Home Blog Page 1445

महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार: झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण

नवी दिल्ली 25: सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसिध्द तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, सुप्रसिध्द भारतीय सैध्दांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपुर यांना पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून प्रसिध्द तबला वादक, झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिध्द गायिका सुमन कल्याणपुर, प्रसिध्द उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच भिकू रामजी इदाते व गजानन माने यांना समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी, शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (मरणोपरांत) यांना व्यापार व उद्योग क्षेत्रात, कला क्षेत्रात गडचिरोलीतील सुप्रसिध्द झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिध्द सिने अभिनेत्री रवीना टंडन व कुमी वाडिया यांना पद्मश्री जाहिर झाला आहे.

महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानासाठी दोन मान्यवरांची निवड झाली आहे, यात साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांचा समावेश आहे.या वर्षी एकूण 106 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह 19 महिला तर 02 हे परदेशी नागरिक आहेत. 7 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.


प्रकाश आंबेडकरांचाआरोप:म्हणाले – शरद पवार आजही भाजपसोबतच, लवकरच समजेल!

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकरांनी एक धक्कादायक विधान केले आहे. ”शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत. हे लवकरच समजेल असा दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. विशेष म्हणजे हा दावा करण्यापूर्वी ​​​​​​दोनच दिवसांआधी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती झाली व ठाकरे गट हा पवारांसोबतच महाविकास आघाडीचे घटक आहेत.

शरद पवारांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्ताचा दाखला दिला. ते म्हणाले की, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर मुलाखत दिली होती. तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, मला लोक दोष का देतात? हे तर आमच्या पक्षाचे ठरले होते. मी फक्त सर्वात आधी गेलो. हे लोकसभेआधीच आमचे ठरले होते. हा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

भाजपविरुद्ध सर्व विरोध पक्षांना एक करण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केला या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही प्रयोग केला. आताच्या असलेल्या प्रयोगात शिवसेनेला भाजपला सोडून बाहेर पडायचे होते. मी त्यावेळीही म्हणालो आजही म्हणतो की, शिवसेनेने काही तरी करून ती सत्ता आपल्या हातात ठेवून जर ते चालले असते, तर सरकार पडले नसते. सत्तेची गरज ही काँग्रेस-राष्ट्रवादीला होती, शिवसेनेला नाही.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे बदलले हे मी म्हणणार नाही. दोघांत भांडण आहे. दोघेही हिंदुत्ववादी आहेत. मी जे भांडण म्हणतोय त्यात वैदीक हिंदु आणि संत हिंदु परंपरा हा असा आहे.

शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून लोणावळा लोकल सेवा सुरु करण्याच्या खासदार बापट यांच्या मागणीला यश

पुणे दि. 25 : खासदार बापट यांनी केलेल्या मागणीवरुन शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरु करण्यास रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली असून ३० जानेवारी पर्यंत बापट यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असून पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरु होणार आहे.
खासदार बापट यांनी सांगितले की पुणे रेल्वे स्टेशन येथून परराज्यात लांब पल्याच्या गाड्यांनी तसेच पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढत आहे. यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड ताण येत असून स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना वेळेत स्टेशनवर पोहचणे अवघड होते. तसेच पुणे रेल्वे स्टेशनवर इतर मुलभूत सुविधांवरही ताण येत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करता पुणे रेल्वे स्टेशन वरील ताण कमी करण्यासाठी शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर स्टेशन वरून लोकल तसेच बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्यास पुणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होऊन पुणे स्टेशन वरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत मी मागील काही वर्षे होणाऱ्या सर्व बैठकांमध्ये तसेच प्रशासनाकडे वेळोवेळी काही रेल्वे गाड्या शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर स्टेशन येथून सुरु करण्यासाठी मागणी केली.
शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर स्टेशनवर नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध देण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन शिवाजीनगर ते लोणावळा या मार्गावर सध्या चार लोकल गाड्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून सुरू करणार आहे. याबाबतची सर्व तयारी रेल्वे प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून येत्या तीन चार दिवसांमध्ये खासदार बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे  पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले

