोलीस यंत्रणा यांच्यासमवेत नागरिकांनीही सहभागी होणे आवश्यक आहे. याविषयावर राष्ट्रीय, राज्य महिला आयोग आणि पोलिसांनी सामंजस्याने काम केल्यास या महिलांना जलद न्याय मिळू शकेल. हे आपले सामाजिक उत्तरदायीत्व असल्याचेही त्यांनी सांगितले.

या महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवर काम करणे आवश्यक असून राज्य शासनाने या महिलांसह त्यांच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू करावीत, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान देह व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांनाही सन्मानाने जगण्याचा समान अधिकार आहे. असे प्रतिपादन आज महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. नारनवरे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य मीनाक्षी नेगी, डॉ. रमण गंगाखेडकर, विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पांडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड (ठाणे), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संग्राम संस्थेच्या ॲड. ओड्रे डिमेलो, प्रा. डॉ. श्रीकला आचार्य, पत्रकार दृष्टी शर्मा यांनीही आपले विचार व्यक्त केले.

उपेक्षित समाजाकडे बघतो तो खरा सामाजिक कार्यकर्ता-आ.रवींद्र धंगेकर

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे तृतीयपंथीयांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत
पुणे : विविध संस्थांकडून होणा-या उत्सवांतून पुणे शहराची उंची वाढते. केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा अंतर्भाव न ठेवता उत्सवांमध्ये मोठया प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविले जातात. उपेक्षित समाजाकडे बघणा-या या संस्था व व्यक्ती हेच खरे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पुण्यातील ही परंपरा अशीच यापुढेही सुरु रहावी, असे मत आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले. 
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये शुक्रवार पेठेतील यल्लमा देवदासी संस्था आणि मंगल मुखी किन्नर चॅरिटेबल संस्थेतील तृतीयपंथीयांच्या हस्ते म्हसोबारायाची आरती करण्यात आली. तसेच तृतीयपंथीयांना ५१ हजार रुपयांची मदत देखील देण्यात आली. 
कार्यक्रमाला कर्वे रस्ता रांका ज्वेलर्सचे संचालक ओमप्रकाश रांका, माजी नगरसेवक योगेश समेळ, सुशिला नेटके, तुषार रायकर, सौरभ अमराळे, यल्लमा देवदासी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब कुंभार, मंगल मुखी किन्नर चॅरिटेबल संस्थेच्या अध्यक्ष रंजीता नायक, म्हसोबा ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
ओमप्रकाश रांका म्हणाले, म्हसोबारायाचे दर्शन घेऊन पुढील १२ महिने जोमाने काम करण्याची शक्ती मिळते. ट्रस्टने राबविलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून आमच्याकडून देखील २१ हजार रुपयांची मदत तृतीयपंथीयांना देत असल्याची घोषणा त्यांनी केली. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना आॅनलाईन देखील पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

अपारशक्ती खुराना याला मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) मालिकेसाठी नामांकन ! 

अभिनेता अपारशक्ती खुराना हा एक प्रतिभावान कलाकार मानला जातो. अॅमेझॉन प्राइम ची वेब सिरीज ज्युबिली मधील मदन कुमार यांच्या भूमिकेने सगळ्यांचं  लक्ष वेधून घेतले आहे. मेलबर्नच्या प्रसिद्ध भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFM) सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) मालिका श्रेणीतील नामांकन या अभिनेत्याला मिळाल आहे.
IFFM मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) मालिकेसाठी त्याचे नामांकन त्याच्या चाहत्यांना साठी अनोखी बाब आहे. 1940 च्या दशकातील स्टार मदन कुमार यांच्या भूमिकेचे चाहत्यांनी आणि समीक्षकांनी खूप कौतुक केले होते. भारतीय मनोरंजन उद्योगातील काही सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये त्याला नामांकन मिळाले आहे. या श्रेणीमध्ये अभिषेक बच्चन, विजय सेतुपती, शाहिद कपूर, त्यांचे सहकलाकार प्रोसेनजीत चॅटर्जी आणि सिद्धांत गुप्ता आणि विजय वर्मा यांसारखे कुशल अभिनेते आहेत.
https://www.instagram.com/p/CuqrymdyOog/?igshid=MzRlODBiNWFlZA%3D%3D
स्त्री 2 ची चर्चा सुरू असताना या अभिनेत्या कडे बर्लिन हा चित्रपट देखील आहे.ज्युबिलीचे लेखक अतुल सबरवाल यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केले आहे आणि अॅप्लाज एंटरटेनमेंट सोबत ‘फाइंडिंग राम’ नावाचा डॉक्युमेंट्री त्यांच्या किटीमध्ये आहे.