पुणे  : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे   २५ ते २९ जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले असून. प्रदर्शनाचे उद्‍घाटन आज  खासदार श्रीनिवास पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले . या वेळी संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे आणि विश्वस्त अनुपमा बर्वे ,श्रीनाथ कवडे ,सुमन किलोस्कर , प्रशांत काळे , प्रशांत चव्हाण ,आदी मान्यवर उपस्थित होते . ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया  या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे..  या वर्षीचे प्रदर्शन संस्थेचे मा. अध्यक्ष स्व. श्री. राहुल बजाज यांच्या स्मृतीस अर्पित करीत आहोत.

पुष्पप्रदर्शन २६ ते २९ जानेवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल असणार आहेत.

यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विविध झाडे, वेली नटलेले एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली बहरलेले असून लवकरच पुणेकरांना यांचा आनंद घेता येणार आहे.
संस्थेमार्फत अगदी १०० वर्षापूर्वीपासून जनमानसात निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने पुष्पप्रदर्शने भरविली जात होती. मध्ये काही कालावधीचा खंड वगळता संस्थेने आजवर ती परंपरा कायम ठेवलेली आहे.

बागेमध्ये पुन्हा नव्याने पुष्पप्रदर्शन भरविण्यास जानेवारी, १९९८ सालापासून सुरूवात झाली. अगदी पहिल्या प्रदर्शनापासून पुणेकरांनी यास उस्फूर्त प्रतिसाद दिला.

पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात.या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती इ. गोष्टींचा समावेश असतो.
पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेस निरनिराळ्या शाळांमधून सुमारे १००० विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदाच्या वर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवार दि. २२ जाने. २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

पुष्पप्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षीदेखील) जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील,

एरवी केवळ पानांनी, वेलींनी व हिरवाईने नटलेली एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

नाल्यांना फाशी दिले आता नदीच्या वहन क्षमतेवर हल्ला चढविणार काय ?

…तोपर्यंत नदी सुधार प्रकल्पाचे काम बंद ठेवा सांगूनही आयुक्त ऐकत नाहीत -नेमके दडलंय तरी काय ?

पुणे : विशिष्ट लॉबी हाथी धरून महापालिकेचा कारभार फारच चांगला आहे अशी शोखी मिरवीत काम करणाऱ्या महापालिका आयुक्तांनी पुण्यातील खासदार ,आणि पर्यावरण क्षेत्रातील ,तसेच प्रसार माध्यम क्षेत्रातील अनेकांचा विरोध डावलून त्यांच्या शकांना उत्तरे देण्याऐवजी काही हजार कोटीचा नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प रेटण्याचे काम सुरूच ठेवल्याने आयुक्त आणि त्यांच्या भवतालचे मधमोहोळ संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे महापालिकेतील वर्तुळात बोलले जात आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काॅंगेसच्या खासदार वंदना चव्हाण,नितीन कदम,प्रदीप देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाबाबत विविध मुद्दे पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत .

राष्ट्रवादी काॅंगेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना केली. प्रवक्ते प्रदीप देशमुख , नितीन कदम यासंदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले कि,’सदोष असलेला मुळा मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यास राष्ट्रवादी अर्बन सेलचा आक्षेप असून प्रकल्प मुळात तांत्रिक दृष्ट्या सदोष असल्याने व त्यामुळे पुणेकरांवर गंभीर नैसर्गिक संकट ओढवण्याची शक्यता असल्याने हा प्रकल्प नागरिकांच्या पाठींब्याने होत आहे असे दर्शविण्याचा प्रशासनाचा अट्टहास दिसत आहे.” Pune re” ही मोहीम महानगरपालिकेने ताबडतोब मागे घ्यावी, अशी आमची मागणी आम्ही थेट आयुक्तांपर्यंत पोहोचविली आहे.

चव्हाण यांनी नमूद केले की, पुणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या मुळा मुठा नदी सुधार व सुशोभीकरण योजनेसंदर्भातील त्रुटी व धोके राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आपल्या निदर्शनास आणले होते. यासाठी पुणेकर नागरिक व पुणे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तज्ञाकडून प्रकल्पाचे सादरीकरण देखील आयोजित केले होते. या प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे आम्ही आपणास वारंवार सूचित करत आलो. राज्य शासनाच्या पातळीवर देखील अनेक तज्ञ पुणेकरांच्या वतीने या शंका मांडल्या गेल्या होत्या व जोपर्यंत या शंकाचे निरसन होत नाही तोपर्यंत नदी सुधार प्रकल्पाचे काम बंद ठेवावे असे ठरले. आता दुर्दैवाने पुणे मनपाच्या वतीने हा प्रकल्प पुढे रेटण्याचे काम सुरु आहे.

चव्हाण यांनी नमूद केले की काही नागरिकांनी आमच्या निदर्शनास आणून दिले आहे की पुणे महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत योजनेस नागरिकांचा पाठिंबा असल्याचे दर्शवण्यासाठी नागरिकांचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत आहे. असा प्रयत्न अत्यंत धक्कादायक व निंदनीय आहे. पुणे शहरातील इतर महत्वपूर्ण प्रकल्पासाठी नागरिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत व त्यांच्या भावनेचा कुठेच आदर केला जात नाही. मात्र आता लहान मुलांना वेठीस धरून बक्षिसांची आमिष दाखवून, त्यांची दिशाभूल करून त्यांचा माध्यमातून त्यांच्या पालकांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत असून ते चुकीचे व आक्षेपार्ह आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन

0

पुणे, दि. २५: विभागीय आयुक्त कार्यालयात १० हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या मॉड्युलर बायोगॅस प्रकल्पाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोंदार्डे, रामचंद्र शिंदे, राहुल साकोरे, सह आयुक्त पूनम मेहता उपस्थित होत्या.

विभागीय आयुक्त राव म्हणाले, हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याने उपयुक्त आहे. यामध्ये दररोज १०० किलो कचरा जिरवला जाणार आहे. आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेल्या उपहारगृहातील ओला कचरा या बायोगॅस प्रकल्पासाठी वापरला जाणार असून ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरितीने होणार आहे.

ते पुढे म्हणाले, विभागीय आयुक्त कार्यालय, कष्टकरी पंचायत व वायू कंपनीच्या संयुक्त प्रयत्नाने हा प्रकल्प सुरु करण्यात आला असून असे प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद आदी ठिकाणी कार्यान्वित करावेत. तसेच पुणे विभागातील अन्य सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी कायालयातही प्रकल्प सुरु करावा, असे सांगून प्रकल्प राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडवल्या जातील याकडे लक्ष द्यावे. तसेच इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, अशा सूचनाही श्री. राव यांनी दिल्या.

यावेळी आयुक्त राव यांनी प्रकल्पाची पाहणी करुन माहिती घेतली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला विशेष संस्थात्मक योगदान पुरस्कार

मुंबई, दि.25 : लोकशाहीमध्ये निवडणुका महत्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे. प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, कुलसचिव विलास नांदवडेकर, उपसचिव मनोहर पारकर यांच्यासह मिलिंद बोकील, सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, डॉ.सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, डॉ.उज्वला चक्रदेव आदी पाहुणे उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक कार्यात योगदान देणाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे प्रसिद्धीसाठी नेहमीच अग्रेसर असते. राज्याच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि त्याचे अधिनस्त कार्यालय हे निवडणूक कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्राथम्याने करते. त्यामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना विशेष संस्थात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

निवडणूक कार्यात राज्यातील अधिकारी वर्गाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी शण्मंगराजन (वाशिम), रूचेश जयवंशी (हिंगोली), अशोक शिनगारे (ठाणे), डॉ.विपिन इटनकर (नागपूर), डॉ.राजेंद्र भोसले (अहमदनगर) आणि राजेश देशमुख (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन (वाशिम), दिलीप कच्छवे (हिंगोली), श्रीमती अर्चना कदम (ठाणे), श्रीमती मिनल कळसकर (नागपूर), जितेंद्र पाटील (अहमदनगर), पुण्याच्या श्रीमती आरती भोसले आणि श्रीमती मृणालिनी सावंत यांना विभागून पुरस्कार देण्यात आले.

त्याचप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कारात गणेश राठोड (मेहकर, जि.बुलडाणा), धीरज मांजरे (कारंजा, जि.वाशिम), डॉ.सचिन खल्लाळ (वसमत, जि.हिंगोली), श्रीमती क्रांती डोंबे (कळमनुरी, जि.हिंगोली), राहुल मुंडके (पनवेल, जि.मुंबई उपनगर), श्रीमती वैष्णवी बीष्वा (भाप्रसे)(तुमसर, जि.भंडारा), संदीप भस्के (ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर), श्रीमती ज्योती कावरे (सिन्नर, जि.नाशिक), डॉ.शशिकांत मंगरूळे (संगमनेर, जि.अहमदनगर), सुशांतकिरण बनसोडे (कागल, जि.कोल्हापूर) आणि गणेश मरकड (पलूस कडेगाव, जि.सांगली) या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे असल्याने समाजमाध्यमावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडणूक कार्यालयाचा गौरव करण्यात आला. यात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, शिवडी, जत आणि कोल्हापूर उत्तर यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे उत्कृष्ट मतदार मित्र पुरस्कारात किन्नर मॉ ट्रस्ट व कोरो इंडिया या सामाजिक संस्थाचा गौरव करण्यात आला. निवडणुकीचे वार्तांकन करून जनजागृती करणारे लोकसत्ताचे पत्रकार निखिल अहिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात लोकशाही दिंडी, पथनाट्य, रांगोळी प्रदर्शन, मतदार जागृती दालन, ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण, शपथ घेणे, ओळखपत्राचे वाटप, अहवाल प्रकाशन आदी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले तर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आभार मानले.
000

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

पुणे दि.२५-जिल्हाधिकारी कार्यालयात १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचा सत्कार करण्यात आला.

अपर जिल्हाधिकारी विजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे, डॉ.पी.ए.इनामदार, तहसीलदार स्वाती रेडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.मोरे म्हणाले,लोकशाही व्यवस्थेत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारतात निवडणूका मुक्त आणि निष्पक्ष होण्याचे श्रेय निवडणूक यंत्रणा आणि सर्वसमावेशक मतदार यादीला आहे. देशात लोकशाही रुजल्याने देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव आणि तपशील तपासावा आणि पात्र युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. प्रास्ताविकात श्रीमती रेडकर यांनी राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाबाबत माहिती दिली. ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’ ही संकल्पना यावर्षी मतदार जागृतीसाठी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मतदार नोंदणी शिबिर आयोजनासाठी सहकार्य करणारी महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी यांना यावेळी गौरविण्यात आले. मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण आणि छायाचित्र मतदार यादी तयार करण्यात चांगली कामगिरी करणारे मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी,नायब तहसीलदार, केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित

पुणे दि. २०: पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते. यावेळी देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाचा या वर्षाची संकल्पना ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’, अशी आहे. यावेळी प्रख्यात निर्देशक सुभाष घई द्वारा निर्मित ‘मैं भारत हॅुं’ या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राशी संवाद साधताना ते म्हणाले, आजचा महत्वाचा दिवस आहे. तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस आज आपण या ठिकाणी साजरा केला आणि सर्व देशामध्ये दहा लाख पेक्षा जास्त ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत, मी आजच्या मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधील आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामधील ८० लाख मतदारांना शुभेच्छा देतो, त्यांचा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाचे आम्ही आभार मानतो. पुणे जिल्ह्यामधील आमच्या सर्व टीमने गेल्या दोन वर्षांमध्ये मतदार यादी आणि निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या परिश्रमाची फलश्रुती आज मिळाली आणि आज आमच्या सगळ्या टीमला माझ्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखापेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली, विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यात युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष देण्यात आले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हाधिकारी यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.

यावेळी ‘इलेक्टिंग द फर्स्ट सिटिजन- एन इलेस्ट्रेटेड क्रॅानिकल ऑफ इंडियाज प्रेसिडेंशियल इलेक्शन’ पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना भेट स्वरूपात देण्यात आली.  राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते एकूण १३ राष्ट्रीय पुरस्कार वितरित करण्यात आले. 

चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार! पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रमुख

पुणे-आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. तसेच भारतीय जनता पक्ष जगताप कुटुंबियांच्या पाठिशी सदैव खंबीर उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाची पूर्वतयारी आढावा बैठक आज झाली. या बैठकीला शहर अध्यक्ष महेश लांडगे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा नेते शंकर जगताप, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, आ. उमाताई खापरे, माजी महापौर माई ढोरे यांच्यासह पिंपरी चिंचवड मधील भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पूर्वतयारी आढावा बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नामदार पाटील म्हणाले की, “लक्ष्मण जगताप हे जनमानसात अतिशय लोकप्रिय होते. आपल्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनी जनमानसात आपलं वेगळं स्थान कायमस्वरूपी निर्माण केलं आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र तरीही गाफिल न राहता, पक्षाने ‘थिंक इन अँडव्हान्स थिंक इन डिटेल’मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअनुषंगाने काम सुरू केले आहे.”

पाटील पुढे म्हणाले की, “चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समिती स्थापन केल्या असून, त्यात संघटनात्मक कामांसाठी ‌पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्या नेतृत्वात एक समिती काम करेल. तसेच पोटनिवडणुकीच्या व्यवस्थेसाठी व्यवस्थापक प्रमुख म्हणून बापू काटे यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नामदेव ढाके हे त्यांना साहाय्यक म्हणून काम करतील. त्यासोबतच महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वात एक राजकीय समिती स्थापन केली असून, महेशदादांच्या नेतृत्वात चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतील.

ते पुढे म्हणाले की, लक्ष्मणभाऊंच्या निधनानंतर ही भाऊंच्या कुटुंबावर सर्वांचे प्रेम कायम आहे. शंकरभाऊ आणि वहिनीं यांनीही इथल्या जनतेसोबतचं आपलं नातं अतुट ठेवलं आहे. भारतीय जनता पक्ष जगताप कुटुंबियांच्या पाठिशी खंबीर उभा आहे‌. तसेच पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाची कार्यसमिती निश्चित करते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत

मुंबई,दि.२५ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास  विकास महामंडळामार्फत  वैयक्तीक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत मराठा प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात आहे.  या योजनेची कर्ज मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती महामंडळामार्फत प्रसिद्धीद्वारे देण्यात आली आहे.

मराठा प्रवर्ग व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील उमेदवारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांमार्फत उद्योगधंदे  उभारण्याकरीता आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न या योजनांमार्फत केला जाणार आहे.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत (IR-I) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. या योजनेकरीता वयोमर्यादा कमाल ६० वर्षे आहे.  या योजनेची मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यंत वाढविण्यात आलेली असून, महामंडळामार्फत रु. ४.५  लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा व व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त ७ वर्ष व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. १२% असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी  उद्योगाच्या दृष्टीने बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे.

तसेच, गट कर्ज व्याज परतावा (R-II) योजने अंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीच्या गटास कर्ज देण्यात येते. दोन व्यक्तीसाठी कमाल रु. २५ लाखाच्या मर्यादेवर, किंवा तीन व्यक्तीसाठी रु. ३५ लाखाच्या,  चार व्यक्तीसाठी रु. ४५ लाखाच्या किंवा पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. ५० लाखापर्यंतच्या व्यवसाय उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यंत १२ टक्के व्याज किंवा रु १५ लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

या योजनेमध्ये FPO गटांनी त्याच्या  शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल.

महामंडळाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा हे महामंडळ नियमानुसार करीत आहे. सदर योजनांची अंमलबजावणी २ फेब्रुवारी, २०१८ पासून सुरु करण्यात आली असून, सद्यस्थितीत कालानुरूप व लाभार्थीभिमुख अनेक बदल योजनामध्ये केलेले आहेत.

‘पठाण’ : 25 सिंगल स्क्रीन पुन्हा सुरू,कोविड पासून होते बंद …

शाहरुख म्हणाला – तुम्हा सर्वांना आणि मला यश मिळो

पठाण चित्रपटासोबतच 25 सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलही पुन्हा सुरू झाले आहेत, जे कोविडच्या काळात काही कारणास्तव बंद पडले होते. यावर आनंद व्यक्त करत शाहरुखने सोशल मीडियावर ट्विट करत त्या सर्व सिंगल स्क्रीन्सना शुभेच्छा दिल्या आहेत.सोबत त्याने २५ सिंगल स्क्रीन ची नावे दिली आहेत . शाहरुखने लिहिले, ‘लहानपणी मी सर्व सिनेमे सिंगल स्क्रीनवर पाहिले आहेत. त्यांची स्वतःची मजा आहे. तुम्हा सर्वांना आणि मला यश मिळो अशी मी प्रार्थना करतो. रिओपनिंगबद्दल अभिनंदन.

‘पठाण’ सिनेमागृहातील गर्दीचा व्हिडीओ शेअर करून जीतेंद्र आव्हाडांनी केला सवाल ….

मुंबई- शाहरुख खानच्या ‘पठाण ‘ या सिनेमाची अलीकडच्या काळात खूपच चर्चा झाली आणि त्यामुळे प्रसिद्धीही झाली , अनेक ठिकाणी या चित्रपटाला सातत्याने विविध स्तरावरून विरोधाच्या चर्चा झडल्या . आज हा सिनेमा प्रदाशित झाला आणि या चित्रपटाचे दर्शक सिनेमागृहात दाखविणारा एक व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट र वर शेअर करत सवाल केला आहे.

पठाण” पाहणारे कुठल्या जाती धर्माचे आहेत हे कळतय का? हा माझा “भारत”आहे…. प्रेमाच्या धाग्यानी विणलेला द्वेशाची तलवार चालवली तरी वीण सैल ही होत नाही तुटणे तर लांबचे … मी भारतीय आहे कृपया सर्टिफिकेट विचारू नका.. असे या ट्वीट मध्ये आवदांनी म्हटले आहे .

या मध्ये त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ आणि त्यात सिनेमागृहात दिसणारी गर्दी लक्षणीय तर आहेच पण अचंबित करणारी देखील आहे.

पठाण :’KGF-2’चा 5 लाख तिकिटांचा विक्रम मोडत दाखल

शाहरुखवर वरचढ जॉन अब्राहमची अ‍ॅक्शन

बॉलिवूडचा किंग अर्थातच शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठान’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही ‘पठाण’ने ‘KGF-2’चा 5 लाख तिकिटांचा विक्रम मोडित काढला आहे. तर दुसरीकडे चित्रपटाला अनेक ठिकाणी निषेधही होतोय.

  • चित्रपट – पठाण
  • वेळ – 146 मिनिटे
  • दिग्दर्शक– सिद्धार्थ आनंद
  • कलाकार– शाहरुख खान, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा

चित्रपटाची कथा:
चित्रपटाची कथा आहे एका माजी भारतीय एजंटची, ज्याचे नाव आहे जिम. त्याच्या कुटुंबाला त्याच्या डोळ्यांदेखत मारण्यात येते. कारण भारत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत नाही. जिम मारला गेला, असे गृहीत धरून भारत सरकार त्याला शौर्य पुरस्काराने सन्मानित करते. पण जिम जिवंत असतो. काही काळानंतर, आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जिम पाकिस्तानशी हातमिळवणी करतो आणि भारताविरोधात लढण्यासाठी बायोलॉजिकल शस्त्र तयार करतो.

भारताकडून जिमला रोखण्यासाठी पठाण आणि त्याची टीम सज्ज असते. मिशनदरम्यान पठाण डॉ. रुबिना खानला भेटतो, ज्यामुळे पठाणचे मिशन अधिक कठीण होते. आता पठाण बलाढ्य जिमला कसे अडवणार? तो त्याला रोखू शकणार की नाही? हीच या चित्रपटाची कथा आहे.

स्टार्सचा अभिनय :
पठाणच्या भूमिकेत शाहरुख खान शोभून दिसतोय. त्याला अभिनयाला तोड नाही. शाहरुखने आपल्या अ‍ॅक्शन सीनने सर्वांना इम्प्रेस केले आहे. दीपिका पदुकोणचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे, पण तिच्या वाट्याला दमदार संवाद आलेले नाहीत. तिला पाकिस्तानी डॉक्टर ते आयएसआय एजंटची भूमिका देण्यात आली आहे. पण तिच्या भूमिकेला पाकिस्तानी टच दिसत नाही. शिवाय तिच्या पाकिस्तानी एक्सेंटकडेही लक्ष देण्यात आलेले नाही.

डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेला चोख न्याय दिला आहे. इथे उत्तम भूमिका जॉन अब्राहमची आहे. इंटेंस लूक आणि दमदार संवाद जॉनच्या पात्राला देण्यात आले आहेत. जॉनचे पात्र जेव्हा-जेव्हा आले, तेव्हा ते शाहरुखवर भारी पडलेले दिसले. त्याची अॅक्शन शाहरुखवर वरचढ ठरलेली दिसते. चित्रपटातील जॉनची डायलॉग डिलिव्हरी अप्रतिम आहे.

दिग्दर्शन, पटकथा
दिग्दर्शनाबद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ आनंदचे दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. सगळी दृश्ये छान मांडली आहेत. पटकथेच्या बाबतीत हा चित्रपट उत्कृष्ट बनवला गेला आहे, त्यात उणीवा शोधणे कठीण आहे.

संगीत :
पठाणचे पार्श्वसंगीत अगदी फ्रेश आहे. संगीताचा अतिवापर केलेला नाही, हा त्याचा प्लस पॉइंट आहे. पठाणचे अँथम काही ठिकाणीच वापरले गेले आहे. प्रत्येक दृश्यासाठी नवीन संगीत, प्रत्येक सीन फ्रेश बनवते.

VFX आणि स्पेशल इफेक्ट्स
अ‍ॅक्शन सीन्समधील उच्च दर्जाचे VFX तुम्हाला तुमच्या जागेवर खिळवून ठेवतात. सीन्स खोटे आहेत, असे तुम्हाला कुठेही वाटणार नाही, हा त्याचा प्लस पॉइंट आहे. अ‍ॅक्शन सीन्स लक्ष वेधून घेणारे आहेत.

सलमान येथे काही मिनिटांच्या कॅमिओमध्ये दिसतो, जो संथ चित्रपटाचा वेग वाढवतो. इथे सलमान टायगर बनून मित्र पठाणला मदत करतो. इथे आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ही कथा मिशनपासून सुरू झाली आणि मिशनवरच संपते. संपूर्ण चित्रपटात एकच गाणे आहे आणि ते म्हणजे बेशरम रंग. याशिवाय चित्रपट संपल्यानंतर दुसरे गाणे पाहायला मिळते.

कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीची तारीख अचानक बदलली:आता 26 फेब्रुवारीला होणार मतदान; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

पुणे-

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. बारावीची परीक्षा असल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात पुण्यात होत असलेल्या निवडणूका केंद्रस्थानी आहेत. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने काही दिवसांपूर्वी केली होती. तेव्हापासून या दोन्ही निवडणूका बिनविरोध व्हाव्या यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र महाविकास आघाडीतही जोरदार खलबत सुरु आहेत.

26 फेब्रुवारीला मतदान होईल

निवडणूक आयोगाने याआधी 27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 2 मार्च रोजी मतमोजणीची तारीखही निश्चित केली होती. मात्र बारावी आणि इतर परीक्षा असल्यामुळे मतदानासाठी केंद्र उपलब्ध होणे अवघड आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एक दिवस आधीच मतदान घेण्याचे ठरले आहे. आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होईल. या पोटनिवडणुकीचा निकाल ठरल्याप्रमाणे 2 मार्च रोजीच जाहीर होईल